चोर सापडला
चोर सापडला
आमच्या घराचं बांधकाम सुरू असताना आम्ही दोन वर्षे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होतो .पहिल्या मजल्यावरचा फ्लॅट अगदी रोडटच होता आणि त्याला एक छोटीशी टेरेस पण होती.टेरेसच्या समोर रस्ता आणि त्यापलीकडे खूप झाडी होती.त्यामुळे थोडी भीतीच वाटायची.पण आमच्या अपार्टमेंटमध्ये वॉचमन ठेवला होता.
एक दिवशी मला रात्री टेरेसमध्ये खुडखुड आवाज आला.मी प्रचंड मनातून घाबरली. चोर तर नसेल?
मी खूप आवाज दिला अरे कोण आहे तिकडे कोणीच बोलेना ?घरात ते बाकी सगळे झोपले होते आता त्यांना झोपेतून उठवून त्यांना तिकडे पाठवायचं; त्यापेक्षा मीच झाशीची राणी व्हायचं ठरवलं.आणि सरळ दरवाजा उघडला.पण तो दरवाजा पक्का झाला असल्यामुळे तो उघडतांना जोरात करकर असा आवाज झाला.पण त्यामुळे गच्चीत जो पण कुणी होतं त्यांनी धडाधड खाली उड्या मारल्या. मला वाटलं चोर पळून गेले.पण मला अचानक विजयश्री संचारली होती त्याचमुळे मी ठरवलं की आज त्यांना पकडायचंच.त्यामुळे मी समोरच्या दरवाजाने बाहेर गेले आणि वॉचमनला आवाज देऊ लागले पण तो उत्तर देईना.म्हणून मी सरळ उतरून खाली आले आणि वॉचमनला शोधू लागले तो मस्तपैकी झोपून होता.
पण मी त्याला खूप रागावले आणि त्याला सांगितलं की आता आमचे गच्चीमध्ये कोणीतरी घुसलं होतं आणि आता त्यांनी खाली उड्या मारल्या. आणि तू इथे झोपून राहिला. मग तुझा उपयोग काय आहे? हे म्हटल्यानंतर तो खडबडून जागा झाला.आणि मग आम्ही दोघंही धावत मेनगेटकडे वळलो.त्याच्या हातात काठी होती आम्ही मेनगेटकडे आलो तेव्हा खालच्या दुकानाच्या शेडखाली काहीतरी हालचाल दिसली. आता तो झोपला होता आणि त्याची नोकरी जाऊ नये म्हणून त्याला पण काहीतरी करुन दाखवावं असं वाटलं.म्हणून तो पण मोठमोठ्याने ओरडू लागला. अरे कोण आहे रे तिकडे ? आणि शिट्टी वाजवू लागला. मी त्याला म्हटलं अरे उंटावरून शेळ्या हाकशील का ? जरा पकडून दाखव नां त्यांना.त्याने जोरात त्याच्या हातातला दंडा त्या शेडखाली फेकला.तो दंडा बरोबरच आमच्या चोरांच्या पाठीला लागला असावा. तिथे दबा धरून बसलेले आमचे दोन चोर टुनटुन उडय़ा मारत झाडांकडे पळून गेले.
फक्त आम्हाला अजूनही नाही कळलं ते जाताना म्याव म्याव असा आवाज करत का बरं गेले???
