रूम नंबर ३
रूम नंबर ३
॥श्री॥
एक दिवस दवाखान्यात नाही जाशील तर काय बिघडेलं? मी. म्हणाले.
"काय झालं आईला?" पियूचे बाबा.
"काही नाही बाबा,आज पितृमोक्ष अमावास्या आणि माझी पहिली नाईट ड्युटी .आईला कोणीतरी सांगितलेलं माझ्या दवाखान्यात लिफ्टमध्ये आणि रूम नंबर तीनमध्ये भूत आहे म्हणून ती घाबरत आहे.पण आई याच्यासाठीच तू मला डॉक्टर केलंस काय? " -पियू
अंगारा लावून , रामरक्षा म्हणण्याच्या कबूलीवर जाऊ दिले.
गाडी लावून पियू लिफ्टमध्ये चढली फॅन चालू केला. तेवढ्यात . .
हु ssऊ sssss असा आवाज आला. असा आवाज कधीच आला नव्हता . पियू पटकन बाहेर आली आणि जीना चढू लागली.
आज तिन्ही मजल्यांवर ती एकटीच डॉक्टर होती. ती राऊंडला गेली.सगळ्या पेशंटला तपासलं, चार्ट्स पाहिले. सगळं ठीक होतं.
पियुने कॉफी मागवली.
जड जेवण झालंय ना! तांदळाची खीर, चिंचवणी, वडे, बोंड . झोप यायला नको. रमेशने गाणे लावले.गुमनाम है कोई . . .
पियुने बदलून "हवा येऊ द्या" लावले.
"मॅम लवकर चला वरचा ६ नंबर पेशंट सिरीयस झालाय."
निमा सिस्टर म्हणाल्या.
लिफ्टमध्ये जाताच पुन्हा तोच आवाज पियुला असह्य करीत होता.
पेशंट ७८ वर्षांचे आजोबा होते. त्यांच्या कंबरेच्या हाडाच ऑपरेशन झाल होतं रिकव्हर होत होते. आज अचानक कार्डीएक अरेस्ट मध्ये चालले. पियू स्टेथोस्कोप खालीच विसरली म्हणून पुन्हा लिफ्ट मध्ये गेली. पण हा आवाज ??? पियू रामरक्षा आठवू लागली
"बुधकौशिक ऋषीः राम कवचं स्मरेत.. . . "
रोजचीच रामरक्षा पण आठवत नव्हती".
पियूने स्टेथोस्कोप ,फोन घेतला. सरांना फोन केला.सरांच्या इन्स्ट्रक्शन घेताना लिफ्टमधून वर पोचली.
सर्वप्रथम पेशंटला आयसीयू मध्ये हलविले. इनट्युबेट केले आणि ट्रीटमेंट सुरू केली. तेवढ्यात सर आले. अडीच तीन तासांनंतर पेशंट स्टेबल झाला. सरांनी पियूला शाबासकी दिली.
Well done dr Piyu you had done such a great job! "
तू आणि निमा जाऊन झोपा.
त्या दिवशी हॉस्पीटलमध्ये ३ नंबर रूममधल्या(भुताच्या!) तो एकच पलंग रिकामा होता.दोघी पलंगावर जाऊन झोपल्या. आणि लगेचच पियुला झोप लागली. रात्री अचानक पियूला कोणीतरी दरवाज्यावर धडके मारतोय असा आवाज आला.तिने बाजूला पाहिले;
" अरे! निमा सिस्टर कुठे गेल्याज?"
पियू ची झोप खाडकन उघडली.ती घाबरून उभी राहिली . खोलीतले दारं, खिडक्या वाजत होते.थंडगार वारा सुटला होता. अचानक उघडय़ा दारातून एक पांढरी आकृती आत येऊ चलागली.ती सरळ पियू कडेच येत होती.पियूच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तोंडातून शब्द फुटेना. जिभेला कोरड पडली.ती आकृती सरळ पियू कडे आली. आणि म्हणाली. . . . .
मॅडम बरं नाही वाटत काय? ती निमा सिस्टर होती. पियू म्हणाली " थंडी वाजतेय. तुम्ही कुठे गेल्या होत्या? "
निमा म्हणाली "मी वॉशरूमला गेली होती. रात्री खिडकी बंद करायची राहून गेली.पहाटे थंड वारा सुटतो. त्याने दारं खिडक्या वाजतात. पहाटेचे सव्वापाच झालेत तुम्ही झोपतांय की उठणार?
"उठतेय. चहा सांगा." पियू म्हणाली.
पियू चहा घेतांना मोबाईल बघू लागली.बाबांचा मेसेज होता
"बेटा आपली आई अंधश्रद्ध नाही; पण आई असल्यामुळे काळजी करते.पण तू तुझ्या कर्तव्यात कुठेही चुकू नकोस. We are proud of you.
पियू ने उत्तर लिहिले -
"माझे बाबा! My support system. "
पियू घरी निघाली.
पण लिफ्टमध्ये जावे की नाही? तेवढ्यात सर आणि रमेश लिफ्टमध्ये आले. सर म्हणाले "अरे? हा कसला आवाज? "
रमेश म्हणाला "काहीं नाही; पंख्याच्या जाळीचा स्क्रू निघालाय आणि त्याला पातं घासल्या जातंय.काल श्राद्ध असल्यामुळे मेकॅनिक आला नाही. आज येईल ."
पियूला खुदकन हसू आलं.ती बाहेर आली पूर्व क्षितिजावर सूर्याच्या तांबडा गोळा उगवला होता.रामदीनच्या ठेल्यावर गाणं लागलं होतं." भोर आयी, गया अंधियारा!

