Nilesh Jadhav

Comedy Drama

3.9  

Nilesh Jadhav

Comedy Drama

बाळ्याचं फसलेलं प्रेम

बाळ्याचं फसलेलं प्रेम

3 mins
415


मी नववीत होतो तेंव्हाची ही गोष्ट. खरंतर गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्सा असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. मी, मच्या आणि बाळ्या वर्गातलं आमचं त्रिकुट कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही आम्ही आमच्याच विश्वात हरवलेलो असायचो. तसा संपूर्ण वर्ग हा खेळीमेळीने असायचा पण आमच्यातली गट्टी जरा जास्तच खास होती. आम्ही फारसे हुशार होतो असं अजिबात नव्हतं आणि ढ होतो असंही नव्हतं आम्ही आपले मधल्या फळीतले.. वर्गातील सो कॉल्ड हुशार मुलांमध्ये आमची वर्णी अध्याप तरी लागलेली नव्हती. आणि जे अभ्यासात कच्चे होते त्यांची तर बातच निराळी होती. असं असलं तरी आम्ही मात्र बॅक बेंचरच होतो हे मात्र नक्की. ढ मुलांकडे मास्तर लक्ष देत नव्हते आणि हुशार मुलं हुशार असल्याने त्यांचा विषयच नाही मग आम्हाला आणखी हुशार करायच्या नादात मास्तर मात्र हात साफ करून घेत होते.... 

      अभ्यासाचा विषय थोडासा बाजूला ठेऊन पुढं वळूयात... तर असे आम्ही तिघे नुकतेच किशोर वयातील आम्हाला प्रेमाचा अर्थ अध्याप तरी कळाला नव्हताच पण आपणही कोणावर तरी प्रेम करावं असं मात्र वाटत होतं. आमच्यातलं बाळ्या ऐका मुलीवर लाईन टाकत होतं. दिसायला सावळीच होती पण सुंदर होती, बोलक्या डोळ्यांची. एकदम साधी आणि सिंपल एखाद्या टिपिकल मुलाच्या स्वप्नातील स्वप्नसुंदरीच जणू.. स्वभावही शांतच होता तिचा.. सरळ भाषेत सांगायचं झालं तर भारी होती...

आयला तुम्ही म्हणाल की तूच लाईन टाकत असल्यासारखं तिचं वर्णन करत आहेस अहो पण असं काहीच नाही. ती बाळ्याचीच होती. आणि तसंही असे गैरसमज होतात माझ्याबाबतीत. मस्त मागच्या बेंच वर बसून बाळ्या तिच्याकडे बघत असायचा. ती कधी त्याच्याकडे बघत होती की नाही हे नाही सांगता येणार मला कारण मी कधी तिकडे बघत नव्हतो. अरे..! खरंच बघत नव्हतो. परत गैरसमज नको.

      एव्हाना जुलै महिना संपला होता. ऑगस्ट उजाडला होता. मस्त पावसाचे दिवस होते. गावाकडे जास्त पाऊस असतो म्हणून मैदानात खेळ खेळणं तसं अवघडच मग जेवणाच्या सुट्टीत व्हरांड्यातच धिंगाणा चालायचा. अगदी मारामारी पासून याला त्याला चिडवणे इथपर्यंत सर्वच काही. धो धो पाऊस पडत असताना मराठीच्या मास्तरांनी शिकवलेला धडा म्हणजे क्या बात.. अर्थात मला तरी भारीच फिल व्हायचं या वेळी म्हणूनच किमान एवढं तरी लिहू शकतोय ना.. विषय परत भरकटला का अरे कथेचा नायक बाळ्या आहे ना... मच्या आणि मी साईड हिरो आहोत. हो तर पावसाचे दिवस होते आता ऑगस्ट सरत चाललेला आणि त्या दिवशी रक्षाबंधन होतं. शाळेत रक्षाबंधन होत असतं पण ते संध्याकाळी सुटण्याच्या वेळी. पण वर्गात असा काही राडा होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. 

      एक दोन तास गेल्यानंतर मधेच एक तास ऑफ होता. ऑफ तास म्हंटलं की नुसताच धिंगाणा अशातच ती मुलगी उठली हातात राख्या घेऊन सरळ मुलांच्या बेंच कडे मोर्चा घेत ठराविक 2-3 मुलांना म्हणाली मला तुम्हाला राखी बांधायची आहे. त्यात आघाडीवर होता आपला बाळ्या कारण ती पहिल्यांदा त्याच्याकडेच आली होती. यापैकी सर्व जण तिला नाही म्हणून मोकळे झाले. ती परत जागेवर जाऊन बसली आणि मोठ्याने रडू लागली. खरंतर आमच्या वर्गातील आमच्या गावच्या एका मुलीला आमच्या बोलण्यातून बाळ्याचा विषय कळाला होता. वर्गात मुलामुलींचं कधी पटत नव्हतं त्यातूनच घेतलेला हा बदला. त्या मुलीने आणि इतर मुलींनी मिळून बाळ्याच्या लाईन ला भडकावून द्यायचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला होता. एव्हाना अख्या वर्गात ती मुलगी रडतेय हे समजलं होतं. इकडे मी आणि मच्या बाळ्याला म्हणालो काय राव ती तुझ्यामुळे रडतीये.. अमुक-तमुक बरंच काही आम्ही बाळाच्या कानात भरलं हो पण यात कुठलाच स्वार्थ नव्हता त्या अल्लड वयात जे आम्हाला वाटलं तेच आम्ही बाळ्याला सांगत होतो. त्यात कसलीच ईर्षा नव्हती कुठलीच खुन्नस नव्हती हे मात्र तितकंच खरं आहे. ती मुलगी रडत होती इतर मुली तिला चिडवत होत्या आणि आम्ही दोघे बाळ्याला कानमंत्र देत होतो. अशातच बाळ्या उठला त्या मुलीला आवाज देत तो तिला म्हणाला बांध मला राखी. तिनेही क्षणाचा विलंब न करता येऊन त्याला राखी बांधली. सर्वच जण अवाक होऊन पहात होते. आमच्या मित्राचा अपमान होतोय हे आम्हाला कळत नव्हतं. बाकीची पोरं हसत होती आणि पोरींच्या चेहऱ्यावर काहीतरी जिंकल्याचं समाधान होतं. एकंदरीत काय घडलं हे कळायला थोडा वेळ गेला पण त्या नंतर आम्ही बाळ्याला चिडवत होतो आणि बाळ्या आमच्या मागे पळत होता...

       असा हा अल्लड वयातील अल्लड प्रेमाचा शेवट. आमच्या बाळ्याचं फसलेलं प्रेम.. आजही हा किस्सा आठवला की मनोमन खूप हसू येतं. शाळेतील असे काही छोटे मोठे प्रसंग आणि त्यांच्या आठवणी आयुष्याला पुरतील अशाच आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात असते अशी शाळेतील ती.. तुमच्याही असेल...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy