Nagesh S Shewalkar

Comedy

3  

Nagesh S Shewalkar

Comedy

बंद खोलीतील चर्चा!

बंद खोलीतील चर्चा!

6 mins
211


           बंद खोलीतील चर्चा! 

           "सावधान! वऱ्हाडी मंडळीला अक्षता मिळाल्या आहेत का? मिळाल्या नसतील तर सर्वांना अक्षता पोहोचवा!... सावधान..." गुरुजी माईकवर म्हणत असताना अचानक आवाज आला,

"थांबा! महाराज, थांबा!! घाई करु नका. काही हिशोब बाकी आहेत..." गुरुजींच्या हातातील माईकमधून तो आवाज सर्वत्र घुमला आणि सारे आश्चर्याने व्यासपीठाकडे पाहत असताना महाराजांनी विचारले,

"काय झाले बाळा! तू असे का म्हणतेस? शुभ मुहूर्त टळून जात आहे." त्यांच्या हातातील माईक घेऊन स्वतः वधू म्हणाली,

"गुरुजी, मुहूर्ताचे काय तो पुन्हा शोधता येईल परंतु काही गोष्टींची पूर्तता न झाल्यास पुढे आयुष्यभर माझा असाच विश्वासघात होत राहील?"

"विश्वासघात आणि तुझा? कुणी केला?" वधूच्या पाठीशी असलेल्या गर्दीतून वाट काढत पुढे आलेल्या आईने विचारले.

       कार्यालयात लग्नासाठी जमलेल्या लोकांमध्ये ताबडतोब चर्चा सुरू झाली.

"हा तर नवीनच प्रकार पुढे येतोय..."

"आजपर्यंत कधी 'सावधान' म्हणताक्षणी वधूने नकार दिलाय असे ऐकले नव्हते हो."

"हो ना. विश्वासघात झालाय असे म्हणतीय हो. काय असेल?"

"काय सांगावे बाप्पा? आजकाल या तरुणाईचे त्यातल्या त्यात मुलींचे नखरे फारच वाढलेत हो."

"आधीच या मुलीने म्हणे चाळीस पोरांना नकार दिलाय आणि आता सहा महिन्यांपूर्वी जमलय..."

"आणि सहा महिन्यात ही दोघे शंभरहून अधिक वेळा भेटली असतील तरीही ही मुलगी याक्षणी का नाही म्हणत असेल हो... थांबा. ऐका..." कुणीतरी म्हणाले. तिकडे वधू म्हणत होती...

"आई, तुझा जावई म्हणून माझ्यासमोर उभ्या असलेल्या या पोराने मला फसवले आहे..."

"म... म... म्हणजे? त.. त... तू तसे काही तर..." तिची आई बोलत असताना वधूने विचारले.

"तसे म्हणजे?"

"आता कसे विचारु तुला..."

     वधूच्या आईच्या प्रश्नाचा रोख कार्यालयात जमलेल्या अनेकांना समजला. त्यावर पुन्हा चर्चा रंगली नसती तर नवलच...

"बाप रे! म्हणजे मुलीला दिवस गेले की काय? दिवस दिवस दोघे सोबत फिरत होते. कुठे जात होते, काय करीत होते ते कुणास ठाऊक?"

"अहो, तीन दिवस महाबळेश्वरला जाऊन आले असे मी ऐकले आहे."

"अहो, दिवस गेले असते आणि वराने बापत्व नाकारले असते तर हा प्रश्न आला असता ना? दोघे हातात माळा घालून समोरासमोर उभे आहेत याचा अर्थ काहीही घडले असले तरीही तो मुलगा ते नाकारत नाही. तो लग्नाला तयार आहे..."

     अशा विविध चर्चा रंगत असताना तिकडे व्यासपीठावर वधू आईवरच कडाडली, "आई, उगीच पराचा कावळा करु नकोस. तसे काहीच झालेले नाही..." तितक्यात शेजारी अंतरपाट धरलेल्या माणसाच्या हातातील माईक घेऊन वर म्हणाला,

"आई, खरेच तसे काहीच घडलेले नाही. घडले असते तरी मी ती जबाबदारी नाकारली नसती..."

"तू थांब. तुझ्याशी तर मी बोलणारच आहे पण आता मी आईशी बोलतेय..."

"अग, मग असे घडले तरी काय? बरे, आतापर्यंत तू चकार शब्दाने काही बोलली नाहीस आणि आताच असे काय घडले..."

"आई, आतापर्यंत मी विश्वास ठेवला. वाटले सरप्राइज असेल... पण आता अक्षता डोक्यावर पडायची वेळ आलीय तरीही माझी मागणी पूर्ण झाली नाही."

       "बघा. बघा. मुलीने मुलाकडे काहीतरी मागितले आहे. ठरलेला हुंडा दिला नाही म्हणून मुलांनी लग्न मोडल्याची अनेक उदाहरणे आहेत परंतु मुलगी मागणी करतेय आणि ती मागणी मुलाकडून पूर्ण झाली नाही म्हणून मुलगी लग्नसमयी लग्नाला तयार होत नाही हे पहिलेच उदाहरण असेल..." व्यासपीठावरील गर्दीत कुणीतरी म्हणाले परंतु माइकच्या माध्यमातून ते सर्वत्र पोहचले. तसे वधूच्या आईने विचारले,

"तुझी मागणी? काय मागितले होते तू? मला कधी म्हणाली नाहीस?"

"एकच एक प्रश्न विचारु नकोस ग? आमची ती बंद खोलीत झालेली चर्चा तुला कशी सांगणार?"

"अग बाई, तुम्ही खोली बंद करुन चर्चा करीत होता. हे तर भलतेच झाले की. बाकी काही..." वधूची आजी बोलत असताना वधू कडाडली,

"आई, आजीला सांगून ठेव हं. पराचा कावळा करु नकोस म्हणावे."

"अग, कार्टे, पराचा कावळा आम्ही नाही तर तू करते आहेस? अशा मंगलक्षणी, एवढ्या माणसात तू काय त्या 'बंद खोलीतील चर्चे'मुळे लग्न मोडायला निघाली आहेस."

"आई, ह्या.. ह्या पोराने माझ्यावर तशी वेळ आणली आहे. मला पाहायला आला त्यावेळी आपल्या घरी मी आणि हा माझ्या बंद खोलीत चर्चा करीत असताना ह्याने मला एक आश्वासन दिले होते..."

"त्यावेळी मी एक गाणे गुणगुणत होतो. आठवते का..." नवरदेव विचारत असताना वधू त्याला खिजवत म्हणाली,

"आठवते की चांगले आठवते की... तू ते घाणेरडे गाणे म्हणत होता..."

"ताई, घाणेरडे गाणे? कोणते ग? जिज्जू तर छुपा रुस्तुम आहे की... कोणते गाणे... जिज्जू, तू तरी सांग ना रे! प्लीज!" वधूची बहीण वराकडे बघत लाडिकपणे म्हणाली."

"तुला ऐकायचे आहे का तर मग स्पेशल फॉर माय साली... ऐक, 'हम तुम एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाय..."

"वॉव! हाऊ रोमांटिक!!..." वधूची बहीण बोलत असताना वधू चवताळून म्हणाली,

"ये रोमांटिकवाली जा तिकडे. माझ्या वरावर लाईन मारु नकोस.."

"अरे, बाबा हे लाईन मारणे बंद करा आणि बाळा, तुझी मागणी काय आहे ते सांग..." ब्राह्मण तळमळीने म्हणाले.

"ऐ पोरी, आता जास्त वेळ लावू नको. काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. काय हो जावईबापू, तुम्ही काय असे आश्वासन दिले होते ही म्हणते तसे बंद खोलीत?" वधूपित्याने विचारले.

"सासरेबुवा, बंद खोलीतील चर्चा अशा सार्वजनिक कराच्या नसतात."

"अरे, पण त्या चर्चेमुळे तुझी होणारी बायको लग्न मोडायला निघाली आहे. तेव्हा काय ते एकदा ठरवा." वरपिता म्हणाला.

"वाटल्यास पाच मिनिटे पुन्हा बंद खोलीत जाऊन चर्चा करा नि मिटवून टाका." ब्राह्मण म्हणाला.

"अरे, बाबा तू तरी सांग ना. काय ठरलेय बंद खोलीत ते तिच्या तोंडावर फेकून हो मोकळा..." वराची बहीण म्हणाली.

"ताई, पहिल्या भेटीत बंद खोलीत मी काय म्हणालो ते सांगितले तर नंतरच्या अनेक भेटीत बंद खोलीत झालेल्या चर्चाही सार्वजनिक कराव्या लागतील."

"म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी बाहेर गेल्यावर बंद खोलीत चर्चा करीत होतात म्हणायचे?" वराच्या बहिणीने विचारले.

"ताई, जिज्जू बंद खोलीत नुसत्या चर्चाच करायचे की अजूनही काही करायचे..."

"सालीसाहिबा, आमच्या बंद खोलीतील चर्चा ऐकण्यासाठी आपण का इतक्या आतुर आहात?" वराने विचारले आणि सारे हसत सुटले. तसा वर म्हणाला,

"मग काय होणाऱ्या बायकोबाई, काय हवे ते मागा. बंदा हाजिर है।"

"पुन्हा पुन्हा तेच तेच काय सांगू? मी न मागता, केवळ माझा होकार मिळावा म्हणून तू त्यादिवशी बंद खोलीत म्हणाला होतास की..." बोलताना वधू थांबल्याचे पाहून वराच्या बहिणीने विचारले,

"काय म्हणाला होता हा? तू न मागता ह्याने कोणती गोष्ट देण्याचे आश्वासन दिले होते?"

"हा.. हा... म्हणाला होता... यालाच विचार की... तुझ्या भावाला..."

"अरे, बाबा असे काय कबूल केले होते आणि ते दिले नाहीस ते..."

"ताई, मी बंद खोलीत दिलेले आश्वासन पंधरा दिवसात पूर्ण करतोय असे जाहीरपणे सांगतोय..." वर बोलत असताना वधू ओरडली,

"काही नको. सहा महिन्यात तू जे पूर्ण करु शकला नाहीस ते पंधरा दिवसात काय पूर्ण करणार."

"मला म्हणतेस आणि तू दिलेले वचन तरी कुठे तडीस नेते आहेस? माझे काय मी आत्ता या क्षणी माझे वचन पूर्ण करु शकतो. "

"रियली? मग मी काय मागे हटणार आहे? तू तुझे आश्वासन पूर्ण करताक्षणी मीही माझे वचन पूर्ण करीन..."

"बघ बरे. या इथे, या सर्वांसमोर एकमेकांना हार घालावेत त्याप्रमाणे..."

"हो...य! मी पळ काढणार नाही..."

"तर मग बंद खोलीत मी तुला दिलेल्या वचनाची ही पूर्ती! आणा रे ती फाइल..." असे वर म्हणताक्षणी त्याच्या एका मित्राने एक फाइल वराच्या हातात दिली. सर्वांची उत्सुकता ताणलेली पाहून वर म्हणाला,

"तर जानेमन, बंद खोलीतील ही वचनपूर्ती! मुंबई येथे एका उच्चभ्रू सोसायटीत सुसज्ज असलेली ही सदनिका तुला भेट... पहा आणि स्वतःच्या वचनपूर्तीसाठी तयार रहा..." वर असे म्हणत असताना वधूने त्याच्या हातातील ती फाइल जवळजवळ हिसकावून घेतली. त्यावर सरसरी नजर टाकत असताना तिचा आनंद जणू गगनात मावत नव्हता आणि तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नशिल्या नजरेने, मधाळपणे पाहत ती वराच्या दिशेने धावली. त्याला कडकडून मिठी मारत म्हणाली,

"आता माझी बारी... वचनपूर्ती... पण..."

"बंद खोलीत..." असे पुटपुटत वराने वधूला तसेच उचलले आणि ब्राह्मणाकडे बघत म्हणाला,

"गुरुजी, येतो आत्ता..."त्याने अर्धवट सोडलेले वाक्य अनेकांनी पूर्ण केले...

"बंद खोलीतील... चर्चेची सांगता करून..." तितक्यात ब्राह्मण म्हणाले,

"सावधान... आधी मंगलाष्टके पाठोपाठ अक्षता आणि मग बंद खोली..." गुरुजी तसे म्हणत असताना हास्याच्या स्फोटात वरवधू मागे वळले!       


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy