आशा..... एक सकारात्मक प्रारंभ
आशा..... एक सकारात्मक प्रारंभ
'आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गुज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी'
सुधीर मोघ्यांचे सुंदर शब्द असलेलं गीत कानावर पडलं आणि मन 'आशे' बद्दल विचार करू लागलं. संपूर्ण गाण्यातून आपल्याला जाणवत राहतं ते नायिकेचं आशादायी असणं. पूर्ण गाणं आपल्यालाही एक सकारात्मकता देऊन जातं. सुधीर मोघेंनी गाण्यात 'आशा' ही डोळ्यांतून व्यक्त केली आहे. जशी ती डोळ्यातून दिसते तशीच ती मनातही व्यक्त होते. किंबहुना मनात व्यक्त झाल्याशिवाय तिचे डोळ्यातून दिसणे कठीण. पण 'आशा' म्हणजे नक्की काय? मनाने केलेला सकारात्मक विचार की एखाद्या गोष्टीबाबत मनाने दिलेला सकारात्मक कौल? मी 'आशावादी' आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामागे सकारात्मकता जास्त असते किंबहुना 'आशा' हा सकारात्मकतेचा प्रारंभ असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. समोर काळाकुट्ट अंधार असतो, कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याचे सर्व मार्ग खुंटलेले असतात, उपाय सापडत नसतो, मन निराशेनं घेरलं जाण्याची दाट शक्यता असते. अशावेळी फक्त आणि फक्त 'आशा' माणसाला जगण्याचं बळ देते. परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याची ताकद देते. सकारात्मकतेच्या मार्गावर त्याला घेऊन येते आणि मग तो लढतो. परिस्थितीशी दोन हात करतो. त्याला विचार सुचतात. मार्ग सुचतात. पण हेच जर तो आशावादी नसेल तर? निराशेनं घेरून कोसळण्याचीच भीती जास्त. त्यामुळे जीवनात हर घडी प्रत्येक बाबतीत आपण आशावादी राहिलं पाहिजे. परिणाम सकारात्मक दिसतात. ते जाणवतात आपल्याला.
आशा म्हणजे 'Hope'. आशेच महत्व विशद करताना मार्टिन्य ल्यूथर म्हणतो, "Everything that is done in this world is done by hope." अर्थात त्याला प्रयत्नांची जोड मिळायला लागते. पण आशाच नसेल तर माणूस प्रयत्नच करणार नाही. मनात 'आशा' जागवण्यासाठी देखील त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात. त्यामुळे मनुष्याने नेहमी 'आशे'ची कास धरावी. 'Once you choose hope, anything is possible' हे कायम लक्षात ठेवावे. कधी कधी माणूस खचतो. हरतो. सगळं संपलं असं वाटत असताना मनातली 'आशा' त्याला प्रकाशाचा किरण दाखवते. माझ्याकडे काहीच उरले नाही अशी भावना प्रबळ होत असताना, पण माझ्याकडे 'आशा' आहे असे म्हटल्याने जे काही मिळते ते वर्णनातीत असते. त्यामुळे परमेश्वराने ही आशेची देणगी जी प्रत्येकाला दिली आहे, तिचा त्याने योग्य तो वापर करावा. कारण 'ते'च सर्व काही असते. "Hope..... Sometimes that is all you have when you have nothing else. If you have it, you have everything." हे विसरता कामा नये.
आपले आयुष्य 'आशे'ने भरलेले आणि भारलेले असावे. Annie Frank ने म्हटल्याप्रमाणे 'Where there is hope....... there is life.' 'आशे' शिवाय आयुष्य नाही. आपली स्वप्नं आपण जगतो ती या 'आशे'मुळेच. आशा कायमच जिवंत असते आपल्या स्वप्नांमध्ये, आपल्या कल्पनेमध्ये आणि आपल्या धैर्यात सुद्धा. ज्यामुळे आपण आपले स्वप्न वास्तवात आणण्याचा प्रयत्न करत असतो. आशा जगण्याची ताकद आणि उमेद दोन्ही देते. म्हणूनच कदाचित ऍरिस्टोटल आशेचे वर्णन करताना म्हणाला असावा 'Hope is a waking dream'. बाकीचं सगळं जग विरोधात उभं ठाकलेलं असताना फक्त एक आणि एकच छोटासा आवाज आपल्याला सांगत असतो. 'होईल, सर्व काही ठीक होईल आणि हा आवाज असतो 'आशे'चा. तो ऐकायला शिकलं पाहिजे. तर पुढची वाटचाल एकदम सोपी होऊन जाते. आशेचं मोल करता येत नाही. ती अमूल्य असते. तसेच ती खरी किंवा खोटी असत नाही. पण प्रामाणिक असते. 'आशा' ही कायमच आजारी आणि थकलेल्या मनासाठी 'औषध' म्हणून काम करते. ती चमत्कार घडवते. कुठलाही यशस्वी माणूस हा कायमच आशावादी असतो किंबहुना तो आशावादी असतो म्हणूनच तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. अशक्य ते शक्य करण्याची ताकद या 'आशे'त असते. त्यामुळेच मार्टिन ल्यूथर ने म्हटल्याप्रमाणे "We must accept finite disappointment, but never lose infinite hope." 'आशे'ला मर्यादा नाही. 'आशा' ही एक मनात येणारी फक्त भावनाच नाही तर तो एक मार्ग आहे, विचार करण्याचा. त्यामुळेच आशा बाळगू या. आशावादी राहू या. आशा जपुया. कारण दिसत नसली तरी तिचं महत्त्व कालातीत आहे. शेवट Hellen Keller च्या शब्दांनी - "Hope sees the invisible, feels the intangible and achieves the impossible."
