Nilesh Desai

Others

4.9  

Nilesh Desai

Others

शापीत राजपूत्र - भाग पहीला

शापीत राजपूत्र - भाग पहीला

3 mins
1.0K


दहावीत असतानाच अर्धी कथा सुचलेली. जसजशी वर्षे सरू लागली, त्यासोबत आपोआपच कथा मनात पूर्ण होऊ लागली. मनाला अत्यंत जवळची असलेली ही कथा तुकड्यांमध्ये आपल्या समोर सादर करीत आहे. आशा आहे कथेचे सर्व भाग आपल्याला आवडतील. कोणाला नाही आवडले तर क्षमा असावी. कथेतील पात्रे, प्रसंग, घटना यांचा संबंध कोणाशीही जुळणार नाही याची खात्री आहे. तरीही तसे झाल्यास निव्वळ योगायोग मानावा.


'बेबी ब्रींग ईट ऑन......' वरातीत डिजेवाल्यानं चालू केलं आणि इतका वेळ वाजणार्या हिंदी गाण्यांनी त्रासलेला तो... कुठल्याश्या कोपर्यातून सुसाट बाहेर येऊन नाचणार्या ग्रुपमध्ये सामील झाला. बेफान होऊन नाचत तो पाहतही नव्हता की कोणाला त्याची लाथ लागतेय की कोणी त्याच्या आसपास नाचत आहे.

आपल्याच धुंदीत उत्स्फूर्त होऊन डक डान्स, बेले डान्स, नागिण डान्स, रस्त्यावर होऊ शकणार्या हरएक प्रकारच्या डान्सचा जलवा तो दाखवत होता. एकएक करून इतरजण आपलं थांबवून यालाच पाहू लागले. आणि हा आपल्याच तालात सुरू होता.


प्रसंग काय, आपण करतोय काय... देहभान विसरलेले... डोक्यात चढलेली दारू, कानावर पडणारा डीजेचा आवाज.. मदमस्त मेंदूत उठणारी तरंगे.. आणि त्याच धुंदीत तालावर थरथरणारं त्याच शरीर... सुन्न होत गेलेल्या भावना... तुटलेलं ह्रदय.. झुरलेले मन.. सगळं जे आजपर्यंत मनात कुठंतरी दाबून ठेवलेलं तेच आता उफाळून बाहेर येत होतं.


नीरव... अनुभवलात तर या कथेचा नायक नाहीतर एक पात्रच.. पंचवीशीतला.. दिसायला गोरापान, हलकेसे कुरळे केस.. हाईट बाॅडी साधारणं.. उगाचची फॅशन न करता चार लोकांत जेंटलमॅन दिसेल अशी कडक इस्त्री अन् बाहेर जाताना नेहमी ईन-शर्ट असलेली वेशभूषा.. अगदी निरखून पाहणार्यालाही आपल्यातल्या सभ्यतेवर बोट ठेवायची संधी नीरव कोणाला द्यायचा नाही.


चारचौघात असताना आपल्या शांत संयमी स्वभावाने समोरच्यांची मन जिंकणारा. आजूबाजूच्या बर्याचशा विषयांवर बारीक लक्ष ठेवणारा. अवांतर वाचन करणारा. या सवयींमुळेच आवश्यक ती माहीती संग्रहीत करून वेळप्रसंगी इतरांसमोर ती मांडणारा. उत्तम वक्तृत्व, हजरजबाबी, फावल्या वेळात लिखाण करणे, चारोळ्या तर अगदी ओठांवरून वाहात असल्यासारखे करायचा.


असे अनेक छंद त्याने जोपासले होते. पण हे सर्व गुण गरज असेल तिथेच आणि आवश्यक तितक्याच माणसांसमोर तो दाखवायचा. नविन व्यक्तींसाठी मितभाषी असणारा तो क्वचितच स्वतःला व्यक्त करायचा.

पण आज अचानक त्याचे काय बिनसले. आधीच कधी नाही ती दारू ढोसलेली.. त्यामुळे त्याचे त्यालाच भान नव्हते. 


बाकीचे सर्व मित्रमंडळी याचं पहील्यांदाच असलं रूप पाहत होती. कोणाच्या कल्पनेतसुद्धा असं वागू न शकणारा नीरव.. सर्वांच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव होते. फक्त दोन व्यक्ती सोडून. एक अमेय... समोरच उभा होता. अन् दुसरा सागर.. नवरदेव.


आपल्या मित्राला जाऊन थांबवावे असे अमेयच्या मनात आले. पण नीरवचा हा अवतार पाहुन त्यालाही वाटले येऊ दे सर्व बाहेर. तेवढंच नीरवचं झुरणारं मन शांत होईल. आपला मित्र आतून किती तुटलाय हे प्रत्यक्ष आज अमेयला दिसत होतं. दुसर्या बाजूला सागरही शांतपणे सर्वकाही पाहत होता. पण जाऊन ते थांबवावं इतकं धाडस त्याच्यात नव्हतं.


आणि नियतीपुढे हतबल झालेला नीरव तुफान नाचत होता.. स्टॅमिना संपत आलेला.. श्वास भरलेला.. थकलेलं शरीर.. आणि लागलेली धाप... नाचत नाचतच आयुष्य संपावं असं मनोमन नीरवला वाटलं...


नीरव थंड पडू लागला तसं इतरांनी पुन्हा काही झालेच नाही अश्या आविर्भावात नाचायला सुरूवात केली. 


अमेयने धावत पुढे जाऊन नीरवला सावरले. त्याला घेऊन जवळच असलेल्या आपल्या घरी आला. नीरवला घरी झोपवून अमेय पुन्हा लग्नमंडपात आला. सागरच्या लग्नाची सर्व जबाबदारी अर्थातच अमेय आणि नीरव वर होती. म्हणूनच नीरव इथे अश्या अवस्थेत असतानाही अमेयला नाईलाजाने त्याला सोडून जावे लागले.


नीरव अर्धवट शुद्धीतच होता. डोळे बंद झाले.. पण तो जागाच होता.. हलकेसे काही आठवत....


अलगद डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप झाली त्याच्या... पडल्या जागेवरूनच खिडकीच्या बाहेरचा चंद्र दिसला. गर्द काळ्या अंधाराला तेवढाच त्या चंद्रकलेचा आधार होता. नीरव शुद्धीवर येऊ लागला. तरीही उठून बसण्याची तसदी न घेता तो तसाच पडून राहीला.. खिडकीबाहेरच्या चंद्राचा गोळा हळूहळू मोठा होऊ लागला... नीरवला त्यात सर्व भूतकाळ आठवू लागला.. खरा नीरव.. मैत्री.. प्रेम.. हार.. सगळं काही..


'पण हे नियतीच्या मनात नव्हतंच. तो शापीत नव्हताच.. अहं.. इतर सगळ्या बाबींत असेलही तो कमनशिबी. पण प्रेम.. ते तर मिळाल्यात जमा होतं. तरीही हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. पण यावेळी नशिब नाही तो स्वतःच जबाबदार होता.. का नियतीनेच हे सर्व त्याच्याकडून घडवून आणले होते?'


भूतकाळाची सुरूवात अगदी पूर्वीपासून झाली.. अन् नीरवच्या डोळ्यांच्या कडा पाणावत अश्रू घरंगळत उशीवर पसरू लागले..


Rate this content
Log in