Nilesh Desai

Others

5.0  

Nilesh Desai

Others

शापीत राजपूत्र – भाग सहावा

शापीत राजपूत्र – भाग सहावा

5 mins
1.0K


शेवटच्या वळणावर...


सोनलच्या आठवणी सोबत घेऊन नीरवने आयुष्याची वाटचाल चालू ठेवली. काॅलेज, घर करत करत अवघे सहा महीने झाले असतील तोच नीरवच्या बाबांना आजारानं घेरलं. 


घरातला कर्ता पुरूष अंथरूणाला खिळल्यानं जबाबदारी नीरवकडे आपसुकंच आली.. किंबहुना त्यानं ती घेतली. आईनं लाख समजावलं की ती काही काम करून घर सांभाळेल.. पण आईचं जगणं त्यानं पाहीलं होतं. या वयात तीला हालअपेष्टा करू देणे त्याला पटणारं नव्हतं. 


अवघ्या सहा महीन्यातच काॅलेजला रामराम ठोकून लहानश्या गॅरेजमध्ये मॅकेनिकची नोकरी पत्करली त्यानं.. दहावीत फर्स्ट क्लास मध्ये पास झालेला तो. एक वर्षे तिथं काम केलं. तिथुन मग एका सायबरमध्ये कंप्युटर असेंब्लींगच काम करू लागला. आता पैसेही चांगले मिळू लागले होते. 


मधल्या काळात विशेष असं काहीच घडलं नाही. फक्त दहावीनंतरचा एक वर्ष गॅप सोडून नीरवनं बारावीची परीक्षा दिली अन् पासही झाला. 


घरची परीस्थिती नीरव कमावता झाल्यापासून हळूहळू सुधारत चाललेली. लहानपपणापासूनच हात आखडता घ्यायची सवय त्याने स्वतःला लावली होती. आईवडीलांनी त्यांच्या परीने आपल्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते हे तो जाणून होता. आईवडीलांकडून एक गोष्ट मात्र त्याला हवीहवीशी अशी भेटली होती ते म्हणजे स्वातंत्र्य किंवा त्याची प्रायव्हसी. 


पण या स्वातंत्र्याचा नीरवने कधी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी वाईट संगतीशी जुळवून घेतले, ना कुठली वाईट सवय लावून घेतली. भूतकाळाच्या जखमांमुळे कधी कोणत्या मुलीला आसपास फिरकूही दिलं नव्हतं त्यानं.


नीरवचं मन कधीच कुणापुढं मोकळं झालं नाही. मनातल्या दूरवरच्या अडगळीतल्या कोपर्यात त्यानं त्याची दुःख साचवून ठेवली होती. दुःख फक्त मेघना किंवा सोनलपुरतीच मर्यादित नव्हती. त्यानंतरही खुपश्या खस्त्या खालल्या होत्या त्यानं. कामात सर्वस्व झोकून देणारा नीरव, पण श्रेय कुणी दुसरंच घेऊन जायचं. 


सोनलवर त्यानं लिहीलेल्या कवितांची वही ट्रेन मध्ये हरवली तेव्हा हळहळलेला नीरव. अन् त्याहून त्रासदायक म्हणजे त्याच कविता वर्षभरात वेगवेगळ्या वृत्तपत्रात त्यानं वाचल्या कुणा दुसर्याच्याच नावानं. 


बाहेरच्या जगात पडल्यावर झालेले जीवाभावाचे मोजून दोनच मित्र. एक अमेय.. दुसरा सागर. दोघेही नीरवहून वयाने मोठे. अमेय पाच वर्षांनी तर सागर तीन वर्षांनी. वयातलं अंतर बाजूला ठेवून मनं जुळली आणि हे तिघं एकत्र आले. 


चार वर्षे एकमेकांचे ऑफिस सुटल्यानंतर रोजचे एक दोन तास एकमेकांच्या संगतीत घालवत. यादरम्यान नीरवने मुक्त विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. 


तिघांमधली अतूट मैत्री बर्यापैकी बहरत चालली होती. शिवाय राहायलाही तिघे एकमेकांपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते. मग सुट्टीच्या दिवशीही एकमेकांकडे जाणेयेणे व्हायचे. तिघांचेही विचार जवळपास सारखेच.. 


सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायचे अन् नडेल त्याला मदतीचा हात द्यायचे. बाकी आपलं संध्याकाळचं मौजमस्ती करत घरी यायचं चक्र चालू होतं. मतभेद झालेच कधी तरी ते पाच मिनिटांच्या वर कधी टिकून नाही त्यांनी. तसा नियमच होता त्यांच्यात. 


त्यांच्यात वयाने मोठा असलेला अमेय स्मार्ट आणि अक्टीव्ह होता. अमेय जे मनात तेच बाहेर अश्या स्वभावाचा होता. सागर लाजाळू आणि राहणीमान साधे ठेवून असायचा. जशी हुक्की येईल तसा सागरच्या स्वभावात बदल व्हायचा. नीरवच्या स्वभावातल्या वेगवेगळ्या छटा अमेयनं टिपल्या होत्या. आपल्याच विचारांत हरवलेल्या नीरवला त्यानं बर्याचदा पाहीलं होतं. 


एक दिवस सायंकाळी गप्पा मारत असताना सागर म्हणाला.. "आपल्याला रविवारी एका ठिकाणी जायचं आहे."

"कुणीकडे.." अमेयनं कुतूहलाने विचारले. 


"अरे, माझं अवघड आहे, रविवारी मला घरी थांबणे गरजेचे आहे.." त्याला मध्येच तोडत नीरव म्हणाला.


"मला काही माहीत नाही यायचंय तर यायचंय... तुम्हांला वहीनी पसंत आली पाहीजे ना यार... मगच मी विचार करतो लग्नाचा.." सागर. 


सागरच्या घरून त्याला मुलगी पाहण्यासाठी जायची कल्पना दिली होती. त्याचे वडील, काका आणि तो जाणार होते पण सागरला अमेय आणि नीरवचीही सोबत हवी होती. आपल्या वयाचं कुणीतरी तीथं हवं, तेवढाच आधार..

सागरच्या लग्नाचं ऐकताच नीरव आणि अमेय दोघं खुश झाले.


 "चला मग आजची पाणीपुरी सागरकडून.." नीरवनं घोषित केलं आणि अमेय चटकन उभा राहून तयार झाला. पाणीपुरी तीघांचीही जीव की प्राण... विषय निघताच तिघे पाणीपुरीच्या गाडीकडे निघाले. 


हो नाही करता करता नीरवने कसंबसं सागरला आपल्या न येण्याबद्दल समजावलं. सागरही चेहरा पाडून तयार झाला. अमेय, सागर, त्याचे बाबा, काका रविवारचा कार्यक्रम आटोपून आले. 


चार-पाच दिवस या तिघांनाही फारसं भेटता आलं नव्हतं.


येणार्या रविवारी सागरनं अमेय आणि नीरवला खास आमंत्रित केलं होतं बाहेर जेवणासाठी.. आणि स्पेशली आपल्या होणार्या बायकोला भेटवण्यासाठी. 


रविवारी एका जवळच्याच हाॅटेलमध्ये दुपारी एकच्या सुमारास अमेय आणि सागर बसले होते. चेहर्यावरचा घाम पुसत नीरवनंही हाॅटेलमध्ये प्रवेश केला. आल्याआल्याच पहीलं वाॅशरूम गाठून ताजातवाना होऊन मित्रांशेजारी जाऊन बसला.


"काय कुठून आली स्वारी..." अमेयने विचारले.


"काही नाही रे.. सकाळपासून बाहेर कामं होती तीच संपवून आलोय." नीरव थकलेल्या स्वरात म्हणाला.


"बस्स कर आता जरा.. किती पैसा छापतोय. माझं ठरलं आता बघा जमवून स्वतःचपण कुठंतरी." सागर नीरवला छेडायला लागला. 


"अरे गाढवांनो.. इथे तुमचा मोठा भाऊ राहीलाय बाजूला आणि तुम्ही आपल्याच लग्नाचं घोडं पळवताय.." अमेयच्या या कोटीवर तीघं मनापासून हसले. 


"ते जाऊ दे पण सागर साल्या गेल्याच आठवड्यात मुलगी पाहीलीस ना.. लगेच बोलणीपण झालीत का रे.. भलताच स्पीड धरलायस तु तर.." नीरव.


"नीरव, तुला सांगतो मुलगी बघितली आणि आवडलीच यार एकदम.. ही माझ्यासाठीच बनली आहे असा साक्षात्कारच झाला ना यार. घरी येऊन बाबांना सांगितले आत्ताच्याआत्ता तिच्या घरी होकार कळवा. 


ते लोक पहीले इथेच राहायचे. सहा-सात वर्षापूर्वी मुख्य शहरापासून थोडे लांब राहायला गेले. चार दिवसांत तिकडूही ओके झालं. आणि हो (नीरवकडे पाहत) उपकार झाले तुमचे की तुम्ही नाही आलात.. (अमेयकडे वळून) काय अम्या..? नाहीतर माहीत पडले तिनं तुलाच पसंद केलं..." सागरनं अजून एक पंच मारला, अमेय आणि सागर पुन्हा खिदळायला लागले.


का? कुणास ठावूक? नीरव यावेळी हसला नाही.


"अरे पण वहीनी आहेत कुठे..? आपल्याला येऊन अर्धा तास झालाय.." अमेयने विचायलं.


"तिला मीच अर्धा तास उशिरा बोलावलंय रे.. आपल्याला थोडं बोलायला भेटावं म्हणून.. " सागर डोळा मारत म्हणाला.


"हो, नाहीतरी आता आपल्याला कुठे रोज नीट बोलायला भेटणार म्हणा.. तुला लग्नानंतर घर सुटणारच नाही ना.. " नीरव. 


"एकदम करेक्ट..., तुला सांगतो नीर्र्या.. त्या दिवशी नजर हटत नव्हती सायबांची वहीनीवरून.. टकामका बघत होता नुसता.." अमेयनेही हसत नीरवला साथ दिली. 


"बस काय भावा.." लाजलेल्या सागरनं तोंड जरासं वाकडंच केलं. अन् पुढच्याच क्षणाला त्याच्या चेहर्यावर हसु उमटलं.


 "वहीनी आली तुमची भावांनो.." त्यानं दबक्या आवाजातच नीरव आणि अमेयला सांगितलं.


ती आली.. सागर तिला सामोराच बसला होता.. त्यानं हात करून तिला खुणावलं. नीरव आणि अमेय तिला पाठमोरे होते. सागरनं उभं राहून तिच्यासाठी असलेली चेअर थोडी मागे केली. सागरकडे पाहत ती चेअरजवळ आली तसं सागरने चेअर हलके पुश करत तीला बसण्यास सुलभ केलं. 


"मेड फाॅर इच ऑदर..." अमेय पुटपुटला.. तसं नीरवची नजर वर झाली नेमके अमेयला स्मितहास्य देऊन तिची नजर नीरवकडे वळली... 


दोघं एकमेकांना पाहत अवाक् झाले. 


"फ्रेंडस्... मीट मेघना.. आणि मेघना हा अमेय आणि हा नीरव.. सागरनं ओळख करून दिली.


'मेघना... तीच ती शाळेतली....'क्रमशः


Rate this content
Log in