Prerana Wadi

Others

3  

Prerana Wadi

Others

गुलमोहर बहरला

गुलमोहर बहरला

6 mins
194


हे झाड छाटून टाका बरं !फार कचरा होतो याचा.आईने पुन्हा सकाळी उठून कुरकुर सुरू केली.बाबा बोलले अगं त्याला कचरा नाही, छान लाल केशरी फुलांचा सडा म्हणतात.

"हो !तुमचा तो सडा झाडून- झाडून माझी कंबर दुखते." इती आई.

"पण तू का झाडते? आपण बाई लावू नं" _ बाबा.

    आई आणि बाबांचं रोजचं लटकं भांडण सुरू झालं.पण दोघेही ऐकेना आई बाई लावायला तयार होईना आणि बाबा झाड कापायला.

   आमच्या कंपाऊंडच्या बाहेर एक मोठं गुलमोहराचं झाड आहे .ते झाड या दोघांच्या भांडणाचे मूळ होतं. शेवटी नेहमीप्रमाणे बाबांनी हार पत्करली आणि झाड कापणे वाल्याला बोलावलं बाबा म्हणाले फक्त फांद्या फांद्या कापारे बुंधा नही कापायचा.बाबांनी झाड मुळापासून कापूच नाही दिलं.   

     मी जेव्हा खोलीत बसून अभ्यास करायचो खिडकीतून समोर मला गुलमोहराचं झाड दिसायचं.माझ्या लहानपणी ते छोटंसं होतं . आता चांगलंच मोठं झालं होतं.  

 हिरव्याशार बारीक बारीक झावळ्या सारख्या पानांच्या फांद्या आणि लाल केशरी तुर्रेदार फुलं.पूर्ण झाड सुंदर लाल केशरी रंगाने बहरून जायचं .त्या फुलांचा सडा दुसर्‍या दिवशी खाली पडायचा.बाबा त्याला कुंकू- केशराचा सडा म्हणायचे.बाबांना झाडांचं फुलांचं फार वेड. ते मला सांगायचे बघ गुलमोहोरकडे. एवढ्या कडक उन्हाळ्यात सुद्धा किती छान फुलला असतो. आणि साऱ्यांना आनंद देतो .हे झाड खूप मोठी सावली देऊ शकत नाही पण उन्हाची दाहकता मात्र कमी करू शकते .तळपत्या उन्हामध्ये पडलेला हा सुंदर सडा मनाला आनंद देतो.शिवाय हे झाड औषधी आहे .  

    माझे बाबासुद्धा तसेच .

लहानपणापासून 

दुः खात सुद्धा फक्त आनंद शोधत राहिले आणि इतरांना देत राहिले.त्यांच्या 

जन्मानंतर एक वर्षाच्या आतच काकाचा जन्म झाला आणि भरीला भर काका तब्येतीने नाजूक होते. त्यामुळे 

बाबांना त्या वयात जे प्रेम, लाड मिळायला हवे ते मिळूच शकले नाही.ते बिचारे असेच मोठे झाले . त्यानंतर पाठोपाठ दोन आत्या.बाबा सगळ्यात मोठे खूप कमी वयामध्ये त्यांना मोठेपण आलं ते मनानेच मोठे होऊन गेले.

     एवढा मोठा खटला परी पाहुणा सगळ्यांना सांभाळायचं परिस्थिती बेताची.

बाबांचं गणित चांगलं होतं पण पैशांअभावी त्यांना इंजिनीअरिंग कडे जाता नाही आलं. त्यांनी फक्त बीएस्सी केलं.बाबा सेकंड इयरला शिकत असतानाच आजोबांचं देहावसान झालं.घरचा आधारच गेला.आजोबांच्या जागी कॉम्पेन्सेशन ग्राऊंडवर बाबांना नोकरी मिळाली आणि बाबांना ती पत्करावीच लागली.

कारण घराला कोण सांभाळणार ?खरं म्हटलं तर बाबा हुशार होते त्यांच्या स्वतः च्या भरवशावर ते कुठली चांगली नोकरी मिळवू शकले असते . वरतून सर्वजण "बघ आजोबांच्या जागी तुला आयती वायती नोकरी मिळालेली आहे .आता तुला घर सांभाळायचं आहे" हे बोलून दाखवत. बाबा बिचारे निमूटपणे ऐकत.काकांना त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये घातलं इंजिनीअर केलं दोन्ही बहिणींचे लग्न होईपर्यंत स्वतः लग्न नाही केलं.त्यात त्यांचं वय वाढलं.आईचं स्थळ आलं त्यावेळी त्यांनी फक्त "माझ्या आईला, बहिणी भावंडांना नीट सांभाळशील का?" हा एकच प्रश्न विचारला आमची आई साधी बाधी तिनेही हो म्हटलं आणि लग्न झालं .बाबांनी जे पदरात आलं ते गोड मानून घेतलं.खरंतर बाबा गोरेपान उंच आई ठेंगणी, सावळी पण बाबा बोलून दाखवायचे.ती मनाने गोरी आहे. समजुतदारीने उंच आहे.प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधायची त्यांची सवय.अगदी शिळ्या पोळीचे तुकडे खातांना सुद्धा ते आईचं कौतुक करायचे. "वा! किती छान चव आहे तुझ्या हाताला. "  

    बाबा सकाळी लवकर उठायचे. फिरायला जायचे. येताना फुलं तोडून घेऊन यायचे. देवासाठी हार करायचे.त्यावेळी चार फुलांचा आईसाठी छोटासा गजरा पण करायचे. आईला नजरेने सांगायचे छान दिसतेस बरं .

   परिस्थितीचे इतके उन्हाळे पाहूनसुद्धा सदैव कसे फुलत राहायचे बाबा.अगदी गुलमोहरासारखे.

   मुलांना त्यांनी छान शिकवलं ताई एम एस्सी मायक्रोबायॉलॉजी झाली. तिचं लग्न झालं जिजू सोबत कॅनडाला गेली.मी इंजिनीअर झालो यूएसमध्ये एमएस केलं .सध्या लॉस एंजेलिसला आहे. माझ्या कॉलेजची मैत्रीण, तिच्याशीच मी विवाह केला. बाबांनी सगळ्या गोष्टींना परवानगी दिली.ताई आणि मी नेहमी आईबाबांना आमच्याकड बोलवायचो. चार वर्षापूर्वी आईबाबा ताईकडे आणि माझ्याकडे दोघांकडेही आले. ताईकडे तिची छोटी मुलगी श्वेतल असल्यामुळे आईबाबांचं मन चांगलं रमलं. पण माझ्याकडे त्यांचं मन रमेना. शिवाय माझी बायको थोडी दुसर्‍या जातीची. तिला आईच सोवळंओवळं खरकट बरकट कळतनव्हतं.त्यामुळे ते दोघं लवकरच कंटाळले शिवाय आई म्हणायची "काय रे हे? तुमच्याकडे कुठेही कागदं काय वापरता? साफ झाल्यासारखंच वाटतं नाही बाई."

तीन महिन्यांनी ते भारतात परत आले.त्यानंतर माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला आईबाबांना बोलावलं होतं .पण अचानक आईला माइल्ड हार्ट अटॅक आला.आणि दगदग नको म्हणून ते लोक येऊ नाही शकले. बारसं मी इथल्या इथेच केलं .पण मग एक वर्षाचं बाळ झाल्यानंतर वाढदिवस तिकडे केला . आईला आणि बाळाला कुलदेवीचं दर्शन घडवलं.  

     त्यानंतर एक रुटीन सुरू झालं .आईला बरं वाटायला लागल्यानंतर तिला कामं केल्याशिवाय चैन पडेना.बागकाम करणे हा तिचा आवडीचा छंद.अंगण झाडणे, सडा टाकणे ,रांगोळी काढणे हे केल्याशिवाय तिच्या दिवसाची सुरुवातच होईना .तशातच एक दिवस पायात पाय अडकून ती अंगणात पडली आणि कमरेला मार लागला.कमरेचा ऑपरेशन केलं पण तिने हाय खाल्ली.आणि त्यातच ती गेली.

      यावेळी जबरदस्तीने आम्ही बाबांना आमच्याकडे आणलं.पण आम्ही दोघंही बाहेर जाणार. बाळाला पाळणाघरात ठेवणार.बाबा बोअर व्हायला लागले.नाही म्हणायला त्यांना एक दोन मित्र मिळाले पण त्यांचे जुने मित्र होते त्यांची सर इथे नव्हती .बोलायचा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे बोलत नसत पण मी जाणून होतो शेवटी काही दिवसांनी ते भारतात परत आले.

    पण कोरोनाचा प्रकोप सुरू झाला आणि त्यांचं येणं थांबलं.तशातच त्यांनाही आता वयोमानाने कंबरदुखी, पाठदुखी लागली .आयुष्यभर केलेली तडतड आता उत्तर आयुष्यात जाणवायला लागते.

    तशातच एकदा बाबाचा मला आणि ताईला दोघांनाही निरोप मिळाला तुम्ही काही पैसे मला देऊ शकता का ?अर्थातच त्यांनी जितके पैसे मागितले तेवढे द्यायला आम्ही तयारच होतो.पण पैसे कशाला हवेत ते सांगायला ते तयारच नव्हते.आम्ही पैसे पाठवले.पण आम्हाला सतत काळजी वाटत होती की कदाचित त्यांच्या तब्येतीचा काहीतरी प्रॉब्लेम असावा आणि ते आम्हाला सांगत नसावे.ताई फोनवर सतत रडायची आणि मला रागवायची की तू त्यांना आणत कां नाहीस इकडे?. 

    शेवटी माझं व्हॅक्सिनेशन झाल्याबरोबर मी लवकरात लवकर भारतात आलो.  

     मनात खूप काळजी होती आता घरी माझ्यासाठी काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक?घरी गेलो तर बरीच गर्दी दिसली .लहान मुलं, मोठी माणसं.मला कळेच ना हे सगळं काय?तेवढ्यात बाबा बाहेर आले .ते चांगलेच खूश दिसत होते शिवाय त्याचे दोन मित्र त्यांच्यासोबत होते.मला म्हणाले अरे अचानक कसा आलास.मी म्हटलं तुमची आठवण आली .

   दोन दिवसांत मला कळलं की बाबा आणि त्यांच्या मित्रांनी मिळून *मैत्री परिवार* नावाचा एक मंडळ स्थापन केलं .लॉकडाऊन मध्ये ज्यांच्याकडे खाण्यापिण्याची मारामार होती त्यांना हे लोक किराण्याचे किट नेऊन देत होते .कोरोना बाधित लोकांना डबे पुरवण्याची कामं करत होते.ज्यांच्या घरची माणसं मेली त्यांची मुलं उघडी पडली त्यांना आपल्याच घरातल्या वरच्या दोन /खोल्यांमध्ये आसरा दिला.  त्यांच्या पुनर्वसनाची सोय बघू लागले . बाबांच्या मित्राची पत्नी मुलांना संस्कारवर्ग शिकवायला लागली.बाबा आवडीचा विषय गणित शिकवायला लागले.सर्व जण मिळून लोकांकडून देणग्या गोळा करत होते आमच्याकडूनही पैसे त्यांनी त्याच्यासाठीच मागितले होते . आमचं घर एवढं मोठं होतं .त्यातला हॉल, एक बेडरूम आणि किचन बाबांनी स्वतः कडे ठेवले .आणि दुसरी बेडरुम ऑफिस म्हणून केली आणि वर हॉल आणि दोन बेडरुममध्ये हे सर्व कार्य सुरू केलं.सारा दिवसभर हे लोक त्यात बिझी असायचे.मुलांमध्ये रमायचे. सर्व मित्रमंडळींना जगण्यासाठी पुन्हा एकदा एक उद्देश मिळाला होता.त्यांना आता आपण बेकार कोपऱ्यात पडून राहणारे नसून अजूनही आपण खूप काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास जागवला होता.  

संध्याकाळी ऑफिसचं काम संपलं की वरती मुलांसाठी काकू संस्कारवर्ग घ्यायच्या तेवढ्या वेळात सगळ्या मित्रमंडळींचा खाली पत्त्यांचा, कॅरमचा डाव जमायचा.बाबांचे एक मित्र छान गाणं म्हणायचे ते सतत फोनवर गाणे लावून ठेवायचे आणि हे सर्व जण त्यांना टाळ्या वाजवून शिट्टी वाजवून  ताल द्यायचे . दोन दिवसांत बाबांनी कंबरदुखी पाठदुखीची तक्रार एकदाही नाही सांगितली.

     बाबांना मी माझ्यासोबत चला म्हटले बाबांनी म्हटलं नाही -नाही बेटा आता मी काही तिकडे येऊ शकत नाही .बघतोच नां? सध्या आमचं किती काम चालू आहे? आता हे मी सुरू केलेले आहे .आता सध्या मला हे काम करू दे.मला जवळ घेऊन म्हणाले " दादू मी इथे खूप खूश आहे बेटा." हो !बाबा मला लाडाने दादू म्हणायचे.सगळेजण ताईला ताई म्हणायचे पण मला असं वाटायचं की मलाही कुणीतरी दादा म्हटलं पाहिजे म्हणून बाबा मला लाडाने दादू म्हणायचे.

ते म्हणाले 

"तुमची काळजी मला समजते ."पण 

माझी काळजी घ्यायला आता इथे बरेच लोक आहेत तू बिलकूल चिंता करू नका.  

    संध्याकाळी मी ताईशी बोललो. तिला सांगितलं आपण विनाकारण काळजी करतो. बाबांनी स्वतः चा आनंद शोधून घेतला आहे .ते खरोखरच त्यांच्या नावाप्रमाणे "सदानंद" आहेत .त्यांना जबरदस्तीने आपण आपल्याकडे आणलं तर ते मनाने थकतील आणि आजारी पडतील.त्यापेक्षा त्यांना एन्जॉय करू दे!

     दुसऱ्या दिवशी मी जायला निघालो.बाबांनी मला कवटाळलं आणि मी माझी काळजी घेईल असं वचन दिलं.बाबांच्या मित्रांनी थम्स अप करून मला आश्वासन दिलं की ते लोक बाबांसोबत आहेत .मी निश्चिंत होऊन टॅक्सीत बसलो.टॅक्सी सुरू झाली आणि . . . . . 


मला समोर लाल केशरी फुलांचा सडा दिसला. छाटलेला *गुलमोहर पुन्हा एकदा बहरला होता.* 


Rate this content
Log in