जादूचा बटवा
जादूचा बटवा
अरुणा आणि करूणा ह्या जुळ्या बहिणी. पण दोघींच्या स्वभावात मात्र प्रचंड तफावत. एकमेकींच्या एकदम विरूद्ध. अरुणा दिसायला गोरी तर करूणा सर्वसाधारण,सावळीशी. करूणा नावा प्रमाणे दयेचा,करूणेचा सागर होती. तिचे मन फार हळवे होते. घरातील कामे, शिवण टिपण, देव पूजा सारे ती लहानपणापासूनच करायची. देवी महालक्ष्मीची ती फार भक्त होती. अभ्यासातही करूणाने आपला पहिला नंबर कधी सोडला नाही. अरुणा ला मात्र यातील कशातच रस नव्हता.
त्या दोघी पाचवीला होत्या तेव्हाच त्यांचे वडिल दीर्घ आजाराने मरण पावले. घरात होता नव्हता पैसा त्यांना लावला. शेतीचा काही भागही विकला.पण काही उपयोग झाला नाही. आता शेवटी शेतीच्या एका तुकड्यावर भाजीपाला, फुले उगवून ती माऊली आपले व आपल्या मुलींचे पालनपोषण करत होती.
एक दिवस करूणाची आई आजारी पडली. सर्व भार करूणावर आला. घराची, शेतीची, दुकानाची जबाबदारी तिच सांभाळत होती. अरुणा कुठल्याच कामाला हात लावत नव्हती. डॉक्टरांनी आई ला तालुक्याला न्यायला सांगितले. तिथे गेल्यावर काही तपासण्या केल्या. तेव्हा कळले आई च्या पोटात गोळा झाला आहे आणि तो ऑपरेशन करून लवकरात लवकर काढावा लागेल. करूणा आई कडे काळजी ने बघायला लागली. एवढे जास्त झालेले असूनही आई किती करते आपल्या साठी. आपल्या त्रासा बद्दल काहीच बोलली नाही कधी. बिचारी. तीच्या डोळ्यात पाणी आले. तिने डॉक्टरांना ऑपरेशन चा साधारण किती ख़र्च होईल विचारले. त्यांनी तीन लाख म्हंटल्यावर करूणाच्या पाया खालची जमीनीच सरकली. येवढा पैसा कसा जमवायचा? हा यक्षप्रश्न होता तीच्या साठी. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती . काय होईल? कसे होईल? याच विचारात आई आणि त्या बस स्टैंड वर बसल्या होत्या. थोड्याच अंतरावर एक म्हातारी आजीबाई गोधडी घेऊन निजली होती. तिला कदाचित ताप भराला होता अंगात. ती थंडी ने कुडकुडत,कन्हत होती. आई ने अरुणा ला म्हंटले, जा जरा बघ आजीबाईंना काय होते ते. काही मदत लागते का बघ. अरुणा त्या म्हाताऱ्या आजी कडे बघून म्हणाली, काय ग आई, कशाला उगाच दया दाखवते? कोण कुठल्या त्या आज्जी? आपल्याला काय करायचे त्यांचे. असे म्हणत तिने नाक मूरडले. आई काही म्हणायच्या आत करूणा उठली आणि त्या आजी कडे गेली. आजीबाईंना चांगलाच ताप भरला होता. तिने आजी च्या अंगाला स्पर्श करून बघितले. त्यांच्या अंगावरचे पांघरूण निट केले.गाडी यायला अजून बराच अवकाश होता. तिने आजी जवळ असलेल्या एका भांड्यात थंड पाणी घातले आणि आपल्या जवळ च्या रूमालाने आजी च्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. थोड्या वेळात आजीला बरे वाटायला लागले. आजीबाईं उठून बसल्या. करूणा ने त्यांना आपल्या हिश्शाचे जेवण भरवून दिले. अरुणा आई ला म्हणाली, आई,काय गरज आहे अशी समाजसेवा करायची. इथे आपलेच भागत नाही त्यातही भागीदार करत फ़िरते ही. आई म्हणाली. ती जे करते ते योग्यच आहे. गरजूंना मदत करणे, म्हाताऱ्या माणसाची सेवा करणे पुण्या चे काम असते. देव कधी कुठल्या रूपात येऊन आपली परीक्षा घेईल काही सांगता येत नसते बेटा. पण हे तत्वज्ञान समजण्या इतकी अरुणा हुशार नव्हती. आई करूणा कडे कुतुहलाने बघत होती.
आजी ला बरे वाटले. ती करूणा ला म्हणाली, पोरी ,मी कोण कुठली काहीही माहित नसताना तू माझी सेवा केली. मला पोट भर जेवू घातले.पण बाळा त्या बदल्यात तुला द्ययला माझ्या कडे काहीच नाही. काय देऊ मी तुला"? करूणा हसून म्हणाली, आज्जी काही नको मला. बस तुझे आशिर्वाद असू दे. माझ्या आईला लवकर बरे वाटू दे अशी प्रार्थना कर देवाला, करूणा आई कडे केविलवाणी बघत म्हणाली बाकी काही नको मला आजी. तीच्या डोळ्यात पाणी आले.आई ची फार काळजी वाटत होती तिला. अरुणाने तिला आवाज दिला, "चल लवकर आपली बस आली. जागा मिळणार नाही. ये लवकर." करूणा ने घाईघाईत आजीला म्हंटले, मला जावे लागेल आजी. तु काळजी घे तुझी" असे म्हणत तिने हळूच एक पन्नास रुपया ची नोट आजीच्या हातात ठेवली असू दे तुला कामात येतील,,असे म्हणत ती उठली. आजी ने तीचा हात पकडला आणि हातात एक बटवा ठेवला आणि म्हणाली, जेव्हा तुला खूप गरज असेल, सगळे प्रामाणीक प्रयत्न करून जेव्हा तुला निराशाच पदरी पडेल. तेव्हा या बटव्यात हात टाकायचा आणि तुझी ईच्छा बोलून दाखवायची. तुझी ईच्छा नक्की पूर्ण होईल. करूणा ला आश्चर्य वाटले. आजी हे काय बोलते आहे. पण वेळ नसल्या काराणने ती काहीच म्हणाली नाही. आणि नमस्कार करून निघून गेली.
गाडीत बसल्यावर तिने आई ला सांगितले सर्व. अरुणा हसली तिच्यावर. म्हणाली, मूर्ख आहेस तू, कशावरही कसा विश्वास ठेवते. दे फेकुन तो बटवा.पण आई ने तसे नाही करू दिले. म्हणाली, तो बटवा म्हणजे आशिर्वाद आहे त्या आजींचा. असू देत तो करूणा कडे.
आई आणि करूणा, पुढे पैसा कसा जमवायचा ऑपरेशन साठी याचा विचार होत्या. घरी येऊन करूणाने व्याजाने पैसा मिळतो का म्हणून तीने सावकारा कडे विचारणा गेली. पण त्याने चक्क नकार दिला. कारण शेती आधीच त्यांच्या कडे गहाण पडलेली होती. गावात असे कुणीच नाही उरले ज्यांच्या कडे करूणा ने पैशाची मदत नाही मागितली. तिला काही सुचत नव्हते काय करावे. इकडे आई ची तब्बेत दिवसेंदिवस खराब होत होती. आई चे खाणेपिणे बंद झाले होते. सतत पोटात दुखत होते. त्या रात्री आई खूप तळमळत होती. अंगात खूप ताप भरला होता. डॉक्टरांनी केवळ आठ दिवस म्हंटले होते. आणि आज दहा दिवस झाले होते. पैसे केवळ पन्नास हजार जमले होते. बाकी ची रक्कम जामवणे खूप कठीण दिसत होते. रात्री करूणा एकटीच रडत बसली होती. आई ची अवस्था तिला बघवत नव्हती.
"काय करू देवा, हरले मी. माझ्या आई ला तूच वाचव देवा आता" असे म्हणत ती रडत होती. तिला एकदम त्या आजी ची आठवण झाली. " आजी ने म्हंटले होते, सर्व प्रामाणीक प्रयत्न करून जेव्हा निराशाच पदरी पडेल तेव्हा या बटव्यात हात टाकून आपली ईच्छा बोलायची. ती नक्की पूर्ण होईल". आजी चे हे शब्द तीच्या कानात घुमू लागले. तिने घावत जावून तो बटवा ट्रंक मधुन आणला. तिचा विश्वास तर नव्हता यावर, पण सगळीकडून ती हताश झाली होती. तिला काहीच कळत नव्हते. निराशा माणसाला कुठल्या ही परिस्थितीत नेवून ठेवू शकते. सत्य -असत्य च्या पार जावून विचार करायला भाग पडतो मनुष्य. अपयशाच्या भीतीने मनुष्य काहीही करू शकतो हेच खरे आहे. करूणाची अवस्था काही वेगळी नव्हती . भीत भीत तिने त्या बटव्यात हात टाकला. आणि आईची परिस्थिती सांगत रडतच अडीच लाखाची गरज आहे असे सांगितले. आणि लगेच काय चमत्कार तीच्या हाताला काही तरी लागले त्या बाटव्यात....त्या बटव्यातुन पैशाचे एक बंडल ,एक गड्डी आली. जी बघून करूणा विस्मयकारक त्या पैशांकडे बघत होती. तिचा विश्वास बसत नव्हता. तिने घावत जाऊन आई ला उठवले. आणि सर्व प्रकार सांगितला. पैसे आई च्या हातावर ठेवले. अरूणा आणि आई डोळे फाडून नुस्त्याच कधी त्या पैशां कडे तर् कधी करुणा कडे बघत होत्या.अरुणा ने तो बटवा तीच्या कडून हिसकावून घेतला. त्यात हात टाकत म्हणाली मला हि एक लाख रुपये पाहिजे..... एकदा, दोनदा..... कितीतरी वेळ तिने मागितले. पण् तिला काहीच मिळाले नाही. आई म्हणाली. त्या आजी म्हणजे साक्षात देवी महालक्ष्मीच होत्या बेटा आपली मदत करायला आल्या होत्या. आपली परीक्षा बघत होत्या देवी महालक्ष्मी. आई ने आणि करूणाने लगेच हात जोडले. करूणाने मनोभावे त्यांची सेवा केली म्हणून् तिला हा आशीर्वाद मिळाला आहे. सहज कधीच कुणाला काहीच मिळत नसतं अरुणा. प्रामाणिक मेहनत प्रामाणिक कष्ट करावे लागतात त्यासाठी. आई,करूणा आणि अरुणा ने देवी चे मनोमन आभार मानले.
