गहिरं प्रेम
गहिरं प्रेम


आजही स्टेजवरचा त्याचा अभिनय पाहून ती मंत्रमुग्ध झाली. परत एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडली. हे असं नेहमीच व्हायचं.
शशांकच्याही ते लक्षात आलं होतं. असंख्य चाहत्यांच्या गराड्यात असतानासुद्धा त्याची नजर तिला शोधायला भिरभिरायची.
हळूहळू भेटी वाढल्या. भेटींचं रुपांतर प्रेमात झालं. त्याचा शो कुठेही असो, ती तो बघायला जायचीच. प्रसंगी कॉलेजलाही दांडी मारायची. निघताना दहावेळा आरशात बघायची. आणि घरी आल्यावर आपल्याच विश्वात हरवायची. बिकॉमचे शेवटचे वर्ष होते तिचे. तिच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. अखेर तिने काळजीने विचारलंच, "राधा, काय गं, कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय?" राधा मस्त लाजली आणि तिने आईला सगळं काही सांगितलं. आईला धक्काच बसला. आईने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.
"अगं, ऐक माझं. या नट-नट्यांचं काहीच स्थिर नसतं. घरात एक बायको आणि बाहेर हजार भानगडी..." पण कसलं काय... राधा तर प्रेमात अखंड बुडाली होती. आईचं समजावणं तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं.
अशातच राधाची वार्षिक परीक्षा जवळ आली. आई-वडीलांनी तिला निक्षुन सांगितले, "पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत कर." तिलाही ते मान्य होते.
एक दिवस शशांकचा फोन आला, "मला शोसाठी बाहेरगावी जावं लागत आहे. तिथे रेंज मिळणार नाही. परत आल्यावर भेटुया."
तिने "हो " म्हटलं आणि ती अभ्यासात मग्न झाली. रोजच त्याची आठवण तिला सतावत होती. पण मनाची समजूत काढून ती अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत होती. परीक्षा झाली. सगळेच पेपर तिला समाधानकारक गेले होते.
अचानक एक दिवस शशांकच्या मित्राचा फोन आला की, उद्याच्या फ्लाईटने शशांक मुंबईत पोहोचत आहे. फोनवरून ही खबर ऐकून तिला अत्यानंद झाला. त्या रात्री शशांकला भेटण्याच्या विचारांनी तिला झोपसुद्धा लागली नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठून तयार होऊन राधा एअरपोर्टला जायला निघाली. शशांकला एक छानसं सरप्राइज तिला द्यायचं होतं. ती टॅक्सीत बसली आणि ड्रायव्हरला "एअरपोर्ट चलो" म्हणत शशांकच्या आठवणींमध्ये गुंग झाली.
टॅक्सी एअरपोर्टजवळ थांबली. राधा खाली उतरुन विझीटर्सच्या कक्षाकडे धावत सुटली. अर्धा तास लवकरच ती पोहोचली होती. तरीही टाचा उंचावत सारखं आत बघण्याचा प्रयत्न करत होती.
लांबुनच तिला शशांक येताना दिसला. का कोण जाणे पण तिला शशांक थोडासा अशक्त आणि थकलेला वाटला. तिचे डोळे त्याला पाहून भरुन आले. तिने शशांकला हाक मारली. दोन्ही हात वर करून खुणावले. त्याने तिच्याकडे बघितलेसुद्धा. पण न बघितल्यासारखे करुन पुढे चालत राहिला. एवढ्या गर्दीतून ती त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत तो टॅक्सीत बसून निघून गेला होता.
ती हतबल होऊन तिथेच उभी राहिली. शशांकने आपल्याला बघितलं नसेल असे समजून त्याचा नंबर ट्राय करत राहिली. पण प्रत्येकवेळी नंबर स्वीच्डऑफ येत होता.
शेवटी ती त्याला त्याच्या घरी भेटायला गेली. बेल वाजवणार इतक्यात तिला आतून स्त्री आणि पुरुषाच्या हसण्याचा आणि लाडीक बोलण्याचा आवाज आला. ती थोडावेळ थबकली.
दरवाजा उघडाच होता. तिने आत डोकावलं. समोरचं दृश्य पाहून ती जागीच थिजुन गेली. शशांक एका सुंदर मुलीच्या बाहुपाशात होता. आणि ते दोघेही एकमेकांचे चुंबन घेत होते.
ती आवेगाने पुढे गेली. आणि जोरात ओरडली, "शशांक, तू फक्त माझा आहेस. हे काय करत आहेस? तिला जायला सांग."
इतक्यात शशांकने तिला थांबवलं आणि रागाने म्हणाला, "अगं, स्वप्न पाहताना आपल्या तोलामोलाची तरी बघायचीस. मी कुठे आणि तू कुठे. तेव्हा तूच इथून गुपचूप निघून जा."
राधाच्या हृदयाचं पाणी-पाणी झालं होतं. त्यामुळेच की काय तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा आटलं होतं. शांतपणे हळूहळू पावलं उचलत ती तिथून बाहेर पडली. आणि तिला परत एकदा जोरात हसण्याचा आवाज आला.
ती घरी पोहोचली आणि आईच्या कुशीत शिरुन ओक्साबोक्शी रडली, "मी चुकले गं आई. आता तुम्ही सांगाल तसंच वागेन मी."
यथावकाश राधेचं एका उच्चशिक्षित मुलाशी लग्न झालं. सुधीर एक चांगला मुलगा होता. प्रथम भेटीतच तो राधाच्या प्रेमात पडला होता. राधाचा संसार सुखाने चालू होता. तिने सुधीरपासून काहीच लपवून ठेवले नव्हते.
दिवस आनंदात जात होते. तशातच अचानक तिला फोन आला, "शशांकला देवाज्ञा झाली आहे. तू जाऊन भेट त्याला. तशी त्याची शेवटची इच्छा होती." राधाने फोन खाली ठेवला. तिच्या काळजात एक कळ उठली. राग, द्वेष, फसवणूक, दु:ख या सगळ्या भावना एकत्र उफाळून आल्या. आणि तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. सुधीरने तिला समजावलं, "आपण जाऊन भेटुया, त्याची शेवटची इच्छा पूर्ण करुया."
दोघेही त्याच्या घरी गेले. हॉलच्या मध्यभागी त्याचा हसतमुख फोटो होता. कडेला एक समई मंद तेवत होती. त्याच्या फोटोसमोर एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर मोठ्या अक्षरात लिहीलं होतं,
" प्रिय राधास..."
तिने चिठ्ठी उचलली आणि वाचायला सुरुवात केली...
"खूप राग आला असेल ना माझा... मला पण तुझ्याबरोबरच जगायचं होतं. पण नियतीला ते मंजूर नव्हतं. मला 'एड्स' झाला होता. सुरुवातीला मलापण धक्का बसला होता. पण नंतर आठवलं. मला ताप आला असताना घाईगडबडीत एका लोकल लॅबमध्ये मी रक्त तपासणीसाठी दिलं होतं. खूप कमी दिवस होते माझ्याकडे. मला खात्री होती, मी जसा आहे तसा तू मला स्विकारशील. मला सोडून जाणार नाहीस. पण तुझ्या आयुष्याची माती होताना मी कसा पाहू शकलो असतो...
तुझ्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण व्हावा म्हणून नाटक केलं होतं. आणि त्यात मी यशस्वीसुद्धा झालो. तुला आयुष्याचा योग्य जोडीदार मिळाला, समाधान वाटलं. सुधीर... माझी... नाही, तुझी राधा खूप साधी आणि पवित्र आहे. तिला नीट सांभाळ. कधीही अंतर देऊ नकोस... माझ्यासारखं..."
राधाच्या थरथरत्या हातातून चिठ्ठी खाली पडली. ती तिथेच मटकन बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली.
समईच्या मंद प्रकाशात फोटोतला शशांक मंद स्मित करत तिच्याकडे पाहात होता.