Jaya Godbole

Drama Tragedy Crime

3.4  

Jaya Godbole

Drama Tragedy Crime

पगली

पगली

4 mins
691


"पगली की अम्मी मरी रे...." रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. पगलीच्या अम्मीला सुसाट वेगाने येणाऱ्या एका गाडीने उडवलं होतं. पगली अम्मीला जोरजोरात हलवत होती. पण अम्मी हलत नव्हती. सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. पंचनामा झाला. आणि पगलीच्या अम्मीला घेऊन ते गेले. "बहोत बुरा हुवा... अब क्या होगा ईस पगली का... खुपच वाईट झालं रे... कसं होईल या पोरीचं..." म्हणत हळूहळू गर्दी पांगली. 


पगली तशीच रात्रभर फुटपाथवर बसुन राहिली आणि तिथेच झोपली. सकाळी कोणीतरी तिच्यासमोर एक कटिंग चहा आणि बिस्कीटचा पुडा ठेवला. "अम्मी " म्हणत पगलीने पटकन वर बघितले. तिच्या टपोऱ्या डोळ्यांतील आनंद आणि ओठांवरचं हसू क्षणार्धात लोप पावलं. तिथे कुणीच नव्हतं. तिची कावरीबावरी नजर अम्मीला शोधत होती. तिथून उठून अम्मीला हाका मारत वाट फुटेल तिकडे ती चालत राहिली. एव्हाना डोळ्यातून वाहिलेलं पाणी तिच्या मळकटलेल्या गालांवर येऊन सुकलं होतं. फुटपाथवरुन चालताना तिथल्या दुकानांजवळ, माणसांजवळ थांबून तिची नजर माझी अम्मी कुठे आहे म्हणून विचारत होती. तिच्या वागण्याचा अर्थ लक्षात न आलेली माणसे तिला "चल बाजुला हो" म्हणत तिरस्काराने तिच्याकडे बघत तिला झिडकारत होती.‌ तिचा अवतारच तसा होता‌. अंगावरच्या कपड्यांसकट तिचं सगळं शरीर मळाने कळकट्ट झालं होतं. डोक्यावरच्या केसांनी कितीतरी दिवसांत तेल-पाणी पाहिलं नव्हतं. फुटपाथवर प्यायलाच पाणी मिळणं मुश्किल होतं. तर आंघोळीचे विचार त्यांच्या मेंदुच्या पलीकडचे होते. तरीही अम्मी कधी धर्मादाय पाणपोई दिसली की रिकाम्या बाटलीत पाणी भरून आणून पगलीला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायची. उरलंच जर पाणी तर स्वत:च्या चेहऱ्यावरसुद्धा शिंपडायची.

 

पण आता सगळंच बदललं होतं. 

पगलीचं खाणं-पिणं बघणारी अम्मी हरवली होती. 

स्टेशनच्या जवळचा चिंचोळा, भरगर्दीचा रस्ता होता तो. आजुबाजुची गटारं चुकवीत एका बंद असलेल्या टपरीच्या पायरीवर 

असहाय्य असलेली पगली शुन्यात नजर लावून बसली. त्या क्षणाला माणसांपेक्षा त्या पायरीचाच तिला जास्त आधार वाटला. 

इतक्यात जवळच असलेल्या भंगाराच्या दुकानातून रफीकने तिला हाक मारली, "ए पगली, ईदरका कचरा साफ कर, खाना मिलेगा." ती बावरली. पण तशीच त्याच्याकडे निर्विकारपणे बघत राहिली. शेवटी वैतागून दुकानाच्या बाहेर येत त्याने तिला कचरा उचलून दाखवला. ते बघत तिनेसुद्धा दुकानासमोरचा कचरा उचलणं सुरु केलं.

 

हळूहळू सगळेच दुकानदार, फेरीवाले तिच्याकडून कधी फुकट तर कधी खायला देऊन, कधी शिव्या घालून काम करुन घेऊ लागले. काम करुन दमली की ती त्याच पायरीवर झोपत असे. ती पायरीसुद्धा अगदी तिच्याच मापाची बनली होती. जणू काही तिची समवयस्क मैत्रीणच.


असंच एका संध्याकाळी ती अंगाची मुरकुंडी मारून झोपलेली असता एक किडकिडीत शरीराचा, तोंडात पानाचा तुंबडा भरलेला, दाढीची खु़ंट वाढलेला माणूस तिच्याजवळ येऊन तिला "वडापाव खाओगी क्या?" म्हणून विचारु लागला. तिने मान डोलावली आणी ती उठून बसली. त्याची वखवखलेली नजर तिच्या कळकट्ट कपड्यांच्या आतल्या कोवळ्या स्त्री शरीराला चाचपडत होती. पण तिला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती. जवळच्याच टपरीवरुन त्याने दोन वडापाव बांधून घेतले व तो चालत राहिला. त्याच्या पाठोपाठ तिही चालत राहिली. एका सुनसान ठिकाणी तो थांबला. तिची नजर आशाळभुतासारखी त्याच्या हातातील वडापावच्या पुडक्यावर खिळली होती. त्याचवेळी तो वासनांध तिच्या अंगावरच्या कपड्यांशी झटपटत होता. तिला ते आवडत नव्हतं. रागाने त्याने तिच्या कानशिलात जोरात मारली. ती भेदरली आणि तिथेच कोलमडली. आपला कार्यभाग उरकून दात विचकत त्याने तिच्या हातात पुडकं दिलं आणि तो पसार झाला. आपल्या बरोबर काय झालंय हे नं कळल्यामुळे ती तशीच सुन्न बसून वडापाव खात राहिली.


दिवसामागून दिवस जात होते. कधी फुटपाथवर, कधी रेल्वे ट्रॅक जवळून, कधी पुलाखालून आपल्या वाढत्या पोटाचा घेर सांभाळत पगली भटकत होती. कधी उकिरड्यावरचं, कधी कुणाचं उष्ट खात होती, तर कधी कोणी तिला खायला देऊन तिच्याबरोबर स्वत:चे फोटो काढत होते. चालता चालता मधेच दचकून पोटावर हात ठेवून ती थांबत होती तर कधी मधेच गुदगुल्या झाल्यागत हसत होती. 


निसर्गचक्र फिरतच होतं. तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. ती विव्हळत होती. आजुबाजूला कोणीही नव्हतं. भिंतीचा आधार घेत ती खाली बसली. खुप सहन‌ करुन तिने एका जीवाला जन्म दिला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने हळूहळू गर्दी जमू लागली. काहीजणांनी मोबाईल चालू करुन व्हिडीओ शुटींग सुरू केले. ओरडून-किंचाळून थकलेली पगली रडणाऱ्या त्या जीवाकडे कोरड्या नजरेने बघत राहिली. बाजूलाच पडलेले चिंचोके उचलून तिने त्याच्या तोंडात टाकले. हे इतकं अनपेक्षित होतं की कुणालाही काही सुचायच्या आतच त्या रडणाऱ्या जीवाची हालचाल कायमची थांबली. ते बघून पगली जोरजोरात टाळ्या वाजवून हसायला लागली. एव्हाना तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता.


थोड्याच वेळात वेगात एक गाडी तिथे येऊन थांबली. त्या गाडीतून एक पांढरीशुभ्र साडी नेसलेली, केसांचा अंबाडा, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेली स्त्री खाली उतरली. तिचं व्यक्तीमत्वच असं होतं की सगळेजण तिच्याकडे वळून वळून बघत होते. शांतपणे ती पगलीजवळ चालत गेली. तिने पगलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. क्षणात पगली हसायची थांबली. तिचे टाळ्या वाजवणारे हात हळुहळू संथ होत गेले. तिने त्या स्त्रीकडे बघितले मात्र... पगली हमसाहमशी रडायला लागली. तिला प्रेमाने जवळ घेणारी ती स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसुन 'भरारी' या ख्यातनाम संस्थेच्या संस्थापिका संजीवनी गायकवाड मॅडम होत्या. अदबीने दोन माणसं त्यांच्या जवळ आली. पगलीला त्यांनी गाडीत बसवले. पगलीने आपले डोके संजीवनी मॅडमच्या मांडीवर ठेवले. मॅडमना तिला प्रेमाने थोपटताना बघून अचंबित झालेल्या मदतनीसाने शेवटी विचारलेच, "मॅडम, अशा कितीतरी केसेस आपण नेहमीच बघतो. पण याच वेळेला तुम्ही स्वत: तुमच्या कामाचा व्याप बाजूला ठेऊन या पगलीसाठी......"


त्याचं बोलणं मधेच तोडत संजीवनी मॅडम म्हणाल्या, "ती पगली‌ कधीच नव्हती. या समाजाने तिला पगली ठरवली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. हा व्हिडीओ बघताना जे तुम्हाला दिसलं नाही ते मला दिसत होतं. आपलं बाळ आपल्या हातून मेल्यावर कोणती आई हसून टाळ्या वाजवेल??? जे भोग तिच्या वाट्याला आले ते तिच्या बाळाच्या वाट्याला येऊ नयेत अशीच तिची अपेक्षा असावी. अशी मुलगी पगली कशी असेल? आजपासून हीचं नाव 'प्रगती.'"

 

"काय... आवडलं का नाव तुला......" असं म्हणत संजीवनी मॅडमनी हसत तिच्याकडे बघितलं‌. 

खिडकी बाहेरचं आकाश नव्याने बघण्यात प्रगती गुंग झाली होती.  


क्रमश:


Rate this content
Log in