Namarata Pawaskar

Drama

4.4  

Namarata Pawaskar

Drama

तुझे नि माझे नाते काय?

तुझे नि माझे नाते काय?

153 mins
5.3K


१० वर्षं उलटून गेलीत आता! पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. शेवटपर्यंत भूप त्याच्या निर्णयावर ठाम राहिलाय. त्यानं निम्ना सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीला बघायलाही नकार दिलाय. श्रुती-अंकित आता आईबाबाच्या भुमिकेत शिरलेत. रुमझुम त्यांची लाडकी लेक, भूपची लाडकी पुतणी,नेहाची भाची आणि उमाताई प्रसाददादांच्या लाडाचा किडा! रुझुचाही भूप लाडका काका होता. तिची सगळी छोटीमोठी सिक्रेट ती काकासोबत शेअर करायची. तिला तिच्या शाळेत पहिल्यांदा सोडलं काकानंच. तिची सगळी खरेदी करायला तिला काकाच लागायचा. ती कधीकधी लाडानं त्याला भूप+काकूचं रुप भूकू म्हणायची. एकदोनदा तिनं त्यासाठी श्रुतीचा ओरडाही खाल्ला होता. पण, काका-पुतणी दोघंही ढीम्म. तिनं कधीच कुठल्या गोष्टीसाठी बाबाकडं, आईकडं हट्ट नाही केलेला. तिला सहलीची तयारी करायची तर दुसऱ्या कुणी भरलेली बॅग आवडायची नाही. भूप रात्री कितीही उशीरा आला तरी ती अर्ध्या झोपेतपण उठून त्याच्या रुममध्ये जाऊन त्याच्या कुशीत झोपायची. तो आलेला तिला कसं कळायचं हे कोडं आजतागायत घरातल्या कुणालाही उलगडलं नव्हतं. श्रुती गरोदर असतानाच अंकितला नेपाळच्या एका सॉफ्टवेअर कंपनीतून खास आमंत्रण आलं होतं. तेही मॅनेजरपदासाठी नाही तर मॅनेजमेंट कशी करावी? त्यासाठी रिलेशन कसे बिल्टअप करावेत यावर त्याची मतं मांडण्यासाठी. त्याला पहिलं निमंत्रण मिळालं होतं मुंबईच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीत. त्यावेळी विचार मांडताना त्याच्या लक्षात आलं की आपण मॅनेजर म्हणून काम करण्यापेक्षा ती कशी करावी हे सांगण्यात जास्त इंटरेस्टेड आहोत. त्यावेळी श्रुती ५ महिन्यांची गरोदर होती. मग त्यावरुन घरात खलबतं सुरु झाली. आई-पप्पांचा त्याच्या नोकरी सोडण्याला विरोध होता. नेहानं मात्र यावर फारसं काही मतप्रदर्शन केलं नाही. ती तिच्या फॅशन डिझायनिंग आणि होम डेकोरेशन कॅन्डल्सच्या बिझनेसमध्ये गुंतलेली होती. ज्यादिवशी तो त्याचं पहिलं लेक्चर देऊन आला; त्याचदिवशी जेवणाच्या टेबलावर याची चर्चा रंगली होती. येताना त्यानं घरातल्या प्रत्येकाच्या आवडीची मिठाई वेगवेगळी पॅक करुन आणली होती. श्रुतीसाठी कालाजामून, नेहासाठी बेळगावी कुंदा, भूपची आवडती मटका कुल्फी आणि आई-पप्पांसाठी पुरणपोळी.


"अंकित, चला पानं वाढलीत."


श्रुतीनं त्याला आवाज दिला. तो आवाज खरंतर सगळ्यांसाठीच होता. भूप मात्र वलयच्या इलेक्ट्री-फिकेशनच्या कामात व्यस्त होता. लवकरच वलयच्या घरांची पझेशन्स द्यायची होती. या घरांची सगळी वायरिंग ही कंप्लीट कंन्सील्ड वायरिंग असल्यानं त्याला खूप काळजी घ्यावी लागत होती. साहजिकच त्याचं घरी येणं फार कमी झालं होतं. नेहा थोड्यावेळापुर्वीच येऊन आंघोळ करुन फ्रेश होऊन तिला मदत करत होती. सगळे जमल्यावर भूपची रिकामी जागा बघून अंकित थोडा नाराज झाला.


"काय करायचं याचं? एकदा जो घराबाहेर जातो ते परत यायचं नाव घेत नाही. आम्ही काही कामधंदे करत नाही का? पण, याचं सगळंच अजब आहे. तरी बरं साहेबांनी अजून लग्न नाही केलेलं. बायका-पोरांची लफडी मागं नाहीत तरी हा दिवसरात्र कामात गुंतलेला. कसं बोलायचं आणि भेटायचं याला?"


"अंकित, शांत हो बाबा! कशाला एवढा त्रागा करतोस? तुला तर माहितेय ना? तो किती हट्टी आहे ते! आता त्यानं ठरवलंय त्याचा बिझनेस मोठा करायचा तर जाऊ दे. करु दे त्याला त्याच्या मनासारखं." आई त्याला समजवू लागल्या.


"त्याच्या मनासारखं? तुला माहितेय आई हे तो त्याच्या मनानं नाही तर मनाला गुंतवून ठेवायला करतोय. तू हो म्हणाली असतीस तर तो आज आपल्या सोबत बसला असता इथे जेवायला. वेळेत आला असता तो घरी जर त्याला त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर संसार करता आला असता! पण, तू..."-अंकित


" बास! हा विषय इथेच थांबवा. मी याआधीही सांगितलंय की मला जेवणाच्या टेबलवर कसलेही वादविवाद नकोत. तू तुला जे हवंय ते करतोयस; तो त्याला हवं ते करतोय. तिला एकटीला याचा सगळा दोष देऊ नकोस. ती तिच्या जागेवर बरोबरच होती. गेल्या 5 वर्षात तू काय कमी गोष्टी ऐकल्यास का तिच्या बाबतीत? आणि तुम्हांला कुणालाच तिच्याशी संपर्क ठेवायला मना केलं नव्हतं."-पप्पा


"पण, पप्पा आपण आपल्या भूपला..."-अंकित


"अंकित, आपण तुमच्या आजच्या लेक्चरविषयी बोलणार होतो ना!" श्रुतीनं जाणीवपुर्वक बोलण्याला वेगळं वळण दिलं. तसा अंकित म्हणाला,


"हो पप्पा. मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची होती. पण, मला असं वाटतंय की आपण जेवून नंतर यावर बोलूयात."


"माझी काहीच हरकत नाही."-पप्पा


जेवण आटपून तो, श्रुती आईपप्पा आणि नेहा हॉलमधे आपापल्या आवडीच्या मिठाईचा आस्वाद घेत बसले.


"पप्पा, मघाशी अंकित मला म्हणाले की त्यांना आता नोकरी करायचा कंटाळा आलाय. ते ज्या विषयावर मत मांडायला गेले होते तिथं त्यांना वाटलं की यापुढे याच विषयावर आपण फ्रिलान्समध्ये लेक्चर्स द्यावीत. मी नेहमीच त्यांच्या निर्णयाचा आदर करत आलेय. कारण, आम्ही सगळे निर्णय एकमेकांना विश्वासात घेऊन मगच घेतलेत. या निर्णयासाठी मात्र आम्हांला तुमचा सल्ला हवा आहे." श्रुतीनं तिच्यापरीनं अंकितचं मनोगत पप्पांच्या कानांपर्यंत पोचवलं.


"अगं, पण नोकरी का सोडायची? हे तर तो नोकरी करुनसुद्धा करूच शकतो की! आणि नोकरी सोडायची तर दर महिना येणारी एक ठराविक मिळकत बंद होईल. मग साठवलेल्या पैशांवर सगळा भार पडेल. त्यामुळे जमा खर्चात बदलेल. आणि तो तुम्हांला नीट बँलन्स नाही करता आला तर संसाराची आर्थिक घडी विस्कटायला असा कितीसा वेळ लागेल?" उमाताईंनी तिच्यासमोर एक चुकलेलं समीकरण उलगडून ठेवलं.


"आणि आर्थिक घडी विस्कटली की मग कितीही इस्त्री फिरवली तरी नात्यांवरची सुरकुती हटत नाही. हे काही तुला मी वेगळं सांगायला नकोय बाळा! आता ५ वर्ष होऊन गेलीत तुमच्या लग्नाला."


बायकोची समीकरणं गेल्या २५-३० वर्षांच्या संसारात फारच कमी वेळा बिघडलेली बघितली असल्यानं पप्पा यावर फार काही बोलले नाहीत.


"पण, आई मला वाटतं की त्यांना जर त्या शिकवण्यात त्यांचा आनंद मिळत असेल तर आपण थोडीशी रिस्क घ्यायला का मागेपुढे बघायचं? तसंही मी काही त्यांच्यासोबतीनं माझा जॉब सोडत नाहीए ना! त्यामुळे झालाच बदल तर एवढाच होईल की दर महिन्याला हातात येणारी ठराविक रक्कम थोडी कमी होईल. झाली कमी तर मी करेन थोडसं अँडजेस्ट त्यांच्या आनंदासाठी." तिनं हलकेच त्याचा हात हातात घेऊन त्यावर थोपटलं.


"वहिनी मला पटतंय तुझं म्हणणं. मी आहे तुझ्या बाजूने. भैय्यानं मला माझा आनंद मिळवायला मदत केलीय. मी माझ्याकडून एवढासा प्रयत्न नक्कीच करु शकते." बऱ्याच वेळानं नेहा बोलली.


"नेहा, मी भैय्याला विरोध करत नाहीए. मी त्याला पुर्ण विचारांन्ती निर्णय घे असं सांगतेय. उगीच उत्साहाच्या भरात गायली लावणी तिला केली राणी! असं व्हायला नकोय."


"आई तुझ दरवेळेस असंच असतं. दादूसच्या लग्नाबाबतही हेच म्हणाली होतीस की मी विरोध नाही करत म्हणून. हो ना! जर तुला नाण्याच्या नकोश्या बाजूच दाखवायच्या असतात तर तू असं कसं म्हणतेस की तुला विरोध करायचा नसतो?" नेहानं फाडकन् प्रश्न विचारला.


"पण ती ज्या बाजू दाखवते त्या न बघताच जर निर्णय घेतला तर तो अंगाशी येण्याची शक्यता जवळजवळ ६०% पेक्षा जास्त असते. आणि मी आहेच की प्लस पॉईंट घेऊन बसलेला." नेहाच्या प्रश्नाला पप्पांनी उत्तर दिलं.


" ठीक आहे तुम्हांला जो पटेल तो निर्णय घ्या. माझी काहीच हरकत नाहीए. मी या घरची एक सदस्य नी एक कमावता हात आहे. जमेल तेवढी माझी जबाबदारी मी पार पाडेन. पण, भैय्या आणि वहिनी माझं तुम्हांला एवढंच सांगणं आहे की एकदा दादूससोबत यावर बोलून घ्या. भैय्या वहिनी आता आई होणार आहे. तिची काळजी दादूसइतक्या प्रेमानं कुणीच नाही घेऊ शकणार. तु एकदा फ्रिलान्समध्ये गेलास की तुझे प्रवास सुरु होतील. आणि तू काही सतत तिच्या वेळेला जवळ असशीलंच असं नाही. मी माझी स्वतःचीपण तेवढी खात्री देणार नाही. मात्र, दादूसवर तू वहिनीची जबाबदारी टाकलीस तर तो थोडासा घरातही राहिल. जमल्यास त्याचं आईशी असलेलं मौनव्रतंही संपण्याची आशा ठेऊ आपण."


नेहानं जाता जाता एक सर्वसमावेशक उपाय मांडला आणि ती झोपायला निघून गेली. तिची गर्लफ्रेंन्ड गौरासोबत तिला एका बर्थडेसाठी काही थिम बनवण्यावर दुसऱ्या दिवशी काम करायचं होतं. ती गेल्यानंतर पप्पा अंकितला म्हणाले,


" नेहा सांगतेय ते खरंय! भूप म्हणजे काळजीवाहू सरकार आहे. तू एकदा त्याच्याशी बोलून घे. मला नाही वाटत की तो यासाठी नकार देईल. राहिली गोष्ट तुझ्या नोकरी सोडण्याची; तर तुझा नोटीस पिरिएड तू विचार करण्यासाठी वापर. त्यातही जर तुला नोकरी सोडणंच योग्य वाटलं तर निश्चितच तू तुला हवं ते करायला मोकळा आहेस. कुठलाही निर्णय घेताना तो १००% हो किंवा नाहीमध्ये घे. तळ्यातमळ्यात करु नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि कायम राहू."


ते दोघेही झोपायला निघून गेले. हॉलमध्ये आता ती दोघंच उरली होती. तिचा हात हातात घेऊन त्यानं खात्रीसाठी पुन्हा तिला विचारलं,


"श्रु तुला चालेल ना मी नोकरी सोडलेली?"


"अंकित, तू अज्जिबात काळजी नको करुस. मी करेन सगळं मँनेज."


" तुझ्या अशा अवस्थेत मी असा निर्णय घेतोय. आपल्या बाळावर याचा काही परिमाण तर नाही ना व्हायचा?"


"भैय्या, तुझा भूप असताना तू इतकी काळजी का करतोएस? मी आहे ना! मी वहिनीची आणि बाळाची सगळी काळजी घेईन..." मघाशीच आत आलेल्या भूपनं त्याला काही क्षणातच चिंतामुक्त केलं.


"तू कसा काय इतक्या लवकर आलास भूप? अजून तर फक्त ११:३० वाजतायत!"-श्रुती


जमिनीला हात लावून उठणाऱ्या श्रुतीला आपल्या हाताचा आधार देत तो म्हणाला,


" काही नाही गं वहिनी जवळपास सगळं काम आटपलं आजच्या दिवसाचं. मग म्हटलं जाऊ घरी."


"अच्छा, म्हणजे तुला घरी यावसं वाटतं तर?"


अंकितनं त्याला पाठीवर फटका मारत विचारलं. श्रुतीनं फ्रिजमधून काढून दिलेली मटका कुल्फी खात तो अंकितला म्हणाला,


"हं! वाटतं कधी कधी असं. पण, रोज नाही मला इथे यावसं वाटत भैय्या! घरी आलो की आईशी बोलायची ईच्छा नाही. नेहा, तू, वहिनी आपापल्या कामात बुडालेले असता म्हणून तुम्हांला डिस्टर्ब करावसं वाटत नाही. येऊन जाऊन पप्पांसोबत काय मुकेपणानं चेस खेळेन तेवढाच विरंगुळा. गंध्या-रम्याचा संसार मस्त चालू आहे. त्यांचा यदुपण आता चालायला लागलाय. मिथिल सुगमानं पुढच्या वर्षी लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे इथून तिथून मी सगळ्यातून वगळल्यासारखा झालोय. निमाची आठवण खूप त्रास देते रे मग!" हातातली कुल्फी वाडग्यात तशीच ठेवत तो शून्यात नजर लावून बसला.


"भूप्या तू असा उदास बरा नाही वाटत हं!" अंकितनं त्याला टपली मारली.


"तू निम्याला भेटत का नाहीस? तीनं स्वतःला सगळ्यांपासून अलिप्त करुन घेतलंय याचा अर्थ तू तिला शोधायचंच नाहीस असं नाहीए भूप! मला माहितेय ती किती प्रेम करते तुझ्यावर ते! एकदा शोधण्याचा प्रयत्न करुन बघ ना! कदाचित नसेल तिच्या आयुष्यात अजून कुणी. तुला आठवतंय ना! तूच मला म्हणाला होतास शिद्दत सें किसीको चाहो तो कायनात भी आपकी मदद करती है| मग तू असे हातपाय गाळून का बसलायस? घे. संपव ही कुल्फी." श्रुतीनं कुल्फीचा चमचा त्याच्या ओठांजवळ नेला.


"जरा कमी लाड कर त्याचे. लहान नाहीए काही आता तो. चांगला ३५ वर्षांचा घोडा झालाय."-अंकित


" तू का जळतोस एवढा? लाडका दीर आहे तो माझा."


"हां, भैय्या! तू नको आमच्यामध्ये येउस आणि तू तुझा निर्णय बिनधास्त घेऊन टाक. वहिनी आणि तुझ्या येणाऱ्या बाळाची जबाबदारी माझी." बोलता बोलता तो जिना चढून त्याच्या खोलीत घुसला पण.


"हा पोरगा सुधारणार नाही. चल तू. झोपायला जाऊयात."


अंकितनं तिला हाताला धरुन खोलीत घेऊन गेला.


स्वरा....

*****************************************

दुसऱ्या दिवसापासून भूपची सगळी दिनचर्याच बदलून गेली. वलयच्या कामाचं अर्ध बर्डन त्यानं मिथिल-सुगमाच्या खांद्यावर टाकलं. गंधर्व आधीच ऑफिसची मटेरिअल बाईंग अँन्ड यूजिंगची जबाबदारी सांभाळत होता. भूप आता वेळेत घरी यायला लागला. श्रुतीच्या सगळ्याच गोष्टींची जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. तिला ऑफिसला नेऊन सोडणं-घरी घेऊन येणं, तिच्या गोळ्या-औषध, डाएट सगळ्याच्या वेळा सांभाळणं, तिला सोनोग्राफी आणि बाकीच्या तपासण्यांसाठी घेऊन जाणं हे सगळं तो अगदी थोरल्या भावाच्या निगुतीनं करत होता. अगदी येणाऱ्या बाळासाठीची खरेदीपण त्यानं करुन ठेवली होती. अंकितच्या वाट्याला त्यानं फक्त श्रुतीची चौकशी करणं एवढंच काम शिल्लक ठेवलं होतं. अंकित आता त्याचा जास्तीचा वेळ मँनेजमेंन्टचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मँनेजर्सच्या बिहेव्हिअर, सवयी, स्ट्रँटेजी, प्लँनिंग या सगळ्या गोष्टींचा डिटेल स्टडी करण्यासाठी

देत होता. आता त्याला बरीच आमंत्रणं येऊ लागली होती या विषयावर बोलण्यासाठी. त्याला किंवा घरच्यांना वाटलं होतं तसं आर्थिक गणित फारसं बिघडलं नाही. नेहा आणि भूपनं आपल्यापरीनं ते व्यवस्थित उचलून धरलं होतं. हल्लीच्या हल्ली तो दोनदा नेदरलँन्ड आणि इजिप्तची वारी करुन आला होता. श्रुतीचे महिने आता भरत आले होते. डिलिव्हरीच्या अगदी काठावर पोचली असतानाच त्याला नेपाळचं एक महिन्याचं कॉन्ट्रँक्ट मिळालं. खरंतर तो तयारच नव्हता तिला अशा अवस्थेत सोडून जायला पण तिच म्हणाली की आहेत तिला बघणारी इथे. त्याने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावं. खुशाल नेपाळचं निमंत्रण स्विकारावं. मग मात्र त्यानं मनात कोणताही किंतुपरंतु न ठेवता ते निमंत्रण स्विकारलं. त्याला जाऊन नुकता कुठं आठवडा उलटला होता. भूपची वहिनीड्यूटी नेहमीसारखी चालू होती. त्यादिवशी तो जरा लवकरचं घरी आला, कारण वलयचं सगळं काम पुर्ण झालं होतं. दुसऱ्यादिवशी वलयची पझेशन्स वाटली जाणार होती. नंदादीपच्या कामाला हात घालण्याआधी त्याच्याकडे चांगले ५-६ दिवस होते रिलँक्स होण्यासाठी. त्यामुळे तो लवकर घरी आला. वहिनीला आवडणारे चीजबॉल रेडी करुन तो आणि श्रुती गच्चीत छान गप्पा मारत बसले होते. "भूप, तू खरंच निमाला अजून विसरला नाहीएस?"

"वहिनी, तिला विसरुन मी नाही जगू शकत गं! कुठं फार वर्षं झालीत तेव्हा तिनं आपल्यासाठी स्वतःला अपरिचीतच्या पडद्यात बंदिस्त करुन घेतल्याला? आठवतंय ना तुला; की विसरलीस तुझा तो वाढदिवस? मला तर आजही माहीत नाही की तिचं आणि आईचं काय बोलणं झालं ते! तीनं तिथंच सगळ्यांना फोनच्या लिस्टमधून तिच्यासमोर डिलीट करुन टाकावं असं आई काय बोलली होती तिच्याशी? बरं, तिनं तुला त्रास नको म्हणून काका-काकूंनापण या सगळ्यातून लांब ठेवलं. हा माझ्यासाठी केवढा मोठा धक्का होता माहितेय का तुला?"


"मी तुला जर म्हणाले की मला ते बोलणं माहित आहे तर?" तो एकदम भसकटलाच.


"काय? तुला माहित आहे त्या दोघी काय बोलल्या? मग तू आजपर्यंत मला का नाही सांगितलंस?"


"गदाधारी भिम शांत. तुझ्या निमाला दिलेल्या वचनासाठी आजवर मौन होते मी. पण, तुझी अवस्था बघून मी आडून आडून तुला सुचवत होते की तिला शोध म्हणून."


"बाकी सगळं राहू दे. तू आधी मला हे सांग की त्यांचं बोलणं काय झालं?" तो स्वतःचा मुद्दा दातातून सोडायला तयार नव्हता.


"त्या रात्री केक कापून झाल्यावर लेट कमर म्हणून निमा आली होती हे तर तुला माहितच आहे. तशी ती कधीच, कुठेच उशीरा जात नाही. वेळेत कामं करणं हा तिचा जन्मजात गुण आहे. पण, त्यादिवशी ती एका हिंदी प्रोड्यूसरसोबत मिटींगमध्ये होती. ती आटपून तिला पार्टीत पोचीयला वेळ झाला. तुमचं त्यादिवशी फार काही बोलणं झालंच नाही कारण तूपण उशीराच तर आला होतास ना!"


"हो आणि मी मला उशीर होणार हे फोन करुन भैय्याला कळवलंही होतं."


"माहित आहे मला ते! म्हणूनच तर केक कापण्याचा विधी तुझ्याशिवायच पार पाडला होता आम्ही. पण, तू आलास तेव्हा आई आणि निमाचं बोलणं शेवटच्या टप्प्यात आलं होतं. नेमका तिनं तो फोनबुकमधून सगळ्यांचे नंबर डिलीट करण्यासाठी आईंच्यासोबतचं बालणं थांबवून हॉलच्यामध्ये यायला आणि तू ते बघायला एकच गाठ पडली होती. त्यानंतर ती तुझ्याशीदेखील औपचारिक बोलून निघून गेली. कारण, आई तिला म्हणाल्या होत्या की माझा एक मुलगा बिनलग्नाचा राहिला तरी मला फारसं वाईट वाटणार नाही. पण, मी सिनेमावाल्या मुलीला या घरची सून करुन घेणार नाही. बाकी तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस. पण, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा कधीच प्रयत्न करु नकोस. जर तू असं काही केलंस तर मी आत्महत्या करेन. त्यांच्या ह्या बोलण्यानं ती आतून फार दुखावली. त्याच रागाच्या भरात तिनं स्वतःला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून बेदखल करुन घेतलं. जाता जाता ती एवढंच म्हणाली की मी तुम्हांला समजलेच नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्यापासून मी तोडेन अशी भाषा वापरलीत. आज, आत्ता या क्षणापासून मीच तुमच्या मुलाच्या आयुष्यातून निघून जातेय. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की या निर्णयाचा तुम्हांला नक्की पश्चात्ताप होईल. आणि ती बोलली ते अगदी खरंय. आज तुझी अवस्था बघून आईंना खरंच खूप पश्चात्ताप होतोय भूप. त्यांना वाटतंय की तुझ्या आयुष्याचं हे असं वाळवंट त्यांच्यामुळे झालंय."


"मग काय खोटं आहे त्यात? ती नाहीए का त्याला जबाबदार?" इतकावेळ सुन्नपणे डोकं धरुन तिचं बौलणं ऐकणारा भूप उचकला.


"भूप, ती फक्त तुझी आई म्हणून विचार करत असती तर तिनं कधीच तुझ्या न् निमाच्या लग्नाला मान्यता दिली असती. पण, ती विचार करतेय या घरातली कर्ती स्त्री म्हणून. समाज काय म्हणेल याचा विचार करावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी कुटुंबाविषयी निर्णय घेताना हा विचार करावाच लागतो कारण आपण समाजात वावरतो, जगतो. त्यामुळे तुझं तिला जबाबदार ठरवणं चुकीचं आहे असं मला वाटतं."


"मग, तिच्या या निर्णयामुळं मी माझ्या आयुष्यातली काही मोलाची वर्षं हातून घालवून बसलो हे तुला बरोबर वाटतं का?"


"हे बघ, तुला आयुष्य कसं जगायचंय हा तुझा प्रश्न आहे. तू आईच्या आणि प्रेयसीच्या हट्टासाठी एकटा राहिलास. पण, मी म्हणेन की अजूनही वेळ गेलेली नाही. तू निमाला शोध. तिला भेट. तिचं मन वळव. आणि त्यानंतर कदाचित आईंचाही निर्णय बदलू शकेल."


तिच्या या प्रस्तावावर तो कॉफी संपल्यावरही विचार करत राहिला.


स्वरा...

*****************************************

नेहा हल्ली भैय्या नसताना वहिनीच्याच खोलीत झोपायची. न जाणो तिला रात्री अपरात्री कशाची गरज लागली तर; या अवघडल्या अवस्थेत ती काय करेल असा विचार करुन आईंनीच तिला तसं सांगितलं होतं. आजही रात्री उशीरा परतलेली नेहा वहिनीच्याच खोलीत झोपली होती. पहाटे ५ वाजता तिला बेडवरच्या हालचालींनी जाणवलं श्रुतीला कळा सुरु झाल्यात. ती पटकन् उठली. नाईट लँम्प चालूच होता. तिनं मोठा लाईट चालू केला. श्रुतीला हात धरुन वॉशरुममध्ये नेलं, पुन्हा बाहेर आणलं. मग तिला बेडवर बसवून तशीच भूपच्या रुमकडे जाऊन नॉक केलं. तो जागाच होता की काय कोण जाणे! पाचव्या सेकंदाला दार उघडलं त्याने.


"दादूस, वहिनीला कळा सुरु झाल्यात. आपल्याला घाई करायला हवीय."


"बरं! आलोच. शर्ट चढवतो तोवर तिला बाहेर घेऊन ये. दोघं धरुन तिला खाली नेऊ. मी गाडी काढतो तोवर तिला सांभाळून घे."


तो पटकन् आत गेला. तोवर नेहानं आत जाऊन श्रुतीला जिन्यापर्यंत आणलं. शर्ट चढवून आलेल्या भूपनं नेहाच्या बरोबरीनं तिला आधार देत खाली आणलं. तो गाडी काढायला गेला तोवर श्रुतीला सोफ्यावर बसवून नेहानं मम्मीला हाक मारली.


"आई, आम्ही वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. तू आणि पप्पा या मागून. येताना तिच्यासाठी मऊ भात, तूप आणि मेतकूट आण आठवणीनं. बरं भात हॉटपॉटमधून आण हं! हल्ली तू फार विसरतेस सगळं."


" हो तर. मी विसरते आणि तू अनुभवी सुईण झालीस की नाही? जा आता. तो बघ भूप आला."


पप्पा आणि नेहानं तिला धरुन गाडीत बसवलं. सोबतची डिलीव्हरी मटेरिअल बँग घेऊन नेहा तिच्यासोबत निघून गेली. दुपारी १२:२५ ला नेहानं फोन केला.


"पप्पा, आपल्या घरी परी आलीय. तुम्ही या लवकर. डिलिव्हरी नॉर्मल झालीय. भैय्याचा रंग घेऊन आलीय त्याची लेक. तुम्ही लवकर या. आणि आठवणीनं आईला तूपभात मेतकूट घेऊन यायला सांगा. मी बाहेरून डिंकाचे लाडू आणते. चला बाय. भैय्याला फोन करुन सांगते तो बाप झालाय ते!"


पण तिचा फोन लावून विरस झाला कारण तिच्याआधीच भूपनं भैय्याला तो बाप झाल्याची तेही लेकीचा बाप झाल्याची खबर दिलीच होतं. आणखी दोन दिवसात तो येणारच आहे असं म्हणाला तिला. त्याचं फ्लाईट बुकिंग झालं होतं. तो म्हणाला भूपला सेल्फी/फोटो पाठव तर पठ्ठ्यानं त्याला दमच भरला.


"ए, शहाण्या, येऊन बघ लेकीला. काही फोटोबिटो काढणार नाहीए मी इतक्यात तिचा. किमान अजून ५ दिवस तर नाहीच नाही. आपल्याकडचे मोबाईल अजून तेवढे चांगले नाहीएत बाबा! पोरीवर त्या रेडिओ व्हेवचा काही विपरीत परिणाम नको व्हायला."


"वा रे वा! बाप मी आहे का तू रे!"


"मी जरी नामधारी असलो तरी तुझ्या गैरहजेरीत ती माझीच जबाबदारी आहे ना!"


त्याच्या या उत्तरानं अंकित निरुत्तर झाला. चार दिवस आपलं सगळं काम सोडून भूप फक्त आणि फक्त वहिनीसोबत रुमझुम (त्यानंच ठेवलं होतं त्या इलुश्या गोडुश्या परीचं हे नाव.) च्या सोबतच हॉस्पिटल आणि घर एवढ्याच वाऱ्या करत होता. दुसऱ्या दिवशी हा पप्पांना तिथे थांबवून आंघोळ, नाश्ता याच्यासाठी घरी जाऊन परत आला. पप्पा घरी गेले आणि संध्याकाळी अचानकच रुझु शिंकायला लागली. झालं ह्याची म्हणजे श्रुतीपेक्षा जास्त ओरड. चाईल्ड स्पेशालिस्टला आणलं तातडीनं. तिला तपासायला लावलं. आणि जास्त काळजीचं कारण नाही असं कळल्यावर त्यांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन घेऊन तो औषध आणायला गेला. तो औषध घेत असताना अचानक त्याला पाठीमागून ओळखीचा आवाज ऐकू आला. तो औषध घेण्याचं विसरुन गर्रकन् मागे वळला. हो तिच! ती निम्नाच होती.


"मृदुल, मी तुला सांगितलं होतं ना! किमान पुढचे दोन तास मला फोन करायचा नाही म्हणून? मग हा काय वेडेपणा आहे? तुम्हांला दिलेत ना निर्णय घेण्याचे पुर्ण अधिकार? ब्रेकडाऊनमध्ये सगळं तुमच्या हातात देऊनही मला फोन करण्याचं कारण काय?"


पलिकडून कुणीतरी मृदुल अजीजीनं बोलत असावा असा त्यानं अंदाज केला. तिला कल्पनाच नव्हती की भूप तिथेच असेल म्हणून. ती पाठमोरी उभी होती. भूप तिच्यामागे जाऊन उभा राहिला आणि त्यानं हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला.


"निमू!"


त्या आवाजानं आणि स्पर्शानं ती दचकलीच. इतक्या वर्षांनी तोच आवाज! तोच स्पर्श! आणि त्या स्पर्शानं तिच्या आत तेच जुनं प्रेम सळसळून गेलं. तिचा फोन केव्हाच बंद झाला होता पण त्याचा हात खांद्यावरुन काढून टाकण्याची किंवा मागे वळून पहाण्याची तिची हिंमत होईना.


"निमू, मला माहितेय तूच आहेस. इकडे बघ निमू."


पण छे! ती हललीच नाही. तिचे पाय जसे काही दगडाचे झाले होते. ती वळत नाही म्हटल्यावर तोच वळसा घालून तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. तिनं डोळे गच्च मिटून घेतले होते. त्यानं तिचे दोन्ही खांदे धरुन तिला गदागदा हलवलं. तिनं डोळे उघडले तेच घळाघळा वाहताना. त्या पाण्यानं तिला समोर असणारा भूपही धूसर दिसत होता. तिनं त्याला तिथंच गच्च मिठी मारली आणि हमसाहमशी रडायला लागली. तो मात्र तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करत होता.


"ओ, सर औषध घेताय ना?"


पाठीमागून औषधांच्या काऊंटरवरुन आलेल्या आवाजानं भूप भानावर आला. त्यानं निमाचा हात तसाच धरला आणि त्या काऊंटरवर जाऊन औषधं घेतली. पैसे दिले नी तसाच तिला स्वतःच्या मागे ओढत घेऊन चालला. तो कुठे नेतोय असं विचारावंस वाटत असूनही ती मात्र खेचल्यासारखी मुक्याने त्याच्यामागे तो जाईल तसा चालत होती. एका रुमसमोर थांबून त्यानं दार उघडलं आणि तिच्यासकट आत जात तो आनंदानं भारलेल्या अवस्थेत म्हणाला,


"वहिनी तुझ्या लेकीचा जन्म माझ्यासाठी गोल्डन मोमेंन्ट ठरलाय. हे बघ मी कुणाला घेऊन आलोय."


त्याच्या मोठ्या आवाजानं श्रुती जागी झाली. डोळे उघडल्याक्षणी तिला समोर निम्ना दिसली आणि आनंदानं तिचेही डोळे वहायला लागले. दोन्ही हात पसरुन तिनं लाडक्या बहिणीला घट्ट मिठीत घेतलं.


"बबड्या कुठं होतीस तू? का अशी आम्हांला एकटं सोडून गेलीस? काय वाटलं तुला, आम्ही तुला विसरुन जाऊ? आयुष्यातून वजा करुन टाकू? अशी कशी आणि का हट्टी आहेस तू? आईबाबांना काय वाटलं असेल याचा जरासाही विचार नाही केलास तू? का अशी वागलीस गं, का?"


श्रुतीचे प्रश्न थांबत नव्हते आणि निमाच्या डोळ्यांतलं पाणीही. तिकडे भूप मात्र त्याच्या लाडक्या गोल्डन मोमेटला कारण झालेल्या रुझुला घेऊन नाच करत होता.


स्वरा...

*****************************************

आज पाच दिवसांनी श्रुती आणि अंकितनं लेकीला हॉस्पीटलमधून घरी आणलं. सगळ्या घरावर जशी काही जादूच झाली. अंकितचा बाप बघण्यासारखा होता. तो श्रुतीला कसलाही त्रास होऊ नये याची खूप काळजी घ्यायचा. घरी असेल तेव्हा रुझु जागी आहे म्हटलं की तो त्याचा सगळा वेळ तिच्या वाट्याला द्यायचा. नेहानं तर छोटीसाठी अख्ख वॉर्डरोबच तयार केला होता. काय नव्हतं त्यात? जेवढे म्हणून तिला शक्य होतील तेवढे डिझायनर वेअर ठेवले होते तिने त्याच्यात. आई-पप्पांना या वयात करमणूकीचं जिवंत माध्यम मिळालं होतं. आणि भूप? त्याचं आयुष्य बुमरँग व्हावं तसं एका झटक्यात बदललं होतं. अनावर विरहाची त्याच्या आयुष्यातली पुरी दहा वर्षं हवेच्या एका झोतासोबत पाचोळा उडून जावा तशी उडून गेली होती. आता त्याला रुझुशिवाय निमा हे आणखी एक कारण आनंदासाठी सापडलं होतं. त्यादिवशी श्रुतिला भेटवून झाल्यावर तिची परवानगी घेऊन तो निमाला बाहेर घेऊन गेला. घरी गेलेल्या पप्पांना त्यानं तातडीनं हॉस्पीटलला बोलवलं; म्हणाला की त्याला अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागतंय. आणि यायला उशीर होईल. पप्पा येतोच म्हणून बाहेर पडणार तेवढ्यात त्यांना नेहा समोरुन येताना दिसली. "कुठे जाताय पप्पा इतक्या गडबडीत?" "अगं, भूपचा फोन आला होता. त्याला काहीतरी अर्जंट कामासाठी बाहेर जायचंय लवकर या हॉस्पीटलमध्ये म्हणून." "ओके. नॉट टू वरी फादर. आय गो देअर. यू गो अँण्ड मदर को निरोप दो. संध्याकाळी मस्त कॉफी मंगता मेरे कू. लेते आव." ती आल्या पावली माघारी परतून तशीच हॉस्पीटलला गेली. पप्पा येतील म्हणून रुमच्या बाहेर एका कोपऱ्यात थांबलेल्या भूपला नेहा येताना दिसली तसा तो न लपता तिच्यासमोर आला. अर्थातच सोबत निमा होतीच. तिला बघताच नेहाला जसं काही आनंदाचं भरतंच आलं. "निमाताई तू?" ती जवळपास किंचाळलीच. तिच्या गळ्याला मिठी मारुन तिनं स्वतःचा आनंद व्यक्त केला. "ताई तुझे सिनेमे बघते मी. काय क्लास असतात गं! कसली कसली रिलेशन्स किती सहज उलगडून दाखवतेस तू? मी तर तुझ्या प्रेमात आहे यार. मला एखाद्या सिनेमाचे कॉस्च्युम दे ना करायला!" "जाऊ मी तिला घेऊन की आणखी गप्पा मारायच्यात तुला तिच्याशी? नाही म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर मीही थोडसं काहीबाही बोलेन तिच्याशी कामाचं; बिनकामाचं!" भूपनं नेहाची टकळी बंद करण्यासाठी मध्येच हस्तक्षेप केला. "दादूस!" तिनं त्याच्या नाकावर बुक्का मारण्याचा आविर्भाव करत दार उघडून रुममध्ये गेली.

हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावर अगदीच १०-१५ पावलावर चहाची टपरी होती. दोघेही तिथे थांबले. सवयीनं तिनं तिच्या ब्रँन्डची सिगरेट मागितली. त्यानं दोन कटिंग चहा सांगितला. चहा घेऊन दोघेही शेजारच्या कट्ट्यावर बसले. खरतर बोलायचं खूप होतं दोघांना पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नव्हतं. दोघांच्याही मध्ये गेला काळ ठाण मांडून बसला होता. शेवटी त्यानेच विषय काढला. "अजून सिगरेट ओढतेस?" ती शांतपणे झुरके घेता घेता थांबली. "हं! पण खूप कमी केलीय आता. चल. चहा संपला. जाऊया." " कुठे?" " तू तुझ्या वाटेनं मी माझ्या वाटेनं!" "इतक्या वर्षांनी परत भेटल्यावरही तुझा निर्णय तोच आहे?" " तो नव्हताच कधी बदलणारा." तिच्या त्या ठाम उत्तरानं तो आतून थोडा दुखावला. पण मग तिचा हात धरुन म्हणाला, "तुझा जो काही निर्णय असेल तो असू दे. पण आज, आत्ता या क्षणाला तरी मला तुझ्यासोबत जायचंय. मग तू जिथं कुठं नेशील मी तिथं येणारे. हा बघ, मोबाईल स्विच ऑफ. आता यापुढचा वेळ तुला मला कुणीच डिस्टर्ब नाही करणार." त्यानं खिशातून मोबाईल काढून तिच्यासमोर तो स्विच ऑफ केला. तो खिशात टाकून त्याने तिचा हात धरला. "हं! चल कुठे लावलीएस तुझी गाडी?" तिला त्याचा हा हुकुमतीपणा नवीन तर नव्हताच पण आवडतही होता.

"पार्किंग विंग बी-१७." तो तिला हाताला धरुन बी-१७ मध्ये पोचला. "दे चावी." तिने मुकाट्याने चावी काढून दिली. आता गाडी, गाडीची मालकिण आणि स्टिअरिंग व्हील सगळं काही भूपच्या हातात होतं. "पत्ता तू सांगतेस की मी मला हव्या त्या पत्त्यावर गाडी घेऊन जायचीय?" त्याचा प्रश्न थोडा उपरोधिकच होता. "कलासक्त, ६-सी, फ्लँट नंबर १३०८, पवई लिंक रोड" तिच्या स्वरातला यांत्रिकपणा त्याच्या लक्षात आला. तरीही त्यानं गाडी पवईच्या दिशेने जाण्यासाठी चालू केली.


स्वरा...

******************************************


बराच वेळ झाला घरात येऊन पण निमानं त्याला पाण्याशिवाय काही विचारलंच नाही. तिची आतल्या आत घालमेल चालू होती. काय बोलावं न् काय सांगावं याची. समोरच्या टिपॉयवरची मासिकं उलगडून झाली, इकडून तिकडे फिरत सगळ्या घराचा नकाशा पायाखाली घालून झाला तरी ही बाई जागेवरुन ढिम्म हलत नाही म्हटल्यावर तो म्हणाला, " अहो, भावसार मँडम! घरी आलेल्या पाहुण्याला अशी वागणूक देतात का तुमच्याकडे? विचारा की जरा काहीतरी चहा पाणी? खायला प्यायला. जिवंत माणूस आहे मी! भूक लागते मलापण." तशी ती उठली आत गेली. तोवर हा मस्तपैकी तेराव्या मजल्याच्या बाल्कनीत टाकलेल्या खुर्चीत बसून समोरचा समुद्रदेखावा बघत होता. त्याला आवडणारा तिच्या हातचा चॉकलेट चहा आणि चटकदार उपमा शेव घालून आणला. त्याच्यासमोरच्या टेबलवर तो ट्रे ठेवला. त्या चॉकलेट चहाच्या वासाने त्याच्या नाकाला गुदगुल्या केल्या आणि त्याच्या आठवणींच्या कुपीतलं स्मृतींचं अत्तर चाळवलं. "हे काय, तुझ्यासाठी नाही आणलास?" त्यानं आपला उष्टा कप तिच्यासमोर धरत विचारलं. तिनं तो कप घेऊन तोंडाला लावला, एक घोट घेऊन म्हणाली, "हाच शेअर करायचा होता. कधी जाणार तू?" उपम्याचा चमचा तोंडात टाकून तो मिश्किल हसला. "जायला आलोय का मी? एवढा आटापिटा करुन! तुझ्या आयुष्यात ठाण मांडून बसणारे आता मी; तुझ्या कुंडलीतल्या पापग्रहां...." तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला. "असं नको म्हणूस भूप!" "भूप्या! मी अजूनही त्याच्यावरचा तुझा हक्क तसाच ठेवलाय. गेली पाच वर्ष तुझ्याशिवाय कशी काढलीत माझं मला माहितेय! आता तुला पुन्हा कुठंच नाही जाऊ देणार मी." ती उठून कठड्याला टेकून उभी राहिली. मावळणाऱ्या दिवसाच्या कोपऱ्यातून लुकलुकत उगवणारी चांदणी बघत म्हणाली, " हे शक्य नाही होणार भूप. मी तुझ्या आईला, काकूंना वचन दिलंय तसं!" " मीही दिलंय एक वचन. माझ्या प्रेयसीला. तिला माझ्या आयुष्यातलं तिचं स्थान देण्याचं!" "पण, मग तीच तुला सांगतेय ना! की ते आता शक्य नाही म्हणून? मग का हट्टाला पेटलायस?" " कारण, मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना नाही करु शकत. जितकी वर्षं ती कल्पना केलीय तितकी वर्षं आयुष्यात फार मोठी पोकळी अनुभवलीय मी." त्यानं तिच्या हाताला धरुन स्वतःकडे वळवलं. " हे बघ निमू, भांडण तुझं आणि आईचं आहे. त्यात मी आणि माझं प्रेम यांना का होरपळून टाकताय तुम्ही? तिला तुला घरात घ्यायचं नाही. तुला तिच्या मर्जीशिवाय घरात यायचं नाही. मी काय करु? सांगाल का मला तुम्ही? तुमच्या भांडणासाठी मी आणखी किती वर्षं हे सगळं भोगायचं?" त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. तिचे डोळे नुसतेच झरझर वाहत होते. " रडू नको निमा." तिचे डोळे पुसत तो म्हणाला. "तुझा यात काहीच दोष नाही गं! आणि हे अश्रू तुझ्या या छान डोळ्यात अजिबात शोभत नाहीत. कारण ते तुझ्या डोळ्यांच्या आरशातलं माझं प्रतिबिंब धूसर करतात." ती हलकीशी खुदकली. " तू अजूनही तसाच रोमँन्टीक फुल आहेस." "आणि त्या रोमँन्टिक फुलाला फुलवणारा माळी तू आहेस." त्यानं तिला ओढून मिठीत घेतलं. आकाश चांदण्यांनी पूर्ण भरुन गेलं होतं. अनेक वर्षांच्या तळमळत्या प्रतिक्षेनंतर ते दोन प्रेमी जीव एकमेकांच्या सहवासात श्रांत होत होते.

त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन आकाशीच्या तारका पाहणाऱ्या तिला तो म्हणाला, " तुझी आजची प्रगती खरंच दृष्ट लागण्यासारखी आहे गं! नेहाइतके नाही पण मीही पाहतो तुझे सिनेमे. खरं सांगायचं तर ते पाहणं टाळतो मी!" तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह त्यानं अचूक टिपलं न् पुढे म्हणाला, " मला तुझा स्टोरी जॉनर माहित आहे ना! तुला रिलेशनशिपवर भाष्य करायला किती आवडतं हे काय मला माहित नाही का? त्या गोष्टींमध्ये मी खूपदा तुला शोधत राहतो आणि सिनेमा संपेपर्यंत तू काही मला सापडत नाहीस. पण, आमच्या चांडाळ चौकडीला कोण समजवणार ना! ते नेतात मला जबरदस्तीनं कधी कधी." " आता माझे काही का असेनात पण सिनेमे तर तू बघितलेस ना! मग मला सांग बघू आपल्या या रिलेशन शिपवर तू काय म्हणशील? या कथेच्या नायक नायिकेनं नेमकं काय करायला हवंय असं तुला वाटतं?" तिनं त्याच्यासमोर एक यक्षप्रश्न मांडला. काही क्षणांसाठी त्या मोकळ्या आसमंतात भर वस्तीतली स्तब्धता भरुन राहिली. तिचं डोकं मांडीवरुन उचलून त्यानं तिच्या खाद्यांना धरुन तिला स्वतःकडे वळवलं. तिच्या डोळ्यांत खालवर पाहत तो म्हणाला, " माझा निर्णय झालाय निमा. मला तुझ्यासोबत रहायचंय. लग्न करु शकलो तर उत्तमच; जर नाही करु शकलो तर लिव्ह इनमध्ये राहायचंय पण यापुढंचं सगळं आयुष्य मला तुझ्यासोबतच रहायचंय." उत्तर देण्यासाठी उघडू पाहणाऱ्या तिच्या ओठांना त्यानं आपल्या ओठांच्या मिठीत बंद केलं.


स्वरा...

*****************************************

तब्बल दोन दिवसांनंतर भूप घरी उगवला होता. आला तोच फ्रेश होऊन श्रुतीच्या खोलीत गेला.


"ओहो! काय करते माझी परी?" त्यानं पाळण्यातल्या रुमझुमला उचलून घेतलं.


"काय सरकार! आज भलतीच खुष दिसतेय तुमची स्वारी! तुमच्या लाडकीनं केलं वाटतं लग्न मान्य?"


नाथ हा माझा वाचणाऱ्या श्रुतीनं त्याला हटकलं.


"अगं, ती भेटली याचाच प्रचंड आनंद झालाय मला! आणि हा सगळा तुझ्या ह्या मासोळीचा पायगुण आहे."


त्यानं रुझुला हाताच्या पाळण्यात झुलवलं. आणि तीपण फार शहाणी असल्यासारखी काकूसच्या हाताच्या पाळण्यात गुडूप झोपली.


"चांगलं कनेक्शन आहे हं! काकापुतणीचं. केव्हापासून झोपवतेय तर आपली खेळत बसलीय आणि आता तुझ्या हातावर बघ कशी मिनटात झोपली ते!"


"वहिनी, प्रार्थना कर की तुझ्या बहिणीचं आणि माझं कनेक्शनही असंच चांगलं होऊ दे."


"होईल ना! नक्की होईल. का नाही होणार? पण तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे? तू आज दोन दिवसांनी घरी येतोयस. कुठे होतास? बबड्याकडंच ना? म्हणजे तू नक्की काहीतरी ठरवून आला असशील याची खात्रीय मला. नक्की काय ठरवलंस ते मात्र तूच सांगू शकशील."


रुझुला पाळण्यात ठेऊन तिच्या अंगावर तिचं मऊसं बेबी ब्लँकेट घालून तो श्रुतीच्या शेजारी येऊन बसला. तिचा हात हातात घेऊन बराच वेळ शब्दांची जुळवाजुळव करत बसला. मग म्हणाला,


"वैने, मी तिला लग्नासाठी विचारलंय. ती जराही बदलली नाहीए. तशीच हट्टी आहे ती. नाहीच म्हणाली लग्नाला. मग नाईलाज म्हणून मी तिला तो भूप दाखवला जो सहसा कंपनीचे निर्णय घेणारा आहे. तिला सांगितलं की यापुढचं आयुष्य मला तुझ्यासोबतीनं जगायचंय मग ते लग्न करुन असेल तर चांगलंच आहे; मात्र तसं नसेल तर मी लिव्ह इन मध्ये सुद्धा रहायला तयार आहे."


"लिव्ह इन? भूप तू या तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना! कारण हे लग्न न करता लग्नाच्या बंधनात राहण्यासारखं आहे. पण या नात्यात तू तिच्यावर कुठलंच बंधन नाही घालू शकणार. ना ती तुला कुठल्या बंधनात ठेऊ शकत. तुम्हां दोघांनाही एकमेकांबद्दल वाटणाऱ्या सगळ्या फिलिंग्जना एका मर्यादेच्यावर व्यक्त करता येणार नाही. आणि या परिस्थितीत तुम्ही तुमचं कुटुंब कसं वाढवाल? यातून जन्माला येणाऱ्या मुलांना कायद्याने वारसाहक्क नाहीए. तुम्ही स्वतःहून त्याला जर काही हक्क कागदोपत्री दिलेत तर आणि तरच त्याला ते मिळतात. खूप विचार करुनच तुम्हांला या निर्णयावर अंमल करावा लागेल."


"हो गं! मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. आणि अजून तिनं काही ठरवलंच नाहीए ना! मीच तो पर्याय तिच्यासमोर ठेवलाय कारण ह्या दोघी म्हणजे अडेलतट्टू घोड्या आहेत. कुणाला न् कशी वेसण घालू मी?" त्याच्या या वाक्यावर श्रुती हसायला नी रुझु कुरकुरायला एकच गाठ पडली. तो पटकन् उठला आणि तिच्या पाळण्याला झोका देत म्हणाला,


" मी जातोय निमूकडे. नेहा आली तर तिला मला कॉल करायला सांगशील! इथून मी आधी ऑफिसला जाईन. तिथली काही पेंडींग कामं आटपेन. मग निमाकडे जाईन. रात्री जमल्यास येईन. बाकी सगळं सांभाळायला तू आणि नेहा आहातच. येतो मी."


"जमलं तर येच घरी." तो पायऱ्या उतरत असताना त्याच्या कानांवर श्रुतीचे शब्द पडले.


तो ऑफिसला पोचला तर तिथं मिथिल, सुगमा, गंधर्व, रम्या छोटा यदु सगळे जमले होते.


"अरे वा! यहाँ तो सारी महफ़िल सजधज के ब़ैठ़ी है | काहो, गाववालो कौनो ख़ास बात हुई बा के? तुम लोगन का चेहरा इतना चाँद़नी रात ज़ैसन काहे झ़िलमिलाएँ है?" सुगमानं उठून त्याचं बकोटच पकडलं.


"वा रे वा! आपण उगवतोय चांगला ९ दिवसांनी. हा रेडा बातमीपण सांगणार नाही आपल्याला आणि आपण मात्र याच्याशी सगळं शेअर करायचं. बस, नंदीबैला." तिनं मुटकूनच त्याला खुर्चीत बसवला.


तोवर गंधर्वची जोरदार ऑर्डर गेली होती अँन्ड्याकडे. अँन्ड्या म्हणजे आनंद. त्यांचा केअरटेकर. त्यांनी ऑफिसला सगळ्याच सोई केल्या होत्या. राहणं, झोपणं, आंघोळीपासून जेवण बनवण्यापर्यंतच्या. आणि तिथला केअर टेकर म्हणून हॉटेल मँनेजमेंट केलेला आनंद निंबाळकरला अपॉईंट केलेलं होतं. त्याच्या हाताखाली १० जणांची टीम होती. आनंदला अँस्ट्रॉलॉजीमध्ये रस होता. त्यामुळे त्यानं त्याच्या हाताखाली असणाऱ्या सगळ्या टीमची मुलाखत विशिष्ट मुहुर्तावर घेतली. त्या दहाही जणांच्या जन्मतारखा पारखून १-९ मध्ये बसणाऱ्या असतील याची काळजी घेतली. त्याच्या टीममधले हॉस्पीटँलीटी देणारे दोघेजण ६ अंकाचे शुक्र उत्तम असणारे होते. येणाऱ्या पाहुण्यांना एंटरटेन करणारे दोघे हे बुधाचे होते; त्यामुळे ते म्हणेल ती गोष्ट मँनेज करण्यात पटाईत होते. गुरुचे दोघे सगळ्या बाजूंनी ज्ञानवर्धक गोष्टी जमा करुन ते साठवण आणि वितरीत करत होते. दोन्ही टीममधले दोन सुर्यवाले उत्तम नेतागिरी किंवा प्रतिनिधीत्व करणारे होते. चंद्राचा एक सुखसुविधांवरच्या खर्चावर लक्ष ठेऊन होता. तर योग्य निर्णय घेण्यासाठी मंगळाचा सेनापती गुणवाला अर्चन होता. त्याने प्रत्येकाला कोडनंबर दिले होते. सुर्यवाले ए, एस्- चंद्रवाला बी- गुरुवाले सी, एल्- बुधवाले ई, एन्-शुक्रवाले एफ्, ओ- मंगळवाला आर आणि आनंद स्वतः शनिचा होता. त्याला गंधर्वनं नेमला होता. भूप त्याला चेष्टेनं नवग्रहाची अंगठी म्हणायचा आणि राहू केतू कुठेत विचारायचा. आनंद फक्त दोन्ही गालांना छान खळी पाडून हसायचा. दिसायला फार देखणा नाही पण तरी त्याचं व्यक्तिमत्व चारचौघात उठून दिसायचं. त्यात तो फार बोलायचा नाही. आपलं काम आणि जोडीला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हेच त्याचं जग होतं. आनंदमुळे भूपच्या दामिनी इलेक्ट्रोला खूप वजन मिळालं होतं. त्याच्या कंपनीत येणारे फॉरेन क्लाएंट फार इंम्प्रेस व्हायचे या सिस्टीममुळे. गंधर्वच्या ऑडरप्रमाणे आनंदने मोठ्ठा केक आणून टेबलवर ठेवला.


"अरे सांगा तरी काय आहे ते? हा एवढा मोठा केक कशासाठी?" थोडासा घसा खाकरुन मिथिलनं सुरुवात केली.


"आजची तारीख बहुतेक तू विसरलायस भूप. आज यदुचा दुसरा वाढदिवस आहे. आज माझा शेवटचा बँचलर दिवस आहे. परवा मी आणि सुगमा लग्न करतोय रजिस्टर. त्याची पार्टी नंतर देण्यात येईलच. तिसरी मोठी खबर रम्या दुसऱ्यांदा बिईंग मदर टर्ममध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाची खबर ही आहे म्हणजे आम्हांला कळलंय तुझी आणि निम्नाची भेट झाली ते!"


सगळ्या बातम्या एकदमच कळल्यावर तो उडालाच.


"अरे, पण तुम्ही पुढच्यावर्षी लग्न करणार होतात ना! मग हे असं अचानक परवा लग्न? कसं करणार सगळं प्लँन? बरं, मी यदुचा बर्थडे विसरलेलो नाहीए. पण दुसऱ्या दोन्ही बातम्या माझ्यासाठी नव्या आहेत. महत्वाचं म्हणजे तुम्हांला कसं कळलं आमच्या भेटीबाबत?" एवढं बोलून त्यानं हाक मारली,


"अँन्डी रिंग, जरा ते गिफ्ट घेऊन ये बरं!"


आनंदनं गिफ्ट आणून त्यांच्यासमोर ठेवलं. ते चकचकीत दिसणार काहीतरी यदुला मोहात पाडून गेलं. तो उसळी मारुन त्याकडे धावला. गुडघ्यावर बसून भूप त्याच्यासोबतीनं ते गिफ्ट फराफरा कागद ओढत उघडत होता. फायनली ते सगळं रँपर गळून पडलं आणि आता भूपनं एक मोठा बॉक्स उघडून आतून छानशी इलेक्ट्रॉनिक बाईक काढली. सोबतीला खूप सारी वेगवेगळी खेळणीपण.


"हे सगळं तू कधी केलंस भूप?" रम्यानं विचारलं.


"सरांनी ८ दिवसांपूर्वीच ह्या सगळ्याची व्यवस्था मला करायला सांगितली होती मँडम."


भूपच्या ऐवजी आनंदनंच तिच्या प्रश्नाचं समाधान केलं. रम्यानं भूपच्या गळ्याला मिठीच मारली.


"ए, मी... मी... मी इथंय यार तो भूप आहे भूप..." गंधर्वनं नसती कॉमेडी क्रिएट करायचा विफल प्रयत्न केला.


"चला, केक कापूया. नाहीतर हा गधडा निघून जायचा. आणि आपला केक इथेच रहायचा."


सुगमानं पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करुन दिली. मग यदु, मिथिल, सुगमा, रम्या, गंधर्व, भूप सगळ्यांनी मिळून केक कापला. केकसोबत गप्पा मारताना त्याला कळलं की निमाच्या भेटीची बातमी नेहामुळे आधी गंध्याला आणि नंतर सगळ्या कंपूला कळली. मिथिल आणि सुगमा गेली दोन वर्ष सोबतच राहत होते. आता त्यांना स्वतःची फँमिली हवी होती. सुगमाला नुकतंच कळलं होतं की ती प्रेग्नंट आहे त्यामुळेच त्या दोघांनी घाईने लग्न करण्याचा निर्णय घेतला.


"अरे मग आपण तिलाही केक का नाही कापायला दिला?" भूपला वाईट वाटलं होतं.


"अरे, वेडा आहेस का तू? ३ महिने व्हायचेत अजून आणि त्याआधी नसतं सांगायचं. हा मिथिल वेडा आहे सगळ्या गावात बभ्रा करतोय."


सुगमानं लटक्या रागानं शेजारी बसलेल्या मिथिलला दोन बुक्क्या मारल्या पाठीत.


"ओके बाबा. मी नाही कुणाला सांगणार, पण मेरे दोस्त को बक्ष दो यार."


बराच वेळ त्यांच्यासोबत घालवून येताना त्यानं अँन्डीरिंग कडून नंदादीपच्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स घेतले. शिवाय नवीन आलेल्या आणखी काही प्रोजेक्टच्या फाईलमध्येही तो अधूनमधून डोकावला. बाकीचं काम उद्या करायचं असं ठरवून त्यानं निमाला मेसेज केला.


"हाय डिअर. कुठे आहेस?"


"मी शूटमध्ये आहे. ठाण्यामध्ये."


"ओके. किती वेळ लागेल परत यायला?"


"आज ९ ची शिफ्ट होती. सो परत यायला किमान १२-१२:३०."


" सो लेट डिअर. बट विल मँनेज."


"काय जेवशील?"


"बच्चा मी रात्री उशीरा नाही जेवत. बस येईन आणि एखादी कोल्ड/हॉट कॉफी. डिपेंन्ड अपॉन मूड."


पलिकडून आलेल्या रिप्लायवर त्यानं थोडा विचार केला आणि तिला थंब इमोजी पाठवून दिला.

सगळ्यांना बाय करुन त्यानं गाडी काढली आणि कलासक्तच्या दिशेने निघाला. सगळा रस्ताभर त्याच्या डोक्यात प्लँन घोळत होता.


स्वरा...

******************************************

आता रात्रीचा १:३० वाजून गेला होता. अजून निम्नाच्या येण्याची काहीच चाहूल लागत नव्हती. तिची वाट बघता बघता भूप गँलरीतल्या भारतीय बैठकीवर झोपी गेला होता. साधारण २ वाजता दरवाज्याच्या लँचमध्ये किल्ली गेली आणि दार उघडून निमा आत आली. तिला तिचंच घर ओळखू येईना! सगळीकडे मंद फुलांचा सुवास पसरला होता. दार उघडल्या उघडल्याच तिला एक देखणा फुलांचा गुच्छ तिची वाट पाहताना दिसला. सगळी तिच्या आवडीची फुलं होती त्यात; पिवळा गुलाब, जांभळी ऑर्चिड, निळी कमळं, गुलाबी ताम्हणफुलं. तो रंगीबेरंगी नजारा तिच्या थकलेल्या मनावर एखाद्या आल्हाददायक झुळुकीसारखा पसरुन गेला. तिने इकडे तिकडे नजर फिरवली तर तिला गँलरीतल्या भारतीय बैठकीवर झोपलेला भूप दिसला.


"वेडाच आहे हा मुलगा. कसा झोपलाय तिथं!"


ती पावलांचा आवाज न करता गँलरीत गेली. तिथे टेबलावर कॉफीचा सगळा जामानिमा मांडून ठेवला होता. तिला फारच वाईट वाटलं. तिच्यामुळे त्याच्या प्लँनचा फियास्को झाला होता ना! मग तिनं हळूच तो ट्रे उचलला नी ती दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात गेली. तिला थोडी शंका आली म्हणून तिनं बेडरुमचं अर्धवट दार उघडलं. तर आत तिला नवा बेड, नवी फुलदाणी, नवा टीव्ही, स्टिरिओ सिस्टिम असा सगळा नवा पसारा दिसला. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं हे भलंमोठं हसू पसरलं. इतक्यात तिला पाठीमागून मिठीत घेत भूप म्हणाला,


" काय सरकार, कुठं होती तुमची स्वारी अजून?"


"ते नंतर सांगते. पण आधी मला सांग हे सगळं काय आहे? आपण काय आज पहिल्यांदाच भेटतोय का?"


"याला माझ्या भाषेत रोमँन्टिक फुलनेस म्हणतात. आणि असं कुठेही नाही लिहिलेलं की पहिल्या भेटीतच रोमान्स उधळला पाहिजे म्हणून. मला वाटलं तुझी एक संध्याकाळ छान करावी. मी केली."


"बरं महाराज! चिडू नका. मी वॉश घेऊन येते. तोवर तुझी कॉफी पुन्हा तयार होईलच ना?"


" नाही होणार गं!"


कपाटातून आंघोळीचे कपडे काढणाऱ्या तिनं दाराआडून डोकावून पाहिलं.


" म्हणजे?"


" म्हणजे काय म्हणजे? मी तुझ्यासोबत येतोय ना वॉश घ्यायला. मग कॉफी कशी बनवणार?"


पण तो एवढं सगळं बोलेपर्यंत ती बाथरुममध्ये घुसलीही होती.


" ए, ही चिटिंग आहे यार! प्लीज ना येऊ दे की मलाही."


" मला लगेच कॉफी हवीय." तिनं आतून सांगितलं.


" उफ्, ये हसी समाँ... ए भूप चल कॉफी बना।"


हताश भूप किचनमध्ये शिरुन नव्यानं कॉफी बनवण्याची तयारी करु लागला.

भूपची कॉफी बनवून झाली आणि पुन्हा एकदा तो कॉफीचा सगळा जामानिमा घेऊन गॅलरीतल्या भारतीय बैठकीवर येऊन बसला. तेवढ्यात आंघोळ आटपून निमा गुलाबी रंगाचा छान कफ्तान गाऊन घालून येऊन बसली. त्यानं तिच्या आवडीप्रमाणे कॉफी बनवली आणि तिच्या हातात मग देता देता म्हणाला,


"काय गं! इतका उशीर कसा झाला तुला आज? मला म्हणालीस साडेबारापर्यंत येते म्हणून आणि रात्रीचे २ वाजेपर्यंत कुठे होतीस तू?"


"अरे, काय सांगणार तुला? आज सेटवर जाम राडा झाला."


"ए बाई! तू कुठे मारामारी केलीस का?"


"नाही रे मी कसली मारामारी करते? तशी येते मला कधीकधी खुमखुमी म्हणा. पण सेटवर वगैरे मारामारी नाही करत मी."


" मग इतका उशीर?"


" अरे, तुला ना सगळी अथपासून इतिपर्यंत कहाणी सांगावी लागेल आता मला. त्याचं झालय काय माहिती आहे का? आमच्या प्रोडूसरने ना त्याचा स्वतःचा कॉस्च्युम डिझायनर ठेवलाय. अाणि त्याला डिझानिंगमधलं ना तेवढं काही कळत नाहीए. मला इतका वैताग येतो. पण काय करणार मी? मला झक मारत त्याच्या डिझानिंगनुसार कपडे आवडून घ्यावे लागतात. कारण शेवटी तो आमच्या प्रोड्युसरचा माणूस आहे ना! उगाच काही कुठे वर खाली झालं तर केलेल्या एवढ्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडणार; एवढा एकच विचार मला त्याच्या विरोधात काही बोलू देत नाही. पण आज कहरच झाला. तो माझ्या टीममधल्या लोकांना असं वाटेल तसा बोलला. त्याची कॉस्च्युमची कंटिन्यूटी बघणारी जी पोरगी होती गार्गी तिने माती खाल्ली ना! दोन मोठ्ठे सिक्वल चंक रिशूट करावे लागले. तेही माझ्या टीममधल्या साकेतने

तिला ही चूक लक्षात आणून दिल

ी म्हणून. बरं, एवढं सगळं होऊन गोवर्धन माझ्याच माणसाला वाट्टेल तसं बोलेल तर का सहन करायचं त्यानं ते? येऊन सांगितलं असं झालं म्हणून. मग मिही शूट थांबवून केली आगपाखड गोव्यावर. सरळ सांगितलं त्याला माझ्या टीममधल्या कुणाला काही बोलायचं नाही म्हणजे नाही. मी आहे ना त्याच्यासाठी! कारण, माझी टीम सगळ्यात जास्त काम करते तिथं. आम्ही एकही दिवस सुट्टी न घेता काम करत असतो. राब राब राबत असतो रे! जरा सुध्दा किंमत नाही तुम्हांला त्याची? तुमच्या चुकीसाठी तुम्ही आमच्या टीममधल्या लोकांना काय वाटेल तसं बोलणार? चूक तुमची आणि त्यांच्या माथ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करणार? मग माझी सटकली."  





" शांत. शांत. गदाधारी भीम

शांत."





" कशी शांत राहू सांग ना

? सोपं वाटतं का सिनेमा बनवणं? म्हणजे कुणीही उठायचं आणि जराशी ओळख मिळाली नाही की लगेच मोठ्या मोठ्या पदांवर जाऊन बसायचं. अरे कामं करायची तर थोडासा, अगदी एक टक्का तरी अनुभव हवा की नको? हे मला नाही पटत यार पण तरीसुद्धा मी करते ना! पहिली काही नाटकं मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर केली होती. माझ्या खिशातला पैसा घातला होता. त्याच्यामध्ये अनुभवासाठी म्हणून केली होती मी. तो अनुभव मिळाला. मला काहीतरी अनुभव आहे हे बघितलं म्हणून पोतदारांनी मला पहिला सिनेमा दिला होता ना! मला फक्त एवढंच म्हणायचंय की इथे येताय ना! या. इथं येऊन नाव कमवायचंय ना! अगदी निश्चित कमवा. नाव कमवायला इथं खूप वाव आहे. कारण ही इंडस्ट्री कधी ना कधीतरी प्रत्येकाच्या वाट्याला इस्पीकचा एक्का देतेच. फक्त तो इस्पीकचा एक्का कधी वापरायचा हे माहिती पाहिजे. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या माणसांना इथं अजिबात स्थान नाही. पण, आज परिस्थिती अशी आहे माहितीए का की लोकं अगदी शून्य अनुभवावर येतात आणि त्या लोकांना रग्गड पगार देऊन कामावर ठेवले जातं आणि आमच्या सारख्या अनुभवी माणसांच्या तोंडाला पानं पुसली जातात या गोष्टीचा राग यायला नको का? तूच सांग मला." 





" अच्छा तर हे सगळं अस

ं रामायण घडलं होतं."





" नाही हे रामायण ना

हीए. हे महाभारत आहे. कारण ज्या वेळेला मी कुठलाही प्रोजेक्ट करते ना तेव्हा त्या प्रोजेक्टमधली सगळी माणसं माझ्या कुटुंबाचा एक भाग असतात रे! मला त्यांच्यामध्ये कलह नको असतो म्हणून मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत राहते. पण कुणीतरी असे आंडूपांडू शिशुपाल जरासंध येतात आणि हे असं महाभारत घडवतात. मनस्ताप होतो नुसता." 





" निमा, बास. शांत

हो. नको इतका त्रास करून घेऊस. तुझ्या या आरडाओरड्यामुळे काही बदलणार आहे का? सांग बरं! नाही बदलणार ना! कारण, कुठलाही बदल करायचा असेल तर त्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे ना? तू आपल्या नात्यासोबत काय केलंस? तू आईला वेळ दिलायस. तिचे विचार बदलायला. आपल्या नात्या संबंधातले. तुझ्या करिअरच्या संबंधातले तिचे विचार हे बदलण्यासाठी तू वेळ दिलायस तिला. बदल घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो हे तुला पटतंय ना! मग तुझ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हीच गोष्ट नाही का लागू होत?" 





" तू कधीपासून ए

वढा शहाणा, समजुतदार झालास रे? एक तो भूप होता; ज्याला पावलापावलाला गोष्टी समजवाव्या लागायच्या आणि एक हा भूप आहे, जो आज मला समजवतो आहे की घटनेवर रिअँक्ट न होता तुला रिस्पॉन्स दे म्हणून? कसं घडलं हे सगळं."





" तू आयुष्यात

ून निघून गेलीस आणि माझ्या सगळ्या वळणवाटाच बदलून गेल्या. ज्या अवखळ भूपला तू ओळखत होतीस तो त्या सगळ्या रेट्या राड्यात हरवून गेला. आणि आजचा हा सगळ्या सिच्युएशनमध्ये डोकं थंड ठेऊन विचार करणारा भूप तेव्हा जन्माला आला. माझी चौकडी खूपदा क्लाएंटसोबत हमरीतुमरीवर येते. पण, त्या सगळ्यातून मीच शेवटी लवकर थंड होतो. आणि बाय डिफॉल्ट सोल्युशनही मीच काढतो. कारण गंध्या कंपनीचं एक्सपोर्ट इंपोर्ट आणि सेलिंगबाईंग बघतो. त्यानं आधीच सांगितलं होतं की जोवर मी स्वतःहून मदत मागत नाही तोवर माझ्या डिपार्टमेंटमध्ये कुणीही मदत द्यायला येणार नाही. आणि अँन्डीसारखा अँन्टीक पीस आहे आपल्याकडे सगळ्यांना हँडल करायला त्यामुळे मी जास्त टेन्शन नाही घेत." 





" ए, भूप्या

, माझं भेटायचं राहूनच गेलं रे तुझ्या चौकडीला. आणि तू मला सांगितलं होतंस, तशीच आहे का रे तुझी आताची कंपनी?" 





" हो. जे

तुला बोललो होतो तेच सत्यात उतरवलंय मी. गंधर्व, मिथिल, सुगमा मी अशी जुनी चौकडीच आहे इथंही. फक्त आमच्यातला पाचवा कोन होऊ पाहणारी तूच मध्येच हवेत विरल्यासारखी गायब झाली होतीस."


 



" मग उद

्या नेतोस मला तुझ्या ऑफिसला? उद्या मला संध्याकाळी एडिटींग स्टुडिओला जायचंय आरामनगरला. सो माझा दिवस बऱ्यापैकी फ्रि आहे." 





" येस

बॉस. आणि धन्यवाद. आम्हां पामरांच्या कंपनी आवारात पायधूळ झाडून आपण आम्हांला कृतकृत्य करीत आहात त्यासाठी." 





" चल

बे, नौंटंकी. आधी झोपू तरी मग उद्याचा प्लँन करु."






स्

रा...



                                            


दामिनी इलेक्ट्रोसाठी आजचा दिवस फार महत्वाचा होता. कारण आज दामिनी इलेक्ट्रॉच्या फाईंडर पैकी मुख्य भूप त्याच्या आयुष्यभराच्या जोडीदाराला तिथे घेऊन येत होता. याचा सगळ्यात जास्त आनंद अँन्डी रिंगला झाला होता. त्याला जेव्हा सकाळी भूपने फोन केला तेव्हाच त्याने त्याच्याकडून तयारीसाठी काही वेळ मागून घेतला. थोड्याच वेळात त्याला मेसेज मध्ये रिव्हर्ट केलं की तुम्ही दोघेही बरोबर अकरा बावीसला कंपनीच्या मुख्य गेटवर या. आणि तिथे पोचल्यानंतर मग पुढे जे काही करायचं आहे ते मी आणि माझी टीम बघून घेऊ. तुम्ही फक्त वेळेत तिथं पोहोचण्याचं काम करा. स्वतः भूपला अँडीच्या स्वभावाचं तसं थोडंसं आकर्षण होतं. कसं काय सगळं जमत होतं त्याला कुणास ठाऊक! म्हणजे तो एकाच वेळेला हॉटेल मॅनेजमेंट पण करत होता आणि त्याच वेळेला त्याला ज्योतिष शास्त्रामध्ये पण खूप सारी आवड होती. अगदी खरं सांगायचं झालं तर हॉटेल मॅनेजमेंट हा त्याच्या पोटापाण्याचा धंदा होता आणि ज्योतिष शास्त्र शिकणं ही त्याची प्रचंड आवड होती. त्या आवडीचा उपयोग तो जसा वेळ मिळेल तसा लोकांच्या भल्यासाठी करत होता. या गोष्टी त्यांनं अँडीला जॉबला ठेवल्यापासून अनुभवल्या होत्या. त्यांचं फोनवरचं सगळं बोलणं होईपर्यंत निमा काही उठली नव्हती. गॅलरीतून तो बोलणं आटपून आत आला तेव्हा त्याला तिच्या गालांवर केसांच्या इवल्याशा बटा रेंगाळताना दिसल्या. त्या बाजुला करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि अगदी हलक्या हाताने त्याने त्या तिच्या गालांवरून दूर केल्या. तो तीच्यासाठी आणि स्वतःसाठी चहा करायला म्हणून किचन कडे वळत होता; तेवढ्यात जाग्या झालेल्या निम्नानं मागून त्याचा हात पकडला. " तू उठलास पण इतक्या लवकर? "

उत्तरासाठी तो मागे वळला आणि त्याने तिच्या गालाचं एक हलकसं चुंबन घेतलं. " सरकार! सूर्य उगवलाय म्हटलं. उठायला नको होतं? चला लवकर. तुम्हीही आटपा. आपल्याला जायचंय म्हटलं कंपनीत. बाकी काही नाही अँन्डी रिंगच्या वेळेत पोचलो नाही तर तो माझा जीव नक्की घेईल. तुला माहिती आहे जेव्हा मी त्याला फोन केला होता आणि त्याला सांगितलं की तू येतेयस तर तो काही क्षणांसाठी पॉज मोडवर गेला होता अक्षरशः! मला म्हणे खरंच त्या भावसार मॅडम येणार आहेत? आपल्या दामिनी इलेक्ट्रोमध्ये? सर, मी त्यांचा वेड्यासारखा फॅन आहे. त्यांचे एकेक सिनेमे इतके वेळा पाहिलेत मी तुम्हांला काय सांगू सर! त्या नात्यांना जितक्या सुंदरपणे मांडतात ना कमाल, कमाल आहे ती सगळी. मला तर विश्वासच बसत नाहीए की मी त्यांना प्रत्यक्ष भेटणारे? पण, तुमची ओळख कशी झाली सर? त्या तुमच्या कॉलेजमध्ये होत्या की तुम्ही दोघं कुठे भेटला होतात कुठल्या कामाच्या निमित्तानं? मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. काय सांगू त्याला? कुठे भेटली होतीस तू म्हणून? कुठल्या कामाच्या निमित्ताने आपण भेटलो म्हणून सांगायचं? भैय्या आणि वहिनीच्या दुरावलेल्या नात्याला जवळ आणण्यासाठी भेटलो असं सांगू त्याला? मग जरा त्याची खेचावी म्हणून त्याला म्हणालो, अरे हो! मला पाहुण्यांना घेऊन येण्याची वेळ सांगणार आहेस की तू त्यांचा फॅन असल्याचं कौतुक ऐकवत राहणार आहेस? आणि त्यांची माझी भेट म्हणशील तर माझ्या आयुष्याची जोडीदार आहे ती. मला पक्की खात्री आहे तिकडे हे ऐकणारा अँन्डी चार फूट वर उडाला असणारे." निमाला सुद्धा तिच्या कामाबद्दलची इतकं साग्रसंगीत वर्णन ऐकून हसू येत होतं. ती हसता हसता त्याला म्हणाली, " तू जा. चहा ठेवतोयस ना! मी आलेच फ्रेश होऊन. " तर तिचा हात धरून उठू पाहणाऱ्या तिला तसाच थांबवून तो म्हणाला, "आता उठलीच आहेस तर तुझा स्पेशल चॉकलेट चहा बनवशील प्लीज! " त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत ती उठली. " जा. आवर तुझं. मी बनवते चहा. " बाथरूम मध्ये शिरता शिरता भूप तिला जरा जोरात ओरडून म्हणाला, " आपल्याला 11:22 ला पोहोचलं पाहिजे तिथं माहितीये ना! नाहीतर अँन्डी फाडून खाईल आपल्या दोघांनाही. त्याला अजिबात आवडत नाही मुहूर्ताची वेळ चुकवलेली. गंध्याला ना काही कळत नाही. हा कसला नमुना भरून ठेवलाय. " " ए, तू आंघोळ कर ना! अँन्डीचा जप सकाळपासून झाला तो बास झाला ना! बघूया. जाऊ वेळेत आणि झालाच उशीर तर बघू आपण काय करायचं ते? " असं म्हणत तिने घड्याळात बघितलं. आत्ताशी आठ वाजून दहा मिनिटे झाली. तिनं सवयीनं वेळेचं कॅल्क्युलेशन घातलं आणि चहामध्ये साखर टाकत त्याला म्हणाली, " भूप्या तुझ्या हातात मोजून पाच मिनिटं आहेत. पटकन अंघोळ करून बाहेर ये. आणि तुझं सगळं आवरून तयार हो." गॅस बारीक करून ती दुसऱ्या बाथरूम मध्ये गेली आणि भूुप बाहेर यायच्या आधी पाच मिनिटात आंघोळ आवरुन बाहेरही आली. " आंघोळ कधी केलीस? काय कावळ्यासारखी बुडबुड घागरी केलीस का? " " भूप, बुड बुड घागरी माकडाची असते आणि कावळ्याची शिंतोडलेली आंघोळ असते. " " तेच गं! सारखं कशाला सगळ्याचं डिटेलींग करायचं? तू अंघोळ कधी केलीस ते सांग." " ते महत्वाचं आहे का आत्ता? चल चहा घे आणि निघू आपण. " " इतक्या लवकर का बाहेर पडतोय आपण? " त्याच्या तोंडावर बोट ठेवत तिने चहाचा कप पुढे ठेवला. " तुझं आवर. माझं झालेलं आहे. मध्ये ट्राफिक वगैरे लागेल या सगळ्याचा विचार करून तयारी केली आहे. जर अकरा बावीस ला बरोबर कंपनीच्या गेटवर पोचायचं असेल तर आपल्याला कंपनीच्या बाहेर पाच मिनिटं आधी पोहचायला पाहिजे. " " यार, का माणसं एवढी कॅल्क्युलेटीव्ह असतात? " " एवढं वैतागायची गरज नाही. मला कोणी सांगितल? वेळेत पोचायचंय म्हणून? नाही सांगायचं ना! नसती घातली कॅल्क्युलेशन्स. खाल्ली असती माती. " " चुकलं माझं बयो! चल. निघूया आपण." " अरे हो! पँन्टबिन्ट घालशील का आहे तसाच येशील?" " आलोच थांब. "

म्हणून तो पटकन् पँन्ट चढवायला आत गेला. " ए, भूप! सॉरी हं! पण टॉवेल बेडवर टाकायचा नाही! मला आवडत नाही अजिबात. तो लटकवून ठेव तिथे. अम्मा आली की ती सगळे कपडे घेईल आणि धुवुन टाकेल. ड्राईव्ह मी करणारे तू बसायचं काम कर फक्त शेजारी. " तीनं धडाधड तिचा सगळा प्लँन त्याला सांगून पण टाकला. आता तिनं सांगितलं म्हटल्यानंतर भूप तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. सो बाय डिफॉल्ट गाडी निमाच चालवत होती. ज्या वेगानं त्यावेळेला बाईक वरून त्याला नेलं होतं त्यापेक्षा जास्त वेगानं ती कंपनीच्या दिशेने गाडी नेत होती. " ए बाई! जराशी हळू चालव ना! " " डोन्ट वरी डिअर. तुला मी हातीपायी धडधाकट कंपनीच्या आवारात घेऊन जाते, मग तर झालं? " गाडी कंपनीच्या बाहेर पोहोचली तेव्हा बरोब्बर सव्वा अकरा वाजले होते.

" भूप घड्याळ बघ. आपण वेळेत पोचलोय ना! अँन्डीला फोन कर आम्ही आलोय म्हणावं. " " तू सेटवर पण अशीच आहेस का गं? खडूस कुठची! " ती फक्त गालात हसली. त्यानं अँन्डीला फोन करून ते पोचल्याचं कळवलं. त्यानं त्यांना तिथेच वाट बघायला सांगितलं. बरोब्बर 11:20 ला त्याने कंपनीचं गेट उघडलं आणि गाडी पार्क करायला लावली. आता मुख्य बिल्डिंगच्या दरवाजाशी दोघे जण उभे होते. सगळ्या बिल्डिंगला फुलांनी सजवलं होतं. त्या बिल्डिंगच्या दारामध्ये उंबऱ्यावर फुलांच्या पाकळ्या भरून कलश ठेवला होता. निमाला कळेना हे सगळं काय चाललंय? तिने प्रश्नार्थक नजरेनं फक्त बघितलं. भूपनं तिला डोळ्यांनीच सांगितलं, 


'जे होईल ते बघत राहा. याला आवरण आपल्या हातात नाही. कारण मी अगोदरच सगळे अधिकार त्याला देऊन बसलोय.' तिने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. बरोबर ११:२२ ला अँन्डीनं दोघांनाही हातातल्या तबकांतल्या निरांजनांनी ओवाळलं आणि उजव्या पायाने कलशाला धक्का देऊन आत यायला सांगितलं. तिने त्याच्या सांगण्याबरहुकूम सगळ्या कृती केल्या. " या मॅडम तुम्हांला बघून आज मी फार आनंदी झालो. तुम्हांला काय आवडतं? कॉफी ना! " " तिच्यासाठी कॉफी घेऊन येच. पण, बरोबर मी आहे हे विसरू नकोस. मला चहा वगैरे काहीतरी विचार ना! सकाळी आठ वाजता घेतलाय मी. " " सर, तुम्हांला मी रोजच बघतो आणि तुमच्या सगळ्या सवयी मला तोंडपाठ आहेत. त्यांना कॉफी आवडते विचारणारच कारण त्या पहिल्यांदाच येत आहेत आपल्या कंपनीत. तुम्हांला तर मी असाहि चहा अाणूनच देणारे. " असं म्हणून तो किचन कडे गेला. जाता जाता त्यांनं आपल्या २ ई आणि एन् यांना बोलवून निम्ना मॅडमला पुरी कंपनी दाखवायला सांगितले. भूप शांतपणे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला. हे बघून ती म्हणाली, " तू नाही येणार? " " हे दोघेही तुला छानपैकी कंपनीत फिरवून आणतील. " " पण, तु आला असतास तर? " " एन्जॉय युअरसेल्फ डिअर. मी जरा गंध्या, मिथिल, सुगमा यांना फोन करून लवकर बोलवून घेतो. त्यांनाही तुला भेटायचं तर आहेच ना! " " अरे, म्हणजे काय मलाही तुझ्या चौकडीला भेटायचंयच. " " जा. ते दोघे वाट बघतायत तुझी. " ती हसत हसत इश्वाकू आणि निलिम्पच्या बरोबर कंपनी बघायला निघून गेली. " काय रे! तुमची नाव एवढी अवघड कशासाठी? " त्यावर इश्वाकू म्हणाला, " त्याचं काय आहे ना! आनंद सरांना शिवभगवान फार आवडतात. ते स्वतः शिवजींची वेगवेगळी स्तोत्रं फार सुंदर म्हणतात. त्यांचं संस्कृतही खूप छान आहे. तुम्ही एकदा त्यांना शिवतांडव म्हणताना ऐकलं तर भान हरपून जाल. आमच्या दोघांची नावं त्यांनी त्या शिवतांडव वरूनच निश्चित केली. इश्वाकू आणि निलिम्प ही दोन्ही शिवाची नाव आहेत. " " ग्रेट! छानच आहे की. म्हणजे एकंदरीत तुमचा आनंद सर अभ्यास करण्यासारखा व्यक्ती आहे तर! बाय द वे तुमची खरी नावं काय आहेत? " " मी भरत आणि हा करण. " इश्वाकू म्हणाला. तेवढ्यात मधेच फाजील उत्सुकतेनं निलिम्पनं तिला विचारलं, " तुम्ही आनंद सरांवर सिनेमा बनवणार आहात का मॅम? " " नाही रे! पण आपल्याला वाटत नाही का एखादा माणसाचा अभ्यास करायला हवा? तसा तुमचा आनंद सर आहे असं मला वाटलं इतकंच. " " अच्छा! " " पण, तुमच्या भूप सरांनी ज्या पद्धतीने कंपनी उभी केली ना! खरच हँटस् ऑफ टू हिम. " " खरंय तुमचं. ही कंपनी उभी करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत त्यांनी. मॅम, हा आमच्या कंपनीचा आउटडोर सेक्शन. इथे गंधर्व सरांची काम चालतात. त्यांच्याकडे कंपनीचं बाईंग आणि सेलिंग डिपार्टमेंट आहे. त्याशिवाय ते कंपनीची आयात-निर्यात सुद्धा बघतात आणि हे ऑफिस; हे सुगमा मँमचं डिपार्टमेंट आहे. त्या सगळ्या कंपनीचं अकाउंटिंग बघतात ना! त्यांच्याबरोबर इथे नेहमी घोष सर येतात आणि शेवाळकर वकील पण येतात. आमचे टॅक्सचं काम बघणारे अनिरुद्ध गोडांबे सुध्दा येतात. " " बरं मग, मिथिल काय करतो? " " मिथिल सर, कंपनीच्या कामांचं जे आउटडोरचं ऑर्गनायझेशन असतं ते करतात. म्हणजे असं बघा आत्ता आम्ही नुकतच वलयच्या गृहप्रकल्पाचं इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण केलं. ते काम करण्यासाठी भूपसरांच्या बरोबर मीटिंग करायला मिथिलसर गेले होते. वलयचं काम मिळाल्यापासून ते अगदी पूर्ण होईपर्यंत ते कुठल्या पद्धतीनं चालेल? गृह प्रकल्पामध्ये कुठंकुठं? कशाकशा? कुठल्या प्रकारच्या लाइट्स वापरायच्या? कसलं वायरिंग वापरायचं? कोणती माणसं तिथे काम करणार? कुठून सगळं सामान विकत घ्यायचं इथपासून ते त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्यापर्यंतच्या सगळ्या कामाचं ऑर्गनायझेशन मिथिल सरांनी केलं होतं. " " वाह! कमाल आहे तुमची. " " गंधर्व सरांनी आनंद सरांची नेमणूक केली. आनंद सर, तुम्हांला तुम्ही जर इथे राहिलात कंपनीमध्ये तर तुमच्या घरचं फिलिंग देतात. इतकं त्यांचं काम प्रॉम्प्ट आहे. " " मानलं पाहिजे तुम्हां सगळ्यांना. आणि नुसत्या भूपलाच क्लास मानणार नाही मी! तुम्ही सगळी लोक मिळून तुम्हां सगळ्यांचा एक छान ट्यून्ड संघ बनलेला आहे. असेच एकमेकांच्या सोबतीनं खूप छान छान काम करत रहा. बरं, ते त्या कोपऱ्यात कसली खोली आहे? "


 " ते सगळं आमचं सामान साठवण्याची जागा आहे. स्टोअररुम आहे ती. त्या स्टोअर मध्ये तुम्हांला सगळ्या प्रकारच्या लाईट आणि इलेक्ट्रिक वस्तू मिळतील. त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्सच्यासुद्धा वस्तू आहेत. आणि महत्वाची गोष्ट ही की ते दक्षिण दिशेकडे आहे. " " का बरं? "

" आनंद सर म्हणतात की वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशा जड करायची असते. दक्षिण-पश्चिम दिशा जड करायची असते आणि पुर्वउत्तर दिशा हलकी ठेवायची म्हणजे वास्तू आणि त्यात वास्तव्य करणारे प्रसन्न राहतात. " " चला, आनंदच्या सोबतीनं तुम्हा लोकांनाही ज्योतिषाचा किडा चावलेला आहे तर! " इतक्यात वर बसवलेल्या इंटरकॉम माइक वरून आनंदचा मेसेज आला की मॅमची कॉफी रेडी आहे. सोबत सरांनी बोलल्याप्रमाणे गंधर्वसर, मिथिलसर आणि सुगमामँम सुद्धा त्यांना भेटायला आलेले आहेत. ते सगळे जण त्यांचा गेस्ट रूममध्ये वेट करत आहे.

" चला मॅम. आनंद सरांचा मेसेज आलेला आहे. आपल्याला गेलं पाहिजे. सगळेजण आपली वाट पाहत असतील. " इश्वाकू छोट्या रस्त्याने गेस्टरुमकडे घेऊन गेला. गेस्ट रूम कडे पोहोचण्यासाठी प्रत्येक रूमच्या बाजूने शॉर्टलेन्थ काढलेल्या होत्या. " निम्ना भावसार यांचं दामिनी इलेक्ट्रो मध्ये खूप खूप स्वागत आहे. "-चौघेही एका सुरात ओरडले. ती आता येण्याबरोबरच गेस्ट रूम मध्ये त्या चौघांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. " अरे काय हे? वेडे आहात का तुम्ही? फुलंबिलं काय टाकता अंगावर? "-निम्ना " अग तू पहिल्यांदा येतेयस ना इथं? मग जंगी स्वागत नको का करायला? "-गंधर्व " जंगी स्वागत? मी काय मुख्यमंत्री आहे की पंतप्रधान? कशासाठी जंगी स्वागत करताय माझं? "-निम्ना "स्वागत यासाठी आहे की तू जशी दामिनी इलेक्ट्रो मधे आली आहेस तशीच आमच्या भूपच्या आयुष्यातही ये. केव्हाचा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय तो!" फार वेळानंतर सुगमा बोलली. " गंधर्व रम्याला नाही आणलास तू? " निमानं सरळ सरळ विषय टाळला होता. " अगं नाही. ते दोघे जण बाहेर प्ले ग्राउंड वर आहे. कंपनीच्या आऊटसाईडला एक छोटेसे प्लेग्राउंड आहे. यदु ऐकणार नाही अजिबात. त्याला इथं आलं की त्याच्या लाडक्या घसरगुंडीवरच खेळायचं असतं. नाहीतर मग झोपाळ्यावर झु झु करायचा असतो."-गंधर्व " हाक मार ना मला भेटायचं यदुला. "-निम्ना गंधर्वनं ओमला हाक मारली. "ओम. जरा जा आणि रम्याला म्हणावं मी बोलवलंय तिला वर. निमा तीची वाट बघतेय. " एडिटिंग स्टुडिओला निघण्याच्या अगोदरचा सगळा दिवस तिनं या चौकडी बरोबर वेळ घालवला. रम्याला भेटली. यदुबरोबर खेळली. तिथल्या सगळ्यांचं लाईफ जाणून घेतले तिने. आणि सगळ्या गोतावळ्यात भूप काय करत होता? तर फक्त यांना भेटणाऱ्या निमाला मनापासून बघण्याचा आनंद लुटत होता. तो फक्त तिच्या जवळ असण्याचा अनुभव घेत होता. त्याला आज बाकी काहीच करायचं नव्हतं. तीने गंधर्वला हेही विचारलं की अँन्डी सारखा विक्षिप्त नमुना कुठून शोधून काढला? आणि हे असं ज्योतिषाचं वेड त्याला कधी पासून लागलं? त्यावर गंधर्वनं जी गोष्ट सांगितली ती त्याच्या अख्ख्या कंपूमध्ये सुद्धा कोणाला माहीत नव्हती. गंधर्व म्हणाला, " कॉलेज संपलं आणि आमची ही कंपनी सुरू होण्याच्या काही महिने अगोदरची गोष्ट. मी बाबा आणि आई आम्ही तिघेही जण फिरायला म्हणून मसूरीला चाललो होतो. त्या फिरायला जाण्याचा आणि दैवावर माझा विश्वास बसण्याचा काहीतरी संबंध नक्कीच होता. घाट सुरु होण्याच्या अगोदर जस्ट एक छोटा स्टॉप आम्ही घेतला होता. चहा प्यायचा आणि स्नॅक्स वगैरे घ्यायचे सोबत असा विचार करून त्या स्टॉपवर थांबलो. तिथं आम्हाला एक माणूस भेटला. आम्ही तिघे जण छान आनंदात होतो. गप्पा मारत होतो. अचानक काय झाले माहित नाही; पप्पांना काहीतरी आठवलं म्हणून ते उठले आणि गाडी मध्ये काहीतरी आणायला गेले. मी त्यांना म्हणत होतो पप्पा राहू दे. आपण जाणार आहोत गाडीत. म्हणून त्यांच्या मागे गेलो. नेमका मी जायच्या वेळेलाच त्या माणसानं माझा हात घट्ट पकडला. " थांब. जाऊ नकोस. " मी माझा हात सोडवून घेण्याचा फार प्रयत्न केला पण त्यांनी तो इतका घट्ट धरला होता की नाही सुटली ती पकड. आणि सडन मोमेंटला माझ्या डोळ्यांसमोर ते घडलं. नशीब होतं म्हणून पप्पा वाचले. गाडीचा चुराडा झाला होता. ब्रेक फेल झालेला तो ट्रक, ट्रक ड्रायव्हर आणि त्याचा क्लिनर सगळे क्षणार्धात दरीमध्ये दिसेनासे झाले. मधे किती फ्रँक्षन ऑफ टाईम गेला? ज्या क्षणी तो ट्रक दरीत कोसळला त्या क्षणी त्या माणसाने माझा हात झटकन सोडला. म्हणाला मृत्यूच्या दारात जात होतास. बोलवायला आलं होतं मरण तुला. चांगलंच होतं नेहमी. चांगलंच करायचं असतं. असं काहीतरी असंबंध बडबडत होता तो. तसा आईबाबांचा भविष्य, ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे. नाही असं नाही. त्यांनी माझी पत्रिकाही काढून ठेवली होती. आणि मी मात्र नेहमी त्याची थट्टा करायचो. पत्रिकेवर माणसाचं काही चालत नाही. पत्रिका बित्रिका सगळं थोतांड असतं असं म्हणायचो मी. ही घटना घडली आणि या सगळ्या गोष्टी बोलायचा बंद झालो. त्या क्षणी त्या माणसाच्या पायावर डोके टेकलं. म्हटलं " आज तूच माझा देवदूत बनून आलास. जीवाचं रक्षण केलंस. "

तेव्हा तो म्हणाला, " आज ना उद्या कधीतरी तुझ्या आयुष्यात हे होणारच होतं. अविश्वास दाखवत होतास ना या सगळ्यावर? पत्रिका, ज्योतिष वगैरे थोतांड म्हणत होतास ना! तुझ्या पत्रिकेत आजच्या मुहुर्तावर गडांतर योग होता. नशीबानं वाचलायस. त्या वरच्यानं पाठवलं होतं मला तुला वाचवायला. इदं न मम। हे सगळं विश्वासात बदलणारच होतं. अरे हे सगळं शेवटी विज्ञान फक्त ते समजून घेण्याची मानसिकता तुमच्या आमच्याकडं नसते. या सगळ्या गोष्टींना थोतांड मानतो आम्ही. डोळे उघड. सगळं जग सनातन्यांच्या विज्ञानानं भरलंय बेटा. " असं म्हणून तो तिथून वाऱ्याच्या वेगाने नाहीसा झाला होता. कुठे गेला? का आला होता? कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही. ना मी त्याचं नाव विचारू शकलो, ना त्याचं गाव विचारू शकलो. काही काही कळलं नाही. मग मात्र मी ठरवलं माझ्या कंपनीमध्ये एक ना एक माणूस असा असणार ज्याला यातलं काही ना काही तरी नक्की कळत असेल आणि बघ निमा अँन्डी मिळाला मला. जो माणूस विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून आम्हांला दाखवतो. अरे हे तुम्ही या वेळेला केलं ना तर हे असं होतं म्हणून. " नीमा हे सगळ ऐकून चाट पडली होती. ज्योतिष शास्त्र, हस्तरेषाविज्ञान या गोष्टींवर तिचाही विश्वास नव्हता पण गंधर्वच्या आयुष्यातली ती घटना ऐकून ती थोडी दिग्मूढ झाली. बोलता बोलता मिथिलनं तिलाही सुगमा प्रेग्नंट असून ते परवा लग्न करतायत हे सांगून टाकलं आणि पुन्हा सुगमा चा मार खाल्ला. " डोन्ट वरी सुगमा! हा वेडा मुलगा आहे ना! त्याला काही कळत नाही. तीन महिने होईपर्यंत कोणाला सांगायचं नसतं म्हणून. मला कळलं मी कोणाला नाही सांगणार. " " ते ठीक आहे गं! पण काल यानं भूपला सुद्धा सांगितलं हे! " " ओके बेबी. ही गोष्ट अजून आपल्यातच आहे. ना माझ्या ना भूपच्या कुणाच्याही तोंडून ही गोष्ट कुठेच बाहेर जाणार नाही. आय प्रॉमिस. चला. एडिटिंगला जायचं आहे. वेळ असता तर मी आजचा अख्खा दिवस तुमच्या सोबतच राहिले असते. रात्री मस्त पार्टी केली असती. पण आता मला जायला हवं. निघू मी?" " तुला सोडायला ड्रायव्हर पाठवू? "- भूप " नॉट टू वरी डियर. " एवढं बोलून ती निघाली. दारापर्यंत गेली आणि तिला आठवलं की तिच्या कारची चावी भूपकडेच आहे. ती चावी आणण्यासाठी म्हणून मागे वळली. तोपर्यंत भूप त्याच्या केबिनमध्ये दिसेनासा झाला होता. उगाच ओरडायला नको म्हणून ती भूपच्या केबिन मध्ये शिरली. " चावी हवी आहे ना? मग चावीच्या बदल्यात मला एक किस द्यावा लागेल. त्याशिवाय मी चावी देणार नाही. " तिला आत आलेली बघून दाराला पाठ लावून उभा राहत तो म्हणाला. " बाहेर सगळी जण आहेत आणि तुला हे काय सुचतंय? " " बाय डिफॉल्ट अँम अ रोमांटिक फूल डिअर. " " ओ मिस्टर रोमँन्टिक फूल. घरी येणार आहेस ना! " ती नुसती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिली आणि तो तिच्या नजरेत गुंतून पडला असे लक्षात आल्याबरोबर त्याचा खिशात हात घालून चावी काढून घेतली. "बाय मला चावी मिळाली आहे. " असं म्हणून ती बाहेर पडायला लागली. पण दार उघडेपर्यंत त्याने तिला ओढून जवळ घेतलं आणि हवा तसा किस घेतलाच. " हे फार महागात पडणारे भूप रंगनाथ तुम्हांला. आत्ता मी जाते एडिटिंगला. पण, मी याचे उट्टं काढल्याशिवाय राहणार नाही. " अशी सरळ सरळ धमकी देऊन निमा निघून गेली.



स्वरा...

**********************************************

तिला एडिटिंग स्टुडिओ संध्याकाळी सात वाजता मिळणार होता आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे निमा साडेसहा वाजता अशोक सिन्हा यांच्या एडिटिंग स्टुडिओत पोचली. आधीच्या सिनेमाचं एडिटिंग शेवटपर्यंत आल्यानंतर अशोक जी चहा पिण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी म्हणून स्टुडिओच्या जरा बाहेर आले. तेवढ्यातच त्यांना समोरून निम्ना येताना दिसली. " अरे, आईए आईए निम्नाजी। कैसी है आप? " " मैं बहोत बढ़िया हूँ सर, आप बताईए आप कैसे है? " " हम भी बहुत बढ़िया हैं निम्नाजी। " " मैं आपको बहुत मानती हूँ, सरजी। " " क्यूँ भला? हमने ऐसा कौन सा तीर मार दिया? " " अरे सरजी, बात ऐसी है की ज़ाननेवाले तो काफी है । पर एक आप ही मेरा नाम सहीसही लेते है। नाम तो सारे लोग जानते है। पर मेरा सही नाम लेकर मुझे कोई नही बुलाता। " " अच्छा। तो यह बात है। वैसे हमारी संस्कृत थोडी अच्छी है ना! तो थोडी मराठी पण चांगली बोलता येते. " " चलता है सर, वैसे आपके साथ बात करने से मेरी भी हिंदी अच्छी हो जाती है। " " ऐसा नहीं लगता की आज आप जरा ज्यादा ही जल्दी आ गई? " " अरे कहा सर! आदतन आधा घंटा पहले ही तो आई हूँ। " " काश आप जैसे प्रॉम्प्ट लोग और मिल जाए इस इंडस्ट्री को। पुरी इंडस्ट्री ही बदल जायेगी। " " सरजी ये हमारी तारीफ हो रही है या ताने कसे जा रहे है। " " अरे क्यू शर्मिंदा कर रही है। हम तो तारीफ़ही कर रहे है। वैसे चाय पीएंगी? " " जरूर क्यूँ नहीं! नेकी और पूछ़ पूछ़। " " अरे ओ रामबिलास! बेटा दो चाय ले आना और हां साथ में निम्नाजी का ब्रांड भी लेकर आना। " " क्या सर, अब़ आप बमें शर्मिंदा कर रहे हैं। " " अरे, निम्नाजी। इसमें कैसी शर्मिमदगी भ़ला? हमारे यहाँ जो मेहमान आते हैं; हम उनकी ख़ातिरद़ारी ज़रुर करते हैं। वैसे आपका वह बंदा नहीं आया? " " कौन? मृदुल? आता ही होगा। कहीं ट्रैफिक में फस गया होगा। " " आप कैसे नहीं फँसती? "

" बस ऊपर वाले की दुआ समझिए। " इतक्यात मृदुल तिथं येऊन पोहोचला. " हॅलो मँम! कशा आहात ? " " मी छान. तू सांग! तू कसा आहेस? बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे ना? " मृदुलच्या बरोबर लक्षात आलं की निम्ना त्याला काय विचारते आहे ते! त्यांनं खाली मान घातली आणि हलक्या आवाजात म्हणाला, " सॉरी मॅम. पण, त्यादिवशी प्रसंगच तसा होता की मला तुम्हांला फोन करावा लागला. " " अरे, पण स्टोरी बोर्डची जबाबदारी तुझ्यावर टाकून आले होते ना मी? मग तो वाचवण्यासाठी तुला काहीच करता येत नव्हतं का? "

" मँम, तुम्हांला तर माहितीए ना द्विविद कसा आहे ते? शिवाय त्याच्याकडे ते लायसनवाले पिस्तल असते. त्यानं पिस्तलची धमकी दिली मला आणि तो स्टोरीबोर्ड घेऊन गेला घेऊन गेला. " " याचा काय अर्थ होतो मृदुल? असा कसा घेऊन जाऊ शकतो तो स्टोरीबोर्ड? आपल्या सगळ्या मेहनतीवर तो असं कसं पाणी फिरवू शकतो? मला सांग तुझ्याकडे आणखी किती कॉपी आहेत? " " मँम ती पहिलीच कॉपी होती. तिची दुसरी बनवायच्या आधीच द्विविद ती बंदुकीचा धाक दाखवून घेऊन गेला होता. " " आणि तू भित्र्या सशसारखा मुग गिळून गप्प बसलास. बरोबर ना? " " मी काय करणार होतो मग त्यावेळी? गोळी लागली असती तर जीव गेला असता माझा! " यावर मात्र निम्मा मोठ्याने हसली. " त्याने तुझ्यावर कधीच गोळी चालवली नसती. माझी खात्री आहे. कारण त्याने गोळी चालवली असती तर त्याच्या पाठोपाठ घडणाऱ्या अनेक घटनांसाठी त्याला जबाबदार ठरवण्यात आलं असतं आणि मग द्विविदच्या मागे जे सत्य अंधारात लपून बसलं आहे ते ढळढळीत प्रकाशात आलं असतं. तुझा फोन आहे तुझ्याकडे? का तो ही द्विविद घेऊन गेला? " " नाही मॅम. माझा फोन माझ्याकडेच आहे. " " मग त्याच्यावर द्विवीचा नंबर डायल कर आणि त्याला सांग जिथे कुठे असशील तिथून स्टोरीबोर्ड घेऊन तुला मॅडमनी सिन्हांच्या एडिटिंग रूमला बोलावलंय म्हणून. "

" पण मँम, तो येईल का? " " तो नाही तर त्याचा बाप येईल; पण, मला आज काहीही करुन स्टोरीबोर्ड हवाय. तू फोन लाव. मी बोलते त्याच्याशी. " मृदुलने त्याचा नंबरवरून द्विवीला फोन लावला. आधी त्याने उचलला नाही. मग तिसऱ्या ट्रायमध्ये फोन उचलला आणि उलट मृदुलला धमकी द्यायला लागला. 


" मृद्या, हिंमत कशी झाली तुझी मला फोन करण्याची? यावेळेला स्टोरीबोर्ड नेलाय. पुढच्या वेळेला माझ्या वाटेत आडवा नाही यायचं. जर आलास तर... " पण हे सगळं ऐकणारी नीम्ना होती हे त्याला थोडीच माहीत होतं. त्याचं वाक्य संपेपर्यंतच ती विजेसारखी त्याच्यावर कडाडली. " ए, भेकडा! भाडखाऊ, पाठीमागून चोरी करतोस आणि तोंड वर करून बोलायला लाज वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची मृदुल लुळा पडला असेल पण, तुझी गाठ निम्ना भावसारशी आहे हे अजिबात विसरायचं नाही. जो स्टोरीबोर्ड तू घेऊन गेलास तो माझी मेहनत आहे. तेव्हा तो स्टोरीबोर्ड घेऊन आत्ताच्या आत्ता अशोक सिन्हांच्या एडिटिंग स्टुडिओला यायचं. नाहीतर याच्या पुढे जे होईल त्याच्यासाठी जबाबदार तू असशील. तुला आणि या सगळ्याच्या पाठीमागे असणाऱ्या त्या माणसाला दोघांनाही सगळ्यांसमोर उघड पाडीन. तुला काय करायचंय ते तू ठरव. माझा स्टोरीबोर्ड आणून द्यायचाय की लोकांसमोर बंद केलेलं सगळं उघड्यावर आणायचंय ते! जर तू मी म्हणते ते केलं नाहीस तर पुढचं सगळं आयुष्य तू उभा राहणार नाहीस याची काळजी मी घेईन. माझ्या वाट्याला जायचं नाही. तुझ्याकडे मोजून एक तास आहे. येत्या तासाभरात स्टोरी बोर्ड इथं पोचला पाहिजे. कळलं? चल, फोन ठेव. " मृदुल या सगळ्या प्रकाराने पुरा दडपला गेला होता. " मॅडम, तो खरंच स्टोरीबोर्ड आणून देईन? " " तू इथेच वाट बघ. अवघ्या अर्ध्या तासात तो पोचणार इथं. मला माहितीये तो कुठे आहे ते! आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे तेही! पण त्याला हे नाही माहित की इस निम्ना भावसार ने घाट घाट का पानी पिया है। चल, मला एडिटिंगसाठी जायचय. " " पण, या सगळ्या पाठीमागे नक्की कोण आहे? " " आपल्या प्रोडूसरला जे सतत पाण्यात बघत असतात ना! ते विरेन मेहरा. तसं मेहरा साहेबांचा बॅकग्राऊंड बऱ्यापैकी अंडरवर्ल्डच्या लोकांबरोबर साट्यालोट्याचं आहे आणि हा जो द्विविद आहे ना! तो इथे काही डिरेक्टर बिरेक्टर बनायला आलेला नाहीए तर त्याला व्हायचंय नामांकित प्रोड्युसर आणि त्यासाठी तो मेहरांकडं या अशा फालतू ट्रिक शिकतोय. त्याला माहित नाही की या ट्रिकने त्याचं थोड्या काळासाठी नाव होईल. पण शेवटी कामाला येणार ती गुणवत्ताच. बरं, सव्वासात झालेत ना! तू इथेच थांब मी आत जाते. बरोबर साडे सात वाजता तो स्टोरीबोर्ड घेऊन येईल. त्याच्याशी एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. गप मुकाट्यानं स्टोरीबोर्ड घ्यायचा आणि सरळ आत यायचं. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. " " होय मॅडम. " त्याला तिथेच दारात उभा ठेवून निम्ना अशोक सिन्हांच्या बरोबर गाण्यांची एडिटिंग करायला आत स्टुडिओत गेली. " सरजी, मै तो आज यहाँ कुछ करनेवाली हूँ नहीं। मैं तो सिर्फ देखने आई हूँ के आप गाना कैसे एडिट करते है। और धैर्यजी आप की कोरियोग्राफी का क्या कहना? माशा अल्लाह! आप की कोरियोग्राफी और सिन्हा जी का एडिटिंग। आज तो मेरे सितारे उफान पें है। आज मुझे बहुत कुछ सीखने को मिलने वाला है। " "और अभी अभी मैं बाहर आपसें बहोत कुछ सिखकें आया हूँ। "

अशोकजींनी तिचा बॉल सहज बाहेर फटकवला. बरोबर साडेसात वाजता द्विविद स्टोरीबोर्ड घेऊन हजर झाला. त्याचे डोळे नुसते आग ओकत होते. खेळी फसली होती याचा विषाद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तो ताड्ताड् पावलं टाकत आत आला आणि हातातला स्टोरी बोर्ड मृदुलच्या हातात देऊन पुढे काही बोलणार इतक्यात मृदुल मागे वळला आणि थेट दरवाजा उघडून एडिटिंग रूम मध्ये शिरला. बिचाऱ्या द्विविदच्या हातात चरफडण्याशिवाय काही राहिलं नाही. तो जसा आला होता तसाच निघून गेला. दोन्ही गाण्यांचं एडिटिंग करून मृदुल आणि निम्ना सिन्हाजींचा निरोप घेऊन धैर्य जाधवांना थँक्स म्हणून बाहेर पडले. 


" का रे मृदुल! त्या दिवशी मला फोन केलास त्यावेळी वर्कींग रूमवर नक्षत्रा, रमणी कुणीच नव्हतं का? " "नाही मॅम. रमणी मॅडम नव्हत्या आणि नक्षत्र मॅडम होत्या. पण हे सगळं प्रकरण घडण्याच्या थोडावेळ आधी त्या बाहेर पडल्या. कदाचित त्या बाहेर गेलेल्या बघूनच द्विवीनं त्याचा डाव साधला होता. " " बरोबर आहे. त्या दोघीही त्याला भारीच पडल्या असत्या. तो त्या दोघींना डावलून स्टोरी बोर्ड कसाच घेऊन जाऊ शकला नसता. त्या दोन्ही हडळींनी द्विविदचा जीव घ्यायला मागेपुढे पाहिलं नसतं. " " मॅडम, एक विचारू? तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मुली अशाच आहेत का? " " हां. थोड्याफार फरकानं माझ्यासारख्याच. का पण? असू नये का? " " नाही. तसं नाही. " " मग कसं? दरवेळी मदतीला कुणीतरी येईल म्हणून आम्ही ताटकळत वाट बघत राहायचे का? स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही का? आणि तुम्ही कधी येणार मदतीला? जवळपास कुठेही असलात तर ठिक आहे रे! पण जवळपास नसलात तरीसुद्धा मदतीसाठी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे असं म्हणायचे का तुला? जर तसं म्हणायचं असेल तर तू चुकीच्या माणसासोबत काम करतोयस. कारण निम्ना भावसार कृती आधी करते; विचार नंतर. मुळात तिची कुठली कृती अविचारी असत नाही. पण तसं करावं लागलं वेळप्रसंगी तर ती त्यालाही मागेपुढे बघत नाही. नक्षत्रा रमणी असत्या तर त्यांनी स्टोरीबोर्ड जाऊ दिलाच नसता. आणि मी तिथे असताना द्विवीनेसुद्धा तसा विचार केला नसता. माझ्या मेहनतीचं फळ जर असंच कुणी चाखू म्हणत असेल तर त्याला जोपर्यंत चाप लावत नाही तोपर्यंत मला शांती मिळत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. या इंडस्ट्रीतच नव्हे तर ह्या जगात बळी तो कानपिळीचाच कायदा चालतो. जर असा मुळूमुळू वागत राहिलास तर लोक फक्त तुझा फायदाच करून घेणार. माझा मास्तर मला एकदा म्हणाला होता इथे जगायचं असेल तर गांधीबाबा नाही उपयोगी पडत. चाणक्य लागतो. कुणी एक थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करायच्या ऐवजी समोरच्याची दोन्ही कानशिलं बहिरी करता आली पाहिजेत तरच तुम्ही जगात आणि इंडस्ट्रीत जगु शकता. आता जास्त प्रश्न विचारू नकोस. जाऊन बरंच काम करायचंय. अजून आपल्याला माहिती नाहीए की द्विवीनं हा स्टोरी बोर्ड कॉपी केलाय की नाही. हा आणखी कुणाकडे गेलाय का त्याचा शोध घेतला पाहिजे. ठीक आहे. बाय. उद्या सकाळी आपल्या वर्करूमवर मला भेट. " दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या गंतव्य स्थानाकडे रवाना झाले.



स्वरा...

**********************************************

एडिटिंगचं त्या दिवसाचं काम आटपून निम्ना घरी परतली. ती आली तेव्हा भूप टिव्हिसमोर सोफ्यावर बसून बातम्या बघता बघता मस्त पॉपकॉर्न खात होता. " हे काय? तू इथंच? घरी नाही गेलास? " " का? तुला माझा कंटाळा आलाय का? " " अरे, तसं नाही रे!.... " तिला काय उत्तर द्यावं ते सुचेना. " मग का हाकलतेयस मला? " तो तिला चिडवत म्हणाला. " मी असं काही करत नाहीए. आणि हे तुलाही माहितेय भूप!..." 

आता मात्र ती जराशी चिडीला आली. आधीच स्टुडिओत ते महानाट्य घडलं होतं आणि आता हा हे असे शब्दांचे खेळ करत होता. तिचा विस्कटलेला स्वर ऐकून त्यानं पटकन् १८०° यू टर्न मारला आणि म्हणाला, 

" फायनली द्विविदनं स्टोरीबोर्ड आणून दिला ना? मला माहित नव्हतं तू एवढी राणी चन्नमा असशील म्हणून. "

" तुला कसं कळलं? कुणी सांगितलं? " " हे काय आताच बातम्या झळकल्या. प्रसिद्ध दिग्दर्शिका निम्ना भावसार यांनी आपल्या असोसिएटला चांगलाच धडा शिकवला म्हणून. " " भूप चेष्टा बास झाली हं! मला नीट सांग तू काय करत होतास तिथे? काही कामासाठी आलेलास का? मग माझ्याचसोबत का नाही आलास? " तिनं लागलीच प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. " अगं, हो. हो. श्वास घे नाहीतर धाप लागेल तुला. " " आधी मला सांग तुला कसं कळलं ते? " " एवढी काय घायकुतीला येतेस? तुझं काम आटपलं की नाही विचारायला मृदुलला मघाशी फोन केला होता. तेव्हा तो हे सगळं सांगत होता. " तिनं सुटकेचा निश्वास सोडला. तिला वाटलं खरोखरीच पुन्हा कुणा मँगझीनचा पत्रकार होता की काय पाळतीवर. यांना उगाच सगळ्याला फोडणी देऊन जास्तीचं तिखटमिठ चोळून सगळ्याच्या बातम्या करायच्या असतात. अर्धी जमात चोचा मारण्यावर जगते झालं. तिकडे भूप मात्र तिनंच अनुभवलेला घटनाक्रम तिलाच रंगवून सांगत होता. 

" काय बाबा! आज एका माणसाची फारच तारीफ होत होती. मँडम कसल्या डेअरिंगबाज आहेत. कुणाला घाबरत नाहीत. सॉलीड आहेत वगैरे वगैरे. " " आता आम्ही तरी काय करणार ना? दुधाची तहान ताकावरच भागवून घेतो झालं. ज्यांनी करायला हवी, ते लोक तर काही बोलतच नाहीत ना! " न बोलायला काय झालं? तू फक्त लग्न कर माझ्याशी. मग बघ कसे तुझ्या तारीफांचे पुल बांधतो. त्यांना आपल्या प्रेमाच्या वेलींनी सजवतो. मग त्यावर आपल्या रोमान्सची फुलं फुलतील. " " ओ इलेक्ट्रिकल इंजिनिअर. या. स्वप्नातून बाहेर या. इथे वायरी जोडताना घोटाळे करताय ते काय कमी आहेत का? निघाले लगेच पुल बांधायला! त्यातही करशील घोटाळा आणि मी उभं रहायच्या आधीच पुल पडेल तो. नक्कोच. मी नाहीच लग्न करणार तुझ्याशी. "

" निमा, मी इतका वाईट आहे का गं? अजून किती वर्षं वाट बघायला लावणारेस? " तो जरा जास्तच गंभीर झाला होता लग्नाच्या विषयावरुन. "ए वेड्या! तसं काही नाहीए. मी अशीच गंमत केली तुझी." ती पटकन् त्याच्या शेजारी बसली. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, " पण, मी गंमत करत नाहीए. मी खरंच खूप गंभीर आहे यासाठी. मला माझं सगळं आयुष्य तुझ्या सोबत जगायचंय. " " कसं शक्य आहे भूप ते? " " का शक्य नाहीए? तू हो म्हण मी सगळं शक्य करतो. " " लग्न करुन मी इथेच राहू? तुझ्या घरी नको येऊ? आई घेतील मला घरात? त्यांचे विचार बदललेत का? बघ ना! १० वर्षं उलटून गेलीत भूप! आपलं नातं म्हणजे आता काही कालचे कोवळे रेशीमबंध राहिलेलं नाहीए. ते खूप प्रगल्भ झालंय रे! मी तुला तू मला खूप आतून समजून घेऊ शकतो. पण, गेल्या १० वर्षांनी आईंच्या नजरेत मी आणखी नकोशी झाली असेन हे माहितेय मला. काय कमी वावड्या उठल्या का माझ्याविषयी? तू काहीच ऐकलं, वाचलं, बघितलं नाहीस का? माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत इथपासून ते काम मिळवण्यासाठी मी निर्मात्यांसोबत झोपते इथपर्यंत सगळं प्रकाशित करुन झालंय माध्यमांनी. अशा परिस्थितीत त्यांची मत बदलली असतील असं मानणं म्हणजे आपल्याला परिस मिळाल्याचा आभास जपून ठेवण्यासारखं नाहीए का?"

" एक मिनिट. ये माझ्यासोबत. " तो हाताला धरुन तिला बेडरुममध्ये घेऊन गेला. तिथे नवीनच लावलेल्या मोठ्या आरशासमोर त्याने तिला उभं केलं. " या आरशात नीट बघ. आता मला सांग निमू, तू स्वतःशी नजर मिळवू शकतेस? " " अर्थातच, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? " " आणि माझ्याशी? " " नक्कीच. कारण माझ्यानंतर माझा आरसा तूच आहेस. तुझ्या डोळ्यांइतकं स्पष्ट प्रतिबिंब कधीच दिसलं नाही मला कुठल्याच आरशात. " " मग झालं तर! तुझ्या माझ्या लग्नासाठी आणखी कशाचीच गरज नाहीए. " " हो तर आलाय मोठा शहाणा! म्हणे कशाची गरज नाहीए. जसं काही आई पंचारती घेऊन माझी वाटच बघतायत ना? वेडपट! तुमच्या रंगनाथांच्या घरात तूच एकटा नमुना असशील ना? " तिनं त्याच्या डोक्यात टपली मारत कपाटाचं दार उघडलं. " छे गं! अजून आहे एकजण. " " अरे देवा! काय सांगतोस? आता असं म्हणू नकोस की तायडीपण तुझ्यासारखी झालीय म्हणून. " " छ्या! छ्या! ती तुमची भावसारांची तुळस आणून आमच्या रंगनाथांच्या वृंदावनात लावलीय. हे म्हणजे अस्सल रंगनाथांचा नमुना आहेत. आमचं शेंडेफळ; नेहा. " " का? आता तिनं कसली भूपगिरी केली? " " आधीच आई तुझ्यामाझ्या लग्नाला तयार नाही. त्यातं हिचं आणखी वेगळंच. " " अरे पण असं केलंय काय तिनं? " " तिलाही लग्नच करायचंय. फरक फक्त लिंगाचा आहे. " "म्हणजे? मला नाही कळलं! किती कोड्यात बोलतोयस तू! " " कसली गं तू दिग्दर्शिका? सगळं उचकटून सांगावं लागतं तुला. नेहा लेस्बो आहे. तिला तिच्या मैत्रिणीशी गौराशी लग्न करायचंय. " " ओ माय गॉड! इज इट? " आता मात्र तिलाही धक्का बसला. " म्हणजे आईंना सिनेमाइंडस्ट्रीतली मुलगी नको होती सून म्हणून आणि आता त्यांची लेकच जावई म्हणून एका मुलीला आणायचा विचार करतेय? कसं काय स्विकारतील त्या हे? केवढी कठीण परिस्थिती आहे ही! " " आहे खरी. पण त्यावर आपण दोघं मिळून नंतर विचार करुन मार्ग काढू. सध्या तू ह्या गरीब भूप्याचा विचार कर फक्त. " " तुझा कसला विचार करायचा? " " यार मी कालही उपाशीच झोपलो. किमान आज तरी... " त्याचं पुढचं वाक्य ऐकायचं टाळून ती बाथरुममध्ये घुसत म्हणाली, " आधी वॉश घेते. मग जेवूया. आणि मग तुमच्या रोमान्सचे धुमारे पाहूयात हं! " " अरे, निमा. किती संयम ठेवायला लागतोय मला! बघ, काही दिवसात मला संयमाचा महामेरु म्हणून ओळखायला लागतील सगळे! " आतून तिच्या खळखळाटी हसण्याचा आवाज बाहेर पसरला. " असं अज्जिबात काही होणार नाही हं रंगनाथ! कारण तुमच्या संयमाचा द्रवणांक मला चांगलाच माहितेय. त्यासाठीच तर बाथरुमचं दार अजून उघडंच आहे. "

स्वरा.

कालची रात्र फारच सुखद होती त्याच्यासाठी. निमाची सकाळी ७ ची शिफ्ट होती. तिला ६:३० चा कॉल टाईम असल्यानं ती ४-४:१५ वाजताच बाहेर पडली होती. इतक्या सुंदर रात्रीनंतर तिचं असं मिठीतून निघून जाणं त्याला नकोसं झालं होतं. तो तयारच नव्हता तिला जाऊ द्यायला. ती उठण्यासाठी जितका जोर लावत होती तितक्याच आवेगानं तो तिला पुन्हा जवळ ओढून घेत होता. शेवटी एकदा ती त्याच्या मिठीतून कशीबशी निसटलीच. तिचं आटपून त्याला एक छानसा गुडबाय किस करुन ती बाहेर पडली. तिच्या गेटमधून बाहेर जाणाऱ्या गाडीला बघून तो गँलरीतून आत आला आणि पुन्हा बेडवर आडवा झाला. आपल्याला ८ वाजता बाहेर पडायचंय. इथून घरी जाऊन रुझुला भेटून मग ऑफिसला जायचंय अशी रिव्हर्स कँल्क्युलेशन्स घालत त्यानं गजराची वेळ बदलली आणि उशीला कुशीत घेऊन परत एकदा मस्त ताणून दिली. 


बरोबर ८ च्या गजरला तो उठला आणि सगळं आवरण्याच्या मागे लागला. तो आंघोळीसाठी बाथरुममध्ये चालला होता तर दारावर त्याला स्टिकी डकवलेली दिसली. " 

अंग पुसल्यावर टॉवेल प्लीज मशीनमध्ये टाकशील..." शेजारी छोटासा किसी काढलेला होता. तो मनातच म्हणाला, ' टाकतो गं बाई! ' आंघोळ आटपून कॉफी घेण्यासाठी किचनमध्ये आला तर समोरच्या वॉलवरही एक स्टिकी लावली होती. " कॉफीच्या बाटलीचं झाकण घट्ट लावून फ्रीजमध्ये ठेवशील; कॉफी झाल्यानंतर प्लीज..." पुन्हा शेजारी एक छानशी किशी काढलेली. तेवढं पुरेसं नव्हतं म्हणून नाश्त्याच्या प्लेटवरही स्टिकी लावलेली, " तुला आवडणारा नाश्ता झाला की प्लीज प्लेट बेसीनमध्ये ठेवशील..." सोबत किशी होतीच. तो सकाळीच होणाऱ्या या प्रकाराला आता वैतागला. नाश्ता आटपून तो बाहेर पडत होता तर इथेही एक स्टिकी त्याची केव्हापासून वाट पाहत होती, किशी सोबत 


" बोक्या एक चावी अम्मांसाठी कुंडीखाली ठेवशील प्लीज..." चावी कुंडीखाली सरकवत तो स्वतःशीच पुटपुटला, " यार इतके सगळे किस त्या स्टिकीला देण्याऐवजी एखादीनं मला दिले असते. "

तो जेव्हा घरी पोचला तेव्हा घरात अशा धावपळीच्या वेळेत शांतता नांदत होती चक्क! बाबा एकटेच हॉलमधल्या त्यांच्या टेबलाशी बसून चेस खेळत होते. तसे अख्ख्या घरात त्यांचे तीन चेसबोर्ड मांडलेले असायचे. एक हॉलमध्ये, एक त्यांच्या खोलीमध्ये आणि एक गच्चीतल्या झोपाळ्याजवळ. त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की ज्याअर्थी बाबा हॉलमध्ये चेस खेळतायत त्याअर्थी घरात काहीतरी नवं महानाट्य घडलेलं असावं. तो रुममध्ये जाण्याआधी त्यांच्या टेबलकडे आला. तिथे ठेवलेला शेकर उचलून कोल्डकॉफीचा एक मोठ्ठा घोट घेऊन त्यानं बाबांच्या चालीला प्रत्युत्तर दिलं. " काय आज घरात एवढी शांतता? गेले कुठे सगळे? " " का मी नाहीए का बसलेला इथे? " ते काय डाव खेळावा याचा अंदाज लावत म्हणाले. " तुम्ही ऑल टाईम सायलेंन्ट मोडवरचं रेडिओ स्टेशन. कधीतरी रेंज मिळाल्यावर फर्र फर्र करणारं. बाकी चालू स्टेशन्स कशी काय बंद ते विचारलं मी! " बाबांनी चष्मा नाकावर खेचून त्याच्यावरुन त्याच्याकडे नजर टाकली आणि म्हणाले, " काही नाही रे! आपला साक्षात दुर्गावतार मार्केटात भाजीवाल्यांशी हुज्जत-युद्ध खेळायला गेलाय. " त्याच्या तोंडून फसकन् हसू फुटलं. हे नाव त्यानंच थोरल्या रंगनाथ बाईंना म्हणजे आईंना प्रदान केलेलं. " श्रुती अंकितचं सगळं आटपून वर बसलेय खोलीत. रुझु आत्ता खेळत होती गेलो होतो तेव्हा आणि शेंडेफळ कोपागारात बसलंय. " " का? तिचं काय बिनसलं? आज काय दुकानात जायचं नाही का तिला? " " बघ बाबा! तुला काय सांगते का ते! सकाळी नाश्त्याच्या वेळेला मातोश्रींना हिरवा कंदील दाखवलाय बाईसाहेबांनी. आज घरात नक्की दुधी येणार. " " बघतोच तिला! कामधंदे सोडून घरात कसली बसते ही बया? तुमच्या राजासमोरचं प्यादं हलवलंत की सरळ चेक मेट हं बाबा! " जिन्यातून वर जाताना त्यानं आपली चाल उघड केली. 

श्रुतीच्या खोलीतून रुझुच्या हसण्याखिदळण्याचा आवाज येत होता. तो आत आला तर ती बाबागाडीत बसून पायातलं पैंजण वाजवत त्या आवाजाने आनंदून हसत होती. श्रुती पलिकडेच लँपटॉप घेऊन बसली होती. तिची अजून दोन महिने रजा बाकी होती. " ए, पिल्लू! का कत्ते गं तू? आईनी घात्ते पैजन? कचे वाजतात? चुमचुम. " " भूप, तिच्याशी बोबडं नको बोलूस बरं! मग तिही तशीच बोबडी बोलेल. स्पष्ट बोल. आणि हे पैंजण तुच घेतले होतेस तिला! विसरलास का? पाचव्या दिवशी कुणी आणले होते घरात येताना? पिल्लू काका विसरला बघ! " तिनं टाळ्या वाजवल्या तशा रुझुनंपण हसत टाळ्या वाजवल्या. तो तिथंच तिच्या वॉकरशेजारी बसला तिच्याशी खेळत. " काय मग, काय म्हणतंय तुमचं लग्नाचं घोडं? न्हातंय की नाही लग्नाच्या गंगेत? " " जरा शिकव की तुझ्या बहिणीला काहीतरी. हट्टीपणा कमी कर म्हणावं. भूपचं ऐकत जा जरासं. जरासा बहिणीकडे माझा वशिला लावलास तर चालतंय की. " " आता काय वशिला लावून लग्न करणार का तुम्ही? म्हणजे अजून पहिले पाढे पंचावन्नच का! " " जाऊ दे. तिला बघतो मी कसं मनवायचं ते! मला सांग आमच्या शेंडेफळानं लग्न करायला होकार दिला हे खरंय? " " हो म्हणजे काय? तिच्या तयार होण्यामुळंच तर आज कॉजवेला पूर आला होता आनंदाचा. त्या भरात शिऱ्यात दोन चमचे तूप जास्तच पडलं होतं. " ती


 हसतच म्हणाली. आता मात्र त्याच्या डोक्यात घंटा वाजायला लागली. राहून राहून गौरा डोळ्यांसमोर नाचायला लागली. पण तरीही तो थोडावेळ तिथंच रुझुशी खेळत बसला. " आई म्हणते रुझुशी स्पष्ट बोल. मग सांग बरं तू मला काय म्हणणार? मी तुझा भूप काकू. काय म्हणायचं मला भूपकाकू. " " काहीतरी नको ना शिकवू गधड्या. काकू काय? बाई आहेस का तू? काका म्हणायला शिकव तिला. " " छ्या एवढं मोठं नाव कोण घेणार? बाबूशा, तू मला भुकू म्हण. " "ए, अरे मार खाशील हं तू! " तिनं त्याला मारायला शेजारची उशी उचलली तर तो ह्यँ ह्यँ करत पळाला तिथून. तो दारातून बाहेर गेला असेल तोच रुझु कू कू म्हणत पायातले पैंजण वाजवायला लागली. "रुमझुम! " श्रुतीचा आवाज दडपून टाकत तो दारातून डोकावत म्हणाला, " अगदी बरोबर. भूकू. परत म्हण भूकू. " आता ती लँपटॉप ठेऊन उठली तोवर तो नेहाच्या खोलीकडं पसार झाला. " तू धप्प्या खाशील हं रुझु! काकू म्हणलीस तर बघ! " श्रुतीनं तिच्यावर डोळे वटारले. 

त्यानं नेहाच्या खोलीच्या बंद दारावर टकटक केली. " कोण आहे? " आतून नेहाचा तिरसटलेला आवाज आला. त्यानं काही न बोलता पुन्हा टकटक केली. तिला कळलं की तो भूप आहे म्हणून. मग ती जरा आणखी तिरसटून म्हणाली, " तू तुझ्या कामाला जा दादूस! उगाच इथे वेळ काढायची गरज नाहीए. " " नेहा, पहिली गोष्ट माझ्यावर आवाज चढवायचा नाही. दुसरी गोष्ट गप मुकाट्यानं दार उघडायचं. " तिला माहीत होतं की अशा जरबेच्या आवाजात तो बोलला म्हणजे त्याला आपल्या लग्नाच्या निर्णयाबद्दल कळलं असणार. आता त्याच्याशी बोलल्याशिवाय आपली सुटका नाही म्हटल्यावर तिनं गपगुमान दार उघडलं आणि उशी घेऊन बेडवर कोपऱ्यात बसली. 


" जरा शहाण्यासारखं वागायचे काही पैसे पडत नाहीत. कशाला नसते लोचे करुन ठेवतेस गं? आहेत निस्तरायला ती काय कमी आहेत का? " दार लावून तिच्याशेजारी बसत त्यानं विचारलं. " मी कसलीही लफडी लोचे केलेले नाहीत. " " मग तुझ्या लग्नाची राळ काय मी उडवलीय का खाली? आणि दुकानात जायचं सोडून तू घरात काय करतेस? त्या गौराच्या जीवावर जरा जास्तच धुमाकूळ घालायला लागलीयस तू आजकाल. " " काही तिची बाजू घ्यायची गरज नाहीए. एवढा काही सौजन्याचा पुतळा नाही लागून गेलेली ती! " नेहा अजूनही घुश्श्यातच होती. " आता सरळपणानं सगळं सांगतेस की फोडू तुझं कानफाड? " " दादूस, आता तू पण असं म्हणणार का? " " काही काकुळतीला यायची गरज नाहीए. तुला माझ्याशिवाय असं कुणीही काही बोललेलं नाहीए. लाडकं मडकं आहेस ना घरातलं! उचकट आता थोबाड आणि सांग काय पराक्रम केलेस ते! निस्तरले मलाच पाहिजेत ना! " " काही नाही केलेलं मी. आईला फक्त सांगितलंय सकाळी की मी लग्नाला तयार आहे म्हणून. " " अच्छा. तर तुला लग्न करायचंय. कुणाशी? " " आई म्हणेल त्याच्याशी. " " म्हणजे बाय डिफॉल्ट एका पुरुषाशी? बरोबर ना! " " हं! " " हं! हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीए नेहा. तू एका पुरुषाशी लग्नाला खरंच तयार आहेस? अगं मग गौरानं काय करायचं? " " ती करेल ना अद्वैतशी लग्न. तिला कुठं माझी गरज आहे तेव्हा मी तिची काळजी करु? " " कोण हा अद्वैत? आणि हे सगळं कधी ठरलं? " आता नेहा थोडी सावरुन बसली. पण अजूनही तिची भूपकडे नजर वर करुन बघायची हिंमत होत नव्हती. कारण तिला माहीत होतं दादूस जेवढा प्रेम करतो त्याच्या दसपटीने जास्त तर्कट आहे. त्याला लपवाछपवी अजिबात आवडत नाही. " काय शब्द मिळत नाहीयेत का? " तसं तिनं दबक्या आवाजात विचारलं, " तुझ्याकडे वेळ आहे ना दादूस? " " हो. तुमच्या या उचापती कळल्यावर मेसेज टाकला होता अँन्डीरिंगला उशीरा येतोय म्हणून. पण, म्हणून मी इथं बसणार नाहीए. आवर पटकन् आणि चल माझ्याबरोबर. मी खाली गाडीत वाट बघतोय. " तिला कसलेही प्रश्न विचारु न देता तो तसाच तिथून बाहेर पडला. श्रुतिच्या खोलीत मात्र जाता जाता डोकावला. रुझू झोपली होती आणि श्रुती अजूनही कामात होती म्हणून त्यांना डिस्टर्ब न करता तसाच खाली आला. बाबा अजूनही हॉलमध्येच होते. म्हणजे आई अजून आलेली नाही हे गृहीतक त्यानं खाली उतरतानाच मांडलं होतं. " बाबा, येतो मी जाऊन. " त्यावर बाबांनी फक्त हात हलवलेला त्याला दिसला. त्यानं जाऊन गाडी स्टार्ट करेपर्यंत नेहा आलीच. तिला घेऊन तो बाहेर पडला. 

गाडी तिथून जी बाहेर पडली ती थेट पोवईलेकला येऊन थांबली. ट्रँफीकला त्रास होणार नाही अशी जागा बघून त्यानं गाडी पार्क केली. दोघेही तिथल्या हिरव्या गवतावर येऊन बसले. तशी ही वेळ काही प्रियाराधनाची नव्हती; त्यामुळे साहजिकच तिथे फारशी वर्दळही नव्हती. " बोला मँडम. द्या आता स्वमुखाने केलेल्या कांडाची सफाई द्या. " आता तिने त्याला सगळं प्रकरण सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली. " काल आमचं भांडण झालं. अद्वैत इनामदारवरुन. मला गौरानं त्याला भेटलेलं नाही आवडतं. मी तिला हे आधीही सांगितलंय पण ती ऐकतच नाही. तिचं म्हणणं तो तिचा फक्त मित्र आहे. " " मग तू तिच्यावर विश्वास का नाही ठेवत? " " कशी विश्वास ठेऊ? ती खुपदा मला न सांगताच त्याला भेटायला जाते. " " बरं. आधी मला सांग हा अद्वैत इनामदार कोण? त्याचा तुमच्या नात्याशी नक्की काय संबंध? " " सांगते. याची सुरुवात १५ दिवसांपूर्वी झाली, जेव्हा मैथिलींचं लग्न फायनल झालं. मैथिली इनामदार आमची जुनी कस्टमर. मैथिलीचं उर्जित देसाईसोबत लग्न ठरलं. त्यावेळी ती तिच्या मोठ्या भावाला अद्वैतला घेऊन आमच्या शॉपवर आली. तिला त्या दोघांसाठीही खास लग्नाकरता म्हणून डिझायनर वेअर शिवायचे होते. त्याशिवाय तिनं देसाईंच्या बंगल्याचं हनीमून डेकोरेशनही आम्हांलाच दिल होतं. त्यादिवशी मला मांगल्यची ऑर्डर द्यायची होती म्हणून मी तिला निहारिका, रोशन आणि बँनी (बिनीता) ला सोबत घेऊन जा म्हणाले. तीच माझी घोडचूक ठरली. तिथलं डेकोरेशन आणि ऑर्डर देऊन आल्यापासून ती सतत त्या अद्वैतशी कनेक्टेड असते. त्याच्यासोबत फिरायला जाते. तेही मला न सांगता. विचारलं की उडवाउडवीची उत्तरं तरी देते किंवा गप्प तरी बसते. किती दिवस हे सहन करु मी? परवाही ती त्या अद्वैतसोबत मॉलमध्ये गेली होती भटकायला. काय तर म्हणे शॉपिंग करायची होती. अरे मग माझ्यासोबत यायचं ना! तो कशाला लागतो तुला सगळीकडे सोबत? छान पिक्ड आयटम आणले होते तिने शॉपिंग करुन. म्हटलं एकटीच का गेलीस? मला सांगितलं असतंस तर सोबत गेलो असतो ना दोघी! तेव्हा म्हणाली की अद्वैत होता सोबत म्हणून. मग मी उचकले. म्हणाले तिला की ती जे काही वागतेय ते चुकीचं आहे. इतक्या वर्षांची आपली रिलेशनशिप तिच्या ह्या अशा वागण्यामुळे तुटेल. तर ती मला, मला पझेसिव्ह म्हणाली. डॉमिनंट म्हणाली. म्हणाली मी तिच्यावर हक्क गाजवते. तिचं कधीच काही ऐकून घेत नाही. मग माझा पारा चढलाच १८०° वर. म्हटलं कशाला राहतेयस माझ्यासारख्या पझेसिव्ह माणसासोबत? जा. चालती हो त्या अद्वैतसोबत. आजपासून तुझ्यामाझ्या वाटा वेगळ्या. उद्याच आईला लग्नासाठी होकार कळवते. इतके दिवस तुझ्यात जीव अडकून पडला होता माझा. आता तू तुझं काय ते बघ. मी माझं बघेन कसं होतंय ते! " हे ऐकणारा भूप मात्र गालातच खुसखुसत होता आणि नेहा पार काकुळतीला येऊन टिपं गाळत होती.  

तिला रडून मोकळं होऊ दिल्यावर तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तो म्हणाला, " राजा, अशा तुझ्या-माझ्या वाटा वेगळ्या म्हटलं की खरंच वाटा वेगळ्या होतात का? नाही रे बच्चा. माणूस ना भावनांचा भिकारी आहे. त्याच्या झोळीत जो कुणी प्रेमाची, आपुलकीची, मायेची, आदराची, थोड्याश्या हक्काची भावना टाकतो तो कायमचा त्या माणसाला चिकटून जातो बघ! तशीच गौरा आणि तू एकमेकीला चिकटलेल्या आहात. तीला आईबाबा नाहीत. अगदी गेल्या वर्षीपर्यंत आजी आजोबा होते सोबत. आता तर तेही नाहीत. एकतर ती आधीच मुखदुर्बळ. कमी बोलते. त्यात तिला तुझ्याकडून ती माया, ते प्रेम, तो आदर सगळं मिळालं आणि तुम्ही एकमेकींत गुंतून पडलात. बरं, गुंतण्याआधीच बाहेर पडला असतात तर काही प्रश्नच नव्हता. मी स्वतः तुमच्यासाठी स्थळं पाहिली असती. पण, आता? जेव्हा तुमच्या नात्याला इतकी वर्षं उलटून गेलीत. आता यातून बाहेर पडून कुणाचं भलं होणारे? तू तिला विसरु शकणारेस की ती तुला गं? आणि आता नवीन गोंधळ घातलायस तू; आईला लग्नासाठी होकार कळवून. समज तिनं एखादा मुलगा बघितला तर? " नेहाच्या उरात ह्या तर ने धडकी भरली. आता तिच्या लक्षात आलं की रागाच्या भरात आपण आपल्याच समोर समस्येचा अगडबंब राक्षस उभा केलाय. तो काही असाच सोडेलसं वाटत नाही आपल्याला.   " नेहा ऐकतेयस ना मी काय सांगतोय ते? आई तशीही तू लग्नाला तयार व्हावीस म्हणून सतत प्रयत्न करत असते. तू हो म्हणालीस म्हणून तिनं एखादा मुलगा आणून केला उभा तुझ्यासमोर; तर काय सहज माळ घालशील त्याच्या गळ्यात? राजा स्त्रीपुरुषाचा संसार ही सामान्य गोष्ट आहे. पण तुम्ही दोघी, तुमचं नातं, तुमचा संसार यातलं काहीही सामान्य नाहीए. म्हणजे तुमच्यासाठी सामान्य असलं तरी आजूबाजूच्या जगासाठी नाही. एखाद्या पुरुषाशी लग्न करुन तू किंवा ती बाकी सगळं मँनेज करालही पण माणसाच्या काही भुकांपैकी एक जी शारिरिक भूक ती कशी भागवाल तुम्ही? त्याच्याशी तडजोड करुन दोघीही रोज रोज मरत रहाल. आणि जर ही तडजोड करायचीच असं ठरवलंच असेल तुम्ही तर आधी मन, मेंदू सगळ्याचं नीट काऊन्सलिंग करुन घ्यावं लागेल तुम्हांला. " 

" नाही दादूस. ७ वर्ष तिच्यासोबत राहतेय आता तिच्याशिवाय नाही राहू शकणार रे मी! " " हेच, हेच ते भावनेत अडकणं म्हणतो मी. हेच मला उद्या निस्तरायला लागणार आहे. त्याआधी मला सांग काल भांडण झाल्यापासून फोन नाही केलास ना गौराला? " उत्तरादाखल नेहाची मान ना च्या अर्धवर्तुळात हलली.          " थोडासा हा नाकावरचा तेरम आणि तो पझेसिव्हनेस कमी कर तुझ्यातला. कळतंय मला; तुला भिती वाटली असेल की अद्वैत तिला तुझ्यापासून तोडणार तर नाही याची. पण अशीच वागत राहीलीस तर मात्र हे नातं नक्की तुटेल. हे बघ, नात्यांत आणि युद्धांत काही गोष्टी सेम असतात. कधी दोन पावलं मागं घ्यायची आणि कधी चार पावलं पुढं टाकायची याचं गणित जमलं की दोन्हीकडे फत्तेच व्हायची. चल, जाऊयात आपण. मलाही कामधंदे आहेत म्हटलं. आणि गौराची काळजी घे. मी संध्याकाळी दुकानावर येईन न्यायला दोघींनाही. कुठं जायचंय ते ठरवून ठेवा. " " का? आता संध्याकाळी परत कुठं जायचंय आपल्याला? " " तुझ्याशी बोललो. आता तिचं म्हणणं नको का ऐकून घ्यायला? न्यायालयानं काय एक बाजू ऐकूनच निर्णय घ्यायचा का? "

नेहा हो म्हणत गाडीत बसली. त्यानं तिला तिच्या शॉपवर ड्रॉप केलं. गौराची चौकशी केली. तिचे रडून रडून सुजलेले डोळे बघून तो काय समजायचं ते समजून गेला. जाता जाता परत त्यानं नेहाला चार गोष्टी ऐकवल्या आणि संध्याकाळी तयार रहा म्हणून सांगून तो ऑफिसला निघून गेला.

स्वरा....

**********************************************

संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे भूप नेहाच्या शॉपवर पोचला.  " काय दादूस, निमाताई भेटल्यापासून तुमची स्वारी फारच पंक्च्युअल झालीय वेळेच्या बाबतीत? " " तसा मी आधीपासूनच होतो. निमाताईनं काय जादूमंतर केलाय की काय? हां, पण तुझ्यामुळे मात्र आज मी गंध्या आणि मिथिलच़्ा शिव्या खाल्ल्यात फुकटफाकट." त्यानं दुकानात चौफेर नजर फिरवत तिला जशास तसं उत्तर दिलं.  " दादूस, उगाच फाका मारु नकोस हं! मी स्वतः तुला खूपदा लेट झाला म्हणून पळत जाताना पाहिलंय. " तिनंही त्याला उडवून लावला. आता ही हे दातात धरलेलं वेळ प्रकरण काही सोडणार नाही असं लक्षात येताच त्यानं फट्दिशी विषयच बदलला. " तू एकटीच कशी काय दुकानात? गौरा कुठं गेलीय? " " ती कुठंही गेलेली नाहीए. आतमध्ये आहे बँनीसोबत. " त्यानं तेवढं ऐकलं मात्र काहीतरी फार मोठं कांड घडल्याच्या आविर्भावात तो म्हणाला, " काय म्हणतेस काय? ती बँनीसोबत आत आहे? असं कसं झालं? काय करतेय ती आतमध्ये? तुला तुमच्या दोघीत अद्वैत आलेला चालत नाही आणि आता बँनीला कशी खपवून घेतलीस? " आधी त्याच्या आलेल्या टोळधाडीसारख्या प्रश्नानी ती थोडी गांगरली. पण मग जसं तिच्या लक्षात आलं की हा आपली टेर खेचतोय तशी ती म्हणाली, " काय आज जरा जास्त वेळ थांबलास का मिथिलदादासोबत? बरे फालतू पंचेस सापडतायत तुला! त्या दोघी आत मँनीक्वीनच्या मॉडेलवर ड्रेसचं फिटिंग टेस्ट करतायत; म्हणजे उद्या परवाकडे अँक्च्युअल मॉडेलला बोलवता येईल ना! " " पण बाकी काहीही म्हण हां नेहे, तुझ्या या समृद्धी शॉपमध्ये विविधतेनं नटलेला अर्धा भारत बघायला मिळतो. " " तो कसा? " ती बुचकाळ्यात पडली. इतक्यातच आतलं काम संपवून बँनी, रौशन आणि गौरा तिघेही एकदमच बाहेर आले. " हा काय! हा असाच की. ही बंगालन बँनी, हा लखनवी रौशन तुम्ही दोघी मराठमोळ्या सुंदऱ्या आणि ती इंग्रजानं हात ठेऊन जन्मलेली मायक्रोमिनी पंजाबन निहारिका. आहाहा! सक्काळ सक्काळ प्रतिज्ञा म्हटल्याचा फिल येत असेल ना या अर्ध्या भारतात! " 


त्यानं तिलाच उलटा प्रश्न करत गौराला हाय करण्यासाठी हात वर केला. नेमकं गौराचं लक्ष नव्हतं आणि बँनीनं ते पाहिलं. त्यानं लगेच बँनीला, " काय बनी कशी आहेस? सगळं आलबेल ना? " असं विचारलं. ते ऐकून गौरा फुटलीच एकदम. मोठ्याने हसत म्हणाली, " दादूस, मराठी नाही कळत तिला. " " आयला, असं काय? ए डिक्री केम छे? एकदम सारु छे ना! " "दाद्या, अरे ती बंगाली आहे रे! आणि तू तिच्यावर गुजरातीची पिचकारी का मारतोयस? " भूपच्या वात्रटपणाला कंटाळून नेहा त्याच्यावर उचकली. तरी भूपवर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो आपला आपल्याच टवाळकीचा कित्ता गिरवत बसला. " गौरे, आवाज चांगलाय तुझा. बोलत जा जरा. " ती काहीच न बोलता दुसऱ्या कामासाठी वळली तसा भूप म्हणाला, 


" ए बायांनो, मी काही इथं तुमची एंन्टरटेनमेंन्ट करणारा आर्टिस्ट म्हणून आलो नाहीए. आवरा आणि चला लवकर. चल गं गौरे! " तो तरातरा तिच्याकडे गेला आणि तिचा हात धरुन त्यानं तिला खेचतच काऊंटरकडे आणलं.    " नेहा तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का? " आता मात्र धाबं दणाणलेली नेहा पटकन् काऊंटरमागून बाहेर आली आणि रौशनला म्हणाली, " रौशनजी, आप जाते समय ठीक से ताला लगा दिजीए. एक चाबी मेरे पास है, और बिनिता को उसकी स्टॉपतक छ़ोड दिजीएगा। " " जी मैडमजी। आप हो आईए। बिनताजी की चिंता ना किजीए। हम सब संभाल लेंगे। " " ए बाई, आवर चल. " असं म्हणून त्यानं तिचं बकोट धरुन तिला ओढत गाडी पर्यंत आणलं. जाताजाताही त्याच्या खोड्या सुरुच होत्या. त्या गाडीत बसताना हा मागे वळून बँनीला ओरडून म्हणालाच,   " बँनी, आमी बोंगोली पोछंद कोरी. आमी तोमोके भालो माछी. " " अरे तू काय प्रेम करतोस का तिच्यावर दादूस? " गाडीत बसणाऱ्या भूपला नेहानं विचारलं. 


" ए तू काय डोक्यावर पडलीस काय? " त्यानं गाडीला स्टार्टर मारला.   " नाहीतर काय? अरे बंगालीत आमी तोमाके भालो माशी म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. " " काय? " तो उडालाच. " थांब. थांब. तिला सांगून येतो तसं काही नाहीए म्हणून. " " चल तू. मी सांगते तिला. येतात मला थोड्याबहुत भाषा बोलता. " असं म्हणत तिनं इअरप्लग कानात घातला आणि डोळे मिटून घेतले. " बघितलंस? हे हिचं असं असतं. ए, डुचके काढ तो इअर प्लग. माझ्या गाडीत चांगली गाणी आहेत . " पण ते ऐकायला नेहा कुठं जागी होती; ती केव्हाच तंद्रायमान झाली होती. बराच वेळ तो नुसताच त्या गाण्यांच्या सोबतीनं एकटाच गाडी चालवत होता. मग कंटाळून गौराला म्हणाला, " बाई, तू तरी सांग कुठं जायचंय ते? " तर तिनं काही माहीत नसल्याच्या आविर्भावात खांदे हलवले. " म्हणजे आपण तिघंजण काय मुंबई दर्शनला चाललोय का? ठीक आहे. आता तुम्ही नाहीच ठरवलं तर मी सांगेन तिथं यायचं तेही विना वाद घालता. आणि ती रडगाणी बंद कर जरा. गाणी पण काय लावलीत! तीन तीन माणसं आहोत आपण इथे. गप्पा मारता येतील ना! किमान तुला तरी? " त्यानं गाडीतली गाणी बंद केली. गाणी बंद झाली तशी नेहा तंद्रीतून बाहेर आली; कारण तिनं मघाशी भूप ओरडल्यावर आपल्या मोबाईलचा आवाज पॉईंन्ट चारवर आणून ठेवलेला. " ए, का बंद केलीस गाणी? आणि कुठे चाललोय कुठे आपण? " ती वैतागली. " प्रश्न विचारू नकोस. मी सांगितलेलं काही डोक्यात घुसलं नाही का तुझ्या? काय गौराबाई काय घडलं आज दिवसभरात? " त्यानं नेहाचं तोंड बंद करुन गौराला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तिनं सांगू की नको अशा द्विधावस्थेत नेहाकडं पाहिलं. " तिला घाबरतेस की काय? तिची काळजी घ्यायला मी आहे इथं. तू बोल. " " नाही रे दादा! तसं काही नाहीए. मी तिला काही घाबरत वगैरे नाही. पण जाऊ दे ना तो विषय! तू सांग गंधर्वदादाचा यदु कसाय? अजून येतो का तो कंपनीत? आणि मिथिलदादा, सुगमाताई ते कसे आहेत? " तिनं विषय बदललेला त्याच्या लक्षात आला. जाऊ दे मग नंतरच बोलू त्यावर असा विचार करुन तोही तिच्याशी गप्पा मारण्यात गुंगला. बोलता बोलता त्यांची गाडी मध्येच फँशन डिझायनिंग आणि कँन्डल डेकोरेशनवर घसरली. " काय गं गौरे, बाकी तुमचा कामधंदा कसा चालूय? सिझनमध्ये ही बया स्वतःबरोबर तुमचंपण कांडप काढत असेल ना! " " काय करणार दादूस! सॉरी दादा. " तिनं जीभ चावली. " अगं, म्हण म्हण काही हरकत नाही. " " थँन्क्यू दादूस. कसंय ना! सिझनमध्ये करु तेवढं काम थोडं असतं. रौशनकडे सगळ्या कपड्यांची कापाकापी असते. बँनी आणि तिच्या हेल्पर स्टिचिंग बघतात. निहारिकाकडं तयार ड्रेसवरचं जरीकाम, कलाबूत, बीडवर्कची जबाबदारी आहे. त्यात मधे मधे मेणबत्त्यांच्या वर्कशॉपमध्ये जावं लागतं. तिथं जरा दुर्लक्ष झालं की मेण वाया जाणं, मेणबत्तीचं स्ट्रक्चर चुकणं, रंग आणि गंधाची गणितं बिघडणं हे असले उपद्व्याप होतात. मग अधेमधे रौशनला नाहीतर निहारिकाला नजर ठेवायला पाठवावं लागतं तिथे. " " अरेच्चा, सगळी कामं हेच करतात तर मग तुम्ही काय दिवसभर टाळकुट देखरेख करता का? " " हो तर तेवढ्यासाठीच बसलोय ना दुकान उघडून! " नेहा खोचकपणानं उत्तरली. " बोललं. आमचं शेंडेफळ बोललं. बघितलंस ना! किती तेरम आहे हिच्या नाकावर ते! " " जाऊ दे ना दादूस! आपण आपला विषय चालू ठेवूया. तिचं नेहमीचं आहे ते! " भूपनं समोरच्या आरशातून फक्त भुवई उंचावून मागे पाहिलं. नेहानं त्याची नजर चुकवून ती मोबाईलमध्याला गेमवर केंद्रीत केली. गौरा आणि भूप परत आपापल्या व्यावसायिक आणि इतर गप्पांमध्ये गुंतून गेले. नेहा अधूनमधून त्यांच्याकडे बघत होती पण त्या दोघांनी जसं काही तिला ब्लँकआऊटच केलं होतं. तिची आतून नुसती चडफड चडफड होत होती. थोड्याच वेळात गाडीनं राईट टर्न मारला आणि भूपनं हुकूम सोडला. " उतरा खाली. पोचलोय आपण. स्पेशली गेमवाली माणसं! " खाली उतरल्यावर दोघींच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं. " कुठे आलोत आपण दादूस? "

स्वरा...

______________________________________________

" अशा काय उभ्या आहात तुम्ही? चला, आपल्याला तेराव्या मजल्यावर कलासक्तमध्ये जायचंय. " " कुणाकडे? " दोघी एका सुरात म्हणाल्या. " चला तरी आधी. सगळे प्रश्न काय इथेच संपवायचेत का? " त्याने आत जाऊन लिफ्टचं बटण दाबलंपण होतं. ती २७ व्या मजल्यावरुन खाली येईतो ह्या दोघीही येऊन पोचल्या. लिफ्ट आली. शटर उघडलं. तिघंही आत घुसले आणि त्याने १३ नंबरचं बटण दाबलं. एवढं सगळं होऊनही त्या दोघींच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह कायम होतं आणि भूप मात्र मस्तपैकी शिट्टीवर गाणं गुणगुणत होता. १३ व्या मजल्यावर पोचून लिफ्टचं शटर पुन्हा उघडलं. लिफ्टमधून बाहेर येऊन भूपनं डावीकडे वळून ८ नंबरच्या फ्लँटची डोअरबेल वाजवली. ह्या दोघी त्याच्या पावलावर पाऊल टाकत त्या फ्लँटसमोर येऊन उभ्या राहिल्या. तोवर दार उघडलं आणि समोरच्या व्यक्तीला बघून पहिली नेहा किंचाळली, " 


निमाताई तू? " आणि तिच्यामागोमाग अचंबित अवस्थेतून बाहेर येत गौरापण, " ओ माय गॉड! ओ माय गॉड! हे मी काय बघतेय? चक्क निम्ना भावसार? " त्या दोघींच्या आश्चर्याचा कारंजा थांबवण्यासाठी वैतागल्याचा आव आणत भूप म्हणाला,       " म्हणजे मला काही किंमतच नाहीए! आणि मी आत जातोय; तुम्ही येताय की इथूनच जाताय? " तशा त्या दोघी त्याच्या मागोमाग आत गेल्या. दार बंद करत निम्ना त्यांना म्हणाली, " त्याच्याकडे काही लक्ष नका देऊ. तुम्ही दमला असाल. फ्रेश व्हा. तोवर मी खायला आणते काहीतरी. " आणि किचनकडे जाताजाता तिनं त्यांना बाथरुम दाखवलं. दोघी आता एकाच बाथरुममध्ये जायचं का अशा विचारात उभ्या असतानाच बेडरुममधून तोंड पुसत बाहेर आलेला भूप गौराला म्हणाला, " गौराबाई, तू हे बाथरुम वापरु शकतेस. जा आत. गिझरचं गरम पाणी आहे काढलेलं. " तशी गौरा तिकडे आत निघून गेली. त्या दोघींना असं कटवून भूप स्वतः मात्र किचनमध्ये सटकला. गँसजवळ उभ्या असणाऱ्या निमाच्या कंबरेत हात घालून तिच्या मानेवर तो ओठांचे शिक्के उठवू लागला. 


" ए, अरे काय करतोयस? गुदगुल्या होतात ना मला! सोड बघू. " " जानेमन, कधीतरी तूही अशीच मूडमध्ये ये ना! " " हो का? तू जरा जास्तच विसरायला लागलायस का? " " हो. " त्यानं खांदे उडवले. " तसा याबाबतीत मी जरा जास्तच गझनी आहे. " असं म्हणून त्यानं तिच्या खांद्यावरचे केस बाजूला करुन तिथं किस केला. " आह! " तिच्या तोंडून एक सुखावणारा चित्कार निघून गेला तसा त्याने तिच्याभावतीचा वेढा आणखीनच घट्ट केला. " ए, अरे सोड ना! त्या पोरींनी पाहिलं तर काय म्हणतील त्या? " " काही म्हणणार नाहीत. त्यांच्या नात्यात याचीच कमतरता आहे. " " भूप, बस्स झाला हं तुझा वाह्यातपणा. " पण तो मात्र काही त्याची छेडाछेडी थांबवायला तयार होईना. इतक्यात बाथरुममधून बाहेर आलेल्या नेहाला हा सगळा रोमान्सचा नजारा नजरेला पडला आणि तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. तिने त्याच्याकडेे दुर्लक्ष करत हॉलमध्ये जायला वळली; पण खोड्या तिच्याही अंगात काही कमी नव्हत्या. जाता जाता उगीचच घसा खाकरून मी आहे याची जाणीव त्यांना; खासकरुन भूपला देऊन गेली. तशी भूपनं निमाच्या कंबरेची मिठी सोडली आणि तिनं भरुन ठेवलेला चहाचा ट्रे घेऊन तो हॉलमध्ये आला. " तायडू, मला आवडली ही भारतीय बैठक. आरामात पाय पसरुन बसता येतंय. " नेहा लोडाला टेकून पाय पसरत म्हणाली. " हो ना! मलाही हा प्रकार खूप आवडतो. पण, मी थोडी कन्फ्यूजच होते दुकानात हा वापरु की नको म्हणून. " असं म्हणत भूपच्या शेजारी बसायला जाणाऱ्या गौराला त्यानं नेहाच्या शेजारी बसायला पिटाळलं. 


" गौराबाई, ही सिट रिझर्व्हड् आहे. आपल्या आपल्या पॉईंंटला जाऊन रिझर्व्हेशन करा आणि बसा. चला पळा इथून. " ती जाण्यासाठी वळलीच होती तेवढ्यात निमानं डोळ्यांनीच भूपला वटारलं. " काहीही काय असतं रे तुझं? बस गं तू. " " अरे पण!..." " श्श! " तिनं तोंडावर बोट ठेऊन त्याला दटावलं. तर त्यानं नजर चुकवून तिच्या त्या बोटला किस केलं. त्यामुळं झालं काय तर तिनं नेहासाठी पुढे केलेला चहाचा कप डचमळला. नेहाच्या ते लक्षात आलं आणि तिनं चोरुन गौराकडं बघितलं. पण, तिच्या मात्र यातलं काहीच गावी नव्हतं. ती मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होती. नेहाला वाटलं की ती पुन्हा अद्वैतला एन्टरटेन करतेय. म्हणून ती काही बोलायला जाणार तोच निमानं तिच्या मांडीवर थोपटलं. " गौरा चहा घेतेस ना! " " अं, हो! " ती निमाच्या आवाजानं मोबाईलच्या व्हर्च्युअल जगातून वास्तवात आली. चहा घेता घेता नेहानं विचारायचं म्हणून निमाला विचारलं, " मग ताई कसं चाललं आहे तुझं शूटिंग? " तिच्या मागोमाग लगेच गौरानंही निमाला विचारलं, " आणि ह्यावेळी तू काय वेगळं रुप घेऊन येतेयस नात्यांचं? " तिनं हळूच नजरेच्या कोपऱ्यातून भूपकडे पाहिलं. तसा तो फटकन् म्हणाला, 


" ए, टॉम अँण्ड जेरी; इथे आपण तुमच्या सिनेमाविषयी बोलायला आलोय. आमचा सिनेमा आम्ही आमच्या बेडरुममध्ये कधी रिलीज करायचा ते बघू नंतर. " आता तो तसा उचकटला म्हटल्यावर नेहा काय कमीची नव्हती. तीही लगेच फाडकन् म्हणाली त्याला, " माझं झालंय सगळं बोलून दादूस सकाळीच. या बयेचंच काय ते बघ! जळूसारखी त्या मोबाईलला चिकटून बसलीय नुसती! " तो उठून त्या उलट बोलण्याबद्दल तिला एक चांगला रट्टा द्यायच्या विचारात होता पण निम्नानं त्याचा हात धरुन ठेवला होता. ती गौराकडे वळली आणि म्हणाली, " नेहा कंट्रोल युअर सेल्फ बेटा. शांत हो. गौरा ऐकलंस ना ती काय म्हणाली ते! आता जरा मला सांग बघू हे सगळं उलगडून. तसं भूपकडून थोडंबहुत कळलंय मला पण तुझ्याकडून सांग्रसंगीत ऐकणं जास्त प्रशस्त वाटेल मला. " " थांब ताई. मी सांगते हीची माझी ओळख. " नेहानं निवेदनाचा माईक आपल्या हातात घेतला. " बारावीनंतर कॉलेज संपलं आणि मी भारत फिरण्यासाठी बाहेर पडले. मला त्या डिग्र्या घेण्यात काहीच रस नव्हता. मला फँशन डिझायनिंग करायचं हे तर पक्क होतं. तरीही आता शाळा, कॉलेज अशा चार भिंतींचा कंटाळा आला होता. आता किमान दोन वर्षं तरी मी जगाच्या मुक्त शाळेत शिकायचं असं ठरवून बाहेर पडले. आईला नव्हतंच पटलं हे! पण पप्पा मात्र खूप आनंदाने तयार झाले. या २ वर्षांत मी काय काय शिकले म्हणून सांगू? वस्त्र प्रावरणात आणि ते निवडण्यात किती विविधता आहे हे मी अनुभवलं. " " अच्छा म्हणूनच तुझ्या दुकानात भारताची प्रतिज्ञा नांदते काय? " " भूप आता मध्ये मध्ये बोललास ना तर मी एकतर तुला बाहेर काढेन नाहीतर बेडरुममध्ये लॉक करुन ठेवेन. काय परवडेल तुला? " " गप्प बसणं. मी आपला आळीमिळी गुपचिळी. " त्यानं तोंडावर बोट ठेवलं. " नेहा तू बोल गं! कसा वाटला तुला भारत? नुसतेच कपडे आणि कापडं पाहिलीस की माणसंपण अनुभवलीस? " " नो तायडू. तशी माणसं अनुभवण्याची वेळ फारशी नाही आली माझ्यावर. पण मी कापड, कपडे, त्याच्यावर आधी आणि नंतरच्या होणाऱ्या प्रक्रिया या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवल्या. लखनौमधून पुऱ्या भारत आणि जगभरात पसरलेली चिकनकारीची कला डोळ्यांच्या खाचा करुन घेणारी आहे. आता चिकनकारी सर्रास मशीनमधून


 

ोत असली तरी दर्दी माणूस हातावरच्या चिकनकारीसाठी चांगला दाम मोजायला तयार असतो. काश्मिरी कलाबूतही याच साच्यातली. हैदराबाद जसं बांगड्या आणि राजघराणी, त्यांचे शौक यासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते तिथल्या सोन्याच्या तारेत केल्या जाणाऱ्या बीडवर्कसाठीही प्रसिद्ध आहे. आसाम, हिमाचल प्रदेशातले थंडीसाठी वापरले जाणारे जाडेभरडे पायघोळ कपडे, महाराष्ट्रातलं कोकण, केरळ वगैरे किनारपट्टीच्या भागात वापरले जाणारे घाम टिपणारे सुती कपडे; असं बरंच काही अनुभवलं. त्यानंतर मी परत येऊन नवी मुंबईला फँशन डिझायनिंगसाठी नँशनल स्कूल ऑफ फँशन डिझायनिंगला अँडमिशन घेतली. बाबा नाहीच


 

म्हणत होते इतक्या लांब पण मी हट्टालाच पेटले होते. फायनली माझी तिथे अँडमिशन झाली आणि तिथंच मला हे ध्यान भेटलं. " बराच वेळ बोलल्यामुळे तिच्या घशाला पडलेली कोरड कमी करण्यासाठी तिने शेजारची पाण्याची बाटली जवळ केली. " हो. कॉलेज सुरु होऊन २ महिने झाले होते आणि त्यादिवशी आमची स्केच टेस्ट सुरु होती." नेहानं सोडलेल्या धाग्यापासून गौरानं पुढं बोलायला सुरुवात केली. " ही हिचं स्केच पुरं करुन इझलवर पेपर टाकून बाहेर गेली होती. मी तिथून जात असताना वाऱ्याने फडफडणाऱ्या त्याच्यावरच्या पेपरमुळे मला लक्षात आलं की त्या स्केचमधल्या काही रेषा नीट नव्हत्या. मी तो पेपर बाजूला करुन त्या नीट केल्या. तेवढ्यातच बाहेर गेलेली नेहा आणि एक्झामिनर राधिका मँम एकाचवेळी तिथे आल्या. त्या परिक्षेत हिला ५०/४० मिळाले. राधिका मँम जाताच चुगलीखोर चिरायूने हिला सांगितलं की माझ्या करेक्शनमुळे हिला ते मार्क मिळालेत. झालं. हिनं तिथल्या तिथं मला कडकडून मिठी मारली. मला नक्की माहित नाही त्याक्षणी मला काय झालं ते? पण तो स्पर्श मला खूप जवळचा, हवासा, खूप आश्वासक वाटला. "


 

निमा जरी मन लावून त्यांची गोष्ट ऐकत होती तरी भूप मात्र केव्हाच तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपी गेला होता. तो झोपल्याचं लक्षात आल्यावर ती गौराला म्हणाली, 

" गौरा-नेहा जर तुम्हांला काही प्रॉब्लेम नसेल तर ही गोष्ट आपण उद्याही सुरु ठेवूया का? म्हणजे उद्या मला शूटब्रेक आहे. आणि आज आपण सगळेच दमलो आहोत. " चालेल ना! दोघींनी हो म्हणून मान हलवली. तशी तिनं त्यांना बाजूची बेडरुम वापरायला सांगितली. त्या दोघी आत गेल्यावर तिनं भूपला उठवलं. " भूप ए भूप! उठ. चल आत बेडवर झोप. चल. बोक्या उठ चल. "


स्वरा...

______________________________________________

दोघींमध्ये अजून म्हणावा तसा कंम्फर्ट नव्हता आलेला. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्या हॉटेल आणि गौराचं घर सोडून कुणा दुसऱ्याच्या घरी एकाच खोलीत बसल्या होत्या. कुठून बोलायला सुरुवात करायची या विचारात असतानाच दारावर हलकीशी टकटक झाली. गौरानं पटकन् उठून दार उघडलं. 


" हां ताई!" " काही नाही गं! सांगायचं फक्त एवढंच होतं की आरामात रहा. आपलंच घर समजा. आतल्या कपाटात रमणी आणि नक्षत्राचे नाईटवेअर आहेत. ते तुम्ही बिनधास्त वापरु शकता. आणि तांब्यात पाणी आहे की नाही ते बघून घेऊन ये. झोपा आता. चला. गुडनाईट, शुभरात्री. " 

ती आत गेल्याचं पाहून गौरानं जाऊन तांब्या पाण्यानं भरुन आणून ठेवला. दार लावलं आणि कपाट उघडून आतले दोन नाईट ड्रेस काढले. एक स्वतःसाठी घेतला आणि दुसरा नेहा बसली होती तिथं शेजारी ठेवला. ती कपडे बदलून आली तरी नेहासाठी काढून ठेवलेले कपडे तिथंच होते. नेहा खिडकीजवळ उभी राहून दूर कुठेतरी बाहेर नजर लावून होती. " हे काय नेहा, कपडे का नाही बदललेस? अशीच झोपणारेस का? " गौरानं कपडे उचलून नेहाजवळ येत विचारलं. तिचा हात खांद्यावर पडला आणि नेहाचा आतापर्यंत धरुन ठेवलेला संयम सुटवा. तिनं गौराला मिठी मारली आणि हमसून हमसून रडायला लागली. तिला थोडावेळ तसंच रडू दिल्यावर तिच्या पाठीवरुन हात फिरवत गौरा म्हणाली, " येड्या पिल्ला किती रडतेस? ये बस इथं. " तिनं नेहाला बेडवर बसवलं. तांब्यातून पाणी घेऊन तिला दिलं. " घे पाणी पी. " तिचं पाणि पिऊन झाल्यावर शांतपणे तिचे डोळे पुसत म्हणाली, " कशाला एवढा त्रास करुन घेतेस? मी काहीतरी बोलले का तुला? " " तेच ते! का बोलत नाहीस तू? का माझं सगळं ऐकून घेतेस? तुला कळतं ना; मी रागवले की बेभान होते. काय बोलते ते कळत नाही मला ते! तरीही का बोलत नाहीस तू? " " चिल बेबी चिल. हे तुझं तुला कळतंय ना! मग झालं तर. मला आणखी काय हवंय. " " मला एक सांग, तू उद्या निमाताईशी काय बोलणार आहेस? " " अच्छा, तुझं खरं दुखणं हे आहे का? घाबरतेस ना तिला? " " मुळीच नाही. ते तर मी असंच विचारलं होतं. " नेहानं हळूच तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. " हं! जास्त मखलाशीपणा नकोय. तिकडे नीट बेडवर झोप. " असं म्हणून गौरानं तिला बेडवर झोपायला लावलं आणि आपणही झोपली. नेहा हळूच तिच्या कुशीत शिरली. गौरा बराच वेळ तिला थोपटत होती. 

इकडे निमा जरी झोपायला म्हणून आत गेली तरी तिला काही झोप येत नव्हती. ती नुसतीच कपाळावर हात ठेऊन छताकडे बघत नेहा आणि गौराचा विचार करत होती. ' काय गोणार या दोघींचं? कसं काय आपण दोघींना समजवू शकू? आणि घरच्यांचं काय करायचं? ते देतील का या अशा नात्याला मान्यता? शक्यता जवळजवळ नकाराच्या कठड्यावर उभी असताना तिला होकारात कशी बदलायची? बरं, बदलली तरी या नात्याचं नेमकं भविष्य काय? या आणि अशाच विचारांनी तिच्या मेंदूचा ताबा घेतला होता आणि झोपेला पार उडवून लावली होती. तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे ती या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात जंग जंग पछाडत होती. हा सगळा झांगडगुत्ता जेव्हा तिला कुठल्याच उत्तरापर्यंत नेईना तेव्हा ती उठली आणि तिनं किचनमध्ये जाऊन एक कॉफी करुन आणली. भूपला त्रास नको म्हणून तिनं गँलरीतले फ्लोअर लाईटस् ऑन केले नी तिथंच बसून ती कॉफीचे घुटके घेत पुन्हा नेहागौराच्या नात्याच्या सगळ्या बाजू तपासत होती. पण, कॉफी संपली तरी ती कुठल्याच ठोस मुद्द्यावर पोचली नव्हती. तेवढ्यात तिला तिच्या खांद्यावर भूपच्या हाताचा स्पर्श जाणवला. " काय झालं सरकार? अजून कुठल्याच निष्कर्षावर नाही पोचलात ना? " उत्तरादाखल तिनं फक्त त्याच्या हातावर थोपटलं. तसा तो तिच्याशेजारी बसला. समोरच्या गडद काळ्या होत जाणाऱ्या वातावरणाकडे बघत तो म्हणाला, 


" दिवा विझताना त्याची वात मोठी होते, एखादी समस्या सुटताना तिचा अक्राळविक्राळ राक्षस होतो आणि अख्खा हत्ती दारातून पार झाल्यावर त्याचं अडकलेलं शेपूट आपल्या नाकी नऊ आणतं. " " अरे किती कोड्यात बोलतोस भूप? काय ते स्पष्ट सांग ना! " " ही बघ. ती समोरची पूर्व दिशा किती अंधारलीय बघितलंस? म्हणजे लवकरच पहाट होईल याचा हा संकेत आहे. तू काही काळजी करु नकोस. तू जिचा अगदी खोलात शिरुन धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतेयस ना! त्याचं उत्तर मी शोधू ठेवलंय. " " तुझ्याकडे उपाय होता तर मग तू त्यांना इथे का घेऊन आलास? " तिनं आपसूकच प्रश्न विचारला. " त्याचं काय आहे ना! त्यांच्या नात्यात आत्ता जो गैरसमज ठिय्या मांडून बसलाय; त्याला मोडीत काढण्याचं काम तुझ्यापेक्षा चांगलं कुणीही नाही करु शकत. म्हणून आणलंय त्यांना इथे. " " आणि या समस्येचं सोल्यूशन काय काढलंत म्हणे तुम्ही? " " फार काही नाही करणारे मी. येत्या काही दिवसात मी माझे बंगलोरचे क्लायंट मिस्टर अनिमेष संघवींच्सा मदतीनं नेहाला गौरासोबत बंगलोरला हलवेन. तिथं तिच्यासाठी एक चांगला टू बीएच के बघून ठेवेन आणि दुकानासाठी मोक्याच्या ठिकाणी १००० स्क्वेअर फूटचा गाळा बघून ठेवेन. ह्या दोघी तिथं जाण्याआधी तिथल्या घर दुकान दोन्हीचं अन्वयदा आणि श्रावणीताईकडून छान इंटेरिअर करुन घेईन. सगळी तयारी झाली की ह्या दोघींचं पार्सल नेऊन तिकडे टाकू. इथलं दुकान निहारिका सांभाळेल. कँन्डल वर्कशॉपसाठी एक चांगला मँनेजर शोधू. बस्स आईशी बोलण्याचं महत्वाचं काम करण्याची हिंमत तू तिला दे म्हणजे झालं. अजूनही आईनं मुलगा शोधला नाहीए. तिनं कुणी मुलगा शोधण्याआधीच नेहानं घरातला हा लग्नाचा गोंधळं चेक अँन्ड मेट करायला हवाय. " ती थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली.         ' किती खोलात जाऊन स्टेप बाय स्टेप विचार करतोय हा. त्या मधल्या १० वर्षांनी ह्या उधळ्या घोड्याला किती समंजस, विचारी बनवलाय. बरं झालं जे झालं ते! नाहीतर हा तसाच अवखळ राहिला असता. ' ती विचारात बुडलेली आणि अचानकच तिला चेहऱ्यावर पाण्याचे तुषार पडलेले जाणवले. 


" अशा थंडीत पाऊस? " " नाही मीच तुला विचारातून जागी करण्यासाठी पाणी शिंपडलं. " तो लहान मुलासारखा हसत म्हणाली. ' उफ्फ! मी आत्ताच ह्या डोम्याला विचारीबिचारी म्हटलं होतं ना! ' ती मनातच पुटपुटली. " काही म्हणालीस का? " त्यानं तिला उठवून तिचे हात आपल्या पोटाशी धरुन तिला ओढत आत आणत म्हणाला. " नाही रे!... " पण तिचं वाक्य पुर्ण होण्याआधीच त्यानं तिला बेडवर पाडलं होतं आणि तिच्या तळव्यांना भूपच्या ओठांच्या ओलसर मऊ स्पर्शांनं गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. शरीरावर रोमांच फुलत होते आणि मनाला नवेनवे धुमारे फुटत होते. आता या दोघांची रात्र उजळवण्याची तयारी चालू होती आणि बाहेर भास्करबुवा जगाला उजळवण्यासाठी चंद्राच्या डीमलाईटचं कनेक्शन फुल लाईटला जोडण्याच्या कामगिरीवर रुजू झाले होते.


स्वरा...

______________________________________________

आज सकाळीच नेहानं निमाच्या किचनचा ताबा घेतला. तिनं छान चहा बनवला तर गौरानं सगळ्यांसाठी चिली-चीज-बटर-गार्लिक ब्रेड बनवला. त्या ब्रेडच्या खमंग वासानं नुकत्याच झोपलेल्या भूपची झोप चाळवली. 'अरे यार, का ही लोकं सकाळ सकाळी इतके खमंग पदार्थ बनवतात? श्शी! मला अजून झोपायचं होतं. पण, आता ह्या वासाने माझ्या पोटाने झोपेशी असहकार पुकारला त्याचं काय करु? ' तो वैतागतच उठून बाथरुममध्ये गेला. निम्ना सवयीप्रमाणे पहाटे उठून तिची योगासनं, प्राणायाम सगळं आटपून बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत चहाचे घोट घेत होती. नेहा आणि गौरानं चहा नाश्त्याचा सगळा सरंजाम हॉलमध्ये आणून मांडला. तेवढ्यात तयार होऊन भूपसुद्धा आलाच. " निमू, तुला तुझ्या पोटाची नसली तरी जरा माझ्या पोटाची काळजी करायचीस ना गं! " " का? मी काय केलं? " पेपरवरची नजर न हलवता तिनं विचारलं. " अगं ह्या दोन शिंपिणींना कुठे किचनमध्ये पाठवलंस? " त्यानं ब्रेडचा तुकडा मोडून खात विचारलं. " ए, मग खाऊ नकोस तू. ठेव तो ब्रेड आधी खाली. आणि जा तुझ्या त्या अँडीच्या हातची उकडलेली अंडी खा जा. " तो ब्रेडचा आणखी एक तुकडा तोडायला जाणार तोवरच नेहानं तो त्याच्या हातून हिसकावून घेतला. " अरे, ए ! अरे माझा ब्रेड. निमा यार तू तरी बोल ना काही. भूक लागलीय मला. " त्यानं तो तिच्याकडून परत मिळवायचे प्रयत्न सुरु केले. " दादूस, तू दुसरा घे ना! मी बनवलेत जास्त. " गौरानं त्या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. " गौरा, अगं ह्यांची ही पत्त्याच्या बंगल्याची भांडणं आहेत. शांत रहा आणि तुझा तू नाश्ता कर. हे दोघे उंदीर भांडतील भांडतील आणि मग तुझ्या गळां माझ्या गळां करतील. तू नको लक्ष देऊस. " निमानं असं म्हटल्यावर नेहानं गुमान हातातला ब्रेडचा तुकडा सोडून दिला. " जा. जा. इस बारी तुझे माफ किया। अगली बारी पंगा लिया तो मुझसा बुरा कोई नहीं।" नेहानं मिळालेल्या चान्सचा उपयोग करुन डायलॉग चिकटवून टाकला. त्यांचा हसत खेळत नाश्ता चालला होता; तितक्यात दार उघडून अम्मा आत आली. " अय्यो... तुम्म गया नहीं जी? " निमाला तिथं बघून तिनं विचारलं. " नई हमको आज्ज छुट्टी जी। आओ नाश्ता करो। " " ह्यँ..." अम्मानं तोंड वेडंवाकडं केलं. " अम्म नाश्ता करके आया जी... इड्डली... ये ब्रेडवेड अम्म नई खाता जी। " गौरानं तिच्या साऊथ इंडियन हिंदीचा आधार घेत म्हटलं, " अय्यो अम्मा चाय तो पियेंगी ना? " " अय्यो, तुम्म मेरा नकल काय कू करता जी... " अम्मा चिडली. " अम्मा. अपना बच्चाय वो छोड दो। आओ चाय पियो फिर काम करो। " तिच्या प्रेमाने सांगण्याने अम्मा तिथंच फतकल मारुन बसली. नेहाचा चुळबुळा स्वभाव काही तिला गप्प बसू देईना. " अम्मा, आप मुंबई में कब सें हो? " " अय्यो मेरा जनम यई का ज्जी। " " तो फिर आपको मराठी आता होगा ना। " " ऐसा कैसा जी? अम्म को आता जी। मर्राटी..." " मग बोलत नाही का तुमी? " " बोलतो की वो मी मर्राटी. ते बाजूचं देशपांडे काकू होतं ना! आदी मी त्येंच्याकडं होतं बगा कामाला. ते लै वर्सं होतं बगा हिथं ऱ्हायला. आता ते गेलंय बगा बदलून. त्यांचं पोरगं तिकडंच ऱ्हातंय बगा अमरिकेला. ते जायच्या आदी ह्ये मेडम भेटलं बगा मला. हिथं बी लै वर्सं जाली मला ऱ्हावून बगा. समदी कामं करतं की वो मी हिथं. सैपाक करतं, बांडी गासतं, कापडं दुतं. जाल्लंच तर ते केरफरशी सगळंच करतंय बगा... "


 अ

्माची राजधानी एक्सप्रेस काही थांबायचं नाव घेईना म्हटल्यावर निमा पेपरातलं डोकं वर उचलून त्यांना म्हणाली, 


" अम्मा, मला दुपारी जायचंय बाहेर. जरा कामं आटपून घेता प्लीज. " " होय की. ते कामंच करायला आलो बगा मी. "

 अम्मा आपला अवजड देह आणि भांडी एकत्रच घेऊन गेल्या. " ही आपल्या बँनीचा साऊथ इंडियन अवतार आहे ना! " गौरानं नेहाला टाळी दिली. " नुसत्या टाळ्याच देणार आहात की कालच्या रामायणाचं उत्तरकांडपण ऐकवणार आहात? " निम्नानं हातातला पेपर होता तसा घडी करुन टिपॉयवर ठेवत आपला चष्माही काढून त्यावर ठेवला आणि मोर्चा या दुकलीकडं वळवला. तसा सोफ्यावर डोळे मिटून पडलेल्या भूपनं डोळे किलकिले करत म्हटलं, " नको ना बाई तेच परत चालू करुस. मला तोंडपाठ आहे यांची आटपाटनगराची कहाणी. " " मग तू वाचतोस का त्याची फलश्रुती? " तिच्यातला डिक्टेटर जागा झाला म्हटल्यावर भूपनं तिथून काढता पाय घेतला. " तुझी तूच ऐक. मी आत लँपीवर माझं काम करतोय. " " चला आपण बाहेर गँलरीत बसू. " ती आधीच जाऊन बाहेर बसली. त्याही आल्या तशी ती म्हणाली, " हं! सांगा आता तुम्ही फायनली या स्टेपला कशा पोचलात की जिना सिर्फ तेरे संग." " तायडे, खरं सांगायचं तर मी नाही सांगू शकत की आम्ही या निर्णयावर कधी पोचलो ते! तो एक बेसावध क्षण होता. ज्याक्षणी आम्हांला कळलं की आम्ही मन आणि शरीर दोन्ही बाजूंनी एकमेकींच्या झालो. आता दोघींमध्ये वेगळेपण नाही. तेव्हाच सोबत राहणं पक्कं झालं. त्यानंतर कधीच आम्ही एकेकटे राहण्याचा विचार नाही केला. गेली ७ वर्षं आम्ही सोबत आहोत. हिचं माहीत नाही मला पण माझ्या मनात मात्र हिच्यापासून वेगळं होण्याचा विचार कधीच डोकावला नाही. हिलाच अधूनमधून इनसिक्यूरिटीचं फेफरं येतं. मध्ये एकदा स्टँलिनवरुन माझ्याशी भांडली होती. तो तर इथलाही नव्हता. बिचारा महिन्याभरासाठी भारतात आलेला. चिरायूचा मित्र. त्यानं गळ घातली म्हणून त्यांच्यासोबत १५-२० दिवसांसाठी महाराष्ट्र भ्रमंतीवर गेले मी. खरंतर तो हिलाही ये म्हणाला होता. पण, दुकान कोण बघणार? म्हणून नाही आली ही. कारण तेव्हा निहारिका नव्हती ना! आता तिच्या जिवावर सोपवून येता येतंय. पण त्या भ्रमंतीवरुन हिनं काय राडे केलेत काय सांगू तुला! स्वतः कधी कुठल्या मुलाशी मैत्री करत नाही आणि मी मैत्री केली की त्याला भिंग लावून बघते ही. मनस्ताप देते नुसती मला. बरं, रागवायचे, रुसायचे सगळे हक्क ह्या बाईसाहेबांचेच हं! आम्ही जसे काही त्या संचातले नाहीच. वरनं यांनी सॉरी म्हटलं की मोठ्या मनानं माफ आम्हीच करायचं. का? माफी देण्याचा मक्ता घेतलाय मी? नातं फक्त मला एकटीलाच हवंय? हिचं काही कर्तव्य नाहीए का त्या नात्याबाबत? कर तायडे हिचं काहीतरी कर. अद्वैत आणि माझी मैत्रीच आहे; फक्त मैत्री. हिला दरवेळी असं का वाटतं की मी हिला सोडून जाईन? हिचा विश्वास नाहीए का माझ्यावर? आणि ज्या नात्यात विश्वासच नाहीए त्या नात्यात गुरफटण्यात काय अर्थ आहे तूच सांग मला? मला जायचंच होतं तर अद्वैतनं विचारलं तेव्हाच त्याला हो म्हटलं नसतं का मी? तो माझी वाट बघतो म्हणाला तेव्हाही त्याला वाटेला का लावलं मी; तू फक्त मित्रच आहेस म्हणून? हिच्यासाठी ना! मग हिने थोडासा माझ्यावर विश्वास ठेवावा असं मी म्हटलं तर काय मोठा गुन्हा केला गं? " गौरा चांगलीच भडकली होती. काय काय आणि केव्हापासूनचं मनात साठवून ठेवलेलं भडभडून बोलत सुटली होती. तिचं ते सगळं बोलणं ऐकून निम्नाच्या लक्षात आलं की नेहा खूपच इनसिक्यूअर पर्सन आहे. तिला आधी तिच्या ह्या असुरक्षिततेच्या भावनेतून बाहेर काढलं पाहिजे. तिनं खूप सावधपणे नेहाला विचारलं, " तुला काय म्हणायचंय यावर नेहा? " आधी तर ती काहीच बोलली नाही. निमानं तिला परत विचारलं, " काय झालं नेहा? तुझ्याकडे बोलायला काही नाहीए की गौराचे सगळे आरोप तुला मान्य आहेत? " " ताई! " शेवटी एकदाचं नेहानं मौन सोडलं. " गौरा सांगतेय ते सगळं खरंय. स्टँलिनच्या वेळीही मला ती सोडून जाईल याची भिती वाटली होती आणि आता अद्वैतच्या वेळीही. मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करते पण नाही माझा माझ्या रागावर ताबा राहत. मला एकटं पडायची भिती वाटते. आणि मला अजिबात एकटं रहायचं नाहीए. त्यात दादूसचं एकटेपण बघून तर मला त्याची आणखीनच भिती वाटायला लागलीय. " तिच्या ह्या वाक्यानं निम्नापण मनातून चरकली. " माझ्यात नाहीएत दादूसएवढे पेशन्स. त्याने तुझी खूप वाट पाहिलीय गं ताई! वेड्यासारखा तुला शोधत फिरलाय तो. दिवस दिवस त्याचं तोंड दाखवलं नाहीए त्याने घरातल्यांना. हे असलं काही माझ्याच्याने नाही सहन होणार. मी मरुन जाईन. ही मला सोडून बिडून गेली तर मी संपवून टाकेन स्वतःला. " हळूहळू बोलणाऱ्या नेहाचा आवाज आता तारस्वरात बदलला होता. 


" नेहा, नेहा. शांत हो. मी आहे की नाही? मी नाही जाणार तुला सोडून कुठेही. आय प्रॉमिस डिअर. शांत हो. " दोघीही तिला आपापल्या परीनं समजावत होत्या. नेहा मात्र कंट्रोल करण्याच्या पार गेली होती. बाहेरचा गोंधळ आत काम करणाऱ्या भूपच्या कानांवर पडला आणि ताडकन् तो हातातलं काम सोडून बाहेर आला. एका झटक्यात त्याच्या लक्षात आलं काय झालंय ते! त्याला एकट्यालाच ह्याच्यावरता रामबाण उपाय माहीत होता. नेहा दोन मुलांच्या पाठीवरची एकुलती एक मुलगी; त्यामुळे तिचे आई-बाबा आणि दोन्ही भावांकडून खूप लाड झाले. ती मागेल ती गोष्ट मिळायची. ती म्हणेल ती पूर्वदिशा असायची. ती कायम कुणा ना कुणाच्या संरक्षक कवचाखाली राहिली. कधी एकट्याने कुठली गोष्ट करावी लागली नाही तिला. थोरला असूनही कधी अंकितनं तिच्यावर हात उचलला नाही की कधी तिच्यावर चिडचिड केली नाही. त्याबाबतीत तो आणि बाबा सेम सेम होते. नेहा तर बाबांचा लाडोबा होती. त्यामुळे जेव्हा कधी गोष्टी तिला हव्या तशा होत नसत तेव्हा ती राग, आदळआपट, आक्रस्ताळेपणा करुन गोष्टी आपल्याला हव्या तशा करवून घेई. मात्र आई आणि भूप ह्या दोघांची तिला नेहमीच भिती असे. तिचे हे सगळे डावपेच फक्त अंकित आणि बाबांमुळेच सफल होत असतं. लहानपणी तिच्या अशाच वागण्यासाठी आईनं तिला चौदावं रत्न दाखवलं होतं. तो धसका तिच्या मनात कायम होता. त्यात अकरावीला असताना तिनं व्यायामानं धट्टाकट्टा झालेल्या भूपचाही असाच रट्टा खाल्ला होता. तोही तीच्या चांगलाच लक्षात होता. आताही जसा भूपचा जरबेचा आवाज कानावर पडला तसा तिथे टाचणीचापण आवाज ऐकू येईल अशी शांतता पसरली. मात्र त्या आवाजानं भितीनं अम्मांच्या हातून पडलेल्या डिशचा चक्काचूर झाला. 


" काय चाललंय नेहा? ही सगळी नाटकं एका मिनिटात बंद झाली पाहिजेत कळलं ना! आणि काय म्हणालीस मरायचंय तुला? संपवणार आहेस का स्वतःला? जा मग मार उडी खाली. तशीही तू १३ व्या मजल्यावर आहेस. ही एक चांगली संधी आहे. " " भूप. अरे..." नीम्ना पुढे काही बोलायच्या आतच तिचं बोलणं तोडत त्याचा हात वर आला. " ऐकू येतंय का नेहा? काय म्हणतोय मी? जा मार उडी. " नेहा मात्र थिजल्यासारखी एका ठिकाणी बसून राहिली. त्याच जरबेत त्याचा आवाज पुन्हा गरजला, " अम्मा एक ग्लास पाणी आणा. " अम्मा आपलं भलंथोरलं पोट सांभाळत थरथरत्या हातानं पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. " हं! गौरा हे घे. दे तिला. पाणी पी नेहा आणि आता मला अजिबात आवाज नकोय. निमू काय सांगते ते सगळं नीट ऐकायचं. त्याच्या अंमल करायचा. थांब मीच बसतो इथे. " तो आत गेला आणि गेल्या पावली लँपटॉप घेऊन परत आला. " निमा बोल तू. मी आहे इथेच. बघतो हिच्यात कुठला संचार येतोय ते! " " नेहा, सगळ्यात पहिली, शेवटची पण महत्वाची गोष्ट; गौरा तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि तू कधीच एकटी नाही राहणार. आम्ही सगळे तुझ्यासोबत नेहमीच असणार. " " अगदी बरोबर बोलतेय ताई. " गौरानं निम्नाच्या बोलण्याला दुजोरा दिला. " आता ऐक. तू डॉ. भास्कर भागवतांचं नाव ऐकलंस की नाही मला माहीत नाही; पण ते एक खूप चांगले हिप्नॉटिस्ट आहेत. आपण तुझ्या ह्या एकटेपणाच्या भितीवर त्यांच्याकडून उपाय करुन घेऊ. आपल्याकडे अजून चांगले दोन महिने आहेत. " " का? दोन महिन्यांनी काय होणारे? " नेहानं तिचं आश्चर्य अजिबात लपवलं नाही. निम्ना पुढं काही सांगणार इतक्यात लँपी बाजूला ठेवत भूप म्हणाला, " तुला कायमची विदा करणारे मुंबईतून बंगळुरुला. माझे एक क्लाएंट आहेत तिथे प्रमिथेश संघवी. त्यांच्याशी बोलणं झालंय माझं. ते तुझ्या आणि गौरासाठी तिथं एक ड्युफ्लेक्स फ्लँट शोधतील आणि दुकानासाठी १००० चौरस फुटांचा गाळा शोधतील मोक्याच्या जागी. इथल्या दुकानाची जबाबदारी निहारिकावर सोड. तुझ्या मेणबत्तीच्या वर्कशॉपसाठी एक चांगला मँनेजर शोधतोय मी. तुझ्या घर आणि दुकानाच्या इंटेरिअरबद्दल अन्वयदा आणि श्रावणीताईशी बोलून घ्या. राहिली गोष्ट तू घातलेल्या लग्नाच्या सावळ्या गोंधळाची; तर ते तुझं तू ठरव की आईला तू काय आणि कसं समजवणार ते! तुझं आणि गौराचं मिळून पुढचं आयुष्य कसं प्लँन करायचं हाही पुन्हा तुमचाच प्रश्न. निमू चल आपण जरा शॉपिंगला जाऊ. यांना राहू दे इथंच. "

त्या दोघींना एकंदरीत सगळा विचार करायला तिथेच सोडून भूप आणि निम्ना शॉपिंग, सिनेमा, भटकंती अशा भरगच्च कार्यक्रमासाठी निघून गेले. 

स्वरा....

______________________________________________

आज ती तिसऱ्यांदा नेहाच्या निमित्ताने स्विकृत-मग्नला येत होती. तिला इथलं शांत वातावरण आवडायचं. स्विकृतच्या ओपीडीत नेहमीच किमान ३-४ जण तरी असायचेच. ही ओपीडी अनेक गोष्टींनी भरलेली होती. त्या गोष्टी खूपच आकर्षक होत्या. चारपैकी एक भिंत अनेक मंत्रांनी भरलेली होती. ते अस्ताव्यस्तपणे त्या भिंतीवर ठाण मांडून कुणी त्यातली ऊर्जा शोधण्याचा प्रयत्न करतोय का ते पाहत होते. बरोबर समोरच्या भिंतीवर वेगवेगळ्या आज्ञार्थी स्वयंसूचना विसावल्या होत्या. एका भिंतीवर डोळ्यांना आणि मेंदूला गुंगारा देणारी वेगळीवेगळी कोडी होती तर तिच्या समोरच्याच भिंतीवर खूप सारे एकात एक गुंतलेले भौमितिक आकार काढलेले होते. ही कोडी सोडवणं, मंत्रातली ऊर्जा शोधणं, स्वयंसूचनांचा अभ्यास करणं आणि भौमितिक आकारांची सांगड घालणं तिला तिच्या पहिल्याच भेटीत आवडलं होतं; जेव्हा ती रमणीच्या ओळखीतून हिप्नॉटिझम या विषयावर डॉक्युमेंन्ट्री करायला इथे आली होती. तेव्हा तिच्या मनामेंदूतही नव्हतं की कधीकाळी तिला तिच्या जवळच्या माणसासाठी इथं यावं लागेल. इथली आणखी एक गोष्ट तिला आवडायची. ती म्हणजे ओपीडीच्या दारातून आत गेलं की एक मोकळीढाकळी खोली होती. त्या खोलीच्या बरोबर मध्यात एक वर्तुळ होतं; ज्या भवताली नक्षीदार सळया लावून बंदिस्त केलं होतं. ती खोली साऊंडप्रूफ होती. तिथे बोलला जाणारा प्रत्येक शब्द हा फक्त आणि फक्त तिथे उपचार करुन घेण्यासाठी येणाऱ्या माणसालाच ऐकू येई. त्या बंदिस्त सळ्यांमधला वर्तुळाचा तो भाग पुर्ण उघडा होता. त्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. या पायऱ्यांनी खाली गेलं की खाली एकाला एक लागून तीन हॉल होते. प्रत्येकात जाण्यासाठी वेगळा दरवाजा होता. पहिला भाग हा खास हिप्नाटिझमच्या सेशनसाठी होता. दुसऱ्या भागात लेखन सराव घेतला जाई; जो पुढच्या आयुष्यात जीवनपुरक विचार करण्यासाठी उपयोगी पडे आणि तिसरा आणि शेवटचा हॉल हा ध्यानधारणेसाठी वापरला जाई. आज नेहाचं आठवं सेशन होतं. ती नेहासोबत दुसऱ्यांदा इथे आली होती आज. आज नेहा हिप्नॉटिक होऊन त्यातून पुन्हा जागी झाली की तिला ध्यानधारणेच्या हॉलमध्ये नेणार होते. गेल्या बऱ्याच सेशनमध्ये ती दुसऱ्या हॉलमध्ये लेखन सरावासाठी बसत होती. तिला तिच्या मोबाईलमध्ये काही बायन्यूरल बिटस् देण्यात आल्या होत्या ऐकण्यासाठी ज्या डॉक्टरांनी खास संस्कृत स्तोत्रांच्या आधाराने बनवल्या होत्या. या बिटस् चं वैशिष्ठ्य म्हणजे त्यातले ठराविक सुरात उच्चारले जाणारे मंत्र हे मेंदूच्या विशिष्ट भागावर विशिष्ट परिणाम करत होते. त्यातही नेहाला देण्यात आलेले बिटस् हे काही पुरक हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी होते त्यामुळे तिची एकटेपणाची भिती कमी होत होती. आता तीचं आणि गौराचं नातं छान व्हायला लागलं होतं. आज ती नेहमीसारखी नेहाच्या बाहेर येण्याची वाट बघत बाहेर ओपीडीत बसून होती. तेवढ्यात तिच्या फोनवर भूपचा नंबर ब्लिंक होताना दिसला. तशी ती पटकन् बाहेर आली आणि तिने कॉल रिसीव्ह केला.



" हँलो,

हं भूप बोल. "




" निम

ू... निमू... सुगमाला अँडमीट केलंय. "




" क

ा? काय झालं तिला? " 




"

अजून तरी नेमकं काय ते कळलं नाहीए. दुपारी अचानकच तिच्या पोटात दुखायला लागलं. खूपच जास्त त्रास व्हायला लागल्यावर तिच्या गायनँक शर्मिलांनी सांगितल्याप्रमाणे तिला अँडमिट केलंय आम्ही. तुला येणं शक्य आहे का? प्लीज ये ना. "


" भूप, यू आर अ ब्रेव्ह बॉय डिअर. असा घाबरून नको जाऊ. सुगमाला काही होणार नाही. आपण तिला काही होऊ देणार नाही. थोड्या वेळात नेहाचं सेशन आटपेल आम्ही पोचतोच आहोत तिथे. "

त्याला कसंबसं समजवून तिनं फोन कट केला. तिचं नशीब चांगलं होतं. ती ओपीडीत आली तर नेहा तिचं सेशन आटपून बाहेर आली होती. ती तिला पटकन् समोरची सगळी परिस्थिती सांगितली. नेहा आणि ती सुसाट वेगाने अरुंधती गायनो सेंटरला पोचल्या. सुदैवानं रविवार असल्यानं त्यांना ट्रँफिकचा सामना करावा लागला नाही. त्या सेंटरला पोचल्या तेव्हा मिथिल आणि भूप दोघेही बाहेर रिसेप्शनलाच बसलेले दिसले त्यांना. निम्नाला बघितल्यावर मिथिलचा बांधच फुटला. तो तिला मिठी मारुन एकदम रडायलाच लागला. ती त्याला तिच्यापरीने समजावत होती. " निमा, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत यार. गेली कितीतरी वर्षं माझ्या जगण्याचा, असण्याचा भाग आहे ती. आणि आता तर माझं बाळंही आहे तिच्यासोबत. मला ती हवीय यार हवीय मला ती. मला तिच्यासोबतीनं म्हातारं व्हायचंय. " अशा परिस्थितीतही निमाला ते ऐकून हसायला आलं. तो थोडा नॉर्मलला आल्यावर ती म्हणाली, " मिथू आता मला नीट सांग बरं नेमकं काय घडलं ते!" " ती आधीपासूनच थोडी अँनिमीक आहे; म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच. त्यामुळे तिला ब्लड डोनेट वगैरे नाहीच करता येत. त्यात ती सतत काळजी करत असते. कधी माझी तर कधी भूप्याची. काहीच नसलं तर दामिनी इलेक्ट्रोची तरी असतेच तिला काळजी. गंध्याला त्याची बायको आहे म्हणते काळजी घेण्यासाठी आणि तुझ्यासाठी मी आहे पण भूपला कोण बघेल म्हणून येताजाता याच्यासाठी त्रस्त होते ती. " निमानं हळूच भूपकडं पाहिलं. त्याचे डोळे अजूनही वाहतच होते. तिला नव्हतं माहीत की हा एवढा हळवा आहे ते! मिथिल पुढे सांगत होता, " तरी आपल्या अँन्डीनं तिला सांगितलं होतं की तुझ्या पत्रिकेत पंडुरोगाचे योग आहेत शिवाय तुला गरोदरपणात तुझी खूप काळजी घ्यावी लागेल. म्हणून मग वर्षा मँडमच्या सतत संपर्कात होती ती; जेव्हापासून कळलं की ती प्रेग्नंट आहे. आज तसाही सुट्टीचा दिवस त्यामुळे सिनेमाला जायचं ठरलं आमचं. तिच्या आवडत्या हृतिक रोशनचा बँगबँग बघायला चाललो होतो. सगळं काही छान आलबेल होतं. गाडीत मस्त गप्पा मारता मारता अचानकच तिला पोटात दुखायला लागलं; मी सरळ सिनेमाचा बेत रद्द करुन गाडी इथे आणली. येतानाच भूपला फोन केला तर तो आज ऑफिसलाच होता. तसाच उठून धावत आला इथे. " " गंधर्वला कळवलंस का? " तिचा प्रश्न संपलाच होता तेवढ्यात तिला घाईघाईत समोरून येणारे गंधर्व आणि रम्या दिसले. गंधर्वनं आल्या आल्याच निमाला हाताला धरुन बाजूला नेलं. निमाच्या जागेवर आता रम्या बसली होती मिथिलचे हात हातात घेऊन. " ऐक निमा, मी येताना अँन्डीशी बोललोय. तो म्हणालाय मला की तिला सध्या गडांतर योग आहे चालू. मी येतानाच माझ्या गुरुजींना महामृत्यूंजय याग करायला सांगून आलोय. ती वाचली पाहिजे. बस्स! मला आणखी काही नकोय. मी मिथ्याला माझ्या नजरेसमोर उध्वस्त होताना नाही बघू शकत गं! नाही बघू शकत. " तो खूप पोटतिडकीनं बोलत होता. " हे बघ गंधर्व, तुझ्या या सगळ्या उपायांनी घटना आपण फार तर लांबवू शकू; पण तिचा मृत्यू आताच लिहिला असेल तर आपण तो थांबवू नाही शकणार. तेव्हा किमान तुला मला तरी काळीज दगडाचं करण्याशिवाय इतर कुठला पर्याय मला समोर दिसत नाहीए. " एवढ्या अडचणीच्या वेळीही तिचा धरबंध खूपच स्थिर होता. ते बोलतच होते तेवढ्यात नर्सने येऊन मिथिलला डॉक्टरांनी बोलवल्याचं सांगितलं. त्याच्या मागोमाग बाकीचेही आलेच. पण डॉक्टरांच्या केबिनमध्ये मात्र निमा एकटीच त्याच्यासोबत गेली. " हे बघ मिथिल, आपण आपल्यापरीनं सगळे प्रयत्न करु. कुठेही उपचारात काही कमी नाही पडू देणार पण प्लीज बी प्रिपेअर फॉर एनीथिंग हँपन. ती आधीच अँनिमिक होती. त्यात आता तिचे प्लेटलेटस् ही कमी झालेत. कदाचित तिने तिच्या मॉर्निंग सिकनेसकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या परिस्थितीत पोचलीय ती. " " पण डॉक्टर तुम्ही दिलेली गोळ्या औषधं सगळं तर व्यवस्थित चालू होतं. मी स्वतः तिच्या जेवण्याखाण्याची विशेष काळजी घेत होतो. गेल्या ६ महिन्यात मी एकही आऊटडोर प्लँन नाही केला कारण मला तिची काळजी आहे. " " येस मिथिल. आय कँन अंडरस्टँन्ड व्हॉट यू फिल नाऊ. पण कधी कधी खूप काळजी करुनही घडणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. मी आताच्या परिस्थितीत फक्त एवढंच सांगेन की तिला अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवणं मस्ट आहे. आता तिला ऑक्सिजनवर ठेवलं असलं तरी तो काही कंटिन्यू लागणार नाही. मात्र तिच्या प्लेटलेटस् कडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे. जराशी हलगर्जी आणि आपण करत असलेल्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडेल. मी तर म्हणेन की पुढचे तीन महीने डिलीव्हरी होईपर्यंत तरी तिला इथेच हॉस्पिटलमध्ये असू दे. विल डू अवर बेस्ट. "


 मिथिलच्या वतीनं निमाचं म्हणाली, " डॉक्टर तुम्हांला जे योग्य वाटेल ते करा. आय नो यु आर नॉट गॉड टू मेक अ मिरँकल बट द टाईम यू आर नॉट लेस दँन गॉड फॉर अस. " तेवढ्यात पुन्हा एका नर्सने केबिनमध्ये येऊन सुगमा शुद्धीवर आल्याचं सांगितलं. तिघेही तात्काळ आयसीयूकडे निघाले. तिथे आधीच गंधर्व, नेहा आणि भूप पोचले होते. डॉक्टर वर्षा आत गेल्या. त्यांनी सुगमाचं व्यवस्थित अँन्यालिसिस केलं. आता तिचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवला होता. त्या दोघांना तिथं बघून तिच्या मलूल चेहऱ्यावर हसू पसरलं. बारिक झालेल्या आवाजात ती म्हणाली, 


" अरे, किती काळजी करता? आय अँम अँबसोल्यूटली ऑलराईट यार. आताही पार्टीत नाचायला तयार आहे मी. " गंधर्व तिच्या शेजारी बसला. तिचा सुया खुपसलेला हात हलकेच हातात घेतला. " यस डिअर, तू इथून बाहेर आलीस की 

लग्गेच आपण इथल्या कॉरिडोअरमध्ये पार्टी करु. तू, मी,रम्या, मिथ्या, भूप्या, निमू आणि तुमचं बाळपण. पण काय गं ही वाढीव ढेरी घेऊन तू काय डान्स करणार? कोळी की शेतकरी? हां, हा, त्यात जास्त हलायचं नसतं ना! नाहीतर तू नाचायचीस आणि कळायचंच नाही कधी डिलीव्हरी झाली ते! " गंधर्व त्याला जमेल तसं सुगमाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. गंधर्वचं जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा निमा मात्र सुगमाची प्रेग्नसी आणि बाकीच्या बाबतीत बोलत होती. " डॉक्टर, किती चान्सेस आहेत सुगमा आणि तिच्या बाळाला वाचवण्याचे? नेमका काय प्रॉब्लेम झालाय? " " ये आपण केबिनमध्ये बसून बोलू सविस्तर. " ती वर्षा मँडमच्या मागोमाग निघून गेली. बाकी सगळे सुगमा कशी खुष राहिल ते बघत होते. " बैस. काय आहे निमा की आशा माणसाची खूप जवळती मैत्रिण आहे. तिच्याच आधारावर तो सगळं आयुष्य जगतो. आपल्या सुगमाच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. आपण आशा ठेऊ की सगळं चांगलंच होणार आहे म्हणून. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. बाकी सगळं त्या अज्ञात शक्तीवर सोडून देऊ. आता तिला झालंय काय तर खूप काही मोठं नाहीए. तिला इतर बायकांसारखाच मॉर्निंग सिकनेस होता जो प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मल गोष्ट असते. सुगमाच्या बाबतीत ही गोष्ट हायपर होती. तिला त्यासाठी उपायही सांगितले होते. आणि होतं कधीकधी असं की अगदी डिलीव्हरी पर्यंतही हा मॉर्निंग सिकनेस राहतो. एकतर ती अँनिमीक आहे. त्यात या मॉर्निंग सिकनेसमुळे तिच्या पोटात म्हणावं तेवढं अन्न जात नाहीए. परिणामी तिच्या व्हाईट प्लेटलेटस् पण कमी झाल्यात. याचा गंभीर परिणाम तिच्या गर्भावर झालाय; त्याच वजन ६ व्या महिन्यात जेवढं हवं त्यापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्यावर सुगमा आणि तिचं बाळ ह्या दोघांना वाचवण्याची दुहेरी जबाबदारी आहे. म्हणूनच मी तिला पुढचे ३ महिने अंडर ऑब्जर्व्हेशन ठेवायला सांगितलंय. आता जर तर च्या गोष्टी. या सगळ्यातून ती सुखरुप बाहेर आली तर मी तिला सेकंड चान्स न घेण्याचाच सल्ला देईन कारण त्यात ती आणि मूल दोन्ही वाचण्याचे चान्सेस आताच्या तुलनेत जवळपास ६५% कमी होतील. " " थँन्क्यू सो मच डॉक्टर. आम्ही सा सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेऊ आणि तुम्हांला कॉपरेट करु. " ती डॉक्टरांचा निरोप घेऊन बाहेर आली आणि थेट आयसीयूमध्ये सुगमाला ठेवलं होतं तिथं गेली. " काय मँडम आमच्या साध्या पोराला किती घाबरवून सोडलंत तुम्ही? बिचारा पार भांबावून गेला ना! आता याची शिक्षाच करते तुम्हांला; काय मिथू? " तिनं सुगमाच्या शेजारी बसलेल्या मिथिलच्या खांद्यावर थोपटलं. तिला बघून सुगमाच्या डोळ्यांत चमक आली. तिनं क्षीण आवाजात हाक मारली, " निमा बस ना इथं. " तसा मिथिल तिथनं उठला आणि त्याच्या जागेवर निमा बसली. तिनं हलकेच सुगमाच्या डोक्यावरुन हात फिरवला. सुगमाला बोलताना त्रास होत होता तरी ती म्हणाली, " तुम्ही सगळे बाहेर जा. मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. " सगळे त्यांना सोडून बाहेर गेले. " काय झालं राजा? " " निमा माझ्या हातात खूप कमी वेळ आहे. जगले वाचले तर मिथिलसोबतच्या संसाराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. पण जर माझं काही बरं वाईट झालं तर मला वचन दे की तू माझ्या मुलाची आई होशील. " " सुगमा, असं काही होणार नाहीए. आपण प्रयत्न करतोय की नाही? " परिस्थिती माहीत असूनही निमा तिला लढण्याचं बळ देत होती. " निमू मी सगळ्याची तयारी केलीय. तू फक्त मला वचन दे. आणखी एक गोष्ट. मला मरायच्या आधी मिथिलशी लग्न करायचंय. त्याची बायको म्हणून, त्याच्या मुलाची आई म्हणून मला या जगाचा निरोप घ्यायला आवडेल. एवढी ईच्छा पूर्ण कर प्लीज. " आता मात्र निम्नाचा धीर सुटला. " काय घाई झालीय तुला मरायची? इतक्यात जायचंय आम्हांला सोडून? कशासाठी ह्या सगळ्या निरवानिरवीच्या गोष्टी करतेस? म्हटलं ना तुला की आम्ही प्रयत्न करतोय म्हणून? मग आमच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जरा पॉझिटीव्ह विचार केलास तर काही बिघडणार आहे का तुझं? हो मी सांभाळेन तुझ्या होणाऱ्या बाळाला पण मोठी आई म्हणून. तू असताना मी एवढंच करु शकेन. "


 निमाच्या शब्दागणिक सुगमाच्या डोळ्यांतून पाण्याची धार वाहत होती, तिच्या हातावरची पकड घट्ट होत होती. निमाचं बोलणं थांबलं तसं आपल्या क्षीण आवाजात ती पुन्हा म्हणाली, " तू कितीही मुलामा दिलास तरी सत्य बदलणार नाहीए. मी अँनिमीक आहे, प्लेटलेटस् कमी झालेत. वाचले तर तो नशीबाचा भाग असेल हे सगळं मी केव्हाच मान्य केलंय. तिसऱ्या महिन्यातच या सगळ्या गोष्टी वर्षा मँडमनी मला सांगितल्या होत्या. फक्त मी त्या मिथिलच्या कानावर नाही घातल्या कारण मग त्यानं मला हे मुल ठेऊच दिलं नसतं. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. आणि माझी खात्री आहे त्याला आणि माझ्या बाळाला तूच सांभाळू शकतेस. मला वचन दे तू हे करशील म्हणून. आणि भूपलाही जपून ठेव. तुझा लग्न न करण्याचा हट्ट सोडून दे. काकू आज ना उद्या बदलतील. पण तू आणि भूप दुरावलात तर भूप उन्मळून पडेल. त्याची गेल्या ५ वर्षांतली तळमळ, तगमग सारं सारं अनुभवलंय मी. डोळ्यांतल्या पाण्याला खळ पडायची नाही त्याच्या. रात्रीच्या रात्री जागून काढल्यात त्यानं तुझा विरहात. तू... मल... मला... वचन... "


 पुढे धाप लागल्यामुळे तिला काही बोलता येईना. " हो हो मी वचन देते... नर्स... तू म्हणशील तसं करेन सगळं... नर्स लवकर या प्लीज... " तोवर तिच्या आवाजाने तिथली नर्स धावत आली आणि तिने पुन्हा एकदा सुगमाच्या नाकावर ऑक्सिजन मास्क चढवला. निमा धावतच बाहेर आली. बाहेरच्या बाऱकड्यावर बसून तिनं मानेला टेकू लावला आणि अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.




स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

" दादूस मला तुझा सपोर्ट हवाय. आज संध्याकाळी मी आईशी बोलणार आहे. प्लीज बी विथ मी. यू आर माय स्ट्रॉंन्ग सपोर्टर. "

लँपीवर काम करणाऱ्या भूपच्या मोबाईलला मेसेज नोटिफिकेशन ब्लिंक झालं. नेहाचं नाव बघताच त्यानं तो मेसेज ओपन केला, वाचला आणि त्याला रिप्लाय दिला.


" डोण्ट वरी बच्चा. दादूस इज ऑलवेज बी विथ यू. तू फक्त तुझा स्टँन्ड क्लिअर कर. "

निमा तिच्या सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात होती. अजून ८ दिवसांचं एक शेड्यूल मग १०-१२ दिवसांची रेस्ट त्यानंतर एडीटिंग, डबिंग, ग्राफिक्स आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या बाकीच्या गोष्टींमध्ये ती व्यस्त होणार होती. पण तरीही तिचं सुगमाकडे काटेकोर लक्ष होतं. गंधर्व, रम्या, मिथिल, भूपच्या बारोबरीनं तिही सुगमाच्या तब्येतीची काळजी घेत होती. श्रुती आणि अंकितचं आयुष्य आता रुमझुमच्या अवतीभवती एकवटलं होतं पण तेही अधूनमधून भूपच्या सोबतीनं निम्नाकडे जात होते. मात्र या सगळ्या गोष्टींची कल्पना रंगनाथांच्या घरातल्या नेहा सोडून कुणालाच नव्हती. नेहा त्या हिप्नॉटिझमच्या सेशन्समुळे बऱ्यापैकी सावरली होती. गौरा आणि तिचं नातं आता एका नव्या टप्प्यातून जात होतं; जिथं ती गौराला पहिल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत होती. तिच्या विचार करण्याची पद्धतही बदलली होती. एकदा अनुभवासाठी गौराही तिच्यासोबतीनं तिच्या सेशनमध्ये सहभागी झाली होती. तिला ते सगळंच प्रकरण आवडलं. त्यामुळे मग तिनं बाकीच्या जमतील तेवढ्या सेशनमध्ये तिच्याबरोबर भाग घेतला. त्या दोघींची खूपदा या सगळ्यावर चर्चापण झाली. आणि या चर्चेतूनच त्यांनी पुढे बंगळूरुमध्ये जाऊन काय करायचं ते ठरवलं होतं. गौराला आई व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी खूप सारे सायन्स रिसर्च पेपर वाचून काढले. आणि या सगळ्यातून त्यांना एक आशेचा किरण दिसला. तो होता स्पर्म बँक आणि टेस्टट्यूब ट्रिटमेंट यातून बाळ जन्माला घालण्याचा. हा सगळा विषय त्यांनी निम्ना आणि भूपलापण सांगितला. त्यावर दोघांचं एकच मत पडलं की मूल जरी तुम्हां दोघींचं असलं तरी जेव्हा कधी नेहा या घरी येईल तेव्हा तिनं ते स्वतःच आहे असंच सांगावं. गौरालाही ती गोष्ट पटली कारण तिला भूपसारखा मोठा भाऊ निम्नासारखी सपोर्टीव्ह वहिनी नेहामुळेच तर मिळाल्या होत्या. आज याच सगळ्या गोष्टीवर घरात मोठं घमासान होणार होतं म्हणूनच नेहानं भूपला लवकर घरी यायला सांगितलं होतं. 


संध्याकाळी सगळं रंगनाथ कुटुंब डायनिंग हॉलला जमलं होतं. बऱ्याच दिवसांनी सगळे असे एकत्र जमले होते. पण तरीही त्यात दोन पात्र कमीच होती; भूप आणि निम्ना. भूप तसा येणारच होता, नेहाच्या सपोर्टसाठी. पण निमाच्या नावापुढे मात्र अजूनही प्रश्नचिन्हच होतं. आज कणसं चांगली मिळाली म्हणून अंकितच्या आवडीचा मक्याचा चिवडा केला होता नाश्त्याला. त्याला आवडतं म्हणून त्याच्या डिशमध्ये आईंनी बटरसुद्धा घातलं होतं. रुमझुमसाठी गव्हाच्या जाड रव्याचा मऊसूत दलिया केला होता छानसा; भरपूर तूप घालून तिला आवडतो म्हणून. शिवाय बाईसाहेबांना आता दातही यायला लागले होते म्हणून मग भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम, चारोळी यांची भरडपूडही घातली होती त्याच्यात. ती तिच्या चाकाच्या बदकू आणि बॉलसोबत सगळ्या हॉलभर फिरत होती आणि श्रुती दलियाचा वाडगा चमचा घेऊन तिच्यामागून फिरत होती. सगळ्यांचा नाश्ता चालू होता पण अजून भूपचा काहीच पत्ता नव्हता; नेहाला टेन्शन यायला लागलं होतं. तेवढ्यात रुझू पायातले पैंजण वाजवत भूकू भूकू ओरडत दाराकडे पळाली. 


" अरे माझं पिल्लू. काय करते तू? " " काकू मी तुपातला दलिया खाते. "

 मोठ्ठी कामगिरी केल्याच्या थाटात रुझूनं सांगितलं. " मग जा बरं एका जागी बसून खा हं पिल्लू! आईला केवढी धावाधाव करायला लावतेस? " " ओके काकू. " म्हणत रुझु तिच्या बदकूवर बसली. " आई तिथेच थांब मी बदकूला घेऊन आलेच. " तिनं आपल्या बदकाची चाकं श्रुतीच्या शेजारी जाऊन थांबवली. आईंच्या डोळ्यांचा इशारा समजून श्रुती भूपला म्हणाली, " नाश्ता करतोयस ना? मक्याचा चिवडा केलाय. चालेल तुला की तुझ्यासाठी करु काही दुसरं? " " नको गं! मला चालेल चिवडा. जरा फ्रेश होऊन येतोच मी. " नेहानं तो आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. आणि तो फ्रेश होऊन येईपर्यंत ती मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली. तो आला तशा आई त्याला नाश्ता द्यायसाठी उठायला लागल्या. त्यानं हाताच्या इशाऱ्यानेच आईंना बसायला सांगितलं आणि किचन कट्ट्याकडे जाऊन स्वतःच्या डिशमध्ये चिवडा वाढून घेतला. फिल्टरमधली कॉफी मगमध्ये ओतून घेऊन तो नेहाच्या शेजारी येऊन बसला. अंकितसोबत थोडं इकडचं तिकडचं बोलणं झालं. तेवढ्यातच त्यानं टेबलाखाली नेहाच्या हातावर थोपटून तिला बोलण्याचं बळ दिलं. मगातला कॉफीचा शेवटचा घोट घेऊन नेहानं आईला विचारलं, 


" तू बघितलास का कुणी मुलगा? की कुठल्या विवाह संकेतस्थळांवर माझं नाव टाकलंयस? " " अगं त्या माळव्यांच्या कुमुदच्या ओळखीचे रामजी ठुकराल आहेत ना! त्यांना सांगितलंय सुचवायला. तसे त्यांनी मला दाखवले बरेच पण मला काही ते तुझ्यासाठी आवडले नाहीत. सुचवतील रामजी चांगलं स्थळ. ते फार वर्षापासून जुळवतायत ना लग्नं." आईंच्या आवाजातला उत्साह बघण्यासारखा होता. " बरं मग त्यांना सांग की आम्हांला मुलं बघायची नाहीत. नेहाला लग्न करायचं नाही. " नेहानं खूप शांतपणे सांगितलं. अंकित आणि पप्पा तिच्या शांतपणावर चकित होते तर आईंना काहीवेळ ती काय म्हणाली तेच कळलं नाही. श्रुतीलाही ती असं का म्हणतेय ते कळेना. आधी स्वतःच लग्नाला तयार झाली आणि आता नाही का म्हणतेय ही? ह्या विचारात ती पडली. भानावर आल्यावर आई चिडल्या, " काय म्हणालीस तू? परत सांग एकदा. " " मला लग्न करायचं नाही आणि हे फायनल आहे. " नेहा पुन्हा त्याचं शांतपणे म्हणाली. तिच्या ह्या वाक्यासरशी आई ताडकन् उठल्या तिच्या खुर्चीकडे आल्या. तिच्या खांद्याला धरुन उभं केलं आणि पुढच्याच क्षणी सन्नन्नन्न... काही वेळासाठी टाचणीचाही आवाज होईल एवढी शांतता पसरली होती. नेहाच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले होते. आई तिला आणखी फटके देणार होत्या पण त्याचवेळी भूपनं पुढे होऊन त्यांचा हात धरला. " थांब आई. का मारतेस तिला? लहान आहे का ती? तिला तिचं मत नाहीए का? आणि तू मारलंस म्हणून बदलणार आहे का तिचं मत? " इतक्या वर्षांनी भूप आईंशी बोलला तेही अशा प्रसंगात. घरातल्या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आई हतबद्ध होऊन खुर्चीवर बसल्या. " काय वाटतं काय तुम्हांला? लग्न म्हणजे कापूसकोंड्याची गोष्ट आहे? दरवेळी नवं उत्तर देताय ते? मला बाहेरच्या जगात काही किंमत आहे की नाही? काय सांगू मी कुमुदला? लोकं काय म्हणतील? दोन दोन मुलं बिन लग्नाची आहेत. " " कशाला लोकांनी काही म्हणायला हवंय? तुम्ही आम्हाला शिक्षण देताना ते आले होते का सांगायला हे नका शिकवू ते शिकवा म्हणून? तुम्ही तुमच्या मनानच निर्णय घेतलात ना! " नेहानं विचारलं. " आणि भैय्याचं लग्न केलंत ना लोकांना बोलवून! मग झालं की. सगळ्याच गोष्टी काय भोंग्यावर बोंबलून सांगायच्या का? " भूपनं त्याचं स्पष्ट मत मांडलं. " भूप आईशी असा बोलू नकोस. ही भाषा नाहीए तिच्याशी बोलण्याची. तुला जराही मानमर्यादा कळेनाशी झालीय का? " बऱ्याच वेळानंतर अंकित बोलला. पप्पांनी मात्र या सगळ्यात मौनंम् सर्वार्थ साधनम् चा वसा घेतला होता. 


" भैय्या तू पण? मलाच चुकीचं ठरवणार आहेस? मी कुठे तिला काही म्हणालो? मी कधी तिला दोष दिला का? तिच्यामुळे माझं प्रेम अर्धवट राहिलं याचा? मी गेली ५ वर्षं एकटेपणाच्या वेदना सहन करतोय त्यासाठी तरी तिला जबाबदार धरलंय का? नाही ना! मग कुठे चुकलं माझं? मी नेहाच्या बाजूनं उभा राहिलो ते! जर तसं असेल तर मी अशा चुका पुन्हा पुन्हा करणार. जो बरोबर असेल त्याच्या बाजूनं उभं रहायला भूपला कुठल्याही कायद्याची परवानगी लागत नाही. नेहा तू बोल गं! नाही लग्न करायचं तर नको करुस. कुणीही तुला काहीही म्हणणार नाहीए. " " भैय्या, वहिनी, पप्पा मी पुन्हा एकदा सांगतेय की मी लग्न करणार नाही. कधीच नाही. मला माझ्या पद्धतीनं आयुष्य जगायचंय. लग्न, मुलंबाळं, संसार यात गुरफटून नाही पडायचं. जर कधी मला इच्छा झालीच तर मी माझा वारसा चालवण्यासाठी दत्तक घेईन मुल. आणि मी पुढच्याच आठवड्यात चाललेय मुंबई सोडून बंगळुरूला. गेल्या महिन्यात फँशन शोला गेले होते तेव्हाच तिथल्या एका कंपनीत फ्री-लान्स फँशन डिझायनरच्या जागेसाठी अर्द भरला होता. तो मंजूर होऊन जॉईनिंग लेटर कालच हातात पडलंय. पप्पा माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मला माझ्या आयुष्यात काय करायचंय हे ठरवायचा हक्क तुम्ही मला मी कॉलेजला असतानाच दिलात त्यासाठी थँन्क्स. भैय्या, वहिनी तुम्ही मला जबाबदारी पेलायला शिकवलीत. तुम्ही सगळे माझ्या आयुष्यातले खूप महत्वाचे घटक आहात तरीही हे आयुष्य माझं आहे आणि मला ते माझ्या नियमांवर जगायचंय. तुम्ही सगळे कालही मला हवे होतात आणि उद्या तसेच हवे असाल; आता मात्र मी जायची तयारी करतेय. " ती बोलणं संपवून तिथून निघाली. जाता जाता बदकूवर झोपलेल्या रुझुच्या डोक्यावरुन हात फिरवला. तिच्या दोन्ही गालांचा पापा घेतला आणि तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या निर्णयानं अस्तव्यस्त झालेल्या वातावरणाला भूपनं आणखी अस्ताव्यस्त करुन टाकलं. नेहा गेल्याच्या दिशेनं बघत तो म्हणाला, " मीही चाललोय. इथून पुढे मी दामिनी इलेक्ट्रोच्या गेस्टरुमलाच राहीन. नेहा म्हणाली तसं माझ्यासाठी तुम्ही सगळे महत्वाचेच आहात. पण मलाही आता दुहेरी आयुष्य जगायचा कंटाळा आलाय. एकटं राहण्याची सवय करुन घेतलीय मी पण जर निमा भेटली तर हा एकटेपणा मी नक्कीच सहवासात बदलण्याचा प्रयत्न करेन. आई तुला जरी सिनेमा-नाटकवाली मुलगी नको असली तरी मला मात्र निम्नाशिवाय दुसरी कुणीही नकोय सांगाती म्हणून. येतो मी. वहिनी रुझूची काळजी घे. मी तिला तुम्हां सगळ्यांना भेटायला येतचं राहिन. भैय्या मघाशी तुला उलट बोलण्यासाठी सॉरी. पप्पा आशिर्वाद द्या. नवं आयुष्य सुरु करतोय. तुमच्या आशिर्वादाशिवाय ते सुरळीत नाही चालणार. " त्यानं भैय्याला मिठी मारली. पप्पा आणि आईच्या पायांना हात लावून नमस्कार केला. श्रुतीनं उचलून घेतलेल्या रुझुला घेऊन एकदा छातीशी धरलं. तिच्या गालाचे, कपाळाचे पटापटा मुके घेतले आणि आपल्या खोलीत निघून गेला. 

" काय झालं हो आमोद हे? का ही मुलं अशी वागली? कुठं चुकले मी आई म्हणून? " आईंना एकंदरीतच झाल्या गोष्टीचा फार मनस्ताप करुन घेतला होता. अंकितनं तिला जवळ घेतलं. " आई रडू नकोस. तू नाही चुकलीस कुठेच गं! रडू नकोस तुला त्रास होईल त्यानं. " " अंकी अरे तू तरी सांग रे तिला; म्हणावं लग्न कर. आयुष्याच्या उतरणीला एखाद्या साथीदाराची गरज लागते बाई. अशी किती दिवस एकटी राहणारेस? " " आई तुम्ही आधी शांत व्हा बघू. आपण समजवू त्या दोघांना. " श्रुतीपण जमेल तसं त्यांना समजवत होती. " अगं भूप तर तुझं सगळं ऐकतो ना! मग त्याला सांग की मी नाहीए त्याच्या एकटेपणाला जबाबदार. ती मोठी आहे त्याच्यापेक्षा आणि अधिकारही गाजवणारी. त्यांचा संसार कसा होईल? म्हणून नाही म्हणाले मी. आमोद अहो बोला ना काहीतरी. समजवा त्यांना. " श्रुतीला आईंच निमाविषयीचं हे मत ऐकून वाईट वाटलं पण ती प्रसंगावधान राखून काहीच बोलली नाही. " हे बघ उमा! " बऱ्याच वेळानंतर पप्पांनी बोलायला तोंड उघडलं. 


" मी अंकितसारखं तुला खोटं सांगणार नाही की तू कुठेच चुकली नाहीस म्हणून. पण तू बरोबर नाहीस असंही नाहीए. जेव्हा मी मिलीटरीमध्ये होतो तेव्हा तू हे घर अगदी एक हाती सांभाळलंस. नो डाऊट की त्यावेळी सगळे निर्णय तुला एकटीलाच घ्यावे लागले. पण मी तुला तेव्हाही सांगितलं होतं की मुलं मोठी होतील तसे त्यांचे लगाम सैल कर. त्यांना त्यांच्या हिशोबाने आयुष्याची आखणी करु दे. तू नाहीच ऐकलंस माझं. धडपडत राहिलीस सतत त्यांच्या नाड्या स्वतःच्याच हातात ठेवण्यासाठी. आज जे घडलंय ते कधीतरी घडणारच होतं. लग्न आयुष्यात गरजेचं आहे म्हणूनच तर लग्नसंस्था अस्तित्वात आली ना! जर तसं नसतं तर पूर्वापार काळापासून लग्नाला, कुटुंबाला इतकं महत्व का दिलं गेलं असतं? पण त्याचवेळी अनेकांनी हे सिद्ध केलंय की लग्न म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नाहीए. असं असताना तू त्यांना हवं तसं जगण्याचा त्यांचा हक्क का नाकरतेयस उमा? जाऊ दे त्यांना त्यांच्या वाटेनं. तुझं सुदैव आहे की तुझा थोरला मुलगा, सून आणि नात तुझ्याचजवळ राहतायत हे. हट्ट सोडून दे उमा. बाकी सगळ्या बाबतीत तुझ्या बाजूनं ठामपणे उभा असलो तरी याबाबतीत मात्र मी तुझी साथ नाही देणार. " पप्पा त्यांच्या खोलीत निघून गेले. अंकित आणि श्रुती मात्र पप्पांच्या ह्या पवित्र्याने अवाक झाले होते. त्यांच्या हातात आईंना समजावण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. मघाशी जिथं सगळं कुटुंब एकत्र झालं होतं आता त्याच हॉलमध्ये फक्त तीन टाळकी विमनस्कपणे बसली होती. तेवढ्यातच भूप त्याचं सामान घेऊन खाली आला. निष्प्राण डोळ्यांनी सगळ्या घराकडे पाहत त्याने श्रुतीला आवाज दिला. " वहिनी, येतो मी. " " भूप, असा वेडा विचार नको करुस भूप. थांब जाऊ नकोस. माझं ऐकणार नाहीस का तू? " ती आईंना तसंच सोडून त्याच्याकडे धावत आली. त्याची बँग हाताने खेचून ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. " वहिनी, भैय्यापेक्षाही जास्त माया तू दिलीस मला. थांबवू नकोस मला. तुझ्या मायेच्या बेड्या माझ्या पायात पडल्या तर मी इथेच अडकून पडेन. आणि इथेच घुसमटून मरुन जाईन मी. नको थांबवूस मला. " " भूप, थांब. " अंकित पुढे आला. " तू असा घुसमटत इथे राहिलेला मला नाही आवडणार. जा तू. पण या घराला कधीच विसरु नकोस. श्रुती त्याला नको अडवूस. " समोर आलेल्या अंकितला भूपनं घट्ट मिठी मारली आणि आतापर्यंत कोंडलेल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. " शांत हो भूप. माझी खात्री आहे तू चुकीचा नाही वागणार. जा आणि माझा तुझ्यावरचा विश्वास किती खरा आहे ते सगळ्यांना पटवून दे. " त्यानं डोळे पुसले आणि तो बाहेर पडला. 

गेला दोन-अडीच महिने तो दामिनी इलेक्ट्रोच्या त्याच्या रुममध्येच राहत होता. तो बाहेर पडला आणि पुढच्याच आठवड्यात नेहासुद्धा तिथून बाहेर पडली. जाताना गौराही तिच्यासोबत होती. भूपनं दिल्या शब्दाप्रमाणे बंगळुरुत प्रमिथेश संघवींच्या मदतीने त्यांच्यासाठी घर- दुकान ह्या दोन्हीची छान व्यवस्था केली होती. अन्वय-श्रावणीनं त्या दोघींना हवं तसं दोन्हीचं इंटेरिअर करुन दिलं होतं. निमाच्या दहा दिवसांच्या सुट्टीच्या वेळेत ते आठवडाभर त्या दोघींसोबत येऊन राहिले. त्यांना जम बसवायला मदत केली. आणि त्यांचा जम बसतोय हे लक्षात आल्यावर फ्लाईट पकडून दोघंही मुंबईत परत आले. निहारिकानं इथल्या शॉपची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर व्यवस्थितपणे घेतली. कँन्डल वर्कशॉप नेहमीप्रमाणं अँन्डीकडून तपासण्या करुन त्याची चाचपणी करुन महेंद्र मतकरच्या हातात सोपवलं त्यानं. नेहाच्या सगळ्या बस्तानाची ख्यालीखुशाली वेळोवेळी तो श्रुती-अंकितला पोचवत होता. त्या दोघांचं सगळं व्यवस्थित चाललं असलं तरी इकडे आईंना मात्र बीपीचा त्रास सुरु झाला. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या नसल्या तरी खूप गोष्टी त्यांच्या विस्मृतीत जाऊ लागल्या होत्या. त्यांना घराबाहेर पडताना सतत कुणाची तरी सोबत असावी म्हणून चारु नावाची नर्स ठेवली होती. पण कधी कधी आई तिलाही गुंगारा देत.


स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सगळ्या हॉस्पीटलमध्ये नुसता यांचा गलका चालू होता. चारचारदा नर्सने सांगूनही त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. होणार तरी कसा ना! मिथिल बाप झाला होता. सुगमा आई झाली होती. तीनच दिवसांपूर्वी इथेच हॉस्पीटलच्या या वॉर्डमध्ये विवाह- नोंदणी अधिकाऱ्यांच्या समक्ष दोघांनी मँरेज रजिस्टरवर सह्या केल्या होत्या. सारं काही कसं छान आनंदात चाललं होतं. सगळ्यात जास्त आनंद झाला होता गंधर्व आणि भूपला. सगळं हॉस्पीटल रंगीबेरंगी फुग्यांनी सजलं होतं. आज अँन्डीच्या बोडक्यावर बसून दोघांनी मिठाई तयार करुन घेतली होती; जी सगळ्या हॉस्पीटलमध्ये वाटली जात होती. निम्ना नसती तर या दोघांनी तिथे आवाजाचं धुमशान घालायलाही कमी केलं नसतं. तिने सज्जड दमच भरला होता दोघांना, खबरदार जर हॉस्पीटलमधल्या कुणालाही आवाजामुळे त्रास दिलात तर. मग काय बाबाजी का हुकम सर आँखोपर म्हणत यांनी फक्त फुग्यांची सजावट आणि मिठाईवर समाधान करुन घेतलं मनाचं. पण कोंडीतून वाट नाही काढली तर मग तो भूप कसला? त्यानं ओरडा खाऊनही गाणी लावलीच.


" राम जन्मला गं सखे राम जन्मला. " 

सगळ्या हॉस्पीटलभर मंद स्वरात गीतरामायणाचे सुर लहरत होते. निम्नानं त्याच्या ह्या निवडीला दाद दिली. 

" वस्ताद आहेस हं तू! " 

" तुमच्याकडूनच शिकलो मँडम. " 

" मखलाशी राहू दे. बाकी सगळ्या गोष्टी केल्यास ना नीट? म्हणजे पाळणा वगैरे आणलायस ना? आणि सुगमासाठी डिलिव्हरीनंतरचे कपडे वगैरे सगळ्याची खरेदी तुम्ही नीट केलीय ना? " 

" हो गं बाई. सगळं सगळं तू सांगितलंस तसं नीट केलंय. आता जरा मी जाऊ छोट्या राजकुमारांना बघायला? " 

" हो. जा. पण हात नको हं लावूस. उद्या परवा घ्या काय घ्यायचं जवळ ते बाळाला. "

ही बातमी कमी होती म्हणून की काय बंगळूरुहून आणखी दोन चांगल्या बातम्या आल्या होत्या. एक म्हणजे गौरा आणि नेहाची शोधाशोध थांबून त्यांना चांगलं आयव्हीएफ् सेंटर मिळालं होतं बंगळूरुत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच सेंटरच्या मध्यस्थीने त्यांना इंदूरची स्पर्मबँकपण मिळाली होती. हे सगळेजण आत जेव्हा सुगमा आणि तिच्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करत होते तेव्हाच निमाच्या फोनवर गौराचा कॉल आला होता. आलेच म्हणून ती फोन घेऊन बाहेर गेली. 

" हां गौरा बोल गं! "

" काय गं वहिनी? कामात होतीस का? फोन उचलायला वेळ लागला? "

" नाही गं. हॉस्पीटलला आलो होतो आम्ही सगळे. गुड न्यूज आहे. सुगमाला मुलगा झालाय. "

" काय सांगतेस? वा! तिला सांग मी हे सगळं खूप मिस करतेय म्हणून. "

" ते सांगेनच गं पण तू का फोन केला होतास? "

" सॉरी गं विसरलेच बघ मी. माझ्याकडेही गुड न्यूज आहे. मी आणि नेहानं एँम्ब्रिओ दिलाय प्रिझर्व्हेशनसाठी स्पर्म बँकेत. "

" वा, ही तर खूपच चांगली गोष्ट झाली गं! मग तुमची स्पेशल न्यूज कधी देणार मग तुम्ही? "

" त्याला मात्र वेळ लागणार गं वहिनी. त्या स्पर्म बँकेचे नियम कडक आहेत. आता आमचाच एँम्ब्रिओ जो आम्ही प्रिझर्व्हेशनला दिलाय तो सगळ्या लँब टेस्ट करुन मग सहा महिन्यांनी वापरता येणार. " 

" आणि जर दुसरा कोणी वापरणार असेल तर? " निमाची सहजशंका

" तरीही सहा महिने गं. कारण फ्रेश स्पर्म वा एँम्ब्रिओ वापरणं भारतात गुन्हा आहे. शिवाय त्याच्या बऱ्याच टेस्टपण करायच्या असतात ना! "



" मग तुमच्यापैकी कोण होणार सरोगेट? "

" अर्थातच मी. मलाच जास्त हौस आहे आई व्हायची ना! आम्ही जेव्हा इंदौरला त्या बँकेत गेलो ना तेव्हा आमच्या खूप साऱ्या टेस्ट केल्या त्यांनी. केस, डोळे, त्वचा, डीएनए, एचआयव्हीसाठीची एलायझा टेस्ट, हिपँटँसिस- बी, सी, कँन्सर टेस्ट, कुठलाही अनुवंशिक आजार नसल्याची टेस्ट आणि हिस्ट्रिपण तपासली. सगळ्यात शेवटी तर त्यांनी आमची कोणताही लैंगिक आजार नाही ना! याचीपण तपासणी केली. तशी हिस्ट्रीपण तपासली. आमच्या टेस्टमध्ये आम्हांला त्यांनी कुठलं व्यसन नाही ना? असापण प्रश्न विचारला होता. आमचं वय विचारलं. कारण डोनरचं वय २१-३५ च्या दरम्यानच असावं असा नियम आहे तिथला. "



" देवा, किती त्या अडथळ्यांची स्पर्धा गं! "

पलिकडून गौरा खळखळली.

" चल ठेवते फोन. सुगमाताईला मिस यू सांग. पुढच्यावर्षी आमच्याकडेपण असणार गुड न्यूज. "

तिचा फोन संपला तोवर मिथिल, गंध्या आणि भूप बाहेर आले होते. 

" तिला आराम करायला सांगितलाय. भवानांचे राजकुमार झोपलेत मस्त. चला आपण आपल्या कामाला जाऊ आता. " 

तो दिवस संपला. म्हणता म्हणता सुगमाची डिलीव्हरी होऊन आज पाचवा दिवस होता. गंधर्व अँन्डीच्या रुममध्ये बसला होता. त्याची जन्मतारीख आणि जन्मवेळ देऊन अँन्डीला त्याची पत्रिका करायला सांगितली होती त्यानं. अँन्डीची आकडेमोड चालू होती. तिकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण सुगमाच्या डिस्चार्जची तयारी करत होते. मिथ्याचा उत्साह नुसता ऊतू जात होता. भूपनं रम्याला मिथूच्या घरी पिटाळलं होतं. तिथं रांगोळी काढायला, तबक तयार करुन ठेवायला सांगितलं. बाळाला नुकतीच नर्सने आंघोळ घालून आणून पाळण्यात ठेवलं होतं. मिथिल बाहेर डिसार्ज पेपर, हॉस्पिटल बिल या सगळ्याची पूर्तता करत होता.

" गंधर्व, अरे याला अगदी किंचीत मूळ नक्षत्र लागलंय. "

" मग त्याने काय होतं? "

" मातृपितृ सुखात कमतरता. "

" म्हणजे मी नाही समजलो. तुझी ही असली भाषा मला नाही समजत. नीट सांग ना! "

" हे बघ, मूळ नक्षत्र लागलं की आई वडिलांचं सुख मिळत नाही. पण या मुलाला किंचीत लागलंय त्यामुळे त्या सुखात कमतरता असं म्हणालो मी. "

" मिथिल लवकर चल सुगमाला आय आय सी यू मध्ये नेलंय. " 

भूप वॉर्डच्या दारातूनच ओरडला. मिथिल हातातली कागदपत्र वगैरे सगळं तिथंच सोडून तीरासारखा त्याच्याबरोबर आत गेला. 

" अचानक काय झालं हिला भूप? सकाळपासून बरी होती ना ही! "

" हो रे! मघाशी अचानकच तिला घुसमटल्यासारखं व्हायला लागलं. म्हणून मी डॉक्टरना बोलवलं. त्यांनी सांगितलं की तिची शुगर हाय झालीय. बीपी लो झालाय. नस सापडत नाहीए. म्हणून तातडीनं तिला आयआयसीयूत नेलंय. "

मिथिलचा जीव नुसता घाबराघुबरा झाला.

" अरे मग त्या एवढ्याशा जिवाचं काय होईल? आईबापाच्या प्रेमाशिवाय तो कसा लहानाचा मोठा होईल? "

" काळजी नको करुस गंधर्व. ज्यानं जन्माला घातलं तो त्याची सगळी व्यवस्था करतो. जर त्याच्या पत्रिकेत पालकसुखाची कमतरता दिसतेय तर पालक असणार आहेत हे नक्की. " 

गंधर्वनं निश्वास सोडला.

" तू कधी कधी फार घाबरवून सोडतोस बघ! हे सुख नाही, ते सुख नाही. पैसा दिसत नाही. व्यापारात बरकत दिसत नाही. असलं काहीतरी गौडबंगाली भाषेत बोलतोस आणि अर्थ सांग म्हटलं की सारवासारव करतोस. "

गंधर्वला त्यानं पत्रिकेतला वर्तवलेला अंदाज पटला नव्हता.

अँन्डी हसला. म्हणाला, " अरे गौडबंगाली भाषा कुडमुडे ज्योतिषी वापरतात. ज्यांना या शास्त्रातलं फक्त दहापैकी दोन टक्केच समजतं ते. मी सहसा असलं भाष्य करत नाही. हा माझा अभ्यास आहे. ग्रहांचीसुद्धा स्वतःची अशी एक उर्जा असते जी माणसाच्या आयुष्यावर परिणाम करते. नाहीतर अमावस्या-पौर्णिमेला मेंन्टल असायलममध्ये जास्तीची काळजी का घेत असतील? कारण, मन पाण्यासारखं तरलं असतं आणि चंद्र जो चंचल आहे तो पाण्याचा कारक आहे. म्हणजेच तो मनाधिपती झाला. आणि मनालाच तर साडेसाती लागते. "

" अंन्ड्या मला ना यातलं काही कळत नाही बघ. तू फक्त मला बाळाच्या पत्रिकेत काय ते सांग. "

" बाळाच्या चौथ्या घरावर राहूची दृष्टी म्हणजे पुन्हा मातृसुखात कमी. आणि मनाधिपती बसलाय तुळेत. म्हणजे पितृसुखात कमी. जरा थांब हं! " 

असं म्हणून त्यानं सुगमाची पत्रिका उघडली; जी गंधर्वच्या हट्टाखातर त्यानं बनवली होती. काही आकडेमोड केली आणि झटक्यात म्हणाला, 

" गंधर्व सुगमा... तू आधी हॉस्पीटलला फोन कर. "

" अरे पण झालं काय? "

" फोन तरी कर ना! " 

अँन्डी खूपच घाई करत होता. गंधर्वनं फोन काढायला खिशात हात घातला; तेवढ्यातच फोनची रिंग वाजायला लागली. 

" भूपचा फोन! "

" गंधर्व, गंध्या सुग... सुगमा गेली रे! "गंधर्वच्या हातातून फोन गळून पडला. तो पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. अँन्डीनं पटकन् त्याचा फोन उचलून कानाला लावला.

" हँलो, सर काय झालं सर? "

" अँन्डी, सुगमा गेली रे! आणि त्या धक्क्यानं मिथिलंही गेला रे! मी आता कुठं जाऊ अँन्डी? माझं कुणी नाही राहिलं रे! माझा मिथ्या गेला. आता माझ्याकडून हक्कानं पेनल्टी कोण वसूल करणार रे! माझी थोरल्या बहिणीसारखी काळजी करणारी सुगमा मला एकट्याला सोडून गेली. काय करु मी आता? भूप, भूप शांत हो. " त्याला फोन कट होता होता निमामँडमचा आवाज ऐकू आला. 

कसंबसं त्यानं गंधर्वला सावरलं आणि ते हॉस्पिटलला पोचले. बिचाऱ्या निमाला त्या सगळ्यांना सावरण्याच्या नादात सुगमासाठी दोन थेंब अश्रूही नाही गाळायला मिळाले. मैत्रीच्या चौकटीच्या दोन भिंती गळून पडल्या होत्या. आता ह्या उघड्या पडलेल्या मैत्रीला आधार देऊन उभं करणं तिच्याच हातात होतं. सुगमा आणि मिथिल गेल्याची बातमी जड अंतःकरणानं तिला सगळ्यांना द्यावी लागली. हॉस्पीटलची सगळी प्रक्रिया आटपून दोघांच्या बॉडी हातात येईपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते. या सगळ्यात त्या पाळण्यात गुमान झोपलेल्या बाळाकडे थोडं दुर्लक्षचं झालं सगळ्यांचं. नर्सने बाहेर येऊन विचारलं,



" ते वॉर्डमधलं १३ नंबर कॉट जवळच्या पाळण्यातलं बाळ तुमच्यापैकीच आहे ना! कुणीतरी घ्या त्याला रडतंय ते केव्हाचं. नसेल तर तसं सांगा आम्ही ते अनाथाश्रमात पाठवतो. " 

ते ऐकलं मात्र निम्ना धावतंच आत गेली. त्या पोरक्या झालेल्या पोराला उचलून तिनं छातीशी धरलं. एका क्षणात ते रडायचं थांबलं. 

तिच्या मागोमाग आलेला भूप म्हणाला, " कशाला त्या कपाळकरंट्याला उराशी धरतेस? माझ्या दोन्ही जिवलगांना खाऊन बसलाय तो. सोड त्याला इथंच. जगू दे अनाथ म्हणूनच. काही त्याला सोबत न्यायचं नाहीस तू. "

निमा त्यावर अवाक्षर न बोलता तिथून बाहेर पडली. जाताना तिनं भूपचा हात घट्ट धरला आणि त्यालाही खेचत बाहेर नेलं. सेमी सायरन वाजवत अँम्ब्युलन्स स्मशानाकडे पोचली. चार वॉर्डबॉयनी आतून आधी सुगमाची मग मिथिलची बॉडी बाहेर काढली. मागोमाग बाळाला घेऊन निम्ना खाली उतरली. मागच्या गाडीतून भूप, अँन्डी, गंधर्व, रम्या उतरले. त्याच्या मागून आलेल्या गाडीतून अंकित-श्रुती, अन्वय-श्रावणी, आणि नेहा-गौरा सगळे एक एक करत खाली उतरले. भटजी येऊन पोचले. विद्युतदाहिनीत शवांना ढकलण्याआधीचे सगळे विधी सुरु होते. बाळ पुन्हा रडायला लागलं; जणू त्याला कळलं की आता आई-बाबा पुन्हा कधीच दिसणार नाहीत. निमाच्या शेजारी उभारलेला भूप पुन्हा काहीतरी वेडवाकडं बोलणार होता इतक्यात त्याच्यासमोर उभी राहून निमा म्हणाली,

" खबरदार माझ्या बाळाबद्दल काही वेडंवाकडं बोलशील तर! सुगमा मिथिलची ठेव आहे ती माझ्याकडं. तो अनाथ नाहीए. जाण्याआधी सुगमा तिचं आईपण माझ्याकडं देऊन गेलीय. त्यादिवशी तुम्हांला सगळ्यांना बाहेर घालवून तिनं माझ्याकडून हेच वचन घेतलं होतं. आज, आत्ता ह्या क्षणापासून मी या बाळाची आई आहे. आणि भूप तुला जमलं तर लाडक्या मित्राच्या आणि मैत्रिणीच्या मुलाचा बाबा हो. "

तेवढ्यात भटजींचे सगळे विधी आटोपले आणि त्यांनी सगळ्यांना शेवटचा नमस्कार करायला सांगितला. सगळ्यात शेवटी निमा बाळाला घेऊन तिथे गेली. सुगमा आणि मिथिलच्या पायांना तिने बाळाचा हात लावला.

" मित्रांनो, सुखाने स्वर्गस्थ व्हा. तुमच्या मुलाला मी कधीच परकेपणा जाणवून देणार नाही. "

काही क्षणातच विद्युतदाहिनीच्या त्या भागात राखेचा ढीग आणि काही अस्थींचे भाग उरले होते. 

स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुगमा आणि मिथिलला जाऊनही आता पाच वर्षं उलटली होती. लग्नाच्या पाच वर्षांनी श्रुतीला रुमझुम झाली. रुमझुम सहा-सात महिन्यांची असेल तेव्हाच सुगमाला सुमिल झाला. दोघांच्या वयात येऊन जाऊन आठ-नऊ महिन्यांचं अंतर असेल. मिथिल-सुगमाच्या जाण्यानं भूप-निम्ना आपसूकचं आईबापाच्या भूमिकेत शिरले. त्यांच्या संपर्कातल्या प्रत्येकाला माहित होतं की ते गेली पाच वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतायत म्हणून. अगदी पप्पांनाही माहीत होतं; मात्र त्यांनी उमाताईंना याचा अजिबात सुगावा लागू दिला नव्हता. त्यांची तब्येत सतत काही ना काही कारणानं नादुरुस्त व्हायची. बरेचदा तर त्या हिस्टेरिक होत. त्यांना आवरणं कठीण जाई. त्यांच्यासाठी डॉ. दलिप सिंग यांची ट्रिटमेंन्ट चालू होती. ते विख्यात मानसतज्ञ होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी माणसं सतत मै करे सो कायदा या न्यायाने वागतात त्यांच्या त्या स्वभावावर वेळीच ट्रिटमेंन्ट करायला हवी अन्यथा परिस्थिती उमाताईसारखी हाताबाहेर जाते. या आजाराला डिमेन्शिया म्हणतात. याची प्राथमिक लक्षणं अल्झायमर्स नावाच्या विस्मृतीच्या आजारासारखीच असतात; पण अल्झायमर्समध्ये टप्प्याटप्याने सगळी स्मृती पुसतच जाते तर डिमेन्शियामध्ये काही वेळा रुग्णाला सगळं काही आठवतं, कधी काहीच आठवत नाही तर कधी तुटक तुटक स्मृतींचा पट्टा जोडला जातो. सहसा हा आजार होणारी लोकं ही हेकेखोर, मनमानी, हट्टी आणि आपलं ते खरं करणारी असतात. अशा लोकांना विरोधाची सवय नसते. त्यामुळे बोथट विरोधही त्यांच्यासाठी अशा वयात घातक ठरतो. उमाताईंच्या देखरेखीसाठी ठेवलेल्या नर्स चारुला डोळ्यांत तेल घालून त्यांच्यावर नजर ठेवावी लागे. नाहीतर त्या तिलाच टाळेबंद करुन कुठेही निघून जात. पुन्हा त्यांची शोधाशोध करताना सगळ्यांच्या नाकी नऊ येई कारण त्यांना कधी पत्ता आठवे तर कधी त्या सपशेल हेही विसरुन जात की त्यांचं नाव काय आहे? त्या कुठून आल्या? कुठे जाणार आहेत? वगैरे वगैरे. अशावेळी फार त्रास पडू नये म्हणून अंकितनं खबरदारीसाठी जवळपासच्या सगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये उमाताईंचा फोटो, नाव, पत्ता, फोननंबर देऊन ठेवला होता. ज्यामुळे त्या जर अशा कुठे हरवल्या तर त्यांचा पत्ता लागणं सोईचं होई. गौरा-नेहाची शाल्मली आता तीन वर्षांची झाली होती. गौरानं पुन्हा एकदा चान्स घेतला होता. यावेळी तिला मुलगा हवा होता. गौराच्या डिलीव्हरीसाठी निम्ना आणि श्रावणी गेल्या होत्या. अन्वय-श्रावणीनं दोन जुळी मुलं दत्तक घेतली होती. जुई आणि जगत दोघेही आता ८ वर्षांचे होते. 

म्हणता म्हणता १० वर्षं उलटून गेली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. रुमझुम आणि सुमिल दोघेही आता ६ वर्षांचे झाले होते. दोघे एकाच शाळेत होते. रुझु आणि सुमिल एकाच गटात होते. गंमत म्हणजे ती दोघं आपलं आपलं खेळण्यात, शिकण्यात बिझी असायची. तशी रुझु जरा जास्तच वात्रट होती. मधेच वर्गातल्या कुणाकुणाच्या खोड्या काढायची. शाळेचा एकही दिवस असा गेला नसेल की तिने देवेनचा डबा हडपला नाही. सुमिल मात्र दरवेळी स्वतःचा डबा त्याच्यासोबत शेअर करायचा. दिवस अगदी चाकं लावल्यासारखे पळत होते. त्यादिवशी जुई-जगतचा वाढदिवस होता. ८ वं संपून ९ वं लागणार होतं त्यांना. मग निम्ना-भूप, श्रुती-अंकित सगळे मिळून खरेदीला गेले. सोबत बारकी पिलावळ पण होतीच. खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर रुझुला तर आभाळ ठेंगणं झालं. कधी ती सायकलवर बसत होती तर कधी बँटरीवर चालणाऱ्या बाईकवर. मधेच तिला हँगीगवाला झुला खुणवत होता तर मधूनच ससा-वाघ-अस्वल-हत्ती-हरिण असे सॉफ्ट अवतारातले जंगली प्राणी खुणावत होते. ते मुलांसाठीच्या खेळण्यांचं चांगलं चार मजली दुकान होतं. रुझुची अशी मजा चाललेली असताना सुमिल मात्र विस्फारल्या डोळ्यांनी टकाटका करत त्या मोहमयी जगाला बघत होता. त्यातलं काय घ्यावं काय नको ह्या विचारात तो गुंतला असताना रुझुनं धावत येऊन त्याला हाताला धरुन ओढतच सोबत नेलं आणि एका मोठ्या अस्वलाच्या अंगावर ढकलून दिलं. अगदीच अनभिज्ञ असणारा सुमिल त्या अस्वलाच्या मांडीवर पडून घसरला आणि जमीनीवर दणकन् आपटला. त्याला जोरात डोक्याला लागल्यावर त्यानं मोठ्ठ्यानं भोकाड पसरलं. त्याच्या भोकाड पसरण्याच्या आवाजानं श्रुती धावतच तिकडे आली. 


" काय केलंस रुमझुम तू त्याला? " ती ओरडलीच तिच्यावर.

आईचा ओरडा बसणार म्हणून आधीच रुझुनं सुम्याच्या तोंडावर हात दाबून त्याच्या रडण्याचा आवाज सायलेंट मोडवर आणला होता.

" काढ त्याच्या तोंडावरचा हात! " श्रुती पुन्हा कातावली. " का रडतोय तो? काय केलंस तु त्याला? नतद्रष्ट पोरगी आहेस नुसती. किती खोड्या करतेस? सांग आधी काय केलंस त्याला ते? " श्रुती तिचा हात धरुन तिला रागवत होती. 

तिच्या रागवण्यामुळे रुझुच्या डोळ्यांत पाणी आलं. ती रडतेय असं बघून सुमिल पटकन् गप्प झाला. 

" काकी ताईला नको रागवू. मीच पडलो असोलाच्या मांडीवरुन उडी मारताना. ताई गं रडू नको आपण मोठ्या ताईदादासाठी खेळणी घेऊ चल. " त्यानं आपल्या बारक्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि तिचा हात धरुन समोरच्या खेळणांच्या पसाऱ्यात तो गायब झाला. 


हे सगळं नाटक निमा न् भूप झोपाळा घेता घेता बघत होते. 


" बघ हा बाजू सावरण्यात अगदी तुझ्यावर गेलाय. " निमानं त्याला कोपरखळी मारली.

तो काही बोलणार इतक्यात तिथं आलेली श्रुती म्हणाली, " अगदी खरं बोललीस. मला पक्की खात्री आहे हे कांड आमच्याच ध्यानानं केलंय म्हणून. "

" वहिनी तू गप गं; उगीच माझ्या पोरीला का नावं ठेवतेस? गुणी लेकरु आहे माझं ते! "

" चला जाऊया ना आपण? " एका हातात मोठ्या मोठ्या दोन पिशव्या आणि दुसऱ्या हाताला दोघांना धरुन समोरुन अंकित येत होता. सुमिल आपल्या वजनाएवढा आकाराचा बॉक्स ढकलत ढकलत आणत होता.



" काय आणलं सुमा तू? " निमानं तो बॉक्स बघून विचारलं.

" जगतदादूसाठी टीटी चा सेट आहे. हा डबा मला उचलत नव्हता तर काकू म्हणाला ढकलत नेऊया. "

त्याच्या ह्या वाक्यावर तिथल्या सगळ्यांच्याच हसण्याच कारंजं उडालं. 

" आणि रुझु मँडमनी काय घेतलं म्हणे? " तिला कडेवर उचलून घेत भूपनं विचारलं.

" काकू मी कि नाही ताईसाठी खूप खूप काय काय घेतलं. पण सगळं सरप्राईज आहे म्हणून मी तुला सांगणार नाही. आणि तुला सांगू मी काही सुमिलसारखी हुश्शार नाहीए ना! म्हणून मग मी माझं सगळं सामान बाबाकडे दिलं. "

" भैय्या, अरे तुझी लेक आतापासून मँनेजमेंट करायला लागली की रे! " बिल देऊन हसत हसत सगळे तिथून बाहेर पडले आणि थेट अन्वय- श्रावणीच्या मढमधल्या बंगल्यावर निघाले. नेहा-गौराच्या वतीनं जगत-जुईसाठी आधीच गिफ्ट आलं होतं. तो एक शोधाशोध गेम होता; जो मोठेसुद्धा लहानांच्या सोबतीनं खेळू शकत होते. त्यात एक राजाचा पेपर महाल होता. त्या महालातल्या खोल्या आधी बनवून घ्यायच्या मग त्यातल्या खजान्याच्या खोलीत चोरी होणार आणि मग सगळेजण टीम बनवून तो खजाना शोधणार, असं एकंदरीत त्या गेमचं स्वरुप होतं. 


स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अन्वय-श्रावणीचा मन्मथ आज छोट्या मुलांच्या आरडाओरडा आणि दंगाधोप्यात हरवून गेला होता. तिथं फक्त जुई-जगतच्या शाळेतली मित्रमंडळी नाही तर त्यांना जिथून दत्तक घेतलं होतं तिथली मुलंही आली होती. आता घरचेच झालेले ड्रीम पार्टीज ऑर्गनायजरकडूनच याही पार्टीची सगळी तयारी करुन घेतली होती दोघांनी. दोघांमध्ये कसलाच प्रॉब्लेम नव्हता. मुल होण्याचे सगळे चान्सेस प्लसमधे मोडत असताना त्यांनी हा दत्तक मुलाचा पर्याय निवडला होता. धनंजय आणि गीताईंनापण त्यात काही फार वेगळं वाटलं नाही. उलट त्यांना आपल्या लेकाचं आणि सुनेचं खूप कौतुक होतं. जुई-जगतला दत्तक घेतल्यानंतर दोघांनी आणखी एक निर्णय घेतला; तो म्हणजे जोवर दोघांतल्या कुणा एकालाही स्वतःचं मुल हवं असं वाटत नाही तोवर मुल न होऊ देण्याचा. आणि आता त्याच जुई-जगतचा ८ वा वाढदिवस थाटामाटात साजरा होत होता. द्विजय आणि रुमा गिरी त्यांची लेक परीसोबत आले होते. अंकित-श्रावणी रुमझुमला घेऊन आलेले. भूप-निम्ना सुमिलसोबत आलेले; निमाला आत्ता सहावा चालू होता म्हणून ती जरा घोळक्यापासून लांब लांब राहत होती. गौरा- नेहाकडून फक्त गिफ्ट आलं होतं कारण गौराला प्रवास करायचा नव्हता. निहारिकानं एक गोरटेला पंजाबी पटवून चट मंगनी पट शादी करुन टाकली होती. तीही तिच्या हरदीप आणि छोट्या दिलशादसोबत आली होती. बँनीनं अजूनही लग्नाचं मनावर घेतलं नव्हतं. ती तिच्या तिच्या आयुष्यात मजेत होती. रौशनची बायको हिना बेगम "क्या हुना बे? कायकू जी?" बोलणारी अस्सल हैदराबादी होती. तेही दोघेजण त्यांच्या हुस्ना आणि जाएदसोबत आले होते. या सगळ्यांच्या सोबतीला उमताई-आमोद, धनंजय-गीताई, राजीव-अपर्णा आणि सुप्रियाताई-श्रीधर अशी रंगनाथ, भालकर, जेधे आणि भावसारांकडची बाकीची मंडळी आपापल्या केसांतल्या चंदेरी छटा घेऊन पार्टीला चार चांद लावायला हजर होती. निमानं नाशिकला घरी जाणं पुन्हा सुरु केलं होतं. आता तिथली प्रॉपर्टी आणि बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी तीच सांभाळत होती भूपच्या सोबतीनं. अधूनमधून श्रुती-अंकितही मदत करत होते. त्यामुळे त्या सगळ्याचा तिला फार काही त्रास होत नव्हता. नाशिकच्या बंगल्याचं अन्वयच्या मदतीनं रेनोव्हेशन करुन त्याचं स्पेशल गेस्टहाऊसमध्ये रुपांतर केलं होतं. श्रावणीनं अगदी मोजक्याच पण क्लासी फर्निचरच्या सहाय्यानं तिथं जुना राजेरजवाड्यांचा माहौल भासेल असं इंटिरिअर केलं होतं. एकंदरीत सगळ्यांच्या आयुष्याच्या पुलाखालून शेकडो क्यूसेस पाणी वाहून गेलं होतं. 


आजची पार्टीची थीम होती अलिबाबा आणि चाळीस चोर. त्यातही रुमझुमला रुखसाना होण्याची खूप हौस. मी तेल ओतणार म्हणत तिनं सगळ्या बुधल्या आडव्या केल्या. सुमिल बापडा त्या गोंधळात निमाचं बोट धरुन बसून राहिला. भूपनं किती सांगून पाहिलं पण हा ढिम्म हलायला तयार नाही. शेवटी अंकितनं त्याला जबरदस्तीनं उचलून ड्रेसरुममध्ये नेऊन अलिबाबाचे कपडे चढवले. त्यावर तो म्हणाला, 

" काकू हे कपडे घालून काय करायचं? लढाई करायची? पण मला नाही आवडत लढाई खेळायला. " त्यांच्या मागोमाग आत आलेला भूप त्याला म्हणाला, " ओहो, तू किती छान दिसतोयस सुमा. तू ना हिरो होणार आजचा. आणि दिदू तुझा हेल्पर होणार. मग दोघं मिळून त्या चाळीस चोरांना शिक्षा करा हं! " हे ऐकलं मात्र त्याच्या अंगावर जसं काही मुठभर मांस चढलं. भूपनं उचलून घेतलेलं असताना तो टुणकन् उडी मारुन खाली उतरला आणि रुझुच्या नावाने मोठ्याने ओरडत तिला शोधायला निघून गेला. त्याच्या त्या घोड्यासारख्या उधळण्याकडे बघत अंकित भूपला म्हणाला, " हा अजिबात मिथिल-सुगमाचा वाटत नाही; कुठल्याच बाजूने. सगळी लक्षणं तुझ्या लहानपणीची दिसतात मला. निमाबद्दल श्रुतीला जास्त माहीत असेल. तू पण असाच सगळ्या घराची दाणादाण उडवायचास. एकदा माहितेय ना जत्रेतून आणलेल्या तलवारीनं कोचाचं कव्हर फाडलं होतंस. " " हो आणि आईच्या माराला घाबरून गच्चीवरच्या ड्रमात लपलो तर त्याचं झाकणंच बंद झालं." " नशीब आमचं की नेहानं तुला तिथं लपताना बघितलं होतं म्हणून नाहीतर करायचा होता गणपती आणि झाला मारुती अशी वेळ आणली होतीस तू! " अंकितला त्या आठवणींनी आताही कसंतरीच झालं. " भैय्या, नेही असायला हवी होती ना! " " हो पण काय करणार? गौराला प्रवास नाही ना करायचा! नाहीतर ह्यांच्या शाल्मलीपण असती धुडगूस घालायला. पण भूप्या मला एक गोष्ट सांगशील? " " विचार की? असा माराच्या भितीनं मास्तरला विचारताना चाचरावं तसं भीत भीत काय विचारतोस भैय्या? " " म्हणजे तू नेहाचं हे सगळं इतकं सहज कसं मान्य करु शकलास? मला तर आजही विचारताना इतकं संकोचायला होतंय. खरं सांगू मला आणि श्रुतीला पहिल्यांदा वाटलं होतं की शाल्मलीला तिनं स्वतःच जन्म दिलाय म्हणून. तिच्याकडे गेल्यावर हे सगळं प्रकरण कळलं मला. आधी कळलं असतं तर माहीत नाही मी कसा वागलो असतो? " " काही नाही रे! आम्हांला नववीला असताना धात्री गुरव मँडम होत्या शिकवायला विज्ञान. ही सगळी त्यांची कृपा. त्यांनीच आम्हांला लैंगिक शिक्षण धेणं किती गरजेचं आहे हे सांगितलं. मग त्यांनी सांगितलेली, आणलेली त्या विषयावरच्या तज्ञांची, डॉक्टरांची बरीच पुस्तकं वाचत राहिलो. डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. मालती कारवारकर अशा डॉक्टरांनी लिहिलेल्या पुस्तकांना वाचून मतं प्रगल्भ होत गेली. मग काही पाश्चात्य संशोधकांची पुस्तकं, पीएचडीचे पेपर वगैरे वाचले आणि सगळं कसं आरशासारखं लख्ख झालं. कॉलेजमध्ये असताना मी एकदा असाच नाईट आऊट करुन घरी आलो होतो. नेहाच्या रुमची लाईट ऑन दिसली म्हणून तिकडं वळलो. दारावर नॉक करणार तर आतून वेगळेच आवाज येत होते. काहीवेळासाठी माझीच मति गुंग झाली होती. काय करु सुचत नव्हतं. वाटलं आईने हिला कशी काय परवानगी दिली हे असं काही करण्याची? मग नीट कानोसा घेतला तर आवाज फक्त एकट्या नेहाचा येत होता. पुरुषाचा आवाज येत नाही म्हटल्यावर आधी जीव भांड्यात पडला. पण लगेच दुसरी शंका आली ही काय लँपीवर पॉर्न व्हिडिओ बघतेय का? हळूच दाराच्या फटीतून डोकावलो तर ही फोनवर बोलत होती आणि सोबतीनं तिचं मँस्ट्रीब्यूशन चालू होतं. मी फक्त बघीतलं आणि उलट्या पावली माझ्या रुममध्ये येऊन आडवा पडलो. पण मला झोप काही येईना. कळत होतं की हे जे आहे ते नँचरल पण थोडसं अँबनॉर्मल आहे. त्यानंतर तिच्याशी कसं बोलावं ह्या विचारात मी पुढचे २-३ आठवडे पिसाटासारखा याच्यासंदर्भातलं मिळेल ते वाचलं, पाहिलं, अभ्यासलं. या सगळ्यातून हिंमत आल्यावर तिच्याशी बोललो. बँन्डस्टँन्डला जाऊन खूप वेळ समजवलं तिला की हे अँबनॉर्मल आहे म्हणून. पण नेही माहितेय ना तुला मिलटरी बापाची चिवट पोरगी. ती नाही म्हणजे नाहीच ऐकायला तयार. डहाणूकरांकडे नेऊन तिची मेन्टल स्टेटस् चेक केली होती मी. " " काय सांगतोस काय? अरे पण यातलं काहीच कसं आम्हांला घरातल्यांना कळू दिलं नाहीस तू? " " कळायचं म्हणतोयस तू? अरे आईला नुसता वास जरी लागला असता तरी तिनं नेहाला उभी फाडली असती महिषासुरमर्दिनीचा अवतार घेऊन. " " हे मात्र अगदी खरं बोललास तू. बाबा पण तिला किती समजावायचे. अगं उमा दाती तृण धरुन बसणं आजच्या जगात शहाणपणाचं नाही. असं कितीदा तिला म्हणायचे. ती मात्र नेहमी स्वतःचंच खरं करायची. " " म्हणूनच मग डॉक्टरांनी नेहा नॉर्मल असण्याचा निर्वाळा दिल्यावर मगच मी तिला तिच्या वाटेने जायला मोकळीक दिली. आधी खात्री करुन घेतली की यातून काहीही वेडवाकडं घडण्याचे चान्सेस नाहीत म्हणून. मगच ठामपणानं तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. खरंतर ही सगळी जुळवाजुळव मी आणि निमूनंच केली. " " भूप्या तू केवढा मोठा झालायस रे? मला नसतं जमलं आईच्या विरोधात नेहाच्या बाजूनं असा शड्डू ठोकून उभं रहायला. तुम्ही दोघं मेड फॉर इचअदर आहात. मला वाटलं होतं निमीसोबतं तुझं कसं निभावेल? ती अशी धडाधड निर्णय घेणारी आणि तू रोमँन्टीक फूल. पण, नाही. तू माझे सगळे तर्क कुतर्क होते हे सिद्ध केलंस. तुझ्यामुळे आज मी फ्रिलान्स मँनेजमेन्ट लेक्चरर म्हणून मिरवतोय. तुझ्यामुळे आज नेहा तिच्या आयुष्यात सुखी आहे. तुमच्या दोघांच्या प्रयत्नांमुळे आमची दोन्ही जोडपी आपापल्या जगात आनंदी आहेत. तू ना त्या बलराम-कृष्णाच्या जोडीतला आहेस बघ! सगळं करुन सवरुन नामानिराळा. " " अरे ए भैय्या, काय चाललंय तुझं? इथे काय माझ्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याला जमलो नाहीए आपण; माझ्या कौतुकाची तोरणं कसली लावतोस? चल बाहेर जाऊ आणि बघू ह्यांच्या अलिबाबाची गोष्ट कुठवर आली ते! " भूपनं सवयीनं अंकितला उडवून लावला. पण, अंकितला माहीत होतं की तो बोलतोय त्यात किती तथ्य होतं ते. ते बाहेर पडले तर रुझुनं सगळ्या घोड्यांचे लगाम लपवून ठेवले होते आणि ते काही तिला कुठं ठेवलेत ते आठवत नव्हते.


स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कसेबसे एकदाचे गिरीजाबाईंनी ते लगाम शोधून काढून घोड्यांच्या गळ्यात अडकवले. आणि त्या त्या घोड्यावर तो तो स्वार तयार केला. हे दोघे प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. बसता बसता भूपचं लक्ष गेलं तर उमाताई नेमक्या निम्नाच्याशेजारीच बसलेल्या. त्यानं खुणा करुन पाहिल्या, आवाज देऊन पाहिला पण अलिबाबावाल्या पार्ट्यांचा एवढा गोंधळ चालू होता की तिच्या कानावर काहीही पडलं नाही. तो निराश होऊन खुर्चीवर टेकला. " काय रे, काय झालं? एवढा चेहरा का पडलाय तुझा? " स्टेजवरच्या पोरांमध्ये गुंतलेल्या अंकितनं विचारलं. " ते बघ तिकडं. आई नेमकी निमाच्या शेजारी बसलीय. उगाच सगळ्या रंगाचा बेरंग व्हायला नकोय. " त्यानं निमा आणि उमाताई बसलेल्या खुर्च्यांकडे बोट दाखवलं. " एवढंच ना! काळजी नको करुस. आईचं सध्या सगळं लक्ष त्या पोरांच्या नाटकात आहे. त्यातून निमाला तिनं ओळखलीच तर पुढचं पुढे बघू. तो बघ आपला अलिबाबा लाकडं तोडायला चाललाय. " त्यानं स्टेजवरच्या सुमिलकडे बघून जोरात शिट्टी वाजवली. झालं, सुम्याला निमित्तच मिळालं तो ती हातातली कुऱ्हाड नाचवत म्हणाला, 


" काकू, खाना बनाने की तयारी करो. हम लाकडं तोडके आणते है। " त्याचं हे असलं मराठाळलेलं हिंदी ऐकून सगळीकडे एकच हशा पिकला. माईकवरुन गिरीजाबाईंचा आवाज यायला लागला. " आणि एक दिवस आपला अलिबाबा रोजच्यासारखा जंगलात लाकडं तोडत असताना त्याच्या कानांवर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. घाबरुन त्यानं कुऱ्हाड तिथंच टाकली आणि तो झाडाच्या उंच शेंड्यावर चढून लपून बसला. "


 त्यांचं बोलणं संपतंय तोच स्टेजवरच्या पुठ्ठ्याच्या झाडाकडे जाऊन सुमिल ओरडला, " गिरीजाबाई, आता मला चोर पकडणार. मला झाडावर चढता येत नाही. " " गधड्या, अरे त्या बुंध्याच्या मागे लप झाडाच्या; आम्ही समजून घेतो की तू झाडावर चढलास म्हणून. " त्या माईकच्या माऊथपीसवर हात ठेवायचं विसरल्यानं पुन्हा एकदा ह्या संवादानं प्रेक्षकांच्यात हास्याची खसखस पिकली. टप्प्याटप्प्यानं नाटक पुढे पुढे जात रंगत चाललं होतं. अंकित नाटकात पार हरवून गेला होता तर भूपचं अर्ध लक्ष आई आणि निमाकडे होतं. त्या दोघी अधूनमधून एकमेकींशी बोलत असताना त्याला दिसलं होतं. आता नाटकातला शिंपी कासिमच्या शरीराचे तुकडे कुणाला जोडून दिले त्याचं घर दाखवत होता एका चोराला. वाटेत रुखसाना हे बघून लपून बसते आणि तो चोर अलिबाबाच्या घरावर खुणेचं चिन्ह काढून निघून गेल्यावर सगळ्या घरांवर तशाच खुणा करते असं करायचं होतं. पण जसा तो शिंपी अलिबाबाच्या घराजवळ पोचला तशी रुझू लपलेल्या जागेतून बाहेर आली आणि त्या चोराला म्हणाली, " ए चोऱ्या माझ्या मालकाला मारलंस तर तुझ्यावर उकळलेलं तेलं तू बुधल्यात बसायच्या आधीच टाकेन हां! "


 तेवढ्यात गिरीजाबाई स्टेजवर धावत आल्या. " रुमझुम लपून बस बघू. नंतर खुणा करायच्यात तुला दारावर. " तिला हाताला धरुन ओढत त्या विंगेत घेऊन गेल्या. 

अशारितीनं टप्प्याटप्प्यानं सगळा पोरांचा गोंधळ सावरत नाटक शेवटाकडे पोचलं होतं. दरोडेखोरांचा सरदार झालेला जगत गुहेची जादूई देवता झालेल्या जुईला विचारत होता की या कासिमशिवाय आणखी कोण घुसलं होतं या माझ्या गुहेत? तेव्हा तिनेच त्याला जादूच्या गोलात तो अलिबाबा दाखवला होता ज्याने नंतर कासिमचं प्रेत शिंपी बनलेल्या दिलशादकडून शिवून घेतलं होतं. दोन वेळा प्रयत्न करुनही रुखसानाच्या हुशारीमुळे अलिबाबा काही सरदाराच्या हाती लागला नव्हता; त्यामुळे आता तो तेलाचा व्यापारी बनून अलिबाबाच्या घरात घुसला. त्या आलेल्या पाहुण्याचा अलिबाबाने छान आदरसत्कार केला. त्याच्या मनोरंजनासाठी रुखसानाचा नृत्यगायनाचा कार्यक्रम झाला. आता डोळ्यांवर झापड आलेला तो सरदार त्याच्या खोलीत झोपायला चालला होता. घरातली बाकीची कामं आटपून आपल्या नोकरांसाठी असणाऱ्या खोलीकडे जाणाऱ्या रुखसानाला एका तेलाच्या बुधल्याशी थांबलेला सरदार दिसला. तिला संशय आला म्हणून ती कानोसा घ्यायला लागली तर सरदार चक्क त्या बुधल्याशी बोलत असल्याचं तिच्या लक्षात आलं. नीट लक्ष दिल्यावर तिला कळलं की हा दुसरा तिसरा कुणी नसून दरडोखोरांचा सरदार आहे आणि आपल्या मालकाला मारायला आलाय. तिला प्रश्न पडला की आता इतक्या रात्री जाऊन मालकाला कसं उठवायचं? आपल्यालाच काहीतरी करायला हवंय. जसा तो सरदार त्याच्या खोलीत पोचला; तिनं तो झोपण्याची थोडावेळ वाट पाहिली आणि त्याच्या खोलीला बाहेरुन कडी घातली. मग तिनं बाकीच्या हालचाली खूप वेगानं केल्या. भटारखान्यातल्या जाड्या नोकराला उठवून त्याला मोठ्या कढईत तेल उकळत ठेवायला सांगितलं. जसं तेल उकळलं ते एका मोठ्या झारीत भरुन भरुन तीने ते बुधल्यांमध्ये टाकायला सुरुवात केली. जाड्या नोकर आधी बुधल्यावर टकटक करायचा, आपला सरदार आला समजून ते चोर त्याला चाहूल द्यायचे की लगेच हा त्याच्यावरचं झाकण काढे आणि तो चोर बाहेर येण्याआधीच रुखसाना त्यात तेल ओते की लगेच जाड्या ते झाकण लावून टाकी. असं करत करत त्या दोघांनी सगळ्या ३९ चोरांना मारुन टाकलं. उरला त्यांचा सरदार त्याला दुसऱ्या दिवशी अलिबाबाने मारुन टाकलं. आणि मग नाटक संपलं. सगळी मुलं ओळीने जेवणाच्या टेबलाकडे जाऊन उभी राहिली. प्रेक्षकसुद्धा उठून जेवणाच्या टेबलाकडे जमा झाले. निमा, उमाताई, अंकित, भूप सगळे जवळजवळच होते. तेवढ्यात अलिबाबा सुमिल धावत तिथे आला. 


"आ

ई, भूक लागली. भूक लागली. उचलून घे ना. मला भरव हां! मी आत्ता खूप काम करुन आलोय. दमलोय की नाही. दमून घरी आलेल्या बाबाला तू भरवतेस ना तशीच मला भरव हां! "



तो तिच्या आणि भूपच्या रोजच्या आयुष्यातल्या खाजगी गप्पा सगळ्यांसमोर मोठमोठ्याने सांगत होता. निमा त्याला डोळ्यांनीच दटावून शांत करु पाहत होती पण त्याची एक्सप्रेस तर केव्हाच स्टेशनवरुन सुटली होती. तो ऐकेना म्हणताना उमाताईंनी त्याला उचलून घेतलं. 


" अलिबाबा तू शहाणा मुलगा आहेस ना! ये मी भरवू तुला? आजीच्या हातून जेवणार ना! "

त्यांनी सुमिलला उचलून कडेवर घेतलं.

" तू कुणाची आजी? "

" वेड्या अलिबाबाची. घे. हा घास चिऊचा. "

" म्हणजे शहाण्या सुमिलची. पण, सुमिलच्या बाबांची की आईची आई तू? "

" मी ना तुझ्या आईची आई. हा घास भू भू चा. "

त्यांच्या ह्या वाक्यावर शेजारी उभारलेला भूप गर्रकन् मागे वळला. 

" अगं, तू माझी आई आहेस गं! "

तो मनातच म्हणाला.

"भूप!" त्याच्या खांद्यावर हात ठेवत अंकित म्हणाला, " वाईट नको वाटून घेऊस. जे होतं ते भल्यासाठी. बघ ना! आजवर आईला निमू ह्या घरात नको होती. तिला सिनेमावाली मुलगी सून म्हणून नको होती. तिचं तुझ्यापेक्षा वयानं थोडं मोठं असणं खटकत होतं तिला. आणि आता? आता ह्या विस्मृतीच्या आजारानं डिमेन्शियानं तिला काही काळासाठी सगळं विसरुन निमाची आई असणं लक्षात राहिलं. तू जेव. बोलू आपण नंतर. " तो प्लेट ठेवून हात धुवायला निघून गेला. इकडे सुमिल आणि आजीचा जेवणासोबतचा गप्पाष्टक कार्यक्रम चालूच होता.

"मग तू आमच्या घरी का येत नाहीस रहायला?"

"अरे बाळा आपल्याकडे मुलीच्या घरी पाणी नाही पित. रहायला कशी येऊ? हा घास माऊचा."

" शी, वेडी माणसं असतात. असं नसतं काही करायचं. तू ये आमच्या घरी रहायला. आई आजीला येऊ दे ना!"

" हो बाळा येऊ दे की. आजी आपलीच आहे मग आपल्याच घरी येणार ना!" भूपनं लगेच त्याला परमिशन दिली. उमाताईंना त्याची काही ओळख लागेना. तेवढ्यात सुमिलनं त्यांच्या कडेवरुन भूपकडे झेप घेतली. "बाबा, तू व्हेरी गुड बाबा आहेस. आता मी तुला बशकिस देणार." 

तो असं म्हटल्यावर भूपनं त्याला कडेवर घेऊन वाकून नमस्कार करत जावई असल्याचा उत्तम अभिनय केला. "आई नमस्कार करतो. नक्की या हं आमच्या घरी. आमच्या सुमिलच्या घरी. हो ना सुमा?" ह्यांचा हा सगळा गोंधळ चालू होता तेवढ्या वेळात निमा पलिकडे श्रुती,श्रावणी,निहारिका,बँनी या सगळ्यांच्या गप्पात जाऊन सामिल झाली. 

"येते हं जावईबापू. पोरीची नीट काळजी घ्या. आता सहावा महिना चालू आहे ना! मी आलेच हात धुवून. " असं म्हणून उमाताई हात धुवायला गेल्या. आता नाटक संपून खूप वेळ झाला होता. सगळ्यांची जेवणं आटपली होती. बाहेर अनाथाश्रमाची बस थांबली होती. गिरिजाबाईंनी एक एक करत सगळ्यांना ओळीने बसमध्ये बसवायला सुरु केलं. जगत आणि जुई सोबत रिटर्न गिफ्टचं बॉक्स घेऊन अन्वय-श्रावणी उभे होते. प्रत्येकाला बसमध्ये चढताना ते रिटर्नगिफ्ट हातात ठेवत होते. बसमध्ये सगळी मुलं बसल्यानंतर गिरीजाबाईंचे आभार मानून ती सगळीजणं आत आली. आता जमलेली सगळी आपली माणसं निरोप घेत होती. भालकर आणि जेधे कुटुंबिय सोडून सगळेच आपापल्या गाड्यांमधून एक एक करत बाहेर पडले. निमा भूप आणि सुमिलदेखील निघाले. सुमिल तर तिथेच भूपच्या खांद्यावर झोपला होता. आई भैय्यासोबत जाणार म्हणून त्यानं अंकितला काहीच विचारलं नाही आणि तोही अन्वयदा-श्रावणीचा निरोप घेऊन निघाला. तो बाहेर पडला त्याच्या गाडीनं वेग घेतला आणि उमाताईंना बघायला गेलेले पप्पा घाईघाईनं तिथे आले आणि म्हणाले, "अंकि, अरे आईला पाहिलंस का कुठे? सगळीकडे शोधून आलो मी; कुठेच नाहीए ती." अंकितला हे ऐकून धक्काच बसला. त्यानं पटकन् खिशातनं फोन बाहेर काढला आणि पटापट फोन फिरवायला सुरुवात केली. कुणीच तिला बघितलं नाही म्हटल्यावर तर त्याचं धाबचं दणाणलं. तो मटकन् तिथंच पायरीवर बसला. आता काय करायचं? कुठं शोधायचं आईला? इतक्यात शेजारी उभी असलेली श्रुती म्हणाली, " ऐक ना! भूपला फोन लावला होतास का तू?" एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. " हो गं, विसरलोच मी. आईला त्याच्यासोबतच शेवटी बघितलं होतं मी." भूपचा नंबर डायल करत तो म्हणाला. बराच वेळ रिंग वाजल्यावर फोन रिसीव्ह झाला. भूप ड्राईव्ह करत होता आणि निमाचा डोळा लागला होता. त्यामुळे तो रिसीव्ह व्हायला लेट झाला. फोन उचलल्याक्षणी निमाच्या कानावर शब्द पडले," भूप्या आईला फोन दे. असा न सांगता कसा नेतोस?"

स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भैय्या निमा बोलतेय. भूप ड्रायव्हिंग करतोय. काय झालंय नक्की? आई तर मघाशी तिथेच होत्या. मी त्यांना वरच्या मजल्यावर वॉशरुमला जाताना पाहिलं. " 

" निमा अगं बाबा सगळीकडे शोधून आले आई कुठेच नाहीए. मला वाटलं की मघाशी सुमिल तिला घरी चल म्हणत होता म्हणून ती तुमच्याबरोबर गेली की काय? सगळ्यांना फोन करुन झाले; तिला कुणीच पाहिलं नाहीए गं! " अंकितचा स्वर अगदी हताश वाटत होता. 

" भैय्या धीर सोडू नको. सापडतील आई. भूप जरा मागचे दिवे लाव गाडीतले. इथे तर नाहीएत भैय्या आई. एकदा परत अन्वयदाचा बंगला सगळ्यांनी मिळून शोधा तोवर येतोच आम्ही. भूप... "

" निमा, निमा!" तिचं बोलणं अर्धवट तोडतच अंकित म्हणाली, " हे बघ बाळा इतक्या रात्री आता मागे फिरु नका. मी बघतो सगळं. काय होईल ते कळवतो; तुम्ही घरी जा नीट."

" पण भैय्या अरे... " 

" भूप्या जा म्हणून सांगतोय ना! मग जा घरी. ती सापडली नाही सापडली तरी कळवतो मी तुला. "

भूप काही बोलण्याआधीच अंकितनं फोन कट केला होता.

" बघितलंस निमू? हा असा करतो. मला नाही का तिची काळजी वाटत? तूच सांग मला. कुठे गेली असेल म्हातारी कुणास ठाऊक? रात्रीच्या अशावेळी आता कुठे शोधणार तिला? मी असतो तर मदतच झाली असती ना! "

" मला कळतंय भूप तुला काय वाटतंय ते! पण भैय्यासुद्धा काही चुकीचं सांगतोय असं नाहीए. बघ ना! आपण अर्धा अधिक रस्ता केव्हाच पार केलाय. पुन्हा परत जायचं म्हटलं तर हा रस्ता असा अंधाराच्या कडेवर नको नको त्या खऱ्याखोट्या गोष्टींना जोजवत बसलेला. बरं आपण मागे परतलो आणि ते तिकडून आईंना शोधायला निघाले; आपली चुकामूक झाली म्हणजे पुन्हा नवं लचांड. त्यांना शोधतील की आपला माग ठेवतील? तू शांत हो. अशावेळी धतरमतर करण्यापेक्षा मेंदू शांत ठेवला तर नेमकं काय करायचं ते नीट कळतं. घरी पोचूच आपण थोड्या वेळात. सुमाला रुममध्ये झोपवते आणि कॉफी करुन आणते. मग बघू काय करायचं ते! " 



त्याला त्याच्याच भाषेत समजवणं तिलाच जमायचं. तिकडे निमाच्या सांगण्यावरुन पुन्हा एकदा सगळेजण मन्मथ मँन्शनमध्ये शोधमोहिमेवर बाहेर पडले होते. ही खोली, ती खोली करत करत एकेकजण निराश होऊन परत येत होता आणि त्याचवेळी अचानक श्रावणीच्या बेडरुमच्या गँलरीतून शोधायल्या गेलेल्या श्रुतीचा बारिकसा आवाज पप्पांच्या कानावर पडला.

" अंकित, आई झोपल्यात रे इथे. " 

ते धावतच वर गेले. त्यांच्यामागेच अंकित, अन्वय, श्रावणी आणि बाकीचा जिल्हापण तिथे पोचला. बघतात तर उमाताई एका कोपऱ्यात पदर अंगाशी गुंडाळून झोपलेल्या. 


" या इथे कशा आल्या? त्या तर खालच्या मजल्यावरच्या वॉशरुममध्ये गेल्या होत्या ना! " 

श्रावणीला काहीच कळेनासं झालेलं. तशी श्रुती म्हणाली, " तुला तर माहितेय ना आईंना डिमेन्शिया आहे ते! कधी कधी त्या जे काही करतात त्याला कसलाच कार्यकारणसंबंध नसतो गं! आणि असणार तरी कुठून म्हणा? कारण तो संदर्भ लावायला माणसाकडे काहीतरी कसलीतरी का होईना स्मृती असावी लागते. आणि त्या स्मृतीची सांगड घालणारा मेंदू नीट चालणारा असावा लागतो. असो. त्या सापडल्या हेच खूप महत्वाचं. " बोलता बोलता तिनं त्यांना हळूच उठवलं आणि हाताला धरुन आत नेलं. बेडवर बसवलं.

" आई बरं वाटतंय ना! एवढ्या थंडीत अशा गँलरीत का झोपलात? " 

" मी... मी कुठे होते म्हणालीस? " त्यांनी जमलेल्या सगळ्यांवरुन नजर फिरवत तिला विचारलं. तेवढ्यात पाण्याचा ग्लास पुढे करुन अंकित म्हणाला, " काही नाही गं! या मागच्या गँलरीत फरशीवर झोपली होतीस तू. खूप शोधलं आम्ही तुला. सगळ्यांना विचारलं तू कुठे दिसलीस का ते? निमा आणि भूपलाही विचारलं त्याच्यासोबत गेलीस का म्हणून. "

अचानक त्यांच्या मेंदूनं कसलीतरी सांगड घातली. पाणी पिऊन ग्लास परत देत त्या म्हणाल्या, " अरे आपल्या निमाचा पोरगा... काय त्याचं नाव ते!... जाऊ दे बरंच काहीतरी असणार. तर तो मागे लागला माझ्या आजी घरी चल म्हणून. त्याला येते म्हटलं तर तो ऐकेना. हटूनच बसला जेवता जेवता. तरी बरं जावई बापू आले म्हणून. त्यांनी त्याला घेतला आणि मी त्याला हात धुवून येते म्हणून बाजूला आले. एवढंच आठवतंय रे बाबा मला. "

" बरं बरं असू दे काही हरकत नाही. चल आपण आता घरी जाऊयात ना! "

अंकितला अर्धा अधिक प्रसंग तर माहीतच होता. आणि जिला काही आठवतच नाही तिच्यावर चिडणार तरी कुठल्या कारणासाठी? जेवढं आठवलं तेही खूप होतं त्यांच्यासाठी. 

" अंकित आता इथेच झोपा सगळे. सकाळी निघा परत जायला. तुमच्या सगळ्यांच्या झोपण्याची लगेच व्यवस्था करतो. रुझु जगत जुईच्याच रुममध्ये झोपलीय. काकू आणि आमोद काका इथे झोपतील. पलीकडच्या बेडरूममध्ये तुम्ही झोपा. मी, श्रावणी न् आईबाबा खालच्या मजल्यावरच्या बेडरुममध्ये झोपू. "

अंकितकडे हो म्हणण्याशिवाय काही पर्याय नव्हता. कारण आता त्याच्यातही गाडी चालवण्याचे पेशन्स नव्हते. रजई त्याच्या हातात देऊन जाता जाता श्रावणी म्हणाली, " त्या पोराला जरा फोन करुन सांग रे काकू सापडल्या म्हणून. तो काळजीनं अजून तळमळत असेल. " " हं! करतो. "

इतक्यात बाथरुममध्ये गेलेली श्रुती बाहेर आली. " अंकि अरे भूपला फोन केलास का? ते दोघेपण काळजीत असतील. " " मग मी काय विटीदांडू खेळत होतो का? त्यालाच लावतोय फोन. तुम्हां बायकांना त्या भूप्याचीच काळजी जास्त. एक तू दुसरी निमा आणि तिसरी आता ही श्रावणी. " बरोबरच होतं त्याचं वैतागणं; कारण भूप किती प्रँक्टीकल असल्याचं दाखवत असला तरी तो आतून खूप इमोशनल होता. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायचा. नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याच वेळानंतर भूपचा फोन लागला. हॉलमध्ये चिंतातूर अवस्थेत बसलेल्या भूपनं झडप घालून पटकन् टीपॉयवरचा फोन उचलला आणि रिसीव्ह केला. 


" काय भैय्या तुझा फोन नाही लागत. सापडली का आई? तिला काही झालं नाहीए ना? बरी आहे ना ती? " " ए भुसनाळ्या, बोलायला गँप सोड की मध्ये. धाड धाड आपली उचलला फोन की चालूच केली एके-४७. शांत रहा जरा. सापडलीय ती. काही झालं नाहीए तिला. एकदम खुटखुटीत आहे म्हातारी. काही काळजी करु नकोस. आता झोप शांतपणे. मी ठेवतो फोन. आम्ही अन्वयकडेच झोपतोय आता; उद्या सकाळी जाऊ घरी. वेळ मिळाला की ये मग. चल. गुडनाईट शुभरात्री. "

" निमू आई सापडली गं! " तो किचनमधून येता येता सुमाच्या खोलीत गेलेल्या निमाला आई सापडली हे सांगायला आत गेला. 

निमा आत सुमिलच्या डोक्यावरुन हात फिरवत बसली होती. " काय गं! काय झालं? अशी अचानक आत का आलीस हॉलमध्ये येता येता? " त्यानं काळजीनं तिला विचारलं. 

" अरे काही नाही रे! किचनमधून येता येता मला सुमिलचा आवाज ऐकू आला. काय झालं म्हणून बघायला आले तर हा झोपेत बडबडत होता. झोपेतच आजीला सांगत होता की तू आमच्या घरी जेव म्हणून देवबाप्पा तुला काही मारणार नाही मुलीच्या घरी जेवलीस तर! मला काही नीटसा संदर्भच लागला नाही बघ! कोण मुलगी? कुणाची आई? "

" अच्छा असं बोलत होता का? "

म्हणत त्यानं तिला ती बाकीच्या जणींबरोबर गप्पा मारायला गेल्यापासून ते उमाताई हात धुवायला जाईपर्यंतचा सगळा किस्सा सांगितला. ती थोडी विचारातच पडली.

" भूप! "

" निम्या! "

" तू सांग आधी. "

" नाही तू सांग तुला काय म्हणायचं होतं? "

" अं! आपण असं करुया का? "

" काय करुया? "

काही क्षणांचा विश्राम गेला आणि दोघं एकदमच म्हणाले, " आईंना/ला घरी आणूया का? "

आणि आपण एकमेकांना किती ओळखायला लागलोय या विचारानं सुमिल झोपलाय हे विसरुन मोठ्याने हसायला लागले. त्यांच्या त्या हसण्यानं डोळे चोळत सुमिल उठला आणि भूपच्या गळ्याला गळामिठी मारत म्हणाला, " तुम्ही दोघे असे का हसताय? " " आम्हांला आनंद झालाय कारण उद्या आमच्या सुमाची आजी येणारे घरी. " सुमिलला तर स्वर्ग दोन बोटं उरला. दणदण बेडवर उड्या मारत तो ओरडत होता. आजी येणार, आजी येणार. मध्येच तो थांबला आणि भूपला म्हणाला, " बाबा तुझ्यापण आईला बोलव ना! म्हणजे आईच्या आईला मैत्रीण मिळेल. "

स्वरा...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी सुमा सकाळीच उठून शहाण्या मुलासारखा दात घासून तयार झाला. आपल्या ससावाल्या बँगेत छोटी पाण्याची बाटली भरुन ठेवली. किचनमधल्या सुमा टेबलावरुन आई टेबलावर चढून त्याने कपाटातून लाडूचा डबा आणि सुक्यामेव्याचा डबा काढून घेतला. मग दोन मुठीत मावतील एवढा सुकामेवा छोट्या सुट्टीच्या डब्यात भरला. मोठ्या सुट्टीच्या डब्यात त्याला लाडू काढायचे होते पण लाडूचा डबा काही उघडेना. आता काय करायचं? एकदा त्याला वाटलं आईला उठवूया का? परत विचार केला नको झोपू दे. तिला आता बाळ होणार असं म्हणाली होती आजी, मग तिला आराम करु दे. पण डबा कसा उघडायचा? हा प्रश्न लवकर सुटेना. मग त्याला युक्ती सुचली. तो आधी बेडरुममध्ये जाऊन आई बाबा झोपलेत ना! हे बघून आला. मग हळूच बाबाच्या कारपेंटर बॉक्सकडे गेला. त्यात बरचं काही काही होतं. मोठा हातोडा, छोटा हातोडी, मोठी पक्कड, छोटी पक्कड, स्क्रू-ड्रायव्हर, मेजर टेप, पेन, वॉटर सिलिंग टेप, आणखीही खूप काही. तो नीट मांडी घालून हातावर हनुवटी टेकवून त्या बॉक्समधल्या गोष्टींचा अंदाज घेत तिथंच बसला. काय घ्यावं यातलं? कशानं डबा उघडेल बरं! हां ती टीव्हीतली आजी त्या झाकणावर जड वस्तू मारते मग तिचा डबा उघडतो ना! आपण हे घेऊया, असं म्हणत त्याने तो मोठा हातोडा उचलला. पण कसंच काय! तो भलताच जड होता. सुमाच्या चिमुकल्या हातांना त्याला त्या बॉक्समधून काढणंपण अवघड झालं. त्याने थोडावेळ प्रयत्न केला शाळेतल्या रस्सीखेच खेळातल्यासारखा जोर लगा के हैशा असं म्हणत उचलायचा पण हातोड्याचं आपलं राम नाही नी शिवा नाही; तो तसाच ढिम्म. मात्र त्याच्या त्या जोर लगा के हैशानं निमाची झोप चाळवली. बघते तर शेजारी सुमा दिसत नाहीए. कुठे गेला हा पोरगा? आणि आवाज कसला आला होता आपल्याला? म्हणून ती उठून बेडरूमच्या दारात आली. आजूबाजूला नजर फिरवतेय तर गँलरीच्या बाजूला ठेवलेल्या कारपेंटर बॉक्ससोबत सुमा काहीतरी करत होता. ती तशीच मागे वळली आणि हळूच तिनं भूपला उठवलं. तोंडावर बोट ठेऊन गप्प रहायला सांगून त्याला मागे यायचा इशारा केला. 


" काय करतोय हा तिथं? आणि इतक्या लवकर कसा उठला? " 

सुमाचे एकंदरीत चाललेले सगळे प्रयत्न ते दोघे दाराच्या फटीतून बघत असताना तो निमाच्या कानात कुजबुजला.

" मला तरी काय माहीत! थांब बघू काय करतोय ते! "

शेवटी एकदा सुमाला ती छोटी हातोडी उचलता आली. त्याला लग्गेच आपण भीम असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यानं पुरी ताकद लावून ती छोटी हातोडी खांद्यावर टाकून आपला मोर्चा किचनकडे वळवला. 

" किचनमध्ये काय आहे याचं हातोडी घेऊन? "

भूप निमाला एकावर एक प्रश्न विचारत होता. त्यामुळे ती वैतागली.

" मला कसं माहीती असणार; मी आत्ता उठलेय ना? चल बघूया काय रामायण-महाभारत केलंय ते किचनमध्ये. " दोघेही पावलांचा आवाज होणार नाही अशा बेतानं सुमाच्या मागे मागे किचनकडे आले. त्यानं आत आल्यावर आधी ती हातोडी भीम थाटात खांद्यावरुन उतरून ठेवली. मग स्वतःशीच म्हणाला, 

" शुकामेचा डबा आत ठेऊया नाहीतर आईला कळेल सुमानं दोन दोन मुठी भरुन शुकामेवा घेतला म्हणून. "

निमाला हसूच आलं ते ऐकून पण पटकन् भूपनं हात ठेवला म्हणून ते सुमाला ऐकायला नाही आलं. त्यानं पुन्हा सगळा सुमा टेबल, आई टेबल मग परत सुमा टेबल करत सुक्या मेव्याचा डबा होता तसा कपाटात ठेवला.

" वा पोरगं अगदी आईवर गेलंय हां! जरा इकडचा तिकडं न करता जागेवर ठेवलाय बघ डबा! " 

भूप खुसखुसला. तिनं पुन्हा त्याला गप्प बसवलं. सुमा आता तो लाडूचा मोठा डबा पायात धरुन बसला होता. मग तो डबा सोडून हातोडी उचलायला उभा राहिला. त्याचं स्वतःशीच बडबडणं चालू होतं. 

" हं! काय बरं केलं होतं? त्या टिव्हीतल्या आज्जीनं दब्याच्या जाकणावर जोरात बत्ता मारला. आणि ढुम्म जाकण उघडलं."

त्यानं ताकद लावून ती हातोडी उचलली आणि आता तो ती झाकणावर मारणार इतक्यात दोघेही एकदमच म्हणाले, 

" डबा फुटेल सुमा तो! "

सुमाचं कॉन्स्न्ट्रेशन ब्रेक आणि धप्पकन् हातोडी हातातून सरळ खाली. तिला वाटलं आता हा भोकाड पसरतोय. पण हातोडी त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या अर्धा इंच बाजूला पडली होती आणि सुमा आपले मोठे मोठे डोळे फिरवत रागाने कमरेवर हात ठेऊन त्यांच्याकडे बघत होता. 

" माझं सगळं काम खराब केलंश. आता आजीला खाऊ कसा देणार मी? रिकाम्या हाताने जाऊ आजीकडे? "

" कोण म्हणालं तुला असं? मी देते ना लाडू काढून डब्यातून. राजा, तो डबा प्लास्टिकचा आहे. तू हातोडी मारली असतीस तर डबा आणि लाडू दोन्ही फुटले असते ना! " 

" मग ती टीव्हीतली आजी का दब्याच्या जाकणावर बत्ता मारते? " सुमाचा बालसुलभ प्रश्न.

" तिचा डबा किनई पितळेचा असतो. त्याचं झाकण घट्ट बसतं मग ते उघडण्यासाठी बत्ता किंवा हातोडा वापरावा लागतो. " 

डबा उघडून त्यातले लाडू काढून ते सुमाच्या मोठ्या सुट्टीच्या डब्यात भरत तीनं त्याचं कारण स्पष्ट केलं. 

" पण मला सांग सुमा तू मला नाहीतर आईला का उठवलं नाहीस? ही सगळी परेड एकटाच का करत होतास? " 

भूपनं त्याला पाठंगुळीला मारत विचारलं. 

" बाबा, तू पण ना विसरुनच जातोस. काल नाही का आज्जीनं सांगितलं; आईला बाळ होणारे. म्हणून तिला आराम करायला हवा. त्रास द्यायचा नाही असं. " 

सुमानं बाबाच्या डोक्यात टपली मारली. बाथरुमकडे जाणाऱ्या भूपनं निमाला डोळा मारला आणि म्हणाला, 



" खलंच विशललो की मी. सुमाा आमचा शाना आहे आणि सुमाचा बाबा वेडा. " 

सुमानं लगेच त्याच्या गालाची पप्पी घेतली. 

" सुमा शहाणा आहे मग सुमाचा बाबापण शहाणाच असणार. हो किनई आई? " 

तिनं हसून मान डोलवली.

मग सगळ्यांचं सकाळचं आन्हिक आटपून उमाताईंना आणायला जायची तयारी केली. पण दाराबाहेर पडल्यावर सुमा म्हणाला, " आई तू येऊ नकोस. इथेच थांब. आजीला मी आणि बाबा घेऊन येतो. तुला गाडीत त्रास होईल ना! " " बरं रंगनाथ आजोबा, तुम्ही जा हं! आणि आजीला घेऊन लवकर या. " तिनं सुमाचा गालगुच्चा घेऊन त्याला टाटा केलं. 

आता उमाताईना येऊन १५- २० दिवस झाले होते. त्यांना आपण भूपची आई आहोत ही गोष्टच आठवत नव्हती. त्यांना हेच वाटत होतं की निम्नाच त्यांची मुलगी आहे आणि भूप त्यांचा जावई. यायच्या आधी त्यांनी सुमाला खूप समजवलं पण तोही शेवटी हट्टी आईबापाचा हट्टी पोरगा. आलाच आजीला घरी घेऊन. आजी घरी आल्यापासूून त्यानं त्याची दिनचर्याच बदलून टाकली होती. सकाळी लवकर जायला लागायचं त्याला शाळेत. ११-११:३० वाजता आला की अम्मा असायच्या घरी. ड्रायव्हर त्याला अम्मांच्या ताब्यात देऊन भूपच्या ऑफिसवर निघून जात असे. तरी हल्ली निम्ना घरी होती म्हणून तो खुष होता. नाहीतर अम्मा त्याला जेऊ खाऊ घालून दाबून दमटून झोपवायच्याच. मग संध्याकाळी उठून तो आणि अम्मा जवळच्या पार्कमध्ये खेळायला जायचे. अम्मा चाले चालेपर्यंत हा पाय लावून पळत पार्कात पोचून जुना झालेला असायचा. त्याला अंधार पडल्यावर तिथून घेऊन यायचं म्हणजे अम्मांसाठी रोज नवा टास्क असायचा. निम्ना होती घरात तर तो ती आणि सोबतीला अम्मा मिळून खूप सारे खेळ खेळायचे. हल्ली निमा तिच्या प्रॉडक्शन हाऊसलाच असायची बरेचदा. खूप सारं काम व्हिडिओ कॉलिंगवर व्हायचं नाहीच तर मग ती सुमाला घेऊन जायची तिथं. सुमाला तर जसं काही नवं कुरणच मिळायचं तिथे. त्याच्या आवडत्या गोष्टी शोधून तो एक कोपरा पकडून बसायचा. स्टेपलर, शार्पनर, पेन्सिल, रंगीत मार्कर पेन, पांढरे-रंगीत कागद, पंचिंग मशीन असा सगळा जामानिमा घेऊन तो एडी बॉक्सच्या एका कोपऱ्यात पडीक पडलेला असायचा. शेकडाभर पेन्सिली शार्प केलेल्या, भोकं पाडलेले ढिगानी कागद आणि सगळ्या दुनियाभर पसरलेले मार्कर असं त्याचं जग त्या कोपऱ्यात उभारलेलं असायचं. पण आता मात्र सगळं काही बदलून गेलं होतं. तो आणि त्याची आजी; जग दोघांमध्येच सामावून गेलं होतं. शाळेतून आलं की आजीकडून भरवून घ्यायचं, तिला शाळेतल्या गंमती सांगायच्या, रुझुची हुल्लडबाजी सांगायची, बाईंचे शेरे ऐकवायचे. मग तिच्याकडून गोष्ट ऐकत झोपायचं. संध्याकाळी तिला हाताला धरुन पार्कात न्यायचं. थोडं खेळायचं आणि थोडं आजीसोबत फिरायचं. संध्याकाळी पुन्हा सायंप्रार्थना करायची जेवायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं. असा त्याचा रोजचा शिरस्ता चालू होता. 

त्यादिवशी भूप दुपारी जेवायला घरी आला. तसं त्याने निमाला आधी सांगितलं होतं म्हणून मग तिनं ऑफिसला जाणं रद्द केलं आणि मिराजला फोन करुन सगळं मँनेज करायला सांगितलं. उमाताई सुमिलला घेऊन बेडरुममध्ये झोपल्या होत्या. जेवण करुन दोघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. 


"

ज असं दुपारी घरी यायचं कसं ठरलं तुझं? अँन्डी नव्हता का?"



"होता की. तो कुठे जातोय! ते मेहता आणि मेहता सोबतचं कॉन्ट्रँक्ट फायनल झालं. मग म्हटलं घरी जाऊ जेवायला. गंध्यासुद्धा येणार होता. पण मध्येच त्याला लेकाच्या शाळेत जावं लागलं. साहेबांनी कुणालातरी धू धू धुतलंय असं सांगत होत्या बाई. मग त्याला शाळेत सोडलं आणि मी घरी आलो. म्हणून मला एवढा उशीर झाला." 

मग शाळेच्या विषयावर एकमेकांच्या लहानपणीच्या शाळेतल्या, कॉलेजमधल्या आठवणी निघाल्या. निमाला पुन्हा एकदा त्याच्या लास्ट ईअरच्या पेपरातली गंमत आठवली. आणि ती ते सगळं आठवून पुन्हा हसायला लागली.

"किती वेडा होतास तू तेव्हा! काय तर म्हणे त्या वायरींमध्ये तुला मी आणि तू दिसत होता. ए, काय झालं असतं तेव्हा मिथिल नसता तर? तू आपटीच खाल्ली असतीस सपशेल तिही शेवटच्या वर्षी आणि एटीकेटी लागली असती ना?"

"नाही गं! शेवटच्या वर्षाला कशी एटीकेटी लागेल! डायरेक्ट नापास आणि लेक्चर ऐकावं लागलं असतं आमोद रंगनाथांचं."

"ए, उगाच बाता नको मारुस. मी कधीच पप्पांना फारसं बोलताना ऐकलं नाही; लेक्चर कसले देणार?"

"बरं झालं नाही ऐकलंस ते! नाहीतर माझ्यासोबत राहण्याचा कधीच विचार केला नसतास."

"चल त्याचा काय संबंध? मी तर मिथिलसुगमामुळे माझा विचार बदलला. ते दोघे असते तर सुमा आपला नसता आणि आपण कधीच सोबत राहिलो नसतो कारण मला शब्द मोडायला आवडत नाही."

"खरंय गं तुझं! मी त्यासाठी त्यांचे खूप आभार मानतो. पण मला खात्री आहे की ते दोघे असते तरी सुगमानं तुला लग्नासाठी नक्की तयार केलं असतं. ती माझी रादर आमच्या सगळ्यांची खूप लाडकी मैत्रीण होती. का नेलं तिला असं?"

तिच्या आठवणीनं भूपला भरुन आलं. निमा उठून त्याच्या शेजारी बसली. तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन तो मुसमुसत राहिला.

"श्श्! शांत हो. आत आई आणि सुमिल झोपलेत तुझ्या अशा वेड्यासारख्या वागण्यानं ते जागे होतील. सकाळी लवकर उठतात ना ते दोघे!"

डोळे पुसून आपल्या भावनांना आवर घालत तो म्हणाला, "निमू आपण चुकीचे वागलो का गं? हे असं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून चूक केली का गं आपण?"

"असं का वाटतंय तुला? आणि तेही इतक्या वर्षांनी जेव्हा मी आपल्या बाळाची आई होणार असताना?"

"काही नाही गं सहजच वाटलं आपलं. आईला जर डिमेन्शियाचा आजार झाला नसता तर तिला आठवलं असतं ना की ती तुझी आई नाही सासू आहे म्हणून? तेही न झालेल्या लग्नातून मिळालेल्या सुनेची? त्यात तिला नेहाबद्दल काही म्हणजे काहीच आठवत नाही. ती जेव्हा कधी शाल्मलीला घेऊन येते तेव्हा भैय्या तिची वहिनीची मैत्रिण म्हणून ओळख करुन देतो. तिला काही फरक पडत नाही त्यानं. तिला जर आठवत असतं तर तिनं तुझ्या माझ्या या अशा नात्याला कधीच स्विकारलं नसतं. किती वेगानं सगळी समीकरणं बदलून गेली ना! किती अचानक ती तुझी आई आणि माझी सासू झाली. समज जर आता तिला जुनं काही आठवलं तर? ती सगळं विसरुन जाईल का गं? तुझं रात्रीचे तिचं पाय चेपणं, तिला स्वतःच्या सख्ख्या आईसारखं जपणं, तिच्या विसरण्याच्या आजाराला विसरुन तिची काळजी घेणं हे सगळं विसरुन ती पुन्हा पहिल्यासारखी तुझ्या विरोधाची सतार छेडेल का?"

"भूप, किती विचार करतोयस तू! परिस्थिती कधीच आपण म्हणू ती नसते. ती ती असते जशी काळ ठरवत असतो. यावर मला एका नाविकाचं वक्तव्य सारखं आठवत राहतं. तो म्हणतो जहाजावर रोज मला हवी तशीच परिस्थिती असते. म्हणजे कशी तर जशी असेल तशी मी तिला स्विकारतो म्हणून ती माझ्या मनासाखी असते. आणि तुला आपल्या ह्या नात्याचा प्लस पॉईंट जमेची बाजू सांगू? आपण लग्न केलं नाहीए. समज अगदी वाईट परिस्थितीत आईंना जुनं सगळं आठवलं, त्या पुन्हा माझ्या विरोधात उभ्या राहिल्या, तुला घरी परत नेण्याचा अट्टाहास केला तर आपण सहज वेगळे होऊ शकतो."

"निमू!" तो त्या विचारानंच धास्तावला.

"किती सहज बोलतेयस तू हे सगळं? आपल्या बाळाची आई होणार असताना तू आपण विभक्त होण्याच्या गोष्टी कशा करु शकतेस?"

"श्श्! हळू ना बाबा. ती दोघं झोपलीत आत. आणि मी वेगळे होतोय असं नाही म्हटलं. मी म्हटलं अत्यंत वाईट परिस्थितीत असं काही घडलं तर हे होऊ शकतं असा एक विचार मांडला. आपण फक्त होप फॉर बेस्ट करु. तेवढंच हातात आहे आपल्या असं म्हणायचंय मला."

त्यानं पटकन् तिला जवळ घेतलं.

"असा विचारही मनात नको आणूस. आईला काही आठवो वा न आठवो तू मी वेगळे नाही होणार भले मला आयुष्यभर तुझ्याशी बिनलग्नाचा संसार करावा लागला तरी चालेल! पण आता निम्नाशिवाय भूप आणि भूपशिवाय निम्ना नाही राहणार. खूप सहन केलंय विरहाचं जगणं. या अशा बिनलग्नाच्या नात्याचं सामाजिक, कौटुंबिक, मानसिक दडपण खूप झेललंय आपण. लग्न केलं असतं तर ते मोडण्यासाठी खूप साऱ्या कायदेशीर बाबींमधून जावं लागलं असतं. पण आपल्या नात्यात कुणीही कधीही नात्याला विराम देऊन जाऊ शकण्याची शक्यता असताना ना तू मला सोडून गेलीस ना मी तुला. यापुढेही हे नातं असंच जिवापाड सांभाळायचंय मला."



निमा नुसतीच त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत राहिली. त्या दोघांना हे मात्र माहीत नव्हतं की आतमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून उठलेल्या उमाताईंनी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. 

दिवस जसे उगवत होते तसेच मावळत होते. कालचक्र त्याच्या गतीनं चालत होतं. उद्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे माणसाला कधीच कळणार नाही. आणि त्याचा आज मात्र उद्यासाठी जळणारच आहे. 

दोन दिवसांनी सुमिल दुपारी शाळेतून घरी आला तर अम्मा त्याला म्हणाल्या की आजी बाहेर गेलीय आज माझ्याच हातून जेव. सुमिलनं शहाण्यासारखं जेवून घेतलं आणि तो खोलीत जाऊन रंगकाम करत बसला. खूप उशीर झाला तरी आजी आली नाही म्हणून आधी त्यानं निमाला फोन करुन कळवलं की आजी बाहेर गेलीय ती आलीच नाही म्हणून. मग बाबालापण फोन करुन सांगितलं. उमाताई आल्या नाहीत म्हटल्यावर भूप प्रचंड अस्वस्थ झाला. सुसाट वेगानं ट्रफिकमधून अँन्डीची बाईक घेऊन तो घरी येऊन पोहचला. तर निमा अजून बाहेरच पडली नव्हती ऑफिसमधून. त्याला थोडं आश्चर्यच वाटलं तिच्या थंडपणाचं. पण ती येईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचं म्हणून त्यानं आजूबाजूच्या पोलिसठाण्यात फोन करुन तिथले मोबाईल नंबर घेऊन उमाताईंचे फोटो त्या त्या नंबरवर पाठवून दिले. अंकित आणि श्रुतीलाही फोन करून बोलवून घेतलं. ते दोघे येऊन पोहचले तेव्हा संध्याकाळचे ७ वाजत आले होते आणि तरीही निमाचा काहीच पत्ता नव्हता. अम्मा ह्या सगळ्या गोंधळामुळं घरी गेल्याच नव्हत्या. भूप काही कारणासाठी खोलीत गेला तर त्याला तिथल्या कॉर्नर टेबलावर एक चिठ्ठीवजा कागद सापडला. त्या चिठ्ठीवरचं अक्षर त्याच्या ओळखीचं होतं. उमाताईंनी लिहिली होती ती चिठ्ठी निम्नाच्या नावाने.

प्रिय मुली,

हो मुलगीच आहेस तू माझी. माझ्या विस्मरणाच्या आजारामुळे मला नव्याने कळलीस तू. खरंच मी खूप चुकीची वागले तुझ्याशी, माझ्या लेकाशी. तुमचं प्रेम मला समजलंच नाही गं! परवा तुम्ही बोलत असताना मी सगळं ऐकलं आणि मला माझ्या त्या निर्णयाचा फार पश्चात्ताप झाला. तू आणि भूप लग्न न करता सोबत राहिलात आयुष्यभर तरी माझी काही हरकत नाहीए. असेच एकमेकांवर प्रेम करत रहा. तुमच्या प्रेमाला कुणाची नजर न लागो. बाकी कुणाची नसली तरी माझी नजर नक्कीच लागेल अशी भिती वाटली म्हणून मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जात आहे. आमोदना सांभाळा. दोन्ही लेकरांना खूप सारं प्रेम द्या. भूप तुझ्या येणाऱ्या बाळाला माझे खूप सारे आशिर्वाद.



निरोप द्या.

तुमची अपराधी

सौ. उमा आमोद रंगनाथ...

अंकितचं पत्र वाचून संपलं आणि भूपचा ओढून ताणून आणलेला सगळा धीर खचला. 

"आई, तू का गेलीस गं मला असा सोडून? मी रागवलो असलो तुझ्यावर तरी तू हवी आहेस गं मला. माझ्या प्रेमाला तुझी कधीच नजर नाही गं लागणार. आई परत ये."

अंकितला त्याचं हे रुप नवीनच होतं. त्याला कळेचना की भूपला कसं सावरावं. तो दिड़ग॒मूढ नजरेनं त्याला बघत राहिला. श्रुती स्वतःचे अश्रू आवरुन त्याच्या पाठीवरुन हात फिरवत होती. इतक्यात तिथे निमाचा आवाज घुमला,

"भूप रडू नकोस. आई कुठेच गेल्या नाहीत. या आई."

निमाच्या पाठोपाठ आत येणाऱ्या उमाताईंना पाहून झटक्यात उठून भूपनं त्यांना मिठी मारली आणि पुन्हा लहान मुलासारखा रडू लागला. 


"भूप वेड्यासारखा वागू नकोस. त्यांना बसव तिथं सोफ्यावर. दिवसभर काही खाल्लं असेल नसेल त्यांनी. अम्मा पाणी आणा आणि आईसाठी कॉफी ठेवा. थोड्या वेळानं सगळे जेवायला बसणार आहेत. पार्सल मागवलंय. आमच्यासोबत तुम्हीही बसा जेवायला. आणि आजीचं बारकं वासरु सुमा कुठाय?"

पाण्याचा ग्लास आणून देत अम्मा म्हणाल्या, " वो रुममें दिदी के साथ खेल रहा जी. बोलवू काय त्याला?"

पण निमानंच हाक मारली.

"सुमा, रुझू पटकन् बाहेर या. आजी आलीय बघा."

दोन्ही पोरं धावत बाहेर आली. आतापर्यंत बाबानं फर्मानं सोडल्यामुळं दोघंही नुसतं डोकावण्याशिवाय काहीच करत नव्हती. आजीनं दोघांनाही पोटाशी धरलं. हळूहळू सगळ्यातून सावरलेल्या अंकितनं विचारलं, "तुला आई कुठे भेटली? आणि तू इतक्या उशीरा का आलीस?"

"कारण मी आईंना मोबाईलवरुन ट्रँक करत होते."

"म्हणजे? तुला माहीत होतं ती घर सोडून गेली ते?"

"नाही तुझ्यासारखंच मलाही सुमानं फोन करुन सांगितलं आजी नाही आली म्हणून. त्या घर सोडून गेल्यात वगैरे हे आत्ता कळलं मला. जेव्हा भैय्या पत्र वाचत होता तेव्हा. तोवर माझी समजूत होती की त्या रस्ता विसरल्या असाव्यात म्हणून."

"पण मग ती तुला भेटली कशी?"

"तायडे, जसं भैय्यानं आजूबाजूच्या पोलीस चौकीत आईंबद्दल कळवून ठेवलंय तसंच आई ईथे आल्यावर आम्हीही कळवून ठेवलं होतं. पण मला सारखं वाटत होतं की याचा फारसा उपयोग नाही व्हायचा. म्हणून मग मी अशा डिजीटल उपकरणाच्या शोधात होते जे आईंच्या नकळत त्यांचा पाठपुरावा करेल. माझ्या नशीबानं मला पेन कँमेरासारखी छूपी डिजीटलं यंत्रणा इन्स्टॉल करणारी न्यू व्हिजन्स नावाची कंपनी माहीत होती. त्यांनी माझ्या एका साय-फाय सिनेमाच्या वेळेस त्याची प्रत्यक्षिकं दाखवली होती. आईंच्या नकळत मी ते त्यांच्या बॉडीवर फिट केलं आणि त्याचा ट्रँक माझ्या मोबाईलला जोडून घेतला. त्यामुळे आता त्यांची कितीही ईच्छा असली तरी त्या आपल्याला सोडून कुठेही जाऊ शकणार नाहीत."

सगळ्यांना निमाच्या ह्या कामाचं फारच कौतुक वाटलं. भूपनं आईला विचारलं, 

"आई बघितलंस का? तुझ्या ह्या बिनलग्नाच्या सुनेनं तुला कसं परत आणलं ते! आता तू कितीही विसरलीस तुमचं नातं काय तरीही काही फरक पडणार नाही बघ! सासू हो नाहीतर आई हो ही तुझी सून कम लेक तुला म्हणूच देणार नाही तुझे नी माझे नाते काय?"

यावर तिथे जमलेल्या सगळ्यांमध्ये एकच हास्याची लकेर पसरली.

त्यानंतर रंगनाथांच्या घरात पहिल्यांदाच असं घडलं की आईबापाच्या लग्नाला थोरला ७ वर्षांचा आणि धाकटी दीड महिन्यांची होती....

शुभ मंगल सावधान...

स्वरा....

........समाप्त...........


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama