गरीबी
गरीबी
"बाय मला आसं कळलं का तुमच्याकडं बाई लागते कामाले?" एक बाई दारात उभी होती आणि काम मागत होती.मी म्हणाले हो हवी आहे तुला जमेल का काम करायला तर म्हणाली "हाव ना. जमते ना."
तिने पगार विचारला मी सांगितला तर म्हणाली "बाई एवढ्या पैशात माझं का होईन जी?" मी तिला म्हटले; अग माझं दुकान नवीनच आहे जरा धंदा वाढू दे मग तुझा पगार वाढवेन.
दुसऱ्या दिवशी पासून कामाला येऊ लागली. दर दोन-चार दिवसानंतर मला विचारायची "बाई धंदा वाढला का? माझा पगार कधी वाढवता?" एक दिवशी माझं डोकं सटकलं. तिला म्हटलं रोज रोज पगार कोणीतरी वाढवतं का? एक तर तू काम किती दिवस करशील दोन-चार महिन्यानंतर डिलिव्हरी साठी सुट्टी घेशील. आताच पाच सहा महिन्याची गरोदर दिसते आहे.ती हसून म्हणाली "नाय जी! माझं पोट सुटलं हाय. शिझर झालं नां."
त्यानंतर तिची रोजची कुरकुर बंद झाली. मी नव्यानेच दुकान टाकले होते मला बाईची गरज होती म्हणून तिला ठेवले. अन्यथा कुठल्याही दुसऱ्या दुकानदारांने चुकून नसते ठेवले. *नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा पण वाळा नाही* अशी तिची अवस्था होती. नाव होतं शोभा; पण शोभण्यासारखं काहीच नव्हतं. भदाडी, काळीशी नकट्या नाकाची लठ्ठलूठ्ठ हालत डुलत काम करणारी, चकण्या डोळ्याची शोभा माझ्याकडे कामाला लागली. चपळाई चंटपणा हा कुठलाही गुण एक सेल्स गर्ल म्हणून तिच्यामध्ये नव्हताच. पण नवीनच दुकान असल्यामुळे मी खूप पगार देऊ शकत नव्हते म्हणून सांभाळत होते.
पण हळूहळू माझा धंद्यात जम बसायला लागला आणि हिचा उपयोग मात्र शून्यच होता. तेवढ्या पैशात तिचंही भागत नव्हतं शेवटी एक दिवस तिनेच काम सोडलं.
शोभा गरीब होती. नवरा टेलर होता. शर्ट चांगले शिवायचा.एका टेलरिंग शॉप मध्ये काम करायचा.तीन मुले; मोठी मुलगी अकरावी नापास,लहानी नववी शिकत होती आणि मुलगा सहावी सातवीत होता.तीन मुलं नवरा आणि म्हातारी सासू या सर्वांना खाऊ घालता घालता तिची पुरेवाट व्हायची. सासू आधी चार घरी भांडे घासायचे काम करायची. पण आता त्यांच्यानी होत नाही गुडघ्याचा त्रास वाढला ती लंगडत लंगडत चालते. शरीराला आणि पायाला वाक आलेला सगळीकडूनच शोभाची अवस्था खरोखरच खराब होती
शोभाचे एकमेव स्वप्न होते लवकर लवकर मुलांनी मोठे व्हावे.काहीतरी कामधंद्याला लागावे म्हणजे हिच्या वरचा भार जरा कमी होईल. दिवसभर बाहेरचे काम करून आल्यानंतर पुन्हा घरचे काम हिच्यानी होईना. त्यापेक्षा "मी घरी फक्त एक टाईम बडवीन, दोन टाईम खाईन आणि खाऊ घालीन असे तिचे गणित होते. पण मुले शाळेतून आली की भूक भूक करायची, सासू दिवसभर घरात बसल्या बसल्या भुक भुक करायची शोभाचं डोकं काम करे ना.
शोभाला कुणीतरी सांगितले या दुकानात वगैरे काम करून खूप पगार मिळत नाही त्यापेक्षा स्वयंपाकाचे काम कर त्यात पैसा जास्ती मिळतो.
शोभाच्या हाताला चव होती तिला लवकरच दोन-तीन स्वयंपाकाचे काम मिळाले. मधून मधून ती माझ्या दुकानात काही चिल्लर वस्तू घ्यायला यायची. मी तिला म्हटले पगार वाढला काय तुझा? तर हसून म्हणाली "हो नां!" पण शोभाच्या नशिबात सुखच नव्हते. सदैव दारूच्या नशेत नवरा खूप चाटा मारायचा त्यामुळे त्याची नोकरी सुटली. आता तो दिवस रात्र घरातच होता. कुठून पैसे आणायचा माहित नाही पण रात्री ढोसून यायचा. दिवसभर लोळत पडला राहायचा. उठला की खाय खाय करातच्या व कट कट करायचा. घरात आनंद असा नव्हताच. नवऱ्याचे कसेही चार पैसे येत होते तेही आता बंद झाले कुठून पुरवणार शोभा.
पुढे मला कळले शोभा एक नंबरची चोरटी आहे.सगळ्या बायका तिच्या नावाने खडे फोडत आहेत. एकदा आमच्या दुकानात काही घ्यायला आली असता आली असता तिने एक पॉलिथिन दुकानाच्या बाहेर भिंतीवर लटकवून ठेवले होते. माझ्या दुकानात काम करणाऱ्या मुलींनी सांगितले त्यात गरम गरम भाजी होती.एवढी गरम ताजी केलेली भाजी कोणी अशीच का देणार? हीने चोरली असेल काय?
एकदा माझ्याच दुकानातला एक इमिटेशनचे मंगळसुत्र तिच्या जवळ दिसले. तिने ते विकत तर घेतली नव्हतेच म्हणजे नक्कीच चोरले असावे. आता माझाही विश्वास बसायला लागला .
एकदा ती माझ्याकडे ५० रुपये उधार मागू लागली. तिला पैसे देणे म्हणजे वाघाच्या गुहेत बकरीला पाठवण्यासारखेच होते. वापस येण्याची कुठलीही शक्यता नव्हती.पण कां कोणास ठाऊक मी ते दिले. माझ्या दुकानातूनही तिने काही नेलेल्या वस्तूंचे दोन चारशे रुपये झाले होते त्यातले कधीमधी ती पाच पन्नास रुपये वापस करायचे आणि पुन्हा पाच-पन्नास रुपयाची वस्तू घेऊन जायची. त्यामुळे उधारी तशीच कायम होती.
खूपदा वाटायचे की हिला चांगले रागवावे तिच्याशी खडसून बोलावे. पण तिचा मठ्ठ चेहरा मला भाबडा वाटायचा तरी मी तिला पुढे या वेळेला विचारले पन्नास रुपयांचं काय केले? तिने सांगितले. "बर्नॉल ची ट्यूब आणली कारण तिच्या छाती पाशी चांगलेच पोळले होते. तिथे लावायचे होते." मी खूप वेळ विचार करत राहिले कदाचित तिच्या नवऱ्याने तिला चटका दिला असावा.तिला ती जखम बरेच दिवस पुरली.
त्या जखमेचा उलगडा नंतर माझ्याच एका ग्राहक स्त्री कडून कळला. ती त्यांच्या शेजारी पोळ्या करायचे काम करायची आणि नेहमी तिथे दोन-चार पोळ्या चोरायची त्या बाईच्या लक्षात आले.पुढे ती स्वतः कणिक काढून ठेवून द्यायला लागली. पण तरीही जेवढी कणिक काढली त्यात सांगितले तेवढ्या पोळ्या करायची पण त्या खूप पातळ पातळ करायला लागली म्हणजे त्यांना शंका येत होती की दिलेल्या कणकीतच ती दोन-तीन पोळ्या तरी जास्तीच करते आणि पळवते असे बऱ्याच ठिकाणी करत असावी. घरच्यांच्या पोटाची चिंता होती ना तिला. याच पोळ्या ती कशातरी गुंडाळून रुमालात वगैरे गुंडाळून ब्लाऊज च्या आत ठेवायची एकदा हा उपक्रम करत असतानाच मालकिन बाई आत डोकावल्या आणि तिने गरमागरम पोळ्या घाई घाईने कोंबल्या अन त्या पोळ्यांची वाफ ब्लाऊज च्या आत पसरली आणि तिला पोळल्या गेले. हे सर्व सांगणारी बाई मला हसून हसून सांगत होती पण का कोणास ठाऊक मला थोडे वाईट वाटले. ती हे सारे काही फक्त घरच्यांसाठी करत होती. बघता बघता तीन चार वर्षे लोटली
घरच्या परिस्थितीत कुठलाही फरक पडत नव्हता.घरात आली की कटकटी भांडणे, नवऱ्याचे ओरडणे, दारूच्या नशेत मारणे हे कमी होते म्हणून पुन्हा सासूचे केकाटणे सारखे चालू असायचे
त्याच काळात माझ्या घरची स्वयंपाक वाली बाई सुटली आणि शोभा पुन्हा एकदा काम मागायला माझ्याकडे आली होती तर मी तिला स्वयंपाकाच्या कामाला ठेवले. मला सर्वांनी मूर्खात काढले. त्या चोरट्या बाईला का ठेवले म्हणून? अर्थात मी नजर ठेवून असायचीच. शोभा मुकाट्याने कामाला यायची आणि खाली मान घालून काम करायची. काम झाल्यानंतर चालायला लागायची.मला तिचा हा गुण आवडत होता.नाही वचवच, नाही इकडे तिकडे बघणे. पुष्कळदा मी तिला चहा करताना विचारायची चहा घेणार का?ती नाही कधीच म्हणत नव्हती.दिलेला चहा व्यवस्थित स्टूलवर बसून प्यायची.त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर तृप्तता दिसायची.काही अन्न उरले असल्यास किंवा नाश्ता बनवला असल्यास मी तो तिला द्यायची. ती कधीही खात नव्हती पण आवर्जून घरी घेऊन जायची. सांगायची "अमुक आहे ना माझ्या सासूला खूप आवडते.तमुक आहे ना माझ्या मुलाला खूप आवडते." ती तिचे घर, तिचा संसार, तिची मुले यापुढे तिचं विश्वच नव्हते. कधी कधी चेहरा पडलेला असायच। सुजलेला असायचा.घरी भांडण झाले असायचे. मी तिला म्हणायची तू एकटी का करतेस हे सारे?
एक तर तू करतेस त्यांना सर्व आयते मिळते पण त्यांना त्याचे काही वाटत नाही.इतके वर्ष झाले तुझा नवरा धड कमवत नाही सासू तू आणलेलं खाते पण तरी तुझ्याबद्दल काही चांगले बोलत नाही. आता तुझी मुलेही मोठी झाली. त्यांनाही तुझ्याबद्दल काही वाटत नाही तू का सर्व पूरवत राहते?पण ती म्हणाली" मी तर आई आहे. मी त्यांना उपाशी कसं ठेवू? नवऱ्यानं खाल्लं नसंल तर मला घास जाईल का? अन् आता या वयात सासूला कुठे ठेवू?
आजकालच्या शिकल्या सवरल्या, कमावत्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या परंतु सासूला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या सुनांना कधीतरी हिचे विचार एकवायला हवे असे वाटले.
एके दिवशी ती निराशेने म्हणाली "सुख आनंद माझ्या नशिबातच नाही. माझ्या घरची गरिबी कधी जाईल? कदाचित मी मेल्यानंतरच जाईल."
पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली माझ्या घरी मी तिला अन्न देत होते.माझ्या घरी तिने कधीही कुठली चोरी नाही केली. पण घरी भांडण झाले असले की हिची दोन-चार दिवसाची सुट्टी ठरलेली असायची. शेवटी कंटाळून मी तिला सोडले.
एकदा कळले शोभा कुठेतरी निघून गेली. जे तिने खूप आधी करायला हवे होते ते एकदाचे केले म्हणायचे! चला किती दिवस सहन करणार ?असे विचार माझ्या डोक्यात आले. पण चार-पाच दिवसांनी मला कळले तिच्या घराच्या जवळ असलेल्या बाजूच्या वसाहतीतील एका विहिरीत दोन दिवसानंतर तिचे प्रेत फुगून वर आले. झाले असे होते ती एका घरी नेहमीप्रमाणे काम करायची अर्थातच काही चोरायची सुद्धा. तिच्या मालकीणीच्या डोक्यात हे होतेच.त्यात तिचे कानातले दिसत नव्हते आणि तिने तो आळ शोभा वरच घेतला.शोभाने कितीदा तरी पटवून देण्याचा प्रयत्न केला की मी घेतले नाही. पण ती बाई तिच्या घरी जाऊनही बरेच बडबडून आली. त्यावेळी हिच्या खाल्ल्या अन्नाला जागून तरी घरच्यांनी तिची बाजू घ्यायची हवी होती .तर ते लोकही तिलाच बोलू लागले. तिचा तोल गेला आणि त्या तिरीमिरीतच ती घरातून निघाली.ज्यांच्यासाठी ती हे सर्व करत होती. ते पण उलटले मग काय या जगण्याला अर्थ असे कदाचित तिला वाटले असावे. आणि ती आपलं जीवन संपवून बसली.
तिच्या विरोधात बोलणारे सारेच होते पण कां कोणास ठाऊक माझ्या डोळ्यात एक आसू तिच्यासाठी उभा झाला.
तिच्या घराच्या जवळच माझ्या परिचयाची एक स्त्री राहायची. तिच्याकडे गेली असताना मी हिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा कळले आता नवरा कुठल्या तरी दुकानात काम करतो.मोठी मुलगी एका दुकानात लागली. लहान त्यांच्याच परिचयातल्या एका मुलासोबत पळून जाऊन लग्न करून मोकळी झाली. मुलगा पण कुठेसा कामाला लागला. सासू मात्र रोज सुनेची आठवण काढून रडत राहते.
खरच तिच्या घरची गरीबी कटकट तिचा मृत्यूनेच संपली.
खरंच शोभा इतकी वाईट होती का? माझ्या मते ती गरीबीचा बळी होती.
