Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Namarata Pawaskar

Romance Fantasy


3  

Namarata Pawaskar

Romance Fantasy


अनोळखी परिचित

अनोळखी परिचित

69 mins 429 69 mins 429

"हे अति होतंय तुझं आता! तुझ्या प्रत्येक वाक्यागणिक तू माझ्या चुकांची गणती का करतोयस? तुला असं वाटतंय का कि तू फारच धुतल्या तांदळासारखा आहेस? हे बघ राविश, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक निर्णयामध्ये फक्त माझ्या एकटीची चूक नाहीये. तुही तेवढाच जबाबदार आहेस हे मुळीच विसरू नकोस तू! लग्न झाल्यानंतरचा तू आणि लग्नाला ५ वर्ष झाल्यानंतरचा तू? बघितलंस का कधी किती फरक पडलाय तुझ्यात ते?... "

 "अच्छा म्हणजे तू तेव्हा जशी होतीस तशीच आता आहेस असं तुला म्हणायचंय का? तद्धन खोटं आहे हे! एक ती मृगा होती आणि एक हि मृगा आहे. माझं जगणं मुश्किल करून टाकलाय ह्या बाईने! छळ मांडलाय आयुष्याचा नुसता... कामही करायचं, पैसाही मिळवायचा, आयुष्यात सगळ्या सुखसोयी हव्यात आणि जरासा वेळ कमी पडला तर त्याही आघाडीवरून माझ्यावर शेरे ताशेरे आहेतच ठरलेले तुझे. तरी बरं तुही नोकरी करणारी आहेस म्हणून आणि आपल्याला अजून मुलबाळ नाहीये म्हणून."

 "का? का झालं नाही आपल्याला मुल? कारण तुला तुझ्या कामातून कधीही माझ्याकडे बघायला वेळच नाहीये रे! मी घर बघायचं, ऑफिस बघायचं, तुझे-माझे, घरचे-बाहेरचे नातेसंबंध सांभाळायचे आणि या सगळ्यातून काही थोडासा वेळ काढून तुझ्या सोबतीत बसायचं म्हटलं कि आहेच तुझ्या त्या भुक्कड बॉसचा फोन ठरलेला. काय रे नय्यर गे वगैरे तर नाही ना? आणि तू त्याचा लाडका बिडका?..."

 "अगं माझे आई बास! बास कर हे आरोपांचे गलिच्छ शिंतोडे माझ्या चारित्र्यावर उडवणं. मी अजूनही काल होतो तसाच नॉर्मल आहे. मला तर वाटत कि तूच मला कंटाळली आहेस आणि तुझ्या त्या सो कॉल्ड ऑफिशिअल मैत्रिणीसोबत मजा मारण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढतेस. "

 "रावीशऽऽऽ! "

 "आवाज चढवू नकोस मृगा. तुला काय वाटत गं! मी काय महाभारतातला धृतराष्ट्र आहे? की डोळ्यावर गांधारीची पट्टी ओढून बसलोय? मला दिसत नाही का कि वीक एन्डच्या दिवशीपण तुला तुझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचं असतं ते! मी बिचारा तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतो आणि तू एकदा बाहेर गेलीस कि उगवतेस कधी तर रात्री उशिरा तीही पार पावलाचं भान नसलेल्या अवस्थेत! काय बडबडत होतीस त्यादिवशी? कोण तुझा तो मित्र... हा! आठवलं टीम कि टॉम असं काहीतरी. त्याला सांगतेस तू? आपल्या दोघांत जे काही होत ते! "

 "प्लिज हं! तो काही कुणी बाहेरचा नाहीए. टॅमी म्हणजे तनमीत माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि असं तर मुळीच नाहीए कि तू त्याला ओळखत नाहीस. तरी बरं एकाच कॉलेजमध्ये होतो आपण सगळे. "

 "अरे म्हणून काय तू आपलं वैयक्तिक आयुष्य असं कुणाशीही डिस्कस करणार का? मला हे अजिबात चालणार नाही."

 " मग मलाही नाही चालणार तुझं शरयूशी सोशल मीडियावरून चॅट करणं. तुला काय वाटलं मला माहित नाही तू तिच्याशी कसल्या गप्पा मारतोस ते? मी किती अनरोमॅंटीक आहे आणि बेड वर कशी तुला अजिबातच साथ देत नाही हे रंगवून सांगतोस तिला तू?"

 "काहीही काय बोलतेयस मृगा तू? मी असं काही तिला कशासाठी सांगेन? मी इतका निर्लज्ज नाहीये कि माझी बायको कशी आहे बेडमध्ये आणि कशी नाही या बेडरूममधल्या खाजगी गोष्टी गावभर करेन. ते काम तूच जास्त चांगलं करतेस तुझ्या त्या लाडक्या टॅमीसोबत."

 "अजिबातच नाही रावीश. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे मी त्याला आपल्यात घडणार सगळं सांगते असं होत नाही."

एकाला लागून एक असा मुद्द्यामागुन मुद्दा पटावर येत होता. संया श्रावस्ती मॅडमची केबिन नुसती यांच्या वादंगाने भरून गेली होती. कितीही आवरायचं प्रयत्न केला तरी एक थांबला कि दुसरा काही ना काही उकरून काढत होता. अचानक तिथे आलेल्या गीतच्या आवाजाने सगळेच गप्प झाले.

 "काय चाललंय? शिकलेली माणसं आहात तुम्ही आणि असे मासळीबाजारात उभे असल्यासारखे भांडताय? "

 "मीच वैतागलेय यांना. किती प्रयत्न करायचे समजवायचे आणि शांत करायचे? एक झालं कि एक चालूच आहेत कुरापती काढणं. मला तर समजेनासंच झालंय गीत नक्की कुणाची बाजू घेऊ? इतका गोंधळ माजवलाय या दोघांनी माझ्या मेंदूत. "

 " नॉट टू वरी संया. आय विल सॉर्ट आऊट धिस. यु गाईज प्लिज काम डाउन. तू... अं! काय नाव तुझं?"

 "मी मृगा."

 "ओके. आणि तू?"

 "तो माझा नवरा रावीश."

 "मला वाटतं त्याला बोलता येतंय. तू इथेच थांब रावीश. मृगा माझ्यासोबत येईल. संया तू याची बाजू ऐकून घे मी हिची बाजू समजावून घेतो. उद्या बघू याच्यावर काय करायचं ते! "

 "थँक्स गीत तू आहेस म्हणून आयुष्य सुरळीत चाललंय बघ. " 

 "ईट्स ओके डिअर. चल आधी हा मॅटर सॉर्ट आऊट करू. "

मृगा गप उठून गीतसोबत त्याच्या केबिनमध्ये गेली. आणि रावीश संयाच्याच केबिनमध्ये थांबला.

मृगा आणि रावीश दोघेही उच्चशिक्षित. आपापल्या योग्यतेप्रमाणे चांगल्या पद आणि पगारावर एम एन पी मध्ये नोकरीला. पैशांची अजिबात ददात नाही. दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम. लव्ह कम अरेंज मॅरेज झालेलं. पहिली १- २ वर्ष खूप छान मजेत गेलेली. मग हळूहळू जबाबदाऱ्यांनी आपले पाश आवळायला सुरुवात केलेली. आता कोण कधी येतो घरात कधी बाहेर जातो याची कोणालाही पत्ता नाही; असणार कुठून? घरात २चं माणसं, ती आणि तो. येऊन जाऊन तिसरं माणूस म्हणजे घरकाम आणि स्वयंपाकाला येणारी गोदा. कुणी कुणाला उशिरा येण्यासाठी प्रश्न विचारायचे आणि कुणी कुणाला उत्तरं द्यायची हाच मोठा प्रश्न. आधी सगळे सोबत रहायचे. दीपेन-दीप्ती म्हणजे रावीशचे आईबाबा आणि हि दोघजणं. मग प्रायव्हसी मिळत नाही. कामाचं ठिकाण लांब पडतं. येण्याजाण्यात खूप वेळ वाया जातो. अशा क्षुल्लक कारणांवरून नवं घर घेतलं. तिकडे शिफ्ट झाले. मग आईबाबांनीही यांच्या संसारातून काढता पाय घेतला. त्यांनी सरळ शहरातील राहतं घर विकून त्यांच्या मूळ छोट्या गावात नवं घर घेतलं आणि निवृत्तीपूर्व रिटायरमेंट घेऊन शांत आयुष्याला पुन्हा सुरुवात केली होती. मग मात्र आयुष्य जरा जास्तच गुंतागुंतीचं झालं. दोघानांही घराचे हप्ते भागवायचे, क्रेडिट कार्डवरचे पैसे चुकवायचे, गाडीचा मेन्टेनन्स द्यायचा, पेट्रोल- डिझेलचा खर्च, शिवाय ऑफिसमध्ये होणाऱ्या पार्ट्यांसाठीची खरेदी, असंच मूड झाला म्हणून केलेली खरेदी, अशा अनेक गोष्टींचा ताळमेळ सांभाळावा लागला. त्यांची अवस्था आता घी देखा मगर बडगा नाही देखा अशी झालेली. या सगळ्याचा परिणाम म्हणून रात्र दिवस, काळवेळ कशाचाही विचार न करता दोघे सतत कामाचं जोखड घेऊन जगत होते. आता ५ वर्षांनी या सगळ्याची निष्पत्ती हि झाली कि दोघेही संयाकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी आलेले.

............................

 (२)

पण संयाकडे येऊन त्यांच्यातल्या वादाने खूपच गंभीर रूप धारण केले. दोघेही एकमेकांचे अक्षरशः वाभाडे काढत होते. नको नको ते सगळे आरोप एकमेकांवर लावत होते. एका अनोळखी तिसऱ्या माणसासमोर एकमेकांचे कुणालाही दाखवू नयेत असे सगळे क्षण उघडेनागडे करून मांडत होते. त्यांना तिथे कसलाच धरबंध उरला नव्हता. गेला जवळपास तास दोन तास दोघेही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत संयाच्या डोक्याला ताप होऊन बसले होते. गीत जर तिथे आला नसता तर कदाचित संयाच्या डोक्याचा भुगाच झाला असता. ती फक्त एक वकील नव्हती तर कौन्सिलरपण होती. ती आणि गीत दोघेही त्यांचं नवराबायकोचं नातं घरात ठेऊन येत. इथे अँबेसित ते एकमेकांचे सहकारी, मित्र हे नातं सोबत घेऊन वावरत. आजही ह्या दोघांचा बराच वेळ चाललेला गोंधळ शेजारच्या केबिनमध्ये बसलेला गीत ऐकत होता. जेव्हा त्याच्या लक्षात आलं कि हे दोघेही तिच्या आटोक्याबाहेर जात आहेत; एका क्षणात तो उठून संयाच्या केबिनमध्ये आला. सगळा मामला सॉर्ट करून मृगासोबत निघूनपण गेला. मागे संयाच्या केबिनमध्ये उरले फक्त दोघे; संया आणि रावीश. गीत आणि मृगा गेले त्या दिशेने रावीश हताशपण बघत राहीला. संयाला त्याची अवस्था कळत होती. आजवर तिच्यासमोर अशी अनेक नाटकं -महानाटकं घडून गेली होती. कधी दोघेही चुकीचे असत पण स्वतःची चूक त्यांना मान्यच नसे. कधी एक चुकीचा एक बरोबर असे. पण बहुतेकदा या सगळ्याची परिणती घटस्फोटाच्या नकोशा निर्णयातच होत असे. तिला खूपवेळा हे सगळं होऊ नये असं वाटत असे पण दोन्ही पक्ष स्वतःच्या अडेलतट्टूपणाच्या पायरीवरून खाली उतरत नसत. आताही तिला त्या दोघांच्या भांडणांतही त्यांच्यातलं प्रेम दिसत होतं. तिला हे नीट लक्षात आलं होत कि त्या दोघांमधला नेमका प्रॉब्लेम काय आहे? एकमेकांना देण्यासाठी वेळ ते बाजूलाच काढत नव्हते. एकमेकांसाठी कदाचित खूप दिवसात त्यांनी आभारी आहे, चुकलं माझं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझी गरज आहे, तू आहेस म्हणून शक्य आहे अशा मनाला उभारी देणाऱ्या शब्दांची मदतच घेतली नसावी हे संयाला कळायला वेळ नाही लागला.

"घे पाणी पी. "

 तिने टेबलावरचा पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरला. आपली खुर्ची सोडून ती त्याच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसली. पाण्याचा ग्लास बाजूला ठेऊन रावीश मान खाली घालून बसला होता. तिने त्याचा हात हातात घेतला. 

" रावीश तू मला वकील किंवा कौन्सिलर समजण्यापेक्षा मैत्रीण समज. नाहीच तर मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे म्हणून तू मला मोठी बहीण समज. ती असती तर तिला मनातलं सगळं सांगितलंच असतसं ना! त्याच हक्काने मला सांग. काय झालंय? खूप प्रेम आहे ना एकमेकांवर तुमचं? मग कशासाठी हवाय घटस्फोट? फक्त सोबत राहू शकत नाही म्हणून? कि एकमेकांसोबत जुळवून घेता येत नाही म्हणून? हे बघ, प्रत्येक माणूस मुळातूनच वेगळा असतो. तू माझ्यासारखा किंवा मी तुझ्यासारखी असत नाही. असतात काही गोष्टी दोघांमध्ये समान म्हणून येतात माणसं जवळ. पण तुला माहित आहे का? कि चुंबकाचे गुण माणसालाही लागू होतात रे! " 

त्याने खट्कन मान वर करून संयाकडे पाहिलं. तिने तरीही तीच बोलणं चालूच ठेवलं.

 "हो अरे खरच सांगतेय मी. म्हणजे बघ हं! सजातीय चुंबकीय ध्रुव एकमेकांच्या जरा जरी कक्षेत आले तरी ते सामान गुणधर्मामुळे दूर फेकले जातात. तर विजातीय चुंबकीय ध्रुव टोकाच्या विरोधी गुणधर्मांमुळे एकमेकांकडे खेचले जातात. तुमच्यात काय होत? म्हणजे तुम्ही सजातीय ध्रुव की विजातीय रे? "

 संयाच्या अशा मोकळ्या ढाकळ्या बोलण्यानं रावीशच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर पसरली.

 "माझी मोठी बहीण जर तुझ्यासारखी असती तर आज मृगा आणि मी इथे नसतो. त्याऐवजी आमच्याकडे आईबाबा आणि आमची एखाद दोन कार्टून असं छान घर असत आमचं. "

 "अरे मग आता कुठे काय बिघडलंय? अजूनही हे सगळं होऊ शकतं. याद रख बंदे जब आँख खुले तब सवेरा."

 "पण आँख काय अशी वकिलांच्या एम्बसीत येऊन उघडते का गं? तिला खूपदा सांगितलं मी की आपण दोघे बसून यावर विचार करूया. पण दरवेळी दोघे बोलायला बसलो की कधी मुद्दे गुद्द्यावर येतात समजतच नाही. "

 "त्यासाठी तर आहोत आम्ही. आमच्या माध्यमातून बोला तुम्ही. कधी कधी माध्यमं खूप फायद्याची ठरतात बघ. पण आमच्या माध्यमातून बोलण्याआधी तुला तुम्ही आजच्या परिस्थितीत कसे पोचलात ते सांगावं लागेल."

 "नक्कीच. मला ती हवी आहे. तिचं प्रेम हवं आहे. आमचं लग्न हवं आहे. आमचं कुटुंब हवं आहे."

" फार काही जगावेगळी कहाणी नाहीए आमची.अगदी साधी सोपी आटपाटनगरातली गोष्ट.एक होता तो आणि एक होती ती.एकमेकांना भेटले,मैत्री झाली,काळजी वाहता वाहता प्रेमात पडले. बरं, घरूनही काही विरोध वगैरे नव्हता.त्यामुळेआमचं छान सगळ्या रीती रिवाजांसकट लग्न झालं." तो हळू हळू त्याच्या त्या धुंद आठवणीत हरवत होता.

"तुला सांगतो संया फारच मोरपंखी रेशीम दिवस होते ते. हनीमूनच्या निमित्ताने अर्धं जग भटकून आलो आम्ही. तिच्या सोबतीनं अनवाण्या पायांनी गर्द हिरव्या सावलीत हायवेवर चाललो. काळोख्या रात्री चांदण्यांची शाल पांघरलेल्या आभाळाखाली निवांत विसावलो. नितळ पाण्याच्या तळ्यातलं निळ्याभोर आकाशाचं प्रतिबिंब दोघांनी मिळून पाहिलंय. आई-बाबा दोघांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं ठरवून साजरे केलेत. कितीतरी सहलींच्या, भटकंतीच्या, सणावारांच्या आठवणी मी तिच्या असण्याच्या सोबतीनं साजऱ्या केल्यात. ते आनंदाचे क्षण इतक्या लगेच संपतील असं कधी वाटलंच नाही. मी तर सगळं आयुष्य तिच्या सोबतीनं घालवायचं स्वप्न पाहिलं होतं..."

 "पाहिलं होतं? होतं म्हणजे काय? आता नाहीए असं काही म्हणायचंय का तुला?"

 "आता हिच्यासोबत कोण राहिल? सतत तिला येणंजाणं, खाणंपिणं, उठणंबसणं असे अपडेटस् द्यावे लागतात. जसं काही मी हिला सोडून बाहेर लफडी करत फिरतो. ती करण्याएवढा तरी वेळ मिळायला हवा ना! दोनच वर्षं झालीत प्रमोशन होऊन. कामाचा इतका व्याप वाढलेला आहे की शरयूशी ऑफिसमध्येही बोलता येत नाही. लफडी कसली डोंबलाची करतोय मी! त्यादिवशी विदुरच्या लग्नाची बातमी कळली; मग लग्न ठरण्याच्या बहाण्याने सगळ्यांनी त्याच्याकडे पार्टी मागितली. मग हो ना करता करता सिनेमा बघायचा ठरला. ऑनलाईन तिकीट बुक करुन सगळे मर्डर बघायला गेलो संध्याकाळच्या शोला. आमचा सगळाच ग्रुप तसा मँच्युअर विचारांच्या लोकांचा आहे. आणि जेव्हा कधी सिनेमा-नाटक पाहणं होतं, एखादी कथा-कविता वाचणं होतं, कुणी एखादं प्रदर्शन वगैरे पाहून येतं तेव्हा त्याच्यावर साधकबाधक चर्चा होते आमच्यात."

 "अरे वा! म्हणजे हे सगळं कधी करता तुम्ही कामाच्या रगाड्यातून?"

 "अगं काढतो आम्ही कधी कधी वेळ. रोज कुठे आम्हांला ही असली थेरं जमायला? पण त्यादिवशी चक्क ही चर्चा आमच्या चँट ग्रुपवरही ठाण मांडून बसली होती. होता होता बाकी सगळे एक एक करत गेले निघून पण मी आणि शरयू दोघेच त्यावर बोलत बसलो. रात्र बरीच झाली होती. मग ग्रुपवर चर्चा करण्यापेक्षा आम्ही पर्सनलवर बोलत बसलो. आणि तिच्याशी बोलता बोलताच माझा डोळा लागला. नेमक्या त्याचदिवशी मृगाला माझा फोन तपासायची ईच्छा व्हावी हे माझं दुर्दैव. बरं, तिनं त्याच रात्री, दुसऱ्या दिवशी वगैरे वाद घातला असता तर मला तिच्या शंकेचं निरसन करणं सोपं गेलं असतं. पण, तिनं ते मनात ठेवलं. हळूहळू करत आधीच कमी असलेला संवाद तिनं संपवत आणला. आणि जेव्हा क्षुल्लक गोष्टीवर वाद झाला तिनं त्या संवादाला हत्यार बनवून माझ्यावर आरोप करणं सुरु केलं. जेव्हा हे सगळं असह्य झालं तेव्हा हे असे इथे येऊन तुझ्यासमोर बसलोय आम्ही. आता नाही सोबत राहता येत गं!" रावीश अगदीच हताश झाला होता.


"मग तू तिच्यावर जो आरोप लावला होतास की ती तिच्या मित्रासोबत तन्मीतसोबत तुमच्या सांसारिक गोष्टी शेअर करते म्हणून; त्याचं काय झालं?"

........................................................................

(३)


‘’तुम्ही दोघ संयाकडे आलात म्हणजे साहजिकच तुमची केस एकतर घटस्फोटाची आहे किंवा मग पुन्हा एकत्र राहण्याचा विचार करताय तुम्ही! पण मग सोबत राहायचं तर माणसं एवढे वादविवाद करत नाहीत. म्हणजे नक्कीच हे प्रकरण डिव्होर्सचं आहे. बरोबर ना? ‘’ 


‘’ हो.’’ मृगानं मोघम उत्तर दिल. 


‘’काय झालं? मघाशी तर तुझा आवाज अगदी टिपेला गेला होता. आता माझ्यासमोर बोलायचं नाहीए का? ‘’


‘’ तसं काही नाहीए. मघाशी मला त्याचे आरोप मान्य झाले नाहीत म्हणून माझा आवाज चढला होता. ‘’


‘’ काय आरोप केले होते त्यानं? ‘’


‘’ त्याचं म्हणणं होत कि मी तन्मीतशी आमच्या व्यक्तिगत गोष्टी शेअर करते. ‘’


‘’ तू तसं काही करतेस का? नाही ना! मग कशासाठी आवाज चढवलास? त्यापेक्षा आणखी थंडपणे प्रतिक्रिया दिली असतीस तर कदाचित त्याचं शरयूसोबत जे प्रकरण चालू आहे त्याविषयी तो काहीतरी बोलला असता. ‘’ 


‘’ एकच मिनिट! त्याच शरयूशी काहीही प्रकरण नाहीए. मला फक्त त्याचं तिच्याशी आमच्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावरून चॅट करणं आवडत नाही. ‘’

 ‘’ असं काय बोलतो तो तिच्याशी? ‘’ 


 ती काहीवेळ तशीच शांत बसली; या विचारात कि यांना कसं सांगावं? 


‘’ काय झालं? न सांगण्यासारखं काही आहे का? तुला माहितेय ना वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काही लपवायचं नसत! ‘’ 


‘’ हो माहित आहे. तो शरयूसोबत आमच्या बेडरूममधल्या प्रायव्हेट क्षणांविषयी बोलतो. तिला सांगतो कि मी नवऱ्यासोबत इतकी थंड असते आणि बाहेर कशी एवढी हॉट होते? तिला काहीच कसं वाटत नाही असं वागताना? खरंतर नवरा इतका रोमँटिक दिसतो तरी हिला हे असं कस काय सुचत वगैरे वगैरे. ‘’ 


‘’ अगं मृगा हे सगळं किती वरवरचं आहे. यात कुठेही तुझा किंवा तुमच्या इंटिमेट क्षणांचा उल्लेखसुद्धा नाहीए गं! ‘’ 


‘’ म्हणजे मी खोटं बोलतेय असं तुम्हाला म्हणायचंय का? ‘’


‘’ मुळीच नाही मला असं म्हणायचंय कि तू आणखी खोलात जाऊन शोधायला पाहिजे होतंस म्हणजे आपल्याला आवश्यकतेएवढं कारण मिळालं असतं दाखवायला. पण मग तू त्यानं केलेले आरोप कसे फेटाळशील? तू खरंच टॅमी बरोबर असं काही बोलली नाहीस जसं तो म्हणतोय? ‘’ गीत तिच्या कलाकलाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होता.


‘’ त्याला जे वाटतंय ते तसं अजिबात नाहीए. मी टॅमी आणि रावीश एकाच कॉलेजमध्ये होतो. फक्त रावीशची एंट्री थोडी उशिरा झाली. मी आणि टॅमी १० वी पासून सोबत होतो. रावीश आम्हांला भेटला कॉलेजमध्ये. आणि मग तोही आमच्या ग्रुपचा एक भाग झाला. आम्ही आधीपासूनच सगळं एकमेकांसोबत शेअर करत होतो. रावीशला हे केव्हापासूनच माहित होतं. आणि मी कधीही टॅमी सोबत आमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर नाही केल्या. जे त्यानं ऐकलं ते तर मी टॅमीला याविषयी सांगत होते कि रावीश कसा आधीसारखा गोष्टी समजून घेत नाही. तुला कधी भेटला तर त्याला सांग ना! असं नको वागत जाऊस म्हणून. नेमकं मी फोनवर

हे बोलायला आणि त्याने तेवढंच वाक्य ऐकायला एकच गाठ पडली. आत तुम्हीच सांगा मी काही चुकीचं केलं का? त्यानं मला किमान विचारायचं तरी कि मी त्याच्याशी फोनवर नक्की काय बोलत होते म्हणून! पण त्यानं विचारणं लांबच नुसता कटाक्ष टाकून निघून गेला तो. ‘’ 


‘’ मग त्यानंतर तो कधीच त्या विषयावर बोलला नाही? ‘’ 

‘’ नाही.’’ 

''मग हे सगळं तो आजच बोलला? ‘’ 

’' हो. ‘’

‘’ आणि शरयूविषयीची तुला वाटणारी गोष्ट तू त्याच्याशी कधीच बोलली नाहीस ह्याआधी? ‘’

 ‘’ नाही. ‘’

 ‘’ तुही तो विषय त्याच्याशी आजच बोललीस? ‘’ 

‘’ हो.’’ 

‘’ अरे यार! उठ. आधी उठ इथून. ’’


त्यानं तीला हाताला धरून जसं ओढत त्याच्या केबिनमध्ये नेलं होत तसंच परत संयाच्या केबिनमध्ये आणलं. 


‘’ संया हे दोघेही मूर्ख आहेत. सध्या तुम्ही दोघंही घरी जा. आपण उद्या या विषयावर पुन्हा बोलू. मात्र तुम्ही उदया एकत्रच या येताना. ‘’ 


रावीश आणि मृगानं एकमेकांकडे पाहिलं. अजिबात ओळख नसल्याचा भाव डोळ्यांमध्ये आणत ते तिथून बाहेर पडले. दोन दिशांनी जाऊन एकाच गाडीत येऊन बसले आणि घराच्या दिशेने निघाले.


‘’ बघितलसं संया? यांचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून गमेना. चल आपणही जाऊ. उद्या आल्यावर ठरवू ह्या दोन येड्यांचं काय करायचंय ते !...’’


त्यादिवशी तिथून दोन वेगवेगळ्या गाड्या एकाच उद्देशाने पण दोन वेगवेगळ्या दिशेला गेल्या. दोन्हीकडंची नाती थोडी समान थोडी वेगळी होती. संया श्रावस्ती आणि गीत श्रावस्ती; दोघांनाही एक गोष्ट खूप छान समजली होती. कुठल्याही नात्याचा पाया मैत्रीच असते; त्याखेरीज ते नातं फुलत नाही. दुसर्‍या गाडीतल्या दोघांना मात्र ही गोष्ट समजायला अजून काही वेळ जावा लागणार होता. शेवटी स्वयंपाक आणि नात्यांमध्ये वेगळं तरी काय असतं ना? दोन्हीही मनासारखं व्हायचं असेल तर वेळ हा द्यावाच लागणार ना!

................................................................

(४)


दोघेही घरी पोचले. फ्रेश होऊन रावीशने जाऊन छानसा मसाला चहा केला. आपला कप घेऊन तो बेडरूममध्ये गेला. जाता जाता हॉलमध्ये बसलेल्या मृगाच्या पुढ्यात दुसरा कप ठेवला. खरंतर तिलाही चहाची तलफ आलीच होती; तरीही आत जाऊन चहा करायचं तिच्या अगदी जीवावर आलं होतं. असा आयता चहा समोर आल्यावर तिला तो पिण्याचा मोह आवरत नव्हता पण ,आपला राग अजूनही आहे हे रावीशला जाणवून द्यायचं होतं. चहाचा कप हातात घेऊन ती त्याला म्हणाली, ‘’ काही गरज नव्हती ह्या उपकाराची. केला असता माझा मी चहा. ‘’ 

तोही काही कमी नव्हता. लग्गेच तिला प्रत्युत्तर देत म्हणाला, ‘’ नकोय तर पिऊ नकोस. ओत जा नेऊन बेसिनमध्ये. ‘’ 

‘’ स्वयंपाकघर माझं आहे आणि तिथे मी असली नासधूस होऊ नाही देणार. हा ! पण तुझ्या ह्या आयत्या चहाचे उपकार फेडले जातील. ‘’ 

एवढं बोलून तीन तो चहाचा कप तोंडाला लावला. अनाहूतपणे तिच्या तोंडून बाहेर पडले 

‘ वाह ! नेहमीसारखाच सुंदर चहा. ‘ 

आत बसलेल्या रावीशच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले.


संया आणि गीतची गाडीतही मृगराच्या केसवरच चर्चा चालू होती. 

‘’ तुला काय वाटत संया? ते खरंच वेगळे राहू शकतील? ‘’

‘’ छे! मला मुळीच तसं काही वाटत नाही. उलट त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि ते एकमेकांना छान समजूनही घेऊ शकतात. ‘’ 

‘’ हं! तुझं निरीक्षण अगदी अचूक आहे. मी तिला म्हणालो की रावीशचं शरयूसोबत जे काही प्रकरण चालू आहे; ते आपल्याला कळायला हवंय! तर ती केवढी चिडली. म्हणाली त्याच काही तिच्याशी प्रकरण वगैरे नाहीए. तुला कळतंय ना! एखादा माणूस आपल्या जोडीदाराविषयी इतक्या ठामपणे तेव्हाच बोलू शकतो जेव्हा त्याचा आपल्या जोडीदारावर डोळे झाकून पण डोळस विश्वास असतो. आणि मृगाशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की तीचा रावीशवर असाच विश्वास आहे. रावीश काय म्हणाला? बोललीस ना तू त्याच्याशी! ‘’ 

‘’ त्यानं त्यांचं लग्न कसं झालं इथंपासूनची आटपाट नगराची कहाणीच ऐकवली मला. आणि या कथेतल्या संशयित पात्र असणाऱ्या शरयूबाबतही बोलला तो. त्याचा ऑफिस कलीग विदुरचं लग्न ठरलं. सो एक बॅचलर पार्टी तो बनती है म्हणत त्यांचा सगळा ग्रुप ज्यात शरयूपण होती. ते गेले होते मर्डर सिनेमा पाहायला. आणि त्यांच्या सवयीने ते त्यावर चर्चा करत होते चॅट ग्रुपवर. बाकी सगळे झोपले म्हणून हे दोघेच जण पर्सनल वर बोलत होते सिनेमातल्या नवराबायकोच्या जोडीबाबत. त्याचा बोलताना डोळा लागला आणि नेमके ते मेसेज मृगानं पाहिले. तेव्हापासून तिच्या डोक्यात या गोष्टीनं ठाण मांडलीय कि तो बेडरूम मधल्या गोष्टी शरयूसोबत बोलतो. आता तु म्हणतोस त्याप्रमाणे ना तिच्या मनात त्याच्याविषयी काही संशय आहे ना त्याच्या मनात तिच्याविषयी काही संशय आहे. ‘’ 

‘’ म्हणजे तुझ्या लक्षात येतंय ना! नेमकं काय घडतंय ते? ‘’ 

‘’ हं! येतंय लक्षात. हा फक्त एकमेकांना न दिलेल्या वेळेमुळे झालेला गोंधळ आहे. ओह! एक मिनीट. म्हणजे तुला अनोळखी परिचित खुणावतंय का? ‘’ 

‘’ अगदी बरोबर. हेच एक ठिकाण आहे जे त्यांना नुसतंच एकत्र आणणार नाही तर त्यांच्यातल्या त्याच जुन्या प्रेमाला पुनर्जिवित करेल. ‘’ 

‘’ तुला खरंच एवढा विश्वास आहे गीत? ‘’

‘’ हो संया. त्या दोघांच्या प्रेमाला याच जागी स्वतःची खरी ओळख पटेल. ‘’


हा प्रवास जरी घरापर्यंतच होता; तरी गीत आणि संयाला त्यांचं निश्चित ध्येय सांगून गेला. त्यांच्या बोलण्यात आलेली अनोळखी परिचित ही एक अशी संस्था होती, जिथे नात्यांच्या सुटू पाहणार्‍या विणीला पुन्हा घट्ट बांधलं जात असे. शहराच्या बाहेर पडण्याच्या थोडसं आधी एक मोठी सोसायटी होती. त्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावरचं मोठ्या अक्षरात हे नाव लिहिलं होतं. आत प्रवेश केला की उजव्या बाजूला त्यांचं कार्यालय होतं. कार्यालयात आत शिरलं की तुमची पहिली गाठ पडते ती तिथल्या रिसेप्शनीस्ट रोझाशी. आधीच तुम्हांला इथल्या सुगंधी वातावरणाने भूल पाडलेली असते. त्यात हे असं फुललेलं टपोरं गुलाब दिसल्यावर तुम्ही आणखीनच खूष होता. इथल्या सगळ्यांसाठी एक अलिखीत नियम आहे; कितीही राग आला तरी कोणीही तुमच्यावर आवाज चढवून बोलत नाही. त्यांचा राग काढण्यासाठी इथे वेगळी खोली आहे. त्या खोलीत एक पुतळा, काही मातीची- धातूची भांडी, प्लास्टिकचे फोन-संगणक-टीव्ही, खेळाचं साहित्य, एक फळा-डस्टर-खडू (मार्कर किंवा व्हाईट बोर्ड मुद्दामच नाही ठेवलेले.) असं बरंच काही ठेवलेलं आहे. आता तुम्हांला प्रश्न पडेल की याचा आणि रागाचा काय संबंध? म्हणजे तुम्ही कधीच काहीच रागाच्या भरात मोडलंतोडलं नाहीए का? त्यासाठीच आहे ही खोली. चला, थोडं आणखी आत शिरुन पाहूया; इथे आणखी काय काय आहे ते! रिसेपशनिस्टच्या थोडसं पुढेच रजिस्ट्रेशनचं काऊंटर आहे. तशी प्रक्रिया नेहमीसारखी असली तरी थोडासा फरक आहेच. त्याचं काय आहे की ईथे तुम्हांला कमीत कमी ३ किंवा ६ महिन्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यापेक्षा कमी नाहीच. शिवाय हे जोडीचं होतं. म्हणजे तुमच्या ज्या नात्याविषयी तक्रारी आहेत ती व्यक्ती सोबत हवी. एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन झालं की उर्वरीत सगळ्या गोष्टी अनोळखी परिचितच्या अनघा आणि सेतूवर सोडून द्यायच्या.


............................................

(५)


इमारत बांधली तेव्हा या सोसायटीत एकूण २२ टू बी एच् के सदनिका होत्या. ही सोसायटी बांधली श्रीयश वर्धमान यांच्या आयुष्मान बिल्डर्सने. सेतू हा त्यांचा एकुलता एक मुलगा. त्यानं खूप लहानपणापासून आईवडीलांमधले बेबनाव पाहिले होते. त्याला नेहमी असं वाटायचं की अशी एखादी संस्था वगैरे असती की जिथे नाती दुरुस्त होत असती तर तोही त्याच्या आईबाबांसोबत राहिला असता. असा २ महिने बाबा आणि २ महिने आईसोबत नसता राहिला. शहराच्या टोकाशी असणारी ही जागा त्याच्याच पसंतीची. तसा तो मानसशास्त्राचा पदवीधर. शहरातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये २ वर्षं समुपदेशक म्हणून काम पहात होता तो. तिथेच त्याला डॉ घोगावकरांमुळे पुष्पौषधींची आवड लागली. मग त्यात त्याने डॉक्टरेट मिळवली. श्रीयशचं म्हणणं होतं की त्याने स्वतःचं क्लिनिक चालू करावं. मात्र सेतूच्या मनात अनोळखी परिचितनं ठाण मांडली होती. बाबाच्या उशापायथ्याला उभारुन, त्याच्या दिमतीला राहून, मुंडक्यावर बसून असे चाणक्याचे सगळे साम-दाम-दंड-भेद वापरुन त्यानं ही सोसायटी हस्तगत केली होती. सोसायटीचं मूळ नाव अनाहत होतं. सेतूच्या हातात जाताच त्याने तिचं नाव कायाकल्प असं केलं. २२ टू बी एच् के चे त्याने ११ भाग केले. २२ फ्लॅट त्याने एकाच भिंतीने जोडले; त्यात मधे एक दरवाजा ठेवला जो दोन्ही बाजूंनी कुलुपबंद असे. तिथे एक पध्दत होती, तुमचं रजिस्ट्रेशन जरी सोबत होत असलं तरी तुम्ही कसं? कुठे? राहणार हे सेतू आणि त्याची टीम ठरवत असे. तिथे राहणार्‍या कुणाला ही गंमत माहीत नाही तुम्हांला म्हणून मी सांगते. श्शूऽऽऽ! कुणाला सांगायचं नाही अनोळखी परिचितची गोष्ट मी तुम्हांला सांगतेय म्हणून. मी? मी उर्वी. माझं नातं मला इथेचं गवसलं; मग म्हटलं यांची गोष्ट तुम्हांला सांगावी. तर काय सांगत होते मी? हां! सेतू आणि त्याची टीम त्या रजिस्ट्रेशन झालेल्या जोड्याला (भाऊ-बहीण, नवरा-बायको, मित्र-मैत्रिण अगदी कुणीही) एकाच फ्लॅटमध्ये ठेवतात. आणि त्या फ्लॅटमध्ये नॉट अलाऊड मोबाईल फोन, नो इंटरनेट. हो! पण इथे एक लँन्डलाईन फोन आहे बर प्रत्येक सदनिकेत. मात्र, तुमच्याकडून फॉर्ममध्ये भरुन घेतल्याप्रमाणे सगळ्या तुमच्या आवडीच्या गोष्टी उपलब्ध करुन ठेवलेल्या असतात. टिव्ही फक्त सिनेमा आणि नाटक बघण्यापुरता असतो. इथला टिव्ही म्हणजे आपल्या घरातल्या टिव्हीसारखा इडियट बॉक्स असत नाही. एक गंमत सांगू का? इथे ना, एक लेटरबॉक्स आहे. आश्चर्य वाटलं ना तुम्हांलापण! कारण इथल्या नियमाप्रमाणे तुम्हांला पलिकडच्या माणसाशी बोलावचं लागत; नसेल बोलायचं तेव्हा पत्र लिहायचं. आता कळलं तो लेटरबॉक्स का आहे ते! तसा तो वापरण्याची संधी अजूनतरी सेतूच्या टीमला मिळाली नव्हती. आणखीही खूप काही आहे इथे. जसं की तुम्हांला जर स्वयंपाकाची आवड असेल तर महीनाभराचा किराणा भरून ठेवला जातो. कलात्मक वस्तू बनवणे, लिहिणे, वाचणे अशा छंदासाठीच्या साहित्यासोबत गप्पा मारण्यासाठी माणसंही असतात. म्हणजे काय तर इथे आल्यानंतरचा सगळा वेळ हा तुम्ही स्वतःसाठी द्यायचा असतो. आणि अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे चेंजिंगरुम, बाथरुम, वॉशरुम सोडून सगळीकडे सीसीटिव्ही लावलेले आहेत; म्हणजे नियम मोडला की नोंदवहीत तुमचं नाव गेलंच समजायचं. इथली तुमची वेळ ही एखाद्या हॉटेलसारखी चेकइन आणि चेकआउट प्रमाणे असते. फक्त ही वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशीच असते. या अनोळखी परिचितमध्ये येऊन अनेकांची नाती विस्कटता विस्कटता सांधली गेली आहेत. आता फक्त सेतूच्या टीमबद्दल सांगणार मी. सेतूच्या टीममध्ये एकूण ६ जण स्वतः सेतू वर्धमान, अनघा जेते, शरण बिर्जे, लिला उन्नीकृष्णन्, नत्राम बावीसकर आणि मी उर्वी जयंत ( पूर्वीची ) ( आताची उर्वी नगेंद्र केदारे ) या सगळ्यांचा परीचय पुढच्या भागात.


 हुश्श!... किती बोलले मी. कंटाळला नाहीत ना! जरा सेतूच्या टीममधल्या सगळ्यांची साग्रसंगीत ओळख करुन देते. त्यानंतर तुम्हीच बघा मृगराच्या केसचं काय होतं ते! अगदीच गरज लागली तर उर्वी येईलच मदतीला बॉस! नॉट टू वरी…


.................................................

(६)


आता हे सगळे इथे कसे एकत्र कसे आले हे सांगते. तसा या सगळ्यांच्या आयुष्याचा एक धागा समान आहे; विभाजन. येनकेनप्रकारेण प्रत्येकाच्या आयुष्यात हे विभाजन प्रकरण प्रसंगोत्पात येऊन गेलंय. मात्र लिला या गोष्टीला अपवाद आहे. लिला या सहाजणांमधलं शेंडेफळ. तिचा जन्म मद्रासमधल्या भल्या थोरल्या वाड्यातल्या मोठ्याशा कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिनं घट्ट बांधलेली नाती पाहिल्यानं तिचा कुटुंबसंस्थेवर प्रचंड विश्वास. लिला उन्नीकृष्णनचं घर म्हणजे ऐसपैस चौसोपी वाडा. आणि त्याला पोसणारी विस्तीर्ण पसरलेली भाताची शेती, नारळी-पोफळीची बागायत. या चौसोपी वाड्यात रहायचं कोण म्हणाल तर लिलाच्या पणजीपासून लिलापर्यंतचे सगळेजण. सख्खी-चुलत, मामे-मावस भावंड आणि पणजीची पतवंडं. नाही म्हणायला तिचे काही नातेवाईक शहरात तर काही अगदी पार समुद्रापल्याड राहत होते. वाद, भांडणं, हमरीतुमरीचे प्रसंग तिने पाहिले नव्हते असं नाही पण यातूनही वेळप्रसंगी पाय घट्ट रोवून मदतीला उभी राहणारी माणसं तिच्या जास्त परिचयाची होती. मात्र एकदा का सुट्ट्यांमध्ये, सणावाराला ही सगळी जमली की पणजी, आजी, आई यांचा शब्द शेवटचा; दक्षिणेतलं मातृसत्ताक घराणं होतं त्यांचं. लिलेचा एक मामा रामानुजन याच शहरात रहायचा. म्हणूनच पुढच्या शिक्षणासाठी ती या शहरात आली. इथे येऊन मात्र तिचा पुरता भ्रमनिरास झाला. इथे तिला बर्‍याच ठिकाणी दिसली ती ढासळलेली कुटुंबव्यावस्था, त्यातली विसविशीत झालेली नाती, स्त्रिया-मुलांकडे होणारं दुर्लक्ष आणि थोरामोठ्यांच्या बाबतीतला वाढलेला अनादर. याच्यामुळे झालं काय तर तिच्या मनातला तिचा वाडा, त्यातली माणसं, त्यांची नाती यांची मुळं आणखीनच घट्ट झाली. मग त्यातून जन्माला आला भारतीय कुटुंबसंस्थेवर पी एच् डी करण्याचा मानस. याला खतपाणी घालायला आम्ही होतोच सगळे.


आता येऊया सेतूकडे. सेतू म्हणजे आमचा म्होरक्या, म्हणजे लिडर ओ! तुम्हांलापण ना! मराठी कळतच नाही बघा. असो. तर सेतू वाढलाच मुळात अर्धा आईकडे आणि अर्धा बाबाकडे. त्याच्या बाबाचं म्हणजे श्रीयशचं लग्न वडिलांच्या हट्टामुळे त्यांच्या मित्राच्या मुलीशी विशाखाशी झालेलं. श्रीयश इंजिनिअर झालेला तर विशू ( तिचं लाडाचं नाव ) फक्त १२ वी झालेली. त्यामुळे त्याला काही हे विशू प्रकरण पटलेलं नव्हतं. पण वडिलांच्या ईच्छेपुढे त्याच्या तोडीस तोड शिकलेली बायको असावी या ईच्छेचा ठार कडेलोट झालेला. श्रीयशचे आईबाबा असतानाच सेतू झाला. मात्र सेतूच्या जन्मानंतर काहीच वर्षांत आजीआजोबांनी या जगाचा आनंदाने निरोप घेतला. त्यांचं जाणं श्रीच्या पथ्यावरच पडलं. त्यानं विशूला घटस्फोट देऊन आयुषाशी दुसरं लग्न केलं. ती त्याच्या मित्राची सुकीर्तची धाकटी बहीण. सुकीर्तला विशूबाबत सगळं काही ठाऊक होतं. म्हणून त्याने तिच्या अपरोक्ष तिची सर्वतोपरी मदत केली. त्याच्यामुळेच विशूनं पुढचं शिक्षण घेतलं. तशी आयुषा काही फार वर्षं जगली नाही. ती होती तोवर तिनं सेतूला आईची कमी मुळीच भासू दिली नाही. आणि विशूनंही त्याचा ताबा मिळवण्यासाठी कज्जेखटले केले नाहीत. आयुषा आई बनून आली तेव्हा फक्त ८ वर्षांचा असणारा सेतू ती गेली तेव्हा १२ वर्षांचा होता. आणखी वर्षभराच्या कोर्टकचेरीनं त्याला श्रीयश-विशाखामध्ये २-२ महिन्यांसाठी वाटून टाकला. दर दोन महिन्यांनी त्याचा पत्ता बदलत असे. कधी आईच्या घरचा तर कधी बाबाच्या घरचा पत्ता असे. या वाटाघाटी, तह, वाटण्या यातून त्याला स्वातंत्र्य मिळालं १८ व्या वर्षी. अनघावर त्याचं कॉलेजमध्ये असल्यापासून प्रेम. पण आईसारखाच अनघाचाही पुरुष नावाच्या प्राण्यावर विश्वास नाही. नाही म्हणायला मित्र आहेत, सहकारी पुरुष आहेत मात्र अनघा आपली एकलकोंडीच. हल्ली हल्ली ती सेतूच्या औषधांनी माणसाळायला लागलीय. ( तिला माहीत नाही हं! तिच्या नकळत देतो औषधं सेतू तिला. सांगाल बिंगाल तिला मी तुम्हांला हे सांगितलं म्हणून ) अनघाचं जेते हे आडनाव तिच्या आईच्या वडिलांचं म्हणजे तिच्या आजोबांचं. अनघाची आई आदिती जेते. आदिती कॉलेजमध्ये असताना प्राच्य सारथीच्या प्रेमात पडली. तो तसा कॉलेजमधला प्लेबॉयच होता मात्र आदितीमध्ये कसा कोण जाणे अडकुनच पडला होता. कॉलेजच्या एका सहलीच्या वेळी त्यांच्या प्रेमानं सगळ्या सीमा पार केल्या. प्राच्य आदितीशी लग्नही करणार होता. त्याच्या वडिलांनी सुजॉय सारथीनं मात्र त्याच्या या बेताला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तरीही प्राच्य त्याच्या निर्णयावर ठाम होता. मग सुजॉयनं त्याचं खास हत्यार बाहेर काढलं. जर प्राच्यनं आदितीशी लग्न केलं तर तो त्याला आपल्या करोडोंच्या इस्टेटीतून बेदखल करणार असं ठरलं. हे कळताच घर सोडून आदितीकडे गेलेला प्राच्य दाती तृण धरुन बापाला शरण गेला. आणि आदितीचा ८ व्या महीन्यात स्वतःची जबाबदारी नाकारुन गेलेल्या प्राच्यमुळे समस्त पुरुष जमातीवर रोष होता की हे सगळे भेकड, फसवे आणि अप्पलपोटे असतात. आईचाच प्रभाव पडलेल्या अनघाचीही विचारसरणी तशीच होती यात नवल ते काय? सेतूला मात्र त्याच्या प्रेमावर विश्वास होता आणि म्हणूनच अनघा आज आमच्यासोबत होती. ती स्ट्रॅटेजी हा विषय घेऊन मास्टर्स झालेली. इथे येणार्‍यांच्या संदर्भातल्या सगळ्या स्ट्रॅटेजी ( निती ) सेतूच्या सोबतीनं तिच ठरवते.


शरणची गोष्ट अगदीच माहितीतली. आई गेली आणि एकट्या पोराची जबाबदारी नको म्हणून बापानं त्याला अनाथाश्रमात ठेवलेला. पण ह्या जबाबदारी झटकणार्‍या माणसाला फार काळ एकटं राहणं शक्य झालं नाही. म्हणून मग त्यानं दुसरं लग्न केलं. त्यातून त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. शरण म्हणतो तसं त्याला सगळं कुटुंब आहे पण सावत्र. त्यानं तर बापाचं नावही जळमटासारखं आयुष्यातून झटकून टाकलंय. तो जे शरण बिर्जे नाव लावतो ते अनाथाश्रमाच्या चालकांचं रामशरण बिर्जेंचं आहे. त्याच्या लेखी तेच त्याचे आईबाप आहेत. तो इथला पळापळ मास्टर आहे. म्हणजे आमच्या टीमचा हीस्ट्री अरेंजर. इथे रजिस्ट्रेशन करणार्‍यांची माहिती गोळा करणारा.


दमले बुवा मी बोलून! तुम्ही तर पाणिपण विचारत नाही रावऽऽऽ... असं कुठं असतंय होय? जाऊ दे! आता वाट बघा; नत्राम आणि माझ्याबद्दल पुढच्या भागात...

..............................................................

(७)


सॉरी बाबांनो, अगदी कान पकडून सॉरी! मगतर झालं?...

पण मला एक गोष्ट सांगा मंडळी जर अर्धवट माहिती दिली टीमची तर तुम्हीच मला नावं ठेवाल ना!...


असले स्तंभलेखक ठेवतातच कसे कामाला पेपरवाले असंच म्हणाल. म्हणून एक जास्तीचा स्तंभ वाढला इतकंच...

तर आजचा भाग मी माझ्या आणि नत्राम बावीसकरविषयी सांगणार आहे.


नावापासून सुरुवात करायची? तुम्हांला माहीतच आहे; मी उर्वी नगेंद्र केदारे. आधीची उर्वी जयंत शेंडे. माझा आणि नगेंद्रचा प्रेमविवाह. जसे सगळे पडतात तसेच आम्हीही पडलो प्रेमात. घरच्यांचा विरोध असतानाही आम्ही लग्न केलं. खरं सांगते लग्नाआधी जराही कल्पना असती की हा एवढा बेजबाबदार आहे म्हणून तर कधीच याच्याशी लग्न केलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात मला त्याच्यातली टाळाटाळी लक्षात यायला लागली. पण मी पडले घरची मोठी मुलगी. त्यामुळे मला लहानपणापासूनच जबाबदार्‍या पेलायची सवय झालेली. म्हणून मग मी त्याला सांभाळून घेत राहिले जोवर मला शक्य होतं तोवर. अगदी ईशदाच्या जन्मानंतरही जेव्हा तो बदलण्याची काहीच शक्यता दिसेना तेव्हा मात्र मी चित्रेकाकांकडे धाव घेतली घटस्फोट घेण्यासाठी. मला नाही बाई आयुष्य घालवायला जमायचं अशा बेजबाबदार माणसासोबत असं अगदी कळकळून सांगितलं मी काकांना. चित्रे काका म्हणजे माझी धाकटी बहीण जिथे काम करायची तिथल्या मालकांचे सगळ्यात लहान भाऊ. चित्रे काकांनीच माझी सेतूशी ओळख करुन दिली. सेतूने मला त्याच्या अनोळखी परिचित या संस्थेबद्दल सांगितलं. मी स्पष्टपणे त्याला सांगितलं की आमच्यात सांवादाचा मुळीच अभाव नाहीए. माझ्या घटस्फोट मागण्याच्या मागचं कारण गेली अनेक वर्षं नगेंद्रसारख्या बेजबाबदार माणसाला झेलून आता माझ्यातला संयम संपत आलाय. तेव्हा सेतूनंच मला पुष्पौषधीमधल्या काही अशा औषधांबद्दल सांगितलं ज्यांच्या सहाय्यानं माणसाची दीर्घ मानसिकता बदलता येते. मग आमच्या साधारण ५ ते ६ सिटींग्ज झाल्या सेतूसोबत. त्याच्याच औषधांनी आता आता कुठे नगेंद्र बदलायला लागलाय. म्हणूनच आम्ही अजूनही सोबत आहोत.


नत्राम बावीसकर हा राजीव आणि सई या बावीसकर दांम्पत्याचा लाडका लेक. तशी धाकटी अर्यमापण त्यांची लाडकीच आहे म्हणा. नत्रामचं सगळं घराणंचं उच्चशिक्षितांचं. कुणी डॉक्टर, कुणी वकील, कुणी आयपीएस् अशी सगळी विद्वानांची मांदियाळी या घरात. या विद्वानांच्या लखलखीत माळेतला धूसरलेला एकमेव मणी म्हणजे नत्राम. फक्त डबल एम्. ए. झालेला. तेही मॉब सायकलॉजीसारखा किचकट विषय घेऊन. आई-बाबा दोघेही त्याला आणखी शिक म्हणत होते. पण त्याचवेळी त्याच्या तत्वज्ञानात २ -3 वेळा पी. एच्. डी. केलेल्या काकाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली.


त्याने मागे सोडलेल्या पत्रात म्हटलं होतं की ' हे जीवन क्षणभंगूर आहे. आपणच आपल्या पायात वेगवेगळ्या परिमाणं आणि महत्वाकांक्षांच्या बेड्या अडकवून घेतल्या आहेत. त्या अडकवून घेताना जरी आनंद वाटत असला तरी त्यांच्या पूर्ततेचं समाधान तुम्हांला अखेरपर्यंत मिळत नाही; कारण कुठे थांबायचं ते स्थानक आपण निश्चित केलेलं नसतं. आत्मानुभव हे तेच स्थानक आहे जे अनेकांना मृत्यूपर्यंत ज्ञात होत नाही. मला तो अनुभव मिळाला आहे असे मला वाटते. आता किड्यामुंग्यांसारखे जगण्यात काहीच स्वारस्य उरले नाहीए. याच कारणामुळे मी या नश्वर देहाचा त्याग करत आहे. माझ्या मृत्यूसाठी माझ्याव्यतिरिक्त कुणीही जबाबदार नाही.' - ज्ञानेश


काकाच्या या पत्रानं नत्राम खूपच अस्वस्थ झाला कारण तो काकाचा खूपच जास्त लाडका होता आणि ज्ञानेश त्याच्यासाठी रोल मॉडेल होता. इतक्या शिकलेल्या माणसाने आत्महत्या करणं त्याला अजिबातच पटलेलं नव्हतं. त्यात सईराजीव दोघेही त्याच्या आणखी शिक्षणासाठी मागे लागलेले. पण, नत्रामच्या डोक्यात विचारांचा गोंधळ माजलेला. ज्या ज्ञानाने माणसाची जगण्याची ईच्छाच मारुन टाकली ते मिळवण्याची जद्दोजेहेद करुच कशाला? असा विचार करुन त्यानं आपला बाडबिस्तारा आपली मैत्रीण जोयाच्या फ्लॅटला हलवला. हो! नाहीतर घरात रोज नवी मारामारी होत राहिली असती त्याच्या शिक्षणावरुन. तसं त्याला कुणीही विचारलं नाही की असा अचानक का गेलास घर सोडून म्हणून कारण बावीसकरांकडे याला व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी ठरवण्यात आलं असतं. ही नत्रामची मैत्रीण जोया मुळची भारतीय पण जन्म व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवणार्‍या अमेरिकेतला. ती इथे आली हिंदू संस्कृतीचा अभ्यास करायला. घरातल्या एकंदरीत वातावरणामुळे लग्न, कुटुंब अशा कोणत्याच संस्थेवर विश्वास नसणार्‍या नत्रामचा जोयामुळे मैत्रीच्या नातेसंबंधावर मात्र अजून विश्वास टिकून आहे.


अशा ६ जणांनी मिळून बनलेली आमची अनोळखी परिचित ही संस्था. सहसा नातेसंबंध तुटू नयेत यासाठी प्रयत्न करणारी. आणि जर समजा तुटलेच तर त्यांच्या तळाशी कसलाही किंतु-परंतु राहू नये याची काळजी घेणारी.


सेतू या संस्थेचा संस्थापक, अनघा जेते स्ट्रेटेजी प्लॅनर त्याच्याच कॉलेजात शिकणारी, शरण बिर्जे आधी श्रीयशकडेच कामाला होता. सेतूनं त्याला तिथूनच उचललेला पण त्यांच्यात एक अलिखित करार झाला होता. तो इथला हिस्ट्री अरेंजर. मी आणि लिला चित्रे काकांमुळे या संस्थेशी जोडल्या गेलो. मी मुक्त पत्रकार आहे. लिला कुटुंबसंस्थेचा अभ्यास करण्याच्या नमित्ताने इथे आलेली. नत्राम बर्‍याच सामाजिक संस्थांसाठी वेगवेगळी कामं करायचा. इथे तो नियमावली बनवणं आणि ती मोडणार्‍यांच्या देहबोलीवर लक्ष ठेवण्याचं काम करतो.


...................................................

(८)


आज गीत आणि संयानं सांगितल्याप्रमाणे मृगरा एकत्रच निघाले होते एम्बसीत. अख्खा रस्ताभर गाडीत फक्त एफ् एम् एकटाच कोकलत होता. गाणीपण अगदी परिस्थितीला अनुकूल अशी लागली होती.


" रसिक बलमाँ! हाय, दिल क्यू लगाया? जैसे रोग लगाया... "


" परदेसीयोसे ना अखियाँ मिलाना, परदेसीयो को है ईक दिन जाना... "


" दिल ऐसा किसने मेरा तोडा, बरबादी की तरफ ऐसा मोडा... ईक भले मानुष को अमानुष बना के छोडा... ''


'' मोसे छल किए जाए... हाय रे! हायऽ हायऽ हायऽ... सैय्या बेईमान ''...


'' जुदाई! जुदाई! हाए कैसी यह जुदाई!... जुदाई! जुदाई! कभी आए ना जुदाई!...''


ते एम्बसीत येऊन पोचले तर दोघेही त्यांचीच वाट पाहत होते. मुक्यानंच सगळ्यांचं चहापान आटोपलं आणि गीत लगेचंच मृगाला त्याच्या केबीनमध्ये घेऊन गेला. मृगा तिथून जाताच संया रावीशला म्हणाली, '' हे बघ रावीश! काल मी आणि गीतनं तुमच्या केसवर खूप चर्चा केली. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यात झालेले गैरसमज सहज मिटवू शकता.''


'' मलाही असंच वाटत होतं म्हणून तर खूपदा तिच्याशी बोलायचं ठरवलं. पण दरवेळी पहिले पाढे पंचावन्नच.'' - रावीश


'' म्हणजे मी नाही समजले! तू शरयूबरोबरच्या चर्चेबद्दलच बोलतोयस ना? पण ते तर तुम्ही इथे आल्यावरच बोललात ना! मग आणखी कोणत्या वेगळ्या मुद्द्यावर बोललात का तुम्ही? ''- संया


'' अगं, तसं नाही गं! बोलायचं याच मुद्द्यावर होतं; पण आम्ही कधीही तो मुद्दा एकमेकांसमोर मांडूच शकलो नाही. सुरुवात ठीक झाली तरी कुणा ना कुणाकडून वादाची सुरुवात ही व्हायचीच. मला वाटतं कदाचित तो मुद्दा इथे येऊनच बोलला जाणार होता. ''- रावीश


'' बरं, ते असू दे! आता तुमच्यातले गैरसमजाचे फुगे बहुतेक अनोळखी परिचितमध्येच जाऊन फुटणार असं मला कालपासून वाटायला लागलं. ''- संया


'' अनोळखी परिचित? हे काय आहे? माणूस? मोबाईलमधलं ऍप्लीकेशन? की एखादी संस्था? ''- रावीश


'' द लास्ट वन ईज करेक्ट आन्सर डिअर. ''- संया


'' काय करते ही संस्था? आपल्याच शहरात आहे का? कुणाची आहे? कुठे आहे? ''- रावीश


'' अरे, हो. हो. एकदम इतके प्रश्न? सांगणारच आहे मी सगळं तुला! अनोळखी परिचित ही एक अशी संस्था आहे जी नात्यात निर्माण होणारे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करते. आणि हो आपल्याच शहरात आहे ही. ही संस्था आहे श्रीयश वर्धमान यांचा मुलगा सेतू वर्धमानची. तिचं काम कसं चालतं? त्या संस्थेत कोण काम करतं? ही आणि अशीच सगळी या संस्थेची माहीती तुला तिथे जाऊन मिळेल. ''- संया


'' म्हणजे? मी एकटाच जाऊ तिथे? आणि तिथे जाऊन काय करायला हवंय? ''- रावीश


'' मला ना पक्की खात्री आहे की तू शाळा-कॉलेजला असताना प्रचंड जिज्ञासू मुलगा असणारेस. सांगितलेलं कानापर्यंत पोचून मेंदूत स्थिरावेपर्यंतच तुझी क ची बाराखडी सुरु होते रे! ''- संया


तिच्या या वक्तव्यावर दोघेही खळखळून हसले.


तिकडे गीतनं मृगाला हे समजवण्याचा चंग बांधला होता की आपण शोधले तर रावीश आणि शरयूचे संबंध आहेत हे आपण कोर्टासमोर आणू शकू. आणि मृगा मात्र त्यांचे असे काही संबंध असावेत हेच मान्य करायला तयार नव्हती.


'' मृगा, अगं तू कितीही नाकारलंस तरी अशी शक्यता असू शकते हे तू अमान्य नाही करु शकत. म्हणजे बघ हं! त्यादिवशी रात्री तुला अगदी चुकूनच ते टेक्स्ट मेसेज दिसले. समज जर ते आधीपासूनच असे मेसेज करत असतील तर? ''-गीत


'' अहो, असे कसे मेसेज करणार नाहीत ते? एकाच ऑफिसमध्ये काम करतात ना ते! मग त्यानिमित्ताने मेसेज होतच असतील की. आणि मला कधीच गरज नाही वाटली त्याचा मोबाईल तपासण्याची. त्यादिवशीही फोन लॉक नव्हताच. तो फक्त ऑफिसमध्येच लॉक असतो कारण कंपनीशी संबंधीत मेल वगैरे कुणी उघडून बघितली तर यासाठी. ''- मृगा


गीत स्वतःच विणलेल्या शब्दांच्या जाळ्यात अडकला होता. आता त्याच्यासमोर अनोळखी परिचितविषयी सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तरीही एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानं खडा टाकला.


'' मृगा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला तुला फक्त इतकंच सांगायचंय की थोडेसे प्रयत्न केले आपण तर तुझा आणि रावीशचा घटस्फोट लवकरच होऊ शकतो. नाहीतर मग मी एवढं तरी तुला खात्रीने सांगू शकतो की संया रावीशला नक्कीच अनोळखी परिचितमध्ये घेऊन जाईल.''- गीत


आता त्याला जे वाटत होतं अगदी तसंच झालं. मृगानंही कुतुहलानं अनोळखी परिचितविषयी खूपसे प्रश्न विचारले होते. आणि त्यानंही आडपडदा न ठेवता तिला सगळं सांगितलं. शिवाय त्यानं सेतूला फोन लावून मृगाची पुढच्या आठवड्यातली अपॉईंटमेंन्टदेखील घेऊन टाकली.


अशाप्रकारे एम्बसीत भासआभासाचा खेळ चालू होता. संयानं रावीशला आणि गीतनं मृगाला अपविषयी प्लस मायनस दोन्ही पॉईंट सांगितले.


त्यानंतरचे दोन दिवस खूप घाईगडबडीत गेले. कारण मृगानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यामुळे रावीशला कोर्टाच्या वार्‍या कराव्याच लागल्या. एक दिवस आता सुनावणी होईल, मग होईल म्हणताना अख्खा दिवस भाकडच गेला. दुसर्‍या दिवशी मात्र दुपारच्या वेळी कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या सुनावणीची वेळ नक्की झाली. त्यांच्या सुनावणीच्यावेळी तिथं एक महिला न्यायाधीश आशा कुरलकर दोन न्यायालयीन समुपदेशक धीरज राऊत आणि मूर्ती पोहनकर, मृगा- रावीश आणि दोघांचे वकील म्हणून संया व गीत हजर होते. दोन तास चर्चा होऊन न्यायमूर्ती आशा कुरलकर यांनी दोघांना ३ महीन्यांची मुदत दिली होती; या लग्नबंधनातून कायमचे बाहेर पडण्यासाठी.


रावीशच्या डोक्यात मात्र संयानं सांगितलेली अनोळखी परिचित घुमत होती.


...............................................

(९)


 आता घरात सगळ्या गोष्टी नेहमीसारख्याच होत होत्या. तरीही आयुष्यातल्या खूप सार्‍या गोष्टी बदलल्या होत्या. सुर्य नेहमीसारखाच उगवत होता; मावळत होता. रोज ऑफिसच्या वार्‍या होतच होत्या. म्हणजे खरंतर त्यात चुकण्या- चुकवण्यासारखं तसं बघता नव्हतंच काही. मात्र आयुष्यातल्या खूप गोष्टी सुटून गेल्यासारखी दोघांची अवस्था झाली होती. बोलायचं त्यालाही होतं; बोलायचं तिलाही होतं पण शब्दांनीच साथ सोडल्यानं नुसतंच एकमेकांला ओझरतं पाहणं याखेरीज करता काहीच येत नव्हतं. कळत नकळत २ बी एच् केमधल्या त्या दुसर्‍या बेडरुमचा वापर सुरु झाला होता. कधी तो तिच्याआधी निघून जायचा तर कधी ती त्याच्याआधी निघून जायची. केव्हातरी तो लवकर आला तर सवयीनं दोघांसाठी मसाला चहा ठेवला जायचा. थर्मासमध्ये भरुन ठेवलेल्या त्या चहानं कधीचं आपल्या कामात कसूर केली नाही. तो जसा त्याला फ्रेश करत असे तसाच तिलाही करत असे. मात्र त्याला दुःख एकाच गोष्टीचं होतं; आता तो दोघांच्या रिफ्रेशमेंन्टच्या आनंदाचा हिंदोळा उरला नव्हता तर राहिला होता फक्त दोघांच्या उरात खूपणारा विरहझुला. जिथं हसणं-खिदळणं, नाचगाणं, एकमेकांना भारुन टाकणारा ओलावा आणि प्रेम पाझरायचं त्या चार भिंतीत गेल्या काही दिवसांपासून उरले होते फक्त मुकेपणाच्या खिळ्यांना लटकणारे दुखरे, बोचरे क्षण. 


 या बोचर्‍या क्षणांना हसरे खेळकर बनवावेत म्हणून धावतपळत पोरांसाठी गावाकडून शहरात आलेल्या दिपेनदिप्तीलाही अजून त्या प्रयत्नात काही म्हणावं तसं यश येत नव्हतं. ते दोघेही या दोघांना आपल्यापरीने समजावत होते. पण तरीही तिढा कायमचं होता. ते तरी काय करणार ना! बाजू कुणाची घेणार? लेकाची? सुनेची? की दोघांनाही त्यांच्या अवस्थेवर सोडून द्यायचं? नाही म्हटलं तरी बाहेरच्यांना नसेना का पण नातलग नावाच्या रेसिडेन्ट ईव्हिलना मन मारुन उत्तरं द्यावीच लागतात ना! म्हणजे मुलाच्या बाजूने बोललो तर कर्णोपकर्णी वार्ता जाणार की अमक्यातमक्या घरात घरगुती हिंसा होते (कुणास ठाऊक यांच्या हिंसा-अहिंसेच्या नेमक्या व्याख्या काय असतात ते!). आणि सुनेची बाजू घेऊन बोलावं तर म्हणणार यांचं बराय! हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणं. त्यानं लेक एकटा पडेल ते आणखीनच वेगळं. दोघांसाठीही निर्माण झालेली ही परिस्थिती म्हणजे 'इकडे आड आणि तिकडे विहीर ' जीव द्यायचा तरी नेमका कुठं? कसा सावरायचा हा मोडणारा संसार ? या प्रश्नांचं उत्तर त्यांना अखेर गीतसंयाकडेच घेऊन आलं.


चिंतातुर चेहर्‍यानं बसलेल्या दिपेनदिप्तीला गीतनं समजावलं. 


'' काका-काकू तुम्ही मुळीच चिंता करू नका. आम्ही त्यांचा घटस्फोट होऊ देणार नाही. आम्ही दोघेही फारसे लग्न मोडण्याच्या बाजूचे नाही आहोत. तेव्हा त्या दोघांच्या लग्नाचं त्रांगडं तुम्ही आमच्यावर सोपवून शांत मनानं घरी जा. ''


'' खरंय तू म्हणतोस ते गीत. पण आईबाप झालं की मरेपर्यंत पोरांची काळजी सुटते का रे? ''- दिप्ती 


'' काकू, अहो खरंच विश्वास ठेवा आमच्यावर. कसं असतं ना! की तुम्ही पाहताय किंवा अनुभवताय ती फेज आहे. सतत सोबत राहणार्‍या माणसांना काही काळासाठी केवळ स्वतःसोबत राहू द्यायला हवं. थोडे दिवस आणखी मग ते स्वतःच इथे येतील आणि त्यांना पुन्हा जुन्या वळणावर घेऊन कसं यायचं हे तुम्ही आमच्यावर सोडा. आम्हांला त्यांचा दुखरा भाग बरोबर सापडला आहे. आमचे आयुर्वेदाचार्य म्हणतात की औषधयोजना ही नेहमी मुळावर करायची असते म्हणजे रोगाचा समूळ नाश होतो. कारणच संपवून टाकायचं म्हणजे पुन्हा पुन्हा वेदनांची निर्मिती होत नाही.'' 


दिपेनदिप्ती ऑफिसमधून सगळ्या चिंतांचा भार गीतसंयाच्या डोक्यावर टाकून बाहेर पडले. 


 '' गीत तुला खरंच असं वाटतंय का की ते येतील आपल्याकडे परत आणि त्यांचा घटस्फोटाचा निर्णय बदलतील म्हणून? ''- संया 


'' संया, तुलापण ना उगाचच सगळ्या गोष्टीत घाई करायची असते. अगं, जरा समजून घे. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी एक वेळ असते. त्या वेळेच्या आधी आणि नंतर घडणार्‍या गोष्टींना म्हणावा तसा अर्थ उरत नाही. कठीण आहे तुझं! तुला समुपदेशक म्हणून मान्यता देणार्‍याची मानसिकताच शोधायला हवी बहुतेक मला. '' गीतनं तेवढ्यातही तिची थट्टा करण्याची संधी सोडली नाही. 


'' पण काय रे! मघाशी काकूंशी बोलताना तू तो दुसर्‍या लग्नाचा विषय का काढलास? ''- संया 


'' हे बघ गोष्ट अशी आहे की आयुष्याची थेअरी अशी असते की त्याला मोकळ्या जागा भरा हा प्रश्न जरा जास्तच आवडतो सोडवायला. त्यामुळे ते तुमच्या जगण्यात निर्माण झालेल्या पोकळ्या भरण्यासाठी सतत पर्यायांच्या शोधात असतं. मृगराच्या आयुष्यातपण आता एकप्रकारची पोकळीच निर्माण झालीय. आणि आता नाही तरी काही काळाने का असेना पण आपल्या आधीच्या जोडीदारासारखा दुसरा किंवा त्याच्यापेक्षा सर्वार्थाने भिन्न असा दुसरा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार. आणि जर आपल्याला त्यांचं लग्न वाचवायचं असेल तर आपल्याला त्यांना ही संधीच मिळू द्यायची नाहीए. त्यासाठीच मी काकाकाकूंना काही दिवस आणखी इथे राहून त्या दोघांना एकमेकांचे चांगले गुण आडून आडून अथवा समोरुन सांगत रहायला सुचवलं; जेणेकरुन आपलं काम सोपं होईल. समजलं का वकीलीणबाई? ''- गीत 


'' म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं ना मी! मला हे असले किचकट, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणारा कामसू माणूस हवा होता. '' संयानं त्याच्या मघाच्या विनोदाची घरवापसी केली.


मृगराच्या आयुष्यात कदाचित ती वेळ चोरपावलांनी येत असावी कारण त्या दोघांना अजूनही कळत नव्हतं की जे झालं ते योग्य झालं का? आपण जे वागलो ते तसं वागण्याची खरचं गरज होती का? आपण खरचं इतके एकमेकांना अनोळखी झालोयत का की एकमेकांना लांबून सोडाच पण जवळूनही ओळखता येत नाहीए? इतकी वर्षं सोबत, सहवास अशी घालवल्यानंतर आपल्यासोबत 'अतिपरिचयात अवज्ञा! ' ही उक्ती खरी ठरु पाहतेय? काय मिळवलं आपण हे असं वागून? का ही अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्याबाबतीत? या आणि अशाच असंख्य डोकं भंडावून सोडणार्‍या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधूनही मिळत नव्हती. रावीशच्या डोक्यातून मात्र अनोळखी परिचित हे नाव काही केल्या जात नव्हतं. तिकडे मृगालाही उत्सुकता होतीच की पुढच्या आठवड्यात नेऊन गीत तिला नेमकं असं काय दाखवणार होता अनोळखी परिचितमध्ये? 


आज जवळ जवळ ५ दिवस उलटले होते. घरात सुदूर शांतता प्रस्थापित होऊन. तशी कुणालाही नकोच होती पण त्या शांततेचा भंग करणार्‍या संवादाच्या पुलाचा वापर कुणी करायचा हेच ठरत नव्हतं. शेवटी संध्याकाळी रावीशनंच संयाला फोन लावला. 


'' संया, आपण उद्या जायचं का अनोळखी परिचितला? ''- रावीश


त्यानं संवादाची सुरुवातच अगदी अधीरपणे केली होती. 


'' हो. नक्कीच जाऊया. मी आजच तिथे फोन करून तुझी उद्याची भेटीची वेळ नक्की करते. ''- संया 


तिनेही फारसे पाल्हाळ न लावता मुद्दा संपवला. 


..........................................................

(१०)


ऑफिसमध्ये येऊन चहापान झाल्यानंतरही रावीश फारसं काही बोलत नव्हता. संया एकटीच होती ऑफिसमध्ये; गीत त्याच्या शेजारच्या केबीनमध्ये दुसर्‍या एका केसवर काम करत होता.


'' अरे काही बोलशील की नाही? की नुसताच चहा प्यायला आला होतास इथे वाट वाकडी करुन? आता काय मृगानं तुला स्वयंपाकघरात जायचीपण बंदी केलीय का? ''


फायलीत डोकं खुपसून बसत संयानं विषयाला सुरुवात केली. नाहीतरी कुणी ना कुणी विषयाला हात घालायलाच हवा होता ना!


'' अगं! तसं काही नाही गं! तुला काल बोललो नव्हतो का? अनोळखी परिचितला जाऊ म्हणून? तू घेतलसं का बोलून त्यांच्याशी? कधी जायचंय आपण? ''


'' अरे हो! हो! तू ना तोंड उघडलंस की नुसते प्रश्न विचारतोस. घेतलंय मी बोलून त्यांच्याशी काळजी नको करुस. आज दुपारीच जाऊ आपण. एवढं काम आहे हातात ते संपवते. तोवर तुला हवं असेल तर तू आतल्या लायब्ररीत जाऊन बसू शकतोस. ''


'' अगं मला कुठे तुझ्यासारखी वकीली करायचीय तेव्हा? '' रावीश हसतंच म्हणाला.


'' त्याची अजिबातच काळजी नको तुला. ही माझी कामाची जागा असली तरी मला माझ्या मेंदू आणि मनाला काहीतरी खाद्य द्यावचं लागत. नाहीतर मी कोर्टात अशिलांच्या बाजू कशा मांडणार? त्यामुळे मला फ्रेश करण्यासाठी लागणार्‍या पुस्तकांचा खजाना आहे इथे. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तुला हव्या त्या भाषेतली पुस्तकं तू वाचू शकतोस. म्हणजे मला तर्री एवढ्याच तीन भाषा येतात बरं का!''


'' मला कुठं अशा सतराशे पन्नास भाषा येतात? आम्ही आपले फिरतो देशविदेशात भाषेचे अडते सोबत घेऊन. बरं तुझं काम संपलं की मला आवाज दे. मी बसतो आत. ''


तो उठून संयाची मदतनीस निलयानं दाखवलेल्या दारातून आतल्या बाजूला असणार्‍या लायब्ररीत गेला. तिथं जाऊन त्याला लक्षात आलं की संयाकडे एवढा शब्दखजिना कुठून आला ते! आधी त्यानं बरीच शोधाशोध केली, मग मनासारखं पुस्तक मिळताच तोपण बर्‍याच वर्षांनी आपल्या या आवडीच्या गोष्टीत रमून गेला.


'' गोलाविसमोआरच्छलेण अप्पा उरम्मि से मुक्को । 


अणुअम्पाणिद्दोसं तेण वि आढमुवऊढा ।। ''


-ः गोदावरीचे पात्र ओलांडताना बिचारीची त्रेधातिरपीट उडाली. उतारावर घसरताना सावरण्याच्या निमित्ताने तिने त्याच्या (प्रियकराच्या) छातीवर भार टाकला. तिची ती त्रेधातिरपीट उडालेली पाहून केवळ अनुकंपेने त्याने तिला हात दिला पण पुढे त्याने तिला तेथेच आलिंगन दिले. पण तो खरेच निर्दोष आहे. 


हे सगळं वाचून त्याच्या अंगावर सर्रकन् काटा आला मृगाच्या आठवणीने. तरीही तो पानं उलटत पुढे वाचत राहिला.


'' दिट्ठा चुआ अग्घाइआ सुरा दाक्खिणाणिलो सहिओ । 


 कज्जाइंव्विअ गरुआई मामि! को वल्ल्हो कस्स? ।। ''


-ः घरातील ज्येष्ठ स्त्रीला गृहस्वामिनी म्हणते, '' मामी! ते लवकर परत यावेत म्हणून मी आम्रांकूराचे दर्शनही (पुजा असावी) घेतले व थोडेसे मद्यही. दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍याची झुळुक अंगावर घेत मी इथे दारात वाट बघत उभी आहे. पण, माझ्यापेक्षा त्यांना कामाचं महत्व जास्त आहे. बघ, कोण कोणाचा नसतो. आणि प्रियकर तर नाहीच नाही. ''


त्याला पुन्हा पुन्हा मृगाचे त्याच्यावर केलेले आरोप आठवत राहिले. पण पुढे वाचण्याची उर्मी काही कमी होत नव्हती.


'' भरिमो से गहिआहरधुअसीसपहोलि रालआउलिअम । 


 वअठां परिमलतरलि अभमरालि पइण्ण कमलं व ।। ''


-ः मी तिचा ओठ माझ्या दातात धरल्यावर तो सोडविण्याच्या धडपडीत तिचे केस सैल झाले व तिच्या मुखावर पसरले. ते केस बघून वासाने धुंद झालेले भुंगे कमळाभोवती जमतात त्या दृश्याची मला आठवण झाली. 


'' द्ठ्ठूण तरुणसुरअं विविहविलासेहि करणसोहिल्लम । 


 दिओ वि तग्गामणो गअं पि तेल्लंण लक्खेङ् ।। 


-ः तरुण युगुलांच्या विलासी रतिक्रिडा बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचे भानही त्याला उरले नाही. 


'' मह पइसणा थणजुअले पत्तं लिहिअं ति गाळिआ कीस? ।


 आलिहइस महं पि पिओ जइत से कंपो च्चिअण होइ ।। ''


-ः तुझ्या उरोजांवर तुझ्या पतीने लिहिले आहे म्हणून भाव खाऊ नकोस. माझ्यावरील प्रेमामुळे त्यावेळी माझ्या पतीचा हात थरथरत होता म्हणून नाहीतर त्याने माझ्या स्तनांवर चित्रेच काढली असती. 


'' दड्अकरग्घललिओ धम्मिल्लो सीहगन्धिअं वअवणम् । 


 मअ्णम्मि एत्तिअं चिअ पसाहणं हरइअ तरुणीणम् ।। 


-ः प्रियकरामुळे विस्कटलेले केस, मद्यामुळे धुंद झालेले मुख; या मदनोत्सवात (वसंतोत्सव ) एवढाही श्रृंगार तरुणींना पुरेसा होतो. 


'' काय हरवलास वाटतं गाथा सप्तशतीमध्ये? '' संयाच्या आवाजाने तो वाचनगुंगीतून बाहेर आला. '' चल. आपल्याला निघायचंय ना! ''


'' हो गं! पण बर्‍याच वर्षांनी तुझ्यामुळे मी माझ्या या वाचनाच्या आवडीत गुंतलो बघ. आणि फार वर्षांपूर्वीची गाथा वाचण्याची इच्छाही इथे येऊन पूर्ण झाली. ''


'' अरे, तू ते नेऊ शकतोस सोबत. मी खूपदा वाचलंय ते. तुला माहितेय का? या गाथा सप्तशतीचा जो कर्ता आहे हाल सातवाहन तो विद्वत्ता आणि विद्वान यांचा फार चाहता होता. त्याची पट्टराणी चंद्रसेनेसोबत एकदा जलक्रिडा करताना त्याने तिच्यावर पाणी उडवले तेव्हा तिने त्याला संस्कृतमध्ये पाणि उडवू नकोस असे सांगताना मोदकैः ( मा उदकै:) ही संधी वापरली. ती त्याला कळली नाही. आणि त्याने तिला मोदक आणून दिले. तेव्हा तिने त्याचा इतर राण्यांसमोर उपहास केला. त्याने दुःखी होऊन सरस्वतीची तपस्या केली. देवी प्रसन्न होताच त्यानं संपूर्ण प्रजेला विद्वान बनवण्याचा वर मागितला. आणि त्याच्या प्रजेने केलेल्या १ कोटी कवनांमधून त्याने ७०० सर्वोत्तम कवनं निवडली आणि त्याचीच पुढे जाऊन ही गाथा सप्तशती झाली.''


'' मॅडम, अहो साडेतीन वाजून गेलेत. तुम्ही आणि रावीश सर जाणार होतात ना अप ला? '' निलयाच्या आवाजाने दोघेही लायब्ररीचं दार उघडून बाहेर आले.


'' कळलंच नाही बघ कसा वेळ गेला ते! चल आपल्याला पोचायला उशीर नको व्हायला. बरं निलया आजचं सगळं काम मी तुझ्यावर सोपवून जातेय. रुद्र आणि धात्रीच्या संध्याकाळच्या मिटिंगपर्यंत येतेय मी. बाकी काय आहे? '' घाईघाईत सगळं आवरत संया निलयाशी बोलत होती. तोवर रावीश बाहेर गाडी काढायला निघून गेला.


'' फार काही नाहीए. नार्वेकरांची उद्याची तारीख मिळालीय. आणि धाडणकरांची आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचीय. बाकी आजसाठी काही विशेष नाहीए. ''


'' ओके. मग आम्ही येतो जाऊन. '' एवढं बोलून ती बाहेर पडली.

.......................................................

(११)


कार तिच्या वेगाने चालली होती. चालवणाऱ्याच्या मनात गाथा सप्तशती आणि संयाच्या मनात रामसीतेच्या पुनर्भेटीचा प्रसंग नाचत होता. शहराच्या बाहेर पडण्याच्या थोडसं आधीच संयाच्या सांगण्यावरुन त्यानं गाडी उजवीकडं वळवली. थोड्याच वेळात त्याला एक छान टुमदार रो हाऊसचा भाग लागला. सगळी घरं खूपचं देखणी होती. न राहवून त्यानं संयाला विचारलंच,


'' कुणाची आहेत गं ही? किती देखणी आहेत ना! एखादं घेऊनच टाकावं. ''


'' अरे मग घे की. आपल्या सेतूच्या वडिलांच्या आयुष्मान बिल्डर्सचीच आहे ही स्कीम. तुला हवं असेल तर आता जाऊ तेव्हा बोलू त्याच्याशी या विषयावर. ''


'' ए! अगं आता नको हां हा विषय काढूस. मला आधीचं झालेलं त्रांगडं आधी निस्तरायचंय. ते घराबिराचं बघू नंतर आधी मला माझी मृगा तर परत भेटू दे. मग तिच्यासोबतीनं या छोट्याशा घरात येऊन सुट्टी घालवायचीय मला. ''


'' चला. माणसं आतापासूनच मनोराज्यात हरवायला लागलीत हे बघून फार बरं वाटलं मला. म्हणजे जानी मंजिल आपके करीब है।''


'' काय हे संया! तू पण हिंदी सिनेमावाली का?''


दोघेही मनापासून हसले. ती रो-हाऊसची मालिका संपत आली असताना त्यांना एक मोठी सोसायटी लागली. हीच ती अनोळखी परिचितची कायाकल्प सोसायटी. सोसायटीत आत शिरताच त्यांना ' चारचाकी पार्किंग डावीकडून पाठीमागे ' असं लिहिलेली पाटी दिसली. तशी संया तिथेच उतरुन उजव्या बाजूला असणार्‍या ऑफिसकडे वळली. रावीश गाडी मागच्या बाजूला पार्क करुन येईपर्यंत संया रोझाशी गप्पा मारत बसली. जरा हवापाण्याच्या गप्पा होतायत न होतायत तोवर रावीश आलाच गाडी पार्क करुन.


'' नमस्कार सर. या. आपलं अनोळखी परिचितच्या या नव्या दालनात स्वागत आहे. ''


नेहमीच्या चिरपरिचित अशा मधाळ आवाजात रोझानं त्याचं स्वागत केलं. तिचं नाव जरी रोझा असलं तरी ती खूपच सुंदर मराठी बोलत होती.


'' सर, तुम्हांला हा फॉर्म भरुन द्यावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हांला तुमचं नाव, पूर्ण आणि कायमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शिक्षण, कामाचे ठिकाण, तिथला संपर्क, तुमच्या आईवडीलांचे नाव, त्यांचा संपर्क नंबर, त्यांच्या राहण्याचं ठिकाण, तुमच्या आवडीनिवडी, छंद, फावल्या वेळात करायला आवडणार्‍या गोष्टी हे सारं भरुन द्यावं लागेल. ''


'' हे सगळं आता लगेच...... ? '' त्याचा प्रश्न पुर्ण होण्यापूर्वीच तिनं तो तोडत त्याला हसून सांगितलं, '' नाही सर. हा फॉर्म तुम्ही घेऊन जा. आणि तुम्हांला दिलेल्या वेळी येताना घेऊन या. ''


त्याला जरा हुश्श् वाटलं हे ऐकून. तो विचारातच पडला होता नाहीतर छंद आणि आवडीनिवडी इतक्या लगेच काय सांगाव्या ह्या विचाराने.


इतक्यात तिच्या टेबलवरचा फोन अगदी मंद आवाजात वाजला. तिनं तो उचलून कानाला लावला. हो नाही काहीही न बोलता फक्त पलिकडचं बोलणं ऐकून ठेऊन दिला.


'' सर तुम्हांला सेतू सरांनी आत बोलवलंय. '' अच्छा म्हणजे हे सांगितलं होतं होय फोनवर हिला.


'' मी सुद्धा जाऊ का गं सोबत आतमध्ये? '' संयानं विचारलं.


'' हो जाऊ शकता ताई. '' रोझानं प्रत्युत्तर दिलं आणि ती तिच्या पुढच्या कामात गुंतली.


दोघेही उठून शेजारचं दार उघडून आत गेले.


'' ये. ये. संयाताई. काय म्हणतेस? कशी आहेस? '' सेतूनं अगदी मनापासून संयाचं स्वागत केलं. संयानंपण हसून त्या स्वागताचा स्विकार केला.


'' अरे मी छान आहे. फार काही नाही रे! जरा कामात गुंतले होते इतकंच. ''


'' पण, तू वेळात वेळ काढून इथे आलीस हे बाकी फार छान झालं. आणि रावीश तुझं काय चाललंय? कसा आहेस तू? उगाच नाहीतर तुला वाटायचं की मी आपला ताईशीचं बोलतोय म्हणून. तसं अजिबात काही नाहीए. असं समज की तू तुझ्या घरीच आहेस. बरं तुला चोकोबार आईस्क्रीम आवडतं ना खूप. हे घे. एन्जॉय.'' असं म्हणून त्यानं उठून बाजूच्या फ्रीजमधून चोकोबार काढून ते रावीशच्या हातात ठेवलं.


आधीच रावीश या अशा एकंदरीतच घरगुती वाटणार्‍या वातावरणाने गडबडला होता. त्यात त्याला त्याच्या आवडीचं चोकोबार मिळालं, त्यानं तो आणखीनंच हडबडला. म्हणजे येताना त्यानं सवयीनं मनातचं ठरवलं होतं की संस्था तेही नाती जुळवून देणारी म्हणजे तिथलं सगळं वातावरण म्हणजे कसं शिस्तीबिस्तीचं असेल वगैरे. पण हे सगळं काही भलतंच दिसत होतं त्याला. हातात मिळालेल्या चोकोबारचा आस्वाद घेता घेता त्यानं सेतूला या त्याच्या कामाच्या संदर्भात प्रश्न विचारले. त्याच्या उत्तरांनी त्याला जास्त गोंधळात न टाकता उलट त्याच्या मनात असलेले गोंधळही दूर केले. त्याच्या हातातलं आईस्क्रीम संपलं हे दिसल्यावर सेतू त्याला म्हणाला, '' चल. तुला बघायचीय ना संपूर्ण अनोळखी परिचितची इमारत? ये आपण जाऊया. ताई तूही येतेस का? ''


'' नाही रे! माझी झालीय आधीच बघून. यालाच काय ती दाखव. मी जरा या अनघाचा समाचार घेते. दरवेळी मला टांग मारते ही पोरगी. येते म्हणते ऑफिसला आणि येतंच नाही रे ही! ''


'' बरं, बरं! चालू द्या तुमची लुटूपुटूची लढाई. मी जातो राव्याला घेऊन माझं हे अर्धं घर दाखवायला. चल ए राव्या! ''


सेतूनं त्याला जवळ जवळ ढोसलतंच बाहेर आणलं आणि ते दोघेही आता पहिल्या माळ्याच्या पायर्‍या चढत होते. रावीशला तर राव्या म्हटल्यावर कॉलेजचे दिवसच आठवले. मात्र त्याला हे माहीत नव्हत की ही सगळी किमया शरणची होती ते!.


'' हे बघ. राव्या हा पहिला मजला. इथे एकूण ११ फ्लॅट आहेत. तुला कुठे रहायला आवडेल सांग? जिन्याच्या जवळ की अगदी या टोकाला वर्दळीपासून दूर? ''


आधी रावीशला काही सुचेना मग त्याने चेंडू सेतूच्याच कोर्टमध्ये टोलवला. '' तुला कुठली आवडेल? ''


'' मला कुठली आवडेल म्हणतोस तर तू या सुरुवातीच्या भागतही नको राहूस आणि शेवटाकडेही नको जाऊस. या ज्या मध्यभागात आहेत तिथे रहा. नात्यांचंही तसंच असतं रे! कुणीतरी एकाने मध्यमार्गी व्हावंचं लागतं.'' त्याने बोलता बोलता त्याला नात्यांच्या काही आतल्या गमती जमती सांगितल्या.


दोघेही सगळा परिसर बघून परत आले तोवर अनघा आणि संयामधला सगळा बेबनाव संपून गेला होता. आता त्यांची परत जाण्याची वेळ झाली होती. रावीश गाडी काढायला निघून गेल्यावर संया सेतूला म्हणाली, '' मग कधी येतो म्हणाला तो? ''


'' ताई, अगं असं काय करतेस? तो कसं ठरवणार ते? ते आम्ही नाही का ठरवणार! आता एकदा मृगा इथे येऊन गेली की मग पुढच्या गोष्टी ठरवणं आणखी सोपं होऊन जाईल. '' सेतूचं बोलणं संपतंय तोवर बाहेर रावीशच्या गाडीचा हॉर्न वाजलाच. मग गीत पुढच्या आठवड्यात मृगाला घेऊन येतोच आहे असं सांगून संयानं सेतूचा निरोप घेतला.

..................................................

(१२)


संयासोबत अपला जाऊन सेतूला भेटून आलेला रावीश बर्‍यापैकी शांत झाला होता. आता त्याला कुठेतरी आतून वाटत होतं की पुन्हा एकदा आयुष्यात सगळं आधीसारखंच सुरळीत होईल.


घरी आल्यावर मृगाला घरात रावीशच्या नसण्यामुळे निर्माण झालेली शांतता लगेच लक्षात आली. पण आईला किंवा पप्पांना विचारायचं कसं? यावर नंतर विचार करू असं ठरवून ती फ्रेश व्हायला आत निघून गेली. दिप्तीला तिच्या येण्याची वेळ माहीत होती. त्यामुळे तिने मृगा फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत हॉलमध्ये छानसा उपमा आणि चहाची तयारी करुन ठेवली. तोवर फ्रेश होऊन मृगा आलीच बाहेर.


'' आई छान वास सुटलाय तिखट सांजाचा. '' हे तिच्या माहेरचं उपम्याचं नाव होतं.


'' अगं तू येतेयसं म्हणून फोन केलास ना! म्हटलं तुझ्या आवडीचा उपमा करावा. फार दिवसांत सोबत बसून चहा आणि गप्पा झाल्या नव्हत्या ना! जरा लेकीशी गप्पा माराव्यात हवापाण्याच्या. आमच्या घराचा वातकुक्कुट सध्या भिरभिरलाय ना!'' दिप्ती हसतंच म्हणाली. मृगापण तिच्यासोबतीनं हसण्यात सामील झाली.


'' काय मग कसं काय चालू आहे ऑफिसमध्ये सगळं? ''


'' काही नाही गं! चाललंय म्हणायचं. रोज मरे त्याला कोण रडे असं आहे सगळं. रोज तेच काम करायचं. रोजचीच आकडेमोड, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन-अपडेशन-डिलीटींग, मिटींगा, चर्चा, कॉफी पें चर्चा, चाय पें चर्चा आणि कशाकशाच्यावेळी चर्चा होतील काही सांगता येत नाही. सगळं आयुष्य यातच चाललंय.''


'' मग यातून जरा बाहेर येऊन रावीश आणि तू एखाद्या सुट्टीवर का नाही जात?'' दिप्तीनं सरळ मुद्यालाच हात घातला.


मृगाला अजिबातच कल्पना नव्हती की आई असं काही म्हणेल अशी. तिला एकदम चहा पिताना ठसकाच लागला.


'' अगं हो, हो.'' दिप्तीनं मायेनं तिच्या पाठीवरुन हात फिरवला.


'' आई तुला तर सगळं माहीत आहे ना! ३ महिन्यांची मुदत मिळालीय ते? आणि अशा वेळेला तुला हा असला विनोद कसा सुचू शकतो?''


'' हे बघ बाळा, हा विनोद नाहीये. रावीश माझा मुलगा आहे. पण मी तुला मुलीपेक्षा कमी मानलं नाही. मला अगदी मनापासून वाटतंय की तुमच्यात हा जो काही बेबनाव झालाय. ज्यामुळे तुम्ही कोर्टाची पायरी चढलात. तो सगळा तुमच्यातल्या तुमच्यात मिटवून टाका. तुमचा विस्कटलेला संसार मी आणि पप्पा नाही बघू शकत गं! तू सांग मला तुमच्यात नक्की काय झालंय ते! मी बोलते रावीशशी. तो तुला उणं अधिक काही बोललाय का? त्याने कधी आमच्या अनुपस्थितीत तुझ्यावर हात वगैरे तर उचलला नाहीये ना? अशा कुठल्या कारणासाठी जर तू वेगळं व्हायचं म्हणतेस तर मी तुझ्या बाजूनंच उभी राहीन याबद्दल तू अजिबातच शंका घेऊ नकोस. पण आधी मला तुमच्यात काय झालंय ते तरी सांग.'' आधी दिप्तीच्या ह्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हेच मृगाला सुचेना. थोडावेळ विचार करुन ती म्हणाली, '' आई, हे बघा. तुम्हांला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहिये. रावीशनं कधीच त्याची मर्यादा ओलांडली नाही. पण तरीही जे काही घडलंय आणि घडणार आहे त्यावर मला विचार करायला वेळ हवाय. '' एवढं बोलून ती उठून आत निघून गेली. दिप्तीनं विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सध्यातरी तिच्याकडे नव्हतं.


आत जाउन बेडवर पडल्या पडल्या तिला संयाच्या ऑफिसमधला झगडा आठवत होता. मग गीतचं बोलणं आठवलं. तो म्हणाला त्याप्रमाणे आपल्या बोलण्यात खरंच काही तथ्य नव्हतं का? आपण अजून शोधायला हवं होतं का त्याच्या आणि शरयूच्या नात्याविषयी? पण शरयूला भेटलो तेव्हा तर अजिबातचं असं काही वाटलं नाही आपल्याला की या दोघांत काही असावं म्हणून. काय चाललंय नक्की आपल्या नात्यात? का आपण एकत्र बसून या विषयावर बोलू नाही शकलो? कुणाचा ईगो नक्की दुखावतोय? माझा? रावीशचा? की आम्हां दोघांचाही ईगो आमच्या नात्याच्या आड येतोय? विचार करकरुन तिचं डोकं पार भंजाळून गेलं. न राहवून तिनं गीतला फोन केला.


'' गीत, दादा. गीत.'' मृगाला आता तिचं रडणं आवरत नव्हतं.


'' मृगा, काय झालं गं? अशी हमसाहमशी का रडतेयसं तू? रावीश आणि शरयूचं खरंच काही आहे का नातं?'' त्याच्या आवाजात धाकट्या बहिणीबद्दल असावी अशी कातर काळजी होती.


'' नाही दादा. तसं काहीच नाहीये रे! मला, मला कळतंच नाहीए मी काय करु ते? आजच्या आज आपण कोर्टात घटस्फोट मागे घेण्याचा अर्ज दाखल करुया का? मला आई-पप्पांची अवस्था बघवत नाहीये रे! आमच्या दोघांमुळे त्या दोघांना विनाकारणंच किती मनस्ताप सहन करावा लागतोय. घरात जर ही अवस्था आहे तर बाहेर त्यांना काय आणि कुठल्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत असतील या विचारानेच कासावीस व्हायला होतंय मला. सांग ना मी काय करु?''


पलीकडून गालातल्या गालात हसून घेऊन गंभीर स्वरात गीतनं विचारलं, '' कोर्ट म्हणजे काय वाटलं गं तुला? आज घटस्फोट मागितला. उद्या वाटलं म्हणून तो परत घेतला. अगं हाच निर्णय पस्ताव्यातून न येता आनंदाने तुम्ही एकत्र यावं म्हणून तर तुम्हांला ३ महिन्यांची मुदत दिलीय ना! आणि असं अचानक तुला उपरती वगैरे का झाली बरं? हा सगळा विचार निर्णय घेण्याआधी का नाही केलात तुम्ही? तू त्याला विचारलं का नाहीस शरयूबाबत स्पष्टपणे? किंवा त्यानं तरी तुला का नाही तन्मीतबद्दल काहीच विचारलं? तुम्ही असे तडकाफडकी का घटस्फोटासाठी तयार झालात? इतकं कसं गं तुमचं नातं विसविशीत आहे? '' असं बरचं काही संधी मिळाली आहे म्हणताना गीतमधल्या समुपदेशकानं तिला ऐकवून घेतलं.


'' तसं नाहीये रे! आमचं नातं.... '' ती मध्येच बोलायची थांबली. '' हं! बोल. बोल. ऐकतोय मी.'' त्याचा आवाज अजूनही खरपूस समाचार घेणार्‍या मास्तरसारखा आहे असं तिला वाटलं. '' दादा, तूच सांग. आता मी काय करु म्हणजे आमचं नातं पूर्वीसारखं होईल?'' तिनं थोडं घाबरतच त्याला विचारलं.


गीत हसतंच म्हणाला, '' काळजी नको करुस. आहे याच्यावरचा उपाय आहे आपल्याकडे. उद्याच्या सोमवारी आपण जातोय अनोळखी परिचितला. तिथेच सापडतील आता सगळी उत्तरं तुला. आज तरी छान झोप. शुभरात्री.'' तिनं पुढं काही बोलण्याआधी पलिकडचा फोन कट झाला होता.


..................................................................

(१३)


आज सोमवार. मृगानं आज वर्क फ्रॉम होम अप्लाय केला होता आणि सुदैवानं तिला तो मिळाला होता. तिचं गीतशी आधीच बोलणं झाल्याप्रमाणे ती बरोबर १२ वाजता गीतच्या ऑफिसला पोचली होती. ती आत शिरणारच होती तेवढ्यात तिला आतून एक पुरुषी आवाज गुणगुणताना ऐकू आला आणि तिचा पाय दाराबाहेरच थबकला.


''आनन्दोत्थं नयनसलिलं यत्र नान्यैर्निमित्तै -


र्नान्यस्तापः कुसुमशरजादिष्टसंयोगसाध्यात् ।


नाप्यन्यस्मात्प्रणयकलहाद्विप्रयोगोपपत्ति -


र्वित्तेशानां न च खलु वयो यौवनादन्यदस्ति ।।''


आनंदाश्रू नयनीं केवळ अन्य तयांना निमित्त नाहीं


 मीलनसुख अंतरतां त्यांना मदनशरांविण नसे व्यथाही


 प्रणयकलह झाल्यास घडे तो - तोच तेवढा वियोग त्यांते


 विचित्र सारे - वयहि न दुसरें तारुण्याविण यक्षजनातें ।


'' नीवीबन्धोच्छ्वसितशिथिलं यत्र बिम्बाधराणां


क्षौमं रागादनिभृतकरेष्वाक्षिपत्सु प्रियेषु ।


अर्चिस्तुङगानभिमुखमपि प्राप्य रत्नप्रदीपान्


ह्रीमूढानां भवति विफलप्रेरणा चूर्णमुष्टिः ।।''


हात घालता सजण निरीला सैल रेशमी वसन ओघळे


लाजुनियां बावरती ललना काय करावें आतां नकळे


अंगराग उधळिती मुठीनें, प्रकाश तिमिरीं बुडवूं बघती


ज्योत उंच पण तशीच झळके रत्नदीप ते मुळीं न विझती 


'' यत्र स्त्रीणां प्रियतमभुजालिंङ्गनोच्छ्वासिताना -


मङ्गगग्लानिं सुरतजनितां तन्तुजालावलम्बाः ।


त्वत्संरोधापगमविशश्चन्द्रपादैर्निशीथे


व्यालुम्पन्ति स्फुटजललवस्यन्दिनश्चन्द्रकान्ताः ।।


उत्तररात्रीं रतिलीलेने क्लान्त जाहल्या जिथें कामिनी


सैल मिठी सजणाची होतां आळसावुनी पडती शयनीं


छतास झुलती चन्द्रकान्तमणि चंद्रकरांनी ते विरघळती


थेंब टपोरे तनुवर पडतां विलासिनींचा शीण वारिती


'' गत्युत्कंपादलकपतितैर्यत्र मन्दारपुष्पैः


पत्रच्छेदैः कनककमलैः कर्णविभ्रंशिभिश्च ।


मुक्ताजालैः स्तनपरिसरच्छिन्नसूत्रश्च हारै -


र्नैशो मार्गः सवितुरुदये सूच्यते कामिनीनाम् ।।''


सूर्योदयिं तूं पथीं पाहशिल वेणीमधुनी सुमनें सुटलीं,


कमळें ढळतां कानांवरुनी ठायीं ठायीं दलें विखुरलीं,


पुष्ट स्तनांवर हेलकावतां तुटल्या माळा, गळले मोती,


अभिसारोत्सुक रमणी गेल्या इथून रात्रीं - खुणा सुचविती


'' तां जानीथाः परिमितकथां जीवितं मे द्वितीयं


दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् ।


गाढोत्कंठा गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बाला


जाता मन्ये शिशिरमथिता पद्मिनी वाऽन्यरूपा ।।''


केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जाण लाडकी


विरहें माझ्या मनीं झुरतसें चक्रवाकि वा जणुं एकाकी


कठीण दुरावा गाढ सोसतां असेल गेली म्लान होऊनी


शिशिराचा आघात सोसतां विशीर्ण व्हावी जशी कमलिनी!


तिचं तिलाच माहीत नव्हतं ती कितीवेळ तशीच त्या केबीनच्या बाहेर उभी होती ते! पायाला रग लागली होती. हृदयात रावीशच्या आठवणीने कालवाकालव झाली होती. डोळ्यांचे झरे कधीचेच वाहत होते. तिला कॉलेजमध्ये रावीश जेव्हा जेव्हा नाटकातले संवाद म्हणायचा, शेरोशायरी ऐकवायचा, मुक्तछंदातल्या कविता वाचायचा तेव्हा तेव्हा त्यात रंगून जाणार्‍या सगळ्या वेळा आताही तिच्या नजरेसमोरुन तरळत होत्या. तिला तिथून बाजूला व्हावं असं क्षणभरासाठीही वाटत नव्हतं. शेवटच्या कडव्याने तर तिला पार हवालदिल करुन टाकलं. असं वाटायला लागलं की असंच धावत जावं आणि रावीशच्या मिठीत विरघळून जावं. तो काय म्हणेल? काय विचारेल वगैरे कुठल्याही गोष्टी तिच्या मनाला शिवल्यासुद्धा नाहीत. ती छातीशी हात गच्च धरुन उचंबळू पाहणार्‍या भावनांना थोपवत भिंतीला टेकून तिथेच उभी होती. कार्तिक काहीतरी कामासाठी बाहेर गेला होता. तो परत येताना त्याचं या अशा अवघडलेल्या अवस्थेत उभारुन टिपं गाळणार्‍या मृगाकडे लक्ष गेलं.


'' अरे, मृगा मॅडम! तुम्ही इथे अशा का उभ्या आहात? चला ना आत. ''


त्याच्या अशा अचानक आलेल्या प्रश्नानं मृगा भानावर आली. झटकन् आसवं पुसून ती कार्तिकच्या मागोमाग गीतच्या केबीनमध्ये घुसली.


'' या या. मृगा मॅडम. तुम्हांला जरा उशीर झालाय यायला असं नाही का वाटत?'' त्यानं भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत तिला विचारलं. पण ती काही बोलणार इतक्यात रॅक जवळ उभा राहून फाईलमध्ये काहीतरी शोधणारा कार्तिक च बोलला.


'' सर, त्या बहुतेक खूप आधीच आल्या होत्या. माहीत नाही किती वेळ बाहेर उभ्या होत्या. मला दिसल्या येताना म्हणून म्हणालो आत चला. तेव्हा आत आल्या त्या. ''


'' काय गं मृगा! कधी आलीस तू?'' आश्चर्याने गीतनं तिला विचारलं.


'' तरी अर्धा तास झाला असेल मला येऊन.'' ती अगदीच मोघम बोलली.


'' अगं मग अशी बाहेर का उभी होतीस तू?'' तो अजूनही कोड्यातच होता तिच्या वागण्याने.


'' मी आत यायला आणि तू ते संस्कृतमध्ये काहीतरी कवितांसारखं वाचायला एकच गाठ पडली. एका क्षणात मी माझ्या जुन्या दिवसात जाऊन पोचले. रावीशसुद्धा हे असंच काहीतरी भन्नाट भन्नाट वाचायचा आणि आम्हांला वेडं करायचा. बरं त्याच्या स्मरणशक्तीला दाद द्यावी तेवढी थोडी! कारण जिथे माझ्यासारखे माठ ब्लॅन्क होतात अशा ठिकाणी त्याला काय काय आठवतं. अगदी महाभारत, रामायण, भारतीय पौराणिक साहित्य, कुठल्यातरी पाश्चात्य लेखक, कवी, अभिनेता,संशोधक, राजकारणी असे कुणीही कधीही आठवायचे आणि तेही त्यांच्या मुद्देमालासहीत.''


ती आणखीही बरंच काही रावीशविषयी सांगत होती. तो मात्र अशा रावीशमध्ये गुंतून पडून त्याच्याविषयी भरभरुन बोलणार्‍या तिचं निरीक्षण करत होता. त्याला उगाचंच आपलं वाटून गेलं किती प्रेम करते ही आणि तरी ह्यांना वेगळं व्हायचंय. मध्येच तिला थांबवत त्याने तिला आठवण करुन दिली की त्यांना आज ठरलेल्या वेळेतच अनोळखी परिचितला जायचंय म्हणून. ते दोघेही अप ला जायला निघाले. मृगानंच त्याला सुचवलं की तिच्याच गाडीतून जाऊया. मग ते तिच्याच गाडीतून निघाले. जाताना त्यांनाही तो रो हाऊसचा पट्टा लागला. आणि गीतला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की त्या दोघांच्याही भावना कित्ती सारख्या होत्या. संया रावीशसोबत जाउन आल्यानंतर तिने तो सगळाच प्रसंग गीतला सांगितला होता. त्यामुळेच जेव्हा मृगा त्याला म्हणाली की ही घरं किती छान आहेत; एखादं घेऊनच टाकावं. तो बघतंच राहिला तिच्याकडे. किती गोष्टी आणखी समान मिळणार आहेत आपल्याला यांच्यात शोधायला गेलो तर? या विचारात एकदा त्याने तिला लेफ्ट घ्यायला सांगितली आणि रस्ता त्याच्या ५ मिनिटांनी लक्षात आल्यावर गाडी मागे घेऊन पुन्हा राईट मारुन अप च्या सोसायटीत पोचले होते ते! इथेही पुन्हा तेच. तिलाही त्याच्यासारखंच सगळी ईमारत फिरुन बघायची होती. बरं सेतूनेपण ही गोष्ट आपल्या मनाच्या नोंदवहीत टिपली आणि त्याला जे नात्यांच्या संदर्भातलं तत्वज्ञान सांगितलं तसंच काहीसं हिलाही सांगितलं. गेल्या गेल्या तिला सेतूनं मसाला चहा दिला आणि ती एकदम अप च्या प्रेमातच पडली. रोझानं तिलाही रावीशला दिला तसलाच फॉर्म दिला. येताना भरुन आणा म्हणाली. तिथून बाहेर पडताना मृगा नेमक्या कुठल्या संदर्भांची जुळवाजुळव करत होती ते काही गीतला कळलं नाही तरी तिच्या एकंदरीतच उत्साहाने ओसंडलेल्या आवाजावरुन त्याने अंदाज लावला की यांचं नातं बहुतेक पुन्हा होतं तसं होणार.

..............................................

(१४)


रावीशनं कपाटाच्या खालच्या भागात ठेवलेल्या त्याच्या जुन्या बँगा काढल्या आणि तो त्या बँगा उघडून आतल्या पुस्तकं- वह्या अशा सगळ्या जुन्यापुराण्या जपून ठेवलेल्या गोष्टींचा पसारा मांडून बसला. आईबाबा आल्यामुळं २ बेडरुमची आई-मृगा आणि रावीश-बाबा अशी विभागणी झाली होती. आता त्यानं काढलेला पसारा बघून दीपेन वैतागला. रात्री ११:३० वाजता घरी येऊन मग त्यानं हे सगळे उद्योग सुरु केले होते. दिप्तीनं जेवणार का म्हणून विचारलं तर म्हणाला की जेवण झालंय त्याचं बाहेरच. ती आपली गुमान झोपायला निघून गेली. मृगा मात्र आज याचं चाललंय काय नक्की ते कळेना म्हणून अस्वस्थपणे चुळबुळत जागी होती. हॉलमधल्या सोफ्यावर कुरकुरत झोपलेला दिपेन शेवटी करवादला.

" आवरतंय का तुझं? आज झोपायला देणारेस का तू मला?''

" बाबा, बस आणखी १५ मिनिटं. झालंय आवरतंच आलंय माझं."

" अरे, १ वाजून गेलाय रात्रीचा. एवढं काय शोधतोयस त्या जुन्या अवशेषात?"

असं म्हणून तो कूस बदलून पुन्हा झोपेची मनधरणी करायला लागला.

आजचा शुक्रवार. उद्या आणि परवाची जोडून येणारी सुट्टी त्याला हातून दवडायची नव्हती. म्हणून तो फॉर्म घेऊन अप ला पुन्हा एकदा जाऊन सगळं नक्की करुन आला होता. ३ महिन्यांसाठी त्यानं दर शनिरविची सुट्टी अप च्या खात्यात लिहून टाकली होाती. आवरल्यानंतर तो शांत चित्तानं झोपायला गेला. बेडवर पडला आणि त्याला आठवलं की बाबा बाहेर सोफ्यावरच झोपलाय. तो पटकन् उठला आणि हॉलमध्ये झोपलेल्या बाबाला हळूच हाक मारुन उठवून आत घेऊन आला झोपायला. पलीकडच्या बेडरुममध्ये झोपलेल्या मृगाच्या डोक्यात मात्र रावीशच्या उत्साहाने तयारी करण्याचाच विचार चालू होता.


आजची सकाळ रावीशसाठी काहीतरी नवीन घेऊन आली होती कदाचित. तो सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठला. एक छानसा कडकडीत आळस देऊन त्यानं अंगातला आळसाचा उरलासुरला अंशही झटकून टाकला. स्वतःशीच गाणं गुणगुणत तो बाथरुममध्ये घुसला. दंतमंजन, मुखमार्जन सगळं आटपून थोडक्यात तोंड धुवून तो सरळ किचनमध्ये गेला. काय मनात आलं आणि त्यानं फ्रिज उघडला आतून अंड्याचा ट्रे बाहेर काढला. गॅसवर चहाचं आधण उकळायला ठेऊन त्यानं त्यात मापात चहापूड साखर घातली, गॅस बारिक केला आणि खालची ट्रॉली बाहेर ओढून आतलं व्हेजकटर बाहेर काढलं. पुन्हा एकदा फ्रिज उघडून त्यातून कोथिंबिर, मिरची, आलं, लसूण बाहेर काढून त्यानं ॑फटाफट कटरमध्ये टाकून त्याची वायर ओढून एकदम बारिक पेस्ट करुन घेतली. अंडी फोडून त्यात या सगळ्या मिश्रणाच्या सोबतीनं चवीपुरतं मीठ, जिरेपूड, हळद, हिंग, टाकून मिक्स केलं. मग त्यात ब्रेडचे स्लाईस टाकून त्यानं ते तेलात शॅलो फ्राय केले. नाश्त्याची ट्रॉली ओढून त्यावर त्यानं फ्रेंचटोस्ट आणि चहा सेट करुन तो हॉलमध्ये आला.


'' चला चांदोरकर कुटुंबियांनो सकाळ झाली आहे. नाश्त्याची वेळ झाली आहे. '' त्यानं खणखणीत आवाजात सगळ्यांना हाक मारली.


त्याच्या या खणखणीत आवाजानं आधी जाग आली ती मृगाला. तिनं डोळे उघडताच पहिला मोबाईल ऑन करुन किती वाजलेत ते पाहिलं. ' इतक्या लवकर उठला हा! आतासे तर फक्त ७:१५ वाजतायत. ' तिनं दिप्तीलाही उठवलं. त्यांच्याच सोबतीनं दिपेनसुद्धा कसाबसा आळसावत येऊन सोफ्यावर टेकला. तोवर रावीश बाहेरचा पेपर घेऊन आत आला.


'' ए, अरे काय हे? दातबित घासाल की नाही तुम्ही लोक? की अंथरुणातून उठून चहालाच येऊन बसलात.''


' हा मोठा सकाळीच तयार असल्यासारख्या गप्पा मारतोय. ' फुणफुणत मृगा बाथरुममध्ये गेली.


त्यानं तिचं फुणफुणणं ऐकंलं होतं पण ठरवून आज काही प्रतिक्रिया नाही दिली त्यानं.


सगळ्यांचा नाश्ता आटोपल्यावर तो म्हणाला, '' मी दोन दिवसांसाठी ऑफिस टूरवर चाललोय. गेल्या काही दिवसांत ऑफिसमध्ये बरंच काही बदललंय. घरात काही बोलायला तेवढा वेळ आणि परिस्थिती दोन्ही नव्हत्या म्हणून काही बोललो नाही मी. पण आज सांगतोय. माझ्यावर वेगवेगळ्या टेरीटरीजचा सर्व्हे करण्याची नवी जबाबदारी येऊन पडलीय आणि तुमच्या कुणाशी न बोलताच मी ती स्विकारलीय. सध्या घरात जसं वातावरण आहे मला त्यातून बाहेर पडायचंय. म्हणून मग मी हे पाऊल उचललं. ''


त्यानं थोडावेळ कुणाची काही प्रतिक्रिया येतेय का? खासकरुन मृगाची म्हणून वाट पाहिली. पण जेव्हा कुणीच काही बोललं नाही तेव्हा तो उठून आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या टाईम-मॅनेजमेंन्टच्या हिशोबाप्रमाणे तो बरोबर ८ वाजता घरातून आईबाबांचा निरोप घेऊन बाहेर पडला. खरंतर त्याला मृगालाही बाय करायचं होतं पण तो जाताना ती रुममधून बाहेरच आली नाही. रावीश निघून गेल्यावर अर्ध्या तासाने मृगाही दोन दिवस अमिताकडे जातेय रहायला असं सांगून निघून गेली. तेव्हाही दिपेनदिप्तीने तिला फारसं काही विचारलं नाही. फक्त पोचलीस की कॉल कर असं रावीशसारखंच तिलाही सांगायला ते विसरले नाहीत. कारण, हे दोघेही एकमेकांला चुकवून नक्की कुठे गेलेत हे माहीत होतं त्यांना. कालच अप च्या ऑफिसमधून दिपेनला फोन आला होता की रावीशने अप मध्ये ३ महिन्यांसाठी रजिस्ट्रेशन केलंय आणि आता तो दर शनिवार-रविवार ऑफिससर्व्हेच्या नावाखाली अप ला रहायला येणार आहे. संध्याकाळी दिप्तीला मेसेजवरुन कळवलं गेलं होतं की मृगा उद्या तिच्या अमिता नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाईल आणि रविवारी संध्याकाळी परत येईल. हा मेसेज तिला गीतनं फॉरवर्ड केला होता कारण मृगानं पालक म्हणून मोठा भाऊ या नात्यानं फॉर्ममध्ये गीतचं नाव टाकलं होतं.


ही दोघंही बाहेर निघून गेल्यानंतर सकाळचा दुसर्‍या वेळेचा चहा घ्यायला बसले असताना दिपेन दिप्तीला म्हणाला, '' हल्ली या ऑफिसांच्या कामाच्या पध्दतीत काहीच्या काही बदल झालाय नाही का? सुट्टीच्या दिवशीपण कामं करतात पोरं! ''


त्यावर चहा पिता पिता दिप्ती गालातच हसली.

............................................

(१५)


रावीशला बोलल्याप्रमाणे सेतूने मधल्या भागातली रुम दिली होती ३०३ नंबरची. त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने मृगा पोचली. तिला त्याच सेम फ्लँटची पार्टिशन रुम 203 दिली. आता त्या दोघांचा प्रवास समांतर रस्त्याने एकाच ध्येयाच्या दिशेने सुरु झाला होता. पहिल्या महिन्यात तसं काही फारसं विशेष घडलं नाही. दोघांनीही आपापला वेळ आपल्या जुन्या छंदाना परत आणण्यात घालवला. सेतूलाही काही घाई नव्हती. त्यामुळे त्यानेही त्यांना थोडं अप मध्ये रुळण्यासाठीचा वेळ देऊ केला. एकदा या वातावरणाची त्यांना सवय झाली की ते स्वतःच घडणाऱ्या घटनांवर वेगळ्या नजरेतून विचार करायला सुरुवात करतील हा त्याचा होरा होता. आणि बहुतेक वेळा त्याचा हा अंदाज बरोबर येई. महिन्याच्या शेवटच्या शनि-रवि च्या सुट्टीला रावीशची टेरीटरी बदलली आणि मृगाची मैत्रीणही. यावेळी ती राधिकाच्या घरी आली होती रहायला. तसं गीतकडून मृगाविषयी सगळ्या गोष्टी कळत होत्या दिप्तीला तरीही संशयाला जागा नको म्हणून एकदोनदा तिनं तिला सांगूनही पाहिलं की अगं रावीश नसतो घरात तर किमान तू तरी राहत जा गं सुट्टीच्या दिवशी घरात. आम्हांला दोघांना एकट्याने करमत नाही इथे. इथे काही गावच्या घरासारखी झाडपेडंसुद्धा नाहीत वेळ घालवावा तर. बाबा जातो त्याच्या मित्रांकडे रमी खेळायला, गप्पा मारायला. मी काय करु? वाचून वाचून असं कितीसे अंक वाचणारे मी? तिच्या या वक्तव्यावर दुसऱ्याच दिवशी मृगानं शेजारच्या नर्सरीमधून माणूस बोलवला. दिप्तीला गच्चीवर त्यांच्या वाट्याला आलेली जागा दाखवली आणि सांगितलं की हवी ती झाडं, कुंड्या, खत असं जे लागेल ते या मधूकडून मागवून घ्या. तुम्हांला हवं तर आपण इथे गच्चीत लॉनपण तयार करुन घेऊ आणि तिथे झोपाळा, ४ खुर्च्या, टीपॉय अशा सगळ्या जाम्यानिम्यासकट टेरेस गार्डन तयार करु. आणि ती ऑफिसला निघून गेली. दिप्तीला वाटलं जग केवढं पुढे निघून गेलंय. २५-३० वर्षापूर्वी काय करत होतो बरं आपण या वयात? आजची पिढी अगदी क्षणाक्षणाचा वापर करुन घेतेय तरी तिला वेळ कमी पडतोय. आणि आम्हांला कित्ती वेळ आहे आपल्याकडे असं वाटायचं. अपमध्ये अनघा आणि सेतूची मृगराच्या केसवर काय पद्धतीची स्ट्रँटेजी वापरायची यावर चर्चा चालू होती.

'' अनु, अजून आपण या दोघांसाठी काहीच स्ट्रॅटेजी ठरवली नाहीए. आताच्या घडीला तर दोघेही त्यांच्या आताच्या आयुष्यात आनंदी दिसतायत. त्यामुळे मला नेमकं काय करायचं हे ठरवायला वेळ लागतोय. '' सेतू थोडा जास्तच काळजीत दिसत होता.

'' डोन्ट वरी सेतू. काळजी नको करूस. आपण ठरवू काहीतरी. त्या दोघांना या गैरसमजाच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर काढायचंय. तेव्हा काही ना काहीतरी विदुरनिती ही वापरावीच लागणार आहे अपल्याला.'' अनघा बोलत असतानाच तिला स्क्रिनवर बाहेरच्या ऑफिसमधये कुरिअरवाली पोरगी आलेली दिसली आणि तिच्या मेंदूने नितीच्या संदर्भात हिरवा कंदील दिला.

'' सेतू, एक उपाय सुचलाय. बघ पटतोय का? '' - अनघा

'' सांग तरी काय ते! मग ठरवूया तो कितपत काम करेल ते.'' - सेतू

अनघानं सेतूला तिला सुचलेला उपाय सांगितला. काहीवेळ सेतू त्याच्यावर विचार करत राहिला. मग त्यानं आणि अनघानं ती स्ट्रॅटेजी कशी वापरायची यावर साधकबाधक चर्चा केली आणि शेवटी येत्या आठवड्यात ती वापरायला सुरुवात करायची या निर्णयावर ते येऊन पोचले. हा मृगराचा दुसरा महिना होता अप मधला. आज रावीश आल्यानंतर सेतूनं त्याच्याशी त्यानं आणि अनघानं मिळून केलेल्या चर्चेतून ठरलेल्या नितीबद्दल चर्चा केली.

'' रावीश, तुला आता अप मध्ये येऊन एक महिना पूर्ण झालाय. आता आपण इथे तू रुळलायस असं समजूया. इथे तुझ्या येण्याचं कारण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपल्याला तुझं घर, तुझा संसार, तुमचं नातं यावर विचार करण्यासाठी तू इथे आलायस हे विसरून चालणार नाही. आणि अप मध्ये काही नियम हे तुमची नाती सुदृढ व्हावीत यासाठी पाळावेच लागतात. या महिन्यापासून तुझ्या शेजारच्या रुममध्ये एक नवीन व्यक्ती येणार आहे रहायला. तुला तिच्यासोबत आपली सुखदुःख वाटून घ्यावी लागतील. बोलणार असलास तर बोलू शकतोस. पण जर का तू न बोलण्याचा पर्याय निवडलास तर तुला तुझं लेखनकौशल्य पणाला लावावं लागेल. कारण, तुला तिथे लावलेल्या लेटरबॉक्सचा वापर करावाच लागणार आहे. ''

सेतूनं रावीशला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या. आणि हे ही सांगायला विसरला नाही की तिथे पत्र लिहिण्यासाठी टाईपरायटर ठेवलाय म्हणून. त्याला अक्षर ओळखीचं आहे वगैरे कुठल्याच नव्या गुंत्याची भर नको होती ही त्यातली खरी गोम होती. जसं हे सगळं सेतूनं रावीशला सांगितलं तसंच ते अनघानं मृगालाही सांगितलं. आपण एका संस्थेमध्ये आपल्याच नात्याच्या पुनर्भरणीसाठी मदत मागायला आलोय तर त्यांचे नियम पाळायलाच हवेत या विचाराने मृगरानं त्या नितीचा स्विकार केला. आता सेतू आणि अनघा त्यांची ही नवी निती कशी काम करेल ते पाहणार होते.

.............................................................................

(१६)


रावीश खोलीत आल्यापासून फक्त विचारच करत होता. आज त्यानं नेहमीसारखी आल्या आल्या किचनमध्ये जाऊन कॉफी केली नाही की आपल्या वाचनासाठीचा नेहमीसारखा सेटअप लावला नाही. आत येऊन जेमतेम बूट काढून तो आरामखुर्चीत स्थिरावला आणि एकंदरीतच ह्या वार्तालाप प्रक्रियेची सुरुवात कशी करावी यावर विचार करु लागला. तो डोळे मिटून आरामखुर्चीला झोके देत विचार करतच होता इतक्यात त्याच्या आतून कुलुप लावलेल्या दारावर टकटक झालेली त्याला ऐकू आली. आधी त्याला वाटलं की त्याचे कान वाजले असतील पण आणखी एकदा टकटक झाल्यावर तो त्या दाराकडे गेला आणि त्यानं विचारलं,


'' कोण आहे? ''


पलिकडून उत्तर आलं, '' मी नंदिनी. तुम्ही? ''


'' मी सर्वेश. ''


'' हाय. कसे आहात? ''


'' मी छान आहे. तुम्ही कशा आहात? इथे कधीपासून आहात? '' रावीशची सवाल- एक्सप्रेस पुन्हा एकदा सुसाट सुटण्याच्या तयारीत होती.


( सॉरी बरं का मित्रांनो! एक सांगायचं राहूनच गेलं तुम्हांला. अनोळखी परिचितमध्ये आल्यानंतर तुमची नावं बदलली जातात गोपनीयतेसाठी. शेवटी आपलं खाजगी आयुष्य जागासमोर उघडंवाघडं करायला कुणाला आवडेल ना! नाही म्हणजे तशी माणसं असली तरी मृगरा त्यातले नव्हते.)


'' मीही छानच आहे. आजच आलेय. '' मृगा अनघानं पढवलेल्या गोष्टींची पोपटपंची करत होती.


'' तुम्हांला विचारलं तर चालेल ना इथे येण्याचं कारण? '' सर्वेशनं अंदाज घेत घेत पाय पुढे टाकला.


पलिकडून थोड्या उदास सुरात नंदिनीचं उत्तर आलं, '' हो. आमचा घटस्फोट होणार आहे दोनेक महिन्यात. ''


'' एवढ्या का उदास आहात तुम्ही? घटस्फोट काय कुणी आनंदाने घेतं का? काहीतरी तसंच कारण घडलं असेल म्हणून तर वेळेनं एवढी मजल मारली असेल ना! '' सर्वेशनं समजुतीचा सुर लावला.


'' खरंय तुमचं! त्याचा विश्वासच नाहीए माझ्यावर. आणि ज्या नात्यात विश्वास नाही ते लांब पल्ल्यापर्यंत कसं जाणार तुम्हीच सांगा! '' नंदिनीनं त्याला प्रतिप्रश्न केला ज्याचं उत्तर म्हणून त्यानं किचनच्या सर्व्हिंग विंडो स्लॉटमधून कॉफीचा मग तिच्याकडे सरकवला.


'' घ्या कॉफी घ्या. काही प्रश्नांची उत्तरं आपण वेळेवर सोडून द्यायला हवीत. ''


मृगाच्या मैत्री करण्याच्या स्वभावामुळे तिनं नेहमीसारखा इथेही पुढाकार घेतला. इथल्या खोल्या बऱ्यापैकी साऊंडप्रूफ असल्यानं फक्त दार आणि त्याच्या शेजारची विंडो इथूनच त्यांना बोलण्यासाठी जागा होती. त्यानं आपली आरामखुर्ची दाराकडे ओढून घेतली आणि नंदिनीनं तिचं टेबलखुर्ची भिंतीला टेकवून टाकली. आणि म्हणता म्हणता त्यांच्या गप्पांची चांगलीच मैफील जमली. हे सगळं सीसीटीव्हीमुळे सेतू आणि अनघासकट नत्रामही पाहत होता ऑफिसमध्ये बसून.


'' हे एक बरं झालं की दोघांनी एकमेकांना प्रतिसाद दिला. '' नत्राम


'' हो ना! मलाही थोडी काळजीच वाटत होती रे! या दोघांनी प्रतिसाद दिला तर बरं होईल अशी मी प्रार्थना करत होते पण हा सेतू मात्र एकदम शांत होता; कसलीच चिंता नसल्यासारखा. '' अनघानं नत्रामकडे सेतूविषयी तक्रार केली.


'' असू दे गं! त्याचा त्यामागे काहीतरी विचार असेल. हो ना रे सेतूदा? '' - नत्राम


'' अगदी बरोबर आहे तुझं नत्राम. मी फार काळजीत यासाठी नव्हतो कारण मी दोघांवरही इथे आल्यापासून पुष्पौषधीचे उपचार चालू केलेत. रावीशच्या खोलीत असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मी ऍग्रीमनी आणि वाईल्ड ओट घातलंय तर मृगाच्या खोलीतल्या पाण्याच्या टाकीत जेनेटीएन आणि पाईन घातलंय. ही दोन्ही औषधं आता त्यांचा परिणाम दाखवायला लागलीत. रावीशला वाचनाचा छंद आहे. पण त्याला त्याच्या भावना तितक्या चांगल्याप्रकारे व्यक्त करता येत नाहीत. याचं कारण काय म्हणशील तर त्याच्याकडे शब्द आहेत, भावना आहेत पण नेमकी व्यक्त करण्याची पारदर्शिता नाही. म्हणून मग ही दोन औषध त्याच्यासाठी वापरलीत. ऍग्रीमनी आतल्या भावनांना वरच्या थरावर आणण्याचं काम करतं तर वाईल्ड ओटमुळे आपल्याला या भावनांचं नक्की काय करायचंय त्यासंदर्भात पारदर्शकता येते. ''


'' मग मृगाला दिलेली औषध काय काम करतात? '' लीलानं आत येत प्रश्न विचारला.


'' काय बाईसाहेब आज लवकर आलात परत? '' नत्रामनं तिलाच उलटा प्रश्न विचारला.


'' थांब रे! आधी मला सेतूदा काय सांगतोय ते ऐकायचंय. हं! बोल तू सेतूदा. '' हे अपमधलं शेंडेफळ सगळं स्वतःच्या मर्जीनं करायचं.


'' कसं आहे लिला की मृगाचा विश्वास थोडा डळमळीत आहे. हा डळमळीत असणारा विश्वास पक्का करण्याचं काम जेनेटीएन करतं तर पाईन तिला ह्या विश्वासाच्या सकारात्मक बाजू पहायला मदत करेल. आलं का तुझ्या लक्षात बाळा! '' सेतूनं लीलाला समजावलं.


'' म्हणजे दादा हे असं होईल का रे! की हे दोघे आणखी काही दिवसांनी आपआपले मुद्दे नीटपणे एकमेकांसमोर मांडतील आणि त्यातून त्यांचा हा आताचा प्रश्न सुटेल. ''


'' हो. असंच होईल. पण आपल्यालाही त्यासाठी वाट बघावी लागेल. ''


त्या दोघांच्या गप्पांनी या दुसर्‍या महिन्याची सुरुवात झाली होती. आणि आजचा हा शेवटचा आठवडा होता. गेल्या आठवड्यात तसा त्यांच्यात फारसा काही मौखिक संवाद झाला नाही. पण नत्रामच्या ससाण्याच्या नजरेनं लेटरबॉक्समध्ये पडलेलं सर्वेशनं नंदिनीसाठी लिहिलेलं पत्र टिपलं होतं. त्याला एकंदरीतच या प्रकरणाला मिळालेलं वळण आवडलं होतं.


नंदिनी आली तेव्हा तिला तिची वाट बघत लेटरबॉक्समध्ये पडलेलं ते पत्र दिसलं. कुतुहलानं तिनं ते उचलून घेतलं. आत आली. फ्रेश झाली. फ्रिजमधून आईसक्यूब काढून तिनं ते ग्लासात घातले. त्यात पाणी ओतलं, आईस-टी ची पाउडर टाकली. चमच्याने ते ढवळत ती खुर्चीवर बसली. टेबलावर ठेवलेलं ते पत्र तिला खूणावत होतं. एक घोट घेउन तिनं ते पत्र उचललं. आता तिच्या लक्षात आलं की ते पत्र सुगंधित आहे. तीनं ते नाकाजवळ आणलं आणि नाकभरुन हुंगलं. तिच्या मनात खोलवर कुठतरी दडून बसलेल्या रावीशच्या आठवणी डहुळल्या. उघडावं की नाही या विवंचनेतच तिनं ते पत्र उघडलंपण होतं. टाईप केलेल्या त्या अक्षरांवरुन तिची नजर अलवारपणानं फिरत होती.


प्रिय नंदिनी,


मला माहीत नाही मला तुला या नावाने हाक मारण्याचा कितपत हक्क आहे ते! तशी आपली ओळखही काही फार जुनीपुराणी नाहीए. पण गेल्या काही दिवसांत तुझ्यात मला एक खूप जवळचा मित्र भेटलाय. तसं पहायला गेलं तर आपण अनोळखीही नाही आणि ओळखीचेही नाही. तरीही असं वाटतंय की तुझ्याशी कुठल्यातरी जन्मीचे ऋणानुबंध असावेत. मीही इथे तुझ्यासारखाच घटस्फोटाची जखम घेऊन आलोय. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. पण तिला गेल्या काही वर्षांत माझं हे प्रेम कळेनासं झालंय हे माझं दुःख आहे. कशी कुणास ठाऊक माहीत नाही पण तुझ्या भेटण्यानं त्या दुःखावर एक अलवार अशी फुंकर घातलीय. आता मला ते पूर्वीइतकं टोचत नाही. पहिल्या दिवशी जेव्हा मला कळलं की तुझ्याशी मला ओळख करुन घ्यायची आहे तेव्हा मला प्रश्नच पडला होता कशी आणि कुठून सुरुवात करु म्हणून. पण तुझ्या पुढाकारानं गोष्टी कशा सोप्या सरळ होऊन गेल्या. तुला सांगू? माझ्या तिचा स्वभावही असाच आहे बघ! पटकन् मिसळून जाण्याचा. गेल्या काही वर्षांत मात्र आयुष्याची कुठली समीकरणं बरोबर आली, कुठली चुकली आणि कुठल्या समीकरणाच्या पायर्‍या चुकल्या मला आजही नेमकं नाही सांगता यायचं. म्हणूनच या सगळ्या पडणार्‍या प्रश्नांची उत्तरं शोधायला मी इथे आलोय. महिना झाला मला इथे येऊन. गेल्या महिनाभरात मी स्वतःला खुप सारा वेळ देऊ केला. खूप सारी पुस्तकं वाचली मी अधाशासारखी. तुला त्यादिवशीची कॉफी आवडली का गं? ती मी इथे येऊनच बनवायला शिकलो. तसा मला रोजचा स्वयंपाक करणं वगैरे आवडत नाही फारसं. पण कधीतरी सहज म्हणून किचनमध्ये घुसून काहीतरी वेगळं शिजवणं आणि त्यासाठी तारीफ करुन घेणं आवडतं मला. म्हणून मग मी इथे आल्यापासून बर्‍याच वेगवेगळ्या पाककृती बनवायला शिकलो मी. कधीतरी करुन तुलाही खायला घालेन. आवडेल ना तुला माझ्या हातचं शिजवलेलं खायला?


बहुतेक माझी गाडी रुळावरुन खुपच घसरलीय असं वाटतंय. त्याचं काय आहे ना! हल्ली मला खूपदा चेहरा नसणारी तूच भेटत असतेस खूप ठिकाणी. त्यामुळे असेल कदाचित मी असा भरकटलोय. सॉरी हं! मला तुझ्याशी आजही खूप बोलायचं होतं. वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पांची तुझ्या सोबतीनं मैफिल जमवायची होती. पण आज ऑफिसला दुपारपर्यंत अडकून पडलोय मी. लंचनंतर येईन. तू येतेयसं ना?


तुझा ओळखीचा अनोळखी मित्र,


सर्वेश...

...........................................................

(१७)


मृगानं ते पत्र अगदी सावशित बसून वाचून काढलं. तिला सारखं असं वाटत होतं की ही लेखनशैली कुठंतरी आपल्या परिचयाची आहे म्हणून. पण रावीशचं हे लिहीत असेल असा तिला जराही अंदाज आला नाही. कारण, एकतर खूप वर्षांत रावीशनं तिला असं पत्र वगैरे लिहीलं नव्हतं. जसं तो लग्नाआधी आणि लग्नानंतरची काही वर्षं भेटकार्डांच्या आडून लिहीत होता. ही शैली जरी खूपशी रावीशच्या लिहीण्याशी मिळतीजुळती वाटत असली तरी मध्येच चालू विषय सोडून बोलताना आणि लिहीतानाही भरकटणं हा रावीशचा स्वभावच नव्हता. त्यामुळे ती थोडी संभ्रमात पडली होती. पण तरीही तिला मित्र म्हणून सर्वेश आवडला होता. आता तिच्यासमोर प्रश्न हा होता की त्याला उत्तर कसं द्यायचं कारण लिहीणं बिहीणं हा काही मृगाचा प्रांत नव्हता. तिनं मनोमन ठरवून टाकलं होतं की त्याला तोंडीच उत्तर द्यायचं म्हणून. तिनं इथे येऊन झोपा काढणं, मित्रमैत्रीणींशी गप्पा मारणं आणि वेगवेगळ्या क्राफटिंगच्या वस्तू तयार करणं यातच सगळा सगळा वेळ घालवला होता. जसा रावीशच्या खोलीत पुस्तकं आणि किराणा सामान भरलेलं होतं तसं मृगाच्या खोलीत क्राफटिंगसाठी लागणार्‍या वस्तूंचा भरणा करुन ठेवला होता.


'' सेतूदा, सर्वेशनं नंदिनीला पत्र लिहीलं. '' नत्रामनं सेतूला नवी माहीती दिली.


'' अच्छा. चला म्हणजे एक एक करत बर्‍याच चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात दोघांच्या आयुष्यात. '' सेतूच्या चेहर्‍यावर एक समाधानाची झलक आली.


'' हो. पण मग आपण त्यांच्याबाबतीत एवढी एकच निती वापरणार आहोत का सेतू? '' अनघानं विचारलं.


'' अगदी तसंच काही नाही. जर तशीच काही गरज वाटली तर वापरुयात ना आणखी एखादी निती. पण सध्या तरी मला त्याची फारशी गरज वाटत नाहीए. म्हणजे बघ हं! मृगाला लिहायचा कंटाळा आहे. पण रावीशला पत्र लिहायला आवडतं. तो काही लेखक वगैरे नाहीए तरीही त्याला पत्र लिहिण्यात चांगली गती आहे. आपल्याला ते या नितीचा नेमका कसा वापर करुन घेतायत ते तर पहायला हवं ना! आता तर कुठं एक पत्र लिहीलं गेलंय. बघूया आपण मृगा पत्र लिहीते का ते? नाहीच लिहीलं तर तिला नियम मोडण्यासाठी तंबी द्यायला तू आहेसच की नत्राम. '' कागदपत्रांमध्ये डोकं खुपसत असतानाच सेतूला अचानक काहीतरी आठवलं आणि तो अनघा- नत्रामकडे वळून म्हणाला, '' तुमच्यासाठी एक नवी बातमी आहे. विचार करुन सांगा आपण काय करायचं ते! काल माझं आणि रावीशचं फोनवरुन बोलणं झालं. तो म्हणत होता की त्याला अजून ३ महीने वाढवून हवेत. मी सांगितलं त्याला की माझ्या टीमशी बोलल्याशिवाय यावर लगेच काही उत्तर देऊ शकत नाही तुला मी. आता तुम्ही सांगा आपण काय करायचं ते! मला वाटतंय की त्याला असे दिवस वाढवून द्यायला काही हरकत नाही म्हणून. तुला काय वाटतं अनघा? वाढवावेत का आणखी ३ महिने आणि करावं का ६ महिन्यांचं कॉन्ट्रक्ट? ''


अनघा विचार करत होती तोवरच नत्राम म्हणाला, '' सेतूदा, रावीशप्रमाणे मृगानंही ही परवानगी मागायला हवीय ना! नाहीतर तो एकटा इथे राहून काय करणारे? ''


अनघाच्या डोक्यात आता पटकन् ट्युब पेटली. ती म्हणाली, '' अरे, सेतू तू हा विचार केलासच नाहीस का? तसं तर मलाही हे लगेच सुचलं नाही म्हणा! मीही याच घोटाळ्यात अडकून पडले होते की दिवस वाढवावेत की नाही. पण, तुला असं का वाटतंय की दिवस वाढवावेत म्हणून? ''


'' काही नाही गं! माझा आपला असा अंदाज की जर यांना थोडा आणखी वेळ मिळाला तर त्याचा त्यांना जास्त फायदा मिळेल ना! ''


इतका वेळ गप्प बसलेल्या लिलानं तोंड उघडलं. '' मानसशास्त्राची एक संकल्पना असं म्हणते की जितके जास्त पर्याय आणि जितका जास्त वेळ मनामेंदूला द्याल तेवढी जास्त गुंतागुंत वाढेल. त्याऐवजी कमी वेळ आणि कमी पर्यायात माणूस जास्तीत जास्त चांगला पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतो. तू वाचलंयस ना सेतूदा? '' तिनं हसतचं विचारलं.


लिलाच्या या बोलण्यावर मात्र सेतू सहमत झाला.


त्यांची ही सगळी जर- तर, हो- नाही, चूक- बरोबरची चर्चा सुरु होती तेव्हा मृगा मात्र पेन आणि कागद घेऊन उत्तर लिहिण्याची तयारी करत होती.


प्रिय मित्र,

सर्वेश...


नाही बाबा! हे काही बरोबर नाही वाटत. तो कुठे माझा प्रिय मित्र आहे? आमची आता कुठे तर ओळख झालीय. छे! नकोच ते प्रिय- बिय...


अं... हं!


सर्वेश...


मित्रा तुझं पत्र मिळालं.


श्शी! हे अगदीच कोरडं कोरडं वाटतंय. शाळेत शिकवायचे की पत्र लिहिताना कसं नावाआधी बिरुद लावावं; म्हणजे वाचणार्‍यालाही वाचण्याचा आनंद मिळतो. पण याला काय बिरुद लावावं? हा ना फार जवळचा, ना फार दूरचा. ना माझा मित्र, ना माझा नातेवाईक, ना सहकारी. काय करु? शी बाई, काही सुचतचं नाहीए. जाऊ दे! मी तोंडीच सांगते त्याला. सेतू म्हणाला होता की सर्वेश आज दुपारनंतर येणारे. ठीक आहे. तेवढी वाट तर आपण बघूच शकतो.


एकदा हे बोलायचं ठरवल्यावर तिनं झटक्यात कागद पेन बाजूला टाकले. आणि आपल्या आवडीच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं. ती त्यात इतकी गुंतून गेली की सर्वेश कधी आला हेही तिला कळलं नाही. ती तेव्हा भानावर आली जेव्हा किचन विंडोमधून '' मॅडम कॉफी! '' असा आवाज तिनं ऐकला.


आणि मग त्या कॉफीच्या निमित्ताने त्यांच्यात पुन्हा छान गप्पा रंगल्या.


'' सर्वेश, छान पत्र लिहीतोस रे तू! ''


'' तू वाचलंस? ''


'' अरेच्चा! वाचलंस म्हणजे? वाचल्याशिवाय का मी छान आहे म्हणून सांगितलं का? तुला सांगू का? माझा नवराही छान पत्र लिहायचा. पण आता आठवत नाहीए मला की त्याने शेवटचं पत्र मला कधी लिहीलं होतं ते? ''


'' जाऊ दे ना नंदिनी. आपण मागच्या गोष्टी विसरण्यासाठी आलोय ना इथे? '' त्यानं तिला समजावलं. मग त्यांच्या गप्पा तिथून बाहेर पडेपर्यंत चालूच होत्या. आणि याची नोंद नत्रामनं बरोबर ठेवली होती.

...........................................................

(18)

शरण ह्या सगळ्या चर्चांमध्ये फारसा भाग घेत नसे. तो आपला आपल्याला दिलेलं काम बरं आणि आपला अनाथाश्रम बरा या मानसिकतेचा होता. सेतू जेव्हा केव्हा नवी केस हातात घेई तेव्हा तो शरणला फोन करुन बोलवून घेई. आणि त्याला त्या त्या केसच्या मिळालेल्या डिटेल्स देऊन त्यांची हिस्ट्री शोधण्याच्या कामाला लावत असे. मुळात सेतू आणि त्याच्यामध्ये तसा अलिखित करारच झाला होता. कारण, शरण सतत फिरतीवर असायचा. कुठून कुठून त्याला फोन येत. माणसं त्याला शोधत येत असत. कधी कुठतरी कुणातरी लहानग्यावर शारिरीक अत्याचार झालेले असत, कुणीतरी जन्माला घालून त्या मांसाच्या गोळ्याला बेवारसपणे उकीरड्यावर फेकलेलं असे. कुणाचे तरी आई- वडील घराबाहेर काढलेले असत. कुणी हुंडाबळी, कुणी बायको आणि तिच्या माहेरच्यांच्या त्रासाला कंटाळलेलं असे, अशा या ना त्या कारणाने त्रासलेले त्रस्त लोक जसे काही शरणची जबाबदारी असल्याप्रमाणे तो वेळोवेळी धावून जात असे त्यांच्यासाठी. सेतूचं कामही त्याच्यासाठी यातलंच एक होतं.

बाकीच्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडल्याने सेतूनं त्यावर विचार करु म्हणून तूर्तास रावीशनं केलेल्या विनवणीला उचलून बाजूला ठेवून दिली.

सर्वेशनं लिहिलेल्या पत्राला नंदिनीनं लेखी उत्तर दिलंच नाही. तिनं त्याला तोंडीच जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. परिणामी तिला नत्रामकडून समज देण्यात आली.

'' ताई, अगं नियम हे सगळ्यांसाठी सारखे असतात की नाही? '' नत्रामनं ऑफिसमध्ये त्याच्यासमोर बसलेल्या मृगाला विचारलं.

'' बरोबर आहे नत्राम तुझं. पण मला अजिबातच गती नाही पत्रंबित्रं लिहिण्यात. तसा मी काही प्रयत्न वगैरे केला नाही अशातला भाग नाहीए रे! पण कागद पेन घेऊन मी खूपवेळ बसून राहिले बघ. मला काही म्हणजे काहीच सुचलं नाही त्या पत्राच्या उत्तरादाखल काय लिहावं ते! '' तिनं खालमानेनं आपली बाजू मांडली.

'' अगं ताई, तुझ्यासारख्या एवढ्या शिकलेल्या मुलीकडून मला ही अपेक्षा नव्हती गं! जरा कधीतरी इंटरनेटवर फेरफटका मारला असतास तर तुला पत्र मग ते कुठल्याही प्रकारचं असू दे; ते कसं लिहायचं याचं ज्ञान देणारे ब्लॉग, लेख, यू ट्यू बीवर प्रात्यक्षिक दाखवणारे व्हिडिओज मिळाले असते की. त्यात एवढं काय अवघड असतं? '' नत्रामनं तिला बोलता बोलता नवा रस्ता दाखवला.

'' ठीक आहे. तू म्हणतोस तर मी हा सुद्धा प्रयत्न करुन बघते. पण, मला एक सांग, हे पत्र वगैरे लिहिणं इतकं गरजेचं आहे का? ''

'' ताई, ती एक थेरपी आहे. आता तू स्वतःच्या गाडीने प्रवास करतेस ना! पण कधीतरी तूही केलाच असशील की सार्वजनिक वाहनातून लांबचा प्रवास? ''

'' हो. केलाय की. पण, त्याचा आणि या तुमच्या पत्र लिहिण्याच्या थेरपीचा काय संबंध? '' बुचकळ्यात पडून मृगानं त्याला विचारलं.

'' आहे तर! खूप जवळचा संबंध आहे. त्याचं कसं आहे ना ताई! की सार्वजनिक वाहनातला लांबचा प्रवास एकट्याने करताना आपल्या सीटवर शेजारी कुणीतरी अनोळखी माणूस बसतो. कधी कधी आपण त्याच्याशी बोलतो, कधी नाही बोलत. तर ही थेरपी त्या बोलण्याशी निगडीत आहे. एखाद्या वेळेस असं होतं की आपण त्या अनोळखी माणसाजवळ आपल्या मनाच्या खोल कप्प्यातल्या गोष्टी बोलून जातो. आपल्याला फरक नाही पडत की तो आपल्या जवळचा आहे की लांबचा. कुणीतरी आपलं मनापासून ऐकतोय हेच आपल्यासाठी महत्वाचं असतं. त्याने काय होतं माहीतेय का? तर आपल्या मनावरची साठलेली विचारांची काजळी दूर होते. आणि आपण आपल्यासाठी नव्या विचारांच्या दिशा शोधायला मोकळे होतो. आमच्या ह्या पत्र थेरपीमागेही हीच संकल्पना आहे. ज्याला पाश्चात्त्य देशात ' टॉकिंग टू अननोन पर्सन फॉर हिलिंग युअर माईंड ' असं म्हणतात. '' तिच्या चेहर्‍यावरचे बदलणारे भाव पाहून तो पटकन् म्हणाला, '' अगं, काळजी नको करुस ताई. मी अजिबातच मानसशास्त्राच्या संकल्पना तुला सांगण्यात तुझा वेळ खाणार नाही. ''

त्यानंतर मात्र मृगानं नत्रामचं म्हणणं मनावर घेतलं आणि सर्वेशला त्यानं लिहिलेल्या पत्रांची उत्तरं पत्रांमधून द्यायला सुरुवात केली.

हल्ली घरातलं वातावरण छान प्रसन्न असायचं. दोघेही घरात असले की घराला वाचा फुटायची. मग घरात नव्या चवीचे छान पदार्थ शिजायचे. हॉल, बेडरुम, किचन इथे सगळीकडे नवी सजावट घराला नवीन करु पाहत होती. दिप्तीच्या टेरेस गार्डननं चांगलंच मूळ धरलं होतं. त्या गच्ची-बागेसाठी मृगानं एक छानसा झोपाळा आणला. मग दिपेननं त्याच्या ओळखीच्या फर्निचरवाल्याकडून वेताच्या देखण्या खुर्च्या- टेबल आणलं. या सगळ्यावरची कडी म्हणून रावीशनं खास तयार केलेल्या चांदीच्या कलाकुसर केलेल्या चहामांडणीचा सेट आणला. सगळीकडे कसं आन दी वातावरण पसरलं होतं.

.......................................................

(१९)


दिप्तीला वाटत होतं सगळं काही नीट होण्याच्या मार्गावर आहे. तिचा मुलगा आणि सून यांच्यातलं नातं सुरळीत व्हायला लागलंय. तसं तिचं वाटणं काही चुकीचं होतं असं नाही पण, ते सुरळीत होण्याआधी बरचं काही घडायचं होतं हे त्या बिचारीला कसं माहीत असणार ना! असो.


आता सर्वेशला नंदिनी आणि नंदिनीला सर्वेश आवडायला लागले होते. आयुष्यानं त्याची खेळी खेळली होती. या खेळातल्या सोंगट्या होत्या दिप्ती-दिपेन, गीत-संया, सेतू, अनघा, शरण, लिला, नत्राम आणि मी. राजा-राणी पटावरुन एकेक पाऊल एकमेकांच्या दिशेने टाकत आता अवघ्या काही पावलांवर आले होते. बस्स! एक चाल आणि मग चेकमेट. दोघेही त्या एकाच डावात चितपट होणार होते.


सेतू-अनघाच्या पत्र थेरपीनं तिचं काम व्यवस्थित बजावलं होतं. नत्रामनं नियामकच्या नात्याने नंदिनीला पत्राचं उत्तर पत्रानं द्यायला भाग पाडलं होतं. मृगराच्या हातात शेवटचे दोन आठवडे उरले होते. पत्रातून व्यक्त होता होता आता सर्वेश- नंदिनी मनातून एकमेकांला ओळखू लागले होते. कदाचित ते आधीही असेच ओळखत होते एकमेकाला. कधीतरी कुठल्यातरी फसव्या क्षणी न जाणो काय घडलं होतं? बंधमुक्ती नेमका कुणाचा आडोसा घेउन नात्यात आला होता? पण अनोळखी परिचितनं बंधमुक्तीला रिकाम्या हाती जायला जवळजवळ भाग पाडलं.


आज टेरेस गार्डनला दिप्तीनं काही नवीन रोपटी आणली होती. यावेळेस तिच्या सोबतीला मृगाही होती. तिनंच हट्टानं ते चांदणीचं रोपटं बेडरुमच्या खिडकीत लावून घेतलं. एका कोपर्‍यात वेगवेगळे निवडुंग लावले होते. दुसरा कोपरा अनेक रंगाच्या गुलाबांनी सजला होता. तिसर्‍या कोपर्‍यात वार्‍याच्या मंद शिळेवर फुटबॉल लिली झुलत होती. आणि चौथा कोपरा छोट्या धबधब्याच्या आवाजाने खळखळून हसत होता. मधल्या भागात मृगानं तिला गवताचा गालिचा करुन दिला होता. चारी बाजूच्या वाफ्यांच्या मध्यात सावलीसाठी पेरू, बकुळ, आवळा, आंबा अशी झाडं मोठ्या पिंपात लावली होती. फुलांचे तर देशी-विदेशी असे अनेक प्रकार तिथल्या वाफ्यात गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यात लावलेला तो झोपाळा म्हणजे आनंदाचं मोहोळच होतं जसं काही.


अशा रंगांनी सजलेल्या दिप्तीच्या गच्ची बागेत मृगाचे आईबाबा, रावीश आणि दिप्ती-दिपेन असे सगळे चहापानाला बसले होते. आशिष आणि सुहासिनीला खुप उशीरा ह्या घटस्फोट प्रकरणाचा सुगावा लागला. जसं कळलं तसे ते लेकीला आणि जावयाला भेटायला आले. मृगरा आज रजा टाकून या चहापानाच्या कार्यक्रमात सामील झाले होते ते एका विशिष्ट हेतूने.


चहाची एक फेरी झाली होती. आशिष-सुहासिनीला दिप्तीकडून आधीच घटस्फोटाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी सांगून झाल्या होत्या. त्याशिवाय अनोळखी परिचित आणि तिथे घडणार्‍या सगळ्या गोष्टींचीही वाच्यता करुन झाली होती. त्यामुळे त्या चौघांचाही पवित्रा जे जे होईल ते पहात रहावे! असा होता. रावीशनं हातातला चहाचा कप खाली ठेवला आणि त्यानंच विषयाला वाचा फोडली.


'' आई- बाबा. आज ना उद्या तुम्हांला हे कळणार हे माहीत होतं आम्हांला. ही गोष्ट आम्हांला तुमच्यापासून लपवायची नव्हती. पण कधी कधी काही गोष्टी कळण्यासाठी ठराविक वेळेची गरज पडते. आज ती वेळ आलीय. चूक कुणाची आहे यावर बोलण्याची वेळ आता निघून गेलीय. जेव्हा बोलण्याची वेळ होती तेव्हा पुढाकार घेण्याची बुद्धी ना तिला सुचली ना मला. आणि आज आम्ही अशा वळणावर येऊन पोचलो आहोत की इथून माघार शक्य नाही. मला वाटतं मृगा तुलाही असंच काही बोलायचं असेल. '' आज बर्‍याच महिन्यांनंतर त्यानं स्वतःहून मृगाशी संवाद साधला होता. तिनं मुक्यानंच मान हलवली. तसं रावीशनं बोलणं पुढं सुरु केलं.


'' मात्र आता तुमचे आमचे कौटुंबिक संबंध पूर्वीसारखे राहतील याची खात्री मी देऊ शकत नाही. ''


त्याच्या ह्या वाक्यानं सुहासिनी थोडी दचकलीच. पण शेजारीच बसलेल्या दिप्तीनं तिला वेळीच तोंड उघडण्यापासून थांबवलं.


'' घटस्फोटाचा अर्ज तुमच्या लेकीनं टाकला होता. ३ महीन्यांची मुदत मिळाली न्यायालयाकडून. मला वाटलं होतं की या ३ महीन्यात काहीतरी असं घडेल ज्यामुळे आमचं लग्न तुटण्यापासून वाचेल. मात्र तसं काहीच घडलं नाही. हे लग्न आता फार काळ टिकणार नाही. तरीही एका गोष्टीचा मला आनंद आहे की मृगा माझ्या आयुष्यातून जात असली तरी तिची जागा काही रिकामी राहणार नाहीए. ''


'' आई मलाही हेच सांगायचंय. माझ्याही आयुष्यातली रावीशची जागा लवकरच भरुन निघेल. ''


गीत आणि संयानं सांगितल्यामुळे बाकीच्या चौघांनी संयमीत प्रतिक्रिया दिली असली तरी किंतुपरंतू तर त्यांच्याही मनात होताच. नेमकं काय गौडबंगाल होतं ते कुणालाच कळत नव्हतं.

..........................................................

अनोळखी परिचित (२०)

३ महीन्यातले शेवटचे दोन आठवडे राहिले होते मृगाचे आणि आता सेतूच्या टीमचा खरा खेळ सुरु झाला. या खेळाचं नाव होतं कुंजिका शोध. रावीश आणि मृगा ज्या फ्लॅटमध्ये राहत होते अपच्या त्याला मध्ये भिंत घालून त्याचे दोन भाग केले होते हे मी तुम्हांला आधीच सांगितलंय. आता त्याची गंमत सांगते. या भिंतीत एक दरवाजा आहे; जो दोन्ही बाजूंनी बंद असतो. हा दरवाजा उघडण्याचा मार्ग एकच. दोघांनीही पलीकडच्या दाराला लावलेल्या कुलुपाची चावी शोधून काढायची. या आठवड्यात सेतूनं ऑफिसमध्ये बोलवून रावीशला ही सगळी गोष्ट समजून सांगितली तर मृगाला खोलीत बसून अनघानं.

 '' हे बघ! रावीश. तू घेतलेली ३ महीन्यांची मुदत संपत आलीय. शेवटचे दोनच आठवडे आणि त्यातलेही मोजून ४ च दिवस तुझ्याकडे आहेत. तुझ्या माहितीसाठी सांगतो. तुझ्या खोलीत तुझ्या शेजारच्या खोलीच्या दाराच्या कुलुपाची किल्ली आहे. तू ती किल्ली शोधलीस तरच त्या पलीकडच्या व्यक्तीला तिच्या नात्यांच्या गुंत्यातून बाहेर पडता येईल; अन्यथा कुणा एकाच्या नात्याची गुंतवळ तशीच तर राहीलच पण आपल्यालाही वेळेत मदत न केल्याचं दुःख कायम बोचत राहील. तुला कळतंय ना? मला काय सांगायचंय ते! एक लक्षात घे की आपण दुसर्‍यासाठी मदतीचा एक हात पुढे केला की आपल्यासाठीही असे हात पुढे येतात. ''

 हे म्हणजे सेतूनं रावीशला चांगलंच भावनांच्या जाळ्यात गुंतवून टाकलं होतं. पण, एक पुष्पौषधी उपचारकर्ता आणि मानसशास्त्राचा अभ्यास करणारा असल्यानं त्याला या आतल्या गोष्टी माहीत असणं साहजिक नव्हतं का? अनघाला मात्र मृगाला समजवणं थोडसं कठीणंच गेलं. तिला हा चावीचा फंडा पटलाच नव्हता. मुळात आपल्याच नात्यांचा गुंता सुटला नसताना दुसर्‍याला कुठे त्यात जागा द्यायची? आणि दिली तर दिली; मग हे दार, त्याचं कुलुप ह्या सतरा भानगडी कशाला करायच्या? बंदच करायची दारं तर सरळ किल्ली द्यायची हातात आणि मोकळं ठेवायचा ना पर्याय हवा तेव्हा दार उघडण्याचा. असं बरचं काही ती बोलत, विचारत, ऐकवतं राहिली अनघाला. सरतेशेवटी अनघानं सेतूची निती वापरायची ठरवली आणि तिला म्हणाली, '' मान्य. तू म्हणतेस ते सगळं मान्य. पण मला सांग तुमच्या नात्यात हा दारं उघडण्याचा पर्याय मुक्तच होता ना? मग तरीही तू का नाही उघडलेस तुझ्या मनाचे, मेंदूचे, विचारांचे, तर्कांचे आणि भावनांचे दरवाजे गं? ते तेव्हाच वेळीच उघडले असतेस तर आज तुला आमची गरज नसती लागली. ही जी बंद दारं आणि हरवलेल्या किल्ल्यांची कुलुपं आहेत ना! ती म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही गं! तुमच्या मन, मेंदू, विचार, भावनांचीच आहेत. त्या कुणा अनोळखी माणसाला मदत करता करता नकळत तुम्ही तुमचीच मदत करत असता हे कळतंय का तुला? कधी कधी आपणच आपल्या हाताने सगळी दारं बंद करुन घेतो. नकळत कुलुप घालतो आणि वेळेला खूप शोधूनही चावी सापडत नाही बघ! जेव्हा खरंच ही कुलुपं उघडण्याची गरज असते तेव्हा जर ती नाही उघडली तर मग खुप उशीर होतो. पश्चात बुद्धीला काही अर्थ असतो का? तुला तुझ्या कंपनीत आता सांगितलेलं काम जर तू महिन्याभरानं केलंस तर चालेल का? नाही ना! मग आता त्या पलीकडच्या व्यक्तीला मदत करता करता तुझे काही प्रश्न सुटले तर तुला ते नको आहेत का? ''

अनघाच्या या काडेचिराईताच्या कडवट डोसाचा मात्र मृगावर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळे तिनं मनोमन सर्वेशला मोकळं होण्यासाठी मदत करायची ठरवली. त्याप्रमाणे तिनं आपले सगळे तर्क वितर्क पणाला लावून दुसर्‍याच दिवशी चावी शोधून काढली. पण तिच्यासमोरची पंचाईत ही होती की नियमाप्रमाणे जोवर सर्वेशला चावी सापडत नाही तोवर ना ती ते सांगू शकत ना त्याला चावी देऊ शकत होती. शेवटच्या आठवड्यात रावीशनं आपल्याला समजून घेणारा एक जोडीदार भेटल्याचं सर्वांना सांगितलं. नाही म्हटलं तरी मृगाच्या हृदयात एक बारीकशी कळ आलीच होती. पण, तिनं असं म्हणून मनावर ताबा ठेवला की जर त्यानं त्याच्यासाठी दुसरा जोडीदार शोधलाच आहे तर आपणही आपल्यासाठी शोधूया. या शेवटच्या शनिवारी रावीशला त्याच्या स्वयंपाकघरात ब्रेडक्रम्सच्या डब्यात चावी सापडली. बस्स! हीच ती वेळ होती, हाच तो क्षण होता ज्याची सेतूच्या टीमसकट गीतसंया आणि रावीशमृगाच्या घरचे आतुरतेनं वाट पाहत होते. रावीशला चावी मिळाल्याचं कळताच सेतूनं त्याला सांगितलं की पलिकडच्या फ्लॅटमधल्या व्यक्तीलाही चावी सापडली आहे आणि उद्याच तुम्हां दोघांच्या चाव्या हस्तांतरीत केल्या जातील. हा रविवार अनोळखी परिचितसाठी जितका महत्वाचा होता तितकाच तो सर्वेश-नंदिनी असं नाव घेऊन राहणार्‍या मृगरासाठीही. दुपारी बरोबर १२:३० वाजता रावीशच्या खोलीत मी, नत्राम, शरण आणि मृगाच्या खोलीत सेतू, अनघा आणि लिला जमा झालो. आमच्या देखतच किचनच्या खिडकीतून चाव्यांची अदलाबदल झाली. एकाचवेळी दोन्हीकडून कुलुपं उघडली गेली आणि दार उघडताच दोघेही अवाक होते. कारण नंदिनी समजून आपण आजवर जिच्याशी हृदयातल्या सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या, इथून बाहेर पडून मृगाशी घटस्फोट झाल्यावर जिच्याशी लग्न करायचं ठरवलं ती दुसरी तिसरी कुणी नसून मृगाच आहे हे कळल्यावर तर तो हतबुद्धच झाला. सर्वेश समजून ज्याला आपण आपलं अंतरंग उघडून दाखवलं तो रावीश असू शकेल याची पुसटशीही कल्पना मृगाला नसल्यानं तिचीही अवस्था काहीशी रावीशसारखीच होती. नंतर त्या दोघांनाही समोर बसवून सेतूनं त्यांची पुन्हा एकदा शाळा घेतली. नातं टिकवण्यासाठी त्यातली मैत्री कधीच मरु द्यायची नाही हे सतत लक्षात ठेवायला हवं असं त्यानं वारंवार त्यांना सांगितलं. तो हेही सांगायला नाही विसरला की नात्यात स्वाभिमान महत्वाचा असला तरी अहंकाराला त्यात स्थान नाही. जपणूक महत्वाची असली तरी त्याची अति होता कमा नये. कारण अति तिथे माती हे सर्वश्रुत आहे. अशा बर्‍याच गोष्टी त्यानं त्यांना समजवून सांगितल्या. हे समजवून सांगितल्यावर त्यानं संयाताईला फोन केला आणि तिला म्हणाला, '' ताई, तुझ्या मृगराचा आता काडीमोड नाही व्हायचा बरं का! कारण सर्वेश ज्या नंदिनीशी लग्न करणार होता तिनंच तिच्या घटस्फोटाचा अर्ज मागे घेतलाय. आणि आपल्याकडे कायद्याप्रमाणे अजूनतरी एक लग्न अस्तित्वात असताना दुसरं करता येत नाही ना! ''

अनघाला मात्र सांगितल्याशिवाय रहावलं नाही. '' मृगा तुझा आणि रावीशचा जो काही गैरसमज झाला होता तो का आणि कशासाठी हे आता कळलं असेल ना? अगं, वादविवाद काय होतंच राहतात पण कधी कधी आपण एक पाऊल मागे यायचं आणि समोरच्याला काय म्हणायचंय हे समजवून घ्यावं. तेही आपल्या मतांची लक्तरं त्याच्या मताला न जोडता. असं झालं की नातं फुलत राहतं. आणि रावीश असं समजू नको की मी तुला सुखासुखी सोडून देईन म्हणून. एक मसाला चहा आणि सगळं प्रकरणं निस्तरलं असतं ना! पण तू त्या पर्यायाचा विचारच केला नाहीस. थोडा चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा ना माणसाने? '' अनघाच्या लंब्याचौड्या भाषणबाजीनंतर कॉफीपान होऊन मृगरा नव्याने जुना संसार करायला रवाना झाले. आज मात्र गाडीत रावीशने आजच्या प्रसंगाला साजेशी गाणी लावली होती.

कधी कसे कुठे भेटलो आपण

अजून वेचतो मी ते सारे क्षणकण

असे कसे बोलायचे न बोलता आता

तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता

डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता

सांगा जरा असे कसे लपायचे रे आता

मन धागा धागा जोडते नवा

मन धागा धागा रेशमी दुवा                                     


Rate this content
Log in

More marathi story from Namarata Pawaskar

Similar marathi story from Romance