निरोप
निरोप
"आई ......अगं बँगेच्या डायमेन्शन्स दिल्या आहेत टीचरनी ! ही बँग नाही चालणार विमानात." काव्या पोटतिडकीने सांगत होती. काव्या - वय वर्ष तेरा. सुमित आणि श्रीयाची एकुलती एक मुलगी.
पहिल्यांदाच एकटी - आई-वडिलांना सोडून शाळेच्या सहलीच्या निमित्ताने अमृतसरला चार दिवस चालली होती. सहल अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. श्रीयाच्या मनात विचारांनी थैमान घातले होते. 'पहिल्यांदाच जाणार आहे! व्यवस्थित तयारी करून दिलेली बरी!' स्वतः जातीने लक्ष देऊन श्रीया तिची तयारी करून देत होती.
"मम्मा! मी करते ना सगळं! तू नको लक्ष देऊस!" स्वावलंबी होण्याचा काव्याचा प्रयत्न चालू होता.
"अगं, ती करत्ये तर करू दे की तिला! तूच सगळं करून दिलंस तर मग ती शिकणार कधी?" सुमितचा दृष्टिकोन.
"अरे, पण राहायला नको काही गडबडीत. पहिल्यांदाच जात्ये इतक्या लांब. काही विसरायला नको. शिवाय आपण नाही आहोत तिथे काही लागलं तर मदत करायला तिला." श्रीयातली 'आई' म्हणाली.
"हो! पण टीचर आहेत ना! त्या घेतील की काळजी मुलांची!" सुमित म्हणत होता ते अगदी खरं होतं. पण तरीदेखील कुठे तरी धाकधूक होतीच मनात तिच्या. सहलीची पूर्ण तयारी होतच आली होती जवळजवळ आणि बॅग भरून झाल्यावर काव्या एकदम बेडवर जाऊन आडवी झाली.
"काय होतंय?" श्रीयाने विचारलं.
"पोटात दुखतंय गं!" काव्याचे उत्तर.
"काही वातुळ वगैरे खाल्लंस का?" श्रीयाने विचारले.
"नाही गं! हे नेहमी सारखं नाहीये. काही तरी वेगळं जाणवतंय." काव्या उत्तरली.
"अरे देवा! हे काय भलतंच उपटलं मध्येच?" श्रीयाने काव्याला 'चेक' करायला सांगितलं. तिचा अंदाज बरोबर होता. दोनच महिन्यांनी तेरावं संपून चौदावं लागणार होतं काव्याला.
"बरं झालं! आजच झालं ते! आता दोन दिवस विश्रांती घे!" तशी तिने कल्पना देऊन ठेवली होती काव्याला. त्यामुळे ती घाबरली तरी नाही.
पहिलीच वेळ असल्याने तिची प्रतिक्रिया काय असेल? याबाबत श्रीया साशंक होती. पण बऱ्यापैकी निभावून नेलं काव्याने. ईलाजच नव्हता. दोन दिवस थोडा त्रास झाला, पण चुपचाप सहन केला पोरीने.
सहलीचा दिवस उजाडला. विमान आठ वाजताचे होते. सकाळी पाच वाजता सुमितने 'उबर' बोलावली. "आवरलं का गं तुझं?" असं म्हणेपर्यंत काव्या तयार होऊन आली सुद्धा! एक्साइटमेंटमध्ये मॅडम रात्री झोपल्याच नव्हत्या. पण आता त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. आयडी कार्ड, आधार कार्ड वगैरे चेक करून ते तिघे 'उबर'मध्ये बसले आणि 'उबर' विमानतळाच्या दिशेने निघाली.
वाटेतही मैत्रिणींचे कॉल्स चालूच होते. श्रीयाच्या सूचना काही संपत नव्हत्या. या सगळ्यात विमानतळ कधी आले कळलेच नाही. शिक्षिका तर आधीच येऊन पोहोचल्या होत्या. गट करून झाले. हजेरी घेऊन झाली आणि निरोपाची वेळ झाली. काव्या आपल्याच धुंदीत होती आणि खुशही होती.
पोटात गोळा मात्र श्रीयाच्या आला होता. 'पोटचा गोळा' पहिल्यांदाच दूर जाणार होता. 'कसं होईल? काय होईल?' विचार थांबत नव्हते. त्या मानाने सुमित शांत होता एकदम.
"बाय मम्मा! बाय बाबा! टेक केअर.....!" काव्याचा आवाज आला. मनात आलं, 'दोन दिवसात केवढी मोठी झाली ही! अगदी आई-बाबांना 'टेक-केअर' सांगेपर्यंत! श्रीयाला भरून आलं होतं. एक इवलंसं पाखरू आकाशात झेपावलं होतं - उंच भरारी घेण्यासाठी. आपली जबाबदारी ओळखून आणि पेलूनसुद्धा! हा 'निरोप' श्रीया कधीच विसरू शकत नव्हती. आई-मुलीचं नातं अधिक गहिरं करणारा! त्यांच्यातला विश्वास सार्थ ठरवणारा! जबाबदारीचे भान देणारा आणि तितक्याच ताकदीने जबाबदारी पेलणारा! दुःख आणि आनंद मिश्रित अश्रू गालावरून खाली ओघळले आणि एकदम हायसं झालं श्रीयाला! मन शांत करून गेला होता एक 'निरोप'!
