Nagesh S Shewalkar

Comedy

4.0  

Nagesh S Shewalkar

Comedy

चंड्याचे लग्न

चंड्याचे लग्न

5 mins
183



           चंडिदास या अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण नावाचा अपभ्रंश होऊन 'चंडी, चंडू, चंड्या...' असे अनेक अपभ्रंशित विशेषण लाभलेल्या चंड्याच्या स्कुटीने त्याच्या गल्लीत प्रवेश केला. गल्लीत जणू आश्चर्याचा पहाड कोसळला. चंड्याचे घर गल्लीच्या शेवटच्या टोकाला असल्याने त्याला साऱ्या घरांना ओलांडून जावे लागत होते. कुणी गप्पा मारताना, कुणी वाळू घातलेली धुणी काढताना, कुणी चहाचा कप हातात घेऊन चंड्याच्या बाईककडे बघत होते. चर्चाही करीत होते. त्यांना चंडिदास गल्लीत आला, बाईकवर आला यापेक्षाही आश्चर्य वाटत होते ते म्हणजे चंडिदासच्या बाईकवर बसलेल्या व्यक्तिचे! कुणी कुणाच्या बाईकवर येणे ही गोष्ट तशी आश्चर्याची नाही आजकाल कुणीही कुणाच्या गाडीवर बसून जाते-येते परंतु चंडिदासच्या गाडीवर बसलेल्या व्यक्तिची आणि चंडिदासची अवस्था काही वेगळीच होती आणि म्हणूनच सारे जण हातातील कामे सोडून त्या दोघांकडे बघत होते. घरासमोर बाईक उभी करून चंडिदासने आवाज दिला,

"आई, मी आलोय. बाहेर ये ना. तुला काही तरी दाखवायचे आहे."

"चंड्या, किती उशीर केलास रे? हे बघ मी पोळ्या करतेय. काय दाखवायचे ते आत आणून दाखव."

"आई, मला तसे करता येणार नाही. तुला बाहेर यावे लागेल आणि हो येताना ओवाळायला ताट घेऊन ये..."

"ओवाळायचे ताट घेऊन येऊ? असे काय दिवे लावलेस बाबा? असे तर झाले नाही ना की, तुझी परीक्षा न घेता तुला पास केले नाही ना? कोरोनामुळे वातावरण बिघडले आहे त्यामुळे सरळसरळ पुढल्या वर्गात ढकलले नाही ना..." असे बडबडत चंडिदासची आई खरोखरच ओवळायचे ताट घेऊन बाहेर आली. चंडिदासच्या गळ्यातील हार पाहून त्याच्या आईला आश्चर्याचा धक्का बसला. सोबतच त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तिला पाहून आणि त्या व्यक्तिच्याही गळ्यात हार पाहून तिचे आश्चर्य रागात, संतापात बदलले. आईच्या हातातील ताट गळून पडेल असे दिसताच चंडिदासने पटकन पुढे होत ते ताट धरले. तशी आई कडाडली,

"चंड्या, हे हे काय? असे का वागलास तू? कोण आहे ही? काय नाव हिचे? कधीपासून तुमचे हे चाळे चालू आहेत?"

"आई, तू शांत हो. सारे काही तुला सांगणार आहे..."

"आता अजून काय सांगणार आहेस? एवढे धडधडीत सत्य समोर उभे असताना अजून काय सांगायचे शिल्लक राहिले आहे? काय नाव आहे हिचे? कुणाची पोर आहे ही? हिच्या घरी तरी तुमची ही थेरं माहिती आहेत का?"

"आई, सारे एवढे अचानक, गडबडीत झाले ना की..."

"अचानक? गडबडीत? लग्नासारखी महत्त्वाची आणि केवळ तुम्हा दोघांच्याच नाही तर सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी घटना अचानक कशी होते रे?"

"आई, आधी सारे ऐकून घे. खरेच सारे अगदी स्वप्नवत, सिनेमात घडल्यासारखे झाले ग. थांब. आत चल. ऐकून घे..." असे म्हणत चंडिदासने आईच्या हाताला धरुन आत नेले. पाठोपाठ त्याची नववधूही होती! आईला सोफ्यावर बसवून तिच्या शेजारी बसलेला चंडिदास म्हणाला,

"आई, तुला माहिती आहे की मी माझ्या मित्रांसोबत दररोज सायंकाळी बागेत फिरायला जात असतो. आजही मी बागेत गेलो होतो. दररोज वेळेवर येणाऱ्या मित्रांपैकी आज कुणीही आले नव्हते. मित्रांची वाट पाहत मी भ्रमणध्वनी पाहत असताना..."

"ही तिथे येऊन टपकली का?" आईने मध्येच विचारले. तिच्या रागाचा पारा अजूनही कमी झाला नव्हता. तशी ती मुलगी त्वरेने पुढे झाली. चंडिदासच्या आईला नमस्कार करीत म्हणाली,

"आई, मी चंद्रिका..."

"व्वा! काय जोडा जमला म्हणावा... चंड्या नि चंद्री! तू तरी खरे सांगणार आहे का..."

"आई, मी म्हणजे आम्ही खरेच सांगतो... तीन तासांपूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. हा जसा याच्या मित्राची वाट पाहत बसला होता तशीच मीही माझ्या मैत्रिणींची वाट पाहत होते..."

"मग म्हणून का एकमेकांशी पाट लावला का? " आईने विचारले.

"आई, ऐक तर. बराच वेळ झाला तरीही ना माझा कुणी मित्र आला ना हिची कुणी मैत्रीण आली. मी माझ्या मित्रांना फोन लावायचा, संदेश पाठवायचा प्रयत्न करीत होतो पण कुणाचाही फोन लागत नव्हता..."

"अगदी अशीच परिस्थिती माझी झाली होती. कुणाही मैत्रिणीचा फोन लागत नव्हता. मी घरी परत जाण्याचा विचार करीत असताना अचानक बागेत काही मुले- मुली शिरली. मुला-मुलींना ते जाब विचारत असताना मला खूप भीती वाटत होती. या मुलांनी आपल्याला काही केले तर या विचाराने अंगावर भीतीचा काटा येत होता. मी आजूबाजूला पाहिले. सर्वत्र वेगळाच गोंधळ माजला होता. जे प्रेमवीर बागेत आले होते तेही एकमेकांच्या हाताला धरून वाट मिळेल तिकडे पळत सुटले. मीही लगबगीने बागेच्या बाहेर जाण्याचा विचार करीत होते परंतु हिंमत होत नव्हती. तितक्यात माझे लक्ष चंडिदासकडे गेले. तो एकटाच बसला होता. क्षणाचाही विचार न करता हा आपल्याला वाचवेल या आशेने मी हा बसला होता त्या बाकड्याकडे गेले. पाहते तर काय ह्याचे कुठेही लक्ष नव्हते. तितक्या गोंधळातही हा मोबाईल पाहण्यात गुंग होता..."

"ही... हीच सवय आहे याची. तहानभूक, झोप विसरुन ते डबडं तोंडाला चिकटवून बसते झाले. मग पुढे काय झाले?"

"आई, ही माझ्या शेजारी येऊन बसली. मला काही बोलणार तितक्यात चार पाच मुलं आमच्या जवळ आली..."

"बाप रे! मग? त्यांनी काही मारहाण तर केली नाही ना?"

"मारहाण केली नाही पण आम्हाला काही न विचारता, आमची चौकशीही न करता आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करतो किंवा आम्ही दोघे त्या बागेत मौजमजा करायला आलो आहोत असा समज करून घेऊन त्यांनी सोबत आणलेले हार आमच्या हातात दिले आणि एकमेकांना घालायला सांगितले..."

"का? असे का? तू खडसावून विचारले नाही?"

"अहो आई, त्यांनी कोणतीही संधी दिली नाही. आज प्रेम दिवस valentine day होता म्हणे. त्यामुळे बागेत आलेली प्रेमी जोडपी मस्ती करायला आली असे समजून आम्हाला एकमेकांना हार घालायला लावले. आम्ही हार घालत असताना त्यांनी त्यांच्या मोबाईलवर फोटोही काढले आहेत..."

"ते झाले ग. हार काढून फेकायला किती वेळ लागेल? एकमेकांचा सत्कार केला असे समजून हार काढून फेकून द्यायचे..."

"आई, पण ह्या मंगळसुत्राचे आणि माझ्या कपाळावर चंडिदासकडून लावलेल्या कुंकाचे काय करायचे? हे तर फेकून देता येत नाही किंवा कुंकू पुसून..."

"पोरी चंद्रिका, असे बोलू नये. झाले ते झाले..."

"आई, आता पुढे..."

"आता पुन्हा एकमेकांच्या गळ्यात पडा... म्हणजे हार घाला..."

"आम्हीही तेच म्हणतो..." तिथे पोहोचलेले एक गृहस्थ म्हणाले.

"आई, हे माझे आईबाबा. बागेतून निघताना मी बाबांना सारा प्रकार कळवला होता."

"चला. म्हणजे तुम्हालाही हे लग्न मान्य आहे तर! अरे, पोट्ट्यांनो पाहता काय? वाजवा रे वाजवा!..." चंडिदासची आई बाहेर पाहत म्हणाली. तसे बाहेर जमलेल्या मुलांनी हातात पडेल ते वाजवायला सुरवात केली...

                


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy