फिरुनी नवे जन्मेन मी...
फिरुनी नवे जन्मेन मी...
कुणी निंदावे त्यालाही करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा त्याचा करावा सत्कार
काही वागावे कुणीही मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने माझे गिळावे मीपण
कित्येकांना दिला आहे माझ्या ताटातील घास
कितीकांच्या डोळ्यातील पाणी माझ्या पदरास
आज माझ्या आसवांना एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी एक अंधार प्रेमळ.
कवयित्री इंदिरा संत यांच्या 'कढ' या कवितेच्या ओळी मनात पिंगा घालत होत्या. पुष्कळदा असं वाटतं की धरणी दुभंगावी आणि आपल्याला कोणीतरी आत ओढून घ्यावं. कुणाचा तरी एक सहारा. कशात तरी गुपचूप मिटून जावं आणि व्हावं एकदम शांत शांत. मनही आणि ठसठसणारं दुःखही. होतं का पण असं कधी कधी? नाही होत. ते होणारही नसतं. तो क्षण मात्र सांगत असतो आपल्याला. कुणाचं काय चुकलं, कोण बरोबर कोण चूक याचा विचारच येत नाही मनात. घाव इतका जबरदस्त असतो की त्यातून सावरायला, बाहेर पडायला वेळ हा लागतोच. कुणीकुणी असू नये आपल्याजवळ आणि घ्यावं कशात तरी मिटून स्वतःला. मनाची ही अवस्था कोणाकडे तरी मोकळं करणं गरजेचं होतं. मनात विचारांचं काहूर उठलं होतं.
माधवी - एक साधी सरळ स्वभावाची गृहिणी. आपण बरं आणि आपलं काम बरं या स्वभावाची. घरातल्या माणसांचं हवं नको अगदी तत्परतेने बघणारी. कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही. तसे सासू बरोबर नाही म्हणायला खटके उडत होते अधून मधून. सासूबाईंच्या आणि तिच्या स्वभावात जमीन-अस्मानाचं अंतर होतं. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण वाद इतका टोकाला जाईल याची त्या बिचारीला काय कल्पना? आणि तो दिवस उजाडला. सकाळी पोह्यात मिरच्या ठेचून घातल्याने तिचा संताप झाला. सासूबाईंना माहीत होतं की तिला तिखट जास्त चालत नाही. आधी चार पाच वेळा तसं चांगल्या शब्दात सांगूनही झालं होतं. पण तरी फरक पडला नाही. मग वादावादी. स्पष्टपणे सांगताना आवाज थोड्या वरच्या पट्टीत लागला आणि मग गेले एक दोन शब्द जास्तीचे निसटून. त्यावर नवऱ्याची बोलणी. नीट शब्दांत सांगता येत नाही का? वगैरे वगैरे. मुद्दा हा होता की चार-पाच वेळा सांगूनही माणूस त्याच चुका करतोय आणि ते पण एखाद्याच्या प्रकृतीला चालणारे नसले तरीही. पण नवरा आई विरुद्ध एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही. घरातल्या घरात संवादाचा अभाव. साधं बोलताना पण मान-अपमान यांच्या मर्यादा आखलेल्या. माधवीचे मन पार कुस्करून गेले. सासूबाईंच्या वागण्याचे वाटले नसेल एवढे दुःख नवऱ्याने त्याच्या वागण्याने दिले.
नवरा अगदी टिपिकल. पुरुषी इगो बाळगून असणारा. म्हणजे बायकोने नोकरी करू नये वगैरे नाही. पण तिला तिच्या स्वतःच्या अस्तित्त्वासाठी, तिचा स्वतःचा आत्मविश्वास कायम राखण्यासाठी काही करणे म्हटले तर त्याला पाठिंबा द्यावा या विचारांपासून फारकत घेतलेला. तुझ्या पैशावर मी अवलंबून नाही या विचारांचा. नोकरी काय फक्त पैशासाठीच करायची असते का? बाकी काही विचारच नाही. आणि ती निमूटपणे त्याचं सगळं ऐकणारी. नको तितकं प्रेम करणारी. मुळात स्वभावच प्रेमळ. हा घाव त्यामुळेच वर्मी लागला तिच्या. अगदी घरातून तुला आणि मुलाला दुसऱ्या घरी शिफ्ट करण्यापर्यंत मजल गेली. रागाच्या भरात बोललाही असेल कदाचित. पण कारण काय, तर म्हणे तुला माणसं जोडता आली नाहीत. ''आम्ही तुझ्या हातच्या अळणी भाज्या खातो तर तुला तिखट खायला काय हरकत आहे?'' उत्तम स्वयंपाक बनवणाऱ्या तिला हे अपेक्षितच नव्हतं. आणि तेही एखाद्याच्या प्रकृतीला चालत नसताना?
मग तिने बंड केलं तर यात कुठे चुकलं तिचं? शांतपणे एकामागून एक विचार येऊ लागले. पहिली आली अपराधीपणाची भावना. कुठे कमी पडलो आपण? वेळेवर सगळ्यांचं खाणं-पिणं, जेवण इत्यादी घरातली कामं मनापासून करून देखील जर उपर्याच ठरणार असू तर नकोच तो बाईचा जन्म. ही तर एका गृहिणीची व्यथा, असंही वाटून गेलं. मग नोकरी करणाऱ्या बायकांच्या आणखीनच कथा असतील नाही? पण मनात विचार आला की, पुरुषांचा दृष्टिकोनच हे ठरवत असावा. काही पुरुष स्वतःच्या बरोबरीने बायकोला घरात स्थान देतात. मग ती कमावती असो किंवा नसो. पण असे फारच कमी असतील. ते लग्नात सात फेरे घेतल्यावर 'सहधर्मचारिणी' वगैरे उगीचच बिरूद लागतं स्त्रियांच्या मागे. सुखंदुःखं एकमेकांच्या साथीने एकत्र शेअर करण्याची वचनं. सगळं खोटं असतं, असं गप्पकन एका क्षणी वाटून गेलं तिला.
कुठलंही घर हे माणसांनी आधीच भरलेलं असतं आणि मग त्यात एक आऊटसाईडर प्रवेश करतो इतकंच. तो 'आउटसाईडर' 'इन्साईडर' बनतो का कधी? सगळ्यांचं सगळं करूनही बिचारा आउटसाईडरच राहतो. कारण दुसर्या घरातले संस्कार घेऊन आलेला असतो ना? एरव्ही कधी जाणवत नसेलही. पण वेळ आली की घरातलाच कोणी माणूस बरोबर त्याची जागा दाखवून देतो त्याला. जी जागा निर्माण करण्यात आयुष्यातली काही वर्षे खर्ची होतात तीच जागा दाखवून द्यायला एक क्षण पुरेसा होतो. म्हणजे लग्न झालं म्हणून 'माहेर' परकं होतं आणि सासरी 'आउटसाईडर' असल्याने ती ही जागा स्वतःची नाही. मग काय असतं आपलं? 'मन'? नाही, ते तर अजूनही माणसांत गुंतलेलं असतं. शरीर? ते तर दुसऱ्याला दिलेलं असतं. एक जिवंत चालता-बोलता आउटसाईडर कायमच आऊटसाईडर असतो हे सत्य फक्त सोबत असतं आपल्या. कितीही कटू असलं तरीही. स्वाभिमान, आत्मसन्मान वगैरे सगळं झूठ असतं. जितक्या लवकर ते स्वीकारलं जाईल तितकं ते चांगलं कारण मग दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं बंद करतो आपण.
कुणाशी बरं बोलावं याबाबतीत? शाळेतली जिवाभावाची मैत्रीण आणि सख्खी बहीण यांच्याशी बोलणं झालं माधवीचं. दोघीही उच्चशिक्षित. त्यामुळे सल्ला चुकीचा मिळणं शक्यच नव्हतं. अशा वेळी कोणी तरी तटस्थपणे ऐकून घेणारं हवं असतं. तिच्या सुदैवाने दोघींनीही वेळेवर मदत केली या सगळ्यातून बाहेर पडायला आणि एक नवी माधवी दिसू लागली तिला. एकाच दिशेने विचार करणाऱ्या मनाला वेगळे पर्याय सापडू लागले. तिची चूक तिच्या लक्षात आली. नको तितक्या अपेक्षा दुसर्यांकडून ठेवल्या की होणारा अपेक्षाभंग आणि त्यामागोमाग येणार दुःखं. मग तिने स्वतःला बदलायचं ठरवलं. काहीएक निश्चय मनाशी करून. इन्साइडर / आउटसाइडरचं सत्य स्वीकारून. एक नवी सुरुवात करण्याचं. गुंतणं कमी करून स्वतःसाठी जगणं वाढविण्याचं. मनातले विचार संपताच माधवीने बेडरुमचा दिवा मालवला. उद्या एका नव्या माधवीचा जन्म होणार होता. मनावरचे घाव आणि उमगलेले नवीन सत्य या सकट आणि अर्थात आपण आपल्यासाठी जगणार आहोत हा निश्चय. मनावरचं मळभ दूर झालं होतं आणि तिच्या मनात मात्र एका 'आउटसाईडर' माधवीने प्रवेश केला होता आणि मनाने तिला सहज 'इन्साईडर' करून देखील टाकलं होतं.
