STORYMIRROR

Nilesh Desai

Abstract

4.7  

Nilesh Desai

Abstract

दखल

दखल

7 mins
942


चंद्रदेव दर्शनाला यायला लागले तसं मैदानाच्या कोपर्यात पडलेल्या हातभर व्यासाच्या पाईपातून त्याने तोंड बाहेर काढलं. अवतीभवती अंधाराची काळी सावली पसरू पाहत होती. मैदानावर खेळणारी पोरेही एव्हाना पांगली होती. नाही म्हणायला त्या मैदानाला लागूनच असलेल्या चाळीतून थोडाफार कल्लोळ ऐकू येत होता. बाकी एखादे आजोबा कुठं बाकड्यावर शांत चित्ताने बसले होते. 


बाहेरचं वातावरण खरंच आता निवांत असं झालं होतं. यानं एकदा उजवीकडं एकदा डावीकडं मान फिरवत पाहीलं.. बाहेर पडायला पाऊल पुढे टाकनार तोच....


'रिश्ते में तो हम तुम्हारें बाप लगते हैं.... नाम है शहेनशहा... ह्हाईऽई....' 


कुणाच्यातरी बोंबलभिक्याच्या घरच्या टिव्हीचा आवाज भणाणला...


आणि त्यानं कान टवकारत पाऊल पुन्हा आत घेतलं... 


काही काळ जाऊ दिला... उगाच कशाला बाहेर जाऊन कुणाच्या रस्त्यात मध्येच यावं....


थोड्यावेळात पुन्हा शांतता नांदायला लागली.


त्याची पाऊलं सरसावली... बाहेर येत त्यानं सभोवताली नजर फिरवली.. तसं रात्रीची सुरूवात झालीच होती म्हणूनच मैदानात उपद्रवी जीवांची वर्दळ नव्हती.. 


आसपास कुणी नाही ते पाहत तो बाजूच्या गटारात उतरला... शरमेनं मान खाली गेली होती.. कुणी पाहत तर नाही ना या भितीपायी गटारात बाजूला ठेवलेली शिळी भाकरीही त्याला प्रथमदर्शनी दिसली नाही.. 


तिकडं नजर गेल्यावर त्यानं बकाबक खायला सुरूवात केली. शिळी भाकरी तोडताना दातांना होणार्या वेदना भूकेवर मात करू शकत नव्हत्या... अहं.. कदापि नाही.. भुकेचा आगडोंब पोटात उसळला असता कुणाला बाकी बाबींवर विचार करायला फुरसत असावी बरे... 


त्यानं गपचूप ती अर्धी भाकर संपवली.. नाहीतरी केव्हा एकदा ती भाकर संपतेय आणि पुन्हा तो त्या पाईपरूपी झोपड्यात जातोय असे त्याला झाले होते..


भाकर खाऊन फिरेपर्यंत मागे वळाला तोच बाजूच्या चाळीतली मुलगी खरकटं फेकायला आलेली... तिनं गंमत म्हणून त्याच्या अंगावर ते खरखटं फेकलं... लज्जा काय चीज आहे हे तत्क्षणी त्याने अनुभवले.. शरमेनं अंगाचं पाणीपाणी झालं. आणि त्यानं डोळे बंद करून घेतले...


कारण एकच होतं.. त्या मुलीनं आपल्याला पाहीलं हे नक्कीच होतं पण आपण स्वतः तिला न पाहण्यासारखं केलं तर कदाचित मनात स्वतःविषयी घृणा तरी निर्मित होणार नाही, अशीच भाबडी आशा बाळगून होता तो..


ती गेली तसा टुणकन उडी मारत पुन्हा त्या पाईपात घुसला. नाही म्हणायला तेवढीच एक जागा होती जी त्याला आपलीशी वाटायची.. जिथं कुणी त्याला पाहणारं नव्हतं.. त्याच्या असल्या जगण्यावर हसणारं नव्हतं.. 


अंगभर जीभ फिरवत चाटत त्याने शरीरावरच्या खरखट्या अवशेषांचे अस्तित्व पुसटसे केले. नकळत पाठीवर जीभ फिरवताना त्याच्या ताज्या जखमेवर जीभ घासली गेली अन् कळवळला तो. जखम ताजीच होती.. आज दुपारचा प्रसंग आठवला..


भर उन्हात कुणाच्याही नजरेत येणार नाही अशा प्रकारेvery त्याने मैदानातल्या मातीत लोळलेले हाडूक शोधून काढले होते. त्यानंतर अचानक समोर उगवलेल्या त्याच्याच जातबांधवानी इवल्याशा त्या हाडकासाठी त्याच्यावर हल्ला चढवला होता.. एका हाडकासाठी भांडण अंगावर ओढूवून घेण्याइतपत कोत्या मनाचा नव्हताच तो मुळी. त्याने प्रयत्न केला होईल तितक्या शांतमार्गाने मॅटर सॉल्व्ह करण्याचा.. मोठ्या मनाने न लढतच पराजय स्विकार करत तो उलट पाऊली फिरला.. पण समोरच्या जातबांधवानी एकच किचाट करत मैदान दणाणून सोडले..


दोन-एक क्षणांत भगदौड माजली म्हणून मागे फिरून पाहावे तर पेकाटात कसल्यातरी लोखंडी हत्याराचा वार बसला.. 


'जळलं मेलं तोंड तुझा... भिकार्या.. दुपारची झोप पण घेऊ देत नाही..' मागून मारणार्या व्यक्तीचे शब्द कानी पडले.


"आईईई गं...." कदाचित बोलता आले असते त्याला तरीदेखिल हे शब्द मुखातून निघाले नसते.. प्रहार इतका जोराचा होता की कंठातून आवाज बाहेर निघालाच नाही.. फक्त काहीशी तोंडाची हालचाल तेवढी झाली.. इथे खरी लिपरीडींग करणार्या जाणकाराची आवश्यकता होती.. निदान कळाले तरी असते की त्याला काय ओरडायचे आहे... तो आईला पुकारत होता की बाबाला... की नशिबाच्या दारिद्र्याला दोष द्यायचा होता त्याला...


फरफटत तिथून निघण्याचा प्रयत्न करताना त्याला जाणवलं की त्याचं शरीर तो निव्वळ हमालासारखं ओढायचं म्हणून ओढतोय.. शरीरावरच्या अवयवांचं एकमेकांवरील नियंत्रण हरवल्यासारखं..


कसाबसा पाईपात घुसल्यावर आडवा पडला ते शुद्ध हरपूनच.. संध्याकाळ होईपर्यंत कसलंच भान नाही.. जखमेवर फिरलेल्या जीभेवरच्या काट्यांनी पुन्हा तो प्रसंग डोळ्यासमोर आणला आणि अक्षरशः त्याला शिरशिरी आली..


नाव नव्हतंच त्याला.. रस्त्यावर जन्मलेला.. भिकार बापाची भिकार अवलाद तो.. लोकांच्या उष्ट्यावर जगणारा.. आणि सापडेल त्याचा मार खाणारा.. बेवारस.. बेकार... बेदखल... जन्माला आलेला आणि फक्त म्हणूनच जिवंतपणाचं नाव असलेला कुत्रा तो.. काय अस्तित्व त्याचं.. कुणाला काय पर्वा त्याची..


भावना त्याच्यातही होत्या मनुष्याप्रमाणेच किंबहुना काहीश्या जास्त.. का असू नयेत का त्याला भावना.. की संवेदना बाळगण्याचा ठेका फक्त मनुष्यप्राण्याचा... त्यातही अपवादात्मकच.. मग प्राणीमात्रांत असावीच की संवेदना.. जरी अपवादात्मक म्हटले तरी शंभरातला असा एकतरी असेलच की.. ज्याच्या मनात लाज, लज्जा, शरम, अब्रू, दया, करूणा, राग, लोभ, द्वेष, ईर्ष्या, आदर, प्रेम, मत्सर यांसारख्या संवेदना ठासून भरलेल्या असतील. 



तो असाच एक अपवाद होता. प्राणीमात्रांच्या स्वभावधर्माला जरी अनुसरून असला तरी काहीसा विपरीतच होता तो. 


रस्त्यावर टाकलेले अन्न खाताना ओशाळून यायचे त्याला. कुणी पाहणार तर नाही ना आपल्याला ते अन्न ग्रहण करताना हा विचार मनात पूर्ण होईपर्यंत इतर भाऊबंद निर्लज्जपणाचा पुतळा होऊन रस्त्यातंच ते हादडाय

चे. बरं कुठे निर्जन जागा शोधावी तर ती या पृथ्वीतलावर शोधून सापडायची नाही.. ढेकणांच्या पैदाईशीप्रमाणे वाढत चाललेली ही मनुष्यप्रजात कुठे न सापडावी तर नवलंच.


जमेल तसं रात्रीचं एकवेळ भेटेल ते खाऊन समाधान व्यक्त करणंच काय ते त्याच्या हातात होतं. कुणी म्हणावं की काय फरक पडतो, खावं बिनधास्त बेशरम होऊन.. कुणी पाहतंय तर खुशाल पाहू दे.. कसली आलीयं मेली ईज्जत.. खाशील तर राहशील....


खरंच चालेल का हो असं.. लेखक अथवा वाचक खाईल का असं पडलेलं.. टाकलेलं कुणी.. कितीही भुक लागली तरी.. आणि ते ही एखाद्यासमोर.. 


एक निश्चित.. जगायचं आहे तर हे असंच.. कुणी आपल्याला उष्ट खाताना हसावं त्यापेक्षा उपाशी राहीलेलं परवडलं म्हणे...



जखमेतून होणार्या वेदनांकडं जमेल तसं दूर्लक्ष करत तो पुढच्या दोन्ही पायांवर तोंड ठेवून निपचित पडून होता. पाईपातून दिसणारं बाहेरचं जग कधीही न थांबणारं होतं. कदाचित भावनाशून्य.. कश्याची घाई लागली असावे बरे त्या बाहेरच्या जीवांना.. सदानकदा त्रासिक भाव चेहर्यावर घेऊन जाताना दिसतात. अन्न, वस्त्र, निवारा असूनही कसलीतरी कमी दिसायची त्यांच्या जीवनात.. 


'भुकेवाचून होणारी वाताहत आपल्याच नशीबी का.. वस्राचा तर विषयच नको.. दिवसा असं हे नागडं धुड घेऊन बाहेर फिरताना मेल्याहुन मेल्याची भावना मनी येते.. आणि निवारा... नको.. निवारा सोईपुरता माझा ठिकच आहे.. त्या पाईपानं माझं अस्तित्व जपून ठेवलयं.. भले त्याला गंज चढलायं वा ठिकठिकाणी छिद्रे आहेत पण त्याचमुळे तर तो इथे पडला आहे.. आणि माझी निवार्याची गरज भागतेय..' 


बाहेरच्या जगाकडे पाहत विचार करताना स्वारी अजूनही तशीच पुढच्या पायांवर चेहरा ठेवून पहुडली होती. समोरून जाणार्या मनुष्यप्राण्यांच्या हालचालींसोबत त्याचे डोळेही इकडून तिकडे फिरत होते.. विचारशक्तीवरचं ध्यान थोडंसं भरकटताच त्याला समोरून एक 'जोडा' जाताना दिसला.. मनातल्या 'त्या' भावनांनी देखिल जन्माला आल्याची जाणीव करून दिली. 


त्याने डोळे बंद केले.. आणि असल्या हजारो विवंचना मनात घेऊन त्याच्या आजच्या झोपेची सुरूवात झाली..


त्यातल्या त्यात दरीद्र कंगाल आयुष्यात मिळणार्या जखमांवर फुंकर पडावी असं त्याचं कुणीच नव्हतं.. जवळ शिल्लक असे आसू आणि विरलेल्या व्यथा यांची सोबत काय ती.. 


दुसरा दिवस उजाडायलाच अजून जरा अवकाश होता.. आणि जाग यावी तो मुळी कुणाच्या तरी चाहुलीनं.. डोळे उघडून पाहावं तर समोर ती.. जवळपास त्याच्याच वयाची.. तिला पाहताच कालचा 'जोडा' न आठवेल तर शपथ... आली असावी तीही शोधात पोटातल्या भुकेच्या आर्त हाकेने... वा अजूनही कसली भूक असावी... पण ती आली.. एकदाची... सुख होऊन जणू त्याच्या फाटक्या आयुष्यात...


हर्षभरित मनाने तो उठला शरीरावरच्या सगळ्या जखमा विसरून.. मरगळलेल्या सार्या आशा अकस्मात् प्रफुल्लित झाल्यासारखं तो अंग झाडत पाईपातून बाहेर आला... मागच्या पायानं थोडं कान खाजवल्यागत केलं त्याने.. खरंतर ते स्वप्न तर नाही ना हेच पाहायचं होतं त्याला. भल्या पहाटेचं चांदणं आजपर्यंत तर त्याला मंदाग्निचा दाहंच देत आलं होतं.. पण आजचं चांदणं अमृताचा आभास दाखवत असल्यासारखं रोमांचित करत होतं...तिच्याही नजरेत ती भूक दिसत होती.. आणि नजरांचा खेळ त्यांच्यात रंगू लागला.. प्राण्यांना बोलता येत नसले म्हणून काय झाले... त्यानं अनुभवलं.. कधी नव्हे ते तिची उत्तेजना आणि त्यातून निघणारी स्वरभासाची सौम्य धून... जणू तिच्या मौन स्वरांतून निघणारं मधाळ गीत असावं..



अन् शेवटी तो क्षण आला.. त्याच्यासाठी जन्मात पहील्यांदाच असा लाभलेला तो क्षण.. समागमाचा... लाडीक भाव घेऊन अंगाशी झटपटत ती जवळ यावी आणि त्याचे जीवनभराचे भाग्य होऊन जावी... 


'आता आयुष्यभरासाठी हीची साथ लाभेल..'


'पाईपात जागा होईल का दोघांना...'


'उद्यापासून भाकरी जास्त आणावी लागेल..'


'लांबच्या कुठल्यातरी ठिकाणी शोधावी लागेल जिथे एकदा जाऊन निर्लज्ज याचकासारखं भाकरी घेऊन यावं..'


'पुन्हा नवी जागा..' 


'त्यापुढं आणखी नवी जागा...' 


'पुन्हा नवी जागा...'


त्याच्या मनात असले शेकडो विचारांचे तरंग जणू फिरत असल्यासारखे... प्रतिध्वनी निर्मित होत गेले... कान टवकारले गेले.. 


ती बाहुपाशात विरघळल्यासारखी यावी... आणि त्या क्षणात स्वतःला झोकून देण्यास तो जावाच की.. 


कालच्या न भरलेल्या जखमेच्या अतिसंवेदनशील भागावर पुन्हा प्रहार झाला...


"जळलं मेलं... पहाटे पहाटे अश्लिलतेचं दर्शन...मरत पण नाहीत कुठे उकीरड्यावर जाऊन..."


इतका आवाज मात्र कानी पडला.. 


खाली तिलाही त्या प्रहाराची झळ काहीप्रमाणात तरी जाणवली होतीच.. ती 'कुइई..कुय....' करत पळत सुटली... मागे वळून त्याला पाहत... त्याला त्यातल्या त्यात एवढं समाधान तरी लाभलं की तो वर असल्यामुळे तिला तितकसं लागलं नसावं..


ती सुरक्षित अंतरावर पोहचताच तो कोलमडला.. त्याच्या कंठातून तर स्वर हरवल्याप्रमाणे.. की तो जीव खाऊन ओरडण्याचा प्रयत्न करत असूनही शब्द बाहेर आलेच नाही.. स्वरांची जागा रक्ताने घेतली... तोंडातून रक्ताचे थेंब बाहेर पडू लागले... त्यातचं खोकला आला म्हणून थोडं श्वास थांबवावा की अजून एक वार पेकाटात बसला... "ह्हह...क्हह..अहह...हुहह...थांऽब्ब्... आऽर्र...खोकूऽऽ तरईई दे जऽऽरा..." हेच बोलायचं असावं कदाचित त्या मुक्या जीवाला.. पण ओंठातून शब्द न फुटावी इतकी अगतिकता त्याच्या नशिबी आलेली...सद्भाग्य बनून आलेली ती दुर्भाग्यास कारणी ठरावी जशी... वार करणार्याची इच्छा ही पूर्ण न व्हावी याच्या उकीरड्यावरच्या मरणाची..


त्या दोन तडाख्यांनी चार-एक मिनिटांची तडफड झाली आणि डोळे उघडे ठेवून त्यानं प्राण सोडला.. उजडून गेल्यावर एक प्रहाराने त्याचं शव उचलण्यास काही माणसे आली.. नकळत वा जाणूनबूजून कुणाच्यातरी भारानं 'त्या'च्या मुखाचा वेध घेतला होता.. त्याचा एक उघडा डोळा चेहर्यावरचं होता पण दुसरा बाहेर निखळून पडला होता.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract