आजोळ
आजोळ
"आई, आजोळ म्हणजे काय ग?'' आठ वर्षांची सोहा स्वातीला विचारत होती. नुकतीच परीक्षा संपलेली. मुलांना सुट्टीत कुठे न्यायचे? या विचारात स्वाती गढलेली. तेवढ्यात मुलीचा प्रश्न कानावर पडला. स्वातीने उत्तर द्यायला सुरुवात केली. ''आजोळ म्हणजे आईचे गाव.'' ''आईचे गाव म्हणजे?'' स्वातीचा जन्म व बालपण मुंबईत गेल्यामुळे या पुढच्या पिढीला आजोळ कसे माहीत असणार? एक विचार मनात डोकावला. स्वातीने समजावून सांगायला सुरुवात केली. '' हे बघ सोहा, तुझी आई मुंबईत वाढली. मुंबईतच शिकली. त्यामुळें नानी आजीचं घर हेच तुझं आजोळ. पण माझं आजोळ मात्र काही वेगळंच होतं हा!'' 'आजोळा'ची व्याख्या थोडी अधिक स्पष्ट होईल, या विचाराने स्वाती बोलू लागली. ''तुझी नानी आजी रहात होती कोकणात. मुंबईत आल्यावर नाना आजोबांशी लग्न झालं तिचं. त्यामुळे माझं 'आजोळ' हे कोकणच होतं. कोकणात नानी आजी राहायची ते एक कौलारू घर होतं. माडी, ओटी पडवी, अंगण इत्यादी इत्यादी असलेलं. एक छान जांभ्याच्या लाल दगडांचे घर. सुट्टी लागली की, आम्ही म्हणजे मी, मामा आणि मावशी नानी आजीबरोबर कोकणात जात असू. मामी आणि मामी भरपूर लाड करायचे. मामीच्या हातचा मऊ भात, सोबतीलाला मेतकूट, लाल पापड आणि त्यावर साजूक तुपाची धार! असा झक्कास बेत असायचा न्याहारीचा! आंबे, करवंद, फणस हे तर मनसोक्त हादडायचो. आंघोळीसाठी चुलीवर स्वतःचं पाणी स्वतः तापवून घेणं, संध्याकाळी 'रामरक्षा' न चुकता म्हणणं हे अगदी नित्याचं होतं. मामा वरून कडक शिस्तीचा वाटत असला तरी आतून खूप प्रेमळ होता. अगदी काटेरी फणसासारखा. भाच्यांचे खूप लाड करायचा. मित्रच वाटायचा आम्हाला.
गोबर गॅस म्हणजे काय? तो कसा निर्माण होतो? तो कसा वापरला जातो? इत्यादी गोष्टी त्यानेच आम्हाला दाखवल्या. शेतात जाऊन वेलीवरची तोंडली काढणे, दुधी भोपळा काढणे, बोरिंगचे पाणी शेतात सोडणे, गोठ्यात जाऊन गाई म्हशींना चारा घालणे, त्यांचं दूध काढताना बघणे या सगळ्यातून कळत-नकळत खूप गोष्टी शिकत गेलो. खऱ्या अर्थाने निसर्ग अनुभवत गेलो. वेगळे 'संस्कार' शिबिर लावायची गरजच भासली नाही कधी. तर असं हे 'आजोळ'. आता मामा नाही आणि मामीही नाही. घर अगदी भकास वाटतं. पण आठवणी मात्र अजूनही तितक्याच ताज्या आहेत मनात." 'आजोळ'ची थोडीतरी कल्पना सोहाला आली असावी असं स्वातीला वाटलं. तिचा तर्क बरोबर होता. सोहाने मुंबईत अनुभवलेलं 'आजोळ' आणि कोकणातलं आजोळ यात जमीन अस्मानाचा फरक होता. आजोळ कथन संपल्यावर सोहाने हट्टच धरला कोकणात जाण्याचा आणि ती सगळी मजा अनुभवण्याचा. स्वातीलाही 'नाही' म्हणवेना तिला. एक 'वेगळा' अनुभव तिला देण्याचं वचन तिने सोहाला दिलं आणि मन मात्र परत एकदा आजोळच्या आठवणींत गेलं.
