Manda Khandare

Children Stories Children

3  

Manda Khandare

Children Stories Children

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिक

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिक

3 mins
290


आयुष्याच्या कुठल्याच वळणावर आई दुर जावू नये, 

आईच्या सावलीविना, कुणी होरपळून जावू नये. 


आई, 

नियतीने क्रुर असा डाव साधून तुला आमच्या पासुन दुर नेले. कसे सावरायचे ग आता आम्ही!?अथांग सागराच्या अनंत कोटी लाटांवर हे दुःख सतत हेलकावे घेत मनाच्या किनाऱ्यावर येऊन सांत्वनेच्या दोन शब्दांची अपेक्षा करते आहे. पण नेहमीचे तुझे ते सांत्वनेचे आज शब्द कानी पडत नाहीये. आई, दुःख झाले तर ते शब्दात व्यक्त करता येतं ग! पण शब्दांना दुःख झाले तर मग ते असे मौन पाळतात बघ!. काय बोलावे, कसे बोलावे, काय लिहावे,काही काही म्हणून कळत नाहीये! तुला न विचारता आम्ही कधीही कुठला निर्णय घेतला नाही की तुझ्या सल्ल्या शिवाय कुठले नवीन कार्य ही सुरू केले नाही.हे तु ही जाणत होतीस तरीही तु का ग असे सर्वाना अधांतरित करून गेलीस. वडिलांचे छत्र तर आम्ही आधीच हरवले होते.पण तु एकटी समर्थ होतीस हा सारा डोलारा सांभाळण्यासाठी. तुझ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आलेत, ज्या मधे एक साधारण स्त्री आपले मनोबल, आपले मनोधैर्य,आपला विश्वास स्थिर ठेवुच शकत नाही. पण आई,तु सर्वसाधारण स्त्री नव्हतीच.तुझा आत्मविश्वास, तुझे प्रत्येक प्रसंगात खंबीर असणेच तुला अन्य स्त्रियां पासून वेगळे आणि उंच शिखरावर नेऊन ठेवणारे होते. खरे तर,तुझ्या सारखे व्यक्तिमत्त्व घडवायला त्या विधात्याने ही खूपदा विचार केला असेल. तुझा संघर्ष लिहितांना तो अनेकदा रडलाही असेल. पण त्याला ही माहित होती तुझी लढण्याची ज़िद्द, तुझा आयुष्या कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, तुझ्यातील आत्मविश्वास. कुणाचेही कधीही मन न दुःखवण्याचा तुझा स्वभाव, जात,पात,धर्म भेद न मानता सर्वाना सदैव मदतीचा तु हात देत राहिलिस. तुझ्या प्रेमळ, गोड वाणीने तु अनेक माणसें जोडून ठेवली. माणसांची पारख तु अचुक करायची याचे तर जणू तुला वरदानच प्राप्त होते. तुझे अंदाज कधीही चुकत नव्हते.दादा च्या औद्योगिक क्षेत्रा संबंधी कुठला निर्णय असो किंवा आमच्या बहिणींच्या जीवनातील कुठलाही प्रश्न असो तुझ्या अनुभवाच्या शाळेत कायमच आम्हाला आमच्या कठीण प्रश्नांची उत्तरे अगदी सहज मिळत गेली. तुझी तल्लख बुद्धी,आणि प्रचंड स्मरणशक्तीला तर सलाम आहे. तुझे लाखो रुपयांचे हिशोब अगदी तोंडपाठ असायचे. जिथे आज काल स्वतःचा फोन नंबर लक्षात राहत नाही तिथे तु तुझ्या सम्पर्कातील हजारो लोकांचे फोन नंबर सहज लक्षात ठेवायची. 

आई,तु म्हणजे आमच्या साठी कल्पतरूच. एखादी इच्छा मनात जरी आणली तरी तुला ते कळायचे. आणि तु ती इच्छा पूर्ण करायची. तुला सारे कसे कळायचे हे रहस्य मात्र कायम आम्हाला राहायचे. तुझी समाजाप्रतिची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. कितीतरी संस्थांनांशी, शाळांशी तु जोडली गेली होती. सढळ हाताने,कुठे ही नाव न येऊ देता तुझी त्यांना मदत असायची. घरी आलेला व्यक्ति कधी खाण्या-पिण्या शिवाय गेला असेल असे कधी आठवतच नाही. आज समाजात अनेक व्यक्ति अश्या आहेत जे मान्य करतील की तुझ्या आशीर्वादाने,तु केलेल्या मदती मुळे त्यांचे संसार आज निट चालत आहेत. तु कायमच दुसऱ्यांचा विचार करत होतीस.आई तु म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ होतीस. आम्ही सर्व बहिण भाऊ जे आप-आपल्या क्षेत्रात यशस्वी पणे कार्य करत आहोत ते केवळ तुझ्याच संस्कारांची फलश्रुती आहे. तुला किती अभिमान वाटायचा सर्वांचा. 

मला कुठला ही पुरस्कार मिळाला की पहिला अभिनंदनाचा फोन तुझाच असायचा. शिवाय तुला लगेच त्या पुरस्काराचा फोटो सुद्धा हवा असायचा. कार्यक्रमाला जाताना मी कुठली साडी नेसावी हे सुद्धा तु मला सांगायची. आता कुणाला विचारू ग हे सारे! तुझ्या शिवाय सारेच विस्कळीत झाले ग! 

असे म्हणतात की, चांगले कर्म केले की त्याचे फळ ही चांगलेच मिळते. पण आज ही गोष्ट मला साफ खोटी वाटते आहे. कारण येवढे चांगले कर्म करूनही शेवटी तु दुःखा मधे आणि यातने मधेच का गेलीस ग? येवढ्या गंभीर आजाराला तु बळी का पडलीस आई?! कितीतरी असे प्रश्न अनुत्तरितच सोडून तु निघून गेलीस....... 


आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी

ती हाक येई कानी, मज होय शोककारी


नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी,आई घरी न दारी


न्यूनता सुखाची चित्ती सदा विदारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.


Rate this content
Log in