Aasavari Ainapure

Abstract

3  

Aasavari Ainapure

Abstract

एक नातं माणुसकीचं....

एक नातं माणुसकीचं....

4 mins
405


मालती-माधव. पुण्याच्या कोथरूड मध्ये असलेला एक टुमदार बंगला. आगाशे कुटुंब गेली कित्येक वर्ष त्यात वास्तव्य करून होतं. श्री. माधव, सौ. मालती, मुलगा कौस्तुभ आणि सून कौमुदी. असं चार जणांचं कुटुंब. माधव आणि मालती आगाशे, घरातले ज्येष्ठ नागरिक, आपलं रिटायर्ड लाइफ अगदी मनापासून जगत होते. मुलगा आणि सून दोघेही सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला. दोघे सकाळी लवकर कामावर जात. मुलाचं लग्न झाल्यापासून स्वयंपाकघराचा ताबा कौमुदीने घेतलेला तर मालती ताई मदतनीसाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडत होत्या. दोघे घरात असत तोपर्यंतचा वेळ कामात जाई. नंतरचा वेळ मात्र खायला उठे मालती ताईंना. माधवरावांना बागकामाची प्रचंड आवड. घराभोवती केवढी मोठी बाग फुलवली होती त्यांनी. रोज झाडांना पाणी घालणे व त्यांची देखभाल करणे ही सारी कामे प्रचंड आवडीने आणि ममत्वाने ते करत असत. एक दिवस सुद्धा नेम चुकलेला त्यांना स्वतःला आवडत नसे. कधी कधी मालती ताई त्यांना म्हणत, "किती जीव लावताय त्यांना? " तर त्यावर माधवरावांचे उत्तर असे, "अगं माझी मुलचं आहेत ती! जोवर जमतयं तोवर त्यांना सांभाळणं माझं कर्तव्यच आहे." 


वरवर पाहता सर्व आलबेल होतं. खंत फक्त एका गोष्टीची होती. घरात पाळणा हलला नव्हता. लहान मुलांची किलबिल कानावर पडण्याचं भाग्य नाही, असं सारखं मालतीताईंच्या मनात येई. म्हणूनच माधवराव आपला जीव झाडांत रमवत आहेत का?" असंही वाटून जाई. तसं आडून आडून त्यांनी कौस्तुभ-कौमुदीला सुचवूनही पाहिलं होतं पण "बघू गं! काय घाई आहे? " असं म्हणून कौस्तुभने ते उडवून लावलं होतं. "अरे म्हातारे झालो आम्ही. जोवर होतयं तोवर विचार करा." मालतीताईंचं साधं सोपं गणित होतं. पण मनावर घेतील ती पोरं कसली? आणि एक दिवस अचानक कौस्तुभने धक्का दिला. आई-बाबा होणे शक्य नसल्याचा. "मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस?" मालती ताईंनी कौस्तुभला विचारलं. "सध्या तरी काही नाही." कौस्तुभ उत्तरला. "आपण कोणाला तरी दत्तक घेऊया का?" मालती ताईंनी आशाळभूतपणे विचारलं. "आई, आम्हाला थोडा वेळ दे विचार करायला. बघू काहीतरी." कौस्तुभ म्हणाला. "बघू बघू म्हणायचे आणि एके दिवशी निर्णयच येऊन सांगायचे. आजकालची मुलं अशीच आहेत. जाऊ दे." मालती ताई मनातल्या मनात म्हणाल्या आणि आपल्या कामाला लागल्या. 


अशीच काही वर्षे गेली. आपल्या समवयस्क मैत्रीणींकडे पाहून कौमुदीलाही आईपण आता हवेहवेसे वाटू लागले होते. नाही म्हणायला सखुची लहान मुलगी तनया कधीकधी आई बरोबर त्यांच्या बंगल्यावर येत असे. तनया आवडायची कौमुदीला. दोन वर्षांची होती. पण एकदम तरतरीत. सखू म्हणजे आगाशे कुटुंबाचा एक घटक. म्हटलं तर कामवाली म्हटलं तर मदतनीस. पण खूप काही करायची त्यांच्यासाठी. इतक्या वर्षांचे आगाशे कुटुंबाचे आणि सखूचे संबंध होते. सखूने आपल्या प्रामाणिकपणाने आणि वागणुकीने सर्वांची मनं जिंकली होती. बंगल्याच्या मागेच माधवरावांनी सखू आणि तिच्या नवऱ्याला एक छोटेसे घर बांधून दिले होते. तेव्हापासून ती त्यांच्या घरी पडेल ते काम करत असे. पहिला लाँकडाऊन लागला. बाकीच्या घरची कामं कमी झाली होती. नवरा ही गाडी धुण्याची कामं करून संसाराला हातभार लावत होता. सगळं सुरळीत चाललं आहे असं वाटत असतानाच एक दिवस सखू आली ती तापाने फणफणतचं. कोरोनाचा काळ होता. मालतीताईंनी सखू आणि नवऱ्याची चाचणी करवली. दोघेही पाँझिटीव्ह आले. CT स्कोअर तसा बरा नव्हता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. तनयाची जबाबदारी मालतीताईंनी घेतली. दोघांनाही शक्य होईल तितकी मदत त्या करत होत्या. कौमुदीलाही हळूहळू तनयाबरोबर वेळ घालवणे आवडू लागले होते आणि अचानक एक दिवस माधवराव घरात परतले ते दु:खी कष्टी होऊनच. मालती ताईंना साधारण अंदाज आलाच होता. गेले चार पाच दिवस सखू आणि तिचा नवरा दोघांच्याही तब्येतीत चढ उतार होत होते. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर्स सखूला आणि तिच्या नवऱ्याला वाचवू शकले नाहीत. सर्वतोपरी काळजी घेऊनही शेवटी कोरोनाने घात केला. 


आता प्रश्न 'तनया'चा होता. इतकी गोड, चुणचुणीत मुलगी. लहान वयातच आपल्या आई-वडिलांना गमावून बसली होती. खेळता खेळता मध्येच ती मालतीताईंना किंवा कौमुदीला येऊन बिलगत असे आणि प्रश्न विचारत असे,"माझी आई कुठे आहे? ती कधी येणार आहे मला न्यायला? बाबा मला विसरले का? त्यांना माझी आठवण येत नाही का?" एक ना दोन. अनेक प्रश्न. अशा प्रश्नांना काय उत्तर द्यावे दोघींनाही कळत नव्हते. काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेत असत दोघी. पण असं किती दिवस चालणार? काहीतरी तोडगा काढायलाच हवा होता. एक दिवस माधवरावांनीच प्रश्नाला हात घातला. "काय करायचं या पोरीचं? आख्खं बालपण सरायचयं अजून तिचं." मालती ताई म्हणाल्या,"माझ्या ओळखीत एक अनाथाश्रम आहे. तिथे ठेवायचं का हिला? म्हणजे पुढे कधी ना कधी तिला तिचे हक्काचे आई वडील मिळण्याची शक्यता वाटते." खरं तर हे मालती ताईंच्या स्वभावाविरुद्ध होतं. पण कौस्तुभ-कौमुदीचा अंदाज न आल्याने आणि आपण किती दिवस तिला सांभाळू शकू हा विचार मनात आल्याने त्या बोलून गेल्या. तोच कौमुदी म्हणाली,"नको आई. मला वाटतं की तिला राहू दे इथेच. मी आणि कौस्तुभने ह्या गोष्टीवर खूप विचार केला काल. आमचं एकमत झालंय की आम्ही तिला दत्तक घ्यायला तयार आहोत. तिला हक्काचं घर मिळेल, कुटुंब मिळेल. नियतीने तिला आज अशा वळणावर आणून सोडलंय, त्यात तिचा काय दोष? सखू आपल्याला कधीच परकी वाटली नाही. आणि संस्कारांचं म्हणाल तर आत्ताचं तिचं वय नकळतं आहे. या वयात आपण तिच्यावर नक्कीच चांगले संस्कार करू. कुठल्याही रक्ताच्या नात्या एवढंच माणुसकीचं नातं ही महत्वाचं आहेच ना?" कौमुदीच्या या बोलण्यावर मालती ताई आणि माधवराव दोघेही खूष झाले. "अगदी मनातलं बोललीस बघ!" माधवराव उद्गारले. भल्या माणसांनी दाखवलेल्या प्रेमामुळे एक कोवळा जीव नव्याने फुलणार होता, बहरणार होता! अगदी माधवरावांनी लावलेल्या नवीन 'मधुमालती' सारखा ! जगात माणुसकी दुर्मीळ होत असताना मालती-माधव मात्र माणुसकी जोपासत होता, वाढवत होता! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract