गणित काळाचे
गणित काळाचे
॥श्री॥
ही एक काल्पनिक कथा आहे घटना किंवा प्रसंग आणि नावांमध्ये साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
"दादू !बंटी रे !अरे बंटी जरा इकडे येतो का बेटा?" प्रवीण राव भांदककर काका उर्फ भडकमकर आजोबा नातवाला आवाज देत होते आणि तो सरळ न ऐकल्याचे सोंग करून बाहेर निघून जात होता.तेवढ्यात मम्माने टोकले. "अरे आजोबा बोलावतात; ऐकू येत नाहीये काय?" नाराजीनेच तो आत गेला आणि मम्माला बोलू लागला "मम्मा! कां आवाज देतेस तू? आजोबांना काही कामधंदे नाहीये. ते आपले उठसुठ मला पाठीवर पाय द्यायला लावतात.किती बोअर! त्यांची एवढी पाठ दुखते तर मसाजर आणून दे, मुव्ह आणून दे. माझे सगळे मित्र वाट पाहत आहेत. आमची आता मॅच आहे." आणि तो पळाला आजोबांना खूप राग आला पण ते काहीच करू शकत नव्हते. चडफडत ते उठले.चहा घेतला तयारी केली आणि पार्कमध्ये गेले. तेथे त्यांचे इतरही मित्र बसले होते. यांच्या अवतारावरून बाकीच्यांच्या लक्षात आले. आकाश काका म्हणाले "काय झाले प्रवीण राव?"
"अरे आजकालची मुले अजिबात ऐकत नाहीत. आपल्याला लहानपणी आजोबांनी पाठीवर पाय द्यायला सांगितले की केवढा आनंद व्हायचा. मोठ्यांची सेवा केली की पुण्य मिळते हेच आपल्याला शिकवले होते. कितीतरी वेळ ते आपल्याकडून दाबून घ्यायचे.पण आपण आनंदाने करायचो. त्याच्या मोबदल्यात ते फार तर आपल्याला एक लिमलेट ची गोळी किंवा रावळगावचे चॉकलेट द्यायचे पण त्यातही आपण खुश होतो. आणि ही मुले ना ऐकल्यासारखे करतात आणि निघून जातात. खरंच गेला तो काळ.
आकाश काकांनी पण त्यांचीच री ओढली. "हे बाकी बरोबर बोललात हो. पूर्वी जो वडीलधाऱ्यांचा धाक होता तो आता राहिला नाही .आपण सर्वांशी आदरार्थी बोलायचो आजकालची मुलं ए बाबा काय? ए डॅडू काय?ए काका काय? सरळ एकेरीवर येतात. त्यांच्या मम्माच नवऱ्यांना अरे तुरे,आणखीन "शोना बेबी"काय काय म्हणत असतात. खरेतर घरात कुणाचा तरी धाक हवा. पण आजकाल त्यांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणे! आपल्या मनावर नाही झाला हो कधी!खरंच "गेला तो काळ.
तेवढ्यात राजेश काकांना जुन्या आठवणींचा उमाळा आला; म्हणाले. "पूर्वी सातच्या आत घरात हवे; असे असायचे.त्यानंतर देवाजवळ परवचा म्हणणे, पाढे पाठ करणे, सूत्र पाठ करणे हें आवश्यक असायचे.आणि म्हणून ३८ वर्षे बॅंकेत नोकरी केली. पण कधी कॅल्क्युलेटर वापरले नाही. आजकालच्या मुलांना तोंडी गणित शिकवणे बंद केले की काय माहिती नाही. छोटी छोटी आकडेमोड करायला सरळ फोन चा कॅल्क्युलेटर वापरतात.
" रामाची सीता कोण हे एकालाही माहीत नसेल. घरातल्या रिती भाती, संस्कार, सामान्य ज्ञान वडीलधाऱ्यांच्या कथा कहाण्यांमधून शिकवल्या जायचे.आता ते सारे बंद झाले खरंच गेला तो काळ.
तेवढ्यात प्रशांत करकरे उर्फ कटकटे काका यांना कंठ फुटला.त्यांचे तर कोणाशीच पटत नाही. मुले खेळत असलेली पण त्यांना चालत नाही.थोडासा बॉल आत आला किंवा खेळताना मुलांनी थोडासा आरडाओरडा मस्ती केली तरी सरळ त्यांच्या अंगावरती धावून जातात. शिवाय बोलण्याची भाषा शिवीगाळापासूनच सुरू होते. कॉलनीतली सगळी मुले
त्यांच्याशी टरकूनच असत. पण त्यांची पाठ वळताच त्यांना वाकुल्या पण दाखवतात.
त्यांनी पण कहाणी पुढे सुरू ठेवली. "खरेच आहे ;लहानपणी माझ्या हाताने एकदा विटी दांडू खेळताना;विटी शेजारच्या काकूंच्या खिडकीला लागली तर आल्या तरातरा आणि त्यांनी मला एक ठेवून दिली. वरतून विटी वापस दिली नाहीच. पण माझ्या घरून मलाच ओरडा पडला.
त्या दिवशी मी त्या समोरच्या स्वप्निल चा बॉल माझ्या बाल्कनीत आला होता म्हणून लपवला. तर त्याची आई माझ्याशी भांडायला आली. आणि बॉल वापस घेऊन गेलीच. खरंच गेला तो काळ.
घाणेकर सर ज्यांना लोक "घाण करणारे" पण म्हणतात ते नेहमीच्या सवयीप्रमाणे पिक थुंकून वर्गात मुलांवर डाफरायचे त्यात सुरात म्हणाले."आम्ही आमच्या गुरुजनांना किती मान द्यायचो.त्या दिवशी मी भाजी आणायला गेलो त्या भाजीवालीचा मुलगा माझा विद्यार्थी होता. शिकवणी पण घ्यायचो मी त्याची. कितींदा तरी फी बुडवली त्याने. पण त्यादिवशी मी दुकानात गेल्यानंतर दोन रुपये कमी नाही केले शिंच्याने. खरंच गेला तो काळ.
प्रमोद आजोबा म्हणाले "मला तर पदोपदी जाणवते. कारण आमची ही म्हणजे सुनिता पहाटे साडेपाच पासून उठायची आणि लगबगिने तिची कामे सुरू व्हायची. सासू-सासऱ्यांचा धाकच होता ना! चहासाठी चूल आणि पाण्यासाठी बंब एकदमच पेटवावा लागायचा. जन्मभर कष्ट करूनच गेली बिचारी.
आता तर काय किटलीत चहा होतो आणि गिझर मध्ये पाणी तापते. तरी आमच्या सुनबाई ज्या कॉलेजच्या प्रोफेसर आहेत सातच्या आधी गुड मॉर्निंग म्हणत नाही. त्यामुळे मला साडेसहा वाजता चहा न घेताच मॉर्नींग वॉकला यावे लागते. पुष्कळदा माझा चहा, नाश्ता मी बगिच्या जवळच्या टपरीवरच उरकतो.
खरंच गेला तो काळ हेच खरे."
या सर्व असंतुष्ट पक्षाची गरमागरम मीटिंग सुरू असतानाच समोरून पांढरी हाफ पॅन्ट, आकाशी रंगाचा टी-शर्ट, आणि डोक्यावर खेळाडू घालतात तशी टोपी घालून जॉगिंग करत येणारे हेमंत पागनीस उर्फ हसमुख आजोबा किंवा संतुर आजोबा दिसले. त्यांना पाहिले की या सर्वांच्या छातीत एक कळ उठते.खरे तर त्यांचे वय चांगले ६८/६९ वर्षांचे आहे. पण माणूस चाळिशीच्या वरचा वाटत नाही. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी बघा एकदम अप-टू- डेट. दाढी, कटिंग, केस रंगवलेले,कपडे परीट घडीचे, बूट- सॅंडल नवीन फॅशनचे, छान स्प्रे मारलेला, व्यवस्थित भांग केलेला, सदैव प्रसन्न मुद्रा असे तेजःपुंज व्यक्तिमत्व आहे.
बाकी सर्व व्यक्ती थकले, भागले, मनाने व्यथीत,त्रासलेले त्यामुळे वयापेक्षा अधिकच म्हातारे दिसतात. परंतु हसमुख आजोबा मात्र आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसले. त्यांच्यासाठी काळ जणू थांबून गेलेला आहे.
ते येतांनाच त्यांना दिसले की दुसऱ्या मजल्यावरच्या आशा आजी सामान घेऊन येत होत्या. घरात मुलगा, सून होते व खेळत असलेल्या मुलांमध्ये नात पण होती. पण कोणीही ते धरायला धावले नाही. पण हसमुख आजोबांनी मात्र त्यांना लिफ्ट पर्यंत सामान येऊन दिले. वापस येताना क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना एक दोन बॉल्स टाकून दिले.एक चिमखडी परी चुचूक - चुचूक बुटांचा आवाज करत चाल चाल करत होती.तिच्याशी लुटूपुटीची धावाधावी केली आणि नंतर या कंपनीकडे येऊन बसले आणि म्हणाले " काय मंडळी आज कुठल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चासत्र सुरू आहे?"
सर्वांनी एक सुरात सांगितले "गेला तो काळ." "आणि आम्हालाही खरंच त्याचीच हळहळ वाटते आहे.पण तुमच्या कडे पाहून मात्र तसे वाटत नाही."
हसमुख आजोबा नेहमीप्रमाणे गडगडाटी हसले आणि म्हणाले."listen man; time and tide never waits." आपल्या साधुसंतांनी ही सांगून ठेवलेले आहे की प्रत्येक क्षणोक्षणी काळ पुढे जात असतो पण माणसाचे जीवन थांबते काय? हे तर एक चक्र आहे त्याने थांबून कसे चालेल? जे गेले त्याचा खेद मानण्यापेक्षा जे हातात आहे त्याचा आनंद घेणे आपल्या हातात आहे. तरच जे येणारे उद्याचे क्षण असतील ते सुखाचे असतील .
प्रत्येकाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.पण हसमुख आजोबाकडे सगळ्यांची उत्तरे होती. ते म्हणाले "मुले घरात टीव्ही, लॅपटॉप बघत राहिले तर आपल्याला चालेल काय? बाहेर खेळले तर थोडीशी गडबड करणार,मस्ती करणार.आपणही आपल्या वयात केलीच की! सांभाळून घेऊया त्यांना."
"जुना काळ आणि त्यावेळची कामे याची काळ - काम - वेग याची गणिते वेगळी होती. आता आपल्या मुलांना, सुनांना, जावयांना सकाळपासून रात्रीपर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे सतत धावावे लागते. शरीराने पेक्षा ते मनाने जास्ती थकतात. त्यांना त्यांच्या पद्धतीच्या मनोरंजनाची आणि विश्रांतीची गरज असते. जुने वेळापत्रक ते कसे पाळणार? त्यापेक्षा आपणच त्यांना समजून घेऊया. मुले अहो जाहो म्हणत नसतील ;एकेरीवर येत असतील पण थोडे प्रेमाने चुचकारून बघा आपले संस्कार वाया गेलेले नाहीत. आजही तो ओलावा त्यांच्यात आहे."
"फेरीवाले भाजीवाले कमवून असे किती कमावतात? आपण त्यांच्याशी भाव करतो. पण तेच मोठ्या दुकानात गेल्यानंतर जेवढे सांगितले तेवढे पैसे टिकवून मोकळे होतो. ही आपली मानसिकता आज बदलायला नको काय?"
"काही बाबतीत आपण बदलतो. जसे पूर्वी मंजन किंवा बाभळीच्या काड्यांने दात घासत होतो पण आता पेस्ट ने घासायला लागलो ना? फार पूर्वी टिळक ,आगरकर यांचा वेश बघा आपण बदललोच नां? शर्ट पॅन्ट घालणे सुरू केले ना? पूर्वी घरात भरपूर मंडळी होती. मुले बाळे भरपूर होती. सणवार खाद्यपदार्थ करण्यास व खाण्यास मॅनपॉवर भरपूर होता. आता कॅलरी कॉन्शसनेस मध्ये आणि वेळेअभावी त्यांना पदार्थांमध्ये बदल करावे लागतात. वेळेअभावी अवडंबर न करता "शॉर्ट बट स्वीट" असे सणांचे स्वरूप झाले. पण अजूनही संस्कार तर जपल्या जात आहेत ना?
एकेकाळी दुरुस्थ चंद्राला ओवाळणारी भगिनी आता अंतराळात जाण्याचे स्वप्न बघते.टीव्ही, कम्प्युटर, नेटवर्क यामुळे जगभरातला माणूस जवळ आलेला आहे. आता जेट युग सुरू आहे आणि तरीही आपण अजून जुन्याच कहाण्या उगाळायच्या काय?
"अहो माणूस गेला तरी दहा दिवस शोक मानून गोड जेवण केल्या जाते ना. मग काळच तो: जाणारच ! जो येतोय त्याचे स्वागत करायला आपण का चुकतो?"
"काळाची गणिते सोडवण्याची सूत्र आपण नाही पाठ केले. ते या नवीन पिढीकडून शिकूया आणि नव्या मनूला सामोरे जाऊया.
काय पटतय काय?"
साऱ्यांनीच ते पटले असल्याचे हसून मान्य केले. आणि टपरीवरच्या चहाला चिअर्स करायला गेले.
