Manda Khandare

Inspirational Thriller

3  

Manda Khandare

Inspirational Thriller

न्याय अन्याय - भाग 4

न्याय अन्याय - भाग 4

4 mins
225


शामलीचा चेहरा, डोळे सांगत होते की तिने काहीतरी पक्का निर्णय घेतला आहे. तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव दिसायला लागले होते. सकाळी घडलेल्या त्या भयंकर घटनेची तीव्रता, वेदना, त्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर आत्ता दिसत नव्हते. याची भीती वाटली सुमीला...


सुमी:- सांग ना काय मदत करू तुझी? असा कुठला निर्णय घेतला आहे तू.मला भीती वाटायला लागली आहे तुझ्या बोलण्याची.. 


शामली शांतपणे बोलली 


शामली:- काकू, मी तुला तुझ्या मुलीसारखी आहे ना, अगं....तू माझा आदर्श आहे. शाळेत न जाता मला लिहायला वाचायला शिकवले, तुझे आचार, विचार मला सर्व पटतात. या न्याय-अन्यायाच्या गोष्टी तूच मला समजावून सांगितल्या. बिकट परिस्थितीत खंबीरपणे कसे उभे राहायचे तूच मला शिकवत आलीस ना... मग अाज खऱ्या अर्थाने मला तुझी गरज आहे तर तुला भीती कशाची वाटते आहे...... माझा निर्णय योग्य आहे काकू... 


सुमी:- अगं तू म्हणते ते सर्व पटते आहे मला.... पण तू काय निर्णय घेतलास ते तर सांग आधी.... 


सुमी चिडून तिला म्हणाली.सुमीच्या मनातली भीती आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण शामलीच्या चेहऱ्यावर तीळमात्रही भीती दिसत नव्हती. ती तिच्या निर्णयावर किती ठाम आहे हे स्पष्ट दिसत होते. सकाळचे वेदनामय दुःख विसरुन ती आता न्याय मिळविण्यासाठी पेटुन उठली होती. 

सुमीला आपल्याकडे असे एकटक बघताना पाहून शामलीने तिच्या दंडांना धरुन हलवले.


काकू.....काय झाले..... तू ऐकते आहेस ना........ 


भानावर येत सुमी म्हणाली.... 

तू बोल.... स्पष्ट बोल


शामली म्हणाली,

काकू काकां प्रमाणे तुलाही आयुर्वेदाचे ज्ञान आहे. कोणते औषध उपयुक्त आणि कोणते विषयुक्त..... हे तुला चांगलेच माहिती आहे. तेव्हा मला तू विष........ 

शामलीचे बोलणे पु्र्ण व्हायच्या आतच सुमीने शामलीच्या कानशीलात एक लागवून दिली. 


सुमी:- पागल आहेस का तू,वेड बिड लागले की काय तुला..... हे काय बोलते आहेस?..... भानावर ये.... असला, भलता-सलता विचार का करते आहेस तू. आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याचा तुला काही अधिकार नाहीये शामली बेटा.... समजले तुला......... 


शामलीने लगेच सुमीच्या तोंडावर हात ठेवला. कारण सुमी जे बोलत होती तसे शामलीच्या मनातही नव्हते सुमीला विष शब्द ऐकून घाबरायला झाले होते म्हणून ती घाई घाई मनातले बोलून गेली. 


शामली:- काकू..... शांत हो.... मी का माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ? माझ्या जगण्याचा अधिकार काढून घेणारे ते लोक कोण आहेत. आत्महत्या करणे पाप आहे, हे तूच मला शिकवले ना.... तुझी शिकवण कसे विसरणार मी. आणि आत्महत्या करायला स्वतःचा जीव द्यायला मी काय भेकड, भित्री नाही.... मी काही गुन्हा नाही केला असे तोंड लपवायला........ तोंड लपवायचीच तर ते त्या पोरांनी लपवायची....गुन्हा त्यांनी केला..... तर शिक्षा ही त्यांनीच भोगायची ना.

रागाने लालबुंद झालेल्या डोळ्यात अचानक मृदु भाव आले. केविलवाण्या चेहऱ्याने ती सुमी जवळ जाऊन तिला विचारते.. 


शामली:- असा कसा हा समाज आहे काकू ? ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाच लोक तीक्ष्ण नजरेने बघतात, त्यांच्या घरच्यांना समाजात मानाचे स्थान राहत नाही. अपमान सहन करावा लागतो त्यांना, समाजात मान खाली घालावी लागते, शरीरिक आणि मानसिक अवहेलना भोगावी लागते. आणि उलट जे अन्याय करतात ते मात्र समाजात ताठ मानेने वावरतात. त्यांना कुणाची भीती नसते. की धाक नसतो. हे..... हे असे का गं काकू? सांग ना....... ती केविलवाणी डोळ्यात अश्रु आणून विचारत होती...... सुमीला काय बोलावे कळत नव्हते तिने शामलीचे डोळे पुसले. आणि तिला कवटाळले...... सुमीचे डोळेही पाणावले होते. कारण शामली जे बोलत होती त्यापेक्षा परिस्थिती काही वेगळी नव्हती. ते एक विदारक सत्य होते. जे त्यांच्या समोर होते. सुडाच्या भावनेने पेटलेली शामली चिडून म्हणाली.... 


काकू असे वाटते आहे एखादा विळा घ्यावा आणि सपा-सपा एका एकाला मारावे...... 


सुमी:- पण तू असे केले तर तुला शिक्षा हाईल बेटा.... 

सुमी काकूने लगेच म्हंटले...... 


शामली:- हो काकू कळते मला........ माहिती आहे मला याची शिक्षा काय हाईल ते.

म्हणून..... म्हणून तर म्हणते आहे मी काकू की, तू मला एक जहाल विष बनवून दे, मी ते त्या मुलांच्या खाण्यात नाहीतर पिण्यात टाकते. आणि हे मी सर्व लपुन करेल, म्हणजे कुणाला काहीच कळणार नाही. म्हणजे माझ्यावर नावच येणार नाही. आणि त्यांना शिक्षा दिल्याचे समाधानही मिळेल मला.


शामलीचे बोलणे ऐकून सुमीच्या पाया खालची जमीन सरकली. कपाळावर घाम चमकायला लागला होता. सुमीला वाटले आपलीच शिकवण होती ही.....आपणच शिकवले होते हे सारे.. लहानपणीपासून शामलीला की अन्याय सहन करनेसुद्धा पाप आहे म्हणून. पण आपलीच शिकवण अाज आपल्याला भोवणार आहे,खूप महागात पडणार आहे असे तिला राहून राहून वाटू लागले. हिम्मत करुन ती शामलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. 


सुमी:- कळते आहे का तुला तू काय बोलते आहे ते?त्यांनी गुन्हा केला म्हणून तू ही गुन्हा करणार का? आयुष्यभरासाठी तुरुंगात जावे लागेल...... नाही.... नाही..... मी असले पागलपण नाही करू देणार तुला..... आणि मी नाही तयार करुन देणार असले विष तुला. कळले?..... ती रागानेच बोलली तिला.... 

शामली काही बोलणार, इतक्यात काका आत आले जे दाराआड उभे राहून दोघींचे बोलणे ऐकत होते. 


काका:-मी तयार करुन देतो माझ्या लेकीला ते विष......


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational