Pandit Warade

Horror Tragedy Thriller

4  

Pandit Warade

Horror Tragedy Thriller

झपाटलेले घर (भाग-२०)

झपाटलेले घर (भाग-२०)

5 mins
557


   राधिकेला बेपत्ता होऊन महिना झाला होता. तिचा शोध घेणे सुरूच होते. नदी तीरावरील सर्व गावात जाऊन झाले, सर्व पोलीस ठाण्यात अर्ज देऊन झाले. परंतु तिचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता. गावातील बरीच तरुण मंडळी तपास कार्यात मदत करत होती, त्यात रमेश सुद्धा होता. सारे प्रयत्न व्यर्थ आहेत हे केवळ तोच जाणत होता. पण संशय नको म्हणून तो तपास पथकात सामील होता. 


   आबा आणि गंगुबाई दोघेही या घटनेपासून घरातच पडून होते. जीव जात नाही म्हणून जगत होते. अशा काळातच माणसांची खरीखुरी परीक्षा होत असते. आबांच्या भोवताली राहणारे नेहमीचे कार्यकर्ते त्यांच्याकडे केवळ हजेरी लावण्यापुरते येऊन बसत. गणपतराव, माणिकराव, बाजीराव, इ. सारे सारखेच. यायचे, थोडेफार गप्पा करायचे. तेवढ्या वेळात एक दोन वेळेस चहापाणी, बिडी काडी व्हायचं. कुणी तरी जेवणाचा विषय काढी. स्वयंपाका साठी आचारी लावलेले होतेच,सतत स्वयंपाक सुरू असायचा. आलेले लोकं जेवणावर यथेच्छ ताव मारायचे आणि निघून जायचे. काही बहाद्दर तर केवळ जेवणा पूरतेच येत असत, ते ही रिकाम्या हातानेच. ती प्रथा काय होती, कशासाठी होती? ते सोयीस्करपणे विसरायच, महिनाभर घरचे जेवण बंद करून रोज आबांकडे जेवणाचं भागवून घ्यायचे. 


   मात्र सारेच काही असेच असतात असं नाही. आबांचे पारंपरिक विरोधक रामराव पाटील (बापू) मात्र पत्नी रखमाबाई सहित या दोघांना आधार द्यायला येऊन बसत, त्यांना थोडे फार खायला घालत. त्यांच्या बरोबर गप्पा करून, त्यांना या धक्क्यामधून सावरायचा प्रयत्न करत असत. 


  "बापू, आता जगू तरी कुणासाठी?" एक दिवस आबा उद्विग्न होऊन म्हणाले.


  "खरं आहे आबा तुमचं म्हणणं. पण कुणी गेलं तर त्याच्या मागं जाता येतं का आपल्याला? कोण गेलं म्हणून आपण जाणार? जन्म, मृत्यू कधीच आपल्या हातात नसतात आबा. सर्वांना मृत्यू येई पर्यंत जगणे भागच असते." बापू समजावत होते. 


  "हो! तेही खरंच आहे म्हणा. पण असं जगणं म्हणजे काय जगणं म्हणायचं? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, बाकीच्यांचं उगाच काळीज हळहळतं बापू." आबा.


   "खरंय आबा, ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. ओझं वाटून घेता येत तसं दुःख थोडंच वाटून घेता येतं? या काळात केवळ मानसिक आधारच देता येतो आणि तो देण्याचं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आहोत." बापू म्हणाले. 


    "होय बापू, तुम्ही आहात म्हणून तर आम्ही जिवंत आहोत असं वाटतंय. नाहीतर अंथरुणावर पडलेले मुडदेच तर होतो आम्ही. एकुलत्या एका लेकीचं लग्न थाटा माटात करायचं होतं हो मला, आता तेही जाग्या वरच राहिलं. लेकराच्या इच्छा अतृप्तच राहिल्यात, कुठे असेल कोण जाणे. या जगात असेल की नाही कोण जाणे." बापूंच्या समोर पश्चातापही मोकळे पणाने व्यक्त करता येत नव्हता. शब्दाशब्दातून हतबलता जाणवत होती. 


  "गंगुबाई, असं करून कसं चालायचं? उठावं, कसेही दोन घास खावे, आबांनाही खाऊ घालावे." रखमाबाई गंगूला उठवून बसवत समजावत होती. 


  "कशासाठी उठू? जगून तरी काय करू? अन कुणासाठी जगू?" गंगू हताश होऊन बोलत होती.


   "गंगू, आबांसाठी तरी तुम्हाला उठून बसावेच लागेल. त्यांनी कुणाकडे पहायचं. तुम्ही दोघांनीच आता एकमेकांना आधार द्यायचा. आमच्यासारखे किती दिवस येणार? तुमचे तुम्हालाच बघायला लागणार आहे. आपल्या वाट्याचे भोग आजवर कुणाला चुकले आहेत का?" रखमाबाई.


  "वहिनी, हे दिवस बघायला मिळण्या अगोदर डोळे का नाही मिटले माझे. मी कुठे लपले होते का? मृत्यूला मी दिसले कशी नाही? यांच्या पाठी मागे केवढ्या उभारीने दिवस कठले मी? लेकराला लहानचं मोठं केलं. त्याचे दोन हाताचे चार हात करायचे होते, माझ्या लेकराला स्वतःच्या हातांनी हळदीने माखायचं होतं, त्याचा फुललेला संसार बघायचा होता. केवढी उमेद होती. साssरं साssरं कसं धुळीला मिळालं." असं म्हणत गंगूने मोठ्यानं टाहो फोडला.


   रखमाबाईच्या डोळ्याला आपसूकच पाणी आले. दोन्ही डोळ्यातून मूकपणे गंगा यमुना वाहू लागल्या. तिने गंगूला जवळ घेतले, तिचे डोके आपल्या खांद्यावर घेऊन मनसोक्त रडू दिले. तो वर तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवत राहिली. 


  "देवा, अशी रे कशी वेळ आणलीस या माय माऊलीवर? कोणत्या जन्माच्या कर्माचं फळ टाकतोस तिच्या पदरात? नवऱ्याचं सुख भोगू दिलं नाहीस आता मुलालाही घेऊन गेलास. इतका कठोर झालास देवा? एवढी कशी कठोर कसोटी घेतोस तिची? जरा तरी दया येऊ द्यायची असतीस." असं म्हणून रखमाबाई गळा काढून रडायला लागली. गंगूनंही सुरात सूर मिसळला. दोघींचा रडण्याचा आवाज ऐकून आणखी चार दोन बायका तिथे येऊन बसल्यात. अशा ठिकाणी चारचौघी एकत्र आल्या की, सांत्वन करतात की जखमेवरची खपली काढतात तेच कळत नाही. विसरायचा पर्यटन करत असलेल्या व्यक्तीला परत परत आठवण करून देत असतात. आताही तेच झाले. गंगूची रडून रडून दातखिळी बसली. सगळेच घाबरले. बरं झालं, तेवढ्यात रमेश तिथे आला. लगेच गाडी काढून तो गंगूबाईला दवाखान्यात घेऊन गेला. 


   गेला महिनाभर रमेश राधिकेच्या शोधाच्या आड मज्जा मारत होता. रोज यायचं आबांकडून पेट्रोल आणि इतर साठी हजारभर रुपये घ्यायचे. ड्राइवर आणि तो जिकडे वाटेल तिकडे फिरायचे, तपासाचं नाटक करायचे, जवळच्या पैशातून खायचे प्यायचे आणि परत यायचे असा सारा कार्यक्रम सुरू होता. आजही तो तेवढ्याच साठी आला होता. परंतु गंगूची दातखिळी बसलेली, आई रखमाबाई तिथे बसलेली, त्यामुळे त्याला दवाखान्यात जावेच लागले. 


   आबा तर गंगूची स्थिती बघून आणखीच हताश झाले. बाकीची मंडळी त्यांना समजावत होती. आबा मात्र आता रडत नव्हते. रडणार तरी कुठवर? डोळ्यात पाणी तरी कुठून येणार? रडून रडून डोळ्याच्या खाचा बनल्या होत्या. एका शब्दानेही कुणाशी बोलत नव्हते. डोळ्यांची पापणीही हलत नव्हती. ते फक्त डोळे उघडे ठेवून पहात होते, त्यांना काही दिसत होतं की नाही कोण जाणे? जमलेले इतर लोकंच आपापसात गप्पा करत होते. कुणीतरी एखादा कुणाच्या तरी घडलेल्या, न घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन गप्पांमध्ये रंग भरत होता.


    या सर्व मंडळींच्या गप्पा सुरूच होत्या, एक दीड तासातच रमेशने गंगूबाईला दवाखान्यातून आणून सोडले. गोळ्या औषधी रखमाबाईच्या हातात दिल्या, आबांकडून पैसे घेतले आणि ड्राइवर सहित गाडी घेऊन परत फिरला. गाडी धुरळा उडवत निघून गेली. 


   "बापू, काही म्हणा पण तुमचा मुलगा रमेश चांगलाच गुणांचा निघाला. महिन्याभरा पासून आम्ही पाहतोय, बिचाऱ्याच्या पायाला जराही दम नाही. रोज दिवसभर इथे तिथे फिरत असतो." माणिकराव म्हणाले. त्यांना कुठे माहीत होते, तो काय काय गूण उधळतो ते? त्यांना एवढेच दिसत होते, तो सकाळपासून गाडी घेऊन जातो आणि संध्याकाळी परत येतो. 


  आजही तो गाडी घेऊन गेला, पण जाता जाता त्याने या लोकांच्या गप्पा ऐकल्या होत्या. कुठे तरी मनाला स्वतःचे वागणे खटकले होते. गाडी एका ठिकाणी उभी करून त्या दोघांनी एका झाडा खाली बसून सोबत आणलेल्या दारूचा आस्वाद घेतला, सोबतच चिवडा खाल्ला. आता दोघांनाही बऱ्यापैकी चढली होती. ते दोघेही खरोखरंच त्या नदीच्या किनाऱ्यावर फिरत चालले होते. फिरता फिरता किती वेळ झाला त्यांच्या लक्षातच आले नाही. दिवस मावळतीकडे झुकला. अंधाराने आपले जाळे फेकायला सुरुवात केली. नशेच्या धुंदीत दोघांनाही भान राहिले नाही. अंधार गडद व्हायला लागला होता. अचानक तिथल्या दाट झाडीत काही तरी हालचाल झाल्याची चाहूल लागली. आणि कानावर एक सुरेल आवाजातील गीत ऐकू आले.....


*किती वाट पाहू तुझी नदी काठी*

*व्याकुळला जीव सख्या तुझ्यासाठी*


   रमेशचे कान टवकारले गेले. 'हे गीत तर आपण गॅदरिंगमध्ये केलेल्या नाटकातले तुफान गाजलेले गीत आहे. कोण गात आहे हे गीत? आपल्याला भास तर होत नाही ना?' त्याने थोडेसे थांबून आवाज ऐकला, तो केवळ भास नव्हता, तर कुणी तरी स्त्री सुरेल आवाजात ते गीत गात होती. आता मात्र त्याची पाचावर धारण बसली. असं कसं शक्य आहे? हा आवाज तर १००% राधिकेचाच आहे. पण मी तर या हातानेच तिला मारून पाण्यात फेकले होते. मग ती जिवंत कशी राहू शकते? त्याच्या डोळ्यासमोर सारा घटनाक्रम उभा राहिला.......


*क्रमशः*


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror