Jaya Godbole

Others

2  

Jaya Godbole

Others

शिवथरघळ

शिवथरघळ

3 mins
3.4K


आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात स्वत:ला सामावून घेऊन जगणं ही एक अतिशय कठीण गोष्ट झाली आहे. या सगळ्यावर प्रभावी उपाय म्हणजे नामस्मरण. पण हे नामस्मरणसुद्धा अखंड, विनाव्यत्यय होणे खूप गरजेचे आहे. तरच त्याचे अपेक्षित परिणाम दिसू शकतील. असं हे विनाव्यत्यय, अखंड नामस्मरण घडणं अतिशय दुर्मिळ आणि अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. या अशक्यप्राय गोष्टीला शक्य करणारे एक स्थान आहे ते म्हणजे 'शिवथरघळ.'


'शिवथरघळ' हे 'सुंदरमठ' या नावानेसुद्धा ओळखले जाते. 'शिवथरघळ' ही एक विस्तीर्ण गुहा आहे. या शिवथरघळीचा पुनर्शोध इ.स. १९३० मध्ये श्री रामदास स्वामींच्या एका अनुयायांनी लावला. 


अतिशय निसर्गरम्य, प्रदुषणमुक्त, स्वच्छ आणि शांत ठिकाण. फोनची रेंजसुद्धा या परिसरात पोहोचत नाही. बाहेरच्या जगाशी या परिसराचा जरासाही संपर्क होत नाही. असं म्हणतात की ७०% आकाश जर निरभ्र असेल तर फोनचा संपर्क होऊ शकतो. वैज्ञानिकांनी इथे येऊनयाह्या गोष्टींचा अभ्यास केला. या परिसरातील ७०% आकाश निरभ्र असूनही फोनची रेंज इथे येत नाही. इथे येणाऱ्या भाविकांना मायेपासून, चिंतांपासून समर्थपणे अलिप्त ठेऊन नामस्मरणाकडे वळवण्याचे कार्य हा परिसर करतो. 

खरंच... संत श्री रामदास स्वामींनी किती विचारपूर्वक हा परिसर त्यांच्या या महान निर्मिती करता निवडला असेल...


महाडपासून ३४ किलोमीटरवर असलेल्या या शिवथरघळीमध्येच प्रत्यक्ष श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री कल्याण स्वामींच्या शुभहस्ते दासबोधाची निर्मिती करून घेतली. समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी २२ वर्षे राहिले. असं म्हटलं जातं की ते हेच ठिकाण आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट झाली.


घळीच्या शेजारीच एक स्वच्छ, निर्मळ पाण्याचा धबधबा अविरत वाहात आहे. हा धबधबा कदाचित 'काळ' नदीचे उगमस्थान असू शकेल. घळीच्या जायच्या रस्त्यावर डाव्या बाजूला जांभ्या दगडामध्ये बांधलेल्या १२५ पायऱ्या चढून वर गेल्यावर डांबरी चढणीचा रस्ता लागतो. त्या रस्त्याने चालत वर गेल्यावर पिढ्यानपिढ्या वसलेलं ३०-३५ घरांचं गाव बघायला मिळतं.


शिवथरघळीपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई सेंट्रलवरुन बस सुटते. तसंच कल्याणवरून थेट बस शिवथरघळीपर्यंत आहे. या दोन्ही बसेस थेट मठाच्या पायथ्याशी भाविकांना आणून सोडतात. कल्याणवरुन दुपारी १२ वाजता ही बस सुटते. ती जर वेळेवर पोहोचली तर रात्री ८ वाजेपर्यंत मठाशी पोहचते. पण या प्रवासादरम्यानचे रस्ते अतिशय खराब असल्यामुळे खूप वेळा बसला पोहोचायला उशीर होतो. खाजगी वाहनांनीसुद्धा इथे जाता येते. मठाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर तिथेच दोन खाणावळी आहेत. त्यांना सांगितल्यावर जेवणाची व्यवस्था होते. तिथून पुढे माकडांपासून सावध राहाणे. 


१५-२० दगडी पायऱ्या चढून वर आल्यानंतर तिथे असलेल्या व्यवस्थापकांशी संपर्क करुन राहाण्याची सोय विनामुल्य होते. एका खोलीमध्ये २ कॉट्स, गादी-अंथरुणं, पंखा, खोल्यांच्या जवळच प्रत्येकी ४ संडास-बाथरुम, २४ तास स्वच्छ पाण्याची उत्तम व्यवस्था. सकाळी ४.३० वाजल्यापासून आंघोळीसाठी कडक गरम पाणी उपलब्ध आहे.

 

उत्सवाच्या दिवसांत खोली मिळणं कठीण होऊ शकतं. रेंज नसल्यामुळे आधीपासून बुकिंगची सोय नाही. पायथ्याशी असलेल्या खाणावळींमधे पैसे देऊन राहण्याची व्यवस्था होऊ शकेल.


पहाटे ५.३० ला मठात काकड आरती सुरू होते. सगळ्यांनी त्या वेळेत जमणं अपेक्षित आहे. काकड आरतीनंतर लोणी-साखरेचा प्रसाद भाविकांना मिळतो. त्यानंतर एक कप गरमागरम चहा. पहाटेच्या वेळेला अशा निसर्गरम्य ठिकाणी हाच चहा अमृततुल्य वाटतो. ९ च्या सुमारास नाश्ता दिला जातो. त्यानंतरचा वेळ आपण घळीमध्ये नामस्मरणात काढू शकतो अथवा आजुबाजुची ठिकाणं पाहू शकतो. 


दुपारी १२ ते १.३० च्या वेळात मुगडाळीची खिचडी प्रसादरुपात भाविकांना मिळते. संध्याकाळी ६ च्या‌ सुमारास मठामध्ये उपासना होते. रात्री ८ च्या‌ सुमारास आमटी-भात-लोणचं-चटणी असं सात्विक जेवण भाविकांना दिलं जातं. विशेष म्हणजे निवास-खाणं-पिणं सगळं काही विनामुल्य आहे. भाविक त्यांचं समाधान होईपर्यंत या ठिकाणी राहू शकतात. 


भाविकांना जास्त काळ मठात राहून सेवा करण्याची परवानगी सज्जनगड इथूनच मिळते. तिथून निघताना स्वेच्छेने काही देणगी व्यवस्थापकांकडे आपण देऊ शकतो. त्याची रितसर पावती मंडळाकडून मिळते. इथे असणारा तृप्त-समाधानी भाविक बाहेर पडतो तेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्याचं मन:सामर्थ्य घेऊनच.


Rate this content
Log in