Jaya Godbole

Romance

3.8  

Jaya Godbole

Romance

व्हॅलेंटाईन 🌹

व्हॅलेंटाईन 🌹

5 mins
235


टर्रर्रर्रर्रर्र.......गजर वाजला. मिहीर हडबडुन जागा झाला.‌ डोळे किलकिले करुन ईकडे-तिकडे बघु लागला. दोन वेळा आधी झालेला गजर त्याने डोळे मिटुनच बंद केला होता. हा तिसरा गजर. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. " अरे ....बापरे...आठ वाजले...मी ललिताला शब्द दिला होता, आज नाश्ता मी बनवेन म्हणुन. चुकलंच माझं.. ". ओशाळलेला तो पटकन ऊठुन बसला. धडपडत बाथरुममध्ये घुसला. सगळे प्रातर्विधी आटपुन हसण्याचा प्रयत्न करत तिच्याकडे गेला. स्वैंपाकघरात जोरजोरात भांड्यांचा आवाज येत होता. तापलेल्या वातावरणात मधेच शितल वार्याची झुळुक यावी अगदी तसच थालीपिठाचा खमंग वास मधेच दरवळत होता. मिहीरच्या तोंडाला पाणी सुटलं. पण ललितापुढे दाखवायचं कसं...

ललिताने बघुन न बघितल्यागत केलं. ती खुपशी वैतागलेली होती. 

ललिता :- "आई-बाबांचा नाश्ता झाला आहे. मुलं केव्हाच शाळेत गेली. तु नाश्ता करून घे. डबा डायनिंग टेबलवर तयार आहे. मी आंघोळीला जाते ".

( ती तणतणत निघाली)

मिहीरने पटकन तीचा हात पकडला. "सॉरी यार....एक ना गं...".

तीने हात जोरात झटकला. कुत्सीतपणे ओठांची किनार एका बाजुला करत ती तरातरा निघुन गेली. 

मिहीर (मनातच) :- "तीचं बरोबरच आहे. नोकरी सांभाळून घरातील सगळी कामं, आई-वडीलांची, मुलांची जबाबदारी ती सांभाळत आहे अगदी तत्परतेने ‌ मी मात्र कामचुकार. पण माझं तरी काय चुकतंय? मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे सतत मिटींग्ज, नवीन आवाहनं, उशीरा घरी येणं, नोकरी जाण्याची टांगती तलवार डोक्यावर सतत लटकलेली. पण हे म्हणजे माझंच मी केलेलं सांत्वन म्हणायचं...ह्या सगळ्या अडचणींना ती सुद्धा सामोरी जातच असेल ना..."

मिहीर नाश्ता करून तयार होऊन ललिताची वाट बघत होता. ती बाहेर आली. तीच ती नेहमीचीच ऑफीसला वापरण्याची साडी, थकलेला चेहरा. 

 मिहीर ( हसुन ) -  " चल, निघायचं ना ? "

ललिता :- "मला गरज नाही तुझ्या लिफ्टची".

तीने तणतणत पायात सॅंडल घातले. 

मिहीर (मनातच) - "म्हणजे...अजुनही राग गेला नाही तर... अरे काय हे...किती समजावून घ्यायचं...किती हाजी हाजी करायची..आणी रोज सकाळी ऊठुन काय सारखा चिडलेला/वैतागलेला चेहरा बघायचा.. च्यायला...मरुंदे...'.

मिहीरचा पुरुषी अहंकार जागृत झाला. दार धाडकन लाऊन तो घराच्या बाहेर पडला. गाडी स्टार्ट केली. 

ललिता देखील शांतपणे आई-बाबांना मी येते सांगुन घराच्या बाहेर पडली. रिक्षा करून स्टेशनला पोहचली.‌ स्टेशनला नेहमीप्रमाणेच तोबा गर्दी. पण प्रथम श्रेणीचा पास असल्यामुळे आणी गाडी तिथुनच सुटत असल्यामुळे तीने शिताफीने खिडकी मिळवली. सुस्कारा सोडत शांतपणे तीने डोळे मिटून घेतले. आता हा एक तास तीचा हक्काचा होता. तीचं काहीतरी हरवलेलं शोधण्याचा प्रयत्न ती करु लागली. डोळे मिटताच तीला कॉलेजचे गुलाबी दिवस आठवायला लागले. मुलींच्या हृदयाची धडकन असलेला माही तीला आठवला.‌ तीसुद्धा त्यांच्यामधील एक होती. तीनेच त्याला प्रपोज केलं होतं. न आवडण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं. त्यालाही ती आवडत होती. मग रोज कधी कॅफेमधे तर कधी पार्कमधे तर कधी सिनेमा-मॉल ह्या ठिकाणी दिवस कसे तरंगत जात होते त्यांनाच समजत नव्हतं. खुप काळजी घेत होते दोघेही एकमेकांची‌. त्याच्या मिठीतील ती ऊब आठवताना आता तीला खूप एकाकी वाटत होतं....

तिच्या मनात विचार येत होते, काय करत असेल माही आता? कुठे असेल तो ? कंटाळा आलाय ह्या जबाबदार्यांचा. मला त्याच्याबरोबर जगायचंय. त्याला भेटलचं पाहिजे आता..

गाडी चालवत असताना मिहीरचं मन देखील भुतकाळात डोकावायला लागलं‌. नेहमीच वैतागलेली , थकलेली ,गबाळ्यासारखी रहाणारी ललिता बघुन विट आला होता त्याला. त्याचं मन परत एकदा लैलाकडे ओढ घ्यायला लागलं. सुंदर , केतकी वर्ण, सुडौल शरीराची, लांब केसांची , हसणारी आणी मधेच लाजणारी लैला त्याला आठवायला लागली.‌ ती सार्या कॉलेजचीच लैला होती. मिहीरपण तिच्यावर फिदा होता ‌आणी नशिबवान देखील ‌. कारण लैला फक्त त्याच्याच हातात लागली होती.‌

अभ्यास करताना, पुस्तकात, लेक्चर मधे, घरी-दारी सगळीकडे तीच दिसत होती.‌बोलताना तिच्या ओठांची होणारी मादक हालचाल...अहाहा...काळीज चिरत जायची. आठवणींच मोरपीस अलगद त्याच्या चेहर्यावरून फिरत असताना जोरात पुढच्या गाडीचा हॉर्न वाजला आणी तो भानावर आला. तरीही त्याची लैलाला भेटण्याची ओढ अजुनच वाढली होती. अनवधनाने ओंजळीतुन निसटलेल्या कोमल आठवणी परत एकदा त्याला ओंजळीत सामावुन घ्यायच्या होत्या.

संध्याकाळी दोघेही ऑफिसमधून आपापल्या वेळेप्रमाणे घरी आले. एकमेकांशी फार काही न बोलता दैनंदिन कामे करीत राहिले. मुलांना झोपताना आई लागायची. म्हणुन ललिता मुलांच्याच रुममधे झोपत असे.‌आणी तो त्यांच्या रुममध्ये एकटा...

दोघांच्याही मनात त्यांच्या जुन्या प्रेमसंबंधांचे अंकुर डोलु लागले होते. 

दोघांमधेही झालेले बदल घरातल्यांच्या लक्षात यायला लागले होते‌ . ललिता आजकल जरा जास्तच फोनवर होती. लिपस्टिकच्या वेगवेगळ्या छटा वापरत होती. साड्यांच्या बाबतीत जास्तच आग्रही बनत होती. 

मिहीर सुद्धा व्हॉट्सॲप वरचे मेसेजेस सारखेच बघत होता आणी गालातल्या गालात हसत होता. कधी न जाणारा मिहीर सुद्धा जेण्स पार्लरमधे जाऊ लागला होता. 

तिच्या नावाने बुके,ग्रिटींग्ज घरी येत होती. आणी त्याने तर सगळ्यांना ताकीदच दिली होती, त्याला आलेल्या कुरीअरला कुणीही हात लावायचा नाही.

म्हणता-म्हणता तो दिवस उजाडला ज्याची ते दोघेही आतुरतेने वाट बघत होते.‌

ललिता आज एकदमच भन्नाट दिसत होती. कितीतरी वर्षांत तिला घरच्यांनी एवढी सजलेली बघीतले नव्हते. तीने आदल्याच दिवशी सगळ्यांना कल्पना दिली होती की ती मैत्रीणींबरोबर पिकनिकला जात आहे. शेजारच्या काकुंकडे डब्याची सोय केली आहे. 

नेहमीपेक्षा जरा लवकरच खुप उत्साहाने, आनंदाने कुणाकडेही न बघताच ती घराच्या बाहेर पडली .

टॅक्सी करून मरीन ड्राइव्हला पोहचली. तीला पोहचायला तेवढाच उशीर झाला होता जेवढा पुर्वी होयचा. माही‌ पुर्वीप्रमाणेच तीची वाट बघत येरझाऱ्या घालत होता. वार्याबरोबर झुळुझुळु उडणारे त्याचे रेशमी केस बघुन ललिता तल्लीन झाली. पुर्वीप्रमाणेच "काय हे..." असा आविर्भाव करत त्याने आपला गॉगल वर डोक्याला लावला. त्याच्या निळ्या डोळ्यांच्या समुद्रात ललिता अखंड भिजली. सॉरी म्हणुन लाजत आपला हात त्याच्या हातात देऊन दोघेही चालत राहिले. खुप वेळ मरिनड्राईव्हला आडोश्याला एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर दोघेही मॉलमध्ये फिरायला गेले‌. तिथेच शॉपिंग,जेवण आणी एक पिच्चर असं त्यांचं आधीच ठरलं होतं. 

पिच्चर संपल्यानंतर दोघेही मॉलच्या बाहेर आले आणी तिच्या लक्षात आलं की माही कुठेच दिसत नाहीये. ती कावरीबावरी झाली. ईकडे-तिकडे बघु लागली. तीने माहीला कॉल करण्यासाठी फोन हातात पकडला आणी...माहीचाच तीला मेसेज आला, "ह्या पत्त्यावर लवकर पोहचं".

खुपचं गोंधळलेली ती काळजीने आणी ओढीने त्या पत्त्यावर पोहचली. ते एक ५ स्टार‌ हॉटेल होते. प्रवेशद्वारावर तीचे स्वागत करायला हॉटेलचा स्टाफ हसतमुखाने सज्ज होता. मागे हल्की रोमॅंटिक धुन चालू होती. मोठ्या अदबीने त्यातील एकजण तीला नियोजीत रुमकडे घेऊन गेला. रुमचा दरवाजा तीने हलकेच उघडला. तिच्या आवडत्या परफ्युमचा सुगंध सगळीकडे दरवळला. तीची नजर पाठमोऱ्या ऊभ्या असलेल्या तिच्या प्रेमाकडे वळली, ज्याला भेटण्यासाठी आर्ततेने प्रत्येक क्षण ती वाट बघत होती, ते प्रेम तिच्या समोर उभं होतं.‌

तिने हळुवारपणे हाक मारली, " माही.... माझ्यासाठी इतकं सगळं...". 

तिच्या डोळ्यांचे किनार ओलावले. 

वळुन तिच्याकडे बघत "आपल्यासाठी...." म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. ती हळुवारपणे त्याच्या छातीवर विसावली. 

माही‌ :- "किती वर्षांनी भेटत आहोत ना आपण".

ललिता :- "हो रे , काळाच्या प्रवाहात वेळ कसा निघून गेला कळलच नाही".

माही :- "माझी आठवण नाही आली कधी ?"

ललिता :-" आठवण यायला तुला विसरले कधी होते... फक्त जबाबदार्या पार पाडताना त्या आठवणींना वेळ देता आला नाही."

माही :- "म्हणुनच आजचा दिवस हा फक्त आपल्या दोघांचाच आहे. त्यात कुणा तिसर्याला अजिबात प्रवेश नाही". 

ललिता :- "होरे... माझ्या प्रेमा."

दोघांनीही एकमेकांना घट्ट आलिंगन दिले. एकमेकांच्या सहवासात सुखाचा परमोच्च बिंदू ओलांडून शरीराने आणी मनाने दोघेही त्रुप्त झाले‌. आज खुप वर्षांनी त्यांच्या प्रेमाला पंख फुटले होते. 

एकमेकांच्या मिठीत रात्र फुलपाखरांसारखी कशी ऊठुन गेली आणी पहाट कधी झाली हे दोघांनाही समजले नाही.

ललिता माहीच्या कानात कुजबुजली, "मला आता वेळेवर घरी पोहचायला हवं‌ सासु-सासरे, मुलं माझी वाट बघत असतील. नवरा तर व्यभिचारी म्हणायला सुद्धा कमी करणार नाही".

माही :- ( ललिताच्या कपाळावरच्या बटेशी खेळत ) "मला जर घरी पोहचायला उशीर झाला तर माझी बायको रोज जी भांडी स्वैंपाकघरात आपटते ती बिल्डींगच्या आवारात आपटायला तीला जरासुद्धा वेळ लागणार नाही".

दोघांनीही एकमेकांकडे बघत हसत डोळे मिचकावले. 

"हॅप्पी व्हॅलेंटाईन" म्हणत एक दिर्घ चुंबन घेऊन दोघांनाही हॉटेल सोडले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance