योगदान
योगदान
परवा केईएममधील एक सिस्टर मला भेटली. म्हणाली तीन विभाग या पेशंटसाठी आरक्षित आहेत.
मी तिला विचारलं, "भीती नाही का वाटत तुला?"
त्यावर ती उत्तरली की, "अगं हे सगळे पेशंट्स आमच्याच विभागात छातीच्या परिक्षणासाठी येत आहेत. आणि भीती कुठे नाही आहे... जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट असलेले पेशंट्ससुद्धा कधी कधी पॉझिटिव्ह निघतात आणि हॉस्पिटलमध्ये लागण होते. या हॉस्पिटलने मला आयुष्यभर पोसलंय. आज अशा परिस्थितीत मला माझं कर्तव्य केलंच पाहिजे. तुम्ही काळजी घ्या."
तिचं बोलणं संपलं. पण मला निःशब्द करुन गेलं...
आज आपल्यातल्या खूप जणांना वाटत असेल की आपण मानसिक आणि शारीरिक संघर्षात अडकलो आहोत. पण मानसिक आणि शारीर
िक संघर्ष काय असतो ते रस्त्यावर, फुटपाथवर बेघर फिरणाऱ्या लोकांना विचारा.
दिवसरात्र कडक ऊन्हाची तमा न बाळगता पहारा करणाऱ्या पोलिसांनाही माहीत आहे की जनतेला हात लावण्यातसुद्धा धोका आहे. पण प्रसंगी ते हात लावत आहेत. आणि हे करताना खुपजणांनी या संकटाला आपल्याच घरी निर्भीडपणे स्विकारलं आहे. कुणाची तान्ही बाळं, कुणाचे म्हातारे आई-वडील, पिटी केसवाल्यांची लहान मुलं घरी एकटी असतात.
थोडंसं मान वर करून आजुबाजुला बघितलं तर आपण खुपच सुखी आहोत हे लक्षात येतं. हॉस्पिटल स्टाफ आणि पोलीसांच्या अमूल्य कामाशी बरोबरी होणारच नाही. पण या संकटातून मार्ग काढण्यासाठी खारीचा वाटा आपणही उचलू शकतो.