भुताटकी...
भुताटकी...
आज ओढ्याला खेकड्या पकडायला जायचं. आब्याच्या या वक्तव्यावर सर्वांनीच होकारार्थी री ओढली. आणि रात्रीचं खेकड्या धरायला जायचं हे पक्कं ठरलं. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आलो की आम्ही सर्वजण मराठी शाळेच्या कट्ट्यावर किंवा जागा मिळेल तिथे गप्पा मारत बसलेलो असायचो. चेष्टा मस्करी, एकमेकांना चिडवणे, इथपासून भांडण, राजकारण सर्व विषयावर गप्पा मारत असायचो. त्यावेळी सर्वांकडेच मोबाईल होते. मग एखाद्या दुसऱ्या मुलाकडे प्रियसी नावाची गोष्ट सुद्धा होतीच. पण तो काळ वेगळा होता. बियर प्यायली की बॉडी होते हा सुद्धा गैरसमज आमच्यात रूढ झालेला होता. मग कधीतरी बियर पिण्याचा सुद्धा योग यायचा. हो पण मजल मात्र फक्त बियर पर्यंतचीच होती बरं का. काही नग होते जे सिगारेट पण प्यायचे त्यापुढे उडी घेण्यासाठी अजून तरी कोणाच्यात हिम्मत नव्हती.
ठरल्याप्रमाणे साधारण अंधार पडायच्या वेळी आम्ही सुनमाळाच्या वाटेने खाली ओढ्याला आलो. नोव्हेंबर महिन्याची रात्र होती त्यामुळे थंडीने वातावरणात जोर धरला होता. दिवाळी कधीचीच उलटून गेली होती. सुनमाळाकडून खाली येताना एव्हाना पिवळसर झालेल्या गवतावर दव पडलेलं होतं. एकदाचे आम्ही ओढ्यावर आलो आता मात्र खरी कसरत सुरू झाली होती. तसं तर पाणी कमी झालेलं होत त्यामुळं पाण्यातून चालायला कसलीच अडचण नव्हती. पण एक एक दगड उलथून त्याखाली असलेल्या खेकड्या धरणं म्हणजे मोठं कौशल्य पाहिजे त्याला आमच्यातले दोन तीन जण या कामात माहीर होते मग काय माझं काम फक्त टेंभा हातात घेऊन यांना उजेड दाखवणं इतकंच होतं. जसजसे पुढे सरकत होतो तसतसं आमच्या पिशवीत एक एक खेकड येऊन पडत होती. आणि मनोमन सर्वचजण खुश होत होते.
अंधार चांगलाच पडला होता. रातकिड्यांचा आवाज आणि खळखळत्या पाण्याचा आवाज का कोणास ठाऊक पण बेसूर वाटत होता. मधूनच एखादी टिटवी टीव-टीव करत उडून जात होती. हळूहळू आम्ही स्मशानभूमी मागे सोडत धशीच्या खालच्या अंगाला येऊन पोहचलो होतो. वरच्या बाजूने येणारे दोन ओढे आणि त्यांच्या संगमापाशी आलेल्या उंचवट्याला भेदत पाण्याने त्या उंच भागाला एका बाजूने तोडत नेलं होतं म्हणून तिथे एक घळीसारखा आकार निर्माण झालेला होता. एका
बाजूने तुटलेल्या दरी सारखी धस निर्माण झाली होती म्हणून त्या जागेला धस म्हणायचे. तशी ती जागा बघताना भीतदायकच वाटायची पण आमची पोहण्यासाठीची ती सर्वात आवडीची जागा होती. आवडीची असली म्हणून काय झालं आजच्या अंधारात मात्र ती भयावहच वाटत होती.
सर्वच जण आपापल्या नादात चाललेलो होतो. आणि अचानक माझ्या अंगावर शहारा उमटला. कुठल्यातरी बाईच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने मी थोडा स्तब्ध झालो. काणांपासून काळजापर्यंत आणि काळजापासून मेंदूपर्यंत गेलेल्या त्या किंकाळीने डोक्याला मुंग्या आल्या होत्या पण आपण घाबरलो नाही असंच मी दाखवत होतो. पायात त्राणच राहिला नाही असं वाटून गेलं. आत्तापर्यंत गप्पा मारत पुढे चालणारे आम्ही आता शांततेत चाललो होतो. माझी तर भितेने पूर्ण गाळण झाली होती. आणि परत एकदा अगदी तशीच किंकाळी ऐकू आली. आता मात्र यांच्याशी बोलायला हवं पण सर्वजण आपल्याला वेडात काढणार म्हणून मी तसाच शांत राहीलो. थोड्या वेळांत जेंव्हा तिसऱ्या वेळी ती किंकाळी ऐकू आली तेंव्हा मात्र आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पहिलं. म्हणजे ती किंकाळी सर्वांनाच ऐकू येत होती. आत्तापर्यंत मी कसा घाबरत नाही या आविर्भावाची जागा भीतीने घेतली होती आणि तीच भीती आमच्या सर्वांच्या नजरेत स्पष्ट जाणवत होती. एकमेकांशी काहीच न बोलता फक्त इशाऱ्याच्या भाषेवर आम्ही पिपरी माळाची वाट धरली. आणि पिपरी माळाला येऊनच एकमेकांशी बोललो.
घरातले लोक रागावतील म्हणून गावात कुणालाही काहीच कळू द्यायचं नाही असं ठरवून आम्ही गावात शिरलो. गावात शिरल्यावर कळालं की कुणाचीतरी भांडणं चालली होती पण या कडे आम्ही लक्ष न देता आपापल्या घरात शिरलो. झोपायला मंदिरात आल्यानंतरही आमच्या मनावरच्या भीतीचं सावट कमी नव्हतं झालं. खेकड्यावर भुताटकी होते असं कोणीतरी सांगत होतं. इतक्यात दिप्या देवळात धाप टाकत आला आणि सांगू लागला की अरे मघाशी राधाबाईचा नवरा पिऊन तिला मारहान करत होता आणि म्हणून ती जोरजोरात ओरडत होती. म्हणजे तो किंचाळण्याचा आवाज राधाबाईचा होता तर.. हे ऐकल्यावर मात्र आम्ही एकमेकांना हसत होतो. पण या प्रसंगानंतर मात्र रात्री खेकड्या पकडायला जाण्याची हिम्मत कुणी केली नाही हे ही तितकंच खरं....