Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

हा भारत आहे, भारत!

हा भारत आहे, भारत!

8 mins
937


              

   भुताच्यावाडीचे मुख्याध्यापक वागवे त्यांच्या कार्यालयात बसले होते. कार्यालय म्हणजे काय तर शाळेच्या एका खोलीत दोन-तीन कपाटं लावून केलेली एक व्यवस्था! चौथीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत शिक्षक दोन आणि खोली एक अशी अवस्था! मुख्याध्यापक वागवे यांच्या जोडीला सहशिक्षक वाचाळ ! दोन दिवसांपासून वाचाळ शाळेकडे फिरकलेच नव्हते. भुताचीवाडी म्हणजे एक अत्यंत छोटी अशी वस्ती. दहा किलोमीटरवर तालुक्याचे गाव. दोघेही तालुक्याच्या गावी राहायचे. शाळा तितक्या जवळ असूनही शाळा करायची दोघांच्याही जीवावर यायचे. 

   वागवे पुस्तक वाचण्यात दंग असताना आवाज आला, "नमस्कार. वागवेसाहेब, नमस्कार."

पुस्तक बाजूला करून वागवेंनी पाहिले, भर हिवाळ्यातही घाम पुसत वाचाळ समोर उभे होते.

"काय चालले आहे, वागवेसाहेब?"

"शाळा करतोय..."

"खरेच की हो. शाळा ही बाब माझ्या लक्षातच राहात नाही. बरे, तसे पाहिले तर तुम्ही शाळेत येऊन करता काय तर टेबलवर पाय ठेवून पुस्तक वाचता. नाहीच तर वाडीतले भूतं जमवून गप्पा मारता."

"कसे काय वाचाळ, आज फार खुशीत दिसता?"

"तुम्ही ऐकाल ना तर तुम्हीसुद्धा आनंदाने उड्या माराल. द्या मस्टर. मारु द्या दोन सह्या."

"सह्या नाही. सही आणि फक्त आजची."

"एवढे मोठ्ठे काम करुन आलोय आणि तुम्ही..."

"वाचाळ, असे काय दिवे लावले म्हणायचे?"

"आपले साहेब भेटले सकाळी सकाळी. एक-दोन दिवसात तपासणी करायला येतो असे म्हणत होते पण मी अशी पाचर मारली म्हणता दरदरून घाम फुटला हो.."

"अस्स! काय सांगितले त्यांना?"

"त्यांना सांगितले की, सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात एक वाघ धुमाकूळ घालतोय. वाडीच्या रस्त्यावरून जाणारा-येणारास पकडतो. तुम्हाला काय सांगू, वागवेजी, चक्क घाबरले हो. आज सायंकाळी सगळे दप्तर घेऊन घरीच बोलावले आहे."

"वाचाळ, हे असे का केले? अहो, येऊ द्यायचे होते की. काय खाणार होते? "

"म्हणे येऊ द्यायचे होते. काय दाखवणार होते त्यांना? या कोऱ्याकरकरीत भिंती? साहेबांना अभिप्राय लिहिण्यासाठी एक कागद तरी आहे का? तुमचे रेकॉर्ड पूर्ण आहे? आणि शाळेत एक पोरग तरी आहे का? आत्ता तरी दाखवा एखादं पोट्ट शाळेत...." वाचाळ बोलत असताना गावातील एक प्रतिष्ठित माणूस आल्या बघून दोघांची चर्चा थांबली.

"काय मास्तर, आज आमोश्या हाय की पुनव हाय? न्हाई म्हन्ल दोघं बी साळत आलात..."

"बसा. बापू, बसा. वाचाळ, चहा सांगा बरे."

"द्या मग पाच रुपये..." हात पसरत वाचाळ म्हणाले.

"मास, दोघंबी येकदाच गावले म्हणून सांगतो, रोज नेमाने साळेत येत जा."

"अहो, आम्ही रोजच येतो हो, पण पोरं कुठे येतात? तुम्ही जरा लोकांना सांगत जा की. लोक तुमचे ऐकतात."

"मी रोज सांगतो हो. पर लोक म्हणत्यतसे, साळमंदी मास्तरच येत न्हाईत मंग आम्ही कहाला साळेत पोऱ्ह पाठवाव? वाचाळ आला की, गावभर फिरतो च्या पित आन् हेडमास्तर तोंडाला पुस्तक लावून बसतो. आता बोला."

बोलत-बोलत वाचाळांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन वर्गांची हजेरी काढली आणि इथून तिथून साऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी टाकून मोकळे झाले. नंतर त्यांनी शिक्षक हजेरीपट काढले. उघडले. बघतात तर त्यांची दोन दिवसांची चक्क लालशाईने रजा लावली होती. 

"हे..हे..काय?"

"काय म्हणजे रजा? तुम्ही शाळेत आला नाहीत मग रजाच लागेल ना? डबल पगार तर कुणी देणार नाही ना?"वागवेंनी विचारले.

"माझ्या रजा लावा आणि स्वतः चार-चार दिवसांच्या सह्या मारत जा."

"बराबर हाय हेडमास्तरचं. त्यो हेडमास्तर हाय.कवा बी यील, कवा बी जाईल. पर तुम्ही रोज साळेत यायला फायजेत. वागवेमास्तर, बराबर केलसा. लावत चला ह्येंच्या रजा. जरा दोन दिसासाठी धा रुपै द्या बर."

"घ्या." असे म्हणत वागवेंनी दहा रुपयाची नोट काढून दिली. तितक्यात चहा आला. चहा पिऊन तो गृहस्थ निघून गेला. तसे वाचाळ कडाडले,

"हे असे पैसे देऊन तुम्ही लोकांना लाडावून ठेवलय. तुम्ही काहीही केले तरी ही माणसं तुमचीच बाजू घेतात. चला. जावू द्या. आता वाजले की बारा."

"जमणार नाही. विसरा सारे. आजपासून शाळा पूर्ण वेळ करायची. दांड्या मारायच्या नाहीत."

"ते उद्यापासून. आज मी न जेवता आलोय. तुमचे ते सारे निर्णय नंतर..."

"चला. दुकानदार, चला." वागवे म्हणाले तसे वाचाळ खुलले.

"काही म्हणा. पण साहेब, सगळेच मला दुकानदारच म्हणू लागले हो."

"का म्हणणार नाहीत. तुम्ही शाळेत कमी आणि त्या दुकानावरच जास्त बसता.."

"त्याच स्टेशनरीच्या दुकानातून मारलेली लालशाईची पेन तुम्हाला भेट म्हणून दिली आणि तुम्ही त्याच पेनने माझी रजा लावली. हा काय न्याय झाला? माझे दुकान झाले ना, मग त्यात लालशाईचा एकही पेन ठेवणार नाही."

"पण कधी होणार आहे तुमचे दुकान?"

"होईल. नक्की होईल. म्हणून तर सध्या त्या दुकानात बसून सारे काही शिकून घेतो. जरा तेवढं ते रजेचे बघा राव. तुमचा एक सहकारी व्यापारी होण्यासाठी धडपडतोय तर करा जरा सहकार्य."

"बरे. बरे. उद्या या. मी नाही शाळेत."

"काय? पण आत्ताच तुम्ही रजेचा...."

"बघू आल्यावर." बोलत बोलत दोघे राहत्या गावी पोहोचले. आठ-पंधरा दिवसात दोघांमध्ये तसा वाद-सुसंवाद होत असे. 

   वाचाळांना शाळेपेक्षा इतर धंद्याचे जास्त वेड! त्यासाठी एका स्टेशनरी दुकानदारासोबत त्यांनी मैत्री जमवली होती. शाळेला दांडी मारून ते त्या दुकानात दिवस दिवस बसून राहायचे. काहीही झाले तरी स्टेशनरीचे दुकान टाकायचेच असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. त्यासाठी पतसंस्थेचे कर्ज, भविष्य निर्वाह निधीचे कर्ज, आर. डी.ची रक्कम, शिक्षकांकडून हातउसनी रक्कम, मित्रांकडे उधारी इत्यादी मार्गाने पैसा उभा केला होता. शेवटच्या क्षणी काम पडलेच तर बायकोच्या दागिन्यांवरही नजर होतीच.

"काही म्हणा साहेब, या दसऱ्याला आपले दुकान होणार म्हणजे होणार."

"वाचाळ, वेड लागलय का? तिथले व्यापारी महाभयंकर आहेत बरे."

"त्यांना विचारतोच कोण? मात्र तुम्ही म्हणता तसेच बदमाश आहेत. मी नुसता दुकान टाकण्याचा विचार करतोय हे समजताच दोघा-तिघांनी भागीदारीचा प्रस्ताव पाठवलाय."

"अहो, पण दुकानासाठी तुमच्याकडे जागा, भांडवल आहे का?"

"त्याची काळजी नाही. तीन लाख तयार आहेत. दोन लाखाचा माल क्रेडिटवर मिळतो. जागाही शोधून ठेवलीय...चांगली मोक्याची आहे."

वागवेजवळच नाहीतर इतर शिक्षक आणि परिचितांजवळ वाचाळांच्या अशाच गप्पा चालत असत. 

"दसऱ्याला आपल्या दुकानाचे ओपनिंग! सर्व शिक्षकांचे खाते टाकू. शिवाय रेट इतरांपेक्षा खूप कमी ठेवणार आहे."

काय झाले, कुठे माशी शिंकली ते वाचाळांनाच माहिती. परंतु दसरा जवळ येताच त्यांनी 'दिवाळीला नक्कीच'असा प्रचार सुरू केला.त्यामुळे त्यांच्या दुकानाची आणि त्यांची चर्चा जास्तच होऊ लागली. 

दिवाळी जवळ आली. तसं वाचाळ म्हणू लागले, "सध्या मी ज्या दुकानात बसतोय त्या मित्रासोबत पार्टनरशिप सुरू केली आहे. सुरुवात अशीच करावी लागते. जरा जम बसला की, देऊ उडवून बार. चौकातल्या एका जागेची बोलणी सुरू आहे."

    काही दिवसांनी शाळेत पोहोचलेले वाचाळ म्हणाले,"मिळवा हात. द्या टाळी.हेडमास्तर, आहात कुठे? ठरले. आपल्या दुकानाचे ठरले. आज पत्रिकाही छापायला टाकत आहे. उद्या माल आणायला जातोय. येताना तुमच्यासाठी खास स्कुटी आणतोय. हे एवढं अंतर रोज पायी चालून यायचे म्हणजे बरोबर नाही वाटत हो. आणा मस्टर...." असे म्हणत वाचाळांनी वागवेपुढे असलेले शिक्षक हजेरीपट  घेतले. सरासर अगोदरच्या चार दिवसांच्या आणि पुढील तीन दिवसांच्या सह्या करुन टाकल्या. वागवेकडे पाहून स्मित हास्य केले. वागवेंनी विचार केला की, आपला एक सहकारी पुढे जातोय ना, मग चार-आठ सह्या केल्या तर बिघडले कुठे? असे कोणते आभाळ कोसळणार आहे?

   दसरा झाला, दिवाळी पार पडली तसा वाचाळांचा गुढीपाडव्याचा घोशा सुरु झाला. 'पाडव्याला नक्की. शंभर टक्के!' आता मात्र सर्वांना वाचाळांचा तो वाचाळपणाच वाटू लागला. सर्वत्र त्यांचे हसे सुरू झाले. चेष्टा सुरु झाली. त्यादिवशी वागवे वाचाळांना म्हणाले,"वाचाळ, आता चर्चेला उत आलाय. दुकान टाका आणि सर्वांची तोंडे बंद करा नाहीतर नाही म्हणून जाहीर करा."

"असे कसे, हेडमास्तर? तुम्हीसुद्धा या वाचाळला ओळखले नाही म्हणायचे. मला सांगा लोक हसतात कुणाला? अधिकारी आणि पुढारी यांनाच आणि तेही त्यांच्या पाठीमागे. म्हणजे मोठ्या लोकांनाच की. माझ्या पाठीमागे हसतात याचा अर्थ मी पण मोठा माणूस झालो की नाही? द्या टाळी आणि या गोष्टीवर सांगा चहा." वाचाळ म्हणाले आणि वागवेंनी चहा सांगताच वाचाळ पुढे म्हणाले,

"हसते कोण? आपले जवळचेच ना? आतल्या आत जळतात हो सारे. हसू द्या हो."

"पण ते दुकानाचे काय?"

"हेडमास्तर, ते तर टाकणारच आहे हो. आणि तुमची स्कुटीही येणारच आहे. एक सांगू का, आपण पडलो सामान्य माणसं, कोणतेही मोठे काम, धंदा करायचा म्हटलं की, वांधा तर होणारच की, वेळ लागणारच. अनेकानेक अडचणी येतात. मोठमोठे उद्योजक काय करतात? मोठ्ठाले फलक लावून, पत्रकं वाटून, वर्तमानपत्रात, आकाशवाणीवर, टिव्हीवर जाहिराती देतात की नाही? अहो, माझ्या दुकानाची तर फुकटात जाहिरात होतेय की."

"ती कशी बुवा?" वागवेंनी विचारले.

"हाच तर फरक आहे, तुमच्यामध्ये आणि माझ्यात. तुम्ही काय किंवा इतर शिक्षक काय फक्त मास्टर परंतु ज्याला मास्टरमाइंड म्हणतात ना तो माझ्याजवळ आहे. हे बघा, सारे जण हसत, चिडवत, माझी टवाळकी करण्यासाठी का होईना माझ्या दुकानाची चर्चा करतात म्हणजे एक प्रकारे जाहिरातच करतात की. ती ही फुकटात! पटलं का?" 

"पटले बुवा, पटले..." वागवे वाचाळांच्या तशा अजब तर्कापुढे आणि जाहिरात तंत्रापुढे हतबल झाले. अशा वातावरणात दुकानाचे उद्घाटन लांबत गेले परंतु लोकांमध्ये चर्चा आणि वाचाळांच्या दृष्टीने फुकट जाहिरात मात्र होत राहिली. 

त्यादिवशी शाळेत आल्याबरोबर वाचाळ म्हणाले,"हेडमास्तर, यावर्षी मी कुटुंब नियोजनाच्या पाच केसेस करणार. मग मला ती उत्कृष्ट कार्याची आगावू वेतनवाढ मिळवून द्या बरे."

"वाचाळ, हे कोणते नवीन खुळ काढले आता. अहो, तुमचे कार्य तरी ..."

"कार्य? हेडमास्तर, आपण येथे भुताच्यावाडीवर येतो, औषधालाही मुले नसताना आपण एक-दीड तास का होईना भुतासारखे बसतो ये काय कमी आहे? मला सांगा आजकाल काम पाहून आगावू वेतनवाढ, आदर्श शिक्षक असे पुरस्कार मिळतात का? लागले तर लागले पाच-दहा हजार पण काहीही करून एकदा आगावू वेतनवाढ मिळवायची आणि मग अशी जंगी पार्टी द्यायची ना बस्स देखते रहना।" वाचाळाच्या त्या नवीन वेडेपणावर वागवे बिचारे काहीही बोलले नाहीत.....

   एक दिवस खरोखरीच वाचाळांनी स्टेशनरी दुकानाचा माल आणला. जागा घेतली. आकर्षक असे फर्निचर केले. माल व्यवस्थित लावून झाला. चांगल्या मुहूर्तही ठरला. तब्बल वीस दिवसांनी शाळेत येऊन दणादण सह्या मारणाऱ्या वाचाळांना वागवेंनी विचारले,

"का हो, वाचाळ, तुम्हाला भाऊ किंवा मेहुणा आहे का?" 

"कुणीच नाही हो. का बरे ?"

"का हो? मै हूं ना।"

"आणि शाळा कोण करणार?"

"च्यायला! शाळेची धोंड गळ्यात आहेच की. ठिक आहे, आठवड्यातून दोन दिवस येत राहील... सह्या करण्यासाठी. तोपर्यंत बायको सांभाळेल की..."

"वाचाळ, वहिनींचे शिक्षण किती झाले हो?"

"ती चौथी पास आहे."

"जमेल त्यांना? वाचाळ, मी इथं आहे तोपर्यंत ठिक आहे. उद्या आपली बदली झाल्यावर?"

"बापरे, बाप! हेडमास्तर, मी या गोष्टीचा विचारच केला नाही की हो."    

"काय चाललय मास्तर?" शाळेत आलेल्या एका पालकाने विचारले. त्याचे त्या दोघांशी विशेषतः वागवेंसोबत चांगले संबंध होते त्यामुळे वागवेंनी वाचाळांसोबत चाललेली सारी चर्चा त्यांना ऐकवली. ती ऐकून ते पालक म्हणाले,

"हात्तीच्या! सोप्प हाय की. परवा टिव्ही पाहिला नाही का?"

"त्याचा काय संबंध?" वाचाळांनी विचारले.

"संबंध आहे हो. कोणत्या तरी देशात दुकान हाय बगा. त्ये इंग्रजी नाव मला समजलं नाही पर त्या दुकानात मालकच न्हाई. गिऱ्हाईकानं दुकानात जायचं जे पाहिजे ते उचलायचं, तिथल्या कंपुटरला घेतलेला माल दाखवला की, ते कंपुटर बील देते. तेवढी रक्कम गल्ल्यात टाकायची नि निघून जायचे..."

"वाचाळ, अहो त्याला 'सेल्फ सर्व्हिस म्हणतात."

"वा! पाटील, वा! तुम्ही ग्रेट आहात. ठरलं आपलं, तुम्ही म्हणता तसेच दुकान आपण थाटणार." वाचाळ आनंदाने म्हणाले. वाचाळांनी लगोलग तशी तयारी सुरू केली. दोन-तीन दिवसात वर्तमानपत्रात जाहिरात दिली,'भारतात सर्व प्रथम, सेल्फ सर्व्हिस दुकान! दुकानात ना मालक ना नोकर! आपण या. माल पहा. घ्या. पॅक करा. काउंटरवर असलेल्या संगणकाकडून बील घ्या. पैसे भरा.घरी जा.' उद्घाटनाच्या दिवसापासून सेल्फ सर्व्हिसचा आगळावेगळा अनुभव आणि आनंद घ्या.'

   उद्घाटनाचा दिवस उजाडला. वाचाळ सकाळी लवकर दुकानात पोहोचले. झाडझुड करून पूजाअर्चा केली आणि तडक भुताचीवाडीवर शाळेत पोहोचले. हट्टाने वागवेंना दिवसभर शाळा करायला लावली. सायंकाळी चार वाजता दोघे ऑटोने बसस्थानकावर उतरले. दुकानाकडे निघाले. त्या दोघांकडे पाहून काही माणसं आणि दुकानदार गालातल्या गालात हसत असल्याचे वागवेंना जाणवत होते. दुकान जसजसे जवळ येत होते तसतशी वाचाळांची छाती अभिमानाने फुगत होती. दोघेही दुकानात पोहोचले. दुकान सारे रिकामे झाले होते.

"पहा. हेडमास्तर, पहा. सात तासात दीड लाखाचा माल खपला. टीव्ही आपणही पाहतो पण आपल्या लक्षात 'ना मालक, ना नोकर, फक्त ग्राहक' हा प्रकार आलाच नाही. या आता आपण रक्कम मोजू...." म्हणत वाचाळ खुर्चीवर बसले. त्यांना ड्रावर उघडले. त्यांना भोवळ यायची बाकी राहिले कारण गल्ला पूर्ण रिकामा होता. त्यांनी वेगळ्याच शंकेने सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही पाच रुपयाचा बंदा सापडला नाही. दुकानात तर एकही वस्तू शिल्लक नव्हती. घाबरलेल्या वाचाळांनी संगणकाला प्रश्न टाक. दुसऱ्याच क्षणी उत्तर मिळाले,

'मुर्खांनो अशा प्रकारचे दुकान इथे, या देशात चालेल कसे? हा भारत आहे रे, भारत आहे !'.....   

                                     

       


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy