मृगधारा
मृगधारा
पियुष आणि स्वीटी यांचा प्रेम विवाह. लग्न करून पियुष स्वीटीला घेऊन घरी आला. शैला ताईंना जबरदस्त धक्का बसला. पियुष एकुलता एक मुलगा. माधवरावच्या मृत्यूनंतर त्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले.आज पियुष इंजिनियर झाला. शिक्षणासाठी पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. डबे देणार्या काकुंची स्वीटी त्याला आवडली. स्वीटी नावाप्रमाणेच गोड, गुबऱ्या गालाची,घाऱ्या डोळ्याची, छान स्टेप कट केलेली आणि फक्त अठरा वर्षाची तरुणी होती.तिचे खळखळते हास्य आणि सळसळते तारुण्य यावर पियुष पागल झाला. पियुष पण स्मार्ट हरहुन्नरी आणि बोलघेवडा त्यामुळे स्वीटी पण त्यात गुंतली. परंतू जाती धर्माचे नसल्यामुळे दोन्ही घरचे विरोधात.शैलाताई अत्यंत करारी, शिस्तीच्या, देवधर्मी,एम ए बी एड झालेल्या आणि नामवंत शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना हे अजिबात पटले नाही फक्त तमाशा करणे त्यांच्या रक्तातच नव्हते. त्यांनी दोघांना घरात येऊ दिले औक्षवाण केले गोडधोड खाऊ घातले आणि सायंकाळी पियुषला समज दिली की तू आता बराच मोठा झालेला आहे तुला माझी गरज नाही तुला जिथे राहायचं तिथे तू राहू शकतोस.
पियुष ला आईचा करारी स्वभाव माहित होता. ते दोघेही बाहेर पडले आणि भाड्याच्या घरात राहत होते. छान सुरू होता त्यांना संसार. एक मुलगा पण झाला.त्यांना वाटले आता तरी आई विसरेल पण शैलाताई फक्त एकदा बारशाला आल्या बाळंतविडा दिला बाळाचा पापा घेतला आणि निघून गेल्या.
दिवस जात होते शैलाताईंनी स्वतःला समाज सेवेमध्ये झोकून घेतले. पियुष स्वीटीचा संसार ही फुलला होता. पियुष ने जॉब स्विच करून दुसरी कंपनी जॉईन केली अशातच कोरोनाचे सावट आले.लोकांचे काम धंदे बंद व्हायला लागले. नोकर कपाती मध्ये पियुषच्या नोकरीवर पण गदा आली.
पियुष हुशार होता अनुभव होता दुसरीकडे नोकरी मिळाली असती पण लॉक डाऊन आणि कोरोनामुळे कुठेच नोकरी मिळेना. आणि स्वीटी दुसऱ्यांदा गरोदर होती. या सगळ्यांमध्ये स्वीटीचे ब्लड प्रेशर खूप वाढून गेले आणि तिला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.
असे म्हणतात संकट येतात तेव्हा संकटांची मालिकाच येते. दे माय धरणी ठाय अशी अवस्था होऊन जाते. अगदी वेळेवरती स्वीटी कोरोना पॉझिटिव आली. सिझेरियन करावे लागले. बाळाला सुद्धा वेगळे ठेवावे लागले. बरेच दिवस दवाखान्यात ऍडमिट असल्यामुळे बिल भरपूर झाले. स्वीटीच्या माहेरचे लोक नातवाच्या जन्मानंतर निवळले होते येणे जाणे सुरू होते पण त्यांची परिस्थिती पण अति सामान्यच होती आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे येणे पण कठीण होते.
दवाखान्यात स्वीटी नुसती रडत बसायची.घरी पियुष सुद्धा हवालदिल झाला होता.
शैलाबाईंचाच मुलगा तो त्यामुळे तो सुद्धा अतिशय करारी आणि स्वाभिमानी होता, कुणाची मदत घ्यायला ही तयार नव्हता. परंतु वेळच अशी आली होती की त्याला मोठ्या मुलाला गावातच असलेल्या आते भावाकडे सोडावे लागले कारण स्वीटीला भेटायला जाताना पूर्ण पि पि ई किट वगैरे घालून जावे लागत होते. अशात मोठ्या मुलाला लागण होऊ नये म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. परंतु आते भावाकडून ह्या सगळ्या बातम्या शैलाताईंना कळल्या.
लगेचच दुसऱ्याच दिवशी एक ड्रायव्हर ठरवून शैलाताई स्वतः कारने पियुषच्या घरी येऊन उभ्या ठाकल्या. परंतु बाहेर गावच्या कुणालाही सोसायटीवाले आत घेईना शेवटी त्या सरळ दवाखान्यातच गेल्या. मोठ्या डॉक्टरांना भेटल्या आणि स्वतंत्र रूम करून स्वतः बाळाच्या संगोपनासाठी दवाखान्यातच राहिल्या एवढेच नव्हे तर स्वीटीची त्यांनी पूर्ण व्यवस्था लावून दिली आणि स्वतः पीपीटी घालून स्वीटी ला भेटायला आल्या.
आणि तिला धीर देऊन म्हणाल्या रडू नकोस .एवढे होईपर्यंत मला का सांगितले नाही. काठी मारून पाणी दुभंगते काय?
ग्रीष्माच्या तापलेल्या जमिनीतले पाणी सुकून गेल्याने तडे पडलेल्या जमिनीवर मृगाचा पहिला पावसाचा शिरकावा पडावा आणि मातीचा गोड सुगंध यावा व आसमंत भरून जावे असे स्वीटीला वाटले.तिच्या डोळ्यात आसवे थांबेना पण ते आनंदाश्रू होते.
