STORYMIRROR

Pandit Warade

Horror Crime Thriller

2  

Pandit Warade

Horror Crime Thriller

झपाटलेले घर (भाग-२५)

झपाटलेले घर (भाग-२५)

5 mins
75

रमेशच्या मृत्यूच्या बातमी नंतर सावंत कॉलेज मध्ये जाऊन गीताला भेटले. ती रमेशची जवळची मैत्रीण असूनही रमेशने केलेल्या कुकृत्याचा पाढा तिने सावंतांसमोर वाचला. त्याला कारणही तसेच होते. राधिके पासून सुजीतला दूर करण्याची खास कामगिरी रमेशने तिच्यावर सोपवली हाती आणि ती पार पाडतांना तिचीच विकेट पडली होती, तीच सुजीतच्या प्रेमात गुंतत गेली होती. सुजीत आणि राधिकेच्या हत्येची बातमी जेव्हा रमेशने तिला सांगितली तेव्हा तिला दुःख जरूर झाले होते, रमेशचा भयंकर रागही आला होता. परंतु रमेशच्या कपटी, क्रूर स्वभावाची माहिती असल्यामुळे त्याच्या विरुद्ध काही बोलण्याची हिंमत ती करू शकली नव्हती.राधिकेच्या अतृप्त आत्म्याशी झालेल्या भेटीमुळे तिच्या मनात धैर्य निर्माण झाले होते, तसेच इन्स्पेक्टर सावंतांना पाहून धीर येऊनच तिने माहिती पुरवली होती.

  इन्स्पे. सावंत गीताचा जवाब घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसले होते. सहज साधी, अपघाताची वाटणारी केस आता आणखी गुंतागुंतीची होत चालली होती. प्रमुख आरोपीचे नाव कळूनही काही करता आले नव्हते, त्याला ते शिक्षा देऊ शकले नव्हते. त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला राधिकेनंच दिली होती, पाण्यात बुडवून देहांताची शिक्षा त्याला दिली होती. आता त्यांच्या समोर तीन सह आरोपींची नावे आलेली होती, गणेश, शंकर आणि ओंकार. या तिघांचा जवाब घेण्यासाठी पुन्हा एकदा लामणगावला जाणे भाग होते. सकाळी एकदा लामण गावला जाऊन येण्याचा निश्चय करत त्यांनी इतर किरकोळ केसेसचा आढावा घेतला.

इन्स्पे. सावंत येऊन गेल्या पासून, सुजीतचा मृत्यू अपघाताने झाला नाही तर त्याची हत्या झाली हे ऐकून आबा अस्वस्थ झाले. त्या रात्री त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. सारी रात्र अस्वस्थतेत घातल्या नंतर आबा सकाळी सावंतांना भेटण्या साठी निघाले. इन्स्पे. सावंत आपल्या केबिन मध्ये बसून सुजितच्या केसचाच अभ्यास करत होते. आता शामरावांची भेट घेणे आवश्यक होते. त्यांच्याकडे जाऊन यावे असा विचार करत असतांना खुद्द शामरावच तिथे आले. सावंतांचे काम हलके झाले. चहापान झाल्यावर सावंतांनी सविस्तर माहिती आबांना दिली. सुजीतचा प्रमुख मारेकरी रमेश आहे हे ऐकून आबांना फार मोठा धक्का बसला. त्याचा खूप रागही आला परंतु तोच या जगात राहिला नसल्यामुळे शांत बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. रमेशच्या साथीला असलेल्या त्या तिघांचा बंदोबस्त केल्याशिवाय जीवाला, त्यांना शिक्षा मिळवून दिला शिवाय चैन पडणार नव्हते. त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याशिवाय सुजीत अन राधिकेच्या मृतात्म्यांना शांतता लाभणार नव्हती. चहापान झाल्यावर सावंतांनी इतर केसेसच्या फाईली हातावेगळ्या केल्या, हवालदार लांडगेला सोबत घेतले आणि गाड्या लामणगावच्या दिशेने निघाल्या.

   इन्स्पे. सावंत, हवालदार लांडगे अन् आबा, त्यांच्या हॉलमध्ये बसून चर्चा करत होते. बापूंना घरी बोलावून घेतलेले होते. आपल्याच मुलाने तीन मित्रांच्या मदतीने हे कृष्णकृत्य केल्याचे ऐकून त्यांना खूप दुःख झाले. पूर्वजन्मीचे काही तरी पातक असेल आपले म्हणूनच आपला एकुलता एक मुलगा असा निपजला असावा, अशी मनाची समजूत करून ते अस्वस्थ झाले. हे दिवस पहायला मिळण्यापेक्षा मृत्यू आला तर फार चांगले असा विचारही त्यांनी बोलून दाखवला. इन्स्पेक्टर सावंत आणि आबांनी समजावून सांगितले म्हणून ते स्वस्थ बसले.

बापू उठून गेल्यावर इन्स्पेक्टर सावंत, हवालदार लांडगे आणि आबा हे तिघेही गणेशच्या घरी गेले. गणेशचे आई आणि वडील दोघेही चिंताग्रस्त चेहऱ्याने बसले होते. आबांसोबत पोलिसांना बघून ते दोघेही घाबरले.

"आबा, पोलीस कशाला आलेत?" शेणफडराव गणेशचे वडील विचारते झाले. 

"सुजीतच्या मृत्यू प्रकरणी तपास करायला आले आहेत ते. पण तुम्ही असे चिंताग्रस्त का? काय झाले? गणेश कुठे आहे?" आबांनी विचारले.

"त्याच्यामुळेच तर चिंतीत आहोत आम्ही. तो कालपासून कुठे गेला कुणास ठाऊक? रात्री परत आलाच नाही. त्याला शोधायला सकाळी गणपा गेलाय, अजून नाही आला. बसलो त्याची वाट पहात." शेणफडराव काळजीच्या स्वरात म्हणाले. 

"असं होय? गेला असेल कुणा मित्रा बरोबर. येईल लवकरच. आजकालच्या पोरांना घरी काही सांगावं, काही विचारावं, याचं काही भानच उरलं नाही. बरं आल्यावर या घेऊन बैठकीत. साहेबांना थोडीफार चौकशी करायची आहे. चला साहेब तो पर्यंत दुसरीकडे जाऊन येऊ." असं म्हणत आबा तिथून निघाले. तसे त्यांच्या मागोमाग इन्स्पेक्टर आणि हवालदार सुद्धा निघाले. 

  आबा, हवालदार, आणि इन्स्पेक्टर गणेशच्या घरून निघून शंकरच्या घरी गेले, त्यानंतर ओंकारच्याही घरी गेले. त्या दोघांच्याही घरी गणेशच्या घरच्या सारखीच परिस्थिती होती. तिघांपैकी एकही सह आरोपी सापडला नाही म्हणून सावंत थोडेसे नाराज झाले होते. त्या तिघांच्या घरी त्यांच्या अपराधा बद्दल सांगायलाच पाहिजे होते. परंतु त्यांचे चिंताग्रस्त चेहरे बघून सांगायची हिंमत झाली नव्हती. म्हणून त्या तिघांच्या वडिलांना आबांच्या बैठकीत बोलावून घेतले. सर्वजण आल्यावर इन्स्पेक्टर सावंत त्या तिघांना उद्देशून म्हणाले, "तुम्हाला कल्पना आहे का तुमची मुलं काय करतात ते? कुणाबरोबर राहतात? कुठे जातात? याविषयी कधी मुलांना विचारलंत? तुमचा हा निष्काळजी पणाच तुम्हाला नडणार आहे. तुमच्या चिरंजीवांनी रामराव पाटलांच्या रमेश सोबत सुजीत आणि राधिकेचा खून केलाय. त्याचाच तपास करायलाच आलो होतो. पण ते तर सापडले नाहीत. ते जेव्हाही सापडतील त्यांना पोलीस स्टेशनला यावे लागेल. येतो आम्ही." इंस्पेक्टरच्या या माहितीवर सर्वजण अचंबित झाले होते, घाबरलेही होते. तरीही....

"साहेब, तुम्ही आलेलेच आहात तर तुम्हीच शोधायला मदत करा ना आम्हाला." गणेशच्या वडिलांनी धीर एकवटून विनंती केली.

"हो साहेब, तुम्हीच शोधून काढा आमच्या मुलांना, नंतर काय करायचं ते करा." शंकर आणि ओंकार यांच्या वडिलांनीही तशीच मागणी केली. "साहेब, तुम्ही जनतेचे रक्षक. अशा संकट काळी तुमचाच आधार असतोबांच्या सारख्या लोकांना. चला आपण सर्वजण शोध घेऊ त्यांचा." आबा इन्स्पेक्टरला म्हणाले. "ठीक आहे. तुम्हा सर्वांचीच इच्छा असेल तर तसे करू. सर्वजण जाऊ. चला." असं म्हणत सावंत चालायला सुद्धा लागले. त्यांच्या पाठोपाठ बाकीचे सर्वजण निघाले. हा सर्व फौज फाटा जवळ पासच्या सर्व रस्ते, मळे, मळ्यात वस्त्या, ढाबे, इत्यादी ठिकाणी शोध घेत होते. बराच वेळ शोधाशोध केल्या नंतर निर्जन अशा जंगलात नदी किनारी एक झाडाखाली त्या तिघांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना सापडले. "थांबा. कुणी त्यांना हात लावू नका. हवालदार, त्यांचे फोटो घ्या, घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करा." असं म्हणत स्वतः सावंतही शक्य तितक्या चपळतेने त्या मृतदेहा भोवती फिरून निरीक्षण करत होते. त्या तिघांच्या वडिलांनी आपल्या मुलांचे मृतदेह पाहून हंबरडाच फोडला. एक दोन जणांनी त्यांना बाजूला घेतले. सावंत आणि लांडगे निरीक्षण करून एकेक गोष्ट आपल्या अहवालात लिहून घेत होते. 

  "आबा, माझ्या मते या तिघांना बाहेरच्या कुणीही मारले नसून त्यांचे दारू साठी भांडण झाले असावे. नशेमुळे भांडणात त्यांनी दारूच्या बाटल्यांचा वापर करून एकमेकांना जखमी केले, नशेच्या अमलात त्यांना पळता आले नाही. शरीरातून खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला." इन्स्पेक्टर सावंत आपले मत व्यक्त करत होते. त्यावर सर्वांचेच एकमत झाले. गावकऱ्यांच्या विनंतीवरून मृतदेह पोस्टमार्टेम साठी न नेता त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. एका बैलगाडीत घालून मृतदेह गावात आणले. त्यांचा अंतिम संस्कार झाल्यावर पुन्हा गावकरी आणि इन्स्पेक्टर सावंत आबांच्या बैठकीत एकत्र बसले आणि या संपूर्ण केसबद्दल चर्चा करून सुजीत-राधिका दुहेरी हत्याकांडाची फाईल बंद करण्यात आली. त्यावर आबा आणि इतर प्रमुख गावकऱ्यांच्या साक्षीदार स्वाक्षऱ्या घेऊन सावंत पोलिस स्टेशनला निघून गेले. 

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror