राखावी बहुतांची अंतरे
राखावी बहुतांची अंतरे
धाडकन फाटकाचा आवाज आल्यामुळे आईने वाकून पाहिले ती दिव्यांगीच होती. दिव्यांगी तावा तावातच आत आली. तिने चपला वाकड्या तिकड्या फेकल्या आणि खोलीचा दरवाजा बंद करून आत गेली. खोलीतूनही वस्तू फेकल्याचा आवाज येत होता.
आई बाबा दोघेही ऐकत होते पण काही बोलले नाह। कारण दिव्यांगीचा तापटपणा, हट्टीपणा त्यांना माहितीच होता. आतमधून रडण्याचा आवाज येत होता जेवणाच्या वेळेला आईने आवाज दिला पण दिव्यांगी आवाज देईना शेवटी आईने ठेवणीतलं अस्त्र काढलं. तू दरवाजा नाही उघडलास तर मीही जेवणार नाही. तेव्हा मात्र तिने दार उघडले.आईला बिलगुन रडू लागली. आई म्हणाली अग तू काही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार काय झालंय?
मग तिने सांगितले "आई श्वेता माझी एवढी जवळची मैत्रीण! ती माझ्याशी असं कसं वागू शकते?"
आता आईलाही काळजी वाटू लागली. "काय झालं बेटा?"
"आई तुला माहित आहे ना त्या दिवशी श्वेताचे पुस्तक वापस नेऊन देताना माझी गाडी खराब झाली होती म्हणून दुसऱ्या दिवशी नेऊन दिलं. पण ती मला म्हणाली तू हे जाणून-बुजून केलं. मी तुला मदत केली पण तू मात्र माझ्या पेपरच्या वेळेला मला माझ्या कामात आली नाहीस. ती अशी कशी बोलू शकते? मग मलाही राग आला आणि मी तिला चांगलंच ऐकवलं. यानंतर आमची मैत्री कायमची तुटली समज"
दोघीजणी जेवल्या आणि ती झोपायला गेली. आवरून झाल्यानंतर आईने तिच्या खोलीत डोकावले. खोलीभर पसारा करून ठेवला होता.
आईचं विचार चक्र मात्र सतत सुरू होतं.दिव्यांगी लहानपणापासूनच जिद्दी हट्टी. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि तिला त्याची सवय पडली आहे.हुशार आहे सुंदर आहे त्यामुळे सर्वांचं कौतुकही मिळतं पण त्यामुळे मॅच्युरिटी येत नाहीये. त्या मनाने दादा मात्र चांगलाच समजूतदार आहे. या मुलीला उद्या सासरी जावं लागेल तिथे पण ही अशीच वागणार काय? आणि उद्या नोकरी करणार तिथे सुद्धा निभवावे लागेलच ना.
दुसऱ्या दिवशी आईने दिव्यांगीला बोलावले आणि विचारले "खरंच जे झालं त्यात तुझी काही चुकच नव्हती काय? गाडी खराब होती पण तू सकाळी बाहेर गेली होतीस. अर्ध्या तासात वापस येते सांगून दोन तीन तासांनी आली. दुपारी दहा मिनिटांची पाॅवर नॅप घेते सांगून दोन तास झोपली होतीस. तेव्हा बाबांची गाडी घरीच होती तेव्हा तू नेऊन दिलं असतंस तर!
खरोखरच श्वेताला त्रास झाला नसेल काय? चुक तुझी असूनही तू जराही कमीपणा घेतला नाही. इतक्या दिवसाची मैत्री सहज तोडून टाकली? संबंध तोडणे खूप सोपी असतं जोडायला फार वेळ लागतो. आणि संबंध सांभाळावे लागतात."
दिव्यांग म्हणाली पण तिने समजून का घेऊ नये? आई म्हणाली "जरा तिच्या बाजूनेही विचार कर. तू तर तिची मैत्रीण आहेस तर तिची बाजू तूं का समजून घेऊ नये ?अरे ला कारे असेच उत्तर देणे गरजेचे असते काय? लक्षात ठेव नेहमी टाळी दोन हातांनी वाजते. कोणी एक जण तापला असताना दुसरा शांत राहिल्यास भांडण होत नाही. हे आपल्याला जन्मभर लक्षात ठेवायचं असतं. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे"
बहुतांशी अंतरे नाही बरं कां." आईने हसून म्हटले.
"सोन्यासारखे माणसे जपणे म्हणजे सोन्याचा साठा जपण्यासारखेच आहे."
आईने समजावलेले दिव्यांगीलाही पटले आणि तिने कॉलेजमध्ये जाताच पहिले श्वेताला सॉरी म्हटले. श्वेता म्हणाली "तुझ्यावर चिडले पण काल दिवसभर वाईट वाटत होते ग."दिव्यांगी म्हणाली " माझे पण तसंच होतं."
या वेळेला दोघींनीही आपला हात पुढे केला आणि मैत्रीसाठी टाळी वाजवली.
