Nilesh Desai

Romance Others

3  

Nilesh Desai

Romance Others

शापीत राजपूत्र – भाग दुसरा

शापीत राजपूत्र – भाग दुसरा

5 mins
1.8K


'शापीत राजपूत्र' कोणताही एक प्रसंग वा घटना यावर आधारीत नसून त्यात नायकाच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर घडलेल्या भिन्न भिन्न अश्या ठळक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. शालेय जीवनातून सुरू झालेल्या या प्रवासात पात्रे आणि स्थळ काल्पनिक असून प्रसंग शक्य तितकेसे साध्यासरळ पद्धतीने सादर केले आहेत.


अमेयच्या घरी अर्धवट शुद्धीत झोपलेल्या नीरवला भूतकाळात डोकावताना सर्वप्रथम शाळा आठवली. दहावीचं वर्ष संपायला अजून चार महीने बाकी होते.


"नीरव, तू डान्समध्ये भाग घेतला आहेस ना..? पार्टनर भेटली का..? अजून शोधली नाहीस तर मेघना आहे.. ती शोभून दिसेल तुला." गीता वर्गाच्या बाहेर उभी राहून नीरवला सांगत होती. 


आतमध्ये सर शिकवत होते, पण नीरव आणि गीता फळ्यावर नाव आल्याची शिक्षा म्हणून वर्गाबाहेर होते.


"नाही, मी फक्त नाव दिलेय पण अजून बाकी गोष्टी नक्की नाहीत.. म्हणजे मी कोणाला विचारले नाही तसे. मेघना तयार होईल का पण..? तीला आवडते का शाळेतल्या फंक्शन मध्ये डान्स करायला..? नीरव.


किंचीतसे हसत गीता बोलू लागली.. "अरे मेघना एका पायावर तयार होईल.."


"असं का..! अगं पण एका पायावर डान्स करायची काय गरज आहे.. दोन्ही पायांचा उपयोग व्हायला हवा की.." मिश्किलपणे हसत नीरव म्हणाला.


"जोक मारू नकोस उगीच, तशी सांगायची पध्दत असते. आणि तीनेच मला तुझ्याशी बोलायला सांगितले." लटक्या रागात गीता.


"काय डान्ससाठी यायचं आहे म्हणून तिला..?" नीरव.


"हो, पण फक्त तेवढंच नाही रे.. नीरव, तु तिला नाही समजून घेतलंस कधी.. ती केव्हाचीच प्रेमात पडलेय तुझ्या. तुला नाही कळत का ती समोर येते तेव्हा. कधी जाणणार तू हे. आणि त्यात ती विचारायचंही धाडस नाही करत." गीताने मुळ मुद्दाच सादर केला.


"काय बोलतेस... पण मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती.. अगं ती एवढी चांगली मैत्रीण माझी कधीच कशी नाही बोलली याबद्दल." नीरव थोडासा गोंधळतच म्हणाला.


"मुली कधी प्रपोज करतात का रे मंद.. तुला नको का कळायला तिच्या मनातलं." गीता.


"ठिक आहे मी बोलतो तिच्याशी." मनात फूटलेला लाडू गीतासमोर न दाखवता नीरव आवंढा गिळत म्हणाला.


"बरं मग लवकर उत्तर सांग मला, तिला कळवावं लागेल." गीता वर्गातून जाणार्या सरांकडे पाहत हळूच नीरवला म्हणाली.


"अगं मी प्रत्यक्ष भेटून सांगतोच की तिला.." नीरव अजूनही स्वतःमध्येच हरवला होता.


"ठिकेय.. मी सांगायचे काम केलं बाकी तुम्ही पाहून घ्या.." गीता.


वर्गात आल्याआल्याच नीरवनं तिच्याकडे तिरक्या नजरेचा कटाक्ष टाकला. इकडे गीताने अगोदरच तीला डोळा मारून खुणावले होते. नीरवशी नजरानजर होताच लाजून मेघनानं पुस्तकात मान खुपसली. तीला पाहत पाहतच नीरव त्याच्या जागेवर जाऊन बसला. 


हुश्श.. आता जरा हायसे वाटले त्याला. 


गीताचे शब्द पुन्हा आठवू लागले. गालावर नकळत खळी उमटू लागली. अलगद मोरपिसं अंगावरून फिरू लागली अन् त्या मोरपीसांच्या स्पर्शाने रोम रोम बहरू लागले. त्या क्षणाला नीरव हर्षावला. 


'कुणीतरी आपल्या प्रेमात आहे आणि मी मूर्ख एवढंही समजू शकत नाही. पण कसे अन् कधी झालं असेल. झाले तेव्हा झाले आता तर आपल्याला कळाले, हे ही नसे थोडके..? पुन्हा त्याची नजर मेघना कडे गेली. त्याच्याकडेच पाहत होती ती..


यावेळी पुस्तकात डोकं खुपसायची वेळ नीरवची होती. तोही तसा लाजाळूचं होता. 


शाळा सुटून घरी आला तरी नीरवच्या मनातले प्रेमतरंग तसेच बागडत होते. मान्य आहे की अगोदर असलं काही मनात आलंच नव्हतं त्याच्या. पण समोरून आलेला मुलीचा प्रपोज आणि त्यातून मिळणारा अलौकिक आनंद सोळाव्या वर्षातल्या कोवळ्या मनासाठी वेगळाच असतो. 


त्यात मेघना म्हणजे शाळेतल्या मोजक्याच आकर्षक मुलींपैकी एक. दिसायला सुंदर, घारे डोळे, दोन वेण्या, दिसण्यात इतर मुलींपेक्षा जराशी नाजूक. पण बोलायला लागली तर तीची बडबड थांबायचीच नाही. छोटीशी बाहुलीच जणू. तीच हसणं रुसणं सगळेच नीरवने अनुभवलेलं. अगदी ज्यूनिअर केजीपासूनचे ते मित्र होते.


'पण आता सुबोधचं काय?' नीरवला सुबोध आठवला आणि सकाळची शाळेतली मोरपीसं टोचायला लागली. 


एवढ्या वेळात त्याचं काही लक्षातच नाही आलं. अख्ख्या शाळेला माहीत होते की सुबोध मेघनाच्या किती मागे लागलाय ते. आणि त्यात अजून भर म्हणजे सुबोध नीरवचा खास मित्र. 


पुढे काय करायचे या विचारांत बरीच काथ्याकुट करून शेवटी त्याने ठरवले की जे नशिबात असेल तसंच होऊ द्यायचे. 


आता हे रोजचंच झालं होतं. त्यांचं एकमेकांकडे पाहणं, लाजणं, एकमेकांना वही पुस्तक पास करणं. एक गोष्ट बदललेली होती. त्यांचं बोलणं कमी झालं होतं. पूर्वी नाही त्या विषयांवर मनमोकळेपणाने बोलणारे ते आजकाल एकमेकांशी समोरच्याचा अंदाज घेऊनच बोलत होते. 


डान्सची तयारी जोरात चालू होती. मेघना आणि नीरव खरंच क्युट कपल दिसत होते. डान्ससाठी शाळा सुटल्यावर एक तास त्यांना थांबावे लागत होते. पण दोघेही या गोष्टीसाठी मनातून खुश होते. तेवढाच एक तासाचा सहवास त्यांच्यासाठी सुखावून टाकणारा होता.


नीरवही नकळत मेघनाच्या जवळ येऊ लागला होता. आपले तिच्याशी बोलणे, भेटणे; शाळा सगळं काही कधीच संपू नये असे मनोमन त्याला वाटत होते. तिच्यावर कविताही केल्या पण सुबोधमुळे त्या द्यायचा प्रयत्न नाही केला. 


पहील्या प्रेमाच्या नितळ भावनांचा विलक्षण आनंद त्याला येऊ लागला होता. त्यावेळी शाळा सुटल्यावर बाहेर कुठं भेटण्याचा विचारही कुणाला यायचा नाही. म्हणून मग शाळेतच काय ते सुख अनुभवायचं. बाकी डोळ्यांत आता सदा मेघनाच असल्यामुळे रात्रीची स्वप्नांनाही जागा नव्हती.


मोजून अकरा दिवस झाले, मेघना आणि नीरवचा डान्स बसवून पूर्ण होतच आला होता. आणि बाराव्या दिवशी वर्गशिक्षिकेनी जाहीर केले की या वर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 


शाळेशी संबंधीत कुण्या बड्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला होता. आणि अश्या परिस्थितीत कार्यक्रम करणे उचित नव्हते.


ते ऐकताच नीरवच्या चेहर्यावर त्रासिक भाव उमटले. असं कसं अचानक सगळं रद्द होऊ शकत..? आताच कुठे प्रेमाचा गुलकंद चाखण्याचे दिवस आलेले. मेघनाही हताश होऊन त्याच्याकडे पाहू लागली. पण त्यांच्या हातात काहीच नव्हते. रोज मिळणारा एक तासही हरवून गेला होता. पण अजूनही नीरव वा मेघनाने स्वतःला व्यक्त केले नव्हते. नीरवने मेघनाला तर अजुन जाणवूही दिलं नव्हत की तो सुद्धा तीच्या प्रेमात आहे.


एखाद्याचं आयुष्य सुखमय करण्यासाठी जगातल्या सगळ्याच चांगल्या शक्ती कितीही एकत्र येऊन प्रयत्न करू लागल्या, तरी शापीत व्यक्तींसाठी त्यांचा शापच पुरेसा असतो सगळ्या आयुष्याची वाताहत करण्यासाठी. तोच त्यांचा सखा असतो.. आजन्म.. त्यातून सुटका नाही.


नीरवच्या आयुष्यात तर ही नुसतीच सुरूवात झाली होती. इतक्या दिवसांतल्या सुखावरती एका क्षणात दुःखाने कडी केली होती. आता मेघनासोबत आनंदाचे क्षण अनुभवणे थोडे अवघड होऊन बसले होते. 


"बरं झालं यार.. तुमचा डान्स रद्द झाला.. मला तर वाटलेले तु तुझ्या वहीणीशीच लग्न करतोयस की काय ? .. शाळेतल्या मधल्या सुट्टीत सुबोध नीरवकडे जाऊन म्हणाला . 


"सुबोध, मला त्याबद्दलच तुझ्याशी जरा बोलायचं होतं." ..नीरव.


"अरे.. मग बोलना.. यार तुला सांगतो जीव जळायचा, तु आणि ती सोबत जायचास तेव्हा.. मनंच लागायचं नाही वर्गात तुम्ही डान्स प्रॅक्टीसला गेल्यावर.." सुबोध.


झालं... जे काय भविष्य होतं ते नीरवला कळून चुकलं. इथे आता उगाचचा त्रिकोन करून गुंता वाढवणं बरोबर नव्हते; हे ही एव्हाना नीरवला उमगले होते. सुबोधशी निखळ मैत्री असल्याने त्यात खडा टाकणे नीरवला जमले नसते.


"बोल ना.. काय झाले?.. काय बोलायचे होते. सुबोधने पुन्हा जोर देऊन विचारले.


"तु खरंच प्रेम करतोस का मेघनावर..? नीरव. 


"बस काय नीर्या... कधीपासूनचं प्रेम आहे आपलं तिच्यावर. प्रपोज पण केला पण नाही बोलतेय. खुप समजावले तीला उत्तर तेच असतं तिचं. तरी मी हार माननार नाही. लग्न करेन तर तीच्याशीच. पहीलं प्रेम आहे रे माझं ती. एक दिवस कंटाळून तरी हो बोलेलच ती." .. सुबोध.


"ठिक आहे", इतकच बोलून नीरव तिथून निघाला. 


त्यादिवशी शाळा सुटल्यावर नीरवला ब्युटी क्विन पुजासोबत घरी जाताना सर्वांनी पाहीले. खरंतर पुजा म्हटले की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच असायच्या. मुलं तिच्या अदाकारीवर दिवाणी झाली होती आणि मुली ईर्ष्येने तिच्याकडे पाहायच्या. तिच्यासोबत नीरवचे असणे मग शाळेत पसरायला वेळ लागला नाही. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पुजा मेघनाचीही मैत्रीण होती. सुबोध आणि मेघनाच्या सेटींगचा प्रयत्न पुजाच करत होती. 


दुसर्या दिवशी शाळेत बोभाटा झाला की, नीरवने पुजाला प्रपोज केला. क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance