Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

चला करुया पारायण

चला करुया पारायण

7 mins
202


   त्यादिवशी सर्वोच्च न्यायालयात एक आगळावेगळा खटला सुरु होता. देशातील एक नामांकित वकील तो खटला एका अशिलाच्यावतीने मोठ्या उत्साहाने चालवत होते. अशील तरी साधेसुधे होते का? वाचक म्हणतील हे काय चालवले आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे वकील नामांकितच असतात, भलेही गोरगरिबांना त्यांचे नाव माहिती नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे अशील साधेसुधे कसे असतील? तिथे गरिबांची डाळ थोडीच शिजणार आहे? बरोबर आहे. अशील म्हणजे त्या महानगराचे प्रथम नागरिक अर्थात महापौर होते. देशातील सर्व नागरिकांचे लक्ष खटल्याकडे लागले होते. देशातील एकूणएक वाहिन्या तिखटमीठ लावून त्याचे वृत्तांकन करीत होत्या.

    न्यायालयात आपली बाजू मांडताना वकील म्हणाले, "मान्यवर महोदय, माझे अशील हे या नगरीचे महापौर आहेत. त्यांना भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे पारायण करायचे आहे. त्यासाठी त्यांना मा. न्यायालयाची परवानगी हवी आहे..."

"काय म्हणता? अहो, आपला देश सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. इथे कोणत्याही जाती- धर्माच्या लोकांना त्यांचे सणवार, उत्सव साजरी करण्याचा हक्क आहे. त्यासाठी परवानगी कशाला?..."

"माय लॉर्ड, ते एका मोठ्या संवैधानिक पदावर आहेत म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीला महत्त्व प्राप्त होते. त्यांना एका विशिष्ट ठिकाणी पारायण करायचे आहे. पुढे काही अडचणी..."

"विशिष्ट ठिकाणी म्हणजे कुठे? मंदिरातच किंवा घरीच पारायण करणार आहेत ना? इतर धर्माच्या प्रार्थना स्थळी जाऊन करणार नाहीत ना?..."

"महोदय, त्यांना सामुहिक पारायण करायचे आहे..."

"त्यासाठी आमची परवानगी कशाला? फार तर पोलीस ठाण्यातून परवानगी घ्यावी. पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही का?"

"नाही. तसे नाही. पोलीस ठाण्यात आम्ही गेलोच नाही. सरळ आपल्याला विनंती करीत आहोत..."

"आम्हाला कशासाठी? त्यांची अशी इच्छा आहे का, की न्यायालयाने सामुहिक पारायणात हिस्सा घ्यावा... पारायण करावे?" मा. न्यायाधीशांनी असे विचारताच उपस्थित प्रेक्षकांना हसू आवरणे कठीण झाले. हास्याचा आवाज कमी होत असताना वकील म्हणाले,

"माननीय, त्यांना थेट मा. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी पारायण करायचे आहे."

"काय? पण असे का? जसे पंतप्रधान या देशाच्या उच्च पदावर आहेत तसेच महापौरही या नगरीचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी पारायण करायच्या ऐवजी महापौरांच्या शासकीय निवासस्थानी पारायण करावे..." मा. न्यायमूर्ती बोलत असताना एक वकील उभे राहून म्हणाले,

"मी मायलॉर्ड, मला वाटते यामागे महापौरांचा नक्कीच काही तरी राजकीय हेतू आहे."

"राजकीय हेतू? तो कोणता?" न्यायालयाने विचारले.

"महोदय, लवकरच या नगराच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. मागील निवडणुकीत यांच्या पक्षाने दिलेली आश्वासने यांची एकहाती सत्ता असूनही पूर्ण झालेली नाहीत. उलट महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार माजला आहे. यांचे काही नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले आहेत. कशाचा ताळमेळ कशाला नाही. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळवून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी पारायणाचे नाटक खेळत आहेत."

"नाही. मुळीच नाही. आमचा हेतू शुद्ध आहे. यांच्या मनात पाप आहे म्हणून हा असला बिनबुडाचा आरोप करीत आहेत." महापौरांचे वकील म्हणाले. ते ऐकताच विरोध करणारे वकील म्हणाले,

"महोदय, यांना भगवद्गीता पंतप्रधानांच्या निवासात वाचण्याची परवानगी आपण देणार असाल तर आम्हालाही आमचे पवित्र कुराण पंतप्रधान निवासी वाचायला परवानगी मिळावी."

"महोदय, एकतर अशी कुणालाही परवानगी देऊ नये. द्यायचीच असेल तर आमचीही विनंती आहे, आम्हाला आमचा बायबल पवित्र ग्रंथ वाचण्याची संधी मिळावी... अर्थातच पंतप्रधानांच्या घरी!"

"न्यायालयाला असे वाटते की, यात हस्तक्षेप करु नये. महापौरांनी पंतप्रधानाशी किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा."

"माय लॉर्ड, आमचाही तसाच विचार होता परंतु पंतप्रधान आणि महापौर हे दोघे वेगवेगळ्या पक्षांचे असून कट्टर विरोधक आहेत. त्या दोन्ही पक्षात एकमेकांवर आरोप करण्याची चढाओढ लागली असल्याने तशी परवानगी मिळणार नाही म्हणून आम्ही मा. सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावत आहोत."

"मी लॉर्ड, कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपण आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे."

"आपणासही गुरुग्रंथ साहेब या ग्रंथाचे पंतप्रधानांच्या निवासी पारायण करायचे आहे का?" मा. न्यायमूर्तींनी विचारले.

"माय लॉर्ड, आपण अगदी बरोबर ओळखले. आमची तशी विनंतीवजा मागणी आहे."

"ठीक आहे. पुढील सुनावणी पंधरा दिवसांनंतर होईल. राज्य शासन, केंद्र सरकार यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहावे."

     न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात आणि देशात धुमाकूळ माजला. सर्वत्र मोर्चे, घोषणा आणि आपापल्या धर्मग्रंथांचे वैयक्तिक, सामुहिक वाचन सुरु झाले. वाहिन्यांनी तर कहर केला. चोवीस तास एकच एक विषय तो म्हणजे पारायण आणि पारायण! सामान्य जनता जणू वेठीस धरल्या गेली. प्रत्येकाने आपली मागणी लावून धरण्यासाठी, त्याला बळ प्राप्त व्हावे यासाठी, जनता मोठ्या प्रमाणात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे दाखविण्यासाठी, माझे मत म्हणजे जनतेचे मत आहे हे ठसविण्यासाठी, 'जनता करे पुकार, हमारे ग्रंथ का हो पठण' असे नारे देण्यासाठी मोठ्या संख्येने जनतेला एकत्र जमविण्यात येऊ लागले. हे सारे करताना पंतप्रधानांच्या निवासस्थानी केवळ आमच्याच धर्माच्या ग्रंथाचे वाचन, पारायण व्हावे असाही मतप्रवाह वेगाने पुढे येत होता. दुसरीकडे समाजातील एका गटाने अशा कोणत्याही ग्रंथाच्या वाचनासाठी पंतप्रधान निवासाची निवड हा चुकीचा पायंडा असून कुणालाही तशी परवानगी देऊ नये अशी मागणी थेट पंतप्रधान यांच्याकडे केली. असे मतप्रवाह असणारांची संख्या वाढत असताना चारही धर्माच्या लोकांनीही आम्हाला पारायण करण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारची निवेदने पंतप्रधानांना पाठवली. निवेदनावर हजारो लोकांच्या सह्या घेण्यात आल्या. शेकडो लोकांनी तर सही करताना बोट कापून रक्ताचा वापर केला. पक्षा-पक्षातील लोकांमध्ये वाद रंगू लागले, त्याचे पर्यवसान भांडणे, मारामारी ह्यामध्ये होत असताना महापौर पत्रकार परिषदेत म्हणाले,

"मी न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता अमूक दिवशी दिल्लीत जाऊन पंतप्रधान निवासस्थानी गीतेचे पारायण करणार म्हणजे करणार! बघूया कोण अडवते ते." महापौर यांची तशी घोषणा होताच त्यांच्या पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि लगोलग कुणी विमानाचे, कुणी रेल्वेचे तिकीट आरक्षित केले. इतर धर्मीय का मागे राहणार आहेत? त्यांनी महापौर यांनी जाहीर केलेल्या तारखेच्या आधी वेगवेगळ्या दिवशी पंतप्रधान निवासस्थान गाठणार असल्याचे जाहीर करताच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सोबत जाण्याची तयारी सुरु केली. एकंदरीत राज्यात धर्मांध नसेल पण धार्मिक वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी उन्मादाची परिस्थिती निर्माण झाली होती.

     काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, की महानगरपालिकेचे महापौर हे तुमच्या पक्षाचे आहेत, तुमच्या वरदहस्ताने त्यांना खुर्ची मिळाली आहे. तुमचा शब्द ते टाळणार नाहीत. त्यांना एक पाऊल मागे घ्यायला लावा. समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पक्षाला धोका बसू शकतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले,

"गीता पठण हा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच, तोही पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जाण्याची तयारी करावी. आपली ताकद, आपली हिंमत दाखवून द्यायची हीच वेळ आहे. परंतु पारायणासाठी जाणारांनी एक लक्षात ठेवावे, खुन खराबा होऊ शकतो, अटक होण्याची वेळ येऊ शकते, कदाचित राजद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो. तुरुंगात जावे लागेल. आपले कार्यकर्ते भित्रे नाहीत, लेचेपेचे नाहीत. एक खातील पण दोन देतील. तेव्हा तशा तयारीने यावे. घाबरु नका. मी स्वतः पंतप्रधानांच्या निवासस्थानी पारायणासाठी येणार आहे. आता आरपारची लढाई आहे."

   स्वतः मुख्यमंत्र्यांनी महापौर यांना भक्कम पाठींबा दिल्याने राज्यात नव्हे तर देशातही मोठे वादळ निर्माण झाले. इतर धर्मीय उच्च पदस्थ नेत्यांनीही देशाच्या राजधानीकडे कुच करायचे ठरवून आपापल्या कार्यकर्त्यांना फार मोठे बळ दिले. पंतप्रधानांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करायला सुरवात केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पठण तर सोडा परंतु नुसते पाहिले तरी डोळे गमावून बसाल असा इशारा दिला. वातावरण बिघडत होते. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः पंतप्रधान काहीही बोलत नव्हते. त्यांचे मौन जास्त घातक ठरेल असा इशारा देशातील तथाकथित बुद्धिजीवींनी विविध माध्यमातून दिला. काही विचारवंतांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन 'पारायण सोहळा' थांबवण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने त्या अर्जावर पहिल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी बाजू मांडावी असा आदेश दिला. 

    शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले, दोन दिवसांनी रात्री आठ वाजता पंतप्रधान स्वतः पारायण या विषयावर बाजू मांडतील. तसे निवेदन प्रसारित होताच पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला. अनेकांनी ठामपणे सांगितले की, पंतप्रधान पारायण सोहळ्याला नक्कीच परवानगी देणार नाहीत. अशा धार्मिक प्रथांना ते लाल दिवा दाखवतील. साऱ्या देशात जागोजागी तशा साधकबाधक चर्चा रंगत असताना ज्या दिवसाची सारे जण आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला. आता प्रतिक्षा होती... रात्रीचे आठ वाजण्याची. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चर्चांचा रागरंग असा होता...

"पंतप्रधानांनी काहीही सांगितले तरी आम्ही आमच्या ठरलेल्या दिवशी जाणार म्हणजे जाणारच.

आता माघार नाही. निर्णय बदलला तर लोक शेळपट म्हणतील. पंतप्रधानांना आणि संभाव्य शिक्षेला घाबरले असे म्हणतील. म्हणून पाऊल मागे घ्यायचे नाही. जे होईल ते होईल. बघता येईल. सायंकाळचे सहा वाजले आणि लोकांची धाकधूक वाढली. काय होईल? कसे होईल? पंतप्रधान काय म्हणतील? राजकारणी लोक पंतप्रधानांचे ऐकतील का? देशात दंगली माजतील? दंगल पेटली तर काय होईल? संचारबंदी लागेल का? किती दिवस व्यवहार बंद राहतील? अशा अनेक प्रश्नांचे भेंडोळे घेऊन जनता आठ वाजण्याची वाट पाहू लागली. शेवटी रात्रीचे आठ वाजले. पंतप्रधान टीव्हीवरुन जनतेशी संवाद साधताना जे म्हणाले ते ऐकून सर्वांना जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ असा...

   "देशातील बंधू-भगिनींनो, देशात फार मोठी क्रांती होऊ पाहत आहे. सर्वधर्मीय लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांच्या-त्यांच्या ग्रंथांचे पठण करणार आहेत. पंतप्रधान या नात्याने मी सर्वांचे स्वागत करतो. आपला देश विविध धर्म, जाती असलेला परंतु एकोप्याने राहणारा देश म्हणून ख्यातीप्राप्त देश आहे. ही आपली कीर्ती झाकाळू नये, तिला तडा जाऊ नये म्हणून सर्वांना एक विनंती आहे, वेगवेगळ्या दिवशी येण्यापेक्षा एकत्र या, हातात हात घालून या. साऱ्या देशाला आपल्या एकात्मतेचे अनोखे, आगळेवेगळे दर्शन पुन्हा घडवू या. फक्त एक करा, किती जण येणार ते तीन दिवस आधी रीतसर आम्हाला कळवा म्हणजे आपणा सर्वांची पाणी, नाष्टा, जेवण यांची व्यवस्था करायला सोपे जाईल. महत्त्वाचे म्हणजे मी सर्व धर्मीयांसोबत बसून प्रत्येक ग्रंथाचे त्यांच्या सोबत वाचन करणार आहे. हा अभूतपूर्व योग जुळून आणल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. या. मी वाट पाहतो..."

    पंतप्रधानांचे निवेदन ऐकताच सर्वांनी आम्ही काही काळ आंदोलन स्थगित करत आहोत अशी घोषणा केली...

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy