Nilesh Desai

Others

3  

Nilesh Desai

Others

शापीत राजपूत्र – भाग चौथा

शापीत राजपूत्र – भाग चौथा

5 mins
897



प्रेम फक्त एकदाच होतं का..? कदाचित शेवटचं प्रेम भेटेपर्यंत हा प्रवास चालुच असतो.


नुकत्याच दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रमैत्रिणी गावी जायच्या तयारीत होती. तो ही जायचा दरवर्षी अगदी न चुकता. पण यावर्षी कुणास ठाऊक मन तयार होत नव्हतं त्याचं. 


गावाकडच्या नदीत मारलेल्या डूबक्या, झाडावर चढून चोरून खाल्लेले आंबे, शेतातल्या जमिनीत पिकवत घातलेले फणस, घरातली गाय सगळं खुप आठवत होतं. पण मन इथुन निघायला तयार नव्हतं. 


अजुनही तो मेघनाच्या आठवणींत होता. गेले चार महीने खुप अवघड गेलेले. इतके दिवस तर मेघनाचा चेहरा डोळ्यांसमोरून घालवण्यासाठी अभ्यासात झोकून दिलं होतं. त्या परिस्थितीत खरंतर अर्जुनाची एकाग्रताच हवी होती, आणि नीरवने अभ्यासावरून आपलं चित्त जराही ढळू दिलं नव्हतं. 


पण आता सुट्टी लागली आणि एकटं मन पुन्हा खायला उठलं. चार महिन्यांपूर्वी जे काही घडलं होतं त्यातली आपली बाजू त्यानं कोणापुढंही मांडली नाही. आणि बहुतेक तेच त्याला आतल्या आत खात होतं.


आज संध्याकाळीही असंच झालं.. घरात जशी दर्दी गाणी चालू झाली.. अगदी मनातल्या जखमांच्या वेदना असह्य होऊन नीरव बाहेर चालू लागला.


कुठं जायचंय? काय? कशासाठी?, कसलाच पत्ता नाही. पाऊले नेतील तिथं जाऊ लागला तो. आणि चालता चालता त्याच्या शाळेचं पटांगण आले. 


जवळच्याच एका पायरीवर फतकल मांडून नीरव बसला. अगदी काही क्षणातच तो मेघनाच्या आठवणींत गुंग झाला. सभोवतालचं सगळं विसरून.. 


दूर क्षितीजावर मावळत्या सूर्याची लाली पसरली होती. पटांगणात छोट्या मोठ्या ग्रुपने मुलं खेळत होती. शाळेचं पटांगण नेहमी खुलं असल्याने कुणीही तीथं येऊ शकत होतं. एका कोपर्यात तीन-चार मुली गप्पा मारत होत्या. सर्वजण आपापल्या दुनियेत खुश दिसत होते.


मग आपणचं दुःखी का..? छ्या.. यापेक्षा आपल्याला कळालंच नसतं तर बरं झालं नसतं का..? नको तो त्रास उगाचचा.. 'जग मेला पर मैं अकेला..' अशी अवस्था झाली आहे माझी.. ती विसरली असेल का मला.. की सुबोधसोबत खुश असेल ती.. 


हुश्श.. झालं ते जाऊ दे.. विसरेन मी तीला.. अवघड असं काहीच नाही त्यात.. 


नीरवच्या मनात सुमारे तासभर तरी अशीच कालवाकालव चालू होती. स्वाभाविक प्रतिक्रियेप्रमाणे त्याचे हात उठले नकळत आलेले अश्रू पुसण्यासाठी.. आणि.. डाव्या बाजूला नजर गेली. दोघांची नजरानजर व्हायला एकच वेळ साधून आली होती. 


ती.. थोड्याच अंतरावर बसली होती. शुभ्र रंगाचा ड्रेस, मानेपर्यंतचे केस त्यांना साजेसा गोलसर चेहरा, हातात फिकट गुलाबी रंगाचा रूमाल.. अन् डोळ्यांतून वाहणार्या गंगायमुना.. त्याच्या शाळेत तर नव्हती ती पण एवढं नक्की की आसपासच कुठेतरी राहत असावी.


दोन दर्दी.. एकमेकांकडे पाहूनही न पाहील्यासारखं करणारे.. दोनवेळा नजरेची देवाणघेवाण झाल्यावर नीरवनंच किंचीतशी स्माईल दिली. तीनंही हलकसं हसून प्रतिक्रिया दिली. आपण दोघेही एकाच नावेतले प्रवासी आहोत हे कळायला वेळ नाही लागला त्यांना.


थोड्याच वेळात ते दोघं एकमेकांशेजारी होते. खरंतर एखाद्याशी ओळख नसताना एकमेकांशी बोलणे कुणीही टाळतेच. पण दोघांनीही एकमेकांना रडताना पाहीले होते. आणि हीच एक नाळ होती जी त्यांना एकमेकांशी बोलायला भाग पाडत होती. 


तीनं सांगायला सुरूवात केली.. सोनल नाव होतं तिचं. नकळत झालेलं प्रेम.. तात्पुरतं आकर्षण.. प्रेमभंग.. आणि त्यातनं आलेलं नैराश्य.. सर्वकाही ती हमसून हमसून सांगत होती. नीरवने तीला शांत व्हायला सांगतले.


मेघना जाण्याच्या दुःखाने नीरवमध्येही कमालीचा बदल झाला होता. अचानक वयात आलेल्या मुलाप्रमाणे त्याच्यातला समंजसपणा वाढलेला. त्यानं परीस्थिती नीट हाताळत तीला शांत केलं.


"या अनुभवातुन काही शिकायचं आहे की असंच रडायचं आहे?" - नीरव.


त्याच्या बोलण्यातला रोख उमगुन तिचं रडणं थांबलं. 


"तु का रडत होतास..?" - सोनलनं त्यालाही बोलतं करण्याचा प्रयत्न केला.


"मी कुठे रडत होतो..?" नीरव.


"मी पाहीलेय तुझे डोळे.. आता नाकारू नकोस.. रडला तर रडला त्यात काय..?" सोनललाही ऊत्सुकता लागली होती त्याची कहानी ऐकण्याची.


"हे बघ, जिच्यासाठी मी रडत होतो तीचे विचार मी मघाशीच मागे सोडले आहेत. आणि हा यापुढे असल्या झंझटमध्ये मी पडणारच नाही. त्यामुळे सांगून काय उपयोग नाही." नीरवनं एका दमात सगळे सांगितले.


"बरं बाबा.. जाऊ दे.. थॅक्स तुझ्याशी बोलून छान वाटले. फ्रेंडस्..? ..सोनलने मैत्रीचा हात पुढे केला.


"फ्रेंडस.." नीरवनेही त्यांच्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. 


घरी जाताना रोज तिथंच सात वाजता भेटायचं ठरवून दोघे निघाले. त्यावेळी काॅलेजच्या मुलांकडेही क्वचितच मोबाईल असायचे. मग यांची तर नुकतीच कुठे शाळा संपलेली. पण मैत्रीत रोज थोडासा वेळ तरी द्यायचा हे नक्की करून ते दोघं घराकडे मार्गस्त झाले.


दुसर्या दिवसापासून ते रोज तिथेच भेटू लागले. आकर्षण असं काही नव्हतं फक्त एकटेपणा दूर करण्यासाठीची ओढ होती ती. आणि नीरवने तर अगोदरच स्पष्ट केलं होतं की त्याला असल्या झंझटमध्ये पुन्हा पडायचे नाही. 

त्यांच रोजचं एकमेकांना भेटनं वाढलं होतं. 


अजूनतरी या नात्याला त्यांनी मैत्रीचंच नाव दिलं होतं. पण खरंच ही मैत्री होती की नकळत फुलत चाललेलं त्यांच्यातलं प्रेम.. याचा अंदाज दोघांनाही अजून आला नव्हता. 


सोनलनेही याच्याबरोबरच दहावीची परीक्षा दिली होती. फक्त त्या दोघांच्या शाळा वेगवेगळ्या होत्या. सुट्टीतले दोन महीने खुप छान चालले होते. त्यांच भेटणं, बोलणं यातूनच ते समोरच्याला समजून घेत होते. नात्यातला पाकळ्या हळूवारपणे खुलू लागल्या होत्या.


'खरंच ही फक्त मैत्री आहे की त्यापल्याड आपले नाते सरकलेय..' नीरव आणि सोनल दोघांनाही हा प्रश्न पडू लागला होता. 


आणि एक दिवस सोनल आलीच नाही.. तासभर वाट पाहीली नीरवने. बैचेन झालेला तो सारखा चहुबाजूला पाहत होता. कुठूनही येईल ती अचानक. पण नाहीच आली ती. का? काय झाले असेल? ती ठिक तर असेल ना? प्रश्नांची सरबत्ती नीरवच्या डोक्यात सुरू झाली. 


तीचं घर तर माहीत होत त्याला पण कधी घरी गेला नव्हता तीच्या. तरी ठरवलंच त्यानं आता जाऊन पाहायला हवं नेमके आज ती का नाही आली. 


नीरव साधारणपणे पंधराव्या मिनिटाला तीच्या घराजवळ पोहोचला. 


सोनलच्या चाळीत तिच्या घरापाशी पोहोचताच बाहेर चारपाच चांगल्या कपड्यातली माणसं गप्पा मारताना त्याने पाहीली. घरात बायकांची लगबग दिसत होती. तीथंच घुटमळत नीरव त्यां माणसांच बोलणं कान टवकारून ऐकायला लागला. 


"मुलगी खरंच छान आहे, बघु आता मामाला सुन म्हणून आवडते का..! - एकजण म्हणाला आणि बाकीचे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देऊ लागले. 


आता हे ऐकून नीरवच्या पायाखालची जमिन सरकायचीच बाकी होती. 


तडक तिथुन निघायला तो मागे वळाला तसे सोनल वरच्या खोलीच्या पायर्या उतरत खाली येताना दिसली. मोरपीसी साडीत तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. मानेवर रूळलेल्या तिच्या छोट्या केसांनी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती. 


सोनलचीही नजर नीरववर पडली अन् त्याला पाहताच एक क्षण ती गांगरली.. आणि ती खाली उतरून काही बोलायला जाणार तेवढ्यात तीला दिसलं की नीरवने रागातच तिच्या चाळीतून पाय बाहेर टाकला होता. 


मन खट्टू झालेलं त्याचं पण काही विचार डोक्यात आणायचाच नाही असा चंग बांधुन घरी येऊन टिव्ही पाहत बसला. 


इकडे सोनलही कावरीबावरी झाली होती त्याला आपल्या घराजवळ आलेला पाहून. काहीतरी सांगायचं होतं तिला पण तो आला तसाच निघून गेला तिथून.. 


काहीही न बोलता.. 


कदाचित हीच तर त्यांची शेवटची भेट नसेल ना...?


क्रमशः


Rate this content
Log in