Namarata Pawaskar

Drama Romance

2  

Namarata Pawaskar

Drama Romance

मैत्र

मैत्र

432 mins
925


*1*

बी जी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड इंटेरिअर डेकोरेशन

इथेच दोघांची पहिली टक्कर झाली. प्रेशा इनामदार आणि जीत जैतकर. जीत साळगावमधील जैत गावचा. आणि प्रेशा ह्या गावची म्हणजे रतनपुरच्या आबा इनामदारांची नात. आईबापानंतर आजी आजोबानं सांभाळलेलं लाडकं लेकरु. पोरगी कमी आणि पोरगा जास्त होती ती. आपल्याला हवं ते करवून घेण्यात पटाईत. अगदीच एखादा आला तोडीचा तर मग त्याची काही खैर नसे. साम, दाम, दंड आणि भेद हे चाणक्याचे सगळे नियम वापरण्यात मास्टरी होती तिची. विक पॉईंट फक्त एकच गुळातल्या बोलण्याला आणि मायेच्या स्पर्शाला फसायची. अमेया जांभळे तिची मैत्रीण अगदी शाळेपासूनची. घासातला घास वाटून घेतला होता तिनं अमेयासोबत. प्रेशा जीवाला जीव देणारी माणूस होती. त्यामुळे आबांनी जांभळेंच्या घरापासून जवळच असणार्‍या या कॉलेजमध्ये जायची परवानगी तिला हसतच देऊन टाकली.

कॉलेज सुरु होऊन नुकते कुठे चार-पाच दिवस झाले होते. प्रेशानं हट्टानं आबांकडून बुलेट मिळवली होती. तीच घेऊन ती कॉलेजला यायची सकाळी आणि कॉलेज सुटलं की अख्खा दिवसभर अमेयाच्या घरी पडी मारायची. जया काकू काहीना काही वेगवेगळं बनवून खाऊ घालायच्या आणि यांचा हादड धंदा चांगला चालायचा. दिवसभर त्या कसल्या कसल्या प्रकारचे घरांचे नकाशे काढायचं. ड्रेनेज सिस्टीम, विहिर, पाण्याच्या पाईपलाईन, झाडं, भिंती अशा एक ना हजार गोष्टींवर दोघी तावातावानं बोलायच्या. घसा सुकला, पोटात खळगा पडला की आहेच हक्काची काकूआई करुन खायला घालायला. असे मस्त दिवस चालले होते.

आजही प्रेशा घरुन तिची बुलेट घेऊन निघाली. तिनं अमेयाला घरुन उचललं आणि थेट कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडी लावायला आली. आज तिच्या जागेवर कुणाची तरी स्कूटी पार्क केलेली दिसली. तिथं बसलेल्या युवीच्या कंपूला तिनं ती कुणाची आहे म्हणून विचारलं. तो म्हणाला, ‘’कुणीतरी जीत जैतकर म्हणून आलाय ना! त्याची आहे ती. ‘’ ‘’बरं, असेना कुणाचीही मला काय करायचंय त्याला सांग ही माझी जागा आहे. इथून आपली गाडी काढायची.’’ जीत तेव्हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पित बसला होता. पम्यानं येऊन त्याला सांगितलं की यार लवकर चल. तिथं तुझ्या स्कूटीवरुन लै मोठा झोल झालाय. ती स्कूटी जीतला प्रचंड प्रिय; कारण ती त्याच्या आईची होती. आणि त्यानं आईकडून हट्टानं ती मागून घेतली होती, बाबा बाईक घे म्हणत असताना. तो ताडकन् उठला आणि पार्किंगमध्ये आला.

‘’ ए स्कूटी तुझीय का रे ही? ‘’

‘’ हो.’’

‘’ चल. हलव इथनं लाव दुसरीकडे. ‘’

‘’ का पण? तुम्ही तुमची बुलेट लावा की दुसरीकडे. ‘’

‘’ ए, उलटं बोलायचं नाही हां आपल्याला. उचल म्हटल्यावर गुमान उचलायची. कळलं ना? ‘’

‘’ नाही उचलणार. काय कराल? ‘’

जीतला ती कुणीतरी सिनीअर वाटत होती म्हणून तो तिला अहोजाहो करत होता. तेवढ्यात युवी त्याच्या कानात कुजबुजला, ‘’ए, ती आपल्याच एजची आहे. अहोजाहो काय करतोस? सांग सरळ नाही काढत म्हणून. बघू काय करते ती!’’ युवीचा जीतला बळीचा बकरा बनवायचा प्रयत्न काही फळला नाही कारण तोवर प्रेशानं त्याची स्कूटी तिथून काढून पार पल्याडच्या सायकल पार्किंगमध्ये नेऊन लावलीपण होती.

‘’ हे बघ ए! जैतकरांच्या जित्या, ही जागा आपली आहे. प्रेशा इनामदारची. सो आजची चूक माफ. उद्या जर तुझी गाडी परत इथे दिसली तर ती डायरेक्ट दवाखान्यात जाणार. काय कळलं? ‘’ आणि जीत काही बोलायच्या आत ती अमेयाला घेऊन तिथनं निघूनपण गेली.

जीत ती जात होती तिच्याकडे बघत चडफडत होता तेवढ्यात नंदा शिपायानं मोठ्यानं आवाज दिला, ‘’ कोन हाय रे तो सायकलीच्या जागेवर स्कूटी लावणारा?’’

जीत धावतच तिथे पोचला. ‘’माझी… माझी गाडी आहे ती. पण.. ती…’’ तो धाप टाकायला थांबला तोवर नंदा म्हणाला, ‘’ ही पावती. फाईन भरा चाळीस रुपये. आज पहिला दिवस म्हणून फक्त एवढेच. उद्या जागा चुकली तर डबल फाईन पडणार. ‘’ त्यानं पुढं केलेली पावती घेऊन जीतनं मुकाट्यानं खिशातून चाळीस रुपये काढून त्याच्या हातावर टेकवले आणि गाडी आणून दुचाकीच्या पार्किंगमध्ये लावली.

‘’साला, फुकट फाकट पहिल्याच दिवशी चाळीस रुपयाचा फटका लावला यार हिनं! युव्या काय म्हणत होता रे तू? कोण आहे ती? ‘’

‘’आबा इनामदारांची नात आहे. गावचे पाटील आहेत.’’

‘’पाटील काय! बर, आता बघतोच पाटलीणबाई घरी कशा जातात ते! चेत्या कंपस काढ. ‘’

‘’ आयला जित्या काय करणारेस तू? ‘’ चेत्यानं त्याला कंपस देत विचारलं.

‘’ ए माठ! कळत नाही टायर पंक्चर करणारे. भंपक कुठला!’’ इति युव्या

आणि जीतनं खरंच तिच्या बुलेटच्या दोन्ही चाकांचं फुस्स करुन टाकलं होतं.

………

*2*

कॉलेजचा शेवटचा तास ऑफ होता म्हणताना अमेया आणि प्रेशा दोघीही घरी निघाल्या. पार्किंगमध्ये आल्या तर बुलेट साफ बसलेली तिला दिसली.

‘’आयचा घो! हे कसं झालं?’’ अमेयाचा बाळबोध प्रश्न

‘’मला बरोबर माहीतेय. तू इथंच थांब. आपण गाडीवरुनच जाणार आहोत. आलेच मी.’’

आणि ती तरातरा जीतच्या वर्गाकडे निघाली. माघून अमेया तिची समजूत काढत की जाऊ आजचा दिवस चालत. गेल्यावर सदाकाकाला पाठवून देऊ ना गाडी आणायला. पण ऐकेल ती प्रेशा कुठली? जीन्स, फुल बाह्यांचा पांढरा शर्ट, त्याच्या बाह्या दुमडून कोपरापर्यंत घेतलेल्या, खांद्याला एखाद-दोन वह्या राहतील एवढीशी सॅक लटकवलेली प्रेशा आपल्या वुडलॅन्डच्या बुटांचा खाडखाड आवाज करत वर्गाजवळ पोचली तर आपटे सरांचा तास चालू होत. आपटे सर सिमेंट कसं बनतं त्याची रासायनिक प्रक्रिया शिकवत होते.

‘’ सर, एकच मिनिट फक्त!’’ तिनं आवाज दिला आणि सरांनी आत ये वगैरे म्हणण्याआधी ती आत पोचलीपण.

‘’जीत!’’

तो फटकन् उभा राहिला.

‘’ चावी दे!’’

तो मख्खासारखा तिच्याकडे बघत राहिला.

‘’बहिरा आहेस का? तुझ्या स्कूटीची चावी दे!’’

सगळ्या वर्गासमोर असं काही बोलेल अशी अपेक्षा त्याला नव्हतीच. पण, ती असं बोलतेय म्हटल्यावर त्याला जोर चढला. त्यानं अजूनंच मख्खपणा चेहर्‍यावर आणला. तशी ती तरातरा चौथ्या बेंचकडे आली त्याच्या खिशात हात घातला आणि चावी काढून घेतली.

‘’माझ्या बुलेटच्या टायरची पंक्चर काढून आणलीस की तुझी स्कूटी घेऊन जा.’’

‘’सॉरी सर. यु मे कंटिन्यू.’’

जसा आलं तसं इनामदारांचं वादळ परतपण गेलं होतं.

स्वरा…..17/04/2020

…………….

*3*

कॉलेजमधून सुटल्यापासून ते घर येईपर्यंत अमेया एका शब्दानंही प्रेशाशी बोलली नाही. तिनं जे काही आपटे सरांच्या तासाला कांड केलं ते अमेयाला अजिबात आवडलं नव्हतं. आणि अमेयाचा नियम होता एखादी गोष्ट तिला नाही आवडली की ती सरळ मौनव्रत धारण करायची; तेसुद्धा तोवर जोवर प्रेशा त्या कांडांचा निकाल लावत नाही तोवर! हो हा तिचा नियम फक्त प्रेशापुरताच होता कारण तिला माहीत होतं की भडकलेल्या प्रेशाच्या डोक्यात फटकन् काही शिरायचं नाही सांगून. मग त्यावेळी शांत बसणं आणि बाईसाहेबांना शांत होऊ देणं एवढंच हातात शिल्लक राही. आजही तिनं तेच केलं.

‘’ काय तोंडात गौरीची गुळणी धरुन बसलीयस? बोल की आता! मी काही चुकीचं केलेलं नाहीए. त्याला कुणी सांगितलं होतं माझ्या बुलेटची चाकं पंक्चर करायला? म्हणजे कुणी काही केलं तरी मी ऐकून घ्यायचं का? गांधीबाबा आहे का मी? आपल्याला नाही जमणार. ‘’

प्रेशा इतकं सगळं बोलली पण अमेया आपली ढिम्म.

‘’ अगं ए महामाये! बोल की बोल. उघड की तोंड तुझं! आता जर बोलली नाहीस ना तर बत्तीशी उचकटेन मी! ‘’ तिनं रागानं खांद्यावरची सॅक काढून बेडवर भिरकावून दिली. अमेया शांतपणे आत आली. तिनं भिरकवल्यानं बेडखाली अस्ताव्यस्त पडलेली बॅग उचलली आणि आपल्या बॅगसोबत नीट जागेवर ठेऊन ती बाथरुममध्ये गेली. तिच्या ह्या थंडपणानं वैतागलेल्या प्रेशानं बूट काढून बाथरुमच्या दरवाज्यावर फेकून मारले.

‘’ यार, काही किंमत राहिली नाहीए आबा पाटलाच्या नातीची! लोकं तोंडात गुळणी धरुन बाथरुममध्ये शिरतात राव! ‘’

‘’ कोण म्हटलं आबा पाटलांच्या नातीची काही किंमत नाहीए म्हणून? तिची किंमत तिच्यापेक्षा जास्त मला माहीतेय. पण याचा अर्थ असा होत नाही की ती चुकीची वागत असेल तर ते मी डोळे मिटून मान्य करावं. तू चुकीची वागलीस आणि जोवर चुक सुधरणार नाहीस तोवर मला तुझ्याशी बोलायचं नाही.’’ बाथरुममधून बाहेर येत अमेया म्हणाली.

‘’ यार, अमू अशी नको ना वागूस यार माझ्याशी. तुच सांग मी काय चुकीची वागले? मी त्याच्या गाडीला काही केलं का? नाही ना! फक्त गाडी तर घेऊन आले तीसुद्धा माझ्या बुलेटची चाकं त्यानं पंक्चर केली म्हणून. हो की नाही? चुक त्यानं केली यार आणि तू उगाच मला दोष देतेयस. ‘’ हळूहळू प्रेशाचा पारा वितळायला लागला होता.

टॉवेल अडकवून ठेवून दारातूनच आईला काहीतरी खायला आण असं ओरडून सांगून ती प्रेशाच्या शेजारी येऊन बसली.

‘’ चल मान्य करुया की तो चुकीचा वागला. त्यानं तुझ्या बुलेटची चाकं पंक्चर केली. पण, मग तू कितपत बरोबर वागलीस? आपटे सर शिकवत असताना तू ज्या पद्धतीनं त्यांच्या वर्गात शिरलीस ते बरोबर होतं? तू कॉलेजच्या संस्थापकांची नात आहेस म्हणून तुला कसंही वागण्याचा परवाना मिळत नाही. आणि जीतशी जशी वागलीस वर्गात त्यानं सगळ्या वर्गासमोर त्याची काय इमेज तयार झाली? ‘’

‘’तुला लै च पुळका आहे यार त्याचा! आणि मला लेक्चर अजिबात द्यायचं नाहीस हां! मी नाय ऐकून घेणार. ‘’

‘’ऐकून घ्यावं लागेल. माती खाल्लीयंस ना उकरुन उकरुन? मग ऐकून घ्यावं लागेल. आणि नसेल ऐकून घ्यायचं तर अमेया मेली असं समजायचं आणि फुटायचं इथून. चुकीच्या वागणार्‍या माणसांसोबत रहायला मला आवडत नाही. ‘’

कडू कारल्याच्या रसाचा घोट घेतल्यासारखं तोंड करुन प्रेशा हाताची घडी घालून बसली. अमेयाच्या लक्षात आलं की तिचा बॉल बरोबर नेटमध्ये गेलाय.

‘’ सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे की मी तुला लेक्चर देत नाहीए. माझ्या मैत्रीणीला कुणीही नावं ठेऊ नयेत म्हणून मी धडपडते इतकंच. तू संस्थापकांची नात म्हणून कॉलेजमध्ये दादागिरी करतेस असं कुणी म्हटलं तर मला ते अजिबात आवडणार नाही. उद्या तू आपटे सरांना जाऊन सॉरी म्हणशील. ‘’

प्रेशानं मान डोलवली. कारण तिच.याकडे त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तिला पुन्हा मौनव्रताचा सामना करायचा नव्हता.

‘’ आता मुद्दा नंबर एक. आपलं घर अगदी दहा मिनीटांच्या अंतरावर आहे. कशाला हवी होती तुला त्याची गाडी? घरी आली असतीस आणि सदाकाकाला पाठवलं असतं फोन करुन गाडी आणायला तरी चाललं असतं ना! आणि तुला काय माहीत की त्यानेच चाकं पंक्चर केलीत म्हणून? तू बघितलंस का? ‘’

प्रेशा काही बोलणार इतक्यात अमेयानं तोंडावर बोट ठेवून गप्प बसायची खूण केली.

‘’ मुळात सुरुवात तू केलीस; बरोबर ना! लावली असतीस एक दिवस दुसरीकडे गाडी तर काय आभाळ कोसळणार होतं का? ‘’

आता मात्र प्रेशा नियम मोडून बोललीच, ‘’ मी का म्हणून चालवून घेऊ? रोज तिथंच लावते ना गाडी मी? मी जाते का दुसर्‍या कुणाच्या जागेवर गाडी लावायला? आणि आज त्यानं लावली, उद्या कुणी दुसरा लावेल. मी काय रोज सगळ्यांना समजवत बसायचं का? अशानं माझा काही वट नाही रहायचा.’’

‘’ कशाला रहायला हवाय तुझा वट? आणि तुझा वट रहावा म्हणून तू दुसर्‍याचं नुकसान करणार का? ‘’

‘’ हे बघ ए अमे! मी कुणाचं नुकसान केलेलं नाही. उलट माझंच नुकसान झालंय. मुळात मला एक गोष्ट सांग तुला त्याची एवढी का काळजी वाटते गं! आणि असं काय नुकसान केलं मी त्या बिचार्‍याचं म्हणे? ‘’

‘’ यार, तू मला दरवेळेस अशी मुद्दा-मुद्दा खेळायला लावणार का? तुला माहीतेय तो कुठे राहतो? त्याचं घर जवळ आहे की लांब? की तो कॉलेजच्या हॉस्टेलवर राहतोय? कसा जाणार तो? त्याच्या खिशात पैसे आहेत की नाही? आणि त्यात त्याच्या वाट्याला ठेवलीस तुझी पंक्चर झालेली गाडी! आता मला सांग तो हे सगळं कसं मॅनेज करेल? ‘’

‘’ हे बघ अमू, तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे ! पण जाऊ दे! तू भी क्या याद करेगी सिमरन! किस दानी इन्सान सें तेरा पाला पडा है। जा फ कर दिया। ‘’

‘’ यार गलती किसकी और माफी देखो कौन दे रहा है। ‘’ असं म्हणत अमेयानं तिला मिठी मारुन वादावर पडदा टाकला पण पिक्चर अभि बाकी है दोस्तो कारण हा वाद मालिनी काकू अर्थात अमेयाच्या आईनं ऐकला होता. आता तिची पाळी होती या दोघींची शाळा घ्यायची.

‘’ चांगले धंदे चाललेत हं दोघींचे कॉलेजात जाऊन. असा लोकांच्या पोरांना त्रास देताय होय? काही खायला प्यायला मिळणार नाही जोवर तुम्ही त्या मुलाची गाडी परत करत नाही तोवर. त्याची गाडी जाऊन त्याला परत द्या जिथं कुठं असेल तिथं जाऊन. आणि मी आबांना घरी फोन करुन कळवते गाडी पंक्चर झालीय सदाला पाठवा म्हणुन. जा आता. पळा लवकर. ‘’

स्कूटीला किक मारताना प्रेशा म्हणाली, ‘’ यार अमू तुमच्या घरात सगळी अशी संविधानिक माणसं आहेत का भरलेली? ‘’

तिला टपली मारुन गाडीवर बसत अमेया म्हणाली, ‘’ तुला जसं काही आताच कळलं ना हे! ‘’

त्या दोघी कॉलेजवर पोचल्या तर कॉलेज सुटलं होतं आणि नंदा शिपाई सोडून दुसरं कुणी तिथं दिसत नव्हतं.

 ‘’ नंदा, तो सकाळचा पोरगा गेला काय रे? काही माहीतेय का कुठं राहतो ते? ‘’

प्रेशानं गेटवरुनच मोठ्या आवाजात नंदाला विचारलं. तसा काडीनं कान खाजवत बसलेला नंदा म्हणाला, ‘’ ते पोरगं होय? ते तिकडं पुला पलिकडच्या बॉयज हॉस्टेलवर राहतंय ताई! ‘’नंदा वयानं मोठा असला तरी आबांची नात म्हणून तिला ताई म्हणायचा.

दोघी तशाच पुढे जाऊन पुल पार करुन बॉईज हॉस्टेलवर गेल्या. दुडके तसाही माशा मारत बसला होता स्टूलावर आणि जांभया काढत होता. आत जाताच प्रेशानं त्याला गदगदून हलवलं आणि विचारलं, ‘’ ए दुडके, तो जीत जैतकर कुठल्या रुमात राहतात रे! ‘’

पाटलांचं वादळ शिरलंय म्हणताना दुडके खाटकन् जागा झाला.

‘’ थांबा. थांबा ताई मी आणतो बोलवून. ‘’ असं म्हणत जिन्यात जाऊन दुडकेनं हाक मारली. ‘’ सावंत, जरा त्या 5 नंबरमधल्या जैतकरला बोलव रे! ‘’

जीत खाली आल्यानंतर अमेयानं प्रेशाला त्याची माफी मागायला सांगितली. ती काही पुढे येत नाही म्हटल्यावर ती स्वतःच पुढे आली. त्याच्या हातात गाडीची चावी. दिली आणि म्हणाली, ‘’ सकाळी प्रेशा तुझ्यासोबत जे काही वागली त्यासाठी मी माफी मागते. ही गाडीची चावी. गाडी लावलीय बाहेर. फ्रेंन्डस्? ‘’ तिनं मैत्री करण्यासाठी हात पुढे केला. जीतपण त्याचा हात पुढे करणार इतक्यात प्रेशानं तिला मागे ओढलं.

‘’ जा! जा! आम्हांला नाही काही तुझ्याशी मैत्री बित्री करायची. आज काकूआई आणि या महामायेमुळे तुला सॉरी म्हटलंय. परत नाही म्हणणार. आणि हो आताच सांगून ठेवते माझ्या जागेत गाडी लावायची नाही तुझी. नाहीतर तुझ्या गाडीसकट हाकलून देईन तुला मी. ‘’ असं म्हणून ती अमेयाला ओढत घेऊन गेली. पण तेवढ्यातही अमेया म्हणालीच त्याला, ‘’ हिच्या धमक्यांना घाबरु नकोस रे जीत! मी आहे तोवर तुला ही काही करणार नाही. ‘’

जीतनं हसतंच त्यांच्याकडे बघत दुडकेला विचारलं, ‘’ काय हो दुडके, कसं काय ऍडमिशन दिलं कॉलेजनं या अशा मुलीला? ‘’

दुडकेनं त्याच्याकडे आश्चर्यानं बघत विचारलं, ‘’ कॉलेजचं नाव नाही का लक्षात? ‘’

‘’ म्हणजे? ‘’

‘’ म्हणजे काय? बी. जी. पाटील; बळवंतराव जयवंतराव पाटील.तिच्या बापाच्या नावानं तिच्या आज्यानं म्हणजे आबा पाटलांनी बांधलंय ते कॉलेज! तिला कोण नाही म्हणंल का? पण, पोरीच्या असल्या वागण्यावर जाऊ नका. लै प्रेमळ हाय ती. फणस हाय एकदम.ज्याला जीव लावलं ना त्येच्यावरुन जीव ओवाळून टाकलं असली हाय ती. ‘’

दुडकेनं दिलेली ही माहीती मात्र जीतसाठी नवी होती.

19.04.2020

………………

*4*

गेले 7 दिवस रोज जीतची स्कूटी तिथंच लागत होती; प्रेशाच्या बाईकच्या जागेवर. आदल्या दिवशी हॉस्टेलवर येऊन दरडावून गेल्यानंतरही जीत तिथेच लावत होता त्याची स्कूटी. कॉलेजला आल्यानंतर गाडी पार्क करायला गेलेल्या प्रेशानं पुन्हा जीतची स्कूटी त्या जागेवर पाहिली आणि रागानं अमेयाकडं बघितलं. तिला म्हणायचं होतं की हे सगळं ना! तुझ्यामुळे होतंय. पण अमेयानं काय माहीत म्हणून खांदे उडवले. तणतणत प्रेशानं बुलेट दुसरीकडे पार्क केली आणि ती पाय आपटत वर्गात निघून गेली. तिनं एकदाही मागे वळून बघितलं नाही की अमेया येतेय की नाही ते! प्रेशा गेलेली बघताच पार्किंगमधल्या झाडाच्या मागे लपलेला जीत बाहेर आला.

‘’ बघितलंस ना अमेया! तुम्हीच तिचे सगळे हट्ट पुरवता म्हणून ती अशी उर्मटासारखी वागतेय. आता कुठे काय केलं तिने? ‘’

अमेयाला कल्पनाच नव्हती की जीत असं काहीतरी करेल म्हणून.

‘’ वेडा बिडा आहेस का जीत तू? अरे, मी काल असंच म्हटलं तुला की मी असताना ती तुझं काही वाकडं करु शकणार नाही म्हणून. तू परट हा उद्योग का केलास? ‘’

‘’ का केलास? तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात भरलेलं खूळ काढून टाकायला की ही संस्थाचालकांची नात चांगली आहे म्हणून. आता कशी सुतासारखी सरळ आली. बघतोच काय करते ती. ‘’

अमेया त्याला कळवळून म्हणाली, ‘’ जीत नको तिच्या नादाला लागूस बाबा! अरे, तिला नाही तिच्या रागावर कंट्रोल ठेवता येत. उगाच करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असं नको व्हायला. आज ती गप्प आहे कारण मी काल तिच्याशी मौनव्रत धरलं आणि खडसावलं म्हणून. ती दरवेळी माझं ऐकेलच असं नाही. काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार? ‘’

‘’ काही काळजी नको करुस. तिला फार माज आहे ना, हे कॉलेज तिच्या आजोबांनी बांधल्याचा? आता बघ कसा उतरवतो तिचा माज ते! ‘’

‘’ म्हणजे काय करणारेस तू? ‘’ तिथं उभ्या असलेल्या धन्यानं विचारलं.

‘’ रोज इथंच लावणारे मी गाडी. बघतोच कशी माझ्या गाडीला हात लावते ती. नुसता हात लावला की पुर्‍या कॉलेजसमोर तिच्या आहे नाही त्या सगळ्या इज्जतीचा कसा फालुदा करतो बघ! तिला माहीत नाही तिनं कुणासोबत पंगा घेतलाय ते! ‘’

‘’ जीत्या ऐक माझं. तिचं फक्त रागाच्या बाबतीतच तसं आहे. नाहीतर ती खरंच खूप चांगली पोरगी आहे रे! आपल्या अख्ख्या कॉलेजात तिच्यासारखी जीवाला जीव देणारी पोरगी नाही भेटणार. ‘’ युव्यानं त्याला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

पण ऐकूनच घ्यायचं नाही म्हटलं की माणसाला कितीही चांगला युक्तीवाद केला तरी तो पटत नाही. शेवटी बाप वकील असल्याचा काही ना काही प्रभाव जीतवर पडणारच होता ना!

‘’ हे बघा, तुम्ही सगळ्यांनी तिची कितीही बाजू घेतली तरी मी काही माझा मुद्दा सोडणार नाहीए. मला बघायचंच आहे; तुमच्या ह्या चांगल्या मुलीचा राग किती टोकाला जातो ते! ‘’ आणि तो त्याच्या वर्घात निघून गेला. मागे राहिलेल्या युवराज, धनराज, चेतन, अभिषेक, अमेया यांच्या डोक्यावर जाताना चिंतेची तलवार लटकवून गेला.

गेले सहा दिवस प्रेशा फक्त बघण्याखेरीज काही करत नव्हती. रोज जीत गाडी लावून त्या झाडामागे जाऊन उभा राही की आता प्रेशा येईल माझी गाडी बघेल आणि मला तिचा पाणउतारा करण्याची हवी तशी संधी मिळेल. पण सहा दिवसांत एकदाही प्रेशानं त्याच्या गाडीकडे तांबरल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज काहीच केलं नाही. कोण कुणाचा संयम तपासत होतं तेच कळत नव्हतं. कंपुतल्या बाकीच्यांची अवस्था मात्र कधीही ऑक्सिजन लावावा लागेल इतकी बिकट होती. सहा दिवसांत काहीच घडलं नाही म्हणताना एकीकडे जीत निर्धास्त झाला की प्रेशानं तिची हार मान्य केली असावी आणि आता आपण असा कुठला डाव खेळूया जेणेकरुन ती स्वतः माफी मागेल याचा तो विचार करत होता तर दुसरीकडे प्रेशाच्या संयमाचा पारा उच्चांकावर पोचला होता; न जाणो कधी तापमापी फोडून बाहेर पडेल.

आजचा सातवा दिवस होता. तसा काही तो लढतीचा शेवटचा दिवस वगैरे नव्हताच. नेहमीसारखंच जीतनं येऊन गाडी लावली आणि जाऊन झाडामागे उभा राहिला. आजही प्रेशा आणि अमेया प्रेशाच्या बुलेटवरुन आल्या. आपल्या जागेत लावलेल्या जीतच्या स्कुटीकडे तिनं भुवयांचा धनुष्य करुन बघितलं आणि ती त्याच पावली अमेयाला तिथंच सोडून निघून गेली. अमेयाचं लक्ष होतंच. तिनं बघितलं जीतला झाडाआढून बाहेर येताना. आणि ती उखडलीच त्याच्यावर.

‘’ महामूर्ख माणसा! तुझं नाव जीत आहे याचा अर्थ असा होत नाही की तू प्रत्येक गोष्टीत जिंकायलाच हवंयस. तुझ्यामुळे आज माझी इतक्या वर्षांची मैत्री तुटायची भिती वाटायला लागलीय मला. गेले काही दिवस प्रेशा माझ्याशी फक्त कामापुरतंच बोलतेय. ती माझ्या घरीपण येईनाशी झालीय. ‘’

‘’ अरे! एवढं काय वाईट वाटून घेतेयस तू? उलट माझ्यामुळे तू असल्या मुलीपासून वाचतेयस तर माझे आभार मानायचे सोडून मलाच ऐकवतेयस तू? ‘’

ह्याला बोलण्यात काही फायदा नाही म्हणून अमेया निघून गेली.

युव्या,धन्या,अभ्या आणि चेत्यानं त्याच्या आधीच जीतचा नाद सोडून दिला होता.

कॉलेज सुटलं आणि सगळे परत जायला निघाले. पार्किंगकडे मुलांचा बराच घोळका जमला होता जीत पोचला तेव्हा. त्यानं एकाला विचारलं, ‘’ काय झालंय? ‘’ तो म्हणाला, ‘’ कुणाच्या तरी गाडीचा हाफ मर्डर झालाय. ‘’ गाडी म्हणताच तो त्या घोळक्याला बाजूला करत आत शिरला आणि बघितलं तर ती त्याचीच लाडकी स्कुटी होती. ती पार्किंगमधून बाहेर काढून जमीनीवर बेवारशासारखी लोळत पडली होती. तिचे दोन्ही साईड मिरर फुटले होते. नेमप्लेट गाडीपासून सुटून आशाळभूत नजरेनं मालकाला शोधत होती. दोन्ही चाकांनी हवा नसल्यानं राम म्हटलं होतं आणि सीटच्या फाटून चिंध्या झाल्या होत्या. जीतला कल्पनाही नव्हती की त्याच्या लाडक्या गाडीसोबत असं काही होईल म्हणून. त्यानं गाडीची ती अवस्था बघून तिथंच बसकण मारली. हे सगळं त्याच्या अपेक्षेपेक्षा विपरीतच होतं. तो त्या अवस्थेतून बाहेर येण्याआधीच त्याच्या कानांवर प्रेशाचा आवाज पडला.

‘’ आता बरं वाटलं का? त्यादिवशी सांगितलेलं सगळं काय सोनाराच्या नळीसारखं गेलं का या कानांतून त्या कानावाटे बाहेर? खरंतर तुझीच अशी हालत करावं असं वाटत होतं मला पण तू माझ्या गाडीसोबत वाईट वागला होतास म्हणून मिही तुझ्या गाडीसोबतच वाईट केलं. कळलं ना! आता खरी फिटम् फाट झाली. मी हे त्यादिवशीच करायला हवं होतं. पण जाऊ दे! देर आए दुरुस्त आए। आता तू तुझ्या वाटेनं आणि मी माझ्या वाटेनं. परत माझ्या नादाला लागायचं नाही. ‘’

बुलेटवर बसता बसता तिनं तिथं उभ्या असलेल्या धनराजला आवाज दिला.

‘’ धन्या, त्याच्या स्कुटीचं मढ नेऊन त्या रमाकांतच्या गॅरेजला नेऊन टाक. संध्याकाळी सदाकाका त्याचे पैसे देईल. ‘’ आणि ती निघून गेली.

जीत अजूनही त्या धक्क्यातून सावरला नव्हता. त्याच्या आईची शेवटची आठवण होती ती आणि तीचीच त्या नालायक प्रेशानं अशी हालत करुन टाकली होती. राजमाचीकर सरांना भेटायला गेलेली अमेया परत आली तोवर नाटकाचा तिसरा अंक संपून पडदा पडला होता. जीतच्या गाडीची अवस्था बघून तिला कळायला वेळ लागला नाही की हे सगळं प्रेशा नावाच्या दैत्यानं केलंय म्हणून. तिनं एक सुस्कारा सोडत मनाशीच म्हटलं, ‘ तरी सांगितलं होतं मी आधीच याला. ऐकला नाही.’ तिनं जाऊन गाडीजवळ डोक्याला हात लावून उकीडव्या बसलेल्या त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

‘’ तरी मी तुला सांगत होते तिच्या नादाला नको लागूस म्हणून. आता त्या दैत्याला आवरताना माझ्या नाकी नऊ येणारेत. काय अवस्था केलीय बघ तुझ्या गाडीची तिनं! ‘’

जीतला काय बोलावं? कसं वागावं? तेच कळेना. तो मान वर करुन तिला फक्त एवढंच म्हणाला, ‘’ अगं माझ्या आईची होती ती! तिची शेवटची आठवण म्हणून आणली होती मी. ‘’

अमेयानं कसंबसं त्याला सावरलं आणि म्हणाली, ‘’ चल गॅरेजला नेऊ गाडी. ‘’

तिचं बोलणं ऐकून मघापासून तिथंच उभा असणारा धनराज तिला म्हणाला, ‘’ अमेया तू जा घरी. जीतला चेत्या सोडेल हॉस्टेलवर. आणि प्रेशानं मला सांगितलंय गाडी रमाकांतच्या गॅरेजला नेऊन द्यायला. मी ती घेऊन जातो. ‘’

अमेयासाठी प्रेशाचं हे रुप काही नवीन नव्हतंच. तिला तिचा राग आवरता यायचा नाही पण तिला पश्चात बुद्धी मात्र होती आणि तिला कळायचं की आपण चुकीचं वागलोय म्हणून. मग ती प्रायश्चित्त करायला जंग जंग पछाडायची. आताही ती असंच काही करणार याबद्दल तिला काही शंकाच नव्हती. अमेयानं तिला हज्जारदा समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता की नुकसानभरपाई देऊन सगळ्याच चुका क्षम्य होत नाहीत. त्यापेक्षा स्वतःवर थोडा का होईना ताबा ठेवायला शिक.

लहानपणी नदीच्या किनार्‍यावर असणार्‍या वडाच्या झाडाला ती, प्रेशा आणि भिकाजी काकांचा मुलगा राजा सुरपारंब्या खेळत होते. खेळताना बाकीच्या पोरांची होतात तशी यांचीपण भांडणं झाली. होता होता भांडणं एवढ्या टोकाला गेली की प्रेशानं राजाला सणसणीत लाथ मारली. असं काही होईल याची कल्पनाही नसणारा तो त्या लाथेनं पार भेलकांडला आणि वडाच्या घेरदार बुंध्याला जाऊन थडकला. नशीबानं डोळा वाचला कारण शेजारी वडाची बारकी मुळ तुटून त्याची टोकदार काडी राहिली होती. चार टाके पडले. हिच्या ह्या वागण्याच्या धसक्यानं भिकाजीनं पोराला त्यांच्यासोबत खेळायला पाठवणं बंद केलं. स्वतःपण शेतावर कामाला यायचा बंद झाला. हे सगळं प्रेशामुळं झालंय कळल्यावर आबांनी तिला वेताच्या काठीनं चांगली फोकळली. तिला कळत होतं की आपण चुकीचं वागलोय. पण त्या वयात हे प्रायश्चित्त वगैरे काही कळत नाही ना! मग तिला जे बालबुद्धिला सुचलं ते तिनं केलं. दोन दिवस स्वतःला कोंडून घेतलं खोलीत आणि अन्नपाणी बंद करुन टाकलं. आधी आबांनी लक्ष दिलं नाही. पण पोरीच्या काळजीनं माईचा जीव थार्‍यावर राहिना. तिनं गळ घातली म्हणून आबा स्वतः तिची मनधरणी करायला गेले.

‘’ लेकरा चुकलं माझं तुला लै मारलं मी. पण आसं चकीचं वागू नै बाळा! उघड. दार उघड. माईनं तुला आवडती म्हणून गावार केलीय बघ शेतातली. भिकानं आणलीय तोडून. त्यानं माफ केलं लेकरा तुला. उघड की बाळा दार. ‘’

पण आतनं हू नाही अन् चू नाही म्हणताना आबांनी गड्याला सांगून दार फोडलं तर आत ही बया बेशुध्द पडलेली. पहिल्यापासनं अशीच. असले तिरपागडे धंदे करायचे आणि आजूबाजूच्यांना त्राहि माम् करुन सोडायचं. विचारांच्या गर्तेत अमेया घरी पोचली. तिनं आईला कॉलेजमधला हा प्रकार कळू दिला नाही नाहीतर तिचा जीव उगाच दोघींच्या काळजीनं वरखाली झाला असता. तिनं सॅक खोलीत ठेवली. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आईला म्हणाली आलेच आबांकडं जाऊन.

22.04.2020

………

*5*

आबांच्या घराकडे निघालेल्या अमेयाचं विचारचक्र पुन्हा सुरु झालं. ह्या बयेला दोन दिवस दवाखान्यात ठेवून सलाईन वगैरे लावून बरं करुन घरी परत आणलं. इतकं होऊनही प्रेशाचं तोंड काही उघडलं नाही. ते उघडायचं ते फक्त खाण्यासाठी कारण माई सारखी तिच्या मागं लागलेली असायची की काहीतरी खाऊन घे म्हणून. हो! नाहीतर पुन्हा ते बेशुध्द प्रकरण होईल याची माईंना भिती वाटत होती. शेवटी किती झालं तरी ती आबामाईंची एकुलती एक लाडकी नात होती ना! बळवंत आणि त्याची बायको सुहासिनी एका अपघातात गेल्यानंतर त्यांनीच तर तिला लहानाची मोठी केलेली. हा रागाचा प्रकार मात्र प्रेशानं बापाकडनं उचलला होता. तोही असाच होता. एवी खूप शांत असायचा पण चिडला की सगळ्यांना दे माय धरणी ठाय! असं करुन सोडायचा. त्यादिवशीपण असंच आबांसोबत कशावरुन तरी त्याचं वाजलं आणि सुहासिनीला शाळेतून घेऊन येताना त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यातच त्या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. ही गोष्ट आबांच्या मनाला फार लागली पण त्यांना कल्पनाच नव्हती की बळवंत गेला असला तरी रागाच्या रुपानं तो प्रेशामध्येच राहत होता. हे सगळं भिकाजी प्रकरण त्याचाच परिपाक होता. आणि आबांनीही हे सगळं पहिल्यांदाच अनुभवलं होतं.

प्रेशा जेवढी हुशार होती तेवढीच तापट होती. आणि महत्वाची गोष्ट ही होती की ती जेवढी तापट होती त्यापेक्षा जास्त प्रेमळ होती. शेवटी तिच्या ह्या मुकेपणाला शरण जाऊन आबांनी भिकाजीला बोलवून आणलं. भिकाजी आला तेव्हा प्रेशा झोपाळ्यावर बसली होती आणि माई तिला काहीतरी खाऊन घे म्हणून मागे लागली होती. भिकाजीला आलेला बघितला आणि प्रेशानं त्याच्याकडं धाव घेतली. ती धावत आली तिच त्याच्या पायांवर पडली आणि कुणाला काही कळायच्या आतच तिनं दणादणा आपलं डोकं आपटायला सुरुवात केली. आबा आणि भिकाजी थोड्यावेळासाठी हतबुध्दासारखे बघत राहिले. आपल्या पायाजवळ रक्ताची धार लागलेली दिसताच आधी भिकाजी भानावर आला.

‘’ अगं ए पोरी! अगं काय करतीस हे? असं काही करु नको बाई. उठ. उठ. मी कवाच माफ केलंय तुला.’’ असं म्हणून त्यानं तिला खांद्याला धरुन उचलली आणि तसाच डॉक्टरकडे धावत गेला. त्याचा पांढरा शर्ट सगळा प्रेशाच्या रक्तानं लाल झाला होता. असली ही पोरगी ईद्राट होती. मध्यंतर नावाची गोष्टच बहुतेक तिच्या आयुष्यात नव्हतं. सहा टाके पडतील एवढी खोक पाडून घेतल्यानंतर हे भिकाजी प्रकरण एकदाचं मिटलं होतं. विचारांच्या गर्तेत अमेया आबांचं घर सोडून नदी किनार्‍याच्या वाटेवर चालत होती. कारण तिला लहानपणापासून प्रेशाची असली सगळी ठिकाणं माहीत होती. अमेया नदीच्या पुलाजवळ पोचली तर तिथं थोड्याशा अंधार्‍या जागेत प्रेशा गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. अमेयानं जवळ जाऊन प्रेशाच्या डोक्यावर हात ठेवला. तशी प्रेशानं मान वर करुन बघितलं. रडून रडून सुजलेले, लालभडक झालेले डोळे, गालांवर पाण्याचे ओघळ सुकून त्याचे डाग पडलेले अशा अवस्थेतल्या प्रेशानं एकदम अमेयाचा हात धरला आणि म्हणाली, ‘’अमू मी फार वाईट आहे ना गं! सारखं कुणा ना कुणाचं नुकसान होतं ना माझ्यामुळं? मी कुणाला आवडत नाही ना! अशी वागते म्हणून? मलाच कंटाळा आलाय आता ह्या सगळ्याचा. संपवून टाकते सगळं. ह्या नदीतच जीव देते मी! नाही जगायचं यार मला; नाही जगायचं!’’ ‘’मग जा मर. बघू तरी कशी मरतेस ती! ‘’ अचानक अमेयाच्या तोंडून हे असं काही ऐकून प्रेशा चमकून तिच्याकडं बघतच राहिली आणि पुढच्याच क्षणाला तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकवत अमेयानं तिच्या कानाखाली आवाज काढला होता. ‘’हरामखोर! माज चढलाय का तुला जास्ती? मरणाच्या गोष्टी करतेस? आणि तू मेलीस की तुझ्यामागं त्या म्हातार्‍यांनी काय उरलेलं आयुष्य रडतकुढत घालवायचं का? लेक आणि सून अपघातात गेल्यावर त्यांच्या एकमेव खुणेला; तुला डोळ्यांची निरांजनं आणि हाताचा पाळणा करुन वाढवलं ते याच दिवसासाठी का? उठ इथनं. आणि परत जर इथं दिसलीस मला तर मीच ढकलून देईन तुला नदीत.’’ असं म्हणून अमेयानं तिचा हात धरला आणि तिला फरफटत घरी घेऊन निघाली. प्रेशा मात्र द्वाड गायीला गोपाळानं घरी न्यावं तितक्या शांतपणे मान खाली घालून तिच्यामागनं चालत होती. वाटेत तिला अमेयाच्या सुचना चालूच होत्या. ‘’प्रेशे, जे काही केलंयसं ना ते सगळं स्वतंच्या तोंडानं आबांना सांग. खरंतर आतापर्यंत सांगायला हवं होतंस. पण, तू अजून इथंच म्हणजे तुझ्याकडून आबांना यातलं काही कळलेलं नसणार हे तर पक्कं आहे. आता देवाचीच प्रार्थना कर की त्यांना कॉलेजातून ह्यातलं काही कळू नये. नाहीतर तुला आधीच त्यांनी सांगितल्याप्रमाणं ते तुझं कॉलेज बंद करुन टाकतील.’’

मात्र त्या दोघींना याची अजिबातच कल्पना नव्हती की काळे सरांनी हे पुण्यकर्म आधीच करुन टाकलंय म्हणून. प्रेशा निघून गेल्यावर अमेया घराकडे गेली. धन्या जित्याची गाडी घेऊन रमाच्या गॅरेजकडे निघाला. चेत्यानं त्याला तिथंच थांबायला सांगून तो पुस्तक बदलायला लायब्ररीत गेला. लायब्ररीत जायला ऑफिसजवळून जायला लागायचं. त्यानं त्याचं पुस्तक बदलून घेतलं आणि तो परत येत होता; तर त्याला ऑफिसमधून काळे सरांचा आवाज ऐकू आला. त्यानं अंदाज लावला की त्यांनी बहुतेक आबांना फोन लावलाय. कारण त्यानं ऐकलं की ते म्हणत होते प्रेशाचे हे उद्योग बरोबर आहेत का? तुम्हांला महणून सांगतोय तरी! नाहीतर अशा मुलीला आम्ही केव्हाच काढून टाकलं असतं कॉलेजमधून. झालं चेत्या तिथून सुसाट वेगानं धावत सुटला तो थेट जित्याकडं आला आणि धापा टाकत त्याला म्हणाला, ‘’ज, ज, जित्या! आताच्या आता मा झ्याबरोबर आबांच्या घ री चल. आता फक्त तूच प्रेशाला वाचवू शकतोस… कारण काळे सरांनी आताच तिनं केलेलं तुझ्या गाडीचं सगळं कांड आबांना फोन करुन कळवलंय. आज काय आबा तिला ठेवत नाहीत. तिला कॉलेजातून काढून टाकतील ते! तिचं सगळं करिअर संपून जाईल यार!’’ ‘’बरंच झालं की मग. अशांना कॉलेज बिलेजात ठेवलंच नाही पाहिजे. काही आचार विचार असतो की नाही कृती करण्याआधी? असं कसं दुसर्‍याचं नुकसान करुन टाकतात? आणि माझी गाडी? ती तर माझ्या आईची शेवटची आठवण होती. बघितलीस ना तिनं काय गत केली तिची ते! मी अजिबात असल्या पोरीला वाचवण्याची शिफारस करायला येणार नाहीए. आणि एक सांग रे मला सगळेच कसे तिच्या बाजूनं बोलता? तिच्यासाठी धडपडता? ‘’ चेत्यानं त्याची गचांडी पकडून त्याला जबरदस्ती गाडीवर लादला आणि वरात आबांच्या घराकडं निघाली. ‘’ हां, भडव्या आता बोल. काय म्हणत होतास? आम्ही सगळी तिची बाजू घेतो? तिच्यासाठी धडपडतो? तुला काय माहितेय रे रांड्या तिच्याबद्दल आं? तू तर आता आलास कॉलेजात, तेव्हाच भेटलास ना तिला? आम्ही सगळे तिला लहानपणापासून ओळखतोय. एकत्र लाहानाचे मोठे झालोय आम्ही. तुला कल्पना तरी आहे का ती काय काय करते ती? आबांनी तिला बॅंकेत खातं काढून दिलंय. पण आबा जेवढा पैसा त्याच्यात टाकतात तो सगळा पैसा ती दुसर्‍यांच्या मदतीसाठी वापरते. तिला म्हटलं स्वतंसाठी खर्च कर तर म्हणते कपडालक्ता, जेवणखाण, शिक्षण सगळं तर आबा करतायत की! मग मला कशाला पैसे लागतायत? सदा काका सांगतो बळवंतकाकापण असाच होता. तिच्या त्या खात्याच्या पैशातनं इथल्या उसतोडणी कामगारांच्या पोरांसाठी अंगणवाडी चालते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होते. मोठ्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारं सगळं सामान आणलं जातं आणि हे सगळं दत्ताजीअप्पांच्या मदतीनं आबांना न कळता करते ती. आणि मी, अमेया, युव्या, धन्या आम्ही सगळेच तिला यात मदत करतो. भाडखावं पैला पंगा तिच्याबरोबर तू घेतलास तिच्या बुलेटची चाकं पंक्चर करुन कळलं का? ‘’ आत्ता कुठं जीतच्या टाळक्यात प्रकाश पडला की ही अख्खी गँग नेमकं काय काय करते ती.

ते आबांच्या घराकडं पोचले तर आबा झोपाळ्यावर बसले होते. आणि प्रेशा चार पायर्‍या सोडून खालच्या अंगणात मान खाली घालून अमेयाचा हात धरुन उभी होती. दत्ताजीअप्पा आणि सदाकाकापण तिथंच उभे होते. ‘’काय इचारतोय मी? कशापायी केला येवढा कांगावा? निस्ती गाडीची चाकं पंक्चर झालती म्हून येवढा धंदा कराया तू काय शेट सायबीण लागून गेली का? कुनाच्या जोरावर येवढा माज दाखवती तू? अप्पा, ह्या सदाला ध्या रम्यानं सांगितलेलं पैसे. आन सदा गुमान जाऊन धिवून ये पैसं. पोटच्या उमाळ्यानं पोरीची बाजू घ्यायला गेलास तर तुलापण भाईरचा रस्ता दाखवीन मी. कळलं का न्हाई?’’ सदा मुकाट्यानं अप्पांकडून पैसे घेऊन तिथंन निघाला आणि आबांनी परत प्रेशाची उलटतपासणी सुरु केली.

आत प्रेशा त्यांना घडलेलं सगळं रामायण सांगत असताना बाहेर पडणार्‍या सदाला भिंतीला टेकून उभी राहिलेली ही दोघंजणं दिसली. सदानं डोळ्यांनीच त्यांना प्रेशाला वाचवण्याची विनंती केली आणि तो निघून गेला. आतमध्ये आबांचा आवाज टीपेला पोचला होता.

‘’ हे दिवे लावताय का कालिजात जाऊन? एक धेला येतो का कमवता? मोठ्या तोंडानं सदा पैसं दिलं म्हणून सांगून आलीस ते? तुझ्या अंगावरची कापडं आनी तुझ्या कालेजाची फीपण मीच भरतोय आजून. काय सांगितलं होतं मी कालेजला जायच्याआधी? हाय का ध्यानात? असलं कायबी धंदं केलं तर कालेज कायमचं बंद करीन म्हणून?’’

आणि तेवढ्यातच चेत्याच्या लक्षात येण्याआधी जीत धावत सुटला. ‘’आबा, थांबा आबा. असं काही करु नका आबा. ‘’

त्याच्या आवाजानं आमेया आणि प्रेशापण दचकलेच.

‘’ कोन हाय कोन तू? ‘’ आबांनी त्याला दरडावल्या आवाजात विचारलं.

‘’ आबा, मी मी मी जीत जैतकर. ज्याची गाडी हिनं खराब केली. मी मी माफ केलं तिला. तुम्हीपण करा की एक डाव. मी घेतो तिची जिम्मेदारी. ती परत अशी नाई वागणार. ‘’ त्यानं हळूच सुचक नजरेनं अमेयाकडं पाहीलं. तिनंही मग त्याचं म्हणणं उचलून धरलं. मागोमाग आलेल्या चेतनपण आबांकडं तिची रदबदली केली. आता इतकी सगळीजण प्रेशाच्या बाजूनं बोलतायत म्हटल्यावर आत उभारुन हे सगळं ऐकणार्‍या माईंना जोर चढला. ‘’ आता काय लेंगा सुटायची वाट बघता काय? तम्हांला सवंच लागलीय सगळं उकरुन उकरुन समद्यास्नी पार नागडं करायची. पोरं म्हणतायत येवढं तर करा की येक डाव पोरीला मापी.’’ आता हायकोर्टाचाच आदेश आला म्हणताना आबांनी परत एकदा तंबी देऊन प्रेशाला सोडून दिलं.

25.04.2020

……….

*6*

आबा उठून गेले तशी त्या तिघांनी प्रेशाला बकोट पकडून बाहेर आणली. ‘’ हे बघ, प्रेशे! तुला सगळ्यात आधी जीतचे आभार मानायला हवेत; आज तो होता म्हणून तुझं कॉलेज आणि करिर दोन्ही वाचलंय. ‘’ अमेया आणि चेतन एका सुरात म्हणाले. तेवढ्यात जीत त्यांना म्हणाला, ‘’ माझ्या गाडीची दुर्दशा हिनं कॉलेजमध्ये केली होती. तेव्हा ही माफीची जाहीर सभा उद्या कॉलेजातच होईल. सध्या इथून चला. ‘’ ते तिघेही निघून गेले.

दुसर्‍या दिवशी जेव्हा प्रेशा अमेयाला घेऊन कॉलेजात पोचली तर जीत सोडून बाकी सगळी गँग म्हणजे चेतन, युव्या, धन्या, अभि सगळे आले होते. प्रेशा आल्याबरोबर सगळ्यांनी तिला घेराव घातला. चेतन सोडून सगळ्यांना काल वाड्यात काय झालं ते ऐकायचं होतं. पण, प्रेशाला ते सगळं सांगण्यात काही इंटरेस्ट नव्हता आणि अमेयाची नजर सगळ्या कॉलेजभर फक्त जीतला शोधत होती. आता प्रेशा काही बोलत नाही म्हटल्यावर चेतननं पुढाकार घेतला आणि सगळ्यांना रंगवून रंगवून कालचा किस्सा सांगयला लागला. कसा त्यानं काळे सरांचा फोन अर्धवट ऐकला आणि अंदाजपंचे धागोदर्से जीतचं बकुटं पकडून त्याला गाडीवर टाकून वाड्यावर नेलं. मग तिथं कसे आबा प्रेशाच्या सात पिढ्यांचा उध्दार करत होते हे तर तो अगदी रंगात येऊन सांगत होता.

‘’ तुम्हांला माहितेय का? मी! मी होतो म्हणून मी जीतला आबांकडं प्रेशाची रदबदली करायला लावली. नाहीतर फिनिश… ‘’ त्यानं गळ्यावरुन हात फिरवला. अमेया त्याचं हे सगळं पितळ उघडं पाडणारच होती इतक्यात गेटमधून नंदानं चेतनला आवाज दिला.

‘’ ए चेतन, आला का हिकडं. तुज्यासाठी जैतकरचा फोन हाय हॉस्टेलवरनं. ‘’ आणि तो त्याच्या कामाला निघून गेला.

‘’ आलो. आलो. ‘’ असं म्हणून चेत्यानं तिथनं पळ काढला. तो तिथनं आत गेला असलं नसलं इतक्यातच सदा जीतची दुरुस्त केलेली गाडी घेऊन आला. गाडी आता एखाद्या मेकओव्हर झालेल्या मुलीसारखी दिसत होती. तिचे दोन्ही आरसे नवे बनवून चकचकीत केले होते. नंबरप्लेटसुध्दा हसायला लागली होती. आणि पुर्‍या गाडीला नवा रंग दिल्यानं ती भलतीच हॉट दिसत होती. सदा गाडी घेऊन आला, पार्किंगमध्ये लावली, चावी प्रेशाच्या हातात दिली आणि निघून गेला. सगळेजण त्या नव्या होऊन आलेल्या गाडीला अगदी जवळून बघत होते. त्यांच्यात आता एकच चर्चा चालू होती. रम्याच्या हातात जादूय यार! काय कम्माल बनवलीय गाडी! ते सगळेजण गाडी आणि रम्याच्या कामाचं कौतुक करत असतानाच चेत्या प्रेशाच्या नावानं कोकलत तिथं आला.

‘’ ए प्रेशे! हुश्श्! ऐक गं! आताच्या आता गाडी घेऊन हॉस्टेलवर जा. जीत्या तुझी वाट बघतोय. त्यानं तुझ्यासाठी निरोप दिलाय की त्याला तू हॉस्टेलवरुन घेऊन ये कॉलेजला. नाहीतर तो येणार नाही म्हणालाय आणि ऍबसेंन्टीचं कारण नो व्हेईकल अव्हेलेबल असं सांगेल काळे सरांना. ‘’ प्रेशानं हा सगळा निरोप ऐकून नाक मुरडलं आणि ती स्कूटी चालू करायला लागली.

‘’ ए थांब, थांब. तुझी बुलेट घेऊन जा. त्याची गाडी इथंच ठेव. ‘’

चेत्यानं असं सांगितल्यावर तिनं झक मारत बुलेटला किक मारली आणि ती हॉस्टेलला निघाली. ती हॉस्टेलला पोचली तर दुडके जीतमुळं हैराण झाला होता. त्याला इतका उशीर झाला तरी टाकीचं पाणी बंद करता येत नव्हतं कारण जीतनं त्याची इंजिनरुमची चावी लपवून ठेवली होती. आणि तो स्वतः बिन आंघोळीचा दार लावून रुममध्ये बसला होता. आणि सारखी एकच चौकशी करत होता की प्रेशा आली की नाही. जशी प्रेशा पोचली तसा दुडकेंनं श्वास सोडला.

‘’ आला काय ताई! काय ओ ते पोरगं उत आणलाय निस्ता सकाळपास्न मला त्यानं. इंजिन रुमाची चावी काढून घेतलीय बगा. आणि आपण आंघोळ पांघोळ न करता रुमात बसून र्‍हायलाय बगा. मला म्हनला तुमी आला की सांगा मग आंघुळीला जातो. बरं झालं आलायसा. आलोच बगा मी. ‘’ तो सायकली लावलेल्या जागेत आला आणि त्यानं जीतच्या शेजारच्या रुमात राहणार्‍या सुशांतला हाक मारली.

‘’ अयं, सुश्या, ए सुश्या. आयकलं का सुश्या? ‘’

असं दोनतिनदा दुडकेनं कोकल्यवर हाफ चड्डीवर बनियन घातलेला सुश्या चष्मा नीट करत बाहेर आला.

‘’ काय झालं दुडके? कशाला माझ्या नावाचा एवढ्या मोठ्यानं जप करताय? ‘’ हा निमशहरी भागात राहणारा असल्यानं त्याला कोल्हापूरकडची भाषा फार जमायची नाही.

‘’ आरं, त्या जैतकराला सांग म्हणावं प्रेशा ताई आल्यात. आता री बाबा आंघूळीला जा आन् माजी इंजिन रुमाची चावी दे म्हणावं. ‘’

सुशांतनं 5 नंबरचा दरवाजा ठोठवून जीतला प्रेशा आल्याचं सांगितलं आणि तो त्याच्या रुममध्ये निघून गेला. जीतनं ते ऐकलं आणि तो पटकन् उठून आंघोळीला गेला. फटाफट आंघोळ आटपून कपडे करुन तो बाहेर आला. दारातूनच ओरडून त्यानं खाली उभ्या प्रेशाला हाक मारुन ऑर्डर सोडली.

‘’ प्रेशा वर ये. ‘’

ती ऐकून दुडके हादरलाच. तो तिला थांबवेपर्यंत ती वरच्या मजल्यावर पोचलीपण होती. जीतनं आतनं सॅक आणली आणि तिच्या खांद्याला अडकवली.

‘’ चल. आज एवढंच आहे. ‘’

ती दोघंही खाली उतरली तर दुडके वसकलाच त्यांच्या अंगावर.

‘’ आता काय माझी नोकरी घालवता का? सक्काळधरनं पाक वात आणलाय ह्या पोरानं मला. ‘’

प्रेशानं त्याला हात जोडले, कान पकडले. पण तिला काहीही बोलू न देता जीतनं तिला मानगूट धरुन गाडीकडं ओढत आणलं. त्याला हॉस्टेलवरुन ती घेऊन कॉलेजला आली तर त्यांची गँग अजूनही पार्किंगमध्येच पडीक पडलेली.

‘’ ए काय रे! अजून इथं काय करताय तुम्ही लोक? गेला का नाहीत पिरिएडला? ‘’ प्रेशा तिच्या मॉनिटरींग अवतारात परत आली होती.

पार्किंगमधल्या गाड्यांवर ठिय्या मांडलेल्या अभ्या म्हणाला, ‘’ आयला, असं कसं? तासाला गेलो असतो तर तुमची रासलिला कशी बघायला मिळाली असती? ‘’ हसतच त्यानं युव्याला टाळीसाठी हात पुढं केला; ज्याच्यावर अमेया सोडून सगळ्यांनी हात मारला.

तेवढ्यातच जीतनं, ‘’ ए हराम्या! ‘’ असं म्हणून त्याची गचांडी धरली. ‘’ साल्या, तुला काय हे प्रेमाचे चाळे वाटायला लागलेत का? वाह्यात कार्ट्या! ‘’

यांच्या या सगळ्या गोंधळात प्रेशा निघून चालली होती तर जाणार्‍या प्रेशाचा त्यानं धरुन तिला थांबवलं.

‘’ ऐका रे! भाड्यांनो. प्रेशाचं आणि माझं काहीही प्रकरण नाहीए. उल्ट कालपासून ती माझी लै भारी मैत्रीण झालीय. मी आधी तिचा लै राग राग केला. मला तुम्ही सगळे समजवून सांगत होतात पण मी तुमचं ऐकलं नाही. आणि बरंच झालं मी नाही ऐकलं ते! म्हणून तर काल जेव्हा मला चेत्यानं प्रेशाच्या सगळ्या उद्योगांबद्दल सांगितलं तेव्हा मला साक्षात्कार झाला आणि मी तिला मैत्रीण बनवून टाकली. नाहीतर तोवर मला वाटायचं की हे तलेवार घराण्याचं लाडावलेलं लेकरू आहे म्हणून. ‘’

‘’ ए बास ए बास. लै लेक्चर पाजलं तू. चल चल. हटा सावन की घटा. बोअर नको करु यार तू. ‘’ सगळे एका सुरात ओरडले.

‘’ जीत्या लेका काल तुझ्या लाडक्या गाडीसोबत ह्या बयेनं येवढं मोठं कांड केलं तरी तू गुमान कसा बसलाय राव? ह्या प्रेशीला शिक्षा केली पायजे कळलं का? ‘’ युव्यानं प्रस्ताव मांडला.

‘’ होय. होय. प्रेशीला शिक्षा झालीच पाहिजे. ‘’ सगळ्यांनी मुद्दा लावून धरला.

अमेया तिची बाजू घ्यायला जाणार तोच शेजारी बसलेल्या धन्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिच्या कानात कुजबुजला, ‘’ काय गुमान बसून मजा घेता यिना व्हय खेळाची? सारखं काय आपलं वकील वकील व्हायचं? ‘’

‘’ ए धन्या हात धर रे हिचा.’’ जीत्यानं प्रेशाचा हात सोडून धन्याला बजावलं. धन्यानं अमेयाच्या तोंडावरचा हात काढला आणि जीत्यानं सोडून दिलेला प्रेशाचा हात पकडला.

तोवर इथं जीतनं खाली वाकून बोटानं मातीत मोठा गोल काढला.

‘’ प्रेशे, उभी रहा ह्यात. दोन्ही कान धर. आणि जे सांगेन ते मान्य करायचं. उलट उत्तर द्यायचं नाही.’’ जीतनं प्रेशाला बोटानं वर्तुळ दाखवलं. तीपण मुकाट्यानं जाऊन त्या गोलात उभी राहिली.

‘’ अमेया, जा तिच्याशेजारी जाऊन उभी रहा. लै वकीली करायची असते ना तुला तिची. ‘’ जीतनं अमेयाला प्रेशाची वकील करुन टाकली. ‘’ आणि हो! जर काही चुकीचं वाटलं तरचं बोलायचं. मधी मधी तोंड उघडायचं नाही.’’ तिला ही ताकीदपण दिली.

‘’ चेत्या, युव्या, अभ्या, धन्या तुम्ही सगळे माझे साक्षीदार. या साईडला उभे रहा. ‘’ त्यानं त्याच्या मागच्या बाजूला बोटानं इशारा केला. अशी सगळी कोर्टाची तयारी झाल्यावर प्रेशावर जीतनं दावेदार म्हणून गाडीचा खटला चालवायला घेतला.

‘’ मी जीत जैतकर. या खटल्याचा दावेदार आणि न्यायाधीशपण. आणि हो माझा वकीलपण मीच आहे. तर आता आरोप नंबर एक. ही पाटलांची पोरगी मुलखाची रागीट आहे.’’

त्याच्या मागच्या साक्षीदारांनी त्याच्या हो मध्ये हो मिळवला.

‘’ होय न्यायाधीश महाराज. ‘’

‘’ दुसरा आरोप. तिचा तिच्या रागावर ताबा नाही. ‘’

‘’ होय न्यायाधीश महाराज. ‘’

‘’ ती रागाच्या भरात जे नुकसान करते ते प्राईसलेस असतं. ‘’

‘’ अगदी बरोबर महाराज. ‘’

‘’ ह्या पाटलीणीनं जीतच्या गाडीचा खटारा केला. ‘’

‘’!!!!!!!!!!!!!!!! जा…..’’

‘’ हे सगळे आरोप तिच्यावर सिध्द झालेत. तर आता तिला याच्यासाठी xyz कलमाखाली शिक्षा ठोठावण्यात येतेय. सगळ्यात आधी तिच्या नावाचं बारसं घालतोय. आजपासून जीत प्रेशाला प्रिशा म्हणणार. आणि आता सगळ्यात महत्वाची शिक्षा. उद्यापासून प्रिशा रोज जीतला हॉस्टेलवर आणायला जाणार. तेपण स्वतःची बुलेट घेऊन. आणि हे तिनं कॉलेजची सगळी वर्षं करायचं आहे. ‘’ जीत आपल्याच नादात प्रेशाला शिक्षा सुनावत चालला होता. शेवटचं वाक्य ऐकलं आणि अमेया हळूच खाली वाकली आणि तिनं पायातली चप्पल काढून हातात घेतली आणि लक्ष नसलेल्या जीतच्या पृष्ठभागावर फटाफट दोन सटके मारले.

‘’ आयचा घो. ए काय करते तू? मला का मारतीस? ‘’ आपला पृष्ठभाग चोळत जीत कळवळला.

‘’ लागलं का तुला? आं! सगळे आरोप माझ्या मैत्रीणीवर करणार का तू? तिलाच देणार का शिक्षा सगळ्या? तिच्या बुलेटची चाकं तू पंक्चर केलीस ना! त्याची शिक्षा आहे ही! ‘’ असं म्हणून तिनं आणखी दोन सटके लगावले त्याला.

ह्या सगळ्या मारामारी आणि हसी मजाकमध्ये शेवटी एकदाचं फायनल झालं की प्रेशा जीतला आणायला रोज हॉस्टेलवर जाणार. आणि ही 3 वर्षांची फायनल सेटलमेंट झाली.

30.04.2020

……..

*7*

ह्यांच्या पुर्‍या गँगमधला एकच प्राणी अभ्यासू होता; चेत्या. बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि अभ्यास एका बाजूला. त्याच्यात तडजोड नाही करायची. लेक्चरच्या वेळेला सर सुचवतील त्या त्या पुस्तकांचा अभ्यास करणारा, नोटस् काढणारा आणि कॉलेजच्या लायब्ररीचा सढळ वापर करणारा ग्रुपमधला एकमेव गुणी पोरगा म्हणजे चेतन. सगळीजण तो कधी कुठलं पुस्तक वाचतो आणि कधी कुठल्या पुस्तकातल्या नोटस् काढतो याच्यावर डोळा ठेऊन असायची. मग त्याच्या वह्या ह्याच्याकडून त्याच्याकडे अशा फिरता फिरता महिन्याभरानं परत यायच्या. बाकीची लायब्ररीचा उपयोग पार्कात आल्यासारखी करायची बरेचदा आणि त्याच्यासाठी लायब्रेरीयन दामलेंचा ओरडा खायची. ह्या पार्क समजणार्‍यांमध्ये जीत आणि अमेयाचा पण नंबर होता. कसं असतं पार्कमध्ये गेलं की बोलता येतं पण सगळीकडं गवगवा होतो.लायब्ररीत भले बोलता नाही आलं, नुसतं खुसफुसायला लागलं तरी बॉण्ड घट्ट होतो असं जीतअमेयाला वाटायचं. त्यामुळे वर्गाबाहेरचा कॉरीडॉर, पार्किंग, त्याच्या शेजारचा कट्टा अशा काही जागा सोडल्या तर ही कबूतराची जोडी खूपदा लायब्ररीतच एकमेकांना भेटायची. त्यातही जीत डोळ्यांची भाषा समजण्यात खूप कच्चा होता. मग वह्याचा अशावेळी सदुपयोग केला जायचा. गेल्या 5 महिन्यांत ही गोष्ट या कानाची त्या कानाला समजू न देण्यात दोघंही चांगलेच सरावले होते. त्यांचे सगळे इशारे ठरलेले असायचे. कधी भेटायचं? कुठं भेटायचं? लायब्ररीत भेटायचं असेल तर किती नंबरचं कपाट? किती नंबरचा बेंच? तिथं जर कुणी बसलं असेल तर काय करायचं हे मात्र ऐनवेळी ठरायचं. पण दोघांना एकाचवेळी एकाच पुस्तकातल्या नोटस् काढायच्या असतं आणि ही गोष्ट कुणाच्या अजून लक्षात नव्हती आली. आता हे त्यांचे इशारे पोचवणारा माणूसपण यांचाच होता पण हे त्या माणसाला माहीत होतं का नाही हे ह्यांनापण माहीत नव्हतं.

प्रिशा रोज न्यायला आली हॉस्टेलवर की जीत जाता जाता तिच्या सॅकच्या कप्प्यात चिठ्ठी सरकवून ठेवायचा. हे लोकं पार्किंगमध्ये भेटले की डोळ्यांच्या इशार्‍यानं तो अमेयाला चिठ्ठीची जागा दाखवून ठेवायचा. दोघी एकाच बेंचवर बसायच्या. शिवाय प्रिशाच्या सॅकमधलं चिठ्ठीचं ठिकाण अजूनपर्यंत बदललेलं नव्हतं त्यामुळं अमेयाला ती शोधण्यासाठी फार काही शोधाशोध करावी लागायची नाही. वर्गात जाऊन बसलं की मॉनिटर असल्यामुळं प्रिशाला मॉनिटरींगसाठी उभं रहावं लागायचं. मग त्या वेळेत अमेया चिठ्ठी काढून वाचून फाडून टाकायची. कधी मधल्या रिसेसमध्ये ती गायब व्हायची तर कधी शेवटच्या तासाला दांडी मारायची. चेत्याकडून सगळं उतरुन घ्यायचेच काय ते कष्ट घ्यावे लागायचे दोघांनाही. म्हणून मग ते त्यांचा हा सगळा वेळ बहुतेकदा लायब्ररीत सत्कारणी लावायचे.

चेतन त्यादिवशी आर्किटेक्चर अ वर्ल्ड हिस्ट्री नावाचं पुस्तक जे डॅनियल बोर्डेन, जेर्झी एलझानोवस्की, जॉनी टायलर,स्टिफन टर्क अशा लेखकांच्या विविधप्रकारच्या बांधकामाशी संबंधीत लेखांनी भरलेलं होतं; ते तो संदर्भासाठी न्यायला लायब्ररीत आला होता. काऊंटरजवळ जाऊन त्यानं सरांना हाक मारली.

‘’सर, ते परवा मी सांगितलेलं पुस्तक आलंय का?’’

‘’ कोणतं रे?’’ सरांनी मान खाली घालून नव्या पुस्तकांची एन्ट्री करता करताच विचारलं.

‘’ सर, ते आर्किटेक्चरः- अ वर्ल्ड हिस्ट्री. ‘’

‘’अच्छा! ते त्या 6 नंबरच्या रॅकमध्ये जाऊन बघ. बहुतेक मी कालच ठेवलंय तिथे.’’ सरांनी पेन घेतलेलं बोट 6 नंबरच्या रॅकच्या दिशेनं दाखवलं. तसा चेतन त्या दिशेनं गेला. त्यानं खालच्या कप्प्यापासून पुस्तकं शोधायला सुरुवात केली. कारण येताना ते सरांना पुस्तकाचा नंबर विचारायला विसरला. आता परत जाऊन कुठं सरांना विचारत बसा? असा विचार करुन त्यानं खालच्या कप्प्यापासून शोधायला सुरुवात केली. खालचे 3-4 कप्पे शोधूनही त्याला पुस्तक काही मिळालं नाही. दुसर्‍या कप्प्यात शोधताना त्यानं एक पुस्तक उचललं आणि त्याला त्या पुस्तकाच्या उचलण्यामुळे पडलेल्या फटीतून पलीकडच्या टेबलावर उकमेकांचा हात हातात घेऊन गुलूगुलू करणारी कबूतराची जोडी दिसली.

‘च्यायला! लायब्ररीत येउन हे उद्योग चाललेत होय ह्यांचे? थांब दाखवतोच ह्यांना. भांडच फोडतो साल्यांचं.’ स्वतःशीच असा विचार करत त्यानं आपलं पुस्तक शोधलं. काऊंटरवर नेऊन त्याची एन्ट्री केली आणि तो खाली गेला. नेमका तो काऊंटरकडं यायला आणि 6 नंबरच्या रॅककडं ठेवलेल्या टेबलावरनं धवननं त्या आवाज दिला.

‘’ चेत्या, पुस्तक लवकर परत कर रे! मला पायजेल. नायतर तुझी वही मिळायची नाही परिक्षेपर्यात. ‘’

‘ आयची जय ह्याच्या! ह्याला पण साल्याला आताच कोकलायचं होतं का?’ चेत्या उखडला. ‘’हां, हां. देतो. देतो.’’ असं म्हणून तो पटकन् तिथंन सटकला कारण त्या जाऊन सगळ्यांना बातमीगिरी करायची होती. पण धवन्याचा आवाज जित्या न् अमेयानं ऐकलाच होता. ती दोघं पण पटदिशी त्याच्यामागनं निघाली.

चेत्या पार्किंगजवळच्या अड्यावर पोचला आणि मोठ्यानं वरडून म्हणाला, ‘’ ऐका हो ऐका! ‘’ तशी सगळी गँग सावरुन बसली.

‘’मिश्टर जीत जैतकर आणि अमेया जांभळे नावाच्या कबूतराच्या जोडीनं लायब्ररीत घरटं बांधलम होऽऽऽऽ‘’

त्याच्या ह्या दवंडीवर सगळा ग्रुप फिस्कारला. सगळ्यांच्यात चर्चा चालू झाली काय करत असतील लायब्ररीत? याच्यावरनं. इतक्यात जीत अमेयाचा हात पकडून तिथं आलाच.

‘’ हे बघा. जोडी हिथंच आली.’’ अभ्यानं त्यांना आलेलं बघून युव्याला टाळी दिली. आणि सगळे एकदम हसायला लागले. प्रिशा मात्र ह्या घोळक्यापासनं लांब झाडाच्या सावलीत आपली बुलेट लावून त्यावर बसून चणे खात होती.

‘’ए गपा ए! उगा हे बेणं कायबी सांगतं आणि तुमी विश्वास ठेवता व्हय त्याच्यावर? ‘’ जीत सगळ्यांवर खेकसला. त्यानं अजूनपण अमेयाचा हात सोडला नव्हता. धन्याचं लक्ष होतंच त्याच्याकडं.

‘’कशालं खोटं बोलतो? तिचा धरलेला हात अजून सोडला नाहीस आणि म्हणतो चेत्या कायपण सांगतो म्हणून?’’

आतामात्र जीतनं पटकन् तिचा हात सोडला. ‘’घे सोडला हात. आणि हात धरला म्हणून काय लगेच कायपण उठवणार का तुमी? तसं तर मी प्रिशाचापण हात धरतो.’’ जीतनं स्वतःला वाचवत चेत्याला खोटं पाडायला प्रिशाला मधी खेचलं. त्यानं तिला झाडाखाली बसलेली बघितलीच नव्हती. त्याचं ते वाक्य ऐकलं मात्र प्रिशानं खाताखाताच हातातले चणे खिशात टाकले आणि बुलेटवरनं खाली उडी मारली.

‘’जीत्या!’’ तिनं तिथनंच त्याला आवाज दिला. चार ढांगात त्यांसमोर येऊन म्हणाली, ‘’ तू आणि ही मिळून सगळ्या दुनियेला खोटं ठरवाल; पण मला नाही उल्लू बनवू शकत. तुमच्या पहिल्या भेटीपासूनच मला तुमचा सगळा मामला माहीतेय.’’

हे ऐकून सगळेच गार पडले. म्हणजे जीत कॉलेजात आल्यापासनं ह्यांचं गुटर्गू चाललंय आणि आपल्याला आत्ता कळतंय याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. बरं, अमेया आणि जीतलापण हे सगळं आताच कळत होतं की हिला हे सगळं माहीतेय म्हणून. सगळे तिच्याकडंच बघतायत म्हटल्यावर ती म्हणाली, ‘’ बघता काय डोळं वटरुन? ह्याला पयल्यांदा बघितलं तवाचं हिचं अवसान गेलंत. पहिल्यांदा ह्याला बघितलं तेवाचं हिचं डोळं हरणासारखं लकालेलं बघितलं मी आणि लग्गीच मला सगळं कळलं. पण म्हटलं हिनं स्वःताहून सांगू दे. त्याच्यानंतर ह्यानं माझ्या बुलेटचा सगळा राडा केलता तवापण ह्याला वाचवायला हिनं माझ्यासंगट मुक्याचं व्रत घेतलं.’’ हे जीतला माहीतच नव्हतं. त्यानं हळूच डोळ्याच्या कोपर्‍यातून अमेयाकडं पाहिलं तर ती खाली मुंडी घालून प्रिशा करत असलेली चिरफाड ऐकत होती.

‘’ अगं ए राणी चन्नमा! मग आमला सांगायला काय तुझं थोबाड उचकटलं नाय व्हय? ‘’ युव्यानं विचारलं.

‘’ गपे सांड! काय सांगायला पायजे होतं मी तुम्हांला? का ह्या दोघांचं अफेअर हाय म्हणून? ह्यांच्या रोजच्या चिठ्ठया माझ्या सॅकमधून येतात म्हणून? आणि कशाला सांगायला पायजे होतं मी तुम्हांला? तुमच्याकडं गॉशिप करायला गोष्टी कमी पडतात म्हणून? हे बघ ए! हे जे काय हाय ना! ती त्यांची खाजगी बाब हाय. आपण कशाला त्याच्यात नाक खुपसायचं? त्यांना जेवा कवा सांगाविशी वाटतील तेवा ते सांगतील नायतर नायपण सांगणार. ह्या अमीनं तर अजून मलापण बोलली नाय काय; मी तिची ल्हानपणापासूनची मैत्रीण असून.’’ अमेयानं खटकन् मान वर करुन तिच्याकडं बघितलं. ‘’आणि ह्यो जीत्या. मोठा बेश्ट फ्रेन्ड म्हणतो मला. त्यालापण मला ह्यातलं काही सांगावसं वाटलं नाई. आणि आपला हिशोब एकदम साधाय.ह्यास्नी जर मी जवळची वाटत नाई तर लोकांच्या खाजगी गोष्टी जगभर करायचा परवाना आपल्याला मिळत नाय. काय कळलं?’’ थोड्या वेळासाठी कुणीच काही बोललं नाही. भानावर येऊन जीत अमेया तिला काही बोलणार इतक्यात पलीकडच्या गेटातून आत जाणार्‍या नंदाला तिनं हाक मारली.

‘’ ए नंदा! थांब ए, थांब. आलेच मी.’’ असं म्हणून ती तिथनं निघूनपण गेली.

‘’ जीत्या यार तू असं काय करशील असं वाटलं नव्हतं मला. फुकटफाकट तिला दुकवलीस.’’ युव्या म्हणाला.

‘’आरं पण!’’ जीतनं त्याला सांगायला तोंड उघडलं तर तेवढयात चेत्या म्हणाला, ‘’ भाड्या निसताच मिरवतोस बेश्ट फ्रेन्ड म्हणून. कळतं का तुला बेश्ट फ्रेन्ड काय असतं ते!’’

‘’नायतर काय? अमे, तू तरी अशी कशी गं वागलीस तिच्याशी? ते बी तुमची ल्हानपणापासूनची मैत्री असताना? अगं सगळीकडं तिची वकीली करायचीस, तिच्यासाठी घासातला घास काढून ठेवलास आणि येवढी मोठी गोष्ट लपवलीस व्हय तिच्यापासनं?’’ धन्यानं अमेयाला जाब विचारला तशी अमेयाला खूपच अपराध्यासारखं वाटायला लागलं न् ती तिथनं निघून गेली.

‘’ अमू, ए अमे!’’ जीत तिला थांबवायचा प्रयत्न करत होता.

‘’हां! अजूनपण तिलाच हाक मार. बेश्ट फ्रेन्ड गेला खड्ड्यात हाय का नाय. भावा प्रेम लै येळंला हुईल पण चांगला मित्र येकांदाच गावतो बघ! मोट्या रुबाबात तिला बेश्ट फ्रेन्ड म्हणलास आणि इतक्या म्हैन्यात मानातली गोष्ट सांगता आली न्हाय व्हय तुला. थुत तुज्या जिंदगानीवर.’’ धन्यानं तर जीतची उरली सरली सगळी इज्जतच धडका लावून पेटवून दिली.

‘’ अयं लेको! माफी करा की एक डाव. चुकलं माजं. पुना असं कायबी करत नसतो मी, मग तर झालं का नाय.’’ जीतनं त्याच्यासमोर गुडघे टेकून शरणागती पत्करली.

‘’ हां! हां! हे असं येकट्या येकट्यात तू काय बी म्हनशीन. आमी नाय चालवून घेणार. आमच्या पोरीला दुकावलीस तू. सगळ्यांच्या समोर तुम्ही दोघांनी बी तिची माफी मागायची. ती बी उद्याचं. चालतंय का?’’

‘’पळतंय की.’’

दुसर्‍या दिवशीपण प्रिशा जीतला हॉस्टेलवर न्यायला आली. तिनं दुडकेला वर पाठवला आणि जीतला यायला सांगितलं. दुडकेनं दारात जाऊन जीतला आवरुन खाली यायला सांगितलं. तसं तो म्हणाला की तिला जायला सांग. मी येतो थोड्यावेळानं. दुडकेनं खाली येऊन तसाच्या तसा निरोप दिला. आणि ती निघून गेली. ती गेल्यानंतर जीत स्कूटी घेऊन बाहेर पडला. नाक्यावरच्या करवीर डेअरीतनं त्यानं खरवस घेतला. शेजारच्या फुलवाल्याकडनं निशिगंधाची फुलं घेतली. आणि तो कॉलेजला आला. फायनल बेल व्हायला अजून पंधरा मिनिटं होती. प्रिशासकट सगळी गँग तिथंच पार्किंगमधे बसलेली. इतक्यात स्कूटी घेऊन जीत तिथं पोचला.

‘’कुणी लावली रे गाडी माझ्या जागेवर?’’ त्यानं रुबाबात प्रिशाच्या बुलेटवर थाप मारत विचारलं.

‘’माझीय गाडी. तुला काय अडचण होतीय का? ‘’ प्रिशानं कठड्यावरनंच विचारलं.

‘’ ती माझी जागाय. उचल तुझी गाडी. ‘’

‘’ तू तुझी गाडी लाव की दुसरीकडं.’’

‘’ ए उलटं बोलायचं नाय काय आपल्याला. उचल म्हटल्यावर उचलायची.’’

ह्या दोघांचं काय चाललंय ते कळेना गँगमधल्या कुणालाच. युव्या उठला आणि जीतच्या कानात कुजबुजला. ‘’कालचं नाटक थोडं झालं का? आता हे काय नवं खूळ काढलंयस?’’ जीत काहीच बोलला नाही. प्रिशा मुकाट्यानं उठली आणि बुलेट काढायला गेली. ती पुढं आली तशी जीतनं तिच्यावर निशीगंधाची सगळी फुलं उधळली. तिला कळेनाच हा काय करतोय ते! ती त्या फुलांकडं बघतच राहिली; मग पटकन् खाली वाकली आणि पाय पडू नये म्हणून ती फुलं गोळा करायला लागली. तसा खरवसाचा डबा उघडून तिच्यासमोर धरत जीत म्हणाला, ‘’ दोस्तीत नो थँक्स नो सॉरी. तेरी मेरी यारी खड्ड्यात गेली दुनियादारी.’’ ती हसली आणि तीनं त्यातनं एक तुकडा घेतला तोवर अमेयासकट सगळेजण त्या खरवसाच्या डब्यावर तुटून पडले.

कॉलेजचे दिवस असे मस्त मारामारी, भांडणं, रुसवे-फुगवे, सहली, गमतीजमती, अभ्यास यात छान चालले होते. सहामाहीची सेमिस्टर सगळ्यांना चांगली गेली होती. आता जवळपास वीसेक दिवसांची सुट्टी पडली होती. जीत त्याच्या गावाला गेला होता. अमेया, प्रिशा, आणि बाकीच्या ग्रुपनं त्यांची ठरवलेली, राहून गेलेली अशी सगळी कामं ह्या सुट्टीत पूर्ण करुन घेतली.

07.05.2020

………….

*8*

सुट्टी संपली आणि परत एकदा सगळ्यांचं कॉलेज रुटीन चालू झालं. गावाकडं गेलेला जीत परत येताना एकटा आला नाही. त्याच्यासोबत त्याचा मित्र श्री अर्थात श्रीपर्ण सुध्दा सोबत आला होता. यावर्षी त्याला कॉलेजला सुरुवातीच्या काळात ऍडमिशन घेता आली नव्हती. कारण त्याची आजी खूप सिरिअस होती आणि बेडरिडनपण. शिवाय तिला बघायला, तिची शुश्रुषा करायला दुसरं कोणी नव्हतं घरात. तशी घरात गडी माणसं, बायका होत्या बर्‍याच; पण ज्या आजीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं तिला गडी माणसांवर टाकून आपण कॉलेजला जावं हे काही त्याला पटत नव्हतं. नाहीतरी त्याला आजी, बाबा, रंगा आणि जीतशिवाय होतंच कोण दुसरं या जगात. आई जन्माच्या वेळीच गेली होती. आजीनं म्हणजे वडलांच्या आईनंचं लहानाचं मोठं केलं होतं. तसा श्री श्रीमंत शेतकरी बापाचा पोरगा. बापपण स्वतःच्या हिमतीवर मोठा झालेला. लेकाला मात्र घरं बांधायची स्वप्न पडायची. शेतात रस नाही असं नव्हतं श्रीचं, पण त्याला शेतापेक्षा घरं जास्त जवळची वाटायची. बापाला पोरगं आणि शेत सारखंच लाडकं. 7 एकरात उस लावलेला. 3 एकराचा कारखान्यात जायचा. उरलेल्या 3 एकराचा गुर्‍हाळाला जायचा. आणि 1 एकराचा उरलेला उस बाजारात जायचा. बांधावर देशी चिंच लावलेली. त्याचे घरीच साठवणीचे चिंचगोळे बनवले जायचे. त्यासाठी पंधराजणी कामाला होत्या. त्या चिंचांचे गोळे करण्याआधी त्यचे जे चिंचोके गोळा व्हायचे ते कुंकूच्या कारखान्यात पंढरपुरला पाठवले जायचे. त्याशिवाय घरचा गोठा होता; 5 जर्सी गाई आणि 5 जाफराबादी म्हशी होत्या दावणीला. शिवाय हे सगळं सांभाळायला गडी माणसं होतीच. निंबाळकरांचा भला थोरला वाडा वडिलांनंतर श्रीलाच सांभाळायचा होता आणि तो मात्र घरं बांधण्याच्या स्वप्नात हरवून जायचा आजीची देखभाल करता करता. जीत आणि तो लहानपणापासूनचे मित्र. अगदी लंगोटी यार. जीतची आई त्याचे खूप लाड करायची. त्याच्यावरनं जीतची आणि त्याची लै घमासान मारामारी व्हायची. जीत 9वी ला असताना त्यांना टायफॉईड झाल्याचं निमित्त झालं न् त्या गेल्या. जीतपेक्षा श्रीलाच त्याची दुसरी आई गेल्याचं अनावर दुःख झालं होतं. पाटील कॉलेजला तो जीतसोबतच ऍडमिशन घेणार होता. पण आजीचं जास्त झालं. तिला दवाखान्यात ठेवायला लागलं. मग तो दवाखाना, बाबाला शेतात मदत करणं ह्या सगळ्यात त्याची ह्या वर्षाची ऍडमिशन झालीच नाही. त्याच्या शिवाय ती न व्हायला रंगापण एक कारण होता. हा रंगा म्हणजे त्यांच्या गौरी गाईचा खोंड होता. तो गावात चांगल्या वाणासाठी ओळखला जाई. ह्या रंगाला ल्हानपणापासूनच श्रीची लै सवय होती. एखाद दिवशी जर श्री त्याला भेटला नाही तर हांबरुन हांबरुन गोठ्यापासनं सगळ्यांना टेकीला आणायचा. मग गडी माणसांची श्रीला शोधायला धावपळ व्हायची. एकदाचं त्याला धरुन आणून त्याच्यासमोर उभा केला काय मग त्याचा जीव भांड्यात पडं. आता ल्हान असताना श्री असल उद्योग लै करायचा. पण जसा मोठा व्हायला लागला तसं त्याचं न् रंग्याचं चांगलंच मेतकूट जमलं. रंग्याला श्रीनं बोललेलं सगळं कळायचं. कधी कधी तर न बोललेलं पण कळायचं. त्यानं तर एकदा श्रीला दवाखान्यातनं यायला उशीर झाला म्हणताना रागानं ढुशा देऊन गोठ्याची एका बाजूची भिंतच पाडून घातली. कुणालाच ऐकना म्हटल्यावर बाबा दवाखान्यात गेला. त्यानं श्रीला सगळं सांगितलं आणि त्याला घरी पाठवला. श्रीनं वाड्याचा दरवाजा उघडल्याबरोबर तो मोठ्या आनंदानं शेपटी वर करुन करुन डुरकला. श्री त्या रात्री त्याला थोपटता थोपटता गोठ्याच्या कडाप्प्यावरच झोपून गेला. दुसर्‍या दिवशी बाबानं त्याला विचारलं की आम्ही तुला शिकायला दुसरीकडं जाऊ देऊ पण ह्या रंग्याचं काय करणार तू? श्रीला तेव्हा काय उपाय सुचला नाय पण त्यानं रंग्याचं मन वळवायचं मनावर घेतलं. रोज तो त्याला खायला घालताना म्हणायचा, ‘’ रंग्या मला शिकायचंय रं पुढं! तू जर असा वागला तर बाबा काय मला शिकायला पाठवणार नाय बघ जीत बरोबर. आईक की राजा माझं. मी आठवड्यातून एकदा ये जाईन की तुला भेटायला.’’ आधी आधी रंग्या त्याचं असलं काही बोलणं ऐकलं काय खाण्यापिण्यावर बहिष्कारच घालायचा दोन-दोन दिवस. पण श्रीपण काही कमी हट्टी नव्हता. त्यानं त्याच्या सगळ्या नाकदुर्‍या काढल्या. मात्र आपला दुसरीकडं शिकायला जायचा हेका सोडला नाही. जीतला पाटील कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हटल्यावर तो आनंदानं रंग्याला सांगायला गेला. ‘’ भावा, आपल्या जीत्याला पाटील कॉलेजात साळगावला ऍडमिशन मिळालीय. मलापण जायचंय तिथं. तू तुझा हट सोड की लेका.’’ रंग्यानं नाहीच्या तोर्‍यात मान हलवली तसा रागानं श्रीनं त्याचा कान पकडला न् पिरगळला. ‘’आत तू जवर हो म्हणत नाय ना तवर मी जेवतच नाही बघ! मी मेलो काय बस एकटाच हितं वरडत माझ्या नावानं. ‘’ असं म्हणून तो रागानं निघून गेला. दोन दिवसांनी काका गोठ्यात गेले आणि रंग्याच्या पाठीवरनं हात फिरवत रडायला लागले. ‘’ रंग्या लेका किती हट करतोस? जाउ दे की त्याला पुढं शिकायला. पोराचा जीव घेतो का आता? दोन दिवसापासनं काही खाल्लं नाही बघ त्यानं. मी कुठवर कुनाकुनाला पुरा पडनार तूच सांग? ‘’ रंग्यानं तेवढं ऐकलं मात्र हिसका देऊन दावं तोडून तो वार्‍याच्या वेगानं श्रीला शोधायला बाहेर पडला. तो पुढं आणि वामनकाका त्याच्या मागनं त्याला पकडायला धावत होता. रंग्या गेला तो बरोबर त्याच्या खोलीच्या खिडकीशी जाऊन उभा र्‍हायला. आत श्री गुमान कॉटवर पडला होता. खिडकीत कसला आवाज झाला म्हणताना त्यानं मान वर करुन बघितलं तर खिडकीत त्याला रंग्या उभा असलेला दिसला. पटकन् कॉटवरनं उठून श्री खिडकीत उभा राहिला तसा रंग्या पुढचे दोन्ही पाय मुडपून खाली बसला आणि त्यानं मान खाली घातली. श्रीला ह्याचा अर्थ बरोबर कळला. तो धावत खोलीतनं बाहेर आला. तर रंग्या खाली मान घालून टिपं गाळत होता. ‘’ रंग्या लेका. रडतो कशापाइ? मी काय तुला हितं सोडून लंडनला चाललो का काय? आरं हितं जानार हाय साळगावात. तू निस्ता डुरकला काय माझ्या कॉलेजात त्याचा आवाज पोचलं बघ! आणि मी दर आठवड्याला येणारच हाय की तुला आणि बाबाला आजीला भेटायला. मला काय करमतंय व्हय तुमच्याशिवाय तितं. हास बगू आता. आनी हां मी गेलो काय शान्यासारखं वागायचं. बाबाला त्रास द्यायचा न्हाई. समजलं का? ‘’ रंग्यानं सगळं समजल्यागत शेपटीचा गोंडा जमिनीवर आपटला. मुकं जनावर! पण त्याला माणसापेक्षा कणभर जास्तच अक्कल असती. अशी रंग्याची समजूत काढून श्रीनं आपला कॉलेजला जाण्याचा रस्ता मोकळा केला. आता तो वाट बघत होता आजीच्या बरं होण्याची. पण इतके दिवस अंथरुणात पडून बरी होण्याची आशा दाखवून शेवटी आजी लेकाला आणि नातवाला एकटा सोडून गेली. तिचं सगळं कार्य आटपल्यावर एकदा वामनकाकानं आपणंच श्रीला जीतशी बोलायला सांगितलं कॉलेजसाठी. श्रीनं जीतशी बोलल्यावर तो म्हणाला काय की काळे सरांशी बोलून घ्यायला पायजेल. तेच प्राचार्य आहेत ना कॉलेजचे! आपण तुझा सगळा झालेला प्रॉब्लेम सरास्नी सांगू आणि विचारु की काय होईल का ऍडमिशनचं म्हणून. त्यांचं बोलणं झाल्यावर जीत काळे सरांशी बोलला. तर सर म्हणाले की ऍडमिशन तर होऊन जाईल. पण एकदा एन्ट्रन्स परिक्षा देऊ दे त्याला. मग बाकीचं सगळं काम माझ्यासाठी सोपं होईल. त्याप्रमाणं सुट्टी संपायच्या 1 आठवडा आधी श्री साळगावला आला. तिथं त्याच्यासारखी ऍडमिशन घ्यायला आलेली आणखी 5-6 जणं होती. त्यादिवशी त्या सगळ्यांची परिक्षा झाली. त्या परिक्षेत श्रीनं चांगले मार्क काढले. मग त्याचं ऍडमिशन फायनल झालं. आता श्रीपण जीतसारखाच इंजिनिअरिंगवाला झाला.

सुट्टी संपायच्या एक दिवस आधी जीत आणि श्री हॉस्टेलवर पोचले. त्यांना बघून दुडकेनं विचारलंच, ‘’ काय कशी काय झाली सुट्टी?’’

‘’ झाली की चांगली.’’

‘’हे कोण? कुनाकडं आलेत? ‘’

‘’कुनाकडं म्हणजे? आपल्याच हॉस्टेलला र्‍हायसाठी आलाय तो. गेल्याच आठवड्यात आमच्याच वर्गात ऍडमिशन झालीय त्याची.’’

‘’ आरं पर आधी सांगाय काय झाल्त तुला? गेल्याच आठवड्यात ती पलीकडची 25 नंबरची रुम दिलीनं सायबानी राहूल कदमला. कॉलेजात आल्यापास्न माझं जगणं मुश्कील करुन टाकलंयस नुस्त. आता ह्याला काय माज्या डेस्क्यावं जागा दिवू का?’’ दुडके चांगलाच भडकला जीतवर. कारण 25 नंबराला विश्वास गावडे राहत होता; त्याच्या रुममध्ये एक कॉट रिकामी होती जी गेल्याच आठवड्या राहूल कदमला दिली साहेबांनी. आता हॉस्टेलवर जागाच नव्हती.

दुडकेच्या ह्या चिडण्यावर हसत श्री म्हणाला, ‘’ काका, जरा टोपी काढता का? ‘’

दुडकेनं भुवया वर करुन त्याच्याकडं रागानं बघितलं. टोपी काढली आणि म्हणाला, ‘’काय जागा शोधतूस का? ‘’

त्याच्या डोक्यावरच्या अर्ध्या तुळतुळ्याकडं बघत श्री चिंतातूर चुहर्‍यानं दुडकेच्या खुर्चीत बसला. जीत आणि दुडके दोघपण त्याच्याकडं काही न कळून बघायला लागले. तो हातावर हनुवटी टेकून बसून र्‍हायला म्हणताना दुडके त्याच्या अंगावर खेकसला. ‘’आता बोलतो का न्हाई?’’

‘’ त्याचं काय हाय काका, तुमच्याकडं जंगल नाही. जंगल नाही म्हणजे लाकडं नाहीत. आता लाकडं नसतीन तर मी घर कसं बांधणार? आणि घर नाही तर राहणार कुठं? ‘’ श्रीनं गंभीरपणानं विचारलं.

दुडकेनं डोक्यावर हात फिरवत जीतला विचारलं, ‘’ काय बरळतो रं ह्यो खुळा? ‘’

पण जीत काही बोलण्याआधीच श्री पटकन् उठला दुडकेचा डोक्यावरनं फिरणारा हात पकडून म्हणाला, ‘’ आता तुमीच बघा की. तुमच्या जंगलाचा पार उजाड डोंगर झालाय.’’

हे ऐकलं मात्र जीत मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. आणि आपल्या डोक्याचा अर्धा चमनगोटा झालाय हे आठवून दुडकेपण हसायला लागला.

‘’ आता एक काम करा. सध्या ज्या रुमात हा र्‍हातोय त्याच रुमात तूपण र्‍हा. पुढच्या वर्षाला बघू दुसर्‍या खोलीचं. ‘’ दुडकेनं सांगितलं.

‘’ आवो पण संज्या? तो तयार हुईल का? ‘’ जीतनं विचारलं. कारण त्याला माहीत होतं संज्या किती टापटीपीत राहणारा होता ते. त्याला त्याच्या कॉटवरच्या बेडशीटला सुरकुती पडलेली दिसली की तो राडा करायला सुरुवात करायचा आणि इथं तर अख्खा एक माणूस सांभाळून घ्यायचाय.

‘’ ते माजं काम न्हाई. ते तुजं तू बगून घे. मी आपलं सांगायचं काम केलं. ‘’ दुडकेनं हात झटकले आणि तो आपल्या कामाला गेला.

 अजून संज्या आला नव्हता. म्हणून मग आपलं सामान ठेऊन दोघजणं जेवून येऊन दोन खाटांवर अस्ताव्यस्त पसरले. संध्याकाळी संज्या आला तर त्याला हे दोन कुंभकर्ण पसरलेले दिसले. जीतला त्यानं ओळखला. पण दुसरा कोण? त्यानं बॅगा टाकल्या आणि गॅलरीत जाऊन दुडकेच्या नावानं कोकलायला सुरुवात केली.

‘’ दुडके, ओ दुडके! आव माझ्या खोलीत कोणतरी झोपलाय बघा.’’

दुडकेला हा राडा होणार हे आधीच माहीत होतं त्याच्यामुळं तो गुमान आपल्या खोलीत जाऊन छाताडावर हात ठेवून, तोंडावर टोपी टाकून घोरत पडला होता. मरना तिकडं. उगं बोंबलंल,बोंबलंल आणि नरडं दुकलं काय गप बसलं. दुडके ऐकत नाही म्हटल्यावर तो परत आत आला.

‘’ जीत्या, उठ ए! हे कोण येऊन झोपलंय काय बघशील का नाही?’’

‘’बघायला कशाला पायजेल? आपला श्री हाय तो. झोप तू. उगा कशाला केकाटतो? ‘’ जीतनं झोपेतच उत्तर दिलं.

आपला? आपला म्हणजे कोणाचा? ह्याच खोलीत र्‍हाणार की काय ह्यो उपटसुंभ? ह्या प्रश्नांनी चक्रावलेल्या संज्यानं जीतला गदादा हलवला. तसा खडबडून जागा होत जीत उठून बसला. त्याच्या एका फटक्यात सगळा झोल लक्षात आला.

‘’ आरं, संज्या आपला मित्र हाय तो. र्‍हाऊ दे की त्याला. हॉस्टेलला रुम नायाय शिल्लक. ‘’ जीतनं समजावणीचा सूर लावला. श्री मात्र घोरेसूर होता त्याला ढोलताशाच्या आवाजात पण गार झोप लागायची. मग ह्या आवाजाचा त्याच्यावर कसला परिणाम होणार?

‘’ ए आपला बिपला काय नाय हां! हिथं आपण दोगंच राहणार. मला दुसरं काय माहीत नाय. ‘’

‘’ संज्या आरं असं करु नको की. मी काय कदी तुला कसला तरास दिलता काय? न्हाय ना! इतक्या म्हैन्यात तुझी काडीसुदीक हलवली नाय जागेवरनं. ऐक की माझं. ‘’ जीत त्याला मनवायचा प्रयत्न करत होता. शेवटी तासाभरानंतर कसाबसा संज्या श्रीला खोलीत ठेवून घ्यायला राजी झाला ते पण त्याच्या कॉटजवळ दोघांपैकी कुणी फिरकायचं नाय ह्या कबुलीजबाबावर. श्री अजूनपण डाराडूर पंढरपूर होता. रागारागानं संज्यानं त्याला दिला कॉटवरनं ढकलून. तसा श्री झोपेतनं खडकून जागा झाला. तो रागानं बाथरुममध्ये घुसणार्‍या संज्याला मारायला जाणारच होता इतक्यात जीतनं त्याला अडवला.

‘’ असं काही करु नकोस बाबा! नायतर तुझे र्‍हायचे वांदे होतील. येवढे 6 महिनें सांभाळून घे. ‘’ त्यानं श्रीला गळ घातली.

दुसर्‍या दिवसापासून कॉलेज सुरु झालं. आदल्या दिवशी संज्यासोबत झालेल्या वाटाघाटीप्रमाणं जीत आणि श्री एकाच कॉटवर झोपले होते. जीत कॉटच्या आतल्या बाजूला दारकडं डोकं करुन आणि श्री बाहेरच्या बाजूला दाराकडं पाय करुन. संज्या रोजच्या सवयीनं सकाळीच उठून चालायला गेला होता. प्रिशा तिला दिलेली शिक्षा प्रामाणिकपणानं पाळत आजपण जीतला न्यायला हॉस्टेलवर आली. रोज रोज हॉस्टेलला येऊन तिला दुडकेच्या चहाची लत माहीत झाली होती. आताशा ती घरुन येताना दुडकेसाठी राधाबाईंकडून कच्च्या दुधाचा थर्मासभरुन चहा करुन घेऊन यायची. बाहेर बुलेट लावली की आत येऊन दुडकेला चहाचा थर्मास द्यायची; आदल्या दिवशीचा थर्मास घेऊन तो बॅगेत टाकायची. मग बॅग तिथंच दुडकेच्या खुर्चीत टाकून जीतच्या नावाचा पुकारा करत वर जायचा हा तिचा नियम झाला होता जसा. जीत मात्र तिच्यामुळं आधी होता त्याच्यापेक्षा जास्त आळशी होत चालला होता. रात्री अभ्यास करता करता तो सगळं सामान पसरुन ठेवायचा आणि झोप आली की उठून झोपायला जायचा. सगळ्या सामानाचा पसारा जसाच्या तसा पडलेला असायचा. आधी आधी जेव्हा प्रिशा यायची तिला तो पसारा बघून खोलीत यावसंच वाटायचं नाही. मग एक दिवस कंटाळून तिनं तो पसारा आवरला. पण हाय रे रामा! ह्या जीतचं भिजत घोंगडं परत तसंच पडलेलं. हा सांगून ऐकणारा नाही म्हृणताना तिच आवरायला लागली तो सगळा पसारा रोज आल्यावर. वर जायचं. संज्या जाताना दार नुसतंच लोटून जायचा. ते दार उघडून आत जायचं. ह्या बाबानं अभ्यासाच्या नावाखाली घातलेला सगळा पसारा आवरताना त्याला हलवून हलवून जागा करत बाथरुमध्ये आंघोळीला पाठवायचं आणि त्याची बॅग घेऊन येऊन खाली बुलेटकडं त्याची वाट बघायची असा तिचा साडेपाच महिन्यांचा शिरस्ता झाला होता. आजपण ती सवयीनं त्याला न्यायला आली होती. मात्र आज येताना ती ह्याची खरडपट्टी काढायची असं ठरवूनच आली होती. त्याला कारणपण तसंच होतं. जीतनं सुट्टीवर गेल्यापासनं तिला एकदापण स्वतःहून फोन केला नव्हता. जाताना तिला बाबांच्या ऑफिसचा नंबर देऊन गेला खरा; पण त्याच्यावर फोन केला की नंतर करतो, बाबांचे क्लायंट आहेत अशी कारणं देऊन फोन ठेवून द्यायचा. नंतर फोन करायचं काही त्याच्या लक्षात राहायचं नाही. त्याच्यामुळं आज तिनं त्याला खालनं अजीबात हाक मारली नाही. वर आली आणि संज्यानं लोटून गेलेल्या दारातनं आत आली. तर आतमध्ये स्टेन्सील बॉक्सचा पसारा पडलेला. टेबलाशेजारी लाकडाचं खोकं ठेवलेलं. त्याच्यावर काच ठेवलेली. आत 25 चा बल्ब लटकत सोडलेला. त्या काचेवर व्हाईट ड्रॉईंग पेपर ज्याच्यावर नकाशा काढलेला होता तो आणि स्टेन्सिलपेपर चिकटवलेला. त्याच्यावर अर्धवट नकाशा काढलेला. बाजूला पेन्सील, पेन, स्केचपेन, ट्रँगल स्क्वेअर, टी स्क्वेअर आणि 2-3 वह्या पसारल्या होत्या जागा मिळलं तिथं. तो पसारा बघून आधीच भडकलेल्या डोक्यात आणखीनच आग पडली.

‘’ ए गधड्या, उठ की आता. सुट्टया संपल्यात. कळलं ना! सूर्यवंशासारखा घोरत पडू नकोस. उठ पटकन्. ‘’ असं म्हणून तिनं त्याला गदागदा हलवलं आणि त्याची पुस्तकं, वह्या गोळा करायला लागली. तो मात्र ढिम्म जागचा हलला नाही. पुस्तकं गोळा करुन तिनं ती बॅगेत टाकली. बॅग खांद्याला लावली आणि बाहेर जाता जाता तिनं त्याच्या अंगावरची चादर खसकन् ओढली.

‘’ उठ, कुंभकर्णा! ‘’ ती परत ओरडली.

एवढं बोलून ती दारापर्यंत पोचायच्या आधीच तिच्या बॅगेला हिसका बसला आणि ती मागे ओढली गेली.

‘’ जीत अरे काय करतोस? ‘’

असं ती ओरडतेय तोच तिच्या लक्षात आलं की तिच्या कंबरेत पडलेला हात जीतचा नाहीए.

स्वरा… 08.05.2020

……..

*9*

तो हात श्रीचा होता. कारण जीत समजून तिनं श्रीच्या अंगावरची चादर ओढली होती. तिला आपल्या अंगावर पडता पडता सावरण्यासाठी त्यानं तिच्या कंबरेत हात घातला होता. तिला मात्र हे काय घडतंय काही कळलंच नव्हतं. पडताना आता काय होईल या भितीनं तिनं डोळे मिटले होते; जे तिनं श्रीच्या आवाजाने उघडले.

‘’ काय प्रकार हाय हा? मुलांच्या हॉस्टेलवर एक मुलगी काय करतीय? कुणाला विचारुन आली तू आत? ‘’ त्यानं एका मागोमाग एक प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली तिच्यावर. पण तिच्या कानांवर हे शब्द कसले पडायला! ती तर त्याच्या काळ्याभोर डोळ्यांच्या डोहात बुडून गेली होती. ह्यांच्या गोंधळामुळं जागा होऊन जीत चादरीतनं बाहेर यायची धडपड करत होता पण त्याला बाहेर यायला फटच मिळत नव्हती चादरीची. त्या धडपडीत त्याच्या लक्षात आलं होतं की आपल्याला कॉलेजवर न्यायला आलेल्या प्रिशानं आपण समजून श्रीच्या अंगावरची चादर ओढल्यामुळे सगळा राडा सुरु झालाय ते! तो त्या चादरीतून बाहेर पडण्यासाठी फट शोधताना म्हणाला, ‘’ श्री, अरे थांब. थांब. सोड आधी तिला. ती माझी मैत्रीण हाय. मला रोज न्यायला येती ती इथं. ‘’ ते ऐकून श्रीनं तिच्या कंबरेतला हात काढून घेतला आणि तोल जाऊन प्रिशा दणकन् त्याच्याच अंगावर आदळली. त्यामुळं जीत चादरीतनं बाहेर येता येता त्याचं फक्त डोकंच कसंबसं बाहेर आलं चादरीतून.

‘’ अरे यार! जायचं का नाई कॉलेजला? ‘’ तिनं त्या अवस्थेतून उठण्याचा प्रयत्न करत वैतागून जीतला विचारलं. तेवढ्या चालायला गेलेला संज्या आला. बगतो तर जीत्याचं डोकं चादरीतनं बाहेर आलेलं, त्याचे पाय श्री आणि प्रिशाच्या वज्याखाली दाबल्यानं त्याला हालता येत नव्हतं. प्रिशा वेडीवाकडी कॉटवर पडल्यानं तिचे त्याच्यावरुन उठण्याचे सगळे प्रयत्न फेल होत होते. आणि या सगळ्यात मधल्या मधी श्रीची चापटपोळी झालेली. हे सगळं बघून तो आधी हसत सुटला. ‘’ असंच्च! असंच्च पाहिजे तुला श्री. चांगली शिक्षा झाली. ‘’ तो हसता हसता श्रीच्या त्या अवस्थेवर खुष झाला होता. ‘’ ए रेड्या! हस नंतर आधी हात दे मला. ‘’ प्रिशानं त्याला झाडलं तसं त्यानं प्रिशाला हात देऊन तिथंनं उठायला मदत केली. प्रिशा उठली तसा आधी धडपड करुन जीत कॉटवरनं उडी मारुन खाली उतरला. ‘’अग्गायाया! काय वजन हाय तुझं राव! तुला तर बॉर्डरवरच नेउन सोडली पायजे बग. तोफ गोळ्यापेक्षा चांगलं काम करशील. ‘’ ‘’ गपे! गमजा नंतर मार. जा आंघोळीला. पयल्या दिवशीपण लवकर उठता यिना व्हय तुला बेण्या? ‘’ संज्या त्याच्यावर डाफरला. ‘’ हां! आटप पटदिशी आन् ये खाली मी वाट बगतीय. ‘’ असं पुटपुटत डोळ्याच्या कोपर्‍यातनं श्रीकडं बघत प्रिशा तिथंनं निघून गेली.

हातपाय धुवायला आत जाणार्‍या संज्याला ढकलून जीत बाथरुमात घुसला. ‘’ ह्ये बराय. उशीरा उठायचं न् वरनं फुडंफुडं करायचं. ‘’ संज्या तिथंच खुर्चीवर टेकला.

‘’ येक डाव. येक डाव. आजचा दिवस माफी माफी. ‘’ कावळ्याची आंघोळ आटपून बाहेर आलेल्या जीतनं संज्याची माफी मागितली. पटाटा कपडे चढवून तो समाधी अवस्थेत बसलेल्या श्रीला म्हणाला, ‘’ ए, समाधी बाबा! आता उठ की हाल पटाक् किनी. ‘’ तसा श्री उठून बाथरुमात गेला. ‘’ संज्या जराशी जागा दे की. भांग तर पाडू दे. आजचा दिवस सांभाळून घे. त्याला आवरु दे. आणि ही माझ्या स्कूटीची चावी ठेवतोय टेबलावर त्याला तेवढी दे. जातो मी आता. नायतर ती खाली उभी असलेली रंभा माझा जीवच घिल आज.’’ तो चावी ठेऊन धातव सुटला खाली. संज्याला सहा महदन्यांपासनं ह्याची रोजची सगळी नाटकं पाठ होती. त्यामुळं तो त्याच्याकडं लक्ष न देता गुमान दाढी करत होता.

जीत येऊन बसला तशी प्रिशानं बुलेटला किक मारली न ऍक्सीलेटर वाढवून कचकाटून तिसरा गिअर टाकला. पुलाजवळ येता येता तिनं तो आणखी वाढवला. ‘’ आगं, हो. हो. पण मी काय केलंय? ‘’ तिच्या त्या वाढलेल्या बुलेटच्या वेगानं जीतचा जीव पार नरड्यात आला. कॉलेजला पोचल्याबरोबर जीत उतरतो का नाही हे न बघता तिनं करकचून ब्रेक लावत गाडी उभी केली आणि काही न बोलता तराट वर्गात निघून गेली. मागं गाडीवर बसलेला जीत चेत्याच्या मदतीनं कसाबसा अंगावर आलेल्या त्या बुलेटवरनं उतरला. मग चेत्यानंच ती गाडी ढकलत नेऊन पार्किंगमध्ये लावली.

‘’ आता काय केलंस हिचं? कशापाई धुमसतोय ह्यो ज्वालामुखी? ‘’ युव्यानं विचारलं. तोवर तिचं काय बिनसलंय बघायला अमेया गेलीच तिच्यामागनं.

‘’ चल. कँन्टीनात जाऊ. घोटभर चा ढकलतो पोटात आणि सांगतो. ‘’ ते कँन्टीनला पोचून त्यांनी चहाची ऑर्डर दिली तोवर जीतची स्कूटी घेऊन श्री पोचलाच तिथं.

तिकडं अमेया प्रिशाला विचारत होती काय झालं चिडायला म्हणून पण प्रिशाला मात्र काही बोलायचं नव्हतं. इतक्यात धामणस्कर मॅडम आत आल्या. आज मॅडम त्यांना वेगवेगळ्या मटेरिअलचे प्रकार, त्यांचे आकार, मापे, वापर याशिवाय फर्निचर, दारं-खिडक्या यांची सर्वसाधारण मापं कशी असतात तेही शिकवणार होत्या.

‘’ Interior design requires far more than just good taste. Taking measurments is a key element of the job. As are making decisions and calculations based on the results. Because accuracy is crucial. Professional Interior Designers and Decorators measure everything in inches. To the nearest sixteenth for window treatments and the nearest eighth for everything else before covering them to feel as needed.

Simple square or rectangle shaped home- measure the exterior length and exterior width. Simply mulitiply these two to get total square footage.

मॅडम सांगत असलेलं सगळं काही प्रिशाच्या कानात शिरत होतं, डोळ्यांना दिसत होतं पण मेंदूपर्यंत काही जात नव्हतं कारण यांना जोडणार्‍या मनानंच असहकार पुकारुन ते सकाळी बघितलेल्या श्रीच्या काळ्याशार डोळ्यांत हरवून गेलं होतं. कॅन्टीनवाली गँग मात्र जीतच्या तोंडून सगळा किस्सा ऐकत खिदळतच आपल्या वर्गात पोचली होती. बिचारा श्री पहिल्याच दिवशी ह्यांचा टारगेट झाला होता.

कॉलेज सुटलं आणि सगळे परतीच्या वाटेवर होते. चेत्या लायब्ररीकडे चालला होता. मदीच थांबून त्या कबूतराच्या जोडीला चोच मारली. ‘’ आज काय तुमचं गुटर्गू नाही वाटतं. सुट्टीत लै भेटलायसा का काय? ‘’ ‘’जा घुबड्या! ‘’ म्हणत जीतनं त्याला धपाटा घातला तसा तो गुमान निघून गेला. सकाळी कॉलेजात आल्यापासून गप्प असणारी प्रिशा अजूनपण बोलायला मागत नव्हती. पार्किंगमध्ये बुलेट काढायला आलेल्या तिनं अमेयाला फक्त येतेस का? एवढंच विचारलं न् तिनं बुलेटला किक मारली. अमेया बसायला जाणार इतक्यात जीतनं येऊन गाडीचं हॅन्डल पकडलं.

‘’ सॉरी की बाई! बास की आता. किती चिडशील? आता काय इश्टेट देऊ का नावावर करुन म्हणजे माफ करशील? ‘’

‘’ हे बघ जीत. माल तुज्याशी बोलायचं नाय. अख्ख्या सुट्टीत तुला मला येक फोन नाय करता आला. आणि मी फोन केला तर तिथंपण तुला बोलायला नाय जमलं. या सगळ्यासाठी माफी दिली मी तुला. पण, तुला येका शब्दानं सांगता नाय आलं का की तुज्यासोबत कुणी दुसरा मुलगा र्‍हायला येणार हाय म्हणून? का माजी फजीती करायची होती तुला? ‘’

अमेयाला यातलं फोन सोडता बाकी काहीच माहीत नव्हतं. ती आपली गुमान त्यांचा चाललेला वाद ऐकत होती. आता प्रकरणंच माहीत नाय तर तळी उचलणार कुनाची ना? त्यापेक्षा गप र्‍हायलेलं बरं.

‘’ प्रिशे, चिडायची काय बी गरज नाय. मी काय पण मुद्दाम केलेलं नाय. जे काय सकाळच्याला झालं त्यात माजी काय बी चूक नाय. हां, तुला सांगायला विसरलो काय की श्रीपण येणार हाय म्हणून त्याच्यासाठी तू देशील ती शिक्षा कबूल हाय मला. पण, तू शिक्षा द्याच्या आधी ए श्री! हिकडं ये रे!. ‘’ त्यानं श्रीला हाक मारुन जवळ बोलवलं.

‘’ हा श्री, श्रीपर्ण. माझा लंगोटीयार. आणि श्री ही माजी लाडकी मैत्रीण प्रिशा पाटील. हा आपल्याच कॉलेजाला शिकायला आलाय ह्या टर्मपासनं. आता बाकीचं सगळं तुमचं तुम्ही मिटवून घ्या. मी चाललो. ‘’ असं म्हणून तो वाटला लागला.

‘’ ए माकडा. थांब की. तुझी शिक्षा…. ‘’ ती ओरडली.

‘’ ती नंतर नंतर. आता मला जरा बागेचं दर्शन घ्यायचं हाय. चल गं अमू. ‘’ त्यानं जाता जाता तिचा हात पकडला आणि आपल्याबरोबर तिला ओढत घेऊन गेला.

‘’ अरे पण! ‘’

‘’ सॉरी. ‘’

‘’ आं! ‘’

‘’ त्ये सकाळसाठी सॉरी. ‘’

तिला काय बोलावं काही सुचेना. जीत अमेया मात्र झाडामागून ह्यांचं न जमलेलं समीकरण कसं सुटतंय ते बघत होते.

स्वरा….13.05.2020

*10*

‘’ मला ते सकाळी… सगळं… झालं ते!.... ते!... ते!...’’

‘’ अबे काय झालं सकाळी? ‘’

‘’ जीत आता चल की लवकर बाबा! त्या तुज्या मित्रावर सकाळचा बॉम्ब फोडलं ती बया. चल लवकर. ‘’ अमेयानं जीतच्या मागं लकडा लावला.

‘’ गं, थांब गं जरा! काय नाय व्हायचं! मी हाय की कायी झालं तर… ‘’ जीतला पुढं काय घडतंय नाटकात ते बघायचं होतं.

‘’ तोंडाकडं काय बघतोस माज्या? बस म्हटलं ना गाडीवर…’’

‘’ आवो पण!... ते जीत…’’

‘’ ए आवो जावोवाल्या… आवो जावो करायला मी काय बुढ्ढी हाय का? आता बसतो काय नाय? ‘’ तिनं त्याचा हात धरुन ओढला आणि त्याला जबरदस्तीनं गाडीवर बसायला लावला.

‘’ ए, अरे ही काय करती नक्की त्याच्याबरोबर? ‘’ जीतनं अमेयाला ढोसलंल.

‘’ मला काय म्हाईत. ए अरे ती चालली की रं त्याला घिवून… ‘’

ते दोघं झाडामागनं येऊन तिथं पोचेपर्यंत प्रिशा त्याला घेऊन तिथंन सटकली होती.

‘’ झालं का आता? बघितलसं ना! तुज्या त्या नाटक बघण्याच्या नादात प्रिशीनं चांगला चुना लावलाय आपल्याला. ‘’ अमेया जीतवर उखडली. जीतलापण काळजी वाटायला लागली आता श्रीची. पण प्रिशा कुठं गेली कसं कळणार म्हणताना ते तिथंच कट्ट्यावर टेकले. प्रिशाची बुलेट पार्किंगमधनं बाहेर पडली ती वळसा घालून कॉलेजच्या मागच्या बाजूला असणार्‍या शंकर्‍याच्या चहाच्या टपरीवर येऊन थांबली.

‘’ उतर…’’ तिनं सवयीनं त्याला ऑर्डर सोडली.

तो गुमान खाली उतरला. तिनं बुलेट बाजूला लावली आणि शंकर्‍याला म्हणाली, ‘’ चा पाज रं दोन. तू चा पितो काय नाय रं? ‘’ शंकर्‍याला चा बनवायला सांगितल्यावर तिच्या लक्षात आलं की आपल्याला माहीतच नाहीए हा चा पितो का नाय ते! म्हणून लगेच तिनं त्याला विचारुन घेतलं. त्यानं नुसतीचं नंदीबैलागत हो म्हणून मान डोलवली.

‘’ आरं तोंडानं बोल की. मी काय तुला खानार नाय.’’

तिच्या ह्या वाक्यावर शंकर्‍या फिस्कारला.

‘’ गपे टवळ्या! फिस्कारतो कशाला बोक्या. चा कर की मुकाट्यानं. ‘’ त्याच्या फिस्कारण्यावरनं प्रिशा त्याच्यावर वसकली.

‘’ तुला काय बाकड्यावर बसायला हळदीकुकवाचं आवतान हवं का काय? टेक. ‘’ तिनं बाकड्यावर हात मारत त्याला बसायचा इशारा केला. तसा तो गपचिप बाकड्याच्या एका कोपर्‍यावर टेकला. तेवढ्यात शंकर्‍यानं चाचे दोन गलास आणून टेबलावर ठेवले.

‘’ हां, घे! आता सांग सगळं बैजवार. त्या हरामी जीत्यानं काय बोलू दिलं नसतं तिथं. डुचका मजा बगायसाठी तिथंन पळून गेला. त्याला वाटलं असलं तुज्यामाज्यात कायतरी शिजलं म्हणून. ‘’

ते ऐकलं आणि चा पिणार्‍या श्रीला जोरात ठसका लागला.

‘’ हाळू पी बेण्या. जीभ भाजलं त्या गरम चानं. शंकर्‍या पानी आण रं! ‘’

‘ आयला हे खोडं आतनं मऊ दिसतंय की! ‘ तो मनातच म्हणाला आणि काही सेकंद तिच्याकडं बघतंच र्‍हायला. तिनं त्याच्याकडं बघितलं तसं त्यानं आपले डोळे ग्लासात घातले आणि गप चा प्यायला लागला.

चा पिता पिता म्हणाला, ‘’ मी आणि जीत येकाचं गावचे. ल्हानपणापास्नंचे दोस्त. ‘’

‘’ थांब ए! मी काय तुला हिथं तुझा न् त्या डुकराचा इतिहास इचारायला आणला नाय तुला. मला फकस्त येवढंच सांग काय की तू हिथं कसा? बास!...’’

आता त्याच्या लक्षात आलं की तिला फक्त त्याच्या ह्या कॉलेजात येण्याबद्दल म्हाईत करुन घ्यायचंय. तसं मग त्यानं तिला पार त्याच्या आजीच्या आजारपनापास्नं सांगायला सुरुवात केली ते कालच्या त्यांच्या संज्यासोबतच्या राड्यापर्यांत सगळं सांगितलं. तवर आणखी दोन चा ढोसून झालते दोघांच्ये. आता सगळं कळल्यावर ती उठली. त्याला म्हणाली, ‘’ चल जाऊया. ‘’ तो कुठला प्रश्न विचारण्याआधी तिनंच त्याला पुढं विचारलं, ‘’ तुला कुठं सोडू? कॉलेजात परत जानार काय हॉस्टेलवर? ‘’

‘’ हॉस्टेलात. ‘’ तो प्रामाणिकपणानं म्हणाला तशी ती गालातच हसली.

तिनं त्याला हॉस्टेलवर आणून सोडला. तो वर पोचलेला बघितला आणि हळूच दुडकेला विचारलं, ‘’ जीत्या आला काय? ‘’ दुडकेनं तंबाकू तोंडात धरल्यानं नुसतीच मान हलवली हो म्हणून. तशी तिनं बुलेटला किक मारली आणि ती निघून गेली. दुडकेला जरा नवालच वाटलं ही बया हॉस्टेवर येऊनपण जीतला न भेटता कशी काय गेली याचा ईचार करत त्यानं खिडकीच्या भिंतीवर हाताचं कोपर ठेवलं आणि त्याच्यावर डोकं ठेऊन डुलकी काढायला लागला. संज्या काय अजून आला नव्हता. जीतपण कधी आलता काय माहीत. पण तो आपला त्याची बनियन आणि हाफ चड्डी घालून बसलेला त्याच्यावरनं त्यानं अंदाज लावला की ह्या यिवून बराच येळ झाला असणार म्हणून. संज्याच्या कॉटखाली एक बारकी ट्रंक ठेवलेली होती. ज्याच्यात तो वाचायचा ती पुस्तकं होती. श्री येईपर्यं काय करायचं म्हणताना जीत त्यातलं अनंत तिबिलेंचं तृप्ती पुस्तक घेऊन चाळत बसलेला. जसा श्री आत गेला तसा लगेच हातातलं पुस्तक बाजूला ठेवत जीतनं त्याची झडती घ्यायला सुरवात केली.

‘’ कुठं गेल्ता रं इतका उशीर तू? ‘’

श्रीनं काय न बोलता सॅक कॉटवर ठेवली आणि तो बाथरुमात घुसला.

‘’ श्री… आरे काय इचारतो मी? ‘’ जीतनं परत तोच प्रश्न विचारला.

‘’ आर थांब की जरा. तोंड तर धुतो जरा. ‘’ बाहेर येऊन खुटीला अडकवलेला टॉवेल घेऊन तोंड पुसलं. परत तो टॉवेल तसाच खुटीला अडकवून ठेवला.

‘’ हां! इचार आता काय ते! ‘’ तो खुर्चीत टेकला.

‘’ कुटं होता इतका उशीर? आणि त्या बयेनं काय केलं नाय ना तुला? तशी काय करनार नाय पण आपलं इचारलेलं बरं. ‘’

‘’ छ्या! मला कायच नाय केलं तिनं. आमी कॉलेजच्या मागं शंकर्‍याच्या टपरीर चा प्यायला गेल्तो. ‘’ श्रीनं जे झालं ते जसच्या तसं सांगितलं.

‘’ चल ए! कायतरी फाका नको मारु. मी काय येडाय का? ती तुला निस्ताच चा प्याला टपरीर घिवून गेल्ती व्हय? ‘’ जीतचा श्रीच्या बोलण्यावर विश्वासचं बसंना.

‘’ हां मग काय तर? खोटं बोलीन का तुज्याशी मी? तू काय करतो चाच्या टपरीर जाऊन काय दुसरं करतो का? ‘’ श्रीनं हसतंच विचारलं.

‘’ च्यायला! पोरगी लैच बदलली की… ‘’ जीत्यानं उशी घेऊन पाठ आणि भिंतीच्या मधी सरकवली. तिला टेका लावून हात डोक्यामागं नेले. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेऊन हलवता हलवता त्याचे डोळे आकाशात भूतकाळ शोधायला लागले. हा काहीच बोलत नाय म्हटल्यावर टेबलावर हाताच्या कोपराच्या मदतीनं टेकवलेलं डोकं उचलून त्यानं मागं वळून बघीतलं तर जीत्या कुठल्यातरी दुसर्‍या जगात बुडलाता.

खुर्चीवरनं उठून संजयाच्या कॉटीवर आपलं बूड टेकवत श्रीनं विचारलं, ‘’ काय रे काय म्हनत होता तू आता? ‘’

तसा भूतकाळातनं अर्ध्या वर्तमानात येत जीत म्हणाला, ‘’ काय नाय रे! तशी गुनाची हाय पोरगी. पण आदी लै डांबराट होती. आणि त्याच्यापेक्षा जास्त तिरसाट, तापाट होतं गाडं. आता बर्‍यापैकी लायनीर आणलीय मी. कॉलेजात आलो तेवा तिची न माजी भिडत झाली. मी फुकाचे चाळीस रुपये गेल्याच्या रागानं तिच्या बुलेटची चाकंच पंक्चर करुन टाकलीती. आणि मग त्या रागानं तिनं माज्या लाडक्या स्कुटीचं पार भुस्काट करुन टाकलं. ‘’

ते ऐकून श्री जरा ताठ होऊन बसला. ‘’ मग रं! ‘’

‘’ मग? मग काय नाय. ‘’ आकाशातले डोळे आकाशातच ठेवत जीत म्हणाला. ‘’ आधी भांडान झालं पार टोकाचं. मग यारी दोस्ती. आणि प्रिशी आता माजी लै जवळची मैत्रीण हाय. आमूला जेवढं म्हाईत नाय ना माज्याबद्दल तेवढं प्रिशीला म्हाईत हाय माज्याबद्दल आणि मला तिच्याबद्दल. ‘’ तरंगतच जीत बोलून गेला.

‘’ काय रे काय म्हनला तू? ‘’ श्रीनं परत विचारलं तसा पुरा जागा होत जीत म्हणाला, ‘’ कुटं काय? मी म्हनलो की मी आणि प्रिशी एकमेकाला चांगले वळकतो. ‘’ त्यानं श्रीला पडलेला प्रश्न त्याच्या डोक्यातून झटकायचा फालतू प्रयत्न करुन बघितला पण त्याचा कायी उपयोग झाला नाय. श्रीनं आपलं म्हणण पुढं लावून धरलं.

‘’ साल्या, मला थुका लावतोस व्हय. लंगोटी मित्राला? आमी आवडती तुला? ‘’

‘’ कॉलेजात तिला बघितली तवापास्नंच. ‘’

‘’ छुपा रुस्तम भाड्या. मला नाय सांगितलंस पण तिला तर बोललास का नाय? ‘’

‘’ कवाच. माजं काय तुज्यासारखं हाय व्हय. झुरुन मरनारं झुराळ तू. ‘’

मग असंच येकाला लागून येक इषय येत र्‍हायला न् हे दोगजन त्यात गप्पा मारत भरकटत र्‍हायले. दुपारच्याला संज्या आला आणि परत त्याच्या कॉटवरची बेडशीट इस्कटल्यावरनं त्याचा न् श्रीचा राडा झाला. शेवटी श्रीनं परत त्याला होती तशी बेडशीट घालून तिली बिन सुरकुत्याची. भांडन संपल्यावर पोटातल्या कावळ्यांना आलेला डबा खायला घालून सगळे आपल्या आपल्या आभ्यासाला लागले. संज्या त्याच्या त्याच्या नोटस् काढत होता आणि हो दोगजन मॉडेल नकाशावर काम करत होते. होता होता रात्रीचे नऊ वाजले. तिघंपन जाऊन जिवून आले. जरा हसी मजाक टवाळकी करण्यात टाईमपास केला तवर रात्रीच्या अकरा वाजताची दुडकेची हाक सगळ्यांनी ऐकली.

‘’ मोट्या लायटी बंद. ज्यास्नी अभ्यास करायचा त्यानी येकोणतीस नंबरला जावा. ‘’

हा हॉस्टेलचा रोजचा टाईम होता लायटी बंद करायचा. ज्यांचा इश्वास होता की रात्रीच आभ्यास चांगला होतो त्यांच्यासाठनं येकोणतीस नंबरची खोली राखून ठेवलेली. रोज चारदोन- चारदोन पोरं असायची तिथं. ती रात्री आभ्यास करतात काय उनाडक्या करतात हे बगायला दुडके कदीच तिसरा मजला चढून यायचा नाय. त्या कामासाठी तो रात्रीचा सावंतलाच उठवायचा. आजपण सगळ्या लायटी बंद झाल्या. संजा, जीत आणि श्रीपण झोपायला गेले. आजपण जीत आणि श्री एकाच कॉटवर आल्टीपल्टी मारुन झोपले. जीत म्हणता म्हणता झोपलापण. पण श्री मात्र टक्क डोळ्यांनी जागा होता. आणि त्या उघड्या डोळ्यांसमोर प्रिशा दिसत होती. आजच्या एकाच दिवसात ती किती वेगळ्या वेगळ्या रुपात त्याला भेटली होती. त्याच्या डोळ्यांसमोर आजचा अख्खा दिवस भिरभिरत होता.

स्वरा… 17.05.2020

…..

*11*

त्याला कॉटवर पडल्या पडल्या सकाळी आश्चर्याचा धक्का बसलेल्या प्रिशाचा चेहरा आठवत होता. तिच्या त्या गडद तपकिरी रंगाच्या डोळ्यांच्या विस्फारलेल्या बाहुल्या त्याला स्वतःकडे खेचत होत्या. त्याला त्यात आणखी डोकावून बघावसं वाटत होतं; पण इतक्यातच जीतला जाग आली.

‘’ श्री, झोपला नाय का अजून तू? झोप. झोप. सकाळच्याला कॉलेजला जायचंय. ‘’ असं म्हणत त्यानं कूस पालटली आणि त्या कूस पालटण्यासोबतच त्यानं श्रीला त्याच्या त्या मधाळ स्वप्नरंजनातून झटका देऊन बाहेर काढलं. जीत कूस बदलून परत गुडुप झोपून गेला. जीत उठला आणि त्याला सकाळी तावातावाने जीतशी भांडणारी प्रिशा दिसायला लागली. कसली भारी दिसत होती ती तिच्या त्या बुलेटवर! तो तिच्या जवळ आणखी जवळ चालला होता. त्याला पुन्हा एकदा तिचे ते मोठ्ठाले तपकिरी डोळे पहायचे होते. इतक्यात जीत पुन्हा बडबडला.

‘’ काय करतो श्री? झोप की गुमान लेका. किती वळवळतो गांडळागत! ‘’

‘ हा ना सारखा आमच्या मधी मधी येतो यार! ‘’ श्री स्वतःशीच वैतागला. ‘ मरु दे साल्या! झोप येकटाच.’ असं म्हणून तो कॉटवरनं उठला आणि जाऊन खुर्चीत बसला. आता इथं त्याला आणि प्रिशाला डिस्टर्ब करायला कोण येणार नव्हतं. उशी घेऊन त्यानं ती मानेखाली लावली आणि दोन्ही पाय टेबलावर पसरुन तो परत एकदा प्रिशाच्या आठवणीत बुडून गेला. बुलेटवर बसताना त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवलेला त्या आठवला. त्या आठवणीनं आताही त्याच्या मनात काहीतरी हुळहुळलं. एखादं मोरपिस फिरल्यावर कशा गुदगुल्या होतात त्याला तसं काहीतरी वाटत होतं. जीतनं ओळख करुन दिल्यानंतर तिनं किती हक्कानं आपल्याला बुलेटवर बसायची ऑर्डर सोडली होती. आणि आपण बसायला वेळ लावल्यानंतर कसं आपल्या हाता धरुन तिनं जबरदस्तीनं आपल्याला ओढून गाडीवर बसायला लावलं होतं हे सगळं त्याला आठवून आठवून काहीतरी होत होतं. पण नक्की काय होत होतं हे मात्र त्याला स्वतःलापण कळत नव्हतं.

मध्येच त्याचा डोळा लागला आणि त्या इतकुशा झोपेतपण त्याला प्रिशाच दिसत होती. मात्र आता ती सकाळ सारखी दिसत नव्हती तर काहीतरी वेगळी दिसत होती. तो विचार करत होता ही अशी वेगळी का दिसतेय आपल्याला. काय बदललंय हिच्यात. तो तिच्या अगदी शेजारी उभारुन तिला न्याहाळत होता आणि अचानक त्याला लक्षात आलं की तिनं साडी नेसलीय. त्या धक्काच बसला. ‘’ आई गं! ‘’ त्या हृदयात एक दिलखेच कळ आली. ही अशी? काय कमाल दिसते ही अशी यार? त्या जीन्स, शर्ट, बुट आणि जॅकेटपेक्षा इथं ती किती सुंदर दिसतेय! कमालीची सुंदर. खरंच आहे, जातीच्या सुंदराला कायपण शोभतं. पिवळ्या रंगाची साडी, छोट्याशा बाह्यांचा ब्लाऊज, गळ्यात साधीशी चेन, कानात पिवळ्या रंगाचीच फुलं घातली होती. तिचे ते खांद्यापर्यंतचे केस जाऊन तिथं छान वार्‍यावर लहरणारे केस पाठीवर मोकळे सोडले होते. एका हातात घड्याळ आणि दुसर्‍या हातात साडीच्या रंगाच्या बांगड्या. तिच्या त्या मोठाल्या तपकिरी डोळ्यांना काजळानं आणखीनंच देखणं केलं होतं. तो तर त्यात पार पार बुडून गेला होता.

‘’ श्री! ‘’

‘’ हं! ‘’

‘’ काय बघतोयस श्री? ‘’

‘’ तुलाच. तुला माहीतेय का तू किती सुंदर दिसतेयस ते या साडीत? ‘’

उत्तरादाखल ती काहीच न बोलता मान खाली घालून नुसतीच लाजली.

‘’ आई गं! ‘’ पुन्हा त्याच्या हृदयात एक दिलखेच कळ आली.

‘ यार ही जर अशी लाजली ना! तर माझा जीवच जाईल अशानं.’ तो दोन पावलं पुढं आला. त्यानं हळूच तिची हनुवटी उचलली. त्याबरोबर तिनं डोळ्यांच्या पापण्या अलगद वर उचलल्या. त्याच्या डोळ्यांत एका क्षणात डुबकी मारुन ती पुन्हा बाहेर आली आणि पुन्हा त्या पापण्या खाली गेल्या.

‘’ ए बघ ना माझ्याकडे. ‘’

‘’ नको. तू मला तुझ्यात बांधून घालतोस. मग मी बाहेर कशी येऊ? ‘’ तिनं विचारलं.

‘’ का? तुला नाही का बुडायचं या तळ्यात? ‘’ त्यानं तिचा हात धरला आणि तो आपल्या हृदयावर ठेवला. तिला त्याच्या त्या हृदयाची धडधड स्पष्ट जाणवत होती. आता मात्र तिनं त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून बघितलं आणि त्याच्या छातीवर डोकं टेकलं. उफ्! किती छान वाटत होतं. त्याच्या हृदयाची आजवरची त्याची सगळी अस्वस्थता कुठल्याकुठे पळून गेली होती. हीच, हीच आहे तुझ्या हृदयाची राणी त्याच्या मनानं त्याला ग्वाही देऊन टाकली.

इतक्यात कुठूनतरी तो शंकर्‍या चहाचे ग्लास घेऊन तिथं कडमडला.

‘’ ताई, चा! ‘’

त्यानं ते ग्लास टेबलावर ठेवले आणि तो निघून गेला. दोघांनी आपापला ग्लास उचलला आणि चहा प्यायला लागले. ती चहा पिता पिता काहीतरी बोलत होती. मध्येच म्हणाली, ‘’ त्या जीत्याला वाटलं असणार तुझ्यामाझ्यात काहीतरी शिजलं. ‘’ ते ऐकलं आणि त्याला ठसका लागला. ‘’ हाळू पी बेण्या. जीभ भाजलं त्या गरम चानं. शंकर्‍या पानी आण रं! ‘’ त्याला तिच्या त्या ओरडण्यातही तिचं प्रेम न् तिची काळजी दिसत होती. ती पुन्हा चहा प्यायला लागली तसा तो तिच्याकडं बघत राहिला. तिच्याकडं बघता बघता तो स्वतःशीच हसत होता.

‘’ काय रे झोपत काय हसतो तू? श्री… ए श्री! ‘’ संज्यानं त्याला गदागदा हलवून उठवला.

‘’ काय झालं? ‘’ तो संज्यावर करवादला.

‘’ आरं झोपला न्हाईस का? की झोपंतच हसत होतास? ‘’ संज्यानं जांभई देत विचारलं.

‘’ तुला काय करायचंय? तू झोप की गुमान. बाथरुमला चाललायस ना! मग जा तिकडं. मी बघतो मला काय करायचं ते! ‘’ त्यानं बाथरुमच्या दाराकडं बोट दाखवत संज्याला आपल्या स्वप्नाच्या वाटेतनं हुसकून लावला.

त्याची सगळी रात्र अशीच गेली. सगळीच भेसळ. प्रिशा त्याला कुठपण आणि कशातपण दिसत होती. पहाटे कधीतरी खुर्चीत बसल्या बसल्या तिथंच त्याला झोप लागली.

रोजच्या शिरस्त्याप्रमाणं प्रिशा आजपण जीतला न्यायला आली. पण कालचा सगळा धुमाकूळ लक्षात असल्यानं तिनं गपचुप दुडकेसोबत चाच्या थर्मासची अदलाबदली केली आणि बॅग तिथंच ठेऊन ती मुकाट वर गेली. दुडकेचं कालचं प्रश्नचिन्ह आज परत तिच्या अशा वागण्यानं ताजं झालं. आज तिनं हलकाच हात लावून दार उघडलं. आधी बघितलं आत काय नजारा दिसतोय ते! बघितलं तर श्री खुर्चीतच झोपला होता तंगड्या टेबलावर पसरुन. ती हळूच आत आली. आज जीतच्या वह्या-पुस्तकांचा जास्त पसारा मांडलेला दिसत नव्हता. ज्या काही दोनचार त्याच्या कॉटच्या कडेला होत्या त्या उचलून तिनं त्या सॅकमध्ये टाकल्या. सॅक खांद्याला अडकवली आणि ती खुर्चीच्या शेजारी जाऊन उभी राहिली. अनिमिष होऊन तिनं श्रीला त्या झोपलेल्या अवस्थेत डोळ्यांनीच पिऊन घेतला. हळूच तिथंन ती कॉटकडं गेली. हलक्या हातानं थापट्या मारुन तिनं जीतला उठवला. तो आधी किरकिरला. ‘’ कोण हाय? ‘’ त्याच्या त्या मोठ्या आवाजानं श्रीची झोप मोडेल म्हणून तिनं पटकन् त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या कानाजवळ फुसफुसली. ‘’ उठ की रेड्या. कॉलेजला जायचंय का नाय? आवरुन ये. मी खाली वाट बघतीय. ‘’ ती निघून गेली तिकडं बघत डोळे चोळत जीत उठून बसला. ट्रकचा हॉर्न एकदम कारच्या हॉर्नमध्ये कसा काय बदलला? हे गणित काही जीतला आंघोळ करताना, कपडे बदलताना सुटना. ह्या गोंधळात असताना त्याच्या आता लक्षात आलं की श्री खुर्चीतच झोपलाय.

‘’ श्री! ए श्री! उठ लवकर. कॉलेजला यायला उशीर हुईल. आटप लवकर. मी चाललो. ‘’ त्यानं श्रीला उठवलं आणि तो खाली गेला. आज त्याला खाली दुडकेसोबतपण हिची काही बोलाचाली दिसंना. ‘ झालंय काय ह्या फावडीला? ‘ पाटलांचं गाडं येवढं कसं शांत झालं काही समजना जीतला.

‘’ आज काय झालंय काय? सूर्य कुठं उगवला म्हनायचा? ‘’ गाडीवर बसता बसता त्यानं प्रिशीला विचारलंच.

‘’ काय नाय झालेलं. सूर्य पुर्वलाच उगवलाय. मी फकस्त कालच्या धड्यावरनं शानपना शिकून आज काळजी घेतलीय. ‘’

‘’ वा! वा! चांगलंय की. अशीच शान्यागत वाग गं माजी बाय ती. ‘’

‘’ जीत्या माज्या खोड्या काढल्यास ना तर बघच. तुला पुलावरनं नदीतंच फेकून दीन बघ! ‘’

‘’ ह्यँ ह्यँ! म्हणं नदीत फेकून दीन. कशाल फुकाचं पाणी उकाळती? तू कश्शाल मला नदीत टाकशील? तुला श्रीला भेटायचं न्हाय काय? ‘’ जीतनं तिची नस बरोबर पकडली.

‘’ जीत्या! ‘’ असं म्हणून तिनं काच्कनी ब्रेक मारला पुलावरच.

‘’ ए बाई तुझा काय भरोसा नाय, टाकशील बिकशील मला नदीत. मी चेष्टा केली गं रानी. आता तू मला कॉलेजात निवून सोड बघू शान्यासारखी. मी आमूला येकटाच हाय गं! तिचा तरी इचार कर. झालं तरी उद्यापास्नं यिवू नको मला न्यायला. ‘’ जीत्यानं आपले शब्द मागे घेतले.

‘’ ए माकडतोंड्या! आमच्या खानदानात कदी कुनी दिला शब्द मोडत नायत. काय कळलं? ‘’

ते कॉलेजला पोचले तर पार्किंगात बसलेली अमी कुरकुरली.

‘’ जीत तुमच्यामुळं रोज मला हिथं वाट बघत बसावं लागतंय. ‘’

‘’ त्यात काय येवढं. हिच्यामागं बसून तू पण येत जा हॉस्टेलला. तशीपण येकटीच तर येती की ही. ‘’ जीतनं लगीच त्याच्यावर उपाय शोधला.

‘’ होय तर भाड्या! तेवढंच र्‍हायलंय आता. मी जशी काय तुजी पगारी ड्रायव्हरच हाय ना! हरामी साल्या! येकतर हॉस्टेलला यिवून तुजी क्लिनरकी करायची. तुजा ड्रायवर हून तुला कॉलेजला आनायचं आणि आता काय माजा हमालपण करतूस व्हय? ‘’

‘’ आगं तू माजा ड्रायवर कसा असशील? तु तर माजी ड्रायवरीन हायंस. ‘’ जीत्यानं हसत हसत तिची फिरकी घेतली तशी उभ्या उभ्याच तिनं गाडीला लावलेला टी-स्क्वेअर काढला आणि त्याला मारायला धावली. तो पुढं आणि प्रिशा त्याच्यामागनं पट्टी घेऊन त्याला मारायला पळत होती.

‘’ थांब की रेड्या! आता का? कुठं पळतोस? थांब. ‘’ असं म्हणत तिनं तो टी-स्क्वेअर त्याच्या दिशेनं फेकला. नेमका जीत खाली बसला आणि गेटातनं आत येणार्‍या श्रीच्या हेल्मेटवर ती पट्टी जाऊन आदळली. काय झालंय हे कळायच्या आधीच त्याचा स्कूटीवरचा बॅलन्स गेला आणि त्यानं गाडीसकट गेटसमोरच्या मातीत लोळण घेतली.

18.05.2020

……

*13*

‘’ श्रीऽऽऽ! ‘’ जीत ओरडल. धावत येऊन प्रिशानं आडव्या पडलेल्या स्कूटीला उचलून बाजूला केलं.

‘’ सॉरी… सॉरी… सॉरी… मला तुला मारायचं नव्हतं. ते चुकून तुला लागलं. ते मी ह्या डुकराला… ‘’ प्रिशानं कान पकडले.

‘’ अगं त्याला उठायला हात तरी दे की आधी. ‘’ तिथं येऊन हात देऊन श्रीला उठवत जीत म्हणाला.

तो असं म्हटल्यावर प्रिशाच्या लक्षात आलं की श्री खाली पडला होता आणि आपण त्याला उठायला हातपण दिला नाही. तिला आणखीनंच लाजल्यासारखं झालं. जीभ दाताखाली दाबून ती तशीच मान खाली घालून उभी राहिली. जीतनं हात देऊन उठवलेल्या श्रीनं कपड्याला लागलेली माती झटकली. सरळ उभं राहण्याच्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्यातून सणसणून कळ आली.

‘’ आई गं! आई…ई गं! ‘’ त्यानं कळवळत वाकून दोन्ही हातांनी गुडघा दाबून धरला. त्याचवेळी त्याच्या हाताच्या खरचटलेल्या कोपराकडं प्रिशाचं लक्ष गेलं.

‘’ लैच खरचाटलंय की तुज्या कोपराला. थांब आलेच मी मेडिसीनचा बॉक्स घिवून. ‘’ असं म्हणून ती ऑफिसच्या दिशेनं पळाली. जीतनं त्याला आधार देऊन बाजूच्या कठड्यावर बसवला.

‘’ काय काळयेळ काय नसती नं तुम्हांला भांडायला? ‘’ श्री जीतवर उखडला.

‘’ म्हणजे? तुला काय म्हनायचंय की आमी सारखं भांडतंच असतो व्हय? आणि मग अमेयावर प्रेम कोण करतं? ‘’

श्रीला जीतकडनं असल्या पीजे प्रश्नाची अपेक्षाच नव्हती. तो आता हयाला काय उत्तर द्यावं ह्याचा विचार करतच होता की तेवढ्यात प्रिशा औषधाचा डबा घेऊन तिथं आली. तेवढ्या वेळात कॉलेजातली भटकी जमात काय तमाशा झाला ते बघायाला तिथं गोळा झाली होती.

‘’ हां! हात कर पुढं.’’ हिला संधी मिळायची खोटी काय लगीच सगळ्यास्नी निस्त्या आर्डरी सोडती असा विचार करत श्रीनं हाताचं कोपर पुढं केलं. श्रीनं पुढं केलेल्या हातावर प्रिशानं मेडिसीनच्या डब्यातनं काढलेलं हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकलं. जखमेवर पडलं तिथं त्याचा फेस झाला पण आजूबाजूला तिथं पडलं तिथं ते त्याला चरचरलं.

‘’ स्स्स्सऽऽऽ! हाळू की जरा. ‘’ श्री पुटपुटला.

तसं तिनं त्याच्या जखमेकडं बघायचं सोडून डोळे वर करुन त्याच्याकडं बघितलं.

‘’ हां! मग काय तर! जरा हळू टाक की. झोंबतंय न्हवं त्याला? आता बघतीस काय अशी? फूक मार की फूक मार. ‘’ असं तिला सांगून जीत स्वतःच त्याच्या त्या खरचटलेल्या जखमेवर फूक मारायला लागला. श्रीला कळायचं बंद झालं की हा असा तिरपागडा का वागतोय ते!

‘’ ल्हान हाय का तुमी दोगजणं? शाळेत जातायसा काय? रोजच्या रोज सगळ्या कॉलेजसमोर काय ना काय राडे घालत असताय ते? ‘’ अमेया जीतवर करवादली.

‘’ आणि ही कार्टी तर कधी सुधारणार हाय ते त्या वरच्यालाच म्हाईत… ‘’ असं म्हणून तणतणंत अमेया तिथनं निघून गेली. तिच्या मागंमागंचं बाकीचा सगळा कंपूपण निघून गेला. जमलेली सगळी भटक्या जमातीची गर्दी पांगली आणि त्या पार्किंगच्या कट्ट्यावर आता फक्त तिघंजण उरले; प्रिशा, जीत आणि श्री.

जीत तिथं बसून नुसतं बघ्याचं काम करत होता. प्रिशानं श्रीची जखम स्वच्छ पुसून काढून त्याच्यावर मलम लावलं.

‘’ आता बरं वाटतंय ना? आणि परत येकदा सॉरी. चुकून झालं. चल मी जाते. तुझी बॅग निवून दिवू काय वर्गात? ‘’ तिनं जाता जाता आपुलकीनं चौकशी केली.

‘’ काय गरज नाय त्याची. तू जा तुजी तू. मी न्हिन त्याची बॅग. ‘’ जीत फुत्कारला.

‘’ जास्त टिव टिव करु नकंस. हात गावलास काय तुजी नांगीच मोडीन बग बरी. ‘’ असं म्हणून प्रिशा बॅग मेडिसीनचा बॉक्स सगळं उचलून चालालयला लागली. श्री जाणार्‍या प्रिशाकडं बघत राहिला.

‘’ जखम काय लै मोठी वाटत नाय. पण दुकतंय का तुला लै? ‘’ जीतनं श्रीला विचारलं.

‘’ आरं हट! असलं घाव शेतात काम करताना लै लागत्यात. हे कसलं दुकतंय! ‘’ असं म्हणून श्रीनं खिशातनं रुमाल काढला आणि कोपरावर बांधून टाकला.

‘’ आरं येड्या मी ह्या जखमेचं विचारतूय. ‘’ श्रीच्या छातीवर डाव्या बाजूला हात ठेवत जीत म्हणाला.

‘’ तितं कुटं काय झालंय मला? ‘’ श्रीला त्याचं बोलणंच कळलं नाय.

मग मात्र जीत कठड्यावरनं उतरुन उभा र्‍हायला. त्यानं श्रीची हनवटी धरली आणि प्रिशा गेली त्या दिशेनं वळवत म्हणाला, ‘’ त्यो बाण लागलाय न्हवं का हितं? ‘’

‘’ चल बे! तुजं कायतरीचं आसतंय. ‘’ श्रीनं त्याला फाट्यावर मारला.

पण आयकलं तो जीत कसला? ‘’ हां! हां! आमी जसं काय खुळीच हावोत. काय कळतंच नाय ना आमाला? काय करत व्हता तू रातभर खुर्चीत काल? ‘’ त्याला वाटलं नव्हतं पण जीतनं त्याची चोरी पकडली होती.

‘’ ते!... ते व्हय!... ‘’ श्रीला पटकन् उत्तर सुचना.

‘’ हां! हां! तेच… ‘’ जीतनं गाडा ढकलायला हातभार लावला.

‘’ आसं काय करतो लेका? तुला नीट झोपता येत न्हवतं म्हणून तर मी तिकडं खुर्चीत जाऊन नाय का झोपलो? रातभर दुसरं काय करणार ना! ‘’ सुचलेली कडक थाप श्रीनं जीतवरचं उलटवायची ठरवली. पण तिचा काही उपयोग झाला नाही.

‘’ है शाब्बास! सोड तू चक्री हां! मी गुंडाळतूय. पण मला गुंडळायला नाय जमणार तुला. तुली प्रिशी आवडती. कळलंय मला. ‘’ जीतनं अंगठा आणि करंगळी ताणून धरत दोरा गुंडाळायचा आव आणला.

‘’ आरं जीत्या तुझी शपथ खरं सांगतोय मी. तुला कशाल थुका लावीन? ‘’

पण जीत काय त्याचं ऐकायला मागत नव्हता.

प्रिशा आपल्याच विचारत जाऊन वर्गात बसली.

‘’ झालं वाटतं औषध लावून? ‘’ तिला आत येताना बघून अमेयानं विचारलं.

‘’ हं! ‘’ प्रिशानं नुसताच हुंकार भरला. आणि ती बेंचवर येऊन बसली.

‘’ का गं? काय झालं? त्याला लै लागलं नाय ना? ‘’ अमेयानं तिच्या पडलेल्या तोंडाकडं बघत विषय पुढं चालू ठेवला.

‘’ नाय. ‘’ आतापण प्रिशानं एका शब्दांत उत्तर देऊन विषयाला बगल मारली.

‘’ त्याला काय लै लागलं नाय. औषधपण तुझी तूच लावून आलीस. मग आता तोंड पाडायला काय झालंय तुला? ‘’

‘’ काय नाय गं! विचार करतीय की तो कॉलेजला आल्यापास्नं नुसते राडे चाललेत त्याच्यात माझ्यात. बरं आमी दोगं पण काय तुज्या आणि जीतसारखे नाय की दिल आया गधी पें तो परी भी क्या चीज है म्हणणारे. ‘’

‘’ म्हणजी मी आणि जीत काय गाढव हाय असं म्हणायचंय का तुला? ‘’

‘’ तसंच काय नाय. पण नाय असं पण नाय. ‘’

‘’ म्हणजी? ‘’

‘’ जाऊ दे! तुज्या टाळक्या भायेरची गोष्ट हाय ती. तू आपला त्या येड्या जीतलाच सांभाळ म्हृणजी झालं. ‘’

अमेया त्याच्यावर काय न बोलता फुरंगाटून तोंड फिरवून बसली.

‘’ आमे तुला रात्रीची झोप येती का गं? ‘’

प्रिशानं येकदम तीनशे साठ अंशात मारलेलं वळण बघून अमेया नुसतीच गालात हसली.

20.05.2020

........

*12*

कॉलेजची दोन वर्षं हा हा म्हणता संपली. जीत आणि अमेयाबद्दल सगळ्या कॉलेजला माहीत होतं आणि प्रिशाचं नाव श्रीसोबत सगळ्या कॉलेजनं जोडून टाकलं होतं. हे दोघे काही बोलायचं नाव घेत नव्हते पण कॉलेजला मात्र घाई झाली होती हे कधी एकमेकांना होकार देतायत याची. यांनी मात्र सगळ्यांना दोन वर्षांपासून झुलवत ठेवलं होतं.

हे त्यांच्या कॉलेजचं तिसरं वर्ष होतं. या वर्षाचं वैशिष्ठ्य हे होतं की एकतर कॉलेजमध्ये यावर्षासाठी नवं ऍडमिशन झालं होतं. इंद्रजित घाडगेचं पुण्यावरुन. पुण्याच्या कॉलेजात त्यानं जे गुण उधळले होते त्याच्यामुळं कॉलेजनं त्याला रस्टीकेट केलं होतं. त्यानं चित्रा पुळेकर नावाच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली. वर्ष-सहा महीने तिच्याबरोबर मजा मारली आणि प्रकरण जेव्हा गळ्याशी आलं तेव्हा सरळ ‘ तो मी नव्हेच!’ असं म्हणत हात वर केले. चित्राला त्याच्यामुळे दिवस गेले होते. आणि आता इंदर ती जबाबदारी झटकतोय म्हटल्यावर चित्रतच्या आईनं सरळ कॉलेज कमिटीकडे त्याची तक्रर केली. बिचारीला माहीतच नव्हतं की त्या कमिटीचे एक सदस्य इंदरचे वडील भाऊसाहेब अर्थात विजयेंद्र घाडगे आहेत म्हणून. पण बाप पोराचे सगळे गुण ओळखून होता. त्यामुळं त्यानं त्याच्या पध्दतीनं या प्रकरणातून मार्ग काढला. चित्राचं ऍबॉर्शन करणं शक्य नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळं त्यांनी तिला डिलीव्हरी होईपर्यंत त्यांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर ठेवली. त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर काय करायचं ह्याचीपण सगळी सोय त्यांनी तिथं करुन ठेवली होती. आणि आपल्या कमिटीच्या सभासदपदावर गदा येऊ नये म्हणून इंदरला कॉलेजमधून रस्टीकेट करुन स्वतःचा कमिटी चेअरमन बनण्याचा मार्ग मोकळा केला. आता दोन वर्षं इंजिनिअरिंग केलंच आहे तर आणखी एक वर्ष करुन पदवी घेता यावी म्हणून पुण्यापासनं जरा लांब आणि कोल्हापूरपासनं जवळ असणार्‍या पण फारसं नाव नसलेल्या या कॉलेजात त्यांनी इंदरची वर्णी लावली होती. तसा तो शिकला नसता तरी काही फरक पडणार नव्हताच त्याला; कारण येऊन जाऊन त्यालाच तर मोरवन बिल्डर्स सांभाळायची होती. भाऊसाहेबांनी थोरल्या दिपाचं लग्न आपल्या राजकारणाशी संबंधितांमध्ये करुन देऊन तिच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले होते. खोट्या डिग्र्या काय पैशाला पासरी मिळाल्या असत्या त्यांना पण दाखवण्यासाठी असली तरी मेहनत करावीच लागते असं मानणार्‍या भाऊसाहेबांनी जा एक वर्षं मजा कर असं म्हणून लेकाची ह्या कॉलेजात रवानगी केली होती.

या वर्षांचं दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे स्पर्धा. दरवर्षी अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला असणार्‍या मुलांसाठी कॉलेजमध्ये मॅप ड्रॉईंग आणि त्याबरहुकूम कार्डबोर्डची मॉड्यूल्स बनवण्याची स्पर्धा असे. त्यात इंटेरिअर करणारेपण असत. यावर्षी जीत, प्रिशा, अमेया, श्री, युवराज, धनराज, चेतन, अभिजीत ही सगळी गँग ह्या स्पर्धेत होती. यात इंद्रजित घाडगेची आणखी भर पडली होती. इंदर म्हणजे ‘ शेंडी तुटो वा पारंबी तुटो! होणार माझ्याच मनासारखं असं मानणार्‍यांच्यातला. बाकीचे सगळे जेव्हा काय करायचं? कसं करायचं? ह्याची चर्चा करत होते तेव्हा त्यानं आपल्या पंटर विजाच्या मदतीनं सुशाला पटवला. जो कोणी सगळ्यांत चांगला नकाशा काढेल आणि चांगलं मॉड्यूल बनवेल त्याची सेंटपर्सेंट कॉपी मारण्यासाठी. सुशा मॉड्यूल्स बनवण्यात सगळ्यांचा बाप होता. त्याला घरं बनवण्याची आवड आर्किटेक्चरला येण्याच्या आधीपासनं होती. दिवाळीत किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन मिळवलेल्या बक्षिसांनी कपाट भरलं होतं त्याच्या घरी. इंदरचा पंटर विज्यानं सुशाच्या ह्या क्वालिटीसोबत त्याची एक कमजोरीपण शोधून काढली होती. त्याला श्रीमंत होण्यात जरा जास्तच रस होता. बंगला, गाड्या, सोन्याचे दागिने या गोष्टीचं सुशाला प्रचंड आकर्षण होतं. विजाला त्याची ही कमजोरी कळल्यावर त्यानं सुशाला 10 ग्रॅमचं सोन्याचं कडं भेट दिलं. बदल्यात सगळ्यात चांगला नकाशा शोधून काढून चांगलं मॉडेल बनवायचं आणि इंदरला मदत करायची असा सौदा पक्का केला. वरनं त्याची इंदरशी भेट घालून दिल्यावर इंदरनं त्याला भागीदारीचं गाजरपण दाखवलं. मग मात्र सुशा नाही म्हणूच शकला नाही.

सगळ्यांचे आपआपले गट तयार झाले होते. जीत-प्रिशा-अमेया-श्री ह्यांचा एक गट. जीत आणि श्री नकाशा काढून स्ट्रक्चरल मॉडेल बनवणार होते आणि अमेया-प्रिशा त्याचं इंटेरिअर करणार होत्या. त्यांनी भूकंपरोधी प्लस सोलारसिस्टीम असणारं मॉडेल बनवायचं ठरवलं होतं. युव्या, चेत्या,धन्या,अभ्या यांच्या गटानं सहा तुकड्यांचं मोठं मॉडेल बनवायचं घाटलं होतं. त्यात जंगलातली झाडावर बांधली जाणारी, लाकडाची घरं, पर्वतीय भाग- हिमवर्षाव, मुसळधार पावसाच्या ठिकाणी असणारी उतरत्या छपराची घरं, अतिशय थंड व उष्ण भागातली घरं, भूकंपप्रवण क्षेत्रातली घरं, दलदलीच्या भागातली घरं आणि शहरी भागातली घरं यांचा समावेश होता.

इंदरनं या सगळ्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी कधीच मानलं नाही. त्याच्या डोळ्यांत खुपत होता तो श्री! कारण त्याला कॉलेजात आल्या आल्या आवडणारी पोरगी त्याला भाव न देता श्री आणि जीतसोबत वावरायची. बरं, हे कमी म्हणून की काय अख्ख्या कॉलेजात प्रिशाच्या नावासोबत श्रीचं नाव जोडलं जायचं. त्यामुळं इंदरची आणखीनचं चडफड तडफड व्हायची. आता अशी सोन्यासारखी संधी मिळाली तर तो थोडीच ती हातची जाऊ देणार होता? त्यानं सुशाला सांगून ठेवलं होतं काहीही झालं तरी श्री सोडून दुसर्‍या कुणाच्याच मॉडेलची नक्कल तयार करायची नाही. त्यामुळं सुशा आता एकाचवेळी दोन दोन मॉडेल तयार करत होता. एक त्याचं स्वतःचं आणि दुसरं इंदरसाठीचं. त्यासाठी त्यानं मोठ्या मुश्कीलीनं श्रीनं काढलेल्या नकाशाची नक्कल तयार केली होती. इंचभराचासुध्दा फरक न करता त्यानं श्रीनं तयार केलेल्या मॉडेलप्रमाणं मॉडेल बनवलं. मॉडेल बनवण्यासाठी त्याला सोल्ड्रिंग गन हवी होती. ती त्यानं युव्याकडनं मागून आणली होती.

परीक्षेच्या दिवशी सकाळी युव्या सुशाच्या खोलीत आपली गन न्यायला आला तर सुशा आपला ढाराढूर झोपलेला.

‘’ ह्याच्या आयला! कसं झोपलंय तंगड्या ताणून. आपलं झालं काम तर घेतलेली वस्तू कोण बा आणुन देणार काय ह्येचा. ए सुशा! उठ ए सुशा. मला गन पायजे माजी.’’

रात्रभर काम करुन उशीरा झोपलेला सुशा थोडीच उठणार होता. तरी युव्याच्या आवाजानं अर्धवट जागा होतं त्यानं विचारलं, ‘’ काय पाहिजे तुला? ‘’

‘’ आरं माजी गन आणलीस ना काल? तीच पायजेल. ‘’

‘’ बरं! ठेवलीय बघ त्या टेबलाखाली. ‘’ असं म्हणून तो परत झोपलापण.

टेबलाखाली गन घ्यायला वाकलेल्या युव्याचं कॉटखाली तयार करुन ठेवलेल्या मॉडेलकडं लक्ष गेलं. काय केलंय बघुया तरी म्हणून तो सरपटत कॉटखाली गेला. सुशाच्या खोलीत राहणारा राजन तेव्हा आंघोळीला गेलेला. तो डोकं पुसत बाहेर आला तर कॉटखाली पाय बघितल्यावर त्यानं युव्याला विचारलं, ‘’ काय रं! गन भेटली नाय का अजून? ‘’

तसा पटदिशी कॉटखालनं बाहेर येऊन अंग झाडत युव्या म्हणाला, ‘’ गन मिळली की पण तू चांगलम बनवलंस मॉडेल हां! ‘’

‘’ कसलं मॉडेल? ‘’ राजननं काही न कळून विचारलं.

‘’ आरं ते सोलार घराचं मॉडेल. ‘’

तसा राजन हसला. म्हणाला, ‘’ युव्या खुळा का येडा रं तू? बघितलास का मला कवा तुमच्या कॉलेजात? आरं मी कॉमर्सला हाय. ‘’

युव्याला आपला घोळ झालेला कळला आणि तो बरं! बरं! म्हणत तिथनं बाहेर पडला. परीक्षेची तयारी करण्याच्या नादात त्याच्या डोक्यातनं तो विषय बाकीच्यामबरोबर बोलायचा राहून गेला.

कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये स्पायरली टेबलं मांडली होती. भाग घेणार्‍या 150 जणांचे दोन गट केले होते. पहिल्या दिवशीच्या गटाची परिक्षा झाली होती. सुशा आपल्या घरी निघून गेला होता. आजच्या दुसर्‍या दिवशी इंदरच्या सोबतीला बाकी सगळी गँग होती. काळे सर आणि रमणिक सर एकेकाचं मॉडेल तपासून त्याची नोंद करुन घेत होते. युव्याच्या ग्रुपचं परिक्षण झालं होतं त्यामुळं ते सगळ्या हॉलभर मोकाट हिंडत होते. धन्या आणि चेत्या अमेया-श्री च्या टेबलाकडं आले.

‘’ कुठं आले रे सर? ‘’ अमेयानं एक पाय उचलून दुसर्‍या पायाच्या गुडघ्यावर ठेवत विचारलं.

‘’ त्या पलिकडच्या लायनीत इंदरच्या टेबलाकडं पोचलेत सर. अजून 10-12 टेबलं झालं की मग तुमचा नंबर लागलं बघ. ‘’ धन्या म्हणाला.

‘’ येवढा वेळ लागलं म्हणतोस तर जरा चा पिऊन यिवू का आम्ही कॅन्टीनातनं? थांबताय काय तुम्ही दोघं हितं? ‘’ अमेयानं विचारलं.

‘’ जा. जा. जाऊन या. आमी हाय इथंच. ‘’

धन्याकडनं आश्वासन मिळालं म्हणताना अमेया आणि श्री कॅन्टीनला चा प्यायला गेले.

चा पिता पिता आमीनं त्या विचारलं, ‘’ श्री तुला काय वाटतं आपल्या मॉडेलला चांगले मार्क भेटतील ना? ‘’

‘’ अगं आपल्यासारखं सोलारवरचं दुसरं मॉडेल कुणी बनवलेलं नाय. त्याच्यामुळं तू अजाबात काळजी करु नकोस. आपल्याला चांगलेच मार्क पडतील बग. ‘’

तेवढ्यात धन्या त्यांच्या नावानं कोकलत आला कॅन्टीनमध्ये.

‘’ श्री, आमेऽऽऽ लवकर चला. आरं तुमची गाडी घरंगाळली घाटात. काळे सरांनी तुमचं मॉडेल फेल केलंय. त्याच्यावर कॉपीकॅटचा शिक्का मारलाय. चला लवकर. ‘’

जाता जाता श्री म्हणाला, ‘’ आसं कसं हुईल धन्या? आमच्यासारखं मॉडेल दुसरं कुणीच नाय बनवलेलं. आता मी आमीला तेच तर सांगत हुतो. ‘’

‘’ कोन म्हनलं तुला दुसरं नाय बनवलं म्हणून? त्या उंदरानं तुज्यासारखंच बनवलंय बग. आणि तुमच्याआधी त्याचा नंबर होता ना! त्यानं म्हणं सांगितलं की त्याला लगीचं घरला जायचंय त्याचे बाबा आजारी हायत म्हणून त्याचं मॉडेल आधी बघा. नायतर तुमच्याच लायनी होते सर. ‘’

ते पोचल्याबरोबर काळे सरांनी त्यांची चांगली खरडपट्टी काढली. त्यांनी सरांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही पयोग झाला नाही. पण जाता जाता रमणिक सर श्री ला म्हणाले, ‘’ एक काम कर। कल का कल नवा मॉडेल बनाव। सिच्युएशन समझ में नथी आवे? ‘’

23.05.2020

......

*13*

तोंड पाडून सगळीजणं एवढ्या मेहनतीनं करुनही रिजेक्ट झालेली ती मॉडेल घेऊन अमेयाच्या घरी आली. बेडवर मॉडेल ठेऊन सगळीजणं त्याच्याभोवती कोंडाळं करुन बसली होती. श्रीला तर कळतच नव्हतं काय करावं ते! तो नुसताच हातावर हनुवटी टेकून त्या बेडवर ठेवलेल्या मॉडेलकडे बघत बसला होता. एकटी प्रिशा जाऊन खिडकीत बसून आपला आपला वेगळा विचार करत होती. तेवढ्यात चहा घेऊन मालिनी काकू आत आली. तिनं सगळ्यांना चा दिला. आणि जाता जाता म्हणाली, ‘’ येवढी तोंड पाडून कशाल बसलाय? घ्या चा घ्या. पोटात कायतरी गेलं काय सुचलं कायतरी उपाय. ‘’

चा घेता घेता मॉडेलकडं बघणार्‍या युव्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तसा तो येकदम ओरडला, ‘’ ए सापडला रस्ता! मी सकाळच्या सगळ्या गडबडीत तुम्हांला सांगायचं विसरुनच गेल्तो. आरं, त्यो आपला सुशा न्हाई का? मॉडेल बनवणार्‍यातला माश्टर. त्यानं माझी सोल्ड्रिंग गन नेल्ती; ती आनायला मी सकाळी त्याच्या खोलीत गेल्तो. त्याचं मॉडेल तर कॉलेजात असनार ना! कारन त्याची तर कालच झाली परिक्षा. पण मला सकाळी गन घेताना त्याच्या खोलीत राजनच्या कॉटीखाली आणखी एक मॉडेल दिसलं. ते शेम टू शेम श्रीच्या मॉडेलगत होतं. आदी मला वाटलं का ते राजाचं हाय. मी त्याला म्हटलं पन काय भारी मॉडेल बनवलंस म्हणून. तर त्यानं मला येड्यातच काढलं. त्यो म्हनला काय त्यो मॉडेल कसं बनवलं? त्यो तर कॉमर्सला हाय ना! मला म्हाईतच नव्हतं काय सुशाच्या रुमातला राजा कॉमर्सला हाय म्हणून. ‘’

‘’ ए युव्या तुझं पाल्हाळ बंद कर. आनि मुद्द्यावर ये पाटदिशी. मला सांग ते मॉडेल राजाचं नव्हतं, सुशाचं मॉडेल कॉलेजात होतं तर मग ते होतं कुनाचं? ‘’ खिडकीत बसलेल्या प्रिशानं त्याची वटवट ऐकून विचारलं.

‘’ त्यात काय येवढं सायन्स हाय गं प्रिशे? अगं जर ते राजाचं नव्हतं, सुशाचं नव्हतं तर मग ते त्या उंदराचंच असणार ह्ये ग्यारेंन्टेड हाय ना! अभ्या पचकला.

खिडकीतनं झाटदिशी उठून प्रिशा श्रीला म्हणाली, ‘’ ए श्री! उठ पाटकिनी. चल माज्यासोबत. आज त्या सुशाचा निकालच लावते मी. ‘’

‘’ आगं ए बाई! थांब की जरा थांब. येवढी कसली घाई हाय तुला? आता राडा झालाच हाय तर निस्तरायला आपल्याकडं पुरा दिवस हाय. आणि तुला काय वाटलं त्या सुशाला म्हाईत नसनार काय असा राडा हुईल तो? तो काय खोलीवर तुजी वाट बघत बसला आसलं काय? कदी तू येतीस आनि कदी माजी चोरी पकडतीस याची वाट बघत? जरा हाय त्या मेंदवाचा उपयोग कर की. ‘’ इतका वेळ विचार करत बसलेला युव्या म्हनाला.

‘’ आरं मग हिथं हातावर हात धरुन इचार करत बसून काय होनार हाय का? ‘’ प्रिशा लैच चिडली होती.

‘’ तसं नाय आक्का. अगं थोडा येगळा इचार करु. बस. ‘’ युव्यानं तिला हाताला धरुन परत बेडवर बसवलं.

‘’ आपण असं केलं तर? ‘’ इतका उशीर गप बसून सगळा चालेला गोंधळ बघनार्‍या अमेयानं विचारलं. ‘’ त्यो सुशा कुठं कुठं जात होता तिथं तिथं जाऊन आपन त्याला हुडाकला तर? ‘’ अमेयाची ही आयडीया सगळ्यांना पटली आणि सगळे सुशाला शोधायला बाहेर पडले.

धन्या आणि चेतन कॉलेजच्या मागच्या बाजूला असणार्‍या शंकर्‍याच्या चाच्या टपरीवर गेले. जीत आणि प्रिशा त्याचा कुणी मित्र भेटतोय का बघायला कॉलेजवर गेले. श्री-अमेया बसस्टॅन्डवर गेले तर अभ्या-युव्या हॉस्टेलवर गेले. बाकी सगळी जणं रिकाम्या हातानं परत आली तरी हॉस्टेलवर गेलेल्या युव्या-अभ्याला तिथं राजन भेटला. त्याला कळलं ही सुशाला शोधतायत म्हटल्यावर त्यानं काय झालं त्याची चौकशी केली. तर मग युव्यानं त्याला सकाळी काय झालं त्याची आठवण करुन दिली आणि सांगितलं काय की ते मॉडेल त्यानं चोरुन इंदरसाठी बनवलं हुतं श्रीच्या मॉडेलची कॉपी करुन. तसा राजन म्हनाला, ‘’ आरं तासभर झाला असलं बघ त्याला जाऊन. कुटं जातोस इचारल्यावर म्हनाला सातार्‍याला चाललोय घरी. पण खाली दुडकेशी बोलताना ऐकलं मी त्याला सांगत होता कासेगावला काकांकडं चाललोय म्हणून. ‘’ राजाकडनं येवढं सगळं कळल्यावर त्यांनी घराकडं येतायेताच प्लॅन बनवून टाकला काय करायचं त्याचा. परत यिवून त्यांनी सगळ्यांना काय कळलं ते सांगितलं. आणि आपला सगळा ठरलेला प्लॅनपण सांगितला. त्याप्रमाणं युव्या सोडून जीत,श्री,धन्या,चेत्या सगळीजणं कासेगावला त्याच्या घराकडं जायला निघाली. आधी ती कॉलेजात गेली तिथनं त्यांनी त्याच्या घरचा पत्ता घेतला तर तो सातार्‍याचा होता. मग ती सगळीजणं परत हॉस्टेवर गेली आणि त्यांनी दुडकेला सुशाच्या काकांच्या घरचा पत्ता विचारला. दुडके म्हणाला पत्ता तर त्याला काय माहीत नाय पण त्याच्या काकाला सगळ्या गावात वळखतात येवढं माहीतेय. आता येवढ्याच माहीतवर त्यांनी कासेगावला जायचं ठरवलं. रात्र होता होता सगळीजणं जीतच्या घरी पोचली. तिथनं कासेगाव जवळच होतं म्हणताना ती सगळीजणं रात्री जीतच्याच घरी र्‍हायली. दुसर्‍या दिवशी सक्काळीच उठून सगळीजणं कासेगावच्या वाटेला लागली. तासाभरात कासेगावात पोचून सुशाच्या काकांचा पत्ता शोधून त्याच्या घरी पोचली. त्यांनी सुशाच्या काकाला काही सांगितलं नाही कथ ते सुशाला कशासाठी शोधतायत म्हणून. त्यांना फक्त येवढंच सांगितलं काय की सुशासाठी कॉलेजातनं महत्वाचा निरोप आणलाय म्हणून आणि त्याला आताच्या आता प्राचार्यांनी कॉलेजात बोलंवलंय म्हणून. विचारायला गेलेल्या धन्या आणि जीतला काकांनी सांगितलं की सुशा शेतावर गेलाय म्हणून. आणि त्यांना शेतावर जायचा रस्ता सांगितला. तिथनं माघारी यिवून श्री आणि चेत्या थांबलेले त्यांना सोबत घिवून सगळीजणं शेतावर पोचली. ही सगळीजणं शेतावर पोचली तर सुशा पाटाचं पाणी सावडत होता. ह्यांना शेतावर आलेलं बघून त्यानं हातातलं फावडं तसंच पाटात टाकून सुंबाल्या केला. पण आज त्याच्या नशीबानं त्याची साथ द्यायची नाय असं ठरवलेलं होतं बहुतेक. त्यामुळं चारबाजूला चारजनांनी मिळून त्याची चांगलीच कोंडी केली आणि आपसूकच सुशा त्यांच्या कड्यात आडकला. चौघांनी त्याची गचांडी उचलली आणि डायरेक अमेयाच्या घरी आनून टाकली. तो पळून जाऊ नये म्हनून दोगजणं त्याच्याशेजारी बसली. श्री दार अडवून उभा र्‍हायला आणि जीतनं त्याची झडती घ्यायला सुरवात केली.

‘’ हां! आता जे काय झालं ते सगळं संगतवार पटाटा वकायचं. नायतर तुला मिटाचं पानीचं पाजतो बग. कशाला केलास रांड्या ह्यो उद्योग? ‘’

सुशा आदीच झालेल्या सगळ्या प्रकारानं हाबकला होता. त्यानं जे काय घडलं ते समदं जसच्या तसं सांगून टाकलं.

‘’ आता ह्येच सगळं तू सरांच्यासमोर जाऊन सांगशीला काय? ‘’ जीतनं त्याला विचारलं. तशी सुश्यानं नुसतीच मान हलवली. त्याबरोबर दार पकडून उभा र्‍हायलेला श्री त्याच्यावर गुरगुरला. ‘’ आन् जर का तितं जाऊन पलटी मारलीस ना तर तुजा तितं सारांच्यासमोरच खुर्दा करतो नाय ते बगच तू! ‘’

मग ते सगळेजण त्याला कॉलेजात काळे सरांसमोर घेऊन गेले. लगेच काळे सरांनी टीचर्सरुममध्ये बसलेल्या रमणिक सरांनाही ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. वडील आजारी असल्याच्या नावावर खेळलेल्या गेमनंतर इंदर काही पुण्याला गेला नव्हता. त्यामुळे सुशांतनं त्याचं नाव घेताच काळे सरांनी इंदरला त्याच्या घरुन शिपाई पाठवून बोलवून घेतला. सुशानं सगळी हकीकत सरांना जशीच्या तशी सांगितली. तसे रमणिक सर त्याच्यावर डाफरले, ‘’ए छोकरा! ए तमें शु करे? अरे डिक्रा ए एक भुल छे! समझ में आवे की नथी? ‘’

‘’ काय रे! कळतंय का तुला तू काय केलंयस ते? अरे आता ह्या सगळ्यामुळं तुझं वर्ष तर वाया गेलंच पण आता तुला दुसर्‍या कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेशपण नाही मिळणार. ह्या इंदरला एक काही फरक पडत नाही रे त्याच्यामुळं पण तू मात्र ह्याच्या नादाला लागून स्वतःच्या भविष्याचा खेळखंडोबा करुन टाकलास. ‘’ सुशा मान खाली घालून काळे सरांचं मौलिक लेक्चर ऐकत होता खरा पण त्याच्या आत मात्र श्री आणि जीतचा विचार करुन आग लागली होती. सरांनी इंदर आणि सुशांतच्या मार्कशीटवर रेड शिक्का मारला. दोघांनाही कॉलेजातून रस्टीकेट केलं आणि श्रीच्या मॉडेलवर मारलेला कॉपीकॅटचा शिक्का काढून घेऊन त्याच्या मार्कशीटवर पासचा शिक्काही मारला.

इंदरची मात्र ह्या सगळ्यात प्रचंड चडफड झाली. सरांच्या ऑफिसमधून बाहेर पडून तो कट्ट्यावर श्रीची वाट बघत बसला. श्री येताना दिसला तसा तो उठून त्याची वाट अडवून उभा राहिला.

‘’ इंदर गुमान वाट सोड माजी. ‘’

‘’ वाटेत तर तू आडवा आलास माझ्या. तुला बाजूला करण्यासाठी तर हे सगळं कांड केलं होतं मी. पण ह्या जीत आणि युव्यामुळं सगळं भांडं फुटलं. पण ठीक आहे. काही हरकत नाही. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची मला इंदर म्हणतात. इंद्रजीत घाडगे. मला जे हवंय ते मी मिळवतोच आणि नाही मिळालं तर संपवतो. ‘’

‘’ जा रे! तुज्या ह्या धमक्या कुनाल दुसर्‍याला दे. आमी नाय तुज्या असल्या धमक्यास्नी घाबरत. जा काय करायचं ते करुन घे. चल रे श्री. ‘’ असं म्हणून जीतनं एका हातानं इंदरला मागं ढकललं आणि दुसर्‍या हातानं श्रीला तिथनं ओढत बाहेर घिवून गेला.

26.05.2020

……

*14*

6-7 वर्षं उलटून गेली. मधल्या काळात बरंच काही घडून गेलं. आधी तापाचं निमित्त होऊन माई गेल्या. तिच्यामागे दोन वर्षांनी आबा गेले. आबा गेले म्हणताना दत्ताजी अण्णांचं काही कामात लक्ष लागंना. लागणार तरी कसं? 40 वर्षं सोबत राहिलेला, काम केलेला माणूस गेला म्हणून काय त्याच्या आठवणीपण जातात काय? सगळ्या जमिनींची कागदपत्रं, फायली, शेतांचा सगळा हिशोब असं जे काही म्हणून त्याच्याकडं इतकी वर्षं सांभाळायला होतं ते सगळं त्यांनी प्रिशाकडं आणून दिली.

‘’ अण्णा, हे सगळं माज्याकडं कशापाई देताय? आवो तुमी हाय म्हणून सगळं येवस्थित चाललंय. मी कदी बगनार हे सगळं? ‘’

‘’ पोरी, तू म्हनतीस ते बरोबर हाय. पण खरं सांगू का? आबा गेल्यापास्न मनंच लागत नाय बग माझं हिथं.’’

‘’ म्हंजी अण्णा, मी कोन नाय व्हय तुमची? ‘’

‘’ तसं न्हाय लेकरा! अगं पाळण्यात हुतीस तवापास्नं तू माजं बी लेकरुच हाईस की. पर आता लेक पण मोठा झालाय. त्याचंबी लगीन झालंय. नातू हाय मला येक. वय झालंय आता माजंबी राघव कवापास्नं मागं लागलाय आता चाकरी बास झाली. आमच्यासोबत यिवून र्‍हावा म्हनून. पन आबांनी मला मोकळाच नाय केला न्हवं चाकरीतनं. आता तू तरी जाऊ दिशील म्हनूनशान माजं गार्‍हानं तुज्याम्होरं मांडाया आलतो बग. ‘’

प्रिशानं पटकन जाऊन त्यांचे हात धरले आणि म्हणाली, ‘’ अण्णा, आवो असं काय करताय? तुमी मोटं हाय माज्यापेक्षा. मीचं गार्‍हानं घालाया हवंय तुमाला. तुमाला जायचंय न्हवं राघवसंगती र्‍हायला. कवाबी जावा, माजी काय ना न्हाय. लेक हाय तुमचा. माज्यापेक्षा त्याचा जास्त हक्क हाय तुमच्यावर. फकस्त दोन दिस थांबा. मला येक चांगला मानूस मिळू दे. हे सगळं सांबाळायला. ‘’

‘’ त्येची काळजी तू नगं करुस. मी माज्या भरोशातला मानूस आनलाय सोबत. दिवाकर आत ये रं!. ‘’ असं म्हणून अण्णांनी बाहेर उभ्या दिवाकरला आत बोलवला.

‘’ ह्यो दिवाकर माज्या लांबच्या नात्यातला हाय. मानूस इश्वासू हाय. मी आसं तर म्हननार नाय की डोळं झाकून इश्वास ठेव म्हनून. पन येवढी ग्यारंटी देतो का ह्यो तुला काय बी तोशिश पडू द्याचा नाय. बाकी तुजं तू ठरवं.’’

प्रिशानं दिवाकरला अण्णांच्या जागेवर नेमून टाकला आणि अण्णांना निरोप दिला. आता अण्णा त्यांचा लेक राघव, सून गायत्री आणि नातू सदेश सोबत आनंदानं त्यांचं म्हातारपण घालवत होते.

दत्तजी अण्णा निघून गेले आणि आता त्या येवढ्या मोठ्या वाड्यात दोघंजणं राहिली. सदाकाका आणि प्रिशा. सदा वाड्यातच लहानाचा मोठा झाला. बळवंतापेक्षा 10 वर्षांनी मोठा. त्यानं काही लग्न-बिग्न केलं नाही. त्यामुळं पाटलांचं घरंच त्याचं सगळं काही होतं. बळवंतराव आणि त्याची बायको गेल्यावर माईआबांच्या बरोबरीनं त्यानंच सांभाळलं होतं प्रिशाला. आता त्या वाड्यात दोघंचजण उरले होते एकमेकांसाठी. दिवस जायचा निघून कारण वाड्या सारखी कुणा ना कुणाची ये जा असायची. पण दिवस मावळला काय दोघं दोन टोकाला जायची. सदा खाली त्याच्या खोलीत आणि प्रिशा वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत. राधाबाईंची सून दोघांसाठी स्वयंपाक करुन ठेवायची आणि संध्याकाळी निघून जायची ती सकाळीच उगवायची.

युवराज पुढच्या शिक्षणासाठी देशाबाहेर निघून गेला. दाखवून सवरुन अमेया जीतनं लग्न करायचं ठरवलं. त्याआधी दोन वर्षं जीत पुण्यात राजधन बिल्डर्सकडे नोकरी करत होता. आता त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. मात्र दोन्ही घरातनं मोठ्या माणसांचा एकच निर्णय झाला की आधी लग्न करायचं आणि मगच नव्या कामाची सुरुवात करायची. आता मोठी माणसं अडली म्हणताना ही दोघं काय शेवठी त्यांच्याच रक्ताची ना! ‘ ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या वाण नाय गुण लागायचाच!’ तसं ही दोघंपण अडून र्‍हायली दोनी घरची माणसं एकत्र राहतील म्हणून. शेवटी हो नाय करता करता सगळी एकत्र रहायला तयार झाली आणि ह्यांच्या लग्नाचं घोडं एकदाचं गंगेत न्हालं. लग्न झाल्यावर अमेयाच्या आईबाबांनी त्यांचं घर विकलं आणि ते जीतच्या घरी रहायला आले. व्यवसाय पुण्यात करायचा तर घरसुद्धा तिथंच असलं तर सोपं पडेल असा विचार करुन जीतची पुण्यात घराची शोधाशोध सुरु होती. त्याला सिंहगड रोडला एक ट्विनबंगलो मिळाला. पण त्याचं घोडं परत अडलं. कारण त्याला त्यातला एकच हवा होता आणि विकणार्‍याला दोन्ही एकाच माणसाला विकायचे होते. त्याला पडलेला पेच अमेयानं सोडवला.

‘’ तू प्रिशा नायतर जीतला विचार की. र्‍हायसाठी नको गुंतवणूक म्हणून घेताय का विचार. हो म्हटले तर चांगलंच हाय ना! ‘’

जीतला तिचा हा सल्ला पटला. आणि त्यानं श्रीकडं जायचं ठरवलं. कॉलेज सुटल्यापासनं त्याच्या घरी जाण्याचे प्रसंगच खूप कमी आले होते. त्यात आधी नोकरी, मग लग्न आणि आता हे घरासकट व्यवसायाचं गाडं हाकण्याच्या नादात मैत्रीच्या नात्यात अर्धविराम लागला होता. जवळ जवळ तीन वर्षांनी तो श्रीकडं आला होता.

तो तिथं गेला तेव्हा त्याला कळलं की कही दिवसांपूर्वीच श्रीचा लाडका रंग्या गेला साप चावून. वामनकाकांनी जीतला सांगितलं की हल्ली श्री दिवस दिवस खात पित नाही. नुसता गुडघ्यात डोकं खुपसून रंग्याच्या खुटाशेजारी बसलेला असतो. मी बाप असूनपण मला अजून त्याला सावरायला जमलं नाही. खरंतर जीतची हिंमत नव्हती होतं श्रीला भेटायची पण त्याचा आतला आवाज त्याला सांगत होता की त्यानं एका चांगल्या मित्राचं त्याचं कर्तव्य विसरता कामा नये. तो श्रीला भेटायला गोठयात गेला तर श्री भिंतीला डोकं टेकून आभाळात रिकाम्या नजरेनं काही शोधत होता. जीतची चाहूल लागली तसं त्यानं मान वळवून बघितलं आणि जीतला बघून त्यानं हंबरडा फोडला.

‘’ जीतऽऽऽऽऽ! माजा रंग्या गेला रं! मला येकटा टाकून गेला रं! ‘’

त्यानं धावत येऊन जीतला मिठी मारली. जीतनं त्याला कडकडून मिठी मारली. जरा निवळल्यावर तो श्रीला म्हणाला,

‘’ श्री, अरे किती दिवस असा झुरणार आहेस तू? एकदा कुणी त्या गावाला गेलं की परत येतं का? तुझ्या अशा वागण्यानं वामनकाका किती खचलाय बघितलास का? माणसानं दुःखाला पकडून बसायचं नसतं रे वेड्या! असा खचू नकोस. त्याची वेळ आली होती तो गेला रे! ‘’

पण जीतच्या या शब्दांनी श्रीला फक्त तरंगण्यापुरता आधार दिला. जीतच्याही लक्षात आलं की अशा अवस्थेत श्री काही निर्णय घेऊ नाही शकत. म्हणून मग तो वामनकाकाशीच त्या सिंहगडमधल्या ट्विनबंगलोच्या खरेदीविषयी बोलला.

‘’ काका, तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते! नसेल रहायचं तर काही हरकत नाही पण एक गुंतवणूक म्हणून तू याचा विचार करशील का? ‘’

‘’ जीत, आरं तुज्यापास्न काय लपून र्‍हायलंय व्हय? तुला तर म्हाईतच हाय की माज्यानंतर ह्यो वाडा ही सगळी इश्टेट श्रीचीच हाय. ती गुंतवणूक बिक सगळं मी त्येच्यावरच सोडलंय. पण आता तू बगतोयसं नव्हं श्री ची हालत काय झालीय ती. मला तर वाटतंय काय त्यो आता हिथं र्‍हायला तर त्याला सांबाळणं मला काय जमंल असं वाटत नाय. आता अशा वक्ताला ह्यो निर्णय मलाच घ्यायला पायजे. आसं बग, आता पावसाळा चालू हाय. आताच्या घडीला हातात नकद नाय बघ तेवढी. मी आर्धी रक्कम घालतो. चालंल का तुला? ‘’

‘’ काका, अरे असं काय म्हणतोस चालेल की मला. मी प्रिशाला पण जाऊन भेटणार आहे याच कामासाठी. तिला विचारतो अर्ध्या पैशांबद्दल. ‘’

‘’ तू रतनपुरला जानार हायस तर माजं येक काम करशील का? ‘’

‘’ काका, परवानगी कसली मागतोस? हक्कानं सांग की काय करायचंय? ‘’

‘’ आबांच्या नातीला म्हणावं मी बोलवलंय. जमलं तर येकदा यिवून जा म्हनावं.’’

‘’ बरं! काही हरकत नाही. मी नक्की तिला निरोप सांगतो तुझा.’’

‘’ काका, एक विचारु का? बघ तुला पटतंय का ते? मी आता जो नवा व्यवसाय सुरु करतोय त्यात मला एक पार्टनर हवाय. श्रीला घेतला तर चालेल का? म्हणजे तो आताच्या ह्या धक्क्यातनं पण बाहेर पडेल? ‘’

‘’ ह्या सगळ्या साठनंच मी आबांच्या नातीला बोलवायचम म्हणतोय. माजी खात्री हाय काय जे तुज्या माज्याच्यानं झालं नाय त्ये ती करलं म्हणून. सध्या तू फकस्त घराचा इचार कर. येकादा का ती यिवून गेली काय पुढचा सगळा इचार सांगतो. ‘’

जीतला वामनकाकाचा हा विचार पटला. तो तिथन रतनपुरला प्रिशाकडे गेला.

एकटं राहून कंटाळलेल्या प्रिशानं आबांच्या वाड्याचं मुलींच्या वसतिगृहात रुपांतर केलं होतं. आबा पाटलांच्या नावानं ट्रस्ट तयार करुन काळे सर आणि काही विश्वासातल्या माणसांना तिनं त्याचं विश्वस्त बनवलं होतं. सदाकाका त्याचा केअरटेकर होता. तिथं आलेल्या जीतला वाड्याचं हे बदललेलं रुप दिसलं आणि तो गोंधळला. त्याला आधी वाटलं की प्रिशी गेली की काय गाव सोडून. पण मग नाव तर आबा पाटलांचं आहे असा विचार करुन त्यानं तिला बूथवरनं फोन लावला तर तो सदाकाकानं उचलला. त्याला आधी ओळखंच पटना. मग कशीबशी ओळख लागली तसा सदाकाका म्हणाला,

‘’ ताई, गाव सोडून कुटं जाईल? हिथंच र्‍हातीय की. पण आताच्याला न्हाय हाय हिथं. बाह्येर गेलीया. सांच्याला परत यिल. तुमी कुटं थांबलाय? या हिकडंच. जेवण, चा पाणी सगळं हुईल.’’

सदाकाकाकडनं हे कळल्यावर जीत निर्धास्त झाला. मग तो वाड्यात गेला. जेवणं खाणं होई होईपर्यंत सदाकाकानं त्याला वाड्याचं वसतिगृह कसं झालं ते सांगितलं. सांगण्याच्या अर्ध्या वेळेत तर तो जीतचं नावंच विसरुन गेला. आणि त्याला तो जीत आहे हे पटवून सांगताना जीतला खूप कष्ट पडले.

संध्याकाळी प्रिशा आली तेव्हा तिला जीतला बघून प्रचंड आनंद झाला. तिनं तर त्याला कडकडून मिठीच मारली. कित्ती वर्षांनी भेटले होते ते! कॉलेज संपल्यावर जीत पुण्याला गेला नोकरीला दोन वर्षं. नंतर त्यांची भेट जीतच्या लग्नातच झाली. तरी सहा-सात महिने झाले असतील त्यालाही. आणि आता भेटत होते त्यानंतर. एवढ्या गॅपनंतर भेटले म्हटल्यानंतर गप्पांची मैफिल तर बसणारच होती. तरी संध्याकाळचं जेवण सदाकाकानं दोघांना बळंबळंच करायला लावलं. मग ते दोघे प्रिशाच्या खोलीत बसले गप्पा मारत.

जीतचं बोलणं ऐकून प्रिशानं त्याला टोमणा मारलाच.

‘’ लैच भारी मराठी बोलायला लागलास की तू! आपली भाषा काय वाईट हाय व्हय? ‘’

‘’ आता तेवढं तर होणारच ना! एकतर इतकी वर्षं मी पुण्यात राहतोय त्याचा काहीतरी परिणाम होणारच ना! आणि तसंपण तिथं पुण्यात आपल्यासारखं बोललं की गावंढळ समजत्यात आपल्यास्नी. ‘’

त्याच्या ह्या स्पष्टीकरणावर मात्र दोघेही एकमेकांला टाळ्या देऊन खळखळून हसले.

‘’ पण, इतक्या वर्षांनी तुला हिथली आठवण कशी काय झाली? ‘’

‘’ अगं, आता नोकरी करायचा कंटाळा आलाय. स्वतःचा व्यवसाय करावा असा विचार चाललाय. पण ह्या सगळ्यांचा विचार ठरला की आधी लग्न मग व्यवसाय. म्हणून मग आधी लग्न करुन घेतलं. आता तिला इथं ठेवायचं आणि तिकडं पुण्यात आपण एकटं रहायचं तर त्या लग्नाला काय अर्थ आहे तूच सांग. भाडं भरा, डबा लावा, आणि साला आयुष्यात भांडायलापण कुणी जवळ नाही म्हणजे अन्याय आहे यार. मग बाबा म्हणाले की भाड्यानं राहण्यापेक्षा स्वतःचं घरंच घ्या. घराची शोधाशोध सुरु झाली. सिंहगडमध्ये चांगल्या ठिकाणी ट्विनबंगलो मिळाला. विकणार्‍याला एकालाच दोन्ही विकायचेत म्हणताना अमीच्या सुचनेवरनं तुमच्या दोघांकडं हा पसरायला आलो. ‘’

‘’ लैच तिकडमबाजी हाय म्हनायची तुज्या आयुष्यात.’’ प्रिशा हसली.

‘’ तू तर अशी बोलतीयेस की तुझ्या आयुष्यात तसं काही नाहीए. हे वसतिगृह, आबांच्या नावाची केलेली ट्रस्ट, ते सांभाळायची कसरत ह्या सगळ्या लडतरी जसं काय तू करतंच नाही ना! ‘’

‘’ ते जाऊ दे रे! ते आपण किती वर्षं मागनंपासनं करतोय तुला काय म्हाईत न्हाई व्हय. मला एक सांग तू श्रीला भेटलास काय? ‘’

‘’ हो. भेटलो की.’’

तेवढं ऐकलं मात्र प्रिशाचा चेहरा उजळला. जीतच्या ते लक्षात आलं. त्यानं खुर्ची जवळ ओढली. प्रिशाचे हात हातात घेतले.

‘’ तू गेलीसंच नाहीस का तिकडं? इतक्या वर्षांत श्रीला भेटलीच नाहीस?’’

तिनं नाही अशी मान हलवली. पण तिच्या गालांवर श्रीच्या नावानं उमटलेली लाज जीतच्या लक्षात आलीच.

‘’ चांगलं आहे. हा 007 बॉन्ड लाजाळूचं झाड झाला. ‘’

02.06.2020….

………..

*15*

‘’ म्हंजे जित्या तुला काय म्हनायचंय? हे सगळं श्रीला मी सांगायला पायजे होतं का? ‘’

‘’ अगं राणी! इतकं सगळं तर करतेस की; माझा डॅशिंग हिरो आहेस तू आणि तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे सांगायला तुला लाज वाटते? कमाल आहे!’’

‘’ जित्या! पोरी करतात व्हय असल्या गोष्टी? त्या मोच्यानं मला इचारायला पायजे होतं. तू नाही का अमीला सांगितलंस? तसं त्यानं मला सांगायला नको व्हय?’’

‘’प्रिशा!’’ खुर्ची जवळ ओढून तिचे हात हातात घेत गंभीरपणे जीत म्हणाला, ‘’ राजा, श्रीला मी लहानपणापासून ओळखतोय. तो बोलणार्‍यातला नाही. त्याला त्याच्या भावना शब्दांत नाही सांगता येत गं! हे सगळं तुलाच त्याला सांगायला हवंय. ‘’

जीतच्या नजरेत बघत तिनं विचारलं, ‘’ श्री कसाय काय बोलला नाईस तू? ‘’

थोडावेळ शांततेत गेला. शब्दांची जुळवाजुळव करत जीत म्हणाला, ‘’ तुला वामनकाकांनी भेटायला बोलंवलंय. श्रीची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाहीए. आता पावसाचे दिवस चालू आहेत. आणि तुला तर माहि आहे ना की पावसाळ्यात कशी जनावरं निघतात ते! ‘’

‘’ म्हणजे श्रीला जनावर? ‘’

‘’ नाही गं बाई! त्याला नाही त्याच्या लाडक्या रंग्याला चावलं. त्याला काय झालंय कळेपर्यंत उशीर झाला आणि मग डॉक्टर येऊन उपाय करुनपण काही उपयोग झाला नाही. त्यानं रंग्याच्या जाण्याचा एवढा धसका घेतलाय की त्याची जेवणाखाण्यावरची वासना उडालीय. तो दिवस दिवस गोठ्यात बसून असतो. वामनकाका सगळे उपाय करुन थकले. आठवडा झाला पण तो काही रंग्याच्या दुःखातनं बाहेर पडला नाहीए. मी गेलो तेव्हा मीही त्याला समजवायचा प्रयत्न केला पण ते त्याच्या कितपत पचनी पडलं त्यालाच माहीत. काल काका म्हणाला की तू आलीस तर कदाचित त्याला बरं वाटेल. तू त्याला सांभाळू शकशील असं काकाला आणि मलापण वाटतंय. ‘’

प्रिशानं काही न बोलता नुसतीच मान डोलवली.

इतक्यात खालनं सदाकाकानं आवाज दिला.

‘’ ताई, पाव्हणं चा घेताय काय वाईच? ‘’

तसा दोघांनाही चहा हवाच होता. दोघंही खाली उतरुन चहा प्यायला आले. चहा करणार्‍या सदाकाकाला जीतनं विचारलं, ‘’ काका इतक्या रात्री चहा पिताय? झोपायचं नाही का?’’

‘’ पाव्हणं आता म्हातारा झालूय. झोप कुटली यायला? कदीतरी फाटफटीची लागती त्येवढीच बगा. ‘’

‘’ मग काय रात्रभर इथं बसून राहता का? ‘’

‘’ व्हय तर! हिथंच बसून असतो बगा. जानार कुटं म्हातारं मानूस? आता हिथं पोरीबाळी र्‍हात्यात, वावारत्यात. पन मंग रातच्याला मला हिथं झोपाळ्यावर बसून काम करनारे आबा दिसत्यात. ताईस्नी खायला घालनार्‍या माई दिसत्यात. ‘’

प्रिशाला माहीत होतं की सदाकाकाशी बोलायला इथं कुणी नसतं त्यामुळं त्याची टकळी चालू झाली की ती लवकर बंद होत नाय. म्हणून तिनं चहा ओतता ओतता सदाकाकाला आठवण करुन दिली.

‘’ आवो काका! आपला जित्या हाय त्यो. पाव्हणा न्हाय काय. इसरला का काय परत? ‘’

‘’ आसं व्हय. कदी आला बाबा तू? समदं बरं हाय न्हवं? लेकरंबाळं बरी असली काय जीव तगून जातो बग मानसाचा. ‘’

‘’ तू लक्ष नको दिवूस जित्या काकास्नी हल्ली आठवत नाय काय काय. म्हनून मी त्यास्नी येकटा सोडून कुटं जात नाय बग. ‘’

‘’ व्हय बाबा! येकटा र्‍हातूय खरा. पण मी जित्ता हाय ताईचं लगीन बगाया. येकदा का तिच्या डोईवर अक्षाता पडल्या का मी डोळं मिटायला मोकळा. ‘’

‘’ बगीतलंस न्हवं? सारखं असं बोलत्यात. मला येकटीला सोडून जायची भाषा करत्यात. आता उद्याच्याला जर वामनकाकांकडं जायचं म्हटलं तर कसं करायचं तूच सांग? ‘’

‘’ तू त्याची काळजी नको करुस. मी जाताना त्यांना सोबत नेतो पुण्याला अमू आणि आईबाबांनापण बरं वाटेल काकांना बघून. आणि काका कसल्या मरणाच्या गोष्टी करता? अजून तुम्हांला आमची पोरंबाळं खेळवायचीत की. चला माज्यासंगट पुन्याला. ‘’

असं म्हणून तो आणि प्रिशा खळखळून हसले.

‘’ त्ये खरंय. पण आता रातीचं झोपाल तवा सकाळच्याला उठाल न्हवं? ताई तू जा वर तुज्या खोलीत निजायला. ह्ये झोपतील माज्यासंगट. चला ओ पाव्हनं. ‘’

सकाळी उठून आवराआवरी करुन प्रिशानं दिवाकरला बोलवून घेतला. त्याला सांगून जीतला हवे असलेले कागद आणि पैसे बँकेतनं काढून आणले. त्याला बाकी सगळ्या सुचना देऊन प्रिशा, जीत आणि सदाकाका जीतच्या गाडीनं पुण्यासाठी निघाले. जाता जाता जितनं प्रिशाला जैतच्या गावकमानीकडं सोडलं.

‘’ काळजी घे. नीट रहा आणि लवकरच चांगली बातमी दे मला. ‘’ असं म्हणून त्यानं तिचा निरोप घेतला.

गाव कमानीच्या पुढं जाऊन प्रिशानं तिथल्या थांब्यावरनं रिक्षा केली.

‘’ निंबाळकर वाडा.’’

त्यानं तिला निंबाळकरांच्या वाड्यापाशी आणून सोडलं.

ती पोचली तर वाड्यात उसाच्या डोळ्याची कांडकं पोत्यात भरायची चालली होती.

बंडाकाका सगळ्यांवर देखरेख करत होते. तिला आलेली बघितली आणि त्यांना आनंद झाला. पटाटा पाय उचलत ते दारातनं आत येणार्‍या प्रिशाकडं जाऊन पोचले.

‘’ प्रिशे पोरी आगं किती वर्सांनी आलीस हिकडं? बरी हायसं न्हवं? ये बस. ‘’

‘’ व्हय काका. आता आबांचं सगळं मीच सांबाळती न्हवं. त्ये कमी हाय म्हणून मी माजा येगळा याप वाडवून ठेवलाय. आबा गेल्यापास्नं मी न सदाकाका येकटं पडलो म्हनताना त्या वाड्याचं पोरींसाठनं हास्टेल बनवून टाकलंय. आबांच्या नावाचा ट्रस्ट केलाय. मग मुलांसाठी कायतरी हवं म्हणून त्येंच्यासाठनं नव्या हास्टेलाचं बांदकाम काढलंय. ‘’

‘’आसू दे! आसू दे! कामंच त्ये. फुडमागं याप वाडायचाच. तू बस हां! मी जरा येवढं काम आवरतो. अंबाक्काऽऽऽ! ओ अंबाक्काऽऽऽ! प्रिशा आलीय बगा पाटलांची. तिच्यासाठनं वाईच चापान्याचं बगा बरं. ‘’ बंडाकाकांनी तितनंच अंबाक्कांना आवाज दिला.

जाता जाता त्यांनी तिला इचारलं, ‘’ त्ये न्हवं पर इतक्या वर्सांनी हिथली वाट कशी काय चुकलीस म्हनायची तू? ‘’

‘’ त्ये, काल जीत आल्ता न्हवं तिकडं. ‘’

‘’ जैताकर वकीलांचा व्हय? त्यो तर परवाच धन्यास्नी ब्येटून गेला. ‘’

‘’ व्हय काकांनी त्येच्याकडनंच निरोप धाडलाता की यिवून जा म्हणून. त्येच्याकडनं कळालं मला रंग्याचं लै वंगाळ झालं बगा. ‘’

रंग्याचं नाव काढलं तशे पायरी उतरणारे बंडाकाका थांबले आणि म्हणले, ‘’ धनी शेतार गेलेत दुसर्‍या नांगरटीसाठनं. पण रंग्याचं लैच वंगाळ झालं बग. ह्यो असा धटमुट राजबिंडा गडी. त्येच्यासारखं दुसरं पोर गावात कुटं मिळायचं न्हाई बग. आमच्या डोळ्यादेकत बरबरुन फेस आलता त्याच्या तोंडाला. पाय झाडून झाडून लेकरु गेलं गं! आमच्या इठ्याला पावसामुळं रंग्याचा आवाज उसरानं आयकायला आला. त्याच्यामागनं मग डाक्तर यिवून सलाईन लावून इंजाक्शान बिंजक्शान दिलं पर लै उशीर झाल्ता. पोरगं काइ जगलं न्हाइ बग. ‘’ त्यांनी सदर्‍याच्या बाहीनं भरुन आलेले डोळे टिपले.

तेवढ्यात अंबाक्का चा घिवून आल्या.

‘’ तात्या, आल्या आल्या लेकराला काय म्हनुन रडवतायसा ओ! बरी हायसं न्हवं पोरी? ‘’ तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत अंबाक्कांनी विचारलं.

‘’ व्हय आक्का. मी बरी हाय. तुमी बरं हायसा न्हवं? ‘’

‘’ आता बरीच हाय असं म्हनायचं बगं. बापलेकाची अवस्था बगवत नाय मला. पन काय करनार? कुनी कुनाला सांबाळायचं. लेकाचं हाल बापाला बगवत न्हाईत आणि लेकापाई होनारे बापाचे हाल आमास्नी बगवत न्हाईत. ‘’ अंबाक्का डोळ्यांतलं पाणी लपवत आत निघून गेली.

‘’ हां! मला म्हनती मी लेकराला रडवतो आनि हीनं काय केलं. तू तिच्याकडनं लक्ष नग दिवूस. वाड्याची सटवी बी आता म्हातारी झालीय न्हवं. तुला श्रीला भेटायचं न्हवं? इठ्याऽऽऽ! ए इठ्याऽऽऽ!! प्रिशाताईस्नी धाकल्या मालकांकडं घिवून जा बरं जरा! ‘’ बंडाकाकांनी इठ्याला काम सोपवलं आणि ते खळ्यातल्या कामाकडं वळले.

02/06/2020

.......

*16*

ईठ्यानं नेऊन प्रिशाला गोठ्यात सोडलं. एक एक पाऊल टाकत गोठ्यात येणारी प्रिशा गोठ्याची बांधणी बघत होती. बाकीच्या गाई म्हशींसाठी एकत्र एका बाजूला खुंट मारले होते आणि रंग्यासाठी एकट्यासाठी एका बाजूला ऐसपैस जागेत खुंट मारला होता. रंग्याच्या खुंटाजवळ एक माणूस आरामात झोपेल असा कडप्पा बसवला होता. त्याचं पाण्याचं तसराळंपण चांगलंच मोठं होतं. एका कोपर्‍यात त्याच्या वैरणीच्या सोईसाठी चामड्याची गोण लावली होती. दुसर्‍या कोपर्‍यात भिंतीत कडाप्प्याचे चार खण बसवून त्याच्या सामानासाठी कत्रल केलं होतं. त्यात रंग्याची झूल, त्याच्या घुंगूरमाळा, वादी, गोंडे आणि त्याच्या पायातला काळा नजरधागापण जपून ठेवला होता. आता येणार्‍या प्रिशाची रंग्याच्या खुंटाशेजारच्या कडप्प्यावर गुडघ्यात डोक खुपसून बसलेल्या श्रीवर नजर गेली. ती तशीच चालत पुढे आली आणि त्याच्या शेजारी बसली.तिच्या बसण्याची चाहूल लागताच श्रीनं मान वर करुन बघितलं. शेजारी बसलेल्या तिला बघून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक! त्यानं तिला घट्ट मिठी मारुन हमसून हमसून रडायला सुरुवात केली. प्रिशा मात्र काहीही न बोलता त्याच्या पाठीवरुन प्रेमानं आणि मायेनं हात फिरवत राहीली. कधी कधी शब्दांचा हात सोडून मौनाची साथ धरावी लागते. तिकडं शेतात दुसर्‍या वेळेची नांगरट करुन विसाव्याला बांधावरच्या झाडाखाली असणार्‍या बाजेवर येऊन बसलेल्या वामनच्या डोक्यात प्रिशाचेच विचार चालू होते. यिल का ती आपल्या बोलवण्यावरनं? आणि न्हाई आली तर काय करायचं? आपल्याला जावं लागलं का तिला बोलवायला? जायला लागलं तर जाऊ आपण! आता श्रीची हालत बघवत न्हाई आपल्याच्यानं. कायबी करु पण तिला हिथं घिवून यिवू. पण त्याला माहीत नव्हतं की प्रिशा त्याच्या एका निरोपासरशी तिथं येऊन पोचलीय ते!

श्रीचं रडणं हळूहळू ओसरलं पण तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचं रडू आवरल्यावर प्रिशानं त्याला हाताला धरुन उठवला आणि तसाच त्याच्या खोलीत घेऊन गेली. दुपार टळून सूर्य अस्ताला चालला होता आता. तिनं त्याला खोलीत आणून पलंगावर बसवला. बाथरुममध्ये जाऊन गरम पाण्यानं टॉवेल भिजवून पिळून घेऊन आली. त्या ओल्या टॉवेलनं तिनं त्याचा चेहरा पुसून काढला. अंबाक्कांना हाक मारुन जेवणाचं ताट मागवलं. अंबाक्कांनी गरमगरम आमटी भाजी भाताचं ताट आणून तिच्या पुढ्यात ठेवलं. आज कितीतरी दिवसांनी त्यांचं लेकरु जेवणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरुन ओसंडत होता. प्रिशानं ते ताट हातात घेतलं आणि लहान मुलाला भरवावं तसा एक एक घास करत ती श्रीला भरवू लागली. तिच्या हातानं भरवल्या जाणार्‍या एका एका घासाबरोबर त्याला आई, आजी, जीतची आई, रंगा सगळ्यांच्या मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणी डोळ्यांतून वाहत होत्या. त्यानं एक शब्दही न बोलता प्रिशाला त्याचं हळवं मन कळत होतं. त्याचं जेवण झाल्यावर तिनं अंबाक्कांना ताट घेऊन जायला सांगितलं. अंबाक्का येऊन समाधानानं श्रीकडम बघत ताट घेऊन गेल्या. प्रिशा त्याशेजारी पलंगावर येऊन बसली तशी त्यानं तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. रंग्या गेल्यापासून त्याच्या मनावर साचून राहिलेलं भावनांचं मळभ आज प्रिशाच्या येण्यानं बर्‍यापैकी निवळलं होतं. तिनं हलकेच त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याला थोपटायला लागली. तो कित्येक दिवसांनंतर आज झोपेच्या ग्लानीत चालला होता.

वामनकाका रात्री शेतातून परत आले तर वाड्यात शिरल्या शिरल्या बंडातात्या त्यांच्या कानाला लागले.

‘’ धनी पाटलांकडं निरोप धाडलाता व्हय? पाटलांची प्रिशा आलीय तुमास्नी आणि धाकल्या धन्यास्नी भेटाया रतनपुरास्नं. ‘’

ती बातमी ऐकली आणि त्यांचा दिवसभराचा थकवा पळून गेला. ते आत येऊन झोपाळ्यावर टेकले तेवढ्यात अंबाक्का त्यांच्यासाठी चा घिवून आली.

‘’ वामन्या, लै बेस काम केलंस बग तिला बलिवलंस त्ये! आरं इतक्या दिसानं आज माज्या ल्हान्यानं जेवायलाय बग.’’ अंबाक्काच्या बोलण्यातनं प्रिशाचं आणि वामनकाकाचं कौतुक वसंडत होतं.

‘’ हाय कुटं ती? ‘’ चा पिता पिता त्यांनी अंबाक्काला इचारलं.

‘’ ल्हान्याच्या खोलीत हाय बघ! ‘’ चा चं भांड उचलून नेताना तिनं सांगितलं.

वामनकाका लगीच तिला भेटायला श्रीच्या खोलीकडं निघाला. त्यानं दारातनं बघितलं तर त्याला प्रिशाच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलेला श्री दिसला. त्याला तसा शांत झोपलेला बघून त्याच्या डोळ्यांत आसवं जमा झाली. ती पुसून त्यानं हलक्या आवाजात प्रिशाला हाक मारली. प्रिशानं बगितलं तर वामनकाका तिला हाक मारत होते. तिनं हळूच श्रीचं डोकं शेजारच्या उशीवर ठेवलं आणि ती उठून बाहेर गेली.

‘’ कधी आलाय काका शेतातनं? ‘’

‘’ ह्ये काय आताच येतूय. आल्या आल्याच बंडातात्यानं सांगितलं मला तू आलेली. बरं केलीस पोरी तू आलीस त्ये! मला लै काळजी लागून राहिली व्हती श्रीची. ‘’

‘’ मी हाय न्हवं काका? मग कशाला काळजी करता? ‘’

तितक्यात अंबाक्कानं दोगास्नी जेवाया हाक मारली.

‘’ वामन्या, आरं पोरीला जेवायबिवायचं काय इचारशील का निस्त्या गोष्टी करुन पोटं भरनार हाय दोगंबी? ‘’

‘’ व्हय आलोच की. चल गं पोरी! दोन घास खाऊन घे. दुपारपास्न ह्या आंबीनं तुला काय खायला घातलं का नाय? ‘’

‘’ह्ये बराय की! चोराच्या उलट्या बोंबा निस्त्या. नाव घेतूस व्हय माजं? तुज्या आईपरास चार वर्सं मोट्टी हाय मी. गुमान जेवाय चल. ताटं लावते मी. ‘’ अमबाक्का बळंच वामनकाकाला रागं भरत ताटं मांडाया निघून गेली.

‘’ काय काका तुमीबी? ल्हान पोरासारखं वागताय. ‘’

‘’ अगं आई गेल्यावर आता अंबाक्काच उरलीय माज्याकडं खोड्या काढाया. माजा लेक काय असली कामं करत न्हाय बग. मी तरी करतो म्हंजी त्या म्हातारीला येकटं वाटायचं नाय. ‘’

दोघंपण हातपाय धुवून येऊन जेवायला बसले. अंबाक्का आज लै खुष होती. ती प्रिशाला आग्र करकरुन वाढत होती. जेवणं आटपून दोघजणं पडवीत यिवून बसले.

‘’ काल जीत आल्ता घरला. त्यानं मला सांगावा दिला तुमचा. येकदा फोन करायचा न्हाय व्हय? श्रीच्या डायरीत हाय की माज्या घरचा नंबर. ‘’

‘’ खराय तुजं पण तुला कसं बोलावायचं तेच कळत नव्हतं बग मला. जीतनं पण लै समजवलं श्रीला पण त्येचा काय बी उपेग झाला न्हाय. मग मीच त्याला म्हटलं तुला बलिवतो का म्हणून? म्हनतानी त्यानं तुला निरोप दिला. ‘’

‘’ काका, आसं म्हणून मला परकं करुन टाकताय की तुमी. ‘’

‘’ तसं न्हाय गं पोरी! माज्या लेकाकडं त्येचा बाप तरी हाय त्येला सांबाळायला. पण तुला तर आता तुजं मायेचं कोनबी नाय. आनी वरनं तुलाच माज्या लेकाला आधार द्यायला ये म्हनून सांगाया माजी जीभच रेटना बग. ‘’

‘’ काका, आसं काय करता? तुमी, आमुचे आईबाबा, जीतचे बाबा सगळी माजीच तर हायसा. मी येकटी हाय म्हणून कुनी सांगितलं तुम्हांला? ते जाऊ द्या. तुमी जीतला जे घर घ्यायला अर्धे पैशे दिले त्याच्यासाठनं मीपण अर्धे पैशे दिले त्याला. आणि सदाकाकालापण धाडला त्याच्याबरोबर पुण्याला. लै माया हाय बगा सदाकाकाची माज्यावर. ‘’

‘’ तीच माया माज्या लेकाला दिलीस न्हवं तू आता. तुज्याकडनं आज जे त्याला मिळालं ते त्याला जीतकडनं मिळालं नसतं. ‘’

‘’ म्हंजी ओ काका? ‘’

‘’ पोरी, आगं! त्याला ज्या आईच्या मायेची उब हवी होती ती तुज्यामुळं मिळाली बग त्येला. आजी गेल्यानंतर आईच्या मायेचं कुनीच नव्हतं त्येच्याकडं. आणि बापाची माया शेवटी बापाची माया असती. तिला आईसारखं मऊ नाय व्हता येत. ‘’

बोलता बोलता त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, ‘’ पोरी येक ईचारु काय? माजा श्री त्येच्या मनातल्या गोष्टी कुनालाच सांगत न्हाय. येकादी गोष्ट पार टोकाला जाईस्तवर त्याच्या तोंडातनं भाईर पडत न्हाय. रंग्याचंच बगितलंस न्हवं तू? त्याचं समदंच टोकाचं असतंय. राग बी आन प्रेम बी. अशा पोराचं लगीन करुन द्यायचं म्हंजी माज्या जिवाला त्या आलेल्या पोरीच्या काळजीनं घोर लागायचा. म्हनतानी मी इतकी वर्षं त्याच्या लग्नाचा ईशयच काडला न्हाई. पण, आता वाटतंय की तुला हिथं पाठवून त्या वरच्यानंच माजी समदी काळजी मिटवलीय. माज्या श्रीसंगट लगीन करशील काय? ‘’

ती काकांकडं बघतंच राहिली. तिला काका असं काही इचारतील असं वाटलंच न्हाई.

4/06/2020

........

*17*

‘’ काका! पण एकदा श्रीला इचरुन तर घ्या की! ‘’

‘’ हे बघ पोरी, मला त्याला ईचारायची कायबी गरज नाय हाय. अगं म्या सवताच्या डोळ्यांनी बगितलय न्हवं समदं. मग पुन्यांदा ईचारायची गरज नाय हाय. त्यो काय बी बोलला नसला तरी तुज्या मांडीवर डोकं ठिऊन ल्हान्या बाळागत शांत झोपलेला बगितलाय मी त्येला. त्येच्यावरनं मला काय समजायचंय ते समद समजलंय. तुला येक मोटी गोष्ट सांगू काय पोरी? कंच्या बी पुरसाला इतकी शांती त्येच्या हक्काच्या कुशीतच मिळती बग! आणि माजा श्री नशीबवान हाय की ती त्येला तुज्या रुपात भेटली. त्यो त्येच्या आईसारखा हाय बग! तिनं कंदीच मला तोंडानं सांगिटलं नाय की तिचं माज्यावर किती प्रेम हाय ते! पण तिनं मला भरवलेल्या परत्येक घासातनं, तिनं तिच्या पदरानं माज्या कपाळावरच्या पुसलेल्या घामातनं मला तिचं प्रेम कळत र्‍हायलं. ती गेली आणि माज्या आयुष्यातली सुखाची झोप, शांती, प्रेम सगळं सगळं तिच्यासंगती गेल्यं. मी माज्या लेकाला तिनं माज्याकडं त्येचा बाप असण्याचा दिलंला इश्वासच दिवू शकलो बघ! आज मला तूज्या रुपानं माज्या श्रीसाठी माज्या गायत्रीनं निवडली असती अशी सुन भेटलीय.’’

‘’ धनीऽऽऽ! निजला न्हाईसा व्हय? आवो लै रात हून गेलीया. ‘’ बंडातात्या गोठ्यातनं समद्या जनावरांची जाग घेऊन येताना त्यास्नी ही दोगं बी बोलत बसलेली दिसली म्हणताना त्यांनी काळजीनं वामनदादास्नी इचारलं.

रंग्या गेल्यापास्न ते रात्रीतनं उठून उठून गोठ्यातनं फेरी घालून यायला लागले होते.

‘’ व्हय व्हय तात्या! जातू झोपाया. तुमी काय गोठ्यात गेल्ता का काय परत पोरांची जाग घ्यायला? ‘’ वामनदादांच्या ह्या प्रश्नावर नुसती व्हय म्हणून मान हालवत बंडातात्या झोपाया निघून गेले.

‘’ बाबा, तुम्ही व्हा पुढं. मी जरा श्रीला बघून येती. ‘’ असं म्हणून प्रिशा श्रीच्या खोलीकडं निघून गेली. तिच्या काकावरनं बाबावर येण्यातच वामनदादांना तिचा होकार कळला आणि ते आनंदानं झोपायला गेले.

श्रीच्या खोलीत गेलेल्या प्रिशानं त्याच्या अंगावरचं पांघरुण नीट केलं. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि ती तिला दिलेल्या खोलीत येऊन कॉटवर आडवी पडली. पण तिला झोप काही येत नव्हती. कपाळावर आडवा हात घिवून छताकडं बघताना तिला कॉलेजातले श्रीच्या सोबतीत घालवलेले दिवस आठवत होते. इतक्या वर्षांत त्यानं कधीच तिला सांगितलं नाही की त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. पण त्याच्या कृतीतनं तिला त्यानं कितीदा तरी जाणवून दिलं होतं त्याचं प्रेम. तिला आतासुद्धा तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. विचार करता करता ती कॉलेजात जाऊन पोचली.

कॉलेजचा सांस्कृतिक दिवस असायचा मकरसंक्रांतीला. सगळं कॉलेज पांरंपारिक कपड्यांमध्ये सजायचं त्यादिवशी. त्या वर्षी तिनं आणि आमूनं नउवारी साडी नेसली होती. बाकीच्या मुलीपण वेगवेगळ्या पारंपारिक वेषात आल्या होत्या. श्री आणि जीतनं शाहिराचा वेष केला होता. आणि बाकीची सगळी गँग मावळ्यांच्या वेषात आली होती. इंदर सरदाराच्या कपड्यात होता तर सुशानं परटाचं रुप घेतलं होतं. येताना तो परटाचं गाठूडं आणायला इसरला नाय. तसंपण तो इंदरची धुणी धुवायचं कामचं जास्त करायचा कॉलेजात. विज्यानंपण अशीच पाणक्याची कापडं घातली होती. कुणी शेतकरी झालेलं तर कुणी धनगर. ज्याला जे आवडंल आणि जमलं त्या त्या प्रकारचा वेष ज्यानं त्यानं केला होता. जीत आणि श्रीनं ‘ गड आला पण सिंह गेला ‘ ह्याची गोष्ट सांगणारा नरवीर तानाजी मालुसरेंवरचा पोवाडा सादर केला. कुणी काय कुणी काय असे सगळ्यांनी सुंदर सुंदर कार्यक्रम सादर केले. त्या सादरीकरणानंतर सगळीजणं कॅन्टीनच्या बाहेर अल्पोपाहारासाठी जमली होती. हा कॉलेजचा दरवर्षीचा नियम होता. सांस्कृतिक दिनाच्या दिवशी कॅन्टीनमध्ये सगळं कॉलेजच्या खर्चानं मिळायचं खायला. नाश्ता करुन सगळी जण इकडं तिकडं विस्कटून बसली होती. अमू आणि प्रिशापण पायर्‍यांवर बसल्या होत्या. श्री आणि जीत चहासाठी कॅन्टीनमधल्या लाईनमध्ये उभे होते. तेवढ्यात तिथं इंदर आणि विज्या आले आणि ते प्रिशा-अमूच्या मागं पायर्‍यांवर येऊन बसले. त्यांच्या येण्यामुळं प्रिशाची वाकडी झालेली भुवई अमूनं बघितलीच होती.

‘’ तू उगा त्यांच्याकडं लक्ष दिवू नकोस.’’ असं म्हणून अमूनं प्रिशाचा हात दाबून धरला.

मागं बसलेला इंदर विज्याला म्हणाला, ‘’ विज्या आज कॉलेजात मोगरा जरा जास्तचं घमघमतोय ना? काय म्हणतो घ्यायचा का वास? ‘’

आधीच प्रिशाला त्याच्या वागण्याचा राग होता. त्यात त्याचं असलं बोलणं. मग काय तिला भस्कटायला कारणच मिळालं. तिनं खसकन् अमूच्या आंबाड्यात लावलेला गजरा ओढला आणि तो मागं बसलेल्या इंदरच्या दिशेनं भिरकवत म्हणाली, ‘’ लै घमघमतोय न्हवं मोगरा मग घे आणि तुज तोंड काळं कर गोर्‍या माकडा! ‘’

आणि तिनं जबरदस्ती अमेयाला तिथनं उठवलं नी त्या तिथनं लांब जाऊन बसल्या. पण, शेवटी इंदरच होता तो! तो त्यांचा पिच्छा असा थोडीच सोडणार होता. त्याची कॉलेजात आल्यापासून प्रिशावर नजर होती. पण त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही मात्र आता संधी मिळत होती त्याला तर तो ती हातची थोडीच जाऊ देणार होता? तो पण त्यांच्यामागनं गेला न् परत त्यांच्यामागे जाऊन बसला. ह्या मोसमात बोरं मिळत तेही स्वस्त. कॉलेजबाहेर तर गाडे लागत बोरांचे. विज्यानं येताना तिथनं बोरं आणली होती. दोघेही आरामात बोरं खात होते आणि इंदर बोराच्या बिया प्रिशाच्या दिशेनं फेकत होता.

‘’ काय लेका विज्या, तुला बोरं आणायचीपण कळत नाहीत बघ!’’ असं म्हणून त्यानं बी प्रिशाला फेकून मारलं.

‘’ तू त्याच्याकडं लक्ष दिवू नकोस म्हणून मगाशी सांगितलं न्हवं तुला? बस की गप. करु दे त्याला काय करतो त्ये!’’ अमूनं अजूनपण प्रिशाला गप बसायला लावलं होतं.

‘’आमू, त्यानं त्या मिनाक्षीबरोबर गेल्या येळेला काय केलं बगितलंस न्हवं तू? त्यो काय कुटल्या देशाचा राजा हाय व्हय? त्येला काय पोरींची छेड काडायचा परवाना मिळला हाय व्हय? ह्ये बघ अजून येकादं जरी बी मला लागलं तर मग मी त्याची मशागतच करतो बघ शेताच्या मातीसारखी.’’ प्रिशाच्या रागाचा ज्वालामुखी आता उसळायला लागला होता.

‘’विज्या माझ्याकडून शिक तू. बोरं कशी आणायची ते! ही अशी लाल रंगाची बोरं काही कामाची नाहीत बघ! बोरांचा रंग कसा जरा गडद व्यायला पाहिजेऽऽऽ‘’ असं म्हणून त्यानं आणखी एक बी प्रिशाच्या दिशेनं भिरकावलं. ते बी तिला लागलं आणि काही कळायच्या आतच प्रिशा ताडकन् उठली न् तिनं जाऊन फाडकन् इंदरच्या कानाखाली आवाज काढला. त्याची कॉलर धरली आणि म्हणाली, ‘’ प्रिशा पाटील म्हणत्यात मला. मी बाकीच्या पोरींसारखी लेचीपेची नाय हे लक्षात ठेवायचं आणि परत माज्या वाट्याला जायचं नाय. काय कळलं? ‘’

तिनं तशीच परत येऊन अमेयाचा हात धरला आणि ती तरातरा कॅन्टीनच्या दिशेनं निघाली. आधी थोढ्या वेळासाठी इंदरला काय घडलं तेच कळलं नाही. पण लक्षात आल्याबरोबर तो तसाच प्रिशाच्या मागनं गेला न् त्यानं पुढं जाणार्‍या प्रिशाचे केस धरुन खसकन् तिला मागे ओढली.

‘’ आऽऽऽ! इंदर सोड. तू हे चांगलं करत न्हाईस.’’

‘’ तू मला शहाणपणा शिकवणार होय? सगळ्या कॉलेजसमोर माझ्या इज्जतीच्या चिंध्या केल्यास ना तू? आता तुला दाखवतो मी कशा करतात इज्जतीच्या चिंध्या ते!’’ असं म्हणत इंदर तिला फरफटत ओढत नेत होता.

‘’ इंदरऽऽऽऽ! सोड तिला. ‘’ श्रीचा जबराट आवाज कानावर पडला आणि एका फटक्यात इंदरचे पाय जागेवर थांबले.

प्रिशाला इंदरनं पकडल्याबरोबर घाबरलेल्या अमेयानं कॅन्टीनकडं धाव घेतली. आता कुठं त्याचा नंबर लागला होता आणि त्यांना थर्मासमध्ये चहा भरुन मिळाला होता. इतक्यात धावतच अमेया तिथं पोचली आणि तिनं प्रिशाला इंदरनं छेडल्याचं सांगितलं. ते ऐकून हातातल्या थर्माससकट श्रीनं तिकडे धाव घेतली.

आवाजाच्या दिशेनं इंदरनं बघितलं. पण प्रिशाचे केस अजूपण त्याच्या हातात घट्ट धरलेले होते. त्याच्या थांबण्याच्या त्या क्षणाचा श्रीनं फायदा घेतला.

‘’ प्रिशेऽऽ! सांभाळ. ‘’ असं म्हणून त्यानं हातातल्या थर्मासमधला कडकडीत चहा इंदरच्या दिशेनं फेकला. श्रीच्या इशार्‍याबरोबर थांबलेल्या इंदरच्या पोटात प्रिशानं सगळ्या ताकदीनं कोपर ढोसलं. तशी त्याची प्रिशाच्या केसांची पकड सैल पडली. ती खाली वाकली न् श्रीनं फेकलेला गरम चहानं इंदरच्या चेहर्‍याला सरप्राईज किस केलं.

‘’ आऽऽऽऽ!’’ चेहरा भाजलेल्या इंदरनं दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. पुढं येऊन श्रीनं त्याची कॉलर पकडली.

‘’ह्येच्यापुढं कुटल्याबी पोरीच्या वाट्याला जाशील तवा ह्यो चा तुला कायम आठवलं. आणि हां! प्रिशीच्या वाट्याला जायचा परत इचार जरी केलास ना तर त्यो इचार करनारा मेंदू डोक्यातनं भायेर काडून त्येचा भुगा करीन. लक्षात र्‍हावू दे. ‘’

तो प्रिशाचा हात धरुन तडक चालू लागला. त्याच्या मागोमाग जीत, अमेया आणि बाकीची गँगपण निघाली.

चेहरा भाजलेल्या अवस्थेत विज्याच्या आधारानं उभा राहिलेला इंदर त्या सगळ्या कंपूला म्हणाला, ‘’इंदरला जी गोष्ट आवडते ती तो मिळवतो आणि नाही मिळाली तर तिला धुळीला मिळवतो. तू पण लक्षात ठेव मला इंद्रजीत घाडगे म्हणतात.’’

09/06/2020

….....

*18*

एकदा निर्णय झाल्यावर मग पुढच्या 4-5 दिवसांत पाटील-निंबाळकरांच्या सोयरिकीची गाठ बांधली गेली. जीत-अमेयाच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेल्यानंतर यांचं लग्न ठरलं. प्रिशाच्या इच्छेप्रमाणं फक्त काही मोजक्या माणसांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीनं लग्न झालं. मग त्या लग्नाचा सोहळा म्हणून ट्रस्टच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जेवण दिलं. त्यांना अभ्यासासाठी लागणारी त्यावर्षाची सगळी सामग्री वाटली गेली. लग्न व्हायच्याआधी पैसे आणि कागदपत्रं घेऊन पुण्याला गेलेल्या जीतनं बंगल्याचा व्यवहार पुर्ण केला होता. त्यामुळं लग्न झाल्यानंतर वामनदादा, प्रिशा, श्री, सगळीजणं पुण्याच्या नव्या घरातच रहायला गेले. घर, शेतीचा सगळा कारभार वामनदादांनी प्रिशाच्या विश्वासातल्या रंजन काळेकडे सोपवला. तसंही पुणं कुठे फारसं लांब होतं ना! 3-4 तासांत पुण्यावरुन जैतला पोचता येणार होतं.

लग्न झालं की देवदर्शन करुन श्री-प्रिशाची वरात जैतवरुन थेट सिंहगडच्या नव्या घरीच येणार होती. अमेयाचा उत्साह नुसता फसफसून उतू चालला होता. येणार्‍या नव्या जोडप्याच्या स्वागतासाठी काय करु आणि काय नको असं तिला झालं होतं. तिला आजची श्री-प्रिशाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची होती. बंगल्याची सजावट लायटिंग आणि फुलांनी करुन झाली. श्री-प्रिशाची खोलीदेखील सजवून झाली. चार कोपर्‍यात चार नंदादिप टांगले होते. त्यांच्या साखळ्या फुलांनी सजवल्या होत्या. दारापासून पलंगापर्यंत फुलांची पायघडी घातली होती. पलंगाच्या कडांना वेगळी चौकट करुन त्याला फुलांचे पडदे लावले गेले. शेजारी ठेवलेल्या छोट्या टेबलालाही फुलांनी सजवून त्यावर एका तबकात पानाचा डबा ठेवला होता. त्या तबकात विड्यांची सजावट केली होती. रात्री जेव्हा प्रिशा केशरी दुधाचा प्याला घेऊन आत येईल तेव्हा त्याच तबकात तो ठेवला जाणार होता.

आज दोन-दोन सोहळे उकाचवेळी प्रिशा-श्रीच्या आयुष्यात घडणार होते. आज त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात होणार होती सोबतच त्यांच्या नव्या घराचा गृहप्रवेशही होणार होता. लग्नसोहळा आटपून देवदर्शन करुन नवीन जोडपं कालच पुण्यात दाखल झालं होतं. सगळीजणं जीतच्याच घरात उतरली होती. आजचा अख्खा दिवस नुसता धावपळीचा होता अमेया जीत आणि बाकी सगळयांसाठीच. गुलबक्षी रंगाच्या शालूत नवी नवरी सजली होती. श्रीनं मोतीया रंगाच्या धोरावर रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता घातला होता. अमेयानं आकाशी रंगाची साडी नेसली होती तर जीतनं जांभळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. अमेयाचे आईबाबा, जीतचे बाबा, वामनदादा, सदाकाका सगळेजण नव्या कपड्यांत सजून धजून नव्या जोडप्याच्या गृहप्रवेशाची वाट पाहत होते. श्री-प्रिशाच्या निलय बंगल्याच्या समोर सुंदर रांगोळी काढलेली. सनईचौघडे वाजत होते. प्रवेशद्वार तर फुलांनी आधीच सजवलं होतं. तांदळाचा कलश भरुन तो उंबर्‍यावर ठेवलेला. एका थाळ्यात कुंकू पाण्यात कालवून ठेवलेलं. प्रिशानं त्या तबकात हात बुडवून त्याचे ठसे प्रवेशद्वाराच्या भिंतीवर उठवले. उंबर्‍यावर अमेयानं आधीच मालिनीकाकूच्या सांगण्याप्रमाणे उंबर्‍यावर हळदीकुंकवाची बोटं ओढली होती. भटजींनी हातात दिलेला नारळ प्रिशानं पायर्‍यांखाली वाढवला. त्याचं पाणी चारी दिशांना शिंपडलं. आता वास्तुपुजा आणि हवन करण्यासाठी आत प्रवेश करायला ती श्रीचा हात धरुन चारही पायर्‍या चढून वर आली पण अमेया दार अडवून उभी राहिली.

‘’चला दोघांनीपण नाव घ्या. आधी कर भरायचा. मगच आत प्रवेश मिळेल तुम्हांला. ‘’ तिनं फर्मान सोडलं.

थोडे आढेवेढे घेत प्रिशानं नाव घेतलं.

‘’ जैतवरनं पुण्याला आली निंबाळकरांची वरात; श्रीपर्णरावांचं नाव घेते प्रवेश द्या घरात. ‘’

‘’ श्री आता तूपण नाव घे. ‘’ असा सगळ्यांनी आग्रह सुरु केला. मग जीतनंच श्रीच्या कानात हळूच खुसपुस केली. तसं श्रीनंही नाव घेतलं.

‘’ नऊवारी साडीत बायको माझी चालवते बुलेट गाडी; प्रिशाच्या हातात दिली माझ्या संसाराची नाडी.’’

मग अमेयानं हक्कानं श्रीच्या खिशात हात घालून 551/- चा कर वसूल केला. आणि त्यांचा गृहप्रवेश झाला. त्यानंतर दिवसभरात वास्तुपुजा, होमहवन वगैरे सगळं संपन्न झालं आणि संध्याकाळी जीतनं काही निवडक पाहुण्यांना बोलावून त्यांच्याशी श्री आणि प्रिशाची ओळख करुन दिली. आलेले सगळै पाहुणे परत गेल्यानंतर अमेयानं प्रिशाला घरी नेलं. जीतनं श्रीला पांढरा मलमलचा कुर्ता आणि तपकिरी रंगाचं धोतर दिलं नेसायला. अमेयानं प्रिशाला मिश्र रंगाची नेटची साडी आणि पाठीचा गळा मोठा असणारा मेगा स्लीव्हजचा ब्लाऊज घालायला दिला. कंबरेत कंबरपट्टा, दंडात बाजूबंद, गळ्यात कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार, मंगळसूत्र अशा दागिन्यांनी तिनं प्रिशाला सजवलं. तिच्या छोट्याशा केसांचा छोटासा आंबाडा घालून त्यावर तिनं छोटी गुलाबाची फुलं लावली. तिच्या नाकात छोटीशीच नथ शोभून दिसत होती. पायांत जोडव्यांच्या सोबतीनं पैंजणही घातले होते. एकदा तिनं आरशात त्या सजलेल्या प्रिशाचं प्रतिबिंबाला पाहिलं. त्याच्यावरुन अलाबला काढून बोटं मोडली. मग तिला बाजूला बसवत म्हणाली, ‘’ लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते! ‘’ ‘’ हाय की लक्षात माज्या.’’ ‘’ प्रिशे, आता असं बोलायचं नाही. नीट शहरातल्या माणसांसारखं बोलायचं. कळलं ना! आणि हो तो दुधाचा ग्लास सगळा त्याला नाही द्यायचा. थोडा तू प्यायचा थोडा त्याला प्यायला द्यायचा.’’ ‘’अगं काय भांग बिंग मिसळली का काय तू त्येच्यात? ‘’ ‘’बघ, विसरलीस ना! आताच तर म्हणाले तुला की असं बोलायचं नाही म्हणून. आणि मी कशाला भांग मिसळू त्यात? ती तर आजच्या रात्री तुम्हीच चढवून घ्याल एकमेकांकडून. ‘’ असं म्हणून अमेया स्वतःशीच हसली. ‘’चल, तो तिथं यायच्या आधी तुला तिथं जायला हवंय. आणि जरा बाईसारखी लाजण्याबिजण्याचे कष्ट घे बर का! ‘’ अमेया तिला बेडरुमच्या दारात येईपर्यंत चिडवत होती. दारात आल्यावर ती म्हणाली, ‘’ सकाळी घेतलाय 551/- रुपयांचा कर म्हणून आता फुकट सोडतेय असं समजू नकोस. याचा हिशोब उद्या केला जाईल हे लक्षात ठेव. ‘’ पुन्हा एकदा प्रिशाचा अवतार पहिल्या रात्रीसाठी साजेसा आहे याची खात्री करुन घेत अमेयानं तिथंन काढता पाय घेतला.

अमेया निघून गेल्यावर प्रिशा अलगद पावलांचा आवाज न करता दार ढकलून आत गेली. श्री तिच्या आधीच आत आला होता. अमेयानं इतक्या दिवसांत त्या ट्वीन बंगल्याभोवती देखणी बाग बनवली होती. त्या बागेतली फुलं डोळ्यांना तर आनंद देतच होती पण रात्रीच्यावेळी फुलून येणार्‍या फुलांमुळे थकल्या मनालाही आल्हाद देत होती. बेडरुमच्या खिडकीत उभं राहिलं की त्या बागेतल्या देखण्या फुलांनी डोळ्यांना विसावा मिळायचा. त्यात आज पौर्णिमा होती. त्या दुधाळ चांदण्यात ती रंगीत फुलं आणखीनच सुंदर दिसत होती. श्री तिथंच त्या खिडकीत उभा होता. चांदण्यांच्या कवडशात उभारलेल्या श्रीला वेढून टाकत बाहेरच्या जाई-जुई आणि रातराणीचा गंध त्या खोलीत भरुन गेला होता. पावलांचा आवाज होऊ न देता आत येणार्‍या प्रिशाच्या पैंजणांनी केलेली नाजुकशी रुमझुमही श्रीच्या कानांनी टिपली होती. तिनं हलकेच हातातला दुधाचा पेला टेबलावर ठेवला आणि तो ठेवताना तिच्या हातातली काकणं किणकिणली. ‘’ आज चंद्रावर फारच प्रेम करतंय कुणीतरी. ‘’ तिनं अमेयानं शिकवलेल्या शिकवणीचा त्याच्याजवळ येत रट्टा मारला. ती पुरेशी जवळ आल्याची खात्री होताच त्यानं आपला हात मागे नेत तिच्या कंबरेत घातला आणि तिला खेचून घेत आपल्यासमोर उभी केली. ‘’ काही आठवलं का? ‘’ तिच्या डोळ्यांत बघत त्यानं विचारलं आणि ती ते काहीतरी आठवून गोड लाजली. ‘’तुला लाजतापण येतं? इतक्या वर्षांत मला तू फक्त बुलेटवालीच वाटलीस. ‘’ त्यानं हळूच तिच्या नाकातली नथ काढली आनि तिच्या ओठांवर ओठ टेकले. प्रिशाच्या सगळ्या शरीरातून एक तप्त शिरशिरी सरसरत गेली. पण तिनं काही हालचाल करण्याआधीच त्यानं तिला घट्ट मिठीत जखडून टाकलं. त्याच्या ओठांचा राकट स्पर्श तिच्या कानांवरुन सरकत मानेवरुन, खांद्यावरुन फिरु लागला. हळूहळू तिच्या अंगावरचे सगळे दागिने धराशायी होऊ लागले. ब्लाऊजच्या मोठ्या गळ्यामुळं उघड्या राहिलेल्या तिच्या पाठीवरुन फिरणारे त्याचे ओठ तिच्या सर्वांगावर हवाहवासा शहारा फुलवत कंबरेपर्यंत येऊन पोहचले. तिच्या बेंबीवर तू माझीच आता असं म्हणणारा ओठांचा शिक्का उमटवत त्यानं तिच्या कंबरपट्ट्यालाही विनासायास तिच्या पायाशी लोळण घ्यायला लावली. फक्त पायातले पैंजण तसेच ठेऊन त्यानं तिच्या साडीला मात्र स्वहस्ते तिच्या शरीरापासून विलग केलं आणि अर्धवस्त्रांकित तिला दोन्ही हातांवर उचलून अलगद पलंगावर ठेवलं. तिच्या आणि स्वतःच्याही उरल्यासुरल्या वस्त्रांचा अडथळा मार्गातून बाजूला करत त्यानं शेजारचा थाळा उचलला आणि त्यातली सगळी मोगरीची फुलं तिच्यावर उधळली. मग अलवारपणे ती फुलं बाजूला करत पायाच्या तळव्यापासून सुरुवात करत कधी ओठ तर कधी नखांचा, दातांचा कौशल्यानं वापर करुन त्यानं तिला पुर्णपणे स्वतःत उतरवली आणि तोही तिच्या रोमारोमात भिनून गेला.

सकाळी आंघोळ करुन बाथरुमबाहेर आलेल्या प्रिशाला खिडकीच्या तळाशी पडलेले दागिने, खिडकीपासून ते पलंगापर्यंत अस्ताव्यस्त पसरलेली त्यांची आदल्या रात्रीची वसनं आणि पलंगावर विस्कळीत होऊन पसरलेल्या फुलांत शांत झोपलेल्या श्रीला पाहून रात्रीच्या स्मृती गुदगुल्या करत होत्या.

15/06/2020…

……………….

*19*

सगळं काही सुरळीत चालू होतं. जीत आणि श्रीनं नव्यानं चालू केलेला त्यांचा व्यवसाय धाम बिल्डर्स उत्तम चालू होता. मोरवन बिल्डर्सला जाणीव झाली होती की त्यांच्यापेक्षा त्यांचा प्रतिस्पर्धी धाम बिल्डर्सच्या इमारतींमध्ये लोक जास्त गुंतवणूक करत होते. दादासाहेब अर्थात इंद्रजितने मोरवन बिल्डर्सचे 50 टक्के भाग भैय्यासाहेबांच्या म्हणजे सुशांतच्या नावावर केले होते. दादासाहेब आता त्यांच्या वडीलांच्या भाऊसाहेबांच्या जागेवर निवडणूक लढवण्याचा विचार करत होते. सध्या ते आकुर्डीचे नगरसेवक होते. गेल्या दोन वर्षांत धाम बिल्डर्सने चांगलीच प्रगती केली होती. पण दादासाहेबांनी आपल्या नगरसेवक असण्याचा पुरेपुर फायदा मोरवनला मिळवून दिला. त्यांच्याच प्रयत्नाने आधीचे दोन शासकीय प्रकल्प मोरवन बिल्डर्सकडे आलेले आणि आता ते एका शाळेचा प्रकल्प मोरवनकडे यावा याच्या प्रयत्नात होते. नेमक्या त्याच प्रकल्पासाठी धामनेपण निविदा भरली होती; त्यामुळे त्यांना जरा टेन्शनच आलं होतं. त्यांनी वरपासून खालपर्यंत सगळीकडे आपली माणसं, पैसे जे जे गरजेचं वाटलं ते ते पेरुन ठेवण्याची काळजी व्यवस्थित घेतली होती. मात्र कर्मधर्मसंयोग म्हणा किंवा अन्य काही पण तो शाळेचा प्रकल्प मोरवनच्या हातातून अगदी येता येता निसटला. निसटून तो गेला सरळ धामच्या झोळीत. निसटला तोही अवघ्या 1.20 पैशांच्या फरकाने. दादासाहेब आणि भैय्यासाहेबांच्या बुडाला चांगलीच मिरची लागली होती. दादासाहेबांच्या नगरसेवक असण्याचा फायदा यावेळेस काही मोरवनच्या पारड्यात प्रकल्प टाकू शकला नाही. आता आपला हा सगळा राग कुणावर काढणार होते दादासाहेब? भैय्यासाहेबांवरच ना!

'' असं कसं ते प्रोजेक्ट गेलं धामकडे? तू काय झोपा काढत होतास की काय? मोरवनचे 50 टक्के शेअर काय फुकटच दिलेत का तुला मी? ही सगळी कामं मी करायची का? आठवतंय ना! की विसरलास स्वतःची लायकी? मी जर नसेन तर तू काहीच नाहीस. आज तू जो काही आहेस तो माझ्यामुळं हे कायम लक्षात ठेवायचं. '' दादासाहेब भैय्यासाहेबांची लायकी काढत होते आणि भैय्यासाहेब मुकाट मान खाली घालून ती ऐकून घेत होते. पण, खरं पाहिलं तर त्यांच्या अंगाचा नुसता तिळपापड होत होता. त्यांनी मनातून ठरवून टाकलं होतं की यावर काहीतरी उपाय शोधायचाच. मात्र त्यांनी उपाय शोधे शोधेपर्यंत पुढचे आणखी दोन-तीन प्रोजेक्ट धामकडे गेले आणि मग मात्र दादासाहेबांनी भैय्यासाहेबांना त्यांच्या फसलेल्या प्रयत्नांसाठी चामडी सोलायचीच बाकी ठेवली होती.

'' सुश्या तुझी लायकीच नाही रे! मी तुला जे दिलंय त्यासाठी मी खरतर तुझ्यापेक्षा अकलेनं आणि विचारानं दोन पावलं पुढं असणारा माणूस निवडायला हवा होता. आता इतक्या वर्षांनी मला कळलंय की तुझ्यासारख्या नालायक माणसाला पदरी बांधून मी माझीच कंबर मोडून घेतलीय. ''

'' दादासाहेब, अहो माझं ऐकून तर घ्या. हे बघा तुम्हांला आता काही करायची गरज नाहीए. मी लावलाय आपला माणूस कामाला. '' भैय्यासाहेब जमेल तशी स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते.

'' ओका आता. काय मोठे तीर मारलेत ते तर कळू दे. 5-5 प्रोजेक्ट त्या धामच्या घशात गेल्यावर आता तुमचा माणूस काय काम करणारे? ''

'' दादासाहेब थंड घ्या. आणि आता बघाच तुम्ही; वर्षभरात मी त्या धामचे वासे कसे खिळखिळे करतो ते! ''

भैय्यासाहेबांनी पुढं केलेला पाण्याचा ग्लास रागाने उडवून लावत ते म्हणाले, '' जरा स्वतःची लाल करायची सोडून काय दिवे पाजळलेत ते सांगा. ''

'' दादासाहेब, धामवाल्यांशी आपलं जुनं वैर आहे कॉलेजपासूनचं. '' ते ऐकताना नकळत दादासाहेबांचा हात आपल्या डागाळलेल्या चेहर्‍याकडे गेला.

'' त्याचं उट्टं काढायची संधी आपल्याला आता मिळालीय. जा साळगावकर आणि श्रीपर्ण निंबाळकरनं आपलं जेवढं नुकसान केलंय त्याच्या दुपटी-तिपटीनं वसूल करु आपण. जिवलग मित्र आहेत ना ते! त्यांच्या मैत्रीचे तुकडे करु आपण. म्हणजे त्यांच्या नात्याचेही होतील. एकदा का ह्या जिगसॉचे तुकडे वेगळे केले की मग जोडणारा येत नाही तोवर यांना कोण आणेल एकत्र? '' आपल्या योजनेवर खुष होत भैय्यासाहेबांनी शेजारी बसलेल्या मॅनेजर निकमला टाळ्या दिल्या.

''आता काय केलंय ते सांगता की नुसत्याच चौकात उभं राहून टाळ्या वाजवणार आहात? '' दादासाहेबांचा राग अजून जराही कमी झाला नव्हता. ते परत एकदा आपल्यावर कडाडले म्हणताना भैय्यासाहेबांनी नुसताच इशारा केला निकमांना. तसे निकम आपल्या खुर्चीतनं उठले आणि दादासाहेबांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसले.

'' त्याचं कसं आहे दादासाहेब! धाम बिल्डर्स दोन सख्ख्या मित्रांची कंपनी आहे. शिवाय त्यांच्या बायकापण एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रीणी आहेत. आणिऽऽऽ माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या देखण्या चेहर्‍यावरचे डागपण तिथनंच आलेत. नाही का? '' निकमांनी असं म्हणताच दादासाहेबांच्या भुवया आक्रसल्या. त्याच्यामुळं आधीच तारवटलेल्या त्यांचा चेहरा भडकलेल्या दैत्त्यासारखा दिसायला लागला. भैय्यासाहेबांना तर आता तिथं मोठा स्फोट होईल की काय अशी भिती वाटायला लागली. पण निकम गेल्या अनेक वर्षांपासून अशा सगळ्या परिस्थितींना सरावलेला माणूस होता. त्यानं पाण्याचा ग्लास पुढं करत आपलं बोलणं चालूच ठेवलं.

'' कसंय ना! जखमा कुरतडून हिरव्या ठेवाव्या लागतात; सुड घ्यायचा तर. म्हणून फक्त आठवण करुन दिली. ''

गरम चहामुळं चेहर्‍यावर पडलेल्या डागांवर हात फिरवताना तो सगळा प्रसंग दादासाहेबांच्या नजरेसमोर तरळून गेला. निकमची चर्पटपंजरी मात्र चालूच होती.

'' आपला एक माणूस मी धाममध्ये जोडून टाकलाय. नाव भावेश दिक्षित. आता तुम्ही फक्त बघत रहा दादासाहेब मी आणि दिक्षित मिळून धामची अख्खी इमारत कशी भुईसपाट करतो ते! ''

स्वरा... 19/06/2020

..........

*20*

स्कूटी पार्किंगमध्ये लावून प्रिशा टिफिनचं बास्केट घेऊन ऑफिसकडे जाणार्‍या कॉरीडॉरमध्ये शिरली. तेवढ्यात समोरुन येणार्‍या दिक्षितनं तिला थांबवलं. तिच्या हातातल्या टिफिनकडे बघत विचारलं, '' काय मॅडम! कुठं जायचा विचार? '' आपल्याच तंद्रीत चाललेली प्रिशा थांबली. ती कधीतरीच ऑफिसला येत असल्यामुळं तिनं दिक्षितला आणि दिक्षितनं तिला ओळखलं नाही. '' तुम्ही कोण? '' तिनं प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्नच विचारला. '' आधी तुम्ही कोण ते सांगा! '' दिक्षितनं तिच्या वरचढ व्हायला बघत आणखी एक प्रश्न विचारला. त्रासिक मुद्रेनं वरपासून खालपर्यंत त्याला बघत तीनं विचारलं, '' तुमच्याकडं टिफिन काय गाईम्हशींना खायला घालतात का? '' ते टिफिनचं बास्केट त्याच्या तोंडासमोर नाचवत ती म्हणाली, '' कोण तुम्ही? मला ओळखलं नाहीत का? जा, जाऊन श्रीला सांगा म्हणावं बायको आलीय टिफिन घेऊन लंचरुममध्ये ये. '' आता कुठं जाऊन दिक्षितची ट्युब पेटली की ही श्रीची बायको प्रिशा आहे म्हणून. पण तोवर प्रिशाची गाडी सुसाट वेगानं लंचरुमकडे निघूनही गेली होती. त्यानं आपला मोर्चा आला तसाच परत श्रीच्या ऑफिसकडे वळवला. लंचरुमच्या बाजूलाच असलेल्या जीतच्या केबीनचं दार ढकलून तिनं त्याला हाक मारली. '' जित्या, डबा आणलाय रे! लवकर जेवायला ये. '' मागून येणार्‍या दिक्षितच्या नजरेतनं ही गोष्ट सुटली नाही की प्रिशानं डाव्या बाजूला असणार्‍या श्रीच्या केबीनचं साधं दारंही वाजवलं नाही पण जीतला मात्र अगदी आग्रहाने जेवायला बोलावलं. तिच्या तर हे असलं काही डोक्यातही नाही. भेटलेल्या माणसाकडं श्रीसाठी निरोप दिलाय; मग परत कशाला हाक मारा असा विचार करुन तिनं फक्त जीतला हाक मारली आणि ती लंचरुममध्ये आली. आत येऊन तिनं आतल्या टेबलवर डबा काढून ठेवला. बास्केटमधून आणलेली ताटं आणि वाट्या टेबलावर मांडल्या. डबा उघडला. आणि दोघांच्याही ताटात जेवण वाढायला सुरुवात केली. तीनं दुसरा छोटा डबा उघडून ती त्यातले गुलाबजाम वाटीत काढतच होती इतक्यात जीत आत आला. गुलाबजाम बघून तो लगेच खुर्चीवर टेकला. '' अरे वा! गुलाबजामऽऽऽ '' त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. प्रिशानं त्याच्याकडं दुर्लक्ष करत विचारलं, '' कॉन्ट्रक्टर साहेब, हात कधी धुणार? '' '' आधी एक गुलाबजाम दे ना! '' '' सॉरी, हात धुतल्याशिवाय तुला काहीही मिळणार नाही. '' प्रिशानं त्याची मागणी सपशेल धुडकावून लावली. '' ए प्रिशे! ते गुलाबजाम माझ्या बायकोनं पाठवलेत. ते पण माझ्यासाठी. ती गुरुवारी माझ्यासाठी गोड पाठवते विसरलीस का? '' '' मी कुठं म्हणाले की ते मी केलेत म्हणून? मी म्हणाले की हात धुतल्याशिवाय तुला काहीही मिळणार नाही. '' '' ठीक आहे. नको देऊस. पण मी तर खाणार आहे; तेही हात धुतल्याशिवायच. '' असं म्हणून त्यानं तिच्या हातातल्या चमच्यानंच वाटीतला गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला. नेमक्या त्याचवेळी दार उघडून आलेल्या श्रीनं हे सगळं बघितलं. लग्गेच त्याच्या कानात काहीवेळापूर्वी दिक्षितनं बोललेले शब्द घुमले. '' तुमची बायको डबा घेऊन आली आणि तिनं साधं तुमच्या केबीनचं दार वाजवलं देखील नाही. उलट प्रेमानं आपल्या मित्राला हाक मारली. काय साहेब, असं कुठं असतं का? '' प्रिशा आणि जीतचं त्याच्याकडं लक्ष गेल्यावर जीत म्हणाला, '' हां! आता एक चमचा यालापण भरव म्हणजे सगळी फिटम् फाट होईल. नाहीतर उगाच माझ्या पोटात दुखायचं. '' प्रिशा त्यावर खळखळून हसत म्हणाली, '' तू लक्ष नको देऊस श्री. तो तसाही वाया गेलेला आहे. '' '' हो. मी जेवतो माझ्या हातानं. तसंही तुझी मैत्रीण तुला भरवण्यात बिझी आहे. '' असं म्हणत तो हात धुवून येऊन जेवायला बसला. जीत-प्रिशा त्याच्या ह्या वाक्यानं चमकले पण त्यांनी ते हसण्यावारी सोडून दिलं. मात्र बाहेर काचेच्या कोपर्‍यातून हे सगळं बघणार्‍या दिक्षितला आपला वार सुका गेला नाही याचा आनंद झाला.

गेल्या 3 वर्षांत श्रीचा रोज प्रिशाला गजरा आणण्याचा नियम बदलला नव्हता. रोज संध्याकाळी ऑफिसवरुन येताना तो न चुकता प्रिशासाठी गजरा घेऊन यायचा. आणि इतक्या वर्षांत त्याच्या गाजरा ठेवण्याच्या जागेतही बदल झाला नव्हता. तो ऑफिसमधून आला की खोलीत जायचा. त्याच्या बेडशेजारी असणार्‍या आरशाच्या टेबलावर एका कोपर्‍यात तो गजरा ठेवायचा आणि हातपाय धुवायला निघून जायचा. त्याच्या मागोमाग त्याचा चहा घेऊन येणारी प्रिशा तो गजरा उचलायची, मनापासून हुंगायची आणि केसांत माळायची. इतक्या वर्षांत त्या गजर्‍याची जागा बदलली नाही. पण आज मात्र ऑफिसमधून आलेल्या श्रीनं तो नेहमीच्या जागेवर नव्हता ठेवला. रोजच्यासारखा चंपानं बनवलेला त्याचा चहा घेऊन आत आलेल्या प्रिशानं पाहिलं तर गजरा त्याची जागा सोडून तिसरीकडेच ठेवलेला तिला दिसला. तिनं तो गजरा सवयीनं उचलला, हुंगला आणि केसांत माळला. तेवढ्यात श्री आलाच बाहेर बाथरुममधून. तो चहा घ्यायला खुर्चीत येऊन बसला तसा चहाचा कप तिनं त्याच्या हातात दिला. त्याच्यासोबत खुर्चीत न बसता ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. '' काय गं? काय झालंय? तू अशी खिडकीकडे का उभी राहिलीयस? '' '' माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही हल्ली. '' '' काय? '' श्रीला ठसका लागता लागता राहिला. '' काहीही काय बोलतेस? '' '' मला सांगा निंबाळकर सगळं ठीक चाललंय ना! '' श्रीला ना तिचा प्रश्न समजला ना तिच्या मनातलं. तो गोंधळून तिच्याकडे बघत राहिला. '' काही नाही. इतक्या वर्षांत पहिल्यांदा तुमची जागा चुकली. '' असं म्हणून ती चहा तसाच सोडून बाहेर निघाली. जाता जाता त्याच्या केसांतून बोटं घुंगराळत म्हणाली, '' तू आपला तुझ्या धामलाच सांभाळ. मी बघते माझ्या नवर्‍याला. '' चंपाला रात्रीच्या जेवणासाठी झुणका भाकरी करायला सांगितली आणि ती जीतकडे आली. '' झाला वाटतं लाडक्या निंबाळकरांचा चहा! '' तिला आत येताना बघून अमेयानं किचनमधूनच तिला टोमणा मारला. '' तू गप गं! तो फक्त माझा निंबाळकर आहे. तू त्याला नावानंच हाक मार. '' '' बरंऽऽ! नाही म्हणत. पण आज तू त्याला, त्याच्या चहाला आणि तुमच्या वेळेला सोडून इकडं कशी? रोज तर मारे संध्याकाळचा वेळ आमचा आमचा म्हणत गायब असतेस. आज काय झालं? '' '' मला जीत्याशी बोलायचंय. आज निंबाळकरांच्या गजर्‍याची जागा बदललीय. '' असं बोलत बोलत ती जीतच्या खोलीकडे गेलीपण. '' काय गं जयंती? काय म्हणाली ही काही कळलं का तुला? ''

अमेयाला किचनमध्ये सोडून प्रिशा जीतच्या खोलीत घुसली. '' ए बाई! लग्नाला 3 वर्षं झाली की तुझ्या; जरा तरी लाजबीज बाळग की. '' जीत आरशासमोर उभारुन कपडे बदलत असतानाच तिला आत आलेली बघून ओरडला. '' जा रे! मला कुठं तुझ्याशी रोमान्स करायचाय? आणि तसंही अमूला तुझ्यामाझ्यातलं सगळं माहीतेय. '' '' बरं, पण तू आता ह्या वेळेला इथं कशी काय? '' '' मला सांग ऑफिसमध्ये काही झालंय का? '' '' नाही गं! काहीच नाही. नेहमीसारखंच तर होतं सगळं. '' '' अच्छा. मी जाते मग. '' '' अगं पण, तू काय विचारायला आलीस ते तरी सांग ना! '' तिच्यामागे ओरडत जीत दारात पोचला पण भरार्‍या वार्‍यासारखी प्रिशा कधीच निघून गेली होती. समोरुन चहाचा ट्रे घेऊन येणार्‍या अमुनं त्याला विचारलं, '' काय रे! काय म्हणत होती ही? '' '' मलाही काही कळलं नाही गं! ऑफिसात काही झालंय का विचारलं. नाही म्हणालो तर गेली निघून. तुला काय म्हणाली. '' '' कुणास ठाऊक काय सांगायचं होतं. म्हणाली आज गजर्‍याची जागा बदलली. ''

दोघंपण तिच्या अशा वागण्यानं विचारात पडले होते.

…….

*21*

भावेश त्याचं काम अगदी चोख करत होता. त्याच्या नेमलेल्या माणसानं जीत-अमेया आणि प्रिशाच्या एका एका मिनिटाची खबर त्याच्याकडं पोचवणं नियमानं चालू ठेवलं होतं. आता भावेशच्या डोक्यात त्या सगळ्यांचं काय करायचं याचा काथ्याकूट चालू होता. भैय्यासाहेब काही कामाचे नव्हते; त्यांना इतरांवर डाफरण्याखेरीज दुसरं काही जमत नव्हतं. तो म्हणजे दादासाहेबांचा अंमलबजावणी कार्यकर्ता होता. मोरवनच्या मिळालेल्या 50 टक्के भागीदारीची लाज राखण्यासाठी म्हणून त्यानं; खरतरं निकमनं भावेशला कामाला लावलं होतं. आणि भावेश? तो एक अजब नमुना होता. त्याला फक्त आणि फक्त पैशांशी देणंघेणं होतं. या भावेशसाठी खबरी कम फोटोग्राफर म्हणून काम करणारा कदम सुशांतच्या वळणाचं पाणी होतं. सांगकाम्या न् होमनाम्या. झापडं बांधून कामं करायची. कामं झाली की खुर्चीत बसून टेबलावर तंगड्या पसरुन झोपी जाणं हा त्याचा सगळ्यात आवडता धंदा होता. मात्र भावेशची काम करण्याची पध्दत थोडी वेगळी होती. तो इतका फाटका रहायचा की कुणाला सांगूनही विश्वास बसला नसता की त्याच्याकडं 4 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट आहे म्हणून. लेंगा, सदरा, खांद्याला झोळी अडकवलेली, नंबर नसतानाही हौस म्हणून लावलेल्या भिंगाच्या चष्म्यातनं त्याचे डोळे बेडकासारखे दिसायचे. हे सगळं कमी होतं म्हणून की काय त्याच्या डाव्या कानाला कायम एक पेन बिन टोपणाचा अडकवलेला असायचा. बरं, तो सुध्दा चोरीला जाऊ नये म्हणून पठ्ठ्यानं तोही त्या चष्म्याला दोर्‍यानं बांधून ठेवलेला. फार लहान वयात डोक्यावरनं शेरलॉक होम्स आणि 007 जेम्स बॉन्डनं हात फिरवल्यामुळं स्वतःला गुप्तहेर म्हणवून घेण्यात धन्यता मानायचा भावेश. निकम अगदी पारखी माणूस होता. त्यानं अगदी बरोबर नेम धरुन भावेशला उचलला होता. कुणाला कुठल्या कामासाठी वापरायचं, त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करुन घ्यायचा यात तो तरबेज होता. त्याच्या याच गुणामुळे तो मोरवनमध्ये टिकून होता. कारण सुशांतला यात काहीही गम्य नव्हतं.

‘’ नमस्कार भावेश साहेब. माझं काम होतं तुमच्याकडं. ‘’

‘’ हं! बोला. ‘’ पेपरातल्या सुडोकूमध्ये डोकं खुपसून बसलेल्या भावेशनं मानही वर न करता त्याच्या प्रश्नाला तुसडेपणानं उत्तर दिलं.

‘’ नोकरी करायचीय. करणार का? ‘’

त्याच्या या प्रश्नानं मात्र भावेशची तंद्री तुटली. त्यानं पेन कानाला अडकवत मान वर करुन आपला भिंगाचा चष्मा पुसून डोळ्यांवर चढवत थंडपणानं त्याकडं पाहिलं तर त्याच्यासमोर काखोटीला एक चामड्याची बॅग मारुन सफारी घातलेला किडकिडीत माणूस उभा होता.

‘’ नाव काय? कुठून आलात? काम काय? असले प्रश्न विचारण्यापेक्षा मी तुम्हांला बाहेरचा रस्ता दाखवणं पसंत करेन. आणि माहीतीसाठी सांगतो. 4 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट ठेवलीय माझ्या बापजाद्यांनी माझ्यासाठी. तुझ्या फादर्‍या हजार रुपड्यांसाठी माझ्या वहाणा झिजवायला मी काय मुर्ख वाटलो का? ‘’ आणि त्यानं बोलता बोलता उघडलेल्या डायरीच्या पानावर फुली मारली.

‘’ चला. कटा इथनं आता. नोकरी करणार का म्हणे! ‘’

‘’ दिक्षित! दिक्षित! अहो थांबा. माझं म्हणणं जरा ऐकून तर घ्या. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो. आणि महत्वाचं म्हणजे हे काम बॉण्डवालं काम आहे हो! ‘’ निकमची ही मात्रा मात्र अगदी अचूक लागू पडली.

निकमला हाकलण्यासाठी दारापर्यंत आलेल्या भावेशनं पैशांचं नाव ऐकताचं त्याला हाताला धरुन येवल्यासारखा मागच्या पायानं ओढत खुर्चीकडे आणला. ती साफसूफ करुन तिच्यावर निकमला बसवलं आणि आपण समोरच्या आपल्या खुर्चीत जाऊन टेकला. निकमच्या जीवात जीव आला. कारण दिक्षित हातचा गेल्यानंतर सञभैय्यासाहेबांनी त्याचे एक एक करत कसे पाखे उखडले असते या विचारानंच तो धास्तावला होता भावेशनं नकार दिल्यावर. दिक्षितनं पुन्हा डायरी उघडली आणि कोर्‍या पानावर पुन्हा काहीतरी कोड्याच्या भाषेत लिहीत राहिला त्यांचं बोलणं चालू असताना.

‘’ चला करा सुरुवात. आधी पैसे. मग काम. किती दिवस करायचं याच्यावर पैसे वाढवायचे की नाही ते ठरणार. म्हणजे मी ठरवणार ते! ‘’

‘’ 50000/- ‘’

‘’ काम? ‘’

‘’ धाम बिल्डर्सचा पाया खचवायचाय. ‘’

‘’ अरे ए! मी काय तुला आगलाव्या डोंब वाटलो की काय? ‘’

दिक्षित पुन्हा आपल्याला हाकलेल असं वाटलं म्हणून आधीच त्याचे हात निकमनं धरुन ठेवले.

‘’ हात सोड आधी. मी माझ्याच ऑफिसातनं पळून जाणार नाहीए निकम. पुढं बोल. ‘’ भावेश कातवला तसा चेहर्‍यावर साखरेचा हसरा मुखवटा घालत निकम म्हणाला,

‘’ काय चिडता तुम्ही दिक्षित असं? हे बघा, तुम्हांला फक्त धाम बिल्डर्सच्या मालकांची खडान् खडा माहिती गोळा करुन आणायचीय. ‘’

‘’ निकम, असं वाईवरनं सातारा करणार असाल ना तर आधीच सांगून ठेवतो हा दिक्षित लोकांची घरं आणि कंपन्या फोडत नसतो. ‘’

‘’ दिक्षित, अहो 1 लाख देतो की मी. आणि मला फक्त माहीती काढून हवीय. बाकीचं काम आमचं आम्ही करु. ‘’

आता मात्र दिक्षितमधला खरा दिक्षित जागा झाला. माणसाला खोड्यात अडकवून त्याच्याच तोंडून त्याची खरी नड काढून घेण्यात दिक्षितचा हातखंडा होता. आता त्याच्या लक्षात आलं होतं की धामला नेस्तनाबूत करण्यासाठी निकम काहीही किंमत मोजू शकतो. आता त्यानं शकुनीचा पौ-बारा वापरायचं ठरवलं.

‘’ निकम ते 50000/-, 1 लाख वगैरे सगळं ठेवा तुमच्याकडेच. कामाला येतील तुमच्या. 4 महिने 5 लाख आणि धाम बिल्डर्स फिनिश. तुम्हांला फक्त मी म्हणेन तसं करायचंय. तशी प्यादी हलवायचीत गरज पडली तर. बघा, पटत असेल तर 4 महिन्यांसाठी दिक्षित तुमचा. ‘’

दिक्षितनं वेळ बघून चाल खेळत आपला पत्ता निकमसमोर फेकला. निकम दिक्षितच्या ह्या सल्या सौदेबाजीनं पुरता भंजाळून गेला. त्याच्या डोक्यातलं विचारचक्र प्रचंड वेगानं फिरत होतं. भैय्यासाहेब तर 1 लाख ऐकूनच फाडून खातील आपल्याला; द्यायचे लांबच राहिले. इथं दिक्षितनं तर हूं म्हणून तोंड फाडलं होतं. कात्रीत सापडलेला निकम म्हणाला,

‘’ बघतो. भैय्यासाहेबांना विचारावं लागेल मला. ‘’

आपल्या समोरचा फोन त्याच्यासमोर धरुन भावेशनं त्याचा रिसिव्हर उचलून निकमसमोर धरत म्हणाला, ‘’ घ्या विचारा. लग्गेच काम फायनल करुन टाकू. हां! पण एक नियम आहे बरं का माझा, या दारातून एकदा जो डिल घेऊन बाहेर पडला मी परत त्याच्या कुठल्याच कामाला हात घालत नाही. ठरवा काय करायचं ते. ‘’

दिक्षितच्या अडकित्यात निकमची सुपारी पक्की अडकली होती. आता आपल्याला परत जाऊन भैय्यासाहेबांच्या जबरी शिव्या खायच्याच आहेत आपल्याला असं मनात ठरवून निकमनं दिक्षित बरोबर 5 लाखात सौदा डन केला.

तो दिड लाखाचा चेक घेत दिक्षितनं पुन्हा एक कंडीशन निकमला सांगितली.

‘’ तुमच्या कामाची सुरुवात उद्यापासून होईल निकम. फक्त एक लक्षात ठेवायचं 5 लाखात सौदा केला म्हणजे त्याची मिजास दिक्षितला दाखवायची नाही. मी तुमचा पगारी नोकर नाही. माझ्यावर कसलीही जबरदस्ती केलीत की तुमच्या कामातनं मी मोकळा. एक रुपडासुध्दा परत देणार नाही घेतलेल्यातला. ‘’

निकमनं मुकाट्यानं मान हलवली आणि आपली चामड्याची पर्स काखोटीला मारुन तो तिथनं बाहेर पडला. दिक्षितनं पेनमधली रिफिल बदलून डायरीवरच्या त्या पानावर लाल रंगानं खूण केली.

‘’ 5 लाख? निकम भडव्या पैसे काय झाडाला लागतात का? तोडले आणि वाटले आपले येणार्‍या जाणार्‍याला. आणि तुला अधिकार दिले म्हणजे काय तू मला नागडा करुन वरात काढणार का आता माझी? ‘’ पिंजर्‍यातल्या वाघासारख्या फेर्‍या घालत भैय्यासाहेब निकमच्या सात पिढ्यांची सनावळ वाचत होते; सोबतीला शिव्यांचं भांडार होतंच.

‘’ भैय्यासाहेब, अहो शांत व्हा. शांत व्हा. अशानं तुमचं टेन्शन वाढेल. त्याच्यामुळं बिपी वाढेल. मग हॉस्पीटलला जावं लागेल. ऍडमीट व्हावं लागेल. परत एकदा पैसांच्या झाडाचे पैसे तोडून वाटावे लागतील आपल्याला. आधीच 5 लाख घातलेत आपण. आताच तर दिड लाखाचा चेक देऊन आलो मी. 2 महिन्यांनी पुन्हा दिड लाख द्यायचेत. आणि शेवटचे 2 लाख काम संपल्यावर. ‘’

‘’ निकम, भडव्या तू टेन्शन उतरवतोयसं की देतोयसं मला? ‘’

 फेर्‍या घालणार्‍या भैय्यासाहेबांनी त्यांच्या मागून पाण्याचा ग्लास घेऊन फिरणार्‍या निकमच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि ते खुर्चीवर बसले.

‘’ तसं नाही भैय्यासाहेब. अहो माझा नाही, तुमचा नाही किमान दादासाहेबांच्या रागाचा विचार करा. तेही नाही तर त्या मिळालेल्या 50 टक्के भागीदारीचा तरी विचार करा. दादासाहेबांनी रुद्रावतार धारण केला तर तुमच्याबरोबर माझेही हाल त्या धोबीच्या कुत्र्यासारखे होतील. ना धड घरचे ना घाटाचे. ‘’ निकमनं कसंबसं आपलं काम भैय्यासाहेबांच्या पचनी पाडलं एकदाचं.

…….

*22*

हा कदम म्हणजे नुसता पाट्याटाकू काम. झापडं लावायची आणि सांगितलेलं काम केलं की आपल्या फोटोच्या दुकानात जाऊन टेबलावर तंगडी टाकून झोपा काढायच्या. जोपर्यंत फोटो आताच्या आता हवेत अशी मानेवर कुर्‍हाड पडत नाही तोवर तो त्या निगेटीव्हकडं बघायचासुध्दा नाही. हां, पण त्याची एक गोष्ट मात्र वाखाणण्यासारखी होती. तो ज्यांच्या ज्यांच्यासाठी म्हणून फोटो काढायचा त्यांच्या फोटोच्या निगेटीव्ह नाव, गाव, पत्ता, टेलीफोन नंबरसकट व्यवस्थित त्याच्या डार्करुम शेजारी जतन करुन ठेवायचा तो. कधी, कुठं अशा गोष्टींचा उपयोग होईल सांगता येत नाही ना!

‘’ ए आळश्या! तुला नुसता तंगड्या पसरुन झोपायसाठी ठेवलाय का मी? ‘’

दुकानात आलेल्या दिक्षितनं कदमच्या गळ्यात अडकवलेल्या कॅमेराच्या पट्ट्याला धरुन ओढत त्याला झिंजाडलं.

‘’ ओ दिक्षित! दिक्षित! सोडा तो पट्टा. तुटलं की. सोडा. सोडा म्हणतो ना! ‘’ झटक्यासरशी झोपेतनं जागा होत कदम ओरडला. तसा हातात धरलेला कॅमेराचा पट्टा सोडून नॉर्मलवर येत दिक्षित म्हणाला, ‘’ अरे बेण्या! तुला एक साधं काम सांगितलं होतं; त्या धाम बिल्डर्सवर 24 तास नजर ठेवायचं. ते पण जमत नाही का तुला? ‘’

‘’ ओ दिक्षित! नावं ठेवायचं काम नाही काय! आपण आपलं काम 100 टक्के व्यवस्थितच करतो काय. ‘’ असं म्हणत त्यानं काढलेले सगळे फोटो दिक्षितला दाखवले.

‘’ अरे रताळ्या! या निगेटीव्हमधून काय दगडं कळणारे का मला? ‘’ दिक्षितनं परत त्याला झापला.

‘’ त्यात काय एवढं? तुम्ही सांगा की मला तसं; फोटो पाहिजेत म्हणून. हे काय आत्ता लग्गेच तयार करतो. या, या, आत या. ‘’ आणि कदमनं हाताला धरुन ओढत आपल्या डार्करुममध्ये नेलं.

‘’ मेल्या, इथं डोळ्यांत बोटं घातली तरी काही दिसणार नाही. ‘’

‘’ तुम्ही फक्त कानांनी बघा आणि डोळ्यांनी ऐका हो! ‘’ असं म्हणत कदमनं डार्करुममधला बल्ब चालू केला.

‘’ उलटंच बोल तू कायम. डोळ्यांनी बघतात आणि कानांनी ऐकतात ना! ‘’

‘’ तेच हो! मी चेक करत होतो तुम्ही इथंच आहात की कसे ते! हे बघा. ‘’ असं म्हणून हसतच कदमनं निगेटीव्हपासून फोटो तयार करण्याची क्रिया त्यांना दाखवायला सुरुवात केली.

‘’ ए, तू तुझं काम कर. मला काही बघायचं नाहीए. तू फक्त मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे झालं. मला धाम बिल्डर्सच्या 24 तासांची नाही तर मिनिटांमिनिटांची खबर हवीय. ‘’

‘’ काय? ‘’ कदमच्या हातातली निगेटीव्ह ट्रेमध्ये गळून पडली.

‘’ मी असलं काही करणार नाही हां दिक्षित कारण असली कामं करायला माझ्याकडं गाडी नाहीए. ‘’

‘’ हो, हो तर! पैशांची झाडंच लावलीत की नाही मी बागेत. गाडी पाहिजे. मग त्याच्यात पेट्रोल टाका. ते कमी पडलं की म्हणशील दिवसभरात खायला प्यायला पैसे द्या. ‘’

‘’ अरे, दिक्षित तुम्ही तर मनकवडे आहात अगदीच. चला बाहेर जाऊया. आता हे फोटो सुकले की तुमचेच. ‘’

‘’ कदम्या तुझ्याकडं सायकल आहे की. मग गाडी कशाला हवीय तुला? ‘’ दिक्षित आपले पैसे वाचवण्याच्या फंदात तडजोड करत होता.

‘’ करेक्ट हाय तुमचं. सायकल आहे माझ्याकडं. आणि मी 1940 मधल्या स्पायसारखा सायकलवरुन करतो हां गाड्यांचा पाठलाग. सायकलवरुन कोण करतं गाड्यांचा पाठलाग दिक्षित? ‘’

‘’ बरं, बरं! रडू नकोस. 100/- भत्ता वाढवून देतो. मग तर झालं ना! ‘’

‘’ हं! द्या. द्या. 100 रुपये वाढवून द्या. म्हणजे मी त्यातून हॅलीकॉप्टर खरेदी करतो आणि धाम बिल्डर्सवर घिरट्या घालतो. म्हणजे मिळेल तुम्हांला मिनिटांमिनिटांची खबर. आताच्या फोटोचे पैसे द्या आणि या तुम्ही. ‘’ कदम भलताच चिडला होता.

‘’ कदम, राजा अरे तू खूप क्वालिफाईड माणूस आहेस. असं करु नकोस. शहाणा आहेस की नाही? हे बघ, मी तुला माझी जुनी लुना देतो. अजून चांगली आहे ती. तुझ्यासारखी धडधाकट. वरनं पेट्रोलपण मीच घालतो. चालेल ना राजा! ‘’

‘’ आणि 100 रुपयांचा वाढीव भत्ता? ‘’

‘’ हो, हो तर! तो पण देणार. आता तरी करशील ना माझं काम? ‘’

‘’ आता कुठं तुमची लुना लाईनवर येतेय. पण 100 च्या पुढं काही जात नाहीए. ‘’

‘’ अडला हरि गाढवाचे पाय धरी. ‘’ असं पुटपुटत दिक्षितनं खिशातनं 500 रुपयाची नोट काढून ती कदमच्या टेबलावर टेकवली.

‘’ हे 500 रुपये. लुना घरनं घेऊन जा. आणि आठवणीनं येताना फोटो घेऊन ये. ‘’ असं म्हणून दिक्षित निघून गेला.

...

‘’ प्रिशा, ए प्रिशे दार उघड. ‘’ अमेया बाहेरुन जोरात दार वाजवत होती. अर्ध्या झोपेतून डोळे चोळत उठून प्रिशानं दार उघडलं.

‘’ काय झालंय? भूकंप आलाय की काय? मला कसा कळला नाही? ‘’

‘’ कारण तो माझ्या बेडरुममध्ये आलाय. ‘’

‘’ अमू, रात्रीच्या 2 वाजता कोण कोडी घालतं? ‘’

‘’ मी. तू चल आधी माझ्याबरोबर. ‘’ असं म्हणून तिच्या हाताला धरुन अमू तिला ओढत घेऊन निघाली. तरी जाता जाता तिनं श्रीला हाक मारलीच.

‘’ श्री, श्रीऽऽऽ! अरे उठ की घोरेसुरा. अरे ही बघ रात्री-अपरात्री येऊन तुझ्या बायकोला किडनॅप करतेय. उठ की. ‘’

श्रीची झोप हल्ली पुर्वीसारखी राहिली नव्हती. तो अमुच्या आवाजानंच जागा झाला होता पण डोळे मिटून तसाच पडून राहिलेला. प्रिशानं जोरात हाक मारल्यावर तो उठून बसला. त्या दोघींच्या मागोमाग तोही काय झालंय ते बघायला गेला.

अमू प्रिशाला घेऊन थेट बेडरुममध्ये शिरली तर तिथं जीत पोट घट्ट धरुन ओरडत होता. त्याला तसा ओरडताना बघून प्रिशानं अमूचा हात झटकला आणि ती पटकन् जीतच्या शेजारी जाऊन बसली. त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याला विचारलं,

‘’ काय झालंय? पोटांत दुखतंय? काय खाल्लंस? पनीर? ‘’

जीतनं त्याही अवस्थेत कशीबशी मान हो म्हणत हलवली.

‘’ अमू तू त्याला काही औषध दिलंस की नाही? ‘’

‘’ अगं, झालं सगळं करुन. पण वाढतंच चाललंय त्याचं दुखणं म्हणून तुला बोलवलं. ‘’

‘’ बरं! बरं! तू जरा त्याचा शर्ट काढ. तोवर आलेच मी. ‘’ आणि प्रिशा पटदिशी पळत घरी गेली नी कसलं तरी औषध घेऊन आली. कोपर्‍यात उभा राहून श्री हे सगळं बघत होता. जुना श्री असता तर आतापर्यंत त्यानं मित्रासाठी दुनिया उलथीपालथी केली असती. पण हा आताचा श्री भावेशच्या मिठीत अडकलेला श्री होता. त्याला मैत्री कळत होती पण वळत मात्र नव्हती.

धावत गेलेल्या प्रिशानं येताना जीवन मिक्श्चरची बाटली आणली होती.

‘’ अमू जरा चमचा आण गं! ‘’

झालं ती जीवन मिक्श्चरची बाटली बघून जीत आणखीनच ओरडायला लागला.

‘’ आं! दुखतंय. पण आता बरं झालं. मी नाही औषध घेणार. ‘’

‘’ बरं. नको घेऊस. माझं काय जातंय. ओरड असाच बैला पोट पकडून. ‘’

‘’ नको नको गं! दे तू त्याला औषध. ‘’

‘’ बघ हं तुझी बायकोच जबरदस्ती करतेय माझ्यावर. मी तुला औषध देत नाहीए. ‘’

‘’ अरे काय नाटकं चाललीत सगळी? ओत त्याच्या नरड्यात पटकन आणि हो मोकळी. ‘’ वैतागलेला श्री फटकन् बोलून गेला.

‘’ आवाज एकदम बंद. आ कर. ‘’ प्रिशाचा आवाज कडक झाला तसं तोंड वेडंवाकडं करत जीतनं आ केला. प्रिशानं चमचाभर औषध त्याच्या तोंडात घातलं.

‘’ थुकलंस ना तर इथंच बडवेन बघ. गिळ मुकाटयानं. ‘’ तिच्या धमकीनं जीतनं मुकाट्यानं ते औषध गिळून टाकलं. तोवर प्रिशानं बाटलीतलं थोडसं जीवनमिक्श्चर त्याच्या पोटावर चोळायला लागली. लहान मुलाला समजवतात तसं त्याला समजवत तिनं त्याच्या अंगावर पांघरुण घातलं.

‘’ आता बरं वाटेल हं तुला. झोप शांत. ‘’

ती जायला निघाली तसा जीतनं तिचा हात धरला.

‘’ थांब ना प्रिशा. मला झोप लागली की जा. ‘’

‘’ अरे अमू आहे की इथं आणि मी कुठं डोंगराच्या पल्याड राहतेय? ‘’

‘’ नको. ती भित्री आहे खूप. काही झालं तर? ‘’

‘’ काही होणार नाहीए. कठीण आहेस तू जीत. ‘’ तिनं हळूच अमूकडे बघितलं. तसं अमूनं नजेरेनंच हो म्हटलं.

‘’ श्री तू जा. जाऊन झोप मी आलेच. ‘’ श्री मुकाट्यानं पडत्या फळाची आज्ञा मानून तिथंन निघून गेला.

प्रिशा तशीच जीतच्या शेजारी बसली. शेजारच्या आरामखुर्चीत बसत अमूनं जीतला डिवचलं.

‘’ हे बराय हं तुझं जीत. लाडकी मैत्रीण आली म्हटल्यावर बायको नकोशी झाली होय तुला? ‘’

डोळे मिटून पडलेल्या जीतला हलकेच थोपटताना प्रिशा आरामखुर्चीत बसलेल्या अमूशी गप्पा मारत होती.  

‘’ झोपला का गं तो? ‘’

‘’ हं! लागेल झोप हळूहळू. औषध गेलंय ना पोटात त्याच्या. ‘’

‘’ पण औषध घ्यायला एवढा का कां कू करत होता हा? एरवी तर कधी असा वागत नाही तो. ‘’

यावर हसतच प्रिशा म्हणाली, ‘’ तुला नाही माहीत. कॉलेजमधला किस्सा आहे तो. म्हणजे त्यानं तुला सांगू नको म्हणून सांगितलेलं ना म्हणून बोलले नाही आणि नंतर कधी सांगण्याचा प्रसंगच नाही आला. कॉलेजला असताना एकदा मित्रांसोबत गेला होता ढाब्यावर जेवायला. हौसेहोसेनं मटरपनीर मागवलं, खाल्लं. आणि रात्री अडीच वाजता सायकल हाणत बिचारा दुडके वाड्यावर. माईमुळं मला हे औषध माहीत झालं. तिनंच मला ते औषध घेऊन पाठवलं दुडकेसोबत. खूपच कडवट चव आहे त्याची. त्यामुळं तो त्याच्यापासून लांब पळतो. ‘’

त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. जीत केव्हाचाच झोपी गेलेला. पण, श्री मात्र बेडवर पडल्यापडल्या डोक्यावर हात ठेऊन छत न्याहळत होता. किती काही केलं तरी त्याच्या नजरेसमोरुन जीतच्या पोटाला औषध चोळणारी प्रिशा काही जात नव्हती.

 03/07/2020

.......

*23*

‘’ भैय्यासाऽऽहेब! ‘’

‘’ हां, उचकट तुझं थोबाड. ‘’

‘’ ते दिक्षित… दिक्षित… ‘’

‘’ काय म्हणाला आता तो नारकुटा? ‘’

‘’ भैय्यासाहेब, आणखी एक-दोन कॉन्ट्रॅक्ट जाऊ देत धाम बिल्डर्सकडे… ‘’ शेवटी एकदाचं सांगायचं सांगायचं म्हणून हिंमत करुन दिक्षितनं पढवलेलं सगळं निकमनं भैय्यासाहेबांच्या कानात ओतलं.

‘’ दळभद्री लेकाचा! नतद्रष्ट माणूस! हरामखोर! आता काय हातात कटोरा घेऊन भीका मागायला लावणार की काय हा? दादासाहेब उभा सोलून काढतील मला. तो दिक्षित काहीतरी बरळतो आणि तू मला त्याच्यावर अंमल करायला सांगतोस? ‘’

‘’ पण, भैय्यासाहेब! एकदा ऐकून तर घ्या. ‘’

‘’ जा, घुबडतोंड्या! मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीए. मला फक्त एवढंच कळतंय की मला कोणत्याही कारणामुळे दादासाहेबांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीए. ‘’

‘’ काय म्हणताय? कुणाची नाराजी ओढवून घ्यायची नाही तुम्हांला? ‘’ दार उघडून आत येत दादासाहेबांनी विचारलं. आता यांना काय सांगावं हा प्रश्न पडलेल्या भैय्यासाहेबांनी चाचरतच चेंडू निकमच्या कोर्टात टोलवला.

‘’ ते हा निकम जे म्हणाला ते मला पटलं नाही म्हणून मी म्हणालो तसं दादासाहेब! ‘’

आता दादासाहेबांनी आपला मोर्चा निकमकडे वळवला. पण निकमला दादासाहेबांचा स्वभाव कळला होता त्यामुळे तो काही फारसा घाबरत नव्हता. नाही म्हणायला त्यालाही भैय्यासाहेबांसारखा का असेना पण थोडासा धाक होताच.

‘’ हं! बोला निकम. काय सांगितलंत तुम्ही यांना? असा तुमचा कुठला प्रस्ताव नाकारतायत हे भैय्यासाहेब? ‘’ भैय्यासाहेबांना त्यांच्या शब्दातली खोच बरोबर लक्षात आली.

तसं तर दादासाहेबांना काही सांगणं सोपं नव्हतं आणि पटवून देणं तर मुळीच नाही. त्यामुळे निकमला घाम फुटला होताच. पण काय करायचं? आलं अंगावर की शिंगावर घेतलं पाहिजे नाहीतर आपलाच कोथळा बाहेर यायचा. त्यानं खिशातनं रुमाल बाहेर काढून कपाळावरचा घाम टिपून घेतला आणि दिक्षितनं सांगितलेलं सगळं यथास्थित त्यांना सांगितलं.

‘’ कसंय ना दादासाहेब, तो धाममध्ये ठेवलेला आपला माणूस आहे ना! भावेश. तो म्हणत होता की अजून किमान एक-दोन कॉन्ट्रॅक्ट जायला हवीत धाम बिल्डर्सकडे. ‘’ पुढचं काही बोलायची हिंमत निकम गोळा करेपर्यंत दादासाहेबांनी थंडपणे भैय्यासाहेबांकडे बघितलं. तसा त्यांनी भितीनं आवंढा गिळला. दादासाहेबांनी तीच थंड नजर निकमकडे फिरवली आणि विचारलं, ‘’ त्यानं काय होईल? ‘’

निकमला त्यांच्याकडून असल्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. पण जर भैय्यासाहेबांना सांगायला म्हणून तो भावेशकडून याचं उत्तर घेऊन आला होता; जे त्यानं दादासाहेबांच्या तोंडावर चिकटवलं.

‘’ तसं तर दिक्षितांनी त्याबद्दल फारसं काही सांगितलं नाहीए. म्हणाले फक्त इतकंच की मला धाम बिल्डर्सचा विश्वास हवाय. कायम लक्षात ठेव की घाव त्याचाच खूप खोलवर होतो ज्याच्यावर माणसाचा खूप जास्त विश्वास असतो. तेवढं ऐकलं मात्र दादासाहेब ताडकन् उठले आणि भैय्यासाहेबांच्या पाठीवर थोपटत म्हणाले, ‘’ वाह! भले शाब्बास. आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंयत तुम्ही. ‘’ ही अशी संधी निकम थोडीच सोडणार होता? त्यानं झटकन् पुढे येत भैय्यासाहेबांच्या चेहर्‍यावरचं उमलू पाहणारं हसू क्रूरपणे पुसून टाकलं. ‘’ दादासाहेब, दिक्षित माझा शोध आहे. ‘’ भैय्यासाहेब चांगलेच चरफडले पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं.

‘’ अरे वा! निकम. मग तर तुम्हांला बक्षिस दिलं पाहिजे. हे घ्या 10000. ‘’ असं म्हणून त्यांनी खिशातनं नोटांचं बंडल काढून निकमला दिलं. ‘’ दिक्षितला म्हणावं त्याचं काम होऊन जाईल. पुढच्या कॉन्ट्रॅक्टच्या निविदांचं चलन भरण्याआधी ती रक्कम तुला सांगितली जाईल. तू त्याच्यापेक्षा कमी चलन त्यांना भरायला सांग आणि ते कॉन्ट्रॅक्ट धामला मिळेल. आणि हे ही सांग म्हणावं जर मला हवं ते केलंस तर तुझ्या आणखी तीन पिढ्या बसून खातील एवढं देईन मात्र जर चुकलास तर दिक्षित होता असं म्हणावं लागेल. ‘’

भैय्यासाहेबांना आधीच हातनं दहा हजार गेल्याचं दुःख होतं त्यात दिक्षितचा प्लॅन दादासाहेबांना अचूक कळल्याच्या दुःखाची आणखी भर पडली.

….

ऑफिसमध्ये बसलेल्या जीतला श्री आयता तावडीत सापडला होता.

‘’ तुझा त्या दिक्षितवर एवढा विश्वास का आहे? ‘’

‘’ हा काही प्रश्न आहे का जीत? तुला दिसत नाहीए का त्याच्यामुळेच तर आपल्याला गेल्यावेळंचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना! ‘’

‘’ अजिबात नाही. मला हे पटत नाही. मला वाटतं की त्याचा तुक्का लागलाय. तो तसा तुझा माझाही लागूच शकतो. ‘’

‘’ छ्या! मला नाही पटत तुझं म्हणणं. मी तीच रक्कम निविदा भरताना भरली होती जी भावेशनं सांगितली होती. आणि तूच बघितलंस ना की आपल्यापेक्षा किती जास्त होती मोरवनची रक्कम ते! ‘’

‘’ बरं! बरं! तू हायपर नको होऊस. कदाचित तुझं बरोबर असेलही. मी विचार करेन यावर. ‘’

असं म्हणून जीत श्रीच्या केबीनमधून बाहेर पडत होता. तरीही मित्राबद्दलची काळजी म्हणून तो जाता जाता पुन्हा श्रीला म्हणालाच, ‘’ हे बघ श्री! डोळे उघडे ठेऊन विश्वास ठेव माणसांवर. माझा त्या गबाळ्या दिक्षितवर अजिबात विश्वास नाही. बाकी तुझी ईच्छा. ‘’

श्रीनं जीतच्या ह्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

आजही श्री दुपारनंतर दिक्षितसोबत 4 वाजताच कुठंतरी निघून गेला. हल्ली तो बर्‍याचदा दिक्षितसोबत कुठंतरी निघून जायचा. जीतनं कधी विचारलंच तर म्हणायचा की दिक्षितच्या ओळखीची कुणी पार्टी आहे त्यांच्या घराचं काम आहे. बघून येतो. कुणाची जमीन असयची तर कुणाच्या ऑफिसचं काम आहे म्हणायचा. दिक्षित महा गोडबोल्या. तो पार्टीच्या नावाखाली दादासाहेबांच्या कार्यकर्त्यांना पकडून आणयचा. येताना त्यांना नीट पढवलेलं असायचं. त्याप्रमाणे दिक्षितच्या नेतृत्वाखाली मिटिंग बसायची. 15-20 मिनिटं चर्चा चालायची. चर्चा संपत आली की बट ऑब्व्हीयस असल्याप्रमाणे दारुपार्टी व्हायची. आधी श्री प्यायचा नाही. मग आलेल्या पार्टीला वाईट वाटू नये, सौदा हातचा जाऊ नये असं पटवून दिक्षितनं त्याला प्यायची सवय लावली. पण या एक पेग दोन पेग वर असणारी गोष्ट अनलिमिटेडवर जाईल असं स्वतः श्रीलाही वाटलं नव्हतं.

‘’ का रे श्री नाही आला तुझ्यासोबत? ‘’ श्रीची वाट बघणार्‍या प्रिशानं आत शिरणार्‍या जीतला ओरडून विचारलं.

तसा आत जाणारा जीत थांबला. मागे वळला आणि माघून येणार्‍या प्रिशाला म्हणाला, ‘’ तो गेलाय त्या दिक्षितसोबत कुणालातरी भेटायला. ‘’

‘’ मग तू नाही गेलास का? ‘’

‘’ माझा नाही त्या गबाळ्यावर विश्वास. आणि तुझा निंबाळकर ना! अडाणी आहे. त्याला माणसं कळत नाहीत. मला तो माणूसच पटत नाही. बेडक्या कुठचा! ‘’

हे ऐकल्यावर खाली पायरीवर बसलेली प्रिशा खदखदून हसली.

‘’ खरंय तुझं. बेडक्याच आहे तो! भिंगाड्या, चष्मिश कुठला. अमू चहा इथेच आण गं! ‘’ तिनं दारातच उभारुन तिच्या प्रश्नांची उत्तरं देणार्‍या जीतचा हात धरुन त्याला खाली बसण्यासाठी ओढला. आत बघणार्‍या जीतचा तोल गेला आणि तो धडपडला तिच्याच अंगावर.

‘’ अरे हो! हो! सांभाळ. ती आत तुझी बायको बसलीय ना ती माझं चहासोबत इथंच क्रियाकर्म करुन टाकेल. ‘’

त्यांची खेळीमेळी चालू असताना कदम मात्र त्याचं काम चोख बजावत होता.

… 05/07/2020

..........

*24*

‘’ सदा नीट गोळा करशील न्हवं फुलं? ‘’

‘’ व्हयजी. समदी काडू न्हवं? ‘’

‘’ व्हय. आणि वामनभाऊजी, माधवभाऊजी आन् आमच्या ह्यास्नी बी सांग. म्हणावं चा घिवून येते. ‘’

‘’ बरं! सांगतो जी. ‘’ असं म्हणून सदाकाका वळला आणि मालिनी काकूंनी त्याला परत हाक मारली.

‘’ सदाऽऽऽ! ‘’

‘’ काय जी? ‘’

‘’ ह्यास्नी म्हंजी कुनाला बोलवणार तू? ‘’

‘’ ते आपलं ह्यास्नीच की. ‘’

‘’ तेच त्ये. त्या ह्यास्नीचं नाव आठवतंय न्हवं? ‘’

‘’ व्हय तर. आठवतंय की. येवडा काय ईसरायलोय व्हय मी? ह्यास्नीचं नाव ह्यास्नीच असतंय की. ‘’

‘’ आरं खुळ्या! ह्यास्नी म्हंजी आमच्या आमुच्या बाबास्नी बोलिव. कळलं का? जा आता. ‘’

सदा आमुच्ये बाबा, आमुच्ये बाबा असं बडबडत निघून गेला.

सगळीजणं झोपाळ्याकडं जमली होती.

‘’ काय दिगंबरराव! वैनीस्नी काय लै म्हत्वाचं बोलायचंय व्हय? ‘’ वामनरावांनी आमूच्या बाबांना विचारलं.

‘’ आसलं बाबा! आपण काय फकस्त हुकमाचे ताबेदार. ‘’

‘’ व्हय व्हय तर! त्येवडंच करता का नाय तुमी दिसभर? ‘’ चहा घेऊन येणार्‍या मालिनी काकू दिगंबररावांवर उचकल्या.

माधवदादांनी आपल्या वकिलीच्या पुस्तकातनं डोकं वर काढत त्यांना विचारलं, ‘’ मालिनी वैनी कशाला एवढं रागवता आमच्या मित्रावर? ‘’

‘’ नाय तर काय ओ! घरात काय चाललंय काय कळत नाय; ना ह्यास्नी ना तुमा दोगास्नी. ‘’

परडीतली फुलं वेगळी करणार्‍या सदानं विचारलं, ‘’ काय झालंया का? ‘’

‘’ घ्या. तूच बाकी व्हतास बग. आता तुबी लाग मसणात लाकडं मोजाया. घ्या चा घ्या. मोठा वकिलीचा धंदा करताय पण घरातल्या गोष्टी कळत नाय तुमा लोकांला. ‘’

‘’ आगं, आता काय झालं ते सांगशीला की निसतीच नमनाला घडाभर त्याल वतशीला? ‘’

आपला मोर्चा वामनदादांकडे वळवत मालीनीकाकूंनी त्यांना विचारलं, ‘’ वामनभाऊजी, तुमाला बी कळंना व्हय पोरगं किती उसरा घरी याला लागलंय? दारु प्याला लागलंय? शेती-बिती तिथं गावाकडनंच सोडलीया का इथं यिवूनपण त्येच्यातच अडकलायसा? ‘’

‘’ वैनी तुमी म्हनताय त्ये खराय बगा! परं आसं अजाबात न्हाय की मी काय बोललो न्हाय, इचारलं न्हाय. येकदोनदा गेल्तो त्येला इचारायला. पण तुमी तुमचं काम बगा; आमच्या मदी पडायचं कारण नाय. मी तुमच्या सुनंला कायबी कमी पडू देनार नाय आसं म्हणून मला वाटंला लावलं बगा त्यानं. शेवटी लेकाच्या घरात र्‍हायाचं म्हटलं की त्यो म्हनंल ती उगवती मानाया लागती बगा. त्या दिसापास्नं म्या आपला त्येच्या वाट्यालाच जात न्हाई बगा. आता आमची सुनबायपण काय बोलत नाय बगा. त्येंच्यात काय भांडण हाय काय नाय त्ये बी कळत न्हाय. फकस्त श्रीचाच आवाज कधी कधी येतो त्येंच्या खोलीतनं. आता तो पोरीसंगट भांडतो का दारुच्या नशेत येकलाच बरळतो मला काय बी कळत नाय बगा. ‘’

‘’ माधवभाऊजी तुमी बगताय काय येक डाव प्रयत्न करुन? म्हंजी जीत आणि श्रीची ल्हानपनापासनची मैत्री हाय ना! ‘’

‘’ वैनी, तुम्हांला काय वाटतंय मी बोललो नाही का त्याच्याशी? वामन सांगतोय त्यात काही खोटं नाही. मी त्याला विचारलं तुला कसलं टेन्शन आहे का? तसं असंल तर मला सांग, जीतला सांग. तुला कसलीपण मदत लागली तर आम्ही आहोत. आम्ही तुझीच माणसं आहोत. पण मला त्यानं सपशेल उडवून लावलं वैनी. मला म्हणाला की तुमी तुमचं वकिलीचं काम करा. जीत आणि मी आमचं काम बघतो. मला कुणाच्या मदतीची गरज नाही. आता तुम्हीच सांगा मी आणखी काय करायला पाहिजे होतं? ‘’

मालिनीताईंनी नवर्‍याकडं बघितलं तसे दिगंबरदादा म्हणाले, ‘’ आगं आता ह्यात मी काय कराया पायजे हुतं? ‘’

‘’ काय कराया पायजे हुतं म्हंजी? प्रिशी आपल्या आमूसारखीच हाय न्हवं आपल्याला? आपल्या लेकीसारखा तिचाबी संसार नगं का चांगला हुयाला? उद्या वर जाऊनश्यानी माईआबास्नी काय सांगाल वं? तुमच्या लेकराला येकटं सोडलं म्हणून? ‘’ मालिनीताईंच्या तोंडाचा तोफखाना धडाक्यानं चालू होता.

‘’ आगं जरा दमानं घ्ये की! चामड्याचं हाय म्हनून टिकलंया; मातीचं असतं तर कवाच फुटून ग्येलं आसतं. मला काय वाटतंय का तुमी लोकं उगा पराचा कावळा करतायसा. त्येचं कसाय ती दोगं आजून नवरा बायकूच हायती. मंग त्येंच्यात भांडणं हुनारचं की? ‘’

‘’ तुमचंपण आसं असतंय बगा. कशापाई आसं कोड्यात बोलताय? सरळ सांगता यिना व्हय की पोरंबाळं झाल्यार सगळं सुधरलं म्हणून? ‘’

‘’ आगं आता माजं म्हननं पुरं करायसाठी तर तुज्यासंगट लगीन केलतं म्या! ह्या दोगांकडं बग बरं! देवानं त्यास्नी कसं लवकर सुखी क्येलं? ‘’

‘’ हां, तुमी माज्या मरनाचीच वाट बगा निस्ती. पन लक्षात ठेवा मेल्यार बी तुमास्नी सोडायची न्हाय मी. ‘’

असं म्हणून मालिनीकाकू चहाचा जामानिमा घेऊन फुणफुणत आत गेल्या.

‘’ काय तुम्ही दिगंबरराव! कशाला आम्हांला मध्ये ओढलंत? ‘’

‘’ न्हाईतर काय? उगा वैनीस्नी दुखावायलाय बगा तुम्ही. ‘’

‘’ गपा ओ! ती कसली दुकावतीय? खरं सांगायचं तर तिची फुणफुण ऐकल्याबिगार माजा दिसंच जात नाय बगा. द्या टाळी. ‘’

…..

रात्रीचं जेवण आटपून जीत काही फाईली घेऊन बेडरुममध्ये बसलेला. मागचं सगळं आटपून अमू आत आली तर त्याचं काम चालू होतं.

‘’ जीत तुझं काम अजून चालू आहे? ‘’

‘’ अगं काय करु? हल्ली श्रीचं ना लक्ष नसतं गं फार कामात! सतत त्या दिक्षितबरोबर कसल्या कसल्या मिटिंगला जात असतो. ‘’

‘’ मग तुम्ही त्याला काढून का टाकत नाही? ‘’

‘’ अगं कसा काढणार त्याला? तो श्रीचा पर्सनल असिस्टंट आहे. त्याला काढायचा की नाही हा निर्णय श्रीच घेऊ शकतो. ‘’

‘’ अरे पण तू कधी विचारलं नाहीस का त्याला की तो कसल्या मिटिंगना जातो म्हणून? ‘’

‘’ अमू मला सांग एखादी गोष्ट तू कितीवेळा करु शकतेस? ‘’

‘’ म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचंय नक्की? ‘’

‘’ अगं, एखाद्या गोष्टीची माणसाची जबाबदारी असते. ती त्याला कळअयला नको का? आम्ही भागीदार आहोत ना! मग दोघांनाही सगळ्या गोष्टी माहीत असणं ही दोघांचीही जबाबदारी असते की नाही? ‘’

अमूला त्याच्या ह्या बोलण्यावर काय म्हणावं कळेना कारण जीतच्या बोलण्यातही तिला तथ्य वाटत होतं.

… 07/07/2020

..........

*25*

जीत म्हणत होता त्यात काही खोटं नव्हतं. गेल्या दोन वर्षांत दिक्षितनं श्रीवर जसं काही गारुडच केलं होतं. खरंतर दिक्षित अवघ्या चारच महीन्यात धाम बिल्डर्सकडचं काम सोडून गेलेला. श्रीलाच त्याची जास्त गरज होती की त्याला दिक्षितचं व्यसन लागलं होतं देवालाच ठाऊक! श्रीनंच त्याला बळं बळं परत आणला. दिक्षित आता श्रीचा परमनंन्ट पर्सनल असिस्टंट झाला होता. आता तर जीतच्या हातात त्याच्या संदर्भीतले कुठलेही निर्णय घेणं राहिलं नव्हतं. दिक्षितच्या सल्ल्याशिवाय श्रीचं पान हलायचं नाही. तो जी म्हणेल ती पूर्व दिशा असायची श्रीसाठी. तो दिक्षितनं दिलेल्या कुठल्याही सल्ल्याची स्वतःच्या बुध्दिमत्तेवर घासून शहानिशा करत नसे. पण भावेश दिक्षितची मात्र पाचों उंगलियॉं घीमध्ये होत्या. धाम बिल्डर्स वरुन जरी एक दिसत असली तरी भावेशनं मात्र आतून तिचे दोन भाग केले होते. एका भागात जीत आणि दुसर्‍या भागात भावेशला सच्चा सोबती मानणारा श्री अशी धामची वाटणी करुन टाकली होती त्यानं. संधी मिळेल तेव्हा तेव्हा जीत त्याला समजवायचा प्रयत्न करायचा की श्री माणसं पारखून घ्यावीत. पण श्री मात्र त्याला त्याच्या म्हणण्यासकट उडवून लावायचा. श्रीच्या कुठल्याही न पटणार्‍या निर्णयांना जीतनं विरोध केला की श्री मीच कसा बरोबर आहे आणि माझा सल्लागार कसा मला योघ्य सल्ला देतो हे पटवून देण्यासाठी ते काम एकट्यानंच करायचा. एकदोनदा जीतनं यावरुनही श्रीला सुनावलं होतं की अशानं तो स्वतः तर गोत्यात येईलच पण धामलाही गोत्यात आणेल. त्यावर तोंड वाकडं करत श्रीनं त्याला ऐकवायला कमी केलं नाही की या व्यवसायात तोही मुख्य भागीदार आहे आणि त्यालाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून.

हल्ली त्याला जयदेव घोरपडे नावाची मोठी आसामी भेटली होती. हा जयदेव घोरपडे कायम श्री म्हणेल त्या प्रोजेक्टवर पैसे लावायला एका पायावर तयार असायचा. सध्या धामचे एकाचवेळी तीन प्रोजेक्ट सुरु होते. आणि गंमत म्हणजे हे तिनंही प्रोजेक्ट मिळवताना त्यांची प्रतिस्पर्धी मोरवन बिल्डर्स कधी 1 रुपया, कधी 60 पैसे तर कधी चक्क 5 रुपयांनी मागे पडली होती. श्रीच्या मते या सगळ्याचं श्रेय भावेशच्या मेहनतीला आणि त्याच्या सल्ल्याला जातं. तर जीतला शंका असल्या तरी त्याला वाटत होतं की धामचे चांगले दिवस आले होते. पण यामागची खरी गोष्ट तर दिक्षितलाच माहीत होती. आणि ती खरी गोष्ट अशी होती की उदार कर्णाचा अवतार झालेल्या दादासहेबांच्या कृपेमुळेच ते प्रोजेक्ट धामच्या झोळीत पडले होते. आता दिक्षितनं ओळख करुन दिलेला जयदेव घोरपडे हाही दिक्षित आणि दादासाहेब यांनी मिळून श्रीसाठी टाकलेला डाव होता; ज्यात श्री अगदी स्वतःहून येऊन फसला होता.

धामला मिळालेला कन्याशाळेचा प्रोजेक्ट जवळपास 80 टक्के पूर्ण झाला होता. ग्रामपंचायतीच्या इमारतीचं काम 60 टक्क्यांवर आलं होतं. मैदानासाठीच्या रेस्टरुमचं कॉन्ट्रॅक्टही जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. हे झाल्यावर करण्यासाठी हातात दुसरं काहीतरी काम असावं म्हणून श्री धडपडत होता तर जीतला 8-10 दिवसांची सुट्टी घेऊन अमूसोबत फिरायला जायचं होतं. त्यासाठी थोडं थांबून आपण नव्या प्रोजेक्टला हात घालू या जीतच्या म्हणण्याकडे श्रीनं सपशेल दुर्लक्ष तर केलंच शिवाय त्याला म्हणालाही की हे सुट्टीचे दिवस नाहीत आपल्याला पुढची तरतूद करुन ठेवायला हवीय. तू जा अमूसोबत फिरायला. मला काय करायचंय ते मी करेन. यावर जीतनं काही न बोलणं शहाणपणाचं ठरवून मौन पाळलं.

श्री मात्र दिक्षितला सोबत घेऊन जयदेव घोरपडेला नव्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवायसाठी तयार करायच्या मागे लागला. या सगळ्यात जीत सतत साईटवर असल्यानं दिक्षितनं ऑफिसमध्ये सुरु केलेल्या राजकारणाची त्याला गंधवार्ताच नव्हती. श्रीच्या कानावर कुणकुण आली होती की हायवेच्या चौपदरीकरणाचं सरकार टेंडर काढतंय म्हणून. त्याला ते कसंही करुन मिळवायचंच होतं. आणि त्याच्या मते बाजी पलटवणारा विदूषक सध्या त्याच्याच हातात होता असा त्याचा कयास होता. त्याच्या समजूतीप्रमाणे त्यानं दिक्षितला हे टेंडर मिळवण्यासाठी कामाला लावलं होतं. दिक्षित फार हुशार; त्यानं मोरवनचा टेंडरचा रेट सांगितला 2.70 पैसे. दिक्षितवर डोळे झाकून विश्वास ठेवणार्‍या श्रीनं हे टेंडर भरताना आपला दर 2.10 पैसे लावला. त्याला खात्री होती गेल्या तीन्ही प्रोजेक्टप्रमाणे दिक्षितच्या हुशारीनं हेही प्रोजेक्ट धामलाच मिळणार. धामला म्हणजे श्रीलाच हे ओघानं आलंच कारण सध्या धाम दोन वेगवेगळ्या स्तरावर एकाचवेळी काम करत होती. एक सरकारी आणि दुसरा बिनसरकारी किंवा खाजगी. खाजगी भागात जीतनं आधीच उभ्या केलेल्या संस्कृती, अपरा, नीलकमल नावाच्या तीन सोसायट्यांची कामं सुरु होती. शिवाय सरकारीमधल्या तीन्ही प्रकल्पांच्या साईटवरही जीत सातत्यानं येऊन जाऊन असायचा. श्री मात्र कधीकधीच त्या साईटना भेट देई. त्याचा बाकीचा वेळ दिक्षितसोबत कुणाकुणाशी मिटिंग करण्यातच खर्च होई. मित्र असल्यानं जीतनं कधी त्याच्या ह्या वागण्यावर फारसा आक्षेप घेतला नाही. पण, दिक्षितच्या नादानं भरकटत चाललेल्या श्रीच्या मनात, मेंदूत जीत-प्रिशाबद्दल गैरसमज करुन देण्यात दिक्षितनं 90 टक्के बाजी मारली होती. आधीच श्री प्रिशाच्या बाबतीत टोकाचा पझेसिव्ह होता. त्याला तिनं जीतशी केलेली सलगी पटायची नाही. पण त्याला आपल्या भावना तिथल्या तिथं व्यक्त करायला कधीच जमल्या नाहीत. प्रिशा जीतला त्यामुळे त्याच्या ह्या पझेसिव्हपणाचा पत्ता लागला नाही. त्यांच्यासाठी त्यांची मैत्री ही फक्त मैत्री होती तर दिक्षितसाठी ते कमाईचं साधन. श्रीनं त्याला परत आणल्यानंतर तर त्यानं या मैत्रीच्या नात्याचं भांडवल करत श्रीच्या कानात आधीपेक्षा जास्त विषारी गरळ ओतायला सुरुवात केली. दिक्षित दादासाहेबांकडून पैसे उकळतच होता शिवाय श्रीचा पीए असण्याचा भरभक्कम पगारही लाटत होता. दिक्षित परत आला आणि काहीच दिवसांनी एक पाकीट कुरीअरवाल्यानं श्रीच्या नावे आणून त्याच्या हातात दिलं. हुशार भावेशनं ती पाकिटं हेतुपुरस्सर श्रीच्या दृक्ष्टीपासून दूर ठेवली. एवढंच नाही तर त्यानंतर येणारी अशी बरीच पाकिटंही त्यानं श्रीला मिळू दिली नाहीत. तसं त्या पाकिटातून फार काही यायचं नाही. यायचे ते फक्त दिक्षितचा माणूस कदमनं पाठवलेले फोटो तेही फक्त जीत-प्रिशाचेच. या फोटोंसोबत ना कधी दोन ओळी लिहून आल्या ना कधी पाठवणार्‍याचा पत्ता त्याच्यावर असायचा. कारण, कुरीयरही खोटं आणि कुरीअरवालाही खोटा. ती पाकिट कुरीअरवाल्याच्या नावाखाली आणून द्यायचा दादासाहेबांचा माणूस. काही दिवसांनी योग्य वेळ बघून भावेशनं त्या पाकिटांचं रहस्य श्रीसमोर उघड केलं.

पण म्हणतात ना! विनाशकाले विपरीत बुध्दीः। श्रीचं तसंच काहीसं झअलं होतं. दिक्षितनं त्याच्या विश्वासू असण्याची पट्टी त्याच्या डोळ्यांवर अशी काही बांधली होती की श्री त्यालाच आपला उत्तम सल्लागार मानून विनाशाच्या वाटेवर चालत होता हे त्याच्या गावीही नव्हतं. त्यामुळेच त्याला त्या पाकीटातले फोटो पाहून हे फोटो कोण पाठवतं? का पाठवतं? त्यावर पाठवणार्‍याचं नाव-गाव-पत्ता का असत नाही? हे सगळे फोटो फक्त प्रिशा आणि जीतचेच का आहेत? भावेशनं ते इतके दिवस आपल्यापासून का लपवून ठेवले? आताच या फोटोंविषयी का सांगितलं? यामागे भावेशचा कुठला स्वार्थ तर नाही ना? असे कुठले म्हणजे कुठलेच प्रश्न पडले नाहीत. जीतनं दिलेला सल्ला त्यानं गांभीर्यानं घेतला असता तर मात्र त्यानं हे असं पाऊल नक्कीच उचलंल असतं. शेवटी माणूस ठरवतो एक आणि नियतीच्या मनात असतं दुसरंच. म्हणूनच नियती तिच्याच धुंदीत फासे फेकत होती. न जाणो तिला नक्की कुणाला काय शिकवायचं होतं?

अखेर तो दिवस उजाडला ज्यादिवशी नियतीनं फासे टाकताना गडगडाटी हसत पौ बारा म्हटलं.

… 17/07/2020 

........ 

*26*

श्रीनं स्वतःच्या हातानं स्वतःच्या नात्यांना सुरुंग लावला होता. ही तीच वेळ होती ज्या वेळेची मोरवन बिल्डर्सचे दादासाहेब आणि भैय्यासाहेब वाट बघत होते. हायवेच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पासंदर्भात श्री जीतशी बोलला होता. हा सल्ला त्याला दिक्षितनंच दिला होता. यात दिक्षितचा हेतू जरी श्रीला एकटं पाडायचा असला तरी त्यानं श्रीला समजवून दिलं होतं की जीतशी तो या विषयावर बोलेल तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट होतील.

‘’ तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट सांग. उगाच कोड्यात नको बोलूस भावेश! ‘’

‘’ कसंय ना! की तुम्हांला तो किस्सा माहीत नाहीए ना, म्हणून माझं बोलणं तुम्हांला कोडं वाटतंय. ‘’

‘’ कसला किस्सा? ‘’

‘’ तोच ओ! एक प्रवासी म्हणतो मी मेल्यावर माझ्या शरीराला तुम्ही जाळाल किंवा पुराल. पुरलं तर माझं शरीर सडून जाईल पण जाळलं तर त्याची राख होईल आणि राख झाली तर दोन गोष्टी होतील. तुम्ही ती पाण्यात टाकाल किंवा शेतात टाकाल. पाण्यात टाकाल तर वाहून जाईल. पण शेतात टाकाल तर दोन गोष्टी होतील. ‘’

‘’ बास! बास! बास! तुझ्या दोन गोष्टींच चर्‍हाट बास झालं. सरळ मुद्द्यावर ये. ‘’

‘’ ते मी येतंच होतो मी. पण आता तुम्ही म्हणताय तर सांगतो विस्कटून. बघा, तुम्ही या प्रकल्पाबद्दल जीत साहेबांशी बोलाल तेव्हा दोन गोष्टी होतील. एकतर ते तुमची साथ देतील किंवा हा प्रकल्पच नको म्हणतील. ‘’

‘’ तो अंदाज मला आहे की. त्यात तू वेगळं काय सांगितलंस? ‘’

‘’ तुम्हांला ना सगळ्या गोष्टींची घाईच फार असते. जे मला दिसतं ते तुम्हांला दिसत नाही. तुमची जी प्रगती चाललीय ती काही जीत साहेबांना बरी वाटत नाही बघा! त्यामुळं मला खात्री आहे की ते तुम्हांला यासाठी नाहीच म्हणणार. कारण हा प्रकल्प तुम्हांला मिळाला तर एकापरीनं सिध्द होईल की तुम्ही त्यांच्यापेक्षा धंद्यात हुशार आहात. आणि हीच गोष्ट खटकते त्यांना. तुम्ही मोठे झालेलं बघवत नाही त्यांना. पण त्यांनी नाही म्हटलं तर तुम्ही काळजी करु नका. हे प्रोजेक्ट तुम्ही एकट्यानं नक्की करु शकता. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ते नाही म्हणाले की तुम्हांला आयती संधी मिळेल या भागीदारीतून मोकळं होण्याची. म्हणजे तुम्हांला सतत जीत साहेबांना विचारायलाही लागणार कुठला प्रोजेक्ट घेऊ कुठला नको ते! कळलं का? ‘’

कानाडोळ्यातलं अंतर विसरलेल्या श्रीला दिक्षितचं हे म्हणणं तंतोतंत पटलं. पण, जीतचा मुद्दाच वेगळा होता. त्याचं म्हणणं होतं की आपण क्वान्टीटीपेक्षा क्वालीटीला महत्व दिलं पाहिजे. आधीच आपल्याकडे इतके सारे प्रोजेक्ट चालू आहेत त्यात आणखी एकाची भर कशाला घालायची? एकतर त्यात गुंतवण्यासाठी लागणारी रक्कम आधीच सगळीकडे गुंतवलेली आहे. आता जर हा प्रोजेक्ट करायचा तर भरभक्कम कर्जाची तरतूद करावी लागेल. ती करायची नसेल तर कंपनीच्या गंगाजळीला हात घालावा लागेल. आणि त्या पर्यायी व्यवस्थेला हात लावला तर सगळा व्यवसायच धोक्यात येईल. त्यातही नुसतेच प्रोजेक्ट घेत राहिलो तर आपली घसरलेली गुणवत्ता लोकांच्या मनात असणारी आपली पतही घसरवेल. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे इतक्या सगळ्या प्रोजेक्टच्या कामासाठी स्टाफ वाढवायला लागेल आणि जागाही वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी जीतनं श्रीला सांगितली तेव्हा त्यानं असा ग्रह करुन घेतला की जीतला त्याच्या ह्या प्रकल्पात ना पैसे गुंतवायचेत ना त्याला त्यात काही रस आहे.

दिक्षितला मात्र जीतच्या ह्या निर्णयामुळे आयतं कोलीत मिळालं हातात. मग त्यानं त्याचा वापर करुन वणवा पेटवलाच.

इतक्या वर्षांत जे घडलं नव्हतं ते आता घडलं. जीतच्या नकारानं चिडलेल्या श्रीनं बँकेतून कर्ज काढलं. अर्थातच हे सगळं करण्यात त्याचा मदतनीस म्हणून दिक्षितनं मोलाची कामगिरी बजावली. आतापर्यंत धामला बँकेतून कर्ज घेण्याची गरज पडली नव्हती. जीत-अमू-श्री-प्रिशा या सगळ्यांच्या आईवडीलांनी कमवून ठेवलेल्या इस्टेटीतून धाम उभी राहिली होती. पण, महाधूर्त दिक्षितनं दादासाहेबांना त्यांचं हेही साध्य आपल्या शकुनीच्या मेंदूतून साधून दिलं.

हायवेच्या प्रकल्पासाठी श्रीनं जीतला न सांगता स्वतःच्या नावावर कर्ज काढलं. दादासाहेबांनीच मॅनेजरला फोन करुन ते कर्ज मान्य करण्यासाठी गळ घातली. दादासाहेबांचं शब्द हा शेवटचा शब्द असायचा. त्यामुळे फार वाट पहायला न लागता श्रीचं तब्बल 5 कोटीचं कर्ज मंजूर झालं. जसं त्याचं कर्ज मंजूर झालं त्यासरशी दादासाहेबांनी त्यांचं प्यादं एक पाऊल मागे घेतलं. लागलीच त्यांनी आपलं टेंडर मागे घेतलं. पण ही गोष्ट दिक्षितनं श्रीच्या कानांवर जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. त्या मागे घेतलेल्या टेंडरमध्ये बदल करुन ते त्यांनी पुन्हा एकदा सबमीट केलं. या एकाच चालीत दादासाहेबांची चीत भी मेरी पट भी मेरी असा दुहेरी डाव लावला. टेंडरमध्ये दादासाहेबांनी लावलेला जुना 2.70 पैशांचा दर बदलून तो 1.80 पैशांवर आणला. त्यामुळे श्रीनं घातलेली सगळी समीकरणं नुसतीच चुकली नव्हती तर त्याच्या समीकरणाच्या अथपासून इतिपर्यंतच्या सगळ्या पायर्‍यादेखील चुकल्या होत्या. श्रीनं आपल्या टेंडरमध्ये मोरवनच्या आधीचा दरचा अंदाज घेऊन 2.30 पैशांची रक्कम दर म्हणून लावली होती. आपल्यालाच हे टेंडर मिळणार या अंदाजाने श्रीने सगळी तयारी आधीच करुन ठेवली. त्यानं आधीच सिमेंट, वाळू, कामगार, पाणी टँकर अशा गोष्टींसाठी देऊन टाकले होते. पण ज्यादिवशी टेंडर फुटलं त्यादिवशी मात्र आकाशात भरार्‍या मारण्याची स्वप्न पाहणारा श्री दणकन् जमीनीवर आपटला. आणि असा आपटला की त्याला पुन्हा उठण्यासाठी आधारही मिळेना.

टेंडर फुटायच्या आठ दिवस आधी पुन्हा सुट्टीचं निमत्त सांगून दिक्षित गायब झाला. टेंडर फुटलं आणि श्रीला कळलं की ते टेंडर मोरवन बिल्डर्सला मिळालंय म्हणून. ही बातमी कळताच त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याला कर्जासाठी खेटे घालणारे बँकेचे अधिकारी डोळ्यांसमोर दिसू लागले. खात्यात नसलेली पुरेशी रक्कम डोळ्यापुढे नाचायला लागली. त्यात भरीस भर म्हणून दादासाहेबांच्या माणसांनी जाणीवपूर्वक बाजारात ही बातमी पसरवली की धाम बिल्डर्स तोट्यात गेली. धाम बिल्डर्समध्ये फूट पडली. धामचे भागीदार वेगळे झाले. ही बातमी आगीसारखी बाजरभर पसरली आणि तिची झळ जीतपर्यंत येऊन पोचली. त्याला या बातमीनं धक्का तर बसलाच पण त्याहून जास्त वाईट वाटलं ते श्रीच्या वागण्याचं. त्यानं ही गोष्ट आधी आपल्याला का सांगितली नाही हे विचारायला तो श्रीच्या केबीनमध्ये गेला. असं नव्हतं की ही बातमी घरच्यांना कळणार नव्हती. पण त्याला व्यवसायाच्या संदर्भातली कोणतीही चर्चा घरातल्यांसमोर करयची नव्हती.

तो केबीनमध्ये गेला तेव्हा श्री विमनस्कपणे बसला होता.

‘’ तुला हे सगळं करण्याआधी माझ्याशी एका शब्दानेही बोलावंसं वाटलं नाही? ‘’

‘’ आलो होतो तुझ्याकडं भिकार्‍यासारखी भिक मागायला. दिलीस का तू मला? उलट गंगाजळीच्या पैशाला हात लावायचा नाही म्हणालास. ‘’

‘’ हो. म्हणालो मी तसं आणि आताही मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. नाही हात लावू देणार मी तुला त्या गंगाजळीला. ‘’

‘’ ते पैसे तुझ्या एकट्याचे नाहीत. माझेही आहेत. माझाही वाटा आहे त्यात. ‘’

‘’ वाट्याच्या गोष्टी कुणाला सांगतोस तू श्री? तू धाममधून लक्ष कमी केलंस त्याला दोन वर्षं होत आलीत. तुला माहीत तरी आहे का कुठले प्रोजेक्ट पूर्ण झालेत? कुठले अपूर्ण आहेत? कुठले कागदावर आहेत आणि कुठल्या प्रोजेक्टसाठी मी सरकारी ऑफिसच्या पायर्‍या झिजवतोय ते? ‘’

‘’ म्हणजे तुला काय म्हणायचंय? जे करतोयस ते सगळं तू एकट्याने करतोयस का? धामला उभी करण्यात माझा काहीच वाटा नाहीए? ‘’

‘’ आहे ना! नाही कसं? तुझा तर सिंहाचा वाटा आहे. पण फक्त मिटिंग करुन काही व्यवसाय उभे राहत नाहीत. त्यासाठी बाकी बर्‍याच गोष्टीही कराव्या लागतात. फक्त टेंडर भरलं, मिळालं म्हणजे झालं का? संपली का धामबद्दलची तुझी असलेली जबाबदारी? ‘’

‘’ बाकीची कामं तू बघतोस या भरोशावर मी ते सगळं करत होतो. पण मला नव्हतं माहीत की तू माझ्या त्या मेहनतीवर अशी शंका घेशील म्हणून. मला वाटलं होतं घरं सोबत राहतायत तर मैत्रीतच भागीदारी करुयात म्हणून. पण माझ्या मित्रानं माझ्याशी दगा करावा हे माझं दुर्दैवच आहे ना! ‘’

‘’ दगा? मी केला तुझ्याशी की तू केलास माझ्याशी? ‘’

‘’ श्री तोंडाला येईल ते बरळू नकोस. मी कसली दगाबाजी केली तुझ्याशी? ‘’

‘’ वाह! छान, फार सुंदर! सौ चुहे खांके बिल्ली चली हज को यालाच म्हणतात. तुला हे विचारताना लाज नाही वाटली का? जाऊ दे म्हणा. मीच विचारुन चूक केली. शेमलेस आर ऑलवेज हॅपी. ‘’

‘’ श्रीऽऽऽ! हे असं काहीतरी माझ्याबद्दल बोलण्याची हिंमत कशी झाली? आधी सिध्द कर की मी तुझ्याशी दगाफटका केलाय आणि त्याचे तुझ्याकडे पुरावे आहेत म्हणून. ‘’

‘’ पुरावे? माझ्याकडे मागतोयस तू? पुरावे हवेत तुला? थांब दाखवतो. ‘’ असं म्हणत त्यानं कॉलरला धरलेला जीतचा हात झटकला आणि टेबलाचा ड्रॉवर उघडला. त्यातून फोटो बाहेर काढून ते जीतच्या तोंडावर फेकले. हे फोटो सकाळीच त्याच्या हाताला लागतील अशा पध्दतीनं दिक्षितनं तिथे प्लान्ट केले होते; जरी तो तिथं नव्हता तरी.

त्या फोटोंमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या अवस्थेत फक्त जीत आणि प्रिशा दिसत होते. पहिल्यांदाच ते फोटो पाहणार्‍याला वाटलं असतं की जीत आणि प्रिशाचं लफडंच आहे. ते फोटो पाहून तर जीत उसळलाच.

‘’ श्शीऽऽऽ! तू इतक्या खालच्या थराला जाशील श्री असं वाटलं नाही मला. संशय घेतोस? तोही आमच्यावर? इतकी वर्षं आम्हांला ओळखतोस आणि तरीही आमच्यावर पाळत ठेऊन हे असे फोटो काढतोस? अतिशय हीन दर्जाचं वागलायस तू श्री. तुला काही बोलण्यात अर्थच उरलाच नाहीए. या सगळ्यानंतर मी तुझ्यासोबत कामच करु शकणार नाही. काय हवंय तुला? तुझा हिस्सा ना! तो तुला व्यवस्थित मिळेल याची काळजी घेइन मी. उद्याच बाबांना सांगून मी ही भागीदारी संपल्याचं जाहीर करतो. पण तुझी माझी मैत्री मात्र आज आणि आत्तापासून संपलीय. ‘’

एवढं बोलून जीत ते फोटो गोळा करुन तरातरा त्याच्या केबीनमधून निघून गेला.

…18/07/2020

..........

*27*

ऑफिसमध्ये प्रचंड वेगानं घडामोडी घडत होत्या. दादासाहेबांनी पाठवलेल्या दिक्षित नावाच्या कलीनं दोन मित्रांच्या मैत्रीत व्यवस्थित फूट पाडली होती. दादासाहेब आणि भैय्यासाहेबांनी कॉलेजपासून मनात धरुन ठेवलेल्या बदल्याचा अशाप्रकारे वचपा काढला होता. घरी अजूनही यातलं फारसं काही कळलं नव्हतं. तसं घरातलं वातावरण पेपरातल्या बातमीनं गंभीर असलं तरी या गांभीर्याला थोडीशी आनंदाची कडाही होती. त्याचं कारणंही तसंच होतं. अमूकडे आनंदाची बातमी होती. ही बातमी कळल्यानंतर सगळ्यांना पेपरातल्या बातमीचा नाही म्हणायला विसरच पडला होता. मालिनी काकूंना तर काय करु आणि काय नको असं झालं होतं. प्रिशा एकाचवेळी मावशी आणि काकी अशा दोन नव्या नात्यात अडकणार होती आता. जीत अतिशय उद्विग्न अवस्थेत त्याच्या केबीनमध्ये बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणापासूनचे सगळे प्रसंग सरकत होते. एका बाजूला त्याला वाटत होतं की आपण हे जे वागलो श्रीशी ते काही बरोबर नाही. आपला लहानपणापासूनचा जिगरी दोस्त आहे तो. आणि चुकत कोण नाही? चुका तर सगळेच करतात ना! आपण एक संधी त्याला द्यायला नको होती का? तोही तर चुकलाच आहे ना! त्या दिक्षितच्या नादाला लागून भरकटलाय तो! प्रिशा आणि माझ्या इतक्या स्वच्छ नात्यावर कसा काय संशय घ्यायला लागला हा? हे असे फोटो का बरं आणि कुणी काढले असतील आमचे? खरंच श्रीनं हे असे फोटो काढायला आमच्यामागे माणूस लावला असेल का? म्हणूनच त्याला मी॑ नाही करु शखत मी. त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यातून आवाज आला. त्याला कसली संधी द्यायची आपण? हे सांगायची की कसे त्यानं आपल्यामागे माणसं लावली? का हे असले फोटो काढले याचं स्पष्टीकरण द्यायची संधी द्यायची का त्याला? चल, तू म्हणतोस तर देऊ आपण त्याला एक संधी पण प्रिशा? तिचं काय? तिच्या नजरेला नजर मिळवू शकतोस का? ती विचारेल तेव्हा काय सांगू आपण की श्री असा का वागला म्हणून? तिचा श्रीपेक्षाही जास्त विश्वास आपल्या मैत्रीवर आहे. तिच्या-माझ्या, माझ्या-श्रीच्या मैत्रीवरच तिचा खूप जास्त विश्वास आहे ना! या मैत्रीवरचा तिचा विश्वास उडेल ना अशानं? आणि जेव्हा ती हे असले फोटो बघेल तेव्हा? तेव्हा तिला काय सांगणार आहोत आपण? अशा प्रश्नांसोबतच त्याच्या डोळ्यांसमोर श्रीनं त्याच्या तोंडावर फेकलेले ते फोटो नाचत होते. त्याची मनःस्थिती द्विधा झाली होती. त्याची दोन्ही नाती त्याच्यापासून दुरावत चालली होती आणि तो काहीच करु शकत नव्हता. ही दोन्ही नाती त्याला तितकीच जिवाभावाची होती. त्याला आपण श्रीशी बांडलो यापेक्षा जास्त प्रिशाला काय उत्तर द्यायचं याची चिंता जास्त वाटत होती. कारण, प्रिशा विचारेल त्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची त्याची मानसिक तयारी नव्हती. मनोमन त्यानं ठरवून टाकलं होतं की आता प्रिशाला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, अमूकडे किंवा घरातल्या कुणाकडेच तिचा विषय काढायचा नाही. त्याला घरी काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती.

अमूची बातमी कळताच दवाखान्यातून आलेल्या प्रिशा आणि अमूच्या पायावर पाणी घातलं. अमूला घेऊन त्या देवघरात नेलं. तिला हळदीकुंकू लावलं. गजरा करायसाठी आणलेल्या फुलांची परडीतून ओंजळ उचलून ती तिच्यावर उधळली. येताना प्रिशानं आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधून पेढा काढून तो तिला भरवला. अमू नमस्कार करायला वाकली तशी तिला अर्ध्यातूनच उठवत काकू म्हणाल्या, ‘’ अमू, आता नमस्कारासाठी वाकायचं नाय बरं का! आगं, झाड फळांनी लगाडलं काय त्येचं लाड करायचं असत्यात बग. ते फळाच्या बारानं तसंपण वाकतंयच की कमरंत. जमंल तितकीच आन झेपलं तेवढीच कामं करायची. देवाधर्माचं कानार पडलं पायजे. चांगली पुस्तकं वाचायची असत्यात. येनार्‍या बाळावर चांगलं सौस्कार झालं पायजेत. टळटळीत दुपारच्याला न् कडकडीत तिनीसांजंला उंबर्‍याभाईर पाऊल टाकायचं न्हाय. सगळं नीट ध्येनात ठिवायचं. कायपण खावं प्येवं वाटलं तर अनमान न करता सांगायचं. न्हाईतर पोराची लाळ गळतीया. कळतंय का? ‘’

अमूपेक्षा प्रिशाच काकूंचे हे सगळे शब्द जिवाचा कान करुन ऐकत होती. उद्या मलापण दिवस गेले की काकूआई मलापण असंच सगळं सांगेल असे तिचे मनाचे खेळ चालले होते. मात्र तिकडं श्रीची अवस्था गंभीर होऊन बसली होती. तो ऑफिसातून उठला ते सरळ बारमध्ये जाऊन बसला. दिक्षितनं भेटवलेल्या खोट्या ग्राहकांनी त्याला थोडी थोडी करत दारुची चांगलीच सवय लावली होती. आणि आता श्री आपल्या न सुटणार्‍या प्रश्नांची उत्तरं त्या सत्याला बगल देणार्‍या दारुच्या ग्लासात शोधत होता. त्या दारुच्या प्रत्येक घोटासोबत त्याच्या डोक्यात दिक्षितचा आवाज घुमत होता.

‘ साहेब, तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवताय खरं! पण, तुमच्या नजरेआड काय चाललंय याची काहीच कल्पना नाही तुम्हांला. मी सांगतो तुम्हांला एका बाईची आणि एका पुरुषाची मैत्री होऊच शकत नाही ओ! असं कुठं असतंय का? माझी खात्री आहे बघा; तुमच्या नकळत जीत साहेबांचे न् तुमच्या बायकोचं लफडं असणारे. ‘

त्याला परत परत आठवत होतं की त्यानं जेव्हा दिक्षितचं हे म्हणणं नाकारलं तेव्हा तो किती ठासून म्हणाला होता की तो हे पुराव्यानिशी सिध्द करेल म्हणून. त्यानंतर कितीवेळा त्यानं आपल्याला सांगितलं की जीत प्रिशा कुठं कुठं गेले, भेटले वगैरे पण आपण नाहीच ऐकलं त्याचं. आणि मग दिक्षितच्या नजरेनं बघायला सुरुवात केल्यावर त्याला कळलं की प्रिशा त्याच्यापेक्षा जास्त जीतची काळजी घेत होती. ती त्याच्यापेक्षा जास्त जीतशी बोलण्यातून मोकळी होत होती. आणि आता तर त्यानं हेही अनुभवलं होतं की रात्री-अपरात्री जीत स्वतःच्या बायकोला सोडून त्याच्या बायकोचा हात हातात धरुन अदिक आश्वस्त होतो. त्याला एकटं झोपायला लागण्याच्या दुःखापेक्षा प्रिशा जीतकडे थांबल्याचं दुःख जास्त डाचत होतं.

आज तर दिक्षितनं या सगळ्याचा कहरच केला होता. चक्क प्रिशा-जीतचे हे असले फोटो आणले होते त्यानं.

त्याला कंत्राट हातातून गेल्याचं वाईट नाही वाटलं. त्याला उद्या बँक आपल्या दारात उभी राहिल याची चिंता वाटली नाही. त्याला कुरतडत होती ती एकच गोष्ट; त्याच्या बायकोचे त्याच्याच जिवलग मित्राशी असे संबंध असावेत? या दुःखाला नाहीसं करण्यासाठी तो हृदयात उठणारी प्रत्येक कळ दारुचे ग्लासावर ग्लास रिचवून दाबून टाकायला बघत होता. हा घशात ओतला जाणारा दारुचा प्रत्येक घोट त्याच्या हृदयाल्या ज्वाळांना आणखी भडकवत होता.

… 27/07/2020

..........

*28*

जीत संध्याकाळी एकटाच घरी परत आला. श्री आला नाही म्हणून चौकशी करायला प्रिशा आली तर तिला सांग की मी झोपलोय डोकं दुखतंय म्हणून असं त्यानं अमूला सांगून ठेवलं. जीतच्या चिंतेनं काळवंडलेल्या चेहर्‍याकडं पाहून अमूनंपण त्याच्या म्हणण्याला होकार दिला. जीतला येऊन खूप वेळ झाला तरी श्री काही आला नाही म्हणून चौकशी करायला प्रिशा आलीच. ती सवयीनं जीतच्या खोलीकडं निघाली तशी स्वयंपाकघरात काम करणारी अमूनं तिला हाक मारली.

‘’ प्रिशे, निंबाळकराची चौकशी करायला आलीस ना! ये हिकडंच. जीतचं डोकं दुखतंय म्हणून तो झोपलाय. त्याला झोपू दे. उगाच उठवू नकोस. ‘’

अमूचं ते बोलणं ऐकलं आणि स्वयंपाकघरात न जाता प्रिशा आली तशी घराकडे परत गेली. परत जाणार्‍या तिला बघून अमूला खूप वाईट वाटलं की तिचयाशी आपण असे वागलो. पण, तिला तरी बिचारीला कुठं माहीत होतं की ऑफिसात काय महानाट्य घडलं ते!

जीत आला तेव्हा ती त्याच्या आवडीच्या मटणाच्या सूपची तयारी करत होती. आता त्याला चांगलीच उकळी फुटली होती आणि घरभर त्या सुपचा दरवळ सुटला होता. ते ढवळताना तिला आठवलं की त्या सूपसाठी श्री कसा धावत घरात शिरायचा ते! आणि दोघे मित्र कसे मला जास्त-तुला कमी, तुला जास्त-मला कमी यावरुन लहान मुलासारखे अडून बसायचे. आणि एखादवेळेस श्री नसला तर प्रिशा खिडकीतनंच ओरडून सांगायची त्याला राखून ठेव म्हणून. पण गेले कित्येक महीने तिनं जीत-श्रीला एकत्र बसून जेवलेलं पाहिलं नव्हतं की साधा चहा दोघांनी एकत्र घेतला नव्हता. पण ही तर खूप लांबची गोष्ट होती; तिनं तर त्यांना गप्पा मारतानाही नव्हतं पाहिलं कित्तीतरी दिवसांत. बरं, घरच्या गोष्टी घरात आणि ऑफिसच्या गोष्टी ऑफिसात हा जीतनं स्वतःचं केलेला नियम. त्यामुळे त्या दोघींचं जग घर आणि घराच्या अवतीभवती गुंतलेलं तर हे दोघेजण ऑफिसात अडकलेले. तशा त्या दोघी अधूनमधून यायच्या ऑफिसला. मग तिथं बसून नवे प्रोजेक्ट आणि त्याच्या इंटेरिअर संदर्भात चर्चा व्हायच्या. पण आता तर त्या गोष्टीलाही खूप मोठा काळ उलटून गेला होता.

बोटाला चटका बसला तशी विचारत हरवलेली अमू भानावर आली. गॅस बंद करुन तिनं ते सूप वाडग्यात काढलं. तो वाडगा ट्रेमध्ये ठेवला, शेजारी चमचा ठेवला आणि ती ते घेऊन जीतच्या खोलीत आली. दार लोटून ती आत आली तर सगली खोली अंधारात बुडून गेलेली.

‘’ का रे असा अंधारात का बसलायस? ‘’ असं म्हणून तिनं बटण दाबून लाईट लावली. जीत त्याच्या आरामखुर्चीत बसल्या बसल्या विचारांच्या गर्तेत हरवून डुलत होता. बेडवर त्याच्या खुर्चीशेजारी बसत तिनं त्याच्या कपाळावर हात ठेवला.

‘’ बरं वाटत नाहीए का तुला? ‘’

तिनं कपाळावर ठेवलेला हात त्यानं हातात घेतला आणि त्याच्यावर डोकं ठेऊन तो ढसाढसा रडायला लागला.

अमू आधी तर सुन्नच झाली. मग पटकन् म्हणाली, ‘’ जीत! जीत काय झालंय? काही सांगशील का मला? का रडतोयस तू असा? ‘’

कसंबसं आपल्या भावनांना आवर घालत तो तिला म्हणाला, ‘’ अमू, मी आज फार वाईट वागलो गं! तुझी शपथ खरं सांगतो मला असं काही करायचं नव्हतं. मी, मी तर फक्त त्याला विचारायला गेलो होतो की तो असा का वागला म्हणून आणि मग त्या बोलण्याला वेगळंच वळण लागलं गं! मला त्याचं वागणंच नाही पटलं. मी आज माझ्या जिवाभावाच्या मित्राशी हमरीतुमरीवर येऊन भांडलो. मला कधीच असं वाटलं नव्हतं की तो माझ्याबद्दल; आमच्याबद्दल असा विचार करत असेल. हे हे असलं काही माझ्या मेंदूत कधी आलंच नाही गं! तो असा कसा विचार करु शकतो? त्याला आमच्याबद्दल असं काहीतरी वाटूच कसं शकतं? ‘’

जीत त्याच्या मनातलं भडाभडा बोलत होता मात्र अमूला त्याची कोड्यातली भाषा काही कळत नव्हती.

‘’ जीत, मला काहीतरी समजेल असं सांगतोस का? तू आता जे काही बोललास मला त्यातल्या कशाचा काहीही संदर्भ लागला नाही. ‘’

तिच्या ह्या बोलण्यावर जीतनं तिला आधी श्रीचं ऑफिसमधलं बदललेलं सगळं वागणं सांगितलं. त्याची आणि दिक्षितची वाढलेली घसट, दिक्षितच्या सांगण्यावरुन त्यानं घेतलेले निर्णय, मिळालेली कॉन्ट्रॅक्ट, मग त्याचा बदलेला स्वभाव आणि सरतेशेवटी आजचं कॉन्ट्रॅक्ट कसं गेलं हातनं नी श्रीनं काढलेलं कर्ज याविषयी सगळं काही सांगितलं.

ते एकल्यावर अमू म्हणाली, ‘’ जीत तू काहीच चुकीचा वागलेला नाहीस. तू जे बरोबर होतं तेच केलंस. ‘’

तसा खालमानेनं जीत म्हणाला, ‘’ हे एवढंच असतं तर मी कधीच या टोकाला गेलो नसतो. आकाशपाताळ एक केलं असतं, जंग जंग पछाडलं असतं पण काहीही करुन मी श्रीच्या मनामेंदूत चाललेला सगळा गोंधळ संपवून टाकला असता. कितीही झालं तरी तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. मित्र कमी आणि धाकट्या भावासारखं नातं आहे त्याचं माझं. आईनं त्याला स्वतःच्या मुलासारखाच सांभाळलाय. ‘’

‘’ तुझं सगळं म्हणणं अगदी खरंय जीत! पण मग तुला हे सगळं करण्यापासून अडवलं कुणी होतं? का नाही जे मनाला वाटलं ते केलंस तू? ‘’

‘’ मला अडवलं जीतनं! प्रिशाचा मित्र असणार्‍या जीतनं! आपल्या जिवलग मैत्रीणीला कसलाही त्रास होऊ नये असं वाटणार्‍या जीतनं! ‘’

‘’ एक एक मिनिट! आता इथं मध्येच हा प्रिशाचा मित्र जीत कुठून आला? हा तुमच्या दोघांतला व्यवहार आहे ना? जे घडलं ते आपण प्रिशाला समजवू शकतोच की! ‘’

‘’ नाही समजवू शकत तिला. ना तू ना मी. कारण व्यवहार आमच्या दोघांतलाच आहे; मात्र नातं आपलं आहे. आपल्या चौघांचं. तू किंवा मी तिला हे नाही सांगू शकत की तिचा नवरा; ज्याच्यावर ती जिवापाड प्रेम करतेय तो तिच्यावर संशय घेतोय. आणि हे मी तिला कुठल्या तोंडानं सांगू की तो ज्यावरुन तिच्या चारित्र्यावर संशय घेतोय तो दुसरा तिसरा कुणी नाही तर तुझा नवरा जीतच आहे. सांग तू हे तुझ्या तोंडानं तुझ्या मैत्रीणीला सांगू शकतेस का? ‘’

हे ऐकून अमूला धक्काच बसला.

‘’ श्री प्रिशावर संशय घेतोय? का? कधीपासूण? आणि तोही तुझ्यावरुन? तुमच्या नात्यात त्याला असं काय वेगळं दिसलं जे इतक्या वर्षांत मला दिसलं नाही? ‘’

तिच्या या प्रश्नांवर मौन बाळगत जीतनं त्याच्या ऑफिसबॅगेतून काही फोटो काढले आणि ते अमूसमोर धरले. तिनं पटकन् ते खेचून घेतले आणि पटापट सगळे बघितले.

‘’ हे? हे सगळं काय आहे जीत? तू आणि प्रिशा ह्या अशा अवस्थेत? कसे? कधी? पोचलात ह्या वळणावर? का गेलात? काय कमी होती आपल्या नात्यात? हे सगळं जर श्रीला दिसलं तर मला का नाही दिसलं हे? कुणी काढले तुमचे हे असे फोटो? का काढले? नक्की श्रीनंच हे सगळं करायला सांगितलं का? ‘’

‘’ अमूऽऽऽ! तूही माझ्यावर संशय घेतेस? तुला काय वाटतंय मी हे असं काहीतरी करु शकतो? जी गोष्ट इतक्या वर्षांत घडली नाही ती आता घडली असं वाटतंय का तुला? इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही तुझा माझ्यावरचा विश्वास असा डळमळू शकतो अमू? ‘’

हतबुध्दपणे हातातल्या फोटोंकडे बघणार्‍या अमूच्या समोर तो बसला. तिच्या मांडीवर डोकं ठेउन म्हणाला, ‘’ अमू, आपल्या होणार्‍या बाळाची शपथ घेउन सांगतो, आईनंतर माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्यात जवळच्या स्त्रिया म्हणजे तुम्ही दोघीजणी आहात. एक तू जी माझा जीव आहे आणि दुसरी प्रिशा जिच्यात माझा जीव अडकला आहे. तू म्हणशील त्याला साक्षी ठेऊन सांगतो मी की तुमच्या दोघींसोबतचं माझं नातं कालही निर्मळ होतं आणि आजही पवित्रच आहे. ‘’

त्याच्या डोक्यावर प्रेमानं थोपटत अमू म्हणाली, ‘’ मला माफ कर जीत. एका क्षणासाठी माझाही त्या फोटोंवर विश्वास बसला होता. पण दुसर्‍याच क्षणी माझ्या लक्षात आलं की हे फोटो नाही तर माझ्या भिंगाची काचंच धूसरलीय. मी ती साफ केलीय जीत. माझा तुम्हां दोघांवर कालइतकाच आजही विश्वास आहे. आतापुरता हा विषय बाजूला ठेउया. बघू काळ आपल्यावर आणखी कुठली वेळ आणतोय ते! ‘’

… 06/08/2020

..........

*29*

त्या दिवसापासून जीतनं प्रिशाला भेटणं, तिच्याशी बोलणं या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक बंद केल्या. अमूला त्याच्या मनातली चलबिचल कळत होती पण तिचेही हात बांधल्यासारखे झाले होते. जीतप्रिशाएवढी नसली तरी त्यांचीही मैत्री होतीच की. मात्र श्री कधीच मनातल्या गोष्टी बोलत नसल्यामुळे तिचा कधी त्याच्याशी मनातल्या गप्पागोष्टी मारण्याचा संबंध आला नाही. त्यामुळे तो मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात जीत प्रिशाबद्दल असा काही विचार करत असेल याचा मागमूसही तिला कधी लागला नाही. तिला वाईट या गोष्टीचं वाटत होतं की श्रीच्या अशा वागण्यानं जीतप्रिशाच्या मैत्रीत तर मिठाचा खडा पडलाच होता शिवाय श्रीप्रिशाच्या प्रेमाची नौकापण बुडल्यात जमा होती.

ती दिवसचे दिवस प्रिशाला भेटत नव्हती की रोज संध्याकाळी आमचे निंबाळकर येतीलच इतक्यात असं म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगून प्रिशा येऊन पायरीवर बसून तिच्याशी गप्पा मारत नव्हती. आजकाल श्रीसुध्दा फारसा नजरेला पडत नव्हता. जीत ऑफिसला निघून गेल्यानंतर कधीतरी तो बाहेर पडायचा. आणि रात्री तो परत आलाय हे कळायचं गाडीच्या करकचून लागलेल्या ब्रेकवरुन किंवा मग त्याच्या चढलेल्या आवाजावरुन. एरवी दुर्गेचा अवतार घ्यायची प्रिशा पूर्वी; पण जीतच्या मैत्रीनं तिला समजुतदारपणा आणि सहनशक्ती नावाचे दोन गुण शिकवले होते. आता रात्री-अपरात्री प्रिशाचा श्रीला समजवणारा सूर ऐकला की जीतला आतून कळवळून यायचं.

तीन महिने संपून अमूला चौथा महिना लागला होता. मालिनी काकूंची त्यादिवशी अमूच्या चोरओटीच्या कार्यक्रमाची गडबड चालू होती. मनात असूनही अमूला प्रिशाला आमंत्रण देता आलं नाही. पण सदाकाकाकडून ह्या कार्यक्रमाचं प्रिशाच्या कानावर जाईल ह्याची व्यवस्था मालिनीकाकूंनी केली होती.

‘’ ताई आयकलं का न्हाय तुमी? ‘’

‘’ काय सदाकाका? ‘’ चंपासोबत कामात असणार्‍या प्रिशानं विचारलं.

‘’ आवो, वैनी म्हनल्या काय की आज आमूताईच्या चोरवटीभरणाचा कारेक्रम हाय म्हणून! ‘’

‘’ होय काय? मग जावा की तुमी. ‘’

‘’ आसं कसं जानार? वैनी म्हनल्या ह्या कारेक्रमाला पुरसांनी याचं नसतंय म्हनं. ‘’

‘’ असं असतं का? मग तुमी मदतीला तर जावा की. बायका येणार असतील ना! ‘’

‘’ न्हाय ओ! वैनी म्हनल्या काय पाचंच बायकास्नी बुलवायचं असतंय. आता त्येंच्याकडं त्या सोवता, त्येंची कामवाली जयंती, तुमी, आपली ही ठमाबाय चंपी आनी त्या शेजारच्या आज्जींची नातसून. काय त्येंचं नाव म्हनल्या….’’

‘’ साखरदांडे आज्जी असतील. त्यांची नातसून रेखा. ‘’

‘’ हां! हां! त्येच. येवडीच येनारेत बायामानसं. ‘’

आता कुठं प्रिशाच्या लक्षात आलं की काकूआईनं तिला कार्यक्रमाला आमंत्रण दिलंय. शेवटी ती त्यांच्या घरचीच तर होती ना! तिला ते ऐकून खरंतर खूप आनंद झाला. ती म्हणालीच सदाकाकांना येते म्हणून आणि अचानक तिनं जीभ चावली.

‘’ काका, आवो! पाच बायका आल्या तरी कामं किती असतील ना? असं करा तुमी जरा जावा की मदतीला. काकूआईला म्हनावं मी येतीच मागनं. ‘’

 हे बोलताना तिचा आवाज भरुन आला होता. सदाकाका गेले तसा आणि प्रिशाचा धरुन ठेवलेला धीर सुटला. तिच्या डोळ्यांतनं घळाघळा पाणी वहायला लागलं. तिची खूप इच्छा होती जायची. पण, तिला आठवलं की दोनच दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात श्री तिला म्हणाला होता की जर पुन्हा त्या घराची पायरी चढलीस तर परतून इकडे यायचं नाही. मेला तुझा नवरा असं समजायचं आणि तोंड काळं करायचं. ती भिंतीला टेकून रडू लागली. चंपाच्या नजरेतनं तिची गेल्या काही दिवसांतली अवस्था काही सुटली नव्हती.

‘’ वैनी आवो येवा की तुमी जाऊन. सायबास्नी कायबी कळायचं न्हाय बगा. ‘’

‘’ पण मग मी माझ्या नजरेला नजर देऊ शकेन का गं? प्रेम केलंय ना त्याच्यावर. प्रेम असा खोटेपणा शिकवतं का? ‘’

‘’ हां तर आल्या मोठ्या मला प्रेमाचं तत्वज्ञान शिकवणार्‍या. प्रेम खोटेपणा करायला शिकवत नाही हे खराय पण सायेब जसं वागत्यात ना तसंबी वागायला शिकवत नाय बगा प्रेम. ‘’

चंपानं तिला निरुत्तर करुन टाकलं.

‘’ मला म्हाईत हाय तुमाला जायाचं हाय पण तुमी काय जानार न्हाय. पर मी तुमचं आर्ध काम करु शकती. चालंल का? ‘’

प्रिशा आनंदानं म्हणाली, ‘’ अगं चालंल का काय विचारतेस? चालणार नाही गं! हे तर धावेल. मी आलेच तोवर तू इथलं आवरुन घे. ‘’

तिनं कपाटातनं नवी साडी आणून चंपाच्या हातात दिली. ‘’ ही नेसून जा. ‘’

ती परत गेली. वामनदादांना सोबत घेऊन बाजारात गेली. तुमी आता आजोबा होणार तेव्हा येणार्‍या नातवंडासाठी जे आवडेल ते खरेदी करा असं सांगून त्यांना सोनारच्या दुकानात सोडून ती साड्यांच्या दुकानात गेली. तिनं अमूसाठी हिरवीगार काठापदराची साडी घेतली आणि ती परत सोनाराच्या दुकानात आली. ती येईपर्यंत वामनकाकांनी चांदीच्या वाळ्या, कंबरेतली साखळी, बिंदल्या, वाटी-चमचा, छोटसं ताट, गडू, पेला एवढं सगळं खरेदी केलं होतं. प्रिशा आल्यावर तिनं सोबतीला चांदीचा करंडा घेतला आणि ते बाहेर पडले. जाता जाता गाडी थांबवून तिनं कासाराकडनं हिरव्या रेशीमगर्भी बांगड्या घेतल्या. गजरा घेतला न् ते परत आले.

ती दोघं येईपर्यंत चंपा सगळं आवरुन तिनं दिलेली नवी साडी नेसून तयार होऊन बसली होती. आल्या आल्या तिनं करंडा सोडून सगळ्या वस्तू बाबांकडं दिल्या. सोबतीला अमूसाठी काळा करदोडापण दिला. बजावून सांगितलं की काकूआईला हा अमूच्या कंबरेत बांधायला सांगा. बाबा गेल्या गेल्या तिनं ओचा खोचला आणि तांदळाच्या कण्यांची खीर करायला घेतली. ताजा भात बनवून तो निवत घातला. चांदीचं ताट तयार केलं. त्यात उका गडव्यात पंचामृत घातलं आणि झाकून ठेवलं. हिरवी साडी सोबत खण आणि कुंचीसाठी मोती लावलेलं मलमलचं कापड त्यात ठेवलं. पाच ओंजळी तांदूळ आणि नारळ ठेवला. नव्या करंड्यात हळदीकुंकू भरुन तोपण त्यात ठेवला. सोबत येताना आणलेला घमघमणारा मोगर्‍याचा गजराही त्यात ठेवला. सोबतीला काजळाची डबी ठेवायला ती विसरली नाही. एका छोट्या कुंड्यात निवत घातलेला ताजा भात काढला, त्यावर दूध घातलं. चवीसाठी माशीच्या पंखाएवढं मीठ घातलं. तो कालवून त्यावर झाकण ठेवून ते सगळं तिनं ताटात ठेवलं. ते ताट तिनं चंपाकडं दिलं आणि म्हणाली, ‘’ चंपे अमूला सांग म्हणावं माझं भाचर माझ्यासारखं देखणं असायला हवंय. मुलगा मुलगी काहीपण असलं तरी! जर जीतवर गेलं तर मारंच खाशील म्हणावं. आणि हां तिची ओटी भरलीस की ह्या काजळाचा टिका तिला लावायला विसरु नको. कुण्णाकुण्णाची नजर तुला न् तुझ्या लेकराला लागू नये. बघत काय बसलीस? जा आता. उशीर झालाय. ‘’

चंपा भरल्या डोळ्यानं ते ताट घेऊन अमूकडे गेली. परत येऊन तिनं सगळं कसं काय घडलं ते सांगितलं.

‘’ वैनी, या हिकडं. हिथं बसा सावशित. आता आयका मी तित जाऊन काय काय केलं ते!. कसंय ना इथं काय गावासारख्या मातीच्या जमनी नायत ना! मग काकूनी देवघरातल्या चार फरशा सदाकाकाकडनं शेणानं सारवून घेतलेल्या. त्याच्यार रांगोळी काडली. फुलांचं मंडल घातलं. त्यावर चौरंग मांडला. समोर दोन पाट ठेवले. एकावर अमूवैनी पाय ठेवणार चौरंगावर बसल्या की आणि दुसर्‍यावर वटीचं सामान ठेवनार म्हनाल्या. त्या चौरंगाच्या बरुबर वरती शिंकाळं बांधलेलं. जे त्यांनी कालंच बाबांकडनं करुन घेतलं हुतं म्हनाल्या. त्या शिंकाळ्या क नाय काकूंनी बुरडाकडनं आणलेली टोपली ठेवली. त्या टोपलीत कुंभाराकडनं आणलेल्या पाच बुडकुल्यात दूध, दही, तूप, लोणी आणि मध ठेवलेला. सगळ्या बायका आल्यावर काकू अमूवैनीना घिवून आल्या. त्यांना हाताच्या आधारानं चौरंगावर उबी केलं. त्यांनी हात वर करुन शिंकाळ्यातनं एक एक करत समदी बुडकुली खाली काढली. काकूंनी त्यातल्या सगळ्या गोष्टी चांदीच्या वाडग्यात एकत्र केल्या. अमूवैनीना चौरंगावर बसवलं. हळदीकुंकू लावलं. त्येंची वटी भरली आन् त्या वाडग्यातलं पंचामृत त्यांना भरवलं. मग बाकीच्या बायकांनीपण त्यांच्या सारखंच समदं केलं. तुमी मला सांगितलेलं तसं मी समदं अमूवैनीस्नी बोलले तर काकूंनी लै मोठ्यानं धपाटा घातला बगा मला. तुमच्यापाय फुकट मार खाल्ला म्या! ‘’

‘’ व्हय गं माझी बाय ती. ‘’ प्रिशानं तिच्या पाठीवरनं हात फिरवला आणि जाऊन किचनच्या खिडकीत उभी राहिली.

मोठ्यानं ओरडून म्हणाली, ‘’ भरुन पावले मी आज. माझ्या मैत्रीणीची ओटी चांगली रुपागुणानं फुलू फळू दे. ‘’

तिच्या आवाजासरशी अमू दारात येऊन उभी राहिली. तशी खिडकीतूनच प्रिशानं तिची अलाबला काढली. अमूच्या एका डोळ्यांत आनंदाचं आणि दुसर्‍या डोळ्यांत दुःखाचं पाणी होतं.

…29/08/2020 

..........    

 *30*

‘’ आणखी किती मुदत मागणार आहात तुम्ही निंबाळकर? तुमचं नशीब चांगलं आहे की बँकेत धाम बिल्डर्सची पत चांगली आहे. नाहीतर तुमच्यासारख्या माणसाला कोण देईल मुदतवाढ? आचार नाही विचार नाही आणि करता त्या कृतीचा ताळमेळ नाही. आता ही शेवटची मुदतवाढ. तीही फक्त 3 महीने. ही देतोय ते जीत साहेबांमुळे. तीन महीन्यात सगळ्या कर्जाची थकबाकी फेडून टाका. ‘’ अगदी शेवटच्या क्षणी मॅनेजर घुगे स्वतः आले होते जीतकडे. तेच आता त्याला सतत मुदत वाढवून मागण्यावरुन सुनावत होते. खरतर याआधी जीत आणि प्रिशाच्या प्रयत्नानं श्रीच्या कर्जाचे बरेच हप्ते फिटले होते. पण दरवेळी तो हप्ता भरायला उशीर लावायचा त्यामुळे शेवटी मॅनेजर घुगेंना श्रीला भेटायला ऑफिसला येणं भाग पडलं.

त्यादिवशी झालेल्या वादानंतर आठवड्याभरानंतरच जीतनं दिगंबरदादांना सांगून धामचे श्रीच्या वाट्याचे शेअर्स त्याला देऊन टाकले. तशी कागदपत्रं घेऊन दिगंबरदादांचा मदतनीस कोलते ऑफिसला चकरा मारुन गेला. पण, त्याला दोन्ही वेळेला श्री भेटलाच नाही. जीतनं स्वतःचं ऑफिस बदललं होतं. त्याला दोन्हीकडून त्रास होत होता. श्रीची घसरत चाललेली अवस्था आणि न भेटताही कळणारे प्रिशाचे हाल. हल्ली त्याचं पिणं आधीपेक्षा खुप जास्त वाढलं होतं. त्या भरात तो काळवेळ न बघता प्रिशाशी भांडायचा आणि हात उचलायलाही मागेपुढे पहायचा नाही. वामनदादांना हे सगळं सहन व्हायचं नाही. पण ते तरी बिचारे काय करणार ना! कितीही वाटलं तरी प्रिशाला एकटं सोडून ते गावीही परत जाऊ शकत नव्हते. श्रीचे एक एक प्रताप ऐकून जीतच्या रागाचा पारा चढायचा. काय करु आणि कसं करु असं वाटून जायचं त्याला. मात्र त्याला एकाबाजूला अमूचीही काळजी वाटत होती. सातवा महीना लागला होता तिला. प्रिशाच्या काळजीनं ती आतल्या आत झुरत होती. जीतला काय बोलून दाखवणार? त्याला त्याचा, ऑफिसच्या कामाचा, श्रीच्या वागण्याचा असा सगळाच ताण होता. त्यात आपली कुठं भर घालायची म्हणून तीही फारसं काही बोलायची नाही. मालिनी काकू होत्या म्हणून तिचा मानसिक ताण थोडाफार हलका तरी व्हायचा. जीतनं श्रीचे शेअर्स जरी परत केले असले तरी मित्राचं काळजीवाहू हृदय मात्र श्रीची काळजी करतच होतं आणि त्यापेक्षा कणभर जास्त प्रिशाची!

श्री ऑफिसात भेटत नाही म्हटल्यावर नाईलाजाने त्यानं ते कागद घरी पाठवले. ती कागदपत्रं हातात पडल्यावर प्रिशाला धाम तुटल्याचं कळलं. तिला कळेचना हे काय आणि कसं झालं ते! ते कागद हातात पडल्यानंतर प्रिशासमोर प्रश्नांची भेंडोळी पडली जी तिला काही केल्या उलगडेनात. जीतला हे सगळे प्रश्न विचारावेत तर तो गेल्या कितीतरी दिवसात तो ना तिला दिसला होता, ना भेटला होता, ना त्यांच्यात कसली बोलाचाल होत होती. अगदी अमूशीही तिला काही बोलता येत नव्हतं. सगळ्या बाजूंनी अडकली होती ती! तिच्या अवतीभवतीचा हा पिंजरा श्रीनं उभा केला होता; ज्याच्या तारा दिसत नव्हत्या पन खुपत मात्र होत्या. आता तिच्यासमोर उत्तर विचारण्यासाटी एकमेव पर्याय शिल्लक होता; श्री.

रात्री आल्यानंतर तिनं श्रीला जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यानं आरडाओरडा करुन सगळं घर डोक्यावर घेतलं. सगळ्यात आधी या प्रश्नांचं उत्तर म्हणून त्यानं तिचा गळाच धरला.

‘’ हिंमत कशी झाली तुला मला प्रश्न विचारायची? लक्षात ठेव धाम माझी कंपनी आहे मी तिचं काहीही करेन. तू कोण मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारणारी? मी माझ्या शेअर्सचं काहीही करेन. तू नाही मला त्याच्यासाठी सल्ला बिल्ला द्यायचा. ‘’

‘’ श्री! श्री! सोड माझा गळा. मी तुला कधीच सल्ला वगैरे नाही देणार. मला फक्त प्रश्न पडलाय की तुम्ही वेगळे का झालात? धामची किती प्रगती होत होती; तरी तुमच्या वेगळं होण्यासारखं काय घडलं? जीतनं काही केलं का? की तुझ्याकडून काही आगळीक घडली? या सगळ्या ताटातूटीच्या प्रसंगात नक्की चूक कोणाची? ‘’ आपला गळा सोडवून घेत तिनं मनातल्या सगळ्या प्रश्नांची भेंडोळी त्याच्यासमोर टाकली.

‘’ माझी. चूक माझी आणि माझीच आहे ह्या सगळ्यांत. मी त्याच्यावर विश्वास टाकला. मी तुझ्यावर प्रेम केलं. लहानपणीचा मित्र म्हणून तो जे म्हणेल ते योग्य असं वाटत राहिलं मला. मला वाटलंच नव्हतं कधी की तो असा वागेल माझ्याशी. आणि त्याची साथ द्यायला माझी बायको पुढाकार घेते हे माझं दुर्दैव. ‘’ असं म्हणून तिला ढकलून देत तो खोलीबाहेर निघून गेला. त्याच्या ढकलण्यामुळे बेसावध प्रिशा दणकन् भिंतीवर आपटली. नेमकी तिथं लावलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटो फ्रेमवर तिचं डोकं आपटलं. त्या फ्रेमची काच खळकन् फुटली आणि प्रिशाच्या डोक्याला खोक पडली. पण तरीही तिला त्याचे हे असंदर्भ प्रश्न सतावत होते म्हणून ती भळभळणारी जखम घेऊन तशीच त्याच्या मागे धावली.

‘’ श्री! थांब ना! ऐक ना माझं श्री! तू काय म्हणतोयस मला काही कळत नाहीए. ‘’

पण श्री तिच्या हाकांनी थांबलाही नाही आणि मागेही वळला नाही. पण इतका उशीर खोलीत जबरदस्ती बसून राहिलेले वामनदादा मात्र बाहेर आले. त्यांनी पाहिलं की प्रिशाच्या कपाळाला खोक पडली होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. त्यांनी पटकन् पुढे होऊन तिला धरलं आणि बाजूच्या सोफ्यावर बसवलं. तिची जखम पुसून त्यावर औषध लावलं.

‘’ कशाला लागतीस त्या रासवटाच्या मागं पोरी? त्यो काय ऐकनार्‍यातला हाय व्हय? सवताच्या बापाला जुमानीना त्यो; तुजं काय ऐकलं व्हय? ‘’

‘’ बाबा, असं नका ना म्हणू. माझा श्री असा नाहीए बाबा! नक्कीच त्याचा काहीतरी गैरसमज झालाय. आपल्याला तो दूर करायला हवाय बाबा. ‘’

‘’ आगं पण जवर त्यो बेन्या सांगत न्हाई नेमकं काय झालंय त्ये तवर तू मी काय वरनं बरमद्येव जरी उतरुन खाली आला तरी काय हुयाचं नाई बग! ‘’

वामनदादा खरंच तर सांगत होते. श्री नेमकं काय झालंय ते तर सांगतच नव्हता. त्या आलेल्या कागदामागचं सत्य आता तिला अमू, जीत नाहीतर दिगंबरकाकांकडूनच कळणार होतं. दोन्ही घरातली माणसं एकमेकांच्या घरी जाणं केव्हाच बंद झालं होतं. अपवाद होता तो फक्त सदाकाकांचा. म्हणून मग तिनं सदाकाकांचा आधार घेऊन जीतला भेटण्याविषयी विचारलं. पण त्यानं नकार दिला. तिनं मात्र या ना त्या मार्गानं त्याला भेटण्यासाठीचे प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी एकदा ही आपली शेवटची भेट असेल असं म्हणत जीत तिला भेटायला तयार झाला. जवळच असणार्‍या नुकत्याच सुरु झालेल्या कॉफीशॉपमध्ये दोघेही ठरल्या वेळेप्रमाणे पोचले. आधी काय बोलावं? कुठून सुरुवात करावी? हेच त्या दोघांना समजेना. शेवटी प्रिशानंच सुरुवात केली.

‘’ काय घेणार तू? ‘’

‘’ ब्लॅक कॉफी. ‘’

जीतनं जेवढ्यास तेवढं उत्तर दिलं.

तिला मनापासून विचारावसं वाटत होतं की काळी कॉफी प्यायला कधी सुरु केलीस म्हणून; मात्र तिच्या मौनानं काही स्वतःची जागा सोडली नाही. तरीही तिच्या डोळ्यांतला प्रश्न जीतनं वाचलाच होता.

‘’ झाले काही दिवस आयुष्यातली दुधाळ गोडी कमी झाल्याला. मग चहा आणि कॉफीतूनही ती काढून टाकली. ‘’ त्यानं स्वतःशीच पुटपटत तिला उत्तर दिलं. तिचा चहा आणि त्याची ब्लॅक कॉफी येईपर्यंत तिनं सवयीनं मुद्द्याला हात घातला.

‘’ का वेगळे झालात तुम्ही? ‘’

‘’ तुझ्या नवर्‍याला विचार. ‘’ त्यानं स्वरात होता होईतो कोरडेपणा आणत उत्तर दिलं.

‘’ तो उत्तर देत नाहीए. ‘’

‘’ मग माझ्याकडेही उत्तर नाहीए. ‘’

‘’ पण काहीतरी कारण असेलच ना! ‘’

‘’ सांगितलं ना! उत्तर, प्रश्न, कारणं जे सगळं काही आहे ते तुझ्या नवर्‍याकडं आहे. माझं डोकं नको खाऊस. ‘’

प्रिशानं पटकन् त्याचे हात धरले.

‘’ जीत तू तरी असा नको वागूस रे माझ्याशी! मी सगळ्या बाजूंनी एकटी पडलेय. माझ्या आधाराच्या सगळ्या भिंती बॅकफूटवर गेल्यात रे! ‘’

तिच्या आर्जवांनी त्यानं स्वतःभोवती उभ्या केलेल्या भिंती मात्र ढासळल्या.

‘’ प्रिशा, माझ्या हातात खरंच काही नाहीए गं! तो आता माझा मित्र राहिलेला नाहीए. जर उरला असेल तर तो फक्त तुझा नवरा म्हणून उरलाय. त्याची सगळीकडूनच घसरण सुरु आहे. कंबरेपर्यंत कर्जात बुडलाय तो. त्याच्यासोबत काम करणं शक्य नाहीए मला. मी अजून बँकवाल्यांना थोपवून धरलंय म्हणून नाहीतर केव्हाच जप्ती आली असती त्याच्यावर. ‘’

‘’ अरे पण तो फक्त कर्जबाजारी झाला म्हणून तुमची भागीदारी कशी तुटेल? तुम्ही तर लहानपणापासूनचे मित्र आहात ना! ‘’

‘’ तुझ्या नवर्‍यासारख्या संशयी माणसासोबत मी काम करु शकत नाही. म्हणून मीच वेगळा झालोय. ‘’

‘’ अरे पण! ‘’

तिचं बोलणं मध्येच तोडत जीत म्हणाला, ‘’ हे बघ, तुझं आणखी काही काम असेल तर सांग नाहीतर मी चाललो. ‘’ तो जाण्यासाठी उठला.

‘’ जीत, मला फक्त एवढंच सांग की त्याच्यावर किती कर्ज आहे? किती हप्त्यात फेडायचं आहे? ‘’

‘’ ठीक आहे. तुला सगळी माहीती मिळण्याची व्यवस्था करतो मी. ‘’ असं म्हणून तो तिथून बाहेर पडला.

मात्र त्या दोघांना माहीतच नव्हतं की भावेशचा तिसरा डोळा कदम त्यांच्या अजूनही मागावर आहे म्हणून.

जीतनं सांगितल्याप्रमाणं प्रिशाला श्रीच्या कर्जाचं सगळं प्रकरण कळवलं. सगळे मिळून 3 करोड रुपये होते. प्रिशानं बाबांशी बोलून काही पैसे त्यांच्याकडच्या जमीनी विकून उभे केले. काही आबांनी तिच्यासाठी ठेवलेले काही दागिने, जमीनी यांच्या विक्रितून उभे केले. अशा सगळ्या खटपटी लटपटी करत तिनं 3 करोड रुपये उभे केले. पुन्हा एकदा ते त्याच कॉफीशॉपमध्ये भेटले. प्रिशानं 3 करोड असलेली ब्रिफकेस जीतकडं दिली. जेव्हा शेवटचा हप्ता भरशील तेव्हा ती सगळी कागदपत्रं आणून माझ्याकडे देशील या शब्दासकट दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

आता बॅंकेचा शेवटचा हप्ता राहिला होता. श्रीला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून जीतनं सगळे हप्ते शेवटच्या क्षणी जातील अशी व्यवस्था केली. मात्र श्रीच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. आज मात्र जेव्हा बँकेचे मॅनेजर घुगेंनी तयाला ऐकवलं की तो जीतमुळे अजूनही चांगल्या अवस्थेत आहे म्हणून तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मॅनेजर गेले आणि त्याच्यामागे आत आलेल्या चपराश्यानं एक पाकिट आणून त्याच्यासमोर ठेवलं.

‘’ काय आहे? ‘’

‘’ माहीत नाही साहेब. ‘’

‘’ कुणी दिलं? ‘’

‘’ ओळखीचा नव्हता साहेब. एक माणूस आलेला त्यानं दिलं. म्हणाला साहेबांना दे! ‘’

‘’ बरं जा. ‘’

त्यानं पाकिट फोडलं आणि ते बघून आधीच संतापलेल्या त्याच्या मेंदूची पार राखरांगोळी झाली. भर दुपारी तो ऑफिसातून निघून तडक बारमध्ये पोचला. त्याच्या मनात नुसती आग भडकली होती.

‘ काय समजते ही स्वतःला? एवढं सांगितलं तरी त्याला भेटते? घरी भेटायला नाही म्हटलं तर बाहेर जाऊन भेटते? ‘’

… 30/08/2020

..........

*31*

 भिंतीवरच्या घड्याळाने 12 चे ठोके दिले. श्रीचा अजूनही पत्ता नव्हता. प्रिशा पायरीवर बसून बसून कंटाळली होती. पेंग येऊन तिचा झोक जात होता म्हणून ती वरच्या पायरीवर सरकून दाराला टेकून बसली. तिचा चांगलाच डोळा लागला होता. 12.30-1 वाजण्याच्या आसपास गेटमधून आत शिरणार्‍या गाडीच्या आवाजाने तीची झोप उडाली. तिनं डोळे मोठे करुन पाहिले तर ड्रायव्हरच्या सीटवर श्रीऐवजी कुणी दुसरंच बसलं होतं. गाडी पुढ्यात येऊन थांबली. आतून एक पोरगा उतरला. प्रिशा काही न सुचून धडपडून उभी राहत जे घडतंय ते पाहत होती. तो बाहेर उतरलेला पोरगा तिच्याजवळ आला.

‘’ तुम्हीच प्रिशाताई का? ‘’

‘’ हो.’’

‘’ मी केशव. श्री साहेबांना घेऊन आलोय. ते मागच्या सीटवर आहेत. ‘’

प्रिशा पटकन् गाडीच्या मागच्या बाजूला गेली तर श्री मागच्या सीटवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता आणि काहीतरी बरळत होता. खिडकीजवळ जाताच दारुचा भपकारा तिच्या नाकात शिरला. तिनं मागचं दार उघडलं आणि त्या मुलाला; केशवला हाक मारली.

‘’ केशवदादा, जरा मदत करता का माझी? ‘’

तसा केशव पुढे आला. दोघांनी मिळून श्रीला कारच्या मागच्या सीटवरुन बाहेर काढलं. केशवच्याच मदतीनं तिनं त्याला आत आणून सोफ्यावर झोपवलं. त्याला सीटवर झोपवल्यावर ती त्याला म्हणाली,

‘’ दादा, अजून थोडी मदत करता का? ती बाहेरची गाडी थोडी आणखी पुढे आणून पार्क करता का? ‘’

हो म्हणत केशवनं गाडी पुढे आणून पार्क केली आणि चावी आणून तिच्या हातात दिली. त्याला धन्यवाद म्हणतानाच तिनं काहीही न बोलता काही नोटा ठेवल्या. नजरेनंच तिला धन्यवाद देत केशव निघून गेला.

केशव निघून गेला तशी प्रिशा आत आली. सोफ्यावर आडवं पडलेल्या श्रीला बघत तिनं हळूच जाऊन बाबांच्या खोलीचं दार वाजवलं. तिच्या दोन-तीन टकटकीनंतर वामनदादा दार उघडून बाहेर आले.

‘’ काय गं पोरी, काय झालं? इतक्या रातीचं दार वाजवलंयस? झोपली न्हाईस व्हय? ‘’

प्रिशाला आधी काय सांगावं? कसं सांगावं? कळेना. पण, शेवटी हिंमत करुन तिनं सांगितलंच.

‘’ बाबा, माझी मदत करताय का? ह्यांना बेडरुममध्ये घेऊन जायचंय. ‘’

वामनदादांच्या चेहर्‍यावर आलेली नाराजी तिच्या लक्षात आली पण आता ह्यावेळेला तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

‘’ हं! आलेले दिसतायत आमचे दिवटे चिरंजीव. चल. ‘’

 त्यांच्या मदतीनं तिनं श्रीला बेडरुममध्ये आणून झोपवलं. वामनदादा मुकाट्यानं आपल्या खोलीत जाऊन झोपले. प्रिशानं त्याचा एकंदरीत अवतार पाहिला. मग त्याचे बूट, सॉक्स काढले. तसराळ्यातून मीठ घालून गरम पाणी आणलं. त्यात नॅपकीन बुडवून त्याचे पाय शेकून घेतले. त्या गरम स्पर्शाची जाणीव त्याच्या मेंदूपर्यंत पोचली तसा नशेतच तो बरळला.

‘ नको ना अशी वागूस गं! मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तू अशी नाहीएस गं! तू माझी आहेस प्रिशा…’

‘’ श्री, मी इथेच आहे श्री. काय झालंय श्री? ‘’

हातातला नॅपकीन खांद्यावर टाकत ती झटकन् श्रीच्या खांद्याजवळ जाऊन काय म्हणतोय ते ऐकायला लागली. पण ते ऐकूनही तिला त्याचा काहीही संदर्भ लागला नाही. त्याचे कपडे वगैरे बदलून ती मुकाट्यानं येऊन त्याच्याशेजारी झोपली. त्याच्या केसांतून बोटं घुंगराळताना तिला कॉलेजचे दिवस आठवत होते. तिचा हात केसांतून फिरायला लागला तसा श्रीनं तो हात धरुन तिला स्वतःकडे खेचलं. तिला घट्ट मिठीत घेत तो म्हणाला,

‘’ माझा जीव आहेस तू प्रिशा! मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं! आई गेल्यावर एकटा पडलो पण जीतच्या आईनं मला जीतएवढाच जीव लावला. आजी आणि रंग्यानं आता आतापर्यंत माजी साथ दिली. पण ती दोघं गेल्यानंतर मला सावरणारी तू एकटीच आहेस प्रिशा. माझ्यासोबत अशी वागू नकोस. मला नाही सहन होत. तुला गमावलं तर हा श्री उध्वस्त होईल प्रिशा…’’

‘’ कशी वागले मी तुझ्याशी श्री? ‘’ तिनं कसंबसं विचारलं. पण नशेत बडबडणार्‍या श्रीला तरी कुठं शुद्ध होती तो काय बोलतोय याची. पण प्रिशाला मात्र खुप बरं वाटत होतं. खूप दिवसांनंतर त्यानं तिला असं घट्ट मिठीत घेतलं होतं. न राहवून तिनं त्याच्या ओठांवर ओठ टेकवले न् त्याला किस केला.

सकाळी थोडी उशीराच जाग आली तिला. श्री अजूनही झोपेतच होता. तिनं प्रेमानं त्याच्या गालावर थोपटलं आणि तिनं आवरायला घेतलं. ती बाहेर आली तेव्हा चंपा येऊन तिचं लादी पुसणं चालू होतं. देवघरात वामनदादांची पुजा होऊन आरती चालू होती. किचनमध्ये शिरणार्‍या तिच्या चेहर्‍यावर आलेलं तेज काही चंपाच्या नजरेतून सुटलं नाही. लादीवर शेवटचा हात फिरवून नळाखाली कापड पिळताना तीनं हळूच प्रिशाला शाब्दिक चिमटा काढला.

‘’ काय वैनी कालची रात लैच रंगीत झाली वाटतं? सायबांनी आणलेल्या गुलाबाचा रंग चुकून लागलाय गालाला की त्यानी मुद्दाम लावला म्हनायचा? ‘’

 तशी प्रिशा लाजली.

‘’ चंपे, तुझं ना काहीतरीच असतं बघ. ‘’

‘’ हां! हां! नगा सांगू काई. न सांगता काय काय गोष्टी आमास्नी बी कळत्यात म्हणलं. ‘’

‘’ जातेस का इथून आता? ‘’ असं म्हणत प्रिशानं किचननॅपकीन तिला फेकून मारला. तशी हसतच चंपा कपडे धुवायला धुवायला मोरीत शिरली. तोवर पूजा आटपून वामनदादा आलेच हॉलमध्ये.

‘’ प्रिशाऽऽऽ! पोरी चा झालाय का गं? ‘’

‘’ होय बाबा. आणतेच. ‘’

असं म्हणून तिनं गरम भाकरीला तूप-मीठ लावून ती प्लेटमध्ये घेऊन दादांच्या पुढ्यात चहा आणि भाकरीची प्लेट आणून ठेवली. ती मागे वळली तर दादांनी तिला म्हणाले, ‘’ पोरी तुजा बी कप हिथंच घिवून ये. ‘’

प्रिशाच्या लक्षात आलं की ते श्रीची चौकशी करणारेत म्हणून. ती आपला चहाचा कप घेऊन तिथं येऊन बसली.

‘’ उठलं का आमचं चिरंजीव? ‘’

‘’ नाही बाबा. ‘’

‘’ मंग तू जानार असशीला न्हवं त्येला उठवायला? बरुबर काय न्हेनार हाईस? काळा चा, काळी कॉफी का लिंबूपाणी? ‘’

‘’ बाबा ते! ‘’ प्रिशाची जीभ त्यांच्यापुढं बोलायला रेटेना.

‘’ काय बाबा? तुला काय वाटलं? तू बोलली न्हाईस म्हनताना मला घरात काई थेरं चालू हाईत काय म्हाईत न्हाय व्हय? मचानावर उभं र्‍हायल्या र्‍हायल्या गोफनीनं उडत्या पाकराची पकं मोजल्यात ह्या म्हातार्‍यानं! जातीचा शेतकरी हाय म्या. तुज्या त्या लाडक्या नवर्‍याला सांग म्हनावं तुजा बा म्हातारा झाला आसलं पण त्यो काय तुजा आश्रित न्हाय म्हनावं! ‘’

‘’ बाबा, अहो असं काय बोलता? हे घर तुमचंच आहे की. ‘’

‘’ त्ये तुज्यासाठनं आसलं सूनबाई. ‘’ वामनदादा खटकन् लेकीवरनं सुनेवर आले.

‘’ बाबा पण! ‘’

‘’ काय पन बिन आयकायचा न्हाय मला. तुजा नवरा काय म्हनलाता मला की तुमच्या सुनंला काय बी कमी पडू देनार नाय म्हनून. माजा लोकांच्या शब्दापरीस माज्या सोत्ताच्या डोळ्यांवर लय इस्वास हाय. आता पानी पाक नाकापातूर आलंया. आज त्येला इचारतोच म्या काय करायचं ठरीवलं हाय त्येनं? त्येला नसंल सांबाळायला जमत तर मी माज्या लेकीला घेऊन जातो म्हनून सांग त्येला. माजं घर, माजी शेती हाय माज्याकडं आनी मी आजपन दोन जास्तीची मानसं आरामात पोशीन म्हनावं. मी काय तुजा मिंधा नाय. खबरदार जर त्येला उठवायला गेलीस तर. आज काय त्यो काटा किर्रच करुन टाकायचाय मला. लई दिस झालं घोंगडं भिजत पडलंया बघ. आज येकतर ही कड नायतर ती कड. लै दिस गप र्‍हायलो म्या तेबी फकस्त तुज्यासाठनं पोरी. नायतर कवाच त्येला रंग्याच्या वादीनं फोडून काडला असता. ‘’ असं म्हणून वामनदादा आपल्या खोलीत निघून गेले.

… 01/09/2020

.........  

*32*

दुपार होत आली तरी अजूनही श्रीच्या उठण्याचा काही पत्ता नव्हता. प्रिशाचा बाकी सगळा स्वयंपाक आटपला होता. आता ती श्रीला आवडणारं चिकन बनवण्याची तयारी करत होती. चंपा तिची कपड्याची-भांड्याची सगळी कामं आटपून आत आली. तिला पुन्हा प्रिशाला चिमटा काढायची इच्छा झाली. प्रिशाच्या मागे जाऊन तिनं विचारलं, ‘’ वैनी खरं सांगा; काल नव्यानं हनीमून झाला न्हवं तुमचा? ‘’

‘’ चंपे, जरा तोंड बंद कर. एखाद्या गोष्टीच्या मागं पडलं की पडलंच ना! ‘’

चंपा त्यावर काही बोलणार इतक्यात श्रीच्या खोलीतून मोठ्याने हाक ऐकू आली.

‘’ चंपाऽऽऽ ‘’

त्या आवाजासरशी प्रिशानं पटदिशी हातातलं कुकरचं झाकण लावलं आणि ती धावतच श्रीच्या खोलीकडे गेली. पलंगावर उठून बसलेल्या श्रीचं दारात आलेल्या प्रिशाकडं लक्ष गेलं.

‘’ काय झालं श्री? काही हवंय का तुला? ‘’

‘’ तू? तू कशाला आलीस इथे? मी चंपाला हाक मारली होती. तुझं नाव चंपा आहे का? ‘’ श्री तिच्या अंगावर खेकसला.

वामनदादांनीपण श्रीचा तो चढलेला आवाज ऐकला होता. ते येऊन त्यांच्या खोलीच्या दारात उभे राहिले होते. त्यांनी श्रीला प्रिशावर डाफरताना ऐकलं आणि तिला तिथून जातानापण पाहिलं.

‘’ चंपा, जा गं! तुला साहेबांनी बोलवलंय. ‘’ प्रिशानं जड आवाजात तिला सांगितलं.

‘’ जाताना ती थर्मासमधली ब्लॅक कॉफीसुध्दा घेऊन जा. ‘’

चंपानं कपात ब्लॅक कॉफी ओतली आणि तो कप घेऊन ती श्रीच्या खोलीत गेली.

‘’ तुला एकदा हाक मारल्यावर ऐकू येत नाही का? ‘’

‘’ पण साहेब, प्रिशावैनी तर आल्या होत्या की. ‘’ हळूच पुटपुटल्यासारखी चंपा तोंडातच बोलली खरी पण ते श्रीच्या कानावर पडलंच होतं. तिनं दिलेला कॉफीचा कप त्यानं फेकून दिला आणि तिच्याही अंगावर तो खेकसला.

‘’ मला उलट उत्तर करतेस? जा चालती हो इथनं. परत तुझं थोबाड मला दाखवायचं नाहीस. जाऽऽऽ ‘’

‘’ श्री अरे तिला का बोलतोस असं? ‘’ तिच्या मागोमाग आलेली प्रिशा न राहवून बोलली.

‘’ फार पुळका आलाय का तुला तिचा? मग तिच्याबरोबर तूही चालती हो इथनं. मला तुझंही थोबाड बघायचं नाहीए. ‘’

त्याच्यासमोर हात जोडून प्रिशाची बाजू घेत चंपा म्हणाली, ‘’ साहेब, मी जाते इथून पण वैनीस्नी नका ओ काहीपण बोलू तुम्ही. ‘’

‘’ बासऽऽऽ! तू कोण गं तिची बाजू मांडणारी? विसरलीस का? तू मोलकरीण आहेस या घरची. तोंड बंद करायचं आणि आताच्या आता इथून चालू पडायचं. ‘’

चंपाच्या डोळ्यांत पाणी आलं. पण मनावर दगड ठेऊन ती तिथनं बाहेर पडली.

‘’ तुला काही वेगळ्या भाषेत सांगावं लागणार आहे का? मला तुझं तोंडही पहायचं नाहीए. ताबडतोब इथून निघून जायचं. ‘’

‘’ अरे पण श्री मीऽऽ‘’

‘’ जाऽऽऽ! ‘’

‘’ थांब. लै येळ झाला तुजी थेरं आयकतूय म्या. कुनाला सांगतूस घराभाईर जायला? या घरच्या लक्षीमीला व्हय. आरं जिनं हे घर उभं क्येलं तिला तू घराभाईर काडनार व्हय? ‘’

‘’ बाबा, तुमी मदी पडायचं नाय म्हणून मी पयल्यांदाच सांगितलंय का नाय? मंग कशायाप नवराबायकूच्या भांडनात तोंड घालताय? ‘’

‘’ श्री तू बाबांशी असा कसा काय बोलू शकतोस? ‘’

‘’ तू तर माझ्यासमोर तोंडच उघडू नकोस. बदफैली बाई! नवरा असताना असली लफडी करायची लाज कशी वाटत नाही तुला? ‘’

‘’ काय बोलतोयस तू हे श्री? विनाकारण माझ्यावर असले आरोप लावू नकोस तू. मी असलं काहीही केलेलं नाही. ‘’

‘’ आहेत का तुझ्याकडं याचे पुरावे? नाही ना! मग लक्षात ठेव की जे मला दिसतंय ते मी बोलतोय. मला आंधळेपणानं बोलणं जमत नाही. मी तुझ्यासारखा आत एक बाहेर असा नाहीए. तुला जर मी पसंतच नव्हतो तर लग्न तरी का केलंस तू माझ्याशी? का माझ्या पैशांचा लोभ सुटला नाही तुझा? ‘’

‘’ आरं पोरा काय बोलतूयस तू हे? आबा पाटलाची इश्टेट आजबी 10 पटीनं जास्त हाय. तिला कशाला तुझ्या पैशांचा लोब हुइल रं? तू माज्या सुनंवर नाय तर माज्या लेकीवर असलं घानेरडं आरोप कशापाई लावतो हाईस? आसं काय क्येलं हाय तिनं म्हनून तू तिच्यासंगती असा वागतूस? ‘’ वामनदादा अगदी काकूळतीला येऊन श्रीला विचारत होते.

श्रीचा टीपेला गेलेला आवाज केव्हाच अमूच्या कानांपर्यंत जाऊन पोचला होता. त्याच्या त्या आवाजानं आता मात्र न राहवून ती धावतच बाहेर आली. तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात काम करणार्‍या मालिनीकाकूही धावल्या. ती त्या घरात जाणारच होती इतक्यात मालिनीकाकूंनी तिचा हात धरला. ओढतंच तिला घराजवळ आणलं.

‘’ अमू थांब हिथंच. तू न्हाई जायचंस त्या घरात. ‘’

‘’ आई! अगं पण प्रिशा? ‘’

‘’ कळतंय मला. तुझा जीव प्रिशासाठी तुटतो ते! पण पोरी तुला सातवा म्हैना चालू हाय गं! ह्ये असलं आवाज, ही असली वंगाळ भाषा त्या गर्बाच्या कानावर पडाया नकूत. त्येचं परिणाम वाईट हुतील गं! ‘’

अमूनं पोटावर हात ठेवला आणि ती बळंबळंच पुढं टाकलेला पाय मागे घेतला आणि दारातच बसकण मारली.

आतमध्ये श्रीचा आरडाओरडा चालूच होता.

‘’ काय केलं म्हणून इचारता बाबा? आवो जिला तुमी लेकीसारखी मानली तिनं तुमच्या इश्वासाच्या पाक चिंध्या केल्यात. लगीन माज्यासंगट केलंय आनी थेरं त्या जीतसंगती चाललीत हिची. ‘’

‘’ नाय नाय नाय. ह्ये असं कायबी होनं शक्य नाय. प्रिशी पोरी काय म्हनतोय ह्यो? ह्ये असलं वंगाळ कायतरी तुज्या बद्दल का बोलतूय ह्यो? ‘’

‘’ बाबा मी खरंच सांगते. माझे आणि जीतचे असे संबंध कधीच नव्हते. हा आमच्याबद्दल असा विचार का करतो नाही माहीत मला ओ! श्री का वागतोयस तू असा? माझी आणि जीतची मैत्री तर तुला आधीपासून माहीत आहे ना! मी कधीच तुझ्यापासून काही लपवून ठेवलं नाही मग तू या निर्णयावर कसा आलास? ‘’

‘’ कसा आलो? काहीच लपवलं नाहीस माझ्यापासून? सगळंच माहीत होतं मला? थांब. ‘’ असं म्हणून त्यानं ऑफिसच्या बॅगेतून काही फोटो काढले आणि ते तिच्या तोंडावर फेकले.

‘’ बघ. नीट बघ. तू माझ्यापासून काय लपवलंस ह्याचे पुरावे आहेत हे. तू इतक्या खालच्या पातळीवर उतरशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता ह्याच्यापुढं मला तुझं थोबाड बघायची इच्छा नाही. आताच्या आता माझ्या घरातनं बाहेर पडायचं. ‘’

प्रिशा सुन्नपणे ते अस्ताव्यस्त पडलेले सगळे फोटो बघत होती. हे जीतनं आपल्याला का नाही सांगितलं? श्रीला केव्हापासून हा संशय होता? तो कधीच का आपल्याशी या गोष्टी बोलला नाही? तिच्या मनाला हे सगळे प्रश्न त्याही परिस्थितीत भुंग्यासारखे पोखरत होते. वामनदादांनीपण ते सगळे फोटो पाहिले. पण रीही त्यांचा प्रिशावर असणारा विश्वास तसूभरंही हलला नाही. जीनं त्यांच्या लेकाला उभं केलं होतं तिच्याविषयी असा विचार करणंदेखील त्यांच्या पापभीरु मनाला पटत नव्हतं.

‘’ नाय पोरा! आसं कायतरी वागू नकंस रं! तुजी कायतरी गैरसमजूत जाली आसंल बग. माजी ल्येक असं वागनार्‍यातली नाय रं! ‘’

‘’ ह्ये बगा बाबा, मी फायनली सांगतू हिला भायेर जायला सांगा. मला हिचं तोंड बगायचं नाय. आनी जर ती हिथनं जानार नसंल तर मीच ह्ये घर सोडून जातो. त्ये बी आताच्या आता. र्‍हावा हिथं तुमी आनी तुमची ही लाडकी ल्येक. माजाच त्रास हुतोय ना तुमाला? मीच जातो हिथनं. ‘’ असं म्हणून आपल्या भात्यातला हा शेवटचा बाण सोडून श्री तिथून निघाला. तशी हात जोडून प्रिशा त्याच्यासमोर उभी राहिली.

‘’ नाही. नाही. तू नको जाऊस. मीच जाते. तू गेलास तर बाबा खचून जातील. मी त्यांना तशा अवस्थेत नाही बघू शकत. मीच जाते इथून. तुला पुन्हा कधीच माझं तोंड पहावं लागणार नाही. ‘’

ती अशीच वामनदादांकडे वळली. हात तसेच जोडून त्यांना म्हणाली, ‘’ बाबा! माझ्या जाण्यानं या घरात शांती र्‍हानार असंल तर मी जाते हिथनं. तुमी तुमची काळजी घ्या. आता सगळ्या गोष्टी सांबाळायला मी नसंन हिथं. ‘’

‘’ पोरीऽऽऽ! ‘’ वामनदादांनी तिचे ते जोडलेले हात घट्ट धरले.

‘’ पोरी माज्ये हात दगडाखाली हायत बघ. आता शरीर साथ देत नाय. नायतर या फोटूच्या मागचं खरंखोटं समद्यांसमोर आनलं असतं मी. पन येक गोष्ट लक्षात ठिव झोपलेल्या मानसाला जागं करता येतंय. पन झोपंचं सोंग घेतलेल्याला तू कशी जागी करनार हाईस? त्यासाठनं भुकंपच हुयाला लागतोय बग. माज्या हातात असतं तर मी कंदीच तुला ह्या घरातनं जाऊ दिलं नसतं. पन हे घर माजं नाय. ‘’

‘’ हां! हां! लै झाली तुमची गुळातली बोलणी. आवरतं घ्या लवकर. ही बया ह्या घरातनं गेली काय मला समंद घर धुवून घ्यायचं हाय. ‘’

श्रीच्या या बोलण्यानं वामनदादांनी प्रिशाचे हात सोडले. प्रिशा मुकाट्यानं बाहेर निघाली. ती दारात पोचली तोच मागून श्री म्हणाला, ‘’ तुला हवे असतील तर तू तुझे दागदागिने, कपडे सगळं घेऊन जाऊ शकतेस. मी काही एवढा वाईट नाही की तुला नेसत्या कपड्यानिशी बाहेर काढीन. ‘’

पण मानी प्रिशा त्याचे ते शब्द हवेत तसेच सोडून तिथंन निघूनपण गेली. 

12/09/2020

..........

  *33*

प्रिशा घरातनं बाहेर पडली. एकदा शेवटचं तिनं मागं वळून बघितलं. घराला आणि वामनदादांना भरल्या डोळ्यांनी हात जोडले. मग निग्रहाने डोळ्यांतलं पाणी निपटलं आणि ती न बोलता तिथून निघून गेली. घराच्या दारात बसलेल्या अमूनं तिला जाताना पाहिलं आणि आपलं सात महीन्यांचं पोट सांभाळत ती प्रिशाच्या मागं धावली.

‘’ प्रिशेऽऽऽ ए प्रिशेऽऽऽ थांब की गं! प्रिशे ऐक की गं माझं! एकदा माघारी ये. प्रिशे अमूसाठी ये की गं! तुझ्या ह्या होणार्‍या भाच्यासाठी तरी मागं फिर की गं! जीत तुझ्याशिवाय कसा जगलं प्रिशेऽऽऽ माझ्या नवर्‍याला असा सोडून जाऊ नकोस गं! त्याचा जीव आहे प्रिशे तुझ्यावर परत येऽऽऽऽऽ ‘’

गेटवर उभारुन बेंबीच्या देठापासून प्रिशाला आवाज देणारी अमू तिच्या जाण्याकडं बघत फतकल मारुन तिथंच बसली. आणि हुंदके देऊन रडायला लागली. तिच्यामागं आलेल्या मालीनीकाकूंनी तिला धीर दिला.

‘’ अमू लेकरा असं करु नये गं! जरा तरी भान ठेव की आपण गर्बारशी हाओत याचं. ‘’

‘’ आईऽऽऽ! ‘’ अमूनं तिला मिठी मारली. ‘’ आई, ही अशी कशी गेली गं? मागं वळून उकदा तरी बघायचं ना! मला आणि जीतला सोडून ही अशी कशी जाऊ शकते? ‘’ हमसत तिनं काकूंना विचारलं.

तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत त्या म्हणाल्या, ‘’ जाऊ दे पोरी! ती थांबणार्‍यातली नाय. किती झालं तरी आबा पाटलाचं मानी रकात हाय त्ये! तिचा राग काय तुला नवा हाय व्हय? मला नाय वाटत का ती मागारी यिल म्हनून. ‘’

‘’ आई पण मी तिचं काय बिघडवलंय गं? आपल्या मैत्रीणीला असं कुणी सोडून जातं का? ते पण अशा अवस्थेत? माझ्या जीतला आता झोप लागेल का गं आई? ‘’

‘’ अमू, लेकरा तू आत चल बघू. अशा अवस्थेत रडायचं नसतंय लेकरा. चल आत चल. जीत आला की बघू आपण काय करायचं त्येचा ईचार करु. तू आत चल बघू आधी. ‘’

अचानक अमूचा आविर्भाव बदलला. तिनं डोळ्यांतलं पाणी पुसलं.

‘’ नाही आई थांब. मी अशीच इथनं जाणार नाही. मला त्या नालायक माणसाला जाब विचारायचात. विचारायचंय त्याला की आता त्याच्या जीव थंड झाला का ते? ‘’

‘’ अगं अमू पण… ‘’

पण त्यांचं काहीही न ऐकता अमू त्यांचा हात झिडकारुन तरातरा जाऊन दारात उभी राहिली. वामनदादांना आत जा असं सांगण्यासाठी वळलेल्या श्रीच्या कानांवर अमूचा रागानं चढलेला आवाज पडला तसा तो पुन्हा दाराकडे वळला.

‘’ ओ निंबाळकर! ‘’

अमूनं दाराच्या चौकटीतच उभी राहून त्याची झडती घ्यायला सुरुवात केली.

‘’ झालं का समाधान? तुझ्या जीवाला लागलेला वणवा विझला असेल ना आता? काका, आरती ओवळा तुमच्या चिरंजीवांवरुन. मोठा पुरुषार्थ गाजवलाय त्याने. ‘’

‘’ अमूऽऽऽ तू! ‘’

‘’ ए गप! तुझ्या ह्या घाणेरड्या गटारातून माझं नाव घ्यायचं नाहीस तू. लायकी नाहीए तुझी ती. ज्याला मैत्रीचं नातं कळत नाही. ज्याला प्रेमाचं नातं कळत नाही. ज्याला मुळात नातीच कळत नाहीत त्या माणसानं मला काहीही शिकवायचं नाही. माझ्या नवर्‍यावर संशय घेतोस? माझ्या जीवाभावाच्या मैत्रीणीला घराबाहेर काढलंस? ही अमेया जीत जैतलकर आज ह्या तुझ्या चौकटीत उभी राहून तुला सांगतेय. माझ्या मैत्रीणीशी आणि माझ्या नवर्‍याशी ज्यानं दगाबाजी केली तो माणूस आयुष्यात कधी सुखी होणार नाही. या माझ्या जन्माला न आलेल्या मुलाची शपथ घेऊन सांगतेय मी माझ्या या वाणीला या वास्तुनं तथास्तू म्हणावं. ‘’

अमूच्या शेवटच्या वाक्यानं मालिनीकाकू भानावर आल्या.

‘’ आमूऽऽ आगं आसं काय बी वायट सायट बोलू नगंस बाई. तू चल बगू हिथंनं. ‘’ त्यांनी पुन्हा तिचा हात धरला. तो हात झिडाकारत अमू त्याच त्वेषानं म्हणाली, ‘’ सोड आई. का नको बोलू मी ह्याला? मोठं पुण्यांचं काम केलंय का यानं? या माणसाला माझा तळतळाट लागणार बघ तू. माझी मैत्रीण माझ्याकडं पाठ फिरवून गेली. माझ्या नवर्‍याला गेले काही महीने अन्न गोड लागत नाहीए. कशासाठी ह्याच्यावर दया दाखवायची मी. ह्या माणसानं घरच्या गृहलक्ष्मीला बाहेर काढली गं! तू कधीच सुखानं झोपू शकणार नाहीस श्री लक्षात ठेव तू. ‘’

मालिनी काकू तिला बळेच हाताला धरुन तिथून घेऊन गेल्या. पण घरात जाईपर्यंत अमूच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. वामनदादांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. पाय जमीनीला खिळल्यासारखे झाले होते त्यांचे. पाण्याने धूसर झालेल्या त्यांच्या डोळ्यांसमोरुन घराबाहेर पडणारी प्रिशा अजून हलत नव्हती. आधी घरातून ती बाहेर पडली आणि आता त्यांच्या लेकाला एका सवाष्णीनं दाराच्या चौकटीत उभं राहून शाप दिला होता. त्यांचा उरला सुरला धीरपण संपला होता अमूच्या त्या बोलण्यानं.

श्री! एवढा तमाशा होऊनही त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नसली तरी त्याचेही पाय थिजल्यासारखेच झाले होते. अचानकच पायातनं जीव गेल्यासारखे वामनदादा धाडकन् जमीनीवर कोसळले. त्या आवाजानं श्री भानावर आला.

‘’ बाबा! बाबा! ‘’

 त्यानं मागे बाबांकडे धाव घेतली. त्यांना पटकन दोन हातांवर उचलंल आणि आत त्यांच्या खोलीत पलंगावर नेऊन ठेवलं. तसाच पळत किचनमध्ये जाऊन पाणी आणलं. त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडलं. कांदा फोडला तो नाकाला लावला.

‘’ बाबा! बाबा! उठा. अहो काय झालं तुम्हांला बाबा? उठा बाबा. ‘’

पण वामनदादा काही शुध्दीवर येण्याची चिन्हं दिसेनात तसा त्यानं हॉलमध्ये येऊन डॉ. वैकल्पला फोन लावला.

‘’ हॅलो, वैकल्प बोलतोय. ‘’

‘’ वैकल्प, मी श्री बोलतोय. प्लीज घरी येतोस का? बाबा शुध्द हरपून पडलेत आणि ते काही शुध्दीवर येत नाहीएत. मी सगळं करुन पाहिलं. ‘’

‘’ बरं बरं मी येतोच लागलीच. अगदी दहा मिनीटांत पोचतोच मी. ‘’

वैकल्प येतोय म्हटल्यावर श्री पुन्हा वामनदादांकडे आला आणि त्यांचे हातपाय चोळायला लागला. तोंडाने सारखा त्यांना बाबा, बाबा उठा म्हणत होता.

तिकडं अमूला घरात नेऊन सोफ्यावर बसवून पाणी प्यायला देऊन मालिनी काकूंनी माधवदादांना ऑफिसात फोन लावला. थोडक्यात घडलेलं सगळं सांगितलं. दिगंबर काका तिथंच बसत हल्ली. दोघेही लग्गेच घरी निघाले.

सोफ्यावर बसलेली अमू अजूनही हुंदकत होती. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेऊन तो टीपॉयवर ठेऊन काकू तिच्याशेजारी बसल्या.

‘’ आमू तुला कितीदा सांगायचं गं! रडू नगंस म्हणून? कळत नाय का तुला? अगं त्या पोरावर वाईट परीणाम हुतील गं! ‘’

तशी ताडकन् अमू त्यांना म्हणाली, ‘’ आई, हे पोरंच वाईट पायगुणाचं आहे बघ. पोटात आलं तर सगळ्यांच्या आयुष्यात वावटळ आणली यानं. जगात आलं तर आणखी काय काय घडवलं काय माहीत. ‘’

आता मात्र काकूंनी आपला सगळा समजूतदारपणा बाजूला ठेवला न् त्या अमूला ओरडल्या.

‘’ बास कर अमे! प्रेमानं समजवाया बगती तर तू माज्याच बोकांडी बसतीस व्हय गं? आगं लोकं तरसत्यात आईबाप होन्यासाठी. जप-तप-नवस-सायास करत्यात लोकं आनी तू देवाच्या देनगीला नावं ठिवतीस व्हय गं? खबरदार जर परत त्येच्याबद्दल काय वायटवंगाळ बोलशीला तर गाठ माज्याशी हाय. र्‍हायली गोश्ट प्रिशी आनी जीतची. ती दोगंबी समर्थ हायती आयुष्यात आलेल्या वादळातनं भाईर पडाया. प्रिशीला तर म्याच ल्हानपनापासनं बगितलीया. आबामाईंच्या बरुबरीनं ती पोर माज्या पदराखाली ल्हानाची मोटी झालीया. तुला काय वाटायचं त्ये वाटूंदेल पण माजा माज्या लेकीवर इश्वास हाय. आनी माजा जावई बावनकशी सोनं हाय. तवा तू तुजी काळजी घे. बाकी सगळं येळेवर सोड. ‘’

…14/09/2020

..........

 *34*

काकूंच्या ओरडण्यानं अमू गप्प झाली. टीपॉयवरचा ग्लास उचलून तिच्या हातात देत त्या तिला समजवत म्हणाल्या, ‘’ पी ते पाणी. आगं देवानं कुशीत वाण दिलं तर त्येचा असा अनमान करु नये पोरी. आनी जे घडलं त्येचं म्हनशीला तर तुला न् मला काय म्हाईत गं? जे घडलं त्ये कदाचित सगळ्यांच्या भल्यासाठनं घडलं असलं तर? लै ईचार करु नगं. मी जीतला फोन लावून बोलवून घेती. बगू त्यो काय म्हनतो त्ये. ‘’

 असं म्हणून काकूंनी जीतला फोन लावला. त्यालापण माधवदादांसारखंच थोडक्यात काय घडलं ते सांगितलं. तो घाईघाईनं ऑफिसातून बाहेर पडला.

श्रीनं फोन केल्या केल्या डॉ. वैकल्प 10 मिनीटातंच पोचला. त्यानं वामनदादांना तपासलं. त्यांना पाहिल्याबरोबर खरतर त्याला शंका आलीच होती की त्यांना डिप्रेशनचा ऍटॅक आलाय म्हणून. तरीही त्यानं पुन्हा खात्री करुन घेतली आणि वामनदादांना ऍन्टीडिप्रेसमेंन्टचं इंजेक्शन दिलं.

‘’ काय रे श्री! काय झालं असं अचानक यांना डिप्रेशनचा ऍटॅक येण्यासारखं? ‘’ शेजारच्या खिडकीला तात्पुरतं सलाईनच्या बाटलीची ऍडजेस्टमेंन्ट करत त्यानं विचारलं.

‘’ फार काही नाही रे! माझं आणि प्रिशाचं भांडण झालं. ‘’

‘’ अरेच्चा! मग त्यात एवढं धक्का बसण्यासारखं काय आहे? तुझ्यासारख्या घुमनमिट्ट्या नवर्‍याबरोबर बायको रोज भांडेल नाहीतर काय करेल? प्रिशाऽऽऽ! मला जरा चहा.... ‘’

‘’ हाक नको मारुस. ती येणार नाही. घर सोडून गेलीय ती. ‘’ वैकल्पचं वाक्य अर्ध्यावरचं तोडत श्री थंडपणे म्हणाला आणि मग वैकल्पची ट्यूब पेटली. त्याला माहीत होतं वामनकाका प्रिशीवर किती प्रेम करतात ते! ती गेलीय घर सोडून म्हणतोय तर त्यामुळेच त्यांना हा असा धक्का बसला असावा; त्यानं तात्काळ मनाशीच सगळी समीकरणं जुळवली.

‘’ श्री, बाकी गोष्टी आपण नंतर बोलू. आता मी त्यांना तात्पुरतं प्रोझॅकचं इंजेक्शन दिलंय. आणि सलाइनमधून बेंन्झोडायझेपिन चढवलंय. पण आपल्याला त्यांना अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवावं लागणार. मी तुझा फोन वापरतोय. आणि नर्स बोलवून घेतोय. सोबत एक वॉर्डबॉयपण येईल आणि सलाईन स्टॅन्ड वगैरे सगळ्याची व्यवस्था करेल. पण एवढं कशावरुन भांडण झालं तुमचं की ती अशी घर सोडून गेली. ‘’ त्यानं फोनची डायल फिरवत पुन्हा श्रीला विचारलं.

श्री काही बोलणार इतक्यात पलीकडून फोन उचलला गेला.

‘’ हॅलो! हां कोण? डॉ. प्रयास. तातडीने श्रीपर्ण निंबाळकरांच्या घरी ऍम्ब्युलन्स पाठवा डॉक्टर. सोबत एक नर्स आणि एक वॉर्डबॉयपण पाठवा. शिवाय गाडीत ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर सगळं असेल याची काळजी घ्या. हो. मी इथेच आहे. ‘’

त्यानं फोन ठेवला. र्श्रकडे वळून त्यानं पुन्हा विचारलं, ‘’ श्री काय झालंय नेमकं तुमच्यात? ‘’ इतक्यात ऑफिसमधून आलेला जीत धावतच तिथे पोचला.

‘’ प्रिशाऽऽऽ! ‘’ अशी हाक मारत असतानाच त्याची नजर फोनशेजारी बसलेल्या वैकल्पवर पडली.

‘’ वैकल्प! तू इथे? काय झालंय? कुणाला? ‘’ असं म्हणत तो दारच्या आत पाऊल टाकणार तोच श्री त्याच्यावर ओरडला, ‘’ ए थांब! ए पाऊलही पुढे टाकायचं नाहीस. जसा आलास तसा माझ्या घरातून चालता हो. इथे कुणालाही तुझी गरज नाहीए आणि इथे कुणीही तुझं नाहीए. जाऽऽऽऽ! चालता हो इथनं. ‘’

‘’ एक मिनिट श्री! तू जीतशी असा का बोलतोयंस? ‘’

‘’ वैकल्प तू आमच्या न पडलेलंच बरं! ‘’ श्रीनं तशातही वैकल्पला दरडावलं.

त्यानं सुचकं नजरेनं जीतकडे पाहिलं. जीतनं त्याला डोळ्यांनीच इशारा केला आणि तो मुकाट्यानं बाहेर पडला.

वैकल्पनं पटकन् त्याच्या नोटपॅडवर काही औषधं लिहिली. ती चिठ्ठी श्रीला देत तो म्हणाला, ‘’ ही औषधं घेऊन ये. तोवर मी आहे काकांकडे लक्ष ठेऊन. ऍम्ब्युलन्ससोबत नर्स आणि वॉर्डबॉयपण येतोय. तो गरज वाटल्यास मशीन सेटअप करेल आणि जाईल मात्र नर्स इथेच थांबेल काकांसोबत. तू काही काळजी करु नकोस. ती शेवटी लिहीलेली कोलोपिनची सलाईन मात्र नक्की आण. ‘’

श्रीनं वैकल्पनं दिलेल्या चिठ्ठीप्रमाणे औषधं आणली तोवर काकांना गरज पडल्यास लावता यावा अशी मशीन सेटअप करुन वॉर्डबॉय बाहेर थांबला होता डॉक्टरांची वाट बघत.

‘’ हे बघ श्री. काकांची नीट काळजी घे. तशी नर्स आहेच इथे. पण तरीही काहीही वाटलं तर लग्गेच फोन कर मी दवाखान्यातच आहे. चल, येऊ मी? ‘’

श्रीनं होकारार्थी मान हलवल्यावर तो बाहेर पडला. जी बाहेरच्या गेटवर त्याची वाट पाहतच होता. वॉर्डबॉयशी बोलून त्याला गाडी ठेउन जायला सांगून वैकल्प गेटजवळ आला. तसा पटकन् त्याच्याजवळ येत जीतनं विचारलं, ‘’ वैकल्प, कुणासाठी आला होतास तू? काय झालंय? प्रिशा बरी आहे ना! ‘’

जीतचा हात हातात घेऊन त्यावर थोपटत वैकल्प म्हणाला, ‘’ काळजी नको करुस जीत. मी वामनकांकांसाठी आलो होतो. प्रिशा नाहीए घरात. ती घर सोडून गेल्यामुळेच त्यांना पॅनीक ऍटॅक आलाय. आताच त्यांना सलाईन लावलंय. इंजेक्शन दिलंय आणि काही वाटलं तर फोन कर असं सांगितलंय श्रीला. पण तुला कसं काहीच माहीत नाही की प्रिशा घर सोडून गेली म्हणून? ‘’ त्याला त्या गोष्टीचं फारचं आश्चर्य वाटत होतं. कारण त्याला जीत पुण्यात आल्यापासून त्याची आणि प्रिशाची मैत्री ठाऊक होती जरी तो तिला जीतच्या लग्नातच पहिल्यांदा भेटला असला तरी.

‘’ नाही तसं नाहीए. मला वाटलं की प्रिशालाच घराबाहेर पडताना काही झालं आणि याला तिची दया वगैरे आली की काय? ‘’

‘’ काय बोलतोयस तू हे जीत? नक्की कुठल्या थराला गेल्यात गोष्टी? आणि तुम्ही दोघे असे एकमेकांच्या जीवाचे वैरी कधीपासून झालात? काहीच कसं बोलला नाहीत मला यार? हीच किंमत केलीत का माझ्या मैत्रीची तुम्ही? ‘’

‘’ काय सांगणार होतो वैकल्प तुला मी? श्री भरकटलाय? त्यानं विचारांची सगळ्यात हीन पातळी गाठलीय? माझं आणि प्रिशाचं अफेअर चालू आहे असा त्यानं ग्रह करुन घेतलाय आणि आमच्यावर वेळी अवेळी पाळत ठेवलीय त्याने? तो अट्टल दारुबाज झालाय? कर्जप्रकरणात पार बुडला असता; पण प्रिशा होती म्हणून वाचला. कुणालाही जुमानत नाहीए. सगळ्या नात्यांचा पार चोथा करुन टाकलंय त्यानं. यातलं काय काय तुला सांगणार होतो मी? आणि आज तुला जे कळलंय तेही अर्धसत्यंच आहे. प्रिशा घर सोडून गेली नाही तर या माणसानं तिला घराबाहेर काढलीय. ‘’

‘’ ओ माय गॉड! अरे काय हा सगळा गुंता होऊन बसलाय जीत? पण यू डोन्ट वरी मित्रा, आय ऍम ऑलवेज विथ यू. मी कायम सोबत असेन. कधीही हाक मार. ‘’

त्यांचं बोलणं चालूच होतं तेवढ्यात जीत आला का बघण्यासाठी बाहेर आलेल्या मालिनीकाकूंना हे दोघेजण गेटवर बोलत उभे असलेले दिसले.

‘’ जीतऽऽऽ ! ‘’ त्यांनी जीतला हाक मारली.

‘’ जीतऽऽऽ अरे अमू बघ कशी करायलीय? ‘’

त्यांच्या आवाजासरशी जीत आणि वैकल्प धावतच आत आले.

‘’ काय झालं आई अमूला? ‘’

‘’ आरं तिला स्वास घ्याला हुईना की रं! तरी मघाधरनं सांगतिया रडू नगं म्हनून; पर माजं म्हातारीचं कोन आयकतंय? ‘’

आत आलेल्या वैकल्पनं तातडीनं तिला सेरॅटोनीनच्या स्मॉल डोसचं इंजेक्शन दिलं.

‘’ जीत तिला तोंडानं श्वास दे. तोवर मी वॉर्डबॉयला हाक मारतो. हिलाही काकांसारखाच पॅनीक ऍटॅक आलाय पण कंडिशन क्रिटीकल आहे. सातवा महीना चालू आहे ना! आलोच मी. ‘’

जीत तिला तोंडानं श्वास देईपर्यंत वैकल्प आणि वॉर्डबॉय मिलिंदने मिळून स्ट्रेचर आणलं तिला त्यावर ठेवलं आणि लगेच तिला गाडीत घातलं. तिथे तिला ऑक्सिजन लावला आणि अमूसोबत जीत आणि वैकल्पही दवाखान्यात गेले.

ऍम्ब्यलन्स गेली आणि थोड्याच वेळात दिगंबरदादा माधवदादांसोबत घरी आले. आल्या आल्याच त्यांना कळलं की आज दिवसभरात मोठ्ठंच महाभारत घडलंय घरात म्हणून. त्या दोघांना सगळी हकीकत सांगून मालिनीकाकू डोळ्यांना पदर लावून सोफ्यात बसलेल्या.

‘’ आजच्या दिवसांत डोस्क्याला लइच तरास झालाय. श्रीनं आपल्या प्रिशीला घराभाईर काढलीया. त्यो धक्का भावजीस्नी सन नाय झाला आनी त्यास्नी आटॅक आला. आपला वैकल्प आलता त्यास्नी तपसाया. त्यो हुता म्हनून निभावलं बगा. त्यो आन जीत गेटार बोलत हुतं तवर अमीलाबी काय तरी झालं. वैक्या सांगत हुता जीतला की अमीची कंडेशन त्ये काय किरटीकल काय म्हनत्यात तशी हाय म्हनून. का वो आमीला आन आपल्या येनार्‍या नातवंडाला काई हुनार न्हाय न्हवं? ‘’

‘’ माले, माले... उगी बरं! रडू नगंस. आगं द्येव हाय म्हनतानी तर ह्ये जग चाललंया न्हवं? येळंला वैकल्प जवळच हुता ही त्येचीच किरपा हाय. उगी.. उगी... तू हिथं बसून रडू नगंस तवर मी आलोच. वामन्याला बघून येतो आनी त्या श्रीचापन समाचार घेतू जरा. कळू तर द्ये का त्येच्या डोस्क्यात अजून काय चाललंय त्ये! पोरीला नेसत्या कापडासकट भाईर काडली भाड्यानं! त्येचाच धस्का घेटला असनार माज्या मित्रानं. ‘’

असं म्हणून दिगंबरदादा उठलेच होते की माधवदादा त्यांना थांबवत म्हणाले, ‘’ थांब दिगू! तू वैनीस्नी बग. त्याचा समाचार म्या घेतो जाऊन. आरं, मी आणि वामन्या जीगरी दोस्त. म्हनून तर जीत आणि श्रीचीबी पक्की मैत्री झाली. इतके दिवस गप हुतो. म्हटलं पोरगं रस्ता चुकलंय आता वळणावर यिल मग वळणावर यिल. पण आता ह्या पाटाच्या पान्याला मलाच वळणावर आणावं लागणारसं दिसतंय. दावतो त्याला वकीलाचा हिसका काय असतू ते! आलोच म्या. ‘’

माधवदादा मुकाट्यानं आत आले आणि सरळ वामनदादांच्या खोलीकडे निघाले. दादांच्या खोलीत नर्स होती म्हणून श्री बाहेर हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसला होता. पावलांची चाहूल लागली म्हणून त्यानं वळून पाहिलं तर वामनदादांच्या खोलीकडे जाणारे माधवदादा त्याला दिसले. तसा तो ठामपणे त्यांना म्हणाला, ‘’ काका, जाऊ नका तिकडं. जसे आलात तसे परत जा. आणि आम्हांला आमच्या परिस्थितीत सोडून द्या. जा तुम्ही इथून. ‘’

त्याचा आवाज कानांवर पडताच माधवदादा जागेवरच थांबले. पुढच्याच क्षणी ते तसेच श्रीच्या समोर गेले. त्यांना बघून गडबडीनं श्री उभा राहिला. तसं त्याला काही कळण्याच्या आधीच त्यांनी त्याच्या कानाखाली फाडकन आवाज काढला. त्या फटक्यानं श्री कोलमडून सो॑यावर पडला. भरदुपारी त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. तो भानावर येण्याआधीच काकांनी त्याचं बकोट धरुन त्याला समोर उभा केला आणि ते त्याच्यावर कडाडले.

‘’ माज चढलाय का? कुनाला अडवतोस तू? मला अडवायची हिंमत कशी झाली म्हनतो मी तुझी? माज्या मित्राला भ्येटायला आडिवनार व्हय तू मला? माज्या आदीगर जल्माला आलास काय? भाड्या, ह्या हातांनी ल्हानाचा मोठा केलाय मी तुला; मला उलटं बोलतूस व्हय रं! आरं जल्माला आल्या आल्या तुज्या नरडीला नख लावलं आसतं तर आज ह्ये दिस बगायची येळ आली नसती माज्या मित्रावर. आता फकस्त येकचं कानाखाली बार काढलाय; ह्येच्याफुडं तोंडातनं येक शबुदपन काडलास तर वळूला तुडीवत्यात तसा तुडवीन तुला मी. माज्या दोस्ताचा पोरगा हाईस म्हनूनसान येवड्यावरच सोडतो तुला. नायतर भाडखाऊ असल्या वागन्यासाठनं हिथंच उबा चिरला असता तुला मी. त्याच्या लेकीसारख्या प्रिशीला नेसत्या कपड्यासकाट घराभाईर काडलीस? कुटं फेडशीला हे पाप? आरं तिनं या घरासाठी निस्ता पैका नाय लावला; रक्ताचं पानी करुन तुला न् ह्या घराला उबं केलंय तिनं. त्याचे आबार मानायचे सोडून चांगलं पां फेडलंस की तिचं! लाऽऽज कशी वाटली नाय तुला इतक्या खालच्या थराला उतरताना? कुनावर संशय घेतलास तू? माज्या लेकावर? ह्या कर्माची फळं हिथंच भोगशीला. त्यो वरचा सगळ्याचा हिशोब बराबर ठेवत असतू. लक्षात ठ्येव ह्येची लै मोठ्ठी किंमत मोजावी लागलं तुला. आनी ह्ये बी ध्येनात र्‍हावूं देल का आमू, वामन्या आणि प्रिशी तिगांपैकी कुनाला काई झालं तर तुला परत उबा र्‍हान्याच्या लायकीचा ठेवत नसतो ह्यो माधवराव! हट्ट... ‘’

असं सगळं श्रीला ऐकवून माधवदादा वामनदादांच्या खोलीत गेले. खोलीच्या दारात उभारुन हा सगळा तमाशा बघणारी नर्स खालमानेनं बाजूला झाली. श्री झेलपाटल्या अवस्थेत तसाच सोफ्यावर पडून राहिला. त्याच्या लक्षात आलं की ज्याअर्थी इतकी सगळी माणसं प्रिशाच्या बाजूने बोलतायत म्हणजे आपलंच कुठेतरी, काहीतरी चुकतंय. पण स्वतःची चूक मान्य केली तर झुकावं लागतं आणि माणसाचा अहंकार त्याला तसं करु देत नाही. श्रीही या गोष्टीला अपवाद नव्हता.

वामनदादा अजूनही बेशुध्दच होते. वैकल्पच्या ट्रिटमेंटमुळे त्यांची तब्येत थोडीफार स्टेबल झाली असली तरी म्हणावी तशी सुधारणा नव्हतीच. माधवदादा जाऊन कॉटवर त्यांच्याशेजारी बसले. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘’ वामन्या, दोस्ताची अशी थट्टा करत्यात व्हय रं? तू असा पडून र्‍हायलास तर आपल्या लेकीनं कुनाच्या तोंडाकडं बगायचं रं? चल उट लवकर दोगंबी जाऊ आनी प्रिशीला शोधून परत आनू. काय हुन बसलंया ह्ये? येळ कदी असा दिस दावलं असं कदी सपनातबी वाटलं नाय बग! समदं चांगलं चाललं असताना कुन्या कंसाची आपल्या ह्या नांदत्या गोकुळाला नजर लागली काय म्हाईत! पर तू काय बी काळजी करु नगंस. तू हिथंनं उटस्तवर म्या ह्यातनं कायतरी मार्ग काडतू बग! पण तू मात्र दोस्ताला दगा दिवू नगंस हां! ‘’

वामनदादांच्या निमित्तानं स्वतःच स्वतःला धीर देऊण माधवदादा तिथून बाहेर पडले.

22/09/2020

..........

*35*

प्रिशा घरातून बाहेर पडली; ती भिरभिरल्यासारखी चालत राहिली. डोक्यात काही म्हणजे काहीच विचार नव्हते तिच्या. जसा रस्ता फुटेल तशी ती नुसती चालत होती. खुप वेळानंतर तिच्या लक्षात आलं की त्या कॅफेसमोर आली होती चालत चालत जिथे ती जीतला शेवटची भेटली होती. त्या कॅफेला पाहून तिला पोटात ओरडणार्‍या कावळ्यांची जाणीव झाली. तशी ती त्यांच्या बाहेरच्या बाजूला लावलेल्या एका छत्रीखालच्या रिकाम्या खुर्चीत बसली. काही वेळातच एका वेटरनं पाण्याचा ग्लास तिच्यासमोर आणून ठेवला आणि म्हणाला, '' फक्त दहाच मिनिटं वाट पहाल का मॅडम? आतलं एक टेबलं रिकामी होईल. '' तिनं नुसतीच मान हलवली. वेटर आत निघून गेल्यावर तिनं त्या ग्लासातलं पाणी पिलं आणि लगेच ती तिथून बाहेर पडली. नाहीतरी हातात पैसे नसताना ती काय आणि कसली ऑर्डर देणार होती? ती कॅफेमधून बाहेर पडली तरी विचारतंच्या गर्तेतून काही तिला बाहेर पडता येत नव्हतं. काय करायचं? कसं करायचं? कुठं जायचं? या चक्रव्यूहात ती आत आत घुसत चालली होती मात्र बाहेर पडायचा मार्ग काही तिला दिसत नव्हता. डोळ्यांसमोर भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहणारे वामनदादा तिला दिसत होते. कानात दूरुन कुठूनतरी येणार्‍या अमूच्या हाका वाजत होत्या.

वामनदादांना धीर देऊन माधवदादा तिथून बाहेर पडले पण जाताना त्यांनी सोफ्यावर बसलेल्या श्रीकडे साधा कटाक्षही टाकला नाही.

अमूला आधीच वैकल्पनं माईल्ड सेरॅटोनीनचं इंजेक्शन दिलं होतं. ऍम्ब्युलन्समध्ये ठेवल्यावर त्यानं लगेचंच तिला ऑक्सीजन लावला आणि ते हॉस्पीटलकडे निघाले. वैकल्पचा दवाखाना काही हॉस्पीटल म्हणावा एवढा मोठा नव्हता. मोजून 10-12 कॉट होत्या तिथं. फक्त इमर्जन्सीची सोय मात्र चांगली होती. अमेयाला लागलीच आयसीयूत ऍडमीट केलं. बीपी चेक केला. ईसीजी काढण्यात आला. आणि मग इतका वेळ स्ट्रेसमध्ये असणारा वैकल्प थोडा नॉर्मल झाला. बाहेर बसून हे सगळं बघणार्‍या सचिंत जीतजवळ येऊन बसत तो म्हणाला, '' काळजी नको करुस जीत. तिला आधीच दिलेल्या इंजेक्शनमुळे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे तूर्तास तरी. पण, तरीही तिला आपल्याला किमान 48 तासांसाठी अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवावं लागणार आहे. कसंय सातवा महीना आहे ना तिला! काळजी तर घ्यायलाच हवी. स्पेशली मुलाच्या हृदयाचे ठोके नॉर्मल आहेत हे महत्वाचं. या सगळ्यामुळं तिची प्री-मॅच्युअर डिलीव्हरी नको व्हायला. म्हणून मघाचं इंजेक्शन माईल्डचं दिलं मी. जरा जरी डोस वाढला तर कळा सुरु होण्याचे चान्सेस होते. बरं, ते सगळं तू माझ्यावर सोड. इथे तिची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तू मात्र आता प्रिशाला शोधायला जा. ''

'' बरं! पण तू अमूकडं नीट बघशील ना? ''

'' जीतऽऽऽ! अरे मी इथे तुझा मित्र असण्याआधी एक डॉक्टर आहे आणि आपली मैत्री एवढी जुनी नक्कीच आहे मी मी माझ्या नंदितासारखी तिची काळजी घेईन. बाय दी वे तुला सांगायचं राहून गेलं की नंदिता जॉईन झालीय मला आता. आणि ती गायनॅक आहे. त्यामुळे तू अमूची काळजी करणं सोड. '' वैकल्पनं त्याच्यावर डोळे वटारले. तसं जीतनं एकदा काचेतून पलिकडच्या नळ्यांमध्ये गुरफटलेल्या अमूला पाहीलं आणि तो वैकल्पचा निरोप घेऊन बाहेर पडला.

प्रिशा चालत स्टॅन्डला येऊन पोचली. बराच वेळ ती विचार करत एस् टी स्टॅन्डला बसून राहिली. मग जसं जसं डोकं शांत झालं तशी तिच्यातली पूर्वीची प्रिशा बाहेर आली. कितीही काही झालं तरी डोकं ताळ्यावर ठेऊन परिस्थितीवर ताबा मिळवण्यात तिचा हातखंडा होता. आता तिच्या लक्षात आलं की आपण पोस्टात पैसे ठेवलेत. जसं हे लक्षात आलं तसं तिचं डोकं भन्नाट वेगानं काम करायला लागलं. ती पटकन उठली आणि बाहेरच्या रिक्षा स्टॅन्डवर गेली. रिक्षा केली आणि ती आनंदनगर पोस्ट ऑफिसला गेली. तिथून तिने आपल्या खात्यातून पैसे काढले. तशीच परत रिक्षाने स्टॅन्डला आली. तिच्या सुदैवानं कराडला जाणारी गाडी स्टॅन्डला लागलीच होती. ती तर ती असं म्हणत ती गाडीत चढली. जलद गाडी असल्यानं तिन तासांतचं गाडीनं कराड गाठलं. तिथं एतरुन तिनं आधी बूथवरुन दिवाकरला फोन लावला.

'' हॅलो, कोण बोलतंय? ''

'' हॅलो, मी प्रिशा बोलतेय आपण कोण? ''

'' प्रिशा ताई, मी मंदा. बोला की. ''

'' मंदा, दिवाकर आहे का गं? ''

'' व्हय की. बाजूच्या खोलीत कायतरी काम करत्यात. ''

'' बोलवतेस का त्याला? अर्जंट काम आहे माझं. ''

'' व्हय की. '' असं म्हणून मंदानं रिसीव्हरवर हात ठेवला आणि दिवाकरला हाक मारली.

'' आवो! आयकलं का? आवो! लवकर या हिकडं. प्रिशाताईंचा फोन हाय. त्यास्नी तुमच्यासंगट आर्जंट कायतरी बोलायचं हाय. आला का वं? ''

पलीकडून प्रिशाला हे सगळं एकू येत होतं आणि ती स्वतःशीच काहीतरी आठवून हसत होती.

'' हां हॅलो ताई. बोला की. ''

दिवाकरच्या आवाजानं ती भानावर आली.

'' दिवाकर, मी संध्याळपर्यंत पोचतेय तिथं. माझ्या जेवणाची काहीतरी व्यवस्था कर. आणि माझी वरची खोली सा॑ करुन घे. बाकी गोष्टी मए तिथं आल्यावर बोलू आपण. चल ठेवते फोन. माझी गाडी लागलीय. ''

असं म्हणून फोन ठेऊन प्रिशा निघूनपण गेली. दिवाकर मात्र विचारात पडला. इतक्या वर्षांनी ताई इकडं येतायत पण त्यांच्या आवाजावरुन काय सगळं आलबेल वाटत नव्हतं त्याला. किती गडबडीनं सगळं त्यांनी.

'' का ओ! कसला येवढा इचार करताय? काय म्हनाल्या ताई? ''

'' बाकी बोलायला येळ न्हाई. आदीगर जाऊन ताईंची खोली साफ करुन घेतो म्या. तवर तू सैपाकाचं बघ. संध्याकाळपतूr पोचतो म्हनल्यात ताई. '' दिवाकर मंदाच्या मागे घाई करु लागला.

'' अशा कशा घाई घाईनं येत्यात? त्ये काय बोलल्या न्हाय व्हय? ''

'' सगळं रामायणं हिथंच आयकायचं हाय व्हय. आल्यावर सांगतिला की ताई. लै खारीसारखी चकाचका करत असती निस्ती. जा त्यापेक्षा जरा हात चालीव. ''

मंदाला फाट्यावर मारुन तो प्रिशाची खोली साफ करायला निघून गेला.

दवाखान्यातून बाहेर पडलेल्या जीतनं जंग जं पछाडलं प्रिशाला शोधण्यासाठी. ती कुठं कुठं जाऊ शकेल त्या सगळ्या टिकाणी त्यानं तिचा तपास केला. अगदी रेल्वेस्टेशन, बसस्टॅन्ड, हॉस्पीटलही सोडली नाहीत त्यानं. पण इतकं करुनही शेवटी तो रिकाम्या हातानंच परत आला संध्याकाळी.

मालिनीकाकूंनी त्याला पाणी आणून दिलं.

'' आई, दवाखान्यातून काही फोन आला होता का? कशी आहे अमूची तब्येत आता; काही सांगितलं का वैकल्पनं? ''

'' म्हंजी? तुमी नव्हता व्हय तिथं? ''

'' आवो, थांबा. जरा बसू तर द्या की पोराला. '' दिगंबरदादांनी त्यांचा प्रश्न अर्धवट तोडला.

'' व्हय. आलता फोन वैकल्पचा. बरी हाय म्हनला आमू. माधव गेला हाय तिकडंचं. आवो, त्ये गेलतं प्रिशाला शोधाया. वैकल्प म्हनला की तू काळजी नगं करुस. बरं प्रिशीचा काय पत्ता लागला काय? ''

'' नाही बाबा. मला वाटतं ती गावाकडे गेली असणार. ''

'' हां तसंच आसल. नाय तर ती कुटं जाईल दुसरीकडं? पुन्यात काय आपलं नातलग हायती व्हय. बरं मंग तुमी कसं करायचं म्हनता? आता काय पयल्यासारख्या सारक्या सारक्या गाड्या जात न्हाईत रतनपूरला. व्हाया व्हायाच जावं लागतंय बगा. आसं करता का? उद्या सकाळच्याला निगता का गाडी घिवून? म्यापन येतो संगती. कसं येकाला दोगं बरं! काय म्हनता? ''

'' मी विचार करतो की आताच निघावं गाडी घेऊन. ''

'' नगं बया. इतक्या राती अपरातीचं तुमी गाडी घिवून नगा जाऊ. आदीच घरात काय चाललंया बगताय न्हवं? त्यात अमू हास्पिटलात, भावजी असं उतानी पडल्यालं. रातीचं काय लागलं बिगलं तर काय करावं? रात वैर्‍याची आसती बगा. ''

'' आई, अहो अमूसुध्दा तिच्याच काळजीनं आहे ना दवाखान्यात? तिला बरंच वाटेन मी गेलो तर. आणि इथं तुम्ही आहात, बाबा आहेत. माझे बाबा आहेत. शिवाय वैकल्प अमूला त्या लहान बहीणीसारखा नंदितासारखाच समजतो. त्यामुळं मला इथली तेवढी काळजी नाही वाटत. काळजी वाटतेय ती प्रिशाची. माझ्यामुळं वागली ती अशी. कॉलेजात असताना तिचा स्वभाव बदलायला गेलो नसतो तर पोर आज अशी रस्त्यावर आली नसती. होलपाटून टाकला असता श्रीला तिनं संशय घेण्यावरनं. काय काय सहन करावं लागलं तिला? सगळं सगळं माझ्यामुळं झालं. वामनकाकांना झटका आला. का? कारण प्रिशा गेली. कुणामुळं? माझ्यामुळं. अमूला दवाखान्यात नळ्यांमध्ये बांधून घातलंय का? प्रिशा गेली. कुणामुळं माझ्यामुळंच ना! मग आता मलाच तिला शोधायला जायला हवं हे जे सगळं बिघडलंय ते सगळं माझ्यामुळं. आता मलाच ते सावरायला हवंय. मी मुर्खपणा केला. तिच्यापासून लपवून ठेउन की श्री आमच्यावर संशय घेतो म्हणून. मीच गाफील राहिलोय त्याच्या मनात आमच्या नात्याविषयी वाढणार्‍या विषवेलीबाबत. आता तरी मला ठामपणे काहीतरी स्टॅन्ड घ्यायलाच हवा. मी आताच जातो तिला शोधायला. ती नक्कीच गावच्या घरी गेली असणार. आता जातो आणि सकाळी तिला सोबत घेऊन येतो. ''

'' जावयबापू! असा काय बाय इचार करु नगा. आवो जे झालं ते झालं. ते का आता दुरुस्त करता येनार हाय व्हय? चुक काय तुमच्या येकट्याचीच हाय का? आमी सगळीपण तेवडी जिम्मेदार हाओत की. घरातली मोटी मानसं म्हनून आमी आदीच हात घातला असता या परकरनात तर आज जे दिसतया त्यातलं काय बी दिसलं नसतं. तुमी उगा सवताला आरोपीच्या पिंजर्‍यात उबं करुन दोष दिवू नगासा. आनी माली म्हनती ते बी खरंच हाय की. आमच्या सगळ्यांच्या हिथं असन्यात आणि तुमच्या हिथं असन्यात जमीन अस्मानाचा फरक हाय. शेवटी नवर्‍याला बायकू आनी बायकूला नवराच जवळचा असतूया. बाकीची समदी आपली तोंडी लावाया. आजची रात जाऊंद्याल. उद्या फाट्याच्या पार्‍यालाच आपन दोगं बी जाऊ रतनपूरला आनी प्रिशीला परत घिवून यिवू संगती. मंग तर झालं का नाय? ''

आता त्यांना हो म्हणण्याखेरीज जीतला काही उपाय दिसत नव्हता. कारण दोघांनीही त्याचा गाडी घेऊन आताच निघण्याचा प्लॅन हाणून पाडला होता.

कराडवरुन सुटलेली गाडी व्हाया तासगांव करत पुढे चालली होती. खिडकीतून येणार्‍या वार्‍याने तिला चांगलाच डुलका लागला होता. सगळा दिवसभर वरवर झाली होती नुसती. सकाळी बाबांच्या सोबत बसून खालेल्या अर्ध्या भाकरीच्या तुकड्यावर होती ती अजून. भुकेनं डोकं ठणकायला लागलं होतं. पण गाडी सुरु झाल्यानंतर आलेल्या संध्याकाळच्या गार वार्‍यानं तिला जरा शांतता मिळाली आणि तिनं डोळे मिटून घेतले. ती डुलक्या घेतच होती की तिला अचानक कसला तरी अनाहूत स्पर्श जाणवला. तासगांवच्या स्टॅन्डवर गाडीत एकजण चढला होता. तो रिकामी जागा बघून प्रिशाच्या शेजारी येऊन बसला होता. एकतर रात्रीची वेळ त्यात गाडीत फक्त ड्रायव्हरच्या केबीनमधला दिवा लागलेला. त्याचाही उजेडच पडलेला. त्यात आयती एकटी बाई बसलेली मिळालेली. त्यानं विचार केला, चांगली संधी मिळालीय तर टाकावी घुमसून. कुटं जानारे रातच्याला बोंबलायला. कांगाव केलाच तर दिवू ढकलून तिच्यावरच आनी होउ मोकळे. तिच्याशेजारी बसून त्यानं हाताची घडी घातली आणि बोटं पहिल्याच प्रयत्नात तिच्या ब्लाऊजपर्यंत घोसाळली. बिच्चारा, त्याला काही कळायच्या आतच फाडकन उलट्या हाताची चपराक त्याच्या थोबाडावर बसली. आधीच दिवसभराचा त्रागा. डोक्यात रागानं नुसतं थैमान घातलेलं. वरवर सगळं शांत दिसलं तरी तळ्याच्या पोटातला ज्वालामुखी धुमसायला लागला होता. आयता सापडला हाताला हा नवखा प्राणी.

'' अग्गायाया! फुटलं माजं तोंड. हात हाय का हातूडा म्हनायचा ह्यो. बाईमानूस हाय का हिजडा हाय. ''

तो केवढ्यानं तरी कळवळला.

'' ए हांडग्या! उट हिथनं. ए ड्रायवर आयकू यिना व्हय तुला? हे बेनं कोकालतंय ते? लाव की गाडीला ब्रेक आनी ढकल ह्येला खाली. ''

त्या गोंधळाच्या आवाजानं कंडक्टर धावतच मागे आला. तोवर ड्रायव्हरनं करकचून ब्रेक मारुन गाडी थांबवली आणि भपकन् सगळ्या गाडीतले दिवे लावले.

'' का रं भडव्या? हिजडा कुनाला म्हनतूस? तू हिजडा, तुजी आय हिजडा तुजा बाप हिजडा फुकनीच्या तुजं समदं खानदान हिजड्याच्या अवलादीचं हाय. लाज वाटत न्हाई व्हय रातीच्या टायमाला येकटं दुकटं बाईमानूस बघून तिच्या पदराला हात घालताना? आंऽऽऽ! बुणग्या, उत्तर हिथं खाली नायतर खुर्दाच करतो बग मी तुजा. ए कंडक्टर बगतो काय रं डोळं फाडून? उतरतो ह्याला खाली का तुज्याबी कानाखाली जाळ काडू. भाड्यास्नी संदी मिळाली की डाव सादायचा असतू. ''

'' आवो, ताई काहीतरी गैरसमजूत झाली असन. चुकीनं लागला असन हात. ''

कंडक्टर मिळमिळ्या सुरात तिला समजवायला बघत होता.

'' ए गतकाळीच्या! कुनाला सांगतो रं तू चुका बिका. ये हिकडं ये तुला दावते त्यानं काय केलंतं ते! आता मुस्काट वाजवायचं बंद कर आनी ह्याला आदीगर खाली उतर नायतर आता ड्युट्टीवरचा हिसका हिथंच दावतो बग म्या. '' प्रिशानं ती पोलीस असल्याचं सरळ सरळ ठोकून तिलं आणि ही मात्रा बरोबर लागू पडली. बाई असली म्हणून काय झालं पोलीसाशी ना दोस्ती चांगली ना दुश्मनी! असा साळसूद विचार करुन त्यामनी त्या माणसाला पुढच्या सीटवर बसवला आणि त्यानंतरच्या सटॉपवर उतरवला. मग मात्र रतनपूर येईपर्यंत तिच्या वाट्याला कुणी गेलं नाही.

स्वरा... 23/ 09/ 2020

 37

प्रिशाची फ्लाईट कोल्हापुरातून वेळेत सुटली. ती तासाभरात मुंबईला पोचली. तिथं एक तासभर थांबून ती पुन्हा डिरेक्ट फ्लाईटनं कानपूरला निघाली. इथे जेव्हा वामनदादांच्या चितेला अग्नी दिला जात होता तेव्हा प्रिशा नुकतीच कानपूर विमानतळावर उतरुन टॅक्सीत बसली होती. आगीचा भडका तर दोन्ही ठिकाणी सारखाच उडाला होता फरक फक्त इतकाच होता की एक शरीर मृत होतं आणि दुसरं जिवंतपणी जळत होतं.

तसं प्रिशाचं कानपूर कनेक्शन फार जुनं होतं. कानपूरमध्ये राहत होती तिची लाडकी कानू मावशी अर्थात डॉ. कानन गोयल. ती स्वतः फिजिओथेरपीस्ट होती आणि तिचा नवरा डॉ. कविश गोयल कानपूरातला विख्यात गायनॅक सर्जन होता. या कविशसोबत काननची ओळख झाली ती मुंबईत मेडिकल कॉलेजला असताना. ओळखीचं रुपांतर प्रेमात व्हायला काही फारसा वेळ लागला नाही. तशी दोघंही एकमेकांला साजेशी होती. कविशच्या घरच्यांना कानन पसंत होती पण आडकाठी होती बाबासाहेब थोरात आणि आनंदीबाईंची. मुलगा हिंदू होता, डॉक्टरकी शिकत होता एवढीच काय ती जमेची बाजू वाटत होती त्यांना. नाहीतर तो महाराष्ट्रीय नाही, मराठा नाही तर परजातीचा आहे अशा काही वजावटीच्या बाजू होत्याच त्यात. हे सगळं काननला माहीत होतं म्हणून ती आणि कविश दोघेही शिक्षण संपेपर्यंत मूग गिळून गप्प बसले होते या विषयावर. कविशचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी त्याचे बाऊजी करणार होते. त्यामुळे काननला तसा फार काही त्रास होणार नव्हता. पण जे आईच्याही कानांवर गेलं नाही ते सगळं काननच्या धाकट्या बहिणीला सुहासिनीला मात्र इत्थंभूत माहीत होतं. कानन तिच्यापासून काही लपवूच शकत नसायची. त्या दोघी इतक्या एकमेकीत गुंतलेल्या होत्या की त्यांची फक्त शरीरंच काय ती वेगळी होती. कॉलेजचं शिक्षण संपवून कोल्हापूरला परत आलेल्या काननने हा विषय पुन्हा एकदा आईवडीलांसमोर काढला.

'' आई-दादा अहो एकदा त्याला भेटा तरी! तुम्हांला आवडेल कविश. खुप चांगला मुलगा आहे तो. माझ्यासाठी म्हणून तरी एकदा त्याला भेटा. '' काननचा सूर अजून विनवणीचाच होता.

'' ह्ये बघा कानन, तुम्हांला आमी शिकाया पाठवलं होतं मुंबईला. ही असली थ्येरं कराल असं सपनातपण वाटलं नाही आमाला. इथं काय तुमच्यासाठनं मुलं नाहीत लग्नाला म्हणून त्या तिकडं उत्तरप्रदेशात जाऊन पोचला तुम्ही. मी म्हणतो तुमीच त्या पोराचा नाद सोडा आणि येक डाव लग्नासाठी हो म्हणा. न्हाई तुमच्यासाठी एकेक खानदानी अस्सल मराठा उभा केला तर नाव लावत नसतो बघा आम्ही बाबासाहेब थोरात म्हणून. ''

'' आई तू तरी सांग की समजवून दादांना. मला कविश आवडतो. प्रेम आहे माझं त्याच्यावर. आम्हांला लग्न करायचंय. ''

'' कानन तुम्ही जीभंला जरा लगाम घाला. काही कळतंय का? आपण बापासमोर उभे राहून काय बोलतो याचा काही पाचपोच नाही राहिला का तुम्हांला? आणि ते काही खोटं तर सांगत नाहीयेत ना! इथली मुलं मिळत नाहीत असं आहे का? ''

आता मात्र काननमधली वाक्पटू उफाळून आली. शेवटी ती कॉलेजमधली एक नंबरची ट्रॉफी जिंकणारी वाक्पटू होती.

'' हां! तर मुलं मिळत नाहीत म्हणे. दादा मुलं लाख मिळतील ओ पण मला नकोयत ना इथली मुलं. माझं कविशवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे एवढी साधी गोष्ट आहे ही. आता तुमचे जरा वजावटीचे मुद्दे बघूयात. काय मुलगा देखणा आहे, सुसंस्कृत आहे, हिंदू आहे या बाबी सोडल्या तर बाकी काहीच जमेचं सापडत नाहीये का तुम्हांला त्याच्यात? कशाला हवाय जातीचा मुलगा? आपल्या संस्कृतीत कुठं जातीच्या भिंती होत्या असं कधी ऐकलंत का? स्वतः श्रीकृष्णाने जी गोष्ट गीतेत सांगितली की माणसाला जात नाही. जर जात असेल तर ती फक्त माणसाच्या कर्माला आहे. कर्मामुळेच एखादा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. चांद्रवंशी राजाला त्याच्या निच कर्मामुळे वनात आयुष्य कंठावं लागलं तर वाल्याकोळ्यासारखा दरोडखोर स्वतःच्या उत्तम कर्मांमुळे वाल्मिकी ऋषी म्हणून नावारुपाला आला. अशी किती उदाहरणं देऊ म्हणजे तुमचं हे जातीवरचं प्रेम कमी होईल? आणि याआधी कुणी आंतरजातीय लग्नं केली नाहीत का? मी काय जगातली पहिली मुलगी आहे का आंतरजातीय लग्न करणारी? कृष्णाच्या सगळ्या बायका काय त्याच्यासारख्या यादवकुलीन क्षत्रिय होत्या? जमदग्नी ऋषींची बायको रेणुका त्यांच्यासारखी ब्राह्मण होती का? ती एक क्षत्रिय राजकन्या होती ना! राजा शांतनुची दुसरी बायको कोळ्याची मुलगी होती. अशी कितीतरी उदाहरणं असताना तुम्ही काय हे जात बित घेऊन बसलात कळत नाही मला. मी शेवटचं सांगते तुम्ही परवानगी दिलीत तर तुमच्या समक्ष आणि नाही दिलीत तर तुमच्या अपरोक्ष मी लग्न करेन तेही फक्त कविशसोबत. '' असं म्हणूनती फणफणत आपल्या खोलीत निघून गेली.

सुहासिनीला ताईचा स्वभाव चांगलाच माहीत होता. तिने एखादी गोष्ट ठरवली की तो तिचा शेवटचा निर्णय असायचा. तिला वाटलं होतं की आता दादा तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात खंबीर पावलं उचलतील. पण दादांनी तिला खोलीत कोंडून ठेवणं याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. तसे दादा कधी कुणाला मारण्या बिरण्याच्या बाजूचे नव्हतेच; त्यांचा आवाज म्हणजे डरकाळी. एवढाच त्यांचा दरारा घरात होता. खमक्या तर आनंदीबाई होत्या. त्यांची नजर चोरुन काही करणं म्हणजे दिव्य असायचं. पण काननने सुहासिनीला हाताशी धरुन कविशपर्यंत चिठ्ठी पोचवली. त्यानुसार पहाटेच सुहासिनीनं आईच्या किल्ल्यांच्या जुडग्यातून किल्ली काढून घेऊन काननला बाहेर काढली. कविश आणि तिनं देवळात लग्न केलं आणि नंतर ते आशिर्वाद घ्यायला परत आले. पण, त्या परत आलेल्या नवपरिणित दाम्पत्याला आशिर्वाद द्यायचं सोडून बाबासाहेबांनी काननला इस्टेटीतून बेदखल केली. त्यापुढे जाऊन त्यांनी तिला सांगितलं की याउप्पर आम्ही समजू की आम्हांला एकच मुलगी झाली. यापुढे कधीही तुमचं तोंड बघणार नाही. जशा आलात तशा परत निघून जा. हे थोरातांचं इज्जतदार घराणं आहे इथं कुणा ऐर्‍यागैर्‍याला थारा देत नसतो आम्ही. या सगळ्याचा सुहासिनीला फारच मनस्ताप झाला. ती काननपेक्षा 4 वर्षांनी लहान, बी.ए. च्या पहिल्या वर्षांला होती तेव्हा. काननला घरातून बाहेर काढल्यावर ती नकळत मागच्या दारानं जाऊन ताई भावोजींना भेटली होती. जाताना तिनं ताईच्या हातात महालक्ष्मीचा छोटा फोटो दिला. देताना म्हणाली अक्का हिला विसरु नकोस आणि हिच्यासंगती मलापण विसरु नकोस. कानननं सुहासिनीला गळामिठी मारली. दोघी बहिणींनी दुराव्याच्या कल्पनेत मोटभर रडून घेतलं. कानननं तिला वचन दिलं कुठंही असले, कशीही असले तरी माझा पत्ता आणि ख्यालीखुशाली कळवत राहिन तुला. त्याचदिवशीच्या रेल्वेने ते दोघे कानपूरला रवाना झाले. कानपूरात काननचं खूप छान स्वागत केलं अम्मा बाऊजींनी. अम्मांनी तर तिला सांगितलं की बचवा कबहौ मैय्या की याद आवै तो हमार गोदी मां सर रख लेना। अरे उहां रहे कां और ईहा रहे का? मैय्या का प्यार दुलार तो सबहौ जगह एक जैसन होवत है। काननला तिच्या निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप झाला नाही. तिनं सुहासिनीला दिलेला शब्द कायम पाळला. सुहासिनीचं बळवंत पाटलाशी लग्न होईतो ती तिला तिच्या माधवी नावाच्या मैत्रीणीच्या पत्त्यावर पत्रं पाठवत होती. बळवंतशी लग्न झाल्यावर मात्र तिला राजरोस पाटलांच्या पत्त्यावर पत्रं पाठवण्याची मुभा मिळाली. आतातर ती सुहासिनीला फोन करुनही गप्पा मारायची. बाबासाहेब आणि आनंदीबाईं कडक असले तरी प्रागतिक होते. त्यामुळे तसा त्यांनी काननच्या निर्णयाला फारसा विरोध केला नव्हता. मात्र बाबासाहेबांना शेवटच्या दिवसांत उपरती झाली. त्यांनी आपलं मृत्यूपत्रं बनवून दोघी बहिणीत आपल्या ईस्टेटीची समान वाटणी केली. बाबासाहेब गेल्यानंतर आनंदीबाई तिर्थयात्रा करण्यासाठी गेल्या. सोबत स्वतःच्या देहदानाची कागदपत्रं घेऊन फिरत असल्यानं सुहासिनीला फक्त त्या गेल्याचं प्रयागच्या हॉस्पिटलमधून कळवण्यात आलं. त्याप्रमाणे मग तिनं त्यांचं बळवंतच्या हातून त्यांचं उत्तरकार्य करुन घेतलं. कानन आणि कविशला अनेक प्रयत्नानंतरही मूल झालं नाही. काननला बाऊजींनीच सल्ला दिला की असं मुल नाही म्हणून दुःख करण्यापेक्षा आपल्या समजात जी अनेक अनाथ मुलं आहेत त्यांनाचं स्वतःची मुलं समजून काम कर. कविशकानने त्यांचा हा सल्ला मानून अनेक अनाथाश्रम आणि समाजोपयोगी संस्थांमध्ये आपला वेळ आणि पैसा गुंतवून टाकला. लग्नानंतरच्या दोनेक वर्षांतच सुहासिनीची कूस उजवली. आणि प्रिशाचा जन्म झाला. मात्र सुहासिनी आधीपासूनच तोळामांसा प्रकृतीची असल्यानं तिच्यासाठी हे बाळंतपण खूपच अवघड झालेलं. शिवाय तिच्या एकंदरीत प्रकृतीकडे पाहता डॉक्टरांनी तिला दुसरा चान्स नकोच अशी सक्तीची ताकिद तिली होती. त्यामुळे ताडफाड निर्णय घेणार्‍या बळवंतानं तिथंच ठरवून टाकलं की प्रिशा हेच त्यांचं एकमेव अपत्य असेल म्हणून. आबामाईंना हा निर्णय फारसा पटला नसला तरी त्यांनाही सुहासिनीच्या जीवाची जोखीम नकोच होती. त्यामुळे त्यांनीही लेकाच्या ह्या निर्णयाला रुकार दिला. सुहासिनीनं प्रिशाच्या लहानपणापासूनचे सगळे फोटो काननला टपालानं पाठवले होते. कविशकाननने ते सगळे फोटो अगदी छान जपून ठेवले होते.

चकेरीच्या विमानतळावर उतरुन टॅक्सी करुन प्रिशा आर्यनगरला पोचली. येताना तिनं काहीच कळवलं नसल्यानं तिचं येणं हे कानूमावशीसाठी सरप्राईज होतं. आर्यनगरला उतरुन तिनं विश्रामबागमधल्या 11 नंबरच्या बंगल्याची डोअरबेल दाबली.

स्वरा... 2/10/2020

………………..

38

'' अरे प्रिसा बिटिया! कैसन हो? आवा, आवा। अंदर आवा। भाभीजीऽऽऽ प्रिसा बिटिया आय रही। '' अंजनाने काननला आवाज दिला. आत आलेली प्रिशा हॉलमध्येच बॅगसकट उभी राहून कानूमावशीचं घर बघत होती. याआधी कधी इथे येण्याचा प्रसंगच न आल्यानं तिच्यासाठी हे सगळं वातावरण तसं नवीनच होतं. हॉलमधल्या भिंतीवर प्रिशाचाच कॉलेजमधला बुलेटवरचा फोटो एनलार्ज करुन लावला होता. जवळ जवळ सोफ्यावरची सगळी भिंत त्या एकाच फोटोच्या वाट्याला आली होती. मोठी फ्रेंच विंडो. त्याच्या बाहेरच्या बाजूला फुलझाडांसाठी बनवलेल्या बकेट रॉमध्ये कितीतरी वेगवेगळ्या रंगांची डोळ्यांना आणि मनाला गुंतवून ठेवणारी फुलं वार्‍यावर डुलत होती. ट्रीपल स्क्वेअरमध्ये ठेवलेल्या सोफ्याच्या दोन कोपर्‍यातही फुलदाणीत टपोरे गुलाब ठेवलेले होते. दोन सोफ्यांच्या मधल्या कोपर्‍यात ठेवलेल्या काचेच्या टेबलावर पाण्याचा जग, ग्लास यांचा ट्रे ठेवला होता. मधोमध असणार्‍या लाकडाच्या टेबलला काचेचा अपर बेस लावला होता. तिथे बरीच वेगवेगळ्या भाषेतली मासिकं आणि पेपर ठेवलेले तिला दिसले. एवढ्या सगळ्या भाषा येतात माऊला न् काकांना? तिच्या मनात प्रश्न येऊन गेला. हा हॉल बेसडाऊन करुन बनवला असल्याने त्याला वर जायला पायर्‍या केल्या होत्या. त्या पायर्‍या चढून वर गेलं की समोर मोठा जिना आणि डाव्या हाताला किचन होतं. त्या मोठ्या जिन्याच्या मधोमध उभी राहून काननमावशी प्रिशाचं तिच्या घराचं चाललेलं निरिक्षण बघत होती.

'' का? चीजन को देखेखातिर इतनी दूर आई हो का? मौसी के गले नाही मिलोगी का? ''

कानूमावशीच्या आवाजानं दचकून प्रिशानं वर पाहिलं आणि हातातली बॅग तिथंच टाकून ' कानू डार्लिंग! ' असं मोठ्याने ओरडून ती मावशीच्या दिशेने पळत सुटली. अनेक वर्षांनी म्हणता म्हणता ती शाळेनंतर आज पहिल्यांदाच कानूमावशीला भेटत होती. सुहासिनी असताना एकदा ती आणि कविशकाका घरी येऊन गेल्याचं तिला पुसटसं आठवत होतं. भेटी जरी फारशा होत नसल्या तरी पत्राच्या माध्यमातून त्या कायमच एकमेकींच्या सोबती राहिल्या. खाली हॉलमध्ये लावलेला तिचा फोटो तिनंच कानूमावशीला कॉलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून पाठवला होता. कानूमावशीच्या या अशा सोबत असण्यामुळेच तिनं पुण्यातून निघताना थेट कानपूरला येण्याचं धाडस केलं होतं. तिला माहीत होतं कानू तिला मुलगीच मानते. आणि तसंही आता तिच्या आयुष्यातून श्रीमुळे जीत आणि अमूसुद्धा तर तिला दुरावलेच होते. आताच्या परिस्थितीत कानू आणि कविशच तिचा आधार होते.

जीतनं प्रिशा जाऊ शकेल अशा सगळ्या ठिकाणी तिचा शोध घेणं चालूच ठेवलं. दोन दिवस जंग जंग पछाडल्यानंतर ते रिकाम्या हातानं पुण्यात परत आले. येताच त्यांना कळंल की अमूला घरी आणलंय. त्याच दिवशी वामनदादांनीही या जगाचा निरोप घेतला. अमू तशी मुळची बोलक्या स्वभावाची पण परिस्थितीनं हताश होऊन ती हल्ली गप्प गप्प रहायला लागली. पण जीत गप्प बसणार्‍यातला नव्हता. त्यानं प्रिशाचा शोध सुरुच ठेवला. पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंगची तक्रार नोंदवली. सोबत तिचे काही फोटोपण तो ठाण्यात देऊन आला. पोलिसांनी ते फोटो जवळपास सगळीकडे सर्क्युलेट केले होते. काननच्या घरी वेगवेगळ्या भाषांमधली मासिकं आणि पेपर यायचे चांदनीसाठी. चांदनी तिची दत्तक मुलगी. त्यापैकीच एका मराठी पेपरात काननने तिचा फोटो पाहिला.

'' ओ हो! तुम तो बडी खुबसुरत दिख रही हो इस फोटो में। पर ई का तुमको गुमशुदा काहे बताया है इसमें? '' असं म्हणत चहा पिता पिता तिनं तो फोटो प्रिशाला दाखवला.

तिच्या फोटोखाली लिहिलं होतं.

हरवली आहे.

सौ. प्रिशा श्रीपर्ण निंबाळकर

वर्ण गव्हाळ, केसांचा रंग काळा, डोळ्यांचा रंग भूरा, उंची साडेपाच फूट

कुणाला वरील वर्णनाची व्यक्ती आढळल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.

खाली जीतचा नंबर दिला होता. तिनं तो पेपर पाहिला. ती जाहीरात वाचली आणि रागाने टराटरा ती तो पेपर फाडायला लागली.

'' अरे, अरे! रुक मेरी अम्मा। क्या कर रही है तू ये? किसका गुस्सा? किसपर निकाल रही हो? हुआ का है? ''

'' काय म्हणतात तुमच्या कानपूरात? माझ्या आयुष्याचे बारा वाजलेत. ती काल अंजना नव्हती का म्हणत! ''

'' अच्छा ऊं! सब तिलंडी में चला गया और जिंदगी झंड बन गयी है। ''

'' हां हां! तेच ते! ''

'' तो इसमें का मुस्किल है? तू भी सिख ले कनपूरिया हिंदी। पर पहले ये बता तू ऐसे बोल काय रही? तू अपनी मर्जी सें आई है तो ये अखबारवाले तुम्हें गुमशुदा काय कह रहे? मुझे नहीं बतायेगी का? का बात हुई है? तू आई है तबसें मैने तुझे कुछ पुछा नहीं ईसका ये मतलब थोडी ना है की तू मुझे कुछ बताए ही ना? देख बिटिया मै जानती हूं की मै तुम्हांर मैय्या नाही हू पर तुही बताओ का मै तुम्हांरी मैय्या से कम हू का? बोल दे मेरे बच्चा जो दिल में दबाय बैठी है सब बोल दे। दिल के जख्मों को दबाय रख्खा तो वो नासूर बन जाते है। मै कितने दिनों से देख रही हू की तू ठीक से खाना नहीं खाती, रात रातभर जागती रहती हो। कही बाहर नहीं निकलती, सिर्फ खिडकीमें बैठी रहती हो। बचवा ऐसन जिंदगी नाही जी जात। ''

कानूमावशीच्या समजवण्यानं प्रिशाच्या संयमाचा बांध मोडला आणि ती मावशीच्या कुशीत शिरुन रडू लागली. तिच्या डोक्यावरुन मायेनं हात फिरवत मावशी म्हणाली, '' रो ले बचवा। जी भरके रोले फिर जिंदगी में ये आसू देने वाले को रुलायेंगे तुमहम। ''

कविश त्याच्या कामासाठी बाहेर चाललेला तर बाहेर हॉलमध्ये ह्यांचा इमोशनल ड्रामा चालू होता. त्यानं जाता जाता डोळ्यांनीच काननला विचारलं, ' क्या हुआ? बिटिया क्यू फुटफुटकर रो रही है? '' त्यावर काननने त्याला डोळ्यांनीच उत्तर दिलं, ' तुम जाओ अपने काम। हम देख लेंगे। '' पण तो कसला ऐकतोय. त्यानं तिला मोठ्यानं विचारलं, '' अरी भागवान, इको का हुईबा? कौनो पहाड गिर पडा है का? ई गंगामैय्या में बाढ काहे आय रही? ''

'' हाय दय्या! काहें बेचारी पें ताने कसे हो? बोल देती हूं इ मठाधिसी अपने पास ही धरौ। काहे पचडे में पडत हौ? जाऔ यहॉं से नहीं तो अबही लभेड हुई जइहै। ''

त्यांच्या कानपूरी हिंदीतल्या भांडणाने प्रिशा तिचं रडणं विसरुन हसायला लागली.

'' काय म्हणाली तू माऊ काय हुई जइहै? ''

'' लभेड। माने मराटीमदी टंटा, टंटा। ''

प्रिशा लहान मुलासारखी आणखीनच खळखळून हसायला लागली.

'' इ देखौ। यही तो चाह रहे हम। ऐसेही हसती रहो। हसते हुए बहुत सुंदर दिखती हो तुम । चलो मै निकलता हूं । मुझे देर हो जाएगी । '' असं म्हणून कविश बाहेर पडला.

किचनच्या दारात खांद्यावर कपडा टाकून उभी असलेली चांदनीपण हे सगळं बघत होती. तिच्याकडे लक्ष गेलं तशी कानन तिला ओरडली, '' का? तुम का ताक रहीं हो? कौनो नाटक चल रहा है का? मदत करना दूर सिर्फ तमासा देखे जा रही हो? जाओ अपना काम करो। ''

तिच्या ओरडण्यामुळे चांदनी पटकन् आत निघून गेली. तशी कानन प्रिशाला म्हणाली, '' चलो हम अंदर जाके बैठते है। इन लोगोंकी ना नाक बडी लंबी होती है। कही से भी कुछ भी सुंघ लेती है । बाद में जाके गासिप जो झाडनी होती है। चांदनी तो फिरभी अपनी है। मगर का है ना अपने घर के राज अपने तक रहे तो ही अच्छा है। वरना मंडी लगनें में कौनो देर थोडी ना लगती है? ''

'' पण माऊ, चांदनी तर तुझी मुलगी आहे ना? ती कशाला गॉसिप करेल? ''

'' अरे प्रिशा तू अभी नासमझ है। वो बात मै चांदनी के लिए नहीं बोली; उसके पिछे खडी रह के अंजना सुन रहीं थी सारी बाते। ये अपनी मराटीमें बोलते है ना लेकी बोलू सुन को समझी। वोही किया मैनें। ''

'' अगं माऊ त्याला लेकी बोले सुने लागे म्हणतात. पण तू चांदनीला कसं दत्तक घेतलंस माऊ? ''

प्रिशानं हे विचारलं आणि काननची टकळी चालू झाली. त्यावरुन तिला सारखी अमूची आठवण येत होती.

'' ये चांदनी 15 साल की थी तबसें मेरे पास है। हम जिस अनाथाश्रम के लिए काम करते है ना वहीं से इसे अडाप्ट किया है हमनें । तू इसकी ये झाडू पोछेवाली कपडों पें मत जा; अच्छी खांसी अंग्रेजी झाड लेती है वो। मेरा सारा काम अब वहीं तो देखती है। पता है संस्कृत साहित्य में वर्णन कि गई वास्तुकला पें पी एच् डी करनी है महारानी को। ''

'' अगं मग ही अशी का राहते? मी आल्यापासून तर तिला घरातली कामं करतानाच बघितलं. ही अभ्यास बिभ्यास करते तरी कधी? ''

'' कैसे देखेगी तू? अपने कमरे सें बाहर निकलेगी तब तो देखेगी ना! वो दोपहर 4 बजे निकल जाती है लायब्ररी में और 8 बजे वापिस आती है। मै तो बोल बोल के थक गई । पर वो है की मेरी एक नहीं सुनती। हमेंशा ये ईन घरवाले कपडोंमें रहती है। अपना काम छोडके कभी कहीं बाहर आती जाती नहीं । और सबसे बडी बात सुन ये लडकी ना आल इंडिया बिल्डर्स असोसिएशन की सलाहकार है । ''

प्रिशा तर चांदनीबद्द‍ल हे सगळं ऐकून चाट पडली होती.

...स्वरा... 

11/10/2020

........

*३९*

'' पण माऊ मला हे काही पटलं नाही बघ! तू तिला कशाला बोललीस? सरळ सरळ अंजनाला बोलायचंस ना! पोरगी पी एच् डी करायची म्हणते आणि तू तिच्याशी अशी वागतेस? ''

'' ए देखो बचवा! हम कौनो गलत बात तो किए नहीं। अरी ओ अंजना कितने सालों सें हमारे यहॉ काम कर रही है। पर का बात है ना के वो इन्सान की आदत मरे के बगैर जाती नाही है। ऊ तो चांदनी भी समझ गई है की हम ओ का नाही अंजना को बोले है सब। तुम उसकी चिंता नाही करौ। हमें अपनी बात सुनाऔ। ओ निचे अखबार में तुम्हें गुमशुदा काय लिखै रहै? का श्री के साथ कौनो झगडा हुई बा का? जौन उ को छोड ईहा आय गई तू? ''

'' मी नाही सोडलं त्याला. प्रेम करते मी त्याच्यावर आणि प्रेम करणार्‍या माणसाला सोडून आपण राहू शकतो का गं? त्यानंच मला त्याच्या आयुष्य आणि घरातून बेदखल केलंय. ''

'' का बात कर रहीं हौ? उसकी इतनी हिंमत के मेरी बच्ची को घर से बेघर किए है? रुको तुम अभी कविश अंकल को बोल के उसके उपर केस ठोक देती हू। मेरी बेटी का घर छिन लिया! अब तो मैं उसे दर दर की ठोकरें खानेपें मजबूर ना करु तो अपना नाम नहीं लगाऊंगी कानन गोयल। ''

'' माऊ! माऊ! शांत हो. माझी काहीच तक्रार नाहीये त्याच्याविषयी. ''

''ह्यँ! ई कौनो बात हुई का? काए टोपा बन रहीं हो? ''

'' म्हणजे? ''

'' अरे जौन आदमी दिमाग सें पैदल, बुद्धि सें गधा और अकल से बैल होता है औऊ को हम कहते है टोपा। कुछ घुसा दिमाग में ? के सिर्फ भुसा भरा पडे है औऊ के अंदर? सूरज की रौशनी में सब कुछ साफ दिखने पर भी तुम उसे देखना नहीं चाहती? का करे भगवान! '' काननला प्रिशाच्या या वागण्याचा आता जास्तच राग यायला लागला होता. हे म्हणजे जरा अतिच होत होतं. ज्या माणसानं घराबाहेर काढलं त्याच्या विरोधात बोलायचंही नाही? हा काय प्रकार आहे? कुणी इतकं वेड्यासारखं प्रेम करतं का? या अशा वागण्याला काही अर्थच नाही.

'' नाही माऊ! माझी त्याच्याविषयी काही तक्रार नाही याचा अर्थ मी त्याला माफ केलंय असं होत नाही. ही प्रिशा आहे. प्रिशा बळवंत पाटील. ती काळ वेळ बघून बरोबर पलटवार करते. एकच वार आणि टांगा पलटी घोडं फरार! ''

'' ए हे हे! का बात कहीं है वाह! अब तू लगती है बलवंत की बेटी। पता है ना तेरे बाप का गुस्सा एकदम रावन के जैसा था। आर देखे ना पार कर दिए सिधा वार। रावननें भी तो ऐसा ही किया था अपने जिजाजी कें साथ; खतम ही कर डाला हमेसा के लिया उ का किस्सा! ''

'' नाही माऊ. हे चुकीचं आहे. मला श्रीला संपवायचं नाही. ना मला आमचं प्रेम संपवायचं आहे. उलट मला त्याला पुन्हा उभा करायचा आहे. तेही त्याच्यातल्या काही गोष्टी कायमच्या काढून टाकून. ''

'' पर बेटा तेरा तो लव्ह मॅरेज था ना? तू तो खुष भी थी इस शादी सें; फिर ये सब कैसे हो गया? और तेरा वो बेस्ट फ्रेन्ड जीत? उसने कैसे कुछ नहीं किया? ''

'' अगं तोच तर शोधतोय मला. तू पेपरात जी जाहीरात पाहिलीस ना माझ्या हरवण्याची; त्याच्या खाली दिलेला फोन नंबर जीतचाच तर होता. हे त्याच्याशिवाय दुसरं कुणीच करु शकणार नाही खात्री आहे माझी. माझा सध्या कुणाचा तरी बुद्दूबैल झालेला नवरा यातलं काहीच करणार नाही. त्याचा इगो आड येईल लगेच. हे जे काही घडलंय त्या सगळ्याचं कारण शोधून काढायचंय मला अगदी मुळापासून. पण त्याची अजून वेळ आली नाहीये. ''

असं म्हणून तिनं कानू मावशीला जीतनं तिला जे सांगितलं, घराबाहेर पडण्याआधी तिनं जे अनुभवलं ते सगळं रामायण अथपासून इतिपर्यंत सांगितलं.

'' हे भगवान! ये सब तो बहुत बुरा हुआ बच्चा। जानती हु मै की हम जिससें प्यार करते है उसका प्यार गर कम हो जाये तो कितने बुरे हाल हो जाते है दिल कें। मेरी दोनों बच्चीयों के साथ ही ये सब क्यू होने दिया तूने भगवान? '' कानूमावशीच्या नकळत चांदनीचा किस्सा प्रिशासमोर बाहेर पडला.

'' म्हणजे चांदनी? तिचंही प्रेम होतं का कुणावर? ''

'' हां बेटा। पर उसका नसीब बहुत अच्छा था के विहाय के बारें में हमको सब शादी के पहले ही पता चल गया। उसे लगता था की चांदनी मेरी अपनी बेटी है तो मेरे बाद सारी जायदाद उसकी हो जाएगी। फिर वो उस जायदादपर ऐश करेगा। मगर जैसे ही उसे पता चला की चांदनी मेरी अडाप्ट की गई बेटी है और उसे खुदको ही मेरी जायदादमें सें कुछ नहीं चाहिए; बस तभी सें उसने मेरी बच्ची को अकेला छोड दिया। और उसी दिन चांदनी ने तय कर लिया की वो अब शादी नही करेगी। बस अब सिर्फ घर, लायब्रेरी और कभी कभार मिटिंग के लिए जो घर सें बाहर निकलती है, उतनाही। मेरे सारे काम ईसीलिए अपने हाथ में ले लिए की कही अकेलापन उससें कुछ गलत करवा ना ले। उसे तो मै बोल बोल के थक गई के ऐसे मत रहा कर। घर सें बाहर निकला कर। जिंदगी हर किसीको एक और मौका जरुर देती है अपनी गलती सुधार नें का। बस हमें ही ऑंख खोलकर उसें ढूंढना चाहिए। ''

आता प्रिशाच्या लक्षात आलं की ही चांदनी अशी का वागते ते!

'' तूने आगे क्या करने का सोचा है बेटा? '' विचारांच्या तंद्रीतून प्रिशाला बाहेर काढत कानूमावशीनं विचारलं.

'' अजून काही विचार केला नाहीये गं मी माऊ! कारण अजूनही बर्‍याच गोष्टी मन आणि मेंदूतून म्हणाव्या तशा पुसटल्या नाहीत. ''

'' चल ठीक है। कोई बात नहीं। अभी तो चल कें खाना खाते है और इसके बाद सें तू वो करेगी जो मै तुझे बताऊंगी। ''

जेवणाच्या टेबलावर कानूमावशी चांदनीला म्हणाली, '' चांदनी बेटा आज मै तेरी पहचान एक पढीलिखी अनपढ सें कराऊंगी। '' हे काय नवीनच म्हणताना चांदनीच्या हातातला घास तसाच राहिला.

'' ई है वो पढीलिखी अनपढ; मेरी बेटी प्रिसा। अभी 2010 में भी ये लडकी ना इमेल इस्तेमाल करती है ना ही फेसबुक और ना ही ईसकें पास अपना खुदका मोबाईल फोन है। ''

हे ऐकून चांदनी गालातच हसली. किती नाटकी आहे अम्मापण ना! एवढीशी गोष्ट सांगायला केवढा ड्रामा क्रिएट केला.

'' तो क्या हुआ अम्मा? हम किस खेत मुली है? अरे दिदी का तो पुरा मेकओव्हर ही कर डालते है। मैने बाबा सें बहुत कुछ सुना है दिदी के बारें में। कैसे वो बुलेट पें घुमती थी, कैसे झगडे करती थी और साथ में अपनों का कैसे ध्यान रखती थी। हम ऐसा करते है उस पुरानीवाली दिदी में जरासी नईवाली दिदी मिलाके कुछ तो नया बना देते है। क्यू दिदी चलेगा ना? ''

'' हॉं! जरुर चलेगा पर मेरी एक शर्त है। तुझें भी मेरे साथ खुदको बदलना पडेगा। ये घर में बैठकर उदासी की सितार छेडनेवाली लडकी सें मै कुछ नही करवाऊंगी। ''

प्रिशाच्या या वाक्यावर कानूमावशी आणि चांदनी दोघांचीपण तोंडं उघडीच राहीली. दोघींच्याही तोंडात एक एक गुलाबजाम घालत ती म्हणाली, '' ऐसे नहीं देखो। आय ऍम अ फास्ट ग्रास्पर, न लर्नर ऍट माय अर्ली स्टुंडन्ट डेज. अगर यहॉ आनेके इतने दिनों बाद भी मै तुम्हांरी भाषा ना सिख सकी तो सब तो तिलंडी में जाय है। ''

'' अरे दिदी तुमनें तो कमाल कर दी। अब सुनो मै ये सोच रहीं हू की आज की मेरी लायब्रेरी को छुट्टी। हम मेरे रुम में जाके पीसी पें सबसें पहले तुम्हांरे लिए एक अच्छासा कॉलेज ढूंढते है। जो हमारे घर से ज्यादा दूर ना हो। फिर हम वहॉ तुम्हारी एक्सटर्नल ऍडमिशन के लिए अप्लाय करेंगे। शाम को बाबा आ जाएंगे तो हम साथ मिलके बुलेट और मोबाईल खरीदने जाएंगे। फिर कल फर्स्ट हाफ में मै आपको अपनी पार्लरवाली आशिया कें पास ले जाऊंगी। ये आपको सूट नहीं करनेवाली जुडा चोटी सब हटाके मै आपको एकदम क्लासी मॉडेल बना दूंगी। देखते ही लडके फिदा हो जाएंगे। और जिजू तो आपको सामने खडे होके भी पहचान नहीं पायेंगे। ''

प्रिशाला असे पटापट निर्णय घेणार्‍या चांदनीचं इतकं कौतुक वाटत होतं की ते तिच्या डोळ्यांतून नुसतं ओसंडत होतं. त्या दोघी आत गेल्या तशी त्यांच्या मागे जात कानूमावशी म्हणाली, '' अरे मुझें भी तो अपने ग्रुपमें शामिल कर लो। ''

स्वरा... 13/10/2020

…………….

*40*


दादासाहेबांचा बंगला लायटिंगने झळझळत होता. धाम बिल्डर्स त्यांच्या रस्त्यातून बाजूला झाल्याचं सेलिब्रेशन ठेवलं होतं त्यांनी आपल्या बंगल्यावर. फार कुणी जमलं नव्हतं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी फार कुणाला बोलवेलं नव्हतं असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.


भैय्यासाहेबांच्या ओळखीचे चार-दोनजण, दिक्षित आणि त्याचा डावा हात कदम तेही अगदी आपल्या गळ्यात लटकणार्‍या साधनसामग्रीसकट अशी मोजकीच माणसं होती तिथं. नुकताच तिथं आणखी एका महत्वाच्या व्यक्तीचा प्रवेश झाला होता. तो होता जयदेव घोरपडे. हा माणूस म्हणजे दादासाहेबांचा बुरख्यातला गुलाम होता ज्यानं ऐनवेळी बाजी पलटवायला मोठी मदत केली होती. तंदूरी रोटी, चिकन, मटण, अंडी या सगळ्याचा नुसता पूर आला होता तिथं. दारुसोबतच्या स्नॅक्समध्ये पनीर, चिकन, मटण याशिवाय फरसाणा, शेंगदाणे, चिप्स यांनी टेबल भरुन गेलं होतं. दारुतही रम, व्हिस्की, व्होडका, बिअर, वाईन आणि नुकती नुकती बाजारात आलेली ब्रिझर असे अनेक प्रकार घेऊन वेटर सतत इथून तिथून फिरत होते. पार्टी सुरु होऊन बराच वेळ झाला होता. कदमनं हा सगळा प्रकार पहिल्यांदाच अनुभवला होता. त्यामुळं आधी तो सामील होता होता जरी चाचपडला असला तरी आता त्यालाही इतरांसोबत चांगलीच लय सापडली होती. सगळेजण पिऊन बर्‍यापैकी तर्र झाले होते आणि आपापल्या खिशातली झाकलेली कार्ड काढून बढाया मारण्यात गुंतले होते.


कदम येता जाता वेटरला पकडून मिळेल त्या ग्लासातली मदिरा नरड्याखाली रिचवत होता. त्याला तर कुठली पिऊ आणि किती पिऊ असं झालं होतं. बरं हे नुसतं पिण्याच्या बाबतीत नाही तर खाण्याच्या बाबतीतही त्याचं असंच झालं होतं. त्याची डिश पदार्थांनी इतकी ओसंडली होती की तिच्याकडे बघूनच मुळामुठेला चुकून पूर आलाच तर काय होईल याची झलक दिसत होती. ताळतंत्र सोडून कशीही आणि कुठलीही पिल्याने त्याला दारु एवढी चढली होती की त्याला ना स्वतःचा तोल सावरता येत होता, ना हातातल्या भरलेल्या डिश आणि ग्लासचा, ना गळ्यात लटकवलेल्या कॅमेर्‍याचा. काऊंटरवरुन झुलत झुलत तो डिशमधले अर्धे पदार्थ आणि ग्लासातल्या दारुची जमिनीला आंघोळ घालत कसातरी भावेशजवळ पोचला आणि त्यानं हातातली डिश जेमतेम टेबलावर ठेवली; दारुचा एक घोट घेतला आणि दिक्षितला म्हणाला, '' आऽयऽलाऽऽ! कदम तुमची बोटं चांगलीऽऽच तुपात बुऽडऽलीऽत की! सॉली... सॉली... सॉली... माऽय मिऽश्... मिश्... मिश्टेऽऽक हां गुर्जी.. तूऽ तूऽ तूपाऽऽत नाय तुऽऽऽमी तं दा... दा... दारूत आंऽऽऽऽगोळ करताय की! ''


'' ए गप! श्श्शूऽऽऽ. जास्त मोठ्यानं बोलू नको. आपलं सगळं गौडबंगाल दादासाहेबांना कळलं तर आपल्याला हिथनं तुकड्यात बाहेर काढतील ते! '' दिक्षित अजून बर्‍यापैकी शुध्दीत होता म्हणून त्यानं वेळीच कदमच्या जिभेवर लगाम घातला.


'' श्शूऽऽऽ! श्शूऽऽऽ! बऽरोऽबऽर आहे गुर्जी. एकऽदम चऽचूऽप... आऽऽ... मिऽऽ.. गुपऽचुप. ''


इकडे दिक्षित आपल्या माणसाला गप्प रहायला सुचवत होता आणि दुसरीकडे दादासाहेब, भैय्यासाहेब दिग्या नायकवडी अर्थात जयदेव घोरपडेचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करत होती. त्याची पाठ थोपटत भैय्यासाहेब म्हणाले, '' वा दिग्या! बेमालूम नाटक वठवलं की रे तू! ''


राजन दादासाहेबांचा सीए होता. पण त्याचा ऑफिसशी फारसा संबंध येत नसे. याची ओळख भैय्यासाहेबांनीच करुन दिली होती दादासाहेबांसोबत. तो आणि भैय्यासाहेब कॉलेजला असताना एकाच रुममध्ये राहत होते. राजनने नवीन नवीन सीएचं काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याला जम बसवण्यासाठी कुणीतरी चांगलं गिर्‍हाईक हवं होतं. भैय्यासाहेबांसोबतच्या भेटीत त्यानं ही गोष्ट त्यांना बोलून दाखवली होती आणि भैय्यासाहेबांनी चांगलं कमिशन देण्याच्या बदल्यात त्याला दादासाहेबांच्या गळ्यात बांधलं होतं. पण या राजनचा दादासाहेबांना फायदाच झाला होता. हा राजन बाकी दुनियेत सगळ्यांच्या ऑफिस, दुकानात आरामात ये जा करत असे पण दादासाहेबांनी त्याला कधीही त्यांच्या ऑफिसात पाय टाकू दिला नव्हता. कारण त्यांची सगळी राजकारणं आणि त्यातले फासे फंदे करण्याचं मोक्याचं ठिकाण म्हणजे त्यांचं मोरवनचं ऑफिस होतं. त्यांनी जेवढी म्हणून कारस्थानं केली, कट शिजवले ते सगळे त्यांच्या कार्यालयापासून लांब मोरवनच्या ऑफिसात बसूनच. लोकांसाठी मोरवनच ऑफिस भैय्यासाहेबांचं होतं; किमान त्यांनी लोकांचा तसा ग्रह तरी करुन दिला होता. याच मोरवनच्या मिटिंग हॉलमध्ये बसून त्यांनी दिक्षित आणि भैय्यासाहेबांच्या मदतीनं धाम बिल्डर्सला ढासळवण्याचं त्यांच्या लेखीचं पुण्यकर्म केलं होतं. राजनला जी कुठली कागदपत्रं लागत ती त्याला एका निरोपासरशी किंवा फोन केल्या केल्या त्याच्या ऑफिसात पोचवली जात. त्यामुळे तोही खुष होता. त्याची पायपीट आणि एकंदरीतच त्याचे कष्ट वाचायचे याबाबतीतले. दादासाहेबांच्या बंगल्यावर चाललेल्या आजच्या पार्टीची राजनला काहीच गंधवार्ता नव्हती. त्याला तातडीनं दादासाहेबांच्या सह्या हव्या होत्या रिटर्नच्या कागदांवर; म्हणून तो आधी मोरवनच्या ऑफिसला गेला तर तिथं त्याला टाळं दिसलं म्हणून त्यानं चपराशाला विचारलं आज ऑफिस लवकर बंद कसं तर तो म्हणे की भैय्यासाहेब दादासाहेबांच्या घरी गेलेत. त्याला आता तिकडे जायचा कंटाळा आला होता पण सह्या गरजेच्या असल्यानं तो झक्कत त्यांच्या घराकडे असा विचार करुन निघाला की आता घरी परत जाताना ही कागदं कुरीअर करुन टाकू.


तो तिथं पोचला तर तिथला गाण्याचा गोंगाट आणि लायटिंग बघून त्यानं अंदाज लावला की घरचं काहीतरी कार्य असावं. बाईक स्टॅन्डला लावून दारापर्यंत पोचला तर त्याच्या लक्षात आलं की त्याचा अंदाज एकशे एक टक्का चुकलाय. पण आता त्याला वेगळाच प्रश्न पडला की नशेतल्या दादासाहेबांकडून सह्या कशा घ्यायच्या? शेवटी मरु दे. काय व्हायचं ते होऊ दे! उद्याच घेऊ सह्या असा विचार करुन तो परत फिरलाच होता इतक्यात उघड्या खिडकीतून त्याच्या कानांवर भैय्यासाहेबांचा आवाज पडला, ' वा दिग्या! बेमालूम नाटक वठवलं की रे तू! चांगलंच तोंडघशी पडलं ते धाम बिल्डर्स आणि आमचा शत्रूपक्ष जीत जैतकर आणि श्री निंबाळकर. '


ही दोन्ही नावं ऐकली आणि राजनची उत्सुकता चाळवली. त्याला एका फटक्यात कॉलेजचे दिवस डोळ्यांसमोर तरळले. इंदरच्या तोंडावर ओतलेला चहा, सुशान केलेला मॉडेलचा दगाफटका सगळं सगळं अगदी जसंच्या तसं तरळून गेलं. आणि अचानकच त्याला मध्यंतरी पेपरात धाम बिल्डर्स तोट्यात गेल्याची बातमी वाचलेली आठवली. म्हणजे धाम बिल्डर्स या दोघांचं होतं? आणि ह्या दोघांनी ते पार डुबवलं? अशा स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तो खिडकीच्या जरासा आतल्या अंगाला सरकून त्यांचं बोलणं ऐकू लागला.


भैय्यासाहेबांनी पाठ थोपटल्यावर कसाबसा ओशाळा हसत दिग्या म्हणाला, '' आवो कसऽलं काय सायेब! सगऽऽऽळं केलं ते दादासाहेबांऽऽऽच्या सांगन्यावरऽऽऽनं. ''


'' हो खरंय दाद्या! पण ते निभावणं कठीण होतं. तू ते चांगलं केलंस त्यासाठी हे ठेव ५० हजार आहेत. कामाला येतील. ''


'' कशाऽऽऽला कशाऽऽऽला साहेऽऽऽब! '' दिग्या त्यांनी केलेल्या तारीफमुळे जास्तच लाजला होता.


इतक्यात तिथं आलेल्या भावेशनं ते शब्द ऐकले आणि त्याची जेमतेम चढलेली नशापण उतरली. साला केलं कुणी आणि तारिफ कुणाची होतेय? त्याचा पाराच चढला. पण शेवटी तो भावेश होता. आपल्या भावना सहसा लोकांसमोर उघड न करण्यात वाकबगार माणूस. तो दोनच पावलात झोकांडत तिथं पोचला आणि दादासाहेबांच्यासमोर हात पुढे करुन म्हणला, '' द्या मला द्या. मला गरज आहे त्याची. '' त्यानं असं म्हणताच दिग्यानं झडप घालून ते नोटांचं पुडकं हस्तगत केलं.


'' र्‍हावूं दे साहेऽऽऽब. तसापऽऽऽन माऽऽऽज्या गाडीचा हऽऽप्ता भरायचाऽऽऽय. ''


'' बाकी दिक्षितला काय मिळतील तेवढे कमीच आहे. लाखांची इस्टेट असणारा आयुष्यभराचा गरजू माणूस आहे तो! काय दिक्षित खरं ना? '' भैय्यासाहेबांनी इतक्या दिवसांचा मनातला सल शेवटी बोलून दाखवला.


पण त्यांच्या बोलण्यानं दारुची नशा उतरलेल्या दिक्षितमधला नाग फणा काढून फुत्कारला, '' मापं कुणाची काढतोस रे भैय्या? दिक्षितची? त्याच्या चपलेची तरी सर आहे का तुला? मी होतो म्हणून आज पार्टीत टेंभा मिरवतोयस तू. आणि माझीच लायकी काढतोस? तू काय करतो रे त्या ऑफिसात बसून चकाट्या पिटण्याशिवाय दुसरं? घंटा कळतं का इंजीनिअरिंगमधलं? पाट्या टाकू वसाड्या. एक गोष्ट तरी केलीस का भडव्या मी सांगितलेल्यातली? सगळा आपला बोलाचा भात आणि बोलाच्या कढीचा मामला. मी सांगितलेली सगळी गोष्ट तुझ्या त्या निकमनं केलीय. दादासाहेबांनी मोकळा हात दिला म्हणून. त्या कदमला गाडी घेऊन दिली. ठीक आहे सेकंडहॅन्ड आहे पण दिली हे महत्वाचं. तुझ्यासारखं काम सांगितल्यावर लगेच शेपूट घातलं नाही त्यानं. वेळेवर त्याला चांगल्या कॅमेर्‍यासाठी पैसे दिले म्हणून तो जीत आणि प्रिशाचे फोटो काढू शकला ते तसले! त्यांनीच माझ्या सांगण्याप्रमाणे टेंडरच्या रकमा बदलल्या. ह्या! ह्या! बिनकामाच्या दिग्याला मीच जयदेव घोरपडे नावाची बडी आसामी बनवून घेऊन गेलो होतो. त्याचीपण सगळी व्यवस्था दादासाहेबांच्या सांगण्यावरुन निकमनंच केली. तू म्हणजे नुसता खायला कार आणि भुईला भार आहेस रे भैय्या. दिक्षितच्या वाट्याला जायचं नाही. हजामाला वस्तारा फिरवायला न् सोनाराला कान टोचायला शिकवावं लागत नाही. हा दिक्षित म्हणजे डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोवर चेक मेट करुन डाव संपवतो. कळलं ना! ''


दिक्षितला त्याचा झालेला म्हणण्यापेक्षा भैय्यासाहेबांनी जाणूनबुजून केलेला अपमान फारच झोंबला होता. दारुची नशा उतरली असली तरी अपमानाची आग त्याला जाळत होती आणि तो भडाभडा बोलत सुटला होता. शेवटी ह्यात दादासाहेबच मध्यस्थी झाले. एकाअर्थी त्यांनाही बरं वाटलं होतं. भावेशनं चारचौघात सुशाच्या इज्जतीचा पार कचरा करुन टाकला होता.


'' असं काय करता दिक्षित? जाऊ द्या. माफ करा त्याला. आपलाच माणूस आहे. आणि तुमचा ग्लास रिकामीच आहे की! ए वेटर इकडं ये. ''


खिडकीच्या बाहेर उभ्या असलेल्या राजननं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आपल्यापरीन त्याचा गोषवारा मांडला.


' म्हणजे ह्या लोकांनी कारस्थान करुन धाम बिल्डर्सची वाट लावलीय तर. कॉलेजात केलेलेच पराक्रम इथंही गाजवतायत हे लोक. मला कसंही करुन ह्या सगळ्या गोष्टी जीत आणि श्रीपर्यंत पोचवल्या पाहिजेत. आता दादासाहेबांच्या सह्या उद्याच घेऊ. चल राजन इथनं. कुणी बघण्याआधी बाहेर पड. '


स्वरा...16/10/2020

……………

*42*

राजन तिथून निघाला तो तडक जीतला भेटायचं या उद्देशाने. पण त्याला नव्हतं माहीत की त्यानं दादासाहेबांचं बोलणं ऐकलंय हे त्यांच्या बॉडीगार्ड यशवंतच्या ध्यानात आलंय म्हणून. तो आपला त्याच्याच नादात सुसाट गाडी पळवत होता. यशवंतनं राजनला दादासाहेबांना न भेटताच तिथनं बाहेर पडताना पाहिलं. त्याला नक्की माहीत नव्हतं की राजननं काय ऐकलं किंवा काय पाहिलं ते! पण राजनच्या हालचालीतली चपळता बघून त्याला संशय आला आणि त्यानं त्याचा पाठलाग करायचं ठरवलं. त्यानं शेजारीच दारु पित बसलेल्या जयड्याला सोबत चल म्हणून गाडीवर बसवलं न् तो राजनच्या मागं मागं निघाला. तो ज्या रस्त्यानं जात होता तो रस्ता धाम बिल्डर्सच्या ऑफिसला जातो हे यशवंतला माहीत होतं; शिवाय भिंतींच्या कानांमधून त्याला दादासाहेबांनी धाम बिल्डर्सची केलेली सगळी कुरापतही माहीत होती. त्यावरुन त्यानं अंदाज लावला की राजननं बहुेक दारुच्या नशेतल्या दिक्षितचं बोलणं ऐकलं असावं आणि तेच सांगायला तो धाम बिल्डर्सच्या मालकाला जीत जैतकरला भेटायला चालला असावा. जसं राजनच्या लक्षात आलं की त्याचा पाठलाग होतोय तसं त्यानं गाडीचा वेग आणखी वाढवला. हेतू हा की जो कोणी त्याचा पाठलाग करतंय त्याच्या हाती सापडण्यापूर्वीच जीतला सगळं सांगता यावं. पण वेळेच्या एका चुकार क्षणानं त्याला दगा दिला न् मागून येणार्‍या यशवंतच्या गाडीनं त्याला एका ठोकरेत उडवून दिला. जसा राजन गाडीसकट पडलाय हे लक्षात आलं तसा यशवंतनं यू टर्न मारुन गाडी दादासाहेबांच्या बंगल्याच्या दिशेनं सोडली.

'' यशा, आय की. ''

'' बोल की काय म्हणतोस? ''

'' जरा गाडी थांबव. ''

'' अरं पण कशाला? ''

'' थांबवं म्हणतो ना! आपण तसं पण त्या स्पॉटपासनं लै लांब आलोय. ''

एक गचका मारुन यशवंतची गाडी थांबली.

'' हां, बोल काय झालं? ''

'' अरे आपण त्या अकौटंटाला तिकडं येकटाच टाकून आलो की! ''

'' हां मग काय त्याचा मुडदा आणायला पायजे होता का दादासाहेबांना दाखवायला? '' यशवंत जयड्याच्या ह्या बोलण्यावर गुरकावला.

'' अरं तसं न्हाय. ह्यातलं सायबांना काय माहीत हाय का? जर असलं तर त्याला तिथंच मरु दे. पण नसलं आणि तो खपला बिपला तर आपल्या बोलण्यावर साहेब विश्वास ठेवतील का की आपण त्याला कशासाठी मारला म्हणून? नायतर आता हाय म्हणूपर्यंत आपले फोटो लागायला वेळ लावणार नाहीत साहेब. '' जयड्या आतनं चांगलाच घाबरला होता मरणाच्या भितीनं.

'' अरं पण आपण काय सायबांचं वाईट करत नव्हतो. त्यांच्या भल्याचा विचार करुनच तर उडवला ना त्याला आपण? ''

'' खराय तुझं यशा. पण असं बघ; हे सगळं आपल्याला माहीत की आपण साहेबांच्या भल्याचा विचार केला. पण साहेबांना यातलं काहीच माहीत नाही. त्यात तो पडला साहेबांचा अकौटंट. म्हनजे साहेबांचे पैशाचे सगळे विषय त्याला माहीत असणार. आता जर का हा गतकाळीचा गेला वरच्या वाटेला तर त्या सगळ्याचा हिशोब पण त्याच्यासंगती गेला. बर आज ना उद्या साहेबांना कळणारचं की त्याला आपण म्हणजे तू उडवलास ते! आता तुझ्यासंगती होतो म्हणताना मलापण माळंत गोवतील जरी मी काय केलं नसलं तरी. ''

जयड्याच्या ह्या बोलण्यानं यशवंतला घाम फुटला. नाही म्हटलं तरी दादासाहेबांसाठी त्यानं कितीतरी जणांना ढगात पाठवलं होतं. कितीजणांचे हातपाय, बरगड्या न् हाडं मोडून त्यांना जागेवर बसवलं होतं याचा हिशोब तर त्यानं स्वतःपण घातला नव्हता. मात्र हे सगळं साहेबांच्या सांगण्यावरनं झालं होतं. आताचं प्रकरण मात्र त्यांच्या नकळत झालं होतं आणि जयड्या म्हणत होता त्यात यशवंतला तथ्य वाटत होतं. त्यानं दबक्या आवाजात जयड्याला विचारलं, '' तू म्हणतोस ते खराय. पण आता काय करायचं? आपण तर त्याला उडवला. आतापर्यंत मेला असलं तो. ''

'' आपण कुठं बघितलं मेला की जीता हाय ते! चल असंच माघारी जाऊ आणि ते बोचकं जसं मिळलं तसं उचलून जवळच्याच कुठल्यातरी फडतूस हॉस्पीटलात नेऊन टाकू अपघाताची केस म्हणून. आणि माघारी आलो की साहेबांना सांगू त्याचा असा असा ऍक्सीडेंट झाला म्हणून. ''

'' हां हे एकदम बरोबर आहे. चल. चल. ''

त्यांनी गाडी वळवून राजन पडला होता तिथं आणली. राजनला गाडी येत असल्याचा आवाज आला न् त्यानं बेशुध्द होण्याचं सोंग वठवलं. तिथं आलेल्या त्या दोघांनी त्याला उचलून दोघांच्या मधी गाडीवर बसवला आणि तिथून जवळच असणार्‍या डॉ. संग्राम भानुशालींच्या दवाखान्यात भरती केलं. भरती करताना सांगितलं की आम्ही वाटेत येताना ह्या माणसाचा अपघात झालेला दिसला. तिथनं जवळचा दवाखाना तुमचाच म्हणताना इथं आणलं. ती नर्स त्यांना बाकी गोष्टी विचारत होती पण आम्हांला काही माहीत नाही. हा माणूस अनोळखी आहे. आम्हांला पोलीसांची लफडी नकोत असं म्हणून त्यांनी अंग काढून घेतलं. लागलीच ते तिथनं बाहेर पडले. राजनच्या गाडीला टो करुन नेऊन गॅरेजला टाकली आणि हा सगळा वृत्तांत उद्या साहेबांना सांगायचं असं ठरवून झोपी गेले. पार्टी मात्र बर्‍याच उशीरापर्यंत चालू होती.

दुसर्‍या दिवशी दोघांनी दादासाहेबांचा चांगला मूड बघून त्यांना राजनच्या अपघाताची बातमी सांगितली. पण दादासाहेब बराच पोचलेला माणूस; त्यांना यशवंतच्या नजर चुकवण्यावरनं संशय आला.

'' यशवंत आता खरं खरं सांगतो का काय झालं ते? '' त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला म्हटल्यावर यशवंतचं अवसानच गळलं.

'' ते साहेब! काल रात्री राजन साहेब आले होते तुम्हांला बंगल्यावर भेटायला पण तुम्हांला न भेटताच माघारी निघाले. मला त्यांचा जरा संशय आला म्हणून ह्या जयड्याला सोबत घेऊन त्यांचा पाठलाग केला मी. तर ते धाम बिल्डर्सच्या रस्त्यानं चालले म्हणताना मी बुचकाळ्यात पडलो. आधी मला समजना की त्यांना मारावं की नुसतंच ठोकावं. पण मग नुसतंच ठोकलं आम्ही. '' यशवंतनं जयड्याला आपल्या कामात सहभागी बनवून टाकला.

'' मग मीच म्हणलो की साहेबांचा अकौंटंट हाय म्हणताना त्याला किमान दवाखान्यात तरी टाकू म्हणतानी तिथनं जवळच्या भानुशालींच्या दवाखान्यात टाकून आलो त्यांना. ''

'' मायला तुमच्या! अडाणी ती अडाणीच र्‍हाणार तुम्ही. अरे संशय आला होता तर अशा वेळी डायरेक्ट खलास करायचं ना! पण तेवढी जर तुमची अक्कल चालली असती तर तुम्ही माझ्या जागेवर असतात ना! शेणातले किडे, शेणच खाणार तुम्ही. असू दे! कुठं टाकला त्या हेकण्याला? किती लागलंय? शुध्दीवर होता की बेशुध्द? काय बघितलंत की नाही? ''

दादासाहेबांच्या चढलेल्या आवाजानं यशवंत एवढंस तोंड करुन बसला. त्याला हेही सांगायला सुचलं नाही की आम्ही नेलं तेव्हा राजन बेशुध्द होता म्हणून.

'' च्यायला मी पण काय तुमच्या भरोशावर बसलोय! चला बघून येऊ काय रंग उधळलेत ते! ''

दोघांना सोबत घेऊन दादासाहेब दवाखान्यात पोचले. दिग्याला सोबत घेऊन दादासाहेब आत गेले. जाताना यशवंत आणि जयड्याला मात्र मुद्दाम गाडीतच बसवून गेले.

'' ओ नर्सबाई! काल एका माणसाला भरती केला ना तुमच्या हॉस्पीटलात त्याला भेटायला आलो. ''

काऊंटरवरच्या बाईने मान वर करुन त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, '' नाव काय म्हणालात? ''

ती नर्स नसून रिसेप्शनीस्ट होती. नाव सांगितल्याशिवाय ती कुणाला कशी भेटू देणार होती?

'' नाव आहे राजन. पण ऍक्सीडेंन्टची केस आहे. जीवंत आहे की नाही ते सांगा आधी. ''

रजिस्टर चेक करुन ती सांगणारच होती की राजनला फार काही लागलेलं नाही म्हणून तेवढ्यातच सुगंधा तिथून जाता जाता त्यांना म्हणाली, '' या माझ्यासोबत. मी तिकडेच जातेय. फार लागलं होतं त्यांना. गळ्यात पट्टा घातलाय. उजव्या हाताला आणि डाव्या पायाला प्लास्टर घातलंय. आणि ती आलेली दोन माणसं तर नावही न सांगता निघून गेली. त्यांच्या खिशातल्या पाकिटावरुन आम्हांला नाव कळलं त्यांचं तशी आम्ही पोलीसांत अपघाती केसची वर्दी दिलीय. तुम्ही कोण त्यांचे? ''

'' माझा सी ए आहे तो. '' दादासाहेबांनी तिच्या माहीतीसाठी सांगितलं. दादासाहेब येऊन राजनच्या कॉटशेजारी ठेवलेल्या खुर्चीत बसले तरी ती नर्स तिथेच उभी होती.

'' ओ नर्सबाई! जरा खाजगी बोलायचंय. बोलू का? ''

तिला त्यांचा इशारा कळला आणि ती निघून गेली.

'' काय म्हणता राजनसाहेब? सगळं ठीक ना! ''

राजननं नुसत्याच डोळ्यांच्या पापण्या हलवल्या.

'' हे असंच! अगदी असंच रहायचं तरच जिवंत रहाल. तोंडातून जराजरी आवाज निघाला तरी हे जे डॉक्टरनं गळ्यात अडकवलंय त्याचा यमाचा फास व्हायला आणि तुमचा फोटो भिंतीवर लागायला जरापण वेळ लागणार नाही. काय समजलं? ''

राजननं पुन्हा तशाच पापण्या हलवल्या. जसं काही तो दादासाहेबांच्या शब्दाबाहेर नाही. इतक्यात बाहेर गेलेल्या सुगंधानं सावधगिरी दाखवत डॉ. भानुशालींना दादासाहेब आल्याची बातमी दिली. दादासाहेब आणखी काही बोलणार तेवढ्यात भानुशालींनी आत येत त्यांची ख्यालीखुशाली विचारली.

'' नमस्कार दादासाहेब! आज चक्क आम्हां गरीबाच्या दवाखान्यात पायधूळ झाडलीत. काही विशेष? हे पाहुणे का तुमचे? नाही म्हणजे त्यांच्या कॉटशेजारी बसलात म्हणून विचारलं. ''

'' नाही. आमचा सी ए आहे तो. काल आमच्या माणसांनी खबर दिली की यांचा अपघात झाला म्हणून. त्यांनाच बघायला आलो होतो. काय आहे त्यांची ट्रीटमेंट हुईस्तोवर आमची कामं खोळंबतील ना! ''

'' तुम्ही काहीच काळजी करु नका. मी व्यवस्थित ट्रिटमेंट केलीय त्यांच्या मोडलेल्या हात, पाय आणि मानेचीपण. आणखी 3-4 महीने तरी फार हालचाल नाही करता येणार त्यांना. ''

भानुशालींच्या या वाक्यानं दादासाहेबांच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं.

'' बरं! बरं! ठीक आहे. राजन साहेब एकदम आरामात रहा. डॉक्टरसाहेब पैशांची अजिबात काळजी करु नका. आमच्या माणसाला एकदम ए-वन ट्रिटमेंट द्या. येतो आम्ही. ''

असं म्हणून दिग्याला सोबत घेऊन ते निघून गेले. ते गेल्याच्या थोड्यावेळानंतर डॉ. संग्रामनी एका नर्सला पाठवून ते निघून गेल्याची खात्री करुन घेतली आणि राजनच्या मानेला लावलेला पट्टा, हाताचं प्लास्टर बाजूला केलं.

'' धन्यवाद डॉक्टरसाहेब. तुमच्यामुळे मी आज माझ्या मित्राला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न तरी करु शकलो. ''

'' अहो आभार कसले मानताय? एकाअर्थी जीत माझाही मित्रच आहे की. डॉ. वैकल्पमुळे आम्ही ओळखतो एकमेकांना. पण काही म्हणा तुम्ही या मानेच्या पट्ट्याचं आणि हातच्या प्लास्टरचं डोकं भारी चालवलंत. ''

झालं असं होतं की यशवंत आणि जयड्यानं राजनला जेमतेम दवाखान्यात दाखल करुन काढता पाय घेतला होता. तो जिवंत आहे की मेलाय हे बघायलाही ते थांबले नव्हते. त्यांचं न थांबणंच राजनच्या पथ्यावर पडलं. सुदैवाने एवढी जोरात धडक बसूनही राजनच्या डाव्या पायाचं हाड मोडणं, घसपटत गेल्यामुळं कातडी सोलवटणं यापेक्षा जास्त काही झालं नव्हतं. त्याला स्ट्रेचरवर टाकून ते दोघे निघून गेल्यावर त्यानं नर्सला विनंती केली की मला तातडीनं डॉक्टरांना भेटायचंय. डॉ. संग्राम त्याला भेटल्यावर त्यानं त्यांच्याकडून कागद आणि पेन मागून घेतला. त्याच्यावर भरभर काहीतरी खरडलं आणि त्यांच्याकडे देऊन म्हणाला, ' डॉ. प्लीज माझी एवढी मदत करा. हे पत्र धाम बिल्डर्सचे मालक जीत जैतकरांकडे लवकरात लवकर पोचवा. आता ज्यांनी मला इथे भरती केलं त्यांनीच मला मारण्यासाठी माझा हा अपघात घडवून आणलाय. ते दोघेही दादासाहेबांसाठी काम करतात. त्यांचं कारस्थान मला समजलंय म्हणून ते हे सगळं करतायत. मला आता काय लागलंय ते कळत नाहीए पण दादासाहेब मी जिवंत आहे की मेलोय हे पहायला नक्की येणार. तेव्हा तुम्ही त्यांना पटवून द्या की मला काही महीने हालचाल करता येणार नाही म्हणून. त्यासाठी मानेला पट्टा आणि हातालाही प्लास्टर घाला. ' डॉ. संग्रामनी तो म्हणेल तशी त्याची सगळी मदत केली.

स्वरा... 22/10/2020

……

*43*

वामनदादांच्या जाण्यानंतर श्री खर्‍या अर्थानं एकटा झाला. प्रिशाला त्याच्यातल्या संशयाच्या भूतानं घराबाहेर काढली. जीतला त्याच्या आयुष्यातून दादासाहेबांनी बाहेरचा रस्ता दाखवला तर अमूनं मित्रद्रोह केला या रागानं त्याच्याशी सगळे संबंध तोडले. एकटेपणाला अतिशय घाबरणार्‍या श्रीनं स्वतःच आमंत्रण देऊन त्याला घरी बोलवलं होतं. आता त्याच्याकडे येऊन जाऊन त्याचा एकटेपणा हाच काय तो त्याचा सोबती होता. प्रिशा कानपुरला गेली असली तरी तिचा जीव मात्र इकडे श्रीमध्ये अडकून पडला होता. ती सतत अमूकडे मेलमधून त्याची चौकशी करायची. तो कसा आहे? काय करतोय? नीट खातो पितो ना! स्वतःची काळजी घेतो ना! असे एक ना हजार प्रश्न ती मेलमधून अमूला विचारत राही. अमूही जमेल तशी तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तिच्या मनाचं तात्पुरतं का होईना पण समाधान करायची. प्रिशा तिला सांगायची की तो एकटा रहायला फार घाबरतो म्हणून. त्याला एकटा राहू देऊ नका. अमू तोंडदेखलं हो हो म्हणायची खरी पण जेव्हा जेव्हा प्रिशाकडून श्रीचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा तिला प्रिशाच्या काळजीनं रात्र रात्र जागणारा जीत आठवायचा. नेसत्या कपड्यानिशी घर सोडून मैत्री मागं टाकून गेलेली प्रिशा आठवायची. हॉस्पीटलमध्ये जगण्या-मरण्याचा संघर्ष करत घालवलेले ते क्षण आठवायचे. वामनदादांची शेवटपर्यंत प्रिशाला भेटण्याची तळमळ आठवायची आणि तिला श्रीचं असणंच नकोसं व्हायचं.

जीतला मात्र प्रिशा, तिची टोकाची मैत्री, टोकाचा राग, टोकाचं प्रेम या सगळ्या गोष्टींची खूप खोलपर्यंत जाणीव होत रहायची. इरवन दिसांमाशी वाढत होता. पण अमूनं जीतला अजून सुगावा लागू दिला नव्हता की तिचा जॉय म्हणजेच त्याची लाडकी मैत्रीण प्रिशा आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्टही त्याच्यापासून तिनं लपवून ठेवली होती की तो लवकरच मामाकाका होणार आहे म्हणून. अमूकडून प्रिशाला श्रीच्या सगळ्या खबरा जात होत्या मेलमधून. प्रिशाचे नऊ महीने भरत आले आणि तिनं अचानकच एका मेलमध्ये अमूला परत येण्याविषयी विचारलं.

प्रिय अमे,

ए बास झालं आता हे असं लांब लांब राहणं गं! मला तुझी, जीतची, श्रीची, आपल्या घराची आणि माझ्या चिंटुकल्या इरवन बोक्याची खूप म्हणजे खूपच आठवण येतेय. माझं कॉलेज छान चालू आहे. चांदनी माझ्या नोटस् काढते, माझ्या आरामाची काळजी घेते इंटेरिअरचे नकाशे काढताना. माऊ माझी आणि माझ्या अजून जन्माला न आलेल्या पिल्लूची खूपच उठबस करते. पण, तुला खरं सांगू का? मला ना परतीचे वेध लागलेत. कधी एकदा तुम्हां सगळ्यांना भेटतेय असं झालंय बघ मला. मला माझ्या बाळाचा जन्म तुम्हां सगळ्यांच्या सोबत असताना व्हावा असं वाटतंय. श्रीला एकदा का कळलं की मी त्याच्या बाळची आई होणार आहे म्हणून मग बघ तो कसा बदलतो ते! मी परत आले की आमच्या जन्माला आलेल्या बाळाला पाहून श्री मागचं सगळं विसरुन जाईल. तो पुन्हा पहिल्यासारखा वागेल आपल्याशी. आपण सगळे पुन्हा एकत्र राहू आनंदाने. ए तुला पण वाटतंय ना अमू की हे सगळं असंच होईल म्हणून? तू मला रिप्लाय करताना सांग की मी कधी परत येऊ ते! म्हणजे मग मी ठरवेन की मला कसा प्रवास करायचा आहे ते! तसं डॉक्टरांनी आता प्रवास करायला नाहीच म्हटलंय. कारण आता दिवस भरत आलेत ना! कधी आमचा फट्दिशी नंबर लागेल काही सांगता यायचं नाही. पण तू मला नक्की सांग हां मी कधी येऊ ते!...

तुझी प्रिशा...

प्रिशाचा तो मेल वाचला आणि अमू नुसतीच सैरभैर झाली नाही तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आता तिला आपण गेल्या काही महीन्यांत जे काही प्रिशापासून लपवून ठेवलं त्याचा पश्चात्ताप व्हायला लागला. पण, ती तरी काय करणार होती? जे घडलं तेच इतकं विचित्र होतं की त्याची कुणी अपेक्षाच केली नव्हती. मग जिला 4-5 वा महिना चालू होता त्या प्रिशाला ती हे सगळं कसं आणि कुठल्या हिमतीवर सांगू शकणार होती. इरवन पाळण्यात छान झोपला होता आणि कॉम्प्युटरच्या टेबलाशी बसलेल्या अमूभोवती मात्र सगळी खोली गरागरा फिरत होती. तिनं डोळे बंद केले आणि तसंच टेबलावर डोकं टेकलं. तरीही बंद डोळ्यांपुढे चित्रपटाची रिळं सरकून जसा सिनेमा उलगडत जातो तशा घटना तिच्या डोळ्यांसमोर सरकत होत्या. तिला कळतंच नव्हतं की प्रिशाला हे सगळं कसं सांगावं की श्रीनं तिचा इथे परत येण्याचा मार्गच बंद केलाय म्हणून. या सगळ्याचा विचार करता करता तिला गेल्या काही महिन्यांत काय काय घडून गेलंय ते सगळं संगतवार आठवत होतं.

तसा वामनदादा गेल्यापासूनच श्री घराबाहेर पडायचा बंद झाला होता. जे काही घडलं ते विसरण्यासाठी त्यानं दारुचा आधार घेतला होता. दिवसरात्र तो नशा करायला लागला होता. जीतला त्याला असं वागताना पाहून फार मानसिक क्लेश व्हायचे. आपला बालमित्र स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या हातानं माती करताना त्याला याचि डोळा पहावं लागत होतं. संशयाच्या वादळात मैत्रीच्या घरट्याच्या काड्या काड्या वेगळ्या झाल्या होत्या. तरीही जीतनं स्वतःच्या कर्तव्याचा हात सोडला नव्हता. आता त्या हसत्या खेळत्या घरात फक्त दोन माणसं रहायची. एक श्री आणि दुसरे सदाकाका. श्रीनं आपल्या जुन्या ओळखीतल्या बारवाल्याला फोन करुन सांगितलं होतं की तुमचे पैसे तुम्हांला मिळत जातील फक्त मला दर दुसर्‍या दिवशी दारु घरी पोहचली पाहिजे. शेवटी धंदा कुणाला नको असतो? पण त्या बार मालकाकडं येणार्‍या पोराला श्रीची अवस्था बघून राहवलं नाही म्हणून त्यानं जीतला श्रीची काळजी घ्यायला सांगितली. म्हणाला साहेब असेच पित राहिले तर काही त्यांच्या वाचण्याची शक्यता नाही. जीत न राहवून सगळे मान-अपमान वेशीला टांगून त्याला समजवायला घरात गेला तर श्रीनं दारुच्या नशेत त्यालाच बाटली फेकून मारली. श्रीला दारुच्या नशेत खूप सारे भास होत होते. तो आता सामान्य माणसासारखा जगत नव्हता तर भास आभासाच्या दोरीवरुन अधांतरी चालत होता. जीत समोर उभा राहून त्याला म्हणत असे की तू, तूच जबाबदार आहेस या परिस्थितीला. मला तुझ्याशी कसलेच संबंध ठेवायचे नाहीत. असं म्हणून तो त्याच्या तोंडावर कागद भिरकावून निघून जात असे. त्याला हतबल झालेले डोळ्यांत प्राण आणून प्रिशाची वाट पाहणारे वामनदादा दिसत खुपदा. त्यांना बोलता येत नसे पण ते हात जोडून श्रीला काहीतरी विनवणी करत असत. आपलं वाढलेलं पोट सावरत त्याच्या दाराच्या चौकटीत उभी राहून शिव्याशाप देणार्‍या अमूचा आवाज त्याला असह्य होई. आणि प्रिशा? तिनं ना कधी त्याला कसला जाब विचारला; ना कधी कसला विरोध केला. ती फक्त त्याच्यासमोर येऊन बसायची आणि थंड डोळ्यांनी त्याच्याकडे एकटक बघत रहायची. तो मात्र कधीच तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नसे. त्याला तिचं असं पाहणं सहन होत नसे. मग तो दारुच्या नशेत या सगळ्या माणसांना खुप अद्वातद्वा बोले. त्यांना मारायला धावून जाण्याचा प्रयत्न करी पण नशेतल्या त्याला कुणीच साथ देत नसे. ना माणसं ना शरीर. आणि ज्या माणसांचा तो राग राग करी ती माणसं तरी प्रत्यक्षात कुठे त्याच्याजवळ होती? ती सगळी तर त्याच्या मनात खोलवर कुठेतरी दडून राहिलेली अपराधीपणाची भावना होती; जी वेळोवेळी माणसांचं रुप घेऊन त्याला छळत राही.

'' हलामखोर! सोताला माजा मित्त म्हनोतो आनि माज्याशीच दगा फटका कत्तो? लाज नाई का वातत तुला इत यायला... तुश्यामुले माशी बायको माज्याशी खोतेपनानं वागली. तु... तु... तुशज्यामुळे मा...जा धंदा बुदला... आता कश्श... कश्शाला आलास इतं? मी मेलो कऽऽऽऽा ज्शिवंत आय ते बग...बग...बगा...बगायला आलास का? ज्शाऽऽऽ ज्शाऽऽऽ... स्चालता हो माझ्ज्या जोयासमोरुन... ती तुझ्जी बाको माश्ज्या झ्दारासमोल यून मलाच श...श...श...श...शिव्या....शऽऽऽऽाप देते. माज...जा बा...बा...बाप माश्जी शोदून तिची बाऽऽऽज्शू घेतो. तू तिच्याऽऽऽसाटी आपली ल्हा... ल्हा... ल्हानपनाची मैश्ती तो...दली... आनी ती इतं ब...बश...बसून थंद दोल्या...दोल्याल्या... ल्यानी मला बग...बग...बगते... ज...सं काऽऽऽय म...म...म...मी तु... तुम...तुम...तुमच्याशी कोटा व...व...वाग...वागलो... ज... ज...जा तून... '' असं म्हणून श्रीनं शेजारची रिकामी बाटली जीतवर भिरकावली. जीतनं जेमतेम ती बाटली चुकवली पण त्यानं श्रीचा हात सोडला नाही.

'' श्री तू आधी नशेतून बाहेर ये. मग भले मला कितीही बाटल्या फेकून मार. मी हसत सगळे वार झेलीन तुझे. तुला काही झालं तर ना मी स्वतःला ना प्रिशाला तोंड दाखवू शकेन रे! ''

पण जीतचं बोलणं श्रीच्या कानांवरुन तसंच कुठेतरी वाहून गेलं. तो काही ढिम्म जागचा हलला नाही. मग नाईलाज म्हणून जीतनं सदाकाकांना सोबत राहून त्याच्यावर नजर ठेवायला सांगितली. मालिनी काकूंनाही श्रीची ही अवस्था पाहवत नव्हती. त्यांनी सदाकाकाला सांगून ठेवलं होतं की दिवसभर भले तू श्रीसोबत राहू नकोस पण रात्रीचा त्याला कस्साच एकटा सोडायचा नाही. जीतनं अमूला सांगून ठेवल्याप्रमाणे ती जयंतीच्या हातून रोज दोन वेळेचं जेवण श्रीकडे पाठवत होती. ती आणि जीत एकाअर्थी आपलं मैत्रीचं कर्तव्य असं समजून पूर्ण करत होती की त्यांचा एक मित्र भरकटलाय, रस्ता चुकलाय. यालाच कदाचित हृदयाचं मैत्र म्हणत असावेत. त्यादिवशी रात्रीच्या जेवणानंतर सदाकाका झोपायला म्हणून श्रीकडे आले तर त्यांना हॉलमधल्या सोफ्याजवळ; जिथं श्री रोजच बसून दारु प्यायचा तिथंच तो अस्ताव्यस्त पडलेला दिसला. ते गडबडीनं त्याला उठवायला गेले तर तो बेशुध्द पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं....

स्वरा...

 27/10/2020

..........

*44*

सदाकाकानं गडबडीनं जाऊन जीतला सांगितलं. तसं त्यानं पटापट सगळ्या हालचाली केल्या. डॉ. वैकल्पला फोन लावला; तो त्यांचा फॅमिली डॉक्टरच होता. त्यानं ताबडतोब श्रीला दवाखान्यात आणायला सांगितलं. वैकल्पनं पाठवलेली हॉस्पीटलची ऍम्ब्युलन्स आली आणि श्रीला घेऊन गेली. तिच्यासोबत जीतही गेला.

'' काय झालं याला काही कळलं का तुला? कसा काय बेशुध्द पडला हा? '' वैकल्पनं जीतला विचारलं.

'' आणखी काय असणार दारुशिवाय कारण. दिवसरात्र त्या दारुवरच तर जगतो ना हा! माणसांना बाजूला केलं आणि ह्या नतद्रष्ट बयेला स्वतःची सोबती बनवल्यावर यापेक्षा वेगळं काही होईल याची अपेक्षा करणंच मुर्खपणाचं आहे ना! '' जीतच्या बोलण्यात उपरोध ठासून भरला होता.

'' नर्स जरा पंप आणा. याच्या पोटात जे काही आहे ते सगळं आपल्याला बाहेर काढायला हवं. तरच आपण याच्यावर पुढचे उपचार करु शकू. '' वैकल्पनं नर्सला पंप आणायला सांगितलं. आता मात्र जीतला काळजी वाटायला लागली.

'' काय अंदाज तुझा वैकल्प? काय झालंय श्रीला? ''

'' आतातरी मी काही ठोसपणे नाही सांगू शकत. पण त्याची एकंदरीत शारिरीक अवस्था बघता मला... '' तो पुढे काही बोलणार इतक्यात नर्स पंप घेऊन आली. आपलं बोलणं तसंच अर्धवट सोडून त्यानं तातडीनं त्या पंपची नळी श्रीच्या घशातून आत पोटात ढकलली. आणि एअर सक्शन करुन तो आत साठलेलं सगळं बाहेर काढू लागला. त्याच्या पोटातून बाहेर आलेला सगळा द्रव खूपच जास्त पिवळ्या रंगाचा होता. मध्ये मध्ये त्यात लाल रंगाचंही अस्तित्व दिसत होतं. ते बघून तर वैकल्पच्या चिंतेत भरच पडली. पण आता श्री बर्‍यापैकी आऊट ऑफ डेंजर होता.

'' हे बघतोयस ना जीत! '' त्या द्रवाकडे बोट दाखवत त्यानं जीतला विचारलं. '' याचा अर्थ आहे की श्रीला लिव्हर सिरॉसिस झाला असण्याची शक्यता आहे. सुदैव आहे आपलं की तो लवकर इथे पोचला. अन्यथा आपण त्याला गमावलाच असता. ''

त्यानंतरच्या सगळ्या हालचाली खूप वेगानं केल्या गेल्या. पोट साफ केल्यानंतर त्याला ग्लुकोज चढवून तो शुध्दीवर येईपर्यंत वाट बघून तो शुध्दीवर आल्यानंतर त्याचा एम आर स्कॅन केलं गेलं. वेगवेगळ्या कारणासाठी गरजेच्या म्हणून रक्त तपासण्या केल्या गेल्या. आणि वैकल्पच्या निष्कर्षावर शिक्का मोर्तब झालं की श्रीला अति मद्यपानानं लिव्हर सिरॉसिसची लागण झाली होती. त्यामुळे त्याला हॉस्पीटलाईज करणं गरजेचं असल्यानं त्यानं जीतला परत जायला सांगितलं.

'' जीत तू आता जा. श्रीची सगळी काळजी मी आणि माझा स्टाफ व्यवस्थित घेऊ. तो पूर्ण शुध्दीत आल्यावर त्यानं तुझ्याशी काही वाद घालावा अशी माझी अजिबातच इच्छा नाही. मी त्याच्या तब्येतीची हालहवाल तुला वेळोवेळी कळवत राहिन. ''

'' पण काहीही लागलं तर मला लगेच कळवशील! '' असं त्याला सांगून जीत तिथून बाहेर पडला. श्रीच्या आजाराची बातमी ऐकून अमूला थोडसं वाईट वाटलं पण तिनं ते काही कुणाला दिसू दिलं नाही. आणि तिनं याविषयी प्रिशाला कळवण्याची तसदीही घेतली नाही.

श्री अजूनही हॉस्पीटलमध्येच होता. नंदिताही तिथे असताना त्याला भेटून जायची. वैकल्प त्याची खूप काळजी घेत होताच. पण नंदिताही तो दुसरीकडे व्हिजीटला गेल्यावर त्याची काळजी घेत होती. अशीच एकदा रात्री उशीरा ती अधिरा नावाच्या तिच्या पेशंटच्या डिलिव्हरीसाठी आली होती. अधीराला रात्री 9 वाजताच कळा सुरु झाल्या होत्या. नर्सचा फोन आला म्हणून नुकतीच घरी पोचलेली नंदिता फक्त चहा संपवून तशीच निघून आली. तिची डिलिव्हरी आटपे आटपेपर्यंत रात्रीचे 2 वाजून गेले होते. बाळ-बाळंतिणीची नीट व्यवस्था झाल्याची खात्री करुनच ती सवयीनं परत चालली होती. सहजच श्रीची आठवण आली म्हणून त्याच्या खोलीत ती डोकावली तर तो झोपेतच बरळत होता. ती आत आली आणि खुर्ची घेऊन त्याच्या बेडशेजारी बसली.

'' प्रिशा, परत ये प्रिशा! मी चुकलो. मला माफ कर प्रिशा. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी... मी कधी तुला बोललो नाही पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत प्रिशा. तू एकदा; फक्त एकदा मला माफ कर प्रिशा. '' तो असंच बरंच काही बरळत होता आणि शेजारी बसलेल्या नंदिताच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्याच्या शब्दा शब्दानं तिला तिच्या आयुष्यातल्या रिकाम्या पडलेल्या जागांची खुपरी जाणीव होत होती. तिच्याही नकळत तिनं श्रीचा हात हातात घेतला. अतिशय हुळहुळ्या झालेल्या तिच्या भावनांनी ती त्या हातावरुन हात फिरवू लागली. रात्र असतेच मुळी अशी. स्वतःतच मस्त असताना दुसर्‍याला अधीर, अनावर करणारी. श्रीचा हात हातात घेतला आणि तिला वाटलं जसं काही तिच्या मनाच्या जळत्या निखार्‍यावर कुणीतरी थंडगार पाणी ओतून त्याला शांत केलंय. हेच नव्हती का ती आजवर शोधत आली? तिनंही कधीकाळी कुणावर तरी प्रेमच तर केलं होतं. पण तिला काय माहीत तिच्या वाट्याला तिचा कुण्या जन्माचा वैरी नवरा म्हणून येऊन बसला होता. किती छान दिवस होते तेही! प्रेम केलं आणि त्याच्याशीच लग्नही करता आलं. आयुष्यातलं एक वर्तुळ पूर्ण झालं. पण, हाय रे दैवा! तिला नव्हतं माहीत की हे पूर्ण झालं असं वाटणारं वर्तुळ तिच्यासाठी अग्निकंकण ठरेल म्हणून. निषिध; तिचा नवरा. जो पुरुष लग्नाआधी तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा त्याला लग्नानंतर नुसता बदललेला नाही तर विकृत झालेला पाहून तिचं काळीज अक्षरशः विदीर्ण झालं. कुठल्या तोंडानं ती हे सगळं भाईला सांगू शकणार होती. किती भांडली होती ती वैकल्पशी निषिधच्या चांगुलपणाची बाजू घेऊन. खरी गोष्ट तर ही होती की तिला दिसलेला निषिध हा त्याचा फक्त एक बुरखा होता. खरा निषिध तर तो होता जो तिनं लग्नानंतर पाहिला होता. खरंतर त्याला लग्न करण्याचं तसं काही कारणंच नव्हतं. लग्न हा त्यानं उभा केलेला पोलिसांना चकवण्याचा देखावा होता. लग्नाआधी तिनं त्याच्याबद्दल फारशी वास्तपुस्त केलीच नाही. तिला त्याच्याबद्दल तेवढंच माहीत होतं जेवढं त्यानं तिला सांगितलं होतं. आईबाबा अपघातात गेले. गडगंज श्रीमंती आहे; मात्र आपलं म्हणावं असं कुणी नाही. बायकांच्या हृदयात आधीच कळवळा खूप असतो. त्यात कुणी स्वतःचं दुःख त्यांच्याकडे घेऊन आलं की त्यावर फुंकर मारताना कधी त्या स्वतःच त्या दुःखाचा भाग होऊन जातात हे त्यांनाच कळत नाही. नंदिता काही यापेक्षा वेगळी नव्हती. तिनंही त्याला असाच जवळ केला. कधी विचारलं नाही की एवढी श्रीमंती कशी आली? कसला व्यवसाय धंदा करतोस तू म्हणून. त्याचा व्यवसाय काय होता हे तिला लग्नानंतर कळलं. एवढ्या भल्या मोठ्या बंगल्यात ते दोघेच राहत होते. तिसरा माणूस कधी आलाच नाही त्यांच्याकडं. हां! पण तिसरी बाई मात्र रोज येत राहिली; तिही रोज वेगळी. आणि मग तिला कळलं की तिचा नवरा व्यसनी आहे. दारु, सिगरेट, तंबाखू, गांजा, ड्रग्ज असल्या कुठल्याही प्रचलित गोष्टींचं व्यसन नव्हतंच त्याला. त्याला व्यसन होतं संभोगाचं! रोज नवी बाई अंथरुणावर घेऊन विकृतपणे तिला भोगायचं व्यसन होतं त्याला. एखाद दिवशी असं कुणी मिळालं नाही की त्यादिवशी नंदिता त्याची हक्काची शिकार असे. मग पुढचे 8-10 दिवस ती भाईला तोंडही दिसू नये याची काळजी घेण्यासाठी घराबाहेर पडणंच टाळत असे. तो पेशानं व्यावसायिक नसून तस्कर होता; तोही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. त्याच्या तस्कर असण्याचं रहस्य नंदिताला तेव्हा कळलं जेव्हा तो बंगल्यातल्या त्याच्या खास खोलीचं कुलुप पुन्हा पहायचं विसरुन गेला न् ते उघडंच राहिलं. आत गेलेल्या नंदिताला अनेक फायली सापडल्या. अशा वस्तू दिसल्या ज्यांची किंमत आजच्या काळात करोडो रुपये असेल. त्या फायलींमध्ये अशा अनेक गोष्टींचे फोटो होते ज्या तिनं कधी पाहिल्याही नव्हत्या. कितीतरी म्युझियम्स, जुन्या वस्तूंचे साठवण करणारे अशांच्या याद्या होत्या त्याच्यात. हे सगळं बघून तर ती हतबुध्दच झाली. तिला कळेना काय करावं ते! या माणसाविषयी आधी पोलिसांना सांगावं की आधी भाईला या विचारात तिनं भाईला काही होईल या भितीपोटी तो विषयच बाजूला ठेवला.

॓अनेक वेश्यांशी त्याचे गळामिठीचे संबंध होते. त्यातही अनैसर्गिक संभोग हा त्याच्या आत्यंतिक आवडीचा विषय असल्याने तो अशाच मुली शोधून आणत असे ज्यांना अशा संबंधात रस असे. बिचारी नंदिता हे सगळं बघत राहण्यापलिकडे काही करु शकत नव्हती. एकदा मात्र निषिधचा अंदाज चुकला. आलेली पोरगी धंद्यात नवीन तर होतीच पण तिला ह्याचे हे असले विकृत शौक माहीतही नव्हते. त्या पोरीनं सरळ याला पोलिसठाण्याचा रस्ता दाखवला. तिच्या दुर्दैवानं तो सहीसलामत सुटला खरा पण याचे वाईट परिणाम मात्र नंदिताला भोगावे लागले. त्याला जेव्हा लहर येईल तेव्हा तो तिला संबंध ठेवायला भाग पाडी. रात्र बघे ना दिवस टराटरा तिच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या करी. सिगरेट पेटवून अंगावर ठिकठिकाणी चटके देऊन तिच्या विव्हळण्यातून आनंदाने ड्रॉपडाऊन होई. कधी कचकचून चावे घेई तर कधी चाकू सुरीसारख्या धारदार हत्यारांचा वापर करी. त्याच्याकडे एक बारिक खिळे लावलेला पट्टा होता. तो कायमच त्या पट्ट्याचा वापर करायला उत्सुक असायचा. हे सगळं करताना तो एक काळजी मात्र कायम घेई. नंदिताला जीवघेण्या जखमा होऊ देत नसे आणि तिचे हातपाय कायम बांधून ठेवी जेणेकरुन ती स्वतःला त्या वेळी काही करुन घेणार नाही. नंदिताच्या मनात खूपदा आत्महत्येचे विचार येत पण भाईचा विचार करुन ती ते परतून लावे. कारण तिच्याशिवाय वैकल्पचं दुसरं होतं तरी कोण?

एकदा किचनमध्ये ती स्वयंपाक करत असताना तो मूडमध्ये आला आणि त्यानं तिच्या हातातला चाकू घेऊन तिच्या ब्लाऊजच्या मागून फाडून चिंध्या केल्या. हातपाय मोकळे असल्यानं नंदिताला पळून जाण्याचा पर्याय मिळाला आणि त्याला नकार देऊन ती तशीच बाहेरच्या दिशेला धावली. मात्र त्या नकाराचा परिणाम म्हणून त्यानं आणखी चवताळून तिच्यावर हल्ला केला. हातातल्या चाकूनं तिच्या कुशीत वार करुन चांगली वितभर तरी फाडली. मग तिला तसाच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून तो निघून गेला. अजूनही तिच्या कुशीत त्या टाक्यांचे व्रण तसेच होते आणि जेव्हा कधी तिला निषिधच्या या आठवणी येत तेव्हा तेव्हा तिला त्या जागी असह्य वेदना होत असत. वैकल्पनं घटस्फोटाचा स्टॅन्ड घेऊन त्याचवेळी तिला परत आणली नाहीतर कदाचित पुढेमागे त्याला नंदाचं कलेवर आणावं लागलं असतं.

प्रिशा समजून श्रीनं तिचा हात आणखीनंच घट्ट पकडला होता. निषिधच्या आठवणीनं तिच्या टाक्यांमधून असह्य कळा येत होत्या तरी तिला तो हात सोडवावा असं वाटलं नाही. उलट ती विचार करत होती की कुणी इतकं टोकाला जाऊन प्रेम कसं करु शकतं? कुठे श्री आणि कुठे निषिध?...

स्वरा... 

01/11/2020

..........

*45*

त्यानंतर जोवर श्री ऍडमीट होता तोवर नंदिता रोज रात्री काही ना काही कारण काढून तिथं येत राहिली. अनेक रात्री श्रीचा हात हातात घेऊन स्वतःच्या जखमांवर फुंकर घालत राहिली. त्यानंतरही भाईची परवानगी घेऊन ती श्रीच्या देखभालीसाठी त्याच्या घरी येत राहिली.

'' नंदा, तू जाणारेस त्याच्यासोबत त्याच्या घरी? ''

'' हो भाई. मला जायचंय त्याच्यासोबत. ''

'' का? काही विशेष कारण आहे का? नाही म्हणजे मी नर्स पाठवणारच आहे त्याची काळजी घेण्यासाठी. पण तरीही तू जाणार असशील तर मला कारण ऐकायला आवडेल. तू गायनॅक आहेस आणि तो लिव्हर सिरॉसिसचा पेशंट. नेमकं काय कनेक्शन तुझ्या जाण्यामागे? ''

आधी नंदिता अडखळली सांगताना. कारण काय सांगावं हे तिला समजेना. मनाचं कारण देऊन असं थोडीच पेशंटसोबत रहायला मिळू शकतं? आणि तसंही तिची श्रीशी ओळख काही फार जुनी नव्हती. काय सांगावं भाईला? याचा विचार करत ती म्हणाली, '' तू कितपत विश्वास ठेवशील माहीत नाही भाई पण, मला त्याचा सहवास आवडतोय. आणि मला वाटतं की हे एकच कारण पुरेसं असावं मी त्याच्यासोबत जाण्यासाठी. ''

'' ते माझ्या केव्हाच ध्यानात आलंय नंदा. तुला काय वाटतं तुझं रात्रीचं इथं येऊन बसणं मला कळलं नसेल! तू त्याच्यासोबत असताना तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद मी वाचला नसेन! तुझ्या जाण्याविषयी मला काहीच आक्षेप नाहीए. सांगायचं फक्त एवढंच आहे की तू डॉक्टर आहेस हे विसरु नकोस. ''

'' थॅन्क्यू भाई! थॅन्क्यू सो मच. ''

ती जाण्यासाठी वळली तसा वैकल्प पुन्हा तिला म्हणाला, '' नंदू, त्याच्यासोबत तुझीही काळजी घेशील बाळा! ''

'' हो भाई. मी अज्जिबात तुला आणि त्याला त्रास नाही देणार. ''

नंदानं श्रीसोबत काही वेळ घालवण्याची परवानगी मिळवली. पण तिला कळलंच नाही की प्रिशा आणि वामनदादांच्या जाण्यानं झालेल्या जखमेवर फुंकर मारता मारता तिनं कधी श्रीच्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीत स्वतःची जागा निर्माण केली ते! ही गोष्ट वैकल्पला तेव्हा कळली जेव्हा श्रीनं नंदिताशी लग्न करण्याची इच्छा वैकल्पला बोलून दाखवली.

'' काय मुर्खासारखं बरळतोयसं? तुझं आधीच एक लग्न झालेलं आहे. ''

'' पण प्रिशा आता इथे नाहीये. ''

'' याचा अर्थ ती कधीच परत येणार नाही असा आहे का? तिचं नाव अजूनही मृतांच्या यादीत नाहीये की तुला लगेच दुसरं लग्न करायला परवानगी मिळेल. कायदा, समाज नावाच्या काही गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत श्री. ''

'' कायद्याच्या गोष्टी मला सांगू नकोस वैकल्प. माझी पहिली बायको बेपत्ता आहे गेले 2 महिने. सगळीकडे शोधाशोध करुनही ती आजही सापडली नाहीये. त्यामुळे मी दुसरं लग्न करतोय याला कायद्यानं सहसा विरोध होणार नाही. आणि समाजाबद्दल म्हणशील तर मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काय करतो याच्याशी त्याला काहीच देणं घेणं नाही. मी काही कुठला स्टार माणूस नाहीये की माझ्या हगल्यापादल्या गोष्टीचा लोक वास काढत फिरतील. हां तुलाच परवानगी द्यायची नसेल तर तसं सांग मला. पण मला वाटतं की तू एकदा नंदितालाही विचार याविषयी. मला वाटतं की तिचा याला कसलाही विरोध नाहीये मी बोललोय तिच्याशी. ''

शेजारी बसलेल्या नंदिताकडे आश्चर्याने पाहत वैकल्पनं तिला विचारलं, '' हे खरंय नंदा? तुला त्याच्याशी लग्न करायचं? त्याला तुझ्या आधीच्या लग्नाविषयी माहीत आहे? ''

त्याच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून तिनं काही न बोलता नुसतीच होकारार्थी मान डोलवली.

'' नंदू, मला वाटतं की तू सगळा विचार केला असशील. तसंही तू आता काही लहान नाहीस. शिवाय तुला लग्नाचा अनुभवही आहे. पण मला सांग उद्या जर प्रिशा आली तर तू काय करणार आहेस? एका क्षणात तुमचं हे लग्न बेकायदेशीर ठरेल याची तुला जाणीव आहे ना! ''

'' भाई या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या. जर आक्काबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हणालो असतो या म्हणीसारखंच आहे हे. मला त्याच्याशी लग्न करण्यात काहीच अडचण नाही. तूर्तास तरी आपण तुझे सगळे प्रश्न अनुत्तरीतच्या यादीत टाकू आणि आम्ही देवळात लग्न करु. मग तर झालं. '' नंदितानं त्याच्या सगळ्या शंका निकाली काढल्या.

'' श्री मला तिच्याशी थोडं खाजगी बोलायचंय. तुला चालेल ना! ''

श्रीनं यावर काहीच हरकत घेतली नाही. त्यानं नंदिताला एका कोपर्‍यात नेलं. तिच्या कानाशी हलकेच कुजबुजत त्यानं विचारलं, '' नंदू तू त्याला तुझ्या कॅन्सरविषयीपण सांगितलंयस ना! ''

पटकन् नंदितानं त्याच्या तोंडावर हात ठेवला. '' नाही भाई. मी त्याला त्याविषयी काहीच सांगितलं नाही. एका अशा मुलीशी तो का लग्न करेल जी काही काळाचीच सोबती आहे? मला फक्त एकदा प्रेमातला, लग्नातला, आई होण्यातला आनंद घ्यायचाय. मरणाच्या आधी मला त्या आनंदासोबत मिळाले तर काही क्षण जगायचेत भाई. तू फक्त हो म्हण. वेळ आल्यावर हे गुपित मीच श्रीसमोर उघड करेन. ''

'' ठीक आहे. नाही बोलणार मी त्याला काही. पण एक शेवटचा प्रश्न त्याला विचारतो. ''

पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसत त्यानं श्रीला विचारलं, '' श्री जीतचं... ''

पण त्याला पुढे बोलू न देता श्री म्हणाला, '' त्याचं माझं नातं प्रिशा आणि बाबा गेल्यापासून संपलंय. त्याला यात ओढण्याची गरज नाही. आणि हे लग्न दोनच दिवसांत होईल. येतो मी. ''

पुढच्या दोन-तीन दिवसांतच श्री आणि नंदितांचं देवळात लग्न झालं. जीत, अमू, माधवदादा, दिगंबरदादा, मालिनीकाकू, सदाकाका सगळ्यांसाठीच हा फार मोठा धक्का होता.

'' बघितलंस अमू. या माणसानं परत नवी गुंतागुंत केली. असा भयंकर राग आलाय मला त्याचा की जावं आणि त्याचा गळाच दाबावा अशी इच्छा होतेय माझी. काय परिस्थिती उभी करतो हा माझ्यासमोर दरवेळी? उद्या जर त्या जाहिरातीमुळे प्रिशा परत आली तर तिला काय तोंड दाखवू मी? ''

सुदैवानं अजूनही अमूचा आणि प्रिशाचा संपर्क झाला नव्हता; त्यामुळे तिलाही जीतसारखाच प्रश्न भेडसावत होता. पण म्हणतात ना की वेळ कशी कूस पालटेल कुणी त्याचा काही अंदाज बांधू शकत नाही म्हणून. हे दोघे या विचारानी त्रस्त होते. श्री नंदिताच्या सोबतीनं आपल्या घसरलेल्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होता आणि पुढच्याच महीन्यात भरदुपारी अमूच्या नावे प्रिशाचं पत्र येऊन धडकलं. त्यानंतरही मेलमार्गे त्या दोघींचा संपर्क होतंच राहिला पण अमू मात्र तोंडात गुळणी धरुन गप्प राहिली कारण श्रीनं दुसरं लग्न केलंय हे प्रिशाला सांगण्याची तिची हिंमतच नाही झाली. आता प्रिशाचे नऊ महीने भरत आलेले, तिला परतीचे वेध लागलेले, नंदिताला चौथा महीना सुरु होता; या सगळ्यात अमू कात्रीत सापडलेली. काय करावं तिला कळेनासं झालेलं. एकदा वाटलं हे सगळं जीतला सांगावं. कदाचित तो काहीतरी उपाय सुचवेल. मग विचार केला की प्रिशा जिवंत आहे, कानपुरात सुखरुप आहे हे कळताच जीत काही स्वस्थ बसणार नाही. तो कसंही करुन तिला परत आणेल. त्यासाठी आकाशपाताळ एक करेल. पण या सगळ्यातून साध्य काय होईल? प्रिशा आणि श्रीचं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं तर होणार नाही. नंदिता कुठे जाईल? त्या बिचारीचा या सगळ्यात काय दोष? ती विनाकारणच कुणाच्या तरी रागाचा बळी ठरायची. केवढी ही गुंतागुंत! त्यापेक्षा जीतला या सगळ्यापासून लांबच ठेवू आपण.

आठ-दहा दिवस झाले तरी अमूचा काहीच रिप्लाय नाही आला म्हणून प्रिशानं तिला पुन्हा मेल केली.

' काय गं अमू! काय झालं? माझ्या मेलचा रिप्लाय का नाही दिलास अजून तू? आठवतंय ना माझे दिवस भरत आलेत. मला तुमच्याकडे परत यायचंय. '

त्यापुढे तिनं काहीच लिहिलं नव्हतं.

हो-ना, हो-ना च्या झोक्यावर झुलता झुलता अमूनं शेवटी निर्णय घेतला की सत्य प्रिशाला कळलं पाहिजे. शेवटी लपवून तरी काय काय आणि किती दिवस ठेवणार? एक ना एक दिवस प्रिशाला हे सगळं कळणारंच आहे. मी नाही सांगितलं तर कुणी दुसरं सांगेल पण घडल्या गोष्टी तर कळतीलंच. आणि दुसर्‍या कुणाकडून कळलं तर ती आणखी दुखावली जाईल. आधी जीतनं तिला सांगायला उशीर केला की श्री तिच्यावर संशय घेतोय म्हणून आणि आता हे माझ्याकडून कळलं नाही म्हणून मी माझी मैत्रीण गमवेन. सांगितलं तर फार फार काय होईल? काही दिवस, महिन्यांसाठी माझ्याशी अबोला धरेल. मैत्री तुटण्यापेक्षा तो अबोला सहन करणं मला परवडेल. असा सगळा विचार करुन अमूनं प्रिशाला रिप्लाय केला.

प्रिय प्रिशा,

मन घट्ट कर. मी जे काही सांगतेय ते कदाचित तुला झेपणार नाही पण तुला ते ऐकावं लागेल. सहनही करावं लागेल. तू गेल्यानंतरच्या महिन्याभरात इथं खुप सार्‍या उलथापालथी घडल्या. वामनकाका गेल्याचं मी तुला आधीच सांगितलं. पण मला माफ कर; मी तुला हे नाही सांगितलं की ते गेल्यानंतर दारु पिऊन श्रीसुध्दा त्याच वाटेवर चालला होता. जीत आणि डॉ. वैकल्पनं मिळून त्याला पुन्हा जगण्याच्या लायक बनवला. तो हॉस्पीटलमध्ये ऍडमीट असण्याच्या मधल्या काळात नेमकं काय घडलं मला स्वतःलाही माहीत नाही कारण मी कधीच त्याला बघायला हॉस्पीटलमध्ये गेले नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव की तो कधीच ना आपल्या मैत्रीसाठी लायक होता ना तुझ्या प्रेमासाठी. आधी त्यानं आपल्या मैत्रीशी दगा केला आणि आता त्यानं तुझ्या प्रेमाशी दगा केलाय. श्रीनं दुसरं लग्न केलंय प्रिशा. वैकल्पच्या बहिणीशी त्यानं दुसरा संसार थाटलाय. आणि आता त्याच्या कथेत नवीन पात्र येतंय. नंदिताला चौथा महीना चालू आहे. तू आणि तुझ्या बाळाला आता त्याच्या आयुष्यात जागा नाही प्रिशा. हे तुला दुसर्‍या कुणाकडून तरी कळून तुझा काही गैरसमज होऊ नये म्हणून मीच तुला सांगतेय. जमल्यास मला माफ कर.

तुझी अमू...

तो मेल वाचून प्रिशाला मोठ्यानं ओरडावसं वाटत होतं पण ती नुसतीच डोळ्यांतल्या पाण्याच्या धारेनं भिजत राहिली.

स्वरा... 

03/11/2020

..........

*46*

राजनने त्यावेळी शहाणपणा दाखवून डॉ. संग्रामच्या मदतीने दादासाहेबांच्या कारस्थानाचं भांडाफोड करणारं पत्र धाम बिल्डर्सकडे पोचवलं होतं. त्याला दादासाहेबांचा असा काही अनुभव नसला तरी सहवासाने स्वभाव ओळखून होता तो त्यांचा. त्यामुळं त्यानं स्वतःच्या सुरक्षेची व्यवस्था प्लास्टर आणि मानेच्या पट्ट्याच्या रुपात करुन ठेवली होती. तरीही दादासहेबांनी जातीनं येऊन त्याला त्यांच्या भाषेत धमकावलंच होतं. तेव्हाच राजनच्या लक्षात आलं होतं की ज्याक्षणी तो तोंड उघडेल तो त्याचा शेवटचा दिवस ठरेल. त्यामुळे त्यानं हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाण्याचा पवित्रा घेतला. राजन गप्प आहे म्हटल्यावर दादासाहेबांनी फार ताण घेतला नाही. पण, त्यांची माणसं मात्र कायम राजनवर नजर ठेवून होती. त्यांना दादासाहेबांच्या तशा सक्तीच्या सुचनाच होत्या. राजनच्या जवळपास जरासं काही खुट्ट झालं तरी ते त्यांच्या कानांपर्यंत जायलाच हवं म्हणून. राजनची गोची अशी झाली होती की तो समोरासमोर जाऊन जीतला भेटू पण शकत नव्हता. बरं! फोन करावा तर दादासाहेबांचा एक माणूस कायम त्याच्या ऑफिसात ठिय्या देऊन बसलेला. त्याला ना हात हलवता येत होता ना डोकं चालवता येत होतं.

इकडे डॉ. संग्रामनी पाठवलेलं ते पत्र निरोप्यानं धाम बिल्डर्सच्या चपराश्याकडे आणून दिलं. चपराश्यानं ते पत्र आणून टेबलवर ठेवलं. पण त्यावेळी जीत फोनवर बोलत असल्यानं तो त्याला पुढचा निरोप सांगू शकला नाही. आपलं फोनवरचं बोलणं संपल्यानंतर जीत पुन्हा कामात गुंतला आणि पत्राविषयी सगळ्या गोष्टी विसरुन गेला. दुसर्‍या दिवशी साफसफाई करायला येणार्‍या पोरीनं ते पत्र सवयीनं उचलून पत्रांच्या बॉक्समध्ये टाकलं. जीतच्या ऑफिसचा नियमच होता की टेबलावरचा कागदाचा चिठोराही त्याच्या परवानगीशिवाय बाहेर टाकायचा नाही म्हणून. त्यामुळे सहसा कुठलेही कागद त्याच्या नजरेत न येता रद्दीत टाकले जात नसत आणि ही रद्दी काढण्याचा मुहूर्त काही ठरलेला नसायचा. त्याचा मूड झाला की तो एखाद दिवसाची साईटवरुन सुट्टी घ्यायचा. तिथं त्याच्याऐवजी त्याचा इन्स्पेक्शनर जायचा आणि जीत ऑफिसात कागदांच्या पत्रावळी मांडून त्याचं सेपरेशन करण्याच्या कामाला लागायचा. या सगळ्यामुळे दादासाहेबांचं कारस्थान जरी राजनला माहीत असलं तरी जीत अजूनही त्यापासून अनभिज्ञ होता. पण ़एक मात्र होतं; कारस्थान असो वा आणखी काही दादासाहेबांच्या मनासारखं झालं होतं. जीत आणि श्रीच्या मैत्रीत फूट पडली होती. जिला मिळवण्यासाठी इंदर धडपडला पण जी त्याला मिळाली नाही त्या प्रिशाला त्यानं नुसतं घराबाहेरच नाही तर श्रीच्या आयुष्यातूनही बाहेर घालवलं होतं. आणि आता त्याला आपल्या त्या भाजलेल्या चेहर्‍यावरच्या डागांची डागणी कमी झाल्यासारखी वाटत होती. जीतनं स्वतःच्या प्रयत्नांनी हे मोडणारं मैत्रीचं घरकुल सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या कुठल्याही प्रयत्नांना नियतीनं यश मिळू दिलं नाही. आता त्याचं आयुष्य अमू आणि इरवनसोबत बर्‍यापैकी शांततेत चालू होतं.

अमूनं प्रिशाला श्री आणि नंदितानं लग्न केल्याचं सांगितल्यानंतर तर तिच्या रागाचा पारा चढला होता. कारण हे घडल्यामुळे तिच्यावरच्या दुःखाचा पार कडेलोट झाला होता. आणि प्रिशा कधीच धर की कर वार या पठडीतली नव्हती. कितीही रागीट असली तरी ती तिचा राग जपून ठेवायची आणि एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायची की समोरच्याला हासहुस कराचीही संधी मिळायची नाही. कानूमावशी. कविशकाका, चांदनी यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांना आधी प्रिशाबद्दल वाईट वाटलं. मग त्यांना श्रीचा भयंकर राग आला अशा वागण्यासाठी. त्या सगळ्यांचं मत पडलं की प्रिशाने आता परत जावं आणि श्रीला या सगळ्याचा चांगला खडसावून जाब विचारावा. पण खूप विचारपूर्वक प्रिशानं निर्णय घेतला की ती आताच परत जाणार नाही. या सगळ्या गोष्टी ती आता वेळेवर सोडून देतेय म्हणून. अमूसकट सगळ्यांसाठी तिचा हा थंडपणा म्हणजे आश्चर्याचा झटकाच होता.

काळ त्याच्या गतीनं पुढं सरकत होता. मागे काय घडून गेलं? पुढे काय घडणार आहे? याची कसलीही चिंता न करता तो कधी धावत होता, कधी क्षणभर विश्रांती घेत होता तर कधी दुडक्या चालीनं चालत होता. जीत-अमूचा इरवन वर्षाचा झाला. प्रिशाची वैद्रुती 9 महीन्यांची तर नंदिताचा अनिशपण आता 5 महीन्यांचा झाला होता. प्रिशाचं पहिलं वर्षं प्रेगन्सी, डिलिव्हरी आणि अभ्यास ह्या सगळ्यात कुठच्याकुठे निघून गेलं. आताचं चालू असणारं एक वर्ष आणि तिचं इंटेरिअर पूर्ण होणार होतं. अर्ध सेमिस्टर संपून पुढचं अर्ध सेमिस्टर सुरु झालं होतं. या सेमिस्टरमध्ये त्यांना सातत्याने गेस्ट लेक्चर्स अटेन्ड करायची होती. भारतभरातून आणि काही खास वेळेला भारताबाहेरुनही गेस्ट लेक्चरर त्यांच्यासाठी येणार होते. एकक्सटर्नल विद्यार्थीनी असूनही प्रिशाचा उत्तम विद्यार्थिनी असा कॉलेजात बोलबाला होता. त्यामुळे तिला सक्त ताकिद होती की तिने एकही गेस्ट लेक्चर चुकवायचे नाही. प्रोफेसर चतुर्वेदींची तर प्रिशा लाडकी विद्यार्थिनी होती. त्यामुळे या गेस्ट लेक्चरचा सगळा आडाखा तिच्याकडे आधीच पोचत असे. पुन्हा त्या लेक्चरच्या संदर्भात तिला फायलींगही करुन द्यावी लागे जी पुढे येणार्‍या मुलांसाठी खूप उपयोगी ठरेल असं नियोजन प्रोफेसर चतुर्वेदींनी केलं होतं.

प्रिशाला आता वैदुची फार काळजी करावी लागत नसे. तिच्या दिमतीला माऊआजी आणि वेळ काढून काकाजोपण असायचे. चांदनी तर तिची दुसरी आईच झाली होती. त्यामुळे प्रिशा निश्चिंत मनाने लेक्चर अटेन्ड करु शकत होती. चांदनीनं आपलं स्वतःचं इंटेरिअर आऊटलेट चालू केलं होतं. प्रिशा तिला त्यातपण मदत करे. जीतनं एकंदरीतच सगळ्या प्रकरणानंतर फक्त स्वतःचा व्यवसाय आणि कुटुंब यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. नाही नाही म्हणता प्रिशा बेपत्ता होऊन आता दोन वर्षं होत आली होती. पण तरीही तो अजूनही इन्स्पेक्टर दामलेंच्या संपर्कात होता. न जाणो ती कधीतरी, कुठंतरी, कुणालातरी ती दिसायची या एकाच आशेवर होता तो. धाममधून वेगळं झाल्यानंतर श्रीनं सर्वापासून स्वतःला वेगळं काढलं होतं. मग आयुष्यात नंदिता आली. मागोमाग अनिशही आला. त्याला आता व्यवसाय करण्यात काहीच रस नसल्यानं त्यानं सरळ एका खाजगी बिल्डरकडे नोकरी पकडली होती. अनिशच्या जन्मापासून नंदिताच्या जुन्या त्रासानं जागा बदलून पुन्हा डोकं वर काढलं होतं. सतत केमो करणं शक्य नसल्यानं तिच्या ह्या ट्यूमर काढून टाकण्यासाठी आजवर 5-6 सर्जरी झाल्या होत्या. सातत्यानं जागा बदलणार्‍या ट्युमरमुळे नंदिताचं शरीर आतून पूर्ण फोफशा होत चाललं होतं. पण अजूनही तिनं श्रीला याविषयी काहीच सांगितलं नव्हतं. कुणास ठाऊक ती कुठल्या वेळेची वाट बघत होती ते! तिची खूप इच्छा होती की अमू आणि जीतशी बोलावं. खूप गप्पा माराव्यात. श्रीचे त्यांच्याशी तुटलेले संबंध पुन्हा पूर्वीसारखे करावेत. पण अमू तिच्याशी कामाव्यतिरिक्त कधीही फार बोलत नसे. जीतनं तिला आपली लहान बहीण मानल्यानं त्यानं मात्र कधी तिच्याशी संबंध तोडले नव्हते. तो तिच्याशी हसून खेळून बोलून चालून असला तरी श्रीमुळे त्यालाही मर्यादा होतीच. श्री आधीच मुखदुर्बळ. त्यात मागल्या घटितांचा त्याच्या मनानं चांगलाच धसका घेतलेला; कारण त्या घटनांनी त्यानं त्याच्या आयुष्यातली फक्त माणसंच नाही तर प्रेमही गमावलं होतं. आता त्याला तसल्या कुठल्याही गोष्टींच्या पुनरावर्तनाची दुरान्वयेही शक्यता नको होती. त्यामुळे इच्छा असूनही तो आपल्याच माणसांच्या जवळपास फिरकत नव्हता की माफी मागण्यासाठी पुढे येत नव्हता. मात्र नंदितापासून लपवावं म्हटलं तरी त्याला आपलं हे दुःख लपवून ठेवता आलं नाही. त्याच्या सामान्य असण्याच्या बुरख्याखाली तिळतिळ जळणारा श्री नंदिताला त्याच्याही नकळत दिसला होता. असं नव्हतं की त्याचं नंदितावर प्रेम नव्हतं; पण तो प्रिशाला मात्र कधीच विसरु शकत नव्हता. कितीही काही झालं तरी माणसं आयुष्यातली पहिल्यांदा घडणारी घटना विसरु शकत नाहीत ना! मग ते पहिलं चालणं असो, बोलणं असो, पहिल्यांदा प्रेमात पडणं असू दे वा झालेला दुगाफटका असू दे. नंदिताला मात्र त्याच्या ह्या आतल्या एकटेपणाची चांगलीच जाणीव होती. आयुष्यात कधीकाळी हाच एकटेपणा तिचाही सोबती होता. ती सोबत असतानाही श्रीच्या हृदयात प्रिशा नसल्याची सलणारी खंत तिला सतत जाणवत राही. श्रीनं तिच्या नकळत प्रिशाचा एक फोटो आपल्या ऑफिसबॅगेत जपून ठेवला होता. अनेकदा त्याची मध्यरात्र प्रिशाच्या त्या फोटोच्या संगतीत, तिनं लावलेल्या रातराणीच्या सोबतीत झोपाळ्यावर बसून पहाटेकडे कललेली तिनं पाहिली होती. त्यानं कुणाला दिसू दिले नसले तरी प्रिशाच्या आठवणीनं ओघळलेल्या आसवांचे त्याच्या गालांवरचे सुकलेले डाग तिच्या नजरेनं टिपले होते. प्रेमासाठी आसुसलेल्या तिला श्रीकडून प्रेम आणि आधार दोन्ही गोष्टी मिळाल्या होत्या. प्रिशा त्याच्या आयुष्यातून कशी निघून गेली हे त्यानं सांगितलं नसलं तरी भाईकडून तिला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. त्यामुळेच तिला काहीही करुन प्रिशाला पुन्हा श्रीच्या आयुष्यात परत आणायचं होतं. तिला तिच्या आयुष्याची मर्यादा माहीत होती आणि तिला हेही ठाऊक होतं की याच मर्यादेच्या आत तिला हालचाल करावी लागणार आहे. कारण जोवर तिच्या कॅन्सरची ट्रिटमेंट सुरळीत चालू आहे तोवरच ती तग धरुन राहणार होती. आताशा तिलाही सततच्या तपासण्या, सर्जरी आणि जगण्यासाठीची धडपड या सगळ्याचा कंटाळा आला होता. या सगळ्या गोष्टी ती श्रीच्या नकळत करत असे. पण जेव्हा जेव्हा ती वैकल्पला भेटे तेव्हा तेव्हा तो तिची समजूत घालत असे की तिनं हे सगळं श्रीला सांगावं. ती मात्र ठाम होती की हे सगळं ती पार शेवटची वेस ओलांडल्याखेरीज श्रीला सांगणार नाही. ज्यानं मला आयुष्यात प्रेम दिलं त्याला त्याचं प्रेम परत मिळण्यासाठीचा माझा प्रयत्न संपतोय, मला हे आयुष्य कमी पडतंय हे जाणवायला लागलं की मी हे त्याला सांगेन.

स्वरा... 

22/11/2020

............

*47*

प्रिशाची खूप जोरात तयारी चालू होती गेस्ट लेक्चरसाठीची. चतुर्वेदी सरांकडून नेहमीप्रमाणे तिला विषय आधीच कळला होता. विषय होता प्राचीन भारतीय उपखंडातील इंटेरिअर डेकोरेशन. यासाठी तिनं चांदनीच्या मदतीनं लायब्ररीचा कोपरा न् कोपरा शोधला होता. जे जे म्हणून हाताला मिळेल त्या त्या संदर्भाचा वापर तिनं यासाठी केला होता. या सगळ्या प्रकरणात तिला अफलातून संदर्भ सापडले होते आश्रमशाळा आणि जनस्थानमधल्या राहणीमान आणि इंटेरिअरचे. तिला ते सगळं वाचून इतकं आश्चर्य वाटलं आणि अभिमानही की आमचे पुर्वज किती पुढारलेले होते.

त्याकाळी आजच्यासारख्या भिंतीआड मुलांना बंद करुन ठेवणार्‍या शाळा नव्हत्या. विद्यालय हा वय वर्ष आठपासून ते वय वर्ष बारा ते पंधरापर्यंत चालणारा प्राथमिक शिक्षणाचा प्रकार होता. त्यानंतर विद्यापीठात जाण्याची संधी सर्वांनाच उपलब्ध करुन दिली जाई; अगदी स्त्रियांनाही. घरं बांधताना स्त्रियांच्या मतांचा फारच काळजीपुर्वक विचार केला जाई. त्याप्रमाणेच आश्रमशाळा बांधतानाही त्यांच्या मतांना फार सन्मान दिला जाई. कारण आश्रमशाळा बांधण्यामागे फार विचारपूर्वक काम केले जाई. त्या आश्रमशाळांमध्ये वगर्वारीप्रमाणे शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली जाई. स्त्रियांच्या सोयी पाहिल्या जात. प्राण्यांच्या राहण्याची, शिकण्याची न् त्यांना माणसाळवण्याचीही सोय पाहिली जाई. या प्रकारच्या शाळा मनुष्यवस्तीपासून दूर जंगलाच्या अंतर्भागात असत. जिथे जंगली श्वापदांचं भय कायम असे, प्रचंड पाऊस, थंडी यांना तोंड द्यावं लागे. अशावेळी त्याठिकाणी सूर्यप्रकाश आणावा लागे व टिकवावाही लागे. या प्रकारचं तंत्रज्ञान त्याकाळी विकसित केलं गेलं होतं. शिवाय फारच कमी वेळा हे लोक वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी वास्तव्यास राहत. सतत बदलत राहणार्‍या त्यांच्या अशा वास्तव्यामुळे त्यांची सौंदर्यदृष्टी विकसित झाली होती. अर्थात आजही अनेक डेकोरेटर जसे नो वेस्ट या तत्वावर काम करत आहेत तसे ते त्याकाळीपण होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक सुर्यप्रकाशाचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी करत असत. ते काही फक्त लाकूड, दगड, शंख-शिंपले, गवत, रत्न क्वचित हाडे यांचा उपयोग करुन थांबत नव्हते तर भास-आभासाचा खेळही ते यासाठी निर्माण करत असत. जे थ्रीडी प्रकरण आज वापरलं जातं ते मयाने पांडवांना त्याकाळात उपलब्ध करुन दिलं होतं. प्रचंड प्रमाणात दगडाचा वापर बांधकामासाठी केला जात असल्यानं त्या दगडांवरच्या कोरीवकामात खूप प्रगती त्याकाळात झाली होती. आज आपण पाहतो ते फॉल्स सिलिंग त्याकाळीही होतं. मात्र त्याकाळी ते फक्त सौंदर्यात भर टाकण्याच्या उद्देशाने बनवले जात नसे तर उष्णठिकाणी थंडावा निर्माण करण्यासाठी अशा फॉल्ससिलिंगमध्ये पावसाचं पाणी साठवण्याची सोय केली जाई. तर थंड ठिकाणी बाहेरुन येणार्‍या थंड वार्‍यांना अडवून धरण्यासाठी याचा वापर केला जाई. शेवटी इंटेरिअर डेकोरेशन म्हणजे काही फक्त दृष्टीसुख नाही तर जे करु ते वापरासाठी सुयोग्य असलं पाहिजे हा दृष्टिकोन असतो ना! स्वतः दशरथपुत्र लक्ष्मण या प्रकारच्या नयनरम्य कुटी बांधण्यात प्रवीण होता हेही तिला या अभ्यासातून लक्षात आलं.

म्हणता म्हणता लेक्चरचा दिवस आला. वैद्रुतीला चांदनीच्या स्वाधीन करुन ती कॉलेजला गेली. आज तिनं तिचं ऑलटाईम फेव्हरीट कॉम्बिनेशन जाणीवपूर्वक घातलं होतं. आफ्टरऑल फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन! लांब हातांचा पांढरा शर्ट आणि जिन्स. मात्र आज चांदनीच्या सांगण्यावरुन तिनं त्यावर ज्यूटचं जॅकेट घातलं होतं आणि आज ती एकदम कमाल दिसत होती. तिला जर अशी कुणी पाहिली असती तर विश्वासच ठेवला नसता की ती एका मुलीची आई आहे म्हणून. तरी हॉलबाहेर भेटलेल्या शर्वरीनं तिला विचारलंच, '' कौनो कतल-वतल करनेका इरादा है का लेक्चरार का? ''

प्रिशा नुसतीच हसली आणि विचारलं, '' नाम-वाम कुछ बताए है के अभीभी सब गुलदस्ताऍ मां रखे है! ''

'' हां बताए तो है पर याद नहीं आ रहा है। सुना है के जर्मनीसे आ रहे है। पर है भारत के ही। महाराष्ट्रामें रहनेवाले है। ''

'' का बात कर रही हो? मराठी है? ''

'' हां तो! तुमको का हुवा? क्यू इतनी फुदफुदाय रही हो? ''

'' अरे कुछ नहीं; वो तो आज मेरी पढाई बहुत अच्छी हुई है ना! बस इसिलिए। ''

'' हां, हां, तुम तो ऐसे भी कालेज की टापर हो। हम तो बस यूही नाम के लिए है। ''

'' अब मेरी तारिफ रहने दे। चल अंदर चलते है। ''

दोघीही आत गेल्या. त्यांच्याच मागोमाग प्रोफेसर चतुर्वेदी, विद्याधर पाठक, रामनारायण बन्सल आणि आजचे गेस्ट युवराज देशमुख आत आले. लेक्चर सुरु होण्याआधी प्रोफेसर चतुर्वेदींनी पाहुण्यांची ओळख करुन दिली.

'' यहा आए सभी छात्रो को हमारा प्रणाम। कहते है के धन को बांटनेसे वो कम हो जाता है और विचारों को बांटनेसे वो दो गुना हो जाते है। इसी विचार को मध्यवर्ती रखते हुए हमारे कालेज में पिछले छः महीनो सें पुरे भारत और विदेश मे से आपके साथ अपने चिंतनशील एवं ज्ञानवर्धक विचार बांटने के लिए बहुत सारे अतिथी आमंत्रित किए गये है। आज के हमारे आदरणीय अतिथी भी इन्ही आमंत्रितोमे से एक है। स्वागत किजीए हमारे आज के प्रमुख आदरणीय अतिथी श्रीमान युवराज देशमुखजी का। प्रायः वह महाराष्ट्रा के है किंतु आज उनको वास्तव्य जर्मनी में है। उन्होंने अपनी उच्च शिक्षा वही जर्मनीमें ही पुरी की है। और वहीं पें उन्होंने अपनी कंपनी झिम्लीच का प्रारंभ किया है। इसका हिंदी में अर्थ होता है स्वर्गीय सुंदर अर्थात आप इसे अतिसुंदर भी कह सकते है। इनकी इस कंपनी की विशेषता यह है की ये कंपनी प्राचीन इंटेरिअर के लिए जानी जाती है। हमारे सौभाग्य से वे आज हमें अतिथी के रुप में प्राप्त हुए है। श्रीमान देशमुखजी जर्मनी के विद्यापिठो में भी अतिथी के तौर पें लेक्चर देते है। तो मै स्वयं को यही पर रोक कर उनसे बिनती करत हू की वे अपने उच्चतम विचार आपतक पहुचाए। धन्यवाद। ''

अशी लंबीचौडी भाषणबाजी करुन चतुर्वेदी सर त्यांच्या जागेवर बसले आणि युवराज देशमुख लेक्चर देण्यासाठी उभे राहिले. पहिल्याच वाक्यात त्यांनी स्वतःला फार हिंदी येत नसल्याचं क्लिअर करुन टाकलं.

'' हे हाय गाईज. दौ आय नो व्हेई लिल हिंदी यू हॅव टू बॉदर माय इंग्लिश. आय ऍम व्हेरी मच सौरी फॉ दॅत. ''

प्रिशा केव्हापासून त्याच्याकडे एकटक लावून बघत होती. साल्ला! इतक्या वर्षांत कसला हॅन्डसम आणि डॅशिंग झालाय हा! कोल्हापूरात असताना किती वेंधळा होता हा! ती मनातच विचार करत होती की याला लेक्चरनंतर कसं काय भेटता येईल. अनेक वर्षं जर्मनीत राहिल्यानं त्याच्या इंग्लिशचे उच्चारही जर्मनीकडे झुकणारे होते. त्याच्या लेक्चरनं तिथे उपस्थित सगळेजण चांगलेच प्रभावित झाले. त्यात प्रिशाही होती. पण तरीही अगदी शेवटी शेवटी का असेना तिनं तिचा प्रश्न विचारलाच.

'' सर मे आय आस्क यू समथिंग? ''

'' या प्लिस! ''

तिला उभी राहिलेली बघताच युवीला आश्चर्याचा झटकाच बसला. प्रिशा! ही खरंच प्रिशा आहे? पण ही इथं कानपुरात काय करतेय? आणि ही अशी स्टुडंट म्हणून कशी काय आली इथं? असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात भुंग्यासारखा पिंगा घालायला लागले आणि त्याला तिचा प्रश्नच ऐकू आला नाही.

'' सौरी कॅन यू रिपित यौर क्वोशन प्लिस! ''

'' येस सर. इन एन्शन्ट टाईम पिपल किप वॉटर लिलिज ऍट देअर हॉल ऍन्ड कॉरीडॉर इन वूड बास्केट; टू किप द एन्व्हॉयरमेंट हॅपी. इफ वी डिड द सेम थिंग नाऊ व्हॉट टाईप ऑफ मटेरिअल यू सजेस्ट टू युज सर? ''

'' आह्! आय इंम्पेस. गुद क्वोशन. दे युस तिकवुद फॉ धिस ताईप औ देकोरेसन कॉस इत सोक इन वातर फौ लान्ग ताईम. नाऊ द ताईम वी हॅवींग मेनी ताईप औ मतेरिअल तू युस फौ इत. मै बी इतस् सिमेंत, व्हाईत सिमेंत, फी ओ फी, प्लास्तिक औ मेनी अद ताईप औ मतेरिअल अल्सो. ''

प्रिशाला खरंतर याचं उत्तर माहीत होतं पण तिला कुठूनतरी तिचं अस्तित्व युवीला जाणवून देणं महत्वाचं होतं. आणि तसं ते त्याच्या लक्षात आलंय हे तिला लेक्चर संपल्यावर लगेच कळलं.

लेक्चर संपवून बाहेर जाणार्‍या प्रिशाला युवीनं हाक मारली.

'' हलौ मिस! ''

ती तिथंच थांबली.

'' इफ यु दोन्त हॅव पॉब्लेम मे आय तॉक विथ यू फौ व्हाईल? ''

तिनं हो अशी मान डोलवताच त्यानं लगेच सगळ्या प्रोफेसरांची परवानगी घेतली.

'' जंन्तलमन एस्क्यूज मी. आय जॉईन यू सम ताईम लेतर! तॅन्क्यू. ''

'' आय तिंक आय नो यू वेल? यू मस बी पिशा; पिशा पातील? '' तिनं पुन्हा हसून मान डोलवली.

'' कम लेतस् तेक कौफी ऍत कॅन्तीन. ''

त्यानं स्वतःच तिला कॉफी ऑफर केली आणि दोघेही कॅन्टीनला गेले. तसा त्याच्यासाठी हा प्रकार काही नवीन नव्हता. तो ज्या देशाचा आता नागरिक होता तिथं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक प्रकारचं खेळीमेळी आणि मैत्रीपूर्ण सौहार्दाचं नातं असायचं. पण इथे कानपुरात मात्र अशा गोष्टी किंवा असं वागणं हेच विशेष होतं.

त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी आणि स्वतःसाठी नॉमर्ल कॉफी घेऊन ती टेबलकडे येऊन बसली.

'' कसा आहेस तू? किती वर्षांनी भेटलो ना आपण? तू हे लेक्चर वगैरे केव्हापासून सुरु केलंस युव्या? ''

आता तो तिच्यासाठी तिचा प्रोफेसर नाही तर तिचा जुना सुहृद होता.

स्वरा... 

23/11/2020

..........

*48*

'' नंदिता, तुला कितीवेळा सांगितलं म्हणजे या सगळ्यांचं गांभीर्य कळणार आहे ? '' वैकल्प आता तिच्या या अशा वागण्यावर खूप चिडला होता.

'' अगं याही वेळेची तुझी केमो संपलीय बाळा. आणि मी अजूनही सांगू नाही शकत की तो कॅन्सर पुन्हा तुझ्या शरीरात आपल्याला दृष्टीलाही पडणार नाही म्हणून. तो जागा बदलत तुझ्यावर सूड उगवतोय हे तरी लक्षात घे गं! तू रोज रोज पावला पावलानं मरणाच्या जवळ जातेयस. श्रीला हे सगळं कधी सांगणार आहेस तू? ''

'' खरं सांगू का भाई मला त्याला ही गोष्ट कधीच सांगायची नाहीए. पण मी तुम्हांला त्याच्या रागाच्या भरीला पाडणार नाही. कारण मला माहीत आहे की कधीतरी ती वेळ येणार आहे की हे सगळं मला त्याला सांगावं लागेल. आणि मी तो निर्णायक क्षण येईपर्यंत वाट पाहणार आहे. मला फक्त श्रीची काळजी नाहीए भाई! मी गेल्यानंतर माझ्या अनिशलाही कुणीतरी प्रेमानं सांभाळायला हवंय. तू, जीतदादा, अमू वहिनी, श्री सगळे असलात तरीही त्याला त्याच्या वाट्याचं आईचं प्रेम मिळायला हवंय जे त्याला फक्त प्रिशाताईच्या परत येण्यानंच मिळू शकेल. ''

'' नंदू, राजा असं निर्वाणीचं बोलू नकोस गं! काळजाला घरं पडतात माझ्या. तुझ्याशिवाय मला या एवढ्या मोठ्या जगात कोण आहे गं? ''

'' अनाहिता! तू विसरलास का भाई तिला? ती अजूनही तुझ्या बोलावण्याची वाट पाहतेय. तू मला वचन दे भाई की मी असले नसले तरी तू अनाहिताला तुझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून निवडशील. ''

'' मला ऐकवत नाहीए नंदू! बास कर. किती टोकाचं बोलतेयस तू? आयुष्यात इतका त्रास सहन केल्यावर माझ्या लेकराला अजून त्रास होऊ नये म्हणून मी आजही एकटाच आहे; आणि तू मला अशी अर्ध्यात सोडून जायची भाषा करतेस? ''

यावर मंद हसत वैकल्पचे हात हातात घेऊन नंदिता म्हणाली, '' खरंच भाई हे मी बोलतेय की ही आपल्यासमोरची सत्य परिस्थिती आहे. आपण तिचा स्विकार मोकळ्या मनाने करायला नकोय का? राहता राहिली अनाहिता. तर तू तिची काळजी नको करुस. मी भेटलेय तिला. तिचा मला कधीच त्रास होणार नाही. माझी खरी समस्या तर प्रिशा ताई आहे जिचा अजूनही काही शोध लागत नाहीए. जर मी गेल्यानंतर मला श्री आणि अनिशसाठी प्रिशाताई हवीय तर तुझ्यासाठीही मला अनाहिता तुझ्या आयुष्यात हवीय भाई. आणि यासाठी जर तू मला स्वार्थी ठरवत असशील तर मी आनंदाने ते बिरुद मिरवेन. ''

'' काय सांगतेस? तू प्रिशाला शोधतेयस? कुठे? कशी? तुला माहीत आहे ना प्रिशाला जाऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त होऊन गेलीत. तू तिला कुठे शोधशील? आणि ती तरी तुला कुठे सापडणार गं? तेही इतक्या मोठ्या काळानंतर! ''

'' भाई, असं म्हणतात की शोधल्यानंतर देवसुध्दा सापडतो. मग मला सांग प्रिशाताई मला का नाही सापडणार? ती काय हवेत अदृश्य झालीय का न सापडायला! ''

'' मी प्रार्थना करेन की तुझं इप्सित साध्य होवो. आणि तू तुझी काळजी घेण्याचा शब्द देत असशील तर मीही तुला वचन देतो की अनाहिता कायमची माझ्या आयुष्यात येईल. ''

'' भाई! '' असं म्हणून तिनं आनंदाने त्याला मिठी मारली.

अनिशच्या जन्मापासून नंदिताचं घटत जाणारं वजन श्रीच्या नजरेत आलंच होतं. शिवाय तिचं थकणं, तिच्या चेहर्‍यावरची उतरलेली रया या सगळ्या गोष्टींवरुन तो तिला छेडत असे. पण ती त्याला अजिबात ताकास तूर लागू देत नव्हती.

' अरे होतं असं काही काही बायकांच्या बाबतीत. तुला काय कळतं रे बाळंतपणातलं तसंही! काही बायकांचं वजन वाढत जातं, काहींचं घटत जातं. काहींना बाळंतरोग होतात. काहींना कायमस्वरुपी मानसिक आजार लागतात मागे. आणि एक मूल नऊ महीने पोटात सांभाळून त्याला जन्माला घालून गोष्टी संपत नसतात ना! इथूनच तर सगळी सुरुवात होते. एक गायनॅक म्हणून सांगतेय तू माझ्या ह्या घटणार्‍या वजनाकडे वगैरे फार लक्ष नको देऊस. त्याच्या वेळेवर ते पुन्हा वाढेलही. '

असं श्रीला ' नरो वा कुंजरो वा! ' अर्धसत्य सांगत ती वेळ मारुन नेई. श्री आता आपल्या जुन्या चुकांमधून नव्याने शिकत होता. त्यामुळे तो फारसा अडून राहून खरंखोटं करण्याच्या फंदात पडत नसे. आता तो बर्‍यापैकी बोलायला लागला होता. नंदिताशीही तो बरा बोलत असे. जरी अजूनही तो त्याच्या मनातल्या अनेक गोष्टी मनमोकळेपणानं तिच्याशी शेअर करत नसला तरी पूर्वीसारखा प्रासंगिकही बोलत नव्हता. त्यातही अनिश त्याचा लाडका होता. तो बरेचदा खेळता खेळता जीतच्या घरी जाई. कधी कधी इरवनच्या सोबतीनं तिथंच झोपी जाई. खूपदा श्री त्याला अंगणात जाऊन हाक मारुन त्याला परत घेऊन जाई. पण जेव्हा केव्हा अनिश यायला नकार देई तेव्हा तेव्हा तो मुकाट्याने परत जाई आणि नंदिता किंवा सदाकाकांना त्याला आणायला पाठवत असे. नंदिताला आयतीच संधी मिळे अमू आणि जीतशी संवाद साधण्याची. आधी अमू तिला टाळत असे. पण मग जीतनं तिला समजवल्यावर तिनं आपल्या मनावरचं मळभ दूर करुन नंदिताला स्विकारलं. आता अमूच्या मेलमधून प्रिशाला श्रीसोबतच नंदिताचे अपडेटस् जात असत. अनिश- इरवनच्या गंमतीजमतींसोबत त्यांचे फोटोही जात असत. प्रिशाही वैद्रुचे फोटो अमूला पाठवे. प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या त्याच्या गतीनं चालत होतं. जीत त्याच्या कामाधंद्यात गुंतला होता. अमू इरवनमध्ये. नंदिता पेशंट, अनिश, श्री आणि प्रिशाच्या शोधामध्ये. श्री काम, घर आणि प्रिशाच्या आठवणींमध्ये. चांदनी तिचा उद्योग-व्यवसाय, प्रिशा आणि वैद्रुतीच्या आसपास गुंतली होती. मालिनी काकू, दिगंबरदादा, माधवदादा, सदाकाका ह्यांची आयुष्यं पोराबाळांच्या संसारात गुंतून पडली होती.

या सगळ्यांच्या आयुष्यात जुनाच असणारा पाहुणा नव्यानं आला होता. युवराज देशमुख. नई बौतल में पुरानी शराब!

स्वरा... 

24/11/2020

..........

*49*

शब्दांची जुळवाजुळव करत कॉफीचे घोट घेणार्‍या युवीला प्रिशानं पुन्हा विचारलं, '' लेक्चरार केव्हापासून झालास तू? ''

'' सी प्रिशा, दोन्त एक्सपेक्त फ्रॉम मी दॅत आय दिरेक्तली तॉक वित यू इन फाईन मराती. कॉज सिन्स लॉन्ग ताईम आय दोन्त तॉक इन मराती. आय दोन्त हाव मराती फ्रेन्स ऍत जर्मनी. आय तिंक यू बेतर अंदस्तॅन्स मी. ''

'' ओके नो प्रॉब्ज डिअर. आय कॅन अंडरस्टॅन्ड यू. वी मीट आफ्टर लॉन्ग टाईम सो आय अल्सो हॅव सो मच क्युरियॉसिटी अबाऊट हाऊ यू चेंन्ज युअर प्रोफेशन! डिरेक्ट एन्जीनिअर टू लेक्चरार? गुड प्रोग्रेस. ''

'' नो नो. यू आर मिसतेकन. आय ऍम स्तिल एंजिनिअर अन्द इंतेरिअर देकोरेतर. यु हर्द अबाउत झिल्मिच इन माय इन्त्रो; राईत! इतस् माय ओन कंपनी ऑफ इंतेरिअर देकोरेशन ओन्ली ऍत जर्मनी. आय वोन्त चेंज माय जॉब. इत हॅपन्स सदनली. वन्स माय फ्रेन्द ऍत जर्मनी नीदेद अ पसन हू तेल्स समथिंग अबाऊत इंतेरिअर देकोरेशन इन हिज कॉलेज. हि आस्कस मी फॉ हेल्प. आय से येस ऍन इतस् स्तारतेर माय लेक्चरशिप. हाऊ बाऊत यू? व्हॉत आर यू दुईंग हिअर ऍत कानपुर? दोन्त से दॅत यू लिव्हज कोलापुर. हाऊज झीत? ऍन आमू? वेअरीज श्री? आय हर्द यू मॅरीद इच अदर! इतस व्हेरी फाईन थिंग्. झीत ऍन आमू अल्सो मॉरी वित इचआदर्? ओ माय गॉद आय मिस्ताऊत सो मेनी थिंग्ज. माय मॉमदॅद इज नो मोअर. आय लॉस्त देम इन ऍन अक्सीदेन्त वेन आय वॉज ऍत जर्मनी फॉ फददर् स्तदीज. देन आय दिसायदेद तू लिव कोलापुर ऍन नॉत तू कम बॅक तू इंदिया. बत आय तिंक देअरीज समतिंक कॉल फेत् विच प्लॅन्स ऍन वी मित अगेन. बाय दि वे हाऊज युओ मॅरीद लाईफ? ऑल इज वेल. ''

अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रीणीला युवी मनापासून तिची ख्याली खुशाली विचारत होता.

'' या. एव्हरीथिंग इज वेल एक्सेप्ट मी ऍन्ड श्री. नाऊ अ डेज वी आर नॉट लिविंग टूगेदर. आय केम कानपुर ऑलमोस्ट फाईव्ह इयर्स अगो. माय मॉम्ज सिस्टर लिविंग ऍट कानपुर. आय लिविंग विथ हर फॅमिली. माय मासी, अंकल, देअर डॉटर अन्ड आय. ऍन्ड अ बिग सप्राईज फॉर यू दॅट आय ऍम हॅवींग अ डॉटर अल्सो हूज फिफ्थ बर्थडे इज कमिंग अप. धीस इज नॉट दि एन्ड माय डिअर. अनदर सप्राइज इज जीत ऍन्ड अमू अल्सो हॅवींग अ सन हू इज एल्डर दॅन वैद्रुती; माय डॉटर. ''

'' आ! वॉतस दॅत. हाऊ दिपिकल्त द नेम इज. हाऊ आय कॅन प्रनाऊन्स इत? ओ माय गॉद यू आर् सो दिपिकल्त! दोन्त से दॅत झीत्ज सन्ज नेम इज अल्सो दिपिकल्त तू प्रनाऊन्स! ''

'' नो नो. नॉट टू वरी. इटस् सो सिंपल. इरवन. ''

'' ओ माय गॉद! वॉत द मिनिंग ऑप बोत? ''

'' वैद्रुती मिन्स सीता ऍन्ड इरवन मिन्स अर्जुन. ''

'' आह! अगेन युअर लव टुवर्दस् एन्शत स्तोरीज. लिव इट. आय वॉन्त तू मित देम. आय ऍम सो हॅपी तू नो दॅत देअर इज समवन हू कॉल मी अंकल. ''

' हं! आणखी एक आहे तुला अंकल म्हणणारा तिकडं पुण्यात. पण आताच नाही सांगणार मी की मला दोन मुलं आहेत म्हणून. '

प्रिशा स्वतःशीच पुटपुटली.

'' यु विस्पर् समतिंग दिअर? ''

'' अं! नाही. कुठं काय? चल उशीर झालाय. भेटू पुन्हा. तुझा नंबर दे मला. आणि हा माझा नंबर ठेव तुझ्याकडे. का कुणास ठाऊक पण मला सारखं वाटतंय की तू भारतात परत येणारेस. ''

'' व्हॉत? मी? अं! मे बी पासिबल. आय वाना मित किदस्. सो मेसेज मी व्हेन इज युअर दॉतर्ज बद्द‍े. फॉ दॅत ओकेजन ओन्ली आय केम हिय एव्हरी इअर. ''

'' लेटस् सी डिपेन्ड अपॉन टाईम. बाय. सी यू सुन. ''

युवराजचा निरोप घेऊन प्रिशा तिथून निघून गेली. तेवढ्या वेळापुरते का होईना दोघांचे रस्ते बदलले होते. जे कदाचित पुन्हा भेटणार होते. 8 दिवस कामासाठी म्हणून भारतात राहून युवी जर्मनीला परत गेला. पण जेव्हापासून तो प्रिशाला भेटला होता तेव्हापासून त्याची भारतात परत येण्याची इच्छा परत उसळ्या मारायला लागली होती. आता चांदनीचं काम चांगलंच वाढलं होतं. एकाच वेळी त्या दोघी कानूमावशी आणि काकांनी चालू केलंलं समाजकार्य पाहत होत्या, त्यांचा सुरु केलेला इंटेरिअरचा व्यवसाय सांभाळत होत्या शिाय चांदनी अधूनमधून इंजिनिअरिंग असोसिएशनचं कामही पाहत होती. वैद्रुतीला मात्र त्यांनी पुर्णपणे मावशीच्या स्वाधीन केलं होतं. कारण या सगळ्या उस्तवारक्यांमधून त्यांच्याकडे फारच कमी वेळ राहत असे. कविश काकांनी त्यांचं हॉस्पीटल एका नव्या तरुण मुलाकडे हॅन्डओव्हर केलं होतं आणि आता ते फक्त फारच एमर्जन्सीच्या केस हाताळत होते. त्यामुळे या दोघींना मधे मधे त्यांचीही मदत मिळत असे. कानूमावशीनं मात्र तिचं सगळं लक्ष वैदु एके वैदुवर केंद्रित केलं होतं. युव्या- प्रिशाचं मेल आणि मोबाईलवर संभाषण चालूच होतं. आता तो पुन्हा एकदा बर्‍यापैकी मराठी बोलायला लागला होता. नाही म्हटलं तरी जर्मनीत जाऊन त्याला आता आठ-दहा वर्षं तरी झालीच होती. इतकी वर्षं तो सातत्यानं इंग्लिशच बोलत आल्यानं कधी कधी त्याला प्रिशाचं मराठी डोक्यावरुन जाई. मग तो पुन्हा तिला मेसेज करुन त्याचा अर्थ विचारी. प्रिशानं अजून चांदनीला तो आलेला प्रोफेसर तिचा कट्टी दोस्त आहे हे सांगितलंच नव्हतं. चांदनी या समजात होती की तिचा कुणी युवी नावाचा मित्र तिला मदत करतो आहे. हा तोच प्रोफेसर असेल अशी तिला अदमासेपण शंका आली नाही. युवराजची भारतात परत येण्याची इच्छा असली तरी एकाएकी तो जर्मनीतलं त्याचं बस्तान गुंडाळू शकत नव्हता. त्याला भारतात कुणीतरी चांगला क्लायंट मिळणं गरजेचं होतं. म्हणजे मग त्याच्या निमित्ताने तो जर्मनी सोडून इथे भारतात येऊन हळू हळू इथेही स्वतःचा व्यवसाय उभा करु शकणार होता. त्यानं प्रिशाला तसं सांगितल्यावर तिनं त्याला बघते प्रयत्न करुन तू काळजी करु नकोस, काही ना काहीतरी नक्कीच होईल असं सांगितलं.

यावेळी चांदनी तिचे क्लायंट गडाखियाज मियारा ऍडस् चं इंटेरिअरचं काम करत होती. गडाखियाजचे मनजी आणि सियाली गडाखिया दोघेही पंजाबी. त्यांची मियारा ऍडस् ही ऍड एजन्सी असण्यासोबतच तिथे मॉडेल फोटो शूटचा देखणा सेट होता. आता त्याच सेटचं रेनोव्हेशनचं काम चांदनीकडं पुन्हा आलं होतं. त्यांचं आधीचं कामही चांदनीनंच केलेलं असल्यानं त्यांनी पुन्हा तिच्याच कामावर विश्वास ठेऊन हे कॉन्ट्रॅक्ट तिला दिलं होतं. पण यावेळेस नेमकं काय बिनसलं होतं काही कळत नव्हतं. आज तिचं सातवं डिझाईन सियाली मॅमनी रिजेक्ट केलं होतं. कुछ रॉयल दिखना चाहिये, लोगोंकी ऑंखे चौधीयांनी चाहीए, ऐसा लगना चाहीए की अपनी दुनिया छोडके दुसरी दुनियामें आ गए है ब्ला ब्ला ब्ला कारणं देत ती दरवेळी तिची डिझाईन्स नाकारत होती. बिचारे मनजी ह्यात काही करु शकत नव्हते. कारण आधीचं डिझाइन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केल्यानं आताचं डिझाईन सियालीला तिच्या मनासारखं हवं होतं.

रिजेक्ट झालेलं डिझाइन घेऊन वैतागलेल्या दोघीजणी कॉफीशॉपमध्ये बसल्या होत्या. कॉफी पिता पिता त्यांची त्यावर चर्चा चालू होती.

'' क्या समझती है आखिर ये खुदको? और कितने डिझाइन लाके दू? आज सातवा डिझाइन रिजेक्ट कर दिया है! '' चांदनीचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडत होतं.

'' शांत होजा बच्चा। ऐसा तो होते रहता है। तू पहले शांति से कॉफी पी। और थोडा मुझे सोचने दे की आखिर ये सियालीजी हमारे इतने अच्छे डिझाइन्स रिजेक्ट पें रिजेक्ट क्यू किए जा रही है? आखिर वजह क्या होगी इसकी? चाहिए क्या उन्हे? कहीं हम ही तो समझनें में गलती नहीं ना कर रहे? देख, हमने पेहले उन्हे आज की तारिख में चलनेवाला डिझाईन दिया। उन्होंने दुसरों जैसा नहीं चाहीए कहके वो रिजेक्ट किया। फिर हम पॉंच साल पिछे गए; वो भी उन्हें पसंद नहीं आए। और आज का तो एकदम क्लासीवाला रि-रेनोव्हेशनवाला दिखाया हमनें; फिरभी रिजेक्ट किया। क्या मासला होगा रिजेक्शन के पिछे का? ''

'' दी अभी तुम्हांरी कॅलक्यूलेशन सुनते हुए मुझे कुछ कनेक्ट हुआ। सियालीजी के ऑफिस में और घर में मैने बहोत सारी पुरानी चिजे देखी है। ऐसा लगता है की उन्हें महलों में ज्यादा दिलचस्पी है। क्यू ना अब की बारी डिझाइन बनाते वक्त हम राजे रजवाडों की रहन सहन पें थोडा और रिसर्च करे? ''

राजेरजवाड्यांचा विषय येताच प्रिशाची ट्यूब पेटली.

'' ऐसी बात है! रुक दो मिनट। ''

तिनं लागलीच युव्याला फोन लावला.

'' युवी एक डिझाइन हवंय. त्यात भारत दिसला पाहिजे. तोही प्राचीन. किती वेळात मेल करशील? 4 दिवस! ओके ठीक. चांदनी आपण तो सेट मॉडेल शूटसाठीच करतोय ना! ''

'' हां दी। ''

'' हो रे! हे सगळं मॉडेल शुट आणि रॅम्पवॉक प्लॅटफॉर्मसाठीच आहे. कानपुरातला नामांकित मॉडेल कास्टिंगवाला आहे. मियारा ऍडस् गुगल कर. मनजी गडाखिया ओनरचं नाव. हां, हां. पंजाबीच आहे. त्याच्या बायकोला सियाली गडाखियाला जरा जास्तच इंट्रेस्ट आहे जुन्या भारतीय गोष्टींत. साल्या, आज अखेर बाईनं सात डिझाईन रिजेक्ट केलेत रे! ''

पलिकडून युवी हसला असावा. कारण प्रिशानं चांदनीसमोर हात पसरला न् म्हणाली, '' दे टाळी! ''

चांदनीच्या लक्षात आलं की त्यांचं काम झालं आहे म्हणून. कॉफीचं बिल पे करुन दोघीही बाहेर पडल्या.

'' क्यू दी, किसे फोन लगाया था आपने? ये युवी कौन है? ''

'' तू नहीं जानती। वैसे तो वो मेरा दोस्त है लेकीन अब प्रोफेसर भी है। ''

'' ये किसकी बात कर रहीं है आप? ''

'' तुझे याद है कुछ महीने पहले हमने एन्शन्ट इंटेरिअर के बारे में लायब्रेरी में खोजबीन की थी। ''

'' हां, हां, अच्छे से याद है। आपका कोई गेस्ट लेक्चर था ना इसी बारे में और लेक्चरारजी जर्मनीसे आनेवाले थे! ''

'' एकदम करेक्ट। वो जो गेस्ट आए थे वो असल में मेरा पुराना दोस्त निकला युवराज देशमुख। वो और मै बचपन सें साथ थे। उसकी जर्मनी में खुद की कंपनी है जो प्राचीन काल के इंटेरिअर को आज के जमानें में कन्व्हर्ट करके बना देती है। अभी मैने उसीसे बात की। ''

'' अच्छा! तो ये है अंदर की बात। तो बताओ कब मिलाओगी मुझे अपने प्रोफेसर कम दोस्त सें? ''

'' आ रहा है अगले महीने भारत। तभी मिल लेना। ''

स्वरा... 

25/11/2020

..........

*50*

चार दिवसांतच युवीकडून प्रिशाला हवा तो फिडबॅक आला. त्यानं सियालीला हवं तसं डिझाईन तयार करुन ते प्रिशाला मेल केलं. प्रिशानं त्याचा तो मेल पाहिला, चेक केला. सगळं मनासारखं हवं तसं जमून आलंय याची खात्री झाल्यावर तिनं त्याच्या प्रिंट काढल्या.

'' दी क्या कर रही हो? ''

'' अरे वो सियालीजी का काम दिया था ना हमनें युवी को! उसी का मेल आया है; वहीं चेक कर रही हू। ''

'' अरे वाह! ये तो बहुत अच्छी बात है। दिखाईये। ''

'' आ बैठ। ये देख मैंने उसकी प्रिंट निकाली है। ''

चांदनीनं सगळ्या प्रिंट व्यवस्थित पाहिल्या.

'' वाह दी, क्या खूब काम किया है बंदे ने। ये तो पुरा का पुरा महलसा लग रहा है। '' असं म्हणताना तिच्या चेहर्‍यावरची बदललेली रेषा बघून प्रिशानं विचारलं, '' क्या हुआ? ये मायुसी की रेखा को कहॉं से पकड लाई? ''

'' कुछ नहीं दी। सोच रहीं थी की सियालीजीने इसका डेमो मांगा तो हम क्या करेंगे? इसमें लाईट इफेक्ट कैसे दिखाएंगे? अभी तो हाथ में वक्त भी कम रह गया है ग्राफिक्स डिझाईन करने के लिए। ''

'' ओऽऽऽ इतनीसी बात! मेरे होते हु़ए तुझे चिंता करने की कोई जरुरत नहीं है बच्चा। ले कर ले अपनी तसल्ली। '' असं म्हणून प्रिशानं तिला मोबाईलमधला व्हिडिओ सुरु करुन दिला.

तो तिला युवीच्या टीमनं सेम डिझाईनचं ग्राफिक्स करुन बनवून पाठवला होता. पुरा व्हिडिओ पाहिल्यावर तर चांदनीनं आनंदानं प्रिशाला गळामिठीच मारली.

'' वाह वा दी! बंदा सच में काम का है। लगता है मिलना तो पडेगाही। ''

'' तो? आखिर दोस्त किसका है? '' प्रिशानं लगेच स्वतःची कॉलर ताठ करुन घेतली.

'' चलो दी आजही जाके हम ये सियालीजी को दिखाते है। तुम ही कहती हो ना कोई भी काम जितना जल्दी निपट जाए उतना अच्छा है। ''

'' हां मेरी अम्मा! याद दिलाने की जरुरत नहीं है। तू एक काम कर उनके ऑफिस में फोन लगाकर अपॉंईंटमेन्ट ले ले। तब तक मै युवी को मेल का रिप्लाय भेजती हू। ''

'' जी दी। जैसा आप कहो। ''

ती पलिकडे खिडकीशी उभी राहून फोन लावत होती. पण बहुधा तिथली लाईन बिझी होती. तिचा फोन लागत नव्हता म्हणून ती कंटिन्यू ट्राय करत होती. इतक्यात हातात पेपर आणि पेन्सिल घेतलेली वैद्रुती तिथे धावत आली. खिडकीजवळ उभारलेल्या चांदनीची पॅन्ट खेचत म्हणाली, '' मॉसी! मॉसी! सुनो ना! देखो ना मैने क्या बनाया है? '' आणि तिनं हातातली वही हलवून तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चांदनी ती वही घेणारच होती की प्रिशानं वैदुला हाक मारली.

'' वैदु, यहॉ आओ बेटा। लाओ मुझे दिखाओ। मौसी अभी बिझी है ना! ममा देखेगी वैदुने क्या बनाया है। आ जाओ ममा के पास। '' वैदु धावतच तिच्याकडे गेली आणि तिच्या मांडीवर चढून बसली.

'' मम्मा, नानी मौसी नें मुझे पेपर और पेन्सिल दिया। फिर मैने इसपर ये बनाया। ये देखो ये मैने घल बनाया है। नानी मौसी कहती है की पापा घल बनाते है औल मॉसी औल तुम मिलकर इस घल को सजाते हो। ''

तिनं काढलेलं ते घराचं चित्र पाहून प्रिशाला पुन्हा एकदा श्री आणि वामनकाकांची प्रकर्षाने आठवण झाली. बाबा नेहमी तिला म्हणायचे की श्री खूप लहान असल्यापासून त्याला कागद दिसला की त्यावर वेगवेगळ्या आकाराची, प्रकारची, रंगांची घरं रेखाटण्याचाच छंद. दिवाळीत इतर मुलांपेक्षा त्याने बनवलेल्या किल्ल्यांना जास्त बक्षिसं मिळायची. कुठून कुठून मुलं त्याला मदतीसाठी बोलवायला यायची. आणि तोही रंग्यासारखा उधळत त्यांच्याबरोबर जाई. काय काय कल्पना लढवायचा तो त्यासाठी. सायकलींवरुन पोत्यांनी माती घेऊन यायचा. कारंजे बनवण्यासाठी सलाईनच्या नळ्या लागायच्या म्हणून दवाखाने पालथे घालायचा. जंगल भरगच्च दिसावं म्हणून वाट्यांमध्ये, करवंट्यांमध्ये माती भरुन त्यात हळीव, मोहरी घालायचा. किल्ला तयार होई होईतो चांगली वितभर वाढायची ती रोपटी. मग ती जिकडे किल्ल्याची अवघड चढण केलेली असेल तिथे जंगलासारखी लावायची. तटबंदीसाठी कधी पुठ्ठे रंगवून वापरायचा तर कधी उन्हातान्हात बसून मातीच्या काडेपेटीच्या डबीच्या आकाराच्या विटा बनवायचा. एक ना दोन नाना प्रकार त्यानं त्यावेळी हाताळले असतील त्यासाठी; म्हणून तर त्याला जीतबरोबर शिकायला पाठवला होता. या सगळ्या आठवणींनी तिचे डोळे भरुन आले. तिनं आवेगानं वैदुला छातीशी कवटाळलं. तोवर चांदनीचा फोनही आटपला होता. मायलेकी काय करतायत म्हणून बघायला वळलेल्या चांदनीनं पाहिलं की प्रिशा आठवणींनी अनावर झालीय आणि कोणत्याही क्षणी रडायला लागेल. तिला वैदुच्यासमोर हे सगळं घडायला नको होतं.

'' दी! ये क्या कर रहीं हो आप? मत करो ऐसा दी। आपही ऐसे टूट गए तो वैदुको कौन संभालेगा? वो तो अभी बच्ची है। वैदु आपने अभी खाना नहीं खाया है ना! भूख लगी होगी? जाओ बेटा, नानी मौसी के पास जाओ वो आपका इंतजार कर रही होंगी। मै शाम को आके आपकी सारी कलाकारी देखूंगी। ठीक है। ''

'' प्रॉमिस ना मौसी? ''

'' हां बेटा वो तेरावाला पिंकी प्रॉमिस। अब जाओ जल्दी। ''

तिनं वैद्रुतीला कानूमावशीकडे पाठवून दिलं. खिडकीतून बाहेर बघत आठवणींपासून स्वतःची सुटका करुन घेऊ पाहणार्‍या प्रिशाच्या खांद्यावर हात ठेवत चांदनीनं विचारलं, '' क्या हुआ दी? आप अचानकसें इतनी इमोशनल कैसे हो गई? ''

'' क्या कहू चांदनी तुझसे? बहुत याद आती है श्री की! नहीं भुला सकती मैं उसे। एक बार उसके साथ जुडने के बाद कभी उसके बगैर जिने की कल्पनाही नहीं की थी मैंने; लेकीन आज देखो वक्त नें ये कौनसा पहिया घुमाया है के मैं और मेरी बेटी उसके बगैर अकेले तडप तडपकर जी रहे है। ''

'' क्या दी! मै जानती हू, अमू दी आपको जीजू के बारे में बताती है ना मेल में! फिरभी? ''

'' हां, वो तो बताती रहती है। पर मैंही उस सबसे दूर भागती रहती हू। जबसें उसने नंदितासे शादी की है तबसे उसके जिक्रसे दिल में एक कसक सी उठती है। कितने साल बित गये चांदनी! अब तो वैदुभी 5 साल की हो जाएगी। क्या श्री को कभी मेरी याद नहीं आती होगी? क्या मेरा प्यार इतना खोखला था की मेरे जाते ही श्री ने किसी और को मेरी जगह देदी? ''

'' दीऽऽ! किन बेखयालों में खोये हो आप? ऐसे कोई किसी की जगह किसीको दे सकता है क्या? हर शक्स को अपनी जगह खुद बनानी पडती है दी। कोई किसीकी जगह नहीं ले सकता। आप सारी बातें ना वक्त पें छोड दो दी। मुझे उसपें पुरा भरोसा है; सहीं वक्त पें वो आप दोनों को जरुर मिलाएगा। और रही बात दर्द की तो उसका हल सिर्फ सहनेवाले के पास होता है। ना वो सुननेवाले के पास होता है और ना ही महसूस करनेवाले के पास होता है। चलीए, अब ये उदासी का चोला उतार दिजीए हमें सियालीजी के पास जाना है। ''

चांदनीनं प्रिशाला त्या मोडमधून बाहेर काढलं आणि त्या दोघीजणी सियालीच्या गडाखियाज मियारा ऍडस् च्या ऑफिसला आल्या.

मिटिंग हॉलमध्ये दोघे नवरा बायको नुकतीच एक मिटिंग संपवून त्यांचीच वाट बघत होते.

'' गुड इव्हनिंग मनजी. सत् श्रीयकाल सियालीजी। ''

दोघींनी एकाचवेळी मनजी आणि सियाली दोघांना अभिवादन केलं. सियालीला इंग्लिश पध्दती फारशा रुचत नसत.

'' सत् श्रीयकाल प्रिशाजी। तो कहिए कैसी है आप? कुछ नया बनाकर लाई होंगी तो जरुर देखना चाहूंगी मै! ''

तिनं डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. सियालीचा स्वभावच तसा होता. रोख बाय ठोक. गोष्टी किवचत राहणं तिच्या स्वभावतच नव्हतं. पण माणूस अवडला की त्याला संधी देत रहायला मात्र ती चुकत नसे. बाईचा ऍटीट्यू्ड म्हणजे एकदम तलवारीसारखा धारदार; हाताला सापडला की समोरच्याचे दोन तुकडेच व्हायचे. मात्र त्या तुलनेत मनजी नावासारखाच नरम माणूस होता. वरुन आणि आतूनही प्रेमळ.

प्रिशानं तिची ऑफिस बॅग उघडली. आतनं डिझाईन बुक काढली आणि ती सियालीसमोरच्या टीपॉयवर ठेवली. त्या बुककडे एक नजर टाकत सियालीनं डावी भुवई चढवून दुसरा कटाक्ष प्रिशाकडे टाकला. त्याचा अर्थ असा होता की आता काय तू वही उघडून दाखवण्याचेही कष्ट घेणार नाहीएस का? प्रिशाला युवीच्या डिझाईनवर खूपच विश्वास होता. तिनं सियालीच्या त्या कृतीला हातानेच बुककडे इशारा करुन कृतीनेच उत्तर दिलं. तशी सियालीनं तिचं ठेवणीतलं गालाला खळी पाडणारं मंद हास्य करत ते बुक उचलून हातात घेतलं. प्रिशानं खास तिच्यासाठी म्हणून त्यात बुकमार्क घालून ठेवलेला तिच्या लक्षात येताच मान थोडीशी तिरकी करुन पापण्या झुकवून तिनं प्रिशाच्या त्या कृतीला दाद दिली. मनजीला या खेळात मजा वाटत होती. दोन्ही बायका आपापल्या इगो आणि ऍटीट्यूडला सांभाळत एकमेकींना खेळवत होत्या तर तो आणि चांदनी या खेळात प्रेक्षक म्हणून सामील झाले होते. ते बुक बघणार्‍या सियालीच्या चेहर्‍यावरुन प्रिशाची नजर तसूभरही हलली नाही. तिच्या लक्षात आलं की युवीच्या डिझाईननं त्याचं काम परफेक्ट केलंय. हातातलं बुक खाली ठेवत तिनं पुन्हा डोळ्यांचा केलेला इशारा समजून प्रिशानं चांदनीचा हात दाबला. तिनं लगेच मोबाईलमधला व्हिडिओ चालू करुन तो सियालीकडे दिला.

'' मनजी, इनका प्रि-पेमेंटका चेक काटो जी 25 लाख का। कुडीयांदे जी खुष कर दित्ता आज। '' असं म्हणून सियाली एक स्मितहास्य दोघींकडे टाकून आत निघून गेली.

स्वरा... 

26/11/2020

..........

*51*

'' चलो दी, इसी चेक मिलने की बात पे पानीपुडी खाते है। ''

'' चूप। एकदम चूप। जब देखो तब पानीपुडी ले आती है बीच में! अब जिम्मेदारी बढ गई है। कितना काम आ धमका है सामने और तुझे पानीपुडी सूझ रही है? ''

प्रिशाच्या डोक्यात डिझाईनच्या संदर्भात शंभर गोष्टी फिरत होत्या.

'' हे चिल यार दी। क्यू इतना टेन्शन लेती हो आप? पहलेसेही ऐसी हो या अब बन गई हो? ''

'' नहीं ऐसी ही हू मैं। आदतसे मजबूर हू यार; जब तक एक भी लूप होल मिलता रहेगा मै अपनी कोशिश करती रहती हू उसे निकालने के लिए। पता है कॉलेज में तेरे जिजू के सारे प्रॉजेक्ट तो मै ही पुरे किया करती थी। ''

'' अरे वा रे मेरे शेर! तो जिजू क्या कॉलेज में सिर्फ तुम्हें पटाने का काम करते थे क्या? ''

'' नहीं यार! उसकी सारी प्रोजेक्ट फाईले सबमिशन सें पहले मेरे और जीत के पास ही आती थी। श्री का प्रॅक्टीकल एकदम अव्वल दर्जे का था मगर फायलिंग में बहोौ बुरा था। ''

दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या इतक्यात प्रिशाचा फोन वाजला.

'' ओह युवी! '' प्रिशानं फोन चांदनीच्या डोळ्यांसमोर नाचवला.

'' देख शैतान का नाम लिया और शैतान हाजिर हुआ। ''

'' हाय डार्लिंग बोल काय म्हणतोस? ''

'' डील फायनल ना! ''

'' यार युव्या इतका कॉन्फीडन्स कुठून आणतोस रे? ''

'' चल चल असल्या सिक्रेट गोष्टी विचारायच्यापण नसतात आणि सांगायच्या तर त्याहून नसतात. ते सोड माझ्या कामाचं काय केलंस ते सांग! तू त्याच्यावर विचार करुन कळवते म्हणालीस आणि डायरेक्ट कामाचं प्रपोजल पाठवलंस? ''

'' अरे मनापासून काही मागितलं ना की देवसुध्दा गोष्टी अशा अलगद ओंजळीत आणून टाकतो. सियालीचं फक्त निमित्त झालं. पण त्यामुळे तुझ्या भारतात तर फायनल झालं ना! बरं मला सांग तुझी परत येण्याची तयारी कितपत झालीय? तू तुझं तिथलं काम बर्‍यापैकी आवरलं असशील असा माझा अंदाज आहे. तर आता मला फक्त आणखी एक आठवडा दे. सियालीच्या कामाच्या सगळ्या डिलच्या सेटलमेंटसोबत तुझ्याही ऑफिस वगैरेची सोय करुन टाकीन. तू चिल मार. ईटस् नॉट अ बिग डिल फॉर मी टू सेटल्ड यू इन कानपूर डिअर! ''

'' म्हणजे या दोन्ही जबाबदार्‍या तुझ्या बोडक्यावर टाकून मी निर्धास्त झोपू म्हणतेस तर? ''

'' हो रे बाबा! सगळं करते मी. तुला इथं येऊन काही करावं लागणार नाही मग तर झालं ना! आता फोन ठेव या चिमणीला पाणीपुरी खायला घालते जाऊन, केव्हाची चिवचिवतेय नुसती. ''

'' बरं! बरं! बायऽऽऽ बी इन टच. ''

आधी नाही म्हणाली असली तरी प्रिशा आता चांदनीला पाणीपुरी खायला घेऊन गेली.

----

नंदा संधीच्या शोधातच होती. एकदा तिला अमूकडूनच तिच्याबद्दलचा समज-गैरसमज जाणून घ्यायचा होता. तिच्या सुदैवाने आज तिला ती संधी अनिशमुळे मिळाली. आज अनिश पुन्हा इरवनच्या सोबतीनं जेऊन तिथंच झोपला होता. संध्याकाळी चार वाजता परत आलेल्या नंदिताला सदाकाकांकडून कळलं की अनिश तिकडेच झोपलाय म्हणून. नंदिता कपडे बदलून त्याला आणायला गेली तेव्हा जीत लवकर घरी आला होता. इरवन आणि अनिश जीतच्याच बेडरुममध्ये झोपलेले असल्यानं जी बाहेरच बसला होता. त्यानं नंदिताला आधीपासूनच बहीण मानलेली असल्यानं त्यानं नंतरही तिच्याशी असलेले संबंध बदलले नव्हते. तो प्रसंग पडला की तिच्याशी बोलायचा; प्रश्न होता तो अमूचा. ती मात्र इतक्या वर्षांत नंदिताशी कधीही मोकळेपणानं बोलली नव्हती. जेवढ्यास तेवढं बोलून विषय संपवून टाके. जीत तिथं चहा पित बसलेला असतानाच नंदिता अनिशला न्यायला आली.

'' नंदा, ये गं ये. चहा घेतेस? अमूऽऽ! तुझ्यासोबत आणखी एक कप चहा आण गं! नंदा आलीय. तू बस ना! उभी का आहेस? ''

नंदा मुकाट खुर्चीवर बसली. तिच्या मनात अमूला काय आणि कसं सांगू? कुठून सुरुवात करु याचा खूप गोंधळ चालू होता.

'' अजून सांग काय म्हणतेस? बरी आहेस ना! बर्‍याच दिवसांनी भेटलो ना आपण? किती बारिक झालीयस तू! तब्येत बरीय ना तुझी? ''

जीत एकटाच तिला प्रश्नावर प्रश्न विचारत होता आणा नंदिता मात्र अमूच्या येण्याची वाट बघत होती.

'' नंदा, अगं तुझ्याशी बोलतोय मी! कसला विचार करतेयस तू? ''

'' दादा तुझ्याशी आणि वहिनीशी बोलायचंय मला. '' धीर करुन नंदानं जीतला तिच्या मनातलं सांगितलं.

'' मग मी कुठे अडवलं तुला? सांग की काय ते! ''

इतक्यात चहाचा कप घेऊन अमू तिथं आली.

'' घे चहा. तुमच्या गप्पा चालू दे. मी आहे आत काही लागलं तर! ''

असं म्हणून चहाचा कप नंदाच्यासमोर ठेवून अमू परत जायला वळली तोच नंदा तिला म्हणाली, '' वहिनी तू पण थांब. मला तुमच्याशी बोलायचंय. ''

परत जाणार्‍या अमूनं चमकून आधी जीतकडे पाहिलं. त्यानं डोळययांनीच तिला बसायची खूण केली. तशी शेजारची खुर्ची सरकवून घेऊन अमू तिथं टेकली. ती बसल्या बरोबर नंदितानं झटकन् तिचा हात पकडला.

'' वहिनी तू मला कधीच माफ करणार नाहीस का गं? ''

अमू तिच्या ह्या कृतीनं बावरली. तिनं जीतकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं; मात्र त्यानं आपल्याला कसलीच कल्पना नाही या अर्थी खांदे हलकेच उडवले.

'' नंदा! ''

'' नाही वहिनी मला आता थांबवू नकोस. मला बोलू दे. कुणास ठाऊक पुन्हा बोलायला मिळेल न मिळेल. गेली अनेक वर्षं हे सगळं मी मनातच ठेवून आहे. वहिनी तुला यासाठीच माझा राग आहे ना की तुला वाटतंय मी ताईचं घर मोडलंय म्हणून? मग तू मला तसं सांग. मला त्यासाठी शिक्षा दे. काय वाटेल ती शिक्षा दे पण अशी माझ्याकडे दुर्लक्ष करु नकोस. मी सगळ्या बाजूंनी एकटी आहे गं वहिनी. श्री अजून ताईला विसरलेला नाही. भाई माझ्यामुळं एकटा राहिलाय. त्यानं अजूनही अनाहिताला लग्नासाठी होकार दिलेला नाही. तू मला अजून माफ केलं नाहीयेस. दादा माझ्याशी बोलतो पण तोही मनातून प्रिशा ताईचीच वाट बघतोय. माझ्याकडे अनिशशिवाय कुणीही नाहीये; पण अनिशकडे मात्र त्याची आई फार दिवस नाहीये. ''

तिच्या शेवटच्या वाक्यानं अमू एकदम सटपटलीच.

नंदानं दोघांसमोर हात जोडले आणि पुढे म्हणाली, '' दादा- वहिनी माझी तुम्हां दोघांना एक विनंती आहे. काहीही करुन कुठूनही प्रिशाताईला शोधून आणा. मी फार दिवसांची सोबती नाहीये. माझ्यानंतर श्री आणि माझ्या अनिशला एकटं टाकू नका. ''

'' नंदा, नंदा तू आधी शांत हो बघू. अमू पाणी आण बरं! ''

अमूनं पटकन जाऊन ग्लासातून पाणी आणलं.

'' घे पाणी पी. काय झालंय नंदा तुला? अशी निर्वाणीची भाषा का करतेस राणी? हे बघ! मी... मी तुझ्यावरचा सगळा राग टाकून दिला. माणसापेक्षा राग मोलाचा असतो का? ''

अमूनं तिला पाणी पाजलं आणि तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला जवळ घेतलं.

'' नंदा मला सांग बरं नक्की काय झालंय ते! तू हे असं वेड्या बिद्र्यासारखं का बडबडतेयस? ''

स्वरा...

 1/12/20

...........

*52*

चांदनी आणि प्रिशाचा तो सगळा आठवडा प्रचंड धावपळीचा गेला. जर्मनीहून येणार्‍या युवीसाठी मोक्याच्या जागी ऑफिस पाहणं व त्याची भाड्याने घेण्याची सगळी प्रोसेस प्रिशाला एकटीलाच पार पाडावी लागली; कारण चांदनी गडाखियांच्या इंटेरिअरसाठी लागणार्‍या सगळ्या सामानाची जुळवाजुळव करणं, डिलरशी डिल फायनल करणं, पेमेंट ठरवणं-करणं या सगळ्यात व्यस्त होती. प्रिशानं युवीला प्रॉमिस केलं होतं की त्याला एअरपोर्टला रिसिव्ह करायला येईल म्हणून; पण ऐनवेळी तिला रजिस्ट्रेशनच्या कामासाठी पोलिस व्हेरिफिकेशनला जावं लागलं. तिनं खरंतर ते काम लवकर व्हावं असं एजंटला सांगितलं होतं पण व्हेरीफिकेशनसाठी मालकही असायला हवा होता जो कानपूरात नव्हता. तो आल्यावर करु असं त्यानं सांगितल्यामुळे प्रिशानं तो विचार बाजूला ठेवला होता. पण नेमका त्याच दिवशी मालक आला आणि एजंटनं तिला पोलिस स्टेशनला बोलावलं. मग प्रिशानं चांदनीला युवीला रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टला पाठवलं. दि च्या सांगण्यानुसार चांदनीनं युवीच्या नावाचा बोर्ड घेतला आणि ती एअरपोर्टला त्याची वाट पाहत उभी राहिली. तिनं याआधी युवीला कधीच पाहिलं नव्हतं म्हणून प्रिशानं तिला त्याचा फोटो दाखवला. पण गंमत अशी झाली की दुसर्‍या कामाच्या विचारता प्रिशानं तिला युवीचा तिच्याकडे असणारा जुना फोटो दाखवला. बरं, चांदनीच्या डोक्यातही गडाखियांच्या कामाचे आडाखे घालणं चालू असल्यानं तिनंही प्रिशा आणि युवीचा नुकताच कॉलेजमध्ये भेटल्यावर काढून फेसबुकला टाकलेला फोटो चेक केला नाही.

प्लेन लॅन्ड झालं. आलेल्या यात्रेकरुंचं स्वागत झालं. त्यांच्या सामनाचं आणि त्यांचं चेकिंग झालं. ज्याने त्याने आपापलं सामान घेतलं आणि सगळे बाहेर पडत होते. चांदनीच्या हातातला युवराज अशा नावाचा बोर्ड पाहून एकजण पुढे आला.

'' आय ऍम युवराज. यू आर वेटिंग फॉर मी! राईट? ''

त्यानं त्याच्या फ्लुएंट इंग्लिशमध्ये विचारलं. तिनं फक्त गालात हसून प्रतिसाद दिला. दोघेही गाडीत बसले आणि घरी पोचले. गाडीत पुरा वेळ तो पुस्तक उघडून बसला होता. त्यामुळेही चांदनीला तो एकदम खत्रूड वाटला. घराजवळ गाडी थांबली आणि त्यानं इतक्या वेळानं त्याचं तोंड उघडलं, '' वी चेन्ज्ड अवर ऍड्रेस? ''

पण त्याच्यावरच्या रागाने चांदनी ना त्याचा प्रश्न ऐकायला थांबली ना तिनं त्याचं उत्तर दिलं. खरी गंमत तर तो दारात येऊन उभा राहिल्यावर सुरु झाली. प्रिशा नुकतीच तिचं व्हेरीफिकेशनचं काम आटपून परत आली होती. गाडी पार्क करुन चांदनीनं दारातूनच ओरड मारली.

'' मॉं! दी! हम आ गए। ''

आतून आरतीचं ताट घेऊन कानूमावशी; तिच्यामागोमाग प्रिशा आणि युवीचं सामान न्यायला कामवालीपण बाहेर आली.

'' ये क्या है चांदनी? ये किसे पकड लाई हो तुम? ''

'' क्यू? ये युवराज नहीं है? आपही ने तो मुझे उसे लाने भेजा था। और इसने तो अपना नाम युवराज ही बताया। क्यू बे बहरुपीए कौन है तू? '' चांदनी उलटी त्याच्यावरच घसरली.

'' एक्सक्युज मी! आय ऍम युवराज. ''

'' पर दी तो कह रही है तुम नहीं हो। ''

'' ओ प्लीज! किप इन माइंड आय ऍम युवराज. ''

'' चुप करो यार! ये मेरावाला युवराज नहीं है। ''

'' हे लेडी व्हॉट द मिन ऑफ दॅट? यू डोन्ट हर्ड? आय सेड आय ऍम युवराज. ''

'' या! या! यू आर युवराज. आय ऍम नॉट डिनाइंग दॅट. बट यू आर नॉट दॅट युवराज फॉर हूम वी ऑल आर वेटिंग. देअर इज सम कन्फ्यूजन. फर्स्ट वी हॉव टू सॉर्ट आऊट इट. ''

'' सी, आय क्लिअर यू. आय केम आऊट. आय सॉ धिस लेडी विथ बोर्ड; रिटन माय नेम ऑन दॅट. सो आय थॉट माय फॅमिली सेंड हर टू रिसिव्ह मी कॉज दे हॅव सेम वर्ड विथ मी यस्टर्डे. आय सॉ द बोर्ड ऍन्ड आय आस्क हर दॅट इज शी वेटिंग फॉर मी? शी सेज येस; सो आय केम विथ हर. इटस दॅट सिंपल. ''

'' नो! देअर स्टील सम कन्फ्यूजन. आय हॅव टू टॉक विथ हर. यू प्लीज काम डाऊन. सीट फॉर अ व्हाईल. हॅव सम टी. कॉल युवर रिलेटीव्हज ऍन्ड देन गो फॉरवर्ड. '' असं त्याला समजवून प्रिशानं त्याला हॉलमध्ये सोफ्यावर बसवला आणि चांदनीला एका कोपर्‍यात नेऊन विचारलं, '' रात्रीची उतरली नाही का तुझी? जरा कमी पित जा ना! काय लिहिलं होतंस बोर्डवर? ''

'' क्या दी आप जानते हो मै पिती विती कुछ नहीं। ''

'' तरी कशी चढते तुला मग? काय नाव टाकलेलंस बोर्डवर? ''

तिची नजर चुकवत चांदनी म्हणाली, '' सिर्फ युवराज। ''

'' इसीलिए । इसीलिए हुवा ये सब। एक काम ठीक से नहीं कर सकती क्या तुम? चलो। अब जाने से पहले एअरपोर्टपें फोन लगाओ। मौसी हम बस अभी युवी को लेकर आते है। ''

असं म्हणून प्रिशानं तिला ओढतच बाहेर आणलं. बुलेट काढली तोवर चांदनीनं फोन लावून विचारुन घेतलं होतं की जर्मनीहून येणार्‍या फ्लाईटचं काय झालं. तर तिला कळलं की ज्या फ्लाईटची ते वाट बघत होते ती दीड तास लेट आहे. प्रिशानं अंदाज लावला की त्या तिथे पोचे पोचेपर्यंत फ्लाईट येईल. घाई करत दोघी निघाल्या खर्‍या पण ट्रॅफिकमधून एअरपोर्टला पोचायला त्यांना जवळजवळ दिड-पावणेदोन तास लागले. पण हा चुकामुकीचा खेळ काही इथे संपणार नव्हताच. ह्या घरातून सुटल्या तेव्हा नुकतंच विमान रनवेवर उतरलं होतं. ट्रॅफिकच्या अडथळ्याची शर्यत पार करुन ह्या जेव्हा विमानतळावर पोचल्या तेव्हा युवी चेकआऊट करुन गेलासुध्दा होता. प्रिशानं चौकशी केली तेव्हा कळलं की फ्लाईट केव्हाच लॅन्ड झाली म्हणून. तिनं अंदाज लावला की ह्याच्याकडे पत्ता आहे म्हणजे हा घरी गेला असणार कारण तिनं त्याला पत्ता एसएमएस केला होता. पण युवीनं तिथं जाणं टाळून टॅक्सी पकडून हॉटेलला जाणं पसंत केलं. त्यानं हॉटेलही टॅक्सीवाल्यालाच शोधायला सांगितलं. प्रिशानं त्याला फोन केला तेव्हा त्याच्या फोनची बॅटरी उतरुन तो स्वच ऑफ झालेला; कारण साहेब सगळा वेळ त्याच्यावर गेम खेळत बसलेले. हिला वाटलं पत्ता मिळाला असल्यानं तो त्यांची वाट न बघता घरी पोचला असेल त्यामुळे ह्या दोघीही पुन्हा बॅक टू पॅन्हेलियन म्हणत परत आल्या. तरी चांदनीनं तिला वाटेत विचारलंच की त्याचा फोन लागत नाहीए का म्हणून! तर प्रिशा म्हणाली तिला की स्विच ऑफ लागतोय फोन. कदाचित बॅटरी वगैरे उतरली असेल. आणि काय माहीत हा घरी पोचून जेटलॅगचं निमित्त सांगून आडवाही झाला असेल. ह्या दोघी घरी पोचल्या तोवर तो आलेला अनाहूत पाहुणाही त्याच्या त्याच्या वाटेनं निघून गेला होता. मात्र घरात कुठेच यांना युवीची चाहूल लागेना! आणि तो जर घरीच आलेला नसेल तर लागणार तरी कशी त्याची चाहूल ना!

'' मौसी, युवी नहीं आया क्या? '' आरामात घरी पोचलेल्या प्रिशानं युवीची काहीच चाहूल लागत नाही म्हटल्यावर कानू मावशीला विचारलं.

'' देख बेटा प्रिशा, तुम दोनों के जाने के बाद सें यहॉं दुसरा कोई नहीं आया है। ''

'' यहॉं नहीं आया? एअरपोर्टसे तो निकल चुका है। फिर अब ये कहॉं रह गया? आज का पुरा दिन क्या हम चुहॉंबिल्ली का खेल खेलनेवाले है क्या? चांदनी, क्या मेस फैला के रखा है ये तुने? बस उसका सरनेम ऍड कर देती तो क्या जाता तुम्हांरा? अब इस आधे अजनबी शहर में मै डसे कहॉं ढूंढू बता? उपर से उसका फोन नहीं लग रहा वो अलग बात!...''

'' दी! क्या हुवा आपको? इतना क्यू परेशान हो रही हो आप? एक छोटीसीही तो मिस्टेक हुई है। और आपका जो बंदा आ रहा है वो कोई अनपढ तो है नहीं। अच्छाखांसा प्रोफेसर है। रुका होगा किसी होटल पें। कर लेगा फोन। आप ना चिल करो बस! ''

ह्या दोघींचा वाद चालू झालेला बघून कानूावशीनं आतल्या खोलीत निघून जाणं पसंत केलं. संध्याकाळी जेव्हा युवी झोपेतून उठून फ्रेश झाला आणि त्यानं चार्जिंगला लावलेला फोन काढून तो चालू केला. पाहिलं तर प्रिशाचे 30 मिस कॉल्स! ते बघून युवीची इतक्या वर्षांनीही तंतरली. एवढे कॉल केलेत म्हणजे ह्या बाईचं डोकं काही आता ठिकाणावर असणार नाही. काय करु? करु की नको फोन? असा टू बी ऑर नॉट टू बीच्या तारेवरची कसरत करत शेवटी त्यानं माप टूबीच्या पारड्यात टाकलं आणि प्रिशाला फोन लावला.

'' हरामखोर, नालायक, हलकट, पाजी माणूस! बेअक्कल माणसा कुठं कडमडलायस तू? ''

स्वरा... 

4/12/2020

..........

*53*

'' नंदा शांत झालीस का तू? हं! आता मला सगळं नीट उलगडून सांग बरं! मघाशी तू आवेगाच्या भरात काय काय बोलून गेलीस बाळा; आठवतंय का तुला? असं कुणी स्वतःच्या मरणाच्या गोष्टी करतं का? तेही अनिशसारखा गुणी मुलगा असताना? हे बघ, तुला वाटतं ना की माझा तुझ्यावर राग आहे म्हणून? तर हो आहे माझा तुझ्यावर राग. नाही आवडलं मला श्रीनं तुझ्यासोबत लग्न करणं. त्यानं स्वतःसाठी तुझा आधार शोधला पण माझ्या मैत्रीणीनं काय करायला हवं? ती कुठे जाईल? काय करेल? कशी राहिल? जेव्हा तिला हे सगळं कळेल तेव्हा तिला काय वाटेल याचा कधी विचारच केला नाही का तुम्ही? इतके कसे स्वार्थी झालात दोघेही की प्रिशाचं अस्तित्वच विसरुन गेलात? तुम्हांला असं वाटलं का की ती कधी परतच .येणार नाही? की तुम्ही गृहीत धरुन चाललात प्रिशा जिवंत नाही म्हणून? माझ्याकडून माफीची अपेक्षा करता पण हे तरी सांगा की कशाच्या बळावर मी तुम्हांला माफ करु? हा जीत ना! तुला बहीण मानतो. त्याच्या समाधानासाठी मी तुझ्याशी बोलते. नाहीतर मी अशा मुलीचं कधी तोंडही पाहिलं नसतं जिनं माझ्या मैत्रीणीचा संसार पुन्हा सुरु होण्याच्या आशेवर पाणी फिरवलंय. श्री माझाही मित्रच आहे. मी आता अशा वळणावर येऊन फसलेय की ना मी त्याला माफ करु शकत ना त्याच्यावर रागवू शकत. काय करु मी? '' अनेक वर्षांनंतर अमूच्या मनाचा बांध फुटला होता आणि जे जे म्हणून साचून राहिलं होतं ते ते सगळं आज बाहेर पडलं होतं.

जीतला नेमकं कुणाला सांभाळू ते कळत नव्हतं. आधी नंदा तसं काहीतरी बोलली आणि आता ही असं काहीतरी बरळत होती. तो बिचारा सगळ्यात असून नसल्यासारखाच होता. त्याचं दुःख कुणाला कळत तरी होतं की नाही कुणास ठाऊक! आणि जिला तो कळत होता ती कुठे होती हे त्याला अजूनही कळलं नव्हतं.

पाणी पिऊन थोडी शांत झाल्यावर नंदा अमूला म्हणाली, '' वहिनी, तुझं मन मोकळं केलंस हे फार बरं झालं. आता मरताना माझ्या मनावर कुठलंही ओझं नसेल. तुला तर माझ्या आधीच्या लग्नाची सगळी कहाणी माहीतच आहे. लग्न मला कधी मानवलंच नाही. ना आधीचं ना आताचं! पण श्री सोबत लग्न करुन मला तुम्ही मिळालात ही माझी फार मोठी कमाई आहे. आता खरंतर मला माझ्या अनिशची काळजी नाही. तू त्याला आईसारखी माया देशील याची खात्री आहे मला. पण माझा नवरा आणि तुमचा मित्र असणारा श्री; तो माझ्या जाण्यानं पुन्हा एकटा पडेल. आणि एकटेपणाचं दुःख माझ्याइतकं कुणाला कळणार आहे? वहिनी, मला आजही निषिधनं दिलेल्या जखमा त्रास देतात जेव्हा केव्हा त्याची आठवण येते. आणि हे एवढ्यावरचं थांबलं नाहीए. तो आजही माझ्या आयुष्यात कॅन्सरच्या रुपाने राहतोय. डॉक्टर असण्याचा फायदा म्हणून वेळेत कळलं, उपचार झाले, त्यातून मी बरीही झाले पण तो कॅन्सर मात्र आजही जागा बदलून का होईना पण माझी साथसोबत करतोय. अनिशच्या जन्मानंतर तो पुन्हा आलाय. आणि मला वाटतंय की ह्यावेळेस तो मला कायमची सोबत घेऊन जाणार. ''

'' नाही गं राणी! असं काहीतरी अभद्र भरल्या घरात बोलू नये. वास्तू कायम तथास्तु म्हणत असते. माझा राग तुझ्यावर असला तरी मी इतकीही वाईट नाहीए की तुझ्या मृत्यूची कामना करेन. ''

'' म्हणूनच तुझ्यासमोर पदर पसरतेय वहिनी! प्रिशा ताईला शोधून आण तिच्याशिवाय माझा अनिश आणि श्री पोरके होतील गं! ''

आता मात्र अमूचा पारा चढला होता.

'' जीत समजव ना हिला! माझी सहनशक्ती संपत आलीय हिला समजवताना; परत परत तेच तेच बोलतेय ही. आता जर ही परत काही वेडंवाकडं बोलली ना तर मी हिचं थोबाड फोडेन. मग मला काही म्हणायचं नाहीस तू. ''

'' नंदा. बाई शांत हो जरा. माझी बायको आता चिडलीय आणि तिचा राग मला परवडत नाही हां! तुला आता ह्या वयात मार खायची ईच्छा आहे का? '' जीतनं परिस्थितीवर थोडासा विनोदाचा शिडकावा करण्याचा प्रयत्न केला. नंदाला त्याच्या या प्रयत्नावर हसू फुटलं.

ती शांत झाल्याचं बघून जीतनं त्याचं घोडं पुढे दामटलं.

'' हे बघ, आता ह्या सगळ्याचा जास्त विचार करु नकोस. मी अजूनही इन्स्पेक्टर दामलेंच्या संपर्कात आहे. माझ्याकडून आणखी प्रयत्न करुन बघतो. तू काळजी नको करुस. आपण नक्की प्रिशाला शोधून काढू. ''

इतक्यात आतून अनिशच्या रडण्याचा आवाज आला.

'' आता याला काय झालं? आईसारखाच भोंगाडा झालाय नुसता. आले आले थांब. '' असं म्हणून अमू धावतच आत गेली.

'' बघितलंस ना! तुझ्यावरचा राग आता असा बाहेर पडणार आहे रात्री झोपेपर्यंत. नाहीतर ही बया तिचं मौनव्रताचं हत्यार उपसेल बघ! मला सांग तुझ्या घरात मला झोपायला जागा मिळेल का आजची रात्र? ''

'' काहीही काय दादा! वहिनी काय तुला घराबाहेर थोडीच काढणारे? ''

'' घे याला. आणि जा आता. बाप आला असेल तर वाट बघत असेल याचा. '' उचलून आणलेल्या अनिशला नंदाकडे सोपवत अमू करवादली. जीतनं हळूच डोळा मारत नंदाला तिथून जायला खुणावलं. तशी अनिशचा हात धरुन नंदा तिथून बाहेर पडली. आताशा तिला त्याला उचलून घेणं शक्य होत नसे.

'' अनु, चल बाळा, बाबा वाट बघतोय. असं रडू नये हं! अनु शहाणा मुलगा आहे ना! ''

नंदा तिथून गेल्यावर जीतनं आपल्या सुरात शक्य तितकं आर्जव आणून तिच्याकडे चहा मागितला.

'' अमूऽऽऽ! मला आणखी एक चहा देतेस का गं! ''

तिनं फक्त डोळे वटारुन त्याच्याकडे पाहिलं आणि ती दुसर्‍या बेडरुममध्ये निघून गेली.

' घ्या! ह्या नंदानं माझी आजची रात्र खराब केली. आता काय इथंच बसावं लागणार बहुतेक. पण आता मोठा प्रश्न हा आहे की प्रिशाला शोधायचं कुठे? दामले म्हणतात त्याप्रमाणे आता इतक्या वर्षांनी तिला शोधण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. शिवाय आणखी 2-3 वर्षं जर ती सापडली नाही तर कायद्यानं तिला मृत घोषित केलं जाईल. तिची केस फाईल बंद होईल. तपास थांबेल. श्री आणि नंदाचं लग्न कायदेशीर ठरेल. पण नंदा म्हणते तसं जर या दरम्यान तिचं काही बरंवाईट झालं तर अनिशचं काय होईल? श्री तर पुन्हा कोलमडून पडेल. '

एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा; प्रश्नांच्या लाटा येऊन त्याच्या मनाच्या दारावर धडका मारतच होत्या. मालिनीकाकूंनी हाक मारुनही तो जेवायला गेला नाही. त्याचं डोकं आता विचार करकरुन ठणकायला लागलं होतं. बरीच रात्र झाली तरी तो तिथेच बसून होता.

'' घे. चहा हवा होता ना तुला! डोकं दुखत असेल विचार करुन? '' त्याच्या पुढ्यात चहाचा कप ठेवत अमू म्हणाली.

ही बया कशी काय एवढ्या लवकर खालच्या सान्यावर आली याचं मनातल्या मनात आश्चर्य करत त्यानं चहाचा कप उचलून ओठाला लावला.

...

'' काय गं नंदा, आज बराच वेळ लागला तुला? ''

'' हो ना रे! अनिश झोपला होता. हातात वेळ होता मग जरा दादा वहिनीशी गप्पा मारत बसले. तू झोपला होतास की काही काम करत होतास? ''

अमू तिच्याशी बोलली याचं श्रीला आश्चर्य वाटत होतं.

'' अं! काय म्हणालीस तू? '' विचारांतून बाहेर येत त्यानं नंदाला विचारलं.

'' अरे मी म्हणाले की काही काम करत होतास की झोपला होतास तू? ''

'' थोडं काम करत बसलो होतो आणि बसल्या बसल्याच डोळा लागला माझा. हा काय तू यायच्या आधी थोडावेळ फ्रेश होऊन आलोय मी. ''

'' चांगलंय तसाही तू झोपत नाहीस. अनि, बाळा सगळं संपवायचं हं! ताटात काही टाकायचं नाही. ''

'' हो आई. अनिश शहाणा मुलगा आहे. ''

'' श्री तुला चहा हवा आहे का? मी घेतेय. जरा डोकं दुखतंय माझं. जेवण थोड्या वेळाने करु. चालेल ना! ''

'' हो चालेल की. ''

तिनं हसतं पातेल्यात आणखी एक कप पाणी वाढवलं. चहा घेऊन दोघेही बाहेर येऊन बसले. श्री रातराणी शेजारच्या झोपाळ्यावर बसला तर नंदितानं शेजारच्या खुर्चीवर बसणं पसंत केलं. शांतपणे चहाचे घोट घेत असताना श्रीनं अचानक तिला विचारलं, '' नंदा, अमूला अजूनही तेवढाच राग आहे का गं माझ्यावर? ''

नंदितानं त्याच्या त्या प्रश्नावर एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. ती काही उत्तर देणार पण श्री त्याच्या धुंदीत एकटाच बोलत सुटला होता.

'' ती चुकीची नव्हती. स्वतःच्या नवर्‍याचा, मैत्रीणीचा विनाकारण अपमान कोण सहन करेल ना! मिही कशाच्या धुंदीत होतो काय माहीत; माझ्याच जीवाला जीव देणार्‍या मित्रांवर संशय घेतला. जिनं मला सावरलं, उभं केलं त्या माझ्या प्रिशाला आयुष्यातून स्वतःच्या हातांनी दूर केलं मी. त्यांना दूर केलं आणि मीच एकटा पडलो. त्या धक्क्यानं बाबाही गेले. प्रिशा कुठे आहे कुणास ठाऊक! जीत आहे म्हणून सगळं सावरल्यासारखं दिसतंय तरी. माझ्या चुकांमुळं तो मात्र फुकटफाकट भरडला गेला. इतका वाईट वागलोय मी की आता या सगळ्यांची माफी तरी कुठल्या तोंडानं मागू? ''

नंदिताला त्याच्या आत इतकं काही चालू असेल असं वाटलंच नाही.

स्वरा...

 09/12/2020

..........

*54*

'' अरे, मला बोलू तर दे ना! ''

'' काय बोलायचंय तुला, हां काय बोलायचंय? केव्हापासून फोन लावतेय तर तुझा फोन स्विच ऑफ. कुठ झक मारत होतास इतका वेळ? काय समजायचं पुढच्या माणसाने? कुठे बेपत्ता होतास म्हणून तू? पत्ता केला होता ना मी मेसेज तुला? तरी नीट जागेवर पोचला नाहीस तू? जर्मनीत असाच वावरलास का इतकी वर्षं? '' प्रिशाच्या प्रश्नांचे तोफगोळे धडाधडा युवीवर पडत होते. तेही इतक्या वेगाने की त्याला मध्ये काही बोलायलाही संधी मिळत नव्हती. कशीबशी तिच्या प्रश्नांच्या मार्‍यातून वाट काढून त्यानं विचारलं, '' तू ऐकणार आहेस का माझं काही? का एकटीच बडबडणारेस? ''

'' हां, हां! ओक वाकड्या ओक. काय केलंस तू? कुठे होतास सॉरी आहेस तू? ''

'' सॉरी डार्लिंग मी ना मोबाईलवर गेम खेळलो फ्लाईटमध्ये. आणि मग त्याची बॅटरी उतरली साफ. मग एअरपोर्टला उतरल्यावर तो चालू करण्याच्या फंदात न पडता मी बाहेर येऊन टॅक्सी केली आणि सरळ हॉटेललाच आलो. जेटलॅगमुळे मला प्रचंड थकल्यासारखं झालं होतं म्हणून मग फोन चार्जिंगला लावून मी झोपलो गं! आता उठलो तेव्हा तुझे कॉल्स पाहिले मी. सॉरी ना डिअर! ''

'' हां सांग तू सांग सत्यनारायणाची कथा. ऐकतेय मी. पण भाड्या तुझ्या या कथेत हॉटेलचं नाव बिव काही आहे की नाही? ''

ते वाक्य ऐकलं मात्र शेजारी बसलेली चांदनी जोरात ओरडली.

'' अम्मा! अम्मा! देखो ना दी दुसरी बारी गालिया दे रही है। ''

एका हातात फोन आणि दुसर्‍या हातानं चांदनीचं तोंड दाबून धरत प्रिशा म्हणाली, '' ए बाई, गप ना माझे आई गप. चुकलं माझं. माफ कर परत नाही शिवी घालणार पण माऊला होक नको मारुस. ''

' आयला ही पण कुणाला तरी घाबरते! नाहीतर सारखी साली डाफरतच असते सगळ्यांवर. ' पलिकडून हे सगळं ऐकणार्‍या युवीला मनातून फार बरं वाटलं. आबांनंतर प्रिशा कुणाला तरी घाबरते हे त्याच्यासाठी जरा जास्त महत्वाचं होतं.

'' ए मुकपट! तू काय ऐकतोयस नुसता? हॉटेलचं नाव सांग की तुझ्या भा.... '' तिनं चांदनीच्या भितीनं पुढचा शब्द गिळून टाकला. हो नाहीतर पुन्हा माऊच्या नावानं कोकलायची ही बया.

'' आं, हां थांब सांगतो. '' त्यानं शेजारच्या टेबलावरचं मेन्यूकार्ड उचललं आणि म्हणाला, '' हॉटेल अतिथी. मिरपूर ''

'' हां आलोच आम्ही. ठेव फोन. ''

' आलोच आम्ही? म्हणजे ही बया काय मला आता उचलून नेणार आहे की काय? भरवसा नाही या बाईचा काहीही करु शकते ही. आपण आपलं तयार होऊन बसूया. ' असा मना विचार करुन सगळं आवरुन त्यानं खाली काऊंटरला चेकआऊटसाठी फोनही करुन ठेवला. पाऊण एक तासांत प्रिशा चांदनीला घेऊन हॉटेलला पोचली. काऊंटरला त्याचं नाव सांगितल्यावर रिसेप्शनवरच्या पोरीनं लगेच त्याला फोन लावायला रिसिव्हर उचलला. तशी प्रिशानं तिला इशार्‍यानंच त्याला फोन लावू नको म्हणून सांगितलं.

'' ए चांदनी, खडी क्या है? जा ना उपर। 101 मे है वो। वो सामने लिफ्ट है। जा जल्दी ले आ उसे। ''

तिच्या डोकययात नेमकं काय चालू होतं याचा काही चांदनीला अंदाज आला नाही. ती गप मोठ्या बहिणीचं ऐकून लिफ्टकडे गेली. त्या संधीचा फायदा घेत प्रिशानं लगेच युवीला फोन लावला. ही जगदंबा कधीही अवतरेल असा अंदाज बांधून युवी फोन हातातच घेऊन बसला होता. त्यानं पहिल्याच रिंगला फोन उचलला.

'' बोल भुताटके, कुठं पोचलीस? ''

'' जास्त बोलू नकोस. खाली उतर पटकन्. ''

तिचं सगळं लक्ष युवीची रुम आणि लिफ्टमधली चांदनी यांच्याकडेच होतं. पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून बॅग घेऊन घाईघाईने लिफ्टकडे निघालेला युवी तिच्या नजरेनं टिपला. आता तिच्या हृदयाची धडधड वाढली. वेळेत पोचू दे, असा मनातल्या मनात जप तिनं सुरु केला. काय झालं कसं झालं ना तिला कळलं ना वरचयया दोघांना! पण लिफ्टमधून बाहेर पडणारी चांदनी आणि आत शिरु पाहणारा युवी यांची एकमेकांशी टक्कर झाली. इकडे खाली प्रिशानं मात्र आनंदानं उडी मारली. लहान मुलीसारखी येस्स! येस्स! करत ती बाहेर गेली. हेल्मेट घातलं, बुलेट स्टॅन्डवरुन काढली आणि किक मारायच्या आधी तिनं चांदनीला फोन लावला. तोवर चांदनी रुममध्ये जाऊन बाहेर येऊन वर उभी राहून न दिसणार्‍या प्रिशाला शोधत होती.

'' क्या दी! यहॉं रुममें तो कोई नहीं है। आपने बेकार ही मुझे उपर भेज दिया। ''

'' हां, हां जानती हू। वो निचे काऊंटरपें आके खडा है। उसे लेकर घर आजा मै जा रही हू। ''

'' मतलब? ''

'' मतलब वतलब कुछ नहीं तू बस आजा। ''

'' अरे पर उसे पहचानूंगी कैसे? ''

''ढक्कन! अभी तो लिफ्ट के पास उससें टकराई थी। चल बायऽऽऽ। '' असं म्हणून फोन ठेवून बुलेटला किक मारुन प्रिशा निघूनपण गेली. आता काय करायचं? आलीया भोगासी असावे सादर म्हणत चांदनी खाली उतरुन आली. काऊंटरजवळ उभ्या असणार्‍या युवीला तिनं हसून हाय केलं.

'' जी मै आपको लेने आई हू। ''

युवी त्या अनोळख्या पोरीला बघून हडबडला. येणार तर प्रिशा होती; मग ही कोण पोरगी आलीय? त्याच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह वाचून चांदनी म्हणाली, '' जी, डोन्ट वरी। दी आगे गई है। आईए चलते है। ''

तिनं बाहेर जाऊन टॅक्सी बोलवली. दोघेही त्यात बसले आणि घराकडे निघाले. तिथंन सुटलेल्या प्रिशानं सुसाट वेगानं शॉर्टकटनं घर गाठलं. तशी युवीसाठी रुमची तयारी आधीच करुन ठेवली होती म्हणा पण तिला आता तिचा पुढचा प्लॅन सुरु करायचा होता. आत येऊन तिनं आधी माऊला आपल्या प्लॅनचा हिस्सा बनवली. मग तिनं वैद्रुला पण त्यात सामील करुन घेतली.

अख्खा रस्ताभर चांदनी एका शब्दानेही युवीशी बोलली नाही. तिला तिथं एकटीच सोडून आलेल्या प्रिशाचा खूप राग आला होता. घरी जाऊन तिला सुनवायचं अशा मूडमध्ये असणार्‍या तिच्या स्वागताला वैद्रुती दारात उभी होती. पोट्टी आयशीच्या एक पाऊल पुढंच होती.

'' मॉसी आप कहॉं गए थे? मगरे साथ खेलने के लिए कोई नहीं था। '' वैद्रुनं तिला इतक्या इनोसन्टली विचारलं की चांदनीला यामागे प्रिशा असेल याचा वासही आला नाही.

'' क्यू बेटा? ममा, नानी मौसी, नाना मौसा सब कहॉं गए? ''

'' नहीं वैसे तो सब घर पर है पर मुझे आप के साथ खेलना था। ''

'' अच्छा, चल आती हू। '' असं म्हणून तिनं वैद्रुला उचलून घेतलं आणि वैद्रुच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यातच बाहेर आलेली कानूमावशी तिच्यावर डाफरली.

'' बाहर सें आने के बाद हाथ पैर धोने का कोई सलिका नहीं है या भुल गई हो? बच्ची को ऐसे ही उठा लिया? ''

तिनं असं म्हटल्याबरोबर चांदनीनं लगेच वैद्रुतीला खाली उतरलं आणि आती हू असं म्हणून स्वतछच्या खोलीकडे निघून गेली. तिला तिच्या खोलीकडे गेलेली पाहून माऊला डन चा अंगठा दाखवत प्रिशा वैद्रुच्या खोलीतून बाहेर आली.

'' कुछ बताएगी भी प्रिशा तेरा क्या चल रहा है? ''

'' अभी सिर्फ इतना समझ लो की ये चुडैल मेरे उपर गुस्सा होनेवाली थी। लेकीन अब आप उसपर गुस्सा हुइ हो तो वे मुझपें गुस्सा नहीं होगी। कुछ समझी? ''

कानूमावशीनं नाही म्हणून मान हलवली.

'' जाने दो। बाकी बातें बाद में समझाती हू। ''

दारात जाऊन तिनं इतका वेळ दारात उभं ठेवण्यासाठी युवीला सॉरी म्हटलं पण युवी वैद्रुतीकडे बघत तिथंच उभा राहिला.

'' चल ना बाबा आता आत. सॉरी म्हटलं ना मी! आता काय चौकटीची मोजमापं काढतोस का? ''

हसतंच आत येत त्यानं विचारलं, '' ही आपली वैद्रुती आहे का? ''

'' नाही लोकाची मागून आणलीय. दिसतंय का तुला इथं काका म्हणणारं आणखी कुणी? ''

तो तिला उचलून घ्यायला पुढे झाला तसा त्याला हाताला धरुन मागे ओढत ती म्हणाली, '' ऐकलंस ना आता चांदनीची कशी हजेरी घेतली ती! तिला इतक्यात उचलून घेण्याचा विचारही करु नकोस. तो पेपराआड बसलेला चष्मेवाला बागुलबुवा आहे ना तो नजर ठेऊन आहे तिच्यावर. आता तुझ्याबरोबर मलाही फटके पडतील. चल आत जा. फ्रेश हो आणि चहाला ये नाहीतर रात्रीच्या जेवणापर्यंत झोपून टाक. '' असं म्हणून तिनं त्याला त्याच्यासाठी तयार केलेल्या रुममध्ये नेऊन सोडलं.

रात्रीच्या जेवणाच्यावेळी प्रिशानं युव्याची सगळ्यांना ओळख करुन दिली आणि तिचा पुढचा प्लॅन सांगितला.

'' माऊ, अंकल ये है युवी, युवराज देशमुख. मेरा कॉलेजका पुराना दोस्त. अभी जर्मनीमें अपना बिझनेस करता है। मगर उसे भारत वापस आना है। अभी तो वो यहॉं हमारी मतलब चांदनी की मदद के लिए आया है। सियालीजी के प्रोजेक्ट का डिल इसी की वजह सें हमें मिला है। ''

तो चांदनीच्या मदतीसाठी आलाय ही तर त्याच्यासाठी आणि चांदनीसाठीही नवीन माहीती होती. त्याला वाटत होतं की तो आणि प्रिशा एकत्र बिझनेस करणार आहेत म्हणून. पण प्रिशानं तर आल्या दिवशीच त्याच्यावर बॉम्ब फोडला होता.

चांदनी आणि युवराज तिचं बोलणं न कळून एकमेकांकडे आणि प्रिशाकडे बघत होते. चांदनीनं तिला हे काय विचारण्यासाठी तोंड उघडलं तोच प्रिशा म्हणाली, '' मेल आया था मुझे; कोई शिद्द‍तसें मुझे तलाश कर रहा है। मुझे जाना होगा। अब जाने का वक्त आ गया है। ''

स्वरा... 

17/12/2020

..........

*55*

'' हॅलो श्रीऽऽ! जसा असशील तसा हॉस्पीटलला ये. '' त्याला काहीही बोलण्याची संधी न देता जीतनं फोन ठेवला. श्रीला काय झालंय काहीच कळेना. त्यानं तातडीनं गाडी काढली आणि तो हॉस्पीटलला निघाला. नंदिता ऑपरेशन थिएटरमध्ये होती. कॉरीडॉरमध्ये जीत आणि अमेया चिंतातूर चेहर्‍यानं बसले होते. एका कोपर्‍यात माधवदादा आणि दिगंबरदादा सचिंत होऊन बसले होते. वैकल्प आत नंदिताला वाचवणययाची धडपड करत होता. आता ती प्रत्येक श्वासासाठी धडपडत होती. किती काळजी घेतली तरी त्याची नजर चुकवून नंदिताच्या शरीरात वाढलेला ट्युमर फुटला होता. आणि हे कसं झालं या विचाराने वैकल्प हैराण झाला होता.

श्रीला अजूनही कळलं नव्हतं की त्याला इथे का बोलवलंय ते! सगळे तर बाहेरच दिसत होते. मग कुणासाठी बोलवलं आपल्याला इथे? अनिश? की नंदा? इरवन? मालिनी काकू? कोण? नक्की कोण? त्याचं मन सैरभैरपणे फिरत सगळ्या बाजूंचा विचार करत होतं.

'' जीत काय झालंय? तुम्ही सगळे इथे? ''

'' श्री, बस. आता शांतपणे ऐक. वैकल्पचे प्रयत्न चालू आहेत. तो नंदाला वाचण्याचे त्याच्या परीने शक्य ते सारे प्रयत्न करतोय. ''

'' नंदा? तिला काय झालंय? सकाळी तर ती चांगली होती. अचानक काय झालं तिला? तेही सरळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासारखं? '' तो अजूनच गोंधळून गेला.

'' अमू जरा पाणी आण गं! ''

जीतनं त्याला अमूनं आणलेला पण्याचा ग्लास दिला. '' घे पी. तू थोडा ताळ्यावर आलास की सांगतो सगळं. ''

श्रीनं तो पाण्याचा ग्लास घटाघटा रिकामा केला. आता त्याला थोडं बरं वाटत होतं. जीतचा फोन येऊन गेल्यापासून ते हॉस्पीटलला पोचेपर्यंत त्याचं मन थार्‍यावर नव्हतं. तो बर्‍यापैकी शांत झालेला बघून जीतनं सगळी सूत्रं पुन्हा स्वतःच्या हातात घेतली.

'' श्री आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐक. कदाचित ते ऐकून तुला विश्वासघात झाल्यासारखं वाटेल पण माझ्यावर विश्वास ठेव; तसं काहीही नाहीए. नंदाला कॅन्सर होता. तुमच्या लग्नाच्या आधीपासून. ती सातत्याने त्याच्यावर उपचार घेत होती. पण, तिच्या दुर्दैवाने तो सतत जागा बदलत तिच्या शरीरात ठाण मांडून बसला होता. अनिशच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यानं पुन्हा जागा बदलून तिच्या शरीरात वाढायला सुरुवात केली. आज दुपारी सदाकाका इरवन आणि अनिशसोबत अंगणात खेळ खेळत होते. इतक्यात त्यांना आतून भांडी पडल्याचा आवाज आला म्हणून ते आत गेले तर नंदिता किचनमध्ये जमिनीवर पडली होती आणि असह्य वेदनेनं तळमळत होती. त्यांनी इरुला आजोबांना बोलवायला पाठवलं. बाबा आणि काकांनी मिळून तिला इथे आणलं. मीही आता तुझ्यापुढेच इथे आलोय. हे सगळं मला अमूकडून कळलंय. ''

श्री हे सगळं ऐकून पुरता भांबावून गेला होता. असंख्य प्रश्न त्याच्या मेंदूचा भुगा करत होते. तेवढ्यातच ऑपरेशन थिएटरमधून वैकल्प बाहेर आला. पण अजूनही त्याच्या चेहर्‍यावरची निराशेची रेषा काही हलली नव्हती. त्याला बघून झटक्यात श्री पुढे आला.

'' काय झालं वैकल्प? कशीय नंदिता आता? ''

'' आता तरी मी काहीच सांगू शकत नाही श्री. तिचं शुध्दीवर येणं फार महत्वाचं आहे. आता तरी तिला 24 तासांच्या अलर्टवर ठेवलीय. आम्ही आतला फुटलेला ट्युमर सगळा साफ केलाय. ये आत बसून बोलू. '' तो शारिरीक कष्टांपेक्षा मानसिक कष्टांनी जास्त श्रमला होता. पण काय करणार काही कर्तव्य अशी असतात की तिथं तुम्हांला तुमच्या भावनांवर ताबा हा ठेवावाच लागतो.

'' नर्स माझ्यासाठी एक कॉफी आणता प्लीज! ''

'' हो सर. ''

वैकल्प त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. मागोमाग श्री आणि जीतही आत आले. अमू मात्र तिथंच थांबून आयसीयुमध्ये शिफ्ट केल्या जाणार्‍या नंदाला पाहत होती आणि तिला नंदाचं मागचं सगळं बोलणं आठवत होतं.

वैकल्प फ्रेश होऊन येईपर्यंत दोघेही खुर्चीत बसल्या बसल्या चुळबुळत होते. तो येऊन बसला आणि थोड्याच वेळात नर्सने त्याच्यासमोर कॉफी आणून ठेवली.

'' तुम्ही? ''

'' नाही नकोय मला. आधी मला हे सांग की नंदिता कशीय आणि हे ही सांग की तुम्ही दोघांनी एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली माझ्यापासून? '' बोलता बोलता श्रीच्या आवाजाची पट्टी वर वर चढत होती.

'' श्रीऽऽऽऽ! हे हॉस्पीटल आहे. आवाज हळू. इतरांना त्रास होईल. '' जीतच्या आवाजातल्या जरबेन श्रीच्या आवाजाची पट्टी खाली आली.

'' हे बघ श्री हे सगळं जाणीवपूर्वक नाही केलं रे! तिचं प्रेम होतं तुझ्यावर. आणि तिचा कॅन्सर बरा झाला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगावं असं तेव्हा नव्हतंच. जेव्हा त्यानं पुन्हा डोकं वर काढलं तेव्हा तुमचं लग्न झालं होतं. नंदाला भिती वाटली की तुला हे कळलं तर ती तुला गमावेल. मी मात्र तिला समजावत राहिलो की तिनं तुला हे सगळं सांगून टाकावं म्हणून. पण तोवर ती अनिशच्यो वेळेला गरोदर होती. आणि मग तिचं तिनंच ठरवलं की...''

त्याचं संभाषण अर्धवट तोडत नर्स त्याला बोलवायला आत आली.

'' डॉक्टर, डॉक्टर, लवकर चला. त्या आयसीयुत आताच शिफ्ट केलेल्या पेशंटचं बीपी फ्लक्चुएट होतंय. ''

जीत न् श्रीला तिथंच सोडून तो धावत आयसीतुत पोचला. त्यानं पाहिलं की नंदिता शुद्धीवर आलीय. पण तिमं बीपी का फ्लक्चुएट होतंय हे त्याला काही कळेना. त्यानं लागलीच तिच्या सलाईन मध्ये ऍन्टी डिप्रेसमेन्ट लोड केलं. जसं जसं ते तिच्या शिरांमध्ये चढत गेलं तशी ती हळू हळू शांत झाली. प्रयत्नपूर्वक आपला हात उचलून तिनं दाराकडे बोट दाखवलं.

'' काय हवंय बाळ तुला? '' तिच्या तोंडाजवळ कान नेल्यावर त्याला अगदी अस्पष्ट असं ती श्री, श्री म्हणतेय हे लक्षात आलं.

'' नंदा, सगळे आहेत बाहेर बाळा! तू जरा नॉर्मल झालीस की बोलवतो मी. आता तू आराम कर बरं! ''

पण बहुतेक नंदाला कळलं होतं की तिची वेळ भरत आलीय म्हणून. तिनं असेल नसेल ती सगळी ताकद एकवटून जोरजोरात हात गादीवर आपटला आणि तोंडाने क्षीणपणे श्री, श्री असं म्हणत राहिली.

'' हो, हो, बोलवतो. बोलवतो त्याला. पण तू त्रास नको करुन घेऊस. '' त्यानं पटकन् बाहेर जाऊन श्रीला आत पाठवलं.

'' श्री, जा तुला नंदा बोलवतेय. तिला फार बोलू देऊ नकोस पण; तसेही एब्द कळत नाहीएत तिचे. '' हताशपणे त्यानं श्रीला तिचा निरोप दिला. बहुधा शेवटचाच...

श्री पटकन् उठला. डोळे कोरडे केले. चेहर्‍यावर उसनं हसू आणलं आणि आत निघाली. पण त्याला त्याच्या पायात मणामणाच्या बेड्या पडल्यासारखं वाटत होतं. असं वाटत होतं या सगळ्यापासून दूर कुठेतरी पळून जावं. त्याला आईचे शेवटचे क्षण आठवत होते. बाबांची जाणारी वेळ आठवत होती. त्याला आत आलेला पाहून तिच्या चेहर्‍यावर त्याही वेळी मंद हसू तरळलं. तिच्या कॉटशेजारचं टेबलं ओढून घेऊन तो त्यावर टेकला. नंदिताचं हात हातात घेऊन प्रेमाने थोपटत रुद्ध गळ्यानं म्हणाला, '' नंदा काय केलंस गं हे तू? मला इतका परका करुन टाकलास तू? प्रेम केलंस ना माझ्यावर मग एवढं मोठं सत्य लपवून ठेवलंस माझ्यापासून? मी बदललो होतो गं नंदा! तुझी शपथ! मला आधी कळलं असतं तरी मी कधीच तुला अंतर दिलं नसतं गं! आयुष्यानं खूप काही हिरावून घेतलंय माझ्याकडून. ज्याच्यावर प्रेम केलं त्या त्या प्रत्येकाला त्यानं माझ्यापासून दूर केलंय. आई गेली. तिच्यामागे जिनं प्रेम दिलं ती जीतची आई गेली. मग आजी, माझा लाडका रंग्या, जीत, प्रिशा, बाबा, अमू आणि आता तूही मला एकटा सोडून जाणारेस का? का वागलीस नंदा तू अशी? का वागलीस? माझे जिवलग माझ्यापासून दूर गेले; सगळ्या बाजूंनी एकटा पडल्यावर मला माणसांची, त्यांच्या भावनांची किंमत कळली. मग आयुष्यात तू आलीस, अनिश आला. आता कुणालाही गमावून जगण्याची सहनशक्ती नाहीए माझ्यात नंदा. मला सोडून जाऊ नकोस नंदा. तू लवकर बरी हो नंदा. मला तू हवी आहेस. आपला संसार हवा आहे. '' त्याच्या डोळ्यांतून गळणार्‍या पाण्यातून त्याचा ओघळणारा पश्चात्ताप नंदाला दिसत होता. थेंबांच्या स्पर्शासोबत जाणवत होता पण त्याला धीर देण्यासाठी हात उचलावा इतकीही ताकद तिच्यात उरली नव्हती.

कशीबशी नंदा एवढंच म्हणाली, '' श्रीऽऽ.... ता... ईऽऽऽ... ला..... शोऽऽऽ.... द... तिऽऽऽ....चीऽऽऽऽ मा.... पीऽऽऽऽ... माऽऽऽ... ग.... अ.... अ... अ.... अ.... निऽऽऽऽऽ श्.... '' पुढं काही बोलण्या आधीचं सारं काही संपलं होतं.

स्वरा...

 18/12/2020

..........

*56*

'' क्या बात कर रही हो दी आप? कहॉं जाना है तुम्हें? कौन इतनी शिद्द‍त सें याद कर रहा है? जो आप मुझें यहॉं अकेली छोड के जाने की बात कर रही हो? इस बेजुबान के साथ कैसे काम करुंगी मैं? ''

'' अरे, रुक रुक सवालों की बौछार! कम सें कम सॉंस तो ले बीच में। सारी फुलझडीयां क्या एक ही दम में खतम करने का इरादा है क्या? ''

'' ए प्रिशे तुझ्या ह्या नखरेल बहीणीला म्हणावं मला बोलतो येतं; हीच येताना तुझ्यावरच्या रागानं तोंड फुगवून बसली होती. ''

'' हां, हां तुम तो जैसे... ''

'' चांदनी, शांती रख। आ इधर आ। आराम सें बैठ। ये ले सौंफ चबा। तेरा दिमाग थोडा ठंडा हो जाए तो बताऊंगी मै। इतनी रेस्टलेस मत हुवा कर तू! असं म्हणून प्रिशा सोफ्यावर बसलेल्या युव्याशेजारी जाऊन टेकली आणि चांदनी बडीशेप चघळत डोळे मिटून खुर्चीत बसून राहिली.

सोफ्यावर टेकल्याबरोबर युव्या तिच्या कानात खुसफुसला, '' कुठून शिकलीस एवढ्या भाषा? ''

'' त्यात काय शिकायचं असतं? मला मराठी येते म्हणजे मी बाकीच्या भाषा शिकूच शकते की! ''

'' आणि ही तुझी लाडाची मैना इतका आिडाओरडा रोज करते का? ''

त्याच्या या प्रश्नावर मात्र प्रिशा गडगडाटी हसली. एवढ्या मोठ्याने की बडीशेप चघळत बसलेली चांदनी दचकलीच एकदम. आणि तिच्या त्या दचकण्यामुळे युव्यापण प्रिशाच्या हसण्यात सामिल झाला. चांदनीला त्यांच्यात काय झालं काही माहीत नव्हतं. तिला वाटलं की ते तिच्या दचकण्यावर हसतायत तिला. तशी ती त्या दोघांवर आणखीनच उखडली.

'' क्या हुवा? सर्कस आई है क्या? तुम्हांरे सामने क्या क्लाऊन नाच रहा है? क्यू ऐसे ठहाके लगाकर हस रहे हो तुम? '' असं म्हणत तिनं आपली गाडी युव्याच्या दिशेने वळवली.

'' क्या हुवा चांदनीत्? आज देवी मॉं के जैसे बार बार रुप बदल रही हो? कभी मॉं शितला तो कभी मॉं दुर्गा? ''

प्रिशाच्या या प्रश्नावर युवीच्या दिशेनं वळलेली चांदनी त्याच्यावर भडकली.

'' ये ये सब ना तुम्हांरी वजह से हो रहा है। एक गलती की इतनी बडी सजा? पुरा दिन खराब कर दिया आज दी ने मेरा; पता भी है तुम्हें? घर से एअरपोर्ट- फिर घर- फिर एअरपोर्ट-वापिस घर और आखिर में जाके वो तुम्हांरा होटल। वहां भी दी मुझे अकेला छोड आई; उपर यहॉं आके अकेला छोडकर जाने की बात कर रही है। तुम नहीं आते तो मेरी दी इतनी बदली नहीं होती। क्यू आ़ए हो तुम? जाओ यहॉं से। ''

चांदनी रागाच्या भरात काहीच्या बाही बोलत होती. मधल्या वेळेत प्रिशानं तिथून किचनमध्ये पोबारा केला होता.

'' ए चांद, इधर देख। '' ती युवीला सुनावण्यात गर्क असताना तिथून गायब झालेली प्रिशा तिच्यामागे येऊन उभी राहिली होती.

'' अब क्या है दी? '' त्याच वैतागलेल्या टोनमध्ये तिनं प्रिशाला विचारलं न् मागे वळली तर प्रिशानं फ्रिजमधून आणलेल्या डेअरीमिल्कचा मोठा तुकडा तिच्या तोंडात कोंबला.

'' क्यू गुस्सा होती है मेरी जान? आ जा बताती हू कहॉं जा रही हू मै। '' असं म्हणून तिला टीपॉयवर बसवून प्रिशा स्वतः खुर्चीत टेकली. तिचे दोन्ही हात धरुन म्हणाली, '' तू तो जानती है ना! के मै और अमू दी मेल के जरीए मिलते है। ''

तोंडात चॉकलेट असल्यानं चांदनी नुसतीच मान डोलवत होती.

'' अभी हाल ही में अमू का मेल आया था मुझे। उसमें उसनें कहॉं था की नंदिता मुझे ढूंढ रही है। उसे मेरी जरुरत है; क्यू की उसके पास वक्त कम है। ''

'' क्या? ये क्या कह रही हो आप? अब वो कहॉं जा रही है? ''

'' वो कही नहीं जा रही। अमू बता रही थी की नंदिता को कॅन्सर है। और वो भी शादी से पहले। अब उसके हाथ में कुछ ही समय बचा है। ''

'' हे भगवान! अब ये क्या नई मुसीबत आ पडी है? '' तिला खरंच प्रिशा आणि नंदिता दोघींसाठीही वाईट वाटत होतं. नाही म्हटलं तरी ती त्यांच्या बर्‍याचशा प्रवासाची पडद्यामागची साक्षीदार होती.

'' हां बच्चा, मुसीबत तो आन पडी है; और शायद इस मुसीबत का हल मुझें ही निकालना होगा। ''

'' तो क्या आप सच में पुना चली जाएंगी? ''

'' जाना तो पडेगा बेटा! सिर्फ श्री और अनिश को ही नहीं वहॉं पें जीत और अमू को भी ऐसे वक्त में मेरी जरुरत होगी। ''

युव्याला नंदिता आणि अनिश सोडून बाकी सगळी नावं परिचयाची होती. पण, त्या दोघींच्या मध्ये कसं बोलायचं म्हणून तो गप्प होता.

'' दी, उनको आपकी जरुरत है और मुझे, वैद्रु को आपकी जरुरत नहीं है क्या? ''

'' पागल है तू? युही उठके चली जाऊंगी क्या मै? तू तो ऐसे बात कर रही है जैसे मैं अभी उडी जा रहीं हू! ''

'' बात वो नहीं है दी! देखो सियालीजीका काम तो अभी शुरू भी नहीं हुआ है। यहॉं के डिलर्स को तो आप मुझसें ज्यादा जानती हो। उपर सें अपने इस गुंगे दोस्त को मेरे पल्ले बॉंध के जा रही हो आप; मान ना मान, मैं तेरा मेहमान। कैसे काम करुंगी मै? ''

'' अरी मेरी अम्मा मै तुझे थोडी ना बावडी में उल्टा लटकाके चल दूंगी! तेरा काम सेटल कर के जाऊंगी मैं। और हां बार बार यु मेरे दोस्त को गुंगा मत कह वरना मार खाएगी तू। अब जा सो जा। ''

'' और आप दी? ''

'' आती हू। जरा इस गधे से बात तो कर लू। बहोत सालों बाद मिले है हम। ''

'' अच्छा दी। '' असं म्हणून चांदनी निघून गेली.

'' बरी आहेस ना तू? तिच्यासमोर काय मला गधाबिधा म्हणतेस? ''

'' का? ती आवडलीय का तुला? ''

'' प्रिशे, काहीही काय बोलतेस गं? आमच्या वयातलं अंतर दिसत नाही की काय तुला? नाही म्हटलं तरी 8-10 वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा. ''

'' तुला कुणी सांगितलं की वय बघून प्रेम करायचं असतं म्हणून? ''

'' आह! लिव्ह दॅट. मला सांग नंदिता आणि अनिश कोण आहेत? '' त्यानं स्वतःवर आलेला भोज्जा प्रिशाकडे सरकवला.

युवीचा प्रश्न ऐकून प्रिशा एकदम गप्प झाली. कुठून सुरुवात करावी हच तिला समजेना. तिला शांत बसलेली पाहून युवी उठून तिच्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला, '' नसेल सांगायचं तर राहू दे प्रिशा! मी पुन्हा नाही विचारणार. ''

'' तसं नाही रे युव्या! तुझ्यापासून काय लपवणार? तुला तर सगळंच माहीतीय. तुझ्यासाठी नवी गोष्ट फक्त एवढीc आहे की नंदिता श्रीची दुसरी बायको आहे आणि अनिश त्यांचा मुलगा. ''

'' काय्य?ऽऽऽऽ '' युवी केवढ्याने तरी ओरडलाच.

'' श्शऽऽऽ! श्शऽऽऽ! हळू. केवढ्याने ओरडतोस? घरात सगळे झोपलेत ना! ''

'' सॉरी, सॉरी. पण यासाठी तू श्रीला माफ कशी करु शकतेस प्रिशा? आणि परत जाण्याचा विचार तरी का करतेयस? ''

प्रिशा कसंनुसं हसली. एक उसासा टाकून म्हणाली, '' तू प्रेम केलं नाहीस ना! मग तुला माझं वागणं नाही कळणार. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दुःख झालेलं नाही सहन होत आपल्याला. जेव्हा कधी प्रेम करशील तेव्हा कळेल तुला हे सगळं. भले श्री माझ्याशी तेव्हा तसा वागला असेल, कदाचित त्याच्याकडे त्यासाठीचं कारणंही असेल पण म्हणून मीही त्याच्यासारखंच वागलं पाहिजे असा कुठे नियम नाहीए ना! ''

'' तू पहिल्यापासून अशीच आहेस प्रिशे! जे तुला पटलं तेच करत आलीस; मग कुणी कितीही विरोध केला तरी मागे हटली नाहीस. नॉट टू वरी डिअर, मी कायमच तुझ्यासोबत आहे. बरं मला सांग तुझ्या त्या चिचुंद्रीला कशी सांभाळायची? काय अंगावर येते माहितेय का तुला? मारक्या म्हशीसारखी नुसता कटाक्ष टाकून समोरच्याला पार आडवा करते ती! ''

'' मग? उगीच अजून सांभाळून ठेवलीय का तिला त्या असोसिएशनवाल्यांनी? आणि भांडू नका रे सारखे एकमेकांशी. आता काय लहान आहात का तुम्ही? ''

'' आहाहा! कोण सांगतंय बघा हे! तू काय करायचीस गं? कॉलेजमधली अर्धी वर्षं तर जीत्यासोबत भांडण्यात गेली तुझी. नशीब की आम्ही होतो तुमची भांडणं सोडवायला. ''

'' त्या जुन्या गोष्टी झाल्या युव्या. ''

'' अरेच्चा, म्हणजे तू म्हातारी झालीस असं म्हणायला हरकत नाही तर? ''

'' मारच खाशील हां युव्या तू! जा आता झोप जा. रात्र बरीच झालीय. उद्यापासून सियालीच्या कामाला सुरुवात करायचीय. ''

'' ओके. बाय स्वीटहार्ट. जास्त विचार करु नकोस. तूही जाऊन झोप जा. ''

तिनं नुसतंच स्माईल केलं. युवी निघून गेला तरी फ्रेंच विंन्डो उघडून बाहेरच्या थंडीत झोपलेल्या फुलांच्या सोबतीनं प्रिशा बराच वेळ जागीच होती.

स्वरा... 

21/12/2020

..........

*57*

'' वैकल्पऽऽऽऽ! '' श्रीनं जोरात आवाज दिला तसा दाराबाहेरच उभा असणारा वैकल्प धावत आत आला. पण, त्याच्या हातातून आता सगळ्या गोष्टी निसटून गेल्या होत्या कारण नंदिताच्या कुडीतून प्राणपाखरु केव्हाच उडून गेलं होतं. नर्स निर्विकारपणे तिच्या शरीराला जोडलेल्या सगळ्या मशीन आणि नळ्या वेगळ्या करत होती. ती तरी काय करणार ना! सातत्याने या सगळ्या गेष्टी पाहून तिचीही नजर मेल्यासारखी झाली होती. रोज कुणीतरी जन्माला येई; त्याचा आनंद साजरा होतच असतो तोवर कुणालातरी मृत्यूचं बोलावणं येई नी नातेवाईकांना शोक अनावर होई. शेवटी हेच खरं की रोज मरे त्याला कोण रडे!

वैकल्पच्या मागोमाग आत आलेले सगळेच त्या धक्क्यानं जागेवरच थिजल्यासारखे झाले. उणंपुरं 35-37 वर्षांचं आयुष्य मिळालेलं नंदिताला; तेही सगळं झगड्यात संपलं. सगळेच आतून हळहळत होते. पण श्रीला सावरायला पुढाकार तरी कोण घेणार? वैकल्प? तो तर स्वतःच मोडून पडला होता. एकुलती एक बहीण; तिच्या जगण्याच्या पानावरची रोजची लढाई त्यानं अनुभवली होती. जशी काही नंदिता डोंबार्‍याच्या अधांतरी काठीवर एकटीच तोल सावरत चालत होती. आता तिच्या शिवाय आयुष्य जगायचंय या कल्पनेनंच त्याला कसंतरी होत होतं. तो कुठून श्रीला सावरणार? आधीचं घडलेलं सगळं कुठं नाी वाटत अस कुठंतरी प्रत्येकाच्या मनात होतं जे पुढं जाणारा त्यांचा पाय मागे खेचत होतं. शेवटी कुणाला तरी पढाकार घ्यायलाच हवा असा विचार करत मनाचा हिय्या करुन अमू पुढे झाली. तिनं श्रीच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शानं श्रीनं अमूच्या कमरेला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडायला लागला. अमू त्याच्या केसांतून हात फिरवत त्याला शांत करण्याचे प्रयत्न करत होती. थोडं भर ओसरल्यावर नंदिताकडे बघून तो तिला म्हणाला, '' अमू, आतातरी तुझा शाप मागं घे अमू! बघ ना गं, तो कितीजणांना माझ्या आयुष्यातून वजा करत चाललाय. '' त्याच्या ह्या वाक्यानं अमूच नाही तर तिथं उभा असलेला प्रत्येकजण आतून हलला. आणि कळत नकळत प्रत्येकालाच वाटून गेलं की माणूस जास्त जवळचा असला की त्याचा तळतळाट आयुष्याचं तळपट करायला पुरेसा असतो. अमूला तर श्री असा काही विचार करत असेल अशी पुसटशीही शंका आली नाही.

श्री मात्र गेलेल्या नंदिताच्या कलेवराचा हात पकडून अमूला विनवत होता.

'' तू म्हणाली होतीस ना! की तुझ्या नवर्‍याशी आणि मैत्रीणीशी ज्यानं दगाबाजी केली तो कधीच सुखी होणार नाही म्हणून? बघ गं बघ! तुझ्या त्या शापानं माझ्या आयुष्यातली सगळी सुखं कशी ओरबाडून घेतलीत ते! प्रिशाला किती शोधलं मी! ती नाहीच मिळाली मला कुठं; अगदी रतनपुरलाही नाही मिळाली मला ती! ''

हे मात्र सगळ्यांसाठीच नवीन होतं. यानं? प्रिशाला शोधली? सगळ्यांना असंच वाटत होतं की प्रिशा गेल्यापासून श्रीनं तिची काही खबरंच घेतली नाही म्हणून. असं म्हणतात की कोयत्या-कुर्‍हाडीचं वैर तर त्यांच्यात होतं जे अतिशय जिवलग असतात. पण मग श्री प्रिशामध्ये नेमकं काय होतं? तिनं त्याचं नाव कधी टाकलं नाही हे एकट्या अमूला माहीौ होतं असं नाही तर जीतलाही त्याची खात्री होती. आणि श्री! त्यानं वरवर जरी मला तिची काळजी नाही असं दाखवलं तरी मग त्यानं तिला शोधलं का? कदाचित यालाच प्रेम म्हणत असावेत. आणि श्रीनं प्रेमच तर केलं होतं प्रिशावर. म्हणूनच तर त्यानं स्वतःची चूक लक्षात आल्यावर कुणाच्याही नकळत तिचा शोध घेण्याचं काम केलं होतं. बाकीच्यांशी संबंध इतके दुरावले होते की हे सगळं तो कुणाला आणि कुठल्या तोंडानं सांगणार होता? आणि सांगितलं असतं तरी त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला असता की नाही हाच मोठा प्रश्न होता. अमूला हे सगळं ऐकून फार दुःख झालं. ती तर हे सगळं मागं टाकून केव्हाच पुढे निघून गेली होती. श्री मात्र अजूनही त्याच वळणावर अडकून पडला होता. नंदिता गेल्यानंतर आता मात्र तो भान सुटल्यासारखा बोलतच सुटला होता आणि तिच्या शापातून आपली मुक्तता करावी अशी अमूला विनवणी करत होता.

'' मी अजून विसरलो नाहीए गं, बाबांचे शेवटच्या क्षणी प्रिशाला शोधणारे डोळे! लहानपणीचे मित्र आम्ही पण माझ्या वागण्यामुळं जीतनंही मला वार्‍यावर सोडला गं! आणि तू? तू तर तोंड फिरवून निघून गेलीस ते मागं वळूनही पाहिलं नाहीस माझ्याकडे? मान्य आहे मी चुकलो. पण चुकीची एवढी मोठी शिक्षा असते का गं अमू? सगळे सगळे माझ्या आयुष्याची मसणवट करुन घाटावर जाऊन बसलात? मी कसा जळतोय हे बघत? जेव्हा सगळ्या बाजूंनी मी एकटा पडलो होतो तेव्हा जिनं माझी साथ दिली त्या नंदितालापण तुझा शाप घेऊन गेला अमूऽऽऽऽ! घेऊन गेला तिलाऽऽऽ! आता एकदा मलाही घेऊन जाऊ दे असं म्हण नाहीतर तुझा हा शाप मागं घे अमूऽऽऽ मागं घे तुझा शाप! '' अमूचे दोन्ही हात धरुन तिला गदागदा हलवत श्री जीव तोडून तिला सांगत होता.

'' श्री! श्री! अरे सांभाळ स्वतःला. असं कुठे असतं का? शाप देऊन माणसं मरत असती; त्यांची आयुष्य उध्वस्त होत असती तर डॉक्टर आणि सैनिक कशासाठी जिवावर उदार होऊन लढले असते? कसला शाप आणि कसलं काय घेऊन बसलायस तू श्री? आम्ही सगळे तुझ्याजवळच होतो कालही आणि आजही तुझ्याजवळच आहोत. आपल्यातलं अंतर तू आणि तुझ्या इगोनं वाढवलंय. '' तिचं हे म्हणणं ऐकून एका झटक्यात श्री उभा राहिला आणि त्यानं अमूला मिठी मारली. शेजारीच उभा असलेल्या जीतनं दोघांनाही जवळ घेतलं.

नंदिताला बहुतेक कालचक्रानंच या सगळ्यांच्या मधला दुवा बनण्यासाठी पाठवलं होतं. ती कायमची गेली खरी पण जाताना जुन्या मित्रांची मैत्री पक्की करुन गेली.

....

सियालीच्या कामसोबतच एका बाजूला युवीच्या ऑफिसचं इंटेरिअरचं कामंही चालू होतं. प्रिशानं त्या दोघांना सियालीच्या कामत अडकवून टाकून स्वतः जातीनं युवीच्या ऑफिसचा ताबा घेतला होता. चांगली 700 स्क्वेअर फूटची जागा होती युवीच्या ऑफिसची. तिनं त्याचे दोन भाग केले. एक वेटिंग हॉल आणि दुसरा वर्किंग प्लस मिटिंग हॉल. मिटिंग हॉलमध्येच वॉशरुम आणि पॅन्ट्री एरियापण ठेवला होता. वेटिंग हॉल प्रचंड आकर्षक असला पाहिजे असं युवी आणि चांदनीला वाटत होतं तर प्रिशाचं म्हणणं होतं की ब्युटी इन सिंप्लीसिटी. शेवटी या वादात तिच जिंकली होती आणि तिनं त्या दोघांना सरळसरळ ऑर्डर दिली होती की त्यांनी सगळं काम पुर्ण झाल्याशिवाय या बाजूला फिरकायचंही नाही म्हणून. मिटिंग हॉल हा नॉर्मल मिटिंग हॉलसारखा न ठेवता तिनं तिथे टी टाईम अरेंजमेन्ट केली. अलिकडे एक मोठा सोफा, त्याच्याशेजारी दोन सोफास्टाईल खुर्च्या आणि मध्ये टीपॉय अशी एकंदरीत मांडामांड तिथं केली होती. एका कोपर्‍यात काचेचा मोठा स्टॅन्ड उभा करुन त्यावर डेकोरेटीव्ह पिस म्हणून कारंज्याशेजारी बसलेल्या तरुणीचं काचेचं शिल्प ठेवलं होतं जे आतून पोकळ होतं आणि त्यात लाईट सिस्टिमची सोय केलेली होती. कारंजा सतत चालू असायचा आणि संध्याकाळच्यावेळी लाईटस् ऑन केले की सगळाच देखावा मनोहर होऊन जायचा. भरीस भर म्हणून तिनं खालची फरशी अशी बसवली होती की सगळ्या इंटेरिअरचं त्यात प्रतिबिंब पडत होतं. मिटिंग हॉलच्या एका बाजूला तिनं युवीसाठी ऑफिस टेबल आणि एक खुर्ची अकाऊंटन्टसाठीही मांडली. आतला सगळा सेटअप बसवून झाल्यावर तिनं तिचं लक्ष बाहेरच्या जागेकडे वळवलं. आतली- बाहेरची दोन्हीकडची लाईट सिस्टीम कन्सिल्ड करुन टाकली. मग फर्निचरकडे वळली. पण त्याआधी ौिनं दारात ह्युमन सेन्सर सिस्टिम बसवून टाकली. युवीच्याच जुन्या डिझाईन्सचा शोध घेताना तिला इंटेरिअर विथ नेचर प्रकार सापडला. आणि तिला खजाना सापडल्याचा आनंद झाला. या बाजूला तिला बांबू सहज उपलब्ध होता कारण तिथून बांबूची शेती करणारी राज्यं जवळ होती. तिनं त्याचाच वापर करायचा ठरवला. खाली हातानं विणलेली बांबूची चटई संपूर्ण फरशीभर टाकली. खिडक्यांना लावलेले मॅट पडदेही प्लास्टिकऐवजी बांबूचे होते. आत बसण्यासाठी वेताच्या खुर्च्या आणि सोफा ठेवले होते; ज्यावर तिनं खास मागवलेले कुशन्स टाकले होते. भिंतींना वरपासून खालपर्यंत बांबू टेक्शरच्या टाईल्स बसवल्या होत्या. डिझाईनचे अल्बम खास ऑर्डर देऊन बांबूचे बनवून घेतले होते. भिंतींच्या मधोमध खाचा करुन त्यात अर्ध्या फुटाचे कौल खाली होल पाडून बसवले होते. त्याच्या खालच्या बाजूला साधारण अडिच तीन फुटांवर पाणी साठवण्यासाठी मोठी सिमेंट कौल बसवली होती. वरच्या कौलात जेव्हा पाणी सोडलं जाई तेव्हा ते त्या होलमधून खाली उौरे आणि भिंतीवर पाण्याचा तलम पडदा तयार होई. पाणी बंद केलं की सगळं पाणी पुन्हा टॅन्कमध्ये जाण्याची व्यवस्था केल्यानं पाण्यानं ओल होण्याचा प्रॉब्लेम संपला. शिवाय वरच्या कौलांना बाहेरुन एलइडी लाईटच्या पट्ट्या बसवल्या होत्या ज्या त्या पडद्याला रंगीत करुन टाकतील. एसीच्या ऐवजी छताला हातपंखा लावला होता. फरक इतकाच की तो मशीनवर चालत असे.

प्रिशा इकडे अशी पार गुंतून गेली होती आणि तिकडे सियालीच्या कामात गुंतलेले दोघेजण सहवासानं जवळ येत होते. तसाही प्रिशाच्या मनात युवीला पाहिल्यापासून चांदनीसाठी त्याचा विचार चालू होता. प्रश्न चांदला तो आवडौो की नाही याचा होता. पण त्या दोघांना तिकडे सोबत काम करायला लावल्यानंतर तिच्या लक्षात आलं की चांदलाही हळूहळू तो आवडू लागलाय. युवी तिथे सगळी कामं करताना चांदनीला जिवापाड जपत होता हे अधूनमधून तिथं चक्कर टाकणार्‍या प्रिशाच्या लगेच लक्षात आलं. मध्येच एकदा तिनं त्या दोघांना बाहेरच्या गॅलरीत बसून गप्पा मारताना पाहिलं. चांदनीचा एकटेपणा युवीच्या सोबतीनं अलगदपणे वितळत होता.

पण ह्या सगळ्या गडबडीत ती अमूचे मेल चेक करायचे विसरुनच गेली.

स्वरा.... 

26/12/2020

..........

*58*

महिना दोन महिने ताबड ताबड काम केल्यानंतर जे कागदावर कोरलं होतं ते तिघांनी मिळून प्रत्यक्षात उतरवत आणलं होतं. आता फक्त शेवटचा हात बाकी ठेऊन प्रिशा त्यातून बाहेर पडली. आजचा दिवस कामाला सुट्टी असं म्हणून तिघंही घरच्यांच्यासोबत टाऊन फेअरला गेले. आज तिघांचाही मूड एकदम छान होता. चांदनीचा उत्साह तर वैद्रुतीपेक्षाही जास्त फेसाळत होता. तिला तर जसं काही ती 10-11 वर्षांची मुलगी असल्यासारखं वाटत होतं. कधी कुठे तर कधी कुठे अशी ती उधळल्या घोड्यासारखी फिरत होती. आणि तिला आवरायला युवी तिच्या मागोमाग फिरत होता. वैद्रुनं आजोबांना कामाला लावलं होतं. ते दोघेही कधी मेरी-गो-राऊंडमध्ये तर कधी हॉर्सव्हिलमध्ये जाऊन सगळ्याचा आनंद घेत होते. प्रिशा आणि कानू मावशी मात्र एकदा ज्या आकाशपाळण्यातून फेरी मारुन खाली उतरल्या त्या काही परत दुसरीकडे गेल्या नाहीत. या सगळ्यांना सोडून त्या जरा कमी गोंगाटाच्या जागी बाकावर जाऊन गप्पा मारत बसल्या. चांदनीला अशी बेफाम झालेली पाहून प्रिशानं माऊला विचारलं, '' माऊ ये क्या बचपन सें ऐसी है? देखो तो जरा इसे; इसकी तो जैसे तितली हो गई है। '' तिलाच आश्चर्य वाटत होतं की याआधी कधी आपण या चांदनीला पाहिली कशी नाही?

'' हां! बचपन से ऐसी ही है वो। तभी सें मेले में जाना बहुत पसंद है उसे; मेले में ले जाओ तो ऐसे ही फुदकती है। चक्कर आने तक पालनों में गोल गोल घुमती रहती है। वैसे एक बात बता, तू कुछ दिन पहले वापिस जाने की बात कर रही थी ना! क्या हुवा उसका? इतनी हडबडी में क्यू जाना था तुझे? सब ठीक तो है ना वहॉं पें? नंदिता कैसी है बेटा? ''

'' क्या कहू माऊ, कई दिनों से ना मैने अमू के मेलही नहीं पढे। ये सियाली और युवी के ऑफिसवाले काम में पुरी गले तक डूब गई थी मै। अच्छा हुवा आपने याद दिलाया; अब घर जाने के बाद पहला काम यहीं करती हू। अमू के मेल चेक करती हू। काश कोई दुसरा इम्पॉर्टंन्ट मेल आनेवाला होता और उसके लिए मैंने रिमाइंडर लगाया होता; कम से कम उसी बहाने सें ही सही काम से वक्त निकालके अमू के भी मेल पढ लेती। न जाने क्या सोचती होगी वो मेरे बारे में के मै कहॉं गुम हो गई करके! ''

'' आराम सें बेटा, इतनी परेशान मत हो। सब ठीक हो जाएगा। ''

त्यांच्या गप्पा चालूच होत्या की इतक्यात युवी चांदनीच्या खांद्याला धरुन तिला तिथे घेऊन आला.

'' हिला काय झालं रे? ''

'' माणसानं कोलांटउड्या जरा कमी माराव्यात ना! ''

'' म्हणजे? ''

'' अरे कुछ नहीं प्रिशा, उसको चक्कर आ गई होगी पालनें में घुम घुम के। ''

'' हां नाही तर काय? किती गरगर फिरते ही! मला तर बघूनच चक्कर आली. नशीब माझं की तिला पाळण्यातून उतरल्यावर चक्कर आली ते!. '' त्याच्या बोलण्यातून त्याला तिच्याविषयी वाटणारी काळजी व्यक्त होत होती.

'' वैद्रुतीपण हेच करतीय का? '' त्यानं सोबत वैद्रुती दिसली नाही म्हणून प्रिशाला तिच्याविषयी विचारलं.

'' छे! तिला नाही आवडत जास्त त्या पाळण्यांमध्ये बसायला. तिला आईसारख्या गाड्या उडवायला आवडतात. ती बघ आजोबांबरोबर त्या क्रॅश द कार राऊंडमध्ये बसलीय ती. तू आणि माऊ हिला घेऊन कारकडे जा तोवर मी आलेच त्या दोघांना घेऊन. '' असं म्हणून प्रिशा वैद्रुला आणयला गेली आणि हे तिघेजण कारकडे गेले.

कारकडे येताना वैद्रुनं हट्ट करुन आजोबांकडून खूप सारे बुढ्ढी के बाल घेतले. गाडीतही तिचं हात आणि कपडे चिकट करणं चालूच होतं. तिच्या ह्या सगळ्या गोष्टींनी सगळ्यात जास्त आनंद युवीला होत होता. प्रिशा गाडी चालवत होती. शेजारच्या सीटवर कविश अंकल बसले होते तर मागे वैद्रुतीला मांडीवर घेऊन कानूमावशी आणि चांदनीला आपल्या खांद्याची उशी देऊन युवी बसला होता. त्याची नजर सारखी चांदनीच्या चेहर्‍यावर जात होती आणि राहून राहून त्याला तिचा अवखळपणा आठवून स्वतःशीच हसायला येत होतं. या सगळ्या गोष्टी प्रिशा समोरच्या आरशातून टिपत होती.

जत्रेत बरचंसं खाणं झाल्यानं घरी येऊन जेवण्याचा प्रश्नच नव्हता. मावशी आणि काका त्यांच्या खोलीत गेले झोपायला. प्रिशानं वैद्रुचे हाततोंड स्वच्छ धुवून, तिचे कपडे बदलले आणि तिला माऊच्या खोलीत नेऊन झोपवलं. चांदनीला तर यातल्या कशाचं भानच नव्हतं. मुळात ती स्वतःच भानावर नव्हती. तिला युवी तिच्या खोलीत घेऊन गेला. पलंगावर नीट झोपवलं, अंगावर पांघरुण घातलं आणि बाहेर येऊन कठड्याला टेकून उभा राहून विचार करत होता की त्याला चांदनीविषयी काय वाटतंय ते प्रिशाशी बोलावं. खिशातून सिगरेट काढून ती हातात तशीच धरुन तो विचारात गुंतलेला असतानाच वैद्रुतीला माऊच्या खोलीतून बाहेर पडून स्टडीकडे जाणार्‍या प्रिशानं त्याला बघितलं.

'' काय रे झोपायचं नाहीए का तुला? ''

'' हो चाललोच होतो. चिमणी झोपली का? ''

'' हो. आणि चांदनी पण झोपली असेल ना! ''

'' तिला कुठे शुद्ध होती तेव्हा! आताच तिला बेडवर झोपवलं आणि बाहेर येऊन उभा राहिलो. तेवढ्यात तू आलीस. बाय दि वे कॅन आय स्मोक? ''

'' गो ऑन मॅन. इथे कुठेच नो स्मोकिंगचा बोर्ड नाही लावलेला. ये खाली स्टडीत बसून बोलू. ''

'' आता स्टडीत? नवीन काम घेतलंयस का? किती बिझी ठेवशील स्वतःला? ''

स्टडीचं दार ढकलत प्रिशा म्हणाली, '' सध्या तरी माझ्याकडे तेवढा एकच उपाय आहे आठवणींपासून दूर राहण्याचा. ये बस. मी काही नवीन काम घेतलेलं नाहीए. मी इथे आले अमूच्या मेल बघायला. ''

'' अगं मग ते काम तू उध्याही करु शकतेस की! एवढी दमलीयेस तर जा जरा आराम कर. ''

'' नाही रे! कामाच्या धावपळीत गेले महिना दोन महिने मी अमूची एकही मेल पाहिली नाहीए. तिची, जीतची, श्रीची, अनिश नंदिताची कुणाचीच काही खबरबात नाही मला. ती काय विचार करत असेल? किती निष्काळजी आहे मी म्हणून. ''

'' ए चल! असं कुठे असतं का? ती आपली खूप चांगली मैत्रीण आहे. आपल्याला समजून घेऊच शकते ना ती! '' युवी सिगरेट ओढता ओढता बोलत होता आणि अचानक त्याला प्रिशाचा थरथरणारा आवाज ऐकू आला.

'' युवी...ऽऽ! ''

त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं तर दोन्ही हात ओठांवर ठेऊन एकटक स्क्रिनकडे पाहणार्‍या प्रिशाचे डोळे मात्र वाहत होते. हिला काय झालं? एका झटक्याौ तो आपल्या जागेवरुन उठून प्रिशाकडे आला.

'' प्रिशा! प्रिशा! अगं काय झालंय? '' विचारुनही ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्यानं तिच्या मांडीवरचा लॅपटॉप उचलून घेतला आणि तिनं ओपन केलेल्या अमूच्या मेलवर नजर टाकली. अमूनं त्या मेलमध्ये फक्त दोन शब्द लिहिले होते, '' नंदिता गेली. ''

ते वाचून त्यालाही झटकाच बसला. त्यानं पटकन् लॅपी बाजूला ठेवला आणि प्रिशाला जवळ घेतली. त्यानं जवळ घेतल्याबरोबर प्रिशाचा बांध फुटला.

'' हे काय होऊन बसलं रे युव्या? वय तरी काय होतं त्या पोरीचं? आता माझ्या अनुचं काय होइल रे? आई गेली रे त्याची! बापासारखा तोही कसनशीबी निघाला. नकळत्या वयात आईला गमावून बसला. मी जाार होते तिला भेटायला. अमूनं मला सांगितलं होतं की ती मला शोधतेय म्हणून. अशी कशी वेळ निसटली रे माझ्या हातून? ''

'' श्शऽऽऽ! श्श... श्श! शांत हो. शांत हो. वेळ अशी कधी सांगून येते का कुणाची बाळा? जे झालं ते झालं. आता शोक करुन ती परत तर नाही ना येणार! आता तुलाच खंबीर व्हायचंय. आणि कोण म्हटलं आपला अनु कमनशिबी आहे म्हणून. त्याची आई आहे अजून आणि लवकरच ती त्याला भेटणार आहे. आतापुरतं हे मेल वगैरे सगळं बंद कर. आता झोप आपण बोलू यावर उद्या. ''

अशी तिची समजूत काढून युवीनं थोपटून तिला तिथंच स्टडीत झोपवलं आणि तिची शाल नीट करुन निघून गेला. रुममध्ये येऊन त्यालाही म्हणावी तशी झोप येत नव्हती. कळत नव्हतं आता पुढं काय होईल ते!

...

' किती दिवस उलटून गेलेत प्रिशाचा काहीच रिप्लाय आलेला नाही. अशी काय करते ही? काय झालं असेल कुणास ठाऊक! का तिनं एकही मेल साधी उघडूनही नाही पाहिलेली? माझ्याकडे तर चांदनीचाही नंबर नाही. कधी तिच्याशी बोलण्याचा प्रसंगच नाही मग फोन नंबर कुठून असणार जवळ! किमान तिला तरी विचारलं असतं प्रिशाबद्द‍ल! '

अमू नको इतकी अस्वस्थ झाली होती. आणि का होऊ नये? नंदिताचं हे असं झालं हे सांगितलेलंही तिनं पाहिलं नव्हतं. गेल्या दोनेक महिन्यात प्रिशानं तिची कुठलीही मेल साधी उघडून पाहिली नव्हती की तिला रिप्लाय केला नव्हता. ज्याअर्थी तिनं ते पाहिलं नाही त्याअर्थी तिला नंदिताच्या जाण्याबद्द‍लही काही माहीत असण्याची शक्यता नाही. आता करायचं तरी काय? नंदितानं जाताना प्रिशाला शोधायला सांगितलं आणि माझ्याकडे तिचा पत्ता, फोन नंबर असूनही मी काही करु शकले नाही.

तिचं कुठल्या कामात लक्ष लागेना. राहून राहून तिला हॉस्पीटलमध्ये श्री जे काही बोलला ते सगळं आठवत होतं. त्यानं प्रिशाला शोधलं होतं; तेही आपल्या नकळत आणि आपण त्याला किती चुकीचं समजलो. का त्याला एकटं सोडलं आपण? असे कसे वागलो त्याच्याशी आपण? मित्र म्हणवतो ना आपण! तरीही इतकं वाईट वागलो. खरंच का आपला शाप लागला असेल त्याला? तो म्हणतो तसं खरंच झालं असेल का?

या सगळ्या विचारांच्या गोंधळात लॅपी तसाच ऑन ठेवून अमू चहा आणायला गेली.

'' अमूऽऽऽ, अगं अनुला पाहिलास का कुठं तू? श्री शोधतोय त्याला. ''

असं विचारत जीत आत आला तर लॅपी तसाच ऑन होता. ' ही पण ना कशी कामं करते!' असा विचार करुन तो लॅपी बंद करायला गेला आणि तो बंद करण्याऐवजी डोळे विस्फारुन समोरच्या स्क्रिनकडे बघतच राहिला.

स्वरा...

 28/12/2020

..........

५८

'' हां जीत! काही म्हणालास का तू? '' हातात चहाचा कप घेऊन आत येणार्‍या अमूनं विचारलं. समोरुन काहीच प्रत्युत्तर नाही म्हणताना चहाच्या कपातलं लक्ष काढून तिनं वर पाहिलं तर लॅपीसमोर बसून जीत प्रिशाचे मेल वाचत होता. तिच्या हातातला चहाचा कप गळून पडला. झटकन् भानावर येत तिनं पुढे जाऊन लॅपीचा फ्लॅप डाऊन केला.

'' हे, हे! काय करतोयस तू जीत? ''

'' ते पाहतोय जे तू गेली अनेक वर्षं माझ्यापासून लपवून ठेवलंस अमू! का वागलीस अमू तू अशी? काय चुकलं माझं म्हणून तू माझ्याशी अशी वागलीस? मला अंधारात ठेवून काय मिळवलंस अमू तू? तुला कधीच माझी तिच्यासाठीची काळजी दिसली नाही का गं? हे असं वागणं शोभतं का तुला? किमान एकदा माझा, माझ्या भावनांचा विचार करायचा होतास ना हे सगळं करण्याआधी! ''

'' जीत, माझं ऐकून तरी घे! ''

'' काय सांगाणारेस तू आता? तू जे केलंस त्याचं स्पष्टीकरण देणारेस का? का केलंस? कसं केलंस? तिचं ऐकलंस आणि माझा विचारपण केला नाहीस! गेली अनेक वर्षं तिच्या नसण्यानं माझ्या जगण्याला पडलेलं भगदाड तुला दिसलंच नाही की तू सपशेल दुर्लक्ष केलंस अमू त्याच्याकडे? ''

'' जीत अरे असं नको ना म्हणूस. किमान तू तरी मला समजून घे. '' असं म्हणून ती गुडघ्यावर बसली. त्याच्यासमोर हात जोडले.

'' मला माफ कर जीत. खरंच मला माफ कर. तुझ्यापासून हे सगळं लपवून ठेवावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती की मला तसं वागावं लागलं. तू विसरलास का सगळं? जे घडलं होतं ते! विसरलास श्रीनं कसं बाहेर काढलं होतं प्रिशाला? वामनकाका गेले हे ही विसरलास का? मला सांग त्यावेळी प्रिशा सापडली असती किंवा तिचा ठावठिकाणा कळल्यावर तू तिला परत आणली असतीस आणि ती परत आल्यानंतर जर काही टोकाचं विपरीत घडलं असतं तर मग दोष कुणाला दिला असतास तू? स्वतःला? श्रीला? प्रिशाला? की त्यावेळच्या परिस्थितीला? आपण काहीच करु शकलो नसतो जीत; आणि म्हणूनच मी वाहत्या पाण्याला बांध घालायचा विचार सोडून त्याच्यासोबत धारेला लागायचं ठरवलं. आता तूच सांग मला यात माझं काय चुकलं ते! तुझ्यापासून ही गोष्ट लपवणं ही त्या वेळेची गरज होती जीत. ज्यासाठी मी आज तुझी माफी मागतेय. ''

जीतला तिचं म्हणणं पटत होतं. तो हळूहळू भानावर येत होता. तसा तो टोकाचा रागीट वगैरे मुळातच नव्हता. पण आता मात्र त्याला स्वतःला सावरणं खूप कठीण जात होतं. अमू त्याची मैत्रीण होती, त्याची बायको होती, त्याच्या मुलाची आई आणि घरच्यांची लाडकी सूनही होती. असं नव्हतं ती तिच्या कुठल्याही कर्तव्यात कसूर करत होती पण प्रिशा त्याच्यासाठी या सगळ्याच्या पलिकडची होती. काय आणि कसे दिवस काढले होते त्यानं इतकी वर्षं हे तो तिलाही नसताच सांगू शकला. कारण जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा तर शब्दही मुके होतात. आणि त्याच्या ह्या मुकेपणाला प्रिशानं केव्हाच समजून घेतलं होतं. त्यानं स्वतःला सावरलं. डोळे पुसले. अमूचे जोडलेले हात धरले आणि विचारलं, '' नंदिता आणि अनिशबद्द‍लही सांगितलं होतंस का गं तिला? ''

'' जीत, मला माहीत आहे की तू माझ्यापेक्षा, आपल्या नात्यापेक्षा नेहमीच प्रिशाला वर ठेवलंस. मग मी तरी कशी त्यात मागे राहीन? तुझी शपथ मी तिच्यापासून कधीच काहीच लपवून नाही ठेवलं. अगदी श्रीनं नंदिताशी लग्न केलं, अनिश त्यांचा मुलगा आहे इथपासून ते आता नंदिता गेली इथपर्यंत सगळं काही तिला सांगितलंय मी. पण गेले दोन महीने तिचा ना फोन आलाय ना माझा कुठला मेल तिने पाहिलाय. मला कळायला मार्गच नाही की आता काय करायचं? माझ्याकडे तर चांदनीचाही नंबर नाहीए. ''

'' ही कोण? ''

'' म्हणजे तू वाचलंस काय? तुला माहीतच नाही की चांदनी तिच्या कानन मावशीची मुलगी आहे म्हणून? ''

'' अगं मी तर फक्त पहिले एक दोन मेल वाचले आणि त्यानंतर प्रिशा सापडली या आनंदाने माे डोळेच वहायला लागले. पुढचं काही वाचेपर्यंत तू आत आली होतीस. पण आता मात्र मला टेन्शन आलंय. आताच तर मी विचार करत होतो की माझी परवड संपलीय म्हणून तोवर तू म्हणतेस की तिनं दोन महीने तुझा एकही मेल वाचला नाही की तुला फोनही केला नाही म्हणून! अमू मी काय करु गं आता? तिला काही झालं नसेल ना? ती... ती परत कुठे निघून गेली नसेल ना? मी... मी असं करु का? मला कानपूरचा पत्ता दे मी स्वतः जाऊन तिला घेऊन येतो. ''

'' जीत अरे असं काय करतोयस तू? खात्री बाळग तिला काहीही झालेलं नसणार. ती नक्की सुखरुप असणार. आणि असा कसा अचानक तू जाशील तिला आणायला? म्हणजे इतके दिवस मी तिचं जे गुपित लपवून ठेवलं ते सगळं मुसळ केरात का? हे बघ तू काही काळजी करु नकोस मी आता मघाशीच तिला आणखी एक मेल केलाय असशील तशी निघून ये म्हणून. आता इतके दिवस तिच्या रिप्लायची वाट बघितली की नाही आपण मग एक दिवस आणखी बघू. जर नाहीच दिला काही रिप्लाय तर मी तुला पत्ता देते कानपुरचा. तू आणि तुझी लाडकी मैत्रीण मिळून घाला काय घालताय तो गोंधळ. ''

पण त्या दोघांना कुठे माहीत होतं की येणारा दिवस त्यांच्यासाठी काय सरप्राईज घेऊन येणार आहे ते!

...

'' ये क्या? आज नाश्ते के लिए दी क्यू नहीं है मॉं? ''

'' पता नहीं बेटा। वो अपने कमरे में भी नहीं थी। शायद सुबह सुबह कहीं चलीं गई होगी। ''

'' ऐसे कैसे किसीको बिना कुछ बताए जा सकती है दी? रुको मै उन्हें फोन लगाती हू। '' असं म्हणून फोन लावायला उठणार्‍या चांदनीनं युवीला मावशीला सांगताना ऐकलं की प्रिशा स्टडी में है। तो नाश्त्यासाठी खाली उतरुन येत होता.

'' क्या? दी स्टडीमें है? वो पुरी रात स्टडी मेंही सो गई? आखिर हुवा क्या है कल रात को? '' असं म्हणून नाश्ता तसाच सोडून चांदनी स्टडीकडे निघाली.

'' सुनो मै बताता हू तुम्हें! उसे डिस्टर्ब मत करो। '' असं म्हणत तिच्या मागं येणार्‍या युवीचे अर्धे अधिक शब्द तर हवेतच विरुन गेले.

चांदनी स्टडीमध्ये आली तर मोठ्या खुर्चीत पाय मुडपून प्रिशा तशीच झोपली होती. रडून रडून डोळे सुजले होते आणि गालांवर पाण्याचे डाग पडलेले स्पष्ट दिसत होते.

'' ये सब चल क्या रहा है आखिर? दी कल रात इतना रोई की ऑंसू भी सुख गए? ये सब हो रहा था तब मै कहॉं थी? ''

'' तुम ना बात बात पर यु हायपर मत हुवा करो। चिल डिअर आय टेल यू एव्हरीथिंग. कल रात तुम फेअर में चक्कर आने की वजह सें जल्दी सो गई थी। बाद में मै और प्रिशा यहॉं अमू के मेल देखने आए थे। प्रिशाने अमू की मेल पढी जिसमें उसने लिखा था की नंदिता चल बसी। ''

'' क्याऽऽऽ! ''

चांदनी हे एवढ्या जोरात बोलली की प्रिशाला जाग आली.

'' क्या हुवा चांद? तुम चिल्ला क्यू रही हो? ''

'' दी पहले आप जाके फ्रेश हो आवो। बाकी बातें हम बाद में करते है| चलीए, आप स्टडी में है। ''

तेव्हा कुठं प्रिशाच्या लक्षात आलं की काल काय काय झालं होतं ते. तिनं वार्‍याच्या वेगानं मनात गणितं घातली आणि ती फ्रेश व्हायला गेली.

त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी अतिशय वेगानं घडल्या. सगळ्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा अमूच्या सगळ्या मेल पाहिल्या. नंदिता गेली ही तिची मेल जवळपास दोन महिन्यांपूर्वीची म्हणजे साधारण सियालीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हाची होती. तिनं त्यानंतरही काही मेल पाठवल्या होत्या. एकांत तिनं लिहिलं होतं की श्रीच्या बाबतीत आपण सगळेचजण चुकलो. त्याचं तुझ्यावर आजही खूप प्रेम आहे. तू गेल्यानंतर त्यानं तुला शोधलं पण तू काही सापडली नाहीस. अशातच त्याला त्याच्या एकटेपणामध्ये नंदिताची साथ मिळाली आणि त्यानं तिच्याशी लग्न केलं. आतातर नंदिताही त्याच्या आयुष्यातून निघून गेलीय. आता मात्र मला त्याची काळजी वाटायला लागलीय. प्रिशा, असशील तशी परत ये. त्यालाच नाही अम्हांला सगळ्यांनाच तुझी फार गरज आहे.

हे सगळं वाचल्यानंतर प्रिशानं तातडीनं पुण्याला परतण्याचा विचार केला. कुठल्याही परिस्थितीत अवधान राखणार्‍या तिनं लागलीच युव्याला तिच्यासाठी दुसर्‍या दिवशी पहाटेची फ्लाईट बुक करायला सांगितली. ते झा;ल्याबरोबर तिनं त्या दोघांसोबत बसून सगळी सांगोपांग चर्चा केली. कुणी? कधी? कसं? कुठं एकमेकांला भेटायचं?, पुण्यात जाऊण नेमकं काय करायचं?, कुठून आणि कशी सुरुवात करायची? वैद्रुतीची काय व्यवस्था करायची? तिला पुण्याला कधी आणायचं? तिचा ह्या सगळ्यात काय रोल असेल? अशा सगळ्या मुद्द‍्यांवर चर्चा करुन फायनली वैद्रुतीला काही दिवस आजीकडेच ठेवून पुण्याला जायचं ठरलं.

विमानतळावर तिला निरोप देण्यासाठी आलेल्या चांद-युवीनं तिला सांगितलं की बस एका कॉलवर आहोत आम्ही. काहीही लागलं तरी कळव.

स्वरा... 

30/12/2020

..........

*60*

'' हॅलो फ्रेन्डस्! होप यू ऑल रिमेंम्बर मी? ''

दारातून बॅग आणि खांद्याला पर्स लटकवून येणार्‍या प्रिशाने दारातच बॉम्ब फोडला. नुकतेच चहासाठी हॉलमध्ये जमलेल्या सगळ्यांना त्या आवाजाने धक्काच बसला. हातातला चमचा पोह्यांच्या डिशमध्ये तसाच टाकून सगळ्यांत आधी तिच्या स्वागताला जीतनं धाव घेतली.

'' प्य्रा! प्य्रा तू परत आलीस. '' त्याला आकाश दोन बोटं उरलं होतं तिला बघून. इतक्या वर्षांनी तिला अशी समोर बघून अमूच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. छोट्या इरवनला ही आलेली नवी पाहुणी कोण? हा प्रश्न पडला होता. त्याचे आई-बाबा, आजी-आजोबा सगळेच त्या पाहुणीच्या स्वागताच्या सरबराईत गुंतून त्याला विसरुन गेल्यामुळे त्याने मोठ्याने भोकाड पसरलं प्रिशानं त्याचं रडणं ऐकलं आणि जीतला तिथंच सोडून ती त्याच्याकडं धावली.

'' इरु, मेरा बच्चा मेरा बेटा। रोना नहीं बेटा। रोना नहीं। देखो तो कौन आया है? मौसी आई है। हाय कलो मौसी को, हाय कलो। '' असं म्हणत तिनं त्याला उचलून घेतलं. त्याबरोबर तो आपलं रडणं थांबवून टकामका तिच्याकडे बघायला लागला. त्याच्या परीनं ती जरा अगम्य भाषेतच बोलत होती ना त्याच्याशी. त्याचं रडणं थांबलेलं पाहून अमून कृतकोपानं जीतकडं पाहिलं.

'' बघितलंस ना! हा अगदी तुझ्यावर गेलाय. तिनं उचलून काय घेतलं लगेच पठ्ठ्यानं आपलं वासलेलं भोकाड आकसून घेतलं. ''

'' खरंय गं! पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिनं त्याला ती त्याची मावशी आहे म्हणून सांगितलं. मला भितीच वाटली होती ही आता त्याला आत्या आहे म्हणून सांगते की काय म्हणून. ''

'' शी! शी! श्शी! तु ना असले धंदे अजिबात करु नकोस हं जीत! तुझा आणि विनोदाचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाहीए. ''

'' ए अमू ही बघ अजून मराठी बोलतेय. ''

अमूनं नुसतंच तोंड वेंगाडलं. त्याचा आविर्भावच असा होता जसं काही तो तिला काहीतरी अप्रूप सांगतोय.

'' जीत बरा आहेस ना तू? काहीही काय बोलतोयस? मी मराठी का विसरेन? ''

'' चला बाबा, हे एक बरं झालं. नाहीतर माझ्या हिंदीचे लागलीच वाभाडे काढले असतेस ना तू! '' तिला काही बोलायला वाव न देता त्यानं लगेच तिला प्रश्न विचारुन टाकला. '' चहा घेणारेस का तू? ''

'' का? तू करणारेस? काय गं अमे तुला ह्यानं काय किचनमधून आराम दिला वाटतं. ''

'' हो तर! तोंड बघा. स्वतःचा कप उचलून ठेवला रोज तरी उपकार होतील माझ्यावर. ''

अनेक वर्षांनंतर घरात अशी लुटूपुटूची भांडणं ऐकून मालिनीकाकूंचा बांध फुटला. त्यांच्या अनावर झालेल्या भावना डोळ्यांतून वहायला कधी लागल्या हे त्यांनाच कळलं नाही.

'' ए काकूआई! काय गं हे? तू पण आता इरुएवढी झालीस का? ''

'' नाय रे लेकरा, पोरांचं सुख बघून मन भरुन आलंया बघ. ''

'' ए! आता असं डोळ्यांतून पाणी काढायचं नाही. पुस बरं! मी आले की नाही आता परत! ''

'' हां, हां पूस डोळे. आपण पाईपलाईन टाकू डायरेक्ट. '' चहा करता करता जीत किचनमधून ओरडला.

'' प्रिशे तू येऊन काहीतरी जादूची छडी फिरवलीस की काय? माझा नवरा चक्क किचनमध्ये गेलाय. आणि नुसता गेला नाहीए तर चहापण करतोय. सूर्य आज नक्की पश्चिमेला उगवला होता बघ. ''

अमूला आश्चर्याचा चांगलाच झटका बसला होता. इरुला आजीकडं देऊन प्रिशापण किचनच्या दारात येऊन अमूच्या खांद्यावर हात टाकून उभी राहिली.

'' प्रिशे, तू ह्या अमीच्या नादाला लागू नकोस हं! मला चांगला चहा करता येतो हे तुला माहीतेय. ''

'' प्रिशे, खरंय का गं हे? काय म्हणतोय हा? ''

'' का तुला वेलचीच्या वासवरनं पण कळलं नाही का ते! ए जीत्या मी वर जातेय. फ्रेश होते तोवर ये चहा घेऊन. आणि हां अमूसाठीपण आण. तिलाही तुझ्या हाताची चव कळायला हवी. चल गं अमे! ''

असं म्हणून हाताला धरुन खेचतच प्रिशा अमूला घेऊन वर गेली. ती बाथरुममध्ये होती तोवरच जीत चहा घेऊन वर आला.

'' हे बरंय हं तुमचं! इतक्या वर्षांत मला साधा वासही येऊ दिला नाहीस तुला चहा करता येतो याचा. ''


पण त्यानं तिला काहीही उत्तर न देता हाताला धरुन जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. तिच्या ओठांवर, गालांवर, पापण्यांवर, कपाळावर सगळीकडे किस करत तो म्हणाला, '' अमू, अमडे, काळे, नकटे आय लव्ह यू यार; आय लव्ह यू. थॅन्क्यू सो मच यार! तू माझी सखी मला परत केलीस. तिला इतकी वर्षं सांभाळून ठेवलीस. तुझ्याजागी दुसरी कुणी असती तर तिनं आजवर मला तलाक तलाक कोंबडी कोंबडी केलं असतं पण तू माझ्या जीवाची किती काळजी करतेस अमू डिअर. आय लव्ह यू. ''

तो आणखी काही बोलणार इतक्यात प्रिशा नॅपकीनला तोंड पुसत बाथरुममधून बाहेर आली. बघते तर समोर हे! लग्गेच डोळ्यांवर हात घेत ती म्हणाली, '' अरे जरा लाज बाळगा रे! माझ्यासमोर रोमान्स करताय? माझे गेली अनेक वर्षं उपास चालू आहेत याचा तरी विचार करा नालायकांनो! ''

'' मोठ्ठी आली उपास करणारी. आलीस ना आता. मग सरळ आहे. उपास सुटणारच गं! '' अमूनं त्याच्या खांद्यावर चापट मारली. त्याला उगीचच डोळे वटारले गप्प राहण्यासाठी; तर त्यानं तिला आणखीनच ओढून जवळ घेतलं. '' आणि हे काय तू नव्यानं बघतेयस की काय? कॉलेजपासून असंच आहे आमचं. माझी डार्लिंग आहे ती. ''

'' प्रिशेऽऽ! ह्याचं प्रेम आता लैच ऊतू जायला लागलं की गं! ''

'' ए चल आता नाटकं बास झाली तुझी प्य्रा! वाट बघून चहा राम म्हणेल आता. ''

आणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तिथं मित्रांसोबत मैत्रीची मैफिल सजली.

'' जीत चव चांगली आहे की रे तुझ्या हाताला. ''

'' जीत्या आता मेलास तू. वाघिणीच्या तोंडाला रक्त लागलं बघ. आता तर तू इंजिनिअरचं काम सोडूनच दे. ''

'' हेच. याचसाठी मी इतकी वर्षं हे सगळं लपवून ठेवलं होतं. कॉलेजात असताना आपण ड्रॉईंग काढण्यासाठी जागायचो ना! तेव्हा मीच चहा करायचो. ''

'' तेव्हापासून? ''

'' हां मग. अरे यार, प्रिशे साले तुझ्यामुळं ना ह्या अमीला माझी सगळी गुपितं कळतात. '' त्यानं प्रिशाच्या पाठीत बुक्का मारला.

'' जुने दिवस परत आल्यासारखे वाटतायत ना अमू. ''

पण अमूऐवजी जीतच बोलला.

'' जुने दिवस गेले खड्डयात. तू आधी मला सांग की तू माझ्या लेकीला का नाही घेऊन आलीस? आधी कळलं असतं तर तुला घरात पायच ठेवू दिला नसता मी. ''

'' तू गप रे! मी काय तिला वडाच्या पारंबीला टांगून आलेय का? नानीमौसीकडं आहे ती. आणि तिच्या वेळेत येणार ती; कारण या नाटकातलं एक महत्वाचं पात्र आहे ती. तिची एन्ट्रीपण तशीच धमाकेदार झाली पाहिजे. ''

'' चल. चल. तुझ्या असल्या कुठल्या नाटकांत मी नसतो काम करणार. ''

'' ठीक आहे. नको करुस. मी जाते परत. आणि ह्या वेळी परतून नाही येणार मी. ''

'' ए अमू तू बोल ना काहीतरी गं! ही बघ ना तुझ्या नवर्‍याला कशी ब्लॅकमेल करतेय ती. सांग ना तिला असं नको करुस म्हणून. प्य्रा खरं सांगतो तुझ्याशी मैत्री झाली आणि मीच मला सापडलो. तुझ्यामुळं मला अमूसारखी बायको मिळाली. माझा इरु स्वभावाच्या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलाय. तुझ्या असण्यानं आयुष्याला अर्थ आहे बघ! इतकी वर्षं तू नव्हतीस तर हे सगळं आयुष्यचं कसं सैरभैर होऊन गेलं होतं. आता असं वाटतंय की आजवरची सगळी वादळं शांत होतायत. पण तू मात्र पुन्हा कुठं जाऊ नकोस. ''

'' ए वेड्या, इतका काय इमोशनल होतोस? मी तर गंमत केली फक्त. आणि हो वादळं संपत नाही आलेली काही; ही तर वादळापूर्वीची शांतता आहे. ''

'' म्हणजे? मला कळलं नाही. ''

'' आपल्या चौकोनाची एक बाजू आपल्याला परत मिळवायचीय. ''

'' हं! खरं बोलतेयस तू. आपण सगळेच त्याच्याबाबतीत कुठं ना कुठंतरी चुकलो बघ. ''

'' अमू, तू म्हणतेयस ते खरंय. पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती की ती निर्माण केली गेली होती याचा आपण कुणीच तेव्हा विचारच नाही केला. आता मात्र आपल्याला त्याचा विचार करायला हवाय. जीत तुझ्याकडे ते फोटो आहेत का रे अजून? ''

'' श्शीऽऽ! काहीतरीच काय? मी असल्या अभद्र गोष्टी कशाला बाळगेन जवळ? ''

'' मला तसं नाही म्हणायचं रे! जर ते असते तर त्यांच्यामागछं सत्य समजून घेता आलं असतं ना! म्हणजे बघ आता टेक्नॉलॉजी किती पुढे गेलीय ना! ''

'' तेही खरंच की गं! पण मअज्याकडं नाहीयेत ते. किती वर्षं उलटून गेलीत ह्या सगळ्याला? ''

'' हो पण कधी कधी सत्य बाहेर काढण्यासाठी इतिहास खंगाळावा लागतो. बरं मला सांग आपलं जुनं ऑफिस आहे की विकलंस? ''

'' नाही गं! मी तर ते केव्हाच श्रीला देऊन माझं वेगळं ऑफिस घेतलं. ''

'' अरे बापरे! आता काय करायचं? बरं श्रीनं त्या ऑफिसचं काय केलं हे तरी माहीत आहे का तुला? ''

'' अंहं! नाही माहीत. पण तू काळजी नको करुस. आपण काढू काहीतरी मार्ग. आतातरी तू छान आराम कर. संध्याकाळी अनिश येईल. तो आज बाबाबोबर गेलाय. त्याला भेट. बघू तोवर काही होतंय का ते! ''

स्वरा... 

31/12/2020

..........

*61*

'' हॅलो चांदनी! ''

'' हॅलो दी! कैसे हो आप? ठीक से तो पहुचे ना आप? ''

'' हो गई तू शुरु? अम्मा, तू क्या सवालों की किताब लेके बैठती है क्या हमेंशा? ''

प्रिशाच्या ह्या प्रश्नावर पलिकडून चांदनी खळखळून हसली.

'' सुन बेटा वैद्रु कैसी है? ''

'' आ गई ना बेटी की याद! अच्छी है वो दी। आप उसकी चिंता मत करो मै और युवी उसे संभाल लेंगे। ''

'' क्या कहॉं तुने? जरा फिरसें तो कह दे जान! अब वो गुंगा नहीं रहा क्या? ''

प्रिशानं लगेच मिळालेल्या संधीचा वापर करत तिचा पाय खेचला.

'' दी आप भी ना! बात वैसी नहीं है जैसी आप समझ रहें हो। वो तो अब मुझें पता चला की वो अच्छी बाते करता है। ''

'' अच्छी बातें हां! ठीक है, कोई जल्दी नहीं धीरें धीरें और भी बातें पता चलेंगी। ''

'' अंहं! जाओ ना दी! ''

'' अच्छा ठीक है चल; तेरा किस्सा तो मै बाद में सॉर्टआऊट करती हू। पहले मुझें ये बता मेरा बच्चा रोया तो नहीं था ना? ''

'' हां सुबह जब ऑंख खुली तो आपको ना पाकर रोई थी। आदत है ना उसें आपकी बाहों में सिमट के सोने की। मैने कह दिया उससें की जल्दही हम जाएंगे ममा के पास। ''

'' सही किया तुने। उसे ममा का ढेर सारा प्यार देना। और सुन अभी ज्यादा कुछ नहीं बताती मै; पर मेरा मेसेज युवी को देके रखना के मैं रात को व्हिडिओ कॉल करुंगी। और हां उसको बोला है इसका मतलब ये नहीं की तू गायब हो जा। तू भी चाहिए मुझें साथ में। ''

'' बाय दी। मिलते है रात को! ''


शेजारीच बसून प्रिशाचा कॉल ऐकणार्‍या अमूची नाही म्हटली तरी उत्सुकता चाळवलीच होती.

'' कुणाबद्दल बोलत होतीस गं? कोण युवी? चांदनीला का चिडवत होतीस? ''

'' अशी काय करतेस अमे! विसरलीस की काय युव्याला? अगं आपला युव्या गं! युवराज. ''

'' काय सांगतेस? युव्या? आणि कानपुरात? तो काय करतोय तिकडं? तुमची कशी भेट झाली? तिही इतक्या वर्षांनी? माझ्या माहीतीप्रमाणं तो काकाकाकीच्या नंतर तिथं जर्मनीतच सेटल झाला होता. ''

'' हो. सगळं खरं! पण आता लंबी कहानी छोटी करुन सांगते. तो आम्हांला गेस्ट लेक्चर द्यायला आला होता कॉलेजला. ''

'' म्हणजे त्यानं घरं सजवणं सोडून प्रोफेसरकी चालू केली की काय? '' गॅलरीत उभा राहून फोनवर काहीतरी बोलणार्‍या जीतनं उगाचच मध्ये खुडबूड केली.

'' तू गप रे चोच्या! रात्री कळतील सगळ्या गोष्टी तुला. आता फूट इथून. जा तुझ्या तुझ्या कामाला बघू! ''

'' नाही रे बाबा! आज आपण सुट्टीवर असतो. हा काय आताच फोन करुन सांगतितलं. ''

'' असा वागतोस ना जीत तू? मी म्हटलं तर कधी सुट्टीबिट्टी नसते तुझ्या कॅलेंडरमध्ये आणि ही बया काय आली तू लगेच सुट्टी टाकलीस ना! जा मला तुझ्याशी बोलायचंच नाही. ''

'' ठीके गं! आता तू नाही बोललीस तरी चालतंय मला. आता माझी प्य्रा आलीय ना! ''

'' ए चल चल जा इथून. मीपण नसते बोलणार तुझ्याशी. ''

'' पुन्हा संगनमत केलंस ना हिच्याशी! तू का गं सारखी माझी बाजू सोडून तिच्या बाजूनं जातीस प्रिशे? '' असं म्हणून तो बेडवर बसलेल्या प्रिशाच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला.

'' जित्या लाडात नको येऊस. हे सगळं जर का श्रीनं बघितलं ना तर परत नव्या संशयाची कहाणी जन्म घेईल. ''

'' घेईना जन्म! मी काय भितो की काय त्याला? तो तसाही अर्धवटच आहे. ''

'' अरे ए नालायका! जरा काही लाज शरम तुला? माझ्या नवर्‍याविषयी बोलतोयस तू! ''

'' होता. आता तो नवरा बिवरा काही नाहीए तुझा. ''

'' अमे! तुझ्या नवर्‍याला घेऊन जा बघू इथून. पार बहकलाय तो. आणि माझ्या भुकेसाठी काहीतरी कर बाई! मी काय याच्या चहावर राहू की काय दिवसभर? ''

'' हो. हो. बाई तुझ्या पोटातल्या कावळ्यांचा विचार केलाय मी! आपण असं करु आता तसाही जेवणासाठी उशीर झालाय. काहीतरी लाईट करेल ती. संध्याकाळी बाहेर जाऊ जेवायला. काय अमू? ''

'' ना रे बाबा! इथे कुणाला वाससुध्दा लागता कामा नये माझ्या येण्याचा कळलं ना! मी रात्री कॉल करेन तेव्हा युवीला सांगणारे की माझी गाडी आणि बुलेट दोन्ही आण म्हणून. ''

'' म्हणजे तू परत बुलेटवाली रानी झालीस? ''

'' आगं ए आमेऽऽऽ! आज काय शिजवनार हाईस का नाय गं? नायतर मी जाती बग सैपाकघरात. '' खालनं मालिनीकाकूंचा आवाज आला तशी त्या दोघांसोबतचं डिस्कशन अर्ध्यातच सोडून तिनं खाली धाव घेतली.

मांडीवर डोकं ठेवलेल्या जीतचे गालगुच्चे घेत प्रिशा म्हणाली, '' जित्या यार तुला लै मिस केला मी नालायका! '' तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तसा पटकन उठून तिला जवळ घेत तो म्हणाला, '' ए येडाबाई! तू तर माझी झाशीची राणी आहेस. अशी टिपं काय गाळतीस? आता भेटलोय की आपण. ''

मग बराच वेळ त्यांच्या पाठीला पाठ लावून तुझा झोका माझा झोका करत गप्पा रंगल्या. मधीच प्रिशानं त्याला विचारलं, '' का रे जीत आता श्री कसा दिसतो रे? ''

'' ए प्रिशे, उगीच येडा बनून पेडा खायचा धंदा करतीस होय! मला माहीतीय अमीनं तुला त्याचे फोटो पाठवले असतील मेलवर. ''

'' नाही रे! ती पाठवणार होती. त्याचा आणि नंदिताचापण. मीच तिला नको म्हणून सांगितलं. मलाच त्याचं तोंड बघायची इच्छा नव्हती. पण मी वैद्रुतीचा फोटो पाठवल्यावर तिनं अनिशचा फोटो पाठवला होता. तो मात्र मी बघितला. ''

'' असं झालं होय? मग तर तुला सांगायलाच हवंय की तू जरा जास्तच म्हातारी झालीयस गं! '' असं म्हणून त्यानं तिच्या पाठीचा आधार काढून घेतला आणि ति दणकन् गादीवर आपटली. उठली आणि तिनं जीतची पाठ धरली. त्यानं तिती चुकवले तरी दोन चार फटके त्याला पडलेच तिच्या हाताचे. मध्येच त्यानं तिचे दोन्ही हात तिनं त्याला मारु नये म्हणून पकडले आणि विचारलं, '' काय गं चांदनी देखणी आहे का गं? ''

'' काऽऽऽ? मध्येच हे काय आता? ''

'' आताच कळलं ना की तुला एक बहीण आहे म्हणून. म्हटलं एक लग्न तिच्याशीही करुनच टाकू ना! ''

'' अरे हट! मी तिच्यासाठी वेगळा प्लॅन आधीच केलाय. ''

'' म्हणजे? तूही जॉब बदललास? मॅच मेकिंग कधीपासून सुरु केलंस? ''

'' जा ना जीत! तू आल्यापासून पकवतोयस नुसता मला. ''

'' जेवायला या रे दोघंही! गप्पा मारुन पोट भरणार नाही आणि मी काही ताटं वर आणणार नाही. ''

अमूच्या आवाजानं दोघेही खाली गेले. जेऊन खाऊन अनेक वर्षांनी प्रिशा सुख अंगावर आल्यासारखी डाराडूर झोपून गेली. जीत बराच वेळ तिच्या डोक्याशेजारी बसून तिला थोपटत होता. सगळं आटपून वर आलेल्या अमूनं त्याला उठवून बाहेर गॅलरीत नेलं आणि दोघेही कलत्या एन्हाचा आनंद घेत बोलत बसले.

'' बरं झालं ही आली. थॅन्क्स अमे! तुझ्या फोनमुळं ही लगेच आली. ''

'' अरे नाही बाबा! मी काल तिला रागानं फोन, मेसेज काही केलाच नाही. हे बघ, खोट वाटतंय का तुला? '' तिनं आपला मोबाईल त्याच्यासमोर धरला. त्यानं पाहिलं तर ना तिच्या कॉललॉगवर प्राशा अपफ्रंन्ट होती ना मेसेज बॉक्सला. सहजच त्यानं मेलबॉक्स उघडला तर त्यात प्रिशाचा मेल परवाच येऊन पडला होता. ' उद्या सकाळच्या फ्लाईटने येतेय मी! '

'' तू पण ना अमू, वेंधळीच आहेस. ''

'' मी नाही तू वेंधळा आहेस. ती आल्याच्या नादात तू हे विसरुन गेलायस की हल्ली श्री आपल्याकडे रात्रीचा जेवायला येतो. आता चुकून इरु काही बोलला आणि त्याला काही कळलश तर कसं रे करायचं? ''

थोडा विचार करुन जीत म्हणाला, '' करतो याच्यावरही काहीतरी विचार मी. तू फक्त आज इरुला लवकर झोपव. मी आधी तिच्या आवडीच्या जेवणाची व्यवस्था करतो. मग रात्री आलेल्या श्रीला लवकर घरी पिटाळतो. ''

स्वरा...

1/1/2021

..........

*62*

प्रिशा जाताना सियाली आणि युवीचं ऑफिस दोघांचीही कामं जवळजवळ संपवून गेली असली तरी अजूनही शेवटचा हात देणं बाकी होतं. युवी आणि चांदनी त्यातच गुंतले होते. आणखी एक दोन-चार दिवसांत ते सियालीच्या कामाचं फायनलाईज्ड व्हर्जन तिच्या हातात सोपवणार होते. युवीला खरंतर प्रिशा असतानाच त्याच्या नव्या ऑफिसचं उद्घाटन करायचं होतं पण घडलेल्या एकंदरीत प्रकारामुळे ते शक्य नव्हतं; म्हणून प्रिशा जाताना सांगून गेली होती त्या दोघांनाही की सियालीचं काम आटोपलं की लगेच फार मोठा सोहळा न करता फक्त पुजा घालून काम सुरु करा ऑफिसात म्हणून. ती आल्यानंतर मग मोठा सोहळा करु असं आश्वासनही द्यायला ती विसरली नाही.

गेल्या दीड-दोन महीन्यांत युवराजला चांदनीचा सहवास आवडू लागला होता. तो काही जीतसारखा बोलभट्ट नव्हता की लगेच हे सगळं तिला सांगून टाकेल; ना श्रीसारखा घुमनमिट्टा की असलेलं प्रेमंही व्यक्त करता येत नाही. परिस्थिती अशी होती की त्याला स्वतःला अजून म्हणावी तशी खात्री वाटत नव्हती की हे खरंच प्रेम आहे की आपल्याला तिच्या सहवासाची सवय झालीय ते! त्याला या सगळ्यांच गोष्टींविषयी प्रिशाशी बोलायचं होतं. तिनंच तर पहिल्यांदा ' तुला आवडते का ती! ' असं म्हणून या विषयाला हात घातला होता. पण तेव्हा तो तरी काय सांगू शकणार होता त्याविषयी कारण त्यावेळी ते ओळखीच्या अगदीच पहिल्या पायरीवर तर होते. अशावेळी असं काही मनात येणं तसंही शक्यच नव्हतं. त्यातं त्याची आणि चांदची ओळख म्हणजे ना धड नाराजी ना धड आनंद अशा कुठल्यातरी अडनिड्या वळणावर झालेली. प्रिशाला मात्र या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. खरं म्हणजे तिनं जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या होत्या. म्हणजे चांदनीची आणि युवीची चुकामुक होणं तिच्या पथ्यावरंच पडलं होतं. नंतर मात्र त्याला आणायला जाण्यापासून ते अगदी सियालीच्या कामात दोघांना एकत्र गुंतवण्यापर्यंत सगळं काही प्रिशानं घडवून आणलं होतं; तेही कानूमावशी आणि कविशअंकलच्या संमतीनं.

ज्या दिवशी हा सगळा घोळ झाला त्याच्या दुसर्‍याच दिवशी तीनं मावशीला तिचा हेतू सांगितला होता.

'' माऊ, एक बात बताना। गर चांद शादी करती है तो तुम्हें खुशी होगी ना! ''

'' ये भी कोई पुछनेवाली बात है प्रिशा? मै तो चाहती हूं की मेरे चांद की शादी हो जाए; मेरा घरआंगन बच्चों की किलकारियोंसे गूंज उठे। ''

'' अरे रुको रुको! मैने तो अभी शादी की सिर्फ बात ही कही की आपने झट से आंगनबाडी भी बना ली? अंकल, आपको युवी कैसा लगता है? ''

'' देख बेटा दुनिया बहुत देखी है मैंने! एकही दिन में किसीका अंदाजा नहीं लगा सकता मै। दिखनें में तो वो भला चंगा है। पढा लिखा है, अच्छाखांसा कमा लेता है। उपर सें खुद का बिझनेस है। मेरी बेटी को खुश रख सकेगा। देखा जाऍ तो शादी करने के लिए और क्या चाहिए होता है? पर एक बात कहू बेटा? वो कहते है ना दूध का जला छांछ भी फूंक फूंककर पिता है। चांद के मामले में मेरी हालत वो है। उपर सें उसनें शादी ना करने का मन बना लिया है| उसें कैसे मनाएंगे? और चलो मान लिया की वो मान भी गई तो युवराज का भरोसा कौन देगा? ''

'' उसका भरोसा मै देती हूं। आपको मुझपें यकीन तो है ना! उसके मॉ-बाबा एक ऍक्सीडेंन्ट में गुजर गए। उनकें बाद जो था उसें बेचबाच कें बंदा जर्मनी में सेटल हो गया। इतने सालों में आज तक वो ना बदला है और नाही परदेसींयोंवाले तेवर अपनाए है उसनें। आ जाकर उसे बचपन सें जाननेवाली बस मै, अमू, काकूआई, अमू के बाबा इतनेंही लोग है। गर आप चाहों तो मै इनसे आपकी बात करवा दूंगी। लेकीन, मै चाहती हूं की चांद खुश रहे तो मै ऐसे ही उठ के शादी की बात नहीं करुंगी। उन दोनों को उनका वक्त मिलना चाहिए। फिर इसपर बात करेंगे। लेकीन मै इसमें आपकी मंजूरी ग्रान्टेंड पकड रहीं हू। अभी तो युवी उसका काम शुरु होने तक यहीं रहनेवाला है। आप उसको परख लिजिए। चाहे तो मै जर्मनीके उसके कुछ दोस्त और साथ में काम करनेवालोंके कॉन्टक्ट भी निकलवाके देती हू। लगे हाथ पूछताछ भी कर लिजीए। आखिर बेटी ब्याहनी है कोई बाजार में भेड बकरी तो नहीं बेचनी है ना! लोग तो उसमें भी आॉखो का देखा और कानों का सुना परख लेते है। ''

असं सगळं बोलून चालून तिनं त्या दोघांची परमिशन मिळवली. शिवाय हे सगळं करण्यामागे तिचे दोन हेतू होते. एक म्हणजे सियालीच्या ऑफिसचं डिझाईन युवीचं असल्यामुळे तो जितक्या सफाईदारपणे ते प्रत्यक्षात उतरवू शकला असता तितकं ते तिला आणि चांदनीला जमलं नसतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिला डोळ्यांनी दिसत होतं की एकटेपणामुळे चांद कशी कातावल्यासारखी झाली होती ते! तिला कळत होतं की चांदनीला कुणातरी अशा साथीदाराची गरज आहे जो तिला, तिच्या भावनांना, तिच्या सुख-दुःखाला समजून घेईल. तिला युवराजचा स्वभाव आधीपासून माहीत असल्यामुळे तो कॉलेजात भेटल्यापासून तिच्या डोक्यात चांदनीसाठी त्याचा विचार चालू होता.

चांदनीची अवस्था ना बोला जाए ना सहा जाए अशी होती. तिला स्वतःलाही कळत होतं की ती विनाकारणच चिडचिड करतेय पण गोष्टी आता तिच्या हातात नव्हत्या राहिलेल्या. तिचं नशीब चांगलं म्हणून विहायचं खरं रुप लग्न होण्याआधीच तिच्यासमोर आलं.

तसे दोघेही एकाच कॉलेजात शिकलेले; पण त्यांचं प्रेम मात्र झालं ती असोसिएशनमध्ये कामाला लागल्यानंतर. विहाय असोसिएशनमधल्या राजाबाबूंचा भाचा. अधूनमधून ऑफिसला त्यांच्यासोबत यायचा. त्यांची ओळखही तिथेच झाली. तेव्हा कळलं की तोही त्याच कॉलेजात शिकलाय ज्यात ती शिकलीय. त्याला खरंतर इंजिनिअरिंग करण्यात कसलाच रस नव्हता. कारण त्याच्या बापाकडे इस्टेट नसली तरी त्याच्या आईकडे राजाबाबूंसारखा श्रीमंत भाऊ तोही निपुत्रिक आणि तिच्या मुलालाच स्वतःचा वंश मानणारा भाऊ होता. अर्धं आयुष्य विहाय आपल्या मामामामीकडेच वाढलेला आणि आता तर तो कायमचा त्यांच्याकडेच आलेला होता. विहाय दिसायला अतिशय देखणा, रुबाबदार असा होता. चांदनी देखणेपणात त्याच्या तोडीस तोड असली तरी उंचीनं जरा खुजी होती. राजाबाबूंकडूनच विहायला कळलं होतं की चांदनी कानन आणि कविश गोयलची मुलगी आहे म्हणून. आणि हे कळल्यापासूनच त्यानं हेतू पुरस्सरपणे तिच्याशी संबंध वाढवले होते. आधी धुमकेतूसारखा उगवणारा विहाय आता असोसिएशनमधला ध्रुवतारा झाला होता. अनेकांना अनेक कामांसाठी मदत करुन त्यानं असोसिएशनमधल्या चांदनीचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. ऑफिसचं डेकोरेशन बदलण्याच्या हेतूनं केलेल्या बदलात त्यानं स्वतःचं डेस्क तिच्याशेजारी शिफ्ट केलं आणि तो वापरत असलेला मस्क तिच्या खास परिचयाचा झाला. हळूहळू दोघेही जवळ आले. विहाय अगदी विचारपुर्वक पावलं उचलत होता. कामानिमित्तानं सोबत उठणं, बसणं तर होतंच होतं; आता बाहेर येणं जाणं, सोबत सिनेमा पाहणं, जेवायला जाणं वगैरेही घडू लागलं. एकदोनदा घरी पोचायला उशीर झाल्यावर अम्मानं तिला कारण विचारलं. तिनं भीतभीतच तिला तिचं असोसिएशनमधल्या राजाबाबूंच्या भाच्यावर विहायवर प्रेम असल्याचा निर्वाळा दिला. तिला वाटलं होतं अम्माला हे अवडणार नाही म्हणून. पण झालं उलटंच अम्मानं तिला विहायला भेटायला घेऊन यायला सांगितलं. विहाय त्याच्या आईबाबा, मामामामीसकट डिनरला घरी आला आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोचल्या. येत्या दोन महीन्यात लग्न करायचं ठरलं म्हणून पुढच्याच आठवड्यात धुमधडाक्यात त्यांचा साखरपुडाही पार पडला. आता ते दोघेही भावी वरवधू असल्यानं त्यांना सहसा कुणी कशासाठी अडवत नव्हतं. लग्नाच्या चारच दिवस आधी विहायसोबत डिनर करुन परतलेली चांदनी तिची पर्स त्याच्या गाडीत विसरली. तिला वाटलं की दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये तो आणून देईल पण तोही विसरला आणायला. तिनं विचारल्यावर म्हणाला, ' कोई बात नहीं। घर चली जाना। वहीं रखी है। मामीसें ले लेना। मै काम के सिलसिले में बाहर जा रहा हू। ' तिला कुठे आता त्याचं घर नवीन होतं! त्यामुळे तिनं बरं म्हटलं आणि ती संध्याकाी घरी गेली. पण हाय रे कर्मा तिचं दुर्दैव तिथं वाट बघत बसलं होतं. खरंतर सैव म्हणायला हवं असं प्रिशाला सगळी हकीकत कळल्यावर वाटलं. तर ती चहा तयार होईपर्यंत वॉशरुममध्ये गेली. मात्र बाहेर येताना पलिकडच्या खोलीत मामी फोनवर जे बोलत होत्या ते तिला ऐकायला आलं.

त्या कुणालातरी म्हणण्यापेक्षा विहायच्या आईलाच समजवून सांगत होत्या.

'' अच्छा हुवा विहाय नें चांदनी को चुन लिया। अब आपकी तकलीफ थोडी कम हो जाएंगी। वो अपने मॉंबाप की इकलौती औलाद है। ऐसेमें वोही कविशजीकी अकेली वारिस होगी। देखा जाए तो जमाई बेटे जैसाही होता है तो अपना विहाय तो उनका वारिस बन गया ना! विहाय ये जानता नहीं था। उसे तो ये बात आपके भाई ने बताई। बस तभी सें वो चांदनी को नजरों में धरे बैठा है। ''

हे सगळं ऐकणार्‍या चांदनीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे हे प्रेमबिम सगळं खोटं आहे? या माणसांचं सगळं प्रेम मला मिळणार्‍या इस्टेटीवर आहे! या विचारात ती तडकाफडकी तिथून निघून आली. घरी आल्याआल्याच तिनं जाहीर करुन टाकलं की हे लग्न मोडलंय म्हणून. कानन आणि कविशला तिच्या ह्या अचानक निर्णयाचा धक्का बसला. आतापर्यंत सगळीकडे आमंत्रणही गेली होती. उद्या संगीत, आदल्या दिवशी मेहंदी आणि तिसर्‍या दिवशी लग्न असं सगळं अगदी तोंडावर आलेलं असताना ही अशी का वागतेय म्हणून विचारल्यावर तिनं मामींचं ऐकलेलं सगळं बोलणं त्यांना सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर कुठले आईबाप अशा मुलाला मुलगी देतील? ते दोघेही तिच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

दुसर्‍याच दिवशी असोसिएशनच्या ऑफिसात चांदनीनं विहायच्या चेहर्‍यावरचा बुरखा फाडून टाकून त्याला आणि त्याच्या मामाला; राजाबाबूंना सगळ्यांसमोर उघडं पाडलं.

साखरपुड्याची अंगठी त्याच्या अंगावर भिरकावत तिनं त्याला सुनावलं, '' कोई जायदाद वगैरा नहीं मिलनेवाली! ना मुझें और ना ही तुम्हें! यहीं सपना देखा था ना मुझसें शादी करनेके लिए? तो सुनो बेशरम इन्सान, मै उनकी सगी बेटी नहीं हू ना उनके जायदाद की वारिस; क्यू की उन्होंने तो वो कब की अनाथालय के नाम कर दी है। टूट गया है तुम्हांरा खुली ऑंखो सें देखा हुवा सपना समझ आया? कितने बगैरत हो की ऐसा कुछ करने सें पहले तुम्हें जरासी भी शर्म नहीं आई? मै तुम जैसे शक्स के साथ अपना नाम हर्गिज नहीं जोडना चाहती। अनाथ ही सी पर मेरी भी अपनी कुछ इज्जत है। मै तुम जैसी बेहया नहीं हू। आज, अभी इसी वक्त मै चांदनी कविश गोयल तुम्हें अपनी जिंदगी से बेदखल करती हू। चले जाओ मेरी नजरों कें सामने सें । मुझे तुम्हांरी सुरत भी नहीं देखनी। ''

तिच्या ह्या कृतीनं एकाचवेळी विहाय आणि त्याच्या कुटुंबियांचं तिच्या वाट्याची इस्टेट बळकवण्याचं मनोरथ भंगलं तर दुसरीकडे तिच्या स्वतःच्या भावनांच्या पार चिंध्या झाल्या. प्रेम ह्या शब्दावरचा, भावनेवरचा तिचा विश्वासच उडाला. तेव्हापासून तिनं प्रेम, लग.न ह्या विषयांना जणूकाही आयुष्याच्या गेटबाहेरचं उभं केलं. ती तिच्या दुःखाला आता आता कुठे सरावली होती तोवर प्रिशामुळे तिच्या त्या जखमेवरची खपली निघाली. चांदनीला लग्नाआधी प्रेमातला फोलपणा कळला तर प्रिशाच्या वाट्याला तो लग्नानंतर आला. दोघींच्या प्रसंगात जरी अंतर असलं तरी किनार एकच होती; प्रेम करुन एकटेपणा वाट्याला आल्याची! आता तर तिनं पार निश्चयच करुन टाकला की या प्रेम-बिम आणि लग्नाबिग्नाच्या वाटेकडे फिरकायचंच नाही म्हणून.

स्वरा... 

03/01/2021

...........

*63*

चांदनीला जरी तिचं आणि दी चं दुःख एकसारखंच वाटत असलं तरी त्यात एक फार मोठा फरक होता; तो हा की चांदनीप्रमाणे प्रिशाचा ना प्रेमावरचा विश्वास उडाला होता ना तिचं श्रीवरचं प्रेम कमी झालं होतं.

या अशा अग्निदिव्यातून गेलेल्या आणि एकटेपणात होरपळलेल्या चांदनीवर युवीचा जीव जडला होता. सियालीच्या कामामुळे त्याला तिचा जो काही सहवास मिळाला होता त्यामुळे तर ती त्याला आणखीन कळायला लागली होती. जशी पहिल्या दिवशीच्या भेटीत ती त्याला मारकी म्हैस वाटली होती; ती तशी नव्हतीच मुळी. आणि हे त्याा सियालीच्या कामामुळे समजलं होतं. ती फारच प्रेमळ आहे, मायेनं, काळजीनं एखाद्याला जपणारी अशी ती होती हे तिच्या सहवासात आल्यावर त्याला उलगडत गेलं आणि ती त्याला आणखीनच आपलीशी वाटायला लागली. इतकी वर्षं नाकासमोर चालत फक्त काम एके काम करणार्‍या त्याच्याजवळ एक धडधडणारं हृदयही आहे आणि त्याच्यात प्रेम नावाची अलवार भावनाही राहते याची जाणीव त्याला तिच्या सोबतीनं करुन दिली. हल्ली तर त्याच्या रात्रीच्या झोपेवरही तिच्याच आठवणींचा ताबा होता. कामाच्या ठिकाणी खुप जपायचा तो तिला. जरा काही खुट्ट म्हणून होऊ द्यायचा नाही. बरं हे सगळं चांदनीच्या लक्षात आलं नव्हतं असं मुळीच नाही पण ती समजून न समजल्याचा आव आणत होती. हळूहळू तिच्याही हृदयात त्याच्याबद्दल तरंग डठायला लागले होते. मात्र युवीसाठी उघडू पाहणार्‍या आपल्या हृदय कमळाच्या पाकळ्या ती ताकदीनं मिटवून ठेवू पाहत होती. न जाणो तोही विहायसारखाच निघाला तर? किंवा मग दी च्या बाबतीत जे काही झालं तसं काहीतरी आपल्यासोबत होईल याची कल्पनाही तरला असह्य होई. नंतर तळमळण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कुणाला येऊ न देणे हा उत्तम उपाय होता तिच्यामते.

प्रिशा जेव्हा जेव्हा चांदनीविषयी बोलत असे तेव्हा तेव्हा युवी जिवाचा कान करुन ते ऐकत असे आणि त्यातला एकेक शब्द अनमोल रत्नासारखा मनाच्या पेटीत जपून ठेवे. प्रिशाला त्याच्यात झालेला हा बदल लक्षात तर आलाच होता शिवाय एका प्रसंगानं तर मनातल्या मनात तो चांदनीच्या प्रेमात पडलाय यावर शिक्का मोर्तब करुन टाकलं. सियालीचं काम चालू असताना इन्चार्ज म्हणून ती अधेमधे देखरेखीसाठी म्हणून तिथं चक्कर मारी. अशीच एकदा ती तदथं गेली असताना तिनं पाहिलं की एका कामगाराशी बोलताना धूळ नाकातोंडात जाऊन चांदला ठसका लागला. तिचा तो ठसकल्याचा आवाज कानावर पडायचा अवकाश की जवळच लायटिंगच्या कामावर लक्ष ठेवणारा युवी वेगानं तिथं पोचला. तिच्या पाठीवरुन हात फिरवला. तिला बाजूला नेऊन खुर्चीत बसवलं तिला पाणी पाजलं. हे सगळं प्रिशा बघतेय अशी कसलीही कल्पनाच त्याला नव्हती. आणि प्रिशानंही त्याला याची अजिबात जाणीव होऊ दिली नाही. ती आल्या पावली तिथनं परत फिरली. तिला हे आठवून गालातच हसू येत होतं की कतिथ प्रेमानं तो तिला विचारत होता. ' व्हॉट हॅपन चांदनी? आर यू ऑलराईट डियर? टेक सम रेस्ट आय विल हॅन्डल द वर्क. ' बास! प्रिशाला जे हवं होतं ते हळू हळू का असेना पण प्रत्यक्षात तर येत होतं. मग तिनं पुढच्या पायरीवर पाय टाकला. टप्प्या टप्प्यानं संधी मिळेल तशी ती बोलण्याच्या ओघात त्याला चांदनीच्या स्वभावाबद्दल सांगू लागली. असेच एकदा ते दोघे चहा पीत बसले असताना तिनं अगदी सहजपणे त्याला विचारलं, '' तुझ्या लक्षात आलंय का युव्या चांदची चिडचिड हल्ली बर्‍यापैकी कमी झालीय! ''

'' इज इट? मला तर ती आता आता माहीत झालीय. मी काय बोलणार ना त्याविषयी! '' त्यानं आपलं मत व्यक्त करणं टाळलं.

तशी उगाचच आपलंच चुकलं असल्यासारखी ती म्हणाली, '' हं! तेही खरंच आहे म्हणा. पण तुला खरंच सांगतेय मी, तिची चिडचिड खूपच कमी झालीय. कदाचित तुझ्या सहवासाचा परिणाम असेल. तसा तू कॉलेजपासूनच कुल गाय आहेस ना! पण विहायच्या प्रकरणापासून... ''

तिला पुढे बोलू न देता युवराजनं पटकन/ विचारलं, '' विहाय? हू इज धिस? त्याचा चांदनीशी काय संबंध? ''

प्रिशाला असं तसं कसंही करुन ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोचवायचीच होती. तरीही, थोडं चाचरत ती म्हणाली, '' सॉरी. बाय मिस्टेक बोलले मी. खरंतर तिला हे नाही आवडणार पण आता विषय निघालाच आहे तर सांगते. विहायशी तिचा साखरपुडा झाला होता. पण जेव्हा तिला कळलं की त्याला तिच्यात कमी तिला मिळणार्‍या इस्टेटीत जास्त रस आहे तेव्हा तिनं स्वतःच तो मोडून टाकला. आणि तेव्हापासूनच ठरवून टाकलं की यापुढे प्रेमाबिमात पडायचं नाही. '' हे सगळं सांगताना प्रिशा त्याच्या चेहर्‍यावरच्या बदलणार्‍या रेषांचा अंदाज घेत होती.

'' ओह! म्हणजे माझं काही खरं नाही. '' तो स्वतःशीच पुटपुटला.

'' काही म्हणालास का तू? '' जाणून बुजून लक्ष नसल्याचा आव आणत तिनं विचारलं.

'' सॉरी! मी? मी नाही काही म्हणालो. ' त्यानं ओठांवर आलेले शब्द गिळून टाकले.

बरं प्रिशा काही फक्त युवराजचा अंदाज घेत होती अशातला भाग नाही तर कधी वैद्रुती, कधी माऊ, तर कधी काकांच्या आडून ती चांदचाही अंदाज घेत होती. मध्येच ती वैद्रुला मावशीकडे झोपायला जायला सांगे. पोट्टी आईच्या दोन पावलं पुढची. ती गोष्ट सांगण्याचा हट्ट धरुन मावशीच्या मांडीवर बसे आणि अर्ध्या गोष्टीपर्यंत तिथंच झोपून जाई. मग तिच्या निमित्तने प्रिशा चांदनीच्या रुममध्ये जाई, गप्पा मारण्याचं निमित्त काढून तिथंच झोपे. गप्पा मारताना या ना त्या निमित्ताने त्यांचाविषय युवीवर आणे आणि तिच्या प्रतिक्रिया आजमावून बघे. आता तर तिची खात्री पटत चालली होती की ही प्रेमाची आग हळू हळू दोघांनाही वेढायला लागलीय म्हणून. तिनं मनाशी ठरवून टाकलं की सियालीचं काम संपलं की या दोघांचा विषय ऐरणीवर आणायचा आणि मिटवून टाकायचा. अगदी असंच काहीतरी युवराजनंपण मनाशी ठरवलं होतं. ते जत्रेला गेले होते, त्या दिवशी चांदनी चक्कर येऊन पडली म्हणून तिला तिच्या रुममध्ये झोपवून बाहेर येऊन गॅलरीच्या कठड्याशी टेकून सिगरेटशी चाळा करत तो मनातल्या मनात प्रिशाशी काय बोलायचं? कसं बोलायचं? कुठून सुरुवात करायची? या सगळ्याची तालीम करत होता. नेमकी स्टडीमध्ये निघालेली प्रिशा त्याच्या हाताला सापडली. तिनं स्टडीमध्ये बसू म्हटल्यावर त्याला आंधळा मागतो एक देव देतो दोन असं वाटलं. मनोमन त्यानं निश्चय केला की या विषयावर आजच तिच्याशी स्पष्टपणे बोलून घ्यायचं. पण तिनं अमूच्या मेल बघण्यासाठी म्हणून मेलबॉक्स ओपन केला आणि त्यानं ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनातच राहून गेल्या. 

स्वरा... 

04/01/2021...

..........

*64*

प्रिशाला येऊन दोनेक दिवस झाले होते. श्रीच्या लक्षात आलं होतं की हल्ली इरवन रात्रीचा लवकर झोपतो. त्यानं विचारल्यावर अमू म्हणाली होती की दमतो ना रे तो दिवसभर मस्ती करुन; मग जेवेपर्यंत धीर धरवत नाही त्याला आणि ताटावरच डुलक्या काढायला लागतो. म्हणून मग जरा लवकरच भरवते त्याला. ही अर्धसत्य असणारी पण फक्त आणि फक्त श्रीनं विश्वास ठेवावा म्हणून अमूनं मारलेली थाप होती. खरं कारणं त्याच्यापासून प्रिशाचं येणं लपवणं हेच होतं. कारण इरु आणि अनु दोघेही तिच्यासोबत इतके रंगले होते की अमूच्या मानेवर सतत ही पोरं कुठंतरी काहीतरी पचकतील याची तलवार लटकलेली असे. प्रिशा आल्यापासून पोरांना आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांचा विसर पडला होता जसा काही. अनु तर घरी जायचं नावं काढायला मागत नव्हता. त्यात ही पस्तिशी ओलांडलेली घोडी काही कमी अवखळ होती अशातला भाग नव्हता. उलट ती तर या दोघांच्या सोबतीनं मिळून वरच्या मजल्यावर नुसताच धिंगाणा न घालता सगळ्या खोल्यांमध्ये पसारा करुन ठेवून अमूचं काम वाढवून ठेवी. अमू तर दोनंच दिवसांत हिच्या ह्या उपदव्यापाला कंटाळली होती.

'' ए घोडे! अगं आता चाळीशी जवळ यायला लागलीय गं! अजून कसले धिंगाणे घालतेस? त्या पोरांनी घातला तर घालू दे. लहान आहेत ती! त्यांना हे सगळं माफ असतं. पण तू हे सगळं आवरायचं सोडून त्यांच्यातली एक काय होऊन जातेस? माझ्यामागे काय कमी कामं आहेत का म्हणून या नसत्या उठाठेवी वाढवून ठेवतेस? ''

'' ममा, आप हमारे बीच मत आओ। हम मौसी के साथ ही खेलेंगे। '' इरवनच्या तोंडून हे हिंदी ऐकून अमू गारच पडली. दोनच दिवसांत प्रिशानं पोरांना चांगलंच तयार केलं होतं हिंदी बोलण्यात.

'' ए बाई! उपकार कर माझ्यावर आणि जरा मराठीत बोल बाई मराठीत बोल. '' अमूनं तिच्यापुढे हात जोडले. '' ह्या दिवट्यानं चुकून श्रीसमोर हे असलं हिंदी पाजळलं तर उगाच मला झाकलेल्या कोंबडीनं अंडं कसं दिलं याचं स्पष्टीकरण देताना नाकी नऊ येतील. आधीच तुला लपवताना दे माय धरणी ठाय होतंय मला. ''

'' डोन्ट वर अमू डार्लिंग! काळजी नको करुस तू. पुढच्या आठवड्याभरात युव्या आणि चांदनी आले की मी शिफ्ट होईन दुसरीकडे. जीत्या इथेच जवळ कुठंतरी फ्लॅट शोधतो म्हणाला मला. ''

'' काय? हे कधी ठरलं? आणि यातलं काही मला का नाही सांगितलंत तुम्ही दोघांनी? सगळं आपल्या आपल्यातच ठरवणार का तुम्ही? मी काय फक्त पणतीची देवळी की काय मग? ''

'' ए अमे, चिडतीस काय गं अशी? ''

'' गेली खड्ड्यात अमू. जर इथून कुठं गेलीस ना तर याद राख. मी आहे आणि तू आहे. नाय तुझं तंगडं मोडून हातात दिलं ना तर नावाची अमेया जैतकर नाही मी! '' अमेया रागारागानं तिथंनं खाली आली. येताना जिन्यातून स्वतःशीच बडबडत होती. '' येऊ दे जीतला! बघतेच त्याला. चांगली झाडू घेऊनच समाचार घेते त्याचा. एका शब्दानं मला खबर लागू देत नाही म्हणजे काय? ''

'' अमे अगं ऐक की मला श्रीसोबत पुढचं सगळं जुळवून आणायचं तर हे सगळं करायला हवं गं! समजून घे ना डिअर. ''

अमूला ऐकू जाईल अशा आवाजात प्रिशा बोलली खरी पण ते अमूच्या कानांवर पडण्याऐवजी तिथंच खेळणार्‍या अनिशच्या कानांनी बरोब्बर टिपलं. अगदी निरागसपणे त्यानं तिला विचारलं, '' म्हणजे मौसी माझ्या पप्पासोबत? तुला काय करायचंय त्याच्यासोबत? ''

'' आं!... नाही... काही नाही... म्हणजे... ते आपलं हे... आपलं... तू.. तू इरुसोबत खेळ ना! मी नंतर तुला एक गंमत दाखवते. असं म्हणून तात्पुरती तिनं त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. तसंही त्याच्या प्रश्नाचं त्याला समजेल असं उत्तर नव्हतंच तिच्याकडे.

श्री सकाळी स्वतःचा चहा स्वतःच करु घ्यायला लागला होता हल्ली. हल्ली म्हणजे नंदिता गेल्यापासून. नाहीतर ती असताना, प्रिशा असताना त्याचा सकाळचा चहा आयता हातात पडत होता त्याच्या. दुपारी तो ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवायचा. अमूनं त्याच्यासमोर डब्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यानं स्वतःच तो नाकारला. कारण त्याचं त्याला माहीत. रात्री मात्र तो जेवायला येतो म्हणाला. नंदिता गेल्यावर त्यानं अनिशला पाळणाघरात ठेवण्याची तयारी केली होती. जशी ही गोष्ट जीत आणि अमूला त्यानं बोलून दाखवली तसे ते दोघेही त्याच्यावर चांगलेच उखडले.

'' का रे निंबाळकर, तुला हे सांगताना, बोलताना काहीच कसं वाटलं नाही? त्या एवढ्याशा जीवाला पाळणाघरात ठेवणारेस तू? आईविना पोराला पैसे घेऊन जेमतेम पोसणार्‍या दाईच्या हातात सोपवणारेस का? आम्ही कोण आहोत मग? आम्हांला काय त्याच्यासाठी वेगळं किराणा सामान भरायला लागणारे का? तो काय आम्हांला जड आहे का सांभाळायला? बाप आहेस का कोण आहेस तू? '' इतक्या वर्षांनी श्रीनं पुन्हा एकदा अमूचा दुर्गावतार पाहिला. पण तिनं चंडी अवतार धारण करायच्या आधीच जीतनं मध्येच हस्तक्षेप करुन प्रकरणं होतं तिथं मिटवून टाकलं.

'' हे बघ श्री. अमू म्हणतेय त्यात काही चुकीचं नाहीए. तुला समजलंय ना की आम्हांला दोघांनाही तुझा हा प्रस्ताव मान्य नाही म्हणून? मग ठीक आहे. तू बिनधास्त ऑफिसला जा. अनु राहिलं इथं. रात्री जेवायला येशील तेव्हा नेत जा सोबत त्याला. ''

श्रीनं ते मान्य करुन टाकलं गपचुप. आताही तो जेवल्यानंतर अनिशला सोबत घेऊन जायला म्हणून जिना चढायला लागला आणि जीत-अमूच्या काळजात लकलकलं. दोघांनाही सुचेना काय करावं ते! कारण तो वर चालला होता तेव्हा प्रिशा अनुला थोपटून झोपवत होती. ती स्वतःशीच गुणगुणत अनुच्या डोक्यावर थोपटत होती इतक्यात जिन्यात पावलं वाजली. ती काही बोलणार तोच कुठून तरी बळ उसनं आणून अमू मोठ्या आवाजात म्हणाली, '' श्री जाऊ दे ना! झोपलाय रे तो. नको नेऊस आजचा दिवस. ''

तिचा आवाज ऐकला आणि प्रिशा झटकन् उठून बाथरुममध्ये शिरली. ती आत शिरली तोच श्री दारातून आत आला आणि त्यानं झोपलेल्या अनिशला उचलून घेतलं. तिला जेमतेम दार ढकलण्याची संधी मिळाली. तिचा जीव वरखाली होत होता. अनिशला उचलून बाहेर निघालेल्या श्रीला दारापर्यंत गेल्यावर शंका आली की बहुतेक बाथरुमचं दार उघडं आहे. तो गेलाय या समजूतीत प्रिशा बाहेर येण्याच्या तयारीत असतानाच त्यानं परत येऊन बाथरुमचं दार ओढून घेतलं आणि कडी लावून तो निघून गेला. खाली दोघांचाही वर काय झालं असेल काय नाही या विचारानी पार बोजवारा उडाला होता. पण श्री शांतपणे अनिशला घेऊन खाली येताना पाहून दोघांनीही निश्वास सोडला. तो खाली आला आणि अमूला म्हणला, '' अमू अगं पोरं वर असताना बाथरुमचं दार उघडं ठेवतं का कुणी? जरा लक्ष दे. आपली दोन्ही कार्टी काही शहाणी नाहीत. मी आलोय आता कडी लावून. ''

त्याचं ते बोलणं ऐकणार्‍या जीतला एकदम ठसकाच लागला.

'' अरे कशाला घाई करतोयस एवढी? आरामात जेव ना! जा गं अमू बघ त्याला पाणीबिणी दे. येतो मी. '' असं म्हणून तो निघून गेला.

जीतनं अंदाज लावला होता की ज्याअर्थी हा इतका शांतपणे खाली आला त्याअर्थी प्रिशा गॅलरीत लपली असणार. पण तो जेव्हा बाथरुमचा दरवाजा उघडा असण्याबद्दल बोलला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गडबडीत प्रिशा बाथरुममध्ये घुसली असणार आणि ह्यानं तिला आत बंद करुन ठेवलीय.

अमूनं त्याला पाण्याचा ग्लास पुढे केला तसा तो म्हणाला, '' कसला आरामात जेवतोय मी! आधी जा आणि बाथरुमचं दार उघड. ह्यानं प्रिशाला बंद केलीय वाटतं आत. ''

'' मी नाही उघडणार. राहू दे त्या म्हशीला थोडावेळ आतच. दुपारी मला म्हणाली मी दुसरीकडे रहायला जाणार आहे. आता जा म्हणावं. उघडतच नाही कडी. बघतेच कशी जातेस ती. ''

'' अगं अमू असं काय करतेस? तिला जावंच लागेल नाहीतर आपल्याला फार कसरत करावी लागेल. ''

'' हे तू बोलतोयस की तिनं पढवलंय तुला. तू तिच्या नादानं करच काही मग बघतेच तुला मी. ''

तोवर वरुन बारिक आवाजात प्रिशाची ओरड सुरु झाली होती दार उघडण्यासाठी. उरलेले दोन घास खाऊन हात धुवून जीत पटकन् वर गेला. त्यानं हसतंच दार उघडलं.

'' काय मजा आली ना आत? ''

'' गप बस. दात नंतर काढ नालायका! आलेच मी कपडे बदलून. वास येतो कपड्यांना बाथरुममधला. ''

ती कपडे बदलायला गेली तोवर तिला आवडणार्‍या व्हॅनिला आईस्क्रिमचे वाडगे घेऊन अमू वर आली. कपडे बदलून आलेल्या प्रिशाला ते आईस्क्रिम बघून इतका आनंद झाला की ती थॅन्क्यू, थॅन्क्यू करत जीतच्या गळ्यात पडली.

'' काय लोचट आहे पोट्टी! नुसती संधीची वाट बघत असते. जरा काही झालं की सारखी आपली येऊन माझ्या नवर्‍याच्या नुसती गळ्यात पडते. '' असं म्हणून अमूनं तिला धपाटा घातला.

त्याच्या बदल्यात लगेच तिला रट्टा मारुन फिट्टम् फाट करत प्रिशा म्हणाली, '' जा गं! म्हणे माझा नवरा. तो आधी माझा मित्र आहे मग तुझा नवरा. ''

त्या दोघींचं परत खोटंखोटं भांडण सुरु झालं की बोलणं राहून जायचं म्हणून जीत मध्येच बोलला, '' मघाशी श्रीनं नक्की तुला पाहिलं नाही ना? ''

'' नाही बघितलं. हिनं जर हाक मारली नसती तर मात्र नक्की बघितलं असतं. ''

'' हुश्श्! वाचलो बाबा! ''

'' कसले वाचलो? गधडा मला बाथरुममध्ये बंद करुन गेला. ''

'' ए गप्प बसा रे! तुम्ही दोघंपण असे आहात ना! महत्वाची गोष्ट सोडून गापगप्पा मारण्यात दिवस जातो तुमचा. माई म्हणायची ते बरोबरच होतं ' दिवस गेला रेटारेटी न् चांदण्यानं कापूस काती!' ''

'' झालं तुला तर आमचे वाभाडे काढायची संधी मिळाली की पुरे. जरा थांब. जीत मला आधी सांग माझ्या कामाचं काय केलंस तू? ''

'' होऊन जाईल दोन दिवसांत. इथं जवळचा फ्लॅट बघून कळवतो म्हणाला एजंट माझा. ''

'' अरे फ्लॅटचं नाही रे! जुन्या ऑफिसचं? ''

'' अच्छा ते होय. ते श्रीनं तसंच बंद ठेवलंय गं! ''

'' चला चांगलं झालं. आपली सोय झाली. ''

'' सोय नाही; गैरसोय म्हण. तिथं जायचं तर चार माणसं सोबत घेऊन जावी लागतील साफसफाई करायला. ''

'' अरे मग जाऊया की. तसंही आपल्याला इतक्या वर्षांची सफाईच तर करायचीय ना! ''

'' अगं पण मी श्रीला काय सांगू? ''

'' ते तुझं तू बघ. आपण परवा तिकडं जातोय हे फायनल आहे आणि मी झोपायला चालले. गुड नाईट बोथ ऑफ यू. ''

असं म्हणून इरुला उचलून ती वाटेला लागली.

स्वरा... 

05/01/2021

..........

*65*

'' ए अरे अशी काय ही! इरवनला का घेऊन गेली ही सोबत? '' दाराशी उभी राहून तिला बघणार्‍या अमूनं जीतला विचारलं.

मागून येऊन तिच्या कमरेला विळखा घालत त्यानं तिच्या उघड्या पाठीवर ओठ टेकले आणि ती नखशिखान्त शहारली. त्यानं तशीच तिला थोडीशी मागे खेचली आणि हलक्या हातने दार लावून घेतलं. अमू असमंजसामध्ये त्याच्या मिठीत अडकलेली. तिला आपल्याकडे वळवून दुसर्‍या हातानं त्यानं तिचे केस मोकळे केले. दोन्ही हातांवर तिला उचलून घेत तो म्हणाला, '' कारण आज मला तुझी सोबत हवीय. ''

गालांत हसत तिनं विचारलं, '' म्हणजे? रोज नसते का मी तुझ्या सोबत? ''

तिला बेडवर ठेऊन तिच्या हाताच्या बोटांवरुन ओठ फिरवत ते कानांपर्यंत आणून तो कुजबुजला, '' असतेस ना! पण तीच्यात माझ्या घरच्यांची सून, इरुची आई जास्त असते. आज माझी जुनी प्रेयसी हो ना! '' असं म्हणत कुजबुजतानाच त्यानं हलकेच तिच्या कानाचा चावा घेतला.

अनेक वर्षांनी ती अंगांगातून मोहरत होती. इतक्या वर्षांत ते जवळ आले नाहीत असं नाही पण गेल्या अनेक वर्षांत ती एक सवयीची प्रक्रिया होऊन बसली होती. मध्यंतरीच्या काळात श्री-प्रिशाचं असं झालं याचा अमूला तर धक्का बसलाच होता पण जीतला तिच्यापेक्षा जास्त धक्का बसला होता. एखादा घाव जिव्हारी लागला की तो भरायला त्याचा त्याचा वेळ द्यावाच लागतो. पण अमूला माहीत होतं की जीतचा घाव भरुन काढणं प्रिशाच्याच असण्यात किंवा नसण्यात आहे. मात्र तिला येणार्‍या काळाची कल्पनाच नसल्यानं तिनं जे चालू होतं ते तसंच चालू राहू दिलं. आज मात्र ती त्या जुन्या जीतला अनुभवत होती. जो कधी तिचा प्रियकर होता. तिच्या सर्वांगावरुन त्याचा तो अदूर स्पर्श एखाद्या तलम पिसासारखा फिरत होता आणि ती पिपासा असल्याप्रमाणे तो स्पर्श, तो क्षण सारं काही पिऊन टाकत होती.

इथे यांचा वसंत पुन्हा एकदा बहरावर आला होता आणि तिकडचा शिशिर मात्र अजूनही पानगळीतच हरवला होता. जाणूनबुजून श्री अनिशला घेऊन गेला होता. नंदिता गेल्यापासून तर ते घर त्याला खायला उठत होतं. आतातर सदाकाकापण तिथं राहत नव्हते. अनिशचा बराचसा वेळ इरवनसोबत जाई. त्याला खूपदा परत जायचंच नसायचं. बळजबरी घेऊन जावं तर रात्रभर नुसता रडून धुमाकूळ घाली. मग तो त्याला इच्छा असली तरी परत आणत नसे. त्याची रात्र मात्र सरता सरत नसे. एका बाजूला नंदिताची आठवण पुसली जात नव्हती. दुसरीकडे प्रिशा अजूनही मनाच्या एका कोपर्‍यात तशीच होती. मग अशावेळी तो अनीशच्या झोपी जाण्याची वाट बघे. त्याला नंदितानं रोज रात्री झोपताना गोष्ट ऐकायची सवय लावली होती. त्यामुळे तो आताही झोपताना गोष्ट ऐकण्याचा हट्ट धरी. मग जमेल तसा प्रयत्न करुन तो त्याला गोष्ट सांगून झोपवत असे. आजही त्यानं अनिशला उचलून आणलं. त्याला बेडवर झोपवलं. अंगावर पांघरुण घातलं आणि प्रेमानं त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत उशीला टेकून तो विचार करत बसला. त्याची झोप तर प्रिशा गेली तेव्हाच तिच्यासोबत निघून गेली होती. आता ती कुठून यायला? तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता.

' काय हवंय श्री तुला? काय करुन घेतलंयस तू स्वतःच्या आयुष्याचं हे? काय हवं होतं नेमकं तुला तेव्हा आणि आतातरी नेमकं काय हवं आहे हे माहीत आहे का तुला? प्रिशा जवळ होती तेव्हा तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं. उलटं जीत आणि तिच्या निर्मळ नात्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंस तू! जीतनं तिला शोधण्यासाठी जसं आकाशपाताळ एक केलं; तसं आपण का करु शकलो नाही? कशात अडकलो होतो आपण? नंदिताशी का आणि कसे सूर जुळले आपले? जुळले तरी प्रिशाला विसरुन तिच्याशी लग्न कसं केलं आपण? खरंतर तिच्यातही प्रिशालाच शोधत राहिलो ना आपण? आणि तिच्यासमोर मात्र प्रिशाचं नाव घेणंही टाळत राहिलो आपण! तरीही तिला कळलंच होतं की आपण तिच्यात प्रिशाला शोधलं म्हणून! म्हणूनच असेल कदाचित जाताना कळकळीनं सांगून गेली की प्रिशाला शोधा म्हणून! मलाच प्रेम करायला जमलं नाही; ना प्रिशावर ना तिच्यावर! नंदा गेल्यानंतर मात्र सगळंच कसं रिकामं रिकामं भकास होऊन गेलंय. काय करावं? नंदा जाताना म्हणाली तशी तिची शेवटची इच्छा समजून तरी आपण प्रिशाला पुन्हा शोधायला सुरुवात करावी का? तिला शोधून काढू, तिची माफी मागू, पण ती खरंच आपल्याला माफ करेल का? काय करु मी? प्रिशाऽऽऽ! प्रिशाऽऽऽ! तू कुठे आहेस प्रिशा? प्लीज परत ये प्रिशा. मी तुझ्याशिवाय नाहीच जगू शकत गं! '

'' काय निंबाळकर! मला आठवताय? ''

तो चमकलाच त्या आवाजाने. हा, हा तर प्रिशाचा आवाज. आपल्या इतक्या जवळून येतोय? त्यानं झटकन् डोळे उघडले.

'' काय? मलाच हाक मारलीस ना आता? '' तिनं पुन्हा त्याला विचारलं.

'' तू इथे? ''

'' का? यायला नको होतं का? पण यावं लागलं मला निंबाळकर. तू माझी एवढी आठवण काढतोयस म्हटल्यावर मला येणं भाग होतं. ''

'' इतक्या वर्षांनी? ''

'' हं! इतक्या वर्षांनी. कारण इतकी वर्षं तू मला फक्त तुझ्या आठवणीत जिवंत ठेवलीस. आठव बरं! एखादा तरी असा क्षण आठवतोय का तुला की ज्यावेळी तू माझ्या परत येण्याची इच्छा केलीस? मग मी तुझ्या त्या आठवणींमधून इथं का परत यायला हवं होतं? ''

'' मग आता तरी तू का आलीयेस? एकट्यानं जगायची सवय करुन घेतोय मी. नको येऊस तू! जा परत. जिथून आलीस त्या आठवणींमध्ये परत जा. ''

'' असं नाही चालणार निंबाळकर! सगळ्या गोष्टी तू म्हणशील तशा नाही होणार नेहमीच! प्रेम काही तू एकट्यानं केलं नव्हतंस. ते मीही केलं होतं. ते तुझ्यावर नंदितानेही केलं होतं. पण अनुसाठी तिचा विश्वास तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर होता. तुझ्यासाठी नक्कीच नाही. मी माझ्या अनुसाठी परत येणार आहे. मी माझ्या प्रेमाची परिक्षा दिलीय. आता तुझ्या प्रेमाची परिक्षा आहे. तुला जर वाटत असेल की मी तुझ्यासाठी परत यावं तर शोध मला. ''

अनुच्या डोक्यावरुन हात फिरवत ती म्हणाली, '' अनु, मी येते हं बेटा! लवकरच येतेय. ''

'' प्रिशा! प्रिशा! ए अगं ऐक ना! प्रिशाऽऽऽ '' आणि तो जागा झाला.

चांदनी आणि युवराज गप्पा मारत गच्चीत बसले होते.

'' क्या लगता है तुम्हें? दी क्या करेगी अब? ''

'' डोन्ट नो डिअर! मै कभी उसका ठीक ठीक अंदाजा नहीं लगा पाया। उसका करेक्ट अंदाजा आजतक बस एकही बंदा लगा पाया है; जीत। ''

'' ऐसा है क्या आखिर उनकी दोस्ती में? ''

'' नहीं बता सकता। बिल्कुल नहीं बता सकता। पहले झगडे, ऐसे झगडे की एक दुसरे की जान ही ले लेंगे। फिर दोस्त बनें, ऐसे दोस्त बने की अब एक दुसरे के बगैरे जी नहीं सकते। न जाने क्या है? कैसी उनकी दोस्ती है! ''

म्हणता म्हणता त्यांच्या गप्पा रंगल्या त्या पार युवराजनं अजून प्रेम किंवा लग्न कसं केलं नाही याच्यावर घसरल्या. पण त्यानं सगळा किस्सा सांगे सांगेपर्यंत चांदनीची गाडी घाट उतरायला लागली होती हळू हळू. तिथेच खुर्चीत बसल्या बसल्या आपल्या अंगावरची शाल तिच्या अंगावर लपेटून तिच्या कपाळावर कळेल न कळेलसा किस करुन युवी पुटपुटला, '' बी माईन डिअर! इच लायबे डिच्! आय लव्ह यू! ''

स्वरा...

 09/01/2021

..........

*66*

आज सकाळपासून अमू छान मूडमध्ये होती. आणि का नसणार म्हणा! आजकाल प्रिशा आल्यापासून तिला तिचा प्रियकर पुन्हा भेटला होता. नाश्ता करायला प्रिशा खाली येत नसे कारण त्यावेळी श्री अनिशला सोडायला येण्याची दाट शक्यता असे. तसा मुडात असला की अनिश आपला आपण येत असे. आजही तो अनिशला घेऊन आला. अवघ्या अर्ध्या-एक मिनिटाच्या या घरापासून त्या घरापर्यंत पोचण्याच्या वाटेवर अनिश अखंड हिंदीत काहीतरी स्वतःशीच बडबडत होता. घरात आल्या आल्या तो किचनमध्ये काम करणार्‍या अमूकडे गेला.

'' काकीमावशी ती दुसरी मावशी आली का गं? ''

हा प्रश्न हॉलमध्ये नाश्ता करत बसलेल्या जीतनं ऐकला आणि त्याला पुन्हा ठसका लागला.

'' काय रे काय झालं? घे पाणी पी. '' असं म्हणून श्रीनं पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडाला लावला. त्याचा ठसका ऐकून किचनमधून नॅपकीनला हात पुसत आलेली अमू , '' आजकाल तुझं ठसका लागयचं प्रमाण वाढलंय हां जीत! '' असं म्हणून पुन्हा किचनमध्ये गेली. तिनं खुणेनंच अनुला गप्प रहायला सांगितलं आणि वर इरवनसोबत खेळायला पिटाळलं. आता श्रीनं काही विचारु दे नको अशी प्रिर्थना करायच्या आधीच तिच्या कानांवर श्रीचा प्रश्न पडलाच.

'' काय गं, हा कुठल्या दुसर्‍या मावशीची चौकशी करत होता? ''

'' अरे कुणी नाही रे! आमच्याकडे धुण्याभांड्याला नवीन मावशी येणारेत ना! तो त्यांच्याबद्दलच विचारत होता. काल मी इरुला सांगत होते ना की कपडे जरा कमी घाण कर. नव्या मावशी येणारेत त्या तुझे कपडे बघून ओरडतील तुला. धुणार नाहीत तुझे कपडे. खराब कपडे अंगावर घालशील का तू? त्याच्या लक्षात राहिलं असेल ते! ''

' वा अमू वा! चांगल्या थापा मारतेस की! ' जीतनं मनातच तिची पाठ थोपटून घेतली.

आता ह्याच्या प्रश्नांपासून पिच्छा सुटेल असं वाटत असतानाच तिच्यासाठी श्रीचा पुढचा प्रश्न तयारच होता.

'' पण काय गं आजकाल मोठ्या गटात काही ऍक्टीव्हिटी चालू आहेत का? ''

नाही रे! का? काय झालं? '' अमू अगदी सहज म्हणाली. तिला कुठं माहीत की तिच्या मानेवरची टांगती तलवार खाली सरकायच्या बेतात आलीय म्हणून.

'' अगं काही नाही गं! हा अनु सकाळपासून स्वतःशीच कसलीतरी हिंदी वाक्य पुटपुटतोय ना! म्हणून तुला विचारलं. त्याला विचारलं तर पठ्या म्हणे आपको नहीं बताऊंगा। ''

अमूनं कपाळावर हात मारुन घेतला.

'' अरे, असेल काहीतरी मुलांमलांचं. तू कशाला एवढा सिरियस होतोस? आज गेले ना सोडायला दोघांना की विचारेन मी. ''

'' बरं ठीक आहे. मी येतो. '' असं म्हणून श्री जायला उठतच होता तितक्यात जीतनं त्याला थांबवलं.

'' श्री अरे एक काम होतं तुझ्याकडे. ''

जाण्यासाठी उठलेला श्री पुन्हा खाली बसला.

'' बोल ना! ''

'' अरे, ते मी ना एक नवीन डिल करतोय. तर आता माझ्यासोबत एक पार्टनरपण असणार आहे. ''

'' हां मग? ''

'' मग! अं! ते... ''

'' हां बोल काय झालं? काय चाललंय तुझं नक्की? काय हवंय ते स्पष्ट बोल ना! ''

'' नाही म्हणजे मला विचारायचं होतं की तू जुनं ऑफिस कुणाला विकलंस का? ''

'' एवढंच! ते अजून तसंच आहे. का? ''

'' बघ म्हणजे जर तुझी काही हरकत नसेल तर मी ते माझ्या पार्टनरसाठी वापरु का? नाही म्हणलास तरी चालेल.मला तसंही नवीन शोधावंच लागणार आहे. ''

'' असा काय करतोयस जीत! वेडा आहेस का तू? आपलं एक ऑफिस असताना दुसरं का शोधतोस तू? वापर ना तू ते बेलाशक. आणि त्यासाठी माझी परवानगी कशाला हवीय तुला? ''

'' थॅन्क्स मित्रा! ''

'' कसले थॅन्क्स न काय घेऊन बसलास? तुझाही हक्क आहेच की त्याच्यावर. बरं चल. मला उशीर होतोय मी निघतो. '' असं म्हणून तो उठून वाटेला लागला, पण दारात जाऊन तो थबकला. मागे वळला आणि जीतला म्हणाला, '' ए जीत पण तुला ते साफ करुन घ्यावं लागेल हं! ''

'' हो हो नक्की. घेतो साफ करुन. तू नको काळजी करुस. ''

श्री निघून गेल्यावर किचनमधून बाहेर आलेल्या अमूनं त्याला विचारलं, '' काय रे! जुन्या ऑफिसची साफसफाई तर करणार होतात तुम्ही दोघे. मग त्यासाठी श्रीची परवानगी कशाला हवी होती तुला? ''

'' काही नाही. मला त्याचा स्वभाव माहीत आहे. सेफर साईडसाठी म्हणून घेतली परवानगी एवढंच. ''

'' प्रिशेऽऽऽऽ! ए प्य्राऽऽऽऽ! '' त्यानं बसल्या जागेवरुनच तिच्या नावाचा कोर्टात हाजिर हो चा करतात तसा पुकारा केला.

पोरांसोबत खेळण्यात रमलेल्या प्रिशानं अनुला पाठीवरुन न उतरता तसंच त्याला ओरडून विचारलं, '' क्या हुवा डार्लिंग? क्यू डंका पिट रहा है मेरे नाम का? ''

आता जीत उठला जिन्याच्या टोकाशी येऊन उभा राहिला आणि म्हणाला, '' अगं आटप की बाई लवकर. आपल्याला आज जुन्या ऑफिसला जायचंय ना! ''

'' हां रे! आलेच. ' दोन्ही पोरांना बाबापुता करुन त्यांची समजूत काढून प्रिशा खाली आली.

अमू कंबरेवर हात ठेऊन उभीच होती समोर. प्रिशानं भुवया उडवत इशार्‍यानंच तिला काय झालं म्हणून विचारलं.

'' आणखी पाजळ तुझं हिंदी. एक शब्द ऐकू नकोस माझा सांगितलेला. नशीब तुझं मी होते म्हणून नाहीतर आज श्रीसमोर तुझी पोतडी उघडीच पडणार होती. ''

'' हां! हां! खरंय. मला आजच कळलं माझी बायको बेमालूम थापा मारु शकते. ''

तिनं नुसतेच डोळे वटारुन त्याच्याकडे पाहिलं आणि जीत मुकाट गाडी काढायला निघून गेला.

'' आलीस तेव्हाच सांगितलं होतं ना की त्या पोरट्यांसमोर तुझी हिंदीची पटर पटर नको करुस म्हणून. पण ऐकतो कोण ना! अमू बोलते, बोलू दे तिला. तिचं मनावर घेतो कोण. ''

'' झालं काय ते तरी सांगशील की नुसतीच मला शेणावरुन ओढणारेस? ''

'' अनु आज हिंदीत काहीतरी बडबडत होता म्हणून श्रीनं माझ्याकडे चौकशी केली. कशीतरी आजची वेळ मारुन नेलीय मी. रोज रोज नवे बहाणे कुठून आणू शोधून? तुम्ही उचापत्या करा आणि मी आहे निस्तरायला. '' तणतणत अमू पुन्हा किचनमध्ये गेली. तर तिच्या मागेमागे किचनमध्ये आलेल्या प्रिशानं फ्रिज उघडला, त्यातनं बर्फाचा ट्रे काढला आणि तो अख्खा ट्रे अमूच्या डोक्यावर रिकामा केला.

'' ए आगीचा बंब! चिल ना यार. लहान मुलांची सगळी कार्टून्स आपल्याकडे हिंदितच तर लागतात. त्यात कसले बहाणे शोधायचे? इथं या किचनमध्ये धुसफुसण्यापेक्षा चल सोबत जाऊ. तेवढाच जीतला पिडता येईल. ''

'' जा तूच. आणि सोबत तुझ्या त्या लाडक्या मित्राला पण ने. ''

'' प्रिशेऽऽ! आज गाडं जरा जास्तच तापलंय. चल तू, आपण जाऊ. ते आपणच होईल थंड थोड्यावेळानं. ''

दोघेही अमूला तिथंच सोडून निघून गेले.

जीतनं जायच्या आधी फोन करुन ठेवला होता. त्यामुळे वाटेत आणखी तीन माणसं त्यांनी सोबत घेतली जी त्यांची वाट पाहत होती आणि साफसफाईचं काम करणार होती. हे जीतनं अशासाठी केलं होतं की त्याचं गटफिलिंग त्याला सांगत होतं की श्री काही ना काही निमित्त काढून जुन्या ऑफिसकडे फेरी मारणार म्हणून. ते दोघेही ऑफिसला पोचले तर त्या जागेची पार रया गेली होती. बाहेरच्या गेटला लावलेलं कुलुपही त्यांना तोडावं लागलं इतकं गंजलं होतं. आत येऊन बाकीच्या तिघांना काय आणि कसं करायचं ते सांगून पाठवलं अणि हे दोघेही श्रीच्या ऑफिसात शिरले.

'' शी! शी! शी! काय रे ही घाण? ''

'' तरी त्याच्याबद्दल मी तुला आधीच सांगितलं होतं. आता काय घाण घाण करतेस. घे. हा रुमाल बांध नाकाला आणि कर सुरु काम. ''

'' काय रे बाबा तरी! आता तुमच्यामुळं मला झाडूवालीपण व्हावं लागणार आहे. तू कॉलेजात हमाल केलीस ती काय कमी होती का? ''

'' काय म्हणालीस? कम अगेन! नालायक कार्टे! माझा काय संबंध तुला झाडूवाली बनवण्यात? तुलाच तुझ्या नवर्‍याची सो कॉल्ड गाडलेली रहस्य शोधायचीत. ''

'' ते सोड रे! चल आधी आपल्याला काही क्लू मिळतोय का बघू. '' असं म्हणुन तिनं बळेच त्याला कपाटं शोधायला ढकललं आणि ती बाकी सगळीकडे शोधाशोध करत राहिली. यांचं इथलं आवरेपर्यंत त्या आणलेल्या माणसांपैकी दोघेजण हात हलवत परत आले. जीतला किंवा प्रिशाला अजून काही सापडलेलं नव्हतं. तोवरच तिसरा माणूस आत आला तेच कुणीतरी गाडी येतेय हे सांगत.

'' बघितलंस ना प्रिशे! माझं गटफिलिंग केवढं करेक्ट आहे ते! तुझा नवरा अजूनही तसाच संशयी आहे. ''

'' मरु दे तुझं गटफिलिंग आधी मला लपव कुठंतरी. ''

'' अरेऽऽ! हां! हां! थांब. ''

त्यानं खिडकीतून बाहेर नजर टाकली तर श्री खाली उतरत होता.

'' प्रिशे, अं... उं... प्रिशे... ''

'' बोल की रेड्या पटकन्. ''

'' तू... तू एक काम कर या या कपाटात लप तू. '' असं म्हणून त्यानं चक्क तिला कपाटात कोंबलं आणि स्वत: त्याला अडसर बनून उभा राहिला.

श्री आत आला त्यानं पाहिलं की माणसं काम करतायत.

'' अच्छा, तू माणसं घेऊन आला होतास होय? मी आपला आलो होतो तुला काही मदत लागेल का विचारायला. आज जरा लवकर घरी चाललो होतो. तू म्हणतोस तर थांबतो मी. ''

'' तू... थांबणारेस? '' लगेच त्याला दारावर बारिक टकटक ऐकू आली.

'' नाही, नाही नको नको. तू जा घरी. जा घरी. थोडसंच काम बाकी आहे. आलोच आलोच मी. तासाभरात येतो. जा जा जा तू जा. ''

'' बरं ठीक आहे. तू तुझं आटप आणि ये. काही वाटलंच तर मला फोन कर. ''

'' हां! हो! हो! करतो. करतो. ''

श्री आला तसा परत गेला. त्याची गाडी बरीच लांब गेल्याची खात्री झाल्यावर जीतनं प्रिशाला बाहेर काढली. ''

एक मोठ्ठा सुस्कारा सोडून तिनं भरभरुन श्वास घेतला आधी बाहेर आल्यावर.

'' हलकटा, माझी काय अनारकली करायचा विचार होता की काय तुझा? ''

'' तू माझ्याशी भांडायला आलीस की काम करायला गं? हात चालव पटाटा. नाहीतर तुझा तो बेभरवशाचा नवरा परत येऊन आपल्या कामाचे बारा वाजवायचा. ''

मग त्यांनी सगळीकडे जोरदार शोधाशोध सुरु केली. काही वेळाच्या त्यांच्या त्या खटपटीला यश आलं आणि प्रिशाला श्रीच्या टेबलच्या शेवटच्या खणात अर्धवट जळालेल्या अवस्थेत ते फोटो सापडले.

'' जीत वी फाऊंड इट! ''

स्वरा... 

11/01/2021

..........

*67*

दोघेही बर्‍यापैकी मेहनत करुन घरी पोचले. येताना जीतनं त्या माणसांना सांगून ठेवलं की सगळी जागा व्यवस्थित साफ करा. आणि संध्याकाळी ऑफिसातून पैसे घेऊन जा. मी उद्या परत येणार आहे. दारांच्या बिजागर्‍या आणि खिडक्या तपासायच्या आहेत. आणि हो कुठं कसर, वाळवी काही लागली असेल तर तेही बघून साफ करुन ठेवा.

काम आटपून प्रिशा त्याच्यासोबत ऑफिसला जाणार होती, पण मध्येच तिचा विचार बदलला आणि ती सरळ घरी निघून आली. संध्याकाळी जीत घरी आल्यावर त्यांचं बोलणं झालं की एकदा रात्री श्री जेवून गेला की मग त्या सापडलेल्या फोटोंवर बोलू. तेवढ्या वेळात वर बसलेल्या प्रिशानं युवराज आणि चांदनीशी याच्या संदर्भात बोलून घ्यावं. त्याप्रमाणे वर बसून फोटो बघणार्‍या प्रिशानं चांदनीला फोन लावला.

'' क्या दी, आप पुना क्या गए हमें तो जैसे भूल ही गए! ''

'' और हर रोज तुझे फोन क्या मेरा भूत करता है? ''

'' अरे दी मै तो ऐसे ही बोल रहीं थी। कहीए क्या चल रहा है? ''

'' ज्यादा कुछ नहीं तेरे आने की तैयारी चल रही है। आज हमारे पुराने ऑफिस की सफाई करी है जीतनें। और मै दो बारी श्री के नजर में आते आते बची हू। क्या बताऊ तुझे! वो पागल तो मुझे बाथरुममें बंद कर के गया और आज तो जीत ने मुझे अनारकली के जैसे कबर्ड में दफना ही दिया था। ''

प्रिशा सगळे झालेले किस्से सांगत होती आणि चांदनी गडबडून हसत होती.

'' रुक रुक। कितना हस रही है। असल बात तो तुने सुनी ही नहीं। ''

'' वो क्या दी? '' चांदनी हसणं थांबवून थोडी गंभीर झाली.

'' अरे मुझे ना आज ऑफिस की सफाई करते वक्त पुरानेवाले फोटो मिले; वो भी जले हुए। ''

'' अरे वा दी! आप तो वहॉं जाके स्पायगिरी करने लगी हों। वैसे जितना मै आपको जान गई हू ना, उससें मै बता सकती हू की आपने ही पहल की होगी उनको ढूंढने के लिए। अब बताईए क्यू ढूंढी आपने वो फोटो? ''

'' सहीं कहॉं तुने। मै सोच रहीं थी की शायद उन फोटों सें मै कुछ पुरानी बातें खोज सकू। ''

'' जैसे की? ''

'' जैसे की ये श्री को किसने भेजी? क्यू भेजी? श्रीकोही क्यू भेजी? जीत को क्यू नहीं भेजी? ''

'' रुको दी। ये सब करके आपको क्या मिलेगा? शायद सें कुछ ज्यादा रिजल्ट नहीं मिलेगा इससें आपको। इसको कुछ अलग तरीके से सोच के या करके देखीये। ''

'' मतलब? मै कुछ समझी नहीं चांद; तू क्या कहना चाहती है? ''

'' देखो दी इसें कुछ ऐसे सोचकर देखना की उस वक्त शायद आप या फिर जिजू के आसपास कोई तो ऐसा था जिसको ऐसी बात करने सें फायदा हुवा होगा। ''

'' पर ऐसा कौन हो सकता है? ''

'' अब ये तो आपको ही खोजना होगा, ऐसे भी स्पायगिरी तो आप ही कर रहीं हो ना! ''

'' ए हाय चांद, क्या कर रहीं हो? '' युवीनं तिच्या रुमच्या दारातून डोकावत विचारलं.

'' आओ ना। मै तो दी सें बात कर रही थी। ''

'' कशी आहेस प्रिशे? '' त्यानं आत येत तिला हाय करत विचारलं.

'' तू सांग तू कसा आहेस? जमतंय का चांदनीशी? ''

तिरक्या नजरेनं चांदनीकडे पाहत तो म्हणाला, '' हं! समजायला लागलीय मला हळूहळू ती आणि तूही! बाय दि वे कसली चर्चा करत होतात तुम्ही? ''

'' तेच रे जुनं फोटोचं प्रकरण. आज मला जुन्या ऑफिसची सफाई करताना मिळाले जळलेल्या अवस्थेत. ''

'' अच्छा, म्हणजे तुझ्यातला जुना गुप्तहेर जागा झाला तर! मग सांग बघू तू काय केलंस ते? बघूया मला काही मदत करता येते का ते! ''

मग प्रिशानं तेच सगळं परत त्याला सांगितलं जे तिनं चांदनीला सांगितलं होतं; आणि तेही जे चांदनीनं तिला सुचवलं होतं.

'' हं! तर असं आहे सगळं. ती सांगतेय त्यात तथ्य आहे. तू या किरणाचा नक्की विचार करुन बघ. मीही करतोच यावर विचार. मला असं वाटतंय की ह्या गोष्टीचं मूळ कदाचित... ''

'' चांदऽऽऽ! युवराजऽऽऽ! खाना लग गया है बच्चों, आ जाओ। '' अशी काननमावशीची हाक प्रिशानंपण ऐकली.

'' ए जा तुम्ही. मावशी हाक मारतेय जेवायला. आपण बोलूयात नंतर. ''

तिचा फोन संपला आणि ती चांद युवीनं सुचवलेल्या मुद्द्यावर विचार करत फेर्‍या मारायला लागली.

'' प्रिशे, अगं तुला हाक मारलेली ऐकू आली नाही का? जेवायला चल बघू. '' जीत तिला वर बोलावयला आला होता.

जेवतानाही तिचं जेवणात लक्ष नव्हतंच फारसं. ते राहून राहून एकाच मुद्द्याभोवती घुटमळत होतं; असं कोण असेल ज्याला या गोष्टी करुन फायदा होणार असेल?

ती जेवण झाल्यावर तिच्या रुममध्ये बसलेली असताना सगळं आटपून वर आलेल्या अमूनं तिला विचारलं, '' काय गं, इतका कसला विचार करतेयस तू? जेवणातही लक्ष नव्हतं तुझं. एवढं काय मिळालं तुम्हांला ऑफिसांत? ''

'' हे बघ! ''

काही अर्धवट जळालेले फोटो प्रिशानं तिच्यासमोर धरले. अमूला लगेचच त्याची ओळख पटली. ती उचकलीच एकदम.

'' कशाला आणलंस हे परत घरात? यांनी आधीच आयुष्यात काय कमी वावटळी उठवल्या होत्या का? आता तू परत आणलेस? आता हे आलेत म्हणजे परत काय घडवणारेत कुणास ठाऊक! ''

'' अमू, थांब जरा. आपण त्यावर नंतर बोलू. '' तोवर जीतही वर आला होता.

'' प्रिशे मला सांग तुझं मघाशी चांद आणि युवीशी काय बोलणं झालं? अमू म्हणतेय ते बरोबर आहे. तू केव्हापासून विचारतच गुरफटलीयस नुसती. धड जेवलीपण नाहीस. ''

'' कसं जाईल जेवण मला; जेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी चालू असेल तेव्हा! त्या दोघांनी माझं एका सुटलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. मी मघापासून त्याचाच विचार करतेय. ''

'' कुठला म्हणे? ''

'' त्यांचं म्हणणं असं की ते फोटो श्रीकडे पोहचवण्यामध्ये कुणाचा तरी काहीतरी फायदा असला पाहिजे. समज जर त्या माणसाचा तुझ्यापासून फायदा होणार असता तर त्यानं या अशा फोटोंऐवजी काहीतरी दुसरी ट्रिक वापरली असती. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की तेव्हा तुमच्या; म्हणजे आपल्या जवळपास कुणीतरी असा माणूस होता ज्याला या गोष्टी करण्यात स्वतःचा फायदा दिसला. कदाचित तो आजही आपल्या आजूबाजूलाच असेल. आणि मी केव्हापासून तो माणूस कोण असेल याचा विचार करतेय. ''

आता तिघेही विचारात पडले होते. तिघांनी तीन दिशा धरल्या आणि फेर्‍या घालत त्यावर विचार करायला लागले.

...

'' चांद प्रिशा का फोन था ना! क्या कह रही थी? '' -कानन

'' श्री से मिली या नहीं? '' -कविश

'' अरे कहॉं पापा, वो तो वहॉं जाके जासूस बन जासूसी किए जा रही है। '' -चांद

'' का बात कर रहीं हो? अब उको कौन किडा काट खाए है ये जासूसी का? '' -कानन

'' ना, ना अम्मा चिंता की कौनो बात नहीं है। वो तो दी को पुरानी बातों का फैसला करना है ना! '' -चांद

'' अच्छा, मतलब उसे जो श्री ने घर सें बाहर निकाल दिया था; वो वाली बात? '' -कविश

'' हां पापा, वो बता रही थी की उन्हें पुराने फोटो मिल गए है। अब वो उनका आगापिछा ढूंढने की कोशिश करेगी। तो मैनें कहॉं की मुझें उसमें कुछ दम नहीं लगता। बल्की वो इस बात को देखे के किसने ये सब अपने फायदे के लिए किया? आप क्या कहते हो पापा? मै सहीं हू ना? ''

'' हां बेटा बिल्कुल सहीं जा रहीं हो तुम। ''

इतक्यात जेवताना प्रिशाबद्दल विचार करणारा युवी हातातला घास तसाच खाली ठेवून घाईने उठून रुममध्ये गेला.

'' अरे ये क्या खाना क्यू अधुरा छोड दिया तुमने? '' त्याच्या मागे मागे रुममध्ये येत चांदनीनं त्याला विचारलं.

'' रुको। प्रिशा को फोन करता हू। मुझे कुछ याद आया है। ''

...

तिघेही एकदम एकाचवेळी एकाच बिंदूवर आले.

'' दिक्षित! ''

तेवढ्यात प्रिशाचा फोन वाजला. तो युव्याचा नंबर होता.

'' हां बोल. ''

'' प्रिशे, मला वाटतंय की याचा संबंध कदाचित इंदरशी असेल! ''

त्यानं लगेचच फोन कट केला. पण त्यानं तिला प्रश्न विचारला की तिच्या प्रश्नाचं उत्तर सुचवलं हे मात्र तिला कळलं नाही.

स्वरा...

 12/01/2021

..........

*68*

'' काय झालं गं? काय म्हणाला तो फोनवर? केव्हाची आपली लहान मुलासारखी अंगठा चोखत बसलीयस. '' तिला गदादा हलवत जीतनं विचारलं.

'' हं! '' एकदम भानावर येत प्रिशा वास्तवात आली.

'' अगं काय म्हणाला तो? '' त्यानं पुन्हा तोच प्रश्न तिला विचारला.

'' आपण अंदाज लावायला चुकलोय रे! ''

'' म्हणजे? ''

'' तो दिक्षित नाही असू शकत. त्याचा काय फायदा असणार आहे श्रीला हे असले फोटो देण्यात? ''

'' अगं तू विचारतेयस की सांगतेयस? नक्की काय करतेयस राणी? ''

'' विचार. युवीनं जे सांगितलं त्याचा विचार. ''

'' किती सस्पेन्स क्रिएट करतीएस? आता सरळ सांगणारेस की मार खाणारेस तू? ''

'' अरे युवी म्हणाला की यामागे कदाचित इंदर असू शकतो. ''

'' इंदर? कोण इंदर? एक मिनिट, एक मिनिट. इंदर म्हणजे इंद्रजित घाडगे तर नाही ना! ''

'' मलाही वाटतंय की त्याला याच्याचबद्दल बोलायचं असेल. पण प्रश्न असा आहे की त्याचा ह्या सगळ्याशी संबंध काय? आणि कसा काय? कॉलेज सोडल्यापासून तर तो राजकारण एके राजकारण करतोय. पेपरमध्ये त्याच्या बातम्या वाचलेल्या आठवतायत मला. तो त्याच्या वडिलांच्या जागेवर निवडणूक लढवणार होता वगैरे. आणि मला मुळात हा प्रश्न पडलाय की युवीला तोच का आठवावा? शिवाय ह्या सगळ्या चित्रात दिक्षित कधी, कसा, कुठून आणि का आला असेल? ''

'' मला वाटतं गेल्या जन्मात तू नक्कीच भारतीय गुप्तहेर खात्यांत होतीस. काय पण प्रश्नांची मालिका उभी केलीयस की त्यांची उत्तरं शोधायचं तर अनेऽऽऽऽऽऽऽऽक वर्षं मागे जावं लागणार. कुणी-कुणी, कुठे-कुठे गाडलेले खजाने शोधून काढावे लागणार आणि आता मला ऑऽऽऽऽऽ (अशी मोठ्ठी जांभई देत पुढे म्हणाला) झोप येतेय. रात्री पुरते हे सगळे विचार, प्रश्न सगळं काही बासनात गुंडाळून उशाला घे आणि शांत झोपून टाक. उद्या सकाळच्या गोलमेज परिषदेत याच्यावर प्रधान्यक्रमाने विचार करण्यात येइल. अमे झोपायला चल. नाहीतर ही बया माझ्या झोपेचं पार खोबरं करुन टाकेल. '' असं म्हणून अमूच्या हाताला धरुन तिला ओढत तो झोपायला निघून गेला.

मागे राहिलेल्या प्रिशानं मोठा लाईट घालवून डीम लाईट लावला. पण बेडवर आडवं पडूनही तिच्या डोक्यात मात्र इंदरच्या शोधाचे विचार ठाण मांडून बसले होते. इंदरचा यात काय फायदा असू शकेल या एकाच विचाराच्या चक्रव्यूहात ती अडकून पडली.

'' अमू, तुला काय वाटतं गं? इंदरचा यात काही हात असेल का? ''

'' का रे मघाशी तर तुला झोप आली होती ना! आणि आता मला प्रश्न विचारतोयस? ''

'' अगं तिथं बसलो असतो तर प्रिशानं मला प्रश्न विचारुन भंडावून सोडलं असतं. आणि आतातरी तिच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मी तर तुला आपला एक अंदाज विचारतोय. ''

'' नाही रे! माझे विचार ना त्या दिक्षितच्या पलिकडे जातच नाहीएत. तो ना जरा जास्तच गूढ होता. काय काम करायचा रे तो धाममध्ये? ''

'' तो कुठे धाममध्ये काम करत होता? ''

'' म्हणजे? अरे हे काय नवीन काढलंस तू? आम्ही दोघींनी तर खुपदा त्याला पाहिलं होतं तिथं! ''

'' हो बरोबर आहे. पाहिलं असेल तुम्ही त्याला; पण तो काही धाममध्ये काम नव्हता करत. तो तर श्रीची सगळी कामं करायचा. मला तर तो माणूस कधी आवडलाच नाही. श्री मात्र त्याच्या हातातली कठपुतळी झाल्यासारखा झाला होता. ''

'' काय सांगतोस? आधी कधी बोलला नाहीस रे हे तू? एवढं सगळं घडलं होतं? ''

'' नाही. याच्यापेक्षाही बरंच काही घडलं होतं. पण बाकीचं सगळं नंतर कधीतरी सांगेन. आता झोपूयात. उद्या जरा या सगळ्याच्या तळाशी जाण्याचा विचार करतोय मी. ''

सकाळी अमू तिचं सगळं आवरुन चहा करायला किचनमध्ये गेली तर चहाचं पातेलं, गाळणं सगळं धुवून पालथं घातलेलं तिला दिसलं.

' हं! म्हणजे बाईसाहेब रात्रभर झोपल्या नाहीतसं दिसतंय. बघू तरी बया काय करतेय ते! '

जीतला उठायला अजून वेळ होता. तिनं बाकीच्यांना चहा दिला. जयंतीला नाश्त्याची तयारी करायला सांगून ती आपला कप घेऊन प्रिशाच्या खोलीत गेली.

ती आत आली तर प्रिशा तिच्या बेडवर बसून समोर लावलेल्या फळ्याकडे एकटक बघत कसल्यातरी विचारात गढून गेली होती.

'' अगं हा फळा इरुच्या खोलीतून आणलास का? आणि हा कसला नवा अभ्यास सुरु केलास तू? ''

'' काहीतरीच काय अमे! अभ्यास कसला करतेय मी? हा सगळा मी काल रात्रभर केलेल्या विचारांचा परिणाम आहे. ''

'' अमूऽऽऽ! माझा चहाऽऽऽ ''

'' जीत उठला वाटतं. मी आलेच परत. मग मला सांग ही सगळी कसली टेबलं आखलीस ते; आणि तू नक्की काय विचार केलास रात्रभर ते! '' असं म्हणून अमू पटकन् खाली निघून गेली.

ती गेल्यावर प्रिशाच्या डोक्यात काय आलं आणि तिनं लगेच युवराजला फोन लावला.

'' हालो, काय गं स...काळीच फोन लावलास? झोपली नाहीस की काय रात्रभर? ''

'' तू आधी जागा हो नीट. मी झोपणार कशी तूच सांग. रात्री माझ्या डोक्यात तू इंदरचा किडा सोडलास ज्यानं रात्रभर माझ्या मेंदूचा कुरतडून कुरतडून पार भुगा केला. ''

'' प्रिशे, कशाला विचार करतेस एवढा सगळ्याचा? सोडून दे ना तो विषय. ''

'' सोड नाही. मला आधी सांग तुझ्या डोक्यात हा इंदर कुठून आला? ''

'' कुठून आला काय? तो माझ्या डोक्यातून कधी गेलाच नव्हता. तुला तर कॉलेजातली त्याची सगळी कांडं आठवत असतीलच ना! तूच तर पहिली मुलगी होतीस जी त्याच्या ह्या सगळ्या कामांच्या विरोधात उभी राहिली होतीस. विसरलीस की काय? बरं तुला तो परिक्षेच्या वेळी घरांच्या मॉड्यूल्सचा किस्सा तर क्लिअरकट आठवत असेल ना! आठवतंय का जीत, श्री, धन्या आणि चेत्यानं जाऊन एका पोराला धरुन आणला होता? काय गं नाव त्याचं प्रिशे? ''

'' सुशांत. त्याला कसा विसरेन मी! ''

'' अं, माझ्या आठवणीप्रमाणे तो कासेगावांत रहायचा ना! ''

'' हां, करेक्ट. ''

'' हे कांड पण त्याला हाताशी धरुन इंदरनंच केलं होतं. ''

'' युव्या यार तुला किती जुन्या जुन्या गोष्टी आठवतायत. मी तर हे सगळं कधीच गाठोड्यात बांधून मागे टाकून दिलं होतं. पण तरीही माझा प्रश्न अजून तिथेच आहे. कारण इंदर कॉलेज सोडल्यापासून राजकारणात घुसलाय. त्याचा आणि बिल्डर्सचा काही संबंध असेल असं तुला वाटतंय का? ''

'' ते मात्र तुला जीतला विचारावं लागेल मैत्रीणी. मी कसा काय सांगू शकणार हे? मी तर अनेक वर्षं नव्हतोच ना भारतात! ''


'' थॅन्क्स यार. हे सगळं मला किती हेल्पफुल झालंय म्हणून सांगू तुला मी! ''

'' ए चल चल. मैत्रीत नो थॅन्क्स नो सॉरी. ''

स्वरा...

 16/01/2021

..........

*69*

नाश्त्यासाठी आलेल्या श्रीनं अनिशला सोडलं आणि जाता जाता त्यानं जुन्या ऑफिसच्या साफ सफाईची चौकशी केली.

'' काय रे झाली का सगळी सफाई? ''





'' हो सफाई तर झाली सगळी कालच. आज जरा परत चक्कर मारुन येणारे. दारं, खिडक्या, भिंती सगळं परत तपासायला हवंय ना! माझी पार्टनर येईपर्यंत तिचं ऑफिस रेनोव्हेट करुन ठेवायला हवंय. ''

'' अच्छा! म्हणजे लवकरच येईल ना ती? पण काय रे ही तुझी पार्टनर नक्की आहे कुठली? म्हणजे ती येणार कुठून आहे? तुझी तिची भेट कशी झाली? ''

'' ती होय. ती आहे कानपुरची आणि येणारही तिथूनच आहे. मी एका इंजीनिअर्स एक्झिबिशनला गेलो होतो. तिथं आमची भेट झाली. तिला तसंही या बाजूला यायचंच होतं. ती तिच्या इंटेरिअरच्या वर्तुळात फार फेमस आहे. चांदनी नाव तिचं. चांदनी गोयल......''

यांचं बोलणं चालूच होतं पण किचनमध्ये काम करणार्‍या अमूचं काही तिकडं लक्ष नव्हतं. तिला वाटलं नाश्ता करुन, अनिशला सोडून श्री निघून गेला असेल. तिनं आतूनच मोठ्या आवाजात जीतला विचारलं, '' जीत अरे प्रिशानं काय केलंय पाहिलंस का तू? ''

नेमकं श्रीच्या कानांनी हवी ती गोष्ट टिपली. तो ताडकन् जागेवरच उभा राहिला. जीतनं मनातच कपाळावर हात मारुन घेतला. केली माती आता हिनं सगळ्याची; लागतंय मला श्राध्द घालायला.

'' काय झालं रे! एकदम उभा राहिलास? ''

'' तू ऐकलंस का ही काय म्हणाली ते! अमूऽऽ काय म्हणालीस गं तू आता? ''

त्याचा आवाज ऐकून अमू सटपटलीच. हा अजून इथंच आहे? कसाबसा चेहरा नॉर्मल ठेवत ती किचनमधून बाहेर आली.

'' अरे तू गेला नाहीस अजून? '' तिनं उलटा त्यालाच प्रश्न विचारला.

'' नाही. नाही ते सोड. मला सांग तू आता काय म्हणालीस? प्रिशानं काय केलं? प्रिशा इथं आहे? ती सापडली? कधी? कुठं? केव्हा? आणि हे तुम्ही मला का नाही सांगितलंत? ''

'' अरे, श्री श्री. एक मिनिट. शांत हो. तुझा काहीतरी गोंधळ झालाय. अरे ती प्रिशा नाही म्हणाली. इशा म्हणाली. इशा, इशा. ''

'' हो अरे मी इशाच म्हणाले. तुझे कान वाजले असतील. ती ना ह्याच्या ऑफिसमध्ये आताच लागलीय कामाला. '' अमूची लोणकढी थाप आणि जीच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. कारण त्यानं मनातल्या मनात इशा इरुची मैत्रीण असल्याचा बनाव तयार केलेला पण सगळी सूत्र एकदम स्वतःकडं घेऊन अमूनं त्यावर व्यवस्थित बोळा फिरवलेला.

'' नाही रे! मी नक्की ऐकलं हिनं प्रिशाच म्हटलं. ''

'' श्री, आता मी तुझ्याशी खोटं बोलेन का? आणि अमू तरी असं काहीतरी का करेल बरं? ''

प्रश्न उलटवण्याची जीतची ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली.

'' सॉरी. माझंच चुकलं. जातो मी. मला उशीर होतोय. '' तो स्वतःशीच अमू काय बोलली, आपण काय ऐकलं याची कॅलक्युलेशन घालत तिथनं बाहेर पडला.

'' हा काय परत प्रिशाला शोधतोय की काय? '' अमूनं तिला आलेली शंका जीतला बोलून दाखवली.

'' तुझी शंका ठेव बाजूला. मला आधी सांग ही इशा कोण काढलीस तू? बरं काढलीस ते काढलीस वर तिला माझ्याच ऑफिसात चिकटवून पण टाकलीस? ''

'' मी कुठे काय केलं? इशाला तर तू जन्म दिलास ना! हा काय आता इथं! ''

'' अगं मी तिला इरुची मैत्रीण म्हणून सांगणार होतो श्रीला. ''

'' हां मग! सांगायचंस ना तसं. ''

'' कसं? माझं बोलणं संपायच्या आधीच झडप मारुन सगळी सूत्रं स्वतःकडे घेतलीस आणि त्या इशाला माझ्या ऑफिसात लगोलग चिकटवून टाकलीस तू. आता कधी हा जर ऑफिसला आला तर तिची चौकशी करेल तर माझी पंचाइत होईल. तू पण ना अमू काहीही उचापत्या करतेस. आता सांग मला काय म्हणत होतीस तू? प्रिशानं काय केलं? ''

'' अरे काही नाही रे! ती बहुतेक रात्रभर झोपली नाहीए. ''

'' हं! त्यात काही नवीन नाही. माहीतेय मला ते. तिच्या डोक्यात काही चालू असलं की ती अशीच करते. पुढं बोल तू. ''

'' तुला बरं सगळं माहीती असतं. ''

'' पुढं बोल ना तू. आम्ही झोपायचो नाही तुझ्यासारखे बाजार विकून. म्हणून माहीतीय मला सगळं. ''

'' हां. असू दे. असू दे. लगेच काही माझी मापं काढायची गरज नाहीए हां तुला. मी तुला हे सांगत होते की तिनं इरुचा फळा नेलाय आणि त्याच्यावर कसलीतरी टेबलं काढून ठेवलीत. ''

'' काय सांगतेस? म्हणजे मी काही करायच्या आधीच ही कनक्लूजनला पोचलीपण? ''

'' तुम्ही दोघं ना येडचाप आहात. तुमच्या नादाला लागणारा दगडं मारत फिरणार. जा बाबांनो काय करायचंय ते करा. मला नंतर सगळं समजवून सांगा म्हणजे झालं. '' असं म्हणून अमू तिच्या तिच्या कामाला लागली आणि जीत दोन-दोन पायर्‍यांत जिना चढून प्रिशाच्या खोलीत आला.

'' काय बाईसाहेब रात्रभर विचार करुन तुला हे पाच चौकोनच मिळाले का? '' तिच्या पाठीत धबका घालत त्यानं विचारलं न् शेजारी बैठक मारली.

'' तू कशासाठी आलायस इथं? काय पाहिजे तुला? थिअरी की प्रॅक्टीकल? ''

'' ये भी कोई पुछनेवाली बात हुई? अर्थातच प्रॅक्टीकल. बघू तरी रात्रभर तू काय धा भोटं आठ आणे उपटलेस ते! ह्या पहिल्या चौकोनात जीत- प्रिशा- अमू आणि खाली दिक्षित म्हणजे काय? हां! म्हणजे आपल्या तिघांनाही दिक्षितवर संशय आहे. बरोबर? ''

'' बरोबर. ''

'' ह्या दुसर्‍या चौकोनात युवराज आणि इंदर म्हणजे युव्याचा इंदरवर संशय आहे असंच ना! ''

'' हो. ''

'' आणि हे काय? ह्या तिसर्‍या चौकोनात हे धाम कशासाठी लिहिलंस तू? ''

'' कारण ही सगळी गोष्ट धाममधून सुरु झाली. आता सकाळी मी युव्याला परत फोन लावला होता. तर त्याच्याशी बोलताना मला असं वाटलं की इंदरचा आणि बिल्डर्सचा एकमेकांशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे. मला सांग तुम्ही दोघे जेव्हा धाम चालवत होतात तेव्हा तुमच्यासोबत स्पर्धेत आणखी किती बिल्डर्स होते? ''

''ऊं... एक आकांशा, एक गितांजली, एक धवन बिल्डर्स आणि कायम आमची ज्यांच्यासोबत तू-तू मी-मी व्हायची ती मोरवन बिल्डर्स. बाकी सगळे आजही आहेत आमच्या म्हणजे माझ्याबरोबर स्पर्धेत पण मोरवन मात्र तेव्हापासून कुठंतरी गहाळ झाल्यासारखी वाटतीय स्पर्धेतून. अरेच्चा, ही गोष्ट इतकी वर्षं माझ्या लक्षात कशी आली नाही. ''

तिनं लागलीच चौथ्या चौकोनात मोरवन बिल्डर्स असं लिहिलं आणि म्हणाली, '' आता नाही तेव्हासुध्दा तुम्हांला यातलं काही खटकलं कसं नाही? मला सांग या मोरवनचा मालक इंदर आहे का? ''

'' नाही गं! इंदर कधी कुठं या चित्रात नव्हताच. ही मोरवन ना कुणा भैय्यासाहेब घोरपडेंच्या मालकीची होती. पण आम्ही कधी त्यांना बघितलंच नाही. कारण, सगळ्या मिटिंगना किंवा निविदा भरण्याच्या वेळी तिथं त्यांचा मॅनेजर निकमच येत असे. बरं त्या मोरवनच्या जाहिरातीतही कधी त्या भैय्यासाहेबांचा फोटो बघितल्याचं आठवत नाही मला. आणि तू काय म्हणतेस गं यातलं काही खटकलं कसं नाही म्हणून? तेव्हा कुठं वेळ होता गावच्या म्हारक्या करायला? आपण बरं की आपलं काम बरं. ''

'' बरं, बरं. ते असू दे. आता तुझ्या लक्षात आलं असेल आपल्याला काय काय करायचंय ते! आणि हे ही की कदाचित जाणीवपूर्वक मोरवनच्या मालकाची ओळख लपवली गेली असावी. आपल्याला ह्या मोरवनचा आगापिच्छा शोधायचाय. आणि शेवटी राहिला हा दिक्षित...''

तिनं त्याचं नाव उरलेल्या पाचव्या चौकोनात लिहिलं.

'' प्रिशे, तुला म्हणून सांगतो. हा दिक्षित ना धुमकेतू असावा. अचानक ऑफिसात उगवला आणि अचानकच गायब झाला. हा श्री ला कधी? कुठं? कसा? भेटला हे मला आजही माहीत नाहीए बघ. ''

'' मग आता लाग कामाला. हा श्रीला कसा भेटला? याचा अतापता आणि फोन नंबर वगैरे काही मिळतोय का बघ श्रीकडून. ''

'' जो हुक्म मेरे आका. गुलामच ना मी तुझा. ''

स्वरा... 

17/01/2021

..........

*70*

जीतनं जुन्या ऑफिसचं रेनोव्हेशन करायला घेतलं. प्रिशानं जे टेबलं मांडलं होतं त्याचा विचार करता करता त्यानं श्रीला भेटून दिक्षितची चौकशी करायचं ठरवलं.

अनेक वर्षांनी त्यानं त्या घराचा उंबरा ओलांडला होता.

'' श्रीऽऽ येऊ का रे? '' त्यानं हॉलमध्ये बसलेल्या श्रीला विचारलं.

तो आज बहुतेक लवकर आला असावा. उगाचच मेंदूला आणि नजरेला काहीतरी चाळा हवा म्हणून तो टिव्ही लावून बसला होता. जीतच्या आवाजानं त्यानं मान वळवली.

'' अरे विचारतोस काय परक्यासारखा? ये ना! ''

जीत आत येऊन बसला तसं त्यानं विचारलं, '' झालं का रेनोव्हेशन सुरु? ''

'' हो रे! आजच सुरु केलंय काम. आज दारं खिडक्यांचं काम उरकून घेतलंय. उद्या जरा भिंतीचे पोपडे वगैरे काढून चुन्याचा एक हात मारुन घेईन म्हणजे रंग द्यायला बरं पडेल. ''

''अच्छा. चांगलंय. त्या जागेचं काहीतरी होतंय हे महत्वाचं. पण मला सांग तू असा वाट वाकडी करुन इकडे कसा काय? काही कामासाठी आलेलास की असाच? ''

'' अरे हो! बरं झालं आठवण केलीस. मी तर विसरुनच गेलो होतो. ''

'' कशाबद्दल विसरुन गेलास? ''

'' अरे, मी ना त्या माणसाबद्दल विचारायला आलो होतो. ''

'' कुणाबद्दल? ''

'' तो नाही का रे! तो आपला हा रे! तोऽऽ तो बघ पी ए होता तुझा! ''

'' कोण? तुला दिक्षित म्हणायचंय का? ''

'' अरे, हां हां. तोच तो. केव्हाचा नाव आठवत होतो मी त्याचं. ''

'' का? मध्येच त्याची का आठवण आली तुला? ''

'' असं काय करतोस? विसरलास का? तुला बोललो होतो ना माझी पार्टनर आहे म्हणून. आता 2-4 दिवसांत सगळं रेनोव्हेशन पूर्ण होईल. ती लगेचच येणार आहे ना! आम्ही एक सरकारी कॉन्ट्रॅक्ट भरलं होतं. ''

'' बरं मग? या सगळ्याचा आणि दिक्षितचा काय संबंध? ''

'' तू बहुतेक ना सगळं विसरुन गेलायस. मलाच आठवण करुन द्यावी लागणार असं दिसतंय. अरे तूच तर तेव्हा सांगायचास की दिक्षितला सगळ्या आतल्या खबरी असतात. त्याच्यामुळेच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतायत म्हणून. त्याचा काही अता-पता असेल तर दे ना. तेवढाच चांदनीच्या नजरेत हिरो होईन. '' असं म्हणून त्यानं श्रीला डोळा मारला.

त्यावर गालात हसत श्री म्हणाला, '' तू तर असा बोलतोयस जसं काही अमू तुला असलं काही करुच देणारे! ''

'' जाऊ दे रे! अमूचं काय घेऊन बसलास! बघू आपण नंतर तिच्याकडे. आधी मला तू दिक्षितचा पत्ता नाहीतर फोन नंबर काहीतरी दे. ''

'' काय वेडा आहेस का जीत तू? पत्ता? फोन नंबर? आत्ता कुठून आणू मी? तेही इतक्या वर्षांनी. ''

'' यार मला वाटलं होतं तूच माझी मदत करु शकशील. इतक्या वर्षांनी मित्र म्हणून आलो होतो मदत मागायला तुझ्याकडे पण तूही माझ्या तोंडाला पान पुसलीस. बघ ना जरा कुठं जुन्या डायरीत वगैरे लिहून ठेवला बिवला असशील तर? ''

जीतचा हा इमोशनल ब्लॅकमेलिंगवाला तुक्का चालून गेला.

'' ठीक आहे. बघतो प्रयत्न करुन. '' असं म्हणून तो आपल्याच विचारात हरवला.

'' ए श्री पण मला एक सांग त्या प्राण्याला तू भेटलास कुठे? ''

स्वतःच्याच विचारात गुंतलेल्या श्रीला त्याचा प्रश्न लक्षात आला नाही.

'' कुणाला? ''

'' अरे दिक्षितलाच की! आणखी कुणाविषयी विचारणार मी? ''

'' अच्छा, तो होय! त्याची माझी भेट मी विसरणं शक्यच नाही. ऑफिसवरुन घरी निघालो होतो. अशीच तलफ आली म्हणून चहाच्या टपरीवर चहा प्यायला थांबलो होतो. दोन घोट चहा पिला असेन नसेन इतक्यात कुठूनतरी हा तिरासारखा धावत आला तो येऊन थेट मलाच धडकला. सगळा चहा अर्धा त्याच्या अंगावर अर्धा माझ्या अंगावर. तरी तसाच मला न बघता ' ए थांब! ए थांब! ' म्हणत कुणाच्या तरी मागे धावला. मी नुसताच बघत राहिलो जे काही घडत होतं ते. मेंदूच जसा काही बधीर झाला होता माझा. नंतर तो ज्याच्या कुणाच्या मागे लागला होता तो पळून गेला म्हणताना एवढंसं तोंड करुन खांदे पाडून जड जड पावलांनी चहाच्या टपरीवर आला आणि शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसला. मला त्याची ती अवस्था बघवेना. मी माझ्यासोबत आणखी एक चहा सांगितला. आणि त्याला दिला. ''

'' घ्या चहा घ्या. बरं वाटेल. ''

'' अहो नको साहेब. ''

'' घ्या हो. संकोच नका करु. घ्या. ''

माझ्या हातून चहा घेत तो म्हणाला,

'' मघाससाठी सॉरी हं साहेब. माझ्यामुळं तुमचे एवढे चांगले कपडे खराब झाले. पण, माझं नशीबच खराब आहे त्याला तुम्ही तरी काय करणार म्हणा! ''

'' का? नशीबाला का बोल लावता? ''

'' जाऊ दे ना साहेब सोडा. ''

'' अहो सांगा तर खरं. कदाचित आपल्याला काही करता येईल. ''

'' तुम्हांला सांगतो साहेब आजचा दिवसच वाईट बघा! क्षुल्लक चुकीसाठी मालकानं नोकरीवरुन काढून टाकलं हो मला. ''

'' काय झालं होतं? ''

'' अहो मी अकाऊंटटला दिलेल्या एक लाखाच्या हिशोबात तीस हजार रुपये कमी भरले. मालक म्हणे तूच घेतलेस ते! किती सांगितलं, विनवण्या केल्या पण नाहीच ऐकलं त्यानं माझं. झाल्या दिवसांचा पगार दिला आणि म्हणे तोंड काळं कर इथून. तोच पगार पाकिटात ठेऊन घरी चाललो होतो तर आता त्या भिकार..ट पाकिटमारानं माझं पाकिटच मारलं. आता तुम्हीच सांगा साहेब कुठल्या तोंडानं घरी जाऊ? जाऊन बायकोला काय सांगू? घरातल्या दोन चिल्यापिल्यांचं काय करु? नाही साहेब, माझ्यात हिंमतच नाही. आता एकच उपाय आहे. मरतोच जाऊन कुठंतरी. ''

असं म्हणून उठून तरातरा वाटेला लागला. मी पळत त्याच्यामागे गेलो. त्याचा हात धरला आणि माझं कार्ड त्याच्या हातात ठेवत म्हणालो, '' अहो असं काही करु नका. हे माझं कार्ड ठेवा. मला उद्या या पत्त्यावर येऊन भेटा. बघूया आपण आपल्याला काय करता येतंय का ते! त्यानंतर दुसर्‍या दिवशी तो माझ्याकडे आला आणि मी त्याला माझ्या पीएचं काम दिलं. ''

'' अरेरे, बिचारा! फारच गांजला होता परिस्थितीनं. ''

इतक्यात बाहेरुन सदाकाकांचा आवाज आला की अमूनं दोघांनाही जेवायला बोलावलंय म्हणून.

'' बरं, चल जेवायला जाऊ. पण प्लीज दिक्षितचा नंबर किंवा पत्ता तेवढा शोधून ठेव हं! ''

जीतनं परत परत त्याला दिक्षितविषयी आठवण करुन दिली.

श्री जेवण करुन अनुला सोबत घेऊन निघून गेला. तो गेला आता परत येणार नाही याची खात्री करुन हळूच प्रिशा खाली उतरुन आली.

'' काय रे, झालं का काही त्याचं तुझं बोलणं? मिळाला का तुला दिक्षितचा नंबर? ''

'' नंबर नाही मिळाला पण श्री मला म्हणालाय की तो शोधून ठेवतो म्हणून. पण मला इतक्या वर्षांनी त्याची आणि दिक्षितची भेट कशी झाली ते मात्र कळलं. ''

'' कशी झाली भेट म्हणे त्यांची? ''

प्रिशानं असं विचारल्यावर त्यानं श्रीनं त्यांच्या भेटीचा जो काही किस्सा त्याला सांगितला होता तो जसाच्या तसा तिला सांगितला. वर म्हणाला, '' प्रिशे आपण ना उगाचच संशय घेतोय त्याच्यावर. बिचारा परिस्थितीनं गांजलेला माणूस काय कुणाचा फायदा घेणार! ''

'' मला नाही तसं वाटतं. काय सांगावं तो तीस हजाराचा बनाव असेल. किंवा मग त्यानं ते खरंच केलं असेल. काय सांगितलं त्यानं कुठं कामाला होता तो? ''

'' आयला, ते काही मी विचारलं नाही गं! आणि श्रीनं पण मला काही सांगितलं नाही. ''

'' बरोबरच आहे युधिष्ठिराचा चांगुलपणाचा चष्मा घातल्यावर चांगलंच दिसायचं तुम्हांला सगळीकडे. पण नेहमी लक्षात ठेवा डोन्ट जज अ बुक बाय इटस् कव्हर. आता आपणही तसंच करुन पाहू. बघूया हे दिक्षित नावाचं पुस्तक उलगडून काय सापडतंय ते. ''

स्वरा... 

18/01/2021

..........

*71*

दोनेक दिवसांत श्रीनं महत्प्रयासानं त्याच्या जुन्या डायर्‍यांमधून दिक्षितचा नंबर शोधून काढून तो जीतला दिला. तो नंबर बघूनच जीतचं तोंड वेडवाकडं झालं; कारण नंबर लॅन्डलाईनचा होता. आताच्या जगात लॅन्डलाईन कोण वापरतं? तेही घरात? कारण त्याच्या माहीतीप्रमाणे दिक्षित तर फक्त श्रीकडेच कामाला होता. त्याला कुठे दिक्षितच्या दुनियाभरच्या उलाढाली माहीत असायला. त्यानं तो मिळालेला नंबर प्रिशाला दिला तर तिनं त्याला डिरेक्टरी आणायला लावली. डिरेक्टरी मिळाल्यावर तिनं त्यात तो नंबर शोधला. तर तिला भावेश दिक्षित या नावाच्या माणसाचा पत्ता सापडला.

'' हे काय? पत्ता कशाला शोधलास तू त्याचा? आपण फोन करुन बोलू शकलो असतो ना! ''

'' जीत, तू पण ना कधी कधी मेंदू गहाण ठेवल्यासारखा वागतोस. ''

'' का? आता काय केलं मी? एक साधा प्रश्न तर विचारला! ''

'' अरे, असं काय करतोस? समज जर हे सगळं कांड त्यानंच केलं असेल तर तो आपल्या फोन करण्यामुळे सावध नाही का होणार? येतंय का काही डोक्यात? ''

'' अरे हो! खरंच की. मी हा विचारच नाही केला. मग आता काय आपण त्याच्या घरी त्याला भेटायला जायचं का? ''

'' नाही रे बाबा. मी माझा माणूस पाठवेन त्याच्या पाळतीवर. बघू तरी हा माणूस नक्की काय काय करतो? कुणाकुणाला भेटतो? कुठेकुठे जातो? कसा राहतो? श्रीला त्यानं सांगितलं तसा खरंच गरीब बिचारा बापडा आहे का की तेही त्याचं एक सोंगच होतं श्रीला जाळ्यात गुंतवण्यासाठी? ''

'' कसली सॉल्लीड हुशार आहेस तू प्रिशे गं! ''

'' जन्मापासूनच...''

'' आणि आमचा नवरा बैलबुध्दी. ''

'' अमे, काय गं माझ्या जरीपटक्याचं कायम पटकूर करुन टाकतेस तू अशी? ''

'' नाहीतर काय? तुला दुसरी भाषा समजतंच नाही त्याला मी काय करु? अरे तुला मी जुन्या ऑफिसचं रेनोव्हेशन करायला सुरुवात केलीस तेव्हाच म्हणाले होते ना की या ऑफिसचीपण साफसफाई करुन घे हातासरशी. गेल्या अनेक वर्षांत नुसती फरशी फुसणं, रंगरंगोटी करणं याशिवाय काही केलंयस का? ''

'' मग? आणखी काय करायचं असतं ऑफिसांमध्ये साफसफाईचं? ''

'' जीतऽऽऽ! तुझ्या त्या कागदपत्रांनी भरलेल्या तीन-तीन कपाटांचं कधीतरी काहीतरी कर. मला तर तिथं आल्यावर त्यांना उघडायचीपण भिती वाटते. न जाणो त्या कागदांच्या ढिगार्‍याखाली मीच दबून जायचे केव्हातरी. ''

'' ते होय. त्याची काळजी नको करुस तू. त्यासाठी आपला खास माणूस आलाय की आता. '' असं म्हणून जीतनं प्रिशाच्या पाठीवर थाप मारली.

'' मी? ''

'' हां मग दुसरं कोण? अमे यू डोन्टच वरी गं या म्हशीला मी लावतोच आज कामाला. ''

'' जीत्या मी असलं काही करणार नसते हं! आधीच सांगून ठेवते. ''

'' का का? का करणार नसतेस? म्हणजे मी तुझ्यासाठी जुन्या ऑफिसची साफसफाई करायची, त्याचं रेनोव्हेशन करायचं, श्रीकडून दिक्षितची माहिती काढून आणायची, त्याचा फोननंबर मिळवायचा आणि तू माझ्यासाठी दोन-तीन कपाटं नाही साफ करु शकत? तेही तसल्या विषयात तुझा हातखंडा असताना? ''

'' धिस इज नॉट फेअर यार जीत! ''

'' एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍन्ड वॉर. सोबत माझा एक शब्द ऍड करतो. फ्रेंन्डशिप अल्सो. करेक्ट ना अमू? आता तूच सांग हिचं हे असं वागणं बरोबर आहे का? ''

आता मात्र अमूनं लागलीच प्रिशाचा गट सोडून आपल्या नवर्‍याची पाठराखण केली.

'' बरोबर बोलतोय तो प्रिशे! मी बरी अशीच तुला माझ्या नवर्‍याचा हमाल करु देईन. किंमत तर मोजावी लागेल ना! '' तिनं हळूच प्रिशाला डोळा मारला.

'' झोपा आता. तुम्ही दोघांनी उद्या सकाळीच सगळी कामं करुन टाकायचीत ऑफिसच्या सफाईची. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. लक्षातच ठेवा तुम्ही. ''

'' जीत्या, हे तुला महागात पडणार आहे. मी याचं उट्ट काढणार. '' झोपायला जाणार्‍या जीतच्या कानांपर्यंत पोचण्यासाठी ती मोठ्यानं ओरडली तसा अमूच्या मागेमागे गेलेला जीत दारातून डोकावत म्हणाला, '' डोंबारणे, जरा हळू कोकल की. श्री शेजारीच राहतोय. ''

तिनं पटकन् दोन्ही हात तोंडावर ठेवले.

तोंडातल्या तोंडातच पुटपुटली, '' सॉली... ''

...

दुसर्‍या दिवशी सकाळीच अमूनं दोघांचीही वरात ऑफिसला घालवली.

'' कामं करुन ठेवा. मी येतेच डबा घेऊन. '' अशी तपासायला येण्याची गर्भित धमकीपण देऊन ठेवली.

जीतनं सकाळीच साफसफाईसाठी येणार्‍या बाईला कचरा काढून फरशी फुसून ठेवायला सांगितलं.

'' ए मग आपल्याला काय काम राहिलं? ह्या अमीनं उगचंच मला घाण्याला जुपलीय. ''

'' नॉट टू वरी मैत्रीणी. तुला काल बोललो होतो की नाही माझ्याकडं कपाटं आहेत म्हणून! ही बघ! ही तिन्ही कपाटं छान झाडून काढून नीट व्यवस्थित लाव म्हणजे माझ्या बायकोची चिरडण्याची भिती कमी होईल जरा. ''

'' ए मी नाही. आपण करणार जीत. ''

'' नाही मैत्रीणी. मला अजूनही आठवतायंत कॉलेजपासून तू माझी आवरलेली कपाटं. तू ती कामं करण्यात एक्सपर्ट आहेस यार. तर तू आता इथेही हेच काम कर. मी जरा बाहेर आहे; अभयसोबत कामाची चर्चा करतोय. त्या कोपर्‍यात कपाट झाडण्यासाठीच्या झाडू आहेत. माझी खात्री आहे तू दिलेलं काम व्यवस्थितच करशील. पण काम झाल्यावर काय कुठे ठेवलंयस ते सांगण्याची कृपा कर हं माझ्यावर बाय. ''

जीतनं अभयशी बोलण्याच्या नावाखाली अंग काढून घेत तिन्ही कपाटं आवरायचं काम तिच्या एकटीवर टाकून तिथून काढता पाय घेतला. तशा या गोष्टी काही प्रिशासाठी नवीन नव्हत्याच. जेव्हा केव्हा त्याला त्याच्याच वस्तू सापडेनाशा होत तेव्हा तेव्हा तो प्रिशाला असेल तिथून पकडून हॉस्टेलवर घेऊन यायचा. ' तुझ्या खाण्यापिण्याचे सगळे नखरे उचलतो मी आता पण मला हे सगळं आवरुन दे. ' असं म्हणून कॉटवर आडवा पसरे. दरवेळी न चुकता मात्र आवरल्यावर कुठं काय ठेवलंयस हे मला सांग असं म्हणायला तो कधीच विसरत नसे. गमतीची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतरही त्याला अमूनं आवरलेलं कपाट कधी आवडलंच नाही. त्याची किरकिर सुरु झाली वस्तू सापडत नाहीत म्हटल्यावर की अमू जाऊन प्रिशाच्या बोकांडी बसे आणि तिला हवं ते खायला करुन घालण्याच्या बोलीवर त्याचं कपाट लावून घेई.

तीन तीन कपाटं आवरायची तिही इतकी वर्षं न आवरलेली म्हणताना प्रिशा आधी डोक्याला हात लावून बसली. कुठून सुरुवात करावी म्हणजे काम लवकर आटपेल हे तिला समजेना. इतक्यात अभय आत आला. त्याच्या एका हातात चहाचा ग्लास आणि दुसर्‍या हातात गोड बनपाव होता.

ते तो तिला देत म्हणाला, '' सरांनी हे तुम्हांला द्यायला सांगितलं. म्हणाले की ती बया आत डोक्याला हात लावून बसली असेल. हे नेऊन तिला दे म्हणजे तिचं डोकं ताळ्यावर येईल. ''

त्याच्याकडून हसतच तो बनपाव आणि चहाचा ग्लास घेत ती दाराकडं तोंड करुन मोठ्यानं म्हणाली, '' गळ्यात ढोल अडकवून सगळ्या गावात याची दवंडी पिट हं एन् एल् वाय के! ''

बाहेरुन खदखदून हसण्याचा आवाज आला. '' कपाटं आवरुन झाली की हाक मार गं! ''

प्रिशा जाऊन त्याच्या खुर्चीवर बसली. मस्तपैकी चहासोबत बनपाव खाल्ल्यावर तिचा मेंदू काम करायला लागला. काय करायचं माणसं असतातच सवयीची गुलाम ना! तिनं समोर उभी राहून तिन्ही कपाटं सताड उघडी टाकली. बाहेरच्या खिडकीतून अभय जीतच्या सांगण्यावरुन आत डोकावून बघत होता.

'' कपाटं सताड उघडलीत तिनं. आता कमरेवर हात घेऊन विठोबा बनून सगळ्याचं निरिक्षण करतेय. मग त्याच्यावरुन कॅल्युलेशन करत बोटं फिरवेल आणि एकदा सगळं समीकरण जुळलं की झटाटा कामाचा फडशा पाडून टाकेल. आहेच ती तशी. झाड कापायला सांगितलं तर अर्धा वेळ त्या कुर्‍हाडीला धार लावण्यात घालवेल आणि समोरच्याला कळायच्या आधीच काम कधी करुन टाकेल ते कळणार पण नाही. ''

'' सर, कसलं परफेक्ट ओळखता तुम्ही त्यांना. ''

'' अरे, मग उगाचच एकमेकांचे बडीज आहोत का आम्ही. ''

सगळ्यांत आधी तिनं फायलींचं कपाट सेट केलं. त्यात तसं करण्यासारखं काही जास्त नव्हतंच. तिनं फायली बाहेर काढल्या. कपाट झाडलं. कपड्यानं स्वच्छ पुसून घेतलं. मग ए टू झेड च्या क्रमानं फायली पुन्हा लावून टाकल्या. सोबत एका कागदावर फायलींचे नाव, नंबर असं सगळं लिहून त्या त्या कप्प्यावर चिकटवून टाकलं. तिच्या सुदैवानं जीतनं इथं कॉलेजएवढा गोंधळ घातला नव्हता. हुश्श! केलं आणि ते कपाट बंद केलं.

'' मला भूक लागलीय. '' ती पुन्हा ओरडली.

'' अरे काय? आता तर चहा आणि बनपाव खाल्लास की कार्टे! असली कामं करायला लागल्यावर तुझ्या पोटात कोण शिरतं नक्की? बकासुर की खोरेकरी? थांब थोडावेळ. अमू येतीय इतक्यात. तोवर ते दुसरं कपाट घे आवरुन. ''

'' थांब येऊ दे तिला. सांगतेच तुझं नाव. उपाशीपोटी माझ्याकडून काम करवून घेतोस म्हणून. चांगला ओरडा बसवते की नाही बघ तू; मला कामाला लावतोस काय? '' असं म्हणत तिनं दुसरं कपाट उघडलं.

त्यातंही तसं फारसं काही करण्यासारखं नव्हतं. वेगवेगळे मॅप, मॉड्यूल्स असेच तुकड्यांतुकड्यांत कोंबून ठेवले होते. ते बाहेर काढून सगळं झाडून पुसून ज्याचे त्याचे तुकडे एकत्र करुन नीट लावेपर्यंत अमू आलीच डबा घेऊन. अर्धा वेळ भांडत, एकमेकांच्या तक्रारी सांगत, अर्धा वेळ एकमेकांना घास भरवत दोघांनी अमूच्या मदतीनं डबा संपवला. आता अमूनं डबे आवरुन जायची तयारी केलीच होती इतक्यात आतनं प्रिशाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि दोघेही आत पळाले. बघितलं तर तिनं तिसरं कपाट उघडलं होतं आणि काहीतरी काढताना आतलं सगळं सामान तिच्यावर कोसळलं होतं.

'' जीतऽऽऽ! बघितलंस ना, माझी भिती खोटी नव्हतीच. आणि तुला काहीच वाटत नाही का रे? दिवसभर सगळं काम तिच्यावर टाकलंस तू? उचल आता ते सगळं. जा. '' अमू उखडलीच त्याच्यावर.

तसा जीत मुकाट्यानं पुढं झाला आणि त्यानं सामान बाजूला करत तिला हाताला धरुन उभं केलं. तिचा हात धरल्यावर तिनं हळूच त्याला डोळा मारला. ती उभी राहिल्यावर तो हळूच पुटपुटला, '' हलकट कार्टी आहेस एक नंबरची. फुकट शिव्या खायला लावल्यास. ''

'' ए अरे आवरा की पटकन. उभे काय आहात ठोंब्यासारखे. '' मागून मास्तरीण बाई करवादल्या.

दोघांनी पटापट सगळं कपाट आवरुन घेतलं. जवळजवळ सगळं कपाट आवरुन झालं होतं. अमू जीतवर लक्ष ठेवायला तिथंच बसून होती म्हणून प्रिशानं एक बॉक्स तिच्यासमोर सरकवला. त्याच्यावर लिहिलं होतं ' इम्पॉर्टन्ट स्टफ '

 तिनं तो बॉक्स उघडला तसा जीत म्हणाला, '' अमू, त्यातले कागद नीट बघितल्याशिवाय टाकू नकोस हं! धामची सुरुवात झाली तेव्हापासूनची सगळी महत्वाची कागदपत्रं आहेत त्यात. '' अमूनं हो म्हणून मान डोलवली आणि तिच्या कामाच्या मागे लागली.

मध्येच प्रिशानं त्याला विचारलं, '' का रे इतकी महत्वाची कागदपत्रं कुणी अशी ठेवतं का? नीट फायलीत ठेवायची ना! ''

'' काय करु माझ्याकडं दोन गोष्टी नाहीत ना गं! ''

'' काय? कुठल्या? ''

'' एक म्हणजे तू आणि दुसरी तुझी तरल बुध्दी. ''

अमूलाही या जोकवर हसायला आलं.

'' हे काय रे जीत? तू हे पाकिट उघडूनही बघितलं नाहीस? '' आपल्या हातातलं पाकिट त्याच्यासमोर नाचवत अमूनं विचारलं.

'' पाकिट? कसलं पाकिट? त्यात तर सगळे कागद आहेत ठेवलेले फक्त. आण बघू काय आहे ते! ''

'' नको मीच उघडते थांब. '' असं म्हणून अमूनं जपूनं ते पिवळं पडलेलं पाकिट उघडलं आणि आतला कागद बाहेर काढून उलगडला.

'' तू कुणा राजनला ओळखतोस का? '' तिनं विचारलं.

स्वरा... 

19/01/2021

..........

*72*

'' राजन? कोण राजन? हे बघ, ही चिठ्ठी तुला कुणी राजनने लिहिलिय आणि... आणि... '' त्या चिठ्ठीवरुन नजर भिरभिरवणारी अमू आणिवरचं अडकली.

'' अगं आणि च्या पुढेही काही लिहिलं असेल की त्यानं! काय तुम्ही दोघीपण! तुमच्या ह्या सस्पेन्स क्रिएट करण्यानं वात आणलाय मला नुसता. बोल की बाई पुढे काय लिहिलंय? ''

'' अरे, युव्याचा अंदाज बरोबर होता. ''

'' म्हणजे? ह्या पत्राचा... सॉरी चिठ्ठीचा आणि युव्याचा काय संबंध? ''

'' घे. तूच बघ. '' अमूनं दिलेली चिठ्ठी घेतली आणि जीतनं भराभर त्यावरुन नजर मारली. ती वाचून तो स्वतःच्याच विचारात हरवल्यासारखा झाला.

तो काही बोलत नाही म्हटल्यावर प्रिशानं त्याला कोपरानं ढोसललं.

'' ए माठ! अरे काही बोलशील का नाही? असा का दगडी पुतळा झालाय तुझा? काय लिहिलंय तरी काय त्याच्यात एवढं? ''

'' प्रिशे, अगं ही चिठ्ठी राजानं पाठवलीय. आठवतोय का राजा तुला? सुशाचा रुममेट राजा! राजन? कॉमर्सवाला राजन? ''

'' अरे हां! हां! आठवला. त्याचा आणि युव्याचा काय संबंध लावला हिनं? ''

'' अगं या चिठ्ठीत बघ त्यानं सगळं लिहलंय. युव्याचाच अंदाज बरोबर होता. या सगळ्याच्या मागं दादासाहेब घाडगे अर्थात इंदरचाच हात होता. मोरवन दुसर्‍या कुणाची नाही याचीच आहे आणि तिचे 50 टक्के शेअर्स सुशाच्या नावावर आहेत. आम्ही ज्याला मोरवनचा मालक भैय्यासाहेब घोरपडे म्हणून ओळखतो तो हाच सुशांत घोरपडे. ''

'' काय सांगतोस जीत? अरे पण हे सगळं राजाला कसं माहीत? ''

'' हे घे तूच वाच म्हणजे तुलाही कळेल सगळं. '' त्यानं ती चिठ्ठी प्रिशाच्या हातात दिली.


जीत,

मी राजन भांबरे. दादासाहेब घाडगेंचा सीए. तुझ्या माहीतीसाठी सुशाचा रुममेट. ही चिठ्ठी मी फारच घाईत लिहतोय. आता मला मारण्याचा त्या लोकांचा प्लॅन फसलाय. त्यांचा म्हणजे दादासाहेब घाडगेंचा. ते कदाचित पुन्हा मला मारण्याचा प्रयत्नही करतील पण तरीही तुम्हांला खरं कळलं पाहिजे म्हणून ही चिठ्ठी पाठवतोय. चिठ्ठी मिळाली की लगेच ऍक्शन घे. नाहीतर मोरवन बिल्डर्स धाम बिल्डर्सला धुळीला मिळवणार. मोरवनचा मालक इंदर घाडगे आहे. त्याचे 50 टक्के शेअर्स सुशा घोरपडेच्या नावावर आहेत. दिक्षित त्यांचा माणूस आहे. हे सगळं मला कसं माहीत हे समजून घ्यायचं असेल तर मी डॉ. संग्राम भानुशालींच्या दवाखान्यात ऍडमीट आहे. जमल्यास येऊन भेट. 

 तुझा मित्र राजन भांबरे


'' बाप रे! यांनी तर फारच मोठी खेळी खेळली रे! काय लोकं आहेत ही? काय मिळालं यांना हे सगळं करुन? आता हे सगळं कळल्यावर काय करायचं आपण? आता वाटायला लागलंय की एकदा श्री जे वागत होता त्यावर संशय घेतला असता तर? एकदा त्या दिक्षितला सगळं कसं कळतं हे शोधायला गेलो असतो तर? जीत आपणच कानपिचके निघालो रे! आपणच मैत्रीला आग लावली आपल्या. आपणच आपले वैरी झालो रे! '' पटकन तिला जवळ घेत जीत म्हणाला '' अमू शांत हो. आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू. आपली मैत्री तोडायला वरुन ब्रह्मा जरी खाली उतरला तरी त्याला जमणार नाही. ''

'' खरं बोललास जीत तू. आता ती वेळ आलीय. या नासक्या बोकडांना दाखवून देऊ आपली मैत्री काय चीज आहे ते! आता तरी आपलं इथलं काम आटपलंय. घरी जाऊ. रात्री युव्या आणि चांदला व्हिडिओ कॉलवर घेऊन बोलू आणि आपली चाल पक्की करु. चला. ''

ऑफिसचं सगळं काम आटपून ते तिघेही घरी परत आले.

...

त्यादिवशी प्रिशा स्वप्नात येऊन गेल्यापासून श्रीला सतत तळमळ लागून राहिली होती. वेळ अवेळ कुठेही काहीही न बघता त्याला सगळीकडे प्रिशाच दिसत होती. त्यादिवशी अमू इशा म्हणाली त्याला प्रिशा ऐकू आलं. जीत जुन्या ऑफिसची सफाई करतोय म्हटल्यावर वाटलं की प्रिशा परत आली असेल; तिला हवंय म्हणून तो हे करत असेल पण नाही तिथंही ती कुठे भेटली? अनिश कुणा मावशीबद्दल बोलत होता वाटलं की अमूची मैत्रीण म्हणून तो प्रिशालाच मावशी म्हणत असेल. पण नाही अमू म्हणाली तो धुणं भांडीवाल्या मावशींबद्दल बोलतोय. काय करु मी आता? कुठे जाऊ हिला शोधायला? प्रिशा थांबव ना गं मला सतावणं. कुठे शोधू मी तुला? तूच सांग तू मला कुठं सापडशील ते! तो ऑफिसात बसल्या बसल्या अस्वस्थपणे खुर्चीला झोके देत विचार करत होता.

'' काय निंबाळकर, काय म्हणताय सगळं ठीक ना! '' आॉफिसच्या दारात उभी राहून प्रिशा त्याची चौकशी करत होती.

तो झटकन् खुर्चीतून उठला आणि तिच्याकडे जाऊन त्यानं तिचा हात घट्ट धरला.

'' आता कुठं जाशील? मला त्रास देऊ नकोस हं प्रिशा. ''

'' काय करणार निंबाळकर? त्यादिवशी उचललास तसा हात उचलशील माझ्यावर? की पुन्हा घराबाहेर काढशील मला? ''

'' प्रिशा, मी मान्य करतोय. मी चुकलोय. आणखी कितीवेळा माफी मागू म्हणजे तुझं समाधान होईल? ''

'' मला नकोय तुझी माफी. ''

'' मग काय हवंय प्रिशा तुला? तू सांग. तुला जे हवं ते मी करेन. ''

'' नक्की करशील? ''

'' आपल्या प्रेमाची शपथ प्रिशा. तू बोल फक्त. ''

'' मी तर केव्हाच सांगितलं मला काय हवंय ते! पण तू अजून साधं पाऊलही टाकलं नाहीयेस त्या दिशेनं. ''

'' मला खरंच सुचत नाहीए गं मी काय करु ते! जाउन आलो मी याआधीही रतनपुरला; पण दिवाकरला नाही माहीत काहीही तुझ्याविषयी. आता तूच सांग काय करु मी अशावेळेस? ''

ती गालात हसली.

'' तू आधीपासून असाच आहेस ना! ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर संशय घेतोस आणि ज्याला नजरेसमोरही धरु नये अशा माणसांवर बिनदिक्कत डोळे झाकून विश्वास ठेवतोस. मी सांगतेय. जा रतनपुरला. दिवाकरला माहीतेय मी कुठाय ते!. ''

ती जायला वळली तसा त्यानं पुन्हा तिचा हात धरला.

'' थांब ना! नको जाऊस. ''

'' काय झालं श्री? कुणाला थांबवतोयस? आणि माझा हात का धरलायस तू? '' त्याचे मालक अरविंदनी विचारलं.

त्यांच्या आवाजानं श्रीच्या लक्षात आलं की त्याने पुन्हा काहीतरी घोळ घातलाय म्हणून.

'' सॉरी सर. थोडी तब्येत ठीक नाहीए. एक-दोन दिवसांची सुट्टी मिळाली असती तर! '' त्यानं वाक्य अर्धवट सोडलं.

'' अरे का नाही मिळणार? नक्कीच मिळेल. आणि तब्येत दाखवून घे. वाटल्यास बरं वाटल्यानंतर ये. ''

'' थॅन्क्यू सर. ''

ऑफिसातून बाहेर पडताना त्याच्या डोक्यात रतनपुरला जाण्याचं प्लनिंग चालू होतं.

...

जुन्या ऑफिसची साफसफाई, डागडुजी, रंगरंगोटी सगळं झालं होतं. आता या नाटकात युवी, चांद आणि वैद्रुतीच्या येण्याची वेळ झाली होती. प्रिशानं फोन करुन चांद आणि युवीला वैद्रुतीला सोबत घेऊन उद्याच यायला सांगितलं. पण त्याआधी त्यांनी राजनच्या सापडलेल्या चिठ्ठीवर चर्चा केली.

'' ए हाय! प्रिशे मला आज परत कॉलेजला गेल्यासारखं वाटतंय. इथे तू, मी, अमू, जीत सगळेच आहोत; फक्त श्री, अभ्या, चेत्याची कमतरता जाणवतेय. '' -युव्या

'' एक गेट टू गेदर करुन सगळे भेटूयात आपण. पण आधी मला पुन्हा एकदा सांग की तुझा इंदरवर संशय का आहे ते! '' -प्रिशा

'' अरे हा काय प्रश्न आहे प्रिशा? तू इतक्या सहज कशी काय त्याची कामं आणि त्याचा ऍटीट्यूड विसरुन गेलीस? तुला माहीतेय का की मी अजूनही तो चहाचा प्रसंग विसरलेलो नाहीये की त्याची ती वाक्यं विसरलेलो नाहीये. तुला आठवतंय ना! श्रीने गरम कडकडीत चहा ओतल्यामुळे त्याचा चेहरा भाजला होता! तेव्हा तो काय म्हणाला होता ते! '' -युवी

'' इंदरला जी गोष्ट आवडते ती तो मिळवतोच आणि नाही मिळाली तर तिला धुळीला मिळवतो. '' जीतनं त्याचं वाक्य पूर्ण केलं.

'' ओ माय गॉड दी! आपकी कहानी मानो सिनेमा होते जा रही है। पर क्या आपको लगता है के इस सबके पिछे इंदर का हाथ है? '' -चांद

'' ते सगळं खरं आहे पण तुम्ही आता ह्या वेळेला ही सगळी चर्चा का सुरु केलीय? काही क्लू लागलाय का तुमच्या हाताला? '' -युवी

'' तुला राजन आठवतोय? '' -प्रिशा

'' कोण गं? '' -युवी

'' अरे राजन भांबरे. कॉमर्सवाला. '' -प्रिशा

'' अरे हां आठवला. त्याच्यामुळंच तर आपण सुशाला पकडू शकलो होतो शेवटच्या वर्षी. ए आयला म्हणजे हापण इंदरला सामील झाला काय साला? मी फार चांगला समजत होतो त्याला. '' -युवी

'' अरे नाही. नाही. राजन नाही. सुशांत. हे बघ. ही चिठ्ठी दिसतेय का तुला? वाचता येतेय? '' -प्रिशा

आधीच चष्मा असलेल्या त्यानं नाही म्हटल्याबरोबर प्रिशाच्या हातातली ती चिठ्ठी जीतनं स्वतःकडे घेतली आणि तो वाचू लागला.

जीत,

मी राजन भांबरे. दादासाहेब घाडगेंचा सीए. तुझ्या माहीतीसाठी सुशाचा रुममेट राजा. मी ही चिठ्ठी खुपच घाईत लिहतोय. आता मला जीवे मारण्याचा त्या लोकांचा प्लॅन फसलाय. त्यांचा म्हणजे दादासाहेब घाडगेंचा. पण, ते मला कधीही मारु शकतील. पण तरीही तुला खरं कळलं पाहिजे म्हणून चिठ्ठी पाठवतोय. चिठ्ठी मिळाली की लगेच ऍक्शन घे. नाहीतर मोरवन बिल्डर्स धाम बिल्डर्सला धुळीला मिळवेल. मोरवनचा मालक इंदर घाडगे आहे. त्याचे 50 टक्के शेअर्स सुशा घोरपडेच्या नावावर आहेत. दिक्षित त्यांचाच माणूस आहे. हे सगळं मला कसं माहीत हे समजून घ्यायचं असेल तर मी डॉ. संग्राम भानुशालींच्या दवाखान्यात ऍडमीट आहे. जमल्यास येऊन भेट.

 तुझा मित्र राजन भांबरे

'' अरे यार यांनी तर खुपच विचारपूर्वक प्लॅनिंग केलीय. '' -युवी

'' हेच या व्हिडिओ कॉलच्या मागचं कारणं आहे. प्लॅनिंगमध्ये माझ्यानंतर तूच आठवतोस मला. तर आता काय करावं असं तुला वाटतं ते सांग. त्याआधी दोन गोष्टी; एक म्हणजे जुन्या ऑफिसचं सगळं काम झालंय. तुम्ही दोघंही वैद्रुतीला घेऊन उद्याच पोचा इथे. आता मला हे सांगायचं नाही की हातातलं काम संपवू दे म्हणून. कारण, तुम्ही इथं येणार हे आधीच ठरलं होतं. '' युवीनं पलिकडून मान हलवली.

'' आता दुसरी गोष्ट. मी दिक्षितचा पत्ता शोधलाय. त्याचं पुढं काय करायचं ते सांग. '' -प्रिशा

''तू मला एवढा मान दिलास त्यानं माझी कॉलर ताठ झालीय. आता तू दिक्षितचा पत्ता शोधलाच आहेस तर त्याच्यामागे एक माणूस लावून टाक. तो काय करतो? कुठे जातो? कुणाला भेटतो? या सगळ्याचा पत्ता लाव. याशिवाय इंदर आणि सुशाचे कार्यक्रम कळले तर आणखी चांगलं होईल. हे सगळं कळलं की एकाच फटक्यात सगळ्यांना ते तसं करु; तू काय म्हणायचीस ते कॉलेजला असताना? '' -युवी

'' एकच वार आणि टांगा पलटी घोडे फरारऽऽऽ! '' अमू ओरडली. ''

'' अरे ही बोलते होय? मला वाटलं जीतनं हिला मुकी केली की काय? '' सगळे एकदम हसायला लागले.

इथे जसा यांचा प्लॅन ठरला होता दिक्षित आणि घाडगे कंपनीचा पर्दाफाश करायचा तसाच तिथे श्रीचाही प्लॅन ठरला होता; प्रिशाच्या शोधात पुन्हा रतनपुरला जाण्याचा.

स्वरा... 23/01/2021

७३

श्री आज नाश्त्याच्याही खूप अगोदर आला होता. अमू नुकतं कुठं चहाचं आधण गॅसवर चढवत होती.

'' काय रे! आज इतक्या लवकर कसा काय आलास तू? ''

'' अगं कामचं तसं होतं. माझी एक मदत करशील प्लीज! ''

'' अरे बोल ना! काय करायचंय? ''

'' काही नाही गं, अनुला दोन दिवस सांभाळशील का? ''

'' असं काय विचारतोस? तो आमचाच आहे. पण का रे? तू कुठे बाहेर चाललायस का? ''

'' हो गं. जरा ऑफिसच्या कामासाठी चाललोय मुंबईला. ''

'' बरं! पण उद्या गेलास तर नाही चालणार का? ''

'' का गं? काय झालं? अनुची व्यवस्था करु का दुसरीकडे? ''

'' काहीतरीच काय श्री! त्याच्यासाठी मी का असं सांगेन तुला? अरे, आज ना जीतची ती कानपूरवाली पार्टनर येणार आहे ना! मग जीतचा विचार चालला होता की आज एक छोटीशी वेलकम पार्टी ठेवूयात म्हणून. तू असतास तर बरं झालं असतं ना! तुझीही भेट झाली असती. ओळखपाळख असलेली बरी असते ना! ''

'' नाही गं! मला जावंच लागणार आहे. माझ्याकडून सॉरी सांग जीतला. ''

'' बरं ठीक आहे. नीट जा. अनुची काळजी करु नकोस. तू तुझ्या कामावर लक्ष दे. ''

'' थॅन्क्स अमू. '' अनुला तिच्या हवाली करुन नाश्ता वाटेत करेन मी आता भूक नाहीए; फक्त चहा दे असं म्हणून चहा घेऊन श्री निघून गेला.

श्रीनं अनुला अर्धवट झोपेतूनच उचलून आणला होता. तो सोफ्यावर बसल्या बसल्या तिथंच आडवा झाला. अमूनं त्याला उचलंल आणि वर नेऊन प्रिशाच्या शेजारी झोपवलं. आता ती तिची रोजची कामं आटपण्याच्या मागे लागली.

प्रिशा आज रोजच्यासारखी लवकर उठली नव्हती. शेजारी झोपवलेल्या अनुनं चळचळ करता करता तिच्या अंगावर पाय टाकला. वैद्रुतीच्या अशा चाळ्यांची सवय असणार्‍या प्रिशानं त्याला जवळ ओढून अणखीनंच कुशीत गुरफटून घेतला. अनु अनेक महीन्यांनी असा आईच्या कुशीत झोपल्यासारखा झोपला होता. नंदिता गेल्यापासून तर तो श्रीच्याच कुशीत झोपायचा. प्रिशानं त्याला जवळ ओढलं तसा तो झोपेतच बडबडला, '' आई, तू कुठे गेली आहेस? तू कधीच परत येणार नाहीस का गं? आई तू परत ये ना गं! अनुला तुझी खूप आठवण येते गं आई! ''

त्याच्या त्या बडबडण्यानं जागी झालेल्या प्रिशानं पाहिलं की अनु तिच्या कुशीत झोपलाय आणि झोपेतच बडबडतोय. त्याची ती बडबड ऐकून तिला गहिवरुन आलं तिनं त्याला उराशी कवटाळलं आणि त्याच्या डोक्या वरुन हात फिरवत म्हणाली, '' अनु, मी इथेच आहे बाळा. मी कुठेच गेले नाही हं! ''

श्रीची गाडी ज्या वेगानं चालली होती त्याहीपेक्षा वेगानं त्याचे विचार रतनपूरला जाउन पोचले होते. त्यानं ठरवलं होतं दिवाकरला भेटल्यावर त्याला काय काय विचारायचं, कसं विचारायचं ते! पण काहीही झालं तरी आता प्रिशाला जिथं असेल तिथून शोधून काढायचंच असा त्याचा निश्चय झाला होता.

विमान हळूहळू रनवेवर उतरलं. काही वेळ रनवेवर धावल्यानंतर ते थांबलं. तोवर तिकडे विमानाच्या येण्याची घोषणा झाली होती. विमानाचं दार उघडलं. एक एक करत सगळे प्रवासी खाली उतरुन तिथं उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसले. त्या बसने त्यांना विनानतळाच्या आत जाणार्‍या दारापर्यंत आणून सोडलं. त्या प्रवाशांमध्ये युवराज आणि चांदनीपण होते. वैद्रुती युवराजच्या खांद्यावर छान झोपली होती. सामानाची तपासणी वगैरे सगळं होऊन ते बाहेर पडले. कॅब केली आणि जीतच्या घराकडे निघाले.

आज श्रीच्या येण्याची कुणकुण नसल्यानं प्रिशा खालीच हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसून नाश्ता करत होती. छान हसत खेळत सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या तर अचानक प्रिशानं अमूला विचारलं, '' काय गं हा असा सकाळीच कसा काय आला आज? ''

'' अगं त्याचं काय झालं की श्रीला त्याच्या... '' ती पुढे आणखी बोलणारच होती तेवढ्यात अनुनं प्रिशाला विचारलं, '' मौसी आप मेरी ममा बनोगी? ''

सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. प्रिशा त्याला काही सांगणार तेवढ्यातच युवराजच्या खांद्यावरुन उतरलेली वैद्रुती ' ममा! ममा! करत तिच्याकडे धावली, तिनंही हातातली डिश तशीच खाली ठेवत पटकन वैद्रुला उचलून घेतलं.

'' ओ ले मेला बच्चा! कैसा है मेरा बेटा. ममा नें वैद्रुको बहोत मिस किया। ''

'' हां ममा, वैद्रुनेंभी ममा को बहोत मिस किया। ''

त्यांचा तो प्रेमालाप पाहणारा अनु ताडकन् उठला आणि निघून गेला हे प्रिशानं पाहिलं. तिनं हळूच वैद्रुतीला खाली उतरवलं.

'' बेटा आप इन सबसें मिलो, मैं बस अभी आई। '' असं तिला सांगून ती बाहेर गेलेल्या अनुच्या मागोमाग गेली.

'' वैद्रु, ये बेटा. हा तुझा जीतकाका. '' युवराज तिला सगळ्यांची ओळख करुन देत होता.

'' आणि ही तुझी काकीमावशी अमू. ''

'' अरे, तिला मराठी समजते का? तू काय तिच्याशी मराठीत बोलतोयस? '' अमूनं न राहवून त्याला विचारलं.

तशी तिच्या पुढ्यात उभ्या असलेल्या वैद्रुतीनं तिचा गालगुच्चा घेतला आणि म्हणाली, '' काकी मावशी डोन्ट वरी. मला येतं मराठी. आई, काका, नानीमौसी सगळे मराठी बोलतात ना! ''

'' अगं माझं पिल्लू गं ते! '' असं म्हणून जीतनं तिला उचलून घेतलं.

'' आता आईनं कुठंही नेलं तरी अजिबात जाऊ नकोस हं तू! माझ्याकडेच रहा. माझ्या इरुसोबत आपण लग्न लावू तुझं. ''

'' अरे काका, तू किती वेडा आहेस. मला आधी आईएवढी मोठी तर होऊ दे. आणि ह्या टिंग्यासोबत कोण लग्न करेल? छीः मी नाही करणार बाबा. ''

वैद्रुतीच्या या उत्तरानं तिथं बसलेल्या सगळ्यांच्या हास्याचा स्फोट झाला.

प्रिशा रागानं बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसलेल्या अनुच्याशेजारी येऊन बसली.

'' काय झालं अनु? ''

'' मी तुझ्याशी नाही बोलणार. ''

'' का पण? ''

'' तू मला आधी का नाही सांगितलंस की तुझ्याकडे आधीपासून एक मुलगी आहे म्हणून? ''

'' आणि जर मी सांगितलं असतं तर काय झालं असतं? ''

अनुनं आता दोन्ही पाय वर घेऊन मांडी घातली आणि तिला समजवायला लागला.

'' माझ्याकडे आई नाहीये कीनी! मला तू आवडलीस म्हणून मला वाटलं की तू माझी आई व्हावंस. आता जर तुझ्याकडे आधीच एक मुलगी आहे हे माहीत असतं तर मी माझ्यासाठी दुसरी आई शोधली असती ना! ''

त्याचा मुद्दा काही अगदीच गहाळ टाकण्यासारखा नव्हता.

'' पण का अनु? तुला एकटंच रहायचंय का? तुला बहीण नकोय का? '' अनु प्रिशाच्या तिढ्यात अडकून तो सोडवण्याचा विचार करत होता तोवरच वैद्रुती तिथे आली. ती तशीही अनुपेक्षा मोठी होती.

'' आई, हा आपला अनु का गं? ''

प्रिशानं गालात हसून मान डोलवली. वैद्रुनं एकदम त्याचा हात पकडला आणि दुसर्‍या हातानं कान पकडत ती म्हणाली, '' तू रुसलास का अनु माझ्यावर? मी एकदम सॉरी हं! चला ना आपण जाऊन खेळूया. ''

तिच्यासोबत खेळायला जाताना मागे वळून अनु प्रिशाला म्हणाला, '' ही बहीण मला चालेल मावशी. ''

त्या दोघांना असं हातात हात घालून खेळायला जाताना बघून प्रिशाला आनंदाचं भरतं आलं आणि ती झोपाळा झुलवत गाणं गुणगुणायला लागली.

...

श्री रतनपुरला पोचला. वेशीवर आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्याची गाडी गर्ल्स हॉस्टेलवर जाण्याआधी त्या त्या ठिकाणी जाऊन आली जिथे जिथे तो प्रिशाला भेटला होता. त्याच्या स्मृतींमध्ये कॉलेजातले सगळे प्रसंग जसेच्या तसे जागे झाले. तो पुला पलिकडच्या बॉईज हॉस्टेलच्या दारात आला आणि त्याला आता जाण्याची फार इच्छा झाली. त्यानं गाडी एका बाजूला घेतली. खाली उतरला आणि दगडी पायर्‍या चढून आत गेला. आत जाऊन एकदा सगळ्या हॉस्टेलभर नजर फिरवली आणि तो मोठ्या जिन्याच्या पायर्‍या चढून त्याच्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. आतमधले अर्ध्या चड्डीतले दोन्ही मुलगे ह्या आगंतुकाला बघून बावचळले. तरी त्यातल्या एकानं पटकन स्वतःला सावरुन कमरेला टॉवेल गुंडाळून पुढे येत त्याला विचारलं, '' कोण तुम्ही? काय हवंय? कुणाला भेटायचंय? काय काम होतं? खाली दुडके भेटला नाही का तुम्हांला? ''

त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचं काहीचं उत्तर न देता तो नुसताच हसला आणि खाली निघून गेला.

'' येडा होता काय हा! '' असं म्हणून ते दोघेही न झालेल्या जोकवर हसले.

तिथे आता दुडकेच्या जागेवर दुडकेचा मुलगा लागला होता. श्री वर गेला तेव्हा तो तिथं नव्हता पण तो बाहेर जाताना मात्र तो आपल्या खुर्चीत बसलेला होता.

'' काय पाव्हणं कुठून आलासा? काय पायजेल होतं? न्हाय म्हंजी डायरेक्ट वर गेलायसा? काई इचारायची पध्दत बिध्दत असती का न्हाई ओ? ''

'' काही नाही. जुन्या आठवणींना शोधत इथे आलो होतो. काही इथंच सोडून गेलो होतो जाताना. म्हटलं मिळतायत का बघावं म्हणून आलो होतो. ''

आणि तो निघून गेला. दुडकेला कशाचाही काही अर्थ लागला नाही. श्री जेव्हा गर्ल्स हॉस्टेलवर पोचला तेव्हा दिवाकर नुकताच जेवायला बसत होता.

'' अरे, या या साहेब. या जेवायला. ''

'' नाही दिवाकर. माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. तुझं जेवण झालं की बोलू आपण. ''

असं म्हणून श्री पुन्हा बाहेर गाडीत जाऊन बसला.

स्वरा... 

25/01/2021

..........

*74*

'' प्रिशे तू काय केलंस दिक्षित प्रकरणाचं? '' - युवराज

'' अरे कुठं काय करायला वेळ मिळाला मला? काल तर तुला सगळं प्रकरण सांगितलं मी आणि आज तुम्ही आलाय. '' - प्रिशा

'' बरं झालं. म्हणतात ना! जे होतं ते चांगल्यासाठीच. '' - युवराज

'' म्हणजे? '' - प्रिशा

'' म्हणजे दी त्याला म्हणायचंय की आता आपल्याला याच्यावर नीट विचार करायला वेळ मिळेल. तू आधीच काही ऍक्शन घेतली असतीस तर कदाचित ती फार घाई झाली असती. '' - चांदनी

'' अरे वा! तुला तो न बोलताही त्याला काय म्हणायचंय हे बर्‍यापैकी कळायला लागलं की चांद! '' - प्रिशा

'' आता काय करणार दी? तूच मला सोडून आलीस ना याच्यासोबत! सोबत रहायचं म्हटल्यावर समजून घेणं आलंच! '' - चांदनी

'' प्रिशे, ही किती छान मराठी बोलतेय. वाटतंच नाही की ही तिकडे कानपुरात जन्माला आलीय म्हणून. '' - जीत

'' अरे तिला बर्‍याच भाषा येतात. आता तर युव्याच्या संगतीत राहून जर्मनही शिकलीय. '' - प्रिशा

'' तुमच्या भेटीगाठीच्या गप्पा झाल्या असतील तर आपण मूळ मुद्द्यावर यायचं का? मला ती चिठ्ठी दे प्रिशा. '' युवराजनं त्यांना त्यांच्या गप्पांमधून बाहेर काढून महत्वाच्या विषयावर आणलं.त्यानं शांतपणे ती चिठ्ठी वाचली आणि तिला विचारलं, '' आता मला सांग तू या सगळ्यावर काय विचार केलास ते! ''

शेजारी बसलेल्या चांदच्या कानात जीत हळूच पुटपुटला, '' आता बघ हं! ह्या दोघांचा खेळ चालू झाला. हे असले धंदे ही दोघंजण कॉलेजला असल्यापासून करतायत. आमच्या पहिल्याच भांडणात हा रेडा मध्यस्थी होता आणि सोबतीला ही आमची महामाया. सगळेच असले. एकापेक्षा एक अवलादी कार्टी! ''

जवळच बसलेल्या अमूचं चांदच्या कानात कुजबुजणार्‍या जीतकडे लक्ष गेलं तसा तिनं त्याला एक फटका दिला आणि ओढून स्वतःच्या बाजूला सरकवून घेतलं. चांद नुसतीच गालात हसली.

'' मी काल हातात पडल्यापासून ही चिठ्ठी किमान 4-5 वेळा तरी वाचलीय. ''

'' हं! पुढे. ''

'' मला असं वाटतंय की सगळ्यात आधी आपण राजनला शोधावं. ''

'' जीत तू काय करशील? '' त्यानं प्रिशाचं वाक्य मध्येच तोडत जीतला विचारलं.

'' अं! मी? मीऽऽऽ सरकार तुम्ही म्हणाल ते! '' असं म्हणून त्यानं चांदनीला इशारा केला. ' बघ, मी काय म्हणालो होतो? '

'' बरं मला सांग तुमचा डॉक्टर असेल ना फॅमिलीवाला एखादा? ''

'' अरे म्हणजे काय! सव्वाल का भाई! आहे तर. डॉक्टर वैकल्प. '' जीत एकदम कॉलेज मोडवर गेला.

'' हां, तू कॉलेजमधून बाहेर ये. आणि मला सांग हा डॉ. वैकल्प या डॉ. संग्राम भानुशालींना ओळखत असेल ना! ''

'' अरे, डॉक्टर डॉक्टर एकमेकांना ओळखत असतात रे! आपण जाऊन बघूया. '' - जीत

'' आता नीट लक्षात घे. तुला दोन कामं एकाचवेळी करायचीत. एक म्हणजे हिला श्रीच्या नजरेत येऊ द्यायचं नाहीए त्यामुळे तू त्या दिक्षितच्या मागे तुझा माणूस सोड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जाऊन या डॉ. वैकल्पला भेटू आणि त्याच्यामार्फत ओळख काढून डॉ. भानुशालींना भेटता येतंय का ते पाहू. '' - युवराज

'' युव्या थांब. ते माणूस सोडायचं काम मी करते. मी त्यामुळे काही श्रीच्या नजरेत येणार नाही. मला फक्त एक फोन करावा लागणार आहे आणि माझं काम होईल. '' - प्रिशा

'' बरं ठीक आहे.ही हे काम करतेय तर चल आपण जाऊया वैकल्पकडे. कदाचित राजनचा पत्ता तिथूनच लागेल आपल्याला. '' - युवराज

'' पण, मला काय वाटतंय युवराज की आपण एवढी झिगझिग का करायची? हिनं ना, दिक्षितच्या फोन नंबरवरुन त्याचा पत्ता डिरेक्टरीतून शोधून काढलाय. आपणही तसंच करुया ना! सी.ए. असणार्‍या लोकांच्या ऑफिसेसचे नंबर शोधू. त्यातून राजन वेगळे काढू आणि मग फोन करुन त्यातनं आपल्याला हवा तो राजन शोधून काढू. '' - जीत

'' जीत आय हॅव नो डाऊट की तुझ्याकडे मेंदू आहे म्हणून आणि तो कधी कधी चालतोही. पण एक लक्षात घे की टेक्नॉलॉजी खूप पुढे निघून गेलीय. मी त्या डॉ. भानुशालींना फक्त नावावरुन असेल तिथून शोधून काढूच शकतो. बट मला चेनच्या कड्या कनेक्ट करायच्यात म्हणून आपण व्हाया व्हाया चाललोय. नाहीतर डायरेक्ट जाऊन भानुशालींना भेटणं माझ्यासाठी अवघड नाहीए. '' - युवराज

'' हां! तू भेटशील रे, बॉन्डच्या काफिल्यात होतास ना आधी. पण त्या चिठ्ठीचं काय करायचं? तिला तर आता किमान किमान 5-6 वर्षं उलटून गेलीत ना! '' - जीत

'' देन? व्हॉटस् द बिग प्रॉब्लेम? '' - युवराज

'' असं काय करतोस जीत! हॉस्पीटलची स्वतःची रेकॉर्डस् असतात. '' प्रिशानं प्रश्न विचारुन त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

'' चला. ठरलं तर मग हे आपलं मिशन भांडाफोड आतापासूनच सुरु झालं. '' - युवराज

'' ए युव्या पण तूही काळजी घे रे! श्रीच्या दृक्ष्टीपथात येऊ नकोस बाबा! तो तर तुला माहीत आहे ना कसा सुतावरुन स्वर्ग गाठतो ते! '' - अमू

'' नॉट टू वरी डिअर. आय कॅन हॅन्डल इच सिच्युएशन. '' त्यानं अमूच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं.

'' युवड्या चल गुमान. ती माझी बायको आहे. तू तुझ्या होणार्‍या बायकोला सांभाळ ना! '' जीत त्याला हाताला धरुन ओढत घेऊन गेला. प्रिशानं नुसतेच चांदकडं भुवया वर करुन कोपर्‍यातून बघितलं. जीतच्या त्या वाक्यानं तिच्या गालांवर गुलाब फुलले होते, डोळ्यांत लाज उतरली होती, मनाला गुदगुल्या होत होत्या हे सगळं प्रिशाच्या लक्षात आलं. तिनं हळूच अमूला कोपरखळी मारली.

'' काय चांद, आमचा युवराज आवडला का तुला? '' अमूनं अचानक तिला विचारलं आणि ती उत्तर द्यायचं सोडून तिथून उठून निघून गेली.

'' काय म्हणतेस अमे, जोडा बरा वाटतोय ना? ''

'' अगं हे काय विचारणं झालं होय? पण त्यांच्यातलं अंतर? ''

'' अंतराचा विचार कशाला करतीस! लग्न करण्यासाठी महत्वाच्या सगळ्या गोष्टी जुळतायत का ते बघणं महत्वाचं. आणि इथे त्यातले बरेच मुद्दे जुळतायत. आता फक्त कोण पुढाकार घेतंय ते मला बघायचंय. नाहीच तर मी येताना माऊला यांच्याबद्दल सांगून आलेय ती काय म्हणतेय ते बघायचं. ''

यांच्या अशा चांदनी आणि युवराजच्या संदर्भातल्या गोष्टी चाललेल्या आणि बाहेर गेलेली चांदनी मात्र त्या गप्पा चोरुन ऐकताना स्वतःशीच खूष होत होती.

...

दिवाकरचं जेवण होईपर्यंत श्री जाणूनबुजून बाहेर जाऊन गाडीत बसून राहिला. दिवाकरला मात्र त्या सगळ्या प्रकारानं अगदीच लाजल्यासारखं झालं. त्यानं कसंबसं चारदोन घासांत जेवण आटोपतं घेतलं आणि दारात जाऊन श्रीला हाक मारली. श्री आत आला. खुर्चीवर बसला आणि त्यानं सरळ मुद्द्यालाच हात घातला.

'' दिवाकर, त्या दिवशी प्रिशा इथं आली होती ना! ''

त्याच्या ह्या प्रश्नानं दिवाकरनं चमकून मंदाकडं पाहिलं.

'' साहेब, तुमी कदीची गोष्ट करताय? ताईंना जाऊन तर सहा वर्षं उलटून गेलीत. '' - दिवाकर

'' हो. माहीतीय मला. मी त्या सहा वर्षांपूर्वीच घडलेल्या घटनेबद्दल विचारतोय. '' - श्री

'' काय चेष्टा करता काय साहेब गरीबाची? '' - दिवाकर

'' दिवाकर मी सिरिअसली विचारतोय. प्रिशा इथून कुठे गेली? '' - श्री

'' साहेब आवो असं काय करता? मी तवापण तुमाला सांगितलं होतं की ताई हिथं आल्याच नाहीत तर कुठं जातील कशा? '' - श्री

'' दिवाकर तू माझ्या पेशन्सचा अंत पाहू नकोस. मला माहीतेय त्यादिवशी प्रिशा इथंच आली होती. ती इथूनच कुठंतरी निघून गेलीय आणि ती कुठं गेलीय हे तुलाच माहीत असलं पाहिजे कारण तू तिचा विश्वासातला माणूस आहेस. ''

दिवाकर मात्र अजूनही कानांवर हात ठेवत होता. तो हे कबूल करायला तयारच नव्हता की त्यानं तेव्हा प्रिशाला पाहिली.

'' साहेब, आवो मी खरंच सांगतोय. मला ताईंबद्दल काहीच माहीत नाही. '' - दिवाकर

काहीही कळण्याच्या आधीच श्री खटकन् उभा राहिला. दिाकरच्या अंगावर धावून जात त्यानं त्याचा गळाच धरला.

'' खरं बोल दिवाकर; खरं बोल. सांग मला प्रिशा इथंच आली होती ना! ती इथून कुठे गेली दिवाकर? मी शोधतोय तिला केव्हापासून! मला माहीतीय की तुलाच तिचा ठावठिकाणा माहीत असणार. ''

श्रीच्या अशा वागण्यानं दिवाकरही इरेला पेटला.

'' नाही सांगणार साहेब. आता तर माहीत असलं तरी सांगणार नाय मी. भलं तुमी मला जीवं मारलंत तरी चालंल; पन मी नाही सांगणार ताई कुटं गेल्या ते! ''

'' दिवाकरऽऽऽऽ! '' असं जोरात ओरडून श्रीनं सगळ्या ताकदीनिशी त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. त्याचा श्वास कोंडला आणि तो जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. मंदाला कळेना काय करावं ते! नवर्‍याचा जीव जाताना नुसतंच बघत राहणं तिला अशक्य झालं. ती धावतच श्रीच्यासमोर आली.

त्याच्यासमोर पदर पसरुन म्हणाली, '' साहेब, साहेब त्यास्नी सोडा साहेब. त्यांची यात काय बी चुकी नाय. ताईंनी त्यांना मना केलंतं सांगायला. झालं तरी म्या सांगते ताई कुटं गेल्या त्ये पर माज्या नवर्‍याला सोडा साहेब. '' ती हीनदीन होऊन श्रीची विनवणी करत होती. पण, जीव जाण्याच्या बेतात असतानाही दिवाकरचा विश्वास काही तुटत नव्हता.

तो तशातही जीव एकवटून तिच्यावर खेकसला, '' मंदेऽऽऽ! खबरदार जर एक शब्द जरी बोललीस तर! माजी शपथ हाय तुला. ह्या मानसाला सांगनार व्हय तू ताई कुटं गेल्या त्ये? ज्यानं गेल्या सा वर्सात माज्या ताईस्नी मागारी वळून पाह्यलं न्हाई त्येला? ह्या असल्या दगडाच्या काळजाच्या मानसाला तू अजाबात काई सांगायचं न्हाईस. भले आज तुजा नवरा मेला तरी भेत्तर! ''

अचानकच श्रीची त्याच्या गळ्यावरची पकड सैल झाली. त्यानं दिवाकरचा धरलेला गळा सोडून दिला आणि दिवाकर तोल जाऊन खाली पडला. मंदानं पटकन् पुढं होऊन त्याचा तोल सावरला. अनपेक्षितपणे श्रीनं पुढे येऊन दिवाकरचे पाय धरले.

'' दिवाकर, दिवाकर मी मान्य करतो की मी चुकलोय. सगळी चूक माझी होती. मी तुझ्या ताईचा विश्वासघात केला. मी तिच्या प्रेमाला समजून घेऊ शकलो नाही. दिवाकर प्लीज असं करु नकोस. मला तिचा पत्ता सांग. मी तिला शोधून काढेन आणि तिची माफी मागेन. पण मला एक संधी दे दिवाकर. प्लीज, एक संधी दे. ''

त्याला असा हात जोडून विनवण्या करताना बघून मंदाच्याच काळजाला पाझर फुटला.

'' आवो, असं निस्तं बगत काय र्‍हायलाय तुमी? त्यास्नी पत्ता सांगा की! जरा बगा तरी त्येंच्याकडं; माजं आयका. मानसं बदलत्यात परिस्थितीच्या रेट्यानं. सांगा त्यास्नी ताई कुटं गेल्या ते! ''

दिवाकरनं त्या हात जोडून गुडघ्यावर बसून विनवणी करणार्‍या श्रीकडे पाहिलं. त्याच्याही ती गोष्ट लक्षात आली की तो श्री आणि हा श्री यात खरंच परिस्थितीनं फार मोठा बदल घडवून आणलाय. त्यानं मनात विचार केला मंदा म्हणती ते खरंच हाय मानसं बदलत्यात.

त्यानं झटकन् श्रीचे हात धरुन त्याला उठवलं. पुन्हा खुर्चीवर बसवलं. मंदानं आणलेला पाण्याचा तांब्या त्याच्यासमोर धरला आणि म्हणाला, '' घ्या पाणी प्या. साहेब तुमचा अंदाज अगदी खराय. त्यादिवशी प्रिशा ताई हिथंच आल्या हुत्या. पण दुसर्‍या दिवशी फाटेच्या फ्लाईटनं त्या कानपुराला निघून गेल्या बघा. ''

स्वरा...

 26/01/2021

..........

*75*

वैकल्पनं नंदिताला दिलेल्या वचनाप्रमाणे अनाहिताशी लग्न केलं होतं. आता ते दोघे मिळून हे हॉस्पीटल चालवत होते जे नंदिता आणि वैकल्पनं उभं केलं होतं. जीतनं आधी फोन करुन वैकल्पला तो भेटायला येतोय असं सांगून त्याची वेळ घेऊन ठेवली होती. जीत भेटायला येतोय हे ऐकूनच वैकल्पला आश्चर्य वाटलं होतं. गेल्या अनेक वर्षांत तो असा स्वतःहून कधी भेटायला म्हणून आलाच नव्हता. नाही म्हणायला वैकल्प त्याचा जवळजवळ फॅमिली डॉक्टर झाला होता. अमूपासून ते सदाकाकांपर्यंत जरा कुणाचं खुट्ट झालं की सगळ्यात आधी वैकल्पला हाक मारली जाई मग बाकी गोष्टींकडे बघितलं जाई. आता अचानकच जीत असा अगदी वेळ वगैरे घेऊन भेटायला येतोय म्हटल्यावर वैकल्प विचारताच पडला होता. ते जेव्हा कधी भेटत तेव्हा तेव्हा तो जीतला म्हणत असे की आपले जुने लोक फार शहाणे होते. उगाच नाही त्यांनी म्हणून ठेवलेलं ' गरज सरो न् वैद्य मरो! ' म्हणून. तुला काय किंवा इतरांना काय; माझी आठवण फक्त आजारी पडल्यावरच होते. आज तो असाच भेटायला येतोय ही त्याच्यासाठी खरंच नवल वाटण्यासारखी गोष्ट होती.

जीत दुपारची त्याची व्हिजीटला न जाण्याची वेळ बघून आला. आल्या आल्या त्यानं वैकल्पच्या समोर स्टीलचा छोटा डबा ठेवला. त्यानं प्रश्नार्थक मुद्रेनं जीतकडे पाहिलं.

'' अरे, उघड तरी ना! आधीच काय असा प्रश्नचिन्ह लावतोस? ''

त्याच्या सांगण्यावरुन वैकल्पनं डबा उघडला तर आत मैद्याचे लाडू होते. त्याचे डोळे लकाकले. पण तो काही बोलण्याआधीच जीत म्हणाला, '' अमूच्या लक्षात आहे तुला हे आवडतात म्हणून. तू आणि इरुसाठी म्हणून खास बनवलेत तिनं. ''

तोंडात लाडूचा बोकणा भरत वैकल्प म्हणाला, '' हं, हं! तॅन्क्यू मन तिला. ''

'' आधी संपव तोंडतलं हावर्‍या. मग बोल. ठसका लागायचा. ''

तरी शेवटचा घास गिळताना त्यानं विचारलंच, '' ऑज कशी काय वाट चुकला तू? ''

'' अरे तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं. ''

'' तरीच म्हटलं तुला अशी अचानक माझी आठवण कशी झाली? हे लाडू काय फी म्हणून आणलेस की काय? आणि हे सोबत कोण तुझ्या? '' एका मागोमाग प्रश्नांची सरबत्ती सुरु होती वैकल्पची.

'' मध्ये जागा ठेवलीस तर मी सांगेन मी कशासाठी आलो ते! हा माझा कॉलेजचा मित्र आणि आता कदाचित प्रिशाच्या बहीणीचा होणारा नवरा युवराज देशमुख. ''

'' आं, कदाचित म्हणजे? आणि प्रिशाला बहीण कुठून आली? माझ्या माहितीप्रमाणे तर ती एकटीच ना! ''

'' हो. हो. ती एकटीच. बाकीही सगळं कळेल तुला पण, आता नाही वेळ आल्यावर. सध्या तरी तू माझी एक मदत कर. ''

'' अमूनं पाठवलेल्या लाडवांसाठी तुझी मदत नक्कीच करु शकतो मी. बोल काय करु? ''

'' तू डॉ. संग्राम भानुशालींना ओळखतोस का? ''

'' हो. अरे भान्या माझा खूप चांगला मित्र आहे मेडिकल कॉलेजपासूनचा. पण, तो तर अस्थिरोगतज्ञ आहे. तुला त्याला कशाला भेटायचंय? काका, काकू, अमू, तू सगळे बरे आहात ना! '' वैकल्पनं लगेच शंका काढली.

'' शेवटी डॉक्टरचं ना तू! तुझ्यात डोक्यात हे असलंच काहीतरी यायचं. अरे, सगळे छान आहेत. कुणाला काहीही झालेलं नाही. आता मी सांगतोय ते नीट ऐक. आणि हो यातली एकही गोष्ट इतक्यात श्रीच्या कानांपर्यंत जाता कामा नये. प्रिशा परत आलीय. ''

'' क्काय? '' ही बातमी ऐकून वैकल्प उडालाच.

'' हो. बरोबर ऐकलंस तू. ती परत आलीय. तिला येऊन आता जवळपास पंधरवडा झालाय. ती, तिची बहीण, मी आणि हा युवराज; आम्ही सगळे मिळून त्या मागच्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतोय. ''

'' कुठल्या? श्रीनं प्रिशाला घराबाहेर काढलं होतं त्याच्याबद्दल बोलतोयस का तू? त्यात काय प्रकरण होतं? त्याचा काय छडा लावायचा? ''

'' याचे ना चांदनीसारखे प्रश्न संपतच नाहीत. '' बर्‍याच वेळानंतर युवराज पहिल्यांदा काहीतरी बोलला.

'' तू बाकीच्या गोष्टी राहू देत रे! मी सांगितलं ना तुला की वेळ आल्यावर सगळं कळेल म्हणून! मग आता तू त्या डॉ. भानुशालीची वेळ घेऊन ठेव. आपण त्यांना भेटायला जाऊ. ''

'' भान्याची कसली वेळ घ्यायची? थांब आताच फोन करतो त्याला. '' असं म्हणून वैकल्पने फोन लावलादेखील.

'' हॅलो भाना! आहेस का रे ओटीत? ''

'' हो आहे की बोल ना! ''

'' बरं मग तुझे पेशंट आटपून घे. तासाभरात पोचतोय. तुला भेटायला काही माणसांना घेऊन येतोय. '' फोन ठेवत वैकल्पनं स्वतःला लागलेला आश्चर्याचा झटका डॉ. संग्रामकडे ट्रान्सफर केला होता. आता तो विचारात पडला होता की वैकल्प नक्की कुणाला घेऊन येतोय आपल्याला भेटवायला? त्यानं नर्स अलकाला ओटीत कितीजण आहेत? काही मेजर प्रॉब्लेम असणारं कुणी आहे का? ऍक्सीडेन्टची वगैरे कुठली केस नाहीए ना! हे विचारुन घेतलं. तशी फार गर्दी नसल्यानं तो वैकल्प येण्याच्या आधीच ओटीतून फ्रि झाला. तासां- दीड तासांत वैकल्प जीत आणि युवराजला घेऊन तिथे पोचला.

'' ये ये वैकल्प. तुझीच वाट बघत होतो. काय म्हणत होतास तू फोनवर? कुणाला भेटायला घेऊन येतोस म्हणून? ''

'' हे काय! याच दोघांना तुला भेटायचं होतं. हा जीत जैतकर आणि हा युवराज देशमुख. ''

'' बोला ना! काय काम होतं? ''

त्यानं असं विचारताच युवराजनं खिशात हात घालून एक पाकिट बाहेर काढलं.

'' हे तुमच्या हॉस्पीटलचं आहे ना! ''

'' बघू बरं! '' त्यानं युवराजकडून ते पाकिट घेतलं आणि नीट पाहिलं.

'' हो. हे आमच्याच हॉस्पीटलंचं आहे. पण हे फार जुनं, म्हणजे तरी 5-6 वर्षांपूर्वीचं आहे. ''

जीत आणि युवराजच्या चेहर्‍यावर स्मित पसरलं; पण वैकल्प अजूनही या सगळ्यांपासून अनभिज्ञच होता.

'' म्हणजे तुम्ही हे ही ओळखाल! '' त्यातनं पिवळसर झालेला कागद काढून तो संग्रामच्या हातात देत युवराजनं विचारलं.

त्याने तो कागद उलगडून नीट वाचला. चष्मा सारखा करत तो परत परत वाचत काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता. दोन- तीनदा वाचल्यानंतर त्यानं अचानक जीतकडे बघत विचारलं, '' म्हणजे तुम्हीच का ते धाम बिल्डर्सचे जीत जैतकर? ''

'' हो मीच. या चिठ्ठीत ज्याच्याबद्दल लिहिलंय तो जीत जैतकर मीच. ''

'' अहो पण ही चिठ्ठी अशी अचानक आता कुठून पैदा झाली? तेव्हा तर मी त्या माणसाला डिस्चार्ज दिल्यानंतरही दहा-पंधरा दिवस तुमच्या येण्याची वाट पाहिली. पण तुम्ही काही आलाच नाहीत. मग हळूहळू हा विषयही गेला निघून माझ्या डोक्यातून. ''

'' अहो, मुळात त्यावेळी ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोचलीच नव्हती. ती आताच दोनेक दिवसांपूर्वी हाताला लागली म्हणून शोधाशोध करत इथवर आलो आहोत आम्ही. तुमच्याकडे त्या माणसाचा; राजनचा काही फोन नंबर पत्ता वगैरे आहे का? ''

'' अहो किती वर्षं उलटून गेलीत या गोष्टीला! त्यात ते सगळंच प्रकरण भलतंच गुपित होतं. शिवाय इतक्या वर्षांत किती काय काय घडून गेलंय मधल्या अवधीत. आता कुठून शोधणार तुम्ही या माणसाला? माझ्या हॉस्पीटलच्या रेकॉर्डमध्ये जर त्याचा नंबर असला आणि सुदैवानं तो अजूनही चालूच असला, बदलला नसला तर तुमचं नशीब जोरावर आहे असं म्हणायला हवं. '' बोलता बोलता त्यानं टेबलावरचं बटण दाबलं तशी एक नर्स दार उघडून आत आली.

'' येस सर? ''

'' अलकाताई जरा आपल्या रेकॉर्डरुममध्ये जा आणि साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची रेकॉर्डबुक शोधून घेऊन या. ''

'' ओके सर. '' असं म्हणून ती नर्स निघून गेली. ती परत येईपर्यंत चहापान करता करता कधी जीत तर कधी वैकल्पकडून श्री-प्रिशा-जीत-धाम बिल्डर्सची कहाणी संग्रामपर्यंत पोचली. जवळपास अर्ध्या तासानंतर ती नर्स अलका दहा-बारा रजिस्टर घेऊन तिथे आली. ती बघूनच जीत आणि युवराजच्या कपाळावर आठी पडली. त्यांच्या चेहर्‍यावरचा प्रश्न वाचून संग्राम म्हणाला, '' फार काही अवघड नाहीए. डिरेक्टरी शोधतो तसं शोधायचं. याच्यात ऍक्सीडेन्ट केसचा विभाग वेगळा आहे. शेवटी अस्थिवाला म्हणजे मोडतोड विभाग ना! इथे अपघाती केसच खूप येतात. तुम्ही त्या विभागात आर नावानं सुरु होणारे केसपेपर पहा. ''

चौघांनी पटापट त्यातलं एक एक बुक घेऊन शोधायला सुरुवात केली. एका रजिस्टरमध्ये वैकल्पला राजन भांबरे या नावाचा केसपेपर सापडला. त्यानं तो संग्रामला दाखवला. पण त्या पेपरवर कुठेही त्याचा फोन नंबर वगैरे काहीच नव्हतं. युवराज तो पेपर घेऊन विचार करायला लागला की आता पुढे काय करायचं? कारण त्या तिघांसमोर आता आणखीनच मोठा प्रश्न उभा राहिला होता, राजनला शोधून काढण्याचा. स्वतःला नॉर्मल ठेवण्यासाठी सहज त्या पेपराला हातात फिरवणार्‍या युवराजला एका कोपर्‍यात अगदी बारिक अक्षरांत काहीतरी खरडल्यसारखं वाटलं. त्यानं ते नीट पाहिलं तर तो अगदी बारिक अक्षरांत लिहिलेला राजनच्या ऑफिसचा कल्प असोसिएटस् चा नंबर होता. राजननंच डिस्चार्ज होताना चालाखी करुन तो तिथं लिहिला होता. कारण त्यावेळी दादासाहेबांची माणसं त्याच्यावर घारीसारखी नजर ठेवून होती. तो नंबर मिळताच त्या सगळ्यांना प्रचंड आनंद झाला कारण यावेळेस दैव त्यांची साथ द्यायला दादासाहेबांविरुध्द दंड ठोकून उभं राहिलं होतं.

...

विमान कानपुर विमानतळावर उतरलं. श्रीनं बाहेर येऊन टॅक्सी पकडली आणि तो काननमावशीच्या घराच्या दिशेनं निघाला. टॅक्सीत बसल्या बसल्या त्याला दिवाकरची प्रतिक्रिया आठवत होती.

'' म्हणजे साहेब! तुम्हांला कानन मावशींबद्दल काहीच माहीत नाय? ताईंनीपण कधी काय सांगितलं नाय का? आवो इतक्या वर्षांत जर ताईंनी त्येंच्याबद्दल तुम्हांला काही सांगितलं नाय तर मी तरी कसा काय सांगू तुमीच सांगा! ''

'' हे बघ दिवाकर मला मागे घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. मला माझ्या त्याच कर्माचं प्रायश्चित करायचंय. किमान त्यासाठी तरी मला तिला शोधलं पाहिजे. तिनं मला पुन्हा स्विकारायचं की नाही हा तिचा प्रश्न आहे. पण मला मात्र माझ्या ह्या मानसिक द्वंद्वातून आता शांती हवीय. ती तेव्हाच मिळेल जेव्हा मी तिला शोधेन, तिला भेटेन आणि तिची माफी मागेन. दिवाकर मी तिच्यावर खरंच मनापासून प्रेम केलंय दिवाकर! तुम्ही सगळे मिळून मला माझ्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा नका देऊ रे! ''

श्रीची अवस्था बघून दिवाकरचं आतडं तुटलं. '' साहेब हा घ्या पत्ता. मी धनादादांना फोन करुन उद्याची फ्लाईट बुक करतो तुमच्यासाठी. आजची रात्र इथंच झोपा. ''

तो टॅक्सीतून उतरला आणि त्यानं चार पायर्‍या चढून बेलचं बटण दाबलं.

स्वरा... 

27/01/2021

..........

*76*

'' हॅलो, कल्प असोसिएटस्. ''

'' नमस्कार. मी जीत जैतकर बोलतोय. मला श्रीयुत राजन भांबरेंशी बोलायचंय. ''

'' एक मिनिट हं सर! '' युगालीनं इंटरकॉम जोडून राजनला सांगितलं की कुणी जीत जैतकर म्हणून आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तर फोन कनेक्ट करु का? इतक्या वर्षांनी जीतचा फोन आलाय म्हटल्यावर त्यानं लगेचंच तो ट्रान्सफर करायला सांगितला.

'' हॅलो, जीत. बोल काय म्हणतोस? कसा आहेस? अनेक वर्षांनी आठवण काढलीस माझी! ''

'' अरे, घडलंच आहे तसं काहीतरी म्हणून तुझी आठवण काढली. तुझ्या शोधासाठी काय काय उलथापालथ केलीय ते आमचं आम्हांला माहीत. ''

'' का? एवढं काय आभाळ कोसळलं? ''

'' ते मी तुला भेटल्यावर सांगतो. कधी येऊ तेवढं सांग. ''

'' अरे कधी येऊ काय? ये की आजच. आता आलास तरी चालेल. आज फ्रीच आहे मी. ''

'' बरं. मग तुझ्या ऑफिसचा पत्ता मला माझ्या मोबाईलवर पाठव. हा माझा नंबर. '' असं म्हणून जीतनं त्याला आपला मोबाईल नंबर दिला न् फोन ठेवला. तोवर त्याच्या नंबरवर अननोन नंबर वरुन एक वा चा मेसेज येऊन पडला होता. तो मेसेज वाचून जीतनं तो नंबर सेव्ह करुन ठेवला. जसा मेसेज येऊन पडला तसे युवराज आणि जीत तयार होऊन राजनच्या ऑफिसला जायला बाहेर पडले.

हे दोघे बाहेर पडत असताना एक बुटकेलासा, काळा गॉगल घातलेला माणूस प्रिशाला भेटायला आला. अमू त्याला घेऊन वर प्रिशाच्या खोलीत गेली. न जाणो, अचानक श्री आलाच बाहेरगावाहून आणि हॉलमध्ये बसलेलो असलो तर भांड फुटायला नको म्हणून हा उद्योग.

'' प्रिशे, हा तुला भेटायला आलाय. ''

'' कोण? अरे उर्जित! ये बस. अमू चहा आणतेस! ''

'' नाही. नको मॅडम. लगेच निघायचंय. एक दुसरं कामंही आहे. ''

'' बरं! माझ्या कामाचं काय केलंस? ''

'' मॅडम, तुम्हांला सांगतो. हा दिक्षित एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. ''

प्रिशाचे डोळे चमकले. तिचा अंदाज बरोबर होता.

'' तो जे दाखवतो ते नाहीए आणि जे आहे ते तो दाखवत नाही. ''

अमूला त्यांची ही सांकेतिक भाषा कळली नाही.

'' म्हणजे? ''

'' म्हणजे अमेया मॅडम; हा दिक्षित गडगंज श्रीमंत आहे. सात पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट आहे त्याची. पण, तरीही पैशांची हाव सुटत नाही त्याची. ''

हे ऐकून अमूचे डोळे गोट्या झालेले.

'' पुढे? त्याचा घाडगेंशी काय संबंध? ''

प्रिशाला मात्र त्यात काहीही नवल वाटलं नाही. कारण तिनं अंदाज लावला होता की ज्याअर्थी राजननं पत्रात असं लिहिलंय त्याअर्थी दिक्षित हे इंदरचं तितकंच महत्वाचं प्याद असणार.

'' आहे ना मॅडम. हा दिक्षित घाडगेंसाठी डिटेक्टीव्हगिरी करतो. खरंतर तो त्याचा मुळचा शौक आहे. त्याच्या बंगल्यातल्याच एका खोलीत त्याचं स्वतःचं सुसज्ज ऑफिस आहे. एरवी बायको मुलांना पैसे देताना फार काचकूच करतो पण टेक्नॉलॉजीवर लै पैसा उधळतो हा माणूस. सतत मोबाईल नंबर बदलत असतो. एखाद्या कंपनीचं कार्ड महिनाभर जरी राहिलं त्याच्याकडे तरी या मोबाईल कंपन्या सत्कार करतील त्याचा. हा दिक्षित दादासाहेबांचे पार्टनर भैय्यासाहेबांचा मॅनेजर निकमचा शोध. हा दिक्षित दोन्हीकडून पैेसे खातो. म्हणजे कोणतं टेंडर कधी निघणार याची माहीती काढण्यासाठी सरकारी ऑफिसांमध्ये पैसे देतो. ही माहीती दादासाहेबांना देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतो. त्याची माणसं सगळीकडे पसरलेली आहेत. ते टेंडर भरणार्‍या लोकांची सगळी माहीती काढून आणतात. मग हीच माहीती त्यांच्या त्यांच्यात विकून हा त्या माहीतीचे आणखी पैसे करतो. शिवाय याचा आणखी एक महत्वाचा साथीदार आहे. फोटोग्राफर कदम. काही वर्षांपूर्वी लग्नांचे फोटो काढून स्वतःचा चरितार्थ चालवणार्‍या या माणसाने दिक्षितच्या सहवासात आल्यापासून स्वतःचा दोन मजली आर्ट स्टुडिओ चालू केलाय. ''

'' हं! म्हणजे एकंदरीत बरीच माया जमवलीय तर यानं. ठीक आहे. काहीच हरकत नाही. माणसानं पैसे कमवलेच पाहिजेत फक्त ते कमवताना काळजी घ्यायची की दुसर्‍याचं नुकसान होता कामा नये. कारण शेवटी कर्माचं फळ मिळतंच. हो ना उर्जित? ''

'' आं! '' त्यानं नुसतेच खांदे उडवले.

तिनं कपाट उघडून चेकबुक काढलं त्यावर उर्जितच्या नावानं रक्कम लिहिली, चार दिवसांनंतरची तारिख टाकली आणि तो त्याला दिला. देताना म्हणाली, '' नुसते खांदे उडवून काही होत नसतं उर्जित. कृष्णाचं गुप्तहेर खातं सार्‍या आर्यावर्तात पसरलेलं होतं. आणि त्यानंतर विक्रमादित्य, चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचंही. बरं, आपलं काम अजून संपलेलं नाही हे तुझ्या लक्षात असेलच? माझं दुसरं काम झालंय ना! आणि यांच्या सगळ्या कांडाचे पुरावेपण मला हवेत. ''

'' येस मॅडम. डोन्ट वरी. मिल जाएंगे. '' प्रिशाबद्दलचं वाटलेलं आश्चर्य मनातच ठेवून तो निघून गेला.

'' कुठून शोधून काढलंस गं हे पात्र? ''

'' अमू, तू आम खा यार. पेड काय को गिनतंय! नंतर सांगते. ''

'' ओके. '' असं म्हणून अमू निघून गेली.

...

'' अरे इतक्या वर्षांनी तुझी ती चिठ्ठी मिळाली आणि तुला शोधण्यासाठी आधी वैकल्प, मग भानुशाली असं करत शेवटी तुझ्याजवळ पोचलोय. ''

'' अरे इतकी शोधाशोध कशासाठी पण? ''

'' ह्या तुझ्या मिळालेल्या चिठ्ठीनं ही शोधाशोध करायला लावली. केसपेपरवरंच नंबर लिहिला असतास तर आमची धावाधाव तरी वाचली असती. ''

'' अरे देवा! ही चिठ्ठी इतक्या वर्षांनी तुला मिळाली? कमाल आहे. आणि केसपेपरचं सांगतो; तुला मिळाली ती माझ्या केसपेपरची कार्बन कॉपी होती बहुतेक. तिथं कशी राहिली कुणास ठाऊक! कारण दादासाहेबांच्या माणसांनी तिथे दवाखान्यातली माझी सगळी माहीती गायब केली होती. मला वाटतं कदाचित दादासाहेबांची वेळ जवळ आलीय. ''

'' ते ठीक आहे. पण आधी या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण तर दे. किमान काही लिंक तर लागेल. गोष्टी पार बरबादीच्या कड्यापर्यंत जाऊन पोचल्यात. ''

'' एकच मिनिट. मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी? ''

'' मी चहा. ''

'' मला ब्लॅक कॉफी. ''

'' ओके. योगिनी दोन चहा आणि एक ब्लॅक कॉफी आता पाठवून दे. '' त्यानं इंटरकॉमवरुन निरोप पाठवला आणि त्या चिठ्ठीचा किस्सा सांगायला सुरुवात केली.

'' त्या चिठ्ठीचा किस्सा सांगण्याआधी तुम्हांला मी दादासाहेबांचा सी ए कसा झालो ते समजवावं लागेल मला. एक वेळ अशी होती की सी ए होऊनही माझ्याकडे काहीच काम नव्हतं. कर्ज काढायचं तर तारण काय ठेवणार हा प्रश्न. अशा परिस्थितीत असताना माझी आणि निकमची गाठ पडली. त्याला काय वाटलं काय माहीत; तो मला मोरवन बिल्डर्सच्या ऑफिसांत घेऊन गेला. मला तेव्हा आश्चर्य वाटलं जेव्हा मोरवनचे मालक म्हणून सुशांत घोरपडेची ओळख करुन दिली त्यानं मला. मला कळेनाच की यानं एवढे पैसे कुठून जमा केले. ''

इतक्यात प्यून त्यांच्यासाठी सांगितलेला चहा आणि कॉफी घेऊन आत आला. ट्रे ठेवून चहा-कॉफी सर्व्ह करुन प्यून निघून गेला. चहा घेता घेता राजननं पुढे बोलायला सुरुवात केली.

'' गंमत म्हणजे सुशांतनं मला ओळखलंच नव्हतं. त्यानं मला माझं क्वालिफिकेशन विचारलं आणि मोरवन बिल्डर्सचा सी ए होशील का म्हणून विचारलं. मला ही आलेली संधी सोडायची नव्हती. मी लगेच हो म्हणालो. आणि अशाप्रकारे मी दादासाहेबांचा सी ए झालो. मध्येच कधीतरी निकमशी बोलताना मला कळलं की भैय्यासाहेब घोरपडे फक्त नावाचा मालक होता. सगळ्या गोष्टी तर दादासाहेब घाडग्यांच्या हातात होत्या; खरंतर आजही त्यांच्याच हातात आहेत. त्यांनी फक्त दिखाव्यासाठी त्याचे 50 टक्के शेअर्स याच्या नावावर केले आहेत. त्यांच्याकडे 1-2 वर्षं काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दादासहेबांचे मोरवनसारखे अनेक उद्योग आहेत. ज्याच्या नावाखाली ते आपला काळा पैसा साबूत ठेवतात. ही चिठ्ठी तुला पाठवली तेव्हा मला त्यांच्या एका सहीची तातडीनं गरज होती. मी पहिल्यावेळी मोरवनच्या ऑफिसला गेलो होतो तेव्हापासून आजतागायत तिथं गेलेलो नाहीए मी. तरीही तेव्हा मी तिथं गेलो पण ऑफिसला कुलुप होतं. वॉचमन म्हणाला की आज दादासाहेबांच्या बंगल्यावर पार्टी आहे. सगळे तिकडेच गेलेत. मी तिथं जाई जाईपर्यंत त्यांची पार्टी रंगात आली होती. मी तिथं पोचलो. दादासाहेबांची सही घेण्यासाठी म्हणून गेलो आणि खिडकीतून आत पाहिल्यावर मला कळलं की इतकी वर्षं मी ज्या दादासाहेबांसाठी काम करत होतो ते म्हणजे इंदर होता. मी दारातून आत जाणारच होतो की आत दारु पिणार्‍यांमध्ये मोठी वादावादी चालू झाली. सुशानं त्या दिक्षितची काहीतरी खोडी काढली होती. काय ते मला कळलं नाही पण त्या दिक्षितनं स्वतःच्या तोंडानं त्यांच्या केलेल्या सगळ्या कुकर्मांचा पाढा वाचला. दिक्षितचं पाकिट मारणारा पाकिटमार आणि श्रीला भेटलेला मोठा गुंतवणूकदार जयदेव घोरपडे म्हणजे इंदरचा कार्यकर्ता दिग्या नायकवडीच होता. दिक्षितनंच श्रीला दारुची लत लावली. तोच होता जो सतत तुझ्या न् प्रिशाच्या नात्यावरुन श्रीचे कान भरत होता. दादासाहेब दिक्षितला त्यांची टेंडर अमाऊंट आधीच सांगत असत. त्यामुळेच पहिली 4-5 कॉन्ट्रॅक्ट धामला मिळाली. जसं सावज जाळ्यात अडकलं तसं त्याच्या डोक्यात हे भरवलं गेलं की जीत श्रीचा मत्सर करतो आणि म्हणूनच स्वतःच्या सल्ल्याशिवाय तो त्याला काम करु देत नाही. या सगळ्यामुळेच श्री फक्त तुझ्याशीच नाही तर प्रिशाशीही तुटत चालला होता. तुमचं नातं पुर्णपणे तोडण्यासाठी दिक्षितनं फोटोग्राफर कदमचा चांगला उपयोग करुन घेतला. त्यानंच ट्रीक फोटोग्राफीचा वापर करत तुझे आणि प्रिशाचे काही फोटो असे काढले की ते पाहिल्यावर पाहणार्‍याचा असा ग्रह होईल की यांचं काहीतरी अफेअर आहे. श्रीचं प्रिशावर असणारं प्रेम, तिच्या बाबतीतला त्याचा पझेसिव्हपणा यांच्यामुळे श्रीचा संशय वाढत गेला. तू धामची भागीदारी सोडल्याबरोबर लगेचच दादासाहेबांनी दिक्षित आणि कदमला गायब केलं. दिग्या नायकवडीला दुसर्‍या राज्यात पाठवलं गेलं. जवळजवळ सगळे पुरावे नष्ट केले गेले. हे सगळं ऐकल्यावर मला वाटलं की मी हे तुला सांगायलाच हवं. म्हणून मी कुणाच्याही नकळत तिथून बाहेर पडत होतो. मात्र कसा कुणास ठाऊक दादासाहेबांच्या गार्डला यशवंताला माझा काहीतरी संशय आला आणि त्यानं माझा पाठलाग करुन मला मारण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून मला भानुशालींच्या दवाखान्यात दाखल केलं. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो. आणि नुसताच वाचलो नाही तर ते डॉ. भानुशाली तुमच्या ओळखीतले निघाले. पण तरीही ती चिठ्ठी फारच उशीरा हातात पडली तुमच्या. सॉरी मित्रा, मी तेव्हा काहीच करु शकलो नाही यापेक्षा जास्त कारण तेव्हा दादासाहेबांची माणसं 24 तास माझ्या पाळतीवर असायची. आताही मी तुला हे सगळं समजावून सांगतोय याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. ''

'' हं! खरंय तुझं. तसंही श्री या सगळ्यावर किती विश्वास ठेवेल माहीत नाही. पण आपली डिटेक्टीव्ह बाई याचं नक्की काहीतरी करेल असा मला अजूनही विश्वास आहे. ''

सगळ्यांनी आशा सोडल्या नंतरही युवराज अजूनही तिचं बोट धरुन बसला होता.

स्वरा... 

02/02/2021

........

७७

'' बीबीजी, आपसें मिलने कोई आया है। आईए, अंदर आईए। ''

श्रीला आत बोलवून अंजना निघून गेली. आत आल्या आल्या श्रीला पहिल्यांदा दिसला तो बुलेटला टेकून उभा राहिलेला प्रिशाचा पूर्ण भिंत व्यापून टाकणारा फोटो. पण ही काही तिची बुलेट नव्हती हे श्रीनं एकाच नजरेत ओळखलं. तिची लाडकी बुलेट तर गेली अनेक वर्षं घरात धूळ खात पडली होती. त्याच्या आतला प्रिशाच्या आठवणींचा डोह डहुळून निघाला. वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात तशा त्या आठवणी बाहेर पडू लागल्या. काय काय आठवत होतं त्याला. सगळ्यात आधी जाग्या झाल्या त्या कॉलेजातल्या आठवणी. तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाची. पहिल्याच भेटीत अचानक पडलेल्या मिठीची आठवण, तिच्यासाठी तो इंदरशी भांडला होता तेव्हाची. मॉड्यूलच्या प्रकरणात त्याच्यासाठी सगळ्यांशी वाकडं घेऊन बसलेली प्रिशा. तिची आणि जीतची हेवा वाटावा अशी मैत्री. त्यांची भांडणं सोडवणारे तो आणि अमू. त्यांचा सगळा कंपू. रंग्याच्या वेळी तिनं त्याला कसं सावरलं ती आठवण. मग दोघांची लग्नं झाली. पहिली रात्र. तिचा रोजचा न चुकता आणलेला गजरा. बाबांना तर किती अभिमान होता तिचा. अमू आणि जीत तर नुसते जीव ओवाळून टाकायचे तिच्यावरुन. आपलंच दुर्लक्ष झालं तिच्याकडे, तिच्या प्रेमाकडे. तिला तर त्याच्या सगळ्या गोष्टींची कशी कोण जाणे खबर लागत असे. न बोलताही त्याच्या मनातल्या बर्‍याच गोष्टी उमजून जात असत तिला. मलाच कळली नाही ती. अनेक वर्षं सोबत असल्यानंतरही आपण असा कसा तिच्या आणि जीतच्या नात्यावर संशय घेतला. त्या जागेत फिरत सगळ्या कोनांतून प्रिशाचा फोटो पाहणार्‍या श्रीच्या मनात कानन मावशीची हाक येईपर्यंतच्या 5-7 मिनिटांत अख्खा आठवणींचा सिनेमा तरळून गेला. हे सगळं आठवताना संगती लावण्यात मात्र त्याच्या मेंदूचा अंदाधुंद गोंधळ झाला होता. हं! आता आठवतंय. दिक्षित बोलायचा सारखं असं, ' एक बाई आणि एका पुरुषाची निखळ मैत्री असूच शकत नाही हो! '

आणि एक दिवस तोच ते तसले फोटो घेऊन आला होता. कुणी पाठवले होते ते? कुठून आले होते ते? मला का आले होते ते? मुळात हे असले फोटो कुणी, का आणि काढलेच कशासाठी होते? पण तेव्हा मस्तकात रागाची तिडिक भरली होती. हे सगळे प्रश्न जे आता सुचतायत ते सुचण्याच्या अवस्थेतच नव्हतो मी. दिक्षितनं पडदा ओढला होता का आपल्या डोळ्यांवर? खरं काय! खोटं काय! काहीच कळत नव्हतं. डोक्यात एका मागोमाग मिळणार्‍या कंत्राटांनी हवा गेली होती. जीत किती समजवत होता पण नाही ऐकलं त्याचं. त्यात ते फोटो आणि दिक्षितनं कानात ओतलेलं विष यांनी सैरभैर व्हायला झालं होतं. विचार करत तो फिरताना तो फुलदाणीजवळ आला. तिथं पाहिलं तर एक फोटोची फ्रेम पालथी पडली होती. त्यानं ती सरळ करुन ठेवावी म्हणून उचलली तोच मागून कानांवर आवाज आला, '' कौन? '' आणि ती फ्रेम तशीच खाली ठेवून तो मागे वळला. ती चांदनी आणि वैद्रुतीची फोटो फ्रेम होती. अगदी थोडक्यात त्याला सगळ्या गोष्टी कळता कळता राहिल्या.

हॉलमध्ये येणार्‍या पायर्‍यांवरुन उतरणार्‍या काननमावशीनं जसा मागे वळलेल्या श्रीचा चेहरा पाहिला तिच्या कपाळावरची आठी विस्तारली आणि एकदम तिचा आवाज टिपेला पोचला.

'' तुम? तुम यहॉं क्या कर रहे हो? क्यू आए हो तुम यहॉं पें? चले जाओ यहॉं सें; हमारा तुम्हांरा कोई रिश्ता नाता नहीं है। ''

'' क्या हुआ कानन? किसपें गुस्सा हो रहीं हो? '' आत काम करणार्‍या कविशनं तिला विचारलं.

तिचा चढलेला आवाज ऐकून भितीनं अंजनापण किचनच्या दारात येऊन उभी राहिली. तिला वाटलं आता आपल्यालाही ओरडा पडणार, आपणच त्याला आत घेतलं.

'' वहीं; हमारा जमाई होने का ढोंग करनेवाला बंदा आया है। '' काननमावशीच्या रागाचा पारा वरवर चढतच होता.

'' वो क्यू आया है अब यहॉं पें? एक बार हमारी बेटी का दिल दुखाके उसका मन नहीं भरा क्या? '' असं म्हणत कविश अंकलपण बाहेर आले. पण समोर श्रीला उभा पाहून ते चपापलेच. त्यांना वाटलंच नव्हतं की हा असा अचानक इथे येऊन पोचेल म्हणून. त्यांचा समज झाला की अनेक वर्षांनी विहाय कसा काय इथे येऊन पोचला? त्यांनी काननचा हात दाबला आणि तिला शांत होण्याचा इशारा केला. श्रीला त्या दोघांसमोर काय बोलावं? कसं बोलावं? ते काही सुचेना त्यामुळं तो शांत उभा राहिला. ते दोघेही जिना उतरुन खाली हॉलमध्ये आले. काननमावशी जाऊन सोफ्यावर बसली तर कविशअंकल जाऊन श्रीसमोर उभे राहिले.

'' क्यू आए हो यहॉं पें? क्या काम है? प्रिशा को ढूंढने आए हो तो वो यहॉं नहीं है। तुम वापिस जा सकते हो। '' कविशअंकलनी स्वतःवर ताबा ठेवत श्रीला सांगितलं.

त्याला वाटलं आपण केलेले सारे प्रयत्न फसले. पुन्हा एकदा आपण येऊन अशा वळणावर पोचलोय की जिथून पुढे काही वाटच नाहीए.

'' तुम गुंगे हो क्या? मै क्या पुछ रहा हू? क्यू आए हो यहॉं पें? '' आवाजात थोडा कडकपणा आणत त्यांनी पुन्हा तेच सगळे प्रश्न त्याला विचारले.

आता मात्र त्याचे कसे काय कोण जाणे पण शब्द फुटले. तो झटकन् खाली वाकला. त्यानं अजीजीनं कविशअंकलचे पाय धरले.

'' अंकल, प्रिशा को ढूंढने यहॉं तक आया हू मै। प्लीज, मुझे खाली हाथ वापस मत भेजिये। मै उससें आज भी बहुत प्यार करता हू। मै उससें सिर्फ एक बार मिलना चाहता हू। मुझे अपने किए का पछतावा हो रहा है। मुझे उससें माफी मांगनी है। ''

त्याच्या त्या कृतीनं दोघेही थोडे बावचळलेच होते. पण, कविश अंकलच त्यातून आधी सावरले.

'' मैने कहॉं ना प्रिशा यहॉं नहीं है। हॉं ये सच है की वो यहॉं आई थी। आखिर हमारीही बच्ची है। यहॉं नहीं आयेगी तो जायेगी कहॉं? ''

काननमावशीला त्यांचा हा मुळमुळीतपणा अजिबात आवडला नाही. तिला वाटलं की ते त्याला त्याच्या त्या अक्षम्य चुकीसाठी चांगलं फैलावर का घेत नाहीत! तिनं अचानकच आपला पवित्रा बदलला. ती उठली आणि श्रीसमोर येऊन उभी राहिली.

'' क्या होगा यू पैर पकडनेसें? तुम्हांरी की हुई सारी बातें भुलाई जा सकती है? तुम्हांरी उस शक की वजह से मेरी बेटी नें क्या क्या नहीं सहा! ये कैसा प्यार है तुम्हांरा की जो अपनोंको ही दर बदर भटकने पें मजबूर कर दे? पिछले 5 साल मेरी बेटी नें कितनी मानसिक यातनाऍ सही है इसका कुछ अंदाजा भी है तुम्हें? भले ही मै उसकी मॉं नहीं हू। मौसी हू। पर क्या मुझें अपने बच्चे का दर्द नहीं समझेगा? '' ती त्याला झिडकारत म्हणाली.

'' कानन, अब छोड भी दो ये सारी बातें। क्या मिलेगा ये सब सुनाके तुम्हें? ''

'' सुकून मिलेगा। मेरे तडपते दिल को चैन मिलेगा। मेरी आत्मा को शांति मिलेगी। मेरी बच्ची के ऑंखो की नींद चली गई। कितनी राते उसने जागते हुए तकीए भिगो भिगोकर गुजारी भुल गए क्या तुम? गर उन पलों का मै इस आदमी सें हिसाब मॉंग रही हू तो क्या गलत कर रही हू? आखिर चाहता क्या है ये? अब लेने आया है मेरी बच्ची को? जबकी इसकी दुसरी बिवी मर चुकी है? उसका बच्चा बिन मॉं का हो गया है तब? और मेरी बच्ची, मेरी ना.... '' ती पुढचं काही बोलणार इतक्यात त्यांनी तिच्या तोंडावर हात ठेवला.

'' बस करो कानन। बहुत हो चुका। उसको उसकी सजा मिल चुकी है। श्री तुम चलें जाओ यहॉं से। ''

'' अंकलजी, आपका फोन बज रहा है। '' अंजना मागून ओरडली.

कानन आणि श्रीला तिथंच सोडून ते फोन घ्यायला मागे गेले.

'' हॅलो! ''

'' अंकल कुछ बोलना नहीं। सिर्फ सुनिए और हां या नहीं में जवाब दिजिए। श्री आया है वहॉं? ''

'' हां। ''

'' मेरी पुछताछ कर रहा है? ''

'' हां! ''

'' आपने कुछ बताया? ''

'' नहीं। ''

'' माऊने कुछ बोला? ''

'' अभी नहीं। ''

'' ठीक अच्छा किया। अब उसे जाने के लिए बोल दिजीए। कह दिजीए की सहीं वक्त आने का इंतजार करे। चलीए फोन रखती हू। '' त्यांनी काही न बोलता फोन कट केला.

श्री अस्वस्थपणे उठून चालला होता.

'' सुनो श्री, तुम प्रिशा की तलाश में सहीं जगह पोहचे थे। लेकीन प्रिशा कब की यहॉं से जा चुकी है। मैं नहीं जानता वो कहॉं गई है। हॉं लेकीन मै तुम्हें बस ये कहूंगा की तुम्हांरे हाथ में सही वक्त का इंतजार करने के अलावा और कुछ नहीं है। जाओ तुम। ''

श्री मुकाट्यानं मान खाली घालून तिथून बाहेर पडला. दिवसभराचा बराचसा वेळ त्यानं इकडं तिकडं भटकण्यात घालवला आणि शेवटी रात्रीची फ्लाईट पकडून तो पुण्याला परत गेला.प्रिशा सापडेल या आशेवर तो इथवर येऊनही त्याच्या हाती काहीच पडलं नाही. प्रिशाला उर्जितनं कळवलं होतं की श्री रतनपुरला गेलाय म्हणून. तिनं लगेचच दिवाकरला फोन लावून या गोष्टीची खात्री करुन घेतली. वरनं त्याला हेही सांगितलं की आधीच त्याला काही सांगू नकोस. तो अगदीच हारीवर आला तर फक्त त्याला कानपुरचा पत्ता दे. दिवाकरनं तसंच केलं. त्यानं श्रीचं तिकिट काढल्यानंतर तीही गोष्ट प्रिशाला कळवली होती. शिवाय उर्जितनंही त्याच्या माणसाकडून मिळालेली न्यूज म्हणत श्री कानपुरला गेल्याचं कन्फर्म केलं होतं. आता प्रिशाचा खेळ चांगलाच रंगात आला होता. आणखी एक महत्वाचं काम तिच्या डोक्यात घोळत होतं. युवराज आणि चांदनीची डेट ठरवायची होती.

स्वरा... 

06/02/2021

..........

*78*

'' युवराजला कुठे सोडलायस तू? '' - प्रिशा

'' त्याला कुठे सोडतोय मी! तो एकदम तुझ्यासारखा आहे; इंटेलिजन्ट! त म्हणता ताकभात लगेच कळतं त्याला. मी काय शेंडी लावणार ना त्याला? मी स्पष्टपणे सांगितलं त्याला की तू जेवण्याच्या वेळेला घरी ये. तोवर ऑफिस सांभाळ. मी जरा कामासाठी बाहेर जातोय. '' -जीत

'' तू पण ना जीत! नमुना आहेस. आता मला सांग की आपण चांद आणि युवराजला भेटवायचं कसं? '' -प्रिशा

'' त्याआधी तू मला सांग की आमची सगळी पिलावळ आणि चांद आहेत कुठे? '' -जीत

'' मी चांदला तिन्ही पोरांना घेऊन वॉटरपार्कला पिकनिकला पाठवलंय. '' -प्रिशा

'' काय? कुठं पाठवलंस? वॉटरपार्कला? अगं आमचं दिवटं शहाणं नाहीए गं! त्या चांदनीला काहीतरी डोकेदुखी करुन ठेवेल. '' - अमेया

'' गप गं तू! नाही काही करणार ती. उगाचच ना त्या पोरांना अनुभव घेण्यापासून लांब ठेवता तुम्ही. ड्रायव्हर आहे सोबत त्यांच्या. '' -प्रिशा

'' तू तर विचित्रच आहेस प्रिशे! कसले डोक्याला शॉट लावतेस? '' -जीत

'' चल, चल. मुद्द‍्यावर ये आता. तुम्ही काही वेळाचा एकांत एन्जॉय करा. मी आलेच कोल्ड कॉफी घेऊन. मग आपण या हॉट टॉपिकवर चर्चा करु. ''

ती कॉफी आणायला निघून गेली तसा जीत लगेचच अमूच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला.

'' साला, बंक मारण्याचीपण एक वेगळी मजा असते यार. कसलं भारी वाटतंय मला आज ऑफिसला बंक मारुन काय सांगू तुला! आठवतंय ना! आपण कॉलेजला असताना कसे बंक मारायचो ते? '' -जीत

'' राहू दे हं तुझ्या फुशारक्या. तुझे सगळे बंक तर प्रिशा मॅनेज करायची. तुला काय माहीत होतं रे कोल्हापुरातलं? तिच्यामुळे तुला कुठे फिरायचं, कसं जायचं, केव्हा जायचं हे कळायला लागलं. पन्हाळ्याला आपण तिच्यामुळे गेलो. तेसुद्धा परिक्षेला दोन दिवस असताना. हट्टी माणूस! ''

जीत नुसताच हसला. खरंतर तो केव्हाच कॉलेजमध्ये जाऊन पोचला होता. अमूची मात्र नेहमीसारखी टकळी चालू झाली होती.

'' भर दुपारी कॉलेजमधून निघून कोल्हापुरला रंकाळ्यावर जायचा मूड आला होता तुला. बेंचवर बसल्या बसल्या मागूनच तिच्या पॅन्टच्या खिशातून तिच्या बुलेटची चावी काढून घेतली होतीस तू. तिथे जाऊन पोचलो आणि थोडावेळ जातो नाही तोवरच केवढा पाऊस सुरु झाला होता. आठवतंय ना! किती भिजलो होतो आपण ते! ''

यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या आणि तिकडं प्रिशा किचनमध्ये कोल्ड कॉफी बनवण्यात गुंतली होती. तिनं फ्रिजमधून दूध बाहेर काढलं. त्यावरची साय काढून ती विरजणाच्या डब्यात काढून तो डबा पुन्हा आत ठेवला. ट्रेमध्ये तीन ग्लास काढून ठेवले. मिक्सीमध्ये दूध, कॉफी, साखर, बर्फाचा चुरा घालून फिरवून घेतलं. तयार झालेली कॉफी ती ग्लासात ओतत होती तर तिचं किचनच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. श्री कानपुरातून निराश होऊन परतताना तिनं पाहिलं. तिला मनातून फार इच्छा झाली की त्याला हाक मारावी. जणू काही तिच्या मनातलं त्याच्या कानांपर्यंत पोहोचलं असावं तसा तो घरात आत जाता जाता वळला आणि तिकडेच यायला लागला.

अरे देवा! हा इकडे का वळला? मुर्ख काहीही इच्छा होते तुला प्रिशा. देवा, प्लीज प्लीज आता याला किचनमध्ये यायची इच्छा तेवढी होऊ नये. असं मनातल्या मनात पुटपुटत तीनं फ्रिजशेजारचा कोपरा पकडला आणि स्वतःला त्यात दडवलं. श्री मुकाट्यानं आत आला. त्याला चहा प्यायची फार हुक्की आली होती. आधी त्यानं अमूला हाक मारायचा विचार केला पण मग त्यानं तो बदलला. हॉलमध्ये घुटमळला न् किचनकडे वळला. तिकडं त्याच्या पावलांचा वेध घेणार्‍या प्रिशाच्या हृदयाची धडधड वाढली. तो किचनच्या दारात आला. आत जाण्याचा विचार करतानाच तो मागे वळला आणि निघून गेला. तो गेल्याची खात्री होताच ती उठली. पटकन् ग्लासात कॉफी ओतून ती वर निघून गेली.

'' किती वेळ प्रिशे? कोल्ड कॉफी करायला इतका वेळ लागतो का? तुझ्यामुळं मला ह्या रेडिओ सिलोनला ऐकावं लागलं. '' - जीत

'' अरे बाबा, श्रीला सापडता सापडता राहिलेय मी! कॉफी केव्हाचीच बनवून झालेली. '' -प्रिशा

'' अरेच्चा, तो आलापण मुंबईहून? '' -अमेया

'' अमे, तो कानपुरला गेलेला. '' तिनं कॉफीचा घोट घेता घेता रहस्यावरचा पडदा उचलला.

'' काय सांगतेस? तुला शोधायला? '' -जीत

'' हो. पण ते सगळं नंतर सांगते. आताचा आपला विषय वेगळा आहे. सांगा काय ठरवलंत तुम्ही? '' -प्रिशा

'' ह्या, कशाचं काय ठरवणार! तू गेलीस की लगेच हा तुझ्या मागोमाग कॉलेजात जाऊन पोचला. '' -अमेया

'' हां, हां तू जसं काही मोठी प्लॅनरच आहेस. हीची अखंड पटरपटर चालू होती. '' -जीत

'' तुम्ही दोघं ना, एकमेकांच्या नावावर बिलं फाडा फक्त. नावाचे पट्टेवाले आहात. सगळी कामं काय मीच एकटीनं करायची का? '' -प्रिशा

'' अशी काय करतेस प्रिशा, आपल्यात जबरा मेंदू तर फक्त तुझ्याकडेच आहे ना! तूच विचार कर. '' -जीत

'' बरं चल मला सांग सध्याची भेटण्याची ठिकाणं कुठली पुण्यातली? '' -प्रिशा

'' सारसबागेत पाठव. लकडी पुलावर पाठव. मुळशी डॅम आहे. एम्प्रेस गार्डन, ओशो गार्डन, बंड गार्डन, ओकायामा फ्रेन्डशिप गार्डन, मेझा नाईन, ट्रिकाया... ''

'' ए भंगार गाईड! तुझी गाईडची नोकरी सोड आणि मुळपदावर ये. मी तुला पुण्यातली रोमॅन्टीक ठिकाणं विचारली, गिनवायला सांगितली नाही. त्यांना कुठं पाठवायचं ते ठरवायचंय मला. ''

इतक्यात बेल वाजली. अमूनं गॅलरीत जाऊन वाकून पाहिलं तर दार उघडंच होतं. आई-बाबा बाहेर हिरवळीवर सावलीत गप्पा मारत बसले होते. मग बेल कुणी वाजवली म्हणून तिनं कोपर्‍यात जाऊन पाहिलं तर तो युवराज होता.

'' ए! '' तिनं आवाज दिला.

त्यानं वर पाहिलं तर तिनं इशार्‍यानंच त्याला वर यायला सांगितलं.

'' अरे, काय करताय यार तुम्ही इथं? जीत तुझं कुठलं काम होतं ते झालं का? '' -युवराज

'' हे काय इथंच होतं माझं काम. '' त्यानं कॉफीचा शेवटचा घोट घेत सांगितलं.

'' म्हणजे तू ऑफिसला दांडी मारलीस? ''- युवराज

'' बघ, मी म्हणालो होतो ना की तो फार हुशार आहे म्हणून. '' -जीत

तेवढ्यात अमू त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली. तो जेवायला बसला.

'' जीत तू माझ्या सगळ्या प्लॅनची बत्ती लावलीस. युव्या आता तुझ्यासाठीचा प्लॅन आपणच दोघं मिळून बनवूया. '' -प्रिशा

'' कसला? '' त्यानं जेवता जेवताच विचारलं.

'' आधी मला सांग तू चांदनीला काही बोललास की नाही अजून? '' -प्रिशा

'' म्हणजे? '' -युवराज

'' म्हणजे काय गाढवा! मला माहीतीय की चांद तुला आवडते. नंदिताची बातमी कळली त्याआधी तुला याविषयीच बोलायचं होतं ना माझ्याशी? म्हणूनच थांबला होतास ना तिथं? '' -प्रिशा

'' हो. पण तुला हे सगळं कसं? '' -युवराज

'' मी डोळे वाचू शकते युव्या अजूनही. आता मला सांग, बोललायस का चांदनीशी? '' -प्रिशा

''ऊं हू! '' त्यानं मान नाही म्हणत हलवली.

'' मग आता तयार हो सांगायला. उद्या संध्याकाळी पर्वतीवर जातोय आपण. तिथली सगळी व्यवस्था या माकडाच्या सोबतीनं मी करते. तुला तिथं जाऊन फक्त चांदसमोर तुझ्या तिच्याबद्द‍लच्या भावना उघड करायच्यात. कधी यायचं वगैरे सगळं उद्या सांगते. जमेल ना! ''

तो नुसताच गालत हसला.

'' जीत्या आता दोन गोष्टींची प्लॅनिंग करणार आहे मी. अख्खा दिवस फुकट घालवण्याच्या तुझ्या कर्तबगारीची शिक्षा म्हणून तू मी सांगेन ते काम घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं डोळ्यावर झापड बांधून करायचंस. आणि अमे तू याच्यावर नीट लक्ष ठेव. हा सगळी कामं नीट करतोय की नाही ते बघ. ''

स्वरा... 

07/02/2021

..........

*79*

'' उर्जित यात सगळ्या गोष्टी आहेत ना? ''

'' होय मॅडम. आता तर काय दादासाहेबांची कारकिर्द संपल्यातच जमा आहे. ''

'' ते तर आहेच रे! पण आणखीन बर्‍याच उलथापालथी होणं बाकी आहे. हा तुझा चेक आणि कॉन्टॅक्टमध्ये रहा. ''

'' अरे मॅडम, आय ऍम ऑलवेज अव्हेलेबल फॉर यू. ''

'' आं! कशाला येत नसणारी इंग्लिश पाजळतोस तू? ''

'' सॉरी मॅडम. ''

उर्जित निघून गेला.

'' जीत फायनली आज तू ऑफिसला जात नाहीएस. चांदनी सध्या तरी श्रीची नजर चुकवून तू आणि युवराज ऑफिसला जा. दुपारनंतर घरी या. ठीक आहे? बाकीच्या गोष्टी तुम्हांला नंतर सांगेन. जा आता तुम्ही. ''

प्रिशा अशी बॉसिंगच्या मुडमध्ये असली की सगळ्यांनी फक्त ती सांगेल ते ऐकायचं असतं. या गोष्टीची सवय जीतला कॉलेजपासून तर चांदनीला गेल्या 5 वर्षांपासून झाली होती. तिचा मेंदू अशावेळी हायली क्वालिफाईड स्कील्ड मॅनेजरसारखा काम करत असे. सहसा शंभरातल्या नव्वदवेळा ती करेक्ट असे; त्यामुळे यातलं कुणीही तिला क संदर्भीय प्रश्न विचारायला जात नसत. आताही तिच्या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड होत्या. दादासाहेबांची पाळंमुळं खणून काढायची, श्रीसमोर सगळं सत्य आणायचं, युवराज आणि चांदनीचा मेळ घालायचा.

'' अमू आज दिवसभर तुझी-माझी सगळी चांडाळ चौकडी आपल्या म्हातार्‍यांकडं सोपव. आणि तू माझ्यासोबत फिरायचंस. जीत गुंगीचं औषध रेडी आहे ना! ''

'' हो. ''

'' अमू श्री चहासाठी येईल ना इतक्यात! ''

'' हं! ''

'' त्याच्या नाश्त्याच्या डिशमध्ये ते गुंगीचं औषध मिसळ. चहात टाकलं तर त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. त्याला वासावरुन गोष्टी कळतात. ''

'' ओके डन. आता एवढं सगळं ठरवलंयस तर नाश्ता काय करायचं तेही तूच सांग. ''

'' त्याला उपमा फार आवडतो. उपमाच कर. उपम्यासोबतचा चहा मी करेन. थोडा गोड लागतो त्याला चहा. ''

'' अगं पण चव? ''

'' कळू दे की. ते मी बनवलंय हे कळेपर्यंत तर त्याची शुद्ध गेलेली असेल. '' प्रिशा आनंदानं हसली.

'' तुझं पुढचं प्लॅनिंग चालू दे. मी जाऊन नाश्ता बनवते. ''

'' माझं प्लॅनिंग करुन झालंय अमू. चल आपण दोघीही किचनमध्ये जाऊ. जीत फोन नीट चार्ज करुन ठेव. बंद झाला, नॉट रिचेबल आला तर तुझा जीवच घेईन मी आज. पार्टीचं सगळं काम आजच्या आज करुन टाकायचंय आपल्याला. आयती संधी मिळालीय तर तिचं सोनं करायलाच हवं ना! ही फाईल. यात दादासाहेबांच्या सगळ्या कुकर्मांचा कच्चाचिठ्ठा आहे. ही अशा जागी ठेव की वेळेला खटकन् मिळेल आणि तू सोडून इतर कुणाला ती जागा माहीतपण असणार नाही. कार्ड छापलीस ना! युवराज आणि चांदनीच्या नावानं छापायची होती. तिही मोजून दहा. ''

'' हो. दहाचीच ऑर्डर दिलीय आणि मजकूरसुद्धा तू सांगितलेला तोच टाकलाय. ''

'' ओके. आतासाठी एवढं बास झालं. बाकी कामं आपण श्रीची शुध्द गेल्यावर करु. बरं खाली जाण्याआधी आणखी एक, तू पटाटा आपल्या सगळ्या ओळखीच्यांना पार्टीचं आमंत्रण देऊन टाक. ''

खाली उतरताना तिनं सटासट दोन-तीन फोन लावले.

'' हॅलो, दिवा, आजच्या आज अर्जंट कानपुरातून फ्लाईट बुक कर. कानू मावशी आणि कविशअंकलसाठी. मला कुठल्याही परिस्थितीत ते आज रात्री इथे हवेत. ''

'' होय ताई. '' फोन कट.

'' हॅलो अंकल, थोडी अर्जन्सी है। मैने दिवा को बोल दिया है आपके लिए फ्लाईट बुक कर देगा वो। उसका फोन आएगा डिटेल बताने के लिए फिर आप दोनो यहॉं चले आईये। ''

'' जैसा तुम कहो बेटा। ''

'' अच्छा, अंकल फोन रखती हू। ''

बाकीचे फोन तिनं पार्टी अरेंजर, प्रोजेक्टर बुकींगवाला, फुलांचं डेकोरेशन करणार्‍याला वगैरेंना करुन घेतले. दोघी किचनमध्ये आल्या. आज अमूकडे प्रिप्रेशनची जबाबदारी होती. तिची सगळी काटछाट करेपर्यंत प्रिशाचा चहा करुन झाला होता. उपम्याची फोडणी पडली तोवर श्री अनिशला घेऊन आला. काकूआई त्याला घेऊन गेली. आजही त्याचा पेंगळ्यामामा डुलतच होता. श्री येऊन हॉलमध्ये बसला तर तिथे सुटलेल्या उपम्याच्या घमघमाटाने त्याला प्रिशाची प्रचंड आठवण आली. सोफ्यावर बसल्या बसल्या त्यानं डोळे मिटून तो वास आतमध्ये भरुन घेऊ लागला.

'' श्री! उपमा. '' अमूनं उपम्याची डिश त्याच्यासमोर धरली होती. त्यानं ती डिश घेतली. एक चमचा तोंडात घातला आणि त्याच्या तोंडून पटकन् प्रिशाचं नाव बाहेर पडलं.

किचनमध्ये जाणारी अमू वळली.

'' तू काही म्हणाास का श्री? ''

'' अं, हो. या उपम्याची चव प्रिशानं केलेल्या उपम्यासारखी लागतेय. ''

'' ओह! तिनंच तर केलाय ना!. '' असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती आत गेली. दोन चमचे पोटात गेल्यावर श्रीचा मेंदू बधीर व्हायला लागला होता. त्याचं डोकं जड व्हायला लागलं. इतक्यात चहाचा कप घेऊन प्रिशा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. ती त्यानं उपम्याचा पहिला घास तोंडात घातल्यापासून काऊंटिंग करत होती. तिला बघून तो झटकन् उभा राहिला.

'' तू? .... '' पण पुढे काही बोलण्याआधीच त्याच्या लडखडणार्‍या पायांनी त्याची साथ सोडली आणि त्याचा तोल गेला. तोच तिथं आलेल्या जीतनं त्याला सावरलं. त्याला तसाच नेऊन त्याच्या बेडरुममध्ये झोपवलं.

'' मापात टाकलंस ना औषध? हा उठेल ना 8-8.30 पर्यंत? ''

'' हो उठेल. फिकर नॉट. चल आता मी बिन बुरख्याची फिरायला मोकळी झाले. काकूआई आजचा दिवस जयंतीच्या हातचं जेव हां! ''

'' प्रिशे, माझे हात का मोडले नायत. तुमी जावा तुमची कामं करा जा. ''

'' अमू चल गं. ढीगभर कामं पडलीत. ''

दोघीही ठरवलेल्या कामासाठी निघून गेल्या. त्या परत आल्या तेव्हा जवळपास तीन साडेतीन वाजून गेले होते. काकूआई जेवणाची तयारी करुन त्यांची वाटच बघत होती.

'' पोरींनो, आधी दोन घास पोटात ढकला न् मग जावा गं बाकीच्या कामाला. ''

'' अमे, तुझी कामं आटपलीत. तू घे आरामात जेवून. काकूआई मला पटकन् दोन घास भरव बघू. मला पुढं पळायचंय. '' तिनं तसंच पुढे जाऊन आ वासला.

'' कार्टे, अगं घोडी झालीस की आता! पोटाला दोन दोन पोरं आलीत तरी सुधरु नकोस तू. '' काकूआईनं आधी धपाटा घातला तिच्या पाठीत आणि मग घास भरवला.

'' अगं मी उद्या म्हातारी झाले ना तरी तुला असाच त्रास देणारे. '' असं म्हणून घास तोंडात असतानाच तिनं जीतच्या नावानं ढोल वाजवायला सुरुवात केली.

'' अगं गप की गं! घास तरी गिळ तो. उगा वरडती कार्टी. जीत बाहेर गाडीत सामान घिवून तुजी वाट बघतूय. ''

बरं, बरं म्हणत तिनं बाहेर धाव घेतली. दोघेही वेगानं पर्वतीवर पोचले. जराशी देखरेख करुन त्यातल्या त्यात एकांडी वाटणारी जागा निवडून त्यांनी आणलेला तंबू तिथं ठोकला. आत गालिचा घातला. बरोबर मध्यावर टेबल ठेवल. त्याच्या चारी कोपर्‍यात सेन्टेड दिवे लावले. तंबूच्या चारी कोपर्‍यात चार्जिंगवरचे दिवे लावले जे मंद प्रकाशाचा अनुभव देत होते. आमोरासमोरचा एन्ट्रन्स सोडून उरलेल्या दोन्ही बाजू लाल गुलाबाच्या फुलांच्या गुच्छाने सजवल्या, बाहेरुन तंबूच्या चारही बाजूंनी वेगवेगळ्या रंगाचे झिरझिरीत पडदे सोडले. त्यावर बारिक बल्बच्या माळा सोडल्या. एकूणच दुरुन बघणार्‍याला त्या अंधार्‍या कोपर्‍यात चांदण्या उतरल्याचा भास होईल अशी वातावरणनिर्मिती त्यांनी केली.

'' झालं ना प्रिशे सगळं? ''

'' वेडायस का तू? इतक्यात कसं होईल? आतल्या टेबलावर अजून अंगठीची डबी असणारी चॉकलेटची परडी ठेवायचीय. आता अंधार पडायला लागलाय. मी आतलं आटपते तोवर तू जा आणि चांदनीला घेऊन ये. मी युवराजला फोन करुन बोलवते. ''

'' ओके डन. '' असं म्हणून जीत चांदनीला आणायला निघून गेला.

तिनं फोन केल्यानंतर थोड्याच वेळात युवराज तिथं येऊन पोचला.

'' वॉव! कमाल आहे यार हे. मला माहीत नव्हत गं तू इतकी रोमॅन्टीक आहेस म्हणून. श्रीला कशाला मध्ये येऊ दिला असता मग मी! हिडन टॅलेन्ट हं! ''

'' ए फ्लर्ट, आता प्रिशाला विसरायचं आणि चांदनीला लक्षात ठेवायचं. ''

'' डार्लिंग तुला विसरुन कसं चालेल? तू तर आमच्या सगळ्यांच्या जगण्याचा एकखांबी आधार आहेस. ''

ते बोलत होते तेवढ्यात चांदनीला घेऊन जीत तिथे पोचला.

'' प्रिशे, चल आपण जाऊया इथून. '' ते दोघेही थोड्या दूर असणार्‍या बेंचवर जाऊन बसले.

युवराजनं चांदनीचा हात धरला तशी ती शहारली.

'' ये. माझ्या या हृदयमंदीराचे हे दरवाजे मी तुझ्यासाठीच उघडले आहेत प्रिये! ''

उफ्! त्याच्या त्या शब्दांतच काहीतरी जादू होती. नाहीतर आजकाल हे असं काहीतरी कोण करतं? सगळा पल दो पलचा मामला.

तिचा हात धरुन युवराज तिला तंबूत घेऊन आला. चांदनी आधीच बाहेरचा सगळा नजारा बघून भारावून गेली होती. त्यात आतले ते गुलाब, दिवे, जस्मिनचा मंद सुगंध आणि टेबलावर ठेवलेली ती चॉकलेटची परडी या सार्‍यांनी तर तिला मोहीनीच घातली.

'' बैस. '' त्यानं तिला हळूच खाली बसवलं. शेजारची हार्टशेप उशी हातात घेऊन तो म्हणाला, '' होप तुला आजची डेट कायम लक्षात राहिल. चांद मला फार काही वर्ख लावलेलं रोमॅन्टीक बोलता नाही येत. मघासची वाक्यं गुगल बाबाची देन होती. पण, तुला वाटेल मी रुक्ष माणूस आहे तर मी अगदीच काही रुक्ष माणूसही नाहीए. फक्त या दगडमातीपेक्षा सुंदरतेत रमणार्‍या या माणसाचं मन तुझ्यावर आसक्त झालंय. ''

आता त्या हातातल्या उशीची जागा चॉकलेटच्या परडीनं घेतली होती.

'' सांग तू माझी होशील का? ''

त्यानं परडीत हात घालून त्यातून अंगठीची डबी बाहेर काढून उघडली. त्यातली अंगठी काढून ती चांदच्या बोटात सरकवत तो म्हणाला, '' प्रेझेंन्टिंग द ब्युटीफुल प्रिशिअस प्लॅटिनम फॉर माय डिअरेस्ट वन. '' तोच बाहेर रोमॅन्टीक सिझलींग अशा व्हायोलीन आणि बासरीच्या एकात एक गुंतलेल्या सुरावटी वाजू लागल्या.

तिनं त्यातनं एक चॉकलेट उचलून ते अनपॅक केलं. त्याचा तुकडा तोडून तो ओठात धरला आणि युवराजसमोर आणला. त्यानं मादक नजरेनं तिच्याकडे पाहत तो अर्धा तुकडा ओठात तसाच धरुन ठेवून थोडा वितळू तिला. त्याचे ओघळ जसे चांदनीच्या ओठांवरुन खाली उतरायला लागले तसे त्यानं तिचे ओठ बंद करत लिपलॉक किस केलं.

'' यार थंडी वाजायला लागलीय. हे काय करतायत अजून? रोमॅन्स संपला नाही का यांचा अजून! चल जाऊन बघूयात. ''

दोघेही उठून तंबूकडे आले. किंचित पडदा सरकवून पाहिलं तर आत हे दोघेजण एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून अजूनही ' पंकजी गुंतला भ्रमर ' प्रमाणे ओठांतच अडकून पडले होते. त्यांनी बाहेरुनच खाकरुन दोघांना वेळ संपल्याचा इशारा केला. तसे आतले प्रेमवीर प्रेमाच्या डोहातून बाहेर पडून वास्तवात आले.

'' चला, पुढे पार्टीला जायचंय अजून. आजची रात्र दादासाहेबांची शेवटची चांगली रात्र ठरवायचीय आपल्याला. आटपा चला. ''

स्वरा...

 08/02/2021

..........

*80*

हॉटेल मितालीच्या लॉनवर पार्टीची जय्यत तयारी दिसत होती. एका बाजूला मंडपही घातलेला होता. लाईटच्या माळा, फुगे, फुलं सगळी सजावट एकदम धमाकेदार होती. प्रिशानं सांगितल्याप्रमाणं जीतनं मोजून दहाच कार्डं छापून घेतली होती. त्यातलं एक गेलं होतं थेट गृहमंत्र्यांकडे. ही चांदनीची कृपा. नॅशनल इंजिनिअर असोसिएशनमधून तिनं निमंत्रण पाठवलं होतं त्यांना. निरोप आला की ते बिझी आहेत मात्र ते आपल्या मुख्य सचिवाला निश्चितच या कार्यक्रमासाठी पाठवतील. तसंही त्यांच्यासाठी गृहमंत्रालयाकडून कुणीतरी येणं महत्वाचं होतं. ते त्यांनी साध्य केलं होतं. माधवकाकांच्या ओळखीनं एक पोलिस कमिशनरना आणि एक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस्. जे. धडामांना गेलं होतं. दोघेही माधवकाकांच्या चांगल्या ओळखीमुळे वेळ काढून येतो म्हणाले. चौथं बाय डिफॉल्ट धी ग्रेट दादासाहेब घाडगेंना गेलं. मागोमागची सगळी भैय्यासाहेब घोरपडे, भावेश दिक्षित, फोटोग्राफर कदम, दिग्या नायकवडी यांना गेली तर उरलेली दोन चांदनीसाठी खास असणार्‍या असोसिएशनमधल्या माणसांना गेली.

कार्ड हातात पडल्यानंतर दादासाहेबांची प्रतिक्रिया अशी होती; कानपुरवाले आहेत का? काही हरकत नाही लवकरच दादासाहेब घाडगे त्यांना महाराष्ट्रीयन करुन टाकतील. भैय्या दिक्षितला तयार रहायला सांग. नवं सावज येतंय. नव्यानं जाळं विणलं पाहिजे आता.

श्री साधारण 8-8.30 च्या दरम्यान त्याच्या गुंगीतून जागा झाला.

'' जीतऽऽऽऽ! '' जागा होऊन आजूबाजूचं सुधरल्यावर त्यानं पहिल्यांदा जीतच्या नावाचा पुकारा केला. बाहेर हॉलमध्ये जीतसोबत बोलत बसलेली प्रिशा ताडकन् उठून बाहेर धावली.

'' मी हॉटेलला जातेय. तू त्याला घेऊन ये. '' ती गाडी घेऊन हॉटेलला निघून गेली. ती बाहेर पडतेय न पडतेय तोच श्री धावतच बाहेर हॉलमध्ये आला.

'' जीत, जीत प्रिशा आलीय जीत. प्रिशा इथं आलीय. तू, तू पाहिलीस ना तिला सकाळी? कुठाय ती? '' बोलत बोलत त्यानं सगळं घर पालथं घातलं पण प्रिशा काही त्याला सापडली नाही.

जीत मात्र हाताची घडी घालून हॉलमध्ये तसाच उभा होता. त्याला आधीच माहीत होतं की हा शुध्दीवर आला की हे असंच होणारे म्हणून.

'' तू गप्प का आहेस? बोल ना काहीतरी. कुठं गेली प्रिशा? सकाळी तर इथं होती ती! ''

'' कधी आली होती ती? '' जीतचा त्याला उलटा प्रश्न.

'' अरे सकाळी नाश्त्याच्यावेळी पाहिली ना मी तिला! ''

'' मी नाही पाहिली. आणि तू आधी असा पिशासारखा घरभर फिरणं बंद कर. पटदिशी तयार हो. मी तुझ्यासाठीच थांबलोय. किती झोपतोस यार! चल पार्टीला जायला उशीर होतोय. ''

'' कसली पार्टी? ''

'' अरे, तू मुंबईला गेल्यामुळं माझ्या पार्टनरच्या वेलकमसाठी ठेवलेली पार्टी मी पोस्टपोन केली होती आजवर. सगळे तिकडेच गेलेत. मी तुझ्या झोपण्यामुळं इथं अडकलो. आवर आता पटदिशी. ''

काहीही न बोलता सगळं आवरुन तयार होऊन श्री आला तर जीत त्याची गाडी घेऊन तयारच होता.

'' हे काय? माझी गाडी कुठं गेली? ''

'' अमू गेलीय सगळ्यांना त्यातनं घेऊन. ''

ते दोघे पोचले तर पार्टी नुकती कुठं सुरु झाली होती. श्रीला तो सगळा तामझाम बघून आश्चर्य वाटलं. ही एवढी मोठी वेलकम पार्टी? तिही फक्त आपल्या पार्टनरची ओळख करुन देण्यासाठी? त्याला समजेना जीतचं नक्की काय चाललंय ते! तो स्टेजकडे जायला वळला इक्यात त्याचं लक्ष गेलं तर त्याचे सरही तिथे आलेले होते. त्याला बघून त्यांनी हात वर केला.

'' अरे श्री, काय झालं? बरा आहेस ना! सकाळी जीतचा फोन आला होता. तुला आज यायला जमणार नाही म्हणाला. तुझी तब्येत बरी नाहीये म्हणाला. '' त्यांनी जवळ येत विचारलं.

'' मला? मी बरा आहे सर. ''

हे काय गौडबंगाल आहे? मी आज कामावर गेलो नाहीये? विचारातच तो मागे वळत होता तर इकडेतिकडे धावणारी वैद्रुती येऊन त्याला धडकली आणि खाली पडली.

'' अरे, अरे लागलं का तुला? '' श्रीनं तिला उठवत विचारलं.

तेवढ्यात तिच्या मागे धावणारे अनिश आणि इरवनपण तिथे आलेच.

'' क्या हुवा दिदी? आपको लगा तो नहीं ना! '' अनिशनं विचारलं.

'' वैद्रु यार चल ना! वहॉं गेमझोन में चल के मजा करेंगे। '' असं म्हणून तिला हाताला धरुन इरवन तिला ओढत घेऊन पण गेला. त्यांच्या मागे जाणार्‍या अनिशला हटकत श्रीनं विचारलं, '' ही कोण? ''

'' अरे बाबा, अमूकाकी के यहॉं प्रिशामौसी आई है ना! ये उनकी बेटी है। '' मधल्या माईक टेस्टिंगच्या आवाजामुळे त्याला प्रिशाचं नावं ऐकू आलं नसलं तरी हा अंदाज आला की अमूनं त्याला नीट चुना लावलाय. त्यानं विचार केला की आता अमू हाताला सापडली की तिला विचारायचंच की ही मौसी कोण ते! त्यानं सर्व्हिस देणार्‍या वेटरच्या ट्रेमधून सॉफ्टड्रिंकचा ग्लास उचलला तोच त्याची नजर समोर उभ्या असलेल्या कानूमावशी आणि कविशअंकलवर पडली. चांदनी त्यांच्या पाया पडत होती. ही कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच त्याला त्यांच्या आजूबाजूला माधवकाका,दिगंबरकाका, मालिनीकाकू सगळे एकत्र उभे राहून गप्पा मारताना दिसले. अरे हे सगळं इथे चाललंय काय? हा जीत यांना कसा ओळखतो? आधीच दिवसभराची गुंगी, त्यात ह्या पार्टीत जे काही घडत होतं ते त्याच्या कळण्यापलिकडे गेलं होतं सगळं. समोरच्या स्टेजवर एक झिरझिरीत पडदा लावला होता. त्याच्यासमोर स्टेजवर जीत, अमू, युवराज, चांदनी उभे होते. अरे, हा तर युव्या आहे. हा कधी?

'' नमस्कार मंडळी. ''

जीतच्या त्या आवाजासरशी आतापर्यंत विस्कळीत असणारे सारे पाहुणे हळूहळू करत स्टेजजवळ ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. दादासाहेब, भैय्यासाहेब, दिक्षित, कदम, दिग्या नायकवडी यांना स्टेजजवळ येताच जीतला बघून धक्काच बसला होता. आमंत्रण पत्रिकेवर कुठेही ना जीतचं नाव होतं ना धाम बिल्डर्सचं. मग हा इथे? सगळ्यांनी सुचक नजरेनं एकमेकांकडे पाहिलं. इशारा समजून दिग्या तिथून हळूच सटकला आणि गेटकडे गेला पण, या पार्टीत सगळीच मोठी माणसं आल्यानं बंदोबस्त तेवढाच कडक होता. त्यांना बाहेर पडण्यासाठी काहीच मार्ग शिल्लक नव्हता. तो तसाच येऊन खुर्चीत बसला. भैय्यासाहेबांनी इशारा केल्यावर त्यानं त्यांना इशार्‍यानंच सांगितलं की बाहेर पडणं शक्य नाही.

जीतनं पुढे बोलायला सुरुवात केली.

'' आज धाम बिल्डर्स नव्या रुपात तुमच्यासमोर येतेय. धाम बिल्डर्सचं नवं दालन सुरु होतंय. इंटेरिअर युवर होम ऍज युवर ड्रीम्स. ड्रीमेंन्टीअर्स. याचे संचालक आहेत युवराज दिक्षित आणि चांदनी गोयल. आपल्याला मागच्या पडद्यावर धाम बिल्डर्सचा आजवरचा प्रवास दाखवणारी एव्ही लगेचच दाखवण्यात येईल. हे सर्व आपणा सर्वांच्या सहयोगाने घडून आलं यासाठी आपले मनःपूर्वक आभार. ''

आपले शब्द आवरते घेऊन जीत स्टेजवरुन खाली उतरला आणि जाऊन पोलिस कमिशनरांच्या शेजारी बसला. मागचा झिरझिरीत पडदा वर गेला. प्रोजेक्टर सुरु झाला आणि पांढर्‍या पडद्यावर धामच्या उभारणीपासूनच्या सगळ्या गोष्टी दिसू लागल्या. मध्येच प्रोजेक्टर बंद झाला. पुन्हा चालू झाला. तिथे दिग्या नायकवडीचा फोटो आला. मागोमाग एका स्त्रीचा आवाज आला.

'' दिग्या नायकवडी. दादासाहेब घाडग्यांचा कार्यकर्ता. दादासाहेबांसाठी लोकांना गंडे घालण्याचं काम करतो. ''

ते ऐकून दिग्याला घाम फुटला. पण उठून जाणार कुठे?

हा आवाज तर प्रिशाचा आहे. म्हणजे प्रिशा इथंच आहे. पण आहे कुठं ती? त्याची नजर तिला शोधत भिरभिरु लागली. तेवढ्यात त्याच्या कानांनी पुढची अनाऊन्समेंन्ट ऐकली.

'' फोटोग्राफर कदम. आधी लग्नाचे फोटो काढायचा. आता स्वतःचा दोन मजली आर्ट स्टुडिओ आहे. दादासाहेबांसाठी अनेकांना ब्लॅकमेल करण्यात याच्या फोटोग्राफीचं स्कील वापरलं जातं. ''

आता घाम फुटण्याची वेळ कदमची होती. तो डोळे फाडफाडून समोर बघत होता.

'' भावेश दिक्षित. सो कॉल्ड स्पाय. दादासाहेबांसाठी सरकारी कंत्राटांच्या रकमा फोडण्यात आणि लोकांची व्यक्तिगत माहीती फोडण्यात माहीर माणूस. ''

'' भैय्यासाहेब घोरपडे. साधा, दुसर्‍याच्या शेतात राबणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा. दादासाहेबांच्या सगळ्या काळ्या कामांचा 50 टक्क्यांचा भागीदार. ''

'' आणि सरते शेवटी या सगळ्यांचे सर्वेसर्वा दादासाहेब घाडगे. कॉलेजात असल्यापासून अनेक घडामोडींमध्ये यांचा हात. वडीलांच्या जागेवर राजकीय प्रवेश केल्यानंतर अनेक लोकांना देशोधडीला लावण्यात यांचा हात. दारुचे धंदे, अवैध वाहतूकीद्वारे नशा पसरवणार्‍या ग्रुपचे संचालक. अनेकांच्या जमिनी नगण्य भावात लाटल्या. बिल्डर असण्याचा दावा करुन अनेक बिल्डरांना मातीत मिळवणारे दादासाहेब घाडगे. ''

आणि या बरोबरच प्रोजेक्टर बंद झाला. सोबतच एका वेटरनं श्रीच्या हातात एक पाकिट आणून दिलं. त्यानं उघडून पाहिलं तर ते इंदर आणि सुशानं दिक्षितच्या मदतीनं मिळून त्याच्या केलेल्या फसवणुकीचे पुरावे होते. सगळ्या मोठ्या माणसांसमोर दादासाहेब घाडग्यांची पोलखोल करण्यात प्रिशाला यश मिळालं. मध्येच पडद्यामागे गेलेल्या पोलिस कमिशनरांच्या हातात ति फाईलही पोचली ज्यात सगळे पुरावे होते. थोड्याच वेळात या पंजाला अटक करण्यात आली. श्रीला आता सगळं सत्य कळून चुकलं होतं. त्याला फार इच्छा झाली की इंदर आणि सुशाला जाऊन रक्त ओकेपर्यंत मारावं. पण प्रिशानं त्याला ती संधी मिळूच दिली नाही. सगळ्यांच्या मुसक्या आवळून पोलिस त्यांना घेऊन जात होते. ते गेटपर्यंत पोचेले तोवर जीतला सांगून प्रिशानं श्रीलाही स्टेजवर आणलं. श्री, अमू, जीत, प्रिशा, युवराज सगळे एकमेकांचा हात धरुन उभे होते.

गेटवर पोचलेल्या इंदरच्या कानांवर प्रिशाचा आवाज पडला.

'' ए इंदर, बघ एकदा मागं वळुन. या स्टेजवर जेवढीजणं उभी आहेत ना! ही त्यांची फक्त मैत्री नाहीये. हे आमचं मैत्र आहे. जिवाभावाचं मैत्र. तुझ्यासारख्या उंदराच्या बस की बात नाही हा हत्तींचा कळप फोडणं. ''

इंदर रागानं काही बोलणार होता पण पोलिस त्याला खेचत बाहेर घेऊन गेले. स्टेजवरच्या सगळ्यांसकट खाली उभारलेल्या घरच्यांनाही प्रतिक्षा होती की श्री आता काय करेल याची. श्रीसमोर सगळं सत्य आलंच होतं. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं होतं की या मैत्रीतला कच्चा दुवा तोच होता. म्हणूनच त्या लोकांनी त्याचा वापर त्यांच्या फायद्यासाठी करुन घेतला होता. जीत आणि अमूला एकाचवेळी धास्ती वाटली की श्री पुन्हा इंम्पेशन्ट होईल म्हणून. चांदनी धडधडत्या काळजानं युवराजचा हात हातात धरुन श्रीवर नजर रोखून बसली होती. काननमावशी आणि कविशअंकलनी ठरवून टाकलं की आता जर श्री काहीही वेडंवाकडं वागला तर प्रिशाला कायमचं सोबत न्यायचं. शिवाय त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीसही पाठवायची. श्री मात्र नुसताच भरल्या डोळ्यांनी प्रिशाला पाहत होता. त्याच्या मनातल्या विचारांची वादळात नाव फुटून सगळे काही अस्तव्यस्त होते तशी काहीतरी अवस्था झाली होती. प्रिशाला ते अगदी नेमकं कळलं. ती जीतच्या कानात काहीतरी कुजबुजली. तसा तो स्टेवरुन उतरुन कुठेतरी गेला. सगळीकडे गाण्याच्या मंद सुरावटींच्यासोबतीनं एक विचित्र शांतता भरुन राहिली होती. थोड्याच वेळात जीत परत आला. त्याच्या सोबत भटजी होते.

'' अरे, असे काय सगळे शांत बसलाय? चला आपल्याला या दोन गुन्हेगारांना जन्मभराच्या कैदेत टाकायचंय ना! वैद्रु, अनिश, इरवन चला.चला. काका काकीला मंडपात घेऊन चला. ''

पुन्हा एकदा प्रिशा सगळ्या घटनाक्रमाचा केंद्रबिंदू झाली. श्री मात्र मुकाटपणानं खुर्चीत जाऊन बसला. त्याला समोर सेम टू सेम त्याच्यासारखीच हसणारी वैद्रुती दिसत होती. वैद्रु माझी आहे? ती माझी मुलगी आहे?

एका बाजूला जो मंडप घातला होता तिथं सगळीजणं जमून युवराज आणि चांदचा साखरपुडा एन्जॉय करत होते.

'' श्री अजूनही तू तिच्याशिवायच राहणारेस का? '' त्याच्याशेजारी येऊन बसत जीतनं विचारलं. जीतला बघून श्रीला एकदम भडभडून आलं. त्यानं पटकन् त्याचे हात धरले. त्याच्यावर डोकं टेकवून तो म्हणाला, '' मला माफ कर मित्रा. मी फार वाईट वागलो तुमच्याशी. स्वतःच्या कतृत्वाचा आणि इगोचा पडदा ओढून बसलो होतो डोळ्यांवर. कळलंच नाही कधी त्या दिक्षितच्या हातचं खेळणं बनलो ते! त्यानं सगळं बरबाद करुन टाकलं रे! मी प्रिशाला फक्त घराबाहेर नाही काढली तर माझ्या मुलीलाही अंतरलो मी! काय होऊन बसलंय हे सगळं जीत? आता कसा तिचा सामना करु मी? कुठल्या तोंडानं तिला सामोरा जाऊ? ''

'' ज्या तोंडानं कॉलेजात असताना सामोरा गेला होतास त्याच तोंडानं जा. '' जीत हसतच म्हणाला.

'' नाही नाही. माझ्यात आता हिंमतच नाहीये. फक्त तिचंच नाही तर तुझं, माझ्या लेकीचं अशा सगळ्यांच्या आयुष्याचं वाटोळं केलंय मी. ''

'' मला सोडलीस श्री तू? '' अमूनं तिथं येत विचारलं.

'' तू आणि मी वेगळे आहोत का? ''

'' हो. नक्कीच. तू पुरुष आहेस मी बाई आहे. आहोत ना वेगळे? '' अमूनं त्यातल्या त्यात बरा विनोद करुन वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. तोवर साखरपुडा आटपून चांदनी आणि युवराज तिथं आले. दोघांनी श्रीला वाकून नमस्कार केला.

'' आशिर्वाद दिजीए जिजाजी। हम दोनो ऐसेही जनमोजनम साथ रहे। ''

श्रीला कळेना ही आपल्याला का जिजाजी म्हणतेय? ही तर जीतची पार्टनर आहे ना!

'' अरे बघतोयस काय असा? आशिर्वाद दे तिला. सख्खी नसली तरी मावस पण मेव्हणीच आहे ती तुझी. कानन मावशीची मुलगी चांदनी. माझी नसलेली पार्टनर. ''

'' म्हणजे? ''

'' म्हणजे काही नाही. जान बची लाखों पाए; लौट के बुद्दु घर को आए। '' प्रिशा म्हणाली. '' चला पार्टी वगैरे सगळं झालंय ना आता घरी जाऊया. ''

जीत, अमू, युवराज, चांदनी सगळ्यांच्या बाऊंड्री पार. त्यांना कळेना ही का श्रीला इग्नोर करतेय? त्याच्यासाठी तर तिनं एवढे सगळे सोपस्कार केले होते. आणि आता त्यालाच असा सोडून जातेय. हे सगळे विचार करेपर्यंत प्रिशा चालायला लागली होती.

'' अरे जा ना मुर्खा, बघतोयस काय नुसता? आता जर ती गेली तर परत कधीच परतून येणार नाही. जा. ''

'' हॉं, जीजू जाईए। दी आपसे बेइन्तहा प्यार करती है। मना लिजीए उन्हे। ''

सगळ्यांनी फोर्स केल्यावर सगळी हिंमत एकवटून श्री तिच्यामागे धावला.

'' प्रिशाऽऽऽ! '' त्याच्या हाकेनं तिची पुढं जाणारी पावलं जागेवरच थांबली.

'' जे काही बोलायचंय ते पटकन् बोल. वेळ नाहीए माझ्याकडे. ''

'' अजूनही रागवलीयस? ''

'' काय संबंध मी तुझ्यावर रागवण्याचा? कोण तू माझा? ''

'' मी... तुझा निंबाळकर. ''

'' नाही असू शकत. त्यानं मला त्याच्या आयुष्यातून केव्हाच पुसून टाकलंय. ''

आता मात्र त्याला राहवलं नाही. तो पटकन् तिच्या समोर आला. तिचे दोन्ही खांदे धरुन म्हणाला, '' मी नाही तुला अशी जाऊ देणार प्रिशा! ''

आणि त्यानं तिचे दोन्ही कान पकडले.

'' बघ, मी कानही पकडलेत. आतातरी मला माफ कर ना! ''

शेवटी प्रेम केलं होतं त्याच्यावर; राग तरी कितीवेळ धरुन राहणार ना! तिच्या डोळ्यांतून आसवांचे झरे झरु लागले.

'' ए वेडाबाई, रडतेस काय अशी? '' असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतलं.

तसा मागे उभारलेल्या ग्रुपनं आनंदानं कल्ला करत अख्खं हॉटेल दणाणून सोडलं.

'' यार बिना चैन कहॉं रे! प्यार बिना चैन कहॉं रे! सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला अरे प्यार करले! ''

'' जीत्या काढ 1000 रुपयाची नोट. तू बेट हरलास. '' तिच्याजवळ पोचून युव्या ओरडला.

 जीतनं खिशातनं हजाराची नोट काढली, ती प्रिशाच्या डोक्याभोवती फिरवली आणि युव्याला दिली. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, '' प्य्रा, झाला ना समेट? '' तशी श्रीला सोडून प्रिशा त्याच्या कुशीत शिरली. तिच्या डोक्यावरुन हात फिरवून तिच्या कपाळावर ओठ टेकून त्यानं श्रीला धमकावलं.

'' आता माझ्या पोरीला तसूभर जरी त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवायचं. ''

सगळे आनंदानं घरी आले. बघतात तर श्रीच्या घराला लायटिंग केलेली. प्रिशानं प्रश्नार्थक नजरेनं युव्याकडं पाहिलं.

'' त्याच्याकडे नको बघूस. त्यानं काही नाही केलेलं. हे मी आणि चांदने केलंय. अमू कलश ठेवलास ना उंबर्‍यात? ''

'' हो. ''

'' चला श्री. आज तुझ्या आयुष्यात आणि घरात प्रिशाचा पुन्हा गृहप्रवेश होतोय. तिला आणि वैद्रुतीला, अनिशला नीट सांभाळ. ''

ते दोघे आत यायला लागले तर युवराजनं वाट अडवली.

'' नाव घ्या. दक्षिणा द्या. मग प्रवेश करा. ''

प्रिशा काहीच बोलली नाही. मात्र श्रीच्या मागे असणारी चांदनी त्याच्या कानात फुसफुसली.

'' आप आए बहार आई, जिंदगी में फिरसें खुशियोंकी लहर आई। '' 

त्या दोघांना त्यांच्या रुममध्ये सोडलं आणि सगळे जीतच्या घरी गेले. अनेक वर्षांनी ती पुन्हा एकदा त्या खिडकीत जाऊन उभी राहिली जिथून तिची लाडकी रातराणी दिसत होती. तो झोपाळा, ती फुलून आलेली रातराणी आणि सोबतीला त्रयोदशीचा चंद्र. पौर्णिमा जरी उद्या असली तरी त्यांच्या आयुष्यात मात्र ती आजच झाली होती.

'' काय बघतेस? '' तिच्या कंबरेत मागून हात घालून खांद्यावर हनुवटी टेकत त्यानं विचारलं.

'' रातराणीला. माझ्या आयुष्यात किती स्थित्यंतरं घडून गेली. पण, माझी रातराणी अजूनही तशीच आहे. ''

'' ती आता कायम तशीच राहिल प्रिशू! मी तिला कधीच सुकू देणार नाही. ''

तिनं नजर खाली झुकवली. श्रीनं तिच्या हनुवटीला धरुन तिचा चेहरा वर करत नजरेत नजर मिसळून टाकली. तिला कळलंच नाही कधी ती श्रीमय होऊन गेली ते!. ''


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama