Sanjay Phadtare

Children

3  

Sanjay Phadtare

Children

ग्रामीण दुर्लक्षित खेळ

ग्रामीण दुर्लक्षित खेळ

3 mins
223


इंटरनेट आणि मोबाईलमुळे लहान मुलं मैदानी खेळ,त्यातही पारंपरिक,कमी खर्चाचे खेळ खेळताना दिसत नाहीत.त्यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलपणा, मधुमेह असे विकार दिसून येतात. मैदानी पारंपरिक खेळांचा प्रसार होणं गरजेचं आहे.

    साधारण ४० ते ५० वर्षांपूर्वी सर्रास खेळले जाणारे सारे खेळ आता इतिहास जमा होत चालले आहेत.वास्तविक हे सारे बिनखर्चाचे असायचे. विशेषतः अंगणात, पटांगणात किंवा झाडांच्या सावलीत खेळले जात.या खेळामुळे मुलांची करमणूक तर व्हायची पण चांगलाच शारीरिक व्यायामही व्हायचा.


१.सूर-पारंबी:

   हा खेळ झाडाच्या सावलीतील असल्याने विशेषतः उन्हाळा सुट्टीत खेळला जायचा.शिवाय साऱ्यांचे झाडावर सरसर चडायचे व उतरायचे कसब आपोआप सर्वांना लाभायचे. या खेळाला कितीहीजण सहभागी होऊ शकत. झाडाच्या खाली सावलीत जमिनीवर एक छोटे रिंगण करायचे,त्या रिंगणात हातभर लांब काटी ठेवली जायची.खेळाची सुरुवात रिंगणातील काटी ढेंगे- खालून जास्तीत जास्त लांब फेकायची.ज्याच्यावर डाव येईल त्याने ती धावत जाऊन आणेपर्यंत इतरांनी चटकन झाडावर चडून बसायचे.रिंगणात काटी आणून ठेवताच त्याने इतर गडयानां शिवायचा प्रयत्न करायचा.तो पर्यंत इतरांनी सर्रकन झाडावरून उतरून रिंगणातील काटीस शिवायचा प्रयत्न करायचा.यात ते यशस्वी झाल्यास पुन्हा त्याच्यावर डाव येऊन पुन्हा फेकलेली काटी आणायला धावायचे. अथवा रिंगणातील काटी शिवायच्या आत एकाद्या संवगड्यास शिवल्यास त्याचा डाव त्या गड्यावर यायचा.या खेळात धावणे,सरसर झाडावर चढ-उतार करणे,या खेळाच्या धावपळीत काही खरचटले किंवा जखम झालीच तर लगेच 'ट्याम्प्लिस'(टाइम प्लिज) करीत खेळ थांबवून आसपास असलेल्या 'तुळस' किंवा 'दगडी पाला' हातानेच चुरघळून त्याचा रस जखमेवर लावून पुन्हा खेळ सुरू केला जायचा. उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करीत खेळला जाणारा हा खेळ सर्वांच्या पसंतीचा होता.


२.लगोरी:

   लगोरी खेळ देखील थोडाफार सूर पारंबी सारखाच.या खेळात कितीही जण सहभागी होऊ शकतात. या खेळाला एक रबरी चेंडू किंवा अगदी कापड्याच्या बोळ्याचा शिवून तयार केलेला चेंडू वापरला जायचा.साधारणपणे चपटे दगड किंवा गोलसर फरशीचे तुकडे एकमेकांवर रचून लगोरी तयार व्हायची.ठराविक अंतरावरून चेंडूने लगोरी फोडायची अन साथीदाराने लागलीच चेंडू लांब फेकून द्यायचा.ज्याच्यावर डाव असेल त्याने चेंडू घेऊन येईपर्यंत इतरांनी झटपट कोसळलेली लगोरी नीट रचून ठेवली तर पुन्हां त्याच्यावर डाव यायचा.पण   लगोरी रचनाऱ्यास लांबूनच चेंडूने टिपल्यास आऊट होणाऱ्या संवगड्यावर डाव यायचा.या खेळात झटपट लगोरी रचणे,स्वतःला चेंडुपासून चुकविणे,चेंडू लांब भिरकावणे इत्यादी बाबी जमाव्या लागतात.


३.आट्या-पाट्या:

    हा खेळ सपाट पटांगणात खेळला जायचा.काही भागात या खेळाला सूर-पाट्या असेही संबोधतात.साधारण दोन संघात हा खेळ खेळला जातो.किमान ५,७ किंवा ९खेळाडू मिळून एक संघ तयार होतो.मैदान आयताकृती बनवले जाते. मैदानाच्या मधोमध सरळ रेषेत पाऊल वाटेसारखा पट्टा बनवतात ज्याला सूर असे म्हणतात.सुरपाटीच्या दोन्ही बाजूस किमान १०फूट ×१०फूट आकाराची खेळाडूंच्या संख्येनुसार चौकोन किंवा घरे आखतात.९खेळाडू असल्यास त्यात एक सूर तर उर्वरित ८ जणांना प्रत्येकी एक घर अशाप्रकारे सूर पाटीच्या दोन्ही बाजूस ८ समान चौकोन किंवा घरे बनवतात .एक संघ हल्ला करीत एक बाजूने म्हणजे कपाळ- पाटीकडून शेवटची म्हणजेच लोण- पाटीकडे जाणे,पण बचाव पार्टीचा स्पर्श न करवून घेता सर्व पाट्या ओलांडून जायचे असते.नंतर लोण पाटीपासून पुन्हा सुरक्षितपणे कपाळ पाटी पार केल्यास विरुध्द पार्टीवर एक लोण होतो.बचाव पार्टी हल्ला पार्टीतील सदस्यास कोंडी फोडत पुढे वाटचाल करताना त्याला शिवण्याचा किंवा स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करायचा.सूर गडी हा मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणताही गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो.कोणी हल्ला व बचाव पक्ष घ्यायचा हे ओली-सुकी करून ठरवले जाते.तसेच एक लोण होताच पक्ष बदल केला जातो.जो संघ जास्त लोण करील तो विजेता ठरतो.


४.आबा-धबी:

   या खेळात कितीही जण सहभागी होऊ शकतात.यात केवळ रबरी चेंडू किंवा कपड्यांच्या बोळ्या पासून बनविलेला चेंडू वापरतात.यात ज्याच्या हातात चेंडू येईल त्याने कोणासही नेम धरून जोरदार पणे शक्यतो पाटीत मारायचा;तर इतरानी तो मार चुकवत चेंडू ताब्यात घेऊन पुन्हा इतरांवर मारा करायचा. या खेळात फार पळापळ करून मार चुकवीत इतरांवर हल्ला करायचा असल्याने चांगलीच दमछाक होते.हा खेळ खेळताना समोर लहान मुलगा किंवा भाऊ वगैरे असल्यास त्याच्यावर नकळत हळुवारपणे मारा केला जायचा.

    कोणताही खर्च न करता केवळ उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून हे सारे खेळ खेळले जायचे,तरीही सारेजण शारीरिक व्यायामासह अगदी मनसोक्त आनंद मिळवायचे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Children