Prerana Wadi

Others

3  

Prerana Wadi

Others

लोक तर बोलणारच

लोक तर बोलणारच

8 mins
195


   ऋतुजा धावत धावत घरात आली तिला पाहताच आई म्हणजे सरोज म्हणाली "अगं सिनेमाला जाणार होतात ना तुम्ही? इतक्या लवकर कशी वापस आली."परंतु ऋतुजाने उत्तर दिले नाही. सरोजने प्रश्नार्थक मुद्रेने शेखर कडे पाहिले. पण शेखरने तिला शांत राहण्यास सुचवले. ऋतुजाच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की एकतर ती खूप रडली असावी किंवा भांडली तरी असावी. स्वाभाविकच सरोजला काळजी वाटू लागली. शेखर म्हणाले "तिला तिचा वेळ घेऊ दे. सांगेल ती तुला सारे काही." परंतु सरोजला कुठे एवढा धीर. ती सारखी ऋतुजाला आवाज देत होती. "ऋतू!ऋतू बेटा!! अगं काय झाले सांग तरी."

 पण ऋतुजाच्या खोलीतून फक्त हुंदक्यांचे आवाज येत होते.

      दुसऱ्या दिवशी ऋतुजा ऑफिसलाही गेली नाही. सरोजने बळे बळे तिला उठवले चहा दिला. आणि तिच्या मनात खदखदत असलेले सारे शेवटी विचारलेच. "अग नक्की काय झाले तुझे आणि शशांकचे?"

ऋतुजा म्हणाली "काय होणार? नेहमीप्रमाणे भांडण झालं." सरोज म्हणाली "अगं तुमचे प्रेम आहे ना? तीन वर्षे झाले तुम्ही एकमेकांसोबत फिरताय. अजून लग्नही व्हायचेय. तर तुमची भांडणेच जास्ती होतात. आणि झाले तर झाले एकदम टोकालाही जातात."

ऋतुजा म्हणाली "तो एक नंबरचा हेकेखोर आहे. मी किती वेळा त्याला कन्व्हिन्स करत बसू?प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्याला समजावत बसावे लागते. मला आता उबग आलाय. त्याने जे म्हटले ते मी नाही ऐकले की तो सरळ म्हणतो तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू माझे नक्की ऐकशील. म्हणजे माझे प्रेम आहे हे मला किती वेळा सिद्ध करत बसावे लागणार?"

    "मला मुळातच या सिद्ध करत बसावे लागणे या गोष्टीची चिडच आहे. *प्रत्येकच वेळेला कां म्हणून आम्ही सिद्ध करावे?* *कोणी आमच्यावर विश्वास का ठेवू नये? आम्ही काय एक नंबरचे खोटारडे आहोत. 

   "मी लहान होते; सहावीत असेल; माझ्या हनुवटीवर एक काळा तीळ आहे. आमच्या विज्ञानाच्या मॅडम मला म्हणाल्या "ऋतुजा तू रोज तीट लावून येतेस काय? अख्खा वर्ग हसला. मी सांगितले अजिबात नाही. पण त्या माझ्यावर विश्वासच ठेवायला तयार नव्हत्या.शेवटी मी त्यांना माझी हनवटी खसाखसा घासून दाखवली तेव्हा कुठे त्यांनी आणि पूर्ण वर्गाने विश्वास ठेवला आणि तेव्हापासूनच मला हे प्रत्येक गोष्ट सिद्ध करणे या गोष्टीबद्दल तितकारा निर्माण झालेला आहे."

   सरोज म्हणाली "अगं!जुन्या गोष्टी उगाळत बसू नये."

पण आज ऋतुजा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती म्हणाली "मला नाही आवडत .तू पण तशीच."

 "मी काय केलं बाई आता? सरोजला आश्चर्य वाटले."अग! मी चांगली दोन अडीच तास अभ्यास झाल्यानंतर जरा टेबलवर डोकं ठेवून नॅप घेत असेल त्याच वेळेला बरोबर तू यायची आणि पाठीत धपाटे घालायची. अभ्यासाला बसली की अशी कशी तुला झोप येते गं? म्हणून रागवायचीस. प्रत्येक वेळेला मला सांगावे लागायचे अग आई! आता दोन मिनिटां करताच मी अशी लोटली होते. पण तू कधीच ऐकून घेतलं नाही बरोबर मी यायच्या वेळेलाच कशी नॅप घ्यायची असते म्हणून."

 आता सरोजला हसू फुटले. "अगं, त्यावेळेला जर मी तुला तसे रागावले नसते तर आज तू एवढी मोठी इंजिनियर होऊन एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकली असतीस काय? मी आई आहे तुझी.तुम्हाला शिस्त लागावी यासाठी रागावणे माझे कर्तव्य होते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा राग नाही मानावा बेटा. आपण अमुक एक गोष्ट नाही ना केली! मग ती सिद्ध करण्याला आपल्याला दुःख का व्हावे? उलट आपण ती अभिमानाने सिद्ध करावी. कारण आपल्याला माहीत असते की आपण खरे आहोत. *जे खोटे असतात ते सिद्ध करायला घाबरतात आपण कां घाबरावे?"*

  "अरे पण प्रत्येकच नात्यांमध्ये सिद्धच का करावे लागावे? मागे एकदा माझी बेस्टी (प्रिय मैत्रीण) श्रावणी तिच्या मनात माझ्याबद्दल कोणी काही भरवून दिले आणि ही चक्क माझ्याशी वाईट वागायला लागली. मला तिला समजावून सांगायला किती कष्ट पडले. तिने मला समजून का घेऊ नये? कुणी काही सांगितले की लगेचच असे कसे आपण आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवतो?

    सरोजला कळेना आता या मुलीला कसे समजवावे? सरोज म्हणाली "हे बघ बेटा, तुम्ही लोक मोठे झालात पण अजूनही अल्लडच आहात.खूप लवकर कुठल्याही गोष्टीचा राग येतो तुम्हाला. पण एक गोष्ट तुम्ही विसरता मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि जेव्हा आपण समाजात राहतो म्हणजेच घरात, शाळेत, नात्यात, मैत्रीत, संबंधात, प्रेमात जिथे कुठे आपला दुसऱ्याशी संबंध येतो तिथे आपण आपल्या वागणुकीमध्ये अत्यंत पारदर्शी असणे गरजेचे असते.कारण ज्यांना आपण आपले मानतो त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात आणि जर त्या पूर्ण नाही झाल्या तर त्या व्यक्तीला वाईट वाटू शकते, राग येऊ शकतो आणि तो त्यावर प्रश्न नक्कीच विचारू शकतो."

  आता तू घरची मोठी.छोटा ऋत्विक जरा बंड होता तो तुझ्या खोड्या काढायचा.तू प्रत्येक लवेळी मला म्हणायची त्याला शिक्षा कर.पण त्याला शिक्षा करण्याच्या वयाचा तो झाला नव्हता. पण हे तुला त्यावेळी कळत नव्हते. मी नक्की त्याला रागवले आहे की नाही हे तू मला सिद्ध करायला लावत होतीस. त्याच्यासाठी आणलेली कॅडबरी मी जास्ती मोठी त नाही ना आणली हे तू लावून बघत होतीस."

ऋतुजा म्हणाली "आई आता काहीतरी लहानपणच्या गोष्ट काढू नको." 

पण सरोज म्हणाली "बघ जुन्या गोष्टी तर तूच काढल्यास. मला तुला एवढेच सांगायचे होते लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी किंतु, परंतु, संशय असतात आणि ते चुकीचे ठरावे असेच त्यांना वाटत असते आणि म्हणून ते आपल्या लोकांना प्रश्न विचारत असतात आपण त्यांची समर्पक उत्तरे दिली की त्यांना बरे वाटते."

"नाही आई; नाही, हे इतकेल सरळ नाही. माझ्या हे लक्षात आलेले आहे की प्रत्येक स्त्रीला स्वतःला सिद्ध करत बसावे लागते. मी बरोबर वागते आहे की नाही? खोटे तर बोलत नाही? सगळ्यांचा मान ठेवते की नाही? घरी दारी ऑफिसमध्ये सगळीकडे स्त्रियांना स्वतःला सिद्ध करावे लागते."

   "माझी मैत्रीण आहे दोनच वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. खूप सुंदर आणि इतकी साधी भोळी आहे . तिच्या नवऱ्याने तिला पाहूनच मागणी घातली.श्रीमंत घरची सून झाली परंतु आता तिला त्यांच्या सगळ्यांच्या तालावर नाचण्यासाठी फार कसरत करावी लागते. श्रीमंत पतीची राणी, मोठ्या घरची सून काय काय बिरुदे लागली पण या झुलींखाली ती बिचारी दबकून गेली. भरीला भर सासू एक नंबर कजाग आहे आणि तिचा नवरा आईच्या मनाविरुद्ध काहीही करायला तयार नाही.

शशांकही मित्र होता त्यावेळेला आमचे दोघांचे रिलेशन छान होते. पण आता लग्न ठरले तर हा नवरेगिरीच करायला लागलाय."

    आता शेखर ही मध्ये पडले आणि म्हणाले "तू स्वतः एक मुलगी असल्यामुळे तुला असे वाटते की फक्त मुलींनाच सिद्ध करावे लागते.पण मुलांना माणसांना कितीतरी आघाड्यांवरती तोंड द्यावे लागते."

  तू आत्ता म्हणालीस मैत्रिणीचा नवरा फक्त आईचे ऐकतो पण पुरुषांना आईचे ऐकायचं की बायकोचे ऐकायचे याची तारेवरची कसरत करावी लागते. आणि दोघींनाही खुश ठेवण्यासाठी,एक चांगला मुलगा आणि एक चांगला पती असणे त्याच्या करता (कंपल्सरी) अत्यावश्यक असते आणि ते सिद्ध करण्यातच त्याची हयात जाते."

   "ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या हाताखाली काम करताना कामात कुचराई होणार नाही यासाठी स्त्रियांबरोबर पुरुषांनाही सारखेच लढावे लागते. धंद्यात सुद्धा जम बसवण्यासाठी काय काय सव्यापसव्ये करावी लागतात. हे *जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.*"

     आई - वडिलांनी रागवले तर मुलांना वाईट वाटते पण आई-वडिलांना सुद्धा आम्ही चांगले पालक आहोत हेही तर सिद्ध करावे लागते. तुमच्या गरजा,तुमच्या आवडी साऱ्या पुऱ्या करून वरतून जे आम्ही केले ते आमचे कर्तव्य ठरते परंतु आम्ही रागावले किंवा काही गोष्टी नाही पूर्ण करू शकलो तर आम्ही पालक म्हणून अयशस्वी ठरतो त्याचे काय?"

   "एक लक्षात घे बेटा हे सर्व एकमेकांशी असलेल्या संबंधाचे फलित आहे. भावाला बहिणीशी, वडिलांना आईशी, पालकांना मुलांची त्याचप्रमाणे मुलांना पालकांशी आपले नातेसंबंध जोपासावे लागतात. आणि हे संबंध विश्वासावर आधारित असतात परंतू विश्वास हा दोहीतर्फी असायला हवा. लक्षात घे *टाळी एका हाताने वाजत नाही."*

    "छे बुवा! मला नाही पटत. असं वाटतंय उगीचच मानवाच्या जातीला जन्माला आलोय."इती ऋतुजा.

आता बाबा मोठ्याने हसले "तुला काय वाटते प्राण्यांना, पक्षांना एकमेकांमध्ये आपले संबंध दाखवावे लागत नाही? त्यांना सुद्धा एकमेकांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा दाखवावा लागतोच.

प्रसंगी कळपात आपली सत्ता स्थापित करण्यासाठी किंवा जोडीदार मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. अगं हा सृष्टीचा नियम आहे.तिथे *survival for the fittest.*

तुम्हाला या वातावरणात स्वतःला सामावून घ्यावेच लागते.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की स्वतः स्वतःला सिद्ध करणे हेच तर आपले प्रथम कर्तव्य आहे त्यात आपण कमीपणा का मानावा. आपल्याकडे खरेपणा असेल इमानदारी असेल, कष्ट करण्याची ताकद असेल, सगळ्यांना सांभाळून घेण्याची शक्ती असेल तर आपण स्वतःला सिद्ध का नाही करू शकत?"

   *"इथे fittest हा शब्द केवळ शक्तीने या अर्थाने वापरला जात नसून याचा सामायिक अर्थ आहे."*

"तुम्ही ज्या देशाच्या पंतप्रधानाला निवडून देता किंवा मंत्र्यांना निवडून देता त्यांना नाही का स्वतःला सिद्ध करावे लागत? की आम्ही तुमच्या अपेक्षांना पूर्ण करू? जे पालक तुमच्यासाठी सदैव जागरूक असतात त्यांच्यासाठी तुम्हीही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला तयार आहात हे तुम्ही सिद्ध करणे तुमचे कर्तव्य नाही काय?

जे शिक्षण तुम्ही घेतले मग डॉक्टरकिचे असेल इंजीनियरिंग असेल किंवा आणखी कुठलेही असेल त्यात तुम्ही पारंगत झाला आहात हे सिद्ध करणे तुमचे कर्तव्यच आहे. त्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही योग्य कामासाठी करणार हेही तुम्ही सिद्ध करायला हवे. "

"ज्या पदावर तुम्ही काम करताय त्या पदाच्या तुम्ही लायक आहात हे सिद्ध करणे तुमची नैतिक जबाबदारी आहे.

डॉक्टर कडे गेल्यानंतर पेशंट बरा होईपर्यंत डॉक्टरच्याही डोक्यावर दबाव असतोच ना."

     "तुला आठवते तू चिमणी होतीस सात- आठ महिन्याची; मी माझ्या एका हातावर तुला उभे करायचो पण तू छान उभी राहायची कारण माझ्या चिमुकलीला माझ्यावर विश्वास होता माझ्या पंजा वर चिमुकले पाय ठेवून तू खतखदून हसायची."

 ऋतुजाला संधीच मिळाली ती म्हणाली "बघा, इतक्या छोट्या वयात सुद्धा मला माझ्या बाबांवर किती विश्वास होता. मग हाच विश्वास माझ्यावर सुद्धा असायला हवा की नाही?"

    शेखर म्हणाले "तू छोटी होतीस त्यावेळी इतर विचार तुझ्या डोक्यात शिवत नव्हते. मोठी झालीस एवढे शिक्षण घेतले पण तुझी आई तुला रागवायची तेव्हा तुझ्या काळजीपोटीच रागवत होती हा विश्वास का गमावलास?"

    "बाबा मला शब्दात पकडू नका." ऋतुजा फणकारली.

    "नाही ग बेटा ज्या नात्यांमध्ये संपूर्ण विश्वास असतो व तो दोन्ही बाजूनी असतो तिथे सिद्ध करावे लागत नाही परंतु *मानव हा शड्रिपूंने ग्रासलेला आहे* त्यामुळे तसे होत नाही."

   ऋतुजा कंटाळयाने उठत म्हणाली "खरंच कलियुग घोर कलियुग आहे."

  पण आई म्हणाली "असे समजू नकोस बरं. द्वापार युगात साक्षात भगवंत कृष्णाला सुद्धा सिद्ध करावे लागले *"मैया मोरी! मै नही माखन खायो!"*

   आणि त्याही पलीकडे सत्य युगात म्हणजे रामायणात साक्षात आपदमस्तक विशुद्ध सीतेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि तरीही एका परीटाने तिच्याविरुद्ध बोलल्याने रामाने तिचा परित्याग केला

*पतीत पावने तिला त्यागिले तशात ती गर्भिणी.* परंतु रामाने सुद्धा तिच्यावरील आपले प्रेम सोडले नाही. महालात राहून सुद्धा राम स्वतः वनवासात राहिल्यासारखे राहिले आणि आपले प्रेम सिद्ध करत राहिले."

      म्हणून म्हणते *"कुछ तो लोग कहेंगे. लोगों का काम है कहना,छोडो बेकार की बातो मे, कही बीत न जाये रैना."*

   "आणि नातेसंबंधात स्वतःला सिद्ध करणे यात कसलाही कमीपणा नाही. उलट तेच जीवनाचे सार्थ आहे."

   प्रत्यक्ष कृष्णाने सांगितले आहे

  *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।*

*मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगो s स्त्वकर्मणि॥"*

    ऋतुजा बोलली काहीच नाही पण कदाचित पटले असावे म्हणून खोलीत गेली आणि शशांक ला फोन करू लागली. पण सहा-सात फोन करूनही शशांकचा फोन सतत एंगेज येत होता शेवटी बाहेर येऊन चिडून बोलली. 

"केव्हाची मी फोन करते त्याला. पण हा कुणाशी बोलतोय माहित नाही? त्याला काही पर्वा तरी आहे का माझी?"

पण त्याच वेळी दारात शशांक उभा होता आणि म्हणाला "ऋतू! मी तुलाच फोन करत होतो ग!. पण तुझा फोन एंगेज येत होता म्हणून शेवटी धावत पळत इथे आलो."

   आई बाबा दोघांनीही ऋतूकडे हेतूपूर्वक पाहिले आणि दोघेही आत गेले आणि अर्थातच ऋतू शशांकच्या मिठीत.


Rate this content
Log in