Jaya Godbole

Classics Others

3  

Jaya Godbole

Classics Others

गोविंदा

गोविंदा

7 mins
193


*मिस्टरांची अलिकडेच बदली तमिळनाडू ईथे झाली. आणी काही कारणास्तव मी मुंबईतच रहाणे पसंत केले. मुलगा पुण्यातच उच्च शिक्षण घेत असल्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा मी मुंबईत असणं हे योग्य होते. त्याचे बीझी शेड्युल बघता त्याने आधीच मला सांगीतले होते की त्याला सध्या सुट्टी घेऊन येता येणार नाही. पण तरीही जेव्हा मी तमिळनाडू ला सुट्टीवर जायचा विचार केला तेव्हा सहजच त्याला फोन करुन यायला जमेल का म्हणून विचारले. आणी योगायोगाने होळी-रंगपंचमी ची सुट्टी लागुनच आल्यामुळे त्यानेही फारसे आढेवेढे न घेता माझ्याबरोबर यायला संमती दिली.*

*मी कल्याण येथुन मास एक्स्प्रेस पकडली आणी तो पुण्यावरून गाडीत चढला. त्यानंतरचा सगळा प्रवास सुखरूप होत असताना* *अरक्कोणमच्या दीड तास आधी रेणीगुंठा जंक्शन लागले. रेणीगुंठा जंक्शनला उतरुन ड्राईव करून तिरुपतीला पोहचता येते. आमची एक्सप्रेस स्टेशनवर थांबली. आणी अचानक माझा मुलगा एकदम* *उत्साहाने म्हणाला की आई, आपण ऊद्या तिरुपतीला जायचं. तयार रहा....... माझ्यासाठी तो आश्चर्याचा पहिला धक्का होता. कारण माझा मुलगा हा नास्तिक आहे. त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही. कधीही मंदीरांकडे न फिरकणारा हा मुलगा स्वतः हुन असं म्हणताना बघुन मला काय बोलावे ते समजेना. मी स्वतः जरी आस्तिक असले तरीही खुप वर्षे आधीच मी बालाजींना सांगुन ठेवले होते की मी तुझ्या दर्शनाला एवढ्या लांब तिरुपतीला अजिबात येणार नाही. माझा काही तुझ्यावर राग नाही आहे. पण तुझी मंदिरे जवळपास असताना एवढा त्रास सहन करुन मी तिकडे तुझ्या दर्शनाला का बरं यावे.....* 

*त्यावेळी तिरुपतीला जाऊन बालाजीचे दर्शन घेणे इतकं सहज-सोपं नव्हते.  भाविकांना २-३ दिवस रांगेत, कडक उन्हात ,अनवाणी पायाने चालावे-ऊभे रहावे लागत होते. आणी त्यानंतर सुद्धा जर बालाजीची ईच्छा असेल तरच त्यांना दर्शन होत होते. नाहीतर काहीना काही कारणांनी लोकांना मागे पण फिरावे लागत असे. आजही परिस्थिती काही फार वेगळी नाही आहे. हे सगळं काही माहिती असल्यामुळे मी बालाजीच्या दर्शनाला जाण्याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आणी चक्क आज माझा मुलगाच मला सांगत होता की आई आपल्याला जायचे आहे. कुठेतरी मनात मी सुखावुन गेले. बालाजीला मनोमन नमस्कार करुन मुलाला हो म्हणाले.*

*दुसर्या दिवशी सकाळी लवकर तयार होऊन आम्ही दोघेही निघालो. मिस्टरांना सुट्टी नव्हती. आम्हाला कसं जायचं...कुठे जायचं काहीही माहिती नव्हते. गुगुल मॅप च्या आधारे अरक्कोणम ईथुन मजल-दरमजल करत अडीच तासांनी जिथुन बालाजी मंदिराच्या परिसराला सुरुवात होते तिथपर्यंत येउन पोहचलो. भव्य आणी विस्तिर्ण कमान आणी त्या कमानीच्या पलिकडे हिरव्यागार डोंगर रांगांमधुन  सगळ्या भाविकांना दर्शन देणारा तो मंदिराचा कळस.....अहाहा.....* *त्यावेळी झालेली माझ्या मनाची अवस्था अवर्णनीय.....तिथुनच हाक मारली.....व्यंकटेशा.....आलेरे...तुला भेटायला.....तुच बोलावून घेतलेस मला... नाही तरी कशी म्हणणार होते मी....आता खरंच तुझ्या दर्शनासाठी हे मन आणी डोळे आतुर झालेत देवा.....*

*ह्या कमानिच्या पलिकडे काही क्षणांनंतर मला दर्शन लाभणार आहे ह्या जाणिवेने मन एकदम उताविळ झाले होते. मुलगा पण तेवढाच उत्सुक होता. तिथुनच मंदिराच्या कलशाचे फोटो काढले. भक्ती पुर्ण नमस्कार केला. त्या कमानिच्या आत जात असतानाच एअरपोर्टवर ज्याप्रकारे चेकिंग होते त्याचप्रमाणे चेकिंग झाले. मिलिटरी पासेस आम्हा दोघांकडे असल्याकारणाने ऑनलाईन बुकींग ची आवश्यकता आम्हाला भासली नाही. तिथुन आत शिरल्यानंतर बरोबर एक तास वळणदार रस्यांवरुन ड्राईव केल्यानंतर आम्हाला वाटले होते की फक्त मंदिर आणी त्याच्या आजुबाजुचा परिसर एवढेच असेल. पण इथे तर चक्क एक मोठं शहर असल्याचे जाणवले. खुपचं मोठा परिसर, दुकाने, लॉजिंग-बोर्डिंगच्या इमारती, आवश्यक गोष्टींची दुकाने. तिथुन पुढे कुठे जायचे माहित नव्हते. भाषेची अडचण. तिथल्या लोकांना तमिल -तेलगु ह्या भाषांव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती.*

*तिथल्या बोर्डवर लिहिलेल्या सुचनांचा अंदाज घेत घेत आम्ही जिथे दर्शनासाठी असलेलं पहिलं प्रवेशद्वार होतं तिथेच बाजुला गाडी पार्क केली. तिथुन आत प्रवेश करताना दोघांचीही ओळखपत्रे बघीतली गेली . थोडं चालुन पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूलाच ३०० रुपये देऊन ऑनलाईन बुकींग ची एक लाईन होती. आम्हाला काहीही माहिती नसल्यामुळे तसं बुकिंग आम्ही केलं नव्हतं आणी त्यादिवशीचे बुकींग पण बंद झाले होते. डोक्यावर रणरणतं ऊन मी म्हणत होते. शेवटी एकदाचे VIP प्रवेशद्वार आले. तिथे परत एकदा ओळख पत्र दाखविल्यानंतर आत सोडले.* *क्षणाक्षणाने मी व्यंकटेशाच्या जवळ पोहचत आहे असं वाटत असतानाच जिथुन मंदिरात जायला मुभा होती तीथेच मंदिराच्या कर्मचार्याने थांबविले. आम्ही ओळखपत्र दाखविल्यावर ते म्हणाले की मुख्य मिलीटरीमधील व्यक्ती कुठे आहे? तुम्ही त्यांचे कुटुंब असलात तरी त्या व्यक्तीशिवाय तुम्हाला आत प्रवेश नाही. आम्ही खूप विनंती केली पण ते ऐकायला तयारच नव्हते . शेवटी परत एकदा व्यंकटेशाला हात जोडले आणी विचारले....हे रे काय.... इथपर्यंत आणलेस आणी आता ही कोणती परिक्षा बघत आहेस??? ईथुन माघारीच पाठवायचे होते तर इथपर्यंत आणलेस तरी कशाला....*

*मी त्या कर्मचाऱ्यांना सांगीतले की भाषेची खुप अडचण असताना सुद्धा इथपर्यंत कडक उन्हातुन अनवाणी पायांनी तापलेल्या रस्त्यांवरून चालत आलो आहोत. कसलीच माहिती नाही आहे. कृपया काहीतरी मदत करा. त्यावर त्या कर्मचाऱ्याला पण खुप वाईट वाटले. ते म्हणाले की मी आमच्या नियमांशी बांधील आहे. पण तुम्ही ईथुन चालत अर्धा तासांवर असलेल्या JEO ह्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटलात तर कदाचित तुम्हाला ते परवानगी देतील. मी हतबुद्ध झाले. आणी त्याच क्षणी माझा मुलगा तापलेल्या रस्त्यावरुन,अनवाणी पायांनी मला तिथेच थांबायला सांगून JEO च्या कार्यालयाकडे निघाला. त्याला JEO काही भेटले नाहीत.‌पण रस्त्यात एक व्यक्ती आपलं ओळखपत्र कुणाला तरी दाखवताना दिसली. ते ओळखपत्र मिलीटरीवाल्याचे असल्याचा अंदाज करुन मुलाने त्यांच्याकडे मदत मागितली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसुन JEO च्या कार्यालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा लहान भाऊच होती. दरवर्षी प्रमाणेच आपला नवस फेडण्यासाठी ते तीथे आले होते. त्यांची पत्नी गेले ९ वर्षे भयंकर आजारी आहे आणी त्यातच तीची डिलीव्हरी पण झाली होती. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला आणी बाळाला पुर्णपणे बालाजी वर सोपवले होते. त्यांनी थोडावेळ विचार करून माझं आणी माझ्या मुलाचं नाव त्यांच्या प्रवेश अर्जावर घातले. आणी ते मला म्हणाले की खरं तरं हे आमच्या नियमांमध्ये अजिबात बसत नाही आहे. कोणतीही मिलिटरी व्यक्ती आपल्या कुटुंबाशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्वतः बरोबर आतमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रवेशद्वारावर दर्शनासाठी ताटकळत उभ्या आहात हे मला तुमच्या मुलाकडुन समजले तेव्हा मला काय झाले माहिती नाही, पण तुम्हाला दर्शन होयला पाहिजे असे वाटले. म्हणुनच तुम्हाला मदत करायला मी तयार झालो.* 

*मी त्या व्यक्तीचे खुप आभार मानले. मोबाईल मंदिरात घेउन जायला परवानगी नसल्याने आमचे मोबाईल्स आम्ही कार्यालयात जमा केले. ती व्यक्ती आमच्या बरोबर असल्यामुळे नंतर आम्हाला कुठेही कसलीही अडचण भासली नाही. प्रत्येक ठिकाणी थांबून तिथली माहिती ती व्यक्ती आम्हाला देत होती. खुप वेळ चालत असताना पुढे तीन विभाग लागले. प्रत्येक विभागात काही भक्तांना काही काळ ठेवलं जातं होते. आणी हळूहळू पुढे पाठवले जात होते.*

*काही काळ पुढे चालत जात असताना गारवा जाणवू लागला आणी अचानक कडेवर बसलेल्या,पायी चालणाऱ्या लहान निरागस मुलांनी आपल्या बोबड्या शब्दांमध्ये गोविंदा ssss गोविंदाssss म्हणुन हाक मारायला सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ भाविकांनी सुद्धा गोविंदाला आळवायला सुरुवात केली.  तिथेच मला बालाजीच्या ह्या दुसर्या नावाची ओळख झाली. नकळत माझे हात जोडले गेले, डोळ्यांत पाणी तरळले. त्या लहान , निरागस बाळांच्या पवित्र ह्रदयांतुन निघणारी बोबडी,प्रेमळ,निस्पृह हाक कानावर पडत असताना आतल्या गाभाऱ्यात उभा असलेला गोविंदा सुद्धा प्रसन्न वदनाने आपल्या बालकांच्या भेटीसाठी आसुसलेला होता. 🌷🙏🏼☺️*  

*मीसुद्धा भारावलेल्या मनाने गोविंदाला आळवित पुढे निघाले. चालता चालता काही अंतरावरच गाभारातल्या समयांच्या मंद प्रकाशात ऊभ्या असलेल्या भव्यदिव्य साधारण ८ फुट उंच, दागिन्यांनी-फुलांनी मढलेल्या , चेहर्यावर मंद स्मित असलेल्या* *गोविंदाचे ओझरते दर्शन मला होत होते. माझे हात नकळत ज्याच्यासमोर जोडले जात होते तोच माझा बालाजी....तोच माझा व्यंकटेश...तोच माझा गोविंदा...आणी तोच माझा विठुराया माझ्यासमोर काही अंतरावर प्रसन्न वदनाने माझ्याकडेच पहात होता.*

*अवघा रंग एक झाला....*

*अवघा रंग एक झाला....*

*रंगी रंगला श्रीरंग...*

*अवघा रंग एक झाला....*

 *देहभान विसरून त्याच्याकडे बघत असताना डोळे आणी मन काठोकाठ भरुन आले. गोविंदा अशीच कृपा कायम आम्हा लेकरांवर ठेव , ज्या ज्या वेळी तुझी आठवण होईल त्या त्या वेळी तुझे हेच रुप डोळ्यांसमोर तरळले पाहिजे इतकं त्याला माझ्या मनात, मेंदुत आणी डोळ्यांमध्ये अढळ कर....म्हणत गाभार्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्टीलच्या दांडीवर डोकं टेकलं. काही क्षणांच्या त्या दर्शनाने मन भारावून गेले.....पण समाधान होत नव्हते. एकटक बघत रहावसं वाटत होते. माझ्या मागे असलेली भाविकांची अफाट गर्दी बघता ते शक्य नव्हते. गोविंदा, परत एकदा मन भरेपर्यंत तुझं दर्शन हवे आहे रे म्हणत बाहेर पडले. माझ्याकडे आणी गोविंदा कडे बघत असलेल्या माझ्या मुलाच्या चेहर्यावर एक आत्मिक समाधान झळकत होते. बरोबरची ती व्यक्ती बाजुला उभे राहून माझी वाट बघत होती. ते म्हणाले तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला खूप जवळून दर्शन झाले. ज्या स्टीलच्या दांडीवर तुम्ही डोके टेकवले त्याला फक्त तिथे पुजा करणारे पंडितच हात लावतात.*

*भारावलेल्या मन:स्थितीने* 

*मंदिरातुन बाहेर पडुन एक प्रदक्षिणा मारली. त्यावेळी जाणवले की मंदिराच्या आजुबाजुच्या लाद्या बसविण्यासाठी चांदीचा वापर केलेला आहे. तसंच तीथेच बाजुला पंचधातुंपासुन बनविलेली मोठी तुला ठेवलेली होती. आणी त्यावर लहान मुलांचा तुलाभार चालु होता. लहान मुलांचा तुलाभार म्हणजे बाळ झाले तर काही कालावधीनंतर बाळाच्या वजनाची एखादी वस्तू गोविंदाला अर्पण करणे असा भाविकाने केलेला नवस. त्या तुलेला स्पर्श केल्यावर आपली आत्तापर्यंतची पापे नाहीशी होतात आणी आपल्याला पुण्य लाभते असा लोकांचा विश्वास आहे.* *आजुबाजुला इतरही अनेक सोन्याने मढलेल्या देवतांच्या मूर्तींचे दर्शन झाले.* 


*तिथुन बाहेर पडुन फिरत असताना लक्षात आले की मुलाचे पैशांचे पाकिट कुठेतरी हरवले आहे. त्या पाकिटात त्याचे ओळखपत्र सुद्धा होते. परत एक नविन चिंता.... आणी त्याच वेळी काळजी करू नका, मी आहे असे सांगत ते पाकीट रात्री आठ वाजेपर्यंत सीसी टिव्हीच्या मदतीने परत मिळेपर्यंत ती व्यक्ती आमच्याबरोबर तीथेच होती. त्या प्रचीतीनंतर मात्र माझ्या मुलाचा गोविंदावर विश्वास बसला. त्या व्यक्तीसमोर त्याने कृतज्ञता व्यक्त करत गोविंदाला एक भक्तीपुर्ण नमस्कार केला.*

*माझ्या नास्तिक मुलाला मला बरोबर घेऊन गोविंदा चे दर्शन घेण्याची इच्छा होणे, त्यासाठी त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात तो कधीही चालला नाही इतके त्याचे अनवाणी, तापलेल्या रस्त्यावरुन विनातक्रार चालणे, गोविंदाचा चांदीचा मुकुट डोक्यावर लाउन घेणे, ती अनोळखी व्यक्ती JEO च्या कार्यालयाशी संलग्न निघुन तीथे कार्यरत असलेल्या सगळ्यांच्या ओळखीची असणे आणी त्या व्यक्तीने नियमांविरुद्ध जाऊन आम्हाला केलेली अमुल्य मदत हे सगळं काही चमत्कार - साक्षात्कार नव्हते तर अजुन काय होते......*

*ही सगळी त्या विश्वरक्षक गोविंदाचीच तर माया होती ना....*

*मी अतिसामान्य मानव त्या मायेतुन कशी उतराई होणार .....*

*हेची दान देगा देवा....*

*तुझा विसर न व्हावा....*

*विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा...*


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics