Nilesh Jadhav

Drama

4.0  

Nilesh Jadhav

Drama

ती आणि माझा चस्मा

ती आणि माझा चस्मा

5 mins
256


         साधारण नुकतेच मोबाईल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचले होते तो हा काळ. माझी बारावी झाली आणि मी जॉब करू लागलो. जॉब करून चार पैसे गाठीला ठेऊन पुढे काहीतरी करायचं हाच मानस बाळगून दिवस ढकलत होतो. कंपनीमध्ये बहुतांशी मुलांकडे मोबाईल होते. मलाही मोबाईलचं आकर्षण होतंच यात नवल वाटावं असं काही नाही. कारण मोबाईल असणं हे त्यावेळी ट्रेंडिंगला होतं. तसं माझं शिक्षण हे गावाला झालं होतं म्हणून माझ्या वागण्यात थोडासा गावरान टच असायचा. आता कुठे कपड्यांची स्टाईल वगैरे गोष्टी कळू लागल्या होत्या. कॉलेज मध्ये असताना एकाच मुलीवर खूप प्रेम करणं असल्या काही गोष्टी आपसूकच मागे सुटत चालल्या होत्या. कारण आता कंपनीतील काही मुलांचे त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर मोबाईलवर चालले संवाद ऐकायला मिळत होते. सहा सात महिन्यानंतर मी सुद्धा एक मोबाईल घेतला होता. खरंतर कॉलदर न परवडण्यासारखेच असायचे पण लोकांच्या संपर्कात राहू लागलो होतो ही बाब चांगली होती. याच मोबाईल मुळे माझीही ऐका मुलीबरोबर ओळख झाली होती. आता कुठे तुम्हाला वाटलं असेल की अरे आला बाबा हा एकदाचा मुद्यावर हो ना. मी लिहिलेली कथा प्रेमकथाच असणार याबद्दल शंकाच नाही...


      आतापर्यंत अगदी कमी बोलणारा मी आता मात्र बाहेरच्या जगाशी समजवता करू लागलो होतो. नवीन मित्र मिळत होते ओळखी होत होत्या आणि बोलतानाही मी सहसा कचरत नव्हतो. नव्वदीच्या दशकात बालपण एकदम मस्त गेलेला मी एकविसाव्या शतकाशी हातमिळवणी करत होतो. नुकत्याच फुटत चाललेल्या मिशा माझ्याही चेहऱ्यावर साजेश्या दिसू लागल्या होत्या. अशातच मुलींबद्दल वाटणारं आकर्षण काही नवीन नाही. तसा मी फारसा मुलींशी बोलत नसायचो हो पण जी मुलगी आवडायची तिच्याशी मी कधीचाच बोलून मोकळा झालो होतो तिच्याकडून मला नकार मिळाला ही गोष्ट वेगळी पण माझ्यातही मुलींशी डायरेक्टली बोलायची थोडीशी हिम्मत आहे हे मला माहिती झालं होतं. पुन्हा विषय थोडासा बारगळला का..? येतो मुद्यावर...


तर झालं असं की एकदा मी गावी गेलो होतो. तेंव्हा माझ्या एका चुलत बहिणीने तिच्या मैत्रिणीला माझ्या मोबाईल वरून कॉल केला होता. त्या मुलीचा नंबर माझ्या कॉललिस्ट मध्ये तसाच होता. आपल्यालाही एखादी मैत्रीण असावी मनोमन असा विचार करून मी तिला कॉल केला आणि तिच्याकडे माझ्याशी मैत्री करशील का अशी रिक्वेस्ट केली. तसा तर मी घाबरलो होतोच पण तरीही हिम्मत केली. ती सुद्धा जास्त काही न बोलता म्हणाली की मी उद्या सांगते. एवढं सर्व होईपर्यंत मी तिला सांगितलं नव्हतं की मी कोणाचा भाऊ आहे ते. दुसऱ्या दिवशी तिचा मला फोन आला आणि ती मला चक्क मैत्रीसाठी हो म्हणाली होती. 


    नंतर मी तिला सर्व खरं सांगितलं की मी कोणाचा भाऊ आहे, तिचा नंबर माझ्याकडे कसा आला वगैरे. नंतर आमच्यात छान मैत्री जमून आली. रोज फोनवर बोलणं चालू झालं होतं. वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करत होतो. बघता बघता दिवस पुढे जात होते आणि एक दिवस ती मला म्हणाली की आपलं नातं इथेच रहाणार आहे की पुढे पण जाणार आहे. तिच्या मनात काय आहे ते मी ओळखलं होतं पण बोलणाऱ्यातला मी सुद्धा नव्हतो. पण तरीही मी तिला म्हंटलं आपण एकदा भेटुयात का..? भेटून एकमेकांना समजून घेऊ आणि मग ठरवू. खरंतर प्रेम ही गोष्ट ठरवून होत नसतेच पण तरीही मला तिला एकदा भेटायचं होतं. ही गोष्ट तिनेही मान्य केली आणि आम्ही भेटायचं ठरवलं.


     ठरलेल्या दिवशी मी तिला भेटायला गेलो पण या आधी मी तिला कधीच पहिलं नव्हतं. आमची भेट ऐका मंदिरापाशी होणार होती खूप पर्यटक असल्यामुळे नेमकी ती कोण आहे हे ओळखणं कठीणच होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला मस्त बाग होती त्याच बागेत पर्यटकांची रेलचेल असायची आम्ही पण तिथेच भेटणार होतो. मस्त इस्त्रीचे कपडे, पायात बूट, आणि डोळ्यांवर नेहमीचा चस्मा असणारा मी मंदिराच्या दाराशी येऊन पोहचलो होतो. तिथूनच मी तिला फोन केला आणि ती कुठे उभी आहे आणि तिने कुठल्या रंगाची कपडे घातलेली आहेत हे मी विचारून घेतलं. मला मात्र तिला माझा पोशाख कसा आहे हे तिला सांगितलं नव्हतं. तिने सांगितलेल्या वर्णनानुसार मी मंदिराच्या मागच्या बाजूला नजर फिरवली. ऐका झाडाखाली पिवळ्या ड्रेस मधील पाठमोरी उभी असलेली ती मला दिसली पण ही ती तीच आहे का हे जाणून घेण्यासाठी मी तिला पुन्हा एकदा कॉल केला. तिने कॉल रिसिव्ह केला आणि माझी खात्री झाली की ही ती तीच आहे. मी तसाच फोनवर बोलत बोलत तिच्या जवळ जात होतो. तितक्यात ती म्हणाली "एवढ्या जवळ येऊन सुद्धा फोनवरच बोलणार आहेस का..?" क्षणभर मी भांबावलो होतो. म्हणजे माझ्या आधीच तिने मला हेरलं होतं. मी दबक्या पावलाने आणखी जवळ गेलो आणि ती मागे वळाली..

" हाय निलेश..! मी अश्विनी "


तिच्या या वाक्यावर मी थोडासा स्थब्ध झालो होतो. थोडीशी सावळीच होती पण नाकी डोळी छान होती. रंगाने जरी सावळी असली तरीही दिसायला मात्र सुंदर होती. माझी नजर तिच्या नजरेतून तिच्या मनाचा ठाव घेत होती. धनुष्याकृती तिच्या ओठांची हालचाल माझ्या मनाची धडधड वाढवत होती. तिने पुढे केलेल्या हातात मी धडधडत्या काळजाने माझा हात दिला आणि शहारून गेलो. लहानपणीचे खेळ सोडले तर तारुण्यात प्रवेश केल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीचा हात हातात घेत होतो. 

"तू मला आधीच ओळखलं होतंस का?" मी तिला म्हणालो

"हो..! जेंव्हा तू आलास आणि मला फोन केलास तेंव्हाच मी तुला ओळखलं होतं" थोडंस ओठांच्या पाकळीत हसत ती बोलली. 


       आमच्या दोघात पुन्हा एकदा शांतता निर्माण झाली होती. मनात असंख्य विचार येत होते. खरतर ही मुलगी समंजस होती, सुंदरही होतीच पण मनात योजलेल्या स्वप्नसुंदरी सारखी ती मला भासत नव्हती. तिचं बोलणंही खूप छान होतं तरीही मी आणखी काहीतरी शोधत होतो. नेमकं काय..? तेच तर मला सापडत नव्हतं. का कोणास ठाऊक पण ती मला आवडली नव्हती.

"ये चल आपण त्या बाकावर बसूयात" मनात असंख्य विचारांची कोलाहल चालू असलेला मी तिच्या आवाजाने खडबडून जागा झालो. मग आम्ही तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलो. या सर्वात मी तिला हे ही सांगितलं की माझ्या मनात जी स्वप्नसुंदरी आहे तशी तू नाहीस वगैरे वगैरे. मी तिला म्हंटलं होतं की मला वाटलं तू खूप भारी असशील पण तशी तू प्रत्येक्षात नाहीस. माझ्या अशा तडकीफड बोलण्याचा खरंतर तिला रागच आला असेल पण त्यावेळी तिने ते सर्व सावरून नेलं होतं. मी असाच होतो आणि म्हणूनच कदाचित याच्यानंतरही मला समजून घेणं कोणाला जमलं नसेल कदाचित. पण त्या वेळी त्या क्षणी मला जे वाटलं ते मी बोललो होतो. मान्य आहे मला की तिला मी प्रपोज करेल अशीच अपेक्षा ठेऊन ती मला भेटायला आली होती. पण तिची नाराजगी तिने दाखवली नव्हती हे त्याहून खरं. आमची मैत्री मात्र या पुढेही कायम राहिली होती.


       त्या दिवशी आम्ही एकमेकांना भेटून घरी निघायच्या तयारीत असतानाच मी तिला विचारलं "तुला माझ्यातलं काय आवडलं गं..!" यावर ती मिश्किलपणे हसत मला म्हणाली होती "अरे मलाही तू तितकासा नाही आवडलास पण हा..! तुझा चस्मा छान आहे आ.." तिच्या अशा बोलण्यावर मला खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. मी जे काही तिच्याशी बोललो होतो त्याचा बदला तिने बरोबर घेतला होता. आजही जेव्हा कधी मी नवीन चष्म्याची फ्रेम घ्यायला जातो तेंव्हा मला ती आठवून जाते आणि मनोमन एक हसू उमटतं... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama