एका जिद्दी मुलीची कहानी
एका जिद्दी मुलीची कहानी


कस्तुरी महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०२१ ची महाप्रतियोगिता नुकतीच पुण्यात यशस्वीपणे संपन्न झाली.
या स्पर्धेत नागपूरची अदिती विजय कल्पना तेलंग या युवतीने द्वितीय उपविजेतेपदाचा (फस्टरनरप) महा.सौंदर्यसम्राज्ञीचा मुकुट मिळवला. त्या बद्दल तिचे मनापासून अभिनंदन. नागपूर साठी ही फार अभिमानाची बाब आहे. खरे तर अदिती इतर स्पर्धकां सारखी सामान्य नव्हती. काही महिन्यांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती , मृत्यूशी झुंज देत ती आय.सी.यु मधे जिद्दी ने लढली आणि जिंकली देखील. पण आय.सी.यु मधे असतांना तिची मानसिक स्थिति फार विचित्र झाली होती. एक तर कोरोना सारखा हा महाभयंकर आजार ,बाहेर ची मन विषण्ण करणारी परिस्थिती, त्यात भरीस भर म्हणजे प्रसार माध्यमांतून दाखवले जाणारे विदारक दृश्य, बातम्या, अश्यात अदिती तिथे आय.सी.यु मधे एकटी.जवळ चा फोन हॉस्पिटलने काढून घेतलेला. त्यामुळे कुणाशी बोलणें नाही की भेटणें नाही. एकटेपणाच्या भीतीचे भूत आणि बाहेर घिरट्या घालणारा मृत्यु यानें आपण परत घरी सुखरुप आपल्या लोकां मधे जाऊ शकणार की नाहीं ?या विचारांनी तिची मानसिक अवस्था पार ढासळून गेली होती. काही दिवस शांत राहून औषधोपचाराला प्रतिसाद देणारी अदिती नंतर नंतर मात्र स्वतःच्या हाताला लावलेले सलाईन ती काढून फेकायला लागली. सतत ओरडायची, रडायची मला घरी जाऊ द्या.....घरच्यां बरोबर बोलू द्या..... तिच्या भीतीने तिच्या मेंदूचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती. आपल्या मुलीची अवस्था काय असेल हे कळत होते त्या आईला त्यामुळे आपल्या मुलीला आधार वाटावा म्हणून तिची आई अशा भीषण परिस्थितीतही हॉस्पिटल च्या आवारात थांबायची. चारही बाजूने कोरोना चे वारे वाहत असतांना ती आई आपल्या पिल्लांच्या एका हाके साठी तिथेच तळमळत असायची. मुलीचा कॉल आला तर सांगायला बरे की मी इथेच आहे. तुझ्या जवळ. तू घाबरू नकोस म्हणून.
व्हिडिओ कॉल वर बोलणें झाले की ती तिच्या आईला म्हणायची मला घरी एखाद्या खोलीत डांबून ठेव पण मला इथून घरी घेऊन चल. वडिलांचे छत्र आधीच हरवलेल्या अदिती ची परिस्थिती फार केविलवाणी झाली होती.
आपल्या लाडक्या लेकीची अशी अवस्था त्या माउलीला कशी बघवल्या जाणार होती? डॉक्टरांशी बोलुन त्यांच्या विनवण्यां करून स्वतःच्या जबाबदारी वर त्यांनी अदिती ला घरी आणले.ऑक्सिजन सिलेंडर ची व्येवस्था घरीच करण्यात आली. घरच्यांचा सहवास, घरचे खाणे-पिणे. मित्र,आपेष्ट यांचा फोन वरील आधार देणारे, धीर देणारे संवाद याने तिला लवकरचं बरे वाटू लगले. पण या उपचारा दरम्यान अति प्रमाणात दिल्या गेलेल्या स्टेरोइडचा प्रचंड असा दुष्परिणाम तिच्या शरिरावर झाला व त्यात तिचे दोन्हीं पाय हळुहळु निकामी होऊ लागले. वजनही वाढले होते. सर्व
औषध उपचार करूनही तिच्या पायांना आराम नव्हता. एम.आर.आय केल्या नंतर कळले की तिच्या कमरेच्या दोन्हीं बाजूच्या हाडांना किड लागली. म्हणून ती चालू शकत न
ाहिये. चालतांना तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिच्या पायांमधे रक्ताच्या गुठळ्याही तयार झाल्या होत्या. पुन्हा दवाखाण्याच्या वाऱ्या सुरू झाल्या. दिल्ली,मुंबई, पुणे, जबलपुर, उदयपुर सर्वच ठिकाणी या आजारा विषयी विचारणा करण्यात आली. कुणी डॉक्टर म्हणाले पूर्ण हिप्स रिप्लेसमेंट करावी लागेल. पुन्हा घरच्यांवर आभाळ कोसळले.काय करावे काय नाही,काही कळत नव्हते. पुन्हा लाखों रुपये ख़र्च येणार होता. नागपूरमध्ये कोरोना झालेल्यांमधे ही अश्या प्रकारच्या आजाराची पहिलीच केस होती. पण सुदैवाने तिच्यावर लेझर ट्रिटमेंट करून चार महिन्यांनपूर्वी तिचे यशस्वीरीत्या ऑपरेशन झाले.दोन महिने पूर्णपणे ती बेड वर होती. तिची सर्व सुश्रुषा आईने केली. हळूहळू तिला विल चेअर व नंतर वॉकर चा आधार घ्यावा लागला. अदिती लहानपणापासून खूप जिद्दी आहे. कुठली गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण करतेच. तिच्या याच स्वभावाचा तिला इथे फायदा झाला. तिच्या जिद्दी ने ती पुन्हा काठीच्या आधाराने हळूहळू चालु लागली. अदिती एक उत्तम नृत्यांगना आहे. तिची स्वतःची *अदिती डांस अकाडमी* आहे. तिचे चार वर्षा पासून ते साठ वर्षा पर्यंतचे विद्यार्थी आहेत. जिथे केवळ पायांचा उपयोग करवा लागतो तिथे तिचे पायच साथ देत नव्हते.
या प्रतियोगितेची नोंदणी ह्या परिस्थितीतून जाण्याच्या बरेच आधी तिने केलेली होती. ही सौंदर्यस्पर्धा बाह्य सौंदर्यपेक्षा आंतरिक सौंदर्य,आत्मविश्वास याला प्राधान्य देणारी सौंदर्यस्पर्धा आहे. असा विश्वास आयोजकांनी तिला दिला. ज्याने तिचा उत्साह अधिक वाढला. व तिला पुण्याला या महा प्रतियोगितेत सहभाग घेण्या करिता बोलावले.
अदितीनेही मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेत सहभाग घेतला. गृमिंग ट्रेनर मयुरेश महाजन यांनीही शेवटच्या ३ दिवसात अदितीवर विशेष लक्ष देऊन स्पर्धेसाठी तिची तयारी करुन घेतली . आयोजक विजया मानमोडे आणि सह आयोजक चारुशिला देशमुख यांनीही अदितीचा उत्साह वाढवला . तिच्या सोबत मंचावर पद्क्रमण-रॕम्पवाॕक करून मनोबल वाढवले. पाय साथ देत नसतांनाही काठीचा आधार घेवून तिने रॕम्पवाॕक केले, अदिती स्वतः उत्तम अशी कोरियोग्राफर सुद्धा आहे.तिने मंचावर लावणी नृत्य सादर करून सगळ्यांना भारावून टाकले. आपल्या मुलीला पुन्हा असे स्टेज वर नृत्य सादर करतांना बघून आई च्या डोळ्यातील आनंद अश्रु अनावर झाले होते. अदिती व तिच्या आईच्या सोबत सर्वांचे डोळे पान्हावले होते. प्रचंड टाळ्यांचा पाऊस दोघी माय लेकींसाठी पडत होता.
प्रथम आदर्श सौंदर्यवती व द्वितीय महा सौंदर्यसाम्राज्ञी चा किताब चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे, प्रसिद्ध हिंदी,मराठी सिने अभिनेता मिलिंद गुणाजी, हास्य जत्रा फेम पांढरीनाथ कांबळे उर्फ प्याडी यांच्या हातून अदितीला बहाल करण्यात आला. तिच्या जिद्दीला व आत्मविश्वासाला मानाचा सलाम.