इण्डियन फ़िल्म्स - 1.8
इण्डियन फ़िल्म्स - 1.8
लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
1.8
मी परामनोवैज्ञानिक हीलर कसा झालो...
मी पाचवीत असताना, टी.व्ही.वर जवळ-जवळ रोज सर्व प्रकारचे मॅजिशियन्स, जादूगार आणि परामनोवैज्ञानिक हीलर्स दाखवायचे. ते कोणत्याही प्रकारचा आजार बरा करायचे. फक्त हात हलवायचे किंवा शब्दाने काही सूचना द्यायचे आणि तुमचा आजार एकदम गायब! तुमचा त्यांच्यावर विश्वास नसला तरीही. विशेषकरून दोन ‘हीलर्स’ नेहमी दाखवायचे – कश्पीरोव्स्की आणि चुमाक. चुमाकचे केस पांढरे होते आणि त्याचा प्रोग्राम सकाळी असायचा, तो फक्त हवेत हात हलवायचा (क्रीम ‘चार्ज’ करायचा, पाणी – म्हणजे असं की जे पण काही तुम्ही टी.व्ही.जवळ ठेवलं असेल, ते ‘चार्ज’ करायचा), आणि कश्पीरोव्स्की संध्याकाळी ‘हील’ करायचा, त्याचे केस काळे होते आणि तो बोलून सूचना द्यायचा.
मी त्यांना बघितलं आणि माझ्या मनात विचार आला की मी त्यांच्यासारखा ‘हीलर’ का नाही होऊ शकत? ते सुद्धा कधी काळी शाळेतच शिकायचे आणि आपल्या योग्यतेबद्दल तेव्हा त्यांना काहीही माहीत नव्हत. आमच्या शाळेत दर शुक्रवारी ‘क्लास-एक्टिविटी’ होत असे. मी ठरवलं की या शुक्रवारी मी ‘शो’ करीन. माशा मलोतिलोवाला पण कळेल की मी काही साधारण मुलगा नाहीये, खरोखरचा ‘हीलर’ आहे. माशा मलोतिलोवा आमच्या क्लासमधे सगळ्यात छान मुलगी आहे, पण, सध्या, याबद्दल काहीच नाही सांगणार.
मी आपल्या क्लास-टीचरकडे, ल्युदमिला मिखाइलोव्नाकडे गेलो आणि तिला सांगितलं की, अशी-अशी गोष्ट आहे, मी शुक्रवारी एक्टिविटी-टाइममधे हीलिंग शो करू शकतो का?
आधी तर ती हसली, मग तिने विचारलं की, हा ‘हीलिंग’चा गुण माझ्यात पूर्वीपासूनच आहे का आणि मग तिने परवानगी दिली. मला, देवा शप्पथ, खोटं बोलावं लागलं, की मी साधारण सहा महिन्यापासून पाणी ‘चार्ज’ करतोय आणि मी माझ्या काकांचा अल्सर बरा केला होता.
गुरूवारी, जेव्हा ‘शो’साठी फक्त एकच दिवस शिल्लक राहिला होता, मी विचार केला की थोडीशी ‘रिहर्सल’ करावी. मी कॅसेट-प्लेयरसमोर बसलो आणि अशी कल्पना करू लागलो की माझ्या शरीरातून स्ट्राँग-पॉझिटिव्ह एनर्जी निघते आहे. मी आपल्यासमोर हातांना हलवत म्हणू लागलो :
“डोळे बंद कर,” मी म्हटलं. “तुम्हाला एक मोट्ठी पांढरी खोली दिसतेय, जी प्रकाशाने तुडुंब भरली आहे. तुम्ही खोलीत आहात. तुम्हीं खोलीच्या मधोमध आहे. तुम्ही बाजूला उभे राहून स्वतःला बघताय, तुम्ही जणू काचेचे बनले आहात. पांढरा, भारहीन प्रकाश तुमच्या शरीराला ऊब देत आहे. मंद-मंद वारं वाहतंय. शरीराच्या ज्या भागात जडपणा आहे, तेथे जास्त प्रकाश एकत्रित होत आहे आणि जडपणा निघून जातोय. तुम्हाला बरं वाटतंय. तुम्हाला ऊब जाणवतेय.”
मी हातांना आणखी थोडा ताण दिला, त्यांना झटकलं आणि म्हणत राहिलो :
“वारं मंद होतंय. तुम्हाला मुश्किलीने त्याची जाणीव होतेय. तुम्हाला या स्थितीत शक्य असेल तितका जास्त वेळ राहावंसं वाटतंय. पण प्रकाश विखरू लागतोय. तो लुप्त होतो
ng>आणि स्वतःबरोबर तुमचे सगळे कष्ट घेऊन जातोय. तुमचं शरीर शांत आहे आणि स्वच्छ आहे...” मी जवळ-जवळ अर्धा तास बोलतच होतो, दारावरची बेल वाजेपर्यंत. शेजारचा मक्सिम मला बोलवायला आला होता. आम्हाला हिंडायला जायचं होतं, पण मी म्हटलं की आत्ता मी येऊ शकत नाही, मी त्याला खेचत माझ्या खोलीत आणलं, त्याला समजावलं की मी काय करतोय, आणि त्याच्यासमोर ‘शो’चा टेप रेकॉर्डर ठेवला. मक्सिमने एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे डोळे मिटले, न हलता पूर्ण कॅसेट ऐकली आणि म्हणाला : “व्वा, तू तर कश्-पी-र आहेस! त्याच्यापेक्षासुद्धा जास्त स्मार्ट आहे! सुप्पर! अरे, मी तुझ्याकडे आलो तेव्हा माझं डोकं दुखत होतं, पण आता–जणू काही हात फिरवून सगळं दुःख काढून टाकलंय!” मी विचार केला, चला, सगळं ठीक आहे, म्हणजे, उद्या सगळं व्यवस्थित होईल. शुक्रवारी सगळ्या क्लासेसमध्ये मी फक्त एक्टिविटी-टाइमबद्दलच विचार करत होतो. माझ्या वर्गमित्रांनी पहिला तास सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे डबे आणि क्रीमच्या ट्यूब्स दाखवल्या, ज्यांना चार्ज करायचं होतं, आणि, कालची रिहर्सल जरी चांगली झाली असली, तरी मी खूप वैतागलेलो होतो. जेव्हा एक्टिविटी-टाइम सुरू झाला आणि ल्युदमिला मिखाइलोव्नाने टीचरच्या टेबलामागची जागा मला दिली, तेव्हा त्या डब्यांच्या आणि क्रीमच्या ट्यूब्सच्या मागून मी जवळ-जवळ दिसतच नव्हतो आणि माझं हृदय इतक्या जोराने धडधडत होतं, जणू काही त्याला वेड लागलंय. “डोळे बंद करा,” मी सुरुवात केली. “एक पांढरी मोट्ठी खोली आहे, तुम्ही त्या खोलीत आहे. तुम्ही जणू काचेचे आहात. प्लीज, शांतता ठेवा...” पहिली गोष्ट, म्हणजे कोणालाच डोळे बंद करायचे नव्हते, आणि दुसरी, मी कितीही जीव तोडून सांगत होतो, तरी त्यांच्या हसण्याने माझ्यातल्या एनर्जीच्या प्रवाहांत अडथळा येत होता, सगळे हसतच होते आणि मला चिडवत होते. मी त्या परिस्थितीतही ‘शो’ करत होतो. जर सिर्योझा बोंदारेवने गडबड नसती केली, तर सगळं नीट झालं असतं, पण जेव्हां मी म्हटलं, की ‘तुमचं शरीर शांत आणि स्वच्छ आहे, आजार काळ्या पदार्थाच्या रूपांत त्याला नेहमीसाठी सोडून जात आहे’, तेव्हा सिर्योझा, जो साधारणपणे एक शांत स्वभावाचा मुलगा आहे, इतक्या जोराने खो-खो करत हसू लागला की शाळेची बिल्डिंग बस पडायलाच झाली. सगळे त्याच्याबरोबर हसू लागले. इतक्या जोराने हसू लागले की खिडक्यांच्या काचा थरथरू लागल्या. त्यांना वाटत होतं की जगात माझ्या ‘शो’पेक्षा जास्त हास्यास्पद आणखी काहीच नाहीये... ल्युदमिला मिखाइलोव्ना क्लासच्या दारात उभी राहून माझ्याकडे प्रेमाने बघत होती, शेवटी मी सुद्धा हसू लागलो, पण मग मी घोषणा केली, की काहीही झालं असलं, तरी पाणी आणि क्रीम्स मात्र ‘चार्ज’ झालेले आहेत. म्हणजे मला माहीत नाहीये की मी ‘हीलर’ आहे किंवा नाही. माझा ‘शो’ जरी फ्लॉप झाला असला, तरी सोमवारी माशा मलोतिलोवाने सांगितलं की, तिची तब्येत आता पहिल्यापेक्षा बरी आहे.