घे उंच भरारी......
घे उंच भरारी......
''मीरा.... ए मीरा! मीराच ना तू?'' ओळखीचा आवाज कानावर पडला. मीराने भर्रकन मागे वळून पाहिले. सुमन धावतच तिच्या मागोमाग येत होती. सुमनला पाहताच मीराच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू आले. विचारांच्या तंद्रीतून मीरा सुमनच्या एका हाकेने भानावर आली. पुरस्कार सोहळा आटपून मीरा घरी परतत होती. स्त्री उद्योजिकेचा पुरस्कार घेताना मीराचे मन आणि डोळे भरून गेले होते. त्यामुळेच कदाचित समोर प्रेक्षकांत बसलेल्या सुमनकडे तिचे लक्ष गेले नाही आणि आता तीच शाळेतली, एका बाकावर बसून दंगामस्ती, अभ्यास सर्वकाही एकत्र केलेली जीवाभावाची मैत्रीण सुमन समोर उभी होती. ''सुमन, तू इथे काय करतेस?'' मीराने विचारले. ''अगं काय करतेस म्हणजे? तुझ्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुद्दामहून आले होते. खूप अभिमान आणि कौतुक वाटतंय बघ तुझं. पेपर मध्ये नाव वाचलं तुझं आणि ठरवलं की या कार्यक्रमाला यायचं आणि तुझी भेट घ्यायची. किती उंच भरारी घेतली आहेस तू? इतकं छान वाटतंय बघ!'' सुमनच्या बोलण्यातून मीराचं कौतुक वारंवार ओसंडून वाहत होतं. मीराच्या मनात आलं, ''इतकं काय केलंय मी? मी तर एक सामान्य स्त्री आणि मी जे केलं ते कुणीही करू शकतं.'' भानावर येत मीरा सुमनला म्हणाली, ''घरी येतेस का? इथून पाचच मिनिटांवर आहे. घरी बसून निवांत बोलूया.''
सुमनने पटकन होकार दिला. दोघी घरी आल्या. अनुष्काने दार उघडलं. 'अनुष्का' - मीराची मुलगी. इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाला होती. अनुष्का आणि मीराचा नवरा पुरस्कार सोहळा आटोपून पुढे आले होते. मीरा थोडी राहिलेली कामे आटपून घरी येत असताना सुमन भेटली आणि मग दोघी गप्पा मारत घरी आल्या. त्या वेळच्या गप्पांतून मीराला कळले की सुमन, एका खासगी बँकेत मोठ्या हुद्यावर होती. घरी आल्यावर सुमनने विषयाला हात घातला. ''अगदी शाळेत होती तशीच आहेस अजूनही. खूप साधी. एवढा पुरस्कार मिळाला आहे पण कुठलाही गर्व नाही. एकदम उद्योजक व्हायचं कसं मनात आलं?'' प्रश्नांमागून प्रश्न येत होते. लग्नानंतर कुठलाच कॉन्टॅक्ट नव्हता. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तिथून परत नव्याने ओळख झाली. मीराने सुमनच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात केली. "खरं तर ती एक गम्मतच झाली. अनुष्काच्या शाळेत आठवीला एक मँथ्स अँड सायन्सचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टचा भाग म्हणून शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमनी अनुष्का सह आणखी दोन मॉनिटर ची निवड करून त्यांना घरून बेसन लाडू आणायला सांगितले, जमलेल्या पालकांना प्रेझेंटेशनच्या वेळी देण्यासाठी. मी केलेले लाडू प्रिन्सिपल मॅडमना खूप आवडले आणि जवळजवळ पन्नास लाडू बनवून द्यायला त्यांनी सांगितले. एक छोटीशी ठिणगी पडली मनात. विचार केला की इथपासूनच सुरुवात का करू नये? शाळेतला क्राउड कॉस्मोपॉलिटन होता. त्यांना मराठी पदार्थ आवडू लागले तर? अनुष्काही मोठी झाली होती. त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरविले. आत्मनिर्भर, स्वावलंबी व्हावे असे मनापासून वाटत होते. शाळेतल्या मैत्रिणी नोकरी करत होत्या. त्यामुळे आपण काहीच करत नाही याची टोचणी लागून राहिली होती मनाला. नवी सुरुवात करण्याचे ठरवले.
नवऱ्याने आणि मुलीने माझ्या या निर्णयाचे स्वागतच केले. त्यामुळे आणखी हुरूप आला. छोट्या छोट्या ऑर्डर्स घेत गेले. जमेल तसं करत गेले. कुठलंही काम करण्यात कमीपणा मानू नये, ही शिकवण लहानपणापासूनच मनावर बिंबवलेली. प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट घेण्याची तयारी यातूनच आकाराला आले 'अनुष्का' फूड्स. घरगुती म्हणून जे जे करता येईल ते ते करायला सुरुवात केली. स्वयंपाकाची आवड होती आणि हाताला उत्तम चवही होती. घरातलेच दोन सभासद जे उत्तम खवय्ये आणि परीक्षक होते माझ्या पदार्थांचे. त्यामुळे हळूहळू पदार्थ वाढवत गेले आणि व्यवसाय विस्तारला. '' मीराच्या चेहर्यावरचे कृतार्थ भाव सुमन टिपत होती. मध्ये प्रश्नांचा अडथळा न आणता तिने मीराला तसेच बोलू दिले. ''अडचणी आल्या पण कुटुंबाची भक्कम साथ असल्यानेच तिथे पोहोचू शकले. एक सांगू का?'' मीराने विचारले. ''अगं सांग ना!'' सुमन उत्तरली. ''कुठल्याही संकटात आपली माणसं सोबत असतील ना, तर आपण अधिक जोमाने लढतो आणि हरवतो त्या संकटांना ! आणि जेव्हा कोणी आपल्या सोबत नसतं तेव्हा, आपणच आपला सोबती व्हायचं आणि लढायचं. आयुष्य लढण्यासाठीच तर आहे ना!'' मीराचं शेवटचं वाक्य सुमनच्या मनाला स्पर्शून गेलं. एका सामान्य माणसातल्या असामान्यत्वाचं दर्शन देऊन गेलं. आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देऊन सुमन तिथून निघाली. पण मैत्रिणीच्याच झालेल्या नव्या ओळखीमुळे मनोमन धन्यवाद दिले तिने स्वतःच्या नशिबाला!
