Pandit Warade

Horror Tragedy Thriller

4.0  

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

झपाटलेले घर - भाग २४

झपाटलेले घर - भाग २४

7 mins
212


   रमेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्या पासून, त्याला निरोप देऊन आल्या पासून गणेश, शंकर आणि ओंकार हे त्याचे तिन्ही मित्र भांबावून गेले होते. म्हणतात ना, 'पाप्याचं मन सदैव घाबरलेलं असतं', तसं या मित्रांचं झालं होतं. रमेश पाण्यात बुडू शकत नाही, याची त्यांना पक्की खात्री होती. त्याला चांगले पोहता येत होते. नक्कीच त्याला धोका झालाय, राधिकेच्या अतृप्त आत्म्याने बदला घेतला असावा, असे त्यांना राहून राहून वाटत होते.


   तसे तर अपघाताच्या घटने पासूनच ते तिघेही खूप घाबरलेले होते. रोज रात्री स्वप्नातही त्यांना तो खांडवीचा पूल, त्यावर घडवून आणलेला अपघात, सुजीत अन राधिकेचा गळा दाबून मृत्यू, राधिकेचा देह पाण्यात फेकलेला देह, पाण्यात पडल्यानंतर ती म्हणत असलेलं गीत..., त्यातील ते *पुन्हा येईन मी, बदला घेईन मी* हे शब्द आठवत होते, त्यामुळे ते कित्येक वेळा दचकून उठत. बरं काय झालं ते घरी सांगण्याचीही सोय उरली नव्हती. चोरीचा मामला. रमेशच्या सोबत राहून केलेल्या या पापकृत्याचा त्यांना पश्चाताप होत होता. आता आपण एकेक करून जाणार याची भीती त्यांना वाटू लागली होती. ती भीती ते दारूच्या घोटात बुडवू लागले. त्या तिघांनाही दारूचे व्यसनच जडले. रमेशच्या जाण्याने त्यांची भीती खरी ठरू पहात होती.


  रमेशच्या मृतदेहाला अग्नी दहन दिले आणि संध्याकाळी उशीरा नदीकाठी झाडा खाली बसून ते दारू ढोसत बसले, सोबतच्या चकण्या बरोबर चघळायला अर्थातच राधिकेचाच विषय होता. 


   "तू काही म्हण गण्या, आपण राधिकेला मारायला नको पाहिजे होते. काय चिकना माल होता. आणून ठेवली असती इथे दाट जंगलात एखादी झोपडी बांधून. जेव्हा वाटले तेव्हा मजा मारता आली असती." शंकरच्या डोक्यात दारूचा चांगलाच अंमल चढला होता. 


   "शंकऱ्या, काय अकलेचे तारे तोडतोस. अकलेच्या कांद्या, अरे तिला झोपडीत ठेवून लपवता आलं असतं का रे? काही आपलं मनात येईल ते बरळायचं? तिला झोपडीत ठेवायचं अन आपण बसायचं जाऊन बिनभाड्याच्या खोलीत. वा रं वा." ओंकारने शंकरला चढलेली नशा झटक्यात उतरवली. त्याने पुन्हा ग्लास भरला आणि तोंडाला लावला. 


  "वंकऱ्या, तू म्हणतो ते खरं आहे. पण ती आताही आपल्याला त्रास देतीय त्याचं काय? उगाच त्या रम्याच्या नादी लागलो आपण. मायला तो गेला मरून अन झाला मोकळा. आपल्या डोक्याला दिला ताप लावून. ती राधी रात्र रात्र झोपू देत नाही राव." गणेशने आपली व्यथा मांडली.


   "म्हणजे? ती रातची येती व्हय तुला भेटायला? मज्जाय भौ एका माणसाची." शंकर गणेशची फिरकी घेत बोलला.


    "अरं, इथं जीव जायची पाळी आली. अन तुला मस्करी सुचत्येय. अरे, तिचं नाव काढलं तर डोळ्याला डोळा लागत नाही माझा. रोज दचकून उठायला होतं. मला वाटतं, रम्याला तिनंच पाण्यात बुडवून मारलं असावं. एखाद्या दिवशी तिचं भूत नक्कीच आपल्याला भेटायला येणार आणि आपलाही बदला घेणार" गणेशने मनातील भीती बोलून दाखवली.


   "अरे, हट! तुझं आपलं काही पण चालतं. एकदा गेलेलं माणूस काय परत येत व्हय? गेलं ते गेलं. संपलं. उगाच डोक्यात भीतीचा किडा वळवळतोय तुमच्या. गप बसा. नशेत काहीही बडबड करू नका. आपण त्यांना मारल्याचं एखाद्याला कळलं ना, तर आपल्याला बसावं लागंल तुरुंगाची हवा खात. कळलं?" ओंकारने त्यांना सावध केलं. तेवढ्यात......


  "तुरुंगात जाण्यासाठी तुम्ही जिवंत राहिलात तर ना?" बाजूच्या दाट झाडीतून आवाज आला. 


   "क्कोण? क्कोण आहे तिकडं?" शंकर जवळ जवळ ओरडलाच. 


   "हा! हा! हा! घाबरलास?" विकट हास्यातला एक प्रश्न.


   "पण तू कोण आहेस? अन असं लपून छपून का भीती दाखवतोस? जरा समोर तर ये." शंकरने हिंमत दाखवून विचारले. गणेश मात्र खूप म्हणजे खूपच घाबरला होता. भीतीने चड्डी ओली होते की काय असे झाले होते. 


  "अरे गाढवांनो, मी म्हटलो ना. तुम्ही नशेत बरळू नका म्हणून. कुणी तरी ते ऐकलं आणि आता आपली मस्करी करत असलं पाहिजे. ऐ, समोर तर ये. कोण आहेस ते पाहू दे की?" ओंकारनेही उसने अवसान आणत हिंमत दाखवली.


   "हा! हा! हा! व्वा! खूप घाई झाली वाटतं आपल्या मित्राला भेटायला जायची. मित्राच्या मृत्यूचं खूप दुःख झालं असेल नाही तुम्हाला? त्याच्या मागे जीव द्यावासा वाटत असेल नाही? एक गोष्ट ध्यानात घ्या तुमच्या मित्राला, रमेशला मीच पाण्यात बुडवून मारलं. बिच्चारा! गेला बाराच्या भावात. आता तुमची पाळी. सांगा मित्राच्या पाठोपाठ जाण्याचा मान कुणाला देऊ? कोण तयार आहे? अरे , जाता जाता तरी नाव होऊन जाऊद्या मित्राच्या दुःखावेगात मेला म्हणून. सांगा लवकर. माझ्याकडे वेळ नाही जास्त. पटकन सांगा. गणेsssश, शंकssर, ओंकाssर हा! हा! हा!" पुन्हा एकदा विकट हास्य.


   भीतीने तिघांच्याही अंगावर काटा उभा राहिला. त्यांच्या अंगावर घामच्या धारा निथळत होत्या, काय करावे हे कुणालाच कळत नव्हते. तिघेही भीतीने थिजून एकमेकां कडे पहात होते, पुतळ्या सारखे स्तब्ध झाले होते. अंतरात पश्चाताप होत होता. पण आता काय उपयोग होता? एका पावलाच्या अंतरावर साक्षात मृत्यू उभा होता. 


   "अजून निर्णय होत नाही काय? असे कसे रे मित्र तुम्ही? मित्रासाठी मरायला तयार होत नाही? छी तुमच्या जगण्यावर! चला तुम्ही सांगता की मी सांगू? नाही ना हिंमत होत मरायला. चला तर मग मीच सांगते. ऐका." अस म्हणत पुन्हा विकट हास्य करत आवाज आला...


  "मला वाटतं कुठल्याही पूजेचा मान गणेशाचा असतो, नाहीं का? मग इथेही गणेशालाच का नको पहिला मान? चला तर मग आधी गणेशचाच बळी देऊ या. ये गणेश चल पुढं ये."


   आपलं नांव पुढं येताच गणेशचे डोळे आपोआप बंद झाले. भीतीने खाली चड्डी ओली झाली. त्याची ती अवस्था बघून शंकर आणि ओंकार सुद्धा भीतीने गारठून गेले. कुणाच्याही तोंडातून आवाज निघत नव्हता. तिघेही डोळे बंद करून असे उभे होते जसे पुतळे उभे केलेत. 


   बऱ्याच वेळा नंतर एक खळाळतं, मंजूळ हास्य कानावर आले तसे ते दचकले. एका मंजूळ स्वरातले शब्द कानावर आले,....


   "अरे, घाबरलात? पुरुषां सारखे पुरुष असून घाबरलात? अरे, तुमची मस्करी केली. तुम्ही मेली असे समजून जिला पाण्यात फेकली ती राधिका तुमच्या समोर उभी आहे. डोळे उघडून पहा तर खरं." असा ओळखीचा आवाज ऐकून तिघांनीही डोळे उघडले. 


  समोर पांढऱ्या शुभ्र साडीत, केसात पांढरा शुभ्र सुगंधी गजरा, गव्हाळ वर्ण, धनुष्याच्या आकाराच्या कोरीव भुवया, चाफेकळी नाक, डाळिंबाच्या फोडी सारखे लालचुटूक ओठ, सफरचंदा सारखे लालबुंद गाल, अशा नव्या अवतारात राधिका उभी होती. जणू स्वर्गातली अप्सराच. तिघेही अवाक् होऊन पहातच राहिले. क्षणभर त्यांचा विश्वासच बसला नाही.


   "अगं, पण तू तर मेली होतीस ना? माझ्या या हातांनीच तुला पाण्यात फेकलं. मग तू अजून जिवंत कशी?" ओंकारने घाबरतच विचारले.


  "अरे, तू मेली म्हणून फेकलंस पण मी मेली नव्हतेच. पाण्यात पडतांना मी जिवंत होते, काही तरी म्हणत होते. तू ऐकलंही असशील काहीतरी." राधिका लडिवाळ पणे म्हणाली. 


   "होय! मी ऐकलं होतं ते. मी पुन्हा येईन! मी पुन्हा येईन! असं काही तरी म्हणत होतीस तू." शंकरने माहिती पुरवली.


   "होय ना? मी मेलेच नव्हते. पाण्याच्या प्रवाहा बरोबर वहात गेले बरीच दूर. तिथे देवानेच मला बुडतांना वाचवले. हो! देवानेच म्हणावे लागेल. कारण मला वाचवणारा कोण होता? मला पुन्हा दिसलाच नाही. कुणी तरी मला पाण्या बाहेर काढलं. मी बेशुद्ध होते, अंग गारठलं होतं. माझ्या गारठलेल्या देहा शेजारी शेकोटी पेटवून निघून गेलं. मी शुद्धीवर आले, आजूबाजूला बघितले तर कुणी नव्हते. अनोळखी प्रदेश, सोबतीला कुणी नाही, कुठे जाणार? दोन शेजारी झाडांचा आधार घेत एक झोपडीवजा घरटं बनवलं आणि त्यात मुक्काम ठोकला. आजूबाजूच्या जंगलातून खूप काही खण्यासारखी फळं मिळतात. ती खाते आणि राहते मस्त. कुणीही येत नाही इथे, निवांत जागा आहे अगदी." तिने मनाशीच रचलेली कथा रंगवून सांगितली, जी सर्वांना खरीच वाटली.


   "या घनदाट जंगलात मी एकटीच राहते, मस्तपैकी राहते. कशा कशाचीच कमी वाटत नाही इथं. कमी आहे ती फक्त पुरुषाची. एका तरुण स्त्रीला पुरुषाच्या सहवासाची गरज असतेच ना? मी ही वाटच पहात होते कुणाची तरी. बरं झालं तुम्ही आलात. पण आता माझ्या बरोबर फक्त एक जणच येऊ शकतो. कोण येतं?" तिने या तिघांत कळ लावणारा प्रश्न केला.


  "मला पहिला मान देणार होतीस ना?" गणेशने लाळ घोटे पणाने विचारले. 


   "चालेल ना. माझी काही हरकत नाही. तिघांनाही नेलं असतं. पण एक तर झोपडी छोटीशीच आहे आणि एका वेळेस तिघांना कशी काय नेऊ शकते? आता फक्त एकच जण येऊ शकतो. तेव्हा गणेश, तू चल." असं म्हणून तिनं गणेशचा हात हाती घेतला. तसे शंकर आणि ओंकार त्याला आडवे झाले. 'मी आधी, मी आधी' म्हणत त्या तिघांमध्येच भांडण लागले. 


  "हे बघा. तुमच्यात जो कोणी श्रेष्ठ ठरेल, दुसऱ्या दोघांना पराजित करेल तोच आजची रात्र माझ्या सोबत घालवू शकेल." असं म्हणत ती एका बाजूला झाडाखाली जाऊन उभी राहिली.


  या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. गुद्धागुद्धी झाली, धरपकड झाली, आपटाआपटी झाली. दारूच्या रिकाम्या झालेल्या बाटल्याही उपयोगात आल्या. त्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचांनी एकमेकांवर वार करून थंड होऊन निपचित पडले.


   "अरे गिधाडांनो, नशेच्या धुंदीत तुम्ही एकमेकांचा जीव घ्यायला निघालात? ते ही एका अशा स्त्री साठी? जिचा महिन्या भरापूर्वीच खून झाला आहे. तो खून करणारेही तुम्हीच आहात. तुम्ही पाप्याची साथ दिली, त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. तुमच्या कृत्याचा बदला घेण्या साठीच तर आले होते मी इथं." असं म्हणत मोठ्याने भेसूर हासत ती त्यांच्या समोर अक्राळविक्राळ रूप घेऊन उभी राहिली. तिचे ते रूप, मोकळे सोडलेले केस, पांढरी शुभ्र साडी, पुढे आलेले दोन सुळे दात. डोळ्यांच्या जागी अंगार ओकणाऱ्या केवळ चिमण्या, लांबच्या लांब वळवळणारी जीभ, हाताच्या बोटांची वीतभर वाढलेली नखे हा सारा अवतार पाहून भल्याभल्यांची दातखिळी बसावी. हे तिघे तर आधीच नशेने चुर झालेले, एकमेकांशी भांडून ग्लानी आलेले. जखमांनी घायाळ झालेले अशा अवस्थेत असलेल्या त्यांनी तिच्याकडे पाहिले फक्त, पाहता क्षणीच त्यांचे डोळे बंद झाले, श्वासोश्वास, हृदयाची धडधड साssरं साssरं काही थांबलं. कायम साठीचं. पुन्हा सुरू न होण्यासाठी....


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror