आणि मला देव भेटला...
आणि मला देव भेटला...
२६ जुलै २००५. अजूनही लख्ख आठवत आहे सगळं. विसरणार कसं? आज बरोब्बर दोन वर्ष होतील. कीर्ती स्वतःशीच विचार करत होती. समोर दोन वर्षांची तान्या खेळत होती. दंगामस्ती चालली होती तिची. संध्याकाळचे पाच वाजले होते. दोन वर्षांपूर्वी म्हणजे तान्याच्या जन्माच्या अगोदर विलेपार्ल्याला 'आर्या ऑफशोअर' मध्ये कीर्ती नोकरी करत होती. नोकरीचे ठिकाण आणि पार्ल्याचं घर जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर. तान्या तेव्हा पोटात होती तिच्या. जुलै महिन्यातली २६ तारीख. सकाळ पासूनच पावसाची रिपरिप चालू होती. दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला होता त्याने. पाच वाजेपर्यंत तर अजूनच वाढला होता. पण बाहेरची काहीच कल्पना तिला नव्हती. नेहमीप्रमाणे आँफिसमधल्या सगळ्यांचा निरोप घेऊन ती आणि अजित निघाले. रस्ता क्रॉस करून नेहरू रोडला लागले. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत स्टेशनच्या दिशेने त्यांनी चालायला सुरुवात केली. शिवसागर हॉटेलशी आल्यावर मात्र तिला थोडी कल्पना आली. करण डावीकडून जोराचा पाण्याचा लोंढा येताना दिसला. 'हा रस्ता घेणं अजिबात योग्य नाही' मनात विचार आला आणि सरळ नेहरू रोड संपेपर्यंत ती अजितच्या सोबतीने चालत राहिली. "जाशील ना गं नीट?" अजितच्या आवाजाने ती भानावर आली.
अजित आणि ती गेली सहा वर्षे एकत्र काम करत होते. एक उत्तम सहकारी म्हणून तिला नेहमीच आदर वाटायचा त्याच्याबद्दल. मुंबईचा पाऊस तिला कधीच नवीन नव्हता. त्यामुळे गुडघाभर पाणी असून सुद्धा तिला कधीच त्या पाण्याची भीती वाटली नाही. "अरे तू अजिबात काळजी करू नकोस. मी नीट जाईन. तूही काळजी घे आणि नीट जा." अजित स्टेशनच्या दिशेने निघून गेला. ती घराच्या दिशेने वळली. घर फक्त पंधरा मिनिटांवर होतं. मध्ये ख्रिश्चनांची वस्ती लागायची. ती पार केली की मग पाच मिनिटांवर घर होतं तिचं. ती वाडीतून चालू लागली. तिथेही पाणी भरलं होतं. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. घर जवळ असल्याने ऑफिस मधून निघताना तिने घरी कळवले नव्हते. ख्रिश्चनांची वस्ती जिथे संपते तिथपर्यंत ती आली आणि थबकली. समोरचं दृष्य 'आ' वासणारं होतं. पाणी नदीच्या वेगाने वाहत होतं. तिच्या बरोबर आणखी पाच-सहा माणसं आडोशाला उभी होती. पुढे जायचं कसं? हा यक्षप्रश्न होता तिच्या समोर. गुडघाभर पाणी जवळ जवळ छातीपर्यंत आलं होतं. समोर पाच मिनिटांवर घराची इमारत दिसत होती. इथपर्यंत आल्यावर मागे फिरण्यात अर्थ नव्हता. काय करावं? "अहो, तुम्हाला कुठे जायचंय? मला ना, राजपुरिया हॉल जवळ जायचं आहे." मागून एका काकूंचा आवाज आला. माझं घर 'राजपुरिया' पासून दोन मिनिटांच्या अंतरावर होतं. 'चला, पाच मिनिटांतली तीन मिनिटं कोणाची तरी सोबत मिळत्ये तर का घेऊ नये?' असा विचार केला तिने.
जुजबी ओळख करून घेतली आणि त्यांचा हात धरून पुढचा मागचा विचार न करता कीर्ती त्या पाण्यात घुसली. पण त्यांचा अंदाज सपशेल चुकला. पाण्याचा लोंढा त्यांना मागे ढकलू लागला. पाय जमिनीवर घट्ट रोवून पाण्याच्या प्रवाहाला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न त्या करत होत्या. पण ते शक्य नव्हते. शेवटी वाहून जाण्याची शक्यता लक्षात आल्यावर, मदतकार्य करणाऱ्या लोकांनी, दोन्ही बाजूंनी त्यांना पकडले आणि त्यांच्या मदतीने त्या मध्येच बंद पडलेल्या एका रिक्षात येऊन बसल्या. तो रिक्षावाला बिचारा रिक्षा ढकलत एका गल्लीत घेऊन आला. त्याने रिक्षा तिथेच सोडली आणि तो निघून गेला. बाहेर पेक्षा आपण इथे सुरक्षित आहोत खरे असा विचार त्या करत होत्या पण थोड्याच वेळात त्यांना कळून चुकले की तो त्यांचा भ्रम होता. कारण रिक्षातली पाण्याची पातळी वाढू लागली होती. आता मात्र कीर्तीचा धीर सुटू लागला. "मला खूप भीती वाटत्ये. मी तीन महिन्यांची गरोदर आहे. काकू, काय करायचं आता?" किर्तीला सगळी परिस्थिती कथन करण्यावाचून उपाय नव्हता. पोटातल्या बाळाची तिला जास्त काळजी वाटत होती. काकूंनी धीर दिला. "तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. आपण करू काहीतरी." काकूंच्या बोलण्याने तिला जरा बरं वाटलं. रिक्षातून उतरल्यावर समोरच एका बिल्डींगची कंपाउंड वॉल होती. दिवे गेले असल्याने आणि मदत करण्याच्या हेतूनेसुद्धा बिल्डिंग मधली बरीच माणसे त्यांना आवारात उभी असलेली दिसली.
मनाचा हिय्या केला आणि काकूंच्याबरोबर किर्ती रिक्षातून उतरली. त्या वॉलवर चढली आणि बिल्डिंगमधल्या काही लोकांच्या मदतीने तिने खाली उडी मारली. नंतर त्या लोकांनी काकूंनाही खाली घेतले. "चला! आता इथे तर शंभर टक्के सुरक्षित आहोत आपण!" कीर्ती काकूंना म्हणाली. "कोणाला तरी विचारून बघूया का? कोणाच्या घरी जाऊ शकतो का आपण? खूप कडकडून भूक लागली आहे." काकूंनी एका 'शेट्टी' आडनावाच्या गृहस्थांना विनंती केली. रात्रीचे नऊ-साडे नऊ वाजले होते. गृहस्थ चांगले होते. कीर्ती आणि काकूंना घेऊन ते स्वतःच्या घरी आले. काय हवं नको ते विचारलं. अगदी प्रेमळपणे सगळी चौकशी केली. मोबाईलची बॅटरी संपल्याने घरच्यांशी काहीच संपर्क होत नव्हता. घरचे देव पाण्यात ठेवून बसले होते. त्यांच्या घरच्या फोनवरून तिने घरी फोन केला आणि सुरक्षित असल्याचं कळवलं. गोष्ट इथेच संपत नव्हती. बाहेर पाणी अजूनही कमी झालेलं नव्हतं. रात्रीचे बारा वाजले. पाण्याचा जोर थोडा ओसरला. 'शेट्टी' काका म्हणाले, "चला. मी सोडतो तुम्हाला." बरोबर बॅटरी घेऊन ते खाली आले आणि दोन मिनिटांतच कीर्तीच्या बिल्डींगपाशी ते सर्वजण पोहोचले. "तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत." कीर्ती उत्तरली. त्यांचा निरोप घेऊन दोघी घरी आल्या. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनही विसरू शकत नव्हती ती आणि त्याचबरोबर माणुसकीचं जे अलौकिक दर्शन तिला घडलं होतं तेही! २६ जुलैच्या त्या दिवसाने माणसातला 'देव' तिला दाखवला होता. "आई......" तान्याची गोड हाक कानावर पडली आणि कीर्ती भानावर आली. तिला आणि तिच्या बाळाला संकटातून वाचवणाऱ्या त्या देवाचे आणि मदत करणार्या त्या सगळ्या अनोळखी माणसांचे तिने मनापासून आभार मानले. ऋणात असल्याबद्दल आणि कायमच ऋणात राहण्यासाठी...
