भेट तुझी माझी स्मरते...
भेट तुझी माझी स्मरते...


इतका वेळ तोंड आणि बोटांच्या चिमटीत पकडलेली पेन्सिल सुटली आणि समोरच्या टेबलावर असणाऱ्या लेटरपॅडवर झरझर अक्षरं उमटू लागली...
"रात्र गडद होऊ लागली होती... नेहमीप्रमाणेच तो नव्या कथेच्या चिंतनात गुंग होता... तो बसला होता ती जागा म्हणजे एक लाकडाची खोली; त्यानं खास स्वतःसाठी बनवून घेतलेली... इथून त्याचं घर अगदी हाकेच्या अंतरावर... पण, तिथला गोंगाट, येणाऱ्या- जाणाऱ्यांचा वावर त्याला काही सुचू द्यायचा नाही... म्हणून मग त्यावर पर्याय म्हणून हिरवळीने वेढलेल्या या लाकडी घराची कल्पना प्रत्यक्षात आली आणि या घराने खरंच त्याला लिहिण्याचं समाधान दिलं...
आजवर त्याच्या लेखणीतून नावारूपाला आलेल्या कथा कागदांवर उतरल्या होत्या त्या इथंच... आजही त्याला असंच काहीतरी आगळंवेगळं लिहायचं होतं... तो चिंतनात गुंग, डोळे मिटलेले आणि अचानक त्याला जाणवलं की घट्ट काळोखानं आपल्याला वेढलंय... डोळे उघडल्यावर लक्षात आलं लाईट गेलेत... सवयीने त्याचा हात खिशात गेला आणि लायटर घेऊन बाहेर आला... लायटरचा खटका दाबून त्याने ड्रॉवर उघडला... आतली मेणबत्ती बाहेर काढली... एवढीशीच खोली असल्यानं ती मेणबत्तीच्या प्रकाशानं लख्खं भरून गेली... तो पुन्हा एकदा चिंतनात खोलवर सूर मारणार इतक्यात सगळीकडे अंधाराचा पडदा टाकून वाऱ्याच्या झोताने मेणबत्ती पुन्हा विझली... आता पुन्हा ती पेटवण्याचा कंटाळा आला म्हणून तो उठला. चांदण्यात येऊन खुर्ची टाकुन बसला... बाहेरच्या वातावरणात अस्वस्थता भरून राहिली होती आणि खूप प्रयत्न करूनही म्हणावा तसा मूडही लागत नव्हता... आज हे आपल्याला काय होतंय? या विचारात त्याची खुर्ची खाली-वर हिंदोळे घेत होती...
एवढ्यात त्याचं लक्ष गेलं की चांदण्यातल्या धूसर अंधाराला भेदत एक आकृती त्याच्याच दिशेने येतेय... डोळ्यांवर खूप ताण दिल्यावर त्याच्या लक्षात आलं की ती एक स्त्री आहे... कोण असावी ती? या विचारात तो असतानाच झपाझप पावले टाकत ती आकृती त्याच्याजवळ पोचलीसुद्धा... चांदण्याच्या प्रकाशात चेहरा निरखून पाहिला आणि तो जवळजवळ ओरडलाच, 'मंदा! तू? तू इथं कशी? हा पत्ता कुणी दिला तुला? इतकी वर्षं होतीस कुठं? लग्न केलंस का गं?'... त्याच्या प्रश्नांचा भडीमार चालू असतानाच ती पायरीवर टेकली...
अरे, हो! हो! मला श्वास तर घेऊ देशील की नाही?... की सगळं एकाच दमात विचारणार आहेस?...
तसं नाही गं! पण, तू अशी अचानक इतक्या वर्षांनी भेटशील असं कधी स्वप्नातही वाटलं नाही गं!... त्यामुळे... जाऊ दे! पण तू इथं कशी?...
तुला आठवतंय? काही वर्षांपूर्वी एक पत्र लिहिलं होतंस माझ्या नावे... त्याच्यावर नाव आणि पत्ता होता पाठवणाऱ्याचा... आज सकाळीच तुला भेटायची इच्छा झाली आणि तुझा तो पत्ता शोधत मी इथवर आले... बाकी कसं चाललंय तुझं?... आणि लिखाण काय म्हणतंय?...
लिखाण, ते चालू आहे ना! हे सगळं वैभव जे मिळालंय ते या लिखणाच्या जोरावरच...
नशीबवान आहेस तू! खरंच तुझ्या नशिबानं तुला हवं ते सगळं दिलंय बघ!...
नाही गं! नशीबानं दिलं नाही गं!... हे सगळं या लिखाणानं दिलं मला... पण जी मला सहचारिणी म्हणून हवी होती ती याच नशिबानं माझ्याकडून हिरावून घेतली... त्याचे डोळे आपल्यावर रोखलेत जाणवल्यावर तिनं आपली नजर दुसरीकडे वळवली...
का गं गप्प का झालीस?... कुठे असतेस?... लग्न केलंस?... अण्णा कसे आहेत?...
अण्णा? झाली काही वर्षं अण्णांना जाऊन!
काय म्हणतेस? काही कळवलं कसं नाहीस?
मी केलं होतं रे टपाल तुला... तसंही माझ्या नात्यातला तू एकटाच ना रे! पण तुही नाही आलास!...
खरंच गं! तुझी शपथ मंदे... मला तुझं कसलेही टपाल नाही मिळालं. <
/p>
जाऊ दे रे! मी घेतलं समजून झालं!...
मग आता तू कुठं असतेस? लग्नाचं....
सारखं काय लग्नाचं विचारतोस? त्याला मध्येच टोकत ती चिडली... नाही केलं लग्न मी!... राहते अजुनही दापोलीच्याच वाड्यात... अण्णांनी मागं खूप वाडी ठेवलीय... खाऊनपिऊन सुखी आहे मी...
चिडू नकोस ग, मंदे!.. अगं तुझी काळजी वाटते ना! म्हणून विचारतो...
हं! म्हणे काळजी वाटते!... मी वाट बघत राहिले तुझी, तेव्हा कुठं गेली होती रे काळजी?... अण्णा गेले, मी एकटी पडले तरीही कुठे दिसली नाही रे मला तुझी ही काळजी आणि आज मला अशी समोर बघून तुला एकदम माझी काळजी वाटायला लागली काय रे?...
मंदा!.. तो खुर्चीतून उठला... खालच्या पायरीवर बसून तिचे हात हातात घेतले...
खरंच गं, मंदे! त्यावेळी परिस्थितीच अशी होती की नाही तुझ्याशी लग्न करू शकलो... ती गोष्ट आजही छळते मला आणि अण्णांचं म्हणशील तर नाही गं! मला खरंच तुझं टपाल नाही मिळालं... नाहीतर तुला असं राहू दिलं असतं का मी एकटं?
जाऊ दे न अव्या! कशाला उकरतो मागचं सगळं.. आता एकटीनंच राहायचंय मला कायमचं... तुझी इच्छा असली तरी तू माझी; मी तुझी साथ नाही देऊ शकत... फक्त एक शेवटची इच्छा होती तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं ती पूर्ण झाली... बरं वाटलं... आता सुखाने जाईन मी... चल अण्णा वाट बघत असतील माझी!...
एवढं म्हणून ती उठली आणि जितक्या वेगाने आली होती तितक्याच वेगानं त्या चांदण्यातल्या धूसर अंधारात दिसेनाशी झाली...
मंदे,ए मंदे!.. अगं असं काहीबाही काय बोलतेस तू? ऐक ना मंदे!...
पण त्याची हाक तिच्या कानांपर्यंत पोहोचलीच नाही... सुन्न झालेलं डोकं धरून तो तसाच खुर्चीत बसला... इतक्यात गेलेले लाईट परत आले... तरीही तो आत न जाता तसाच खुर्चीत बसून राहिला... हे काय घडलं याचा विचार करताकरता गारव्याने त्याला तिथंच झोप लागली...
सकाळीसकाळी रवी त्याचा थोरला मुलगा वय वर्षं दहा धावतच तिथे आला.
बाबा ए बाबा! अरे इथंच झोपलास काय रात्री? ऊठ ना! तुला भेटायला माणसं आलीत...
त्याच्या गदागदा हलवण्यानं तो डोळे चोळत उठला...
कोण आहे रे? माहित नाही बघितले नाही कधी, रवी ओरडतच निघून गेला...
त्याच्या मागेमागे घरात शिरणाऱ्या त्यानं पाहिलं तर सोफ्यावर सदा रेगे आणि दुसरं कोणीतरी बसलेलं होतं...
सदा, अरे अचानक कसा रे? आणि इतक्या वर्षानं कशी रे माझी आठवण आली...
तसंच महत्त्वाचं काम होतं... हे घे!.. म्हणून त्यांनं एक खाकी पाकीट त्याच्या हातात दिलं...
काय आहे यात?... तूच बघ... अव्यानं पाकीट उघडलं... कागद बाहेर काढले...
कागद वाचतावाचता त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा झरझर बदलत गेल्या...
हे माझ्यासाठी? पण का? मंदा कुठाय? सदानं खिशातनं रुमाल बाहेर काढला... भरून आलेले डोळे टिपले म्हणाला, 'ती गेली... आठच दिवसांपूर्वी ही कागदपत्रं तयार करून घेतली माझ्याकडून... कालच तिला अग्नि'... त्याला पुढे काही बोलवेना...
अव्या मटकन खालीच बसला...
नाही रे सदा! तू खोटं बोलतोस... असं कसं होईल... काल भेटली मला ती... काल रात्री... किती गप्पा मारल्या आम्ही... मध्येच म्हणाली एक शेवटची इच्छा होती... तुझ्याशी बोलायची, भेटायची ती पूर्ण झाली... मी म्हणालोही असं बोलू नकोस म्हणून पण ते ऐकायला ती थांबलीच नाही रे!...
अव्या भास झाला असेल तुला!...
नाही रे नाही मला आठवतंय, ती म्हणाली मला जाताना, मला आता जाऊ दे! अण्णा माझी वाट बघत असतील...
अव्या तुला भासच झालाय... अण्णा कशी वाट बघतील तिची... त्यांना जाऊन काही वर्षं झालीत... अव्या शुद्धीवर ये अव्या...