चुकलेलं गणित...
चुकलेलं गणित...
सव्वा आठ वाजून गेलेले. अजून सुधाकरचा पत्ता नव्हता. पावणेआठला फोनवर बोलणे झालेले. "मी एलफिन्स्टनला आहे. दहा-पंधरा मिनिटांत येतो." एलफिन्स्टन ते चर्नीरोड अंतर गाडीने वीसेक मिनिटांत कापू शकता येणारं. शाळेतल्या मैत्रिणीचा मुलगा कार अपघातात गेल्यामुळे शाळेचा सगळा ग्रुप पनवेलला गेला होता. सुधाकरची गाडी असल्याने चार-पाच जण त्याच्याबरोबर होते. खूप वाट पाहून कंटाळलेल्या सुधाने शेवटी साडेआठला जेवण उरकून घेतले. तोच सुधाकर हजर झाला. "एवढा उशीर का झाला?" सुधाने विचारले. त्यावर सुधाकरचे उत्तर, "ट्रॅफिक लागला." नाही! बरोबरच होतं ते! पण मग नक्की आपल्याला सलतंय काय? राग कशाचा आलाय? सुधा स्वतःशीच विचार करु लागली. मित्र-मैत्रिणींच्या देखत दहा-पंधरा मिनिटात येतो सांगणार्याने पाऊण तासाने उगवावे. ट्रँफिक आहे, हे गृहीत धरूनच तसे बोलावे ना ! का धुसफूस होत्ये आपली? त्याच्यावर जीवापाड प्रेम करणार्या आपली हीच किंमत केली का त्याने? असे वाटून गेले तिला ! की काही वर्ष सरल्यावर संसार जुना वाटायला लागतो या पुरुषांना? काही कळत नाही. खरंतर जितका संसार जुना तेवढा तो मुरला पाहिजे लोणच्यासारखा. पण मग घरी बायको जेवायची थांबली आहे हे माहित असून देखील तिच्या भावनांची पर्वाच करू नये का माणसाने? उशीर होणार आहे, ट्रँफिक आहे तर तसं कळवू पण नये का? एक ना दोन, अनेक प्रश्न उभे राहिले मनात. ज्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्न ती करत होती आणि हळूहळू काही गोष्टी कळू लागल्या तिला. स्वतःचे अस्तित्व विसरून, नवरा आणि मुलीसाठी राबणारी ती! कुठलीही गोष्ट घेताना आधी त्यांचा विचार येत असे कायम मनात. दोघांनाही खाण्याची प्रचंड आवड. बाहेरून अगदी थोडा जरी खाऊ विकत घेतला तरी त्या दोघांच्या आवडीनिवडीचा विचार प्रथम येत असे. संसार मुरायला हवा वगैरे विचार तिच्या बाजूने होता. तो मात्र तीच बायको, तोच संसार या विचारांचा. अगदी टिपिकल पुरुषासारखा. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व जपून असलेला. ती मात्र त्याच्यात पुरती विरघळलेली. भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या त्याच्यावर अवलंबून असलेली. म्हणूनच का फायदा घेत असेल तो? एवढा स्वार्थी कधी झाला हा? का आपणच त्याला नीट ओळखले नाही? १९ वर्षांचा संसार! दुखणी, खुपणी, आनंद, दुःखं सारं वाटून घ्यायचं या जाणिवेने इथपर्यंत वाटचाल करत आलेले आपण! साधी छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा शेअर करावीशी वाटायची त्याला! आणि तो मात्र कधीच शेअर करायचा नाही तिच्याशी काहीही. अगदी b.p. शूट होऊन छातीत दुखत होतं तेव्हाही स्वतः डॉक्टरांकडे जाऊन एकटा चेक- अप करून आला आणि मग सांगितले तिला! आपण कुठे नक्की कमी पडतोय? पण आपणहून काही सांगणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. पराकोटीचा शांत स्वभाव. नाती सांभाळताना कायम दुसऱ्यांसाठी जेवढं शक्य होईल तेवढं करणारा हा माणूस. मग मी याला 'स्वार्थी' तरी कसं म्हणू? कदाचित चुकलं माझंच असावं. पण एवढी साधी अपेक्षाही बाळगू नये का त्याच्याकडून? त्याच्या बाबतीतलं 'गणित' नेमकं कुठं चुकलं? 'स्वतंत्र' स्वभाव असलेल्या त्याच्यावर तीचं पूर्णपणे अवलंबून असणं कुठेतरी त्याच्यातल्या 'पुरुषी अहंकाराला' सुखावत होतं आणि तो अहंकार मग असा अधून मधून डोके वर काढत होता. माझा संसार म्हणता म्हणता संसारात तो राहिलाच कुठे आहे? शेअरिंग वगैरे तर कधीच मागे पडलय! फक्त स्वतःवर अवलंबून ठेवायचं होतं का त्याला मला? आणि मी आंधळेपणानं सगळं विश्वासाने करत आले त्याच्यासाठी! पण आता नाही. चुकलेलं गणित सुधारायचं ठरवलं तिने. प्रत्येकाला आपापली स्पेस हवी असते. ती दिली की नाती घट्ट होतात अजून. पण तिच्यावरचं अतिक्रमण मात्र सहन होत नाही. खरं तर ते अतिक्रमण नव्हतंच. पण आती काळजीही (त्याच्या द्रुष्टीने) घातकच ठरते ना! प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. त्या त्या मार्गानेच जावं प्रत्येकाने. ते एकत्र येतील ही अपेक्षा ठेवू नये. लख्ख उजेड पडला तिच्या मनात. गणित कुठे चुकलं होतं ते तिला कळलं आणि संसारातून थोडं अलिप्त व्हायला हवं याची जाणीव तिला झाली. स्वतःमधलं 'वेगळेपण' शोधायला हवं. ते जोपासायला हवं. संसाराची एक वेगळीच व्याख्या हे 'चुकलेलं गणित' शिकवून गेलं तिला! मन एकदम शांत झालं होतं. आता कुठलाच हिशोब कधीच चुकणार नव्हता. मनातल्या मनात या चुकलेल्या गणिताचे आभारच मानले तिने. स्वतः कडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिल्याबद्दल! आता खरं जगणं सुरू!
