बंधमुक्ती :- तो आला, त्यानं पा
बंधमुक्ती :- तो आला, त्यानं पा
"हाय फ्रेंड्स! मी अँजी. नात्यांची वीण मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा किस्सा ज्याचा अंत तुम्ही ठरवायचाय. का? तुमच्या चेहऱ्यावर हे प्रश्नचिन्ह का आहे? असंच वाटतंय ना की किस्सा माझा आणि दि एन्ड तुमचा कसा? अहो कारण हा किस्सा माझ्यापासून सुरु झाला असला तरी कदाचित तुमच्याही वाट्याला येऊ शकतो. मला तर वाटतं आलाही असेल."
हे ऐकल्यावर मात्र हॉलमधल्या सगळ्यांचेच चेहरे चिंताग्रस्त झाले. पण, शेवटी ती अँजी होती. प्रेक्षकांचं मन कसं जिंकायचं याचा तिचा चांगलाच अभ्यास होता. काही क्षणांसाठी सगळ्यांना त्याच वैचारिक गर्तेत राहू दिल्यावर तिने पुन्हा माईक हातात घेतला.
"अरेच्चा! तुम्ही तर सगळे टेन्स झालात ना राव."
तिचं हे वाक्य कानावर पडलं मात्र सगळ्यांच्या चटकन ध्यानात आलं कि ती जे बोलतेय ते काही महानगरी मराठी नाहीए. सगळेच जण कान टवकारून बसले होते की ही आता नक्की काय किस्सा सांगणार आहे म्हणून.
'नात्यांची वीण' हा एका प्रख्यात मराठी वाहिनीवरचा लाईव्ह शो विथ ड्रामा होता. त्या शोचा वाढणारा टी आर पीच त्याची लोकप्रियता सांगत होता. आज शोचा १०० वा आणि शेवटचा भाग होता. आजवर अनेकांनी या कार्यक्रमात भाग घेऊन आपली विस्कटलेली नाती, ती पुन्हा सावरली की नाही, की कायमचीच निसटून गेली हे अतिशय भावनिकरीत्या मांडलं होतं. या शोचं जेवढं श्रेय भाग घेणाऱ्यांचं, प्रेक्षकांचं होतं तितकंच ते डायरेक्टर मणी आणि क्रिएटिव्ह म्हणून अँजीचही होतं. हो! अँजीच होती या शोची क्रिएटिव्ह. आज शोच्या १०० व्या भागात तीही एक किस्सा सांगणार होती. अँजीच खरं नाव अंजली धाडणकर. मास कम्युनिकेशन मधून शिक्षण घेऊन कोल्हापूरसारख्या छोट्या शहरातून ती नोकरीच्या शोधात इथे येऊन थडकली होती. पण, ह्या महानगरानं अंजलीला लवकरच अँजी करून टाकलं. हळूहळू मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषा अस्खलितपणे बोलणाऱ्या अंजलीच मूळ नावच विस्मृतीत गेलं आणि ती कायमची अँजीच झाली.
हॉलमध्ये अंधार पसरला होता. समोरच्या पडद्यावर प्रकाश पडला. एकेक करत स्लाईड्स सरकू लागल्या. त्या स्लाईड्ससोबत अँजीचा आवाजही. ते एका हॉटेलचे फोटो होते. महाबळेश्वरमधलं लेक व्ह्यू हॉटेल. टेकडीच्या पायथ्याशी असणारं त्याचं ते मानवनिर्मित पण, नैसर्गिक वाटणारं तळ अन तिथला लोभसवाणा निसर्ग. आणि त्यानंतर आली ती स्लाईड जिने सगळ्यांचीच उत्सुकता ताणली. त्यात भर पडली अँजीच्या आवाजाची.
"मला वाटतं, तुम्हां सगळ्यांनाच हा चेहरा ओळखीचा आहे. . बरोब्बर! ही आहे माझी खूप जवळची मैत्रीण आणि प्रख्यात मानसोपचार तज्ञ् रिया. रिया पंडित. थांबा. तुमच्यासाठी आणखी एक आश्चर्याचा धक्का अजून बाकी आहे. नंदी पुढची स्लाईड."
तिनं असं म्हणताच आणखी एक फोटो सर्र्कन पडद्यावर आला. जो पाहताच तिथे बसलेल्या सगळ्यांच्या तोंडून एका सूरात आवाज आला,
"आरव. धी ग्रेट पेंटर, आरव."
"येस, गाईज. आज मी तुमच्यासाठी यांचीच कथा घेऊन आलेय. किस्सा आरव आणि रियाच्या नात्यात आलेल्या बंधमुक्तीचा. पण, गोष्टीला सुरुवात करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ आपण."
क्षणातच स्लाईड शो बंद होऊन हॉल लाईटच्या झगमगाटाने भरून गेला. कॉफीपानाच्या ब्रेकमध्ये मणी तिला म्हणाला,
"अँजी, याआधी कधी बोलली नाहीस ती या घटनेबद्दल!"
"काही काही गोष्टी सस्पेन्स असाव्या लागतात मणी. तू नाही का, नॅन्सीसोबत लग्न केल्यानंतर खूप दिवसांनी ते डिस्क्लोज केलंस."
मणी यावर काही बोलणार इतक्यातच ब्रेक संपल्याची बेल झाली. बॉय येऊन त्यांच्यापुढ्यातले कॉफीचे मग घेऊन गेला. एक एक करत सगळे प्रेक्षक पुन्हा हॉलमध्ये जमा झाले.
पडद्यावरच्या स्लाईड्स बदलत होत्या.
" हे आहेत दिवाकर पंडित अर्थात नाना. डॉ. रिया पंडितचे आजोबा. तिच्या आईचे वडील. त्यांच्याकडूनच रियाला ज्योतिष, खगोल, मानस अशी शास्त्र आणि एखाद्या घटनेचा कार्यकारण भाव लावण्याचं तंत्र अवगत झालं होतं. कॉलेजमध्ये असताना ती आरवच्या संपर्कात आली. त्याचं झालं असं कि ती आणि मी गेलो होतो एका चित्रांच्या प्रदर्शनाला. त्यात आरव नावाच्या एका चित्रकाराचं मेंदूचं ऍबस्ट्रॅक्ट प्रकारातलं चित्र तिला फारच आवडलं. एकतर तिने तिच्या क्लीनिकसाठी ठरवलेल्या इंटेरिअरमध्ये ते अगदी परफेक्ट फिट बसत होतं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हि होती कि अशी न समजणारी ऍबस्ट्रॅक्ट प्रकारातली चित्र काढणारा आरव दिसायला मात्र देखणा होता. आमच्या मैत्रिणसाहेबा पहिल्याच दर्शनात प्रेमाच्या तळ्यात पडल्या होत्या. तसं आरवचंही तिच्याबद्दल 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला' असंच काहीस झालं होतं."
या स्लाइडमध्ये होते आरव आणि रियाच्या लग्नाचे काही मेमोरेबल हसरे क्षण. काय सुंदर दिसत होती ती दोघंही! 'खरतर 'मियाबीवी राजी तो क्या करेगा काजी?' या म्हणीप्रमाणे दोघांचाही सेटल झाल्या झाल्या लग्न व्हायला हवं होतं. तशी रिया अम्मांनाही आवडली होतीच पण, ती आरवपेक्षा वयानं मोठी आहे ही गोष्ट काही केल्या त्यांना पटतच नव्हती. शेवटी आरवनेच यातून मार्ग काढला. तो काही दिवसांसाठी रियाला अम्माच्यासोबत ठेऊन त्याच्या वर्क टूरवर निघून गेला. त्या काही दिवसांच्या सहवासाचा असरच असा होता कि अम्मांनीच त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. नाना तर केव्हाचेच तयार होते. आईबाबा नसणाऱ्या रियाला त्यांनीच तर वाढवलं होतं. आणि अम्मांनी जरी एकल पालकत्व हिमतीनं निभावलं असलं तरी आरव मात्र त्याच्या बाबांसारखा चित्रवेडा चित्रकार झाला होता. असं असलं तरी दोघांच्या चित्रात खूप फरक होता. त्यांची चित्रं खूप सरळसाधी रेखाचित्रांपासून आभास निर्माण करणारी होती तर आरवची चित्रं? ती समजून घेणं खूप अवघड होतं. याच मूळ त्याच्या स्वभावात होतं. लहानपणापासूनच आरव कॉन्ट्रास्ट बिहेवियर मध्ये मोडणारा. कुठलीही भावना अजिबातच नाही तर अतिशय जास्त अशा दोन विरुद्ध टोकांचं वर्तन होतं त्याचं. म्हणजे बोलला तर इतका कि थांबवणं कठीण व्हावं. नाहीतर दोन-दोन दिवस त्याला आवाज आहे यावर विश्वासच बसू नये . रियाचं मात्र असं काही नव्हतं. नानांनी तिला स्वतःसारखेच खूप सारे मित्र मैत्रिणी जमवून दिले होते. शिवाय चर्चासत्र, वादविवाद हे त्यांचे आवडते खेळ होते. जसजशी रिया मोठी होतं गेली तसं तिला मानवी भावभावना आणि नात्यांमध्ये रुची निर्माण झाली. यातूनच ती मानसोपचाराच्या कठीण पेशाकडे ओढली गेली. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत खूप अवघड केसेस सोडवल्या. पण, असं कधी वाटलंच नाही कि तिला स्वतःलाच स्वतःची केस सोडवावी लागेल.
आता त्या पडद्यावर तेच सुंदर दृश्य होतं. टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या लेक व्ह्यूचं. एकीकडे पडद्यावरचं सुंदर दृश्य आणि दुसरीकडे रियाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं असेल याच्या विवंचनेत पडलेले चेहरे असं संमिश्र वातावरण होतं हॉलमध्ये. टाचणी पडली तरी आवाज होईल अशा त्या शांततेचा भंग अँजीच्या आवाजाने केला.
" हीच ती जागा. जिथं ती भयंकर घटना मी आणि रियाने अनुभवली. अतर्क्य होतं ते! अनाकलनीय, केवळ अशक्य. खरं सांगायचं तर मला आजही हे सगळं खरंच घडलं की तो आमचा आभास होता हेच कळलेलं नाहीए. माणसाचं मन नावाची गोष्ट आजवर आपल्यापैकी कुणीच पाहिलेली नाहीए. ती फक्त अनुभवली आहे. भावनाही तशाच! अनुभवतो आपण. पण, दिसत मात्र नाहीत. मग या भावनांच्या गुंत्यातून निर्माण होणारी नाती जोडणारा किंवा तोडणारा कुणी मूर्त स्वरूप असू शकतो यावर जसा आमचा तेव्हा विश्वास बसला नाही तसाच कदाचित तुमचाही आता बसणार नाही."
ही घटना घडली २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये. रिया आरवच्या लग्नाची ऍनिव्हर्सरी. ४ वर्ष झाली होती लग्नाला पण दोघांचा उत्साह अजूनही पहिल्या हनीमूनसारखाच होता. त्यावर्षी गळ घालून रियाने मलाही बरोबर नेलं. म्हणाली,
" सारखं काम करू नये गं माणसानं! आम्ही चाललोच आहोत हनिमूनला चौथ्या. तुही चल."
" काय वेडी बिडी आहेस का? तुमच्या दोघांत मी कबाब में हड्डी काय करणारे?"
" ए! माठ.तुला काय आमच्या रूममध्ये झोपायचं आमंत्रण देतेय का मी? म्हणे काय करणारे? अगं, इतके जण येतात तिथं. भटकायला, कॉन्फरन्सच्या नावाखाली कामाचा शीण घालवायला. पटवं कि तुला हवा तो."
शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी गेले एकदाची सोबत त्यांच्या. किंवा मग असं म्हणूया कि नियतीला मला त्या घटनेची साक्षीदार बनवायचं होतं. रिया दरवर्षी हट्टानं या हॉटेलला यायची. त्यांचा पहिला हनिमून इथलाच. तिला त्या आठवणी जागवायला आणि नव्या निर्माण करायला आवडायचं. त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती कि इथे आल्यावर आरव त्याच्या ऍबस्ट्रॅक्ट मधून बाहेर येऊन समजणारी चित्र काढायचा.
या लेक व्हिव्यूची एक खासियत होती. इथे असणाऱ्या टेकडीच्या पायथ्याच्या तळ्याजवळ रात्र अनुभवायची असेल तर त्यासाठी तंबू मिळतात. त्या तंबूतून तुम्हाला अमावास्येची चांदणी रात्र किंवा पौर्णिमेचा चंद्र अनुभवता येतो. अवर्णनीय अनुभव असतो तो. 'सो एन्जॉय धी ब्युटीफुल नाईट्स विथ युवर लव्हेबल अँजेल अँड धी स्पार्कलिंग स्काय इन धी वॉटर.' तिथे बसलेल्या सगळ्यांवरच जशी काही त्या दृश्याची मोहिनी पडली होती. काळ्याशार आकाशातल्या चमचमणाऱ्या चांदण्यांचं तळ्यात पडलेलं प्रतिबिंब.
आमच्याकडे होत्या ४ रात्री आणि ४ दिवस.रियाने शेवटच्या २ रात्रींसाठी तंबू घेतला होता. मला त्या थंडीत एकट्यानं झोपण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे मी शेवटची रात्र प्रिफर केली. त्या रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या आणि मध्यरात्री केव्हातरी आपापल्या तंबूत परतलो. मी काही वेळातच झोपेच्या अधीन झाले. उद्याचा दिवस संपता संपता पुन्हा रुटीनच्या वाटेवर चालायचं होत ना आम्हाला.
ही लोकं ना! पहाटे पहाटे का उठतात ना मला कधी कळलंच नाही. इतकी छान साखरझोप असते आणि अशाचवेळी गजर खणखणुन सगळ्या झोपेचं पार खोबरं करतो. ही रिया याच जमातीची होती. काय तर म्हणे ध्यान लावणार. त्यादिवशीही माझ्या झोपेचं तिनं म्हणजे तिच्या तंबूत वाजलेल्या गजराने खोबरं केलं होतं. त्यात माझ्या झोपेच्या सवयी वाईट. एकदा गजर झाला कि मला पुन्हा झोप येत नाही. झक मारत मी उठून तंबूच्या बाहेर आले. अंगात स्वेटर असतानाही बाहेरच्या थंडीचा कडाका एवढा जाणवत होता कि मी पुन्हा आता जाऊन कानटोपी,ग्लोव्हज,शाल असा सगळं जामानिमा करून किनाऱ्याच्या दिशेने गेले. तिथल्या खडकाला टेकून त्या बर्फाळ पाण्यावर पाय टेकवून रिया कसलं ध्यान करत होती कुणास ठाऊक! तिला डिस्टर्ब् नको व्हायला मी त्याच खडकाच्या थोडं पलीकडे जाऊन बसले. तिथल्या कुडकुडवणाऱ्या थंडीनं पुन्हा माझा डोळा लागलाच होता इतक्यात माझ्या कानांवर रियाचा आवाज पडला.
"अरे! इ
तक्यात उठलास पण तू?"
असं म्हणून ती मागे वळली. ती कुणाशी बोलतेय म्हणून मी चमकून तिकडे बघितलं कारण आरव कधीही ९ च्या आधी उठलेला मला माहित नव्हतं. तो इतक्या लवकर कसा उठलाय हेच माझ्यासाठी मोठं आश्चर्य होतं. मी त्या पहाटेकडे झुकू पाहणाऱ्या अंधारात डोळे मोठे करून आरवला पाहण्याचा प्रयत्न करत होते. पण ती आरव समजून ज्याच्याशी बोलली होती तो आरव नव्हताच मुळी. तिथे एक काळासा,कृश पोरगेला पण कुरूप असा एक मुलगा उभा होता. रिया आश्चर्याने त्याला तो कुठून आला? का? इथे कसा? असे वेडेवाकडे प्रश्न विचारात होती. तिच्या प्रश्नांच्या सरबत्तीने तो पोरगा पार गांगरून गेला होता. कसाबसा शब्द जुळवून म्हणाला,
" मी बंधमुक्ती."
" कोण? बंधमुक्ती? म्हणजे काय?"
मलाही हेच प्रश्न पडले होते.
" ते माझं नाव आहे आणि माझं कामपण."
" काम? मी तरी आजवर असलं कुठलं काम नाही ऐकलं!"
" अच्छा, म्हणजे आजवर जे तू पाहिलं नाहीस,ऐकलं नाहीस, अनुभवलं नाहीस ती कुठलीच गोष्ट अस्तित्वातच नाही असं म्हणायचंय का तुला?"
आता मात्र तो बऱ्यापैकी सावरला होता. पण त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नानं रिया निरुत्तर झाली होती.
" नीट ऐक. पुन्हा पुन्हा तुला तेच तेच सांगायला मी काही तुझा पेशंट नाहीये डॉ. रिया पंडित मुथय्या."
ओ, माय माय. याला तर रियाचं नाव पेशा सगळंच माहित आहे. हा माझ्यासाठीही एक धक्काच होता. त्या धक्क्यातून सावरण्याआधीच मी त्याची पुढची वाक्य ऐकली.
" माझं नाव बंधमुक्ती. तेच माझं काम आहे. मी इथे आलोय कारण आता तुझी बंधनातून मोकळं होण्याची वेळ आलीय."
" पण, मी कुठल्या बंधनात आहे?"
रीयाचा अगदी साळसूद प्रश्न.
" मी तर माझ्या मनाप्रमाणे जगतेय."
" ते फार महत्वाचं नाहीए. कारण जिथे मी जातो तिथे बंध तुटतात आणि कितीही घट्ट असले तरी सुटतात सुद्धा."
तो मोठ्याने गडगडाटी हसला. त्याच्या त्या एकंदरीतच तिथे असण्याने आणि त्या हसण्याने नाराज झालेली रिया त्याच्याही वर आवाज चढवून म्हणाली,
" हसण्याच्या स्पर्धा नाही लागलेल्या इथं. जरा हळू हस पलीकडे माझा नवरा झोपलाय."
क्षणात आपलं हसणं आवरून घेत कुत्सित स्वरात तो म्हणाला,
" हेच,हेच आवडत नाही मला. काळजी करणं,घेणं. आय हेट.आय हेट धिस."
" खड्ड्यात गेली तुझी आवड नावड. तू इथे काय झक मारतोयस ते सांग मला!"
हा साला इंग्लिशपण बोलतो ह्या विचारात मी असतानाच माझ्या लक्षात आलं कि रीयाचा आटा सटकलाय. आता ह्या बेण्याचं काही खरं नाही.
" कूल. कूल डाऊन बेबी. शांत हो. मी तुझ्यासारखा उतावळा नाहीए. माझं काम मी खूप शांतपणे करतो. आय अँम अ ब्लडी स्लो पॉयझन."
"फार झाली स्वतःची ओळख. कशासाठी आलायस इथे ते सांगतोस की जाऊ मी इथून? आधीच माझ्या ध्यानाचा सत्यानाश केलायस आता माझ्या रागाचा टेम्पो नाही वाढवलास तर ते तुझ्याच भल्याचं आहे."
" आय लाईक इट डॉ. मी पाहिलंय तुला तुझ्या पेशंटवर उपचार करताना. आणि म्हणूनच मला वाटलं की तुझ्यासोबत बुद्धिबळ खेळायला मजा येईल. तसा मी सगळे डाव एकटाच खेळतो. फार क्वचित तुझ्यासारखे स्पर्धक मिळतात मला."
आता त्याने त्या खडकावर मस्त बैठक मारली होती.
" आहे तिथंच बैस. कारण मी जे सांगतो ते जर नीट ऐकलं नाहीस तर नुकसान तुझंच आहे. तुमच्या जगात राहणारे प्रेम आणि विश्वास. माझे सख्खे-सावत्र भाऊ. आमचा बाप एक आणि आया मात्र वेगळ्या. हे दोघेजण माणसांची नाती जोडून बांधून ठेवतात आणि मी ती तोडतो."
रिया मधेच काहीतरी विचारणार होती पण त्याने पटकन ओठांवर बोट ठेऊन तिला गप्प बस अशी खूण केली आणि तो पुढे बोलत राहिला.
"फार वर्ष झालीत एक चांगला स्पर्धक नाही भेटलेला. एकट्याने खेळून कंटाळा आलाय. म्हणून मी इथे आलोय तुमचं नातं तोडायला. तुम्हाला एकमेकांच्या नात्यातून मुक्त करायला. असं समज की हा एक गेम आहे. जर जिंकलीस तर आणि तरच हे नातं तुझं नाहीतर मला फार वेळ नाही लागणार तुला आणि त्या चित्रकाराला वेगळं करायला."
त्याच्या ह्या सगळ्या वक्तव्यावर नेमका काय प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया द्यावी हे न कळल्याने रियाने संमिश्र स्वरात विचारलं,
" पण, मीच का? आमचंच नातं का?"
" गुड. चांगला प्रश्न. तुम्हां बुद्धिवाद्यांचं हे मला आवडत बघ. समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी तुम्ही आधी प्रश्नापासून सुरुवात करता. जाऊ दे. फार चर्वित चर्वण नको. नाही का? थेट मुद्द्यालाच हात घालतो. नानांनी आरवची पत्रिका पाहून काय सांगितलं होतं तुला? आठवतंय? त्याच्या पत्रिकेत गंडांतर योग आहे म्हणून. काळजी नको करुस. तुझ्या आरवला मी मारणार नाही. पण या योगाचा मी माझ्या कामासाठी नक्कीच वापर करून घेणार."
" म्हणजे नक्की काय करणार आहेस?"
" पुन्हा एक चांगला प्रश्न. मी काय करणार आहे हे मी तुला सांगणार नाही. ते तू शोधायचंस. तरच तू जिंकशील आणि मला हरवशील. मला हे सांगायला फार अभिमान वाटतो कि मी फार क्वचितच हरतो. आता माझ्या अटी. गेम माझाय. मी तुला प्रतिस्पर्धी म्हणून निवडलंय. तेव्हा अटीही माझ्याच असतील."
" अच्छा, जर सगळं तुला फॉर असणार आहे तर मग मी काय करायचंय? तुझं हे काळुंद्र थोबाड बघायचंय?"
" न्ना! मुन्ना ना. तुझी एक अट पाळून मी तुझ्यावर उपकार करणार आहे."
" हिंदी सिनेमे फार बघतो वाटतं." (सारखे ठेवणीतले डायलॉग मारतो व्हिलनचे ती स्वतःशीच पुटपुटली.)'
" पुटपुटू नकोस. मला तुझ्या मनात बोललेलं कळतं तर हे कळणार नाही का? तर
अट नं १- त्याचा/तुझा इगो,इर्ष्या,काळजी,अविश्वास वाढेल. नं २- तुमच्या दोघांपैकी कुणाच्याही आयुष्यात दुसरी व्यक्ती येईल.
नं ३- तुमच्यापैकी कुणीतरी एक अपंग होईल.
नं ४ आणि फार महत्वाची अट तुमच्यापैकी कुणाची तरी स्मृती जाईल.
आता विचार हि फार महत्वाची का म्हणून?"
" तूच सांग. उगाच मी का कष्ट घेऊ?"
" कारण या अटीसोबत मुदत येते. आणि महत्वाचं म्हणजे तू माझी स्पर्धक म्हणून हि मुदत ठरविण्याचा हक्क तुझाय. मी त्या मुदतीच्या बाहेर जाणार नाही. पण त्या मुदतीच्या आत स्मृती परत येण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न तुम्हालाच करावे लागतील."
त्याचे हे सगळे पर्याय ऐकून ती सुन्नच झाली. नेमकं निवडायचं तरी काय यातून? सगळेच कसे अवघड नि अस्वीकृत करावेसे. तरीही यातला कुठलातरी एक निवडण्यापूर्वी फलनिष्पत्ती काय हे कळावं म्हणून तिने विचारलं,
" याचे परिणाम?"
एवढंही कळू नये अशा तुच्छ नजरेचा कटाक्ष टाकून कुत्सित हसत तो म्हणाला,
" नात्यांची संपृक्तता आणि त्यांचा शेवट."
" ते न कळण्याएवढी अज्ञानी नाहीए मी. शेवटच्या अटीबद्दल विचारतेय मी."
" त्यात काय सांगायचं? तू ठरवलेली मुदत मी मान्य करेन म्हणालोय ना!"
" नाही मला तेवढंच नकोय. खरा खेळाडू असशील तर आणखी एक अट मान्य कर माझी."
तोंड वाकडं करत तो म्हणाला,
" ठीक आहे. सांग काय ती?"
" आता मध्ये बोलायचं नाही. नाऊ इट्स माय टर्न. स्मृती आरवची जाईल. कारण एकतर तू त्याला भेटलेला नाहीस. त्यात तुझे हे असले घाणेरडे खेळ त्याला माहित नाहीत. सो तू फक्त माझ्याशी लढणार आहेस.
अट नं १- त्याची स्मृती दीड वर्षासाठी जाईल. दुसरी अट कि तू त्याला माझ्यापासून कुठंही दूर नेणार नाहीस. म्हणजेच स्मृती गेली तरी तो माझ्यासोबतच राहील. मान्य!"
'मुळीच नाही!'
असं म्हणायचं त्याच्या मनात होतं पण मुदत ठरवायची मुभा त्यानंच तिला दिली होती ना! मी मात्र रियाच्या या पलटवारवर खूष होते.
" ठीक आहे. तुझी वेळ आत्ता ह्या क्षणापासून सुरु होतेय. मोजायला सुरुवात कर,दीड वर्ष हा हा म्हणता निघून जाईल आणि तू कधी हरलीस हे तुला कळायलाही नाही."
या त्याच्या आवाजासकट तो जसा आला तसा निघूनही गेला.
गजराच्या आवाजाने मी दचकून जागी झाले. बघते तर मी अजूनही माझ्याच तंबूत होते आणि बाहेर चांगलाच फटफटलं होतं. गडबडीने उठून मी रियाच्या तंबूकडे तिला हे स्वप्न सांगायला धावले. पण, तिथं तर वेगळंच नाटक चालू होतं. आरव तिला राहून राहून एकच प्रश्न विचारत होता कि तो कोण आहे? ती त्याला ओळखते का? मी मात्र सर्द होऊन ते दृश्य बघत होते. म्हणजे बंधमुक्ती खरंच आला होता. स्वप्न खरी होतात यावर माझा नकळतपणे विश्वास बसला.
हॉलमधलं वातावरण खूपच गंभीर झालं होतं. हळूहळू कुजबुज वाढू लागली. हि घटना खरंच अतर्क्य होती. तिथल्या अनेकांना वाटलं कि अँजी हे जे काही सगळं सांगतेय तो त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर उभा केलेला फक्त एक आभास आहे. हे असं काही घडू शकतं का?
" तुमच्या चेहऱ्यावरचे प्रश्न अगदी बरोबर आहेत. हे सत्य असू शकतं नाही असं तुम्हांला वाटत असलं तरी हे १००% खरं आहे हे सांगणारी, ते घडलेलं अनुभवणारी अँजी तुमच्यासमोर तितक्याच ठामपणे उभी आहे. खरंतर बंधमुक्ती असं कुणी आहे हे रियाला माहित नसावं असं मला वाटलं पण जे स्वप्न मला पडलं अगदी तेच सत्यात रियासोबत घडलं होतं. हे मला तेव्हा कळलं जेव्हा रियाने आरवला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवलं आणि मी तिला माझं स्वप्न सांगायला लागले.
" ओके. म्हणजे त्याने तुला साक्षीदार केलंय तर! काही हरकत नाही. पण त्याला तोंडघशी पडल्याशिवाय मी स्वतःला डॉ.रिया पंडित म्हणवणारी नाही."
" दीड वर्ष पूर्ण व्हायला अवघे २ तास असताना आरवने रियाला तिच्या नावाने हाक मारली. त्याला हेही आठवलं कि तो चित्रकार आहे. बिचारा बंधमुक्ती! त्याला कधी कळलंच नाही कि त्याने नानांच्या हट्टी रियाशी पंगा घेतलाय. त्या दीड वर्षात आम्ही जंग जंग पछाडलं आरवची स्मृती परत येण्यासाठी. आणि आम्हाला त्याचा चांगला परिणाम मिळाला. पण, त्याहीपेक्षा एक मोठं सरप्राईझ आता मी तुमच्यासाठी घेऊन आलेय. नंदी स्लाईड ऑफ कर."
क्षणात पडदा पूर्वीसारखा पांढरा झाला. हॉल लाइटमध्ये झगमगला. आणि तिथे नात्यांची वीण च्या शेवटच्या भागाच्या हिरो होरोईनचं आगमन झालं.
आता तिथे जमलेल्या प्रेक्षकांसोबतच पत्रकारांनाही रियाला या संदर्भात प्रश्न विचारण्याची घाई झाली होती. पण बंधमुक्ती मात्र तिथेच एका कोपऱ्यात उभा राहून आपल्या नवीन सावजावर आपली नजर ठेऊन पुढच्या चाली ठरवत होता.
तिकडे गेमरुममध्ये दैव आणि सटवाईचे दोन्ही मुलगे खूप काळजीपूर्वक समोरच्या बुद्धीबळाच्या पटाकडे पाहत होते. तिथे बंधमुक्तीनं त्यांच्या एका प्याद्याला आपल्या घोड्याच्या अडीच घर चालीनं मुक्ती दिली होती. ते प्यादं होतं आनंद निळकंठ जमादारची बायको शर्वरीचं. तिच्या आयुष्यात आता गोविंद भानुदास येणार होता.
नीट विचार करा नात्यांचा; बंधमुक्ती आलेला कुणालाच समजत नाही.