Jaya Godbole

Inspirational

3.4  

Jaya Godbole

Inspirational

*अशी पाखरे येती ...*

*अशी पाखरे येती ...*

3 mins
343


खरं तर मी कोणी फार मोठी लेखीका नाहीये. पण जे काही लिहीते ते प्रामाणिकपणे. त्यामुळे मान्यवर

 लेखकांसारखे लाईक्स मी माझ्या लेखाला अपेक्षीत नाही. मान्यवर लेखकांचे दर्जेदार लेख लिहून झाल्यानंतर ते नुसते शिंकले तरी त्यावर सुद्धा करोडोंनी लाईक्स आणी कमेंट्स होत असतात. असो, तर तो मुद्दाच नाहीये. 

मला आठवतंय, माझ्या मिस्टरांची पोस्टींग कोचीनला झाली होती. तिथे असताना जाणवलं की सैनिकांच्या बायका ह्या प्रचंड दडपणाखाली जगत आहेत. एक तर स्त्री आणी त्यात त्यांचं शिक्षण कमी. त्यामुळे कुटूंबात होणारी अवहेलना सहन करावी लागत होती. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने अधिका-यांच्या बायकांची पण होती. उच्च शिक्षण घेतल्यानंतर नवर्याबरोबर फिरताना त्या शिक्षणाचं सार्थक होत नव्हतं. कारण नवर्यांची बदली ही कुठेही विकसित/ अविकसित ठिकाणी होत असे. त्यामुळे

त्यांच्याही मनात कुठेतरी एक न्युनगंड हा होताच. थोडक्यात ह्या स्त्रियांचे पंख बांधले गेले होते. आणी त्या उडण्याची धडपड करत होत्या. ते बघताना मला जाणवलं की, मिलीटरी आयुष्य जगणार्या स्त्रियांसाठी एकच पेशा हा खुप चांगला आहे, जो त्यांना अखंड कार्यरत ठेऊ शकतो, त्यांचं शिक्षण वाढवु शकतो. तो म्हणजे शिक्षकी पेशा. कारण कुठेही जा , शाळा सगळीकडे असतात.

हा विचार मनात आल्यावर मी लगेचच वेळ ठरवून नवा प्रेसीडेंट मिसेस बंगारा - साउथर्न नेवल कमांड, ह्यांना भेटले. मी स्वत: B.A,B.Ed.,M.T.T.C. केल्यामुळे आणी अखंड कार्यरत असल्यामुळे त्यांना ही परिस्थिती समजावून सांगू शकले. माझ्या आयुष्यातील ती पहिली "गॉड मदर" होती जीने माझा हात हातात घेऊन तो घट्ट दाबला आणी म्हणाली, "जया, खुप छान काम करत आहेस. माझा तुला सर्वार्थाने पाठिंबा आहे". मग काय धडाडीने कामाला लागले.

मुंबईच्या एका ईंन्स्टीट्युटची फ्रॅन्चाइसी घेतली. त्या ईंन्स्टीट्युट मार्फत पुर्वप्राथमिक कोर्स (M.T.T.C) मी स्वत: 'शिक्षीका बनुन ह्या बायकांना प्रॅक्टिस टिचींगसकट देऊ लागले. मिलीटरी एरीयातुन ह्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मिलीटरी मधील ज्येष्ठ आणी श्रेष्ठ अधिकार्यांची नजर मिसेस गोडबोले आणी ती करत असलेल्या कामाकडे वळली. त्याकाळी पाच वर्षांमध्ये जवळ जवळ १८० स्त्रीयांनी (अधिकारी सैनिक) हा कोर्स माझ्या मार्फत केला. मीपण प्रामाणिकपणे घेतलेला हा वसा शेवटपर्यंत पार पाडला. त्यानंतर काही कारणांनी मी ते काम थांबवले. आणी त्याच धर्तीवर अशी अजुन दोन ईंन्स्टीट्युट्स मिलीटरी एरीयात आली. 

आज जेव्हा जेव्हा त्या स्त्रिया मला भेटतात तेव्हा खास थांबुन मला नमस्कार करतात आणी म्हणतात, मॅडम, मी आज २-४-५ वर्षे अमुक- अमुक शाळेत शिक्षीका आहे.पण केवळ तुमच्यामुळे . तुमच्यामुळेच माझा आत्मविश्वास मला परत मिळाला. मी जगायला शिकले. कधी-कधी लांबलांबुन फोन येतात, "मॅडम, मुझे यहापर नौकरी मिल गई. सिर्फ आपकी वजह से. त्यातल्या एक-दोन जणी तर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. हे सगळं जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा तेव्हा तिथेच माझे डोळे डबडबतात आणी मी घेतलेल्या परिश्रमांचं सार्थक झाल्यागत वाटते. माझी 'गॉड मदर' आजही माझी आठवण काढते. तिचं नी माझं नातं हे अविस्मरणीय आहे. आजही मी घेतलेला हा वसा कायम आहे. फरक एवढाच आहे की, आज मी मिलीटरी कुटूंबांसाठी घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांना शिकवत आहे. 

प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मला शाळेतल्या "बाई" अंतर्बाह्य तोपर्यंत कळलेल्या नव्हत्या जोपर्यंत मी स्वत: एक शिक्षिका बनले नव्हते.

मला आठवणार्या माझ्या बाई म्हणजे साधं राहणीमान आणी कष्टाळु. आईनंतर खरं तर बाईंचच महत्व प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असायला हवं. आईप्रमाणे बाईसुद्धा निस्प्रुहपणे आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतात आणी त्यांच्यावर कष्ट घेतात. शाळा सोडून जेव्हा मुलं उच्चशिक्षणासाठी बाहेर पडतात तेव्हा बाई तिथेच उभं राहून त्यांना शुभेच्छा देतात. आणी परत आपला वसा अखंड ठेवतात. 

ही उडुन गेलेली पाखरं मात्र आपल्या बाईंना विसरलेली नसतात. परिस्थितीमुळे फक्त भेटणं होत नसतं. अचानक ही पाखरं जेव्हा बाईंना भेटायला येतात तेव्हा त्यांना बाई तिथेच पोटतिडकीने मुलांना शिकवताना दिसतात. मधेच एखाद्या धपाट्याचा आवाज पण येतो. फरक फक्त एवढाच असतो, त्यांच्या पदराखालची पाखरं नविन असतात. उडत आलेली पाखरं जेव्हा विचारतात, " बाई, मला ओळखलंत का? " तेव्हा शिकवुन शिकवुन थकलेले डोळे कुठेतरी भुतकाळात अडकतात. आणी काही आठवलच नाही तर विचारतात, "कोण रे बाळा तु? आता काय करतोस?" ओळख पटल्यावर तेच डोळे मायेने, कौतुकाने डबडबतात. डोळ्यांच ते डबडबणं म्हणजे आयुष्यभर घेतलेल्या परिश्रमांचं सार्थक झाल्याची खुण असते.

आयुष्यभर मुलांचं भविष्य घडवणार्या , त्यांना ऊंच-ऊंच आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या बाई मात्र त्याच ठिकाणी राहून स्वत:च स्वप्न जगत असतात. 

आज मला सुद्धा माझ्या बाईंना भेटण्याची ओढ लागली आहे. त्या कशा शिकवतात ते बघायचं आहे. तिथे असलेल्या पाखरांमध्ये मला स्वत:लाच शोधायचं आहे. 

"बाई, मला तुम्हाला भेटायचं आहे.......".


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational