देव्हार्यातले देव बोलू लागले
देव्हार्यातले देव बोलू लागले
॥श्री॥
आज काकांकडे मोठी पूजा होती.नुकतेच काका-काकू चारधाम यात्रा करून आले. जातांना काका- काकुंसोबत दिल्लीपर्यंत काकांचे दोन्ही मुले, त्यांच्या बायका, मोठ्यांच्या तीन व लहानाच्या दोन मुली शिवाय मुलगी जावई व त्यांचे मुलगा मुलगी पण होते. सगळ्यांना काकांनी विमानाची सहल घडवली होती. दिल्ली, चंदीगड वगैरे आसपासचा काही भाग तीन दिवस फिरून बाकी सगळे विमानानेच परत आले काका काकू मात्र पुढे गेले.
किती वर्षांची काकूंची इच्छा होती एकदा तरी तीर्थक्षेत्री जायचे. बिचार्या माऊलीने आयुष्यभर फक्त कष्ट उपसले. लग्न झाले तेव्हा भरल्या घरात पडल्या.शिवाय मोठी सून म्हणून दोन दीर व तीन नणंदांचे लग्ने, बाळंतपणे सगळे जातीने केले. काकांची सरकारी नोकरी होती; पण साधी कारकुनाची. तेव्हा पगारपण कमीच त्यामुळे नेहमी मन मारूनच राहावे लागले पण कधी कुरकुर नाही.
सर्वांची लग्ने झाल्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र संसार झाले. पण काका -काकूंचे उपकार सगळे विसरूनपण गेले. शिवाय त्यांचा स्वतः चा संसार पण फुलला होता.खर्चाची मिळवणूक करता करता नाकीनऊ यायचे. फिरायचे राहूनच गेले .निवृत्तीनंतर मिळणारा फंड वगैरे मधून व जन्मभराच्या पुंजीतून दोन मजली घर बांधले व दोन मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटला. मोठय़ाला बऱ्यापैकी नोकरी होती पण लहान्याचे लक्ष चंचल तो कुठेही फारसा टिकला नाही. शेवटी त्याला दुकान टाकायला पण काकांनी पैसे दिले. मुलीसाठी छान घर पाहून थाटामाटाचे सालंकृत कन्यादान केले सगळे छान सुरू होते.
नुकतीच त्यांची गावाकडची शेती धरणात जाणार असे कळले व त्याचे सरकारकडून भरपाई म्हणून पैसे मिळाले. आता शेतीसोबत काकांनी गावाकडचे घरपण विकले व आलेले सर्व पैसे मिळून चांगली दीड दोन कोटींची घसघशीत रक्कम मिळाली.
मिळालेली रक्कम पुन्हा जमिनीत किंवा स्थावर मध्ये गुंतवल्याने करात सूट मिळते व पैसे सुरक्षित राहतात म्हणून आपण शेतजमीन घ्यायची की (प्लॉट) भूखंड घ्यायचे की (फ्लॅट) सदनिका यावर घरात रोजच्या चर्चा सुरु झाल्या. बैठकी होऊ लागल्या. दलालांचे येणे- जाणे वाढले. काका तर कावूनच गेले त्यांना पण कळेचना काय करावे. त्यातच काकूंनी यावेळी निक्षून सांगितले की आपण चारधाम यात्रेला जायचे म्हणजे जायचे. म्हणूनच ही यात्रा काढली तरीही काकांनी तीन दिवस का होईना सर्वांनाच फिरण्याचा आनंद दिला व नंतर पुढे गेले पण ते दोघे तिकडे असताना इकडे बहिण भावंडांचे रोजचे सल्लामसलत सुरूच होते. प्रत्येकाला याची भीती होती की आता काका- काकू किती फालतू खर्च करतात. आमच्यासाठी काही ठेवतील की नाही. आमचाही हक्क आहे. तिघेही मुले आईबाबांचा फोन आला की;तुम्ही परत आले की आपण हा प्लॉट घ्यायचा काय? शेती बघू काय? वगैरे सुचवायचे. सतरा -अठरा दिवसांनी काका काकू परत आले त्यांनी गंगा पूजनाचा कार्यक्रम ठरवला. शंभर -सव्वाशे लोकांना जेवायला बोलावले. तिन्ही मुलांना हे अजिबात आवडले नाही पण सर्वांसमक्ष मात्र ते खूपच आनंदाने वावरत होते.
मेजवानी पूजा छान झाली. सर्वजण आपापल्या घरी गेले. फक्त तिन्ही मुलांचे कुटूंबिय मात्र घरात होते. सर्वजण आलेल्या भेटवस्तू पाहत होते. खरंतर ते विषयाला तोंड कसे फोडायचे याच विवंचनेत होते. शेवटी एकदाचे लहान मुलाने म्हटले; बाबा माझ्या मित्राने नुकताच एक फ्लॅट घेतला आहे. बांधकाम सुरू असल्याने सध्या किंमत कमी आहे कमी पैशात तीन फ्लॅट्स होऊन जातील. या रविवारी जाऊन बघून यायचे काय?
पण काका नातवंडांशी बोलत होते. अचानक म्हणाले अरे आम्ही प्रवासात असताना गंमतच झाली. एका मंदिरात खूप छान उत्सव सुरु होता. जेवणावळी सुरू होत्या, खूप गर्दी होती भरपूर पक्वान्ने केली हाेती. भजने व त्यावर भक्तमंडळी नाचत होते. मला तर वाटले दर्शन होईल की नाही? हळूच मंदिरात गेलो पण गाभारा पूर्ण रिकामा होता. सर्वजण बाहेरच होते गाभाऱ्यात देव आणि मी एकटेच होतो. आणि देव चक्क बोलू लागले.
तेवढ्यात मोठा मुलगा चिडून बोलला. बाबा राजू काय बोलतोय ते ऐकताय काय तुम्ही? पण बाबांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले व बोलतच राहिले. देव म्हणाले बघ श्रीधर; माझ्या नावाचा उत्सव आहे पण मजा मात्र त्यांची आहे. सकाळी पूजा उरकली, मणभर फुले, पाने माझ्यावर उधळले ते आता सडत आहेत. त्याचा दुर्गंध सुटला आहे. त्यातल्या अळ्या, किडे माझ्या अंगावर फिरत आहेत. ही घाण साफ करावीशी कुणालाही वाटत नाही. पाच- सहा आरत्या म्हटला. आता मात्र ध्वनी प्रक्षेपकावर ढणढण वाद्ये व कर्कश्य गाणे सुरू आहेत. सगळ्यांचा धांगडधिंगा सुरू आहे. सगळे मस्त खात पीत आहेत.पण मला मात्र नैवेद्य दाखवायचा विसरले आहेत.
बाबा आणखीही काही बोलणार ;एवढ्यात त्यांची मुलगी वीणा चिडून बोलली. बाबा तुम्हाला कामधाम नाही पण आम्ही इतक्या व्यस्त कामात केवळ तुमच्यासाठी आलोय आणि तुमचे हे काय फालतू सुरु आहे?
यावेळी मात्र काका बोलले. फालतू? मी फालतू बोलत नाही आहे.हे जे पण सांगतो आहे मी तुम्हाला सत्य सांगतो आहे. तुम्ही आमच्यासाठी आलेले नसून फक्त पैशाची वाट पाहण्यासाठी आलेले आहात. आम्ही प्रवासात असताना प्रत्येक जण मला वेगवेगळ्या योजना सांगत होते. पण तुमच्यापैकी कोणी आमच्या तब्येतीबद्दल विचारले? आम्ही काय खातोय, काय बघतोय, काय फिरतोय याची चौकशी केली? आम्ही जन्मभर मरमर करून चार पैसे कमावले व तुमचे जीवन चांगले व्हावे यासाठी सगळे प्रयत्न केले. ते आमचे कर्तव्यच होते. पण आम्ही आमचं आयुष्य जगलोच नाही. आनंद घेतलाच नाही. याचे तुम्हाला काही वाटतंय? प्रवासात तुमच्या आईचा वाढदिवस आला तुमच्यापैकी एकाने साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.
जे पैसे आहेत त्याचे काय करायचे मला कळते. माझे केस काही उन्हात पांढरे झाले नाहीत. मी पैसे तीन सदनिकांमध्ये गुंतवले आहेत. व बाकी पैसे सर्व नातवंडांच्या नावाने मुदत ठेवीत ठेवले आहेत. त्यांना त्यांच्या- त्यांच्या लग्नात मिळतीलच. पण तीनही सदनिका माझ्या व आईच्या नावानेच राहतील. तीनही घरे मी भाड्याने देईल पण त्याचे भाडे मी आईलाच देईल. त्यातून आम्ही जास्तीत जास्त फिरून घेऊ. व आईला कुठे खर्च करायची असल्यास ती करेल. परंतु तिन्ही सदनिकाख आमच्या दोघांच्या मृत्यू नंतरच तुम्हाला मिळतील.
आम्ही जन्मभर कष्ट करून कमावले. तसेच तुम्ही पण कष्ट करून कमवा .तेव्हा तुम्हाला पैशाची खरी किंमत कळेल .
खरेच आज घरच्या देव्हार्यातले देवसुद्धा बोलू लागले होते. देवाला सजावट उत्सव नाही. मनापासून भक्ती हवी. व घरातल्या देवांना थोडे प्रेम हवे असते.
मिळेल का त्यांना हे सारे ???
